सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
मोबाईल वरील मेसेजेस वाचत होते .पेडोंगी नावाचे खेचर आर्मीमधे रसद पुरवत होते. त्याला पाकिस्तानी सैनिकांनी पकडून आपल्याकडे कामाला लावले. संधी मिळताच पाठीवरच्या मशीन गन आणि बॉम्ब गोळ्या सहित 25 किलोमीटर चालून भारतीय हद्दीत आल. त्याचा सत्कार झाला. आणि गिनीज बुक मध्ये नाव पोचल . खरंच देशभक्त.
हे वाचत असताना आमच्या येथे घडलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. अनेक गाढवांचा घोळका निघाला होता. एक गाढव मात्र अगदी हळूहळू असहाय्यपणे लंगडत चाललं होतं. माझ्यासारख्या प्राणी प्रेमिला गप्प बसवेना. स्वप्नीलला हाक मारली. गाढव कोणाच का असेना पण त्यावर उपचार करायला हवेत. स्वप्नील एकटा काही करणे शक्य नव्हते. राहत संस्थेच्या किरण नाईक आणि पीपल फॉर ऍनिमल संस्थेच्या अशोक लकडे ना बोलावून घेतले. दोघांनी पकडून त्याला गॅरेजमध्ये ठेवलं. संपूर्ण पाय सडला होता. त्यातून पाणी वहात होतं. त्यात किडे झाले होते. मालकाने काम करून घेऊन सोडून दिले होते .फोन करून डॉक्टरना बोलावून घेतले. त्यांनी गाढवांचा पाय पाहिला मात्र आणि काय! यातून हे वाचणं शक्य नाही. इंजेक्शन देऊन सोडवायला हव असा सल्ला दिला.
जीव घेण दोन मिनिटाच काम पण जीव वाचवायला काही दिवस लागतात .प्रयत्न तरी करून बघू. शेवटी त्याचं प्रारब्ध असं म्हणून प्रयत्न सुरू केले. गाढवाला खाण्याची सुद्धा ताकत नव्हती. औषध लावलं तर जखमेवर रहात नव्हतं. जवळ जाणं शक्य नाही, इतका घाण वास येत होता .दोन दिवस पिचकारीने पाण्याने जखम धुवून काढली. दोन दिवसांनी औषध व बॅंडेज बांधले. पण तेही पायावर रहात नव्हते. शेवटी जखम उघडी ठेवली. एका वेळेला एक संपूर्ण ट्यूब लावावी लागायची. आता ते रोज ड्रेसिंग व्यवस्थित करून घ्यायला लागलं. किरण व अशोक गवताच्या पेंड्या ,भरडा आणत होते .त्यांच्या गाडीचा आवाज त्याला कळायला लागला. आवाज आला की ते ओरडायला लागायचं. हळूहळू जखम भरून यायला लागली. आता गाढवाची सगळ्यांशी मैत्री झाली होती. किरणना तर आपण यशस्वी झाल्यासारखे वाटायचे. ते आले की पहिल्यांदा गाढवाला मिठी मारायचे. त्याच्याशी बोलायचे. जाता-येता कोणी कोणी विचारायचे “काय हो गाढव पाळलंय काय ?”हसायला यायचे.
तीन आठवड्यांनी गाढवाची जखम बरी झाली. एक दिवस गाढवाचा मालक तणतणत आला.” माझं गाढव तुम्ही इथं ठेवलंय होय कधीचा हुडकतोय”. सगळ्यांनी त्यालाच फैलावर घेतल. गाढवाच्या सडलेल्या पायाचे आणि बऱ्या झालेल्या पायाचे फोटो दाखवले.’ पावलावर दवाखाना असून त्याला उपचार न करता राबवून घेतलंस ,म्हणून सगळ्यांनी तोंडसुख घेतलं .आता त्याला बोलायला जागा नव्हती. त्याला तंबी दिली. औषधाचा खर्च 2000 आला म्हणून सांगितलं. शेवटी कसेबसे त्याने पाचशे रुपये काढून दिलेन . त्याच पाचशे रुपयांची पुढील उपचारासाठी औषधे घेऊन त्याला दिली. गाढवही त्याच्या ताब्यात दिलं
दोन दिवसानी गाढव त्याच्या मित्रमंडळींबरोबर फिरायला जायला लागलं. जाताना पाच मिनिट गॅरेज जवळ थांबून सगळ्यांकडे पहायचं. जीवदान मिळाल्याबद्दल धन्यवाद देण्याचा अविर्भाव त्याच्या डोळ्यात दिसायचा. गाढवाचे प्रारब्ध, सगळ्यांचे प्रयत्न आणि सर्वात मोठी परमेश्वराची कृपा या. त्रयीतून गाढवाचा जीव वाचला.
काय म्हणावं गाढवाचा शहाणपणा की मालकाचा गाढवपणा!. वेडेपणाला गाढवाची उपमा का देतात हे मला अजूनही न उलगडलेलं कोड आहे.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली
फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈