मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆जड झालेले आई-बाप… साभार : श्री राकेश जगताप ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ जड झालेले आई-बाप… साभार : श्री राकेश जगताप ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

नेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा ‘राजेशचा’ मला फोन आला… म्हणाला, “मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच..!”

मी “हो थांबतो” म्हटलं. 

मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.

एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, “ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल…!”

ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं..

अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, “आजोबा तुम्हाला भूक लागलीय? हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते..!” 

ते म्हणाले, “नको बाबा नको.. पैसे नको.. एक वडापाव घेऊन दे तेवढा”

मी म्हटलं, “थांबा इथेच मी घेऊन येतो.”

एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले.

मला म्हटले, “वर नको बसू , पडशील… इथं बस माझ्या बाजूला, कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास !”

मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली… कुठून आलात? कुठे जायचंय? कोणाला शोधताय? वैगेरे वैगरे.

“मी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे…

इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर,  वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला.

पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!”

मी म्हणालो, “बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही, सांताक्रुज ला आहे Airport.

आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, “परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं… फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा…त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून”

आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली… मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं… 

मी विचारलं, “तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?”

“मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त” ते म्हणाले.

मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला…

मग मी तो कागद उघडून पाहिला… त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.

मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता… मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं.

तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश… 

आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो…

मला कळत नव्हतं, मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती?  कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल.. 

आजोबांना मी म्हणालो, “आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.

अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं, “मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये? “

म्हणाले, “मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी…

आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो….

तेवढ्यात मित्राचा आवाज आला, “चल ना ऐ…!” 

आणि मी भानावर आलो… त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो… 

घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता…

‘आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस.. आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता…? इतकं प्रेम ??? 

साभार : श्री राकेश जगताप, मुंबई

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “विज्ञान गड”: “इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना” – लेखक : इंजि. राम पडगे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ “विज्ञान गड”: “इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना”लेखक : इंजि. राम पडगे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

(आशिया खंडामधला पहिला प्रकल्प आकाराला येतोय महाबळेश्वर तालुक्यामध्ये “कोट्रोशी” या ठिकाणी.) 

नमस्कार अभियंता मित्रांनो,

आपणा  सर्वांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अभियंता दिनाच्या निमित्ताने आपणाला एका नवीन प्रकल्पाची ओळख करून द्यावी अशा उद्देशाने या प्रकल्पाची थोडक्यात माहिती आपणाला पाठवत आहे.

“विज्ञान गड” गेली १८ वर्ष या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एक वेगळी संकल्पना, वेगळा विषय आणि विज्ञान आधारित ही थीम असलेले अत्यंत नाविन्यपूर्ण आणि इंजिनिअरिंग मधला एक अद्भुत  नमूना या ठिकाणी उभारला जात आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये शासनाच्या सर्व परवानक्या प्राप्त होऊन हा प्रकल्प  सर्वांसाठी खुला होईल. आशिया खंडा मधला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाहनांसाठी रस्ता उपलब्ध नाही. डोंगराच्या पायथ्याला आपली वाहने लावून या ठिकाणी जवळपास १५० मी उंच   असलेल्या डोंगरावर  माथ्यावर, वायरच्या मदतीने खेचली जाणारे रेल्वे मधून जावे लागते. याला फिन्यूक्युलर असे म्हटले जाते. सर्वसाधारण ४० लोकांची क्षमता असलेले दोन डबे बॅलन्सिंग पद्धतीने एकावेळी वर खाली होत असतात. सर्वसाधारण सात मिनिट ते दहा मिनिटांचा कालावधी या ठिकाणी जाण्यासाठी लागतो. डोंगराचा तिव्र  उतार सर्वसाधारण ३५ डिग्री ते ४० डिग्री च्या आसपास आहे. आपली ही फिनिक्युलर वरती असलेल्या गोल इमारतीच्या आत मध्ये थांबते. प्रत्येक दरवाज्याच्या पुढे फ्लोरिंग येईल अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.

आणि इथून पुढे तुमचा सुरुवश होतो….. एक अद्भुत प्रवास!!! आपण नक्की काय पहावे व कोणते प्रथम पाहावे अशा प्रकारची आपली परिस्थिती होते. या इतक्या उंच ठिकाणी, इतका भव्य प्रकल्प असेल असे रस्त्यावरून वाटत नाही. समुद्रसपाटीपासून सर्वसाधारण बाराशे पन्नास मीटर उंचीवर असलेला हा प्रकल्प महाबळेश्वर आणि पाचगणी यांच्या उंची पेक्षाही जास्त आहे. या इमारतीच्या माथ्यावर गेल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी कोणताही अडथळा राहत नाही. 

या ठिकाणाहून सह्याद्रीच्या अवाढव्य गगनाला भिडणारया रांगा, कोयना जलाशयाचा विस्तीर्ण नजरेत न सामावणारा पसारा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमार्ग ,कासचे नयनरम्य पठार, वासोटा किल्ला, उत्तेश्वराचं पुराणतन मंदिर, मकरंद गड, महाबळेश्वर, पाचगणी, लिंगमळा, भिलार हा सगळा परिसर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये येतो आणि हे तुम्ही , आशिया खंडा मधला पहिल्या रोटेटिंग  डोम मध्ये बसून पाहत असता. 

या ठिकाणी अत्यंत मोठ्या क्षमतेचे कॅमेरे बसवून, या सर्व ठिकाणांचे दर्शन स्क्रीन वरती आपणाला पाहता येते. याशिवाय आपली वेळ संध्याकाळची असेल तर आकाशातले ग्रह तारे या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येतात.  या ठिकाणचे  फिरणारे हॉटेल आणि या ठिकाणी बसून घेतलेल्या जेवणाचा आस्वाद आपणाला आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे. तुम्ही ३६० डिग्री मध्ये फिरत, निसर्गाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचे दर्शन घेत जेवणाचा आनंद घेत असता. या ठिकाणी आहे अर्थक्वेक मधले सर्व प्रकारचा अभ्यास, या ठिकाणी आहे अभ्यासण्यासाठी विंड एनर्जी प्रोजेक्ट,सोलर एनर्जी प्रोजेक्ट आणि हायड्रो प्रोजेक्ट सुद्धा.  पाण्यामध्ये होत असलेले बदल आणि त्यासंबंधीची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहता येतात. सुनामी प्रत्यक्ष होते तरी कशी? व तिचा इफेक्ट नक्की असतो कसा? हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल या ठिकाणी .लाटा मधलं सायन्स आहे तरी काय? हे अभ्यासायचे असेल तर या ठिकाणी भेटायलाच हवं. भारतीय सैन्य दलामध्ये अत्याधुनिक शस्त्र वापरण्यात येतात. ती प्रत्यक्ष असतात कशी व ती वापरली कशी जातात ? याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच असते . या ठिकाणी शिकण्यासाठी , अभ्यासण्यासाठी आणि पाहण्यासाठी भरपूर काही आहे. अभियंता म्हणून या प्रकल्पाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.  मी या प्रकल्पाची अत्यंत थोडक्यात माहिती दिली प्रत्यक्षात बरेच काही आहे .

तुम्ही कदाचित याल त्यावेळी शिवाजी महाराजांचे अभियंते हिरोजी इंदुलकर यांचं अत्यंत सुंदर शिल्प या ठिकाणी तयार झालेले असेल. या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या तीव्र बुद्धीमतेने अभियंता म्हणून आपले नाव इतिहासाच्या पानावर कायमचे कोरून ठेवलेले आहे. या अभियंत्याची स्मृती म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सह त्यांचाही पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे.

वयाच्या ६८ व्या वर्षी रात्रंदिवस काम करणारे, या प्रकल्पाचे मालक आणि अभियंते जोशी सर यांची भेट म्हणजे  स्फूर्ती आणि संकल्पना याचा अनोखा मिलाफ. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने स्वतःचे स्थान निर्माण करणारे व अभियंता म्हणून नक्की कसे असावे याचे हे जिवंत उदाहरण आहे.

प्रकल्प मालक व अभियंता – इंजि. वसंत जोशी सर 

प्रकल्प सल्लागार. – इंजि. राम पडगे

आर्किटेक्ट –   आर्कि. विक्रांत पडगे 

आर सी सी सल्लागार. –  इंजि. अनिल कदम

अभियंत्यांनी एकदा आवर्जून भेट द्यावी असा हा प्रकल्प आहे. या ठिकाणी ज्याला पाहायचे आहे ते भरपूर काही पाहू शकतात ,ज्याला शिकायचं आहे तो भरपूर काही शिकू शकतो. एक अभियंता म्हणून निश्चितच चॅलेंजिंग असा हा प्रकल्प आहे, म्हणूनच आज अभियंता दिनाच्या निमित्ताने आपल्यासमोर मी हे थोडक्यात मांडत आहे.

आपला,

इंजि. राम पडगे

९६८९३५९४७८

प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ आनंदी जीवनासाठी, लिमिटेड होतं तेच बरं होतं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंदी जीवनासाठी, लिमिटेड होतं तेच बरं होतं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा…..

टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.

दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षा-दीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.प्रवासाचा आनंद मिळायचा.

गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.

शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडणघडण नीट व्ह्यायची.

बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची.

अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते.

पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय.आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय !

“बाबा, तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात?”

“बेटा, काळ खूप बदलला बघ.

तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.

तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोरं दिवसभर बसून ‘कॉम्प्युटर गेम्स’ खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.

तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांच्या डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.

तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड, त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन, ते म्हणतील ते खाऊ घालतात.

तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.

तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला, तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

मुळात काय की,

तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं

            आता

बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यावरील सेमिनर्स अटेंड करावे लागतात.”

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मला भावलेला श्रीकृष्ण” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “मला भावलेला श्रीकृष्ण” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

 (‘shopizen.in‘ यांच्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या “ माझ्या मनातला श्रीकृष्ण “ या विषयावरच्या एका उपक्रमाअंतर्गत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांच्या लेखाला “ सर्वोत्कृष्ट लेखन “ म्हणून गौरविण्यात आलेले आहे. याबद्दल आपल्या सर्वांतर्फे ज्योत्स्नाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. आज हा लेख सर्वाना वाचण्यासाठी उपलब्ध करत आहोत.

हे श्रीकृष्णा, नव्हे नव्हे युगपुरुष भगवान श्रीकृष्णा नमस्कार !

पण तुला बाळकृष्ण म्हणावे, माधव म्हणावे, मुकुंद म्हणावे, मुरलीधर म्हणावे, कन्हैया म्हणावे, वासुदेव म्हणावे का योगेश्वर म्हणावे ? नक्की काय म्हणावे असा मोठा प्रश्न पडतो. कारण तुझ्या प्रत्येक रूपाची मोहिनी वेगळी आणि लीलाही वेगळ्या. पण प्रत्येकच रूप तितकेच लोभस अन् हवेहवेसे.

हे युगंधरा,

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम 

धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

असे वचन तू दिले होतेस आणि ते पूर्ण करण्यासाठी द्वापरयुगात श्रीविष्णूंचा आठवा अवतार म्हणून वसुदेव देवकी यांचा पुत्र म्हणून अवतार घेतलास.

हे देवकीनंदना, तुझ्या बालरूपाने तर चराचरावर मोहिनी घातली. अवघ्या गोकुळाला तुझे वेड लागले. अगदी बालपणापासून तू अनेक खोड्या केल्या, पराक्रम केलेस. ते सर्व कृष्णलीला म्हणून प्रसिद्ध आहेत.

अगदी बालपणातच तू पूतना राक्षसीचा वध केलास. यशोदा मातेने उखळाला बांधून ठेवले असताना रांगत जाऊन दोन झाडे पाडून नलकुबेर आणि मणिग्रीव या दोन कुबेर पुत्रांना शापमुक्त केलेस. यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये विश्वदर्शन घडवलेस. कालिया मर्दन करून कालिया नागाला यमुनेच्या डोहातून निघून जायला लावलेस. केवळ हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे मुसळधार पावसापासून रक्षण केलेस.

हे बाळकृष्णा, अशा अनेक घटनात तुझे देवत्व प्रकट होत गेले. पण प्रत्यक्षात मानव रुपातले तुझे मोहक हसरे रूप सर्वांना आकर्षित करणारे होते. कारण कृष्ण म्हणजेच आकर्षून घेणारा. डोळ्यात प्रेम, करुणा, वात्सल्य दाटलेले, चेहऱ्यावर आपुलकीचे लोभस भाव आणि तुझे ते खट्याळ लडीवाळ हसू प्रत्येकाला आपलेसे करून घेणारे म्हणूनच प्रत्येक जण तुझ्यावर जिवापाड प्रेम करणारा.

हे कन्हैया, तुझे तरुणपणातले मुरलीधर रूप सर्वांचेच अतिशय लाडके. तुझ्या बासरीचे सूर चराचराला धुंद करीत. त्या सुरांनी माणसेच नव्हे तर अवघे गोधन, पशू, पक्षी तुझ्या भोवती जमा होत असत.

हे योगेश्वरा, तू शूरवीर पराक्रमी योध्दा, न्यायनिपूण कुशल प्रशासक, दुर्बलांचा तारणहार, दुष्टांचा संहारक होतास. कौरव पांडवांचे युद्ध होऊ नये, संहार टळावा म्हणून तू शेवटपर्यंत प्रयत्नशील होतास. कौरवांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास. पण ही ‘कृष्णशिष्टाई’ अखेर विफल ठरली.

पुढे कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धात शस्त्र हाती न धरता एका उदात्त हितोपदेशकाची भूमिका उत्तम रीतीने पार पाडलीस. त्यामुळेच पांडव धर्मयुद्धात विजयी झाले. याचवेळी सर्व मानवजातीला मार्गदर्शक असा गीतोपदेश तू अर्जुनाला केलास. जीवनात प्रत्येक गोष्टीत ही गीतातत्वे आजही मार्गदर्शक ठरत आहेत. हे गीता तत्वज्ञान जीवनाची गाथा आहे.

हे वासुदेवा, तू मानव देहधारी अवतरलास. मानवाप्रमाणे जीवनातले सुखदुःखांचे चढ उतार सहन केलेस. सर्व भोग उपभोगलेस आणि भोगलेसही. दुःख, कष्ट, तिरस्कार, पीडा सहन केल्यास. आयुष्यातील सर्व नात्यांना योग्य न्याय देत सर्व नाती उत्तम निभावलीस. माता, पिता, सर्व वडिलधाऱ्यांना योग्य सन्मान, प्रेम दिलेस.

गुरूकुलात सर्व शिष्यांसमवेत त्यांच्यातला एक होऊन राहिलास. मित्र असावा तर असा म्हणत गरीब सुदामाशी आयुष्यभर मैत्री निभावली.

गोकुळवासी गोधन सांभाळायचे. पण कंसाच्या धाकाने सर्व दही, दूध, लोणी मथुरेच्या बाजारात जायचे. खरे तर त्यावर पहिला हक्क गोकुळातल्या बालगोपालांचा. त्यांच्यासाठी तू दहीहंडी फोडण्याला सुरवात केलीस. सर्वांमधली एकात्मता टिकवण्यासाठी गोपाळकाला करायला लागलास.

हे गोविंदा, तू कालियाला दुसऱ्या वनात पाठवून यमुनेचे जलशुद्धीकरण केलेस. गोधनाची अतिशय मायेने काळजी घेतलीस. गोवर्धन पूजेच्या निमित्ताने निसर्ग पूजनाचा पायंडा पाडलास. सगळ्यांना निसर्ग रक्षण, संवर्धन, प्राणी प्रेमाची महती शिकवलीस.

हे माधवा, द्रौपदीला बहीण मानून अखंड पाठीराखा झालास. नरकासुराच्या बंदीवासातून १६००० जणींना मुक्त केलेस आणि त्यांना सन्मानाचे जिणे प्राप्त व्हावे म्हणून त्यांना आपल्या पत्नीपदाचा दर्जा दिलास. स्त्रियांचा सदैव आदर केलास.

अगदी कंस, जरासंध, शिशुपाल यांना चुका सुधारण्याची संधी दिलीस. शंभर अपराध भरल्यानंतर वध केलास. अनन्यभावाने शरण आलेल्यांना अभय देत दुष्टांच्या दुष्कृत्यांना शिक्षा केलीस. सदैव नीतीचे, न्यायाचे अनुसरण केलेस.

हे मोहना, विश्व कल्याणासाठी दुष्ट शक्तींचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी विविध रूपात तू लीला केल्यास. या तुझ्या देवत्वाबरोबरच तुझ्यातलं मनुष्यत्व अतिशय मोहक आणि सर्वांना अगदी जवळचं वाटणारं आहे. सर्व नात्यांना जपणारं तुझं कुटुंबवत्सल रूप मला जास्ती आवडतं.

तुझ्या कृती उक्तीतून तू आपल्या वागण्याला अध्यात्मिक, सामाजिक, नैतिक अधिष्ठान कसे हवे हे दाखवून दिलेस. जीवनात आसक्ती आणि विरक्ती कशी असावी हे दाखवलेस. भक्ती कशी असावी, दुसऱ्याला नेहमी माफ करावे, परोपकार, संरक्षण करावे, नेहमी सत्याची बाजू घ्यावी, त्याचा लगेच परिणाम दिसला नाही तरी सत्याचाच शेवटी विजय होतो अशा अनेक गोष्टी तू कृतीतून दाखवत होतास.

हे दीनबंधो, राजसभेत दु:शासनाने तिच्या वस्त्राला हात लावताच द्रौपदीने तुझ्या असंख्य नावाने तुझा धावा केला. पण तू आला नाहीस. शेवटी तिने, ” हे दीनदयाळा, भक्तवत्सला, आत्मारामा मी तुला अनन्यभावाने शरण आले आहे. माझे रक्षण कर, ” अशी विनवणी करताच तू प्रकट झालास. कारण नुसती स्तुती नव्हे तर अंत:करणापासून मारलेली हाक तुझ्यापाशी पोहोचली. अशी समर्पण भक्ती तुला आवडते. तू आम्हाला निष्काम कर्मयोग, निरपेक्ष प्रेम, नि:स्वार्थ भक्ती शिकवलीस. म्हणूनच तुझी तुला करताना सत्यभामेच्या जडजवाहीराने नव्हे तर रूक्मिणीच्या एका तुळशीपत्राने पारडे खाली गेले. तिचा अनन्यभाव तुला प्रिय होता.

तू शिकवलेल्या या गोष्टी आचरणात आणून सुखाने जगणे शक्य आहे. पण आज कलियुगात माणूस पुन्हा उद्दाम, बेफाम बनू लागला आहे. आपलं माणूसपण विसरला आहे. मायबाप आणि लेकरांचे पवित्र नाते दुरावते आहे. कुटुंबांमधे मतभेदाच्या भिंती उभारल्या आहेत. स्त्री आज सगळीकडेच असुरक्षित झाली आहे. समाजातले दु:शासन राजरोस तिच्या वस्त्राला हात घालत आहेत. समाजातला एकोपा संपत चालला आहे.

हे पुरूषोत्तमा, आज तुझी प्रकर्षाने आवश्यकता आहे. तुझ्या कृपेने प्रत्येकाच्या मनातला निद्रिस्त कृष्ण जागा कर. प्रत्येक स्त्रीच्या मनातली दुर्गा जागृत होऊ दे. अन्याय, अत्याचार लयाला जाऊ देत. पुन्हा सर्वत्र सुधर्माचे राज्य येऊ दे.

हे मधुसुदना, पुन्हा एकदा साऱ्या विश्वाला आश्वस्त करणारे, सर्वांवर कृपेची पाखर घालणारे तुझ्या बासरीचे मधुर स्वर चराचरात घुमू दे. श्रीकृष्णाय नमः ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अनंतकाळच्या माता !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

अनंतकाळच्या माता ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ती त्याच्यापेक्षा सुमारे बारा वर्षांनी धाकटी. त्याची पहिली बायको वारली म्हणून हीची आणि त्याची लग्नगाठ बांधली गेली. खरं तर असं दुसरेपणावर तिला कुणाच्या घरात जायचं नव्हतं. पण त्याला नववधूच पाहिजे होती. पण हिच्या घरात तिच्या मागे लग्नाच्या प्रतीक्षा यादीत आणखी दोघी होत्या. ही गेल्याशिवाय त्यांना पुढे येता येत नव्हते. आणि तो तर एका कारखान्यात पर्मनंट! हा शब्द म्हणजे आर्थिक स्थैर्य हमी. शिवाय तो एक बरे, त्याला प्रथम विवाहातून काही अपत्य नव्हते. यातून ती त्याची बायको झाली. आणि एक adjustment संसार सुरू झाला! आधीच बायकोला पायीची वहाण समजण्याची वृत्ती त्यातून ती वयाने लहान असल्याने तो तिचा नवरा कमी आणि मालक किंवा पालक अशा भूमिकांत जास्त जाई. तरी पण त्याने तिला भरपूर सुख दिलं असं ती आज तिच्या सत्तरीतही हसून सांगत असते. सुख म्हणजे काय.. तर पाणी भरण्याचे! तिच्या वस्तीत पाणी येत नसे. तो रात्री कामावरून आल्यानंतर दूरवरून कॅन भर भरून पाणी आणून देई. आणि येताना त्याचेही ‘पाणी’ग्रहण करून येई. तसं वस्तीत एक नळकोंडाळे होते… पण आपली आपल्यापेक्षा तरुण बायको लोकांच्यात जाणे त्याला पसंत नसे! तिने कुणाशी बोललेलं त्याला खपत नसे.. पदर डोक्यावरून जराही ढळता कामा नये! डोक्यावर खिळा ठोकून ठेवीन पदर अडकवून ठेवायला.. असा दम तो तिला द्यायचा! पण तशातही ती राहिली. चार घरची कामं धरली आणि वर्षानुवर्षे टिकवली.. त्यातून संसाराला जोड मिळाली.

मद्यपान आणि धूम्रपान ही खाण्याच्या पाना सारखी किरकोळ व्यसनं वाटून घेतात लोक. त्याचे दुष्परिणाम थेट रक्तवाहिन्या निरूपयोगी होण्यापर्यंत होतो.. हे पाय amput केल्यावरच समजते अनेकांना. कारण तोपर्यंत रक्तात स्वभावात नसलेला गोडवा रुतून बसलेला असतो!

त्याचे पायाचे एक बोट काढले आरंभी आणि पुढे गुडघ्यापर्यंत प्रकरण गेले. आता सर्वकाही बिछान्यावर. दुसरे बालपण सुरू झाले होते. ती मात्र लहान होऊ शकत नव्हती. किंबहुना महिलांना आणि विवाहित महिलांना उतारवयात लहान होण्याची परवानगी नसते आपल्याकडे. मुलगी, सून, नात इत्यादी नाती रुग्णाची ‘ ती ‘ सेवा नाही करू शकत सहजपणे. हल्ली मेल नर्स, डायपर इत्यादी सेवा सशुल्क उपलब्ध आहेत. पण हे शुल्क ज्यांना देता येत नाही, तिथे ही क्षणाची पत्नी अनंतकाळच्या मातेच्या भूमिकेत जाते.. असे दृश्य सर्व रुग्णालयांत सर्रास दिसते! काय असेल ते असो… पण क्षणाचा पती अनंतकाळचा पिता झाला आहे.. असे अभावाने दिसते! स्त्रीच्या या वर्तनात तिच्या हृदयात तिच्या जन्मापासून घर केलेलं मातृत्व असतं. आयुष्यभर किमान सार्वजनिक जीवनात राखलेलं शारीरिक अंतर, लज्जा इत्यादी इत्यादी रुग्णालयात विस्मृतीत टाकले जाते. आपल्या माणसाची कसली लाज? अशी विचारणा एक बाईच करू जाणे! यात वेदनेमुळे, पुरुषी अहंकारामुळे आणि सवयीने पुरुष या ‘ मातां ‘ वर खेकसतना आढळतात… माता मात्र वरवर हसून आणि मनातून खट्टू होऊन वेळ मारून नेते! अर्थात ही बाब सर्वच जोड्याना लागू होत नाही. काही अनंत काळचे बाबा मी पाहतो आहे आजही.

आपली ही कथा नायिका त्याच्या शिव्या, ओरडा खाते आहे आजही. पण आपले कुंकू शाबूत राखण्यात तिला जास्त रस आहे. आजवर प्रेमाचा एक शब्द कानावर न पडलेली ही अजून आशेवर आहे. तो तिला मर म्हणतो.. त्यावर ती म्हणते.. मग तुमचं कोण करणार? त्यावर तो मौनी बाबा होतो! ती insulin टोचायला शिकली आहे. तिचे पहिले टोचणे त्याला अजिबात टोचले नाही, त्यावेळी तो कधी नव्हे तो गालात हसला होता!

यापुढील पिढ्या हे मातृत्व स्वीकारतील का? हा प्रश्न आहेच. पण पुरुष अजूनही आपल्या मनोवृत्तीत बदल करून बाईला ताई आणि आई या भूमिकेतही पाहू लागला तर… प्रत्येक स्त्रीला माता व्हायचं असतंच की…!

सबंध प्राणिसृष्टीत एकमेकांची सुश्रुषा करण्याची क्षमता इतर प्राण्यांच्या तुलनेत मानव प्राण्याला जास्त लाभली आहे. सर्वच बाबतीत आईवर अवलंबून राहण्यात माणसांची अपत्ये आघाडीवर आहेत! आणि मानवी शरीराची निगा राखणे सर्वांत अवघड बाब असावी. बालकास आहार देणे, शरीर धर्मातून बाहेर पडणाऱ्या त्याज्य पदार्थांची विल्हेवाट लावणे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या घाणीची स्वच्छता करणे, शरीर स्वच्छ करणे या गोष्टी आईशिवाय इतर कुणी अधिक प्रेमाने, सफाईदारपणे करीत असेल तर ती व्यक्ती खूपच मोठी म्हणावी लागेल.. अन्यथा आईला पर्याय नाही! 

पण अडचण अशी आहे की आई शेवटपर्यंत पुरत नाही!

आई जन्माची शिदोरी… सरतही नाही आणि उरतही असं फ. मु. शिंदे म्हणत असले तरी

ही शिदोरी संपते! पण एक मात्र खरे… ही शिदोरी एक नवे नाते घेऊन जीवनात येते.. पत्नी!

मानवी आयुष्याची उत्तरायुष्यातील लांबी लक्षात घेतली तर पत्नीच सर्वाधिक काळ पुरुषाची सोबत करते! 

या सर्व मातांना सादर वंदन!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सूर जेथे वेल्हाळ होती…‘ – लेखक : डॉ. विद्याधर ओक ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

‘सूर जेथे वेल्हाळ होती…  – लेखक : डॉ. विद्याधर ओक ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

पं. गोविंदराव पटवर्धन.

भारतात असे काही असामान्य वाद्य-वादक जन्माला आले, की जणू, ते वाद्य ईश्वराने त्यांच्यासाठीच घडवले असावे. उदा. सनईत बिस्मिल्ला खान, तबल्यात अहमदजान तिरखवा, आणि बासरीत हरिप्रसाद चौरासिया! अगदी त्याप्रमाणेच, हार्मोनियमची निर्मिती परमेश्वराने ज्यांच्यासाठी केली असावी, ते होते कै. पं. गोविंदराव पटवर्धन. माझे गुरू, माझे परम दैवत. २१ सप्टेंबर, १९२५ रोजी गुहागरजवळच्या एका खेड्यात जन्म घेऊन ‘पटवर्धन’ घराण्याचे नाव त्यांनी जणू ‘पेटीवर्धन’ असे केले!

हार्मोनियम हे वाद्य तसे गायनाच्या साथीस, तंतुवाद्यांपेक्षा गैरसोयीचे. याचे पहिले कारण म्हणजे, त्यात स्वरांना जोडणारे ‘मधले’ नाद अस्तित्वातच नसतात. दुसरे म्हणजे, हार्मोनियमचे ट्युनिंग गणिती १२ स्वरांचे (युरोपियन) असल्यामुळे तिच्यात, नैसर्गिक (भारतीय) २२ स्वरांपैकी एकही नसतो. म्हणजे, हार्मोनियम हे वाद्य भारतीय संगीतासाठी मुळातच चुकीचेही असते. तिसरे म्हणजे पेटीचा वादकांसाठीचा एक मोठाच अवगुण, की या वाद्यात बोटांची तयारी ‘१२ पट्ट्यात वेगवेगळ्या प्रकारची’ करावी लागते. म्हणजे, तंतुवाद्यातील (व्हायोलिन, सरोद, सतार, वीणा इ. ) तारेवर खुंटी पिळून स्वर बदलता येत असल्यामुळे, बोटांची तयारी ‘एकाच प्रकारची’ असते. म्हणून, पेटी वाजविणे, हे मुळातच तंतुवाद्यापेक्षा बारापट कठीण; तरीही त्यावर गोविंदरावांना जन्मत:च कमालीचे प्रभुत्व लाभले होते.

गोविंदरावांनी स्वत:च्या मुंजीमधे, वयाच्या आठव्या वर्षी, पाऊण तास स्वतंत्र हार्मोनियम वादन केले. मग पुढच्याच वर्षी गिरगावात थेट दीनानाथ मंगेशकर यांना पेटीवर साथ केली (‘काळी पाच सूर होता’… इति गोविंदराव!). म्हणजे, या माणसाला कुणी गुरूच नव्हता, नव्हे; म्हणूनच आमचा गोविंदा उत्तम पेटी वाजवतो, असे पु. ल. देशपांडे कौतुकाने म्हणत! पुढे ७१ वर्षे आयुष्य लाभलेल्या गोविंदरावांनी, हार्मोनियम आणि ऑर्गन या वाद्यांना सुमारे पाच हजार मैफली व तितक्याच नाट्यप्रयोगांना अविस्मरणीय आणि अविश्वसनीय अशी संगत करून स्वतःबरोबरच अमर केले.

गायक-वादकास उत्तम स्वरज्ञान लागतेच. तयारीच्या गायकांनी गायलेले ‘नोटेशन ध्यानात येणे’, हेच मुळात कठीण असते, ‘वाजविणे’ तर सोडाच. या सर्वसाधारण अनुभवाच्या अगदी विरुद्ध, गोविंदराव, कितीही मुश्किल जागा पेटीकडे न पाहता आणि क्षणार्धात वाजवत आणि रसिकांची, ‘वा गोविंदराव’ अशी दाद हमखास घेत. तुम्हाला ‘नोटेशन’ इतक्या लवकर समजते कसे, या माझ्या (५० वर्षांपूर्वी विचारलेल्या) बाळबोध प्रश्नाला, ‘अरे समजते कुठे, माझी बोटे वाजवून झाल्यानंतर मला कळते’, असे उत्तर त्यांनी दिले होते व ते खरेही होते. म्हणून, गोविंदराव स्वर ‘कानाने’ नाही, तर ‘बोटांनीच’ ऐकतात व वाजवतात, असे रसिक म्हणत.

पेटीतील सर्व १२ पट्ट्यात गोविंदराव ‘समान’ नैपुण्याने वाजवत, हे अगाधच. म्हणून त्यांना ‘स्केल-चेंज’ हार्मोनियमची गरज नसे. स्केल-चेंज ‘पेटीत’ नको, ‘हातात’ हवे, असे ते म्हणत. आणि, ‘ते आम्हाला कसे येईल’ या माझ्या प्रश्नाला, ‘एक एक पट्टी एक वर्षभर वाजव, म्हणजे १२ वर्षांत सर्व पट्ट्यांमधे हात फिरेल’ हे सरळसोट उत्तर मिळाले होते. ‘अशी’ बारा वर्षे कुणाच्या आयुष्यात येणार? एकदा मी माझी नवीन स्केल-चेंजर-हार्मोनियम त्यांना वाजविण्यासाठी मोठ्या उत्साहाने घेऊन गेलो होतो. ‘ही कशाला आणलीस’, असे स्वागत झाले. वाजवायचे स्केल सफेत चारवर ठेवले होते. पहिला राग झाल्यावर म्हणाले, ‘आता सफेत तीन कर’. मग पुन्हा काही वेळाने म्हणाले, ‘सफेत दोन कर’. म्हणजे, केवळ ‘गंमत’ म्हणून पट्ट्या बदलत बदलत वाजवणे, हा गोविंदरावांसाठी निव्वळ पोरखेळ होता! तसेच, कोणत्याही पट्टीत कोणताही राग वाजवितांना त्यांना स्वर अजिबात शोधावे कसे लागत नाहीत, या कुतुहलापोटी मी एकदा त्यांना विचारले, की तुम्हाला ‘सर्व’ पट्ट्यांत ‘कोणत्याही’ रागाचे काळ्या-पांढऱ्या पट्टयांचे ‘डिझाइन’ पेटीवर ‘दिसते’ का? चहाची बशी खाली ठेवून त्यांनी केवळ ‘हो’, एवढेच उत्तर दिले होते!

भारतातील यच्ययावत गायकांना गोविंदरावांनी साथ केली. साथीला बसले की ज्याची साथ करायची तो आपला गुरू, या भावनेने वाजवीत. महाराष्ट्रातील तमाम गायकांसाठी ‘अत्युच्च आदर्श’ असलेले आणि त्यांच्याहून ३७ वर्षांनी ज्येष्ठ कै. बालगंधर्व, यांना साथ करण्याचे गोविंदरावांचे योग आले होते. आणि प्रत्यक्ष बालगंधर्वांनी तेव्हाच्या छोट्या गोविंदाबद्दल, ‘तो मुलगा छान वाजवतो हो’ असे काढलेले उद्गार, आणि एकदा तर प्रत्यक्ष भेटीत ‘बाळा, आम्ही गात होतो तेव्हा कुठे होतास रे?’ हे उद्गार, गोविंदराव त्यांच्या आयुष्यातील ‘सर्वात मोठे पारितोषिक’ मानत

कै. पं. राम मराठे यांच्या नोमतोमने भरलेल्या; आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तिन्ही घराण्यांचे उत्कृष्ट गुंफण असलेल्या जोशपूर्ण लयदार गायकीची गोविंदरावांनी तितक्याच तयारीने केलेली अशक्य कोटीतील साथ, रसिक अजून विसरलेले नाहीत. या दोघांची शारीरिक आणि सांगीतिक क्षमता तर काय वर्णावी ? त्याची कल्पना त्यांनी एका दिवसात केलेल्या तीन तीन कार्यक्रमांवरूनच करता येईल. ‘माझा संगीतातील गुरू आणि संसारातील मोठा भाऊ’, अशा रामभाऊंचे गाणे, त्यांच्या एवढेच, गोविंदरावांना ठाऊक होते. बोटातून झेरॉक्स कॉपी काढावी तसे ते निघत असे. एखादी तान थांबली, तर बोटातून पुढची सुरू होई. इतरही सर्व वादन ‘गाण्याबरोबरच (!)’  सुरू असे. दोन चालकांची एकच सायकल असते, तसे पुढे रामभाऊ व मागे गोविंदराव! आयुष्यातही रामभाऊ त्यांच्या पुढेच निघून गेले.

वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या दैवी उपज आणि चतुरस्त्र गळा लाभलेल्या गायकाची साथ करणे म्हणजे, साथीदाराची एक परीक्षाच असे. कोणत्या क्षणाला त्यांच्या अतिजलद गळ्यातून काय व कसे निघेल, याची कोणतीही पूर्व-कल्पना साथीदाराला मिळत नसे. शिवाय, त्यांच्या गळ्यातील उत्तर हिंदुस्तानी बाज वाद्यावर उतरवणे सुद्धा गोविंदराव लीलया करीत. साहजिकच ‘तुम्हाला कुणाची साथ आवडते’, या माझ्या प्रश्नाला वसंतरावांनी सुद्धा, ‘तसे सगळेच चांगली करतात, पण ‘अचूक’ साथ फक्त गोविंद पटवर्धन करतो’, असे उत्तर दिले होते.

एकदा भीमसेन जोशी यांच्या साथीला गोविंदराव बसले होते. खासगी मैफल होती. पहिला राग ‘मल्हार’ सुरू झाला. गोविंदरावांनी सुरुवातीला नुसता सूर धरून ठेवला होता. थोड्या वेळानंतर, भीमसेनांनी त्यांना ‘वाजवा’, अशी खूण केली. भीमसेनांच्या ताना धो धो पडणाऱ्या पावसाप्रमाणे कोसळू लागल्या. मी लहानच होतो म्हणून, गोविंदराव या अतिमुश्किल ताना पेटीवर कशा वाजविणार, असे वाटून मलाच छातीत धडधडू लागले. मात्र, गोविंदरावांनी भीमसेनांची प्रत्येक तान व जागा, लख्ख आरशातल्या प्रतिबिंबासारखी उचलली. मधे एक क्षणही जात नव्हता आणि हा अद्भुत प्रकार, मैफलभर चालला होता.

छोटा गंधर्वांची लडिवाळ गायकी सुद्धा त्यांच्या हातात चपखल उतरत असे. छोटा गंधर्व तर नेहमीच आयत्या वेळी, तिथल्या तिथे सुचणाऱ्या नवनवीन जागा घेत. आयुष्यात कधीच न ऐकलेल्या अशा शेकडो जागा, गोविंदराव एका क्षणात ऑर्गनवर अलगद फुलासारख्या झेलीत आणि प्रेक्षकांची, ‘वा गोविंदराव’, अशी दाद मिळे. एकदा एका मैफिलीमधे हे एवढे झाले, की छोटा गंधर्व म्हणाले; ‘अरे, मला’ एकदा तरी वा म्हणा! ‘तुम्हाला कुणाला साथ करणे सर्वात अवघड जाते’ या माझ्या प्रश्नालाही, गोविंदरावांनी; ‘तसे कुणाचेच नाही’, पण दादा (छोटा गंधर्व) गात असले की ‘जरा’ लक्ष ठेवायला लागते’ असे उत्तर दिले होते.

अनेक मैफिलीत किंवा नाटकात, गायकांच्यापेक्षा, गोविंदराव काय व कसे वाजवतात याकडेच रसिकांचे लक्ष लागे आणि तरीही गोविंदराव कधीही अधीरपणा दाखवीत नसत. कुमार गंधर्वांनाही ते नुसताच षड्ज (म्हणजे सा) धरून बसत. याबाबत एकदा कुमारांनाच कुणीतरी विचारले की, नुसता स्वर धरायचा असेल, तर तुम्ही पेटीवर गोविंदरावांसारख्या मोठ्या वादकाला का घेता? यावर कुमारांनी, ‘त्याच्यासारखा सा सुद्धा कुणाला धरता येत नाही’ असे मासलेवाईक उत्तर दिले होते! या सर्वांवर कळस म्हणजे, महाराष्ट्र-गंधर्व सुरेश हळदणकर, गोविंदरावांच्या बद्दल माझ्यापाशी त्यांच्या साथ-संगतीचे कौतुक करतांना तर म्हणाले होते की, तुझ्या गुरूच्या उजव्या हातामध्ये ‘परमेश्वर’ आहे.

विविध घराण्यातील धुरिणांना साथी करता करता गोविंदरावांनी स्वतंत्र वादनातही कमालीचे कौशल्य मिळविले. स्वत:ला उत्तम तबला येत असल्यामुळे वेगवेगळ्या तालांचे वैविध्य व डौल सहज सांभाळला जात असे. तोडी, ललत, यमन, मारुबिहाग, चंद्रकौंस, चंपाकली, नटभैरव, मधुवंती असे अनेक राग ते सारख्याच तयारीने आणि साधारण २०-२५ मिनिटे मध्यलयीत वाजवीत. त्यानंतर; झाले युवतिमना, उगिच का, शरणागता, मधुकर, नरवर इ. नाट्यपदांची खैरात होत असे. पदातला प्रत्येक शब्द त्याच्या ऱ्हस्व-दीर्घ उच्चारानुसार आणि अगदी जोडाक्षरांच्या सकट हातातून वाजे. वेगवेगळ्या गायकांची पदे तर ते वाजवीतच, परंतु, एकाच नाट्यपदात अनेक गायक सुद्धा सहजच दाखवीत. शेवटी तीन भैरव्या ठरलेल्या असत. कै. मधुकर पेडणेकर आणि कै. गोविंदराव टेंबे यांना ते फार मानत. कुणी नन्हेबाबू आणि चौरीकर ही नावे सुद्धा घेत. आणि फारच कौतुक झाले तर, ‘अरे मी काहीच नाही, असा मधू वाजवायचा’, आणि; ‘ते (म्हणजे टेंबे) खरे गोविंद ‘राव’, मी नुसताच ‘गोविंदा’, असे विनयाने म्हणत. प्रत्यक्षात, त्यांचे स्वतंत्र वादनातील ‘लयदार तुकडे’, सतारीसारखे ‘झाले’ आणि ‘सफाई’ वर्णनातीत होती. गवतावर वाऱ्याची झुळूक जावी, अशी सपाट तान जाई. ‘गमकेच्या’ जागा, मनगटाच्या ताकदीने वाजवत. अंगठा तर एवढ्या बेमालूमपणे बोटांना ३ सप्तकात पुढे-मागे नेई, की हाताला १० बोटे आहेत की काय, असे वाटावे. त्यांचे स्वतंत्र पेटीवादन ऐकण्यास प्रत्यक्ष कुमार आणि वसंतराव सुद्धा बसत, यातच सर्व आले!

गोविंदरावांनी ऑर्गनवर केलेली संगीत नाटकांची साथ, हा एक स्वतंत्र प्रबंधाचा विषय होईल. याचे सर्व श्रेय ते त्यांचे ‘नाट्य-गुरू’ भालचंद्र पेंढारकर यांना देत. नाटकाच्या साथीदाराला गाण्यांसकट संपूर्ण गद्य पाठ असावे लागते कारण, गाणे सुरू होण्याआधीचे वाक्य संपले की त्या क्षणाला ऑर्गनचा स्वर द्यावा लागतो, थोडाही आधी किंवा नंतर नाही. शिवाय, ४-५ गायक व त्यांच्या वेगवेगळ्या ६-७ पट्ट्या लक्षात ठेवून, सर्व नाटक सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच! यासाठी मैफिलीतील साथीपेक्षा संपूर्ण वेगळे असे तंत्र कमवावे लागते. वयाच्या १४ व्या वर्षी ‘संगीत वेणुनाद’ या नाटकापासून सुरुवात करून गोविंदरावांनी पुढे ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘सौभद्र’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘विद्याहरण’, इ. पारंपरिक नाटकांपासून ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, आणि ‘कट्यार काळजात घुसली’पर्यंत असंख्य नाटकांना ऑर्गन साथ केली. त्यांची १४ संगीत-नाटके गद्य-पद्यासकट तोंडपाठ होती. मी त्यांची ४०० नाट्यपदे ध्वनिमुद्रित करून ठेवली आहेत. दुर्दैवाने, संगीत नाटकेच बंद पडल्यामुळे हा खजिना तसाच दुर्लक्षित रहाणार.

हार्मोनियम आणि ऑर्गन वाजविणे हेच त्यांचे आयुष्य होते. शेवटी मला म्हणाले होते, ‘अरे रामभाऊ गेला, कुमार गेला, वसंतराव गेले, माझे आता इथे उरले आहे काय…’? असे महान कलाकार आपल्या जगात येतात, आणि स्वर्गीय आनंद देऊन जातात, हे रसिकांचे भाग्य! त्यांचे स्मरण ठेवणे, त्यांची कला आपणास जमेल तितकी जोपासणे, आणि ते पुनर्जन्म घेईपर्यंत त्यांची वाट बघणे, एवढेच आपल्या हाती असते. गोविंदरावही यावे आणि मला त्यांच्याकडे पुन्हा शिकायला मिळावे, एवढीच परमेश्वरापाशी प्रार्थना !

लेखक : डॉ. विद्याधर ओक

(लेखक औषधशास्त्र संशोधक असून हार्मोनियम आणि २२ श्रुति पेटी संशोधकही आहेत)

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तटस्थता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘तटस्थता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का ? मग घडलं तर का घडलं ? आपलं काय चुकलं ? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची, ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे ? ती महत्त्वाची आहे का ? आपल्या मताची गरज आहे का ? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.

आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण? परके कोण ? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का ? किंवा मग जी होती ती आपली होती का ? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं, ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला हवी तशी माणसे वागतच नाहीत, हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझं हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होतं. हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते. कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते. त्यामुळे तटस्थता येते.

आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं. हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच, पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलेही ओझं नसतं. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे होऊ शकत नाही. पण अलिप्त राहून ती करू शकतो, हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो, त्या गोष्टी किती फोल होत्या, हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण केले जाते.

नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहीत झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.

तर काहींचे आयुष्य मात्र आम्ही अजूनही शिकतोय !

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो, नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो, नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो, नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.

आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली, नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो, मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला, नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम, नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते, तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !

दोन्हीच कॉकटेल बनवून आयुष्य सुखी करीत आहे.

आयुष्य सुंदर आहे !

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – जोगवा – ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ – जोगवा – ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

आदिशक्ती, आदिमातेच्या उपासनेचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव !

पूर्वी कुटुंब मोठे होती.  रोजचा देवाला नैवेद्य, सप्तशती पाठ, आरती’, नऊ दिवस सवाष्ण, रितीप्रमाणे कुमारिका जेवायला असायची. देवापुढे  अखंड दिवा तेवत असायचा आरती पूजा पाठ यात सगळं घर रंगून जायचं. नऊ दिवस उपास कधी धान्य फराळ अष्टमीला विशेष असं महत्त्व असायचं आणि सगळ्या घरात वातावरण अगदी पवित्र मंगलमय असायचं. 

घरोघरी घटस्थापना असायची. त्याची दसऱ्याला सांगता होऊन ‘दसरा सण मोठा … नाही आनंदा तोटा’ असा दसरा साजरा व्हायचा. अजूनही आपण ही संस्कृती परंपरा जपतो. … देवीला म्हणतो ‘सांभाळून घे आई! चुकलं तर योग्य मार्ग दाखव.’  या आदिशक्तीला आपली संस्कृती स्त्रीरूपात पाहते. आपण तिला माता ..  आई ..  असं संबोधून पूजा करतो, अन् घरातली ‘स्त्री ‘..ती घरासाठी आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठीच देवीकडे काहीतरी मागणं मांडतेच….  आणि स्वतःसाठी अखंड सौभाग्य ! 

पण आज स्त्रीला एवढेच मागून चालणार नाही.  तिने देवीपुढे हात जोडावे ते तिचा आधार मागण्यासाठी .. प्रार्थना करण्यासाठी, सगळं काही सोसण्याचं बळ मिळवण्यासाठीच नव्हे, तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, अत्याचाराला प्रतिकारशक्ती, लढा देण्याची शक्ती लाभावी यासाठी.  तसेच या आदिशक्तीची शक्ती मिळावी यासाठीही.! 

त्यामुळे ‘मी- माझ्या पुरतं’ या वर्तुळाचा परीघ वाढवून समाजासाठी, रंजल्या गांजलेल्या स्त्रियांसाठी, तिला काही भरीव वेगळं असं करता येईल. आणि प्रत्येक गोष्टीसाठी इथं तिथं जोगवा मागण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने स्वतः ‘स्त्री ‘ही स्वयंभू शक्तीच व्हावं, म्हणून “वाढ ग माय जोगवा$ ” म्हणत हात जोडून फक्त देवीपुढे ‘जोगवा’ मागावा.! इतर कुणाकडे नाही. आज त्याचीच गरज आहे. 

देवी माता नक्कीच हा जोगवा देईल.व खऱ्या अर्थानं हा देवीचा नवरात्रोत्सव व दसरा साजरा करता येईल. 

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

विडा घ्या हो अंबाबाई

‘ठेविले अनंते तैसेची रहावे ‘  अशी  आईची समाधानी, आनंदी वृत्ती होती. हातात कांचेच्या बांगड्या, गळ्यात काळी पोत आणि चेहऱ्यावरचे समाधानी हास्य हेच होते आईचे दागिने आणि वैभव.. शेवटपर्यंत सोने कधी आईच्या अंगाला लागलंच नाही. आई गरीबीशी सामना करणारी, आहे त्यात संसार फुलवणारी होती . नानांच्या पिठाला तिची मिठाची जोड असायची. मसाले करून देणे. सुतकताई, पिंपरीला कारखान्यात काम करायला पण जायची . विद्यार्थ्यांना डबा करून देणे अशी छोटी मोठी कामे करून मिळणारी मिळकत हाच तिचा  महिन्याचा पगार होता. 

माहेरी मोकळ्या हवेत हेलावणारा तिचा पदर सासरी आल्यावर पूर्णपणे बांधला गेला .वेळात वेळ काढून महिला मंडळ, एखादा सिनेमा हाच तिचा विरंगुळा होता. त्यावेळी सिनेमाचे तिकीट 4 आणे होतं. प्रभात टॉकीज मध्ये (म्हणजे आत्ताच कीबे)   माझे काका विठू काका ऑपरेटर होते. त्यांचा आईवर फार जीव.  ते आईला कामात खूप मदत करायचे.  तिला मराठी सिनेमाचे पास आणून द्यायचे. तेवढाच तिच्या शरीराला आणि मनाला विसावा.  

तिचा कामाचा उरक दांडगा होता. घरच्या व्यापातून वेळ काढून घरी पांच पानांचा सुंदरसा गोविंदविडा (हा सुंदरसा विडा करायला माझ्या वडिलांनी तिला शिकवलं होतं.)देवीसाठी तयार करून ती रोज जोगेश्वरीला द्यायची. हा नेम तिचा कधीही चुकला नाही.रात्रीच्या आरतीच्या वेळी तबकामध्ये निरांजनाशेजारी सुबक आकाराचा, पिरॅमिड सारखा गोविंदविडा विराजमान व्हायचा. “विडा घ्या हो अंबाबाई” म्हणून अंबेला  रोज विनवणी  असायची.  एक दिवस कसा कोण जाणे विडा द्यायला उशीर झाला. (गुरव )भाऊ बेंद्रे आणि भक्त विड्याची वाट बघत होते.  तबकात जागा रिकामी आहे हे सगळ्यांनी ओळखलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.  विडा विसरला असं कधीच झालं नव्हतं. विड्याची वाट बघत सगळेजण थांबले होते.  भाऊ बेंद्रे तबक घेऊन उभेच राहयले.भक्त आईची विडा घेऊन येण्याची  वाट बघत होते… 

आणि इतक्यात लगबगीने आई पुढे धावली, विडा देवीपुढे ठेवला गेला. आणि टाळ्यांच्या गजरांत  आरतीचा   सूर मिसळला…              

“विडा घ्या हो अंबाबाई,  ही विनंती तुमच्या पायी.”  

… आई अवघडून गेली. आपल्याकडून उशीर झाला म्हणून आईला अगदी अपराध्यासारखं झालं होतं. तिने देवीपुढे नाक घासले. त्यानंतर कधीही तिचा हा नियम चुकला नाही. आम्ही नंतर पेशवेकालीन मोरोबा दादांच्या वाड्यात राहायला गेलो, तरीसुद्धा आईने हा नियम चालू ठेवला होता. ती म्हणाली, “ जोगेश्वरी आईनी आपल्याला पोटाशी होतं ते पाठीशी घालून तिच्याच परिसरात  तिच्या नजरेसमोरच ठेवलंय.”  कारण मोरोबा दादांचा पेशवेकालीन वाडा जोगेश्वरीच्या  पाठीमागेच…  म्हणजे आप्पाबळवन्त चौकातच होता.

 – क्रमशः भाग ४

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संकटनाशन स्तोत्रातले बारा गणपती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “संकटनाशन स्तोत्रातले बारा गणपती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आपण असंख्य वेळेला हे…”गणपती स्तोत्र” …. “संकटनाशन स्तोत्र” म्हणतो, परंतु यामध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नाहीत…

नारदकृत  ‘ संकटनाशन ‘ स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्य स्थाने….

प्रथमं वक्रतुण्डं च 

एकदन्तं द्वितीयकम् 

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं 

गजवक्त्रं चतुर्थकम्

लम्बोदरं पंचमं च 

षष्ठ विकटमेव च 

सप्तमं विघ्नराजेन्द्रं 

धूम्रवर्णं तथाष्टकम्

नवमं भालचन्द्रं च 

दशमं तु विनायकम् 

एकादशम् तु गणपति 

द्वादशं तु गजानन: 

१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ

२. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.

३. कृष्णपिंगाक्ष :- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.

४. गजवक्त्र :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.

५. लंबोदर :- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात.

          (१) रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात,

          (२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.

६. विकट :- हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.

७. विघ्नराजेन्द्र :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.

८. धूम्रवर्णं :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ. 

                  २) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.

९. भालचंद्र :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.

१०. विनायक :- काशी क्षेत्रातील अन्नपूर्णा मंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.

११. गणपती :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.

१२. गजानन :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.

समर्थ रामदास स्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात

।। जय श्री गणेश ।।

माहिती संकलक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print