मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यवानाची सावित्री ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ सत्यवानाची सावित्री  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

जवळपास गेली चाळीस वर्षे इंदू माझ्या घरी काम करते ती माझ्याकडे आली तेव्हा आम्हा दोघींची मुले पहिलीत होती आज आम्हा दोघींच्या घरी गोकुळ आहे.

इतक्या वर्षांचा ऋणानुबंध आमचा! आता ती आमच्या कुटुंबातीलच एक झाली आहे. स्वतःचं एवढं मोठं कुटुंब असूनही ती माझ्या घरात रमलेली असते. आणि माझ्यात गुंतलेली!

तिचा सगळा जीवनप्रवास तसा खडतरच! अशिक्षिततेची झालर असलेलं जिणं तिच!! ठेंगणी ठुसकी अशी इंदू कष्ट करून नीटनेटका संसार करणारी अशी.. ‘तुमच्या वानी तुमच्या वानी’असं म्हणून जमेल तेवढं माझं अनुकरण करणारी . अशी ही इंदू……

माझ्याच घरात तिने स्वयंपाकाचे धडे घेतले. जेवढ्या म्हणून माझ्या गोष्टी तिने डोळ्याने पाहिल्या हाताने शिकल्या त्याचं तिला अप्रूप आहे. वेळोवेळी केलेल्या मदतीचे भान ती ठेवते पण तिच्या नशीबाची गाडी मी पळवू शकत नाही हे तिला चांगलेच ठाऊक आहे.

तिचा नवरा पहिल्यापासूनच व्यसनी…रोजची भांडण रोज वाद, कधीकधी होणारा नशेचा अतिरेक हे मी इतकी वर्ष पाहात आले आहे जीवनाचा समतोल राखत ती बिचारी जन्मभर राबते आहे.

सततच्या व्यसनासाठीच्या पैशाची मागणी आणि पुरवले नाहीत की होणारी मारहाण यांनी कातावून गेलेली इंदू माझ्याकडे आल्यावर सगळं दुःख विसरते आताशा तर रोजचेच रडगाणे गायचे ही तिने सोडून दिलेआहे.

कधीतरी तिचा चेहरा पडलेला दिसला की मी खोदून तिला विचारत असते पण दुःखाचं प्रदर्शन मांडायचं आणि नवऱ्याला नावं ठेवायची हे तिच्या स्वभावात नाही पण अती झाले की कधीतरी ती माझ्यापुढे मोकळी होते.

करोनाचे अस्मानी संकट आले तशी तिच्या जीवनाची घडीच विस्कटली यंत्रमाग बंद पडले. दोन्ही मुलांचं काम गेलं. पैशाची चणचण भासू लागली. माझ्याकडून होता होईल तेवढी मदत करत होतेपण ती खिन्न आहे.

त्यात आणखी तिच्या नवऱ्याची रोजची दारूसाठी पैशाची मागणी

चार दिवस सलग ती आलीच नाही तिच्या मुलाचाही फोन लागेना.एखादा दिवस वाट बघावी आणि मग पाठवावं कुणालातरी तिच्याकडे असा मी विचार करत होते तोवरच दारात उभी !मान खाली घालून काहीशी अस्वस्थच दिसली .घरात आली आणि मटकन खाली बसली. आणि ओक्साबोक्शी रडायला लागली माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली ती दुसऱ्याच कारणासाठी….कुणा मुलाला कोवीड झाला की काय असे वाटले. बऱ्याच वेळानंतर बोलती झाली…

“मालक गेलं वहिनी “…..

“अगोबाई कशानं गं? मला एकदम धक्का बसला.”

“वहिनी जनमभर मी त्याला दारूला कधीबी कमी केलं न्हाई.त्यांच्या व्यसनासाठनं राबलो.तुम्हाला ठाव आहे. घरात दुध नसलं तर चालल पर त्याच्यासाठनं मी कायम पैका दिला. परवा दिवशी त्यांच्या हातात पैसे हुतं पर दारू मिळना म्हनूनशान लै चिडचिड चिडचिड करत हुतं आणि कुठं जाऊन ते हाताला लावत्यात ते काय म्हणतात शनि टायझर पिऊन आलं बघा आनी दवाखान्याला न्यूस तो पतुर डोळ्या देखता गेलं.” असं म्हणून तिने अक्षरशः हंबरडा फोडला.

“म्या त्यांची दारू कवा बंद केली न्हाई. मी त्यांच्या दारू साठनच राबलो का न्हाई वहिनी? मला ठाव असतं दारू कुठं मिळतीया ते तर कुठून बी दारू आनून पाजली असती. त्यांच्यासाठनं काय बी केलं असतं म्या”….. आणि पदर डोळ्याला लावून ती हमसाहमशी रडू लागली

मी आ वासून पाहत बसले त्या सत्यवानाच्या सावीत्रीकडे !!……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ३) – राग देशकार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ३) – राग देशकार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

दीप्तिमान देशकार

एकाच आरोह-अवरोहातून अनेक  राग निर्माण होताना जी संकल्पना ‘की रोल’ निभावते ती म्हणजे रागाचा वादी व संवादी स्वर! तर आज, रागाचा वादी स्वर व संवादी स्वर म्हणजे काय? हे समजून घेण्यापासूनच सुरुवात करूया. रागात सर्वात जास्त महत्व ज्या स्वराला दिलं जातं, सर्वात जास्त प्रमाणात सातत्यानं जो स्वर रागविस्तारात वापरला जातो त्याला त्या रागाचा वादी स्वर म्हणतात आणि वादी स्वराच्या खालोखाल जो स्वर महत्वाचा असतो त्याला संवादी स्वर असं म्हणतात.

थोडक्यात रागाच्या राज्यातला राजा म्हणजे वादी स्वर आणि प्रधान म्हणजे संवादी स्वर! आता कोणत्याही दोन व्यक्तींनी स्वत:ला राजा आणि प्रधान म्हणवून घेतल्यानं म्हणजे फक्त आम्ही महत्वाचे आहोत व बाकी कुणीच नाही असं म्हटल्यानं राज्यकारभार चालू शकेल का? तर नाही! इतर पदाधिकारी सकृतदर्शनी थोडीशी कमी महत्वाची का होईना पण आपापली जबाबदारी नीट सांभाळत असतील तरच राज्य सुरळीत चालेल, प्रजा सुखात नांदेल. त्याचप्रमाणे रागाच्या इतर स्वरांच्या पार्श्वभूमीवरच, त्यांच्यासोबत एका धाग्यात गुंफले जात असतानाच खुलून येणारं ठराविक वादी-संवादी स्वरांचं प्रामुख्य एक राग निर्माण करतं.

वादी-संवादी स्वरांशिवाय रागातील इतर स्वरांपैकी काही स्वरही भरपूर प्रमाणात वापरले जातात, तर काही मध्यम प्रमाणात आणि काही अत्यल्प प्रमाणात! त्या-त्या रागस्वरूपानुसार हे प्रमाण ठरतं. विशेष म्हणजे मुळातच निर्गुण-निराकार असलेल्या सुराला मोजमापांची परिमाणं कशी लावणार!? त्यामुळं प्रत्येक रागातील स्वरांच्या वापराचं हे कमी-जास्त प्रमाण आणि वापराची पद्धती ही गुरूसमोर बसून त्यांनी आपल्याला शिकवताना, रागस्वरूप समजावत गायलेला/वाजवलेला राग ऐकून आणि समजून-उमजून घेऊनच जाणून घेता येते. कागदोपत्री अशा बारकाव्यांची कितीही नोंद करून ठेवली तरी प्रत्यक्ष गुरूमुखातून ऐकल्याशिवाय ह्या गोष्टींचे अर्थ अजिबात कळत नाहीत. म्हणून तर आपल्या रागसंगीताला गुरूमुखी विद्या म्हटलं गेलं आहे.

मागच्या लेखात उल्लेखिलेल्या भूपाच्या संदर्भानेच आजचा विषय पुढे जाणार आहे. आता आपण भूपाविषयी बोलतोय आणि त्यात पाच सूर आहेत तर त्यानुसार कल्पना करूया. समजा, अगदी एकसारखं काढलेलं निसर्गचित्र काही जणांना रंगवायला दिलं. त्यासाठी पिवळा, निळा, लाल, हिरवा, जांभळा असे पाच एकसारखे रंगही त्यांना दिले. मात्र कुठे, कोणता रंग, किती प्रमाणात व कोणत्या पद्धतीनं वापरायचा ह्याचं स्वातंत्र्य रंगवणाऱ्याला दिलं. अर्थातच रंगवून आलेल्या चित्रांपैकी एखाद्या चित्रात पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा जास्त वापर असेल, एखाद्या चित्रात निळा आणि पिवळ्याचा प्रभाव असेल, एखाद्यात लाल आणि हिरवा ठळक असेल तर एखाद्यात पिवळा आणि जांभळा उठून दिसत असेल आणि त्याशिवायच्या इतर तीन रंगांच्या वापराच्या कमी-जास्त प्रमाणातही फरक असेल.

आता एकच चित्र, एकसारख्या पाच रंगात रंगवलेलं असूनही रंगसंगतीतलं रंगांचं कमी-जास्त प्रमाण प्रत्येक चित्राला वेगळं रूप देईल, प्रत्येक चित्राचा `इफेक्ट’ वेगळा असेल, प्रत्येक चित्र पाहाताना बघणाऱ्याच्या मनात उमटणारे भाव वेगळे असतील कारण एकूण रंगसंगतीमुळे चित्राचा होणारा अंतिम परिणाम वेगळा असेल.  हेच उदाहरण अगदी एकसारखेच आरोह-अवरोह असणारे वेगळे राग कसे निर्माण झाले, ही गोष्ट समजून घेण्यासाठी उपयोगी पडेल. रंगांची संख्या सहा किंवा सात केली की हीच गोष्ट आरोह-अवरोहात सहा किंवा सात सूर असतील तेव्हांही लागू पडेल.

वरच्या सर्व परिच्छेदांतील संदर्भ जोडून पाहिले असता एकच आरोह-अवरोह असणारे दोन किंवा त्याहून जास्तही राग कसे असू शकतात ह्याबाबत ढोबळमानाने कल्पना यायला हरकत नाही. आता भूपाचा‘च’ आरोह-अवरोह असणारे आणखी दोन राग म्हणजे एक प्रचलित असलेला ‘देशकार’ आणि दुसरा अप्रचलित ‘जैतकल्याण’! त्यापैकी आज आपण देशकाराविषयी जाणून घेऊया. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे `ग’ आणि `ध’ हे भूपाचे अनुक्रमे वादी-संवादी स्वर अगदी उलट होऊन देशकारात येतात, म्हणजेच देशकारात ‘ध’ हा वादी आणि ‘ग’ हा संवादी होतो. अर्थातच या दोन्ही स्वररंगांच्या वापराचं प्रमाण तर बदलतंच शिवाय इतर स्वरांच्या वापरातही फरक पडतो आणि दोन्ही रागस्वरूपं पूर्ण भिन्न होऊन जातात. तेच रेखाटन(राग उभा करण्याचा ढाचा) त्याच रंगांच्या(तेच आरोह-अवरोह) कमी-जास्त प्रमाणातील ( वादी-संवादी व इतरही स्वरांचं प्रमाणमहत्व) वापरामुळं बघणाऱ्याच्या मनात वेगळे भाव उमटवतं (ऐकणाऱ्याच्या मनात वेगळे भाव निर्माण करतं)…. एकूणात वेगळा परिणाम साधतं!

भूप आणि देशकाराचा विचार करताना वादी-संवादी तर बदलतातच, शिवाय रिषभाचं प्रमाण हे भूपात व्यवस्थित थांब्याचं आहे तर देशकारात अल्प आहे. भूपाची प्रकृती पुन्हापुन्हा गंधाराकडे वळणारी(अधोगामी) आणि देशकाराची प्रकृती सातत्याने धैवताचा ध्यास घेणारी(उर्धवगामी) आहे. म्हणूनच भूप पूर्वांगप्रधान तर देशकार उत्तरांगप्रधान आहे. दोन्ही रागांचा थाटही वेगळा आहे, भूप ‘कल्याण’ थाटातील तर देशकार ‘बिलावल’ थाटातील राग आहे. ह्या दोन्ही रागांची गाण्याची वेळही वेगळी… भूप रात्रीचा पहिल्या प्रहरातला आणि देशकार दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा! ह्या सर्व संज्ञांचा व संकल्पनांचा अर्थ पुढच्या लेखांमधे हळूहळू येणार आहेच. शब्दमर्यादेमुळे आणि विषयाच्या भव्यतेमुळे सगळ्याच गोष्टी एका लेखात उलगडणे शक्य नाही.

ह्या दोन्ही रागांचा विचार करताना मला असं जाणवतं कि सूर्य उगवण्यापूर्वी आणि मावळण्यापूर्वी अनेक रंग आभाळभर पसरलेले असतात. मात्र उगवतीच्या रंगांमधे उषेची चाहूल असते, त्यावेळच्या सूर्यकिरणांच्या प्रखरतेचा प्रभाव दिवस/कामकाज जोमानं सुरू होणार असल्याची चाहूल देतो, आपल्यापर्यंत गतिमान वलयं पोहोचवतो जेणेकरून आपणही ती गतिमानता आत भरून घेऊन कामकाजाला लागतो. याउलट मावळतीच्या रंगामधे निशेची चाहूल असते. अस्ताचलाला चाललेल्या सूर्यकिरणांतली सौम्यता आपल्याला विसाव्याची चाहूल देते, कामकाज थांबवत शांततेत रमण्याचे वेध देते. अगदी त्याचप्रकारे रात्री गायला जाणारा भूप मला शांत प्रकृतीचा वाटतो आणि त्या तुलनेत देशकारात एक गतिमान सळसळ जाणवते.

रागसंगीताशिवाय विचार करताना देशकाराची आठवण करून देणारी दोन नाट्यपदं पटकन माझ्या मनात आली, जी आपण सर्वांनीच निश्चितच बऱ्याचदा ऐकली असणार… संगीत मंदारमाला नाटकातील ‘जयोस्तुते हे उषादेवते’ आणि संगीत सौभद्र मधील ‘प्रिये पहा’! पं. जितेंद्र अभिषेकींची ‘माझे जीवन गाणे’ ही अप्रतिम रचनाही आठवली.  मात्र आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि अशा एकसारखे स्वर वापरले गेलेल्या रागांमधे उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतातील नेमकी एखादी रचना सांगणे कठीण असते. वरती पटकन आठवलेल्या रचना ह्या सुरवातीलाच ‘ध’चा उठाव घेऊन आलेल्या म्हणून `देशकार’चा ‘फील’ देणाऱ्या म्हणता येतील. पण प्रत्येकवेळी रागानुसार स्वरांच्या वापराचं कमी-जास्त प्रमाण नेमकेपणी सांभाळणं सुगम संगीतात घडेलच असं नाही, ती त्या गानप्रकाराची आवश्यकताही नाही आणि तिथं स्वरांचे ठहराव, अल्प-बहुप्रमाणत्व सांभाळण्याएवढं अवकाश (स्पेस) मिळणंही शक्य नसतं. क्वचितच ठराविक रागांबरहुकूम बांधल्या गेलेल्या अशा उपशास्त्रीय किंवा सुगम रचना आढळतील.

एक जरूर सांगावंसं वाटतं, भूप आणि देशकार एका पाठोपाठ एक ऐकून पाहिले (कोणत्याही एकाच कलाकाराचे दोन्ही राग ऐकले तर कळायला आणखी उत्तम!) तर दोन्हीवेळी काही वेगळी जाणीव होते का, हे जिज्ञासू श्रोत्यांना समजू शकेल. एकाग्रतेने ऐकताना तशी काही वेगळी अनुभूती आली तर मलाही जरूर कळवावे, जाणून घ्यायला नक्की आवडेल व आनंदही वाटेल!

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन विशेष – ‘को-जागर्ति’ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे 

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन विशेष – ‘को-जागर्ति’ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

नुकतीच आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. एक आख्यायिका सांगतात की, या दिवशी रात्री लक्ष्मीदेवी ‘को-जागर्ती ‘ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’ असे विचारते. या दिवशी देवीचा कृपाशीर्वाद मिळतो. समृद्धी येते असे म्हणतात.

हेच कॅन्सरच्या आजाराच्या बाबतीतही म्हणता येईल. को-जागर्ती असे विचारणारी देवी जो “जागृत “आहे त्याला निश्चित प्रसन्न होते आणि त्याला आरोग्य धन मिळते. आरोग्यम् धनसंपदा ! हे तर आपल्याला ठाऊकच आहे.

आज ७ नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन (National Cancer Awareness Day ) आहे.  या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली आहे.

आज-काल प्रगत तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक आजारांवर सुलभ आणि प्रभावी उपचार करता येऊ लागलेले आहेत. कॅन्सरसारख्या आजाराचा विचार केला की,एक काळ असा होता की ‘कॅन्सर म्हणजे मृत्यू ‘ असेच जणू समीकरण झालेले होते.

पण आज प्रगत, प्रभावी उपचारांनी क्रांती घडविलेली आहे. कॅन्सर रोग पूर्णपणे बरा होणे आजकाल शक्य झाले आहे.  यामध्ये हा आजार सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षात येणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. या आजारावर प्रतिबंधात्मक औषधोपचार नाहीत.  पण,

Early detection is prevention .

असं नक्की म्हणता येईल. म्हणून प्रतिबंधात्मक चाचण्या (प्रिव्हेंटिव्ह चेकअप )खूप महत्वाच्या ठरतात.

महिलांमध्ये कॅन्सर बाबत जागृतीचे काम करताना बऱ्याच वेळा या दुखण्याबद्दलची भीती,तपासणी टाळण्याची वृत्ती, स्वतःच्या स्वास्थ्या बाबतची उदासीनता यांचा अनुभव येतो. हे औदासिन्य,भीती किती ? तर या आजाराची माहिती देणार्‍या व्याख्यानाला येण्याची सुद्धा अनेकांची तयारी नसते .

घरातल्या गृहिणी घरातील इतर सदस्यांच्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारींची लगेच काळजी घेऊन उपचार करून घेतात. पण स्वतः मात्र बारीकसारीक तक्रारी अंगावरच काढतात आणि आजार वाढला की दवाखाना गाठतात. पण काही आजारांच्या बाबतीत बराच उशीर झालेला असू शकतो. शिवाय लाज,संकोच हे जन्मजात स्वभावधर्म साथीला असतातच.

यामुळे कॅन्सर प्रतिबंधात्मक चाचण्यांसाठी सहजासहजी तयार होणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी असते. पण वेळेवर सावध होऊन तपासणीला गेलेल्या,आजाराचे अगदी प्राथमिक स्थितीत निदान झाल्याने पूर्ण बऱ्या झालेल्या मैत्रिणी पाहिल्या की खूप समाधान मिळते. पण समजून-उमजून तिकडे दुर्लक्ष करणाऱ्या मैत्रिणी पाहिल्या की वाईट वाटते. हे म्हणजे तोंडावर पांघरूण घेऊन ‘मी झोपलोय’असं म्हणण्यासारखं झालं.

अहो, भाजीची एक जुडी घ्यायची तर आपण ५-६ जुड्या खालीवर करून बघतो. मग आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण किती जागरूक असायला हवे हे लक्षात येतंय ना ? आयुष्यातील प्रत्येक बाबतीत आपण चोखंदळ असतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगलीच हवी असते. आपल्याला अनमोल असे शरीर लाभलेले आहे. मग त्याचे स्वास्थ्य शेवटपर्यंत चांगलेच राहायला हवे ना ! त्यासाठी कोणतेही आजारपण,दुखणे झाले तरी ते वेळेवर लक्षात येऊन त्यावर लगेच उपचार झाले पाहिजेत हे पाहणे हे आपलेच काम आहे.

त्यासाठी दरवर्षी आरोग्यविषयक सर्व तपासण्या करायला हव्यात.  विशेषत: पॅप स्मिअर,मॅमोग्राफी,काही पॅथॉलॉजी तपासण्या करून घेणे खूप आवश्यक आहे. यातून संभाव्य धोक्याची पूर्वसूचनाही वेळेवरच कळू शकते. त्यावरील उपचारांनी आजाराला वेळेवरच रोखता येते. यातून एक लक्षात येते की आज-काल कॅन्सर हा दुर्धर आजार राहिलेला नाही. त्यावर चांगले प्रगत उपचार उपलब्ध झालेले आहेत. प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणूनच सर्वांनी जागरूकपणे नियमित कालावधीनी तपासण्या करून घ्यायला हव्यात.

एकूणच कॅन्सर बाबत जागरूक कसे रहावे याबद्दल समजून घेतल्यावर प्रतिबंधात्मक चाचण्यांची उपयुक्तता आणि गरज,सकारात्मक विचारधारा,जीवनातील डोळस वाटचाल यांचे महत्त्व लक्षात आले असेलच. त्यासाठी आपल्या शरीरातील लहान-सहान बदल सुद्धा वेळेवर लक्षात घेतले पाहिजेत.  त्यांची नीट काळजी घ्यायला पाहिजे. घरातल्या अनुवंशिक आजारांची,जवळच्या नातलगांच्या मोठ्या आजारपणाची नोंद ठेवायला हवी. एकूणच नेहमी जागरूक राहायला हवे. कारण शेवटी आपले आरोग्य हे आपल्याच हाती असते. यासाठीच हे कळकळीचे आवाहन—–

 

इकडे जरा द्या तुम्ही ध्यान

कॅन्सर जरी रोग महान

वेळेवर करता त्याचे निदान

मनुजा मिळते जीवनदान !!

 

उत्तम आरोग्याचा आदर्शमंत्र

रोगा आधीच त्यासाठीची तपासणी

आपण सारे मिळून करू या आरोग्य मंत्राची अंमलबजावणी !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेवटची पंगत ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ शेवटची पंगत ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

एकत्र कुटुंबांमधल्या कर्त्या बायकांची पंगत म्हणजे शेवटची पंगत.  हिंगणघाटला माझ्या आजोळी आणि विजापूरला परमपूज्य अण्णांच्या घरची… अशा दोन्ही घरच्या शेवटच्या पंक्ती माझ्या सवयीच्या आणि त्या पंक्तींमधले जेवण तर अतिविशेष आवडीचे.

माझ्या लहानपणी आजोळी खूप माणसे असायची.  त्यामुळे पहिली पंगत मुले आणि बाहेर कामासाठी जाणा-या पुरुषांची,  नंतरची लेकुरवाळ्या मुली आणि सुनांची.. आणि सर्वात शेवटी स्वैपाक करणा-या बायकांची म्हणजे आजी, मामी वगैरे लोकांची.  कधी कधी तर या पंक्तीला इतका उशीर होई की पहिल्या पंक्तीत जेवूनही शाळेला सुट्टी असलेली पोरे परत त्या शेवटच्या पंक्तीत परत जेवायला बसत. सणासुदीला तर असे हमखास होई.

या पंक्तीत अनेकदा भाज्यांनी आणि भाताने तळ घातलेला असे.  कधी पोळ्याही पुरेशा नसत. माझी सदा हसतमुख आजी म्हणे… चांगला झाला असणार स्वैपाक…  म्हणून सर्व भरपेट जेवले!  असे म्हणत ती विझू घातलेल्या निखा-यावर तवा ठेवून  पटकन होणा-या भाज्या किंवा पिठलं करी,  त्यात तेल,  तिखट आणि मसाले सढळ हाताने पडे शिवाय त्या शेतातून नुकत्याच आलेल्या त्या ताज्या रसदार भाज्या अर्धवट शिजल्या तरी खूप चवदार लागत.  उरलेल्या वरणावर थोडे तेल,  मीठ,  तिखट आणि मसाला घालूनही एखादे कालवण होई.

पोळ्याच्या परातीत उरलेल्या पीठात थोडे ज्वारीचे पीठ घालून त्यात मिरच्या कोथिंबीर घालून चुरचुरीत खमंग धिरडे करत.  त्याचा वास थेट झोपलेल्या आजोबांच्या नाकात जाई आणि तेही उठून स्वैपाकघरात येत. एकदा जेवल्यावर ते काही पुन्हा जेवत नसत पण मग तिथेच एका पाटावर बसून काहीबाही मजेच्या गोष्टी सांगून सर्वांना हसवत.   आजी ठेवणीतली लोणची काढी.  भाताच्या खरपूडी लोणच्याबरोबर कालवताना पाहून आजोबा हमखास सूर्याच्या थाळीची गोष्ट रंगवून रंगवून सांगत.

त्या पंक्तीत जेवणा-या बायकांसाठी सुबक विडे लावून देत.

दुस-या दिवशी स्वैपाकाच्या अगोदर आजीला बोलावून…थोडे तांदूळ,  डाळ,  कणिक आणि भाज्या जास्तीच्या घ्यायला आवर्जून सांगत.

विजापूरच्या त्या श्रीमंत घरातही मोठ्या बायकांची शेवटची पंगत असे. या पंक्तीला आक्का,  वहिनी,  वाढणा-या मुली,  स्वैपाकाच्या काकू आणि सगळ्या कामाच्या बायका एकत्र बसत. त्या घरी फारसे काही संपलेले नसे पण अन्न गार झालेले असायचे.  कोशिंबिरींनी माना टाकलेल्या असत  तरी मालकीणींपासून ते नोकरवर्गापर्यन्तच्या बायका समाधानाने जेवत.  त्यांच्याकडे या पंक्तीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे फ्लाॅवरच्या पानांची चटणी,  ती पण फ्लाॅवरची भाजी केली असली तरच होई. फ्लाॅवरची पाने चिरताना बाजूला काढून ठेवलेली असत. ती बारीक चिरून त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट आणि किंचित मीठ घालत.  त्यावर लिंबू पिळून तांबड्या मिरच्यांची फोडणी देत. सगळ्या बायकांचा तो अगदी आवडता पदार्थ होता.

आज मी एकटीच जेवत होते अचानक या दोन्ही ठिकाणच्या शेवटच्या पंक्ती आठवल्या आणि गलबलल्यासारखे झाले.

अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवले वाटले, अन्नपूर्णेच्या हातातल्या त्या ओगराळ्याची दिशा कायम दुस-यांच्या पोटात ताजे घास पडावेत म्हणून… तिच्याकडे ते कधीच का नाही पहिल्यांदा वळत?  सर्वाना गरमागरम खायला घालून स्वतः मात्र  गारढोण अन्न गिळताना… वरवर समाधानाचा आव आणला तरी घशात किती आवंढे दाटत असतील!  भाजी संपली म्हणून लोणच्याबरोबर भात कालवताना…माझ्या वैद्यकी जाणणा-या आजीला स्वतःच्या तब्बेतीची हेळसांड केल्याबद्दल किती वेदना होत असतील…!

अर्थात हे सर्व विचार आत्ता मनात आलेत.  पण हिंगणघाटला असताना त्यांच्या त्या लोणचे भात आणि धिरड्यात वाटा मागताना यातले काही सुध्दा वाटत नसे.

आता विभक्त कुटुंबात सगळे एकत्र जेवत असले तरी शेवटचे.. उरले सुरले संपविण्याचा मक्ता त्या घरातल्या बाईकडेच!  त्यामुळे सर्वांनी हात धुतले तरी ही आपली अजून डायनिंग टेबलावरच बसलेली असते. एकत्र कुटुंबात निदान त्या पंक्तीला इतर बायका तरी असत…आताची शेवटची पंगत तशी सर्वार्थाने तिची एकटीचीच…!

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ !! मनातलं कागदावर !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ !! मनातलं कागदावर !! सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

दवांत भिजूनी बहरली

पाने फुले

लागली डोलू लागली हसू

लागली झंकारू

गीत नवे उषेचे..!!

वा..वा..पांघरुणात शिरूर जोजविणारी पहाट…घरासमोरच्या वाटांनी धुक्याची शाल पांघरलीय. ..कोपर्‍यातला सोनचाफा तोही पहाटेच्या थंडीने गारठून गेलाय. फांदयांच्या कुशीतला कळया हळूहळू डोळे टक्क उघडून सभोवार पाहू लागल्यात…हातातलं पेन वहीच्या कागदावर टेकवत मी तोंडासमोर हात धरला आणि वाफांचा एक ढग तोंडातून बाहेर पडला..तेवढ्यात आईने आवाज दिला. ..”अगं, संगीता आत ये,  बाहेर बघं किती गारवा आहे. .!! ” हो, गं आई” मी बसलेल्या खुर्चीतूनच मागे न पाहता बोलली. ..

आधी तू आत ये नाहीतर तुला थंडीनं सर्दी खोकला व्हायचा. आईची ही प्रेमळ सुचना मानून मी वही व पेनाच्या लवाजम्यासहीत  आत आले.आई ” काय मस्त वाटतय ग बाहेर ” बसल्या बसल्या मला कविता पण सुचली. .हो का? ‘बरं बाई ‘, हसून आईने उत्तर दिले. .

मी कवितेचा कागद दप्तरात भरला माझ्या बालमित्राला आकाशला दाखविण्यासाठी. ..आकाशचं घर आमच्या पासून पाच ते दहा मिनीटांच्या अंतरावर. ..आम्ही एकाच शाळेत एकाच वर्गात अगदी शिशू वर्गापासूनच. .एकमेकांच्या खोड्या काढतच आम्ही शाळेत जायचो. .माझा आवडता विषय मराठी. .त्यात कविता, कथा, लघुकथा खूपच आवडायच्या. ..सहावीत वगैरे असेन. .शर्यतीत हरलेल्या सश्यावरची कविता मला आवडली होती. तेव्हापासूनच माझी कवितेशी गट्टी जमली….

“आई गं सांग ना गवतफूल  कसं असत? ” आई, गं सांग ना..!!” माझ्या हाताला धरून माझी छोटीशी लेक अजया मला विचारीत होती. .या प्रश्नाने मी भानावर आले. .मघापासून ती विचारीत होती कवितेविषयी. ..तिच्या पुस्तकात इंदिरा संतांची  “गवतफुला ” ही कविता होती. तिची छोटी छोटी बोटं कवितेच्या शब्दांवर नाचत होती. ..

अजया माझी छोटीशी गोंडस गोड मुलगी. तिला नव्या शब्दांविषयी, वस्तूंविषयी खूप शंका असतात. आणि तिच्या या शंकांचे निरसन करण्यात मला खूप आनंद होतो. तिला तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यावर तिचे निरागस हास्य माझ्या मनाला खूपच सुखावते तसेच तिच्या सतत चालणार्‍या चिवचिवाटाने घर आनंदाने भरून जाते. .नंतर नक्की सांग हं आई,  असं सांगून ती खेळायला निघून गेली.

माझे मन भूतकाळाच्या खिडकीपाशी घुटमळू लागले. .आणि आकाशने भेट दिलेले कुसुमाग्रजांचे

“प्रवासीपक्षी ” हे पुस्तक आठवले. ..

नवी दुनिया बसवताना कविता माझ्या पासून कधीच दूर गेली नाही. जशी माझी कवितेशी गट्टी जमली तशीच अजया चीही कवितेशी गट्टी जमली. ..

कविता. .तिची नाळ माझ्याशी घट्ट जोडली होती. .मंद पावलांनी अजया च्या रूपात माझ्या आयुष्यात आली आणि अंगणात आनंदाचे झाड लावले. ..

आनंदाने हुंदका बाहेर पडला आणि कागदावर शब्द उमटले. ..

दौडत जाई काळ

ठेवूनी मागे

क्षणांचे ठसे. .

पात्र. .कण न कण जसे

भरलेले भासे. .!!

एवढ्यात अजया ने हाक मारली ” आई “… या शब्दाने तंद्रीतून जागी झाली आणि कामाला लागली. ..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

सुख कोणी पाहिले आहे का?

सुख म्हणजे नक्की काय, कोठे मिळते सुख?

सुखाच्या कल्पना आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते.

मला बरेचदा हा प्रश्न पडतो की सुख म्हणजे नक्की काय? कोठे मिळते ? शांत पणे विचार केल्यावर लक्षात आले की सुख तर आपल्याला प्रतेक टप्प्यावर मिळते ते आपण कस स्वीकारतो हे आपल्यावर आहे.

प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे स्वरूप बदलत जाते.काहीना खूप पैसा, अफाट संपती नोकर चाकर, भरपूर दागदागिने ऐशोआराम म्हणजे सुख. तर काही लोकांना आपल्या मनासारखे वागवून घेणे, आपली सत्ता गाजवणे, मी म्हणीन ते आणि तसच ह्यात सुख मिळते.

प्रतेक जण आपापल्या वया अनुसार सुख शोधत असतात.

तान्हं मूल आईच्या कुशीत. तर शाळकरी मुलं आपल्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात.

काहींना प्रत्येक  गोष्ट जींकण्याची नशा असते त्यांना त्यातच सुख मिळते. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. माझ्या मते,

श्रम केल्या नंतर गादी वर पडल्या पडल्या शांत झोप लागणे म्हणजे सुख.

गरम गरम वरण भात खाऊन दिलेली तृप्तीची ढेकर म्हणजे सुख.

रणरणत्या उन्हात अचानक मिळालेली झाडाची सावली म्हणजे सुख.

एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरचे समाधान म्हणजे सुख.

वेदनांचा दाह कमी होण्या साठी कोणी मायेने हात फिरवणे म्हणजे सुख.

आपल्या जोडीदाराने मी आहे, हो पुढे हे ऐकणे म्हणजे सुख.

लेकीने आई तू दमलीस, अस म्हणत गरम पोळी करून वाढणे म्हणजे सुख.

आजी आजोबांनी नातवंडांवर केलेली माया म्हणजे सुख.

बापरे किती गोष्टीतून आपल्याला सुख मिळत असते नाही का??

मग आपण सुख का शोधत फिरतो असाच आलेला मनात एक प्रश्न

 

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

10.08 20202

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बस तुम कभी रुकना मत☆ सुश्री संध्या बेडेकर

☆ मनमंजुषेतून ☆ बस तुम कभी रुकना मत☆ सुश्री संध्या बेडेकर ☆ 

आज आजी उदास आहेत.•••• हे आजोबांच्या लक्षात आल .••काय झालं ग??? आजोबांनी विचारल .•• आजी म्हणाल्या•• अहो, आता थकवा येतो .••आधी सारखं राहिलं नाही.•• आता गडबड ,तडतड सहन होत नाही.•• कुठे जायचं  म्हंटल तर जास्त चालवत नाही. •••अॉटो मधे चढताना त्रास होतो .••• कधी भाजीत  मीठ टाकायला विसरते तर कधी जास्त असत.कशाकरीता हे एवढं आयुष्य देवाने दिल आहे. ••माहित नाही .••

आजोबा म्हणाले,••• देवाचा हिशोब मला माहित नाही.••आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. ••त्याच्या planning मधे  एक क्षणाचाही बदल करणे. आपल्या हातात नाही.•• जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे?? त्याचा विचार करावा.•• अग ,वयानुसार हे सर्व होणारच.••  आधीचे दिवस आठव ना•• किती काम करायची .पूर्ण घर तू खूप छान सांभाळले••. मला कशाची काळजी नव्हतीच कधी .•••  आता  वयामाना  प्रमाणे हे सर्व होणारच  पण त्यातुनच मार्ग काढायचा असतो .•••आलेला दिवस आनंदात काढणे ••आपल्या हातात आहे••. जिवनाच्या प्रत्त्येक फेज मधे थोडे शारिरीक बदल होतातच .•••थोडे आपल्या ला करायचे असतात. ••आपली ‘ lifestyle’reorganize करायची ,••म्हणजे ,आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते •••.कळल का ?

आजोबा पूढे म्हणाले •••• चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ  या  आपण. छान ती नारंगी साडी नीस. •• बाहेरच जेवू ••  .  आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. ••व  जवळच असलेल्या  बसस्टोप वर जाऊन बसले.•• दोघे बराच  वेळ तेथेच  गप्पा मारत बसले . ••आजोबा आजी ना म्हणाले•• अगं, पाय दुखत असतील  तर ,मांडी घालून बस छान ••. . नंतर ,’गणेश भेळ ‘खाऊनच घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला  शोभेसे  outing आज होते दोघांचे .••• आजींची उदासी मात्र कुठे पळाली?? हे त्यांना कळलेच नाही .•• अगदी ‘refresh’ झाल्या . ••आज आजोबांनी आजीसाहेब  साठी  on line  ‘Mobile  stand ‘ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .•••

आज कुलकर्णी आजींनी तर आजोबांना सकाळीच  सांगुन  टाकलं ,की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही .••काही तरी चमचमीत खायला  घेऊन या .••• आजोबांनी आनंदाने समोसे ,ढोकळा , खरवस   दोन पूरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली . ••.ते बघून आजी म्हणाल्याच अहो, एवढ आणलत  ?? अग आज आणि उद्या मिळुन संपेल की .•••  आज कुलकर्णी आजीं आजोबांनी पार्टी छान  झाली. ••••

कोणी तरी खरच  खूप छान म्हंटल आहे •••

“खुशियां बहुत सस्ती है इस दुनिया में ,

हम ही ढुंढतें फिरते हैं, उसे महँगी दुकानों में”।”

देशपांडे आजोबा बऱ्याच वेळा पासुन एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ••ते पाहून अजय म्हणाला , द्या आजोबा मी उघडून देतो. •••तेंव्हा आजोबा म्हणाले••• अरे ,नको मी उघडतो. ••आता आम्हाला प्रत्त्येक  कामात वेळ लागतोच . हे natural आहे . ••पण काही हरकत नाही. जो पर्यंत करू शकतो तोपर्यंत काम करायचे  .हे मी ठरवलं आहे .•••  रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी  चिरणे   ,washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे‌, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशी बरीच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला पण मदत होते. व माझा वेळ जातो . Something new and different .I am enjoying it. And I feel good .

तो तुमचा actor आहे ना, अक्षय  कुमार त्याने एका advertisement मधे म्हंटले आहे

“बस ,तुम कभी  रुकना मत”

अक्षय कुमार ने  म्हंटलेले हे वाक्य  .मला  खूप आवडलं.

एक  छोटंसं वाक्य.••  मोजक्या शब्दात ••.

पण किती अर्थपूर्ण .••जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .•••एक छोटासा उपदेश जिवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची  स्फुर्ती  देतो..••  विचारांत परिवर्तन  आणत. ••••

तो म्हणतो •••••• कधी थांबू नका,•• चालत रहा. •••• म्हणजेच  ‘active’ रहा.  ‘मनाने आणि शरीराने .’

वाहत पाणी बघताना,  एक वेगळीच उर्जा  निर्माण होते .’ धारा ‘ म्हणजे पूढे पूढे जाणारी, वाहणारी .•••• तेच  जमलेल  पाणी म्हणजे अनेक रोगांचा ऊदगम. ••म्हणून    पाण्याला जमू देत नाही आपण.•••  जमलेल्या पाण्यात मच्छर कीडे पडतात•• .पाण्याला  वास येतो डेंग्यू पसरतो.•••

आयुष्याचे पण तसेच आहे. •••शक्य तेवढ active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते •••.जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल  , ते करत रहाणे गरजेचे आहे. •••••

” चलती का नाम ही तो  जिंदगी है “।

आपल्या पीढीने तरूणपणी  एकमेकांचे हात हातात  घेतले नाही  /नसतील  .•••पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजी ने ,विश्वासाने , हातात घेणे  ही काळाची गरज आहे . ••••

“कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हे•••!

इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता  है  •••!

बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है”•••!!!

“ना  थके  कभी  पैर

ना कभी हिम्मत हारी है ।

जज्बा  है परिवर्तन का जिंदगी में ,

इसलिये सफर जारी  है ।

“प्रत्त्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा .”

“बस , तुम कभी  रुकना मत “।

 

(सहजच मनातल शब्दांत )

© सुश्री संध्या बेडेकर

भ्रमणध्वनी:- 7507340231

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर☆ 

\गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात “मौजमजेसाठी युवाईकडून ‛वाट्टेल ते’ …”ही बातमी आली होती.  काही अल्पवयीन मुले डुप्लिकेट चावी वापरुन एका व्यक्तीची रेल्वेस्टेशनवर दिवसभर पार्किंग केलेली गाडी फिरवायचे व संध्याकाळी पुन्हा जागेवर नेऊन ठेवायचे. शिवाय हल्ली काही तरुणांमध्ये अशा डुप्लिकेट चाव्या वापरुन गाड्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे असेही त्यात  म्हटले होते. परंतु या बातमीतच चौकटीमध्ये मांडलेला विचार मला जास्त महत्वाचा वाटला . “अशी कृत्ये करणाऱ्या मुलांच्या  पालकांवर आधी गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा या मुलांना अल्पवयीन असूनही योग्य ती शिक्षा झाली झाली पाहिजे.”

मुळात मुलांना योग्य वयात आल्याशिवाय हातात गाडी देणे ही चूक आहे हेच  पालकांना पटत नाही. आज अनेकदा बऱ्याच पालकांना आपली मुले “लहान वयात उत्तम गाडी चालवतात” ही आत्मप्रौढी मिरवण्यात धन्यता वाटते. वास्तविक ज्यावेळी 18 वर्षे ही स्वयंचलित गाडी चालवण्याचे वय ठरवले आहे त्यामागे काहीतरी शास्त्रीय  अभ्यास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. समजा तुमच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला हातात पैसे देऊन संपूर्ण घरखर्च चालवायची जबाबदारी दिली तर ते योग्य होईल का ?  तीच गोष्ट गाडी चालवण्याच्या बाबतीत आहे. कदाचित या मुलांची शारीरिक क्षमता परिपूर्ण असेल , पण मानसिक क्षमतेचे काय? सिनेमात बघून ‛धूम’ स्टाईल गाडी चालवणे इतकाच मर्यादित अर्थ वाहन चालवण्याच्या बाबतीत त्यांच्या दृष्टीने असतो. त्याच्या परिणामांची पर्वा या वयात त्यांना नसते.

अगदी दोन दिवसांपूर्वीच माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग घडला. रहदारीच्या रस्त्यावरुन एक स्कुटर सरळ जात होती. त्याच वेळी एका 15 ते 16 वर्षाच्या मुलाने एका दुकानासमोर पार्क केलेली आपली स्कुटर काढली. त्याच्या कानाला हेडफोन होते व तो गाणी ऐकत होता. त्या नादात समोरुन येणारी गाडी त्याला दिसली नाही व दोन्ही गाड्या एकमेकींवर आपटल्या. सुदैवाने दोन्ही गाड्यांचा वेग जास्त नसल्याने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. पण असे काही घडले असते तर ? हा त्या वयातील मानसिकतेचा, अपरिपक्वतेचा परिणाम नाही काय?

एकंदरीतच पालक म्हणून सर्वच गोष्टींमध्ये आपले मूल प्रवीण असावे अशी आपली धारणा झाली आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपोटी आपण शिक्षण, क्रीडा, कला किंबहुना सर्वच क्षेत्रात आपल्या मुलांना घुसमटून टाकत आहोत का? किंवा अकाली त्यांच्या हातात स्वयंचलित वाहने, अँड्रॉइड फोन, लॅपटॉप यासारखी उपकरणे देत आहोत का? हल्ली एखादे पाच- सहा महिन्यांचे मूल सुद्धा मोबाईल हातात घेण्यासाठी हट्ट करते.त्याने नीट खावे म्हणून मोबाईल दाखवला जातो. त्यामुळे काहीही भरवताना तो मोबाईलशिवाय तोंडात घास घेत नाही. ही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. वास्तविक सुरवातीला आपणच ही सवय लावल्यामुळे हे होत असते. त्यामुळे जे साध्य व्हावे असे आपल्याला वाटते त्याऐवजी  बूमरँगसारखी ती आपल्यावरच उलटत आहेत. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अर्थ ही उपकरणे मुलांनी वापरु नये असा नसून ती क्षमता त्यांच्यात निर्माण झाल्यावर जर ती त्यांना दिली तर  ते हाताळण्याची प्रगल्भता त्यांच्यात येईल.

अर्थात काहीजण असेही समर्थन करतील की आमची मुले लहानपणापासून या गोष्टी हाताळत आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण नियमाला अपवाद असतोच. झी टीव्हीच्या संगीत कार्यक्रमात एखादा आठ वर्षाचा चिमुरडा इतके अप्रतिम गाऊन जातो की दिग्गज कलाकारसुद्धा तोंडात बोटे घालतात. पण म्हणून सर्वच आठ वर्षांची मुले इतके अप्रतिम गाऊ शकतील असे नाही. कारण ती क्षमताच त्यांच्यात नाही. एवढेच सत्य जरी लक्षात घेतले तरी आज ज्या अनेक समस्यांना पालक म्हणून आपल्याला तोंड द्यावे लागत आहे त्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतील.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत – 2 – राग~काफी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

परिचयः

गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य.

शिक्षणः एम्.ए. एलफिन्स्टन काॅलेज, मुंबई युनिव्हर्सिटी.

संगीत विशारद~ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

गद्य/पद्य लेखनाची आवड!

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  2 – राग~काफी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील लेखांत यमन रागाविषयी लिहिल्यानंतर आज काफी रागाचा परिचय करावा असे मनांत आहे.

कल्पद्रुमांकूर या पुस्तकांत चार ओळीत काफी रागाचे वर्णन आहे.

“काफी रागो भुवनविदितः कोमलाभ्यां गनिभ्यां।

मन्यैस्तीव्रैः परममधुरः पंचमो वादीरूपः।।

संवादी स्यात् स इह कतिचिद्वादिनं गं वदंति।

सांद्रस्निग्धं सरसितिर्भिर्गीयतेsसौ निशायाम।।

अर्थात सर्वांना माहीत असलेला हा राग अतिशय मधूर आहे. गंधार व निषाद कोमल आहेत. वादी पंचम,संवादी षड् गायन समय मध्यरात्र जाति संपूर्ण

आरोहः सा रे ग(कोमल)म प ध नि(कोमल) सां

अवरोहः सां नि(कोमल) ध प म ग(कोमल) रे सा

सर्व रागांना सामावून घेणार्‍या विशाल र्‍hridayii

थाटांतील हा जनक राग! ” अतहि सुहावन लागत निसदिन” असे या रागिणीचे पारंपारिक लक्षणगीतांतून वर्णन केले आहे.एक अत्यंत श्रुतिमधूर रागिणी म्हणून ती रसिकांच्या पसंतीस उतरली आहे कोमल गंधार व निषाद आणि शेष स्वर शुद्ध असलेली ही रागिणी थाटांतील स्वरांचे पालन करते,परंतु कंठाच्या सोयीसाठी याच्या उत्तरार्धात म प ध नि सां असा कोमल निषाद लावणे कठीण जाते म्हणून शुद्ध निषाद लावण्याची मुभा आहे, तसेच पुर्वार्धात क्वचित शुद्ध गंधार घेण्यास परवानगी आहे.मधुनच असा प्रयोग कलात्मकही वाटतो.मात्र वारंवार हा प्रयोग अमान्य आहे,त्यामुळे रागाच्या शुद्धतेला बाधा येईल व रसहानीही होईल.

रागाचे स्वरूप सा सा रे रे ग ग(कोमल) म म प——, रेप मप धप, धनि(कोमल) धप रेप मप मग(कोमल) रेसा अशा स्वर समूहाने स्पष्ट होते.

ख्याल गायनासाठी हा राग प्रचलित नाही.ठुमरी,दादरा,टप्पा,होरी वगैरे उपशास्रीय गायन प्रकारांत हा प्रामुख्याने वावरतांना दिसतो.याचे कारण ह्या रागाचे अंग श्रृंगार रसपरिपोषक आहे. मध्य लयीत बांधलेल्या पारंपारिक बंदिशी पाहिल्या असता असे दिसून येते की त्या राधा कृष्ण, रास लीला, कृष्णाचे गोपींना छेडणे याचेच वर्णन करणार्‍या आहेत.जसे “काहे छेडो मोहे हो शाम” किंवा “जिन डारो रंग मानो गिरिधारी मोरी बात”, “छांडो छांडो छैला मोरी बैंया दुखत मोरी नरम कल्हाई वगैरे.

ठुमरी दादरा प्रकारातही “बतिया काहे को बनाई नटखट कुवर कन्हाई” “मोहे मत मारो शाम भरके रंग तुम पिचकारी” अशीच काव्यरचना असते.

काफी रागावर आधारीत “एक लडकीको देखा तो ऐसा लगा”~1942 लव्ह स्टोरी

“हर घडी बदल रही है धूप जिन्दगी”~कल हो ना हो ही चित्रपटांतील गाणी सर्व श्रुत आहेत.

याठिकाणी असे सांगावेसे वाटते की कलावंताला या शास्राचे नुसते संपूर्ण ज्ञान असणे पुरेसे नाही.कलाविष्कार करतांना योग्य ती रसोत्पत्ती झाली तरच रसिकांचे मन जिंकतां येते.नाट्यशास्रानुसार रागाच्या अभिव्यक्तीचा विचार होणे अत्यावश्यक आहे. नाट्यांतील प्रसंग दृष्य स्वरूपाचे असतात.त्याचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी नेपथ्य, पात्र,वाच्य या गोष्टींची योजना केली असते. साहित्यांत दृष्याचे वर्णन असते. स्वरभाषेत या तत्वांची फक्त जाणीव असते.स्वरभाषेतून श्रोते,रसिकजन आंतरिकरित्या योग्य तो परिणाम अनुभवत असतात. कलाकाराने रागाचे सादरीकरण करतांना त्या त्या रागांच्या भावाला अपेक्षित अनुकूल सांगितिक वातावरण निर्मिती केली नाही तर मैफीलीत रंग भरणार नाही. जो कलावंत रागभावाच्या पूर्ण स्वरूपाची जाण श्रोत्यांच्या मनांत संक्रमित करतो तोच खरा यशस्वी कलाकार!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

आरसा ज्याला दर्पण ‘असेही म्हणतात, तो आरसा सर्वांचाच एक आपुलकीचा-जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘

सांग दर्पणा दिसे मी कशी? असं गुणगुणत दर्पणात पाहणार्या या फक्त युवतीच असतात असं नाही बरं का!

तर अगदी दुडुदुडु चालायला शिकलेली बालके, जगातील अनेक किंवा अगदी सर्व ठिकाणच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी अर्थातच आबालवृद्धांसाठी आरसा ही एक आवश्यक बाब ठरते.

तयार होऊन शाळेला जाण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी आपली केशभूषा, पआपली वेशभूषा ठीकठाक आहे कि नाही हे आरसाच सांगतो. कांही शाळात अगदी दर्शनी भागात आरसा टांगलेला असतो कारण विद्यार्थ्यांने गणवेश, केस वर्गात प्रवेश करण्यापूर्वी व्यवस्थित आहेत कि नाहीत हे पाहिल्यानंतरच पुढे व्हावे,नसेल तर व्यवस्थित हो असे आरसा सांगतो. सण-समारंभ,लग्नकार्य अशावेळी तरी  या आरशाची खूपच मदत होते.

पण मित्र हो,आपले बाह्यांग,आपले बाह्यव्यक्तिमत्व जसे आरशात पाहून कळते तसा आणखीहीएक आरसा आपल्या जवळ सतत असतो . तो आरसा म्हणजे मनाचा आरसा. ज्या मनाचा तळ लागत नाही असे म्हणतात त्या मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण चेहरारुपी आरशाद्वारे प्रगट होते. मनातील आनंदी,दुःखी, प्रसन्न, काळजीपूर्ण, रागीट, भयभीत असे सर्व भाव चेहरारुपी आरसा स्पष्ट करतो. म्हणूनच म्हंटले जाते.

चित्तं प्रसन्नं भुवनं प्रसन्नं

चित्तं विषण्णं भुवनं विषण्णं।

आपलं आपल्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपण व्यक्तिगत भावना लपवून बाहेर ील व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो. पण याउलट काही वेळा मनाचा आरसा जर चेहर्यावर प्रगट झाला तर त्याचा फायदाही होतो. म्हणजे चेहर्यावर दुःख दिसल्यानंतर जवळच्या व्यक्तीने आपली विचारपूस केली तर दुःख निम्मे  हलके होते.

ब्युटीपार्लर, केशकर्तनालय या ठिकाणी तरी आरसा पाहिजेच. याखेरीज सपाट आरसे आणि गोलीय आरसे प्रकाशाच्या अभ्यासात ,प्रतिमा मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. गोलीय आरशांचा उपयोग काही ठिकाणी प्रदर्शनात अशा प्रकारे केला जातो कि आपली छबी कधी जाड व बुटकी दाखविली जाते तर कधी उभट व लांब दिसते. त्यामुळे आपली करमणुक होते.

म्हणूनच आरसा हा आपला एक जवळचा मित्र आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही.  उभा,आडवा,चौकोनी, गोल,षटकोनी असे सर्व प्रकारचे आरसे आपण पाहतो. पर्समध्ये किंवा अगदी पावडरच्या डबीत मावणार्या छोट्या आरशापासून मोठ्यात मोठे,प्रचंड आरसे असतात. मोठे आरसे आपण राजवाड्यात, आरसेमहालात किंवा वस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.

गावाकडील आमच्या जुन्या घरात मी भिंतीत बसविलेले आरसे पाहिले। आहेत. चित्रपट स्रुष्टीतही आरशांचा उपयोग अगदी लाजवाब पणे केलेला दिसतो. चला तर, आपणही आरसा बाळगुया नि व्यवस्थित, नीटनेटके राहू या.

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. 9552448461

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print