मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ मकर संक्रांत ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

काय आल डोळ्यासमोर मस्त गोल गोल तिळाचे लाडू ना?? आहाहा…. छान गोल आणि गोड त्यात मधेमधे डोकावणारे दाणे आणि वेलदोड्याचा सुवास.

चिक्की गूळापासून बनवलेले लाडू तर अफलातून लागतात. ते असे जेव्हा दाताला चिकटतात तेव्हा ते ओढत खायला खूप मजा येते. एकजीव झालेले तीळ आणि गूळ ह्यांचा खमंग वास कसा घरभर दरवळतो.

काहीजणांना मात्र मऊ वडी आवडते खोबरे आणि दाण्याच कूट घालून केलेली. तोंडात सहज विरघळणारी, पण ती खाण्यात गंमत नसते.

त्याच बरोबर गुळपोळीही आपली उपस्थिती लावते. खमंग खुसखुशीत.. त्यातला गूळ, खोबरे, बेसन पीठ, तिळ कूट, खसखस, जायफळाची पूड दाण्याचे कूट कसे छान एकजीव होते . ही पोळी खाऊन आपले मन कसे तृप्त होते आणि डोळ्यांवर अनावर झापड येते आणि नकळत आपण झोपेच्या स्वाधीन होतो.

गुळपोळी कमी म्हणून की काय,  ती बाधू नये म्हणुन काही जण त्याबरोबर गाजराची खीर खातात. म्हणजे भर दुपारी मध्यांरात्र ही ठरलेली.

दुपार सरते ना सरते तो वर बालगोपाळ वर्दी लावतात आणि तिळगूळ वाटप कार्यक्रम सुरू होतो. छान नटूनथटून गोपाळ कृष्ण, राधा घरी येतात आणि घराचे गोकुळ बनवून जातात. प्रत्येकाच्या हातात असतात छान छोट्या छोट्या वेगवेगळ्या आकाराच्या डब्या.  त्यातून तिळगूळ वाटप करताना खरतर निम्म्याहून अधिक पोटात जात असतो ते वेगळेच.

त्यात घरचे हळदीकुंकू ठरले असेल तर मग काय पहायलाच नको.

एकूण काय हा सण प्रत्येकासाठी काहीना काही तरी वेगळी आठवण घेऊन आलेला असतो.

नवदांम्पत्यानसाठी तो आनंदाचा सण असतो, बाळगोपाळांना बोरन्हाण साजरं करायचं असतं, घराघरातून तिळगूळ वाटायचा असतो, बायकांना मोठा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम करायचा असतो, तर काहींना निव्वळ तिळाची वडी तिळगूळ आणि गुळपोळी खायला मिळते म्हणून हा सण साजरा करायचा असतो.

मकर संक्रांतीला सूर्यनारायण देव मकर राशीत म्हणजेच आपल्या मुलाच्या शनिच्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे शनी देव ह्या महिन्यात विशेष आनंदात असतात.

आणखीन एका गोष्टीला कधी नव्हे ते ह्या महिन्यात महत्त्व येते ते म्हणजे काळ्या रंगाला. जिच्या तिच्या अंगावर काळ्या रंगाची साडी दिसू लागते. अनेक महिने कपाटात रुसलेली साडी आनंदाने बाहेर डोकावू लागते. अगदी काळी पैठणी सुद्धा आपला रुबाब दाखवून जाते.

त्या एका काळ्या रंगात सुद्धा किती त्या छटा पहायला मिळतात म्हणून सांगू. ब्लॅकजेट,चारकोल ब्लॅक, स्टोन ब्लॅक, बापरे बाप. काळ्या रंगाला पण इतक्या रंगछटा असतात ते ह्या सणा निमित्ताने समजते.

असा हा अनेक तर्‍हेने नटलेला आणि सजलेला सण सगळ्यांनसाठी आनंदाचा असतो.

मला एवढेच वाटतेकी जसे गूळ तिळाला घट्ट धरून ठेवतो, जशी गुळपोळी सार्‍या पदार्थांना एकत्र आणते, जसा तिळगूळ आपली गोडी घरा घरातून पोचवतो, तसाच स्नेह, जिव्हाळा आपुलकी आपल्या प्रत्येकाच्या मनात असुदे. पतंग जसा आकाशात उंच भरारी घेत नवचैतन्य , नवे ध्येय घेऊन उंच नभात विहार करतो तसाच नवे ध्येय, नवे चैतन्य आपण आपल्या मनात रुजवू आणि आनंदाने हा सण गूळ पोळीचा आस्वाद घेत साजरा करू.

सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

तिळगूळ घ्या गोड बोला ??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अव्यक्त आत्मवृत्त ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ अव्यक्त आत्मवृत्त ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆ 

“कित्ती सुंदर दिसतोय ना हा? पहातच राहावंसं वाटतंय—” जरा लांबूनच हे वाक्य मला ऐकू आलं आणि नेहेमीसारखंच मी खुद्कन हसलो…. कारण मला बघणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून हेच वाक्य मी ऐकतो  आणि या वाक्याचा मला अजून तरी कंटाळा आलेला नाहीये. उलट ते ऐकतांना दरवेळी मला प्रचंड आनंद होतो. त्यांच्यापैकी कुणीच सहसा माझ्या जवळ येत  नसलं,  प्रेमाने मला कुरवाळत नसलं, तरी याची मला अगदी पहिल्यापासूनच सवय झाली आहे.  मोकळी आणि स्वच्छ हवा, आजूबाजूला प्रसन्न हिरवाई असणाऱ्या या सुंदर जागी मी माझ्या मनाचा राजा असतो.  मुळात मला एकटं असायला आवडतं—मग कुणाचंच कसलंच बंधन नसतं मला हुंदडायला. आसपास दोन-पाच भावंडं असतात बरेचदा– पण सगळे स्वतःतच गर्क– तसं शिकवलंच जातं आम्हाला लहानपणापासून– कुणाच्या पायात पाय अडकवायचे नाहीत. स्वतःचा आनंद स्वतः शोधायचा  आणि हीच माझी वृत्ती झालीये.  माझं कुणावाचूनही काहीही अडत नाही. आणि तशी आई सतत असतेच ना माझ्याबरोबर.  आईला ना, उन्हाळा अजिबातच सोसत नाही. थंडी सुरु झाली कीच तिला अशक्तपणा जाणवायला लागतो. आणि उन्हाळ्यात ती खूपच हडकुळी दिसायला लागते. बरं आजारी आहे म्हणून ती माहेरीही जाऊ शकत नाही. कारण ते खूप खूप लांब आहे म्हणे. एकदा माहेरघर सोडलं, की पुन्हा कधीच ती तिथे जाऊ शकणार नाही,  इतकं लांब–म्हणजे असं तीच म्हणते.

माझे वडील म्हणजे खूप मोठा माणूस आहे म्हणे पण तेही खूप लांब रहातात. मी तर अजून पाहिलेलंही नाही त्यांना. पण त्यांचं सतत आईकडे, तिच्या प्रकृतीकडे लक्ष असतं म्हणे. ती रोडावलेली दिसताच ते काहीही करून तिच्यासाठी औषध पाठवतात.– ते नुसतं पाहिलं तरी बरं वाटायला लागतं तिला आणि ते औषध घेताच ती एकदम ठणठणीत बरी  होते–. बाबांची खूप आठवण यायला लागते तिला  आणि त्यांच्याकडे जायचं म्हणून लगबग-धावपळच सुरु होते तिची — मग काय, आम्हा भावंडांची चंगळ सुरु होते. अशावेळी आम्ही कुठे किती हुंदडतो याकडे ती लक्षही देत नाही आधी सहा-आठ महिने आम्ही शहाण्यासारखे वागलेलो असतो,  घराबाहेर पळण्याचा हट्ट करत नाही,  म्हणून असेल बहुतेक–

तसं आमचं कुटुंब–म्हणजे आजोळचं कुटुंब खूप मोठं आहे. मला कित्तीतरी मावश्या आहेत–माम्या आहेत,  त्यामुळे मला भावंडेही खूपच आहेत… आणि चुलत-मावस-मामे-आत्ये असे किती आजोबा असतील, ते मोजण्याच्या फंदात मी पडतच नाही कधी. कारण ते सगळेजण जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत म्हणे आणि आमच्यातला सर्वात मोठा भाऊ अमेरिकेत आहे-आफ्रिकेत आहे- की आणि कुठे,  हे एकाही नातेवाईकाला नेमकं सांगता येत नाही, याचं आश्चर्यच वाटतं मला. पण आम्हा भावंडातला प्रत्येकजणच अगदी देखणा, प्रसन्न, कुणालाही आवडावा असाच आहे,  असं आई सांगत असते. पहाताक्षणीच कुणीही प्रेमातच पडतो म्हणे त्याच्या. मला तर खात्री आहे की तुम्ही माझा एक तरी भाऊ कुठे ना कुठे बागडतांना नक्कीच पाहिला असेल—तो लहान असो, मोठा असो–बघत रहावा इतका देखणा असतोच असतो.

काय? अजून पाहिला नाहीत? नक्की?–   कमाल आहे खरंच तुमची— मग एक काम करा–  तुमच्या त्या सिमेंटच्या खुराड्यातून बाहेर पडा—गावाच्याही बाहेर पडा—डोंगर-दऱ्यात जा. आमच्यापैकी कुणी ना कुणी भेटेलच  आणि तुमची चक्कर वाया जायला नको असेल, तर मग पावसाळ्यातच जा.  आम्हाला सगळ्यांनाच पावसाळा आवडतो,  त्यामुळे अशा ठिकाणी आमच्यापैकी कुणीतरी तिथे पावसात भिजत मनसोक्त हुंदडतांना— अवखळपणे बिनधास्त धडाधडा उडया मारतांना दिसेलच नक्की तुम्हाला  आणि खात्रीने सांगतो, रेनकोट- छत्री टाकून देऊन तुम्हीही तो आनंद हमखास अनुभवाल.——- विचारत-विचारत यावं लागेल म्हणता? अहो, माझं नुसतं नाव सांगितलंत तरी जवळपासचं कुणीही सांगेल तुम्हाला—- काय?—माझं नाव काय सांगायचं?  आता हद्द झाली तुमच्यापुढे— अहो मी धबधबा—डोळ्यावरची झापडं काढलीत ना,  तर पावसाळ्यात डोंगर-दऱ्यात ,आमच्यापैकी कुणीतरी नक्कीच भेटेल  तुम्हाला–आणि नावात काय आहे? तुम्हाला हवं ते नाव देऊन टाका की. —मग येताय ना? वाट पहातो –

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संक्रांत सण हा मोठा (भाग -2) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ संक्रांत सण हा मोठा (भाग -2) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

संक्रांतीला आस-पासच्या बायकांना, नातेवाईकांना बोलावून हळदी-कुंकू करायची प्रथा आहे. तीळगुळाबरोबरच एखादी वस्तू द्यायची पद्धत आहे. हळदी कुंकू लावून तीळगूळ द्यायचा. गव्हाबरोबरच ओटीत, सुगडात घातलेल्याच वस्तू , म्हणजे बोरं, पावट्याच्या शेंगा, उसाचे कर्वे, गाजराचे तुकडे घातले जात. त्याच बरोबर एखादी वस्तू किंवा फळ वगैरे दिलं जाई. त्याला पूर्वी वस्तू लुटायची असं म्हंटलं जाई.  जी वस्तू द्यायची, त्याचा हळदी-कुंकू असे, त्या खोलीत एका कोपर्‍यात ढीग लावलेला असे. येणार्‍याने त्यातून आपल्याला हवे तेवढे घेऊन जायचे. त्यात प्रामुख्याने मळ्यातून आलेल्या भाज्या, फळे वगैरे असत. हवे तेवढे घेऊन जायचे म्हणून त्याला ‘लुटायची’ असा शब्द रूढ झाला. लूट करावी, इतकी ती गोष्ट अमाप असे. कालौघात परिस्थिती बदलली. मग वस्तू लुटण्याऐवजी वस्तू देणं आलं. त्यात मग गंमत म्हणून वेगवेगळ्या वस्तू आणायच्या. त्याच्या चिठ्ठ्या लिहायच्या. आलेल्या स्त्रियांना चिठ्ठ्या उचलायला सांगायच्या व जिला ही चिठ्ठी मिळेल, तिला ती वस्तू द्यायची. यात कधी आनंद असे, तर कुठे कमी मोलाची वस्तू मिळाली, याची एखादीला खंतही वाटे.

संक्रांतीचं हळदी-कुंकू संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत कधीही आपल्या सोयी-सवडीने करायची प्रथा आहे. माझ्या सासूबाईंना हळदी-कुंकवाच्या वेळी कंगवे, पावडर वगैरेचे छोटे डबे असं काही देणं फारसं पसंत नव्हतं. त्या म्हणत, ‘तुम्ही वस्तू देण्याबद्दलचं बजेट ठरवा. एखाद्या गरजवंत बाईला कशाची गरज आहे, ते बघा आणि तिला ती वस्तू घेऊन द्या. माझ्या जुन्या काळातल्या, सोवळ्या असलेल्या सासुबाईंचे हे विचार आधुनिक काळाला साजेसे होते आणि आम्ही तसच करत असू. मग ते कधी वाण म्हणून असो, वा मग सरळ सरळ प्रथा किंवा चाल म्हणून.

सणाच्या निमित्ताने दुसर्‍याला काही देण्याची प्रथा केवळ हिंदू धर्मातच आहे असे नाही, मुसलमान, क्रिश्चन, शीख , पारशी इ. सर्व धर्मात आहे. आपले सगळे सणवार, ते साजरे करण्यासाठी पडलेल्या प्रथा आनंद, उल्हास, निर्माण करणार्‍या आहेत. म्हणूनच त्या आजही टिकून आहेत. आजच्या काळात स्त्रिया उंबरठा ओलांडून घराबाहेर पडल्या. नोकर्‍या करू लागल्या. प्रत्येकीला स्वतंत्रपणे हळदी-कुंकू करावं इतका वेळ मिळेनासा झाला. मग त्यातून मंडळात किंवा सोसायतीत सगळ्यांनीच एकत्र येऊन सार्वजनिक हळदी-कुंकू होऊ लागले. रीती-रिवाजात बदल होत गेले, पण प्रथा, परंपरा कायम राहिली. पूर्वी हळदी-कुंकवाच्या वेळी  सुवासिनींनाच बोलावण्याची पद्धत होती. आता विधवांनाही सन्मानाने बोलावलं जाऊ लागलं. हा बादल माणुसकीचे बंध घट्ट करणारा आहे.

संक्रांत सणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. बाकीचे सण त्या त्या तिथीला येतात. उदा. पाडवा चैत्र प्रतिपदेला, गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, पण संक्रांतीची तिथी नक्की नसते. तिची तारीख नक्की ठरलेली असते. १४ जानेवारी. टिळक पंचांगाप्रमाणे ती १० जानेवारीला असते.  क्वचित एखाद्या वर्षी ती १३ वा १५ जानेवारीला यते. संक्रांत हा द्क्षिणायण आणि उत्तरायण या दोन कालखंडांना जोडणारदिवस  आहे. या दिवसापासन  सूर्याचे उत्तरेकडे भ्रमण सुरू होते. (त्याच्या फार भौगोलिक तपशीलात शिरायला नको).  या दिवसापासून दिवस मोठा होऊ लागतो. या दृष्टीने खरं तर हाच वर्षाच्या सुरवातीचा दिवस मानायला हवा. गुढी पाडवा हा वर्षाचा पहिला दिवस मानतात. त्यामागे विविध मिथकांचा आधार घेतलेला आहे. संक्रांतीला नववर्षाची सुरुवात मानली, तर त्याला भौगोलिक आधार आहे. शिशीर ऋतूतील थंडी , पानगळ, त्यातून दिसणारे सृष्टीचे, बापुडवाणे, उदास, मरगळलेले आणि मळकटलेले रूप आता बदलू लागणार आहे. झाडाझाडांवर नव्या अंकुरांच्या रूपाने नवजीवन साकारणार आहे. नवचैतन्याने सृष्टी बहरणार आहे. नाना रंगांच्या फुलांनी नटणार आहे. या सार्‍याचं आश्वासन संक्रांत घेऊन येते.

समाप्त 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग – 5 ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग – 5 ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

*ऋणानुबंधाच्या कुठून जुळल्या गाठी*
( भाई – उत्तरार्ध )

वर्गात इतिहासाचा तास चालू आहे. ‘देशपांडे’ सर प्रतापगडा वरचा धडा शिकवत आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराज आणि अफजलखानाची भेट ठरलेली आहे. देशपांडे सर इतकं छान वर्णन  करून सांगत आहेत की मनाने सगळेजण तो क्षण अनुभवयायला तिथे पोचले आहेत. महाराज खानाच्या भेटी साठी निघतात, तेवढ्यात तास संपल्याची घंटा होत. सगळेजण हिरमुसतात.

“भाई – पूर्वरंग” पहात असताना ती खास मैफल संपली तेव्हा मला  अगदी असंच वाटलं होतं.

शाळेतल्या मुलाचं ठीक होतं.

त्यांना दुस-या दिवशी  किंवा तीस-या दिवशी देशपांडे सर अफजलखानचा कोथळा बाहेर काढुन दाखवू शकत होते पण  इथे “भाई – उत्तरार्ध”  येण्यासाठी  ८ फेब्रुवारी पर्यत म्हणजे तब्ब्ल एक महिना  महेश गुरुजींनी ( tutorial वाले नव्हे )  थांबयला भाग पाडले होते.

पण तरीही या  महिन्याभरच्या कालावधीत पूर्वरंगाच्या ‘ नशेत ‘  भले भले ‘रम’लेले दिसले आणि काल ८ तारखेला जेव्हा  उत्तरार्धासाठी खुर्चीवर बसलो  तेव्हा समोर पडद्यावर कुठल्या तरी फालतू जहिराती चालू असताना वसंतराव, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी  यांची मैफल परत कानात गुंजी घालू लागली. शब्द  ऐकू यायला लागले ” कानडा राजा पंढरीचा,  यमुना किनारे मेरो गांव! सांवरे आजइयो,सांवरे”

आता या उत्तरार्धात,भाईंबरोबर “ऋणानुबंधाच्या कुठून, कशा  आणि कुणाकुणाशी गाठी जुळल्या हे पहायची उत्सुकता लागून राहिली होती. तेवढ्यात  श्रेयनामावली सुरु होऊन एक सुंदर अभंग सुरु झाला. अनोखे सरप्राईज होते ते माझ्यासाठी कारण माझा आवडता अभंग लागला होता ” इंद्रायणी काठी”.
ख-या अर्थाने सबकुछ पु.ल म्हणता येईल अशी पु.लं ची कलाकृती ‘ गुळाचा गणपती’ यात  हा अभंग आहे  आणि भाई उत्तरार्ध ही प्रदर्शित झाला ‘गणेश जयंतीलाच’.  छान योगायोग ना?

हे गाणं ऐकताना वाटत होतं श्रेयनामावली अजून जरा वाढवता आली असती तरी चालले असते

भाग १- च्या शेवटी सुरु झालेली मैफल ही ख-या अर्थाने संपते  ती  कुमार गंधर्व यांच्या इंदूरच्या घरी. कुमारजी आजारी असताना हे सगळे त्यांना भेटायला जातात. यावेळेला बरोबर माणिक ताई पण असतात. ‘यमुना किनारे मेरो गाव’ पासून सुरु झालेेली मैफील  परत या गाण्यापाशी येऊनच पूर्ण होते आणि एक वर्तुळ पुर्ण होते. या मार्गात मग अनेक गाणी भेटतात

कबीराचे विणतो शेले,

खरा तो प्रेमा ला,

सुरत पिया की न छीन बिसुराये,

आगा वैकुंठीच्या राया.

माझ्यामते हे  पुर्ण होणारे वर्तुळ  म्हणजे या दोन्ही भागाचा आत्मा आहे.

भाई- उत्तरार्धाच्या सुरवातीलाच नाटकासाठी

विजया बाई – सुनीता बाई यांच्यातील भूमिकेसाठी पात्र निवडीचा प्रसंग छान जमलाय. दवाखान्यात भाईंना भेटायला गेलेल्या विजयाताईंनी २४ x ७ बातम्यांचा दणका देणा-या मिडियाला सणसणीत मारलेली चपराक पाहण्यासारखी.

दूरदर्शन चे  ‘प्रकाशवाणी’ हे नाव एका मराठी द्वेष्ट्या अधिका-या मुळे कसं राहून गेलं,  त्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर खुलंलेले भाई, आणि  नोकरी सोडल्याच्या निमित्याने झालेल्या पार्टीत  कुमार गंधर्वांनी सादर केलेले ‘ अजुनी रुसूनी आहे ‘ खुलता कळी खुलेना ‘ चे सादरीकरण अफलातून.  इथेच बटाट्याच्या चाळीचा जन्म झाला.
आणि यानंतरच भाईंनी,’ मी आता मला पाहिजे तसे जगणार’ हे ठरवले अन करुन दाखवले.

‘बटाट्याचा चाळीचा’ हा प्रयोग पाहून रात्री २ वाजता ‘आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ‘ यांनी भाईंना केलेला फोन आणि पुढील १०००० वर्षात असा पु.ल होणे नाही म्हणून दिलेल्या शुभेच्छा , संगीत नाटकातलही जयमाला शिलेदार -राम यांचा प्रयोग, “रवी मी चंद्र कसा”हे गाणे, तेंडुलकर – भाई यांच्यातील संवाद(डॉ काशीनाथ घाणेकर – श्रीराम लागू जुगलबंदीची थोडीशी आठवण करुन देणारा)

शाळेतील जूना मित्र बारक्या -स्काॅलर भाई यांचा प्रसंग, बाळासाहेब ठाकरे- महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानंतरचे नाट्य,  ‘तूला शिकवीन चागंलाच धडा असे म्हणत दवाखान्यात झालेली बाळासाहेबां नंतरची भक्तीची एन्ट्री.   हे सगळ एकदम कडकच म्हणावे लागेल !

भाईच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा  – समाजसेवा आणि त्यांचे बाबा आमटे याच्याबरोबरचे काम

– आदरणीय  बाबा  आमटे यांच्या आश्रमात  भाई तेथील मुलां बरोबर ” नाच रे मोरा अंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच” या गाण्यावर नाचतात.  ही केमिस्ट्री मस्त जमलीय.  हे गाणे पाहून  मला वाटते प्रत्येकाच्या लहानपणीच्या शाळेतील स्नेहसंमेलनाच्या आठवणी जाग्या होतील.

मराठीतील  दोन बायोपिक मधे ( डाॅ काशिनाथ घाणेकर आणि भाई-२)  झळकण्याचा मान

” नाच रे मोरा ” ? या गाण्याला मिळाला आहे. असे भाग्य दुस-या कुठल्याही गाण्यास आजपर्यंत  मिळाले नसेल. ख-या अर्थाने ह्या गाण्याचा once मोर झाला असे म्हणता येईल

आजकाल मोठ्या मोठ्या पार्ट्यात कुणी हाय फाय इंगजी बोलत सुत्रसंचालन करणारी मॅडम,   सगळ्यांना घेऊन ग्रुप डान्स करताना  एखादा अंगविक्षेप  करते आणि त्याच स्टेपची हुबेहूब नक्कल बाकीचे करतात. त्यांनी हा भाई आणि या मुलांनी केलेला नृत्याविष्कार जरुर पहावा. छोट्या छोट्या पण पहावयाला सुखकारक स्टेप्स कशा करता येतात हे नक्की शिकता येईल.

आनंदवनातल्या आणि आमटे यांच्याबद्दल बोलताना भाई बोरकरांची एक कविता सांगतात

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

भाई,  अगदी पटले हे. हेच तुमचे ही हात जे हार्मोनियम वर अगदी सहजपणे फिरले आणि त्यांनी सुरांची मैफल निर्मिली, लेखणीतून अजरामर साहित्य निर्माण केले. या निर्मिती मागचा ध्यास या बोरकरांच्या कवितेतून दिसून येतो.

कुमार गंधर्व गेल्याचीे दु:खद बातमी कळल्यावर भाई म्हणतात, “आम्ही हा जन्म आनंदाने जगलो कारण आम्ही कुमार ऐकला”
भाई, एक सांगतो,  आज आम्ही पण असे म्हणू की आम्हीही आनंदाने जगू कारण आम्ही ‘भाई’ पाहिला, भाईंचे लेखन वाचले आणि अनुभवलेही.

“शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले”

असे शेवटचे गाणे जेंव्हा सिनेमा संपताना लागते तेंव्हा एकच गोष्ट जाणवते,

“भाई पाहून कळले सारे  भाईं च्या पलीकडले”

समाप्त 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक.. महाराष्ट्री प्राकृतचे एक आधुनिक रूप… मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून  केलेला दिसून आलेला आहे.. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्वही प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भरही पडत आहे..

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मराठीने फडकवले अटकेपार निशाण

माय मराठीच आहे जगाचा अभिमान

मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी १ जानेवारी ते १५ जानेवारी हा कालावधी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्यात येतो..

मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची खरी ओळख व महाराष्ट्राची संस्कृती असं म्हटले तरी काही वावग ठरणार नाही.. मराठी भाषेचा गोडवा,भाषेची संस्कृती त्यांचे महत्व अगदी जगभरात पोहोचले आहेत. महाराष्ट्रात बाहेरून येणारा प्रत्येक माणूस मराठी भाषा ही कळत नकळतपणे का होईना पण शिकतोच आणि बोलतो सुद्धा..

एखाद्या पर्यटनस्थळाच्या त्या त्या ठिकाणचा उत्सव, त्या त्या पर्यटनस्थळाचा इतिहास, त्याचा भूगोल, आजूबाजूचा परिसर, अश्या  विविध गोष्टींचे महत्व आपल्याला माहितीतून समजतो त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि तिचं महत्त्व, तिचा इतिहास, तिच्या विविध बोली, तिचं साहित्य, हजारो मराठी पुस्तके- ग्रंथ,  ग्रंथांमध्ये उपलब्ध असलेली माहिती, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकताना त्याचे होणारे फायदे, तिच्या समोरची आव्हाने, काळानुरूप नवं स्वीकारण्याची तिची ताकद या आणि अश्या अनेक गोष्टींवर लोकांनी एकत्र यावं, त्यावर चर्चा करावी तिचं महत्त्व जाणून घ्यावं, तिचा प्रचार-प्रसार करावा आणि अश्या दैदीप्यमान इतिहास लाभलेल्या या मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा हा शासनाचा मराठी भाषा पंधरवड्यामागे मुख्य  हेतू आहे..

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे अतिशय मोलाचे आहे कारण आपण महाराष्ट्र राज्यात राहतो तो आपल्याला मराठी होण्याचा गर्व आहे. मग मराठी भाषा जतन करणं हे तर  आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण शिक्षकवृंद विद्यार्थ्यामध्ये मराठी भाषा विषयी प्रेमाचे जतन करू शकतो.

ह्यासाठी आपण अनेक माध्यमातून  मराठी भाषेचे जतन करू शकतो. उदा. द्यायचेच झाले तर..मराठी भाषा पुस्तक दिंडी काढणे, मराठी भाषेवर कवी, साहित्यिक, ई. यांचे व्याख्यान आयोजन करणे, मराठी भाषेवर निबंध स्पर्धा, मराठी भाषा शुद्ध लेखन स्पर्धा, मराठी  पुस्तके वाचणे, नामांकित लेखिका व लेखक यांच्या पुस्तकांचे अभिवाचन करणे,  पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे, मराठी भाषेत शुभेच्छा पत्र तयार करणे, वकृत्व स्पर्धा, मराठी गीत गायन स्पर्धा,  मराठी भाषेचे विविध साहित्यिक,कवी,लेखक, लेखिका  यांची समग्र माहिती देणे, तसेच मराठी भाषा – कथा कथन इत्यादी..असे विविध उपक्रम राबवून व अनेक प्रकारांनी आपण मराठी भाषेसाठी प्रचार व प्रसार करू शकतो..

महाराष्ट्राचे भौगोलिक व सांस्कृतिक वैविध्य जपत मराठी भाषेमध्ये मोठी वैचारिक संपदा निर्माण झाली आहे.  विविध लोककला,नाटक, कविता, ग्रंथ असे अनेकानेक उत्तमोत्तम साहित्य लिहिले गेले..  ही वैचारिक संपदा जपण्यासाठी, मराठीचे वैभव वाढविण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे मी इथे मनापासून नमूद करीन..

खरे तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. या सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या निग्रहाची.. मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची नाही का.. !

जसं वर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करतो आणि वर्षभर  त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो अगदी त्याचप्रमाणे एक जानेवारीला भाषिक संकल्प करण्यास काहीच हरकत नाही… हो ना…!!

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संक्रांत सण हा मोठा (भाग -1) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ संक्रांत सण हा मोठा (भाग -1) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

मला सगळेच सण आवडतात. केवळ हिंदू धर्मातलेच नव्हेत, तरणी धर्मातीलही. एकसूरी जीवनात सण वैविध्य घेऊन येतात. आनंद लहरी निर्माण करतात. जगण्यात एक प्रकारचं चैतन्य निर्माण करतात. नवा विचार देतात. नवा जोश निर्माण करतात. आता कुठला सण मला जास्त आवडतो, हे सांगणं मात्र अवघड आहे. कारण प्रत्येक सणाचा स्वत:च असा एक रुपडं आहे. एक व्यक्तिमत्व आहे.  प्रत्येकाचं रूप वेगळा. रंग वेगळा, गंध वेगळा आहे.  वैशिष्ट्यपूर्ण आहे. तरीही लहानपणी ‘तुमचा आवडता सण’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला की मी हमखास संक्रांतीवर लिहायची. का सांगू?

संक्रांत सण हा मोठा । नाही तीळ-गुळा तोटा ।

लहानपणी तीळ-गुळ देण्या-घेण्याची, विशेषत: घेण्याची फार हौस. संध्याकाळी घरातून एक लहानसा अर्धा डबा हलवा घ्यायचा. ( तो बहुदा घरी केलेला असे. ) त्यात चार तीळ-गुळाच्या वड्या टाकायच्या. (खास मित्र-मैत्रिणींना देण्यासाठी.) हे घेऊन बाहेर पडायचं. ‘तीळ-गुळ घ्या. गोड बोला’ असं जवळ जवळ ओरडत, दुसर्‍याच्या हातावर चार दाणे टेकावायचे आणि त्यांच्याकडून चाळीस नाही तरी चोवीस, निदनचे चौदा दाणे हातात येताहेत ना, हे बघायचं. वडी मिळाली तर ती लगेच तोंडात आणि पाठोपाठ पोटात. तीळ-गुळ खात खात घरी आलं, तरी जाताना अर्धा नेलेला डबा येताना तुडुंब भरलेला असे.

वाढत्या वयाबरोबर हा हावरटपणा  कमी झाला, तरी हलवा आणि तिळाची वडी रसनेला देत असलेली खुमारी अजूनही काही कमी झाली नाही.

लहानपणी पाहिलेली गोष्ट म्हणजे सुवासिनी आस-पासच्या घरातून, शेजारणी- मैत्रिणींना मातीची सुगडं नेऊन देत. त्यात उसाचे कर्वे, हरभर्‍याचे घाटे, भुईमुगाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, बोरं, तीळगूळ घातलेला असे. ही प्रथा कृषिसंस्कृतीतून आलेली. आपल्या शेतात, मळ्यात जे पिकतं, त्याचं स्वागत करणारी ही प्रथा. नुसतं स्वागतच नव्हे, तर त्याचा वानवळा शेजारी-पाजारी देऊन त्यांच्यासहित या नव्या पिकामुळे झालेला आनंद साजरा करायचा. पुढे प्रथेमागचा विचार लोप पावला. परंपरा मात्र मागे उरली. मराठीत एक म्हण आहे. ‘चापं गेली आणि भोकं मागे उरली.’ चापं म्हणजे कानात घालायचा दागिना. तो घालण्यासाठी कानाला छिद्र म्हणजे भोकं पाडावी लागतात. तसं कालौघात शेती- मळेच राहिले नाहीत. मग त्यातलं धान्य, भाज्या, शेंगा वगैरे कुठल्या? मग या गोष्टी विकत आणायच्या पण सुगडं वाटायचीच.

खरं तर मूळ शब्द सुघट  म्हणजे चांगला घट असा असणार. शब्द वापरता वापरता, उच्चार सुलभीकरणातून तो सुगड झाला असावा.

तीळगूळ, दसर्‍याला सोने यांची देवाण-घेवाण स्त्रिया-पुरुष सगळेच करतात. पण सुगडं वाटतात. सुवासिनीच. कधी कधी घरातल्या मुलीसुद्धा शेजारी-पाजारी सुगडं देऊन यतात. याला थोडे सामाजिक परिमाणही आहे.  पूर्वीच्या काळात, स्त्रीचं जगणं बरचसं उंबर्‍याच्या आतलं असायचं. सुगडं वाटाण्याच्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडायची संधी मिळायची. थोडा बाहेरचा वारा लागायचा. बरोबरीच्या सख्या, मैत्रिणी-गडणींशी गप्पा-टप्पा व्हायच्या. विचारांची, भावनांची देवाण-घेवाण व्हायची. मन मोकळं करायचं आणि पुन्हा घाण्याला जुंपायचं.

सुगड म्हणजे चांगला घट. तो मातीचा घ्यायचा. धातूचा नाही. मातीच्या घटालाच सुगड म्हणतात. धातूच्या घटाला कलश म्हणतात. मातीचा घट हे भूमातेचे प्रतीक आहे. ती धान्य , भाजीपाला, फळे पिकवते. भूमीचे प्रतीक असलेल्या घटात, तिने पिकवलेल्या गोष्टी घालून सुगडं एकमेकींना द्यायची. तिच्या सृजनाचा गौरव करायचा आणि तोही कुणी? तर  सृजनशील असलेल्या स्त्रीने.

भोगीच्या दिवशी, म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी, घरोघरी मुगाच्या डाळीची खिचडी, बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, गाजर, पावटा, वांगी अशा त्या काळात येणार्‍या भाज्यांची चविष्ट, मसालेदार रसदार मिसळ भाजीचा बेत असतो. भाजी-भाकरीबरोबर दही, लोणी, खिचडीवर ताज्या काढवलेल्या साजूक तुपाची धार…. वाचता वाचता सुटलं ना तोंडाला पाणी?

संक्रांतीच्या दिवशी कुठे गुळाची पोळी, तर कुठे पुरणाची. हरभर्‍याची डाळ-गूळ घरात नुकताच आलेला. ताजा ताजा. मग त्याची पोळी। गुळाची किवा पुरणाची. त्यावर तुपाची धार किंवा अगदी वाटीतूनसुद्धा तूप. त्याचा घास म्हणजे अमृततूल्यच ना! अमृत कसं लागतं, हे कुठे कुणाला माहीत आहे? कदाचित देवच सांगू शकतील कारण त्यावर त्यांची मक्तेदारी. अमृत काय किंवा देव काय, कविकल्पनाच फक्त. गुळाची किवा पुरणाची पोळी ही स्वसंवेद्य. स्वत: अनुभव घ्यायचा आणि तृप्त व्हायचं.

क्रमशः …

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग – 4 ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग – 4 ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

 

*तुला शिकवीन चांगलाच धडा*

पुढची ओळ  काय बरं ?

तुला शिकवीन चांगलाच धडा,

समीक्षक आहेस  ना तू ?

मग  माहितीही पाहिजे खडान,खडा

कोण आहे ?

मी सुनीता  देशपांडे

अहो , सुनीता बाई ? तुम्ही स्वतः ?

हो. आश्वर्य वाटलं? ? भाई येऊ शकतात , तर मी नाही ?

नाही तस नाही.

भाई – उत्तरार्ध ची जहिरात बघितलीस?

हो हो बघितली, ती फुलराणी आठवत होतो, ‘तुला शिकवीन चागला धडा’.

हं  ८ तारखेनंतर दुसरा भाग बघशील, त्यावर मग परीक्षण/समीक्षा ???  लिहिशील.म्हणलं त्या आधीच  तुझी शाळा घ्यावी. काही हरकत ?

छे!  मी कोण हरकत घेणारा ?  चूक समजली की सुधारायला मदतच होते की .साक्षात  ‘ बाळासाहेब  ठाकरें’ ना  वर्गाबाहेर उभे करणा-या तुम्ही , माझी हिम्मत तरी  आहे का तुम्हाला नाही म्हणायची ?

हं, प्रासंगिक विनोद निर्मिती  करताना ही  वास्तविक  विचार  करता आला पाहिजे. त्यावेळी वर्ग चालू असताना ‘ वहीत ‘ व्यगंचित्रे काढणारा तो  खरोखरच ‘ बाल’ ठाकरे माझा विद्यार्थी  होता. त्याचे ‘ बाळासाहेब’ नंतर झाले होते.

बरं, दाखव   ते तू मागे लिहिले दोन भाग – भाईं वरचे

हो  हो , घ्या  हे घ्या मोबाईल .अनुदिनीत मी लिहिलेले कायम ठेवतो मग मिळायला सोपे जाते .

नाही मला लिखित स्वरूपातले पाहिजे आहे.

कागदावर  लिहिलेले  लेखन  माझ्याकडे नाही. जे काही असेल ते  मोबाईलवरच करतो.

आणि मग  झालेल्या शुध्द्व लेखन , व्याकरणाच्या चुका तशाच राहतात. इतरही  पुढे ढकलणारे  चुका दुरुस्त न करता  तसेच पाठवतात. काय गडबड आहे  एवढं प्रसिध्द व्हायची ? आम्ही एखादी गोष्ट , लेख  लिहायचो, चारदा तपासायचो मग पोस्टाने  संपादकांना पाठवायचो मग त्यांच्या उत्तराची वाट बघायचो. खुप वेळ जायचा आणि मग उत्सुकता ही रहायची छापून यायची.  ती मजा तुमच्या पिढीला नाही. आलं मनात,  लिहिलं, टाकले फेसबुक,  Whatsapp वर

जे लिहितात ते नीट कागदावर लिहा, तपासा. असा पेपर संग्रही राहतो , वेळप्रसंगी परत लगेच मिळतो , आवश्यक बदल करता येतात.  लावून घ्या ही सवय.

हो हो सुनीता बाई.

कितीही काल्पनिक लेखन असलं तरी  ज्या व्यक्तीवर आपण लिहीत आहोत त्याच्या मुळ स्वभावा विरुध्द्व चे चित्र सादर करणे/ लिहिणे चुकीचेच. अशा लेखाची
‘हवा आठवड्यातून फारतर  दोन दिवस  राहते’. कायमस्वरुपी नाही

हं , एखादे उदाहरण द्याल ?

हे बघ तुझा लेख.

स्वर्गात मी आणि भाईं मधील चर्चा खुमासदार झालीय यात शंकाच नाही . पण मी भाईंना म्हणते भाई लवकर निघून पर्वतीवर जाऊया , सारसबागेतील गणपतीला जाऊ या ?
मी म्हणते तसं वय्यक्तिक संदर्भ इथे येतात.

अरे  भाईच्या अखेरच्या घटका शिल्लक असतानाही मी कधी ‘देव’ आठवला नाही , सत्यनारायणाचा ‘प्रसाद’ ही मी निव्वळ ‘शिरा’ म्हणून खाल्ला आणि तू मला सरळ सारसबागेतल्या देवळात घेऊन गेलास ?  ही मोठी विसंगती, चूक

हो हो आलं लक्षांत.

त्या पेक्षा  पुण्यातील एका परिसंवादाला हजेरी लावू, किंवा  एखादं मस्त नव्या कलाकारांच नाटक बघू  हे चाललं असत रे.

हो हो खरं आहे तुमचं

परीक्षण करताना  किंवा समीक्षा करतां ऋण / धन दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे . एकाच बाजूने लिहिणे बरोबर नाही ना ?

खरं आहे पण सिनेमात ऋण बाजू अशी वाटली नाही

का नाही ?  काही जणांनी त्यावर लिहिलं की

कशाबद्दल बोलताय , कळलं नाही

हेच  भाईंचे  सिगरेट ओढणे, ड्रिंक्स घेणे, त्यासाठीची धावपळ. याची आवश्यकता होती का नव्हती?  असेल तर का ? नसेल तर का नको?याचा सर्वसमावेशक विचार परीक्षण लिहिताना व्हायला पाहिजे.

मात्र हे दाखवलेले कितपत खरं आहे याची ‘ सत्यता’ समजणे फार अवघड आहे. मग यातून वाद – विवाद अटळ.

खरं आहे.

तुम्ही जेव्हा बायोपिक सारखे सिनेमा करिता तेव्ह्या व्यक्तिगत आयुष्यातले कांगोरे कितपत दाखवावे आणि नेमके कशावर फोकस करावा  हे  ठरवणे फार अवघड जाते
नुकतेच सगळ्यांनी पाहिलेले एक ‘कडक’  उदाहरण म्हणजे

‘ आणि डाॅ काशिनाथ घाणेकर .  . . .

हा सिनेमा आहे तसा स्वीकारला गेला कारण सिनेमात

व्यसना संबंधीत दाखवलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष जीवनातील गोष्टी  मिळत्या जुळत्या होत्या. निदान तशी माहिती अनेकांना होती. मात्र भाई सिनेमातील प्रसंग  आणि दाखवलेली पार्श्वभूमी तशी ब-याच जणांना धक्कादायक वाटून गेली. याचे योग्य प्रतिबिंब एक समिक्षक म्हणून लिहिलेल्या लेखात यायला पाहिजे.

चल निघते मी,  दुस-या भागात विजया ताईंनी ‘ सुंदर मी होणार ‘  ची आठवण सांगितली आहे तसे आता तू  ही ठरव

‘सुंदर मी लिहिणार  ‘ . शुभेच्छा

धन्यवाद सुनीता बाई ?

©  श्री अमोल अनंत केळकर

१६/१/१८

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूगोल दिन १४ जानेवारी ☆ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर यांनी संगणक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व पदार्थविज्ञान या विषयात उच्चशिक्षण घेतले आहे.  एक लोकप्रिय ललित लेखिका म्हणून त्यांचे विविधांगी लिखाण नामवंत वृत्तपत्रे व मॅाम्सप्रेसो या ब्लॅागसाइटवर प्रकाशित झाले आहे. अनेक कथा, लघु कथा, लेख, कविता, पुस्तक परिक्षण, अर्थगर्भ सुविचार, शब्दांकन, कलाकृती असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांच्या स्वतःच्या साहित्य वाचनाचे रेडिओवर कार्यक्रम होत असतात. अर्थगर्भ लिखाण करणाऱ्या या लेखिकेला योगाभ्यास, पर्यटन, वाचन, क्रीडा प्रकार आणि टपाल व चलन संग्रह यातही रुची आहे.

☆ विविधा ☆ भूगोल दिन १४ जानेवारी ☆ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

 

ऐरोली-ठाणे खाडीकिनारी ‘फ्लेमिंगो’ नी बहरलेले दृश्य बघायला छोटी शर्वरी आपल्या आई-बाबां बरोबर गेली होती. पांढरे गुलाबी उंच पक्षी बघून तिला खूप आनंद झाला होता. तिचे प्रश्न चालू झाले, “आई, हे पक्षी कुठून आले? हे किती दिवस इथे राहाणार? मग आपल्या घरी ते परत कधी जाणार? आपण गावाला गेलो की असे दोन महिने कुठे राहातो?” आईला मात्र फ्लेमिंगो आणि त्याबरोबर सेल्फी काढण्यात जास्त रस होता.

“भूगोलाचे ज्ञान हे शाळेत परिक्षेत पास होण्यासाठी मिळवलेले मार्क” अशी समजूती असलेली तिची आई, गौरी. अशा समजूतीत असणारी गौरी ही काही एकटी नाही. भूगोल हे एक शास्त्र आहे आणि त्याला विज्ञान शाखेतील पदवी मिळते. हे देखील अनेक जणांच्या गावी नसते.

अशा पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात चौदा जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो, याची किती जणांना कल्पना आहे?

कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे माजी प्राचार्य आणि राज्यातील थोर भूगोलतज्ज्ञ सी. डी. देशपांडे एक

प्रख्यात व्यक्तिमत्व. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ, त्यांच्या जन्मदिनी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन ‘भूगोल दिन’ साजरा करायचा असे ठरले. त्याप्रमाणे पुण्याचे डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली.

भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) म्हणतात. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द Geo चा अर्थ Earth किंवा पृथ्वी आणि Graphiya म्हणजे graphein या शब्दाचा अर्थ वर्णन करणे किंवा लिहिणे असा होतो. या वरून आपल्या लक्षात येते की पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, तिच्या वरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे.

मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल आणि त्याचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो.

शाळेत असताना गणिताबरोबर सर्वात नावडीचा दुसरा विषय कोणता, यावर बहुतेक सर्व लोकांचे एकमत होईल, तो म्हणजे भूगोल. शाळेत भूगोल शिकवणारा शिक्षक हा तोच विषय घेऊन पदवीधर झाला असेल, हे त्याहून कठिण. मग हा विषय नेहमीच उपेक्षित राहिला, तर त्यात नवल काय?

भूगोल शाळेत शिकतो तसा फक्त राजकीय भूगोलाशी मर्यादित नसतो तर त्याच्या अनेक उपशाखा आहेत.  वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography ) सागरशास्त्र (oceanography), जंगलशास्त्र (forest geography), जैवशास्त्र (biogeography), शेतीविषयक (agriculture), तसेच मानवीशास्त्र. या सर्व शाखांचा आपल्या दैनंदिन जीवनात, राज्याच्या नियोजन आणि विकास क्षेत्र तसेच देशाच्या सीमासुरक्षेतेसाठी देखील उपयोग होत असतो.

असा हा भूगोल अनेक क्षेत्रात उपयोगी पडणारा आणि त्यामधे नोकरी – व्यवसायाच्या संधी असणारा. यामधील काही संधी – कारटोग्राफी (cartography) – नकाशे बनवणाऱ्या व्यक्ती, सव्‍‌र्हेअर – भूमापन, सर्वेक्षण करणे,  ड्राफ्टर, शहर नियोजन, शासकीय कर्मचारी – केंद्र किंवा राज्य सरकारच्या भूविकास, भूनियोजन, भूमापन, भूजलविकास विभाग,  जीआयएस (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) स्पेशालिस्ट, क्लायमेटोलॉजिस्ट – हवामानतज्ञ, वाहतूक व्यवस्थापक, पर्यावरणीय व्यवस्थापन, पर्यटन , डेमोग्राफर – केंद्रीय जनगणना कार्यालय. जी.आय.एस, जी.पी.एस यामधे झालेली प्रगती व त्याची गरज आपल्याला वेगळ सांगायची गरज नाही. यावरुन भूगोल विषयाचे महत्व अधोरेखीत होते.

चौदा जानेवारी म्हणजे सूर्याच्या संक्रमणाचा दिवस. मकर संक्रातीचा दिवस यापलीकडे जाऊन तो भूगोल दिन म्हणून साजरा होतो, याची जाणीव सर्वांना व्हावी ही इच्छा. नाही तर आपला भूगोल फक्त प्लस्टीकचा वापर टाळा किंवा गुगल मॅपवर लोकेशन लावण्या पुरताच मर्यादित असतो आणि बाकी सगळा गोल… असं नको व्हायला, म्हणून हा प्रपंच.

©️ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ६) – राग बिहाग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ६) – राग बिहाग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

” तेरे सूर और मेरे गीत दोनो मिलकर बनेगी प्रीत” गूंज उठी शहनाई या चित्रपटांतील श्री वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले,१९५०चा उत्तरार्ध व १९६०च्या दशकाची सुरवात या कालावधीत अत्यंत लोकप्रिय झालेले हे गीत म्हणजेच राग बिहाग! “बीती ना बिताये रैना हेही परिचय सिनेमांतील गाणे बिहागचेच उदाहरण म्हणून घेता येईल. बाल गंधर्वांच्या नाट्य संगीताने भारावलेला मराठी रसिकवर्ग म्हणेल की संगीत स्वयंवरांतील रुख्मिणीच्या तोंडचे “मम आत्मा गमला”हे पद म्हणजेच बिहाग किंवा सुवर्णतुला नाटकांतील अंगणी पारिजात फुलला हे सत्यभामेचे गीत म्हणजे बिहाग! कितीही वेळा ही गाणी ऐकली तरी प्रत्येकवेळी नवीनच वाटावी अशी ही कर्णमधूर स्वररचना!

“कोमल मध्यम तीवर सब चढत री ध त्याग

ग नि वादी संवादी ते जानत राग बिहाग”

राग चंद्रिकासार या पुस्तकांत बिहाग रागाचे असे वर्णन केलेले आढळते.

या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे हे वर्णन पलुस्करी पद्धतीने केले आहे. शास्त्रीय संगीतात भातखंडे आणि पलुस्कर या दोन सांगितिक भाषा ग्राह्य आहेत.ज्याला  भातखंडे तीव्र म म्हणतात त्याला पलुस्कर कोमल म अशी संज्ञा देतात तर भातखंड्यांच्या शुद्ध स्वरांना पलुस्कर तीव्र स्वर म्हणतात.

बिलावल थाटजन्य असा हा राग, ओडव~ संपूर्ण जातीचा.(आरोहांत पांच स्वर आणि अवरोहांत सात स्वर) शास्त्रानुसार रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी गायचा हा राग. सा ग म प नी सां/ सां नी धप म ग रेसा असे आरोह ~ अवरोह असलेल्या या रागांत तीव्र मध्यम अतिशय अल्प प्रमाणात घेतला जातो तसेच अवरोही स्वररचनेत रिषभ व धैवत अतिशय दुर्बल स्वरूपांत वावरतांना दिसतात. अल्प तीव्र मध्यमाचा उपयोग अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने केला जातो. विशेषतः अवरोहांत पंचम लावताना व पंचमावरून खाली येतांना तीव्र मध्यम घेण्याची प्रथा आहे. जसे “सां नी ध म(तीव्र)प म(तीव्र) ग म ग” —— राग ओळखण्याची ही महत्वाची खूण आहे. युवतीने तिच्या लांबसडक केसांत  एखादेच मोहक गुलाबाचे फूल खोचावे व आकर्षकता वाढवावी तसा बिहागमधील हा तीव्र मध्यम राग आकर्षक करतो. या रागाची प्रकृती एकंदरीत गंभीर परंतु लोभस! त्याचा लालित्यपूर्ण स्वरविलास आनंददायी आणि नैराश्य दूर करणारा आहे. “लट उलझी सुलझा जा बालम” ही बंदीश ऐकली की त्यातल्या सुरांचा हळुवारपणा जाणवतो. बिहागच्या स्वरांचा प्रेमळ स्पर्ष अनुभविण्यास मिळतो, तो किशोरी अमोणकर, अश्विनी भिडे यांनी गायिलेल्या “बाजे री मोरी पायल झनन” या विलंबित तीनताल बंदिशितून.

अंतर्‍याचे गमपनीसां हे सूर ऐकले की सासरी निघालेल्या भावविवश मुलीचा चेहेरा  नजरेसमोर येतो नि मग आठवण येते ती कविवर्य भा.रा.तांबे यांच्या “नववधू प्रिया मी बावरते” या कवितेची.

कवी राजा बढे यांनी बिहागाच्या स्वभावाचे वर्णन कसे केले आहे बघा……. ते  म्हणतात,

“लाविलेस तू पिसे मुळी न बोलता

राहू दे असेच मुके मुळी न बोलता

ओठ हे अबोलके तरीही बोलती मुके

बोललो कितीतरी मुळी न बोलता”

बिहागचं देखणं रूप म्हणजेच मारूबिहाग. ह्यांत तीव्र मध्यम म्हणजे ह्याचा प्राण स्वर! “रसिया हो न जावो” ही बडा ख्याल बंदीश आणि ” जागू मै सारी रैना” ही मध्यलय बंदीश अनेक मैफिलींतून गाईली जाते व दोन्ही फार लोकप्रिय आहेत.

उपशास्त्रीय व सुगम संगीत या प्रकारात मारूबिहागला अधिक मानाचे स्थान आहे.सजणा का धरिला परदेस हे ,हे बंध रेशमाचे  या नाटकातील पद ,मारूबिहागातील, बकूळ पंडीत यांनी अजरामर करून ठेवले आहे.

छाया बिहाग, चांदनी बिहाग, नट बिहाग, पट बिहाग, हेम बिहाग, मंजरी बिहाग असे बिहागचे बरेच प्रकार आहेत. एकूणच बिहागचा पसारा विस्तीर्ण आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 81 – लेखनाने मला काय दिले …. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 81 ☆

☆ लेखनाने मला काय दिले …. ☆

(मैं निःशब्द हूँ और आपका आभारी भी हूँ ।  ई-अभिव्यक्ति मंच को मराठी साहित्य में एक स्थान दिलाने में  आपका साहित्यिक सहयोग अविस्मरणीय है।आज इस श्रृंखला में यह आपकी गौरवपूर्ण  81वीं रचना है। हम आपसे ऐसे ही साहित्यिक सहयोग की अपेक्षा करते हैं । आपकी लेखनी को सादर नमन ??)

आपण ब-यापैकी लिहितो हे मला शाळेत असतानाच समजले, आठवीत असताना मी वर्गाच्या हस्तलिखीतासाठी पहिल्यांदा एक हिंदी कविता आणि मराठी कथा लिहिली होती, नंतर अकरावीत असताना माझ्या हिंदी निबंधाचं बाईंनी खुप कौतुक केलं!

शाळेत असतानाच हिंदी कविता प्रकाशित झाल्या, रेडिओ लिसनर्स क्लबच्या रेडिओ पत्रिकांमधून! त्या कविता आवडल्याची झुमरी तलैय्या, राजबिराज (नेपाल) अशी कुठून कुठून पत्रं आली होती.

छापील प्रसिद्धी मला खुप लवकर मिळाली, कथा/कविता आवडल्याची पूर्वी पत्रे येत नंतर टेलिफोन – मोबाईल वर लोक आवर्जून कौतुक करतात. खुप छान वाटतं, युवा सकाळ, प्रभात,  चिंतन आदेश या साप्ताहिकातून सदरे लिहिली त्या लेखनाने खुप आनंद दिला, आकाशवाणी वरच्या श्रुतिका लेखनाने प्रसिद्धीआणि पैसा दोन्ही मिळालं, स्वराज्य मधल्या कवितेचं ऐंशी साली दहा रूपये मानधन मिळालं (ते आयुष्यातलं पहिलं मानधन) तेव्हा खुप आनंद झाला होता.

लेखनाने मला आयुष्यात बरेच मोठे समाधान दिले आहे, मान मिळाला, अल्प स्वल्प का होईना मानधन मिळाले, स्वतःची ओळख निर्माण करता आली. मुख्य म्हणजे  अनेक संस्थांनी लेखिका, कवयित्री, गजलकार म्हणून नोंद घेऊन पुरस्कारही दिले!

सध्या ई अभिव्यक्ती वरचे लेखनही खुप समाधान देत आहे, मला ही संधी दिल्याबद्दल हेमंतजींचे आभार!

खरोखर लेखणी ने आयुष्याचे सार्थक केले, मी ज्या सामाजिक गटातून आले आहे तिथे इथवर येणं खुप मुश्किल होतं, त्या काळात बाईचं अस्तित्व चार भिंतीत बंदिस्त होतं आणि मी ते स्विकारलं होतं, अपेक्षा नसताना,फार आटापिटा न करता हातून लेखन झाले ही नियतीची कृपा!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print