मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हेमराजवाडीतील गणपती ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ हेमराजवाडीतील  गणपती ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

प्रत्येकवर्षी गणपती आले की  गिरगावातील वेगवेगळ्या गणपतींची आठवण  येतेच. 

सहा महिने आधीपासून रविवारी गणपती मंडळांच्या मिटींग्स चालू व्हायच्या .वाडीतील काही बुजुर्ग लोकाना अध्यक्ष,सचिव, खजिनदार अशी पदे देऊन सार्वजनिक मंडळाची नेमणूक व्हायची. वर्गणीवर चर्चा व्हायची, वाद आणि काही वेळा भांडणेही होत असत.  पण त्यामुळे कधी गणेशोत्सवात विघ्न येत नसे. सगळेजण गणेशोत्सव कसा चांगला होईल ह्यासाठी जोमाने कामाला लागायचे.

—- पण १९८७ च्या  हेमराजवाडीच्या  गणपतीची तयारी मात्र एक वर्ष आधीपासूनच चालू होती, कारण त्यावर्षी हेमराजवाडीतल्या गणपतीला ५० वर्षे होणार होती. त्यामुळे ते गणपतीउत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्याची संपूर्ण जबाबदारी अशा कामात नेहेमी आघाडीवर असणाऱ्या  वाडीतील चार तरुणांनी  घेतली होती. वाडीतील असंख्य तरुण कार्यकर्ते त्यांच्या मदतीला  होते. त्यामुळेच सुवर्णमहोत्सवी शिवधनुष्य वाडीतल्या रहिवाश्यांच्या साथीने व्यवस्थित  उचलले गेले. सुवर्ण महोत्सवाची तयारी पद्धतशीरपणे  चालू होती.

एक महिना शिल्लक असताना बाबूच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तसे त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना येणे हे  नवीन नव्हते. त्याने सांगितले, ” ह्यावर्षी  आपण गणपतीला  खरोखरच्या हत्तीवरून आणायचे “. सुरुवातीला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले . जोखीम खूप आहे– पोलीस परमिशन मिळणे मुश्किल आहे —हत्ती गर्दी बघून उधळू शकतो –अशी अनेक कारणे सांगून सगळ्यांनी त्याला हा विचार डोक्यातून काढायला सांगितला.  पण बाबू असा सहजासहजी हार मानणारा नव्हता—-

परळच्या पुलाखाली एक माहूत त्याचा हत्ती घेऊन राहत होता. तेथे जाऊन त्याने प्रथम त्या माहुताला तयार केले.. नंतर जवळपास  पंधरा दिवस, रोज रात्री त्या हत्तीजवळ जाऊन कधी फटाक्यातला बॉंम्ब लाव, फटाक्याची माळ लाव, तर कधी ढोलताशा वाजव असे करून हत्ती दचकतो का, उधळतो का ह्याचे निरीक्षण केले. जेव्हा सगळ्यांना खात्री पटली की हत्तीवरून गणपती आणण्यात  काहीच धोका नाही, तेव्हा सर्वसंमत्तीने त्यावर शिक्कामोर्तब झाले. आता पोलीस संमतीची गरज होती. त्याकाळी दक्षिण भारतात देवांच्या मिरवणुका हत्तीवरून निघायच्या हे टीव्हीवर बघायला मिळायचे.  पण महाराष्ट्रात तरी तसे कधी दिसले नव्हते. तेव्हाचे एक राजकीय  नेते वाडीतच रहात असल्याने पोलीस संमतीची बोलणी झाली, पण लेखी संमती मिळणे शक्य नव्हते.  त्यामुळे,’ तुमच्या जबाबदारीवर  मिरवणूक काढा आणि काही अघटित घडल्यास कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा,’ या अटीवर, गणपतीचे आगमन  हत्तीवरून होणार हे नक्की झाले, आणि पूर्ण गिरगावात हेमराजवाडीच्या गणपतीची चर्चा सुरु झाली. 

गणेशचतुर्थीच्या  दिवशी पहाटे हत्तीला कोमट पाण्याने आंघोळ घालून दुधाचा अभिषेक केला गेला.  सोंडपट्टी आणि अंगावर झालर चढवून सजविण्यात आले.  सजवलेल्या अंबारीत  बाप्पांची मूर्ती ठेवण्यात आली.पुढे राजदंड आणि मागे छत्र घेऊन मावळे उभे केले गेले. ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी सामुदायिक आरोळी दिली गेली. सनई चौघडा आणि बँड पथक वाजविण्यास सज्जच होते. ‘गजानना श्रीगणराया आधी वंदू तुझ मोरया’ हे  गाणे बँडवर  वाजविण्यास सुरवात झाली. सगळे कार्यकर्ते  मिरवणुकीत काही अघटित घडू नये ह्याची दक्षता घेत होते. गणपतीबरोबर एकाला अंबारीत बसवून, जितेकर वाडीतून वाजतगाजत मिरवणूक सुरु झाली. सी पी टॅंक वरून फडके वाडीच्या गणपतीवरून, गिरगावातून मिरवणूक हेमराजवाडीत आली. गणपतीचे वाडीत आगमन झाल्यावर नऊवारी साड्या नेसून, नथी घालून, केसांत गजरे  माळून १५१ सुवासिनींनी  गणपतीला औक्षण केले. त्यादिवशी हेमराजवाडीत सगळे खरंच ‘ न भूतो न भविष्यती ‘ असेच  घडत होते. गणरायाचे आगमन गजराजाच्या अंबारीतून– असे आधी कधीच  घडले नव्हते आणि त्यानंतरही आजपर्यंत कधीही घडले नाही— ते स्मृती पटलावरून कधीच विरणारेही नाही. . 

गणपती स्थानापन्न झाला आणि गणपतीउत्सव सुरु झाला. नेहमीपेक्षा मोठे स्टेज आणि सजवलेला मांडव उत्सवाची भव्यता वाढवत होता . तेव्हाच्या महापौरांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी उत्सवाचे उदघाटन झाले. 

दहाही दिवस सकाळसंध्याकाळच्या प्रसादाचा मान कोणाचा ह्याचे ‘आरक्षण’ झालेलेच  होते. प्रत्येकालाच  आपला हातभार लागावा असे वाटत असल्याने, जमेल तसा प्रत्येकजण गणपतीची सेवा करीत होता 

रात्री पन्नासाव्या वर्षाला शोभेल असे करमणुकीचे कार्यक्रम होत होते.                  

सुवर्णमहोत्सवाची भव्यता जाणवत होती. त्यासाठी मंडळाला पैशाची गरज होती म्हणून लॉटरी काढण्यात आली होती. आधी एक महिन्यापासून लॉटरी चालू करून पहिले बक्षीस स्कुटर ठेवले होते. त्याकाळी स्कुटर घेणेही सगळ्यांना शक्य नसे. छोटेसे स्टेज करून त्यावर स्कुटरचे प्रदर्शनही केले होते. पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटचे तीन दिवस राहिले होते. मी लॉटरी विकायची जबाबदारी  घेतली. शेवटच्या तीन दिवसात लहान मुलांना  पँट- शर्ट आणि टाय लावून वाडीच्या नाक्यावर उभे केले. माइकवरून  प्रत्येकाला तिकीट  घेण्यासाठी गळ घातली जाऊ लागली. मोठ्या मुलांना सिग्नलला बसमध्ये चढवून  तिकीटे  विकायला पाठविले, ज्याला प्रतिसादही चांगला मिळाला. “ लॉटरीचे तिकिट घ्या आणि बसऐवजी स्कुटरवरून घरी जा” असे  आवाहन करत तीन दिवसात सगळी तिकीट विकली गेली.आवश्यक पैसे जमा झाले. निकाल काढायला  झावबावाडीतल्या  स्वप्नील जोशी या तेव्हाच्या फेमस बालनटाला  बोलाविले होते. एक दिवस वाडीतल्या  रहिवाश्याना जेवण ठेवले होते.आवर्जून वाडीच्या माहेरवाशीणीना, आणि वाडी सोडून गेलेल्या माजी रहिवाश्यानाही बोलाविले होते. त्यादिवशी संपूर्ण वाडीत एक वेगळेच चैतन्य नांदत होते. 

गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला. दहा दिवस कसे गेले ते कळलेच नाही.. बाप्पासाठी निरोपाच्या दिवशीही  काहीतरी वेगळंच असणार हे नक्की होते. फुलांनी सजवलेला चार सफेद घोड्यांचा रथ बाप्पासाठी तयार होता. पुढे ढोल — लेझीम –आणि मागे रथात बसलेला बाप्पा, अशी  मिरवणुकीला सुरुवात झाली. बाप्पा परत चालले म्हणून सगळी वाडीच मिरवणुकीत सामील झाली होती. प्रत्येकाच्याच  डोळ्यात पाणी  होते. अशातऱ्हेने हेमराजवाडीतील आगळयावेगळया सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवाची सांगता झाली.

————-खरंच काही आठवणी विसरता नाही येत —जागा बदलल्या तरी ओढ नाही संपत—-  अंतर वाढले म्हणून प्रेम नाही आटत.

हेमराजवाडीचे वेगळेपण हेमराजवाडी सोडल्यावरच  जास्त जाणवते. गिरगाव सोडलेल्या प्रत्येक गिरगावकरची आपल्या वाडीबद्दल अशीच भावना असेल ह्याची मला खात्री आहे. 

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लाईफ मॅनेजमेंट ☆ संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ लाईफ मॅनेजमेंट ☆ संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर ☆ 

लाइफ मॅनेजमेंट ?

प्रोफेसरने भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये बेडूक टाकला, यानंतर ते भांडे तापायला ठेवले, पाणी गरम झाल्यानंतर बेडकाचे काय झाले, प्रोफेसरने असे कां केले ???——–

एका कॉलेजमध्ये “फिलॉसफीचे” एक प्रोफेसर शिकवायचे…ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे…

एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट समजावणार आहे.

सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत व बघत होते.

प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकला. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागला. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.

भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जो बेडूक होता तो पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अॅडजस्ट करत होता. हळुहळू पाणी जास्त गरम होत होतं, पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता.

काही वेळानंतर पाण्याचे तापमान खूप वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीहि सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

बेडकाने पूर्ण शक्ती लावूनहि त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले. प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी कां मारु शकला नाही ???

सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली.

तेव्हा प्रोफेसर म्हणाले – बेडूकाची इच्छा असती तर तो पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार ऍडजेस्ट करण्याचा प्रयत्न करत होता. जेवढे तो सहन करु शकत होता, तेवढे त्याने केले.

पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, कारण अॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेला असता.

लाइफ मॅनेजमेंट ?

प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले – 

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. पण जेव्हा आपण पूर्णपणे परिस्थितीमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होते. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.

 बोध—— योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय.

संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्राजक्ताची फुले .. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ प्राजक्ताची फुले ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते

मी प्राजक्ताला पहाते

ही टपटपणारी फुले जणू

आहेत अबोल अश्रुधारा …

हो ना …तू असा दुनियेच्या संसारात गुंतलेला तुला कुठे ठाऊक आहेत या उरीच्या वेदना ?? या प्राजक्ताच्या झुळुकीसारखेच तुझे अस्तित्व …तू आलास म्हणून मोहरून जातात दिशा …स्तब्ध होतो वारा …… मध्यान रात्री पक्षी फडफडतात …सूर्यही अवचित डोकावतो अवेळी काळ्याशार ढगांच्या जळात …गायी कान टवकारतात ..इतकेच काय ती तुझी बासुरी सुद्धा अधीर होते तुझ्या कोमल अधरांवर विसावायला …थरथरते तिचीही काया अन अधीर होते तुझ्या मंजूळ स्पर्शासाठी …केवड्याच्या बनात नाग उगीचच सळसळत रहातात …निशिंगन्ध डोकावतो हळूच हिरव्या पानाअडून तुझ्या आगमनाची वार्ता पसरावयाला ! पण …पण तू येतोस …विद्युल्लतेच्या वेगाने … धड -धड होते काळजात ..कालिंदीच्या डोहात तरंग उठत रहातात …आसुसतो तोही डोह …तुझ्या चरण कमलाना स्पर्शायला … धावते वेड्यासारखी तुझ्या भेटीला पण …पण पितांबर  लहरत रहातो रुक्मिणीच्या परसदारात …चांदणं झुला झुलत राहतो …..कर -कर आवाज अंधार कापत जातो ..कस्तुरी रेंगाळत रहाते आसमंतात …खोलवर श्वासात रुतत जाते माझ्या .. .. अन … अबोल प्राजक्त हळुवार ओघळतो त्या काजळलेल्या डोळ्यांच्या व्याकूळ काळोखात नि:शब्द ….

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट स्नेहाची ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ गोष्ट स्नेहाची डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

दवाखाना अगदी बंद करताना, स्नेहा घाईघाईने आली .

” मावशी, सॉरी हं जरा उशीर  झााला, पण थोडे बोलायचे होते.”

” अग बोल ना, काय आहे  प्रॉब्लेम.” 

” कुठून सुरवात करू, तेच समजत नाहीये मला….  तुम्हाला तर माहित आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, माझी जायची वेळ नक्की, पण यायची कधीच लवकर नसते हो. फार धावपळ होते माझी. तरीही, होईल ते सगळं करत असते मी.  आत्ताच प्रमोशन झालं आणि पगारही छान वाढला माझा. पण कसं सांगू , माझी मुलं सासूबाई सांभाळतात.  खूप मायाही करतात, लक्ष देतात मुलांवर.  पण परवा मी सहज भाजी केली तर अमोल म्हणाला,’ शी ! आजीसारखी नाही झाली भाजी.  मला नको ही डब्यात.’ — असं अनेक वेळा झालंय, पण मी दुर्लक्ष केलं ! पण हल्ली हे वरचेवर व्हायला लागलंय.  मुलांना माझ्या कष्टाची किंमत वाटत  नाही, असं वाटतं मला.  बघा ना, माझ्या कंपनीतून कर्ज काढून, हे मोठं घर आम्ही घेऊ शकलो. दोघं कमावतो, म्हणून हे शक्य झालंय ना ! पण– मुलं मला असं बोलली तर सासूबाईंना सूक्ष्म आनंदच होतो.  त्या त्यांना रागवत नाहीतच. शिवाय, ‘ आई, आजी कित्ती कामं करते घरात. तू तर फक्त ऑफिस मध्ये जातेस ‘  असंही अबोली म्हणाली मला. लहान आहेत अजून मुले, पण मला हे खूप लागले.— मला हा तिढा कसा सोडवावा हे समजतच नाहीये.  माझा नवरा यात काहीच बोलत नाही. मी इतकी दमते हो, की मला भांडायची शक्तीच उरत नाही…  मला आता हे सगळं झेपेनासे झालंय !  तुम्हीच सांगा ना आता काहीतरी उपाय !” — एका दमात एवढं सगळं बोलली ती . 

” स्नेहा, तुझी आई काय म्हणली यावर ?”

” ती म्हणाली, तू लक्ष देऊ नको ग.  करतात ना त्या सगळं, मग घे थोडं ऐकून. ” 

” अहो, त्यांना बाई ठेवलेली चालत नाही. कुरकुर करून देतात घालवून.  म्हणतात, 

‘ आम्हाला बाईच्या पोळ्या आवडत नाहीत. ‘ मला नाही जमत हो पोळ्या करून मग ऑफिसला ७ लाच जायला. ” 

” हे बघ स्नेहा, अजिबात रडू नकोस.  एवढी हुषार आणि गुणी मुलगी तू , अशी खचून जाऊ नकोस. हे बघ. मी सांगते ते ऐकशील का? रविवारी सुट्टी असते ना तुला, तर सगळ्यांना एकत्र बोलाव.  त्या आधीच, तुमच्या सोसायटी मधली चांगली बाई शोधून, तिला पक्की करून ठेव.  आहे का अशी कोणी ? ” 

” अहो एक मावशी आहे ना, पण सासूबाई नको म्हणतात. “

” ते सोड ग !– तर त्या बाईला भरपूर पगार कबूल कर आणि बोलवायला लाग. त्या आधी मिटिंग घे घरात. गोड शब्दात, सासूबाईंना सांग–‘ तुम्हाला खूप काम पडतं आणि आता तर मला आणखी उशीर होईल,  म्हणून मी या बाई बोलावल्या आहेत. या सर्व स्वयंपाक उत्तम करतील. समोरच्या गोगटे मावशींकडे त्याच करतात. मी चौकशी केलीय, असेही सांग.आणि हो,  मुलांना, त्यांच्या समोरच सांग,’ हे बघा, आजीला खूप काम पडतं की नाही, मग आपण त्रास नाही द्यायचा आजीला– उलट तिचा त्रास कमी करायचा . . आणि मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना , मग मी नाही सतत घरात राहू शकत. ” 

“बरं. मी खरं तर मुलांना आधीपासूनच असं  समजावत होते की , ‘ तुम्हा दोघांनाही  मागच्या महिन्यात ट्रेकला पाठवले.  तेव्हा शेजारच्या सुबोधला त्याचे आई बाबा पाठवू शकले नाहीत. ते का?  तर तेवढे पैसे ते देऊ शकणार नव्हते, हो ना अमोल? ‘ –त्यावर तो असही म्हणाला की, ‘ हो आई ! सुबोध म्हणाला सुद्धा मला की , ‘तुझी मज्जा आहे, तुझी आई पण नोकरी करते. माझे बाबा म्हणाले,  एवढे पैसे मी नाही देऊ शकत तुला.  एकट्याच्या पगारात नाही भागत बाबा.’ —मी लगेच तो धागा पकडत त्याला म्हटलं होतं की,  ‘ बघ अमोल, हे पटले ना तुला ! मग आता, आपण आजीचा भार हलका करूया. त्यासाठी आता  लीलामावशी येईल आपल्या कडे कामाला, चालेल ना ?’ — यावर मात्र तेव्हा तो काहीच बोलला नाही. “

” हे बघ स्नेहा, तू हे करून बघ.  सासूबाईंना जरा राग येईल, पण त्यांनाही मोकळीक मिळेल ग. 

आणि हो , त्यांना दरमहा पॉकेट मनी देत जा. सगळे आयुष्य कष्टात गेलेय त्यांचे…. मग बघ   चित्र कसे बदलेल ! आणि दोन वर्षातून एकदा, कुठे तरी चांगल्या कंपनी बरोबर ट्रीपलाही पाठव दोघांना. ” 

स्नेहाल बहुदा पटलं असावं. ती निघून गेली—-

—–चार महिन्यांनी ती हसत हसतच आली, आणि माझ्या हातात एक छान परफ्युमची बाटली ठेवली.

” अग हे काय, आणि कशाला?”

” सांगते ना मावशी. तुमचा सल्ला अगदी रामबाण ठरला हो. मी अगदी असेच केले.

आता तर सासूबाई इतक्या खूष असतात. पहिल्यांदा, लीलाबाईंशी उभा दावा होता. पण हळूहळू, आवडायला लागला त्यांचा स्वयंपाक ! शिवाय, मी एक मुलगीही ठेवलीय वरकाम करायला. सगळे करते ती, म्हणून घरही छान राहते. आणि सासूबाईंचीही चिडचिड होत नाही. आता तर लीला बाईंशी गट्टीच जमलीय.  तुम्ही सांगितल्या प्रमाणे, मी त्यांच्या हातात पैसे ठेवले, तर म्हणाल्या मला, ‘ कशाला ग? ‘–म्हटले अहो घ्या, सासूबाई. खूप केलेत कष्ट, आता करा खर्च मनासारखा. मावशी, हे ऐकून डोळ्यात पाणी आले हो त्यांच्या. म्हणाल्या, ‘ बाई ग. कोणीही नाही ग मला असा पॉकेट मनी दिला कधी ‘.—आता आमचे घर एकदम खूष आहे. पोरेही आता म्हणतात , ‘ आज्जी, तू आणि आजोबा जा भेळ खायला. मज्जा करा.’–मावशी, तुम्ही किती मस्त सल्ला दिलात.” —

—गोष्टी छोट्या असतात, पण लक्षातच येत नाहीत आमच्या. —

स्नेहाने मला मिठी मारली. म्हणाली, ” खूप छान सल्ला दिलात आणि माझा संसार मला परत मिळाला. नाहीतर मी खरोखरच चालले होते हो डिप्रेशन मध्ये. पण आता सगळे मस्त आहे. ”  

–आणि माझे आभार मानून स्नेहा गेली.

—-बघा ना, छोट्याशाच गोष्टी, पण अमलात आणल्या, की सुखाच्या होतात !

स्नेहाची साठा उत्तरी कहाणी सुफळ झाली. 

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

अल्प परिचय
ग्राफिक डिझायनर आणि साहित्यिक सल्लागार, पुणे

☆ क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

काही दिवसांपूर्वी एक हळदुल्या रंगाचा पक्षी आमच्या बाल्कनीत येऊन छानपैकी गोडगोड शिळ वाजवत बसायचा. अगदी नेमानं ठरल्यावेळी यायचा, गाणं गायचा आणि जायचा. बऱ्याचदा मी तेव्हा वाचत बसलेली असायचे. पण त्याचं गाणं सुरु झालं की माझं वाचन थांबायचं आणि नकळत त्याच्याबद्दल विचार चालू व्हायचे…  तो इथंच का येतो…  कुणासाठी येतो…  बरं आला तर त्याच्यासाठी  टाकलेले दाणेही खायचा नाही. नुसताच फाद्यांवर झोके घेत बसायचा आणि गाऊन निघून जायचा. 

माझ्या चाहूलीने त्याची गानसमाधी भंग पावू नये म्हणून मी तिथं जाऊन त्याचा फोटो काढण्याचा आणि  व्हिडिओ करण्याचा मोह टाळला. फक्त एकदाच हळूच दाराच्या फटीतून त्याची ओझरती झलक पाहिली. अतिशय सुंदर तेजस्वी असा पिवळा रंग पटकन नजरेत भरला. पक्षी चिमुकला खरा पण सौंदर्य केवढं! अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्या चाहुलीने तो उडाला आणि दूर लपून बसला. जेव्हा मी दार बंद करून माझ्या जागेवर येऊन बसले तेव्हा तो परत फांदीवर येऊन बसून गाऊ लागला. 

मग मी काही मिनिटांचं त्यांचं असणं फक्त अनुभवायचं ठरवलं. त्याची गाण्यामागची आंतरिक उर्मी काय असेल याचा विचारही मी सोडून दिला. डोळे बंद करून फक्त ऐकत राहिले. त्या सुरांचा कानोसा घेत राहिले. 

हळूहळू मनातच त्या गाण्यात कुठले शब्द बसतील, ते सूर विरहाचे की आनंदाचे, तो पक्षी पूर्णपणे कसा दिसत असेल अशी कल्पना चित्रं रंगवायला लागले. रोज पंधरा-वीस मिनिटं मी मनातल्या मनात रानावनात जाऊन वेगवेगळ्या पिवळ्या रंगाच्या पक्षांचा शोध घ्यायला लागले‌. उगाचच, काही कारण नसताना‌… ती पंधरा मिनिटं मला हिरव्या-पिवळ्या रंगाची वेगळीच दुनिया दाखवणारी ठरली. कधी प्रत्यक्षात बघितलेले झाडांच्या दाटीवाटीत बसलेले पक्षी, कधी चित्रपटातले, तर कधी इंटरनेटवर बघितलेले व्हिडिओ त्यातले सगळे फक्त पिवळ्या रंगाचे पक्षी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि काय गंमत, हे आठवताना फक्त पक्षीच नव्हे तर कितीतरी वेळा नदीचा काठ, निळं आकाश, रंगीत फुलं, हिरव्यागार फांद्या असंही काहीबाही दिसू लागलं. अर्थातच खूप छान निवांत असं वाटत होतं. मग मी माझ्या या अवस्थेला एक नाव देऊन टाकलं… ‘हळदुली समाधी’.   

आणि मग काही दिवसांनी तो यायचा अचानकच बंद झाला. सुरुवातीला दोन-तीन दिवस थोडी हूरहूर वाटली पण मग ठरवलं याला आठवणीत बंदिस्त करावा आणि म्हणूनच त्या पक्षाने मला काय काय दाखवलं ते मी या कवितेत मांडलं——-

हळदुल्या…

एय, हळदुल्या रंगाच्या पक्ष्या 

आमच्या अंगणात येऊन 

तू नेहमी नेहमी गातोस काय

खरं सांग, हळदुल्या तुझं आमचं नातं काय

 

शेवंतीच्या फांदीवर बसून मस्त झोके घेतोस 

हिरव्या हिरव्या पानांशी दंगामस्ती करतोस

खरं सांग कशासाठी, कोणासाठी तू इथं येतोस 

आणि इतकं गोड गाणं पुन्हा पुन्हा गातोस

खरं सांग हळदुल्या…

 

दवं भरलेल्या झाडांना आताशी जाग येते आहे

इवल्या इवल्या फुला-पानांवर ऊन कसं डुलतं आहे 

इतका उंच उडतोस तरी तुला दिसत नाही काय

चमचमत्या चांदण्याचाही अजून निघेना इथून पाय 

खरं सांग हळदुल्या… 

 

असा कसा तू आगंतुकपणे उडत उडत येतोस 

इथल्या पानाफुलांशी आपलं नातं जोडतोस 

इथल्या मऊ मातीशी कसलं हितगूज करतोस

तुझ्या गोड गाण्यासाठी सूर तिचे घेतोस काय 

खरं सांग हळदुल्या… 

 

जाईजुईचा वेल कसा वर वर चढतो आहे

चाफ्याच्या फुलाशी खूप गप्पा मारतो आहे

गुलाबाच्या कळीला खोल खळी पडली आहे

एक भुंगा कसा बघ तिच्याभोवती फिरतो आहे

खरं सांग हळदुल्या… 

 

उंच उंच फिरण्याची तुला कित्ती कित्ती हौस 

पण मातीत खेळणाऱ्या पानांची करतोस भारी मौज 

त्यांचा पिवळा रंग पिऊन तु पिवळा होतोस काय 

खरं सांग हळदुल्या– तुझं आमचं नातं काय

आमच्या अंगणात येऊन तू नेहमी नेहमी गातोस काय——-

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेश आगमन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.

हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी  तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती.कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते.

कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत.कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको,  असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला.

  या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते!

त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते.तरी ती  गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो,’ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात,’ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते.

तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते. नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते. लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने  भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो.

जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते, तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते.ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो.पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणि वातावरणात प्रसन्नता आणतात.

गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो.

कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार!

आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार!

संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या,

  ? गणपती बाप्पा मोरया! ?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  स्टोव्ह ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ स्टोव्ह  ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का ? 

जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.

स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये म्हणून घेतलेली काळजी.

आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.

स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी बिटको काला दंत मंजन च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे. 

काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा सगळा थाट असायचा. 

पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची. 

स्टोव्हची टाकी गळत असेल तर तिथे लावण्यासाठी  501 नं.चा साबण बार. 

स्टोव्ह बिघडल्यावर घरातली होणारी चिडचिड तर विचारूच नका आणि दुरूस्त करून आणल्यावर आईची प्रसन्न मुद्रा, ओसंडून वाहणारा आनंद पाहिला की घरातली माणसे अगदी खूष व्हायची. 

स्वयंपाक झाल्यावर आईने सोडलेला सुस्कारा जितका मनाला शांत करतो ना अगदी तसाच शांतपणा स्टोव्हची चावी सोडल्यावर येणारा स्सूsssssss आवाजही खूप मनाला प्रसन्न करणारा होता.

मित्रांनो कोणाकोणाच्या आठवणी जाग्या झाल्या?

 

संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजचा दिवस,आपला दिवस ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? वाचताना वेचलेले ?

☆ आजचा दिवस,आपला दिवस ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

काय करावे, एक करायला गेलं तर एक राहूनच जातं.

सकाळी फिरायला गेलं तर दुलईत गुरफटून झोपायचं सुख निसटतं.

शांततेने पेपर वाचू लागलो तर पूजा, प्राणायाम राहून जाते.

दोन्ही साधायचा प्रयत्न केला  तर नाश्ताच राहून जातो,

धावपळ करत सगळं केले तर आनंद हरवतो.

डायट फूड मिळमिळीत लागतं, चमचमीत खाल्ले तर वजन वाढतं.

एक करायला गेलं तर एक राहूनच जातं.

सिरीयल पहायची तर स्वयंपाक राहतो, स्वयंपाक घरात रमलो तर सिरीयल पहायची राहते.

नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही पण कुटुंबासाठी नोकरी हवी दोन्ही सोडायच्या कल्पनेचे भय वाटायला लागतं.

लोकांचा विचार करता करता मन दुखावत, मनासारखा वागायला गेलं तर लोक दुखावतात.

एक करायला गेलो की एक राहूनच जातं.

घाईगडबडीने निघालो तर सामान विसरतो,  सावकाश गेलो तर गाडी सुटायची भीती.

सुखात असलो की दुःख संपत आणि दुःखात असलो की सुख जवळ फिरकत नाही.

एक करायला गेलो की एक राहूनच जातं.

पण या काहीतरी राहून जाण्यातच खरं जीवन आहे. काहीतरी मिळाल्याचे समाधान आहे.

कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद आहे. आणि अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रडणे आहे.

कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येतं.

ज्याला या कुठल्याच गोष्टीचे काही विशेष वाटत नाही तो माणूस नाही तर यंत्रच आहे.

      म्हणून

आनंदाने भरभरून जगून घेऊ या.

आजचा दिवस आहे तो  आपला आहे.

 बघा, पटलं ना..!

 

संग्रहिका –  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  गणपती बाप्पा मोरया …. ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ?️ गणपती बाप्पा मोरया …. ?️☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

गणपती बाप्पा मोरया….

मोरया… चा जयघोष करत ढोल, ताशे, झांज, लेझीम च्या गजरात आगमन व्हायचे आमच्या गल्लीतल्या बाप्पाचे. पालखीत बसून सोवळ्यांने, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत आगमन होत असे ह्या विघ्नहर्त्याचे. आम्ही सगळी मुलं त्या पालखी मागून चालत गणरायाला आणायला जात असू. गणपती बाप्पाचे

आगमन एका देवळात होत असे जिथे तो पुढे अकरा दिवस विराजमान होत असे. दररोज दोन वेळा, वेळेवर आरती होत असे आणि ती सर्वांनाच पाठ असल्यामुळे ती एका सुरात आणि एकाच लईतही होत असे.

आम्ही जसा गल्लीतला तसाच घरचा गणपती आणायला सुद्धा दर वर्षी बाबांबरोबर जात असू. आमची मूर्ती ठरलेली असायची. मध्यम आकाराची, पिवळे पीतांबर आणि केशरी शेला परिधान केलेली ,हिरे जडीत मुकुट असलेली, सुंदर बोलके डोळे आणि चेहर्‍यावर शांत, शीतल, तृप्त असे भाव, एका हातात मोदक आणि दुसर्‍या हातात कमळ. बरोबर मुषक हवेतच. मूर्ती बघून मनं कसं प्रसन्न होतं असे.

घरी आई आरतीचे ताम्हन घेऊन वाट पहात असायची ह्या एकदंताची. आम्ही पोहोचताच तिच्या चेहर्‍यावरचा भाव अगदी पाहण्या सारखा असायचा. प्रसन्न मनाने ती बाप्पाला ओवाळायची आणि आमचे बाप्पा विराजमान व्हायचे आम्ही त्यांच्या साठी केलेल्या खास आसनावर.

हे दिवस मात्र आमच्यासाठी खास असायचे कारण एक तर गणपती बाप्पा असे पर्यंत आईचा मूड एकदम झकास असायचा आणि रोज गोडाधोडाचे खायला मिळायचे. त्यात उकडीचे मोदक म्हणजे आहाहा.. बाप्पाला आणि आम्हालाही परम प्रिय. न चुकता आरती, अभिषेक, नैवेद्य अथर्वशीर्षाचे पठण व्हायचे. एकूणच वातावरण प्रसन्न आणि अल्हाददायक असायचे. पाचवे दिवशी घरी गौर यायची. त्या दिवशी आई खूप खुश असायची जणू तिचीच लेक आली आहे माहेरी. माहेरवाशीणी साठी पुरण पोळी ठरलेली.

हे अकरा दिवस कसे भुर्रकन उडून जायचे. आणि बघता बघता बाप्पाला निरोप द्यायचा दिवस यायचा. आमचा नावडता दिवसं त्या दिवशी सगळेच उदास असायचे. हा पाहुणा आपल्या घरी आता परत जाणार म्हणून खूप वाईट वाटायचे. आज आरती विशेष व्हायची. आईचे नेत्र भरून यायचे.पण काय करणार काहीच इलाज नसायचा. शेवटच्या दिवशी आम्ही सगळे देखावे बघायला जायचो. इतके सुंदर सुंदर देखावे असायचे आणि अनंत चतुर्दशी दिवशी भव्य मिरवणुका असायच्या. रात्रभर आम्ही मिरवणुका बघायचो आणि पहाटे परत यायचो.

आज मिरवणूक पहायला गेले होते गणपतीची आणि आनंद होण्या ऐवजी दुःखच झाले. समोरचं दृश्य पाहून कळेच ना नक्की कशाची मिरवणूक आहे ते. भक्तीगीतं भावगीतं कानी पडायच्या ऐवजी फास्ट ट्रॅक च्या गाण्यावर, धांगडधींगा चालू होता. दारूच्या नशेत बेधुंद होऊन गणपती बाप्पा समोर तरुण पिढी नाचताना पाहून खूप दुःख झाले. त्यांची त्यांनाही शुद्ध नव्हती. चुरमुऱ्यांची उधळण करत ती पायदळी तुडवत मिरवणूक चालली होती.

ते कमी म्हणून फटाकड्यांच्या धुराने सगळे वातावरण दूषित केले होते. मला प्रश्न पडला त्या विघ्नहर्त्याला तरी श्वास घेता येत असेल का ह्या धुरात?? ते दूषित वातावरण आणि कर्ण बधीर करणारा तो बॅंजो चा आवाज ऐकून परत यावं असं वाटत तरी असेल का त्या गणरायाला ?

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना राबविली होती ती समाजाला संघटीत करण्याच्या उद्देशाने. आज त्यांनी जर हे अस दृश्य पाहिलं असत तर बहुतेक बेधुंद होऊन नाचणार्‍यांच्याच कंबरेतला पट्टा काढून चांगलं फोडून काढलं असत एकेकाला.

मित्रांनो जरा विचार करा आपण बदलू शकू का हे दृश्य?? राजकारणी लोकं आपलं पद आणि पैसा दाखवण्यासाठी एका गल्लीत तीन तीन गणपती बसवतात. नाही नाही तितकी श्रध्दा आहे म्हणून नव्हे तर माझा मंडप तुझ्या पेक्षा भारी हे दाखवण्यासाठी. मी किती किलोचे चांदीचे दागिने केले आहेत ह्या वर्षी ह्यासाठी,सत्तेसाठी.

आपण सगळे जर एकत्र आलो तर हे नक्की थांबवू शकू. एका गल्लीत एकच गणपती निदान एवढी तरी सुरवात करू शकू. बँजो वर नाचण्या ऐवजी सनई चौघडे, लेझीम आणि ढोलाच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देऊ शकू. नशेत बेधुंद न होता भक्तीत तल्लीन होऊ शकू. चुरमुऱ्यांची उधळण करण्या पेक्षा तेच गोरगरिबांना वाटू शकू.

असं काही तरी करू की आपल्या पेक्षा जास्त गणराया वाट बघेल पुढच्या वर्षी येण्याची.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

गणपती बाप्पा मोरया…

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची वैदेही…. ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ आमची वैदेही…. ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली.. हा भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण! आणि आमच्या घरातही.. जन्मष्टमी म्हणजे “श्रीकृष्णाचा हॅप्पा” (हॅप्पी बर्थडे) म्हणून सकाळीच वैदेहीने तिच्या या “मित्राच्या” पूजेची तयारी केली.. सकाळीच देवासमोर बसून आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला “जन्मदिनमिदं…” म्हणून शुभेच्छा दिल्या, आणि मग घरातील देव्हाऱ्या व्यतिरिक्त असलेले बाळकृष्ण/श्रीकृष्ण गोळा करून देव्हाऱ्याशेजारी आपला वेगळा पाट मांडला, आणि आजोबांच्या बरोबर आमचीपण जन्माष्टमीची पूजा संपन्न झाली! (त्यात “दिवसभर सॉफ्ट कृष्ण सुद्धा हलवायचा नाही हं पूजेतून, आजी!” अशी मला दटावणी पण झाली)

साक्षात भगवंताचा हॅप्पा साजरा करणारी ही “सहज भक्ती” सर्वांनाच मिळावी हीच त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी आज जन्माष्टमी निमित्त प्रार्थना!

 

सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares