मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशगंगा ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ विविधा ☆ आकाशगंगा ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

घटना तशी जुनीच. म्हणजे १९६५ सालातली. मी अकरावीत शिकत होते. म्हणजे त्यावेळचे मॅट्रिक. आमच्या सायन्सच्या सरांनी एके दिवशी रात्री आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका त्यावेळच्या तीन मजली बिल्डिंग च्या टेरेस वर बोलावलं होतं. अमावस्येची रात्र होती….. घाबरायचं कारण नाही. आम्हाला ते खगोल  शास्त्रातील’आकाश गंगा’प्रत्यक्ष दाखवून ग्रह तारे नक्षत्र यांची माहिती देणार होते.

आमच्या सायन्सच्या सरांइतका उत्साही शिक्षक मी आजवर पाहिला नाही. आपल्या विषयातील संपूर्ण ज्ञान त्यांना होते. आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची तळमळ ही होती. फिजिक्स केमिस्ट्री मधले कितीतरी प्रयोग …. अभ्यासक्रमाबाहेरचे …त्यांनी आमच्याकडून करवून घेतले होते.

त्या रात्री सरांनी उत्तर-दक्षिण पसरलेला तार्‍यांनी तुडुंब भरलेला चकाकणारा आकाशगंगेचापट्टा दाखवला. खूप सगळी माहिती सांगितली. त्यामुळे खगोलशास्त्राचा वेगळा अभ्यास करावाच लागला नाही.

लग्नानंतर दिल्लीला गेल्यावर बरेचदा मुद्दामून सातव्या मजल्याच्या टेरेसवर जाऊन मी आकाशगंगा शोधायचा प्रयत्न करायचे पण लाईटच्या झगमगाटात ती आकाशगंगा मला कधीच दिसली नाही. आता तर छोट्या छोट्या गावात सुद्धा बिजली च्या झगमगाटामुळे  आकाशगंगा आपल्यापासून खूप दूर गेलेली आहे. उन्हाळ्यात दिल्लीला आम्ही त्यावेळी रात्री टेरेस वर झोपायला जायचो. आता ए.सी मुळे. त्याही गंमतीला आपण मुकले आहोत.मुलांना मी थोडंसं लक्षात राहिलेला ज्ञान द्यायचे. मृगनक्षत्र… हरीण… त्याच्या पोटात घुसलेल्या बाणाचे तीन तेजस्वी तारे…. व्याध. तसेच सप्तर्षींचा  पतंग… दोरी सारखा खूप दूर असलेला ध्रुवतारा.. जो जास्त चमकत नाही… वशिष्ठ ऋषी.. त्यांच्या शेजारी छोटीशी चमकणारी अरुंधती ची चांदणी… सगळं त्यांना दाखवायचे. खरं तर सगळंच फार फिकट दिसायचं. शर्मिष्ठा देवयानी ययातीचा तो M सारखा तारा समूह.. जो एका वेगळ्याच आकाशगंगेच्या भाग आहे (बहुतेक). जो सरांनी दाखवला होता… तो मला कधीच दिसला नाही. शुक्र मंगळ ग्रह पण दिसले नाहीत. पुढं मुलं मोठी झाल्यावर मी त्यांना प्लॅनेटोरियम मध्ये घेऊन गेले होते. तिथं मॉडर्न टेक्निकनं दाखवलेली आकाशगंगा पाहिली. पण सरांनी दाखवलेली आकाशगंगा मला तिथं सापडलीच नाही…… ती हरवून गेली होती.

वर्षापूर्वी मला कर्नाटकातल्या एका खेड्यात जायचा प्रसंग आला. आम्ही तिघं जणं होतो. एका छोट्याशा स्टॅन्डवर बस थांबली. आम्ही आमच्या गंतव्या कडे… साधारण दोन-अडीच मैल चालत निघालो. तीपण अमावस्येची (एखादा दिवस मागेपुढे) रात्र होती. चालताना दृष्टी वर गेली आणि मुग्ध होऊन मी पाहतच राहिले. तो दक्षिणोत्तर पसरलेला तारकांचापट्टा-milky way-मला खुणावत होता. पूर्ण गोलाकार क्षितिज…. काळे कभिन्न आकाश.. ते म्हणजे एक खोलगट वाटी…. अन त्यावर चमकणारा आकाशगंगेच्या पट्टा. तो इतका जवळ वाटत होता की शिडीवर चढून आपण त्याला हात लावू शकू …. आणि हे काय?…. त्या मृगाच्या चौकोनात असंख्य तारे चमकत होते. मग मी माझ्या ओळखीचे तारे शोधण्याचा प्रयत्न करू लागले. ‘खरंच आता सर असायला हवे होते’ मनात विचार चमकून गेला.

पंधरा वीस मिनिटानंतर”काकू थांबू नको.. लवकर ये “. या पुतण्याच्या हाकेनं मी भानावर आले .’मध्ये रुपया ‘नसलेल्या सुपभर लाहया मी मनात भरून घेतल्या.

शेवटी लहानपणी पाहिलेली….अन् हरवून गेलेली आकाशगंगा मला सापडली होती.

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ सेतू – कवी: वसंत बापट ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ सेतू – कवी: वसंत बापट ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

कोवळ्या हिरव्यागार गवताच्या फुलांवर ठिबकलेले दवबिंदू,  समोर दाटलेला धुक्याचा तलम झिरमिरित पडदा, ताजातवाना,  थंड सुखद गारवा.  शरद ऋतुतल्या अशा पहाटवेळी श्री वसंत बापट यांनी कवीमनाला मुक्त केले आहे.

” अशी ही शरद ऋतुतील तरणीताठी पहाट समोर आहे, जणु उषेनं हिरवागार चुडा दोन्ही हातात भरलाय,  तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आहे. गवतपातीच्या नाजुक तनुवर दवाचं चमकणारं कणीस खुलून दिसतंय.

जणूकाही अष्टदिशा तिच्या दासी होऊन तिला न्हाऊ घालत आहेत. आणि अशा राजविलासी थाटात नुक्ते स्नान करून आलेली पहाट आपली आरसपानी कांती न्याहाळत  आहे. तितक्यात कुणाच्या तरी चाहुलीनं ती थबकली. चटकन आपल्या विवस्त्र देहलतेवर हात उंचावून रवि-रश्मी चं सोनेरी वस्त्र ओढून घेतलं. अंगाशी हात लपेटून लाजेनं ओठंगुन ती  क्षणभर उभी राहिली.

ओलसर पाय अलगद उचलून ती चालू लागली. नटखट वारा अवतीभवती रुंजी घालतच होता.  नजर पुढे जाताच तिला दिसला निळाशार तलाव. त्या निळ्या दालनात कुणी असेल का? तिचं पाऊल क्षितिजाशीच थबकलं.

माथ्यावरच्या तलम निळ्या ओढणीतून तिच्या गालावरचा,  फुलाच्या स्पर्शाने उमटलेला व्रण लक्ष वेधून घेत आहे. एक एक पाऊल अलगद टाकत ती येत आहे.

तिच्या नाजुक तनुवर लगडलेले केशरी गेंदेदार झेंडू  आणि सोनेरी शेवंती असे रंग गंधाचे गहिरेपण बघून गुलाबाच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली आणि झेंडू-शेवंतीच्या टपो-या, टंच रुपाच्या बरोबरीने तोही मुसमुसून बहरला.

अशी रंग गंधात चिंब भिजलेली पहाट हलकेच फुलांची हनुवटी कुरवाळीत चालली आहे.  गवतफुलांच्या,  तृणपात्यांच्या कानात हळुच कुजबुजत चालली आहे. पण हे प्रेम वात्सल्य ममता वगैरे काही नाही हं! हे आहेत तारुण्याचे विभ्रम.  यौवनातील प्रेमाचे लडिवाळ क्षण आहेत. असे हे इशारे सराईताला सुद्धा कसे कळावे?

अशी ही सुखद रोमांचित पहाट कवी मनाला जास्तच रोमॅटिक करते. नावात वसंत, पहाट शरदातली,  आणि आश्विनातली पुष्पसृष्टी. अशी ऋतु-मास मीलनाने बहरलेली पहाट.

कवी वसंत बापट यांचा सेतु हा 1957 सालचा काव्यसंग्रह. ते स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातले कवी. अत्यंत संवेदनशील अशा कविमनावर राजकीय,  सामाजिक घडामोडींचा परिणाम होणे अपरिहार्य होते. स्वांतः सुखाय हे तत्व बहुजन हिताय या तत्वाने झाकून टाकले. त्या काळी वसंत बापट हे पोवाडे लिहिणारे व गाणारे म्हणून नावाजलेले होते. त्यांचा संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा,  शिंग फुंकलेे रणी वाजतात चौघडे सज्ज व्हा उठा चला सैन्य चालले पुढे’ अशी स्फुरणदायी कवने खूप गाजली. शूरत्वाला आव्हान देणारी, पारतंत्र्याची लाचारी मानसिक दैन्य याने खचलेल्या अचेतन जनतेला गदागदा हालवून जागं करणारी त्यांची तेजस्वी धारदार लेखणी तळपत होती. वसंत बापटांनी  दुस-या एके ठिकाणी म्हटले आहे, ” संघर्ष,  लोभीपणा, मानसिक सुस्तपणा या आवर्तात सापडल्यामुळे जीवनातील मूलभूत आनंदाला आपण मुकतो. ” ह्याचा प्रत्यय म्हणजे

नंतरच्या काळात त्यांच्या लेखणीने नवे रुप धारण केले.  कोमलतेला हलकासा स्पर्श करणारी, सृष्टीसौंदर्य शब्दात उलगडून मन ताजेतवाने करणारी कोमल कलम तारुण्याला साद देत होती.  निसर्गाच्या स्पंदनांची जाणीव,  मनाच्या अनेक स्मृती,  अनुभव  यांचे आगळे वेगळे रसायन त्यांच्या नंतरच्या कवितांतून आढळते. याचेच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ” सेतु” ही कविता.

फुलातील फूलपणा तर आहेच, पण त्या बरोबर त्याच्याशी संलग्न अशी जाणीव मनात घर करते.

कवितेत शब्द सहज समजणारे. वाचताना जाणवते की, ” ह्या जागी हेच शब्द,  ह्यापेक्षा दुसरा चपखल शब्द असूच शकत नाही “. बघा ना!……’तरणीताठी पहाट ‘, ‘राजविलासी स्नान’ , ‘ आरसपानी कांती ‘, ‘ ओठंगुन उभी ‘, ‘ वारा नखर’, ‘ फलचुखिचा व्रण’, ‘ गुलाब ईर्षेने मुसमुसले’, अशी सुंदर शब्द रर्त्ने. इतके तरल आणि पारदर्शी शब्द,  असं वाटतं की, लिहिताना पेनातून शाईऐवजी दवबिंदू तर टपकत नाहीत ?

प्रत्येक ओळीतून एकेक भावनावस्था प्रकट होते. अरूणोदय हा नेहमीच पूज्य, आराध्य वाटतो.उगवते सूर्यबिंब दिसताच नकळत हात जोडले जातात.पण इथे तर कवीने हाच अरूणोदय इतक्या नर्म,  संयमी,शृंगारिक भावनेने व्यक्त केला आहे. शृंगार रसाला एका उच्च आणि स्वच्छ,  शुद्ध पातळीवर नेऊन ठेवलं आहे.  हेच या कवितेचे मर्म आहे.

रात्र संपून पहाट होता होता एक सौंदर्याकृती आकाराला येते.एक निसर्ग चित्र तयार होते आणि कलमरूपी कुंचला खाली ठेवता ठेवता कवीला ती पूर्वस्मरणीय घटना वाटते, आणि चित्रच बदलून जाते. एक सजीव सौंदर्य डोळ्यासमोर येते आणि कवीमन थबकते.  डोळे विस्फारून पहाटेकडे अनिमिषतेने बघतच रहाते.अशाच पहाटे ” तिला” पाहिले होते. क्षणभरात पहाटेचे ते दवांनी भिजलेले गारव्याचे स्मृतिक्षण रोम रोम पुलकित करतात आणि शब्द उतरतात,

” ही शरदातिल पहाट? …..की…….ती तेव्हाची तू?

तुझिया माझ्या मध्ये पहाटच झाली सेतु?”

एका झंझावाती, मर्द मनाच्या कवीची अगदी नाजुक आणि सुंदर कविता ” सेतु ”

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 6 – राग~तिलक कामोद ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  6 – राग~तिलक कामोद ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील भागांत देस रागाचे विवेचन केल्यानंतर, त्याच रागाचे सख्खे भावंड म्हणता येईल अशा तिलककामोद रागाविषयी विवरण करणे क्रमप्राप्तच आहे. एकाच खमाज नामक जनकाची ही दोन अपत्ये! दोन भावंडांच्या जीन्स एकच असल्या तरी हा सुरेश आणि हा रमेश हे दोघे स्वतंत्र अस्तित्व असलेले भाऊ आपण सहज ओळखू शकतो नाही का? त्यांच्या स्वरूपांत साम्य असूनही वेगळेपण असते. स्वभावही वेगळे असतात. देस व तिलककामोद यांच्यांतही असेच वेगळेपण आहे.

दोघांचे स्वर एकच! सा रे ग म प ध नी, अरोहांत नी कोमल! तिलककामोद मात्र जरा अवखळ,खेळकर स्वभावाचा! त्याची चाल सरळ नसून जरा वक्र वळणावळणाची आहे असे म्हणावे लागेल.

सा रे ग सा, रे म प ध म प सां—आरोह

सां—प ध म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)~ अवरोह. या आरोह~अवरोहावरून हे लक्षांत येते. टप्प्याटप्प्यावर रांगणारे जणू हे बालकच आहे. तिलककामोदची ही वक्र चाल फारच कर्णमधूर वाटते. त्यामुळे हा राग अतिशय लोकप्रिय आहे. कुशल कलावंत अवरोही रचनेत गंधारावरून षडजावर येतांना रिषभाला हलकेच स्पर्ष करून तो कणस्वरूपाने दाखवितात व गायन/वादनांत रंजकता आणतात. अंतर्‍याचा उठाव ‘ प ध म प सां ‘ या स्वरांनी घेऊन तिलककामोद आपले स्वतंत्र अस्तित्व श्रोत्यांच्या निदर्शनास आणतो.” प(मंद्र)नी(मंद्र) सा रे ग सा, रे म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)” हे राग निदर्शक स्वर आहेत. मंद्र सप्तकाचा उत्तरार्ध व मध्य सप्तकाचा पुर्वार्ध हे या रागाचे विस्तारक्षेत्र आहे. या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे रिषभ व पंचम आहेत. जरी अवरोहांत देसप्रमाणेच याही रागांत निषाद कोमल असला तरी उत्तरभारतीय कलावंत कोमल निषाद न वापरतां शुद्ध निषाद घेऊनच हा राग पेश करतात.शास्रानुसार हा राग रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी प्रस्तूत करावयाचा असतो.

तिलककामोद म्हटला की सर्वांच्या पटकन् लक्षांत येणारे गीत म्हणजे उंबरठा या चित्रपटांतील ” गगन सदन तेजोमय ” ही प्रार्थना!

लता दिदींचे सूर, र्‍हुदयनाथ मंगेशकरांची स्वररचना आणि कविवर्य वसंत बापट यांचे शब्द! ह्या तिघांचे रसायन असे काही जमून आलेले आहे की हे गाणे ऐकतांना मन मोहरून येते. स्व.श्री सुधीर फडके यांचेही तिलककामोद रागावर फार प्रेम! रूपास भाळलो मी,विठ्ठला तू वेडा कुंभार,दिसलीस तू फुलले ऋतू, आकाशी झेप घेरे पांखरा, ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर ही बाबूजींनी स्वरबद्ध केलेली आणि गायिलेली गाणी

तिलककामोद रागावरच आधारित आहेत.

ठुमरी, दादरा, कजरी हे उपशास्रीय गायनाचे प्रकार या रागांत आहेतच! अबके सावन घर आजा ही पारंपारिक ठुमरी अनेकांनी गायली नि आजही गायली जाते. सावनकी रितु आयी री सजनिया प्रीतम घर नही आये ही शोभा गुर्टू यांनी गायिलेली ठुमरी ऐकतांना ब्रम्हानंदी टाळी लागते.

उपशास्रीय व सुगम गायनांत या रागाचा दिलखुलास विहार असला तरी हे विसरून चालणार नाही की ख्याल गायनांतही हा राग प्रचलित आहे.चौताल,धमार या विलंबित तालांत

अनेक बंदिशी आढळतात. ” हर हर हर करत फिरत ना डरत गोपियनके साथ “ही चौतालातील बंदीश, ” चलोरी होरी खेलन सजनी दे तारी “हा धमार प्रचलित आहे.

वर नमूद केलेल्या रचनांवरून असे म्हणतां येईल की भक्ति,शृंगार, प्रीति सर्वच भावनाविष्कार करण्यास ह्या रागाचे चलन सक्षम आहे. ह्यांत एकप्रकारचा मांगल्यभाव आहे. इथे उल्हासाची उधळण नाही परंतु निराशाही नाही.चांगल्या गोष्टी तशाच टिकून राहिल्या आहेत असा तिलककामोदाचा भाव आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

एकवीस दिवसाच्या युरोप ट्रीप वरून आम्ही परतलो. अजूनही ट्रीपच्या मूडमध्येच होतो.

इतकं प्रगत राष्ट्र, इतकी मोहमयी दुनिया नजरेत साठवून घ्यावं असं सौंदर्य इतकी आधुनिकता भव्य रस्ते भव्य इमारती इतका सुरेख निसर्ग हे सर्व पाहून डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्या होत्या.

आल्या आल्या मला स्वयंपाकाच्या कट्ट्याचे दर्शन घ्यावं लागलं. चहा करण्यासाठी सरसावले तर डोळे आणखीनच विस्फारले ओट्याच्या एका कोपऱ्यात एक छोटासा हिरवा देठ आणि त्याच्यावरच पिवळे फूल मला खुणावत होतं.

जाताना मीच बीजारोपण केलं होतं जणू! मोहरीचा एक दाणा रुजला होता आणि आपलं अस्तित्व दाखवत होता. मी जणू त्याला पंधरा-वीस दिवसाचा ‘ब्रीदिंग टाईम ‘दिला होता एरवी रोजच्या साफसफाईत तो अंकुरला नसता.

खूपच गोंडस निरागस हिरवट इवलसं पिवळ्याधमक फुलांन नटलेलं असं ते हळुवार डोलत होतं.

माझ्या मनातील सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली त्याने

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले

त्या कुणी ना पाहिले…..

या गाण्यांच्या ओळी मला सहाजिकच आठवल्या. त्या क्षणी कवीच्या भावनाही समजल्या.

….मी युरोप मध्ये पाहिलेलं ट्यूलिप फूल सुंदर की हे मोहरीचं फुल याचा विचार करत बसले आणि दूध उतू गेलं.

अस्तित्वा साठीची ही त्याची धडपड मला जाणवली . माझ्या डोळ्याला ते दिसणं हे त्याचं असणं! आणि माझ्या हदयात त्याचं बसणं हे त्याचं अस्तित्व!!

नाही का?…

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

देव जरी मज कधी भेटला। माग हवे ते माग म्हणाला…..हे गाणं मला फार आवडायचं.

अजुनही आवडतं…तेव्हां विचार करायची, खरंच देव भेटला तर…?नियोजन हा माझा स्थायी स्वभाव असल्यामुळे मी अगोदरच मागण्यांची यादी करुन ठेवली होती…कारण ऊगीच देव घाईत असला तर ऊशीर नको व्हायला…. आपली तयारी असलेली बरी…!! पण देव काही भेटला नाही.जगाचा कारभार सांभाळण्यात इतका गुंतला की माझ्यासारख्या सूक्ष्म जीवासाठी त्याला वेळच मिळाला नाही…

माझी यादी वर्षानुवर्षे तशीच पडून आहे….

आणि आता अलीकडे माझ्या मनात सहज विचार आला, देव नाही तर नाही, त्याचा एखादा सचीव भेटला तर….

शंकराच्या देवळांत नाही का..? आधी नंदीला पुजावे लागते…

मानवाच्या बाबतीतही कुणा स्टारची भेट हवी असेल तर अगोदर सेक्रेटरीशीच बोलावे लागते…..

मग आठवलं…कल्पवृक्ष…!! स्वर्गातला देवांचा सहकारी…तो भेटला तर…?

मी जपून ठेवलेली ती यादी बाहेर काढली…एकेका मागणीवरुन नजर फिरवली……

तशी म्हणा मागण्यांची सवय माणसाला जन्मजातच असते….मानवाचा पहिला ट्याँहा च मुळी मातेच्या दूधाची मागणी करण्यासाठी असतो….कळत नकळत तो आयुष्षभर मागतच असतो….माझ्यासारख्या सरकारी नोकरीतल्या व्यक्तीला तर संप, मागण्या हे नवीन नाहीच….मागण्या पुर्‍या झाल्या तर आनंद …

मागण्या फिसकटल्या तर पुन्हां संप…

पण कल्पवृक्ष एकदाच भेटणार…संधी वाया घालवायची नाही…एका आंधळ्या गरीब बेघर निपुत्रिक दरिद्री माणसाला देव भेटतो…एकच वर देतो ,म्हणतो माग…

तो मागतो, माझ्या विद्याविभूषित पुत्रपौत्रिकांना सुवर्णाच्या माडीवर, रहात असलेले मला पहायचे आहे…..एकाच वरात त्याने सरस्वती ,लक्ष्मी ,संतती  वैभव दीर्घायुष्य, दृष्टी सगळं मागितलं….

कल्पवृक्ष भेटला तर असेच बुद्धीचातुर्य आपल्याला दाखवावे लागेल…

पुन्हा एकदा यादी ऊलट सुलट वाचली….आणि लक्षात आले ही तर पन्नास वर्षापूर्वीची यादी…आता आपण पैलतीरावरचे …संध्यारंग पाहणारे ..एकेका मुद्यावर फुली मारत गेले…हे कशाला..? हे तर आहे.हेही नको.

याची आता काहीच गरज नाही..नव्वद टक्के यादी तर आपली पुरीच झाली आहे.. मग कल्पवृक्ष भेटला तर काय मागायचे?? बघु. करु विचार.

टी.व्ही लावला.

जगभराच्या बातम्या…कुणा कृष्णवर्णीयावर गोळ्या झाडल्या…. चॅनल बदलला. अल्पवयीन दलित बालिकेवर अत्याचार….मी चॅनल बदलत राहिले … संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून…. शेतकर्‍याची आत्महत्या…  करोनाचे बळी… दुष्काळ. .महापूर, अपघात. शैक्षणिक राजकीय सामाजिक भ्रष्टाचार… आरक्षण वाद… सर्वत्र नकारात्मक वातावरण….. मन सुन्न झाले…टी.व्ही. बंद केला…

सर्वत्र द्वेष, मत्सर, चढाओढ…. कल्पवृक्ष भेटलाच तर काय मागायचे?

विंदांची कविता आठवली… घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावेत…. बस् ठरलं…. कल्पवृक्ष भेटला तर मागायचे….

“बा कल्पवृक्षा, मला तुझे हातच दे…!!!”

© सौ. राधिका भांडारकर

 

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

स्वच्छ सुंदर सकाळ! निळे निरभ्र आकाश! हवेतील तापमानही १९/२० डिगरी सेलसियस्,त्यामुळे सुखद गारवा! आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर लोकांना चालण्यासाठी जवळ जवळ पांच मैल लांबीचा ट्रेल बांधला आहे. दुतर्फा उंच, हिरव्यागार वृक्षांच्या रांगा! त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी चालायला जा सतत शीतल सावली.

परवा अशीच चालत असतांना मनांत विचार आला वर्षानुवर्ष्ये हे वृक्ष उन्हांत उभे राहून आपल्याला सतत सावली देत असतात, मधूर फळे देत असतात, त्यांच्यावर उमलणार्‍या फुलांच्या सुगंधाने वातावरणांत प्रसन्नता निर्मीत असतात. परोपकार म्हणजे काय ते निसर्गाकडूनच शिकावे. दुसर्‍याच्या जीवनांत आनंद निर्माण करणे हेच यांचे महान कार्य!

मग स्वर्गातील कल्पवृक्ष आणखी वेगळे कसे असतात? असे म्हणतात की कल्पवृक्षाखाली बसून मनांतली एखादी इच्छा व्यक्त केली तर ती ताबडतोब पूर्ण होते. इच्छांची यादी तर खूपच लांबलचक आहे. कधीही न संपणारी. खरोखरच असा कल्पवृक्ष असतो का? आणेल का कोणी त्या वृक्षाला भूतलावर? दिसेल का तो आपल्याला?

चालता चालता माझ्या विचारांची साखळी लांबतच गेली. आता हळूहळू मन बेचैन झाल्यासारखे वाटू लागले. मग walking trail वर अंतरा अंतरावर ठेवलेल्या एका बाकड्यावर मी जरा डोळे मिटून शांत बसले.

काय सांगू ? मला एकदम डोळ्यासमोर लक्ष्मी~विष्णू उभे असल्याचा भास झाला आणि काय आश्चर्य त्या जोडीत मला माझे आई बाबाच दिसले. बाबा विचारत होते,” काय हवं आहे बेटा तुला? तुला जे पाहीजे ते देतो.” मला साक्षात्कारच झाला.

खरेच! आजपर्यंत काय केले नाही माता पित्यांनी आपल्यासाठी?अनेक खस्ता खाल्या, कष्ट केले, आपले सगळे हट्ट पुरविले, आजारपणांत रात्री रात्री जागवल्या. आज समाजांत आपल्याला जे मानाचे स्थान आहे ते केवळ त्यांनी दिलेल्या उच्च शिक्षणाने, त्यांनी घातलेल्या सुविचारांच्या खत पाण्याने, उत्तम संस्कारांने!

खाडकन् डोळे उघडले. खूप आनंद झाला.

अरे! कुठला कल्पवृक्ष शोधतो आहोत आपण?

कल्पवृक्षाच्या छत्र छायेतच तर आपण वाढलो!

धन्यवाद!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग पहिला) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग पहिला) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆ 

संध्याकाळचे सहा वाजले असावेत. नेहमीप्रमाणे मी गॅसवर चहाच भांडं ठेवलं.

वासू येईलच इतक्यात. एक तासभर समोरच्या बागेत फिरून सहा वाजेपर्यंत येतोच तो.चहा घेत घेत अर्धा तास Zee Business बघतो. नंतर रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत आबांच्या खोलीत पुस्तक वाचून दाखवयाला जातो. मी टेबलवर चहा बिस्किटं ठेवली आणी बागेला पाणी घालायला गेले. थोड्या वेळाने देवापाशी दिवा लावण्यापूर्वी रिकामा कप सिंक मध्ये ठेवला. तेव्हढ्यात . .

“सुधा –s s  सुधा चहा  . . .s s s ”

काय हे? केव्हढा ओरडतोय हा! आणी चहा ? परत ?

“वाजलेत किती बघ.आणी आज स्वारीला पुन्हा तल्लफ आलीय? आत्ताच तर घेतलास.”

“कुठे? तू दिलाच नाहीस? काय हो आबा? घेतला का मी चहा?” अरे, आत्ताच तर रिकामा कप धुतला मी. मग हा चहा प्यायला काय भूत आलं होतं कि काय!”

“विसरतेस तू अलिकडे. दिलाच नाहीस तू चहा मला.”

मी थोड्या घुश्शातचं पुन्हा चहा ठेवला.

रात्री नेहमीप्रमाणे झाकापाक केली. उरलेली पोळी भाजी use and throw च्या डब्यात ठेवली. किचनचे लाईटस् ऑफ केले. दारखिडक्या बंद आहेत ना बघून बेडरुमकडं वळले. WhatsApp चे messages चेक केले.

‘आजही वेदचा मेसेज नाही. आता कानच ओढले पाहिजेत याचे’ असं मनात म्हणत मी चादर अंगावर ओढली… काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी चरफडतच ऊठले. किचनची खिडकी ऊघडी राहिली असावी. छे: छे: स्वत: लाच टपली मारून मी किचन मध्ये आले. आणी… आणी… बघते तर काय …. ?

कोपर्‍यावरच्या घरातल्या बकूमावशी मनलावून पोळी भाजी खात बसल्या होत्या.किचनची खिडकीवार्‍याने ‘थाड  थाड’

वाजत होती .अगबा s s ई s s s. माझ्या

अंगावर सर्रकन काटा आला. या… या… इथे?

..   क्क .. क्क्. ..  क… शा?

 क्रमश:

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

अगदी न कळत्या वयापासून एक प्रेक्षक म्हणून माझ्या जडणघडणीला सुरुवात झाली त्याला निमित्त ठरलं ते किर्लोस्करवाडीत व्यतित झालेलं माझं बालपण.किर्लोस्करवाडी ही टुमदार काॅलनी.तिथल्या सांस्कृतिक आणि संस्कारक्षम वातावरणातील मोकळे श्वास हेच आमचं (त्या काळातही बाहेरच्या जगात अप्राप्य असणारं) वैभव होतं.माझ्या मनात रुजलेली नाटकाची आवड ही त्या वैभवाचीच देन..!

त्या टुमदार काॅलनीत सुरक्षाव्यवस्थेचा भाग म्हणून बाहेरच्या कुणाचाच परवानगीशिवाय वावर नसे.घरी येणाऱ्या पाहुण्यांनासुध्दा संपूर्ण चौकशी होऊन व रजिस्टरमधे सविस्तर नोंदी करुन घेऊन मगच प्रवेश दिला जात असे.अशा वातावरणामुळे स्थानिकांच्या करमणुकीचं कोणतंच साधन तिथं उपलब्ध नव्हतं.सिनेमा पहायलाही शेजारच्या रामानंदनगरच्या तंबूमधे(टूरिंग टाॅकीज)जावं लागे.तेव्हा रेडिओही घरोघरी नसायचे.

यामुळेच काॅलनीतील नागरीकांची सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन किर्लोस्कर व्यवस्थापनातर्फे पुण्यामुंबईतील व्यावसायिक नाटक कंपन्यांची नाटके निमंत्रित करुन त्याचे खास प्रयोग आम्हाला विनामूल्य दाखवले जायचे.त्या विद्यार्थी दशेत  तिथे पाहिलेली बाळ कोल्हटकरांची ‘वेगळं व्हायचंय मला’,’दुरितांचे तिमिर जावो’,बाबुराव गोखल्यांची ‘करायला गेलो एक’, ‘व-हाडी मानसं’ अशी कितीतरी नाटकं आजही मी विसरलेलो नाहीय.

शेजारच्या कुंडल या गावी त्याकाळी खूप प्रसिध्द असलेली ‘आनंद संगीत मंडळी’ नावाची एक नाटककंपनी होती.खरंतर नाटककंपनी ही संकल्पना नुकतीच लयाला गेलेल्या त्या काळात ही ‘आनंद संगीत मंडळी’ मात्र अद्याप आपला आब राखून कार्यरत होती.किर्लोस्करांतर्फे दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या या कंपनीचा तिथे सलग आठ दिवस मुक्काम असे आणि तो मुक्काम म्हणजे आमच्यासाठी गाजलेल्या संगीत नाटकांची पर्वणी..!माझी पुण्यप्रभाव, मंदारमाला,एकच प्याला सारख्या

सगळ्या गाजलेल्या संगीत नाटकांशी ओळख त्यामुळेच होऊ शकली.

बाबूराव गोखल्यांच्या ‘श्री स्टार्स’या संस्थेचं एक ठळक वैशिष्ठ म्हणजे त्यांच्या जाहिरातीतून जाहीर केली जाणारी नाटक सुरु होण्याची वेळ.प्रयोगाची वेळ रात्री ८वाजून २८ मिनिटे,किंवा ८वाजून १७ मिनिटे अशी एखाद्या शुभकार्याचा मुहूर्त असावा तशी जाहीर केली जायची.आणि तिसरी घंटा रात्री बरोब्बर आठ वाजल्यानंतरच्या नेमक्या त्या मिनिटाला होत असतानाच पडदा उघडला जायचा.नाटकाची अनाउन्समेंट होतानाही पहिला,दुसरा,तिसरा अंक संपण्याच्या आणि पुढचा अंक सुरु होण्याच्या अशाच ‘नेमक्या’ वेळा उदघोषित करून पाळल्याही जायच्या.त्यांची नाटकेही तशीच दर्जेदारही असायची.पण वेळेच्या बाबतीतली त्यांची ती शिस्त मात्र एकमेवाद्वितीयच.वेळेचं हे नियोजन खरंच थक्क करणारं.आज आठवलं तरी हे सगळं अविश्वसनीय आणि म्हणून स्वप्नवतच वाटत रहातं.

याखेरीज तिथल्या सोशलक्लबतर्फे काॅलनीतील हौशी कलाकारानी स्वत: बसवून सादर केलेली असंख्य नाटकेही आनंद देऊन गेलेली आहेत.एका वर्षी स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेल्या पु.लंच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकात पुढे कवी आणि गीतकार म्हणून रसिकप्रिय झालेल्या , तेव्हा नवतरूण असलेल्या सुधीर मोघे यानी केलेल्या कवी संजीव या भूमिकेची आठवणही मी विसरलेलो नाहीय.(श्रीकांत आणि सुधीर मोघे हे बंधूद्वय त्याकाळचे वाडीकरच.)

माझ्या न कळत्या वयापासून दर्जेदार नाटके सातत्याने पहायचा योग किर्लोस्करवाडीतील आमच्या वास्तव्यामुळे आला हे खरेच,पण पुढेही नोकरीनिमित्ताने मी प्रथम मुंबईत गेलो तो १९७१-७२चा काळ हा प्रायोगिक रंगभूमीचा पायाभरणीचा काळ तर होताच शिवाय आधुनिक व्यावसायिक रंगभूमीचा भरभराटीचा काळही होता.त्यात योगायोगाने माझे वास्तव्य शिवाजी मंदिरला चालत जाता येईल अशा दादरच्या नूर बिल्डिंग

मधे.त्यावेळच्या पगाराचा विचार केला तर तेव्हाचे नाटकांचे ४-५ रुपयांचे दरही न परवडणारेच वाटायचे.पण बालपणीच मनात पेरली गेलेली नाटकाची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हतीच.मग जमेल तिथे टोकाची काटकसर करत पैसे साठवून शिवाजी मंदिरला जाऊन नाटकं पहायची चैन करावी लागायची.त्यावेळी मी पाहिलेल्या नटसम्राट, संध्याछाया, जास्वंदी,अशा पुढे मैलाचा दगड ठरलेल्या असंख्य नाटकांनी माझ्यातला प्रेक्षक घडवतानाच माझ्याही नकळत माझ्या अभिरूचीला योग्य वळणही लावलं.पुढच्या काळात मी पाहिलेल्या विषवृक्षाची छाया, पुरुष,बॅरिस्टर,गारंबीचा बापू, हयवदन,ऋणानुबंध,सख्खे शेजारी,नातीगोती,हमीदाबाईची कोठी,महासागर यासारख्या असंख्य नाटकांच्या विषयवैविध्य आणि सकस मांडणीने मला कधीच विसरता न येणारा नाट्यानुभव दिलेला आहे.प्रेक्षकम्हणून मला घडवण्यात या सगळ्याच नाटकांचा महत्वाचा वाटा आहे.

या वेळेपर्यंत एक आवड म्हणून कथालेखनाचा व्यासंग जपलेल्या आणि त्यात बऱ्यापैकी स्थिर झालेल्या मला नाट्यलेखन हे एक वेगळंच तंत्र आहे आणि ते आपल्याला जमणार नाही असंच वाटायचं आणि मग मी दुधाची तहान ताकावर भागवावी तसा डोळसपणे नाटके पहात रहायचो.मी नाट्यलेखनाकडे वळलो तेही पुढे खूप वर्षांनंतर.तोही अतिशय अनपेक्षित योगायोगच होता.त्या संपूर्ण प्रवासाबद्दलही सांगण्यासारखं बरंच कांही आहे पण ते पुन्हा कधीतरी…!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

 

पहाटेच्या वेळी एकदा एक कळी हळूच आली

आपले मनोगत हळुवार सांगून गेली.

रात्र कधीची संपली,पहाट झाली.

ही कळी म्हणजे माझ्या मनात नृत्य शिकण्या विषयी विचारांनी घेतलेला जन्म. या कळीला हळूवार फुंकर घातली धनश्री ताई रुपी वाऱ्या ने हळूवार फुंकर घालत असताना त्या कळीच्या आणि वाऱ्याच्या झालेल्या एकत्र प्रवासाविषयी थोडेसे.

खरेतर सुरुवातीला भरतनाट्यम हा नृत्यप्रकार शिकणे केवळ आणि केवळ डोळ्यांनी पाहून शिकणे हीच कला आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा अडसर ताईंच्या आणि माझ्या वाटेत उभा होता.

पण ताईंनी माझं मन नावाचं organजा गं करायला सुरुवात केली. आणि आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की शरीर हे केवळ माध्यम आहे, साधन आहे आणि शरीरा पलीकडे म्हणजे अतिंद्रीय शक्तीच्या आधाराने आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. ताईनी मग स्पर्श, बुद्धीआणि मनातील अंतरिक प्रेमभाव यांच्या माध्यमातून नृत्य शिकवायला सुरुवात केली. अशाप्रकारे नृत्यातील अडवू, हस्त मुद्रा शिकत असताना कधी आमचे सूर जुळून गेले हे कळलेच नाही.

नृत्यामध्ये बरीच अवघड वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतात. जसे की डावा हात डोक्यावर असताना उजवा पाय लांब करणे, उजवा हात कडेला असताना डाव्या पायाचे मंडल करणे, भ्रमरी घेताना उजवा हात डोक्यावर ठेवूनडावा हात फिरवत उजवीकडून वळणे आणि त्याच वेळी गाण्या नुरूप चेहऱ्यावरचे हावभाव दाखवणे. अशा खूप अवघड अवघड गोष्टी ताईंनी अगदी कौशल्यपूर्ण रीतीने शिकविल्या. खरंतर दृष्टिहीन व्यक्ती ला समोर असलेले पाण्याचे भांडे घे हे सांगताना दुसऱ्याची खूप तारांबळ होते. पण इथे तर अच्छे मृत्य शिकवायचे होते.

नृत्याचे शिक्षण प्रशिक्षण जसजसे पुढे जात होते तसच या नवीन अडचणी समोर येत होत्या.  ८-९ वर्षे शिकल्यानंतर अभिनयाचा भाग आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला तो अभिनय  शिकविण्या विषयी. पण पण तिथेही ताईंनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून घेतला आणि लहान मुलांना गोष्टी सांगून जसे मनात भाव निर्माण केले जातात त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला.

माझ्या अनेक अडचणी मध्ये मला येणारी अडचण म्हणजे आवाजाची .नृत्यात गिरकी घेतल्यानंतर माझे तोंड प्रेक्षकांच्या कडे आहे की बाजूला हे मला कळत नसे. पण या अडचणीवरही ही ताईंनी मात केली आणि आवाजाची दिशा ही नेहमी माझ्यासमोरच ठेवली की ज्याच्या आधाराने माझे दोन फिरून समोरच येत असे.

ताईंचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन, त्यांनी घेतलेले कष्ट, माझी मेहनत, रियाज आणि साधना याचा परिपाक असा झाला की मी नृत्यामध्ये गांधर्व महाविद्यालयाची  नृत्य विशारद ही पदवी, कला वर्धिनी चा ५ वर्षा चा कोर्स, टिळक महाराष्ट्र विद्यापीठा ची नृत्यातली एम. ए. ही पदवी,यशस्वी रित्या संपादन केली.ज्यामुळे आज मी अनेक ठिकाणी,माझ्या एकटीचा स्टेज प्रोग्राम करू शकत आहे.

या माझ्या यशाचे कौतुक अनेक वर्तमान पत्रांनी आणि दूरदर्शन वरील अनेक वाहिन्यांनी, प्रसार माध्यमांनी भरभरून केले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ! ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आज त्रिपुरी पोर्णिमा! दसरा दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते. त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो ! तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो.लहानपणी त्रिपुर पहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू!

वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून  गेलेली दिसत असे. गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दिप माळा मी खूप पाहिल्या.

पण… माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला! सासुबाई  सांगत, ‘समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला! त्याकाळी जन्मवेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! आणि लग्नानंतर तारखे पेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला ह्यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात प्रकाश भावजींचा पुढाकार असे. मग मुले आणि आम्ही सर्वजण पणत्या , मेणबत्या घेऊन त्रिपुर लावण्यात मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशाने उजळून गेलेले पहाण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे. शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या  तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे नीरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खुपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस शालीत गुरफटून  घेत डिसेंबर ,जानेवारी येतात, पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचे 70 त्रिपूर पूर्ण झाले! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो,असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे यांना आयुष्यभर मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरद: शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 74 ☆ चेत जाओ ! ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।

श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली  कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 74 – चेत जाओ ! 

रेल में भीड़-भड़क्का है। हर कोई अपने में मशगूल। एक तीखा, अनवरत स्वर ध्यान बेधता है। देखता हूँ कि साठ से ऊपर की एक स्त्री है संभवतः जिसके स्वरयंत्र में कोई दोष है। बच्चा मचलकर किसी वस्तु के लिए हठ करता है, एक साँस में रोता है, कुछ उसी तरह के स्वर में भुनभुना रही है वह। अंतर बस इतना कि बच्चे के स्वर को बहुत देर तक बरदाश्त किया जा सकता है जबकि यह स्वर बिना थके इतना लगातार है कि खीज़ पैदा हो जाए। दूर से लगा कि यह भीख मांगने का एक और तरीका भर है। वह निरंतर आँख की ज़द से दूर जा रही थी और साथ ही कान भुनभुनाहट से राहत महसूस कर रहे थे।

किसी स्टेशन पर रेल रुकी। प्लेटफॉर्म की विरुद्ध दिशा से वही भुनभुनाहट सुनाई दी। वह स्त्री पटरियों पर उतरकर दूसरी तरफ के प्लेटफॉर्म पर चढ़ी। हाथ से इशारा करती, उसी तरह भुनभुनाती, बेंच पर बैठे एक यात्री से अकस्मात उसका बैग छीनने लगी। उस स्टेशन से रोज़ यात्रा करनेवाले एक यात्री ने हाथ के इशारे से महिला को आगे जाने के लिए कहा। बुढ़िया आगे बढ़ गई।

माज़रा समझ में आ गया। बुढ़िया का दिमाग चल गया है। पराया सामान, अपना समझती है, उसके लिए विलाप करती है।

चित्र दुखद था। कुछ ही समय में चित्र एन्लार्ज होने लगा। व्यष्टि का स्थान समष्टि ने ले लिया। क्या मर्त्यलोक में मनुष्य परायी वस्तुओं के प्रति इसी मोह से ग्रसित नहीं है? इन वस्तुओं को पाने के लिए भुनभुनाना, न पा सकने पर विलाप करना, बौराना और अंततः पूरी तरह दिमाग चल जाना।

अचेत अवस्था से बाहर आओ। समय रहते चेत जाओ अन्यथा समष्टि का चित्र रिड्युस होकर व्यष्टि पर रुकेगा। इस बार हममें से कोई उस बुढ़िया की जगह होगा।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print