कोणती भेट अखेरची असेल, कोणते शब्द अखेरचे असतील हे माहीत नसण्याच्या काळात आपण आजच्या, आताच्या गोष्टी उद्यावर का ढकलत असतो हे कळत नाही, हे नाकारता येणार नाही!
आपण महाभारतातील एक कथा निश्चित ऐकली असेल… ज्यात धर्मराज युधिष्ठीर एका याचकाला उद्या दक्षिणा घ्यायला ये! असे सांगतात. त्यावर बलभीम आश्चर्याने म्हणतात…. दादाला ते उद्या ती दक्षिणा द्यायला निश्चितपणे जिवंत असतील असा आत्मविश्वास आहे, असे दिसतं! या कथेतून घ्यायला पाहिजे तो बोध माणसं विसरून जातात…. किंबहुना तशी दैवाची योजनाच असावी किंवा आपले भोग!
परिचयातील एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असते खूप दिवस. भेटीस जाण्याचं खूपदा ठरतं आणि राहून जातं! घरातली जाणती, म्हातारी माणसं सांगून सांगून थकतात… कर्त्यांना त्यांच्या व्यापातून सवड काढणं होत नाही… मग धावपळ करून अंतिम ‘दर्शना’चा सोपस्कार करावा लागतो… जो कितपत खरा असतो? कुणाचं दर्शन घेतो आपण? की आपण आल्याचं इतरांना दिसावं अशी योजना असते ती?
ज्या व्यक्तीबद्दल नंतर जे बोललं जातं… ते त्या व्यक्तीबद्दल असलं तरी त्या व्यक्तीला ऐकता येत असेल का? कोण जाणे? त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या हयातीत त्याच्या कानावर हे शब्द पडले असते तर?
एखाद्या व्यक्तीचं कौतुक करायचं राहून जातं….. योग्य प्रसंगाची प्रतीक्षा करण्याच्या नादात. एखाद्याचं देणं द्यायचं राहून जातं…. देऊ की योग्य वेळी असं वाटल्यामुळे.
….. आपल्याकडे प्रेम शब्दांतून व्यक्त करण्याची पद्धत नाही…. पण कृतीतून व्यक्त करायला कुणाची आडकाठी आहे? पण हे सुचत नाही.
मी हे जे काही सांगतो आहे ते आधी कुणी सांगितलं नाही असं नाही! बेकी हेम्स्ली नावाच्या एका ब्रिटीश कवयित्रीने हे तिच्या भाषेत सांगितलंय नुकतंच. तिच्या त्या इंग्लिश शब्दांचं स्वैर भाषांतर इथं दिलं आहे.. शक्य झाल्यास तुम्ही ती कविता स्वत: वाचावी म्हणून… उद्या किंवा आजच!
तुझं माझ्यावर किती प्रेम होतं हे सांगण्यासाठी मी कायमचे निघून जाईपर्यंत वाट पाहू नकोस !
तुझ्या आसवांमधून माझी कीर्ती तू सांगशीलही पण ती ऐकायला मी असायला तर पाहिजे ना?
तुझं माझ्यावरच्या प्रेमाचं गुपित असं राखून ठेवू नकोस…. उद्या सांग किंवा सांगून टाक आजच !
मग मी ही तुला सांगेन तुझ्यातलं चांगलं …. तू कसा आहेस आणि कसं तू मला प्रेरित करतोस ते!
तू ऐकत असतानाच मी तुला सारं सांगेन अगदी हृदयापासून
….. ‘तू होतास’ ऐवजी ‘तू आहेस’ असं म्हणायला आवडेल मला
‘असं आहे’ हे ‘असं असायचं’ पेक्षा कितीतरी सुंदर आहे, नाही?
तुझ्या अस्तित्वाच्या उजेडात मी बोलेन तुझ्याविषयी ….
….. नंतरच्या अंधारात प्रेमाचे शब्द मनालाही ऐकू येत नाहीत!
म्हणून फार तर उद्याच मला सांग जे तुला वाटतं ते, किंवा आजच, आत्ताच का नाही सांगत?
…. कारण … उद्या असेल का आपल्या नशिबात कुणास ठाऊक?
…. कुणीतरी आपलं आहे… हे आपण ऐकत असताना कुणीतरी सांगणं किती महत्त्वाचं आहे नाही?
☆ अभिजात मराठीपुढील आव्हाने… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
मिरज विद्यार्थी संघातर्फे “जागर मराठीचा २०२४”, सन २०२५ च्या १०० व्या वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने विशेष व्याख्यानमाला झाली. या मध्ये सांगली येथील प्रा अविनाश सप्रे यांचे “अभिजात मराठी पुढील आव्हाने” या विषयावर अतिशय सुरेख व्याख्यान झाले. त्या व्याख्यानाचा मिरजेतील श्री मुकुंद दात्ये यांनी अत्यंत प्रभावी घेतलेला आढावा, आपणापर्यंत पोहोचवल्याशिवाय रहावले नाही.
सरांनी आपल्या सव्वा तासाच्या भाषणात अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? तो कसा मिळतो? याचे सविस्तर विवेचन केले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय होते? त्यामुळे काय आव्हाने उभी आहेत हे सांगितले. ते एका प्रकारे आपलेच कठोर परीक्षण होते.
भाषा म्हणजे संस्कृती. पुर्वी इंग्लंडमध्ये लॅटिन भाषा बोलली जात असे. इंग्रजीला गावंढळ भाषा समजली जात असे. अगदी शेक्सपीअरच्या नाटकातही दुय्यम पात्रे इंग्रजीत बोलत असत. पुढे इंग्रजी भाषेवर लेखकांनी व अनेकांनी खूप काम केले व तिला पुढे आणले.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भाषा मोठी होत नाही. ती मोठी असतेच. तिला तसा दर्जा शासनदरबारी दिला जातो. तिच्या मोठेपणावर एक शासकीय मुद्रा लावली जाते एवढेच.
शासनाने एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ती कमीतकमी दोन हजार वर्षे पुरातन असली पाहिजे. ती सतत वापरली जात असली पाहिजे असे काही निकष ठरवले आहेत. अर्थात निकषांची पूर्तता होते की नाही हे अखिल भारतीय पातळीवरची समिती ठरवते. त्या समितीत तीन अमराठी भाषेतील लेखक सदस्य असतात.
दक्षिणेकडील राज्ये भाषेच्या बाबतीत फारच स्वाभिमानी आहेत. संवेदनशील आहेत. कोणत्याही पक्षाचे सरकार असो ते त्यांच्या भाषेबाबत अभिमानीच असतात. त्यामुळे भिजात भाषेच्या दर्जा देण्याचे ठरवल्यानंतर तसा दर्जा मिळविण्याचा पाहिला मान तामिळ भाषेने मिळवला.
त्यानंतर एक दोन वर्षच्या अंतराने तो मान मल्ल्याळम, कन्नड, उडीसी भाषेने मिळवला. त्यांनी अर्ज करायचा. पुरावे द्यायचे आणि दर्जा मिळवायचा असे घडत गेले. त्यासाठी दिल्लीत मोठे राजकीय पाठबळ, प्रश्न पूढे रेटण्याची ताकद असावी लागते. त्याबाबतीत आपले लोक फारच थंड असतात. त्यांना भाषेच्या प्रश्नाचे काहीच पडलेले नसते. ते आपले राजकारण आणि निवडणुका यात गर्क असतात.
यशवंतराव चव्हाण दिल्लीत असताना त्यांचे मराठी भाषा, मराठी लेखक यांच्याकडे लक्ष असे. लेखकांच्या वैयक्तिक कामातही ते मदत करत.
ना. धो. महानोर याचे दिल्लीत काही काम होते. ते त्या ठिकाणी पोचण्याच्या आधीच यशवंतरावांचा संबंधितांना फोन गेला होता. “उद्या तुमच्याकडे मराठीतील मोठे कवी येणार आहेत. त्यांचा योग्य सन्मान करा व त्यांचे काम पहा. ” महानोर ऑफीसात पोचण्यापूर्वी त्यांची ओळख पोचली होती. काम झाले.
इतर राज्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर आपले लोक जागे झाले. सरकारने रंगनाथ पठारे यांस निमंत्रक करून एक समिती तयार केली. समितीने खूप तातडीने शोधकार्य सुरु केले.
शिलालेख, ज्ञानेश्वरी, तुकोबाचें अभंग, लीलाचरित्र वगैरे पुरावे पहिल्या शतकापासून मराठी होती आणि ती सलग वापरात आहे हे दाखवत होते. अहवाल सादर झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यास संमती दिली आणि तो केंद्रीय समितीकडे पाठवला.
अनेक वर्षे तो तेथे पडूनच राहिला. दिल्लीत पुढाकार घेऊन अहवाल पुढे रेटण्यास कोणीच काही केले नाही. कोणी ते प्रकरण कोर्टातही नेले. तिथे काही वेळ गेला.
शेवटी अहवाल साहित्य अकॅडमीकडे आला. तेथे मराठी भाषेसाठी भालचंद्र नमाडे होते. अनेकांच्या प्रयत्नास यश आले आणि तेवीस ऑक्टोबर २०२४ ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.
ज्ञानेश्वरी एकदम आकाशतुन उतरली नाही. त्यापुर्वीही मराठी होतीच. ती महाराष्ट्री प्राकृत अशा स्वरूपात होती.
आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या निमित्ते काही कोटी रुपये काही काम करण्यासाठी प्राप्त होतील. कामे होतील. पण तेवढ्याने भागणार आहे का हा प्रश्न आहे? प्रत्यक्षात मराठी भाषेसमोर अनेक प्रश्न उभे आहेत.
पालकच वाचन करेनासे झालेत. वाचनालये ओस नसतील पडली पण ओढ कमी झालीये. अनेक कपाटे उघडलीही जात नाहीत. इंग्रजी शाळांच्या प्रेमामुळे तिकडे ओढा वाढत आहेत. इतके इंग्रजी आल्यावर कित्ती मुले इंग्रजीत बोलणारी, पुढे जाणारी दिसली पाहिजेत. तसे काहीच दिसत नाही. मराठी शाळा व वर्ग बंद पडत चाललेत.
या शाळा काही वाईट नाहीत. कवी नामदेव माळी यांनी “शाळा भेट” हे पुस्तक लिहिले आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या कित्येक शाळा किती चांगले काम करत आहेत ते दाखवले आहे. तरीही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालण्यासाठी किती जण तयार होतील.
मराठी भाषा टिकवून, वाढविण्यासाठी ती ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, पुस्तके मराठीत निघाली पाहिजेत. मातृभाषा मराठीत हे ज्ञान मिळाले तर तीचा फायदा होईल. हे सर्व क्षेत्रात व्हायला हवे. एकोणीसव्या शतकात हे काम मोठया प्रमाणात झाले होते. कोष वाङमय मराठी भाषेत सर्वात जास्त झाले आहे.
अनुवाद हे दुसरे आव्हान भाषेपूढे आहे. मराठीतील उत्तम साहित्य अन्य भाषात जाणे व त्या भाषांतील साहित्य मराठीत येणे आवश्यक असते.
टागोरांची कविता बंगालीतच होती. ती इंग्रजीत गेल्यावर जगाला माहिती झाली. दिलीप चित्रे यांनी तुकाराम “तुका सेज” ना नावाने इंग्रजीत नेला तेव्हा तुकाराम हे केवढे मोठे कवी आहेत, दार्शनिक आहेत हे समजले.
तामिळ, कन्नड, बंगाली या भाषात हे खूप होत असते. कन्नड मधील इंग्रजी शिकवणारे प्राध्यापक हे काम करतात. आपल्याकडील इंग्रजीचे प्राध्यापक, आपण इंग्रजी शिकवतो म्हणजे मोठेच आहोत या भ्रमात वावरतात. त्यांचे इंग्रजी सुद्धा चांगले नसते. गोकाक, मुगली हे इंग्रजीचे प्राध्यापक कन्नड साहित्य इंग्रजीत नेतात. कन्नड आवृत्तीबरोबर इंग्रजी आवृत्ती येते.
भैरप्पा यांचे कन्नड साहित्य उमा कुलकर्णी, वीरूपाक्ष कुलकर्णी यांनी मराठीत आणून मोठेच काम केले आहे. त्यांनी काही मराठी साहित्यही कन्नडमध्ये नेले आहे.
गेली पंचवीस वर्षे पुण्यात भाषांतर करण्याचे काम भाषांतरु आनंदे नावाने करत आहे.
साहित्य अकॅडमी मिळवताना साहित्य इंग्रजीत नसणे हा मोठाच अडसर होतो. कुसुमाग्रजांना ते देण्याच्या वेळेस हीच अडचण आली. काही घाई करून ते काम करावे लागले.
विकीपीडिया हे नवे माध्यम उपलब्ध झाले आहे. त्यात तामिळच्या सोळा हजार नोंदी झाल्या तर मराठीच्या सहाशे. त्या नोंदी करण्याची विशिष्ट पद्धत असते. जयंत नारळीकर यांनी त्यांची सर्व पुस्तके विकीपीडियाला दिलीत. ती वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत. पु. लं. ची काही पुस्तकं आहेत.
इकडे अभिजात राजभाषा म्हणून कौतुक करायचे आणि व्यवहारात तीला वापरायचेच नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा दुटप्पीपणा. दर साहित्य संमेलनात “मराठी भाषा जगेल का?” या विषयावर परिसंवाद घ्यायचे आणि करायचे काहीच नाही हे दुर्देव आहे.
राजकारण्यांनी भाषणांत मराठी भाषेला अत्यंत खालच्या स्तरावर नेली.
पुस्तकाचे रुप बदलेल, पण पुस्तक संपणार नाही या विषयावर “धिस ईझ नॉट द एन्ड ऑफ द बुक” असे पुस्तक लिहिले आहे. वेळ आहे काही विचार करण्याची आणि भाषेसाठी कृती करण्याची..
लेखक : अज्ञात
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन… सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो…
अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही… तेव्हढा वेळच नाही मिळाला.
विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण… चेहऱ्यावर शक्य तेव्हढा ‘आलासच ना अखेरीस’ हा माज ठेऊन.
तो मला म्हणाला,
“दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली…
काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास…
ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं…
आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता…
वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली…
त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच…
मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन…
तू त्यावेळी मला म्हणाला होतास, ‘देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो’…
ती वेळ माझ्यावर आली… दोन महिन्यांपूर्वी…
नाही शिवू शकलो मी ते भोक…
नाही करु शकलो रफू…
नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र…
माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं… !
गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत…
‘कसला बाप तू?’ अशी खिल्ली उडवत बहुदा मनातल्या मनात…
म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे…
आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला…
यावेळी तू आपलं नातं ‘रफू’ केलेलं पहायला…
त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला”.
सुन्न होऊन ऐकत होतो मी…
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठे अंगण मिळते बागडायला…
‘देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो’, चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता.
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना… नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे.
‘तो’ त्याने नकळत केलेल्या ‘पापातून’ अन् ‘मी’ नकळत दिलेल्या ‘शापातून’ उतराई होऊ बघत होतो…
मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो…
दोघं मिळून एक नातं, नव्याने ‘रफू’ करू पाहत होतो !
तात्पर्य: सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावणेचा सदैव प्रयत्न झाला पाहीजेत, त्यासाठी सर्व नातेसंबदांना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक, शेजारी, सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही, आपल्या आचरणणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच “रफू” करायला विसरू नका….
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“स्वीकार” सुध्दा दैवी गुणच आहे ह्याची मला जाणीव झाली. देणे सोपे नाही हे आपण मानतोच पण मन:पूर्वक स्वीकार सुध्दा कठीणच बरं.
वरवर स्वीकारणे व खरे स्वीकारणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. देणार्याने देत जावे व घेणारा त्या क्षमतेचा असेल तरच ती दैवी संपत्ती ची देवाण घेवाण होते.
सद्गुरू परमहंस तळमळत होते त्यांच्या ज्ञानदानासाठी. गोष्ट प्रथम ऐकली विशेष वाटली नाही. पण अनुभवाने समजतंय सत्पात्रही तितकेच महत्त्वाचे आहे. विवेकानंद दिसल्याबरोबर तळमळ शांत झाली व ज्ञानदान करत असताना दैवी आनंदाची अनुभूती दोघांनाही आली.
हा सुयोग असतो ते दैवी कार्य असते ते क्वचितच घडत असते.
त्याला चमत्कार म्हणता येईल. सृष्टी चमत्कार.
असे दैवी संकेत व कार्य अव्याहत सुरू असते.
स्वामीजी हे एक उदाहरण स्वरूप लिहिले.
शंखामध्ये मौक्तिकाची निर्मिती हे दैवी क्षणाचे द्योतक आहेत.
म्हणून देणे व घेणे या परस्परपूरक क्रिया आहेत हे पटते.
यालाच once in a life time opportunity म्हणतात.
एकतर देण्याची किंवा घेण्याची पूर्ण तयारी करणे हेच खरे जीवन आहे. एक मार्ग निवडणे आवश्यक आहे.
(अन्यथा जास्तीत जास्त गोष्टी आपण वायाच घालवतो.)
गुरू शिष्य जोडीच अमरत्व प्राप्त करू शकते. मधला पर्याय नाहीच.
या अशा क्षणांची अनुभूती घेणे अध्यात्म आहे.
||जय भवानी जय शिवाजी ||
।।जय शिवराय।।
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराज्यांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
संस्कृत :
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”
मराठी :
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.
ही अशी जाज्वल्य राजमुद्रा ज्यांची आहे व शुकासारखे पूर्ण वैराग्य व वशिष्ठासारखे ज्ञान असणारे रामदास स्वामी ही उत्तम गुरू शिष्य जोडी आहे. अश्या या सुवर्ण युग निर्मित्यावर स्वातंत्यवीरांनी केलेले कवन म्हणजे सर्वोत्तम कलाकृती च म्हणावी लागेल.
प्रखर देशभक्त, उत्तम कवी व युगनिर्मात्याचे चरित्र हे ह्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
सावरकर म्हणताहेत यवनाचा पृथ्वी वर अतोनात भार झाला व हिंदूंची श्रध्दास्थाने व गोमातेचा वध करू लागलेत. हे श्री महाराजांना सहन होणे शक्यच नव्हते. अशा दयनीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी…
प्रभूवर भूवर शिववीर आला…
हे हिंदूंचे हाल जिजाऊ कसे पाहू शकणार? त्यांना सावरकर जगताची जननी उद्बोधत आहेत. अशा या मातेने शिवबांना असे बाळकडू व ओतप्रोत देशप्रेम दिले व कुलभूषण हा संस्कृतीसंरक्षकच नव्हे तर संवर्धक बनला.
प्रभूवर भूवर शिववीर आला…
सावरकर जिजाऊ शिवबा जोडीची तुलना राम कौसल्या, कृष्ण यशोदा यांच्या शी करतात.
रामकृष्णांनी जसा राक्षसांचा वध केला तसेच महाराजांनी अती क्रूर यवनांचा नि:पात करुन स्वराष्ट्र निर्मिती केली व चंद्र जसा कलेकलेने वृध्दिंगत होतो तसे सुराज्य प्रस्थापित केले.
प्रभूवर भूवर शिववीर आला…
“जय जय रघुवीर समर्थ” चा उद्घोष दिशादिशात घुमला व सर्वोत्तम गुरू शिष्य जोडी उदयास आली. देश व धर्म जागवणे व वाढवणे हेच त्यांचे ब्रीदवाक्य ठरले. राजकारण डावपेच शिकवणारे गुरु कृष्णनीतीची आठवण करून देणारे ठरलेत.
प्रभूवर भूवर शिववीर आला…
पुढील दोन कडव्यात सावरकर अफजलखानाचा अतर्क्य असा खातमा व नंतर आई भवानी चा गोंधळ याचे रसभरीत वर्णन करतात. काय तो दैदिप्यमान सोहळा असेल याची आपण कल्पना केलेली बरी. मातोश्रीचे स्वप्न व कुलस्वामिनी जगदंबेने स्वप्नात भवानी तलवार देणे अद्भुत अलौकिक च असे ते गाताहेत.
प्रभूवर भूवर शिववीर आला…
शेवटी सावरकर गदगद् होऊन म्हणतात या सुपुत्राने “अवतार कार्य” पूर्णत्वास नेले. अशक्य कार्यास अवतार कार्य म्हणताहेत. व कार्यपूर्ती करून निजधामास गेले. अशा या युगपुरुषाचे कवन विनायकासोबत इतर सगळे कवी गाताहेत ही अत्युत्तम कोटी ते करताहेत. (सविनायक कविनायक)
प्रभूवर भूवर शिववीर आला…
असा हा त्रिवेणी संगम आपणासमोर यथामती मांडताना परमानंद होतो आहे.
आठवी इयत्तेत गेल्यानंतर आमच्या शालेय अभ्यासक्रमात थोडा बदल झाला होता. कुशल व्यावसायिक प्रशिक्षण बाबतीतला अभ्यासक्रम होता तो आणि त्यात होम सायन्स, चित्रकला आणि संगीत या तीन विषयांचा समावेश होता माझ्या बहुतेक वर्गमैत्रिणींनी पटापट त्यांच्या आवडीचची क्षेत्रं निवडली आणि नावेही नोंदवली. वेळ मलाच लागला कारण त्या वेळच्या माझ्या व्यक्तिमत्त्वासाठी यातला एकही विषय माझ्यासाठी तसा बरोबरच नव्हता म्हणजे यापैकी कुठल्याही विषयात मला फारशी गती होती असे वाटत नव्हते.
होम सायन्स या शब्दाविषयीही मला त्यावेळी फारशी आस्था नव्हती. माझ्या मते होमसायन्स म्हणजे घरकाम, शिवणकाम, भरतकाम, विणकाम, स्वयंपाक वगैरे… त्यावेळी तरी मला यात काही फारसा रस नव्हता.
चित्रकला हा विषय मात्र मला आवडायचा पण त्या कलेनच मला जन्मतःच नकार दिलेला असावा. माझी चित्रकला म्हणजे मोर, बदक, फारफार तर दोन डोंगरा मधला किरणांचा सूर्य, एखादी झोपडी, त्यामागे नारळाचं झाड आणि समोर वाहणारी दोन रेषांमधली नदी पण यातही सुबकता, रेखीवपणा वगैरे काही नसायचं. आधुनिक कला किंवा ज्याला आपण अॅबस्ट्रॅक्ट वगैरे म्हणतो ते त्यावेळी इतकं प्रचलित नव्हतं नाहीतर माझं हे चित्र कदाचित खपून गेलं असतं. फ्रीहँड, ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या वेळी माझी अक्षरशः भंबेरी उडायची. अशावेळी माझ्या प्रिय मैत्रिणी विजया, भारती, किशोरी या मला केवळ करुणेपोटी खूप मदत करायच्या ते वेगळं पण विशेष कौशल्य म्हणून मी चित्रकला हा विषय घेणे केवळ विनोद ठरला असता.
मग राहता राहिला तो संगीत हा विषय. एक मात्र होतं की आमच्या घरात सर्वांना संगीताविषयी खूप आवड होती. विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीत पप्पांना आणि ताईला फार आवडायचे. ताई सुंदर पेटी वाजवायची. ताईचा आवाज थोडासा घोगरा असला तरी तिला सुरांचं आणि तालांचं ज्ञान उपजतच होतं. ( असे पप्पा म्हणायचे आणि तिने गायनात करिअर करावी असे पप्पांना वाटायचे त्याबाबत आमच्या घरात काय काय गोंधळ घडले हा संपूर्ण वेगळा विषय आहे तर त्याविषयी सध्या फक्त एवढंच.. ) पण या सगळ्याचा परिणाम म्हणजे रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी संगीत सभा आम्ही सर्वजण न चुकता ऐकायचो. त्या शास्त्रोक्त सुरावटीचा झोपेत का असेना पण थोडासा तरी अंमल चढायचा आणि त्यासोबत होणारी ताई -पप्पांची आपसातली चर्चाही मजेदार असायची..
“पपा पाहिलंत? हा कोमल गंधार किती सुंदर लागलाय.. !”
नाहीतर पप्पा म्हणायचे, ”वा! काय मिंड घेतली आहे.. ”
यानिमित्ताने ताना, आलाप, सरगम, सुरावट, कोमल, तीव्र, विलंबित, दृत लय, राग, तीनताल, झपतात या शब्दांची जवळीक नसली तरी उत्सुकता वाटू लागली होती. आपल्याला हे पेलवेल किंवा झेपेल का याविषयीचा विचार त्या क्षणी इतका प्रबळ नव्हता. परिणामी मी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात संगीत हाच विषय निवडला.
आजही कधी कधी मनात येतं निदान पप्पांनी किंवा ताईने अर्थात मी ताईचा सल्ला मानला असताच असे जरी नसले तरीही मला थोडं योग्य मार्गदर्शन नको होतं का करायला? पण आमच्या घरात हा नियमच नव्हता. “ तुमचे निर्णय तुम्हीच घ्या” हीच प्रथा होती आमच्या गृह संस्कृतीत. “एकतर यश मिळवा, नाही तर आपटा, डोकं फोडून घ्या आणि त्यातूनच शहाणपण मिळवा आणि स्वतःला घडवा हेच तत्व होतं पण त्यातही एक मात्र अदृश्यपणे होतं की यशात अपयशात हे घर मात्र तुमच्याबरोबर आहे हे लक्षात असू द्या. ” या एकाच आशेवर मी संगीत हा विषय घेतला.
एकदाच मी वर्गात ऑफ तासाला “एहसान तेरा होगा मुझपे…” हे गाणं म्हटलं होतं आणि मैत्रीचा मनस्वी आदर राखून आशा मानकर माझ्या पाठीवरून मी गात असताना हात फिरवत होती. तिच्या त्या स्नेहार्द स्पर्शाने तरी सूर-ताला चा संगम होऊ शकेल असा दुर्दम्य आशावाद आशाला वाटला असेल कदाचित त्यावेळी.
जाऊ दे !
पण आम्हाला संगीत शिकवणाऱ्या फडके बाई मात्र मला फार आवडायच्या. तसे त्यांचे व्यक्तिमत्त्व फारसं प्रभावी नव्हतं. मध्यम उंचीच्या, किरकोळ शरीरयष्टी, किंचित पुढे आलेले दात यामुळे त्यांची हनुवटी आणि ओठ यांची होणारी विचित्र हालचाल, नाकीडोळी नीटस वगैरे काही नसलं तरी रंग मात्र नितळ गोरा आणि चेहऱ्यावरची मृदू सात्विकता त्यामुळे त्या मनात भरायच्या. विशेषतः शिक्षकांमध्ये जो दरारा असतो आणि त्यामुळे जे भय निर्माण होते तसं त्यांच्या सहवासात असताना वाटायचे नाही कुणालाच. शिवाय त्या जेव्हा गात तेव्हा त्या विलक्षण सुंदर दिसत. तसा त्यांचा आवाज पातळ होता पण त्या अगदी सफाईदारपणे एकेका सुराला उचलत की ऐकत रहावंसं वाटायचं. पेटीचे सूर धरताना त्यांची निमुळती गोरी बोटं खूपच लयदार आणि सुंदर भासायची.
या संगीताच्या वर्गात आम्ही पाच सहा जणीच होतो. सुरुवातीला त्या राग, रागाची माहिती, सरगम, अस्थायी, अंतरा, वगैरे आम्हाला वहीत लिहून घ्यायला लावायच्या मग एकेकीला प्रश्न विचारून त्या रागाची बैठक चांगली पक्की करून घ्यायच्या. नंतर यायचा तो प्रत्यक्ष गायनाचा सराव. सुरावट त्या गाऊन दाखवायच्या आणि मग सामुदायिक रित्या उजळणी आणि त्यानंतर एकेकीला म्हणायला लावायचे सगळ्यांना. तेव्हा “छान” “सुरेख जमलं” “थोडा हा पंचम हलला बघ” असे सांगायच्या पण एकंदर समाधानी असायच्या. मात्र माझी गायनाची पाळी आली की त्यांचा चेहरा कसनुसा व्हायचा हे मला जाणवायचं. सुरुवातीला माझ्या आवाजाची पट्टी जमवण्यास त्यांना कठीण जायचं. काळी चार, काळी पाच.. कसलं काय?
मग त्या हातावरच तीनताल वाजवत म्हणायच्या, ” हं!असं म्हण. भूपरूप गंभीर शांत रस.. ”
मी हे पाचही शब्द सलग एकापाठोपाठ एक म्हणून टाकायचे. त्यात संगीत नसायचंच. आळवणं, लांबवणं शून्य. फडके बाईंच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे वाचायला मिळायचं, ”का आलीस तू इथे?”
आज हे आठवलं की वाटतं, ” कोण बिच्चारं होतं?” मी की फडके बाई ?”
पण एक मात्र होतं की मला संगीताच्या लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळत. कुठला राग कुठल्या थाटातून उत्पन्न होतो, कुठला राग कोणत्या प्रहरी गातात, कोणत्या तालात गायला जातो, त्यातले कोमल, तीव्र मध्यम स्वर.. रागाची बंदीश या सर्वांवर मी माझ्या दांडग्या स्मरणशक्तीने किंवा घोकंपट्टीने मात करायची.
“काफी रागातले कोणते स्वर कोमल?”
मी पटकन सांगायची, ” ग आणि नी”. “भूप रागात कोणते सूर व्यर्ज असतात?” “मध्यम निशाद” अशी पटापट उत्तरं मी द्यायचे पण प्रत्यक्ष गाणं म्हटलं की सारे सूर माझ्या भोवती गोंधळ घालायचे. एकालाही मला कब्जात घेता यायचे नाही.
“संगीत” या विषयामुळे माझा वर्गातला नंबर घसरू लागला. प्रगती पुस्तकात कधी नव्हे ते संगीत या विषयाखाली लाल रेघ येऊ लागली. ती बघताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरी फडके बाई खूप चांगल्या होत्या. त्या माझ्याबाबतीत कितीही हताश असल्या तरी त्यांनी माझं कधी मानसिक खच्चीकरण केलं नाही. मला कधीही सुचवलं नाही की, ” अजुनही तू विषय बदलू शकतेस. “
उलट “राग ओळखा” या तोंडी प्रश्न परीक्षेच्यावेळी वेळी त्या माझ्यासाठी नेहमी सोपी सरगम घ्यायच्या. ” हं ओळख.. सखी मोssरी रुमझुम बाssदल गरजे बरसेss”
संपलं बाई एकदाचं…ही रॅपीड फायर टेस्ट मी पार करायची.
सर्व बरोबर म्हणून पैकीच्या पैकी गुण. गातानाचे मार्क्स मात्र त्या केवळ कॉम्प्लिमेंटरी म्हणून देऊन टाकायच्या.
पण आता मला वाटतं, की फडकेबाईंनाच वाटायचं का की माझा वर्गातला वरचा नंबर केवळ संगीतामुळे घसरू नये. कुठेतरी माझ्या इतर विषयातल्या प्राविण्याविषयी त्यांना अभिमान असावा म्हणून त्या मला कदाचित असेच गुण देऊन टाकत असतील.
संगीत विषयात माझी कधीच प्रगती होऊ शकली नाही हे सत्य कसे बदलणार?
पण पूर्ण चुकीच्या निर्णयाने सुद्धा मला खूप काही शिकवलं मात्र. मी आपटले, डोकं फोडून घेतलं, माझं हसं झालं, मैत्रिणींच्या नजरेत मला ते दिसायचं. मी टोटल फ्लॉप ठरले. आजच्या भाषेत बोलायचं तर माझा पार पोपट झाला.
पण तरीही काहीतरी “बरं” नंतर माझ्या मनात येऊ लागलं होतं. संगीतातल्या अपयशानेच मला एक सुंदर देणगी दिली. संगीत किती विलक्षण असतं! त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करताना मला प्रत्यक्ष खूप कष्ट पडले असले तरी एक आनंददायी कान त्यांनी मला दिला. गाता आले नाही म्हणून काय झाले? मी संगीत या शास्त्राचा पुरेपूर आनंद ऐकताना घ्यायला नक्कीच शिकले. अनोळखी सुरांची सुद्धा शरीरांतर्गत होणारी काहीतरी आनंददायी जादू मला अनुभवता येऊ लागली. ती किमया मला जाणवू लागली आणि त्यामुळे माझ्या आयुष्याला एक सुरमयी दिशा मिळाली. माझ्यातल्या जिवंत, संवेदनशील मनाची मला ओळख झाली. पुढे पुढे तर आयुष्य जगत असताना मला या संगीतातल्या शास्त्रानेच खूप मदत केली.
सात सूर कसे जुळवावेत, कोणते सूर कधी वर्ज्य करावेत, तीव्र, कोमल, मध्यम या पायऱ्यांवर कशी पावले ठेवावीत, योग्य प्रहरांचं भानही ठेवायला शिकवलं, कधी विलंबित तर कधी द्रुतलय कशी सांभाळावी, धा धिन धिन्ना ता तिन-तिन्रा या तालांचे अपार महत्त्व मला संगीतातूनच टिपता आले. गाता नाही आले पण म्हणून काय झाले? जीवनगाण्याचे मात्र मी बऱ्यापैकी सूरताल सांभाळू शकले. या क्षणी नाही वाटत मला की माझा निर्णय चुकला होता म्हणून! एका चुकलेल्या वाटेने माझ्या अनेक अंधार्या वाटांना उजळवले.
काही वर्षांपूर्वी मी ठाण्याला माहेरी गेले होते तेव्हा भाजी मार्केटमध्ये मला अचानक फडके बाई भेटल्या. एका क्षणात आम्ही एकमेकींना ओळखले. खरं म्हणजे त्यांनी मला ओळखावे हे नवलाईचे होते. एका नापास विद्यार्थिनीला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडावा हेही विशेष होते. त्यांनी आवर्जून माझी विचारपूस केली. घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि पटकन् खाणाखूणांसहित घरचा पत्ता ही दिला.
मी बराच विचार करून पण संध्याकाळी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरातले तानपुरे, अंथरलेली सतरंजी, पेटी- तबला पाहून सुखावले. फडकेबाई खूप थकलेल्या दिसत होत्या. वय जाणवत होतं पण गान सरस्वतीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर तेव्हाही होतं.
त्याच म्हणाल्या, “ माझी मुलगीही आता सुंदर गाते. अगदी तैय्यारीने.. ”
खरं सांगू ? मला क्षणभर काही सुचेचना काय बोलावे? संगीताच्या वर्गात होणारी माझी फजिती मला त्या क्षणीही आठवली. डोळे भरून आले. फडके बाईंनी माझ्या पाठीवर अलगद हात ठेवला. म्हणाल्या, ” नाही ग! तू निश्चितच एक चांगली विद्यार्थिनी होतीस. तुझ्यात शिकण्याची तळमळ होती. त्यासाठी तू प्रयत्नशीलही होतीस. ”
कदाचित त्यांनी त्यांच्या मनातलं बोलायचं टाळलं असेल तेव्हा मीच म्हणाले, ”आडात नाही ते पोहर्यात कुठून येणार?”
मात्र त्या क्षणी मी त्यांच्या पायाला स्पर्श केला. गुरुपादस्पर्शाचा एक भावपूर्ण प्रवाह अनुभवला. गुरु-शिष्याचा वारसा नाही राखला पण मान राखला. माझ्यात नसलेल्या आणि त्यांच्यात असलेल्या कलेला केलेलं ते वंदन होतं.
“ बाई ! माझ्यासाठी तुमचं ऋण न फिटण्यासारखं आहे. काय सांगू? कसं ते? “
☆ “बालकांच्या काळजाला हात घालणाऱ्या डॉक्टर !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
ती अकरा वर्षांची असताना तिची आई क्षयरोगाने दगावली… आणि तिलाही किंचित क्षय देऊन गेली. त्यामुळे तिचे ते दिवस आजारपणातच गेले. सततच्या खोकल्यामुळे तिच्या श्रवणशक्तीवर खूप विपरीत परिणाम झाला. नीट ऐकता न आल्यामुळे तिला वाचनही करता यायचे नाही… अक्षर-अक्षर जुळवून तयार होणारा एखादा शब्द तिचा मेंदू लवकर स्वीकारायचा नाही… आणि शिक्षणात तर हा सर्वांत मोठा अडथळा ठरला. पण हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ असलेल्या तिच्या वडिलांनी तिला प्रचंड आत्मविश्वास दिला. प्रश्न अभ्यासाचा होता. मग तिने अभ्यासाच्या निरनिराळ्या युक्त्या शोधल्या, एकदा लिहिलेले तीन तीनदा तपासून पाहिले आणि माध्यमिक शिक्षणाचा टप्पा यशस्वीरीत्या ओलांडला… महाविद्यालयात ती उत्तम टेनिसपटू म्हणून प्रसिद्ध झाली होतीच. पण तिला डॉक्टरच व्हायचे होते! कारण तिचे आजोबा डॉक्टर होते आणि त्यांना जीवशास्त्र विषयात खूप रस होता. त्यांचीच प्रेरणा या मुलीने घेतली असावी.
आणि त्यावेळी महिलांना वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून प्रवेश मिळणे दुरापास्त होते. महिला परिचारिका उत्तम करू शकतात… मुलांना वाढवू शकतात पण मग डॉक्टर का नाही होऊ शकत? हा विचार त्यावेळी फारसा केला जात नव्हता. हार्वर्ड विद्यापीठाने तिला वैद्यकीय शिक्षणाच्या तासांना बसायची परवानगी तर दिली मात्र डॉक्टर ही पदवी देण्यास असमर्थतता दाखवली… म्हणून ती बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात गेली. हे विद्यापीठ मात्र महिलांना वैद्यकीय शिक्षण देण्याच्या बाजूने होते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हेलेन तौसिग झाल्या … डॉक्टर हेलेन ब्रुक तौसिग. जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात निवासी वैद्यक अधिकारी होण्याची त्यांची संधी मात्र अगदी थोडक्यात हुकली. हृदयरोग विभागात एक वर्ष उमेदवारी केल्यानंतर त्यांची पावलं बालरोग विभागाकडे वळाली…. आणि त्यांचे लक्ष बालकांच्या हृदयाकडे गेले !
बालकांच्या हृदयरोगावर उपचार करणा-या डॉक्टर एडवर्ड पार्क यांच्या क्लिनिकमध्ये त्या स्वयंस्फूर्तीने म्हणून काम करू लागल्या…. ही एका इतिहासाची पहिली पाऊलखूण होती. पुढे या क्लिनिकचा संपूर्ण ताबाच त्यांच्याकडे आला. त्यावेळी बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया ही कल्पनाच पुढे आलेली नव्हती. बालके हृदयरोगाने दगावत…. जगभरात अशी हजारो बालके आयुष्य पाहण्याआधीच जगाचा निरोप घेत होती… त्यांच्या जन्मदात्यांना दु:खाच्या खाईत लोटून निघून जात होती. ह्या कोवळ्या कळ्या अशा झाडावरच सुकून गळून पडताना पाहून डॉक्टर हेलन यांचे कोमल काळीज विदीर्ण होई.
स्टेथोस्कोप हे उपकरण म्हणजे डॉक्टर मंडळींचा कान. पण डॉक्टर हेलन यांचे कानच काम करीत नसल्याने स्टेथोस्कोप निरुपयोगी होता… मग त्यांनी बालकांच्या हृदयाची स्पंदने तळहाताने टिपण्याचा अभ्यास केला ! त्यांचा हात बालकाच्या काळजावर ठेवला गेला की त्यांना केवळ स्पर्शावरून, त्या स्पंदनामधून त्या हृदयाचे शल्य समजू लागले. फ्ल्रूरोस्कोप नावाचे नवीन क्ष-किरण तंत्रज्ञान त्यांच्या मदतीला आले. कित्येक लहानग्यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून त्यांनी हृदयरोगाची कारणे शोधण्याचा अथक प्रयास आरंभला. हा साधारण १९४० चा सुमार होता… हृदयक्रिया बंद पडून बालके मृत होत आणि त्यावर काहीही उपाय दृष्टीपथात नव्हता. पण डॉक्टर हेलन यांचा अभ्यास मात्र अव्याहतपणे सुरूच होता. सायनोसीस नावाची एक वैद्यकीय शारीरिक स्थिती बालकांचे प्राणहरण करते आहे हे डॉक्टर हेलन यांना आढळले. एका विशिष्ट वैद्यकीय स्थितीत असलेल्या बालकांच्या फुप्फुसांना प्राणवायूयुक्त रक्त पुरेसे पोहोचत नाही हे त्यांनी ताडले. ह्रदयाकडे जाणारी एक रक्तवाहिनी फुप्फुसाला जोडली तर हा पुरवठा वाढू शकेल, असा तर्क त्यांनी लावला…. आणि तो पुढे अचूक निघाला !
ही युक्ती मनात आणि कागदावर ठीक होती, पण प्रत्यक्षात उतरवणे खूप कठीण होते. याच काळात जॉन्स हाफकिन्स मध्ये प्रसिद्ध सर्जन डॉक्टर आल्फ्रेड ब्लालॉक, त्यांचे प्रयोगशाळा सहाय्यक विवियन Thomos यांच्यासह संशोधन विभागात रुजू झाले होते. डॉक्टर हेलन यांनी आपली ही कल्पना त्यांना ऐकवली आणि ते कामाला लागले… विशेषत: विवियन यांनी ही कल्पना चांगलीच उचलून धरली ! आता तीन देवदूत बालकांच्या जीवनाची दोरी बळकट करण्याच्या उद्योगाला लागले. पण या कामात त्यांना मानवाच्या सर्वाधिक निष्ठावान मित्राची, श्वानाची मदत घ्यावी लागली… कित्येक श्वानांना या प्रयोगात जीव गमवावा लागला… आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे !
मानवाच्या हृदयात ज्या प्रकारे हृदयदोष निर्माण होतो, त्याचसारखा दोष कुत्र्याच्या हृदयात निर्माण करणे, आणि तो दुरुस्त करणे हे मोठे आव्हान होते.. ते विवियन यांनी पेलले.
दरम्यानच्या काळात डॉक्टर हेलन यांनी बालकांना हा हृदयरोग होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण शोधून काढले. त्यावेळी अमेरिकेत प्रसूतीपूर्व आजारावर Thalidomide हे औषध अगदी सर्रास दिले जाई. अत्यंत किचकट संख्यात्मक माहिती गोळा करून डॉक्टर हेलन यांनी हे औषध घेण्यातले धोके जगाला समजावले… आणि Thalidomide चा वापर टाळला जाऊ लागला… आणि त्यातून मातांच्या पोटातील बालकांना होणारा ‘ब्लू बेबी’ नावाने प्रसिद्ध असणारा आजार होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. निम्मी लढाई तर इथेच जिंकल्या डॉक्टर हेलन.
९ नोव्हेंबर, १९४४ रोजी पंधरा महिन्यांच्या एका बालिकेवर ब्लू बेबी विकार बरा करण्यासाठीची पहिली शस्त्रक्रिया झाली. यासाठी शोधल्या गेलेल्या प्रक्रियेला ‘ Blalock-Taussig-Thomos shunt ‘ असे नाव दिले जाऊन या तीनही जीवनदात्यांचा उचित सन्मान केला गेला.
डॉक्टर हेलन ब्रुक Taussig यांना पुढे विविध सन्मान प्राप्त झाले.. पण सर्वांत मोठा सन्मान आणि आशीर्वाद त्यांना जीव बचावलेल्या बालकांच्या पालकांनी दिला असावा, यात काही शंका नाही. त्यांना वैद्यकीय जगत “Mother of pediatric cardiology” म्हणून ओळखते.
याच डॉक्टर हेलन यांनी भारताला एक वैद्यकीय देणगी दिली…. भारताच्या पहिल्या महिला हृदयशल्य विशारद पद्मविभूषण डॉक्टर शिवरामकृष्णा पदमावती यांनी डॉक्टर हेलन यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण घेतले आणि भारतात अतिशय मोठे काम उभारले.. १०३ वर्षांचे कर्तव्यपरायण आयुष्य जगून डॉक्टर पदमावती कोविड काळात स्वर्गवासी झाल्या !
या दोन महान आत्म्यांना परमेश्वराने सदगती दिली असेलच.. आपण त्यांच्या ऋणात राहूयात…..
(माझ्या अल्पबुद्धीला अनुसरून या वैद्यकीय विषयावर लिहिले आहे. तांत्रिक शब्द, नावांचे उच्चार चुकण्याची शक्यता आहे आणि याबद्दल आधीच दिलगीर आहे. तज्ज्ञ मंडळींनी जरूर आणखी लिहावे आणि या महान आत्म्यांना प्रकाशात आणावे. संबंधित माहिती मी इंटरनेटवर वाचली (परवानगी न घेता केवळ सामान्य वाचकांसाठी भाषांतरीत केली. कारण मराठीत असे लेखन कमी दिसते) आणि जमेल तशी मांडली.)
पाहता पाहता २०२४ संपत आले, नव्हे संपलेच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी, अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात, तर काही आयुष्यभर आनंद, उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही, जे घडले, ते घडले नसते तर बरे झाले असते. असे मनाला वाटून जाणाऱ्या असतात. काही आनंद, दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असे का ? खरे जगावे, सुखात आनंदी, तर दुःखात थोडी निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य आहेच ना आपल्याला. मनाच्या सगळ्या भावना जशा आहेत, तशा सम्यक पद्धतीने व्यक्त करता येतील अशा व्यक्ती असतातच आपल्याकडे. त्या पारखायला हव्या. मनातली आशा मात्र कायम जीवंत राहायला हवी. थोडा अंधार जास्त आहे पण त्यामुळेच तर उजेडाचे महत्व अधोरेखित होत आहे.
आजपर्यंत समविचारी आपण सगळे सोबत होतो. आजही सोबत आहोत. आणि यापुढेही कायम सोबत राहू. स्त्रीने तिच्या स्त्रीपणाच्या चौकटीतून बाहेर पडताना स्वतःला पुरुषसत्ताक मानसिकतेचे वाहकत्व टाळू शकेल, आणि स्त्री पुरुष दोघांचा मानवतेच्या दिशेने, समतेच्या वाटेने नव्या आधुनिक प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करता येईल ही आशा आहे.
प्रेमाला व्यवहाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे हे खरे आहे. पण विनाअट / निर्हेतू प्रेम नव्याने जन्माला येईलच. ही आशा सोडायची नाही. आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येईल अथवा न येईल, आपण स्वतःवर मनापासून प्रेम करायला शिकूया. खरे जगूया, खरे बोलूया ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊया..!
वर्षाचा शेवटचा महिना जसा.. तसा अडचणींचा, वाईट घटनांचा, दुःखाचा शेवटचा महिना असता तर, वेदनांना कायमचा निरोप देता आला असता तर.. वेदनांचे तण उपसून काढता आले असते तर, अगदी मुळापासून खोल मनातून. जसे कॕलेंडर भिंतीवरुन कायमचे हटवतात तसे…! कधीही परत दिसणार नाही असे.. आनंदी क्षणांचे वट वृक्ष झाले असते तर मग समाधानाचा फुलोरा नक्कीच दिर्घकाळ बहरत राहिला असता नाही का.. !
नको असलेलेच जास्त डोके वर काढताना दिसते. जे जे गंधीत ते जणू शापित वाटू लागते. चांगल्या आठवणी आठता येत नाहीत. साठवता येत नाहीत. कुणाला सांगता येत नाहीत. या व्यवहारी जगात चांगल्या आठवणींचा कचराच होताना दिसतो. ते ही दूर दूर निघून जातात. उजाड माळरान मागे ठेवून. असे वाटणे ही तर मनाची अडचण असते. परत मशागत करायला हवी. स्वतःला अंतःपर्यंत सुगंधीत ठेवण्यासाठी.
खरंतर वेदनेचे गाणे करता यावे आणि संवेदनांनी ते गात रहावे. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावे.
‘ मी डॉक्टर, मी इंजिनीयर, मी वकील,मी शिक्षक, मी एम.बी.ए.,मी शेतकरी, मी ऑफीसर,मी दुकानदार, मी एम. ए. पीएच डी डॉक्टरेट मिळवली – – ‘
‘वा वा अभिनंदन अभिनंदन.. अरे वा म्हणजे बरचं शिक्षण झालय तुमचं. व्यवसाय चांगला करताय आता इतकं शिकलात तर तुम्ही हुशारच असणार म्हणा .. मग एक विचारू का?
— मी एक छोटी परीक्षा घेते .. काही वाक्य विचारते .. ती म्हणायला शिकलात का? पण खरी उत्तरं सांगा हं …..
बायकोला कधी हे म्हणालात का?–
” तू संसार चांगला केलास, घर नीट ठेवतेस, तुझी रांगोळी रेखीव असते, स्वयंपाकात सुगरण आहेस, सगळ्यांची सेवा करतेस, घर आणि नोकरी ही तारेवरची कसरत केलीस, नाती जपलीस “
….. तशी ही यादी मोठी आहे. तूर्तास या साध्या सोप्या प्रश्नांची तर उत्तरं द्या ‘
‘ अरेच्चा एकदम गप्प का झालात ? आत्ता आठवत नाहीये का..? वाटलं तर विचार करून थोडा वेळ घेऊन उत्तरं द्या ….
काय म्हणताय ….. ‘ हे तेवढं राहिलं….’…… असं कसं बरं झालं…? हेच नेमकं शिकायच राहिलं ?
का हा विषयच ऑप्शनला टाकला होता का.. याचा अभ्यास केला नाही….. बरं .बरं..असू दे असू दे.
होत अस बऱ्याच जणांचं … ‘
मग आता करा की हा कोर्स …. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरही हे शिकता येतं … वयाची तर काहीच अट नाही
ऑनलाइन.. करस्पॉन्डन्स.. सिलॅबस…. ते तुमचं तुम्ही ठरवायचं किती दिवसांचा आहे … कधी पूर्ण होईल … परीक्षा कधी आहे ???
…. सांगते सांगते… सगळं नीट सांगते
… तुम्ही कसा अभ्यास कराल त्याच्यावर हे अवलंबून आहे … परीक्षेची वेळ तुमची तुमची …
रिझल्ट ताबडतोब समोर प्रत्यक्ष दिसेल …
आणि फी….सांगते ना…..
एकदम किती प्रश्न विचारता?
आणि हो … हा प्राथमिक कोर्स झाला …. असे बरेच आहेत …
हळूहळू त्याची पण माहिती देईन .. सध्या तरी इतकं पुरे
विचार कसला करताय…. हुशार आहात जमेल तुम्हाला … घ्या की अॅडमिशन
आधीच उशीर झालाय राव … करा अभ्यासाला सुरुवात …
…. अरे एक सांगायच राहिलं .. याची गाईड बाजारात नाहीत .. हा विषय स्वयंशिक्षणाचा आहे
हवी असेल तर मी मदत करीन. मला फी पण नको .. मग लागा तयारीला .. प्रॅक्टीस केली की जमेल
आणि हो … रिझल्ट लागला की या पेढे घेऊन ..वाट बघते……ऑल द बेस्ट !! ‘
…….
साने काका घरी आले होते .. काकांनी हे वाचलं आणि हळुवार आवाजात म्हणाले
‘ मी त्या कोर्सला अॅडमिशन घ्यायच्या आधीच नापास झालो आहे ..
ही वर गेली .. आता हे सांगायच राहून गेलं. मला कधी सुचलंच नाही बघ .. नेहमी गृहीत धरलं तिला सगळ्या बायका हेच तर करतात त्यात काय विशेष .. त्याचं काय कौतुक करायचं असं मला वाटायचं ती असेपर्यंत कधी त्याची किंमत कळली नाही तुला एक सांगू .. तू त्या कोर्समध्ये अजून एक विषय ॲड कर …
… आयुष्यात कधीतरी ” माझं तुझ्यावर प्रेम आहे ” .. हे बायकोला एकदा तरी सांगा असं लिही ….
ती गेली आणि मग मला समजलं माझं तिच्यावर प्रेम होतं…”
हे बोलता बोलता त्यांचा आवाज विलक्षण कापरा झाला होता..
” काका खरं तर आम्हा बायकांना ते न सांगताच माहीत असतं जाणवतही असतं….
आतल्या आत…”
“असेल …कदाचित तसही असेल…”
“तरीपण बोलुन दाखवल तर आनंद होईल की नाही ?..”
“हो हे तुझं अगदी पटलं मला ”
“आजारपणात तुम्ही काकूंची काळजी घेत होता … तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या …’ यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर.. कसं होईल ग यांच माझ्या नंतर…’.
” हो खरंच असं म्हणाली होती ती?…”
” हो काका…..”
……. काकांचे डोळे भरून वहात होते……
पंच्याऐशींच्या सानेकाकांना समाधान व्हावे यासाठी खोटं बोललं तरी देव मला माफ करणार आहे……
आज सकाळीच महिन्याचे वाणसामान आले होते. त्यातील बरेचसे खराब होईल म्हणून फ्रीज मध्ये ठेवण्यासारखे होते. त्यासाठी मी चक्क बैठक मारून फ्रीज च्या पुढेच बसून विचार करत होते. इतक्यात माझ्या एका जवळच्या मैत्रीणीची मुलगी नीता खास आम्हाला भेटायला आली. ही स्वतः इंजिनिअर आणि उच्चपदस्थ असून ही अतिशय टापटीपीने संसार करणारी आणि सासू सासऱ्यांची लाडकी सून.
माझा एकंदरीत अवतार बघून म्हणाली, ” मावशी काय ग हा पसारा मांडून बसली आहेस? “
मी तिला माझी व्यथा ( हो व्यथा च तर काय…) सांगितल्यावर म्हणाली,
” रागावू नकोस मावशी, पण म्हणूनच आम्ही हल्ली minimalism lifestyle अंगिकारली आहे. म्हणजे काय तर, कंजूष पणा नाही . पण शक्यतो जेवढे लागेल तेव्हढेच आणायचे. आधी प्लॅनिंग केले की छान जमते. अवास्तव पसारा वाढवायचाच नाही. तू पण पुढल्या महिन्यापासून काकांना तशी लिस्टच काढून दे.” मला ही हे पटले. काका तर काय (मिशीतल्या मिशीत) हसतच होते.
गप्पा मारता मारता तिने येताना आमच्यासाठी आणलेला इडली सांबारचा नाश्ता केला. दुपारच्या जेवणासाठी ही मस्त रस्सा भाजी घेऊन आली होती. त्यामुळे मस्त मनसोक्त गप्पा मारल्या आणि आमची बॅटरी चार्ज करून गेली सुद्धा……
जाताना मला मात्र food for thought देऊन गेली.
ती गेल्यावर मी माझ्याच दोघांनी सुरु केलेल्या आणि आता पुन्हा दोघांवरच येऊन ठेपलेल्या संसाराकडे त्रयस्थपणे नजर टाकली. एक सर्कल पूर्ण झाले होते….
अक्षरशः दोन बॅग्ससह सुरु केलेल्या संसाराचा केवढा हा पसारा….आता खरच आवरायला हवा.
Minimalism स्वीकारायलाच हवे….
आणि मग डोळ्यासमोर आली एक एक घरातील वस्तू….
कपड्यांनी खचाखच भरलेली कपाटं, पुस्तकांनी भरलेले शेल्फ, हौस हौस म्हणून घेतलेले तर्हेतर्हेचे क्राॅकरी सेट्स, भांडीकुंडी हे सारेच आता कमी करायलाच हवे….
अनावश्यक वस्तूंचे Minimalism….
मग मनाशी विचार आला, वस्तूच काय….आपण स्वतःकडून आणि इतरांकडूनही किती अपेक्षा ठेवतो.
मी ह्यावेळेस असे वागलेच पाहिजे, हे केलेच पाहिजे……
मुलांनी, नातेवाईकांनी माझ्याशी असे वागावे, असे वागू नये….
नुसत्या अपेक्षाच नव्हे तर तसे घडले नाही तर मनस्ताप ही होतो. मग डिप्रेशन, बिपी ,शुगर मध्ये वाढ…
कशासाठी हे सारे???
त्यांच्याही काही अडचणी असतीलच की ….म्हणूनच आताची मुलं म्हणतात तशी प्रत्येकालाच त्याची space देऊया.
आपली मुलं, आपल्या मित्र मैत्रीणी ,जीवाभावाचे नातेवाईक ह्यांच्यावर आता निरपेक्ष प्रेम करण्याची वेळ आली आहे.
हेच तर अवास्तव अपेक्षांचे Minimalism….
हे दुष्टचक्र एवढ्यावरच थांबत नाही. मग सुरू होतात राग/ रुसवे…….
मीच का साॅरी म्हणू ? गरज तिला/त्याला ही आहे…अशा नको त्या मानापमानाच्या कसरती!
ह्यातून निष्पन्न होतो तो फक्त नात्यात दुरावा…
ह्या सगळ्यावर उपाय एकच राग / रुसव्या चे Minimalism!
आपल्या ह्या संसारातून परमेश्वरही सुटला नाही आहे बरं का….
कोणतेही व्रत, नामस्मरण करताना आपण ते निरपेक्षपणे किती करतो हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा. काहीही मागितले नाही तरी फक्त, ” आम्हा सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी असू दे” एवढे तरी मागणे असतेच.( खरंतर लांबलचक लिस्टच असते…)
आता येणाऱ्या नवीन वर्षात मात्र शांतपणे परमेश्वराचे मनापासून नामस्मरण करुया आणि खरच minimalism lifestyle जगण्याचा प्रयत्न करुया.
अवघड आहे (कारण अनेक गोष्टीत आपली भावनिक गुंतवणूक असते…) पण अशक्य नक्कीच नाही.
☆ कलीयुगातील राम – सीता… माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
मालेगांव जवळच्या “गिल पंजाब हॉटेल” चे मालक लकी आबा गिल यांना आज रस्त्याच्या कडेने एक वयस्कर जोडपं पायी जातांना दिसलं. भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं त्यांनी सहजच जेवणाचं विचारलं. तर ते नको म्हणाले. म्हणून त्यांना 100 रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय? त्यानंतर सुरू झाला त्यांचा जीवनपट – ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चालले होते. त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही. मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येईल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय, मग मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून निघाली. ते 25 % हिन्दी 75% इंग्रजी बोलत असल्यामुळे त्यांचे शिक्षण विचारलं तर उत्तर ऐकून सुन्न झालो. त्यांनी लंडन येथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र विषयात पीएचडी केलीय तर त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पीएचडी केलीय. (एवढ शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्वाचा लवलेशही नव्हता. (नाहीतर आपल्या कडे 10वी नापास सुद्धा छाती ताणून हिंडतो) एवढच नाही तर व सी. रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर, तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रीचे संबंध होते. त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंधांसाठी काम करणाऱ्या ट्रस्ट ला देऊन टाकतात. सध्या ते सोशल मेडियापासून लांब राहतात. रोडच्या कडेने जाणारं प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं नाही. एखाद जोडपं हे आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होतं. आणि आपल्या पती सोबत कोणी सीता सुद्धा होतं म्हणूनच आज भेटलेली माणसे ही कलीयुगातील राम सीता च समजतो.
आम्ही जवळ जवळ 1तास गप्पा मारल्या रस्त्यात उभे राहूनंच. इतके प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला. आणि वाटलं की आपण उगाचंच खोट्या फुशारकी वर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून ३ महिने झाले आणि अजून घरी पोहचायला १ महिना लागेल.
त्यांचे नाव डॉ. देव उपाध्याय आणि डॉ. सरोज उपाध्याय
लेखक : अज्ञात
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈