मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 16 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 16 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

आई-वडिलांच्या महती विषयी आपण सगळेच जाणून आहोत. त्यांचे आपल्यावर असलेले ऋण आपण वर्णूच शकत नाही. माझ्या बाबतीतही हेच खरे आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की असे आई-बाबा मला लाभले.

माझा जन्म झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच माझ्या चेहऱ्यावर ती प्रतिसाद न आल्याने आईच्या मनात शंकेची आणि काळजी ची पाल चुकचुकली. त्याच वेळी आजीने मात्र अचूक ओळखले आणि माझ्या दृष्टीमध्ये काहीतरी कमी आहे हे तिला जाणवले. त्यानुसार माझ्यावर योग्य ते उपचार सुरू झाले आणि माझी जास्तच काळजी घेतली जाऊ लागली.

मी जसजशी मोठी होऊ लागले, तोपर्यंत मला काहीच कधीच दिसणार नाही हे सत्य आई-बाबांना नक्की समजून चुकले होते. पण मला दृष्टी नाही म्हणजे मी काहीच करू शकणार नाही असा विचार न करता आईने मला असा विश्वास दिला की मी माझ्या बुद्धीच्या जोरावर आणि इतर अवयवांच्या सहाय्याने सर्वकाही करू शकेन. आपली मुलगी पूर्ण अंध असताना ही तिने मला उभारी दिलीआणि स्वावलंबी बनवले. त्यामुळे मी सर्वसामान्य मुलींसारखे वावरू लागले. मोठे होऊ लागले.

नृत्यांगना म्हणून माझी ओळख झाल्यानंतर कार्यक्रम ठिकठिकाणी होत असताना, ड्रेस अप करणे, हेअर स्टाईल करणे, उत्तम मेकअप करणे, निवडक योग्य असे दागिने घालणे, यामध्ये आई इतकी एक्सपोर्ट झाली की केवळ त्याच मुळे बाहेरून ब्युटीशियन बोलावून मेकअप करून घेण्याची मला गरजच भासली नाही आणि आज पर्यंत आमचे हेच रूटीन सुरू आहे.

जशी आईनं मला साथ दिली तशीच शाळेच्या बाबतीत, अभ्यासामध्ये, नृत्य कलेमध्ये, बाबांनी मला योग्य मार्गदर्शन केले. माझ्या शिक्षणावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले. इतकं की मला एक प्रसंग आठवतो. बाबांची शाळा बारा ते साडेपाच होती. काम जबाबदारीचे होते. शाळेत इन्स्पेक्शन चालू होती आणि माझा नृत्याचा क्लास पाच ते सहा या वेळात होता. मधल्या वेळात वेळ काढून मला क्लासमध्ये सोडण्यासाठी बाबा आले आणि त्यांच्या त्यांच्या वेळी साहेबांपुढे फाईलही हजर केली. खरच किती अवघड होते हे काम.

अशा तऱ्हेने समाजातील इतर दिव्यांग मुलांच्या पालकांसमोर माझ्या आई-बाबांनी आदर्श घालून दिला असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ??

हॅलो  सर तुम्ही पत्रिका बघता का? असा एखाद्या मुलीचा फोन येणे (आजकाल व्हाटसप मेसेज), किंवा सर तुम्ही पत्रिका जुळवून देता का? (न जुळणारी पत्रिका) असे फोन  यायला लागले की ओळखायचे “संत प्रेम बाबा दिवस” ( १४/२)  लवकरच येत आहे.

माझ्या जोतिषाच्या अभ्यासात ‘ग्रहांकित ‘प्रेम’ प्रकरणांची ‘प्रमेय’ मला अनेक गोष्टी शिकवून गेली. माझी सगळ्यात जास्त भकिते जी  बरोबर आली  आहेत  ती ‘ प्रेम ‘ – प्रकरणाबाबतच. ( लगेच हुरळून जाऊन माझा नंबर घेऊ नका, पुढे वाचा. भाकिते बरोबरच आली  यात शंकाच नाही पण ती भकिते  प्रेमभंग होईल /  अपेक्षित मुलाशी -मुलीशी लग्न होणार नाही अशीच होती. आणि ती एकूण एक बरोबर आली. बाकी संपर्क करायला हरकत नाही, तुमची मर्ज्जी ? )

शास्त्राच्या अभ्यासाबरोबर मानशास्त्राचा ही अभ्यास असणे जोतिषाला गरजेचे असते असे सांगितले जाते. याची प्रचिती  ग्रहांकित ‘प्रेम प्रकरणात’ नक्की येते. म्हणजे अगदी हातात पत्रिका नसताना ही समोरचा जातक  जे बोलतो त्यावरून  हे ‘प्रेमप्रकरण’ आहे हे लगेच लक्षात येते. त्याचवेळी शुक्र – मंगल  रुलींग मध्ये असला किंवा त्यावेळी  पंचमात चंद्र वगैरे असला की या गोष्टीची १०० % खात्री समजावी. याची सुरवातीलाच दोन उदाहरणे दिली आहेत.

नुसत्या पत्रिकेचा विचार करता  पत्रिकेतील पंचम स्थानाचे ( प्रेमप्रकरण ), सप्तम स्थानाशी ( विवाह) सूत जुळले की  प्रियकर/ प्रेयसी   ‘पंचम’दांची ‘ सप्त’ सुरांतील गाणी  आळवायला सुरवात करून सप्त-पदीच्या अपेक्षापूर्ती साठी झटू लागतात. खरं म्हणजे पाचव्या पासून सप्तम स्थान फक्त २ पाय-या दूर  पण पत्रिकेतील   ‘ मंगल, राहू ‘ सारख्या व्हिलनशी  सामना करून  जे तिथं पोहोचतात  ते प्रियकर/प्रेयसी चे नवरा/बायको होतात. जे पोहचू शकत नाहीत  ते अपेक्षाभंगाचे दु:ख कायम ठेऊन राहतात. टँरो कार्डेस मध्ये “२ ऑफ कप्स” ( आनंदी जोडपं असं चित्र असलेलं  कार्ड )  हे कार्ड मला पंचम ते सप्तम स्थान या दोन पाय-या यशस्वी पणे पार करणा-यांच  प्रतीक वाटत. तर “३ ऑफ स्वाँर्ड” हे कार्ड   प्रेमभंग झालाय हे स्पष्ट सांगतं

जेव्हा जेव्हा प्रेमभंग हा शब्द ऐकतो तेव्हा तेंव्हा वपुंचं हे लेखन आठवते //

प्रेमभंग झालेल्या तमाम मित्र-मैत्रिणींनो माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीनं जे सांगितलं, ते सुत्र हे –

संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो. तासंतास चालणारा. केंव्हा केंव्हा फार संथ वाटणारा. आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण, ही मोठा राग आळवून झाल्यानंतर ठुमरीसारखी असते. दहा मिनिटात संपणारी; पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी. पण त्याचं काय असतं, की काही काही स्वर वर्ज्यच असतात. त्याला काय करणार? – म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही. वर्ज्य झालेला स्वर वाईट नसतो, वगळायचा असतो, तर एक राग उभा करायचा असतो, त्यासाठी आपण तो खुषीनं विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकून द्यावयाच्या नसतात. त्यांना गाता – गाता, वाजवता फक्त चुकवायचं असतं

हे सूत्र तुम्हाला पेललं, तर संसाराची तुमची मैफल, रागदारीप्रमाणे बहरेल.

//

‘प्रेम ‘ म्हणलं की पाडगावकरांची ही एक कविता हटकून आठवते. हीच कविता  “ग्रहांकित प्रेमाला”   अनुसरून अशी  लिहावीशी वाटली

 

प्रेम  म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम  असतं

तुमच्या आमच्या ‘पत्रिकेत’  अगदी सेम नसतं

 

काय म्हणता?

या ओळी चिल्लर वाटतात?

काव्याच्या दृष्टीने थिल्लर  वाटतात?

 

असल्या तर असू दे

फसल्या तर फ सु दे

 

तरीसुध्दा

तरीसुध्दा

 

प्रेम  म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम  असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं

 

पंचमातील शुक्रकडून

प्रेम करता येतं

सप्तमातील  राहू कडून

‘अंतरजातीय” होता येतं

घरचा विरोध पत्करून

गुरुजींना धरता येतं

पत्रिका न पाहता ही’

पळून जाता येतं

 

प्रेम  म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम  असतं

तुमच्या आमच्या ‘पत्रिकेत’अगदी सेम नसतं

//

१४ फेब्रुवारी या ‘ संत प्रेमबाबा  दिनाच्या ‘ निमित्याने सदर लेखन  संत प्रेम बाबांना प्रेम पूर्वक  समर्पीत ?

(ग्रहांकित ‘ प्रेमी ) अमोल  ?

 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्हॅलेन्टाइन डे…. ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 ☆ विविधा ☆ व्हॅलेन्टाइन डे…. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

व्हॅलेंटाईन डे ही संकल्पना पाश्चांत्यांची असली तरी,एक प्रेम दिवस म्हणून त्याचं महत्व वैश्विक आहे. प्रेम, प्रेमिक, शृंगार, प्रणय हे मानवी जीवनाचेच भाव विश्व आहे. स्त्री पुरुषांच्या नात्यातला तो एक भावपूर्ण बंध आहे. मग सहजच कवी बींच्या काव्यपंक्ती आठवतात,

।।हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण

ऊणे करु आपण दोघे जण

जन विषयाचे कीडे यांची धाव बाह्याकडे

आपण करु शुद्ध रसपान रे…..।।

असा शुद्ध प्रेमाचा संदेश देणारा,या दृष्टीकोनांतून आपण या व्हॅलेंटाईन डे चा सोहळा करुया..

तिसर्‍या शतकाच्या सुमारास रोम मधे क्लाउडीयस नामक राजा होता. त्याने, सैन्यात भरती होणार्‍यांनी लग्न न करण्याचा आदेश काढला होता. तरीही व्हॅलेंटाईन हा पादरी (priest) सैनीकांची गुपचुप लग्न लावून द्यायचा. हे राजाला कळल्यावर त्याने व्हॅलेंटाईनला देशद्रोही म्हणून अटक केली आणि त्यास फाशीची शिक्षा ठोठावली.तेव्हांपासून तेथील प्रेमी युवक व्हँलेॅटाईन या व्यक्तीच्या नावाने हा दिवस साजरा करत आहेत.. वास्तविक हा बलीदान दिवस आहे. तारीख होती १४ फेब्रुवारी. म्हणून दर वर्षी हा दिवस १४ फेब्रुवारीलाच साजरा केला जातो. आणि या सणाच्या साजरेपणातली मूळ कल्पना ही शुद्ध प्रेमाचीच आहे.

मात्र आपल्या संस्कृती रक्षकांनी टीकेचा भडीमार या व्हॅलेंटाईन डे वर केला. त्यांच्या मते युवापीढीचे राष्ट्रांतर आणि धर्मांतर करणारा दिवस म्हणजे व्हॅलंटाईन डे! तो साजरा करणे म्हणजे नीतीहीनतेचे अनुकरण. आणि हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन!!!

वास्तविक हिंदु संस्कृती ही सर्वधर्म समावेशक आहे.

सर्व धर्मातल्या रीतीभातींकडे सहिष्णुतेने पाहणारी आपली संस्कृती आहे… ती इतकीही लेचीपेची नाही की केवळ अनुकरणापायी तिचा र्‍हास होईल.

वास्तविक होळी हाही एकप्रकारचा प्रेम दिवसच आहे. मनातील जळमटं, किल्मीषं, कडवटपणाला अग्नी देउन प्रेमभावनेला ऊजाळा देणाराच तो दिवस आहे.

एक रंगाचा दिवस. एकमेकांवर रंग उडवून प्रेमानंद साजरा करण्याचा दिवस. राधा कृष्णाच्या प्रेमरंगाचीच आठवण.

आता ग्लोबलायझेशन झाले. तांत्रिक विकासाने जग जवळ आले. खर्‍या अर्थाने विश्व एक कुटुंब बनले.

मग सणांची, सोहळ्यांची आनंदी संकेतांची देवाण घेवाण मुक्तपणे होण्यास संकुचीत विचारांचे अडसर कशाला?

शेवटी मर्यादा पाळणं, स्वैराचार, अनाचार टाळणं, शुद्धता राखणं, हे व्यक्तीसापेक्षच आहे.

म्हणूनच १४ फेब्रुवारीच्या, वैश्विक प्रेमाचा संदेश देणार्‍या व्हॅलेंटाईन डे चं आनंदाने स्वागत करुया…. त्याचा थोडा विस्तार करुया वाटल्यास… फक्त युवा प्रेमींपुरताच मर्यादित न ठेवता,सारीच प्रेममय नाती जपण्याचा, व्यक्त होण्याचा संकल्प करुया… देऊया, या ह्रदयीचे त्या ह्रदयाला…  सारेच करुया शुद्ध रसपान…..!!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

नवरा बायकोच्या जोडी तली एकटी बायको राहिली तरी ती घरातल्या काहीना काही कामात रमू शकते. वेळ घालवू शकते. पण विधुर मात्र घरातल्या कामात लुडबूड करू शकत नाही. त्याची कुचंबणाच होते.हल्ली आम्ही जेष्ठ नागरिक असे काही मित्र कोपऱ्यावरच्या बागेत गप्पा मारायला जमतो. आणि वेळ चांगला जातो. पण अलीकडे कोणी ना कोणी गप्पा मारताना तोंड चालवायला काहीतरी आणत असतात. मी घरातल्यांना काही करायला न सांगता, बाहेरच्या बाहेर काहीतरी घेऊन जातो. आणि मग घरी जातानाही सर्वांना घेऊन जातो.

तू खरं तर किती उद्योग करत होतीस. इतकंच नाही तर पै पै करून पैसे साठवत होतीस. का तर म्हातारपणी औषध आणि दवाखान्याला किती लागतील कुणास ठाऊक?असं नेहमी म्हणायचीस. सुजय डॉक्टर  असूनही तुला अस का वाटत होतं काय माहित! सात आठ किलोमीटर अंतरावर त्याचा दवाखाना होता. मला जरा काही झालं की., तू त्याला फोन करून लगेच बोलवायचीस. एकदा त्यांनी तुला सांगितलं की “आई बारीक-सारीक साठी बोलवत जाऊ नको ग दवाखान्यात पेशंट थांबलेले असतात मग गोंधळ होतो” स्वाभिमानी होतीस तू. तब्बेतीसाठी पुन्हा नाही कधी त्याला फोन केलास तू. खरच तुला औषध, उपचार, दवाखाना, डॉक्टर कशाचीच गरज नाही कधी  लागली. झटकन सगळ्यांना सोडून निघून गेलीस. तुझे कष्टाचे पैसे आम्हालाच ठेवून गेलीस. सगळं सगळं आठवत बसतो. आणि बेचैन होतो ग! त्या पैशापेक्षा तू राहिली असतीस तर! पैशापेक्षा तुझी लाख-मोलाची किंमत आज तु नसताना मला पोखरून काढतीय. विधूर‌‌‌ म्हणून मी जीवन कंठतोय.

कितीतरी गोष्टी आठवत बसतो. कितीतरी निर्णयाच्या वेळी माझा नवरेपणाचा अहंकार जागृत व्हायचा. आणि सुनांसमोर लोकांसमोरही मी तुला मापात काढायचो. महिलामंडळासारख्या ठिकाणी अलीकडे कितीतरी स्पर्धांमध्ये तू बक्षीस मिळवून दाखवलीस. अभिनंदनाचा वर्षाव झाला. अभिमान सिनेमातल्या सारखा माझ्या अस्मितेला तडा गेला. तुझ कौतुकही लोकांना सांगायचो. पण ते सांगताना त्यातही कुठतरी मीपणा असायचाच. नवरे पणाचा अहंकार होता तो! एक गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती,  की कोणासमोर तुला मी बोलायला नको होत. तीच गोष्ट एकटं  असताना सांगता आली असती.  तुला खरं तर माणसांची आवड होती. पण तरीही स्वतंत्र संसाराचीही इच्छा होती.पण ती कधीच पूर्ण झाली नाही. हल्ली कधीतरी जवळच्या संबंधातल्या कोणाकडेतरी कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग येतो.अनेक जण जोडी जोडीने आलेले पाहिले की माझ्या डाव्या बाजूच मोकळं अस्तित्व मला सलत रहात. सगळे तुझी आठवण काढून ते कौतुक करायला लागले की आठवणींचा कढ येतो. आणि त्या बेचैनीला शब्द नसतात.

छोटा सोन्या नातू आजोबांजवळ आला. आजोबांना भूतकाळातून वर्तमानात आणल त्यांनी. आजोबाना  म्हणाला “डोळे मिटा आजोबा. गंमत दाखवतो. आजोबांनी बंडोपंतानी डोळे मिटले. दोन मिनीटात  सोन्याने आजोबांच्या डोळ्यासमोर फोटो  धरला. आणि “आता उघडा डोळे”. आजीचा आणि तुमचा फोटो!  गंमत आहे की नाही ! हा फोटो मी तुम्हाला दाखवायला आणलाय. छान आहे ना? डोळ्याला थोडे कमी दिसत होते पण तरीही ते फोटो कडे पहात राहिले. अस्ताला निघालेल्या सूर्याचा एक सोनेरी तांबूस किरण फोटोवर पडला. आणि तिन्हीसांजातही तो फोटो त्यांना छान दिसला. आजोबांच्या बंडोपंतांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. फुलंल आणि खुलल.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१७) – ‘नामी शक्कल’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग-१७) – ‘नामी शक्कल’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

चेन्नईत आल्यावर जेमतेम महिन्याभरात एक गोष्ट पहिल्यांदा पाहिली तेव्हां मला मोठा धक्का बसला होता. संध्याकाळी सहाच्या आसपासची वेळ असावी. घरापासून थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या मंडईत मी भाजी आणण्यासाठी निघाले होते. अचानक ढोल-ताश्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागला आणि त्या रस्त्यावरच्याच एका गल्लीतून एक मिरवणूक बाहेर येताना दिसली. पुढं लोक पायघड्या पडतील अशी भरपूर फुलं उधळत होते, पाठोपाठ आपल्याकडच्या ढोलक, ताशा, गोलाकार पण छोट्या आकाराचे ढोल अशी वाद्यं वाजवणारे लोक होते आणि त्या लोकांसोबत, आगे-मागे असलेले लोक बेभान होऊन नाचत होते, मधेच फटाक्यांची माळ ही वाजली. ह्या पुढच्या लवाजम्यापाठोपाठ एक सुंदर सजवलेली चंदेरी रथसदृश गाडीही येऊ लागली. त्या सगळ्याच प्रकाराकडं मी कुतुहलानं पाहात होतेच, मात्र तो सजलेला रथ पाहाताक्षणी वाटलं कि, थोडं पुढं जाऊन कोणत्या देवाची मिरवणूक आहे पाहावं.

ती मिरवणूक बऱ्यापैकी टप्प्यात आली तसा माझा चेहरा उत्साहानं, आनंदानं ओसंडून वाहात असावा. कारण माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहात गर्दीत माझ्या शेजारी असणारा एक मध्यमवयीन माणूस हातवारे करून मला काहीतरी सांगू लागला. तेव्हां तामिळ अजिबातच समजत नव्हतं. मात्र त्याच्या हातवाऱ्यांवरून तो मला ‘पुढं जाऊ नको’ असं सांगत असावा. दोन क्षण थांबून मी पाहिलं तर मिरवणुकीत सगळे पुरुष लोकच होते आणि म्हणून तो माणूस मला एकटीला पुढं जाऊ नको असं म्हणत असेल असं वाटलं. मग मी त्याला हिंदीत ‘भगवान का दर्शन करना है’ असं सांगत हात जोडून देवाला नमस्कार करतात तसा नमस्कारही करून दाखवला. पण त्याला ते काही कळलं नसावं. तो आणखी मोठ्या आवाजात मला परत तामिळमधे काहीतरी सांगू लागला. मग मी त्याला ‘गॉड गॉड… नमस्कारम्‌  नमस्कारम्‌’ असं म्हणून परत ती नमस्काराची ऍक्शन केली. तोवर अगदी जवळ आलेल्या मिरवणुकीला लोक आपोआप बाजूला होत वाट करून देत होते आणि मी मात्र किमान डोकावायला तरी मिळावं म्हणून जंगजंग पछाडत होते. बाजूच्या माणसानं परत काहीतरी सांगितलं आणि मी परत ‘गॉड, गॉड’ म्हणत किंचित रथाच्या दिशेनं पुढे जाताना त्या माणसानं कपाळावर हात मारून घेतल्याचं तेवढं मला दिसलं.

मी त्या रथापासून साधारण चार फूट अंतरावर असेन तेवढ्यात त्या रथासोबत चालणारा एक माणूस मी पुढं येताना पाहून वस्सकन्‌ माझ्यावर खेकसला. तसंही कानाला सवय होईपर्यंत ह्या भाषेतलं साधं बोलणं ऐकलं तरी माझ्या काळजात धडकी भरायचीच, ते वसकणं तर अजून जोरदार होतं म्हणून मी जामच घाबरले. आपसूक दोन पावलं मागं येतायेता टाचा उंचावून रथात डोकावायची संधी मात्र मी साधली… पण तिथं जे काही दिसलं त्यानं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या रथात एक मृत शरीर होतं आणि ती एक अंत्ययात्रा होती. अशाप्रकारे वाजतगाजत जाणारी अंत्ययात्रा मी पहिल्यांदाच पाहिली होती म्हणून तो चांगलाच धक्का होता. आता ह्या गोष्टीची सवय होऊन गेल्यानं काहीच वाटत नाही, मात्र तेव्हां हे पचायला फारच जड गेलं होतं.

नंतर ओळखी होतील तसं आजूबाजूला तोडक्यामोडक्या हिंदी-इंग्रजीतून साधलेल्या संवादातून काही गोष्टी कळल्या. गेलेल्या माणसाला रडत निरोप न देता अशाप्रकारे निरोप दिला कि लोकांना नाचताना पाहून ते आनंदात आहेत अशा समजुतीमुळं जाणाऱ्या आत्म्याला क्लेश होत नाहीत, शेवटचा निरोप रडून-भेकून कशाला द्यायचा आनंदानं द्यावा असंही कुणी म्हणालं, कुणी म्हणालं कि लोक नाचतात तेव्हां माणूस गेल्यानं झालेलं दु:ख आत साठून न राहाता त्याचा आपोआप निचरा व्हायला मदत होते, त्या दु:खानं धक्का बसला असेल तर त्याची तीव्रता आपोआप कमी होऊन मन हलकं व्हायला मदत होते. तसे भाषेच्या अडसरामुळं सगळे संवादही वरवरचेच होते. खरं कारण काहीही असो, मात्र मला त्यावेळी ते पटायला आणि पचायला खूपच कठीण गेलं होतं.

मध्यंतरी माझे कलीग असलेल्या चेन्नईतल्या एका सुप्रसिद्ध आणि अभ्यासू मृदंगवादकांच्या एका लेक्चरला गेले होते. तेव्हां त्यांनी ‘रिदम’ ह्या संकल्पनेविषयी बोलताना विषय अचानक ह्या गोष्टीकडं वळला. माझे कलीग लहानपणापासून अमेरिकेत वाढलेले आणि क्वचित चेन्नईत येऊन-जाऊन असे असायचे. दहा-बारा वर्षांपूर्वी ते चेन्नईला कायमचे स्थायिक झाले त्यावेळी अशी वाजतगाजत अंत्ययात्रा त्यांनीही पहिल्यांदा पाहिली. ते सांगत होते, ‘माझ्या मनात आलं कि हा रिदम आणि इतकं जोशपूर्ण वादन तर आपल्याला पटकन नाचायला प्रवृत्त करणारं आहे. मग ह्या दु:खाच्या क्षणी ह्याचा वापर का केला जात असावा? एका अगदी बुजुर्ग व्यक्तीकडं ह्या परस्परविरोधी वाटणाऱ्या गोष्टीबाबत चौकशी केली असता ती व्यक्ती सहजपणे म्हणाली कि, तो माणूस खरंच मृत झाला आहे कि अजून जिवंत आहे हे पाहाण्यासाठी असं वाद्यवादन केलं जातं!’ पुढं ते म्हणाले, ‘हे ऐकताच मी अवाक्‌ झालो. वाद्यवादनाचा/संगीताचा मन आणि शरीराशी असलेला संबंध एक वाद्यवादक म्हणून मला चांगलाच माहिती आहे. मात्र त्याचा हा असा वापर मला स्तिमित करणारा होता.’

ते ऐकून आपल्या पूर्वीच्या पिढ्यांची बुद्धीमत्ता आणि तर्कशास्त्राच्या आधारे गोष्टींचा वापर करण्याची क्षमता जाणवून त्यांच्याविषयीचा माझा आदर नव्याने कैकपटींनी वाढला. ज्या काळी वैद्यकशास्त्र ही गोष्ट अजून अस्तित्वात यायची असावी, हृदय सुरू आहे कि थांबलं आहे हे दाखवणारं मशीन अस्तित्वात यायचं होतं  त्याकाळी हुशार मानवानं माणूस मृत झालाय कि जिवंत आहे, हे पडताळून पाहाण्याची ही नामी शक्कल योजली असावी… तीही अर्थातच उपलब्ध साधनांच्या आधारे! ‘जोशपूर्ण वाद्यवादनातून निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळं माणसाच्या शरीरामधे उत्पन्न होणरी उत्तेजना’ ह्या गोष्टीचा असा उपयोग खरोखरीच स्तिमित करणारा आहे.

बराचवेळ माणूस उठलं नाही, त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, त्याच्या नाकासमोर धरलेलं सूत हाललं नाही तर तो मृत झाल्याचं मानण्यात येत असावं. मात्र कुठंतरी अशीही शक्यता असेल कि काही क्षणांसाठी त्या व्यक्तीची शुद्ध हरपली असेल, नाडीचे ठोके अत्यल्प असतील परंतू तो पूर्ण मृतावस्थेत गेला नसेल तर अशा जोशपूर्ण वाद्यवादनाने उत्तेजित होऊन त्याच्यात काहीतरी हालचाल जाणवेल. अशाप्रकारे तो जिवंत असल्याचं लक्षात आल्यावर त्याचा जीव वाचवण्याचे काही प्रयत्न करता येतील. संगीताचा माणसाच्या मन आणि शरीराशी असलेल्या संबंधाचा इतका सूक्ष्म अभ्यास आणि वास्तविकतेमधे ‘मृत्यूच्या खात्रीसाठी’ त्याचा असा चपखल वापर ह्याचं हे अत्यंत नेमकं उदाहरण म्हणता येईल.

क्रमश:…

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोकसाहित्य – आम्ही जाऊ म्हयेराला – भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – आम्ही जाऊ म्हयेराला – भाग – 1  ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

 बाई आपल्या घर-संसारात, मुला-बाळात, घरच्या काम-काजात गुरफटून गेली असली, तरी मनाच्या एका कोपर्‍यात कुठे तरी माहेरची, विशेषत: आईची, तिच्या मायेची आठवण घमघमाट असते. अगदी आपल्या संसारात ती सुखी असली, रमून गेली असली तरी.

नवी नवी सासुरवाशीण सकाळी जात्यावर दळायला बसते. दळताना आई आठवते. मग ती जात्याला विनवते,

‘जात्या तू ईश्वरा नको मला जड जाऊ। बयाच्या दुधाचा सया पाहयतात अनुभावु।।‘

जात्याला ईश्वरा म्हणताना, आईच्या दुधामुळे बळ आल्याचं अभिमानाने सांगते. हे दूध म्हणजे काही तान्ह असताना प्यालेलं नव्हे. आईने केलेल्या  संस्काराचं दूधसुद्धा. तिला माहीत आहे, ती जरा जारी चुकली तरी तिच्या माहेराचा उद्धार होईल. ‘हेच का तुझ्या आईनं लावलेलं वळण असं म्हंटलं जाईल म्हणूनच आपण कुठे चुकू नये, आणि माहेरच्या लोकांना कुणी नावे ठेवू नयेत, म्हणून ती दक्ष असते.

दळण सरतं. ‘काई सरल गं दळईन। सूप झाडूनी गं उभा केलं। चित्त गं बयाच्या गावा गेलं।।‘

मग इतर काम करताना, स्वैपाक-पाणी करतानाही तिला आई आठवते.

‘काई आगीबिगनीच्या पुढं। का ग जळतं वलतोल।। काई गं बयाबी वाचुईनी। कोण म्हणील काम केलं।।‘

पण कधी तरी त्यांच्या ओव्यातून एखादी सासू अशीही सापडते, जी आपल्या सुनेचं कौतुक करते॰

‘पहाटेच्या पार्‍यामंदी।  कोंबडा आरवला। बाळयाची राणी झोपेची जागी झाली। दुरडी दळण झालं पायली।।‘

पाट मांडून, ताट वाढून वाट पाहणारीही एखादी सासू दिसते. नाही असं नाही. अशा सासूबद्दल सूनही कृतज्ञतेने म्हणते,

‘काई सासूबाई आत्याबाई। तुम्ही ग तुळशीची जशी पानं । काई ग तुमच्या हाताखाली। आम्ही नांदतो सुना छान।‘

जेवतानाही तिला पुन्हा आईची आठवण  होते. ‘काई बारीक गं पिठायाची। तेची गं भाकरी चवघडी। बया गं माझीच्या जेवणाची। याद येतीया घडोघडी।।‘ आईच्या चविष्ट जेवणाची, तिने केलेल्या सुघड ‘चवघडी’ भाकरीची आठवण काढत ती एकेक घास घेते.

नव्या नवेल्या सुनेला तर आईची आठवण पदोपदी येते. आई म्हणजे जशी साखरंच. ‘काई आईला गं म्हणू आई । गोड गं इतकं काही नाही। जशी साखर ती गं बाई। जर्रा गं कडूपणा ठाव नाही।। आई वाचून माया दुसर्‍या कुणाला नाही, हे सांगताना कधी ती म्हणते, ‘काई पुरबीगणाची पोळी । पोळी पोटात गं फुटईली । काई गं बयाच्या वाचूईनी। मया लोकाला गं कुठईली।।‘ कधी ती सांगते, ‘काई वाट नि गं वैला वड। फांद्या गं फुटल्या ठायी ठायी। सारी गं पिरतीमी हिंडलो बाई। बया गं शिवाय माया नाही।।‘

अशा मायेचा मायेशीसुद्धा कधी कधी भांडण होतं बरं का! पण ते भांडण कसं? ‘माय गं लेकीच गं भांडाईन। दूधा गं तुपाची उकईळी। काई गं माझी ती बयाबाई। बया गं मनानं मोकईळी।। विस्तव काढला की उकळणारं दूध, तूप खाली बसतं. तसं प्रसंग संपला की आईचा  रागही ओसरतो. ती मनमोकळी असल्याचं ती सांगते.  तिला नेहमीच वाटत राहतं, ‘काई गं सगळ्या गोतामंदी। जल्म दिल्याली बया थोर।‘ आईला कधी ती तुळस म्हणते, तर बाप म्हणजे चाफा. कधी ती दोघे म्हणजे आपल्या वाटणीला आलेला समिंदर आहे, असं सांगते. समुद्रातून कितीही घ्यावं, तो थोडाच कोरडा पडणार? आई-बापाच्या मायेचाही तसंच आहे. ‘काई वळवाच्या गं पावसानं। नदी वढ्याला गं नाही धर। काई गं बापाजी बयाबाई। माझ्या गं साठयाचं समिंदर।।‘ तर असं मायेचं माहेर.

क्रमश:  पुढील लेखात आम्ही जाऊ म्हयेराला – भाग – 2 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

बंडोपंत आज गॅलरीत आरामखुर्चीत विचारमग्न होऊन शांतपणे बसले होते. नजर शून्यात होती. हे शून्य काय आहे? शून्य तर काहीच नाही. काहीच नाही. मधलं सगळं सगळं पहात बसले होते.

राधा काकू गेल्यापासून बंडोपंत खूपच शांत शांत झाले होते. फारसै कोणाशी बोलत नव्हते. कोणत्याही गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया देत नव्हते. आपलं मतप्रदर्शन करत नव्हते. मूकपणाने निर्विकारपणे घरातल्या सगळ्या घटना त्रयस्थपणे पहात रहायचे.राधा काकूंना जाऊनही आता सहा महिने होऊन गेले. खरंतर सगळं काही मनासारख छान दिसावं असं होत. सुजय डॉक्टर झाला. सुमंत सीए झाला. शिवांगीच लग्न हन तिचा संसार उत्तम चाललाय. काय कमी होत! मोठी उणीव होती. भरुन न निघणारी. एक मोठी पोकळी त्यांना जाणवत होती. आणि त्या पोकळीतल्या शून्यातच ते भूतकाळात गेले. मनाने राधा काकूंशी बोलत राहिले.

आपलं लग्न झालं आणि भरल्या धान्याचे माप ओलांडून तू या घरात आलीस. आणी घराचं रुपडच पालटून गेलं. सरवायची जमीन आणि कौलाच छप्पर असलेल्या आणि अडचणीच्या घरातही न कुरकुरता चार-पाच वर्ष आपण काढली. पण तेही घर फ्लट वाटत होतं.

दिवस जात होते घरातला व्याप बराच होता. आले गेले पाहुणे सगळ्यांना घराचं दार सदैव उघडं होतं. तू मात्र त्या व्यापात बुडून जाऊन हसतमुखानं सगळ्यांचा पाहुणचार आणि स्वागत करत होतीस. इतकंच नव्हे तर हे सगळं करताना प्रत्येकाच्या आवडीनिवडीही पहात होतीस. आणि हे सगळं करत असताना मुलांनाही तू घडवलस. मुलं अभ्यास आणि इतर क्षेत्रातही नावलौकिक मिळवत होती. मी अभिमानाने त्यांचे यश सर्वांना सांगायचो. पण मला मात्र या यशाचा वाटेकरी होता येत नव्हतं. खरोखर त्यांचा अभ्यास इतर स्पर्धा, याबाबत मी कधीच कशात लक्ष घातलं नाही. मी सतत माझ्या मित्र मंडळातल्या कोणाला ना कोणाला जेवायला, चहाला बोलवत असायचो. खरं तर तेव्हा तुला मदत करणं माझं काम होतं. तुझ्या कष्टाची मी कधी कदरच केली नाही. तुझा वाढदिवस असू दे. दिवाळी असुदे.मोठ्या गोष्टींचा किंवा दागिन्यांचा हट्ट तू कधीच केला नाहीस. मोठं खटलं असल्यामुळे परिस्थिती समजून, आहे त्यात समाधान मानत आलीस. अगदी पाणी हवं असलं तरी मी जागेवर बसून मागायचो. खरोखरच मी हाताने कधी चहा केलेलाही मला आठवत नाही. कधी डोकं दुखलं तर मी तुला हक्काने सांगायचो “अगं डोकं दुखतय जरा बाम लावतेस का”? कपाळावरुन तुझा हात फिरला की दुखणं कमी व्हायचं. तुझी तब्येतीची तक्रार कधीच नव्हती. एकदाच तुझं डोकं खूप दुखत होत. मी दाबून द्यायला हव होत. पण बरेच दिवसांनी, जुना मित्र आलाय म्हणून मी निघून गेलो. मला सगळ्या गोष्टींचा पश्चात्ताप होतोय. आता माझं डोकं मी कोणाला चेपायला सांगणार? बाम लावून दे, अस कोणाला सांगणार? चेहऱ्यावर दिसल की कोणीतरी गोळी आणून देतात. त्या गोळीबरोबर तुझ्या हाताचा स्पर्श नसतो. अनेकदा अस होत की, मला सगळ्यांशी खूप बोलायचं असतं. पूर्वीच्या आठवणी सांगाव्याशा वाटतात. गप्पांचा मूड येतो. पण प्रत्येकजण आपापल्या कोशात इतका गुंतलेला असतो की माझं सगळं बोलणं एका शांततेत विरून जात. कधीतरी एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण हक्काने कोणाला सांगणार? तुला हक्काने सांगायचो “अगं आजभजी  कर उद्या वडे कर”. पण आता जे काही असेल त्यालाच वडे आणि भजी असच नाव देतो. आणि त्याचाच आस्वाद घेत खातो. तुझ्या हातच्या पुरणपोळीची सर विकतच्या पुरणपोळीला नाही येत ग! तशी पोळी आता मला कधीच नाही मिळणार!

क्रमश:….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ कवितेचे रसग्रहण – प्रा. तुकाराम दादा पाटील

प्रा. तुकाराम दादा पाटील

 ☆ काव्यानंद ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ कवितेचे रसग्रहण – प्रा. तुकाराम दादा पाटील ☆ 

कवी सुहास पंडित यानी आपल्या या कवितेत भक्तीरस मोठ्या श्रद्धेने आळवला आहे. जीला आपण मधुराभक्ती म्हणून ओळखतो तिची आठवण ही कविता वाचताना येते.स्री सुलभ मनाला परमेश्वराची आठवत कशी येते हे सांगताना कवी म्हणतात.

कवी सुहास रघुनाथ पंडित

जेव्हा माझ्या कानावर बासरीची धून येते तेव्हा मला मनमोहन बन्सीधराची प्राकर्शाने आठवण येते. आता धोधो बरसणा-या आषाढधारा सरल्या आहेत आणि श्रावण मासातील रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे.अशा वेळी  माझ्या मनाला भुरळ पाडणारे आवचितच भास का होत आहेत? माझे मन हुरहुरते आहे. पण  माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली असून माझ्या डोळ्याना मला जिथे तिथे माझा  श्रीनीवासच दिसतो आहे. त्याचाच मला सारखा भास होतो आहे. येथे व्यक्त होणारे हळवे कवी मन फुललेल्या रमणीय निसर्गातच  परमेश्वराचे दर्शन घेत आहे असे वाटते. पण तेवढ्यावरच न थांबता ते मन पुढे म्हणते  मला प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप पहावयाचे आहे. मी डोळ्यात जीव आणून त्या विधात्याची वाट पहात आहे. जीवाला जीव लावून जायची  देवाची लाघवी जुनी सवय मला माहित आहे. म्हणूनच माझे मन त्याच्या दर्शनासाठी व्याकूळ झाले आहे. या माझ्या आशाळभूत मनावर कोण बरे मायेची फुंकर घालायला येईल?. मी देवाच्या ध्यासाने ठार वेडी झाले आहे असे सारे जगच मला म्हणते आहे.

त्याचे प्रत्यक्ष असे रूप माझ्या नजरे समोर नाही. पण तरीही त्याच्या कल्पक  स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी माझी वाणी अपुरीच  आहे असे मला वाटते. माझ्या आयुष्यात आसा एखादा सोन्याचा दिवस यावा आणि देवाचे प्रत्यक्ष दर्शन मिळून माझ्या जगण्याचे सार्थक व्हावे.

येथे आता राधा नाही. सखा सुदामा नाही.पण माझे मन  त्यांच्या दर्शनासाठी आणि सहवासासाठी उतावीळ झाले आहे. त्या माझ्या मनाला मी कसा लगाम घालू? माझा हा मनोदय मी माझ्या देवाला आता कोणत्या भाषेत सांगू?

माझ्या हृदयात दाटलेल्या आवेगपूर्ण भावना व्यक्त करणारी भाषा माझ्या ओठावर येइनाशी झाली आहे.  आकाशात दाटलेले हे शामवर्णी मेघ ही मला स्वस्थ पणे जागू देइनासे झाले आहेत. म्हणून मी आता या वनातील पानापानात  व त्यांच्या हरित रंगात दडून बसलेला हरी पहातो आहे.मला आता माझा हरी तेथेच दिसतो आहे.भेटतो आहे.

मनाच्या आभासी संभ्रमावस्थेत निसर्गात समाविष्ट झालेला हरी पाहताना होणारा मनमुराद आनंद निसर्गाचे दिव्यत्व दाखवतो. पण तेथेच परमेश्वर पहाणे ही मानवी श्रद्धा बनायला पाहिजे हेच या कवितेतून कविला सांगायचे आहे असे मला वाटते. निसर्गाच्या या सामर्थ्याची आपल्याला ओळख पटली तर मग आपला स्वर्ग आपल्याच भोवती असेल. आणि तोच आपला तारणहार परमेश्वर असेल.  दिलेल्या या संदेशाला प्रतिसाद देवून आपण एक नवी दृष्टी प्राप्त करून घेऊ आणि सूखीही होऊ. या संदेशाला साठी कवीचे आभार. कविता दीर्घ आहे पण वाचनीय आहे.

धन्यवाद

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोकसाहित्य – ताईता बंधुराजा ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – ताईता बंधुराजा  ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

बाळराजा आणि भ्रातार याच्या पाठोपाठ, विपुल ओव्या सापडतात, त्या बंधुजीबद्दल लिहीलेल्या. बंधुजी कसा? तर गळ्यातला ताईत जसा. ताईत जसा अगदी जवळ गळ्याला लागून बांधलेला असतो, तसाच भाऊ मनाच्या अगदी जवळ, मनाला बिलगून असतो. ताईत, इडा-पीडा, आंनिष्टापासून रक्षण करतो, असा मानलं जातं, भाऊदेखील तसाच रक्षणकर्ता असणार, याची खात्री असते. म्हणूनच अशा ’ताईता बंधुराजाच्या प्रेमाच्या मायेच्या तिने खूप खूप ओव्या गायल्या आहेत. त्यातून त्याच्या रुबाबाचं, दिलदारपणाचं, त्याच्या कर्तृत्वाचं वर्णन केलय. ‘आटपाट नगराचा। भाऊ माझा ग राजा। टोलेजंग इमारत । भरजरी गाजावाजा।।‘ यात भावाच्या कर्तृत्वाचं आणि रुबाबाचं दोन्हीचं वर्णन आहे. त्याची टोलेजंगी इमारत आहे. गावात त्याचा ‘गाजावाजा’ आहे. काइतुक, आदर, कीर्ती असं सगळच त्या ‘गाजावाजा’ शब्दातून व्यक्त होतय. गाजावाजा तिला भरजरी वाटतो. म्हणजे नजर्दीपावणारा वाटतो. ‘भरजरी’ हाशब्द भावाची समृद्धी व्यक्त करण्यासाठीही आलेला असेल.

बहीण – भावाचं प्रेम कसं? तर ती म्हणते, सीताफळासारखं. ‘फोडील ग सीताफळ। आत साखरेची काया।।

बहिणीचा लग्न होतं. ती सासरी येते. साना-वाराला तिला माहेरी न्यायला भाऊ मुराळी येतो. बहीण मनोमणी हरखते.  त्याचं आदरातिथ्य, त्याचा पाहुणचार किती करू आणि किती नको, असं तिला होऊन जातं. ‘पंचामृताचं जेवण।याला गुळाचं लेवण। असा जेव माझ्या बंधू । भाऊबीजेचं जेवण।। तो उशिरा आला, तिन्हीसांजेला आला, तरी त्याच्यासाठी काही करणं तिला जड जात नाही. अनारशासारखा किचकट वेळखाऊ पदार्थ करण्याचीही तिची तयारी आहे.

आपल्या भावाचा रुबाब राजासारखा आहे, हे सुचवताना ती म्हणते, बंधू पाहुणा आला तर,

‘सया ग म्हणती कोण राजा? राजा ग नव्हे त्यो ग बंधू माझा।।

आपला हा बंधू दिलदार असल्याचही ती सांगते. कसा? ‘काळी नि ग चंद्रकळा। एका धुण्यानं झाली गोळा।‘ तर ‘धाकल्या बंधुजीनं दिलं रुपये साडे सोळा।।’ असा मायेचा बंधुजी आणि माया का असणार नाही? अखेर ‘अशी ना बहीण भावंड । एकया झाडाची संतर ‘ च ती. एका झाडाची संत्री, एका झाडाची फुलं, फळं आशा तर्‍हेचं वर्णन ओव्यातून येतं.

अशा या राजस भावाला परदेशी सांभाळ असं ती सूर्यनारायणाला विनवते. ‘नारायण बाप्पा तुला सोन्याचं कमळ। भाई राजसाळा माझ्या परदेशी सांभाळ।।’ तसच ती आई लक्ष्मीला विनवते, ‘आई तू सोन्याच्या पावलांनी ये आणि माझ्या बंधूचा धरला पालव तू सोडू नको.’ भावाची भरभराट पाहून बहिणीला समाधान वाटतं. ‘ती म्हणते, ‘लक्ष्मीबाई आली पांगळया पायाची। बंधूला केली बोली नाही फ्रून जायाची।।

अशा या राजबिंडया भावाचं लग्नं होतं. लाडा -कोडाची भावजय घरात येते. शहाणी, समजुतदार नणंद म्हणते,

‘काई बंधुजी ग आपाइला। भावज का लोकाची कशी म्हणू। बचा नागाची ती ग पद्मीण।।‘

हा समजूतदारपणा दुही अंगी हवा पण भावजय हळू हळू आपले रंग दाखवू लागते.  तरी पण सामोपचाराने घेत ती म्हणते, ‘आपुल्या सोन्यासाठी चिंधी करावी जतन।’ भाऊ सोन्यासारखा तर भावजय चिंधीसारखी. सोन्यासाठी तिला सांभाळायलाच हवीजुन्या काळात जुन्या फाटक्या कपड्यांच्या चिंध्या म्हणजे त्या काळातला बायकांचा लॉकरच. निगुतीनं त्यात सोनं बांधून ठेवायचं. त्यासाठी चिंधीही सांभाळून ठेवायचे. म्हणजेच भावासाठी भावजयीला ही मान द्यायचा. बहीण-भाऊ एका झाडाची संत्री खरी, पण भावजय आली आणि तिने अंतर पाडलं. ‘अशी साखरची पुडी। कशी मुंग्यांनी वेढीली। भावाला होती माया। भावजयीनं तोडली ।।

भावा-बहीणीतलं अंतर हळू हळू इतकं वाढत जातं की आता तो तिला माहेरीदेखील न्यायला येइनासा होतो. सणाला बाकीच्या माहेरी चालल्या आहेत. भाऊ मुराळी त्यांना घेऊन जातोय. आपल्या दारावरून आशा किती तरी गाड्या जाताहेत. आपल्या दाराशी मात्र गाडी  थांबत नाही, याची खंत ती सूचकतेने व्यक्त करते.

‘माझ्या ग दारावरनं। रंगीत गाड्या गेल्या। भावानं बहिणी नेल्या । दिवाळीला ।।

बाईला कधी तरी माहेरी जावसं वाटतच. पण तिथे काय अनुभव येतो?

‘आई- बापाच्या ग राजामंदी। दुधा ग तुपाची केली न्याहारी। भाऊ नि भावजयच्या राजामंदी। शिळ्या ताकाची मला चोरी।।

आता दिवस बदलले आहेत. भाऊ वेगळा राहू लागलाय. ते पाहून तीदेखील कष्टी होते.

‘काई मावबिगळ्याच्या घरी। भाच्या बाळाची ग सवती खोली। काई ग धाकट्या बंधुजीनं। निम्म्या राज्याची केली बोली।।

हे सगळं भावजयीमुळे झालं, असंही तिला वाटत राहतं. अर्थात सगळ्याच जणी काही आशा घर मोडणार्‍या आणि माणसं तोडणार्‍या नसतात. अशा पद्मिनीचं गुणगानही ओव्यातून केलेलं आढळतं. सुंदर, तरुण, गुणी बाईसाठी पुष्कळदा ‘पद्मीनी’ असं अनेक ओव्यातून म्हंटलं गेलय.

कसंही झालं, तरी एक तरी भाऊ हवाच, असं बाईला आसासून वाटतं. एका अहिराणी ओवीत म्हंटलय,

‘दुबळा पाबळा बंधू बहिणीले असावा। पावलीनी चोळी एक रातना विसावा।‘ अगदी अशीच एक ओवी कोल्हापूरच्याकडे ऐकायला मिळाली.

‘काई बहिणीला भाऊ बाई। एक ग तरी असावा। काई चोळीचा एक खण। एक रातीचा ग विसावा।।

क्रमश:  पुढील लेखात आम्ही जाऊ म्हयेराला – भाग – 1 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोकसाहित्य – हावशा भ्रतार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – हावशा भ्रतार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

बाळाचं कौतुक आईनं जसं भरभरून केलय, तसच आपल्या हावशा भ्रताराचं गुणवर्णनही . तिने आसासून केलय. आपला भ्रतार म्हणजे देवाचा अवतार असल्याचं ती सांगते. त्याचा चांगुलपणा, त्याचं सामर्थ्य, त्याचं प्रेम आणि तिची त्याच्यावरची निष्ठा, भक्ती सगळं काही त्याला ‘देव’ म्हणण्यातून ती सुचवते.

‘काई सरलं ग दळईन…. माझ्या सुपात पानविडा… देव ग अवतार माझा जोडा’ कुठे ती त्याला ‘देव’ म्हणते, तर कुठे ‘ बाजीराव’ ती म्हणते, ‘पिवळा पितांबर मला पुशितो सारा गाव… पिता दौलत राजस म्या ग लुटीला बाजीराव.’ ‘पितांबर’ म्हणताना तिला ऊंची, गर्भारेशमी लोकांच्या नजरेत भरेलसे वस्त्र आपण नेसलो आहोत, इतके सुचवायचे आहे. म्हणून तर सारा गाव तिला विचारतो आहे. ते वस्त्र नेसण्याची तिची ऐपत आहे. कारण तिचा राजस पिता श्रीमंत आहे. त्यामुळे की काय ‘बाजीराव’ पती तिने सहज मिळवला आहे. पतीला ‘बाजीराव’ म्हणताना तिला त्याचा रुबाब, सामर्थ्य, संपन्नता असं सगळं सुचवायचं आहे.

आपल्या कर्तृत्ववान पतीच्या ताकदीचं वर्णन करताना ती सांगते. शिवार पिकलं, धान्याच्या गोण्या गाडीत भरल्या आणि आपल्या भ्रताराने त्या दंडभुजांनी रेटल्या. अगदी असंच वर्णन तिने आपल्या भावाचंही केलं आहे.

या रूपवान बाईकडे कुणी वाकड्या नजरेने पाहीलं तर… ते बजावते, वाटेच्या वाटसरा आल्या वाटेने तू निमूट चालू लाग. कारण माझा कंथ आहे, जंगलात वाघाच्या दाढा मोजणारा. अशाच एका ओवीत नागालाही तिने असंच बजावलय. बहुतेक ओव्यातून नागाचा उल्लेख भाऊ म्हणून आलाय. पण क्वचित काही ठिकाणी तो परपुरुष म्हणूनही येतो. नाग हे पुरूषतत्वाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे क्वचित  कुठे अशाही ओव्या दिसतात. आपल्या भ्रतार्‍याच्या सामर्थ्याची कल्पना देणार्‍या अनेक ओव्या स्त्रियांनी गायल्या आहेत.

अशा या सामर्थ्यशाली , कर्तृत्ववान , देवाचाच अवतार आहेसं वाटणार्‍या आपल्या पतीच्या राज्यात आपल्याला काहीच कमी नाही, हे सांगताना ती म्हणते, काई माळ्याच्या गं मळ्यामंदी पान गं मळ्याला पायइरी… हौशा गं कंथाच्या जीवावरी दुनिया भरली दुईईरी’ असं ती कौतुकानं, अभिमानानं संगते. उदंड भोगायला भ्रताराचंच राज्य, हे सांगताना आणखी एक वास्तव ती सांगून जाते.

‘काई पुतबीगराच राज… राज गं डोळ्यांनी बघायला … भोळ्या गं  भ्रताराबीराचं राज … राज गं उदंड भोगायाला.’ मग कधी ती त्याच्याकडे लाडिक हट्ट धरते, ‘काई धाकटं गं माझं घर… हंड्या ग भांड्याचा पसाईरा … हौशा गं कंथाला किती सांगू … वाडा ग बांधावा दुसईरा.’ कंथ हवशा आहे आणि दुसरा वाडा बांधावा अशी समृद्धीही आहे, असं सगळच  ती त्यातून सुचवते.

बाळाबद्दल असो, नवर्‍याबद्दल असो, किंवा मग भावाबद्दल, गाणारी नारी आपल्या नेहमीच्या परिचयातली उदाहरणे, दाखले देते. त्यात आंब्याचं झाड त्याची सावली येते. कधी सीताफळ येतं, तर कधी ब्रिंदावनासारख्या कडू फळाचा दाखलाही येतो.

‘भरतार नव्हं गोड आंब्याची सावली…. आठवली नाही परदेशाला माऊली.’ भ्रताराच्या सहवासात आईसुद्धा विसरली, असं ती तृप्त मनाने म्हणते. कधी त्याच्या सावलीत ऊन–वारासुद्धा गोड लागत आसल्याचं सांगते.

कधी भ्रतार गोड आंब्याची सावली आहे, असं ती म्हणते, तर कधी तो संतापी असल्याचंही सांगते. त्याचा संताप कसा, इंगल्या इस्तवावानी म्हणजे चुलीतल्या निखार्‍यासारखा. किंवा मग आधानाच्या पाण्यासाखा. पण आपण गोड हसून बोलून त्या आधानाच्या पाण्यात विसावण घालतो, असं ती सांगते. म्हणजे तिच्याजवळ हीही चतुराई आहे तर. कधी ती त्याला सीताफळाची उपमा देते. सीताफळ कसं वरून खडबडीत दिसतं, पण त्याच्या आत साखरेची काया असते, तसच वरून खडबडीत वाटणार्‍या भ्रताराच्या पोटात माया आहे, असं तिला वाटतं.

सगळ्याच जणी मात्र अशा नशीबवान नसतात. त्यांके नवरे रुबाबदार, ताकदवान, सामर्थ्यशाली , कर्तृत्ववान नसतात. तरीहे ती आपला पत्नीधर्म निभावते. ’दुबळ्या ग भरताराची सेवा करिते आदरान… पाय पुशिते पदरान. का बरं? कारण ‘काई हळदीवरलं कुंकू … सोनं दिल्यानं मिळना.’ हे तिला माहीत आहे.

पत्नी जितकी आसासून प्रेम करते, सगळ्यांचेच नवरे तितक्याच उत्कटतेने आपल्या बायकोवर प्रेम करतात असं नाही.

मग ती कष्टी होत म्हणते, ‘जीवाला जीव देऊन पहिला। पाण्यातला गोता अंती कोरडा राहिला।‘

कुणाचा नवरा दुबळा असतो. कुणाचा फसवाही निघतो. मग विरस झालेली एखादी मनाशी किंवा जनातही म्हणते,

‘कावळ्यानं कोटं केलं बाभुळवनामंदी… पुरुषाला माया थोडी नारी उमंज मनामंदी।‘ कधी भोळेपणाचा आव आणत ती म्हणते,

कडू बृंदावन। डोंगरी त्याचा राहावा। पुरुषाचा कावा। मला येडीला काय ठावा।‘ बृंदावन हे एक फळ आहे. वरून दिसायला मोहक पण आतून कडू जहर. कधी ती याहीपेक्षा तिखटपणे  म्हणते, ‘माऊलीच्या पोटी लेक जन्मला तरवड । लोकाच्या लेकराची त्याने मांडली परवड।‘ सासू चांगली आहे, म्हणून तिच्यासाठी ती ‘माऊली’ शब्द वापरते. पण तिच्यापोटी हे काटेरी झाड कसण निपजलं म्हणून आश्चर्य आणि खंतही  व्यक्त करते.

भ्रताराबद्दलच्या भाव – भावनांचे असे विविध रंगी इंद्रधनुष्य दळता-कांडतांना गायलेल्या ओव्यातून प्रकट झाले आहे.

क्रमश:  पुढील लेखात ताईता बंधुराजा

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print