☆ जीवनरंग ☆ सखु ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर ☆
चांगल रुपया येवढ मोठ ठसठशीत कुंकू लावणारी, हातात कायम हिरवा चुडा असणारी, नीट नेटक स्वच्छ नऊवारी लुगड नेसणारी, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सदा सर्वदा हसतमुख असणारी आमची सखु.
मध्यम बांध्याची, सावळ्या रंगाची, आणि स्वच्छ राहणारी सखु आमच्या कडे गेली कित्तेक वर्ष काम करत होती. कितीही दुःख, कष्ट असले तरी त्याचा लवलेश नाही चेहर्यावरती. सदा हसतमुख. पदरी तीन मुले आणि दारुडा नवरा. हिने रात्रंदिवस काम करायचे, मुलांना चार घास खाऊ घालायचे आणि रात्री नवऱ्याचा यथेच्छ मार खायचा. हा नित्य क्रम…. तरी ही माऊली हसतमुख चेहर्याने दुसरे दिवशी कामा वर येत होती.
एकेदिवशी तिच्या पाठीवरचे वळ खूप काही बोलून गेले. आणि तिला त्या दिवशी मी न राहून विचारले, काय झाले, मारले आहे काय काल नवऱ्याने ?? त्यावर हसत म्हणाली रोजचं हाय की. आम्ही राबायचे कष्ट करायचे, खायला घालायचे आणि वर मार खायचा. मला आधीच खूप राग आला होता तिचे वळ बघून म्हणून पोटतीडकीने, जरा रागातच म्हणाले मग सोडून का देत नाहीस त्याला?? नाही तरी स्वतः कमावतेस, तो काही तुला पोसत नाही मग हवाच कश्याला तो ? कधी नाही ते ती आज खूप त्रासलेली होती, म्हणाली स्वतः साठी नाही हो आज लढून आली आहे माझ्या हिरकणी साठी, हिरकणी म्हणजे तिची पंधरा वर्षाची वयात आलेली पोर. दिसायला गोरी पान, नाकी डोळी नीटस असलेली आईसारखीच हसतमुख. आज तिच्या बापाने चक्क पैश्यांसाठी विकायचा प्रयत्न केला होता. आज मात्र सखु भरभरून बोलत होती पहील्यांदा. नागाच्या शेपटी वर पाय दिल्यावर जसा नाग चवताळून फणा काढतो तसा. त्यावर मी परत तोच प्रश्न केला तिला, सोडून का देत नाहीस त्याला? आता मात्र ऐकुन घ्यायची वेळ माझी होती. म्हणाली कसा ही असला तरी कुंकू आहे माझं, आज त्याच कुंकवा मुळे घुबडासारख्या घाणेरड्या नजरा वर तोंड करून बघायची हिम्मत ठेवत नाहीत. हे काळे मणी गळ्यातले रक्षण करतात माझे ताई. आणी दारुडा असला तरी माझ्या वर लई प्रेम करतोय. आज कोणाच्या सांगण्यावरून पैश्यांसाठी खूप मोठी चूक करायला निघाला होता, पण आज मी पण हात उगारला बघा नाही सोडला आज त्याला, माझ्या पोटच्या गोळ्याचा सौदा करायला निघाला होता, जागेवर आणले टक्कुर त्याचे, कस काय मती फिरली त्याची काय माहीत, लई जीव आहे त्याचा पण हिरकणी वर, नशा उतरली तेव्हा ढसाढसा रडला,पोरीला कवटाळून.
आणि तिने नंतर जो मला प्रतिप्रश्न केला त्याने मात्र मी अंतरबाह्य हलले.
ती म्हणाली आमच्या सारखीअनाडी लोकं पिऊन रात्री नशेत असतात पण तुमच्या सारखी सुशिक्षित लोक दिवस रात्र नशेत असतात. फक्त पैसा मिळवणे एवढाच ध्येय. घर दार मुलं बाळ तुम्हा मोठ्या माणसांना पण आहेच की. ती म्हणाली, मी जिथे जिथे काम करते तिथे पाहिले आहे ताई घर तर तुम्ही बायकाच सांभाळता की. खर सांगु ताई तुमच्या सुशिक्षित लोकात पण पितात फक्त झाकून. हाणामारी तर तुमच्यात पण होते फक्त चार भिंतीत दडवून ठेवली जाते आणि आमची चवाट्यावर येते. ही सुशिक्षित लोकं जेव्हा त्यांची पायरी सोडतात तेव्हा जास्त त्रास होतोय ताई. फक्त पैशांचे खेळ आहेत. तुम्ही झाकून ठेवता, गरिबी काही झाकून देत नाही एवढेच. उलट आम्ही बोंबाबोंब करून अन्याय विरूद्ध आवाज उठवतो वेळ प्रसंगी हातही उगारतो, पण तुम्ही निमुटपणे सोसता आणि कुणाला कळायला नको म्हणून लपवून सहन करता.
खरच की, ती एवढ बोलून गेलीपण दुसर्या कामावर. आणि मी बधीर मनानी नुसते विचार करत होते. ती बोलून गेली ते अगदी खर होत. अशी कित्येक सुशिक्षित घर आहेत जिथे नवरा रोज पिऊन येतो मारहाण करतो, ज्याची बाहेर आपल्या एज्युकेटेड लोकांच्या भाषेत गर्लफ्रेंड असते, अशिक्षित त्याला रखेल म्हणतात. आपण थोबाडीत खाऊन चेहेरा लपवितो तर त्या एक घेऊन दोन ठेऊन द्यायची हिम्मत ठेवतात.
मग नक्की अबला कोण आपण की त्या? एक ना अनेक प्रश्न मला भेडसावत होते ज्याची उत्तरे माझ्या जवळ पण नव्हती.
सहज मनाच्या कोपऱ्यातून☺️
© सुश्री श्रेया सुनील दिवेकर
मो – 9423566278
30.8.2020
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈