मराठी साहित्य – विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

 ☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-1☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

नमस्कार.

ओळखलं का मला? इंग्रजांना ज्यांनी ठणकावून सांगितलं,” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”

त्या सूर्यपुत्राची मी पत्नी. सत्यभामा .

आमच्या काळामध्ये पतीला आम्ही इकडची स्वारी असेच म्हणत होतो. इ.स. १८७१च्या वैशाख महिन्यात लग्न होऊन मी टिळकांच्या घरी आले. त्यावेळी ३कडची स्वारी होती पंधरा वर्षाचीआणि मी तर त्याहूनही लहान. गंगाधर पंतांच्या पत्नी, म्हणजे बाळ टिळकांची आई म्हणजेच माझ्या सासुबाई जाऊन पाच वर्षे झाली होती. त्यामुळे दापोली तालुक्यातून मी टिळकांच्या घरी लग्न करून आले आणि सत्यभामा झाले.

माझ्या माहेरची एक आठवणीतली गोष्ट सांगते.आमचं घर पैशाने खूप श्रीमंत नसलं तरी मनाची खूप श्रीमंती होती. एके दिवशी सकाळी दारावर एक भिक्षेकरी आला. कणगी तुन ओंजळभर तांदूळ घेऊन मी ते भिक्षेकऱ्याला घातले. त्याने तांदूळ घालताना खणकन आवाज ऐकला. म्हणून त्यांनी हात घालून पाहिले तो सोन्याची बांगडी. त्याने ती बाहेर काढली आणि म्हणाला, “अहो, ही सोन्याची बांगडी चुकून भिक्षेत पडली पहा. हे घ्या. नीट ठेवा.” ही गडबड एकू न माझे वडील आले आणि म्हणाले, “जे एकदा दिले ते परत घेण्याची आमची, आमच्या घराण्याची रीत नाही. तू ती घेऊन जा आणि सुखाने तिचा काय वाटेल तो उपयोग कर.”

तिकडे टिळकांकडे ही राहणी साधी होती. मी साधं लुगडं आणि साध्या कापडाचे झंपर वापरी. मी काही शिकले-सवरले नव्हते बरं !मला साधी अक्षरओळखही नव्हती.पण इकडची स्वारी खूप हुशार आहे,मोठी मोठी पुस्तके वाचते, एवढे मला माहिती होते. कॉलेज का काय म्हणतात, तिथे जाऊन ते वकील झाले, एवढे माझ्या कानावर आले होते.

आमच्या घरी भरपूर काम असे. उसंत म्हणून मिळायची नाही. तुम्हाला सांगते, मरेपर्यंत क्वचितच घराचा उंबरठा मी ओलांडला असेल. आमच्या घरातलं जेवण ही साध होतं. सकाळ संध्याकाळ होणारा चहा हीच तेवढी श्रीमंती होती.

इकडच्या स्वारीचे स्वतःचं सामान म्हणजे ड्रॉवर असलेलं डेस्क, दोन खुर्च्या आणि पुस्तकाचं कपाट. नाही म्हणायला त्यांची आराम खुर्ची त्यांना खूप प्रिय होती. आलेल्या लोकांशी बोलणं या आराम खुर्चीतच होई. वर्तमान पत्रांचा मजकूर ते स्वतः लिहीत नसत, तर ते या आराम खुर्चीतच लेख नीकाला सांगत. सांगताना मधून मधून सुपारी कातरून खात. फक्त महत्त्वाची पत्र ते स्वतः लिहीत.

आडकी त्यानं सुपारी कातरण्यात ही त्यांचं कौशल्य होत बर का!.. आत्ताच्या पिढीला अडकीता म्हणजे काय हाच प्रश्न पडायचा !

एकदा सुपारी हातात घेतली, की इतक्या सुबकपणे कातरत, ती पूर्ण कातरून झाल्यावर ही अख्ख्या सुपारी प्रमाणे त्यांच्या हातात असे.

आम्हाला दोघांनाही मधुमेहाची व्याधी जडली होती. त्यांना करावा लागणारा प्रवास, दगदग, मानसिक त्रास, तुरुंगवास यामुळे माझे मन सतत चिंतेने ग्रासलेले असे. तुरुंगामध्ये त्यांना करावे लागणारे कष्ट, निकृष्ट दर्जाचे अन्न याबद्दल कोणी माझ्यासमोर बोलत नसत पण मला न सांगता हि ते समजत असे.

टिळक अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी विचारांचे आणि शब्दाला जागणारे होते. इतके की मित्राला दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी कारण नसताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी अपार कष्ट झेलले. किती पैसा, वेळ, दगदग, धावपळ, मानहानी आणि अपमान झाले त्याला काही गणतीच नव्हती.

आमची मुले ही टिळकां प्रमाणेच बुद्धिमान आणि प्रखर विचारांची होती. मुले आपल्या वडिलांबरोबर धिटपणे बोलत. एकदा मुलीने इतर मुलींप्रमाणे झगझगीत कापडाच्या परकराचा हट्ट धरला.मात्र टिळकांनी ठामपणे नकार दिला.एकदा मुलांना त्यांनी संध्या केली का म्हणून विचारले.त्यांचाच मुलगा! त्याने विचारले, “तुम्ही कुठे करता रोज संध्या?”तेव्हा टिळक त्याला म्हणाले,”  मी वेद पठण करतो. त्यामुळे संधेची जरूरी नाही.”.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अहल्या – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ अहल्या – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

(मागील भागातइंद्रासारख्या देवराजाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार? त्यापेक्षा अहल्येला दोषी ठरवणं, अपराधी ठरवणं जास्त सोपं होतं. जास्त सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं असेल. नातं तोडलं असेल. तिच्याबरोबर कुठलाही व्यवहार करणं टाळलं असेल. ती अगदी एकटी, एकाकी पडली असेल, रस्त्यावरच्या शीळेसारखी. ….. इथून पुढे -)

श्रीरामाने अहल्येचा उद्धार केला, याचा अर्थ एका बाजूने अहल्येच्या मनातली अपराधीपणाची भावना दूर केली असेल. संवेदनाशून्य आणि बधीर मनोवस्थेतून बाहेर यायला तिला मदत केली असेल. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला मदत केली असेल. तिच्यात संवेदना, चेतना निर्माण केल्या असतील. त्याचवेळी सामाजिकदृष्ट्या, अहल्या निरपराध आहे, हे ठामपणे सांगून, तिच्या कुटुंबियांनी आणि समाजाने तिचा स्वीकार करावा, असे आवाहन केले असेल.

‘नरेंद्र कोहली’ या हिन्दी लेखकाने रामायणावर आधारलेल्या आपल्या ‘दीक्षा’ या कादंबरीत ‘अहल्योद्धारा’चा हाच सामाजिक आशय उलगडून दाखवलेला आहे. राम हा युवराज. सम्राट दशरथाचा पुत्र. भावी सम्राट. तेव्हा त्याची मान्यता, ही सर्वसामान्य प्रजेच्या दृष्टीने महत्वाची ठरली. अनुकरणीय ठरली. अहल्येला रामाने समाजमान्यता मिळवून दिली. तिचं निर्दोषत्व ग्राह्य धरलं. तिला एक प्रकारे न्याय मिळवून दिला. या अर्थाने रामाने अहल्येचा उद्धार केला.

केव्हा तरी ‘विनय राजाराम’ या हिन्दी कवयित्रीची ‘तुम अहल्या नहीं हो’ ही कविता वाचली आणि ‘अहल्या’ या शब्दाचा एक वेगळाच अर्थ मनाशी उलगडला. इथे ‘अहल्या’ ही सामाजिक नीति-नियमांच्या, कल्पना- धारणांच्या प्रस्ताराखाली दबल्या गेलेल्या स्त्रीची प्रतिनिधी म्हणून यते. या स्त्रीला ना स्वत:चं मन, ना इच्छा-आकांक्षा, ना कल्पना-भावना, ना संवेदना-चेतना. म्हणून कवयित्री म्हणते, ‘समाजाच्या प्रतारणेच्या, फसवणुकीच्या प्रस्तराखाली दबलेल्या हे नारी, तू प्रस्तर ( दगड) नाहीस. तू परमाणू आहेस. (या विश्वाचे सृजन परमाणूपासून झाले, असे मानणारे एक तत्वज्ञान आहे.) त्यादृष्टीने तू विश्वाची जननी आहेस. निर्माती आहेस. ऊठ. जाग. स्वत:ला ओळख. आपल्या स्वत:च्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी तू स्वत:च राम बन.

आपल्या स्वत:च्या विकल परिस्थितीला आपण स्वत:च अनेकदा कारणीभूत असतो, नाही का सख्यांनो? आपल्यातील ऊर्जेची, कार्यशक्तीची आपल्यालाच ओळख नसते. म्हणूनच आपली सखी कवयत्री ‘विनय राजाराम’ आपल्याला सांगते, ‘तू निश्चय कर, तू निश्चल नाही, चल बनशील.

‘अहल्या नहीं, हल्या बनोगी

मन-मस्तिष्क और कर्मशक्तीसे

अनुर्वरा नहीं, उर्वरा बनोगी’

हल म्हणजे नांगर. ‘हल्या’ म्हणजे नांगरण्यायोग्य, अर्थात सुपीक जमीन. ‘अहल्या’ म्हणजे बरड जमीन. ज्या जमिनीत नांगरणी-पेराणी करता येणार नाही अशी जमीन. ज्या जमिनीवर संस्कार करताच येणार नाहीत, ज्याच्यावा पडलेलं बीज, तसंच निष्फळ राहील, अशी अहल्या तू नाहीस. मन-बुद्धी, कर्म- शक्तीच्या योगाने तू ‘अनुर्वरा’ नाही, ‘उर्वरा’ बनशील. म्हणजे सुफलीत, सृजनशील बनशील. चांगल्या विधायक विचारांचं बी तुझ्या मन-बुद्धीत वाढेल. विकासेल. चांगलं कार्य तुझ्या हातून घडेल. नवसृजन होईल. ‘तू अहल्या नाहीस… अहल्या नाहीस…’

सखयांनो, आपल्या आसपास, जवळच्या- दूरच्या परिवारात एखाद दुसरी शिळेतील अहल्या आढळते. तिला दिलासा देणं, तिचा आत्मसन्मान जागृत करणं, तिला क्रियाशील बनवंणं, एवढं तरी आपल्याला करायलाच हवं नाही का?

समाप्त 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत- भाग – 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

समकालीनच नव्हे तर आजच्या स्त्री समोरही माणूस म्हणून स्वतःचे अधिकार खेचून आणण्यासाठी संघर्ष कसा करायचा याचे उत्तम उदाहरण रखमाबाईंनी घालून दिले. आज एकविसाव्या शतकातही स्त्री बद्दलचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. फक्त त्याची तीव्रता कमी झाली आहे. स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी साऱ्या जगभर आहेतच. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही स्त्रियांना त्यांच्या कामाच्या कौशल्यापेक्षा कमी वेतन दिले जाते. शेतमजुरी करणारया स्त्री  पासून उच्चपदस्थ स्त्रियां पर्यंत हीच परिस्थिती आढळते.  स्त्री-पुरुष समानता कागदावरच आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या कठिण काळातील रखमाबाईंचा एकांगी लढा हा निश्चितच प्रेरणादायी, स्फूर्तिदायी आहे. रखमाबाईंनी इतिहास घडविला. समकालीन स्त्रियांमध्ये विद्रोहाची ठिणगी निर्माण झाली. आजही त्यांचा इतिहास स्फूर्तीदायक आहे. त्यांना विनम्र प्रणाम.

समाप्त

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुंज ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

☆ विविधा ☆ झुंज ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

ही कथा आहे एका आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नीची, ज्योती जाधवची. शेजारच्या गावात राहणाऱ्या किसन लवांडेच्या लेकीची. दोन भावांच्या पाठीवर जन्मलेल्या ज्योतीला तिच्या वडिलांनी मुला प्रमाणे वाढविले, दहावीपर्यंत शिक्षण दिले आणि योग्य वेळ येताच शेतकरी कुटुंबातील गणपाशी लग्न लावून दिले. आई वडील, दोन भाऊ असलेल्या एकत्र कुटुंबात ज्योतीने पाऊल ठेवले ठेवले. सुखी संसारात किरकोळ कुरबुरी नंतर शेतीच्या वाटण्या झाल्या. शेतीसाठी सहकारी बँकेकडून कर्ज ‌ काढलं होतं, घराच्या डागडुजीसाठी नात लगा कडून उसने पैसे घेतले होते पण एक वर्षी कोरडा दुष्काळ दुसरे वर्षी अवकाळी पावसाचे थैमान आणि तिसऱ्या वर्षी गारपीट. त्यामुळे लागोपाठ तीन वर्षे हाती पिक आले नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. अशा भयंकर संकटाचा सामना करता करता प्रथम सासऱ्याने आत्महत्या केली आणि दोन महिन्यांनी नवऱ्याने गळफास लावून घेऊन जीवन संपविले. पतीच्या आत्महत्येनंतर ज्योतीच्या पायाखालची जमीन सरकली. उधारी उसनवारीची दारे बंद झाली. काय करावं कसे करावं काहीच सुचेना. ना शेती तंत्राची ची माहिती ना व्यवहाराची कल्पना. तिने बैलगाडी सावकाराकडे गहाण टाकली. त्यावेळी मातेसमान असणारी सासू आणि घरात काम करणारा राम काका तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राम काका म्हणाले “पोरी धीर धर हिंमतीने उभी उभी राहा आणि शेती सांभाळ”. पित्याप्रमाणे असलेल्या राम काकांच्या आज्ञेचे पालन करून ज्योती उभी राहिली. नव्याने जगायचं माणूस ठरवतो तेव्हा पहिलं पाऊल अवघड असतं पण निग्रहानं पाऊल ठेवलं की सर्व जमते. घरातल्या पुरुषांना जे जमले नाही ते करून दाखवायचं अशा निर्धाराने तिनं शेतात पाऊल ठेवलं. सोसायटी कडून मिळालेल्या कर्जाऊ पैशातून सोयाबीनचे बी बियाणे विकत आणले. राम काकांच्या मदतीने शेतात सोयाबीन पेरले. त्यावर्षी पावसाची कृपा झाल्यामुळे पिक चांगले आले. सोयाबीनची मळणी झाल्यावर सोयाबीनची पोती भाड्याच्या बैलगाडीतून गावात घेऊन गेली लोकांनी खूप नाव ठेवली, त्या वेळी प्रचंड मनस्ताप झाला अगदी आत्महत्येचा विचारही मनात तरळून गेला पण आपल्या मुलासाठी आणि सासु साठी ज्योतीने तो विचार दूर सारला. नवऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याचे शेत मिळेल म्हणून भाऊबंदांनी तिला खूप त्रास दिला. घराची कौल फोडली शेतातली काम करायला येणाऱ्या मजुरांना शेतात पाय ठेवण्यास मज्जाव केला पण ज्योतीने ठरवले की शेतातल्या कोणत्याच कामासाठी इतरावर अवलंबून राहायचं नाही व स्वतः सर्व काम करायची. शेतातले तण काढणे, पिकाला पाणी देणे, पिकावर औषध फवारणी करणे ही काम ज्योतीने राम काकांच्या मार्गदर्शनाखाली केली. मुलाला सांभाळायची जबाबदारी सासुने स्वीकारली होती बांधावर लावलेला भाजीपाला बाजारात जाऊन विकण्यातही कमीपणा मानला नाही. सोयाबीनच्या विक्रीतून आलेल्या पैशातून तिनं बैलगाडी सोडवून आणली.दुसऱ्या वर्षी आलेले पीक स्वतःच्या बैलगाडीतून सोसायटीमध्ये विकून आली. शेती विषयक तंत्रज्ञान तिनं आत्मसात केलं अद्ययावत बी बियाणे खते यासंबंधी माहिती मिळवली व आपलं शेत पिकवलं. पण हिम्मत तिला एका रात्रीत आली नाही त्यासाठी तिला झुंजावे लागलं. आपल्या मुलासाठी व वृद्ध सासु साठी तिची दोन-तीन वर्षे झगडण्यात गेली. आज शेती विषयक सल्ला घेण्यासाठी इतर शेतकरी ज्योतीकडे येतात आणि ती सर्वांना सहाय्य करते. अशी शेतकऱ्याची एक असाह्य विधवा आज गावासाठी आधार बनली आहे. स्वतःचं उदाहरण देऊन इतर स्त्रियांना हिम्मत देत आहे आणि विनवत आहे “रडणं सोडा आणि हिमतीने उभ्या रहा…”

 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री: कालची आणि आजची ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ स्त्री: कालची आणि आजची ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच, कशी आहे स्त्री?

‘ स्त्री ही घराची शोभा, स्त्री ही संसाराचे एक चाक, कुटुंबाशी निगडीत असलेली व्यक्ती!’  काही कर्तृत्ववान स्त्रियांचा अपवाद वगळता बहुतेक सर्व स्त्रिया प्राचीन काळापासूनच या पुरुष प्रधान संस्कृती च्या वर्चस्वाखाली राहिल्या होत्या. नंतरच्या काळात ‘चूल आणि मूल’ याच चक्रात स्त्री अडकून पडली. स्त्री शिक्षणाचा अभाव होता.

कुटुंब सांभाळणारी, आल्यागेल्याचे सर्वात करणारी, वेळप्रसंगी एकहाती संसार सांभाळणारी गृहिणी हेच चित्र डोळ्यासमोर उभे केले गेले. संसार रूपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष यांचा उल्लेख होत असला तरी काही वेळा स्त्री ही दोन्ही चाकांचा बोजा स्वत:वर  पेलून संसाराचा गाडा ओढत असते. अशी ही गृहिणी, सहधर्मचारिणी असते.

पूर्वी स्त्रियाना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान खूप असे. पैसा कमी होता पण असणार्या प्रत्येक गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे. ‘शामच्या आई’ मधील आई ही अशीच गरीबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती! त्याकाळी विधवा स्त्रियांना शिक्षण नसेल तर मुलांची, कुटुंबाची जबाबदारी पेलताना खूपच कष्ट घ्यावे लागले अशी उदाहरणे आहेत. माझीच आजी एका मोठ्या, घरंदाज घरातील होती. पती निधनानंतर घर कसे चालवावे हा प्रश्न होता. शिक्षण नव्हते, पण व्यवहारी होती. हातात पैसा नव्हता, मुलांची शिक्षणे व्हायची होती.अशावेळी न डगमगता तिने स्वत:च्या कर्तुत्वाने संसार केला. स्व:यांचे घर होते,हा मोठा आधार होता.

तिने गरजेपुरत्या दोन खोल्या स्वत: कडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंटवर दिल्या. येणार्या भाड्यात घरखर्च भागवू शकली.रोजचे व्यवहार पार पडू लागले. मुलांच्या शिक्षणासाठी व इतर खर्चासाठी दागिने विकून पैसे उभे केले, पण नंतर तेवढेच नाही तर त्याहून अधिक सोने खरेदी केले.ती खूप करारी होती.

अशाप्रकारे स्वत:च्या कर्तुत्वाने संसार सांभाळणार्या १९ व्या शतकातील अनेक स्त्रियांच्या  गोष्टी आपण ऐकल्या!

काळाच्या ओघात स्त्री शिक्षण वाढले.स्त्रीच्या कर्तुत्वाच्या कक्षा रुंदावल्या, स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे केव्हा निसटून गेली हे कळलेच नाही!

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे! अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण या सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत, उच्च पदस्थ  आहेत तरीही संसार सांभाळणार्या आहेत. रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्त्रीच्या स्वयंपाकातील कुशलतेवर अधिक दिसून येत असे. मुलांना स्वत: चांगले चुंगले करून खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी, कोंड्याचा मांडा करणारी स्त्री ही आदर्श होती.

नंतरच्या काळात नोकरी करून स्वत:ची ओढाताण करून मुलांसाठी सुटीच्या दिवशी नवीन पदार्थ खाऊ घालणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच ऑर्डर करून आणलेला पिझ्झा, वडा पाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले किंवा घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली! याचा अर्थ तिचे मुलांवरील, कुटुंबावरील प्रेम कमी झाले असे नाही, पण वेळेअभावी या तडजोडी तिला कराव्या लागल्या. ऑफिसकाम करून पुन्हा घरचे सर्व करणे ही तिच्या साठी तारेवरची कसरत होती!

जरा घरात काही सपोर्ट सिस्टीम होती तिथे थोडा फायदा मिळत होता. स्त्रीच्या कष्टाला शेवटी मर्यादा आहेतच ना!

आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोशाख बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना बदलल्या.

लांबसडक केसांची निगा राखण्यास वेळ मिळेना, त्यामुळे शॉर्टकट् शोधले गेले. आताच्या काळात खर्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा आर्टिफिशियल, आकर्षक मॅचिंगचे दागिने बाजारात उपलब्ध झाले. खर्या दागिन्यांना चोरीचा धोकाही होताच! कामाला जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या बदलत्या वेळा असे असेल तर नटून थटून जाणे आवडतही नाही आणि ते गैरसोयीचे ही वाटते! त्यामुळे गेल्या १५/२० वर्षात स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली आहे. पारंपारीक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला असला तरी स्त्रीची उत्सव प्रियता आणि नटण्याची हौस काही कमी झालेली नाही! ती स्वत:ला सजवून आकर्षक ठेवते. तिची जगण्याची उर्मी तिला प्रेरणा देते. आपण मुंबई च्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या स्त्रियांविषयी ऐकतोच की, त्या लोकलमध्ये च केळवणं, डोहाळजेवणं, वाढदिवस, सण-उत्सव साजरे करतात! स्त्री मुळातच प्रेमळ, उत्साही, संसाराची आवड असणारी असते. तिचे सारे जगणेच उत्सव असते. लहानपणी चूल बोळकी मांडून खेळणारी मुलगी आता कमी दिसत असली तरी तिला सर्वच क्षेत्रांची आवड आहे. ती आता पायपुसण्यासारखी नसून खरंच घराचा उत्कर्ष करणारी आहे याची जाणीव तिला आहे.

आताच्या छोट्या मुलींच्या खेळण्यात बदल झालाय, पूर्वी चूल, बंड, पिंप, पातेली हे खेळणारी मुलगी आता गॅस, मायक्रोवेव्ह, फ्रीज, यासारख्या वस्तू खेळते!

स्त्रीने शैक्षणिक, सामाजिक सर्वच क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटवला आहे. अजूनही खेड्यापाड्यातील स्त्रीला हे सर्वांत प्रथम पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड

आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग वाढला आहे हे निश्चित! नजिकच्या काळात असे मांगल्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्की च!

तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तू आहेस खास… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ तू आहेस खास … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

ओळखलस का मला?  अग तू आणि मी वेगळ्या का आहोत ? तू माझं स्त्रीत्व आणि मी तुझं अस्तित्व. दोघी एकमेकींच्या प्राणसख्या. म्हटलं तर एका नाण्याच्या दोन बाजू, म्हटलं तर दिवा आणि ज्योती,म्हटलं तर जीव आणि आत्मा, म्हटलं तर शरीर आणि सावली, म्हटलं तर बरंच काही. दोघीही एकमेकींशिवाय अपूर्णच.

प्रेम, माया, जिव्हाळा, सहवेदना तळमळ, माणुसकी अशा सगळ्या संवेदनांची तू जणू पुतळीच. आपल्या बरोबरच, किंबहुना आपल्या आधी समोरच्याचा विचार करणारी. कुटुंबातील प्रत्येकाची नस  ओळखून योग्य काळजी घेणारी. शेजार पाजार, नातलग, स्नेही सोबती अशा सर्व समाजघटकांना आपलं मानून त्यांच्यासाठी मदतीला धावणे हा तुझा स्थायीभाव.दुसऱ्यांच्या भल्याची तुला सदैव आस म्हणूनच तू आहेस खास.

कुठल्याही वेदना, त्रास, संकटे, कष्ट, धावपळ, जबाबदाऱ्या, अडीअडचणींना न घाबरता पाय घट्ट रोवून आलेल्या परिस्थितीचा सामना धीराने, संयमाने, आत्मविश्वासाने करण्याचा तुझा स्वभाव. म्हणूनच घरातल्या प्रत्येक नात्याला योग्य न्याय देत, प्रत्येक जबाबदारी तू योग्यपणे मनापासून पार पाडलीस. प्राप्त परिस्थिती कौशल्याने हाताळत संसाराची, आयुष्याची वाटचाल आनंदाची, समाधानाची, उत्तम यशाची केलीस.म्हणूनच तू आहेस खास.

कोणतेच कष्ट, त्रास यांना तू कधी घाबरली नाहीस. प्रत्येक गोष्टीत संघर्ष हा अटळ असतो. अंतिम ध्येयावर लक्ष देत तू प्रत्येक संघर्ष मोठ्या हिकमतीने लढलीस.मुळात ज्या वेदनांचे फळ आनंददायी असते त्या वेदनांचे दुःख कधी करायचे नसते, यावर तुझा ठाम विश्वास आहे. त्यातूनच तू छान विकसित होत गेलीस म्हणूनच तू आहेस खास.

मातृत्वाच्या कळा सोसत तू माय लेकरांच्या सुंदर नात्याला जन्म दिलास. आईपण अगदी भरभरून उपभोगलेस. दोन अतिशय गुणी, कर्तृत्ववान, सुसंस्कारीत आधारस्तंभ आज तुझ्या आधाराला सज्ज आहेत हे केवढे मोठे संचित आहे. कुणालाही हेवा वाटावा असं दान तुझ्या झोळीत आहे. म्हणूनच तू आहेस खास.

देवावर तुझी श्रद्धा आहे. स्वकर्तृत्वावर ठाम विश्वास आहे. माणसांची ओढ आहे. निसर्गाचे वेड आहे.कलेची आवड आहे. आपली क्षमता, आपली आवड, आपल्या मर्यादा तू चांगल्या ओळखतेस. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षेत्रातल्या गोष्टींचा तू भरभरून आस्वाद घेतलास. आनंद उपभोगलास. म्हणूनच तू आहेस खास.

कित्येकदा तू तुझ्या इच्छा-आकांक्षा, आनंद घरासाठी, इतरांसाठी दूर सारलास. आता एवढंच सांगावसं वाटतंय की,तुझं तुझ्याप्रती सुद्धा काही कर्तव्य आहेच ना.आता स्वतःच्या इच्छेप्रमाणे वाग. स्वतःला थोडा वेळ दे.आवडत्या गोष्टी कर.जे करायचे राहून गेले ते सर्व आवर्जून कर.यशाची मानकरी हो.मनाप्रमाणे आनंद घे. मला माहित आहे आपल्या या आनंदातही तू इतरांना सामावून घेत आनंद वाटशील. कारण तू आहेसच खास.

तुझ्या कर्तृत्वाचा, तुझ्या संवेदनांचा उत्सव एक दिवसाचा नाहीच होऊ शकत. कारण तू आजन्म अशीच आहेस.कोणी विचारो ना विचारो, मान देवो ना देवो तू आपल्या अंगभूत गुणगौरवाने आनंदाची उधळण करीत आपल्या मार्गावर चालत आहेस आणि म्हणूनच तु खूप खूप खास आहेस. तू माझी लाडकी प्राणसखी आहेस.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अहल्या – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ अहल्या – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

अहल्येची नि माझी ओळख माझ्या नकळत्या वयात झाली. आमचं बालपण, तिन्हिसांजेला घरी आल्यावर हात-पाय धुऊन, वडीलधार्‍यांना नमस्कार करून, ’शुभं करोती’ आणि नंतर पाढे-परवचे म्हणण्यात सरलं. ते झालं की आजी वेगवेगळे श्लोक शिकवायची. म्हणून घ्यायची. त्यानंतर गोष्टीचा खुराक असे. या विविध प्रकारच्या श्लोकांमुळे, मनावर आणि वाणीवर उत्तम संस्कार होतात, असं तेव्हा मानलं जायचं. तिने शिकवलेल्या श्लोकांमध्ये एक श्लोक असा होता-

‘अहल्या, द्रौपदी, सीता, तारा मांदोदरी तथा। पंचकन्या स्मरे नित्यं महापटक नाशनम्।।‘    अर्थ न समजता, त्यावेळी पाठांतर म्हणून पाठ केलेला हा श्लोक.

प्राथमिक शाळेत गेल्यावर देव-देवतांच्या, रामायण-महाभारतातल्या कथा वाचायला-ऐकायला मिळाल्या. त्यातच रामाच्या पदस्पर्शाने शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार झाला, ही कथाही ऐकली-वाचली. त्याच काळात रामदासांचे मनाचे श्लोक पाठ केलेले आठवतात. त्यातच एक श्लोक असा होता, ‘अहल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होओनी गेली. ‘

अर्थात असा अहिल्येला उद्धारणारा श्रीराम, ज्याचे गुणवर्णन करताना वेदवाणीही शिणून गेली, त्या रामाच्या गैरवासाठीच या श्लोकाची रचना रामदासांनी केली होती.

हायस्कूलमध्ये गेले आणि हे असं का? ते तसं का, हे जाणून घेण्याचं कुतुहल वाढलं. त्यावेळी एकदा आजीला म्हंटलं, ‘ तू तो पंचकन्या स्मरे नित्यं ’ श्लोक शिकवलास ना, म्हणजे बघ…. आधी कितीही पापं केली, तरी चालतील…  या पंचकन्यांचं स्मरण केलं की झालं! मिळाली सगळ्या पापांपासून मुक्ती…’

‘फाजीलपणा करू नकोस! तुम्हाला पापं करायला परवानगी दिलीय, असा नाही याचा अर्थ होत!’ आजी रागारागानं म्हणाली.

‘पण काय ग आजी, या पंचकन्यांचं स्मरण का करायचं?

‘अग, त्या महान पतिव्रता होत्या.’

‘ मग मला सांग आजी, अहल्या पतिव्रता होती ना? मग गौतम ऋषींनी तिला शिळा होण्याचा शाप का दिला?’

‘भ्रष्ट झाली होती ना ती?’

‘पण ती भ्रष्ट झाली यात तिची काय चूक होती? मग तिला का शाप?’

‘तुम्हा हल्लीच्या मुलींना काही सांगायची सोय नाही. सांगायला गेलं की टांगायला नेता तुम्ही!’ आजीचं हे उत्तर म्हणजे स्वत: माघार घेताना दुसर्‍यावर ठेवलेलं ठेपर असे. पण अहल्येचं पातिव्रत्य आणि तिचं शिळा होणं याची तर्कशुद्ध सांगड काही आजीला घालता यायची नाही.

अभ्यास वाढला आणि विज्ञानाचा पगडा मनावर बसला, तेव्हा माणसाचं शिळा होणं, बुद्धीनं नाकारलं. या कथेवरची चमत्काराची पुटं खरवडून, त्यावेळी नक्की काय घडलं असेल, याचा शोध, मन नकळत घेऊ लागलं.

अहल्येकडे गौतमाच्या वेशात इन्द्र आला आणि अहल्या फसली, असं पुराणकथा सांगते. पण मला वाटतं, तसं नसणार. कारण ती गौतमांच्या स्ंनन्संध्येची ती वेळ. आपला पाती कोणत्या वेळी कोणती मागणी करेल आणि कोणती अपेक्षा बाळगेल, हे पत्नी या नात्याने अहल्येला निशितच माहीत असणार. ’गणेश पुराण’सारख्या काही पुराणातून अहल्येने इंद्राला ओळखलं होतं, असंही म्हंटलं आहे पण अहल्येने स्वखुशीने इंद्राला जवळ केलं, असं मानलं, तर परंपरेने एक पतिव्रता  स्त्री म्हणून अहल्येचं नाव आपल्यापर्यंत पोचवलं नसतं. काळाच्या विस्मृतीत ते केव्हाच लोप पावलं असतं.

इंद्र, इंद्र म्हणूनच अहल्येकडे गेला असेल. त्याला वाटलं असेल, आपल्या वैभवाने, नाव-कीर्तीने आपल्या सौंदर्याने-शौर्याने-सत्तेने अहल्या दिपून जाईल पण प्रत्यक्षात तसे घडले नसेल. अहल्येच्या सौंदर्याने मोहित झालेल्या इंद्राने तिच्यावर बलात्कार केला असेल. या आकस्मित आघाताने ती इतकी बधीर, चेतनाशून्य झाली असेल, की आपल्याबाबतीत काय घडलं, याची जाणीवच ती हरवून बसली असेल. एखाद्या दगडाप्रमाणे, ती आपल्या जाणीवा, वास्तवाचं-परिसराचं भान हरवून बसली असेल. अहल्या शिळा झाली असेल, ती या अर्थाने. एखादा कटू प्रसंग विसरण्यासाठी, तो घडल्याचच मन-बुद्धी नाकारते, असं मानसशास्त्र सांगतं. अहल्येच्या काळातील समाजाची मानसिकता लक्षात घेतली, तर तेव्हा पातिव्रत्य या मूल्याला सगळ्यात जास्त महत्व होतं. त्यामुळे व्यक्तीगत पातळीवर अहल्येने स्वत:चं अस्तित्व नाकारलं असेल. तत्कालीन समजधारणेचा विचार केला तर, चूक आसो की नसो, अहल्या भ्रष्ट झाली, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे अहल्या एक प्रकारे वाळीत टाकली गेली असेल. तिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला गेला असेल. तिचे अस्तित्व नगण्य, अर्थशून्य मानले गेले असेल. अपराध इंद्राचा असेल, हे मनोमनी पटूनही इंद्रासारख्या देवराजाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार? त्यापेक्षा अहल्येला दोषी ठरवणं, अपराधी ठरवणं जास्त सोपं होतं. जास्त सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं असेल. नातं तोडलं असेल. तिच्याबरोबर कुठलाही व्यवहार करणं टाळलं असेल. ती अगदी एकटी, एकाकी पडली असेल, रस्त्यावरच्या शीळेसारखी.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत- भाग – 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

न्यायमूर्ती पिन्हे यांच्या या निकालानंतर,दादाजींनी पुन्हा खटल्याच्या फेर सुनावणी साठी अपील केले. इंग्रजांना येथील धर्म कायद्यांना धक्का लावायचा नव्हता. ते मतलबी व्यापारी वृत्तीचे होते. राजकीय स्वार्थ त्यांनी साधला. त्यांच्या राज्यकारभारात मदत करणारा इथला तत्कालीन सुशिक्षित समाज, हा उच्चवर्णीय व परंपरावादी होता.  इंग्रजांना  राज्य महत्त्वाचे होते. त्यांना धार्मिक बाबतीत लक्ष घालायचे नव्हते.दादाजींनी केलेल्या अपिलाचा खटला यावेळी न्यायमूर्ती फॅरन यांच्याकडे सोपविण्यात आला. समाज व प्रसारमाध्यमे यांच्या दबावामुळे न्यायमूर्ती फॅरन यांनी 1887 मध्ये रखमाबाईच्या विरोधात निकाल दिला. वादीची तक्रार रास्त असून रखमाबाईंनी एक महिन्याच्या आत आपल्या पतीच्या घरी राहायला गेले पाहिजे अथवा सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा भोगायला तयार झाले पाहिजे. असा निकाल त्यांनी दिला. रखमाबाईंनी या लादलेल्या विवाहाला आणि या अन्याय निकालाला निक्षून नकार दिला. त्या ऐवजी तुरुंगवास चालेल असे त्या म्हणाल्या. कोर्टाला उद्देशून रखमाबाई बाणेदारपणे म्हणाल्या, ‘नको असलेल्या पतीच्या घरी राहायला जाण्याऐवजी मी आपण  दिलेली शिक्षा भोगायला आनंदाने तयार आहे.’असे त्यांनी कोर्टाला सांगितले या कायदेशीर लढाईत रखमाबाईचे आजोबा हरिश्चंद्र व आई जयंतीबाई  या दोघांनी रखमाबाईना शेवटपर्यंत  साथ दिली. डॉक्टर सखाराम अर्जुन मात्र खटल्याचा हा सारा ताण सहन न होऊन खटला सुरू असतानाच मृत्यू पावले. रमाबाईंचे अतुल्य धाडस पाहून, नंतर जाणता समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहिला. रखमा बाईंच्या आर्थिक सहाय्यासाठी हिंदू लेडी या नावाने निधी उभारण्यात आला. एवढेच नव्हे तर बालविवाह संबंधातील कायद्यात बदल करण्यात यावा यासाठी,या कायद्यात सुधारणा करण्यासाठीच्या शिफारशी सरकारकडे पाठविण्यात आल्या. या गडबडीत रखमा बाईंच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला विरोध व विलंब झाला. त्यातच दादाजीने पत्रक काढून रखमा बाईंचे आजोबा हरिश्चंद्र व आई जयंतीबाई हे दोघे रमाबाईंच्या  नावावर जनार्दन सावे यांनी करून दिलेल्या संपत्तीच्या लोभाने तिला आपल्याकडे नांदायला पाठवत नाहीत असा आरोप केला.त्याला उत्तर म्हणून रखमाबाईंनी आपले संपत्तीचे विवरण प्रसिद्ध केले. दादाजीचा खोटेपणा उघडकीस आला. दादाजी हे कुठल्याही प्रकारे रखमाबाईंसाठी योग्य नाहीत हे दादाजींच्या मामाच्या या उलटतपासणीत कोर्टाच्या लक्षात आले. दादाजींची बाजू उघडी पडल्यावर दादाजींनी रखमाबाई ना तडजोड करण्याची विनंती केली.या विनंतीप्रमाणे दादाजींनी रखमाबाईंनीवरचा पत्नी म्हणून हक्क सोडावा आणि दादाजींना खटल्यासाठी लागलेला खर्च रखमाबाईंनी द्यावा अशी तडजोड झाली.चार वर्ष गाजलेला, दादाजी विरुद्ध रखमाबाई हा खटला 1887साली संपुष्टात आला.आणि रखमाबाई मुक्त झाल्या.

नको असलेल्या विवाहातून रखमाबाई मुक्त झाल्या त्यावेळी त्या फक्त बावीस वर्षांच्या होत्या. पण या कोवळ्या वयात अनुभव संपन्न झाल्या होत्या. सत्यशोधक विचारांचा वारसा, प्रगल्भ बुद्धी त्यांना लाभली होती. स्वतःचे आणि डॉक्टर सखाराम अर्जुन यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्यावरील खटल्याच्यावेळी डॉक्टर एडिथ पिची आणि फिप्सन पिची यांनी रखमाबाईना शेवटपर्यंत साथ दिली होती. डॉक्टर एडिथ पिची व डॉक्टर सखाराम अर्जुन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.डॉक्टर एडिथ पॅरिस च्या होत्या. तिथून 1883 मध्ये द्या मुंबईला कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या डफरीन फंडाचे सचिव होते. या पती-पत्नीच्या प्रयत्नामुळे रखमाबाईना डफरीन फंडातून आर्थिक मदत मिळाली. याच पती-पत्नीने रखमाबाई ना इंग्लंडमध्ये रहाण्यासाठी मॅक्लेरन  दांपत्याचे पालकत्व मिळवून दिले. रखमाबाई  डॉक्टर एडिथ आणि फिप्सन यांच्यासोबत 1889 मध्ये वैद्यक शास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेल्या. त्यांचे आजोबा हरिश्चंद्र यादवजी आणि आई जयंतीबाई यांचा शुभ आशीर्वाद त्यांना लाभला. इंग्लंड मधील कालखंड हा रखमाबाईच्या  जीवनातील सुवर्णकाळ होता. वाल्टर मॅक्लेरन  हे इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य होते.त्यांच्या सुविद्य पत्नी इव्हा मॅक्लेरन या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. या सुसंस्कृत घरात रखमाबाईंचा इंग्लंडच्या प्रगत जीवनाशी,प्रगत विचारांशी  परिचय झाला. स्त्री-पुरुष समानतेची ओळख त्यांना इथेच झाली.लॉर्ड टेनीसन या  महान व्यक्तिमत्वाशी आणि बर्टान्ड रसेल या विद्वानांच्या पत्नीऑलिस रसेल यांची ओळख याच घराने त्यांना करून दिली. इथे त्यांना आदर्श जीवनपद्धती अनुभवता आली.वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठीचीअट असलेला केम्ब्रीजचा  एक वर्षाचा कोर्स त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांनी चार महिन्यात पूर्ण केला. आणि 1890 मध्ये लंडन स्कूल ऑफ ऑफ मेडिसिन फॉर वुमेन या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणाचा प्रारंभ केला. 1894 मध्ये त्या शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अनेस्थेशिया विभाग, डेंटल विभाग,चिल्ड्रेन हॉस्पिटल, ऑप्थाल्मिक   हॉस्पिटल येथील कामांचा अनुभव घेऊन त्या परीक्षेसाठी स्कॉटलंडला गेल्या.प्रसूतिशास्त्र व शस्त्रक्रिया या परीक्षेत त्यांनी ऑनर्स पदवी मिळविली.

वैद्यकीय पदवी मिळवून सन्मानाने भारतात परतलेल्या रखमबाईंचा टाईम्स ऑफ इंडियाने सन्मान केला. त्यांचे भव्य स्वागत केले. कारण टाइम्स’ने त्यांच्या पत्रांना प्रसिद्धी दिली होती.लोकांच्या दबावाला बळी न पडता हिंदू लेडीचे नाव जाहीर केले नव्हते व त्यांची पत्रे गव्हर्नरकडे विचारार्थ पाठविली होती.डॉक्टर रखमाबाईंनी मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून वैद्यकीय व्यवसायात सुरुवात केली. त्यावेळी सुरतमध्ये प्लेग व दुष्काळ यांनी थैमान घातले होते. कामा हॉस्पिटलमध्ये सहा महिने काम करुन डॉक्टर रखमाबाई सुरतच्या माळवी हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या. घरापासून दूर राहून त्यांनी हे असिधाराव्रत अंगिकारले. प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रात्रंदिवस काम केले. तेथील स्त्रियांची मागास स्थिती, घरी केलेल्या बाळंतपणात होणारे मृत्यू यासाठी रखमाबाईंनी खूप काम केले.माळवी हॉस्पिटल हे डॉक्टर रखमाबाई हॉस्पिटल म्हणून ओळखले जाऊ लागले. रखमाबाईंनी हॉस्पिटलमध्ये बाल वर्ग सुरू केले. स्त्री शिक्षणासाठी वनिता आश्रमची स्थापना केली. अनेक स्त्रियांशी त्या जोडल्या गेल्या. 1917 मध्ये  त्या सुरत हॉस्पिटल मधून निवृत्त झाल्या. 1918 मध्ये त्यांनी राजकोट येथील जनाना हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली. सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या त्या पहिल्या महिला प्रमुख डॉक्टर होत्या. त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. लोककल्याण हेच ध्येय ठेवले.त्या आजन्म अविवाहित राहिल्या. 1918 मध्ये सुरतला आलेल्या इन्फ्ल्यूएन्झा च्या साथीत त्यांनी अविश्रांत सेवा केली. महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली. त्यांच्या आजोबांच्या मालकीच्या गावदेवी येथील मंदिरात अस्पृश्य स्त्रियांना घेऊन त्यांनी 1932 मध्ये प्रवेश केला व अस्पृश्यता निवारणात योगदान दिले. त्यांच्या सुरत सेवेबद्दल शासनाने कैसर ए हिंद अशी पदवी त्याना दिली. रेड क्रॉस सोसायटी ने पदक देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या 91 वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या. 25 डिसेंबर 1955 रोजी त्या देवत्वात  विलीन झाल्या.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक महिला दिनांच्या निमीत्ताने… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆ विविधा ☆ जागतिक महिला दिनांच्या निमीत्ताने… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिन १९४३ साली साजरा झाला. १९७१ साली आठ मार्चला एक महिला संघटन, समस्या निवारण, सुरक्षितता असे मूलभूतत प्रश्न घेऊन पुण्यात, एक व्यापक असा मोर्चा काढला होता. पुढे १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून युनोने जाहीर केले… आणि त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी येऊ लागली. बदलत्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार स्त्रियांच्या समस्या, प्रश्न ही बदलत गेले… जागतिक महिला दिन साजरा करण्याचा मूळ हेतु, महिलांचे अधिकार जपणे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे हाच आहे.. या सर्व पार्श्वभूमी चा विचार करता, या महिला दिनी, एक स्त्री म्हणूनच नव्हे, एक जागरुक, सामाजिक भान असणारी व्यक्ती म्हणून माझ्या मनात अनेक प्रश्न ऊभे राहतात… स्त्रीवाद म्हणजे ढोबळमानाने असे मानले जाते की पुरुषांविरुद्धची चळवळ. मात्र स्त्रीवाद म्हणजे स्त्री पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचार प्रवाह….

वास्तविक आपल्या संस्कृतीत..

।।यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।।

ही विचारधारा आहे. आपले अनेक सण स्त्री शक्तीचा जागर करतात. पण मग मखरात पूजल्या जाण्यार्‍या या स्त्री शक्तीचे प्रत्यक्ष समाजातले स्थान सुरक्षित तरी आहे का?

तितकेच पूजनीय आहे का?

समानतेची वागणूक खरोखरच तिला मिळते का?

“मुलगी झाली” म्हणून तिच्या जन्माचा सोहळा होतो का?

ती गृहित, ती दुय्यम हे तिच्या जीवनाचं पारंपारीक स्टेटस पूर्णपणे बदलले आहे का?

जेव्हां ‘मी टु’ सारखी अंदोलने घडतात, हाथरस सारख्या घटना वेळोवेळी वाचायला मिळतात, तेव्हां वरील सर्व प्रश्नांची ऊत्तरे संपूर्णपणे सकारात्मक मिळत नाहीत हे दु:खं आहे.

महिला दिनी, महिला शिक्षणासाठी जीवन समर्पित करण्यार्‍या पूज्य सावित्रीबाईंचे स्मरण होईल. अनेक पौराणिक, ऐतिहासिक, ऊंबरठा ओलांडून जगलेल्या विसाव्या, एकविसाव्या शतकातील, सर्व स्तरांवर, सर्व क्षेत्रांत ऊच्च स्थानी पोहचलेल्या महिलांची गौरवाने नावे घेतली जातील… पण म्हणून स्त्रीच्या आयुष्यातला संघर्ष संपला असे म्हणू शकतो का? गुलामगिरीच्या जोखडातून ती पूर्ण मुक्त झाली असे सामाजिक चित्र आहे का..???

पुन्हा ऊत्तर नाईलाजाने नकारात्मकच….

परवाच माझी एक अत्यंत सुविचारी, समंजस, कुटुंबवत्सल, नाती जपणारी मैत्रीण सासुच्या भूमिकेत सुनेविषयी सांगताना म्हणाली.. “अग! शांभवीचं घरात लक्षच नसतं..सदा आॅफीसच्या मीटींग्ज, करीअर, पैसा. प्रमोशन्स… घरासाठी वेळच नाही. मुलांसाठी वेळच नाही.. काही सण, रिती, सोहळे परंपरा… कश्शाची पर्वा नाही…. वेळच नसतो तिला.. आज मुलं  सगळं स्वत:चं स्वत: करतात, सगळ्यांची वेळापत्रकं सांभाळली जाताहेत… पण ऊद्या मुलांना  आईबद्दल नेमकं काय वाटेल ग….मायेचा  सहवास नसेल तर या पीढीचं काय होणार?…”

तिचं हे भाष्य, हे प्रश्न ऐकल्यावर मी थक्क झाले!!  माझ्याकडे ऊत्तरं होतीही. नव्हतीही. तिला विचारावेसे वाटणारे प्रश्नही मनात ऊभे राहिले… पण प्रातिनिधीक स्वरुपातच मला शांभवी दिसली.. एका महत्वाकांक्षी पुरुषाच्या मागे स्त्री सर्वस्वाचा त्याग करून जबाबदारीने उभी असते, तेव्हांही ती दुय्यम स्थानांवर, आणि स्त्रीपणाचा ऊंबरठा ओलांडून  चार पाऊले पुढे टाकते,  तेव्हांही ती गौरवमूर्ती न बनता, समाजाच्या नजरेत अपराधीच….. हीच समस्या कालही होती आजही आहे…..!!

म्हणूनच आजच्या महिला दिनी स्त्री शक्तीचा ऊदो ऊदो करताना “जोगवा” मागायचाच असेल तर तो संपूर्ण सक्षमतेचा.. स्वशक्तीचा, खंबीर बनण्याचा…  आत्मनिर्भरतेचा… निर्णयक्षमतेचा आणि त्याच बरोबर एक नवा जाणीव असलेला, समान दृष्टीकोन असलेला, अविकृत समाजबांधणीचा…. कारण, जरी चढलो असलो उंचावरी तरी पायर्‍या अजुन बाकीच आहेत…..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेती मुळे स्त्रिया होतात आत्मनिर्भर ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

 ☆ विविधा ☆ शेती मुळे स्त्रिया होतात आत्मनिर्भर ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

गावाकडे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया या आत्मनिर्भर  असतात.  शेतातील जवळ जवळ ऐंशी टक्के कामे स्त्रियाच करतात. पेरणी टॅक्टरने केली तरी काही ठिकाणी हाताने रोपे लावणे, बी टोकणे यासाठी स्त्रियाच लागतात. नंतर खुरपणी, भांगलन आहेच. साधारण एका पिकाला दोन तीन वेळा भांगलन करावेच लागते. त्यातून स्त्रियांना रोजगार उपलब्ध होतो. या कामासाठी शिक्षणाची अट नसते. शिकण्यासाठी एखादा दिवस पुरतो. त्यामुळे तुमची इच्छा असेल आणि  तुम्हाला गरज असेल तर कुणीही शेतीत काम करून रोजगार मिळवू शकतो.

भांगलन झाल्यानंतर काढणी, मळणी असते. मळणी यंत्रावर असली तरी मदतीला स्त्रिया लागतात. बरं या कामाची शेतकर्‍याला तातडीची गरज असतेच.  सुगीमध्ये अगदी जास्त रोज देऊन बायकांना बोलावले जाते.

शेतीची कामे बारमाही चालतात. त्यामुळे रोजगार सतत उपलब्ध असतो. शेतात काम केल्यामुळे मोकळी ताजी हवा मिळते. आपोआप व्यायाम होत असल्यामुळे आरोग्य चांगले राहते.

कुठे ना कुठे भाजी, तरकारी पिकवली जाते. येताना कुणीही भाजीचा वानवळा देतात. नाहीतर अगदी कमी दरात ताजी भाजी मिळते.

कित्येक बायका शेतात जाताना दोन तीन शेळ्या चरायला नेतात. जिथं भांगलन  वगैरे चालू असेल तिथेच बांधावर झुड्पाला शेळ्या बांधायच्या. गळ्यातलं दावं जरा लांब सोडायचे. त्यांचं त्या चरतात. येताना जळण, गवत डोक्यावरून आणतात. शेळीचं औषधी ताजं दूध मिळते. बोकड असेल तर तो विकून बरेच पैसे मिळतात. यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नसते. फारसा खर्चही येत नाही. फक्त कष्ट करायची तयारी हवी. आणि खेडयातील स्त्रिया ते करतात. असे समुहाने काम केल्यामुळे त्यांचा मैत्रभाव वाढीस लागतो. एकमेकांना मदत करणे. लग्न कार्याला एकत्र काम करणे, मोठ्यांचा सल्ला मिळणे यासाठी खर्चही कमी किंवा जवळ जवळ नसतोच. कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही.

आपल्याच माणसात काम करणामुळे आत्मविश्वास, निर्भयता येते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. त्यामुळे झोपडीतही ती फार दुःखी नसते.

आता बचत गट खेड्यातही असतात. त्यामुळे पैशाचा योग्य विनियोग त्या करू शकतात.

शेतातील सुगीच्या दिवसात मूग, उडीद, चवळी, घेवडा, हरभरा ही कडधान्ये आपल्या शेतात नसतील तर शेजारणी कडून घेऊन त्यांना राख, किटकनाशक पावडर लावून वर्षभराची साठवण करतात. या कडध्यान्याच्या डाळी करून साठवतात. गहू, ज्वारी यांची वर्षभरासाठी साठवण करता येते. सुगी मध्ये धान्य स्वस्त मिळते. खेड्यात भुईमुगाच्या शेंगाही अशाप्रकारे साठवूण ठेवतात.

घरात जर असे वर्षभर पुरेल एवढे धान्य असेल तर ती गृहिणी केवढी तणावमुक्त राहू शकते.

एखादीचा नवरा मुलगा दारुडा , जुगारी असतो तेव्हा तिला त्रास होतो. पण ती एकटी पडत नाही. तिच्या साठी मदतीचे हात सदैव तत्पर असतात.

 

© सौ. सावित्री जगदाळे

१७/२/१९

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print