मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २२) – ‘सुरसकथा’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २२) – ‘सुरसकथा’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

वाद्यवर्गीकरणपद्धतीनुसार वाद्यांचे विभाजन कोणत्या प्रकारांमधे होते हे आपण गेल्या दोन-तीन भागांत पाहिले. वाद्यांच्या बाबतीत आणखी थोडा मागोवा घेत गेलो तर जुन्या ग्रंथकारांच्या कृपेने काही मनोरंजक गोष्टी हाती लागतात. भगवान शंकरांचा डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य मानलं गेलं आहे. त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर शंभू महादेव नृत्य करू लागले. त्याला तालसंगत करण्यासाठी ब्रम्हदेवाने एका अवनद्ध वाद्याची निर्मिती केली. त्याचा वाजवायचा भाग अर्थातच कातड्यानं मढवलेला होता. मात्र ढाचा मातीचा होता म्हणून त्या वाद्याला मृद्‌+अंग म्हणजे मृदंग म्हटलं गेलं. शिवपुत्र श्रीगणेशांनी हे वाद्य त्यावेळी वाजवलं. मृदंगाच्या उत्पत्तीची अशीआख्यायिका आहे. आणखी एका कथेनुसार वृत्तासुराला मारल्यानंतर आनंदित झालेले भगवान शंकर तांडवनृत्य करू लागले. त्यांच्या नृत्याला तालसंगत करण्यासाठी गणपतीने जमिनीत एक खड्डा खणला, त्यावर मृत वृत्तासुराचं कातडं पांघरलं आणि त्यावर तो ताल वाजवू लागला.

भगवान शंकरांच्याच बाबतीत आणखी एक कथा आढळून येते. ते कैलास पर्वतावर तप करत असताना मुरजासुर नावाच्या राक्षसाने त्यांना त्रास देऊन त्यांचा तपोभंग केला. त्यामुळं क्रोधित झालेल्या शंकरांचं त्याच्याशी तुंबळ युद्ध होऊन त्यात मुरजासुर मारला गेला. हात-पाय-मुंडकं तुटलेल्या अवस्थेतलं त्याचं शव तिथून गिधाडांनी उचलून नेलं. त्यांनी ते पंजांत धरून त्यातलं मांस बऱ्यापैकी खाल्लं. मात्र जास्ती वजनामुळं ते शरीर त्यांच्या पंजातून सुटून खाली एका झाडावर पडलं. काही काळानंतर ते शरीर पूर्ण वाळून त्याचा फक्त वाळक्या ताठरलेल्या कातड्याचा पोकळ सांगाडा झाडावर शिल्लक राहिला.

एके दिवशी जोरात वारं सुटल्यामुळं झाड्याच्या फांद्या त्या कातड्यावर आपटून सुंदर नाद निर्माण होऊ लागला. वनभ्रमण करत असलेल्या शंकरांनी तो सुंदर नाद ऐकला आणि उत्सुकतेपोटी त्या आवाजाच्या दिशेने येत त्या झाडाजवळ पोहोचले. ते कातडं पाहून त्यांना घडलेली सगळी घटना आठवली. त्यांनी त्या कातडी ढाचाच्या एका बाजूला डाव्या हातानं आघात केल्यावर ‘ता’ हा बोल उत्पन्न झाला आणि दुसऱ्या बाजूला उजव्या हाताच्या आघाताने ‘घी’ हा बोल उत्पन्न झाला. त्यापुढंही ते दोन्ही हातांनी त्यावर आघात करत राहिले तसे वेगवेगळे बोल उत्पन्न झाले. थोड्यावेळानं शंकर तिथून निघून गेले.

त्यानंतर एकदा ते पार्वतीसोबत पर्णकुटीत बसले असताना पावसाचे थेंब कुटीच्या वाळलेल्या पानांवर पडू लागले तसा सुंदर नाद उत्पन्न झाला. तो नाद पार्वतीला खूपच आवडल्यानं तिनं शंकरांना विनंती केली कि त्यांनी अशा प्रकारचं काही वाद्य तयार करावं ज्यातून अशा सुंदर नादांची निर्मिती होईल. तेव्हां त्यांनी तिला मुरजासुराची कथा सांगितली आणि त्यातून उत्पन्न होणऱ्या विविध वर्णांचं विस्तृत वर्णन केलं. पुढं असं जे अवनद्ध वाद्य अस्तित्वात आलं त्याला ‘मुरज’ हे नाव मिळालं. मात्र दुसऱ्या एका ग्रंथातील वर्णनानुसार ‘मर्दल’ नावाच्या वाद्याची निर्मिती ही ‘मुरज’ नावाच्या राक्षसाच्या मृत शरीरातून झाली आणि ती श्रीकृष्णांनी केली.

अवनद्ध वाद्यांची माहिती घेताना सरोवरातील कमळाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे निर्माण होणारा कर्णप्रिय नाद ऐकून स्वाती नामक ऋषींना तालवाद्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली हे आपण पाहिलं. त्यापुढची कथा म्हणजे तो सुंदर नाद त्यांनी आपल्या मनात अगदी साठवून घेतला आणि मग ते आपल्या आश्रमात परतले. तिथं त्यांनी विश्वकर्म्याला हा वृत्तांत सांगून त्या सुंदर नादाचं वर्णनही केलं आणि त्याला असा नाद निर्माण करणारं वाद्य तयार करायला सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या नादांचं वर्णन मनात ठेवून तसे नाद निर्माण होतील असं मातीचा ढाचा असलेलं जे वाद्य विश्वकर्मानं तयार केलं ते ‘पुष्कर’ ह्या नावानं ओळखलं गेलं. कालमानानुसार ह्याच वाद्याच्या आधाराने लाकूड, धातू इ.. गोष्टींचा वापर करत प्रयोग होत राहिले आणि त्यातूनच मृदंग, पटह, दर्दुर अशा वाद्यांची निर्मिती  झाली.

रामायणकाळात आजच्या रागसंगीतासारख्या शैलीला गंधर्वगान म्हटलं जायचं. प्रभू श्रीरामचंद्र स्वत: गंधर्वगानप्रवीण होते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र लव-कुशही संगीतज्ञ असल्याचा उल्लेख आढळतो. रावणही मोठा संगीतज्ञ होता. त्यानं निर्माण केलेल्या रावणास्त्र किंवा रावणहस्त ह्या तंतुवाद्याचा उल्लेख प्राचीन वाद्यांमधे आढळून येतो. लंका आणि भारताच्या काही भागात आजही हे वाद्य कालानुसार होत गेलेल्या परिवर्तित स्वरूपात उपलब्ध आहे. वीणेच्या प्रकारांमधेही ‘रावणी’ नावाच्या वीणेचा उल्लेख आढळतो. आपल्याकडील राजस्थान प्रांतातलं रावणहाथा हे वाद्य ह्याच ‘रावणहस्त’चं परिवर्तित रुपडं असावं जे पुढं आजच्या सुप्रसिद्ध व्हायोलिन ह्या वाद्याचा आधार मानलं जातं.

भगवान श्रीकृष्णांच्या केवळ मानवालाच नाही तर निसर्गातील प्रत्येक पशु-पक्षी, वृक्षवेलींना किंबहुना अवघ्या विश्वालाच संमोहित करणाऱ्या जादुई बासरीवादनाविषयी तर आपल्याला कितीतरी सुरस कथा वाचायला मिळतात. श्रीकृष्ण हे महान संगीतज्ञ होते आणि त्यांच्यासारखा श्रेष्ठ बासरीवादक पुन्हा कधीच पृथ्वीवर अवतरला नाही. महाभारतात उल्लेखिलेले श्रीकृष्णाचा ‘पांचजन्य’नामक शंख आणि अर्जुनाचा ‘देवदत्त’नामक शंख हे मुख्यत्वे युद्धाच्यावेळी काही संकेत देण्यासाठी वापरले गेले तेही एक प्रकारचं सुषीर वाद्यच! जसे श्रीकृष्ण सर्वोत्तम बासरीवादक तसाच अर्जुन हा सर्वोत्कृष्ट वीणावादक असल्याचं मानलं जातं. अर्जुनही उत्तम संगीतज्ञ होता. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात अर्जुनानं बृहन्नडा नावानं स्त्रीरूप धारण करून विराट राजाची कन्या उत्तरा हिला संगीतशिक्षण देण्याचं काम पत्करलं होतं. अर्जुनाचं वीणावादनही समोरच्याला भान विसरायला लावायचं आणि ह्या कालखंडातील संगीताच्या विकासाचं मोठं श्रेय अर्जुनाकडं जातं, असं मानलं गेलं आहे.

बनारस घराण्याचे शहनाईवादक शहनाईची उत्पत्ती श्रीमहादेवांच्याच शृंग किंवा सींग ह्या सुषीर वाद्यातून झाली असं मानतात. ह्या वाद्याचं वादन पहिल्यांदा शिव-पार्वतीमीलनाच्या शुभसमयी झाल्याचंही मानलं जातं.  विवाहादि शुभकार्यप्रसंगी शहनाईवादनाची प्रथा आजतागायत आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीचं मूळ दर्शविणारी ही कथा जुन्या ग्रंथांमधे आढळून येते.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆ 

शब्दांच्याही पल्याड असते माझी कविता

केवळ रसिकालाही दिसते माझी कविता

दिसते म्हणजे तशीच असते असेही नाही

आभासाच्या  गावी वसते माझी कविता.

?  ?  ?  ?

मी शब्दांसंगे अविरत भांडत असतो

अन् अर्थांचा मी काथ्या कांडत असतो

जे मुशीतुनी तावून सुलाखून निघते

ते कांचन मी बाजारी मांडत असतो.

               –  इलाही जमादार  

अशी असावी कविता, फिरून

तशी नसावी कविता, म्हणून

सांगावया कोण तुम्ही, कवीला

आहात मोठे ?–पुसतो तुम्हाला.

      – कवी   केशवसुत.

असे कितीतरी नामवंत कवी आणि त्यांच्या कवितांचा उल्लेख करता येईल.

‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings’ हे William Wordsworth यांचे सुप्रसिद्ध  विधानही आपणा सर्वांना माहित आहे. या सर्वांचा उल्लेख आज करण्याचे कारण म्हणजे आज जागतिक कविता दिन साजरा होत आहे.

साहित्यातील काव्यप्रकाराचा सन्मान करण्याचा आजचा दिवस ! युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आणि 21/03/1999 पासून दरवर्षी 21 मार्च जागतिक कविता दिन म्हणून साजरा होऊ लागला. “कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते” असे युनेस्कोच्या महासचिवानी म्हटले आहे. भाषिक विविधतेला समर्थन आणि लुप्त झालेल्या भाषा ऐकण्याची  संधी  उपलब्ध करून देणे हा ही यामागचा उद्देश आहे. युनेस्कोने आपल्या जाहीरनाम्यात “to give fresh recognition and impetus to National, Regional and International poetry movements” असे म्हटले आहे.

आजचा दिवस म्हणजे जगातील  सर्व कवी, कवयित्री आणि काव्यप्रेमी रसिक यांच्या सन्मानाचा दिवस! चला,आपण सर्वजण त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काव्यरसाच हा मधुघट काठोकाठ भरून ठेवूया.

संकलन 

श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ती, स्वप्न, आणि पणती ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

☆ विविधा ☆ ती, स्वप्न, आणि पणती ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

अंधार  सरेल,उजाडेल आणि सार लख्ख प्रकाशमान होईल. मग सार मळभ सरून आसमंत स्वच्छ दिसेल. हवं ते मिळेल आपल्याला. मग येईल समाधानान जगता.  म्हणून तिने प्रसन्न मनाने खूप प्रतिक्षा केली. वाट पाहून पाहून ती थकली, कंटाळली, अखेर वैतागली.

असा अंधाराचा अंदाज घेत कसं, किती आणि कुठवर जायच ? पण आशा मनाची,मरत नव्हती.‌सरत नव्हती. चाचपडत चाचपडत जगताना मनात धैर्य ठेऊन वावरताना तिला एक पर्यायी तेजाची ठिणगी असणारी पणती सापडली. खूप आनंद  झाला तिला. आता आपल्या या अंधारलेल्या वाटेवर थोडाफार  प्रकाश  पडेल. अडखळत चालणं संपेल. आश्वासक  पावलं टाकता येतील आयुष्याच्या वाटेवर. म्हणून तिने ती पणती  हळुवार  हातात घेतली.  पदराआड लपवली. पणती अधीक तेजाळली. आकर्षक व मोहमयी दिसू लागली. आशाळभूत होऊन  लाचावली ती.  तिने आपले लालचुटूक महतप्रयासान जपून ठेवलेले ओठ पदराआडच पणतीच्या प्रखर ज्योती जवळ नेले. तिला दाह जणवला. ती मुळीच घाबरली नाही. मन मात्र खंबीर ठेवून ती ज्योतीला म्हणाली.

“आता तूच काय तो माझा भक्कम आधार  आहेस माझ्या पुढच्या अंधारलेल्या आयुष्यात”.

पणती  परकीय होऊन हलकेच  हसल्याचा भास झाला तिला. ती सुखावली मनातून.  तिला वाटलं   पणतीच्या प्रकाशात पुढची सारी जीवनवाट प्रकाशमय  होऊन न्हाऊन निघेल, वाटनिश्चीत करून मिळणा-या सांद्रमंद  प्रकाशात  ती पुढे पुढे  निर्वेधपणे

चालतं राहिली. पुढे जाण्यापुरता सहवासाचा उजेड मिळतोय याचाच आनंद  तिला समाधान देत होता. तोच उजेडाची स्वप्न  रंगवायला साथ देणार होता तिला.  आनंदाने अंगभर नटलेली ती स्वप्नसुखाच्या राजरस्त्यावर

पुढे पुढे चालत असताना तिच्या मागे अंधाराची जडशीळ पावले पाठलाग करत येत आहेत याचे भानच राहीले नाही तिला. तो अंधार तिच्या नकळत तिच्या

साम्राज्यात  पुन्हा  प्रवेश करणार होता. हे तिला उमजलच नाही. करण ती स्वप्नं पहाण्यात  रंगुन गेली होती.

ती बेसावध असताना अचानक पाठीमागून  तिच्या डोक्यावर जबरदस्त तडाखा बसला. हातातील  पणती हातातून   गळून पडली. फुठली. तिचे तुकडे इतस्ततः विखरून गेले. तेजोमय प्रखरतेने जळणारी प्रकाश देणारी

वात  बाजुला पडली. वात काही काळ धुपली. मग सावकाश  शांत  झाली. आणि निपचित  पडलेल्या तिच्या स्वप्नाळू विश्वा भोवती अंधाराने आपला अंमल सुरू केला.तिला त्या अंधारात  किती लागल, ती शुद्धिवर आली की तशीच संपून गेली. हे कुणाला कधीच  कळणार नव्हत.कारण हे सारं घडलं होतं अंधारात, आणि अंधाराला कुठे डोळे असतात. पुन्हा जे घडतंय ते पहाण्या साठी. आता ती, तिची स्वप्न, ती पणती, आणि पणतीत जळणारी वात काळोखाच्या खोल खोल डोहात कायमची समाधीस्थ होऊन गेली आहेत.

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी ☆ श्री चंद्रकांत बर्वे

 ☆ विविधा ☆ सेल्फी ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆ 

बार्गेनिंग  

आजकाल जिला शॉपिंगची आवड नाही अशी बाई लाखात एक असेल. मला काही लाख बायकांचा अनुभव नाही पण आपलं लिहायचं म्हणून लिहिलं. असो! हां तशी माझी बायको जरी लाखात एक असली तरी शॉपिंगची आवड नसलेली ‘ती’  नव्हे. हां तर आम्ही कुठेही म्हणजे बाहेरगावी, मॉलमध्ये  किंवा परदेशी गेलो तर ती शॉपिंग हे करतेच करते. हरकत नाही, पण पुढे जे सुनावते ते साधारणपणे असं असतं. उदाहरणार्थ: ही पर्स बघितली?  मी कौतुकाने बघतो. “किती  रुपयाला घेतली असेन?”  हा प्रश्न कठीण असतो कारण मला एक किमतीचा अंदाज सांगायचा असतो. मी सांगितलेला अंदाज जर जास्त असेल तर हरकत नाही पण मी जर कमी सांगितली तर “तुला यातलं काही कळत नाही” असं ऐकावं लागतं. मी अशा वेळी उत्तर न देता ती वस्तू जास्त वेळ न्याहाळत बसतो आणि चेहऱ्यावर आवडल्याचे भाव मात्र आणतोच आणतो. मग तीच सांगते फक्त आठशे रुपये. मला तो खर्च जरी जास्त वाटला तरी मी तो माझ्या बोलण्यातून कळू देत नाही. आता ८०० रु देऊन पर्स घेतली एवढ सांगितलं असतं तरी चाललं असतं, पण नाही. फक्त या शब्दावर जोर देऊन ती सांगते. ती पुढे असं सांगते कि तो दुकानदार आधी बाराशे रुपये सांगत होता वगैरे. त्या दुकानदाराच काय जातय, तो आपल्या मालाची किंमत ‘वाट्टेल ती सांगेल’  असा माझ्या मनात आलेला विचार मी मनातच ठेवतो. थोडक्यात म्हणजे “मी बार्गेन करून स्वस्तात मिळवली” असा तिचा दावा असतो आणि मग ती लगेच आता गेल्या महिन्यात हॉटेल वेस्टइन मध्ये आपण गेलो होतो तेव्हा अगदी अशी पर्स मी तिथे शोकेस मध्ये अडीच हजार रुपयांना पहिली होती अशी अतिरिक्त माहिती पुरवते. सरतेशेवटी निष्कर्ष म्हणजे ती बार्गेन करण्यात हुशार आहे आणि बार्गेन म्हटलं की मी एकदम माझ्या फ्लॅशबॅक मध्ये जातो.

वेल, १९७९ साली मी महिनाभर दिल्लीला आकाशवाणीच्या ट्रेनिंग साठी गेलो होतो. आम्हा महाराष्ट्रातील प्रोड्युसर मंडळींचा प्रसिद्ध न्यूज रीडर नंदकुमार कारखानीस दिल्लीतील फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाईड असायचा. मी करोलबागेत राहत होतो तिथले अजमल खान रोडवरचे मार्केट प्रसिद्ध. तिथे वाट्टेल ते मिळतं आणि स्वस्त मिळतं म्हणे. हां पण बार्गेन करावे लागतं. नंदकुमारने मला स्पष्ट सल्ला दिला “तो रस्त्यावरचा फेरीवाला जी किंमत सांगेल त्याच्या अर्ध्या पेक्षा कमी किमतीला ती वस्तू घ्यायची, अर्ध्या किमतीला सुद्धा नाही”. मी त्याचा सल्ला लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी मार्केट पहात फिरत होतो. एके ठिकाणी काही टीशर्ट्स छान दिसले. मला आवडले. मी पाहू लागलो. तो फेरीवाला म्हणाला ६५ रु.चा आहे पण तुम्हाला म्हणून मी ६० रुपयात देतो. मला ती किंमत जरा जास्त वाटली. मी काहीच बोललो नाही. तो एकदम गाडी चौथ्या गिअर वरून एकदम दुसऱ्या गिअर मध्ये टाकावी अशा थाटात म्हणाला चला ५० रुपयात घेऊन टाका. मी म्हटलं छे छे फार जास्त किंमत सांगताय. त्यावर तो म्हणाला टीशर्ट निट बघा तर खरं. माझ्या हातात त्याने टीशर्ट कोंबला. टीशर्ट होता छान,  पण मी न घेता निघण्याचा अभिनय करू लागलो. मग त्याने सरळ मला विचारले किती रुपयाला घेणार? त्याने बॉल माझ्या कोर्टात टाकला. मला गाडी पहिल्या गिअर मध्ये टाकणं आलं. मला नंद्कुमारचा सल्ला आठवला. “फेरीवाला जी किंमत सांगेल त्याच्या अर्ध्या पेक्षा कमी किमतीला ती वस्तू घ्यायची, अर्ध्या किमतीला सुद्धा नाही” मग मी मन घट्ट करून ६५ च्या निम्मे साडेबत्तीस हे लक्षात घेऊन सरळ ३० रुपये किंमत सांगितली. मग तो म्हणाला हे तुम्ही फारच कमी सांगताय, आम्हालासुद्धा या किंमतीत हे मिळत नाही वगैरे. मग मी ३५ रुपयाला तयार झालो. तोही उपकार केल्यासारखा तयार झाला. मी ते टीशर्ट्स पाहू लागलो, त्यातले दोन टीशर्टस मला आवडले. कुठला घेऊ या विचारात पडलो. तो दोन्ही घ्या म्हणाला पण ‘मला एकच हवाय’ असे म्हणून मी त्यातला एक घेतला. पैसे दिले. मी मनातून आपल्याला बार्गेनिंग येतं अस सर्टिफिकेट घेऊन निघालो. मग तो म्हणाला की हा दुसरा टीशर्ट देखील तुमच्या गोऱ्या रंगावर छान उठून दिसेल. मी त्याच्याकडून माल घेतल्याने त्याला माझा गोरा रंग दिसला बरका! (आणखी खरेदी केली असती तर माझे काळे केस, नंतर सरळ नाक देखील दिसले असते) मी देखील नुसते स्मित केलं आणि जाऊ लागलो तर तो म्हणाला हा दुसरा टीशर्ट मी तुम्हाला ३० रुपयाला देतो. माझा बार्गेनिंगचा आनंद जरा कमी झाला, पण मी नको म्हणून निघालो, त्याने मग मला ठीक है तो फिर मै आपके लिये २५ रुपयेमे देनेको तैयार हुं. माझा बार्गेनिंगचा आनंद पार मावळला. मग मात्र मी तडक काढता पाय घेतला पण जाताजाता मला त्याचा आवाज ऐकू आला “तो फिर आप कितनेमे लेना चाहते हो?” मनातल्या मनात स्वतःला दिलेल्या बार्गेनिंगचं सर्टिफिकेट मी टराटरा फाडून टाकलं.

©  श्री चंद्रकांत बर्वे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आजची मी….’बघ कस समाधान मिळत ते’ ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ आजची मी….’बघ कस समाधान मिळत ते’ ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

 ए सखी, गृहिणी म्हणून कामाचा उरका पाडताना, तू करतेस का ग हे?

करत नसशील तर बघ करून….  ‘बघ कस समाधान होत ते’!!

सखी…पोरं, बाळ, नवरा सर्वांचा नाश्ता, डबे आटोपून, तव्यावर शेवटची भाकरी टाक!

टम्म फुगलेली तव्यावरची भाकरी तशीच ताटात घे…त्याच तव्यावर मेथी किंवा पालेभाजी पटकन  परतायची…आणि गरम भाकरी सोबत पटकन खा!नाश्ता म्हणून!! बघ कस समाधान मिळत ते!

भाजीच हवी असही नाही, नुसत गरम भाकरीवर तूप, मीठ, तिखट लाव, आणि मजेत भाकरी खा बघ कशी अंगी लागेल. तुही स्वतःला नाश्ता करायची सवय लावून घे न… आणि सांग कस समाधान मिळत ते!

केर झाला, फरशी झाली, धुण झालं, सगळं स्वच्छ झालं, पूजाही झाली, आणि इतर सगळी सकाळची काम आटोपून घड्याळात बघ एक वाजलाय…. सखी घे ताट आणि चौरस पण सात्विक आहार घे! कंटाळा करू नकोस. फळभाजी, पालेभाज्या, कोशिंबिरी, चटण्या  खायच्या. उरकायच म्हणून जेवण उरकू नकोस ह! दही अन ताक पोटाला शांत करत, ते घ्यायला विसरू नकोस, एकटीच असतेस घरी म्हणून भरभरही खाऊन सम्पऊ नकोस. अन्नाचा आस्वाद घेत, शरीर स्वास्थ्यासाठी जे उत्तम त्याचा विचार करत खा! जेवण झाल्यावर चार शेंगदाणे व गूळ तोंडात टाकायला विसरू नकोस… HB च्या गोळ्या का घ्यायच्या ग?? गुळाचा खडा तोंडात टाक बघ कस समाधान मिळत ते!

दुपारी एखाद अख्ख  फळ तू खा… स्वतःसाठी, सर्वाना फळ कापून देताना… स्वतःला किती घेतेस? येतंय का लक्षात? म्हणूनच म्हणते फलाहार पोटाला शांत करतो.. मग अस शांत झाल्यावर बघ, कस समाधान मिळत ते!

तुझे आवडते छंद जप, वर्तमानपत्र वाच. रोज काहीतरी लिहीत जा. व्यक्त हो, दाबून ठेऊ नकोस तुझ्या भावना. घरातली कशी सगळी माहिती तुला असते, तशी बाहेरची, वातावरणाची, राजकारणाची, घडामोडीची माहिती तुला  मिळत गेली की तुझ्या ज्ञानात आणखी भर पडेल… तुझा आत्मविश्वासही वाढेल. मग बघा कस समाधान वाटत ते!

सखी… संध्याकाळी चहा झाला की ४० मिनिटं तरी चालून ये हं! चयापचय, रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला हवं न? आणि हाच व्यायाम आपली ऊर्जाही वाढवतो, संध्याकाळी चणे फुटाणे टाक तोंड हलवायला! बघ कस समाधान होत ते!

रात्री लवकरच सगळं आवरत जा, स्वयंपाक वगैरे, कारण रात्री लवकर  जेवण केलं की पचतही व्यवस्थित. झोपताना एक कप कोमट दूध पी, बघ कस समाधान होत ते!

खाण्याचं, व्यायामाच, मनशक्तीच तंत्र संभाळलस तर का दुखतील पाय? का होईल HB कमी? का होईल calcium कमी? का येईल थकवा? का येतील दुखणी सांग ना?

अगदी झोपताना एका आसनावर ध्यानस्थ हो, सगळ्या शंका, कुशंका , चिंता, भय, विचार सोडून दे आणि ध्यानावर लक्ष केंद्रित कर!

त्या परमानंदासारखं आनंद दुसरा नाही!

हीच  ध्यानातील शांतता तुला शांत झोप येण्यास मदत करेल, तूझं आत्मबळ वाढवेल, तुझी शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढवेल….

आता तरी स्वतः साठी जगून बघ, ‘मुक्तछंदी’!  सर्वाना वेळ देताना, काढ स्वतःसाठी वेळ! तुझ्या दैनंदिन कामाच्या यादीत, ही सुद्धा यादी नोट करून घेच अन……

…. मग बघ कस समाधान मिळत ते!

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर (ललित लेख) भाग -2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर  (ललित लेख) भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

(मागील भागात आपण पाहिले

—-नंतर एकदा मला भेटायला तू वाट चुकवून आलीस आणि निराळीच होऊन गेलीस. तू मुळी तुझी उरलीच नाहीस. तू मला वेढलंस आणि थरथरत्या खोल जळी मला ओढलंस. त्यानंतरच्या किती भेटी… अंधार्‍या रात्री. चांदण्या रात्री. समुद्राकाठी. पुळणीवती. तळ्याकाठी …. किती तरी भेटी. कधी नि:शब्दशा. कधी अखंड वटवटणार्‍या या भेटी… आता इथून पुढे ——)

     `आठवते का सांज तुला ती पाऊसओली.

भिजलेल्या रंगात आपुली ओळख झाली.’

आणि ती रात्र आठवते तुला? समुद्र संथ होता. चुरगळल्यासारखा लाटा दिसत होत्या. आकाश उत्कट, अधिरे, झाल्यासारखे चुंबनोत्सुक वाटत होते. पिवळ्या चंद्राच्या झिरझिरित पुळणीवरची भुसभुशित रेती न्हाऊन निघाली होती. भुरा अंधार होता आणि होतो फक्त तू… आणि मी… आणि माझ्याजवळची तू… कशी?

`सर्वांगाने सुख भोगावे

कसे तुला ते पुरते ठाऊक

स्पर्शातुन भिनविसी फुलांचे

तू रंगी-बेरंगी कौतुक.’

त्यादिवशी मी तुला म्हंटलं होतं,

`असे मोकळे हसल्यावर तू, जे न तुझ्यातून दुजे वेगळे

दिल्या –घेतल्यावाचून काही तुला मलाही मिळते सगळे’

आणखी एक रात्र . प्रीतीच्या त्या गाढ क्षणी, तू आकाशच जसे पापण्यत मिटून घेतलेस आणि मी त्यात एक चांदणी होऊन लुकलुकलो. त्यावेळी असण्यामधली अथांगता मी अनुभवली.

हळूहळू तू धीट होत गेलीस. म्हणालीस,

‘आभाळ झुकले तळ्यात रे,

तुझे हात माझ्या गळ्यात रे

स्वप्न पाहू लागे दिठी,

तुझी माझी गाठ मिठी

जागी झाली फुले कळयात रे ,

तुझे हात माझ्या गळ्यात रे’

तर मी तुला म्हणालो,

`हा जीव तुझ्यावर जडला

मी मिटूनी घेतले डोळे

पाऊस फुलांचा पडला.’

खरंच! तू नुसतीच कुजबुजलीस त्या अंधारी आणि रहस्य कळले. शब्दांना नसला अर्थ तरीही कळले सारे कळण्याच्या पलिकडले.

पण हे खरंच होतं का? नसावं! नाहीचमुळी! तो मला झालेला आभास होता. एकदा मला मिठीत बुडवीत म्हणाली होतीस,

`तुझ्यासवे राहीन उपाशी नकोच वैभव  नको मला घर

फिरेन मीरानात मजेने तुझ्या संगती रानफुलांचे पिऊनी चांदणे

निजेन अन मी खडकावरती’

अन श्वासांचे शब्द माझिया, ‘वेडीकुठली…’

तू वेडी की मीवेडा? त्यावेळी तू आणि मी दोघेही म्हणालो होतो,

`प्रीत माझी तुझी एक गाणे

गात जाणे, गात जाणे, गात जाणे’

पण पुढे मात्र मला एकट्यालाच हे गाणे गात जावे लागले. तू अलगद निघून गेलीस पुढे… एकटीच … मिटून घेतले होते मी माझ्यात तुला. सर्वस्वाचा पहारा ठेवला होता. पण माझ्या या सर्वस्वाच्या पहार्‍यातून तू निसटून गेलीस. खुशीने? की नाईलाजाने?

एका रात्री मी तुला जाम पिडलं होतं. खूप चिडवलं होतं मी तेव्हा तुला. तू अगदी रडवेलीशी झालीस. म्हणालीस,

`छळून घे रे छळणार तेवढे… मी गेल्यावर स्मरशील का रे?’

तुझी – माझी वाट वेगळी होण्याची चाहूल तुला त्याचवेळी लागली होती का? नंतरच्या रात्री तू मला सांगूनच टाकलंस,

‘थांबणार नाही रात्र, आता होईल पहाट

आहे होणार वेगळी तुझी माझी वाट

तोवर हे स्वप्न बघू, रात्र सरायची आहे

नको सोडवूस मिठी, रात्र सरायचीआहे.’

तोच होता का निरोपाचा क्षण… ती निरोपाची मिठी होती का?

‘तू म्हटले थांब तरी, थांबली न रात्र मुळी’

त्यानंतर … दु:खाला वसतीला मी ऊर दिला. त्या निर्दय नियतीला सूर दिला.  मनात आलं,

`ही हार कुणाची, ही जीत कुणाची?

आसवात (ही) हसण्याची ही प्रीत कुणाची?’’

वाटेसारखे हे भागधेय समोर आले, तशी तुला म्हंटलं,

`त्याचे त्याला देऊन टाक, बाकी ठेवू नकोस काही.

मला देणार होतीस जे, त्याचा हिशेब होणार नाही.’

अभाळाने लाजावे, पृथ्वीने बघत रहावे, असे काही देणार होतीस. पण राहीलंच ते… राहू दे…

‘गाण्यामधून वहात राहील आभाळवेडी तुझी खूण…

वृत्ती-वृत्ती जपत राहील तुझ्या डोळ्यांमधले ऊन…

तू खरंच सांग एकदा … तुला आठवतय हे सारं? की काही बाही? की काहीच नाही? शेवटचा निरोप घेताना तू म्हणाली होतीस,

येईन एकदा पुन्हा

पल्याड काळोखाच्या जाण्याआधी

घेऊन अंगभर ओळख

सगळ्या फुलत्या खुणा

येईन एकदा पुन्हा

घुंगुरवाळ्या पाण्यापाशी…’

मी वाट बघतोय. आसासून वाट बघतोय. त्या क्षणाची …

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ब्रम्हवादी याज्ञवल्क्य मुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डाॅ. व्यंकटेश जंबगी

 ☆ विविधा ☆ ब्रम्हवादी याज्ञवल्क्य मुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

” याज्ञवल्क्य” या शब्दाचा अर्थ-ब्रम्हवादी ऋषी, जनक राजाचे गुरू, याज्ञवल्क्य स्मृतीचे रचणारे !

भारताच्या वैदिक काळात हे एक मोठे दार्शनिक होऊन गेले.ते कर्मकांडाचे पुरस्कर्ते होते.त्याना यज्ञ,याग,होय,हवन इ.चे विशेष ज्ञान होते.ते अत्यंत ब्रम्हनिष्ठ होते.श्रीमद् भागवत पुराणानुसार महर्षि व्यास यांनी वेदाचे विषयानुसार ४ भाग केले.म्हणून व्यास मुनिना “वेदव्यास”असेहि म्हणतात.व्यासांनी पैल मुनिना ऋग्वेद, वैशंपायन यांना यजुर्वेद, जैमिनीना सामवेद आणि अथर्ववेद सुमंतु या आपल्या शिष्यांना शिकविला.याज्ञवल्क्य हे वैशंपायन यांचे शिष्य होते.ते यजुर्वेदाचे अध्ययन करीत होते.एक दिवस वैशंपायनाना राग आला, त्यांनी याज्ञवल्क्याना शिकलेला भाग परत देण्याची आज्ञा केली.याज्ञवल्कांनी तो भाग ओकून परत दिला.काही मुनींनी तो “तित्तर”पक्ष्यांचे रुप घेऊन ग्रहण केला.तीच तैत्तरीय शाखा झाली.तेव्हा याज्ञवल्क्य यांनी “मी मानवाला गुरू करणार नाही”अशी प्रतिज्ञा केली.सूर्याची उपासना केली.सूर्यदेव प्रसन्न झाले.त्यांनी घोड्याच्या रूपाने प्रकट होऊन यजुर्वेदाचे ज्ञान दिले.हाच शुक्ल यजुर्वेद होय.(संदर्भ:भा.पु.१२वा स्कंध,६वा अध्याय, श्लोक ७३,७४)

याज्ञवल्क्य यांना दोन पत्न्या होत्या.एक मैत्रेयी आणि दुसरी भारद्वाज ऋषी कन्या कात्यायनी.मैत्रेयीने पतिकडून ब्रम्हविद्या ग्रहण केली.कात्यायनीला तीन पुत्र होते.

एकदा जनक राजाने ब्रम्हनिष्ठ गुरूच्या शोधासाठी,अशा मुनिना सोन्याने मढविलेल्या गायी देण्याची घोषणा केली.याज्ञवल्कांनी शिष्यांना गायी आपल्या आश्रमाकडे वळविण्यास सांगितल्या.एवढा त्यांचा आत्मविश्वास होता.परंतु गार्गी नावाच्या विदुषीने आधी त्यांना शास्त्रार्थ करण्याचे आवाहन केले.या दोघांचा प्रश्नोत्तराच्या रुपाने जो संवाद झाला,तेच”बृहदारण्यकोपनिषद” होय.यात अत्यंत जटील प्रश्नांची उत्तरे याज्ञवल्क्यांनी दिली आहेत.

याज्ञवल्क्य यांचे प्रसिद्ध ग्रंथ-

१)  शतपथ ब्राह्मण २) याज्ञवल्क्य स्मृती ३) याज्ञवल्क्य शिक्षा ४) प्रतिज्ञा सूत्र ५) योगी याज्ञवल्क्य.

त्यांच्या स्मृतीला वंदन करून येथे थांबतो.

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १२) – राग~ वसंत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १२) – राग~वसंत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूरसंगतराग~वसंत

ऋतुचक्रांतील वसंत ऋतूचे आगमन झाले की शिशीरांत निष्पर्ण झालेल्या सृष्टीत नवचैतन्य येते. वृक्ष वल्लरींना नवी पालवी फुटून सर्वत्र निसर्ग बहरास येतो. संगीतांतील वसंत रागाचे ह्या ऋतूशी फार जवळचे नाते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वसंताचे अवरोही स्वर कानावर पडले की उत्साहाचे वातावरण निर्माण झालेच पाहीजे.असा हा राग वसंत!

ह्या रागासंबंधी फार मनोरंजक अशी आख्यायिका आहे. असे म्हणतात की बूढन मिश्र नावाच्या एका गायकाने पटमंजीरी हा राग गायला आणि त्याच्या प्रभावाने एक प्रचंड वृक्ष निष्पर्ण झाला. हा चमत्कार पाहून सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली.  तत्कालीन राजाने त्याच्या या गायनकौशल्यावर खूष होऊन त्याला बक्षीशीही दिली,परंतु त्याचवेळी जयदेव या गायकाला ही बातमी समजल्यावर त्याने वसंत राग आळवून पर्णविरहीत वृक्षावर पुन्हा नवीन पालवी नार्माण केली. वसंत ऋतूतील नवी पालवी आणि हा राग याचे असे हे अतूट नाते आहे. गीत गोविंद या जयदेवाच्या अमर ग्रंथातील”ललित लवंगलता परिशीलन कोमल मलय समीरे” ही अष्टपदी म्हणजे वसंत ऋतूचे सुंदर वर्णन आहे, ती वसंत रागांत गायली तर अधिक मनभावन ठरते.

हा आल्हाददायक राग वसंत ऋतूत केव्हाही गावा, मात्र इतर वेळी तो मुख्यत्वेकरून रात्रीच्या अंतीम प्रहरी गाण्याची/वाजविण्याची प्रथा आहे.

चैत्र~ वैशाख हा वसंत ऋतूचा काळ असला तरी माघातल्या वसंत पंचमीपासून फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो. या वसंतोत्सवाला फाग म्हणतात. त्यामुळे राधा~कृष्णाच्या रासक्रीडा नृत्य ~संगीतांतून सांगातली जाते.अब्दूलकरीमखाॅं साहेबांची “फगवा ब्रीज खेलनको चलोरी” ही वसंतातली बंदीश आजही पेश केली जाते.’नबी के दरबार’ हा वसंतांतील बडा ख्याल गंगूबाई हनगल, माणिक वर्मा यांच्याकडून रेडिओवर बर्‍याचदां ऐकल्याचे स्मरते.

वसंतच्या शास्त्रीय स्वरूपाबाबत प्राचीन काळापासून बरेच मतभेद आहेत. असे म्हणतात की गंधार व निषाद कोमल असलेला काफी थाटात गायला जात असे. कवी जयदेवाच्या गीतगौविंदमध्ये हा राग असा आहे. जग्गनाथपूरीच्या मंदीरांतही अजूनही काफी थाटातला वसंत गायला जातो. मात्र सध्या प्रचलित असलेला वसंत  पूर्वी थाटांतील आहे. यांतही दोन प्रकार आहेत. एका प्रकारात दोन मध्यम व शुद्ध धैवत घेऊन पंचम वर्ज्य केला जातो तर दुसरा प्रकार संपूर्ण मानला जातो. कितीही वाद असले तरी दोन्ही मध्यमांचा प्रयोग करणारा ललित अंगाचा वसंतच आज अधिक प्रचलित आहे.

वादी व संवादी स्वर अनुक्रमे तार षड्ज व पंचम असे आहेत, शुद्ध धैवताच्या प्रकारांत पंचम वर्ज्य असल्यामुळे शुद्ध मध्यम संवादी मानतात.

या रागाचे वैशिष्ट्य असे की षड्जापर्यंत अवरोह झाल्यावर लगेच शुद्ध मध्यम मुक्तपणे व स्वतंत्र घेतला जातो व नंतर मींडेच्या सहाय्याने ‘नी (ध)(म)(ध) नी सां’ असा आरोह केला जातो.राग ओळखण्याचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. उत्तरांगप्रधान असलेला हा राग स्वरसप्तकाच्या उत्तरांगांत अधिक खुलतो.

ह्या वसंत किंवा बसंत रागाबरोबर बसंतबहार, बसंतहिंडोल, बसंती~केदार असे बरेच जोड राग आहेत. कुमार गंधर्वांनी गौरी बसंत तर रातंजनकरबुवांनी बसंत मुखारी हे राग लोकप्रिय करून ठेवले आहेत.

“केतकी गुलाब जूही मन बसंत फूले” ही बसंत बहारची बंदीश प्रसिद्ध आहे. मंदारमाला नाटकांतील पं.राम मराठे आणि प्रसाद सावकार यांची “बसंतकी बहार आयी” ही जुगलबंदी न ऐकलेला श्रोता विरळाच! सर्व सामान्यांसाठी बसंतचे उदाहरण घ्यायचे झाले तर देवदास चित्रपटांतील माधुरी दिक्षित(चंद्रमुखी)हिचे “काहे छेड छेड मोहे गरवा लगाये हे वसंत रागांतील गाण्यावरील नृत्य.

वसंत ऋतूचे स्वागत करणारा आणि कलावंतांच्या विशेष पसंतीचा आणि अतिशय प्राचीन असा हा राग वसंत/बसंत!

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  काॅफी.. ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा ☕  काॅफी.. ☕ सुश्री आसावरी केळकर-वाईकर☆

मोहक रंगाच्या कॉफीचा वाफाळता मग, त्या वाफांतून विरत जाणारा फिका धवल रंग आणि कानांवर पडणारं मंद संतूर/सतार किंवा हरिहरनचं ‘मैं खयाल हूं किसी औरका, मुझे चाहता कोई और है’ किंवा गुलाम अलींचं ‘फासलें ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था, सामने बैठा था मेरे और वो मेरा न था’ किंवा लताचं ‘लग जा गले…’ किंवा आशाचं ‘मेरा कुछ सामान…’  अशी सुरुवात झाली कि मनात खोलवर झिरपत जाणाऱ्या काहीतरी तरल कथानकाची गुंफण असणार ह्याचे संकेत मिळत जायचे आणि नजर मृदुल होत वाचणंसुद्धा आपसूक अलगद होऊन जायचं…. जणू नजरेतलली तीक्ष्णता त्या तरल कथानकाच्या शब्दांवर पडून त्यांना इजा होऊ नये ह्याची मन आपोआप काळजी घ्यायचं. माझी कॉफीशी ओळख आणि जवळीक ही खरंतर अशी नादावणाऱ्या शब्दचित्रातून झाली.

फार मोठे शब्दांचे काहीही डोंगर न रचता एक ‘कॉफीचा वाफाळता मग’ अंत:चक्षूंसमोर जी रस-रंग-गंधयुक्त रोमांचकारी वातावरणनिर्मिती करतो त्याला खरोखरीच तोड नाही… म्हणूनच कॉफीनं मनाचा एक हळवा कोपरा कायमस्वरूपी व्यापलेला आहे. जिव्हाळ्याच्या व्यक्तीचं उत्कंठेनं, हुरहुरतेपणी वाट पाहाणं असो, प्रत्यक्ष ती व्यक्ती समोर बसलेली असताना तिच्यासोबतची मनं जोडणारी नेत्रपल्लवी असो, कधी पाठ फिरवून गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींत तरसणं असो, कधी असह्य एकटेपणाशी संवाद असो… कुठल्याही कथानकात ‘कॉफीचा मग’ सहजी सामावून जातोच शिवाय त्या प्रसंगाच्या शब्दचित्रातल्या भावनांचे रंग जास्त गहिरे, गडद करत जातो. त्यातून उमलणाऱ्या वाफा डोळ्यांसमोर येतायेता भोवताली भरून राहिलेली हुरहुर आपल्या जाणिवांत उतरते आणि आपण थेट त्या पात्राच्या अंतर्मनात उतरून त्यावेळची त्याची मनोवस्था अनुभवतो…!

लहानपणी घरात चहा-साखरेच्या डब्यांची जोडगोळी अगदी हाताशी येईल अशी कट्ट्याशेजारच्याच भिंतीतल्या कडाप्प्यांच्या रॅकमधे समोरच दिसायची, त्याच्या मागे एक तसाच उभट पण आकाराला किंचित छोट्या डब्यात प्लॅस्टिकच्या पिशवीतच कॉफीपूड ठेवलेली असायची. चमचा चहा-सारखेच्या डब्यातल्यासारखा किलवर आकाराचा असायचा. मात्र हा ठेवणीतला डबा क्वचित कधीतरी बाहेर निघायचा… कुणीतरी चहा न पिणारं आणि कॉफीच घेणारं आलं तर! चहा करणं त्यामानानं ओबडधोबडपणे पटकन उरकता यायचं, मात्र कॉफी करणं हा एक साग्रसंगीत सोहळा वाटायचा.

चहासाठी आधण हे पाण्याचं ठेवायचं आणि कॉफीसाठी मात्र दुधाचं… कॉफीच्या ‘खास, खानदानी, श्रीमंत’पणाची सुरुवात ही अशी पहिल्याच क्षणापासून व्हायची. त्यात मापात साखर घालून उकळी येईतोवर पिणाऱ्याच्या आवडीनुसार एकीकडं सुखद वासाच्या वेलदोड्याच्या दाण्यांची पूड करावी लागायची, कधी चिमटभर जायफळाची पूड त्यात टाकली जायची, नाहीतर ‘अपनी सिर्फ कॉफी’सुद्धा पुरेशी असायची. दुधाला छान उकळी आली कि गॅस मंद करून त्या शुभ्र फेसांत प्रमाणांत कॉफीपूड घातली कि तो दोन रंगांचा संगम फार देखणा वाटायचा. डब्यात चमचा असला तरीही त्या पुडीच्या मुलायमपणाचं स्पर्शसुख अनुभवण्यासाठी ती चिमटीत धरून पाहायचा मोह आवरायचा नाहीच. पांढऱ्या रंगावर उमटत जाणारी कॉफी कलरची नक्षी आणि श्वासांत उतरत जाणारा तो मोहक वास ही अनुभूतीच एकमेवाद्वितीय असायची. हळूहळू तो क्षीरडोह कॉफीच्या रंगात माखला जायचा आणि त्यात चिमूटभर वेलदोडापूड घालून पटकन ताटली झाकली कि नजाकतदारपणे समेवर आल्यासारखा आनंद व्हायचा. कॉफीची बंदिश सजवतानाचा हा आकृतीबंध मोहक वाटायचा.

दक्षिण भारतात चहापेक्षा कॉफी प्रिय असलेली मी पाहातेच आहे. लोक इथे कुटुंबाच्या गरजेनुसार महिन्या-दोन महिन्याला ठराविक किलो कॉफी ही दुकानांतून ताजीताजी दळून आणतात. कॉफीच्या बियांत  ठराविक प्रमाणात चिकोरी मिसळून दळण दळलं जातं. ‘फिल्टर कापी’ करण्यासाठी एक स्टीलचं दोन भाग असणारं उभट डब्यासारखं भांडं असतं. त्याच्या वरच्या भागाच्या तळाला बारीकबारीक छिद्रं असतात. त्यात सकाळसकाळी कॉफी पूड भरून वर उकळतं पाणी ओतून झाकण घट्ट लावायचं आणि कुकरच्या डब्यासारखा हा भाग खालच्या भागावर बसवायचा. त्या छिद्रांतून बराच वेळ पाणी ठिबकत राहातं आणि हे कॉफीचं डिकोशन तयार झालं कि दिवसभर गरजेनुसार त्यात उकळतं दूध आणि साखर घालून कॉफी प्यायची. रोमॅंटिसिजमचा सिम्बॉल असणारा कॉफीचा मग मात्र इथं आढळत नाही. एक पसरट वाटी आणि त्यात  कॉफी गच्च भरलेलं एक छोटं भांडं अशी कॉफी दिली जाते. मग आपण भांड्यातून वाटीत आणि वाटीतून भांड्यात असं जरा वेळ खेळत बसून साखर विरघळवायची आणि ती कॉफी गट्टम करायची.

आजकाल काही उंची हॉटेल्समधे, एअरपोर्टवर वगैरे कायच्या काय पैसे मोजून मिळणारा अत्यंत पांचट कॉफीचा फेस हा मात्र तिचा घोर अवमान आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. माझ्या मनातल्या कॉफीच्या तरल रुपाचा हा अगदी चोळामोळा असल्याचं माझं ठामच मत आहे. तसली कॉफी पिणाऱ्या लोकांना मला एकदा विचारायचं आहे कि, ‘केवळ स्टेटस सिंबॉल म्हणून ही कॉफी आपण सेवन करताहात कि पदार्थाचं रूप-रंग-गंध-चव काहीच न जाणवण्याइतकी आध्यात्मिक उन्नती झाल्यानं आपणांस कोणती चव आवडली नाही असं होतंच नाही!?’… बघू कधी योग येतो! वाफाळत्या कॉफीबरोबरच ‘कोल्ड कॉफी’ पिणारेही लोक जगात आहेत हाही मला आश्चर्याचा धक्काच होता.

माझ्या काळजातलं कॉफीचं रुपडं मात्र जामच ‘रोमॅंटिक’ आहे आणि कायम राहील ह्यात शंका नाही.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर (ललित लेख) भाग – 1☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर  (ललित लेख) भाग – 1  ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

(१९६०-६४चा काळ, हा माझ्या कॉलेज जीवनाचा काळ. ते वय रोमँटिक कल्पनेत रमण्याचं. तसंच त्या काळातील सामूहिक मनवरही रोमँटिसिझमचाच पगडा होता. म्हणूनच की काय, कुसुमाग्रज, बोरकर, शांता शेळके यांच्या कवितांची, विशेषत: प्रेमकवितांची मनावर विलक्षण मोहिनी होती. प्रत्यक्ष प्रेमाचा अनुभव घेणारे फार थोडे. प्रेमाच्या कल्पनेवर प्रेम करणारे माझ्यासारखे खूपच खूप…. नव कवितेने त्या काळात कुतूहल निर्माण केले असले, तरी तरी युवा मनात ती काही तितकिशी रुजली, स्थिरावली नव्हती. युवा मन सफल-विफल प्रेमाची गीते गाण्यात, विरहाचे दु:ख सोसण्यात आणि उसासे सोडण्यात दंग. या अशा रोमँटिक जीवनाबद्दल कुतुहक, प्रेम, आकर्षण वाटण्याच्या काळात आणि वयात, मंगेश पाडगावकरांचे धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव असे काव्यसंग्रह हाती लागले. त्यातील प्रेमकवितेबद्दल इतकं प्रेम, आकर्षण, आस्था, जिव्हाळा वाटू लागला, की त्यातल्या किती तरी कविता, अवतरणे पुन्हा पु्न्हा वाचू लागलो. एकमेकींना वाचून दाखवू लागलो. त्या भावनांशी तादात्म्य पावता पावता, एक ललित लेख मनात साकारत गेला आणि मनातच राहिला. नुकतीच 10 मार्चला पाडगावकरांची जयंती झाली. त्या निमित्ताने त्यांच्या कविता पुन्हा नव्याने वाचता वाचता, कधी तरी लिहिलेला आणि मनाच्या तळात राहून गेलेला हा लेख उसळून वर आला आणि पुन्हा गद्धेपंचविशीत घेऊन गेला.)

? ? ? ?

किती दिवस… महिने… वर्षे उलटली. जुन्या आठवणींच्या पुलावरून येरझारा चालू आहेत. पण तिकडच्या टोकाला आहेस ना तू? उदास व्याकुळ डोळे काय बघताहेत? आठवते तुला ती अखेरची भेट? क्षणभर हातात घेतलेले हात… त्या स्पर्शाची संवेदना अजूनही अंगभर थरथरते आहे. त्या पुलावरून जात जात किती मागे पोचलोय मी. अगदी बालवयात पोचलोय.

आठवते आहे ती बालपणीची शाळा. शाळा कसली? चार खिडक्या असलेले चौकोनी खोकेच. भल्या पहाटे (आठ वाजता) शाळा सुरू व्हायची. प्रार्थना, मग कर्कश्य आवाजातला मास्तरांचा हुकूम. ‘काढा पाट्या..कुठाय उजळणी…चला दाखवा.’ माझी पाटी कोरी. मग खवचट चष्म्यातून रोखून बघणारी भिंगे…. नि माझ्या हातावर सपासप पडणारे वेत. मी किती वेळ मुसमुसून रडत राहिलो, मलाच कळले नाही. मग मऊ हाताच्या स्पर्शाने जाग आली. भुरे, सोनेरी केस असलेल्या, निळ्या डोळ्याच्या मुलीच्या हाताचा तो स्पर्श होता. मी तिला नाव विचारले. ती म्हणाली, `नाव? छोरी… हात पुढे कर’ आणि हातावर पडली नाजुक दातांनी तोडलेली कैरीची फोड. तिचीआंबट-गोडी अजूनही जिभेवर ताजी आहे. अजूनही स्वप्नात तिचे सोनेरी कुंतल भुरभुरतात आणि

अजून घेते टिपुनि वेदना

‘ नजर तिची ती निळी खोडकर…

गिरकी घेते मनी कलाबूत तिच्या स्वरांची

नाव? छोरी… हातपुढे कर.’

बालणीची आणखी एक आठवण. भातुकलीच्या खेळात गंमत वाटायची, तेव्हाचे ते दिवस…. पावसाच्या चिंब वेळी होड्या सोडण्याचा खेळ… तू म्हणालीस, ‘माझी होडी पुढे गेली… तुझी मागे..’ नंतर पुढे जाणार्‍या होडीबरोबर तूही पुढे निघून गेलीस. मी किनार्‍यावर. नि:स्तब्ध… निश्चल… असहाय्यसा.

बघता बघता तू बालिकेची किशोरी आणि किशोरीची नवतरुणी झालीस. जसे फूल फुलावे तशी उमलत राहिलीस. गंध उधळत राहिलीस. कधी तू दिसायचीस लाल फुलांनी झुलणारी डाली, कधी वाटायचे तू असशील वादळवारा. आपल्या श्वासांनी उधळशील सार्‍या वृत्ती सैरावैरा. कधी भासायचे,

‘पार्थिव आणि अपार्थिव यांच्यामधले झिळमिळणारे क्षितीज सुगंधाचे तू’

तुझी किती रुपे, वास्तवातली आणि माझ्या कल्पेतलीही…. या दोन्ही रुपांची किती सरमिसळ झालीय माझ्या मनात.  माझ्या मनमंजुषेत ती सारीच रुपे, वास्तवातली आणि कल्पनीतलीही मी अगदी जपून ठेवलीत. तुझ्याबद्दल वेगळे काही नव्यानेच जाणवले आणि तुझी ओळख नव्यानेच झाली.

‘तेव्हाची ती पहिली ओळख अपुली

बोलायाचे खूपच होते

तुला… मलाही…

परंतु मौनाने मौनच धरले हृदयाशी

अन शब्दांची झाली पळसफुले

पिवळ्या जर्द उन्हाने भरलेली.

नंतर एकदा मला भेटायला तू वाट चुकवून आलीस आणि निराळीच होऊन गेलीस. तू मुळी तुझी उरलीच नाहीस. तू मला वेढलंस आणि थरथरत्या खोल जळी मला ओढलंस. त्यानंतरच्या किती भेटी… अंधार्‍या रात्री. चांदण्या रात्री. समुद्राकाठी. पुळणीवती. तळ्याकाठी…. किती तरी भेटी. कधी नि:शब्दशा. कधी अखंड वटवटणार्‍या या भेटी.

—-क्रमश: भाग 1

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print