मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – २… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – २… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सगळे आनंदाचे प्रेक्षणीय क्षण अनुभवत मुख्य पुस्तक दालनात प्रवेश केला. आणि कुठे जाऊ हा प्रश्नच पडला. कारण समोर फारच मोठे पुस्तकांचे मायाजाल होते. लगेच लक्षात आले, हे एक दिवसाचे काम नव्हे. एकदा माणूस आत शिरला की किमान ४/५ तास हरवून जाईल. इतकी मोठी तीन दालने त्यात सातशे स्टॉल्स. एका फेरीत एक दालनही नीट बघून होणार नाही याचा अंदाज आला. शेवटी एक बाजू ठरवून आत शिरले. पहिलेच स्वागत  जुन्या जिव्हाळ्याच्या  पुणे मराठी ग्रंथालय याच्या स्टॉल वर झाले. तिथे उपस्थित जाणत्या मंडळींनी लगेच नावानिशी ओळखले. आणि “अष्टदीप – लेखक श्री. विश्वास देशपांडे यांच्या पुस्तक परीक्षणाचे पारितोषिक मिळालेल्या तुम्हीच ना?” असे स्वागत झाले. मग त्यांच्या समवेत छायाचित्रे काढली गेली. थोड्या गप्पा अर्थातच पुस्तकांच्या विषयी झाल्या. आणि पुढचे स्टॉल खुणावत असलेले दिसले. प्रत्येक स्टॉल व तेथील पुस्तके आपल्याला खुणावत असलेले दिसत होते.

प्रत्येक स्टॉलवर व्यवस्थित स्वागत व आवश्यक ती माहिती सांगणे होत होते.  विशेष म्हणजे स्टॉल वर ३/४ खुर्च्या तर काही ठिकाणी टेबल पण दिसले. आणि त्यावर बसून मंडळी पुस्तक उघडून बघण्याचा आनंद घेत असलेली दिसली. स्टॉल मध्ये गेल्यावर त्या पुस्तकांना हातात घेताना फार समाधान व आनंद होत होता. ऑनलाईन पुस्तके मगवताना या आनंदाला पारखे झालो आहोत याची खंत वाटली. 

सर्वात कौतुक वाटले  ते पाठ्यपुस्तकांच्या स्टॉल वर. सर्व इयत्तांची पुस्तके एकाच छताखाली दिसली. व  आपण शिकवलेली सगळीच पुस्तके बघायला मिळाली. आपल्या संविधानाची मूळ प्रत एका स्वतंत्र दालनात दिसली. त्याच्या वरील स्वाक्षरी असलेल्या पानाचा फोटो काढता येत होता. आणि ग्रुप फोटो सुद्धा काढता येत होता. त्याच्या जवळच

शिवरायांचा सिंहासनावर बसलेला तर कट आऊट इतका सुंदर, की प्रत्यक्ष शिवराय या महोत्सवाचे साक्षीदार आहेत असेच वाटत होते. सर्व वाचलेला  शिवइतिहास आठवला. त्या भारावलेल्या इतिहासाची मनात उजळणी होत असतानाच समोर दिसला पु. ल. यांचा हसरा पुतळा. जणू तेही कोण काय वाचत आहे,काय चाळत आहे? हे आपल्या दृष्टीतून बघत असावेत. आणि सगळे बघून काही मिश्किल लिहिणार असे दृष्य डोळ्या समोर येत होते. ते विचार मनात घोळतच होते तोच समोर साक्षात हातात शिवपिंड घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा दिसला आणि नतमस्तक झाले! आश्चर्य म्हणजे तेथे असलेली मंडळी मोठ्या नम्रतेने “चप्पल बाहेर काढून आत या”, असे सांगत होते. तेथे आत प्रविष्ट झाल्यावर त्यांचे चरित्र चित्ररूपाने लावलेले दिसले. खूप छान वाटले. मात्र तेथे त्यांच्या विषयीची पुस्तके  उपलब्ध नव्हती. म्हणून थोडी निराशाच झाली. 

लगेच समोरच हॅपी थॉटस हे दालन दिसले. मग काय सरश्री यांची सगळी पुस्तके एकाच ठिकाणी बघून फारच हरखून गेले. तेथील मंडळी खूप छान माहिती देत होती. पुस्तके शोधायला मदत करत होती. आणि तिथेच टेबल,खुर्ची याची व्यवस्था असल्याने चर्चाही करता येत होती.

किती विविध साहित्य! विविध भाषेतील साहित्य! ज्याला ज्याची आवड तो ते पुस्तक घेऊन बघत होता.

मुलांच्या साठी स्वतंत्र दालने, विविध रंगीबेरंगी पुस्तके, चित्र साहित्य! शालेय सहली बरोबर आलेल्या मुलांच्या हातात चांदोबा,किशोर, या बरोबरच शामची आई, स्वामी, छावा अशी पुस्तके दिसत होती. किती सुंदर दृश्य!! 

मी तर वय विसरून तेच बघत बसले. 

स्टॉलच्या शेवटी एक सुंदर स्टेज व खुर्च्या दिसल्या. चौकशी केल्यावर समजले तिथे  लेखक आपल्या भेटीला येत होते. त्यांच्याशी बोलता येत होते. 

गर्दी तर होती. पण त्याला एक शिस्त होती. सगळे जणू एका आनंद सोहळ्याला उपस्थित असावे असे वाटत होते. बंदोबस्त खूप होता. पण त्यातील महिला पोलिस आपल्या बाळांना घेऊन पुस्तक खरेदी करताना दिसत होत्या. खूप कौतुक वाटले त्यांचे!

विविध शाळांची मुले व शिक्षक दिसत होते. कॉलेज मधील तरुणाई दिसत होती. अक्षरशः आबाल वृद्ध दिसत होते. कॉलेज युवती सिनियर असणाऱ्यांना मदत करताना दिसत होत्या. इतके फिरून पाय बोलायला लागले होते. पण एका कॉलेज युवतीने बसायला लगेच स्वतःची खुर्ची दिली आणि मला अचंबित केले. बहुतेक वातावरणाचा परिणाम असावा. एकंदर सर्व वातावरण संस्कारी, सकारात्मक दिसत होते.

यात गंमत म्हणजे व्यसनी लोक जसे एका ठिकाणी सापडतात तसे पुस्तक वाचनाचे व्यसन असणारे पण सापडले आणि आपली इथे भेट होणारच! अशी वाक्ये पण झाली. पुस्तकांवर चर्चाही झाली. 

एकूणच  पुस्तक महोत्सव हा एक सोहळाच झाला होता. वाचन संस्कृती लोप पावत आहे, याला उत्तर मिळाले आहे असे मनात आले. या सगळ्यात बाल चित्रपट मात्र बघता आला नाही. आणि बाहेरूनच त्याचा फलक बघावा लागला.

बरेच दिवस मनात रेंगाळणारी पुस्तके हाताळून खरेदी करता आली याचा खूप आनंद व समाधान मनात घेऊन परतले. 

अशा महोत्सवाची कल्पना मांडणारे व ती साकार करणारे सर्वांना शतशः धन्यवाद ! आणि हा असा महोत्सव दर वर्षी अनुभवायला मिळावा ही मनापासूनची इच्छा! 

समाप्त

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नदीचा काठ…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ नदीचा काठ… ☆ प्रा. भरत खैरकर 

नदीचा काठ आता पहिल्यासारखा स्वच्छ राहिला नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या काठाला आता उसंत नसते. लोक म्हणतात, उन्हाळ्यात नद्या आटतात. मात्र गावची नदी बारमाही सारखीच धो.. धो.. वाहणारी दोन्ही – हातांनी एखाद्या दात्याने भरभरून दान द्यावे. तसं या नदीने आमच्यां गावाला खूप दिलंय. विहिरी आटल्या तरी नदीची धार मात्र खंडत नाही.. शंकराच्या जटेतून निघालेल्या गंगामाईसारखी!!  या नदीची काही कहाणी असेलसं वाटत नाही.

दहा बाय दहाच्या खोलीत आपला संसार छानसा थाटावा, तसा या नदीचा उगम अगदी छोट्या जागेत सामावलेला.. गावापासून चंद्रपूर जिल्ह्यातील खुर्सापार या जंगलातून.. एका डोंगरवजा भागात.. तिची उत्पत्ती झाल्याचे आढळुन येते. एक भला मोठा झरा उंचावरून धबधब्यासारखा अव्याहत खाली वाहतो.. चांदण्यात ही दुधाची धार जणू आकाश धरतीच्या पदरात प्रेमाने टाकतोय.. असं वाटते.

आजूबाजूला उंचच उंच सागवनी वृक्ष.. निसर्गाचं हे रूप पाहात कित्येक सालापासून उभे आहेत. त्या परिसरातील सागाच्या झाडांची वाढ कमालीची झाली आहे. जंगलात सर्वत्र फिरून झाल्यावर निसर्ग याच ठिकाणी इतका ‘खुश’ कसा हे शोधलं तर मुळाशी तो उगम दिसेल..

 साधारण पन्नासेक फुटावरून खालच्या दगडांवर पडणारी ती जाडशी पाण्याची धार हळूहळू घाटदार वळण घेत संथ होते, छोटसं नितळ पाण्याचं तळं.. ते वलयांमुळे अजूनच उठून दिसतं.. मनात भावनांचे हळूवार तरंग उठावे तसे  ह्या पाण्याचे तरंग धारेच्या केंद्रापासून दूरवर काठापर्यंत जाऊन हळूहळू संथ रूप धारण करतात.. मग हे पाणी कड्याकपारीतून मार्ग काढीत. एका नाल्याचं रूप धारण करतं, माणसाचं आयुष्य जसं कधी दुःख तर कधी सुखाच्या अनुभवांनी पुढे पुढे सरकते.. अगदी तस्सच.

या छोट्याशा नाल्याचं, हळूहळू जंगलातून ‘आलेले इतर छोटे छोटे नाले स्वागत करीत त्या नाल्यास येऊन मिळतात, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे या निसर्ग घटकांना कोणी शिकविले कुणास ठाऊक?

आता ही नदी जंगलातील चार-पाच खेड्यांतून आमच्या गावात येते.. ती सरळ गावाच्या मधोमध घुसते..

नदीच्या या घुसखोरीमुळे उगाच एका मोठ्याशा गावाचे दोन भाग झाले. पूर्वेकडचा ‘सिर्सी’ नि पश्चिमेकडचा ‘काजळी’असं नामकरण झाल.

 आता मात्र सिर्सी हेच नाव प्रचलित आहे. तरीही जुन्या माणसांनी ‘कुठं रायतं बाबू?’ म्हटलं का नवीन पोर ‘सिर्सीले रायतो जी !’ उत्तर देतात आणि मग तो माणूस जेव्हा ‘सिर्सी (काजळीच) ना?’ म्हणतो तेव्हा ही पोरं नंद्यांसारखे ‘होजी’ म्हणून होकार भरतात.

नदीमुळे एक बरं झाले.. इतर गावासारखी आमच्या गावाला अजिबात पाण्याची फिकीर करावी लागत नाही. आमच्या लहानपणी आम्ही आईसोबत धुणं धुवायला नदीवर जात होतो.. धुणं धुवायला म्हणजे काय तर तिथं जाऊन काठावरच्या मऊ मऊ रेतीत खेळायला.. पाण्यात पाय ओले करायचे अन् मग आपणच उकीरड्यावर लोळणा-या गाढवासारखं रेतीत लोळायचं.. त्याच्याने ओल्या झालेल्या पायावर रेतीचे मोजे तयार व्हायचे.. जसजशी ऊन तापायची तसतसे त्यातील ओलावा संपल्याने ते मोजे गळून पडायचे! या मोज्याचं आम्हांला तेव्हा भारी अप्रुप वाटायचं.

पायात मोजे घालूनच आमच्या इमारती उभ्या करायचा व्यवसाय चालायचा.. मात्र या इमारती नुसत्या वाळूच्या आणि पाण्याच्या ! हीच त्याची खरी खासियत होती. नानाविध तऱ्हेच्या त्या इमारतीचे ‘स्ल्याब’ मात्र वर्तुळाकारच राहायचे. काही काही इमारतींना कुंपण म्हणून बोटबोटभर.. काड्या सभोवताल लावल्या जायच्या.. त्या रक्षणाचं काम करायच्या… कधीकधी असलाच तर रस्त्यावर सापडलेला सुताचा गुंता येथे तार म्हणून वापरला जायचा.. काहींची घरे एवढी महागडी असायची की त्यांच्या घरात विजेची सोय असायची आणि हे दिवे बाभळीच्या पांढऱ्या काट्यांवर खुपसलेल्या बकरीच्या लेंड्या असायच्या ! काहींच्या घरासमोर किमती मोटारगाड्या.. तुटलेल्या विटांच्या रूपात उभ्या राहायच्या.. रेतीत कोरलेला रस्ता जणू डोंगर पोखरून तयार केल्यासारखा वाटायचा. या सर्व गाड्यांचे डायव्हर मात्र रिमोट कंट्रोलसारखे आपआपल्या जागी बसून फक्त हाताने. गाडी ढकलायचे. बिना ड्रायव्हरचा तो अनोखा प्रवास असायचा.

ज्या कुणाला या चैनीच्या गाडीघोड्यांच्या ‘ लाईफ’ मधे रस नसायचा ते वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करायचे.. नदीकाठाने वाढलेला तरोटा आणि अजून अशाच काही बाही पालेभाजी सदृश वनस्पती उपटून ते ‘मंडई’ मांडत होते.. मग खरेदी करणारे सिगारेटच्या पाकिटच्या, माचीसच्या कव्हरच्या अवमूल्यन न झालेल्या नोटांनी घरच्यासाठी भाजीपाला खरेदी करायचे, काहींचे वावरंही त्या रेतीतच होते. मुख्य म्हणजे रेती चोपडी करून त्यात चौकोनी चौकोनी वाफे करणे खूपच सोपे..

शिवाय उपडलेला काठावरचा तरोटा त्या चौकोनाच्या चौरस्त्यावर एकामागून एक रांगेत लावला की, पाच मिनिटात हिरवंगार शेत दृष्टीस पडे !

असे एक ना अनेक खेळ या नदीकाठावर आम्ही खेळायचो! पडलो, धावलो, मारामाऱ्या सारंसारे येथे केलं. पण मऊशार रेतीवर थोडासाही धक्का कधी लागला नाही. आईने आपल्या पोराला कुशीत घेऊन थोपटावं.. तसंच या काठाने आमचं बालपण जोजावले..

नदीचा काठ आठवला की बालपण ‘फ्कॅशबॅक’ सारखं काठावर जाऊन थांबतं..

नदी, नदीचा उगम, छोटसे तळे, त्यातील तरंग, तिचा गावांपर्यंतचा प्रवास, तिचं गावात प्रवेश करणं.. आम्हां चिमुकल्यांचे तिच्या काठावरचे संसार.. सारं सार

एका पहाटधुक्यासारखे विरळ होत जाऊन गत स्मृतींनी गळा भरून येतो. तेव्हा डोळ्यातील पाणी त्या नदीत जाऊन मिसळत नसेलच कशावरून ??

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आमचा सांताक्लॉज…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आमचा सांताक्लॉज…” 🎅🏼☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भिक्षेकरी याचक मंडळींनी भीक मागणे सोडून काम करावे यासाठी मी प्रयत्नरत असतो.

दिसेल त्या संधीतून यांच्यासाठी काय व्यवसाय निर्माण करता येईल याचा सतत विचार करत असतो.

कॅलेंडर दिसले, दे नवीन वर्षात विकायला…

झेंडूची फुले दिसली, दे दसऱ्याला विकायला..

पणत्या दिसल्या, दे दिवाळीत विकायला…

टाळ दिसले दे, वारीत विकायला…

चार वर्षांपूर्वी असाच कचरा दिसला होता… भिक्षेकरी मंडळींना तो कचरा साफ करायला लावून पगार दिला होता. या उपक्रमात काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली… या टीमला आम्ही मग युनिफॉर्म दिले आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करायला शिकवलं.

….. या टीमचं नाव आहे “खराटा पलटण” ! 

गेल्या चार वर्षापासून; सातत्याने दर आठवड्याला सार्वजनिक जागांची स्वच्छता आमच्या या टीम कडून करवून घेत आहोत. बदल्यात त्यांना पगार किंवा पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देत आहोत.

सांगायला अभिमान वाटतो की आमची ही खराटा पलटण पुण्याच्या “स्वच्छता अभियान” ची ब्रँड अँबेसिडर आहे.

एक भाकरी दिली तर एक वेळ पुरते….

धान्य दिले तर पंधरा-वीस दिवस पुरते…

पण स्वाभिमानाने भाकरी कमवायची अक्कल शिकवली तर ती आयुष्यभर पुरते… !

चिखलात कमळ उगवते असे म्हणतात…

रस्त्यात पडलेल्या कचऱ्यातून आमची भाकरी स्वाभिमानाने उगवत आहे… ! 

तर येत्या नाताळला सुद्धा खराटा पलटण कडून स्वच्छता करून घ्यावी, सहकाऱ्याला सांताक्लॉज बनवावे, सर्व काम झाल्यानंतर अचानक तो येऊन सर्वांना आश्चर्यचकित करेल… याशिवाय भेटवस्तू आणि पंधरा-वीस दिवस पुरेल इतके गहू तांदूळ आणि इतर किराणा देईल असा प्लॅन होता.

पण महिनाअखेर असल्यामुळे संस्थेतील पैशाला अगोदरच वाटा फुटल्या होत्या. जे पैसे शिल्लक होते ते 31 तारखेला इतर कारणांसाठी खर्च होणारच होते. किराणा घेण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते.

जाऊ दे, बघू जानेवारी महिन्यात… असं म्हणून नाराजीने नाताळाचा प्लॅन मी कॅन्सल केला… ! 

नाताळचा दिवस सुरू झाला आणि पितृतुल्य श्री अशोक नडे सर यांचा मला दुपारी फोन आला.

“ अरे अभिजीत, आज आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस ! या निमित्ताने माझ्या मुला – मुलीनी एक मोठा कार्यक्रम ठेवला आहे. आमची धान्यतुला करणार आहेत. आमच्या वजनाइतके धान्य तसेच वर आणखी काही भर घालून 250 किलो पर्यंतचे धान्य तुझ्या लोकांना द्यायचे आम्ही ठरवले आहे आज संध्याकाळी कार्यक्रमाला ये आणि जाताना सर्व धान्य घेऊन जा… “

मला शब्दच फुटेनात… हा योगायोग म्हणावा ? की आणखी काही ? 

…. एखादी गोष्ट ठरवावी… ती रद्द व्हावी आणि पुन्हा कोणीतरी येऊन… ठरल्याप्रमाणे सर्व सुरळीत करून द्यावं… ! 

प्रत्येक वेळी आपल्यापैकीच हे ‘कोणीतरी’ बनुन दरवेळी माझ्या आयुष्यात येतं…

दररोज तुम्ही माझ्या आयुष्यात सांताक्लॉज बनून येता… आणि माझा रोजचा दिवस नाताळ करून जाता… ! 

मी नतमस्तक आहे आपणा सर्वांसमोर !!! 

मातृ-पितृतुल्य नडे पती पत्नी ; यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या…

त्यांच्यासमोर सुद्धा नतमस्तक झालो… ! 

25 तारखेला नाताळच्या संध्याकाळी सर्व धान्य आणले 

26 डिसेंबरला इतर तयारी केली आणि आमच्या आयुष्यात 25 तारखेच्या ऐवजी 27 तारीख नाताळ म्हणून उजाडला !!! 

आमच्या वृद्ध आज्यांची खराटा पलटणची टीम बोलावली, सार्वजनिक भाग आम्ही सर्वांनी झाडून पुसून स्वच्छ केला.

गंमत करावी म्हणून मी त्यांना काम झाल्यावर तोंड पाडून म्हणालो, ‘आज तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही’ 

त्यातल्या आज्या मनाल्या, “ आसुंदे दरवेळी तू लय काय काय देतूस, एकांद्या बारीला नसलं म्हनुन काय झालं?“ 

“ तू तर एकटा कुटं कुटं आनि किती जणांचं बगशील लेकरा ? “ त्यांचे खरबरीत हात माझ्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर फिरवत त्या काळजीने म्हणाल्या.

माझ्या डोळ्यातून अश्रू आले… ! 

याच वेळी तुम्हा सर्वांची आठवण झाली… आणि मी “एकटा” नाही याची जाणीव झाली.

… आईच्या पदराला खिसा नसतो परंतु तरीही लेकराला ती काहीतरी देतच असते….

… बापाच्या सदर्‍याला पदर नसतो परंतु दरवेळी तो लेकराला सावली देतच असतो… ! 

माझ्या आयुष्यात भेटलेले हे याचक लोक सुद्धा कधी माझी आई होतात, काहीतरी देत राहतात….

कधी बाप होतात आणि मलाच सावली देत राहतात…

कसे ऋण फेडावे यांचे… ???

डोळ्यातलं पाणी झटकत मी मग सहकाऱ्याला खूण केली… तो नाचत उड्या मारत हातात काही भेट वस्तू घेऊन आला. आमचे लोक आश्चर्यचकित झाले…

भानावर आल्यानंतर ते मूळ पदावर आले…. “ मुडद्या फशीवतुस व्हय आमाला “ असं म्हणत चप्पल घेऊन त्या माझ्या मागे धावल्या…. आणि सगळे हसायला लागले… ! 

यानंतर नडे साहेबांनी दिलेलं धान्य आमच्या सांताक्लॉजने त्यांना वाटून टाकलं… ! 

आमच्याकडे रोषणाई नव्हती… पण माझ्या म्हाताऱ्या माणसांचे डोळे आनंदाने चमकत होते….

आमच्याकडे ख्रिसमस ट्री नव्हता… पण स्वयंपूर्ण होण्याचं रोपटं आपण सर्वांनी मिळून लावलं होतं…

आमचा नाताळ आज खऱ्या अर्थाने साजरा झाला…. !

आज सांताक्लॉज त्यांना भेटला 

आणि मलाही भेटला…. तुम्हा सर्वांच्या रूपात…!!! 

नतमस्तक आहे…!!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दृष्टिकोन बदला, विचार बदलेल – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “दृष्टिकोन बदला, विचार बदलेल – –” ☆ श्री जगदीश काबरे

खूप खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट. एका छोट्याशा गावात आकाशवाणी होते, “ज्यांना स्वर्गप्राप्ती हवी असेल त्यांनी संध्याकाळी गावाच्या वेशीवर जमावे. ” संध्याकाळी जवळजवळ सारा गाव वेशीवर जमा होते. काळोख पडण्याच्या सुमारास पुन्हा आकाशवाणी होते, “आता सर्वांनी आपापल्या डोळ्यांवर पट्ट्या बांधाव्यात आणि जंगलाच्या दिशेनं वाटचाल सुरू करावी. ” 

त्याप्रमाणे डोळ्यांवर पट्ट्या बांधून गावकरी चालू लागतात. पडत, ठेचकाळत, तोंडाने शिव्याशाप उच्चारत काही तास वाटचाल केल्यावर पुन्हा आकाशवाणी होते, “तुमच्यापैकी तिघांनी माझी आज्ञा पाळली नाही. त्यांनी डोळ्यांवर पट्टी का बांधली नाही ह्याची कारणे सांगावीत!”

“मी व्यवसायाने वैद्य आहे”, पहिला इसम बोलला, “ह्या जंगलात बर्‍याच औषधी वेलीवनस्पती आहेत. मी त्यांचे वर्णन आणि उपयोग लिहून ठेवत आहे. तो कागद इथेच सोडणार. पुढेमागे ह्या वाटेनं जाणाऱ्या कुणाला तरी तो सापडेल आणि समाजासाठी उपयोग करेल!”

“मी चालू लागल्यावर लगेचच ठेचकाळून पडलो. ” दुसरा इसम बोलला, “मनात विचार आला की, असे बरेचजण पडत असतील म्हणून मी पट्टी काढून टाकली आणि पडणार्‍यांना आधार देऊ लागलो!”

“मी पट्टी बांधलीच नाही, ” तिसरा इसम म्हणाला, “कुणीतरी सांगतो म्हणून तसं वागायचं माझ्या स्वभावात नाही. माझा मार्ग मी निवडतो. मग खड्ड्यात पडलो तर मी मलाच दोष देईन. मजल गाठली तर ते यश माझेच असेल!”

“तुम्हा तिघांनाही आपापला स्वर्ग सापडला आहे”, पुन्हा आकाशवाणी झाली, “तुम्ही इथून परत फिरलात किंवा असेच पुढे चालत राहिलात तरी चालेल. इतरांनी मात्र आपली वाटचाल चालू ठेवावी!”

थोडक्यात काय तर, प्रत्येक माणसाचा स्वर्ग हा पृथ्वीवरच आहे आणि ह्या पृथ्वीचा स्वर्ग करायचा की नरक हे त्या माणसाच्या हातातच आहे.

उदाहरणार्थ, नदीला देवी म्हणून पुजत असतानाच नदीचे गटार करण्याचा नीचपणा आपल्याला सोडावा लागेल. स्त्रीची देवी म्हणून आरती करताना स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे, असे समजणे सोडून द्यावे लागेल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून आलेलीच श्रेष्ठ-कनिष्ठतेची वृत्ती सोडून द्यावी लागेल. प्रत्येक माणसाशी माणसासारखा माणुसकीने व्यवहार करावा लागेल. स्वतःच्या जबाबदारीवर जगायला शिकावे लागेल. मगच दृष्टिकोन बदलला तर विचार बदलेल आणि विचार बदलले तर पृथ्वीचा स्वर्ग होईल.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “लोकनायक टंट्या भिल्ल..” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “लोकनायक टंट्या भिल्ल..☆ सुश्री शोभा जोशी ☆

‘राष्ट्रास्तव जे झिजले कण कण, तेच खरोखर यशस्वी जीवन ‘

असे यशस्वी जीवन जगलेले अनेक क्रांतीकारक आपल्या भारत देशात होऊन गेले हे आपण जाणतो. मातृभूमीला मुघल आणि ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे अनेक शूर वीर आपल्या देशात होऊन गेले त्यात जनजातीतील लोकही अग्रेसर होते. असेच जनजातीतील एक क्रांतीकारक टंट्या भिल्ल.

टंट्या भिल्लांचा जन्म १८४२ साली मध्यप्रदेशातील बदादा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंह होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युध्द कलांमध्ये टंट्या तरबेज होते.

सामान्य लोकांवर ब्रिटिश करत असलेले अत्याचार पाहून टंट्यांच्या मनामध्ये आगडोंब उसळे. त्यांनी गावा गावात जाऊन जनजाती युवकांची एक सेना तयार केली. ही सेना जनतेला लुटणार्‍या सावकारांच्या आणि जमीनदारांच्या विरूध्द लढत होती. टंट्या या लोकांची संपत्ती लुटत आणि गोर गरीबांमध्ये वाटून टाकत. कोणाच्याही संकट काळात ते त्यांच्या मदतीला धाऊन जात. लोकांच्या सुख दुःखात समरस झाल्यामुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आणि ते जनतेत मामा म्हणून संबोधले जाऊ लागले.

जमीनदार आणि सावकार हे इंग्रजांचे हस्तक असल्याने टंट्या मामांनी इंग्रजांविरूध्द संघर्षास सुरूवात केली. इंग्रजांनी त्यांना पकडून खांडवाच्या तुरूंगात डांबले. पण तुरूंगात बंदिवासात राहाणे त्यांना सहन होत नव्हते. त्यांनी तुरूंगाच्या भींतीवरून उडी मारून पलायन केले. ५ सप्टेंबर १८५७ ला त्यांची आणि तात्या टोपेंची भेट झाली. त्यांनी तात्या टोपेंकडून गनिमी काव्याने लढण्याचे शिक्षण घेतले आणि त्यांनी इंग्रजांशी गनिमी काव्याने लढण्यास सुरूवात केली. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जग जंग पछाडले पण ते इंग्रजांच्या हाती लागेनात.

टंट्या मामांचा एक विशेष म्हणजे त्यांना उलटे चालण्याची कला अवगत होती. जेव्हा जेव्हा इंग्रज सेना त्यांना पकडण्यासाठी येई तेव्हा तेव्हा ते उलटे चालत जात. त्यांच्या पाऊल खुणांमुळे इंग्रजांची दिशाभूल होई. इंग्रज सैन्य बरोबर विरूध्द दिशेला त्यांचा शोध घेई आणि टंट्या मामा निसटून जात. निमाड, बेतुल, होशींगाबाद या भागात त्यांचा जबरदस्त दरारा होता.

११ वर्षं त्यांनी ब्रिटिश सत्तेशी झुंज देऊन त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी १०, ५०० रू. रोख आणि पंचवीसशे एकर जमीनीचे बक्षिस जाहीर केले. ‘टंट्या पोलिस ‘नावाचे स्वतंत्र पोलिस दल निर्माण केले. गावा गावात पोलिस चौक्या वसवल्या, जमीनदार आणि सावकारांना मोफत शस्रे दिली. तरी हा वीर ११ वर्षं पोलिसांच्या हातावर तुरी देऊनडोंगर दर्‍यात तळपत होता.

शेवटी इंग्रजांनी षडयंत्र रचून त्यांना पकडले आणि इंदौरला आणले. तिथून त्यांना जबलपूर जेलमध्ये आणले गेले. शेवटी ४ डिसेंबर १८८९ ला त्यांना फाशी दिली. निर्घृणपणे त्यांचे शव पाताल पानी जवळ रेल्वे रूळांवर फेकून दिले. आजही तिथे त्यांचे स्मारक आहे.

आपली वीरता, अदम्य साहस आणि इंग्रजांविरूध्द बुलंद आवाज उठवणारे टंट्या भिल्ल जनजातींचे लोकनायक बनले. त्यांना जनजातींचे राॅबिनहूड म्हणूनही संबोधले जाते.

अशा या शूरवीर साहसी जननायकाच्या ४ डिसेंबर या बलिदान दिनी, जनजाती कल्याण आश्रमातर्फे त्यांना विनम्र श्रध्दांजली.

©  सुश्री शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – १ … ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – १ … ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 दिनांक १४ ते २२ डिसेंबर २०२४.

ठिकाण – फर्ग्युसन महाविद्यालय.

विशेष काय? तर पुस्तक सोहळा! 

पुण्यात कायमच काही ना काही विशेष ज्ञान, सांस्कृतिक, कला, नाट्य, संगीत याची विविध प्रकारची रेलचेल चालू असते. आम्हा पुणेकरांना आता कोठे जावे ? असा प्रश्न नेहेमीच पडतो.

एकाच वेळी बालरंगभूमी संमेलन, भीमथडी जत्रा, शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन, सवाई गंधर्व आणि विविध नाट्य गृहातील कार्यक्रम. सगळे एकाच वेळी. असे वाटले गोष्टीत जशी जादू घडते तसे पटापट एका ठीकाणहून दुसरीकडे जाता यायला हवे.

पण वाचन वेड असल्याने पुस्तक महोत्सव पाहूया असे ठरले. एक दिवस जाऊ असे वाटले होते. पण तिथे गेल्यावर लक्षात आले, एकदाच जाऊन जमणार नव्हते. इतका खजिना आहे तर किमान २/३ वेळा तरी जावेच लागेल. आणि याची आठवण आकाशवाणी सतत करून देत होती. मुख्य आकर्षणे अशी होती, १) पुस्तक व लेखकांशी भेट २) खाद्य जत्रा ३) बाल चित्रपट महोत्सव आणि माझ्या दृष्टीने पुन्हा ज्ञान खजिन्याचा आनंद घेणे या निमित्ताने पुन्हा कॉलेजच्या आवारात जायला मिळणार होते.

जाहिराती प्रसिद्ध व्हायला लागल्या पासूनच मामाच्या गावाला जाऊया! या धर्तीवर

पुस्तकांच्या गावा जाऊया..

पुस्तक महोत्सव पाहूया…

असेच मन घोकत होते. आणि त्या पर्वणीची आतुरतेने वाट बघत होते. आणि त्या महोत्सवाचे उद्घाटन झाले. पुस्तकांचे दालन ( मोठे व त्यात छोटी छोटी दालने ) सर्वांसाठी खुले झाले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिथे मैत्रिणीसोबत पोहोचले. चौका चौकात मोठमोठे फ्लेक्स लागले होते. त्या रस्त्याने जाताना मागच्या वर्षीचा पुस्तक महोत्सव व तेथील अनुभव आठवत होते. त्या आठवणी व गप्पा करतच तिथे पोहोचलो. आणि ते भव्य प्रवेशद्वार दिसले. त्या दारातच इतकी गर्दी दिसली की मन धास्तावलेच! प्रवेश दारातच किमान ३/४ शाळांची मुले ओळीने बाहेर येताना दिसली. प्रत्येकाच्या हातात एक पुस्तक आणि चेहेऱ्यावर नवल मिश्रित आनंद उतू जात होता. त्यांचे ते आनंदी चेहरे बघूनच मन प्रफुल्लित झाले. मग मीही थोडा वेळ त्यांचा आनंद बघत राहिले. नंतर आत प्रवेश केला. आत प्रवेश करताना अलिबाबाच्या गुहेत प्रवेश करताना खुल जा सिम सिम म्हणून ते दार उघडल्यावर त्या अलीला वाटला असेल तसाच उत्सुकता मिश्रित आनंद वाटला. आत प्रवेश करताच एका झाडाला लटकलेली पुस्तके अर्थात प्रतिकृती दिसल्या. आणि भावना, विचार यांच्या बीजाला आलेली फळेच दिसली. ते बघून फारच छान वाटले. असे वाटत होते उड्या मारुन ती पुस्तकरूपी फळे घेऊन बघावित. पण मग लक्षात आले की पुढे तर हिरे, रत्ने, माणके, सोने यासम आणि न बघितलेली अनमोल रत्ने नुसतीच दिसणार नाहीत तर हाताळायला मिळणार आहेत. मग जास्त उशीर करायला नको म्हणून इकडे तिकडे बघायचे नाही असे ठरवले. पण आमचे बालमन तिथली एकूणच सजावट बघून कुठले ऐकायला. मग रमले तिथे. तिथे इतक्या सुंदर संदेश देणाऱ्या शिल्पाकृती उभारल्या होत्या की ते संदेश स्वीकारल्या शिवाय पुढे कसे जाणार? शिवाय सेल्फी काढण्याचा मोह होताच. प्रत्येक आकृती वेगळा संदेश देत होती. प्रथम दिसले एक गोंडस बाळ, जे पुस्तकांच्या ढिगाऱ्यावर बसून चेहेऱ्यावर आश्चर्य घेऊन जगाकडे बघत होते. जणू आपल्याला सांगत होते, या पुस्तक रुपी ज्ञानातून इतके ज्ञान मिळते की सर्व जगावर राज्य करु शकता. आणि प्रगतीच्या उंच जागी जाऊ शकता. तो बघे पर्यंत तिथे फोटो घेणाऱ्यांची गर्दी झाली. पुढे तर पुस्तक वाचताना गुंग असणारा माणूस असा पुतळा दिसला. त्याच्या हातातील पुस्तकावर व अंगावर अक्षरेच अक्षरे होती. मग आम्हीही त्याच्या समोर फोटो घेतला.

थोडे पुढे आल्यावर दिसले एका ठिकाणी एका शाळेचे विद्यार्थी व त्यांचे सर उभे आहेत. मग मीही त्यात सामील झाले. त्यांच्या समोर एक आकृती होती. त्यात उघडून ठेवलेले भव्य पुस्तक होते. व त्यातून एक अळी सारखा प्राणी बाहेर पडत होता आणि त्याचे तोंड मात्र भव्य ड्रॅगन प्रमाणे होते. जणू ज्ञान घेतल्यावर आपण कसे मोठे होऊ शकतो हेच दर्शवित होते.

त्यानंतर एक पुतळा असा दिसला की मी तर बघतच राहिले. त्या पुतळ्याच्या डोक्याच्या ठिकाणी पुस्तक होते आणि डोके त्याच्या हातात होते. आणि तो ते पुस्तक एकाग्रतेने वाचत होता. यातून माझ्या मनात बरेच अर्थ आले. असे वाटले आपले तन मन, मस्तिष्क एकाग्र करून सगळे विसरून पुस्तक वाचावे असा संदेश देत आहे. एकदा वाटले डोक्याच्या ठिकाणी पुस्तक ठेवून प्रथम स्वतःला वाचा आणि स्वतःचे परीक्षण करा असा संदेश देत आहे. त्या मार्गावर जागोजागी छोटे मांडव होते. त्यातूनच प्रवेश करावा लागत होता. त्या मांडवाच्या छताला पुस्तकांच्या प्रतिकृती खूप आकर्षक रीतीने टांगल्या होत्या. एका ठिकाणी तर त्यांचा आकार मराठी व इंग्रजी अक्षरांचा होता. आणि दोन्ही बाजूला महोत्सवात काय बघू शकाल याची चित्रे होती. याच मार्गावर जागोजागी पुस्तकांच्या विविध रंगाच्या, विविध आकाराच्या शिल्पाकृती दिसत होत्या. आणि बसायला पुस्तक दुमडल्यावर जसे दिसेल तशा आकाराचे अक्षरे असलेले बेंच होते.

सगळीकडे असलेले पुतळे मात्र मोठे आकर्षक आणि संदेश देणारे होते. एका ठिकाणी एका बेंचवर गावातील माणसाची पुस्तक वाचनात गुंग असलेली आकृती होती.

तेथून पुढे गेल्यावर एका मार्गावर प्रवेश केला. आणि डाव्या बाजूला दिसली खाद्य जत्रा. खूप विशेष वाटले. तिथे एक मॅडम विद्यार्थ्यांना सांगत होत्या, ज्यांना काही खायचे असेल त्यांनी खाऊन घ्या. त्यांची सूचना जरा विचित्र वाटली पण विचार केल्यावर योग्य वाटली. एकदा पुस्तके बघायला लागलो की पुन्हा भूक लागली म्हणून बाहेर यायला नको. आम्ही मात्र थेट मुख्य प्रवेश दारातच प्रवेश केला. त्या लाल कार्पेट वरून चालताना आपण वाचकही विशेष आहोत असेच वाटत होते. आत प्रवेश करताच भव्यता लक्ष वेधून घेत होती. डाव्या बाजूला सुंदर स्टेज व समोर ठेवलेल्या खुर्च्या दिसल्या. चौकशी केल्यावर त्या ठिकाणी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात हे समजले. पण या वेळी तिथे काही मुले चित्रे काढताना दिसली. आणि त्यांच्या शिक्षिका त्यांना सूचना देत होत्या. उजवीकडे उत्कृष्ट सेल्फी काढण्यासाठी व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी आपले मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांचे कट आऊट ठेवले होते. त्यांच्या हातात समृध्द भारताचे पंचप्राण लिहिलेले प्रमाणपत्र होते. आणि ते आपल्याला देत आहेत असा फोटो काढण्याची व्यवस्था होती. तेथे आलेले सर्वच त्या ठिकाणी फोटो काढत होते. आणि त्याच्या बाजूलाच प्रत्येक मुलाला पुस्तक दिले जात होते. आता प्रत्यक्ष पुस्तकांच्या गुहेत प्रवेश करायचा होता. गर्दीचा अंदाज बाहेरच आला होता. त्यामुळे आतही गर्दी असणार हे गृहीत धरूनच आत प्रवेश केला.

– भाग पहिला 

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी केलेली ‘पु.लं.’ ची हजामत” –  लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी केलेली ‘पु.लं.’ ची हजामत” –  लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

(हा लेख आहे पुलंचे केशकर्तन करणाऱ्या प्रतिभावान माणसाचा)

जगाची गंमत करणा-या अवलियाची हजामत या बहादुराने केली आहे.

पण ही हजामतही त्यांच्यासाठी एका देवपूजेपेक्षा कमी नव्हती.

या देवपूजेचे गोष्ट त्यांच्याच शब्दात…

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ ; विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार घडून आत आला.

‘तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ‘

त्याच्या या वाक्याने माझ्या चेह – यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून ‘ सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत ‘- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला.

आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 

‘ हो लगेच निघतो ‘ 

असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो.

त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ‘ पुलं ‘ चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता.

‘राहू द्या हो ; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ‘ 

त्याच्या या वाक्यातून ‘ पुलं ‘ बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी ‘ रुपाली ‘ मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि ‘ या ‘ म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले.

‘ थोडावेळ बसा ; भाई जरा नाश्ता करतो आहे ‘ असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या.

आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते.

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो.

इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. ‘ चंदकांत, यांचे केस बारीक करून टाका ‘ म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या.

त्यांचे लक्ष नाही असे पाहून 

‘ फार लहान करू नका,

थोडेच कापा ‘ 

पुलं माझ्या कानात कुजबुजले.

माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या.

पहिल्याच दिवशी पुलं त्यांना ‘ पुलं-स्वामिनी ‘ का म्हणतात याचा अर्थ उमगला.

त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या.

त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व ‘ वा छान! ‘ म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.

‘ चंद्रकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका ‘ त्यांनी आज्ञा केली.

मला जरा विनोद करावासा वाटला.

मी म्हटलं, ‘ नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ‘ हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ‘ त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ‘ तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय ?’ 

मी मनात म्हणालो ‘ मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते.

म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता.

शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो,

‘ एक आनंदाचं देणं ‘.

पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे… ‘

लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाईंच्या मनातलं… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी `

🌸  विविधा  🌸

☆ सावित्रीबाईंच्या मनातलं☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

मी सावित्री बोलतेय गं माझ्या लेकींनो तुमच्याशी. मलाही थोडं मन मोकळं करावसं वाटतयं नं तुमच्या जवळ!

आज तुम्ही सगळ्या माझ्या कामाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करता आहात नं!खूप बरं वाटतयं मला!खरचं तेव्हा मला खूप कष्ट पडले गं मुलींनो प्रवाहा विरुद्ध पोहोतांना! सगळ्या समाजाचा विरोध होता मुलींना शिकवण्यासाठी. पण माझ्या पतीचा ज्योतीबांचा भरभक्कम हात होता माझ्या पाठीवर म्हणून मी तरून जाऊ शकले. अर्थात मलाही तेव्हढं धैर्य गोळा करावच लागलं बरं का?

का शिकवायचं नाही मुलींना याचं मुख्य कारण काय सांगायचे तेव्हाचे बुजरूक माहिती आहे का?ते म्हणायचे, मुलींना शिकवलं तर त्या आपल्या याराला पत्र लिहितील आणि त्याच्या सोबत पळून जातील. पण नंतरच्या काळात साने गुरूजींनी ठाम पणे सांगितले की खूप काळाने दाव्याला बांधलेली गाय सोडली की ती हुंदडते व आपल्या वासरासाठी घरी परतते. त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा खूप काळ बंधनात होती म्हणून थोडा काळ भरकटल्यासारखी दिसेल पण आपल्या पिल्लांसाठी घरट्यात परतेलच!बरोबर आहे न गं मुलींनो! आतापर्यंत तरी तुम्ही त्यांचे बोल खरे करून दाखवले. शिकून, नौकरी करून, स्वातंत्र्य घेऊनही घरटं नीट सांभाळलं. आपल्या भारतीय संस्कृतीचे पाळंमुळं घट्ट धरून ठेवलीत.

पण आजकाल थोडं थोडं चित्र बदलू लागलयं का गं?मुली वरवरचं रूपडं बघून प्रेमात पडतात आणि स्वतःचंच जीवन उद्ध्वस्त करताहेत!अगं मला माझ्या ज्योतिबांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं म्हणून माझ्या हातून येव्हढं मोठं कार्य घडलं. पण मी आपल्या भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेलीच राहू दिली. कारण पाळंमुळं खोलवर रूजली होती मनात. शिकून मुलींनी उंच झेप घ्यावी. स्वतःची उन्नती करून घ्यावी. हेच चित्र होतं माझ्या डोळ्यापुढे तेव्हा. बरोबर होत ना गं ते!तुम्ही पण ते चित्र छान रंग भरून सर्वांसमोर आणलं बरं का!मला खूप अभिमान वाटतोय त्याचा.

पण एक सांगू का तुम्हाला?तुम्ही शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नती बरोबर आपल्या देशाची, संस्कृतीची शान राखावी या करताच करा हं मुलींनो. आज आपले मुलं मुली कुठल्या दिशेने धावताहेत याकडे वेळीच लक्ष द्या बरं का?दुसर्‍या संस्कृतीमधील चांगल्याबरोबर वाईटही गोष्टी आधुनिकतेच्या नावाखाली उचलू नका. अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल. अजूनही लगाम तुमच्याच हातात आहेत. ते आवरा, उधळू देऊ नका. “सावित्री बाईंनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले” या शब्दांना अलगद सांभाळणं, या शब्दां बरोबरचं माझाही मान राखणं आता तुमच्याच हाती आहे बरं का!कारण मी हाती घेतलेला वसा मी तुमच्या हाती खूप विश्वासाने सोपवला आहे. माझा विश्वास सार्थ करणे तुमच्याच हाती आहे.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नवीन आणि जुन्या पिढीत वैचारिक मतभेद असणे हे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियमआहे.  काळानुसार जीवनशैली बदलत असते. शिक्षण, विज्ञान, जागतिकीकरण यातून नवीन विचार प्रवाह अस्तित्वात येत असतात. नवीन पिढी हे नवे विचार लवकर आत्मसात करते. तर जुन्या पिढीला हे स्वीकारायला वेळ लागतो. यातून संघर्ष निर्माण होतो आणि अनेकदा तो विकोपाला जाऊन एकमेकांबद्दल कटुता निर्माण होते, दुरावा निर्माण होतो.  याचा परिणाम कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होतो. आज कुटुंबात हा वाद आई-वडील आणि मुलं यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.  त्यामानाने काही अपवाद वगळता, आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्या संघर्षाची तीव्रता कमी आहे.

पूर्वी एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य अथवा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा केली जात असे. त्यामुळे वैचारिक देवाणघेवाण करताना एकमेकांशी आपुलकीचे संबंध निर्माण होत.  पण आता गुगलवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या भांडारामुळे हा संवाद हरवत चालला आहे. पाठीवरच्या हातातून मिळणारं पाठबळ व स्पर्शातून व्यक्त होणारं प्रेम, हे दृक्श्राव्य माध्यमातून होणाऱ्या शाब्दिक चर्चेतून कसं मिळणार?कोविडच्या काळात तर अगदी शिशु वर्गातील मुलांना मोबाईल हातात घेऊन शिक्षण घेणं क्रमप्राप्त झालं. आई-वडील लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात गर्क आणि मुलं अभ्यास आणि नंतर मोबाईलवर गेममध्ये दंग!

पूर्वी एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर नवविवाहिता, शेजारच्या एखाद्या काकू, मावशीचा सल्ला घेत असे, माहिती घेत असे.  कालांतराने पाककृतींची पुस्तकं उपलब्ध झाली. आणि आता तर मोबाईलमुळे *कर लो दुनिया मुठ्ठी में *, त्यामुळे देशी-विदेशी कोणत्याही पाककृती काही सेकंदात तुमच्या समोर असतात आणि त्याही दृक्श्राव्य स्वरूपात! केवळ पाककृतीच नव्हे तर कोणत्याही विषयासंबंधी माहिती, मोबाईलवर क्षणात सापडते. या आभासी जगात रमताना कौटुंबिक आणि सामाजिक संवाद हरवत चालला आहे.

जागतिकीकरणामुळे कामाच्या वेळेचा आपल्या स्थानिक वेळेशी मेळ नाही. त्याचाही विपरीत परिणाम शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होत आहे.

आपल्या मुलांनी दिवसभरात चार शब्द आपल्याशी बोलावे, ही घरातील वडील मंडळींची साधीशी अपेक्षा.  पण कामाच्या या विचित्र वेळेमुळे कुटुंबातील ज्येष्ठांची साधी विचारपूस करायलाही तरूण पिढीला वेळ नाही.  मग इतर अपेक्षांची काय कथा!त्यामुळे त्यांच्या परस्पर संबंधात काहीसा दुरावा निर्माण होतो आहे.  लग्न, मुंजीसारखे समारंभ किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात भाग घेणं देखील, त्यांना त्यांच्या कामाच्या वेळेनुसार, अनेकदा शक्य होत नाही. मग नातेवाईक आणि समाजातील अन्य व्यक्तींशी संबंध जुळणार तरी कसे? आपण सुखदुःखाच्या प्रसंगात कोणाकडे गेलो नाही, तर आपल्याकडे तरी कोण येणार? याचा परिणाम नवीन पिढीला एकाकीपणा बहाल करत आहे. वैफल्यग्रस्त बनवत आहे.  त्यांच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढवत आहे.

यामुळेही कौटुंबिक कलह निर्माण होऊन, भावनिक दुरावा निर्माण होत आहे.

मग या दोन पिढ्यांत समन्वय साधणार तरी कसा?कारण प्रत्येक पिढीला स्वतःचंच वागणं बरोबर वाटत असतं. त्यांची जीवनशैली व सामाजिक मूल्ये वेगवेगळी असतात. परस्पर संवाद, चर्चा आणि सामंजस्य याद्वारे हा दुरावा, अंतर नक्कीच कमी करता येईल.

जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला परंपरागत, सामाजिक व धार्मिक विचारांचे महत्त्व पटवून द्यावे, परंतु नवपिढीवर ती बंधन म्हणून लादू नये. सातच्या आत घरात, ही पूर्वीची परंपरा. आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय इ. च्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नवीन पिढीला, हे कसं शक्य होईल?घरी परतायला रात्रीचे ९-१०वाजत असतील तर झोपायला १२ वाजणार, मग पहाटे लवकर उठणं कसं जमणार? आता वटपौर्णिमेला वडाची साग्रसंगीत पूजा आणि उपास केवळ परंपरा म्हणून केला पाहिजे, हे नवीन पिढी ऐकणार नाही. पण वटवृक्षाचं संगोपन, निसर्गाचा समतोल आणि आरोग्य या गोष्टींसाठी ते करावं, हे समजावून सांगितल्यावर आजच्या पिढीतील तरूण आणि तरूणी, दोघंही वृक्षारोपणाचा वसा उचलायला स्वतःहून पुढाकार घेत आहेत.  रोज देवपूजा करणं हा जुन्या पिढीच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग. पण नवीन पिढीला कदाचित तो वेळेचा अपव्यय वाटू शकतो किंवा त्यांच्या कामाच्या घाईगडबडीत त्यांना ते जमवता येत नसेल.  नवपिढी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असेल, त्यांना जमेल तसं सामाजिक उन्नतीसाठी शारीरिक, आर्थिक, बौद्धिक मदत करत असेल तर, जुन्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान, योगाभ्यासाची आवश्यकता संयतपणे तरूण पिढीला समजावून सांगितली पाहिजे.

आजच्या शिक्षणपद्धतीत जीवनमूल्यांचा अभाव जाणवतो. जीवघेण्या स्पर्धेच्या या युगात झापड लावल्यासारखी अवस्था आहे नवीन पिढीची! जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला जुन्या जीवनमूल्यांचे महत्त्व आणि आजच्या परिस्थितीत त्यांची उपयुक्तता समजावून सांगणे आवश्यक आहे. कारण काळ कितीही बदलला तरी नेहमी खरे बोलणे, प्रामाणिकपणे वागणे, वडीलधाऱ्यांचा आदर आणि सेवा करणे ही शाश्वत मूल्ये कधीच कालबाह्य होत नसतात.

नव्यापिढीचे स्वैर वागणे, मुला-मुलींचे एकत्र फिरणे, रात्री उशिरा घरी परतणे, त्यांची कपड्यांची फॅशन, जुन्या पिढीला आवडत नाही.  जुनी पिढी, पालक अनेकदा या मुलांच्या आवश्यक गरजा पूर्ण करत नाही.  यातून मग वाद निर्माण होतो.  आपल्या वागण्याचं, गरजांचं योग्य समर्थन नवीन पिढीला करता आलं पाहिजे आणि आपल्या विरोधामागची भूमिका, जुन्या पिढीलाही नीट समजावून सांगता आली पाहिजे. अर्थात हे करताना दोन्ही बाजूंनी संयम राखणं खूप आवश्यक आहे. अन्यथा केस कापायला आई-वडिलांनी परवानगी दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या, मित्रांबरोबर पार्टी करायला पैसे दिले नाही, म्हणून वडिलांच्या खूनाचा प्रयत्न, मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून वडील आणि भावांनी तिला जीवे मारले, यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात.

नवीन पिढीला तंत्रज्ञानाची माहिती आपल्यापेक्षा जास्त आहे, हे वडीलधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. घरबसल्या मोबाईलच्या मदतीने ते अनेक कामं, अगदी चुटकीसरशी पार पाडतात. मग ते लाईट बील भरणं, औषधं मागवणं, एखाद्या कार्यक्रमाची/प्रवासाची तिकिटे आरक्षित करणं असं काहीही असेल. पण यामुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यांची छान बचत होते. या पिढीच्या उधळपट्टीवर, अवास्तव खर्चावर टीका करणाऱ्या मंडळींनी हेही लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या शहरात अथवा परदेशात राहणारी अनेक मुलंही वेबकॅम सारख्या उपकरणांचा उपयोग करून आपल्या पालकांची काळजी घेताना दिसतात. त्यांच्या दैनंदिन गरजा आॅनलाईन व्यवहाराद्वारे पूर्ण करताना दिसतात.

 ‘आमच्या वेळी नव्हतं हो असं ‘, हे म्हणणारी पिढी कधीच मागे पडली आहे.  आत्ताचे पन्नाशीच्या आसपासचे आई-वडील अथवा सासू-सासरे बघितले, तर ते नवीन पिढीशी बरंच जुळवून घेताना दिसतात.  मुलांची कामाची वेळ, घरून काम, त्यांचं स्वातंत्र्य यांचा विचार करून, त्यांचं वेगळं राहाणं ते समजून घेतात. शक्य असेल तिथे पालक मुलांच्या लग्नाआधीच त्यांची वेगळं राहण्यासाठी सोयही करून ठेवतात. हे परिवार वेगळ्या घरात राहात असले तरी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि परस्परांना शक्य तेवढी मदतही करतात. आपल्या आचरणातून होणारे संस्कार पुढील पिढीत आपोआप झिरपत असतात. म्हणूनच परदेशात राहणारी अनेक मुलंही आपल्या परंपरा, मातृभाषा आवर्जून जपताना दिसतात.  कदाचित ते जपण्याची त्यांची पद्धत काळानुरूप थोडी वेगळी असेल.  पण हे चित्र नक्कीच आशादायक आहे.

  प्रत्येकाने आनंदात राहावे असे वाटत असेल, तर दोन्ही पिढ्यांनीआपल्या भूमिकेची अदलाबदल करून पाहावी. म्हणजे एकमेकांना समजून घेणं सोपं होईल. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून एकमेकांबद्दल प्रेम, आदर, काळजी व्यक्त झाली पाहिजे. मानवी संवेदनशीलता हरवता कामा नये. दोन्ही पिढीतील सदस्यांनी वैचारिक भिन्नतेचा आदर राखला पाहिजे.

 सामाजिक संबंध सलोख्याचे ठेवण्यासाठीही एकमेकांस समजून घेणे आवश्यक आहे.

एकमेकांच्या भावना, विचारसरणी, सामाजिक मूल्ये समजून जीवन जगले पाहिजे. तेव्हाच दोन्ही पिढ्यांमध्ये समन्वय साधला जाईल.  शिक्षण, चौफेर वाचन, सामाजिक माध्यमांचा योग्य वापर यातून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर नक्कीच अनुकूल परिणाम दिसून येईल.  आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे अधिक संवेदनशीलतेने आणि सजगपणे बघण्याचा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जोपासण्याचा प्रयत्न दोन्ही पिढ्या करत आहेत, ही समाधानाची बाब आहे.  शालेय शिक्षणात मूल्य शिक्षण आणि पर्यावरण विषयक जागरूकता यांचा समावेश हे त्यातील एक महत्वाचं पाऊल!याशिवाय अनेक सेवाभावी संस्था आणि गट वृक्षारोपण, रक्तदान, प्लास्टिक हटाव, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचं वाटप, जुनं प्लास्टिक व मोबाईल सारखा ई-कचरा गोळा करून पुनर्वापरासाठी पाठवणे, असे उपक्रम राबवत आहेत.  या उपक्रमांमध्ये लहान-थोर सगळ्यांना सामील करून घेतलं जातं.  त्यामुळे दोन्ही – तिन्ही पिढ्यांमध्ये प्रत्यक्ष संपर्क, संवाद आणि आपुलकीचं नातं निर्माण होण्यास, खूप छान मदत होत आहे.  

 © सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हॅप्पी न्यू इयर !!!!! ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ हॅप्पी न्यू इयर !!!!! ☆ श्री सुनील देशपांडे

तो म्हणाला..  “हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही.  आपलं वर्ष गुडीपाडव्याचं..  “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”

मी म्हणालो..  “ आजची तारीख काय?”

“३१ डिसेंबर”

“आजची तिथी काय?’

“माहीत नाही”

“मग आपलं नक्की काय?”

“ मला रोजची तारीख माहिती..  माझं सगळं नियोजन तारखेवर… म्हणून माझं नववर्षही तारखेवर.

“ मग पाडवा? “

“ तो ही माझा आहेच.  मी आनंदाचा प्रवासी, जिथे आनंद तिथं मी.  ‘शादी किसीकी हो, अपना दिल गाता है. ’

ही माझी वृत्ती, हा माझा पिंड…  खरं तर प्रत्येक सकाळ ही एका नववर्षाची सुरुवात असते.  ‘ सवेरेका सूरज हमारे लिये है ‘ असं म्हणणारा कलंदर मी…..  

….  ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो.  

हर एक पलको खुशी से गले लगाते जियो 

..  हीच वृत्ती असावी.  खरं म्हणजे प्रत्येक क्षणच नवा असतो, नवा जगायचा असतो.  कोणता क्षण अंतिम असेल हे काय ठाऊक? म्हणूनच प्रत्येक क्षण साजरा करावा.  प्रत्येक दिवस साजरा करावा.  पण रोज साजरा करायला जमतंय कुठं? जमलं तर तेही करावं.  कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.

आनंदाला ना जात ना धर्म ना देश.  म्हणूनच – – 

..  ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग…’ असं म्हणत मित्रांनो साजरा करूया “ निखळ आनंद “….  

..  मग तो कुणाचा का असेना..  आणि कधीही का असेना !!!

….  तर चीssssssssअsssssर्सssss !! 

…  , हॅप्पी.. , न्यू.. , इयर !!!!!

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares