मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुखाचा मंत्र… ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

☆ इंद्रधनुष्य : सुखाचा मंत्र… ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

अंगणात एक छानसा पक्षी आला होता. मी पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या कुंड्यात त्यानं चक्क आंघोळ उरकली. शेजारी ठेवलेले दाणे खाल्ले. पाणी प्यायला. थोडावेळ नाचला..चिवचिवला..उडून गेला. माझी सकाळ प्रसन्न झाली.मी पुन्हा कामाला लागले.

मनात सहज विचार आला..सुंदरच होता तो पक्षी. आवाजही गोड. पण ना मी त्याला पिंजऱ्यात ठेवलं, ना त्यानं माझ्याचकडे राहावं असा हट्ट धरला. ना त्यानं मी ठेवलेल्या दाण्यापाण्याबद्दल आभार मानले. खरं तर तो त्याच्या त्याच्या जगात स्वतंत्र जगत होता. योगायोगानं माझ्या अंगणात आला काही क्षण राहिला आणि उडून गेला. मला त्याच्या सहवासात आनंद झाला कारण मला त्याला बांधून ठेवायचं नव्हतं. त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती माझी. मुळात मी त्याच्यात गुंतले नव्हते.

माणसांच्या बाबतीतही असाच विचार केला तर…म्हणजे अगदीच न गुंतणं शक्य नाही. विशेषत: जवळच्या नात्यात गुंततोच आपण. पण हे गुंततानाही थोडं भान ठेवलं, की हा माणूस एक स्वतंत्र जीव आहे आणि तो त्याचं आयुष्य जगायला या जगात आला आहे.आपण त्याला देऊ केलेल्या ऐहिक वस्तू(दाणा पाणी) प्रेम, संस्कार, विचार, मैत्री, मदत हे सगळं आपण आपल्या आनंदासाठी त्याला दिलं. आता ते घेऊन त्यानं उडून जायचं की आपल्या अंगणात खेळत राहायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना…या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करून दखल घ्यायची की नाही हा त्याचा प्रश्र्न आहे. आपल्याला त्याच्या सहवासाचा जो आनंद मिळाला, आपले काही क्षण आनंदात गेले, तेच पुरेसं नाही का?गीतेत भगवंतांनी अनपेक्ष असलेला भक्त मला आवडतो असं म्हटलंय. यालाच निष्काम कर्मयोग म्हणत असतील. अल्बर्ट एलिस सारखा मानसशास्त्रज्ञ सांगतात, की कुणीतरी मला चांगलं म्हणावं ही अपेक्षाच चुकीची आहे. मी सुखी होणार की नाही, हे दुसऱ्यानं माझ्याशी कसं वागावं यावर अवलंबून असेल तर आपण कधीच सुखी होणार नाही.

मग मला साहीरच्या ओळी आठवल्या…

“जो भी जितना साथ दे एहसान है…”

मी त्या बदलून मनातच अशाही केल्या,

“जो भी जैसा साथ दे, एहसान है…”

आणि सुखाचा एक मंत्र मला सापडला.

 

© सौ. राजलक्ष्मी देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

☆ मनमंजुषेतून : फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

फुलपाखराचं  वेलींवर, फुलांवर बागडणं पाहणं हे नयन सुखकारक आहेच; पण त्याहीपेक्षा त्यांच्या पंखांवरची रंगांची पखरण न्याहाळण्यात मी जास्त रमून जाते.

लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावून त्यांना पकडण्याचा माझा छंद आता मला खूप खटकतो.    कदाचित इतरांचे अनुकरण करण्याचा शिरस्ता मी मोडत नसेन इतकेच!

खूप छोटी छोटी झुंडीनं येणारी आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तोच दूर निघून जाणाऱ्या फुलपाखरांचं मला आकर्षण कधी नव्हतच. तेच जर एखादे मोठे फुलपाखरू फुलावर स्थिरावलं की मी हळूच बोटाच्या चिमटीत पकडत असेआणि बोटाच्या तळव्यावर उमटलेलं मीनाकाम तासन तास बघत बसे. फुलपाखरू केव्हाच स्वच्छंदी होऊन जायचं!!

काल सकाळी नेहमीप्रमाणे गणपती साठी जास्वंदीची फुले आणावीत म्हणून गच्चीवर गेले आणि माझं लक्ष वेधलं ते एका सुरेख अशा फुलपाखराने!! बऱ्याच दिवसानंतर फुलपाखरू दिसले आणि मी मोहरले.

जांभळा, पारवा,निळा, आकाशी,गडद निळा अशा निळ्या रंगांच्या विविध छटा आणि त्यात कोरलेली सुरेख नक्षी, तीही एक सारखी, दोन्ही पंखांवर मोजून मापून काढल्यासारखी जणू फ्रीहँड ड्रॉईंग! कमाल वाटली त्या विधात्याची!!

पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना इतकी निरव शांतता ठेवून मी पायरीवर स्थिरावले आणि फुलपाखराला न्याहाळू लागले मधु घटातील मध चोखता चोखता परागीभवनाचे काम नकळत सुरू होतं. जसं काही स्वार्था बरोबर परमार्थ!!!

उशीर झाला तसा मला खालून घरातून बोलावणे यायला सुरुवात झाली. मांजरीच्या पावलाने खाली उतरून “मी योगा करते आहे. मी ध्यान लावून बसले आहे. मला दहा मिनिटे त्रास देऊ नका.”अशी सर्वांना तंबी देऊन पुन्हा गच्चीवर आले.फुलपाखरू गोड हसत होतं…..

फुलपाखराला टेलीपथी झाली की काय? दहा मिनिटांनी ते उडून गेलं. ते पुन्हा येईल या आशेने तिथेच घुटमळले. पण व्यर्थ….

सकाळच्या कामाची लगबग सुरू होती.जास्वंद देवाला अर्पून मी स्वयंपाकाला लागले.अहो आश्चर्यम्! तेच फुलपाखरू माझ्या स्वयंपाक घरातील मनी प्लॅन्ट वर बसलेलं मला दिसलं.लगबगीने मी आरुषला म्हणजे माझ्या नातवाला बोलावून दाखवले. तोही बराच वेळ फुलपाखरू पाहण्यात रमला. नंतर ते सवयीप्रमाणे उडून गेले. पुन्हा दिसले म्हणून मीही भरून पावले.

दिवसभर त्याच्या निळ्या जांभळ्या पारव्या रंगाचा विचार घोळत होता. डोळ्यांनी तर ते रंग साठवूनच  घेतले होते. मिक्सिंगच्या टाक्याने अगदी डिट्टो फुलपाखरू विणायचा संकल्पही झाला मनोमन!..

संध्याकाळच्या चहासाठी स्वयंपाक घरात आले आणि एकदम दचकले! फुलपाखरू माझ्या हातावरच बसलेलं दिसलं मला. त्याचा अलवार स्पर्श जाणवला ही नाही. आरुष माझ्या पाशी उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती अशा संमिश्र भावना होत्या.

जरासा हात हलला आणि ते उडून गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलं. डोळ्याची पापणीही न लवू देता आरुष एकटक त्याकडे बघत होता. माझ्यासारखाच तोही भावूक रात्री झोपेपर्यंत त्याच्या आणि माझ्यात फुलपाखरू सोडून कोणताही विषय नव्हता. आपल्या रंग पेटीतले सगळे निळे जांभळे रंग काढून तो फुलपाखरू आठवत होता.

माझ्यासारखाच फुलपाखरू चितारण्याचा संकल्प त्याने मनोमन केला असावा.

रात्री झोपतानाही आजी फुलपाखराची गोष्ट सांग असा हट्ट त्याने धरला.

“बाळा, मी तुला फुलपाखराचं छान गाणं म्हणून दाखवू का?”असे म्हणून मी ‘छान किती दिसते फुलपाखरू’ म्हणायला सुरुवात केली. ऐकता ऐकताच माझ्या पाखराच्या पापण्या मिटल्या……

सकाळी उठल्यावर मी गॅलरीचे दार उघडलं आणि खाली पडलेलं फुलपाखरू मला दिसलं. जवळचच कुणीतरी गेल्याच दुःख मला झालं. मी पटकन कुणी उठायच्या आत त्याची विल्हेवाट लावायचं पुण्यकर्म करून टाकलं.

मी विचार करू लागले की एरवी माणसांना घाबरणारा हा जीव आज माझ्या हातावर कसा काय येऊन बसला? मरणासन्न झालेलं ते माझ्या आश्रयाला आलं होतं. माझी मदत मागत होतं. मरण जवळ आलं आणि ते अगतिक झालं होतं. माझ्यावर इतका कसा त्याचा विश्वास? माझं मन त्याला उमगलं असेल का? माझ्या भावना त्याच्या पर्यंत पोहोचल्या असतील का? म्हणून तर त्याने इतक्या विश्वासाने माझ्या हाताचे चुंबन घेतलं असेल का? एक ना दोन हजार प्रश्नांचे काहूर माजले माझ्या मनात!

आरुष उठला, “आजी आज पण ते फुलपाखरू येईल ना ग?”

“हो,येईल ना! तू सगळं दूध पटापट पिऊन होमवर्क कम्प्लीट केलस तर येईल नक्की!!”

निरागस हा ही आणि निरागस ते ही…..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

Mob.No. 9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कासव …. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

प्रकाशित साहित्य – बालसहित्य- कथा संग्रह 18, किशोर कादंबरी 3, काव्यसंग्रह 2,

संकीर्ण 1

प्रौढ साहित्य – काव्यसंग्रह 3, कथासंग्रह 12,कादंबरी 11, वैचारिक 11

पुरस्कार 18

☆ इंद्रधनुष्य : कासव …. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

कासव!

समुद्रमंथनाच्या प्रसंगी मंदार पर्वताला आधार देण्यासाठी भगवान विष्णूनी कूर्मावतार- कासवावतार घेतला होता. त्या प्रसंगाचे प्रतिक म्हणून बहुतेक देवालयात, सभामंडपात किंवा अन्यत्र दगडात कासवाची आकृती खोदलेली दिसते. उंच शिखरयुक्त मंदिर म्हणजे मंदार पर्वत होय. त्याला आधारभूत म्हणून कासव रुपात विष्णूची प्रतिमा असते. देवत्व प्राप्त झालेले हे कासव लहान मुलांना प्रिय असते.

मंद चालीच्या कासवाची आणि सशाची पैज लागली असता गडबडीने धावणाऱ्या सशाने फाजील आत्मविश्वासापोटी विश्रांती घेतली आणि तोवर कासव पुढे गेले.गडबडून जाऊन स्वतःची फजिती करून घेण्यापेक्षा विचारपूर्वक केलेले काम कासवाप्रमाणे यशस्वी हो कितीही संकटे आली तरी सर्व संकटांना खंबीरपणे तोंड देऊन यशस्वी होणारी माणसं कासवाच्या पाठीची असतात मात्र अशा कासवाच्या पाठीच्या माणसांना थोडीसुद्धा कासवदृष्टी म्हणजे दया नसते, तर कासव पाठीप्रमाणं ही माणसं कठीण,कठोर अंतःकरणाची असतात.संतानी मात्र सर्वांकडे कासव दृष्टीने म्हणजे दयाळू अंतःकरणाने पाहिले.

पाण्यात व पाण्याबाहेर रहाणाऱ्या कासवाच्या पाठीचा उपयोग ढालीसारखा होत असे त्यामुळे पाठीची ढाल करणे म्हणजे संरक्षणासाठी लढणे हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

कासवाच्या पाठीपासून विविध वस्तू बनवितात.कासवाच्या पाठीसारखे टणक असणारे शिवधनुष्य सीतास्वयंवरात ‘पण ‘ म्हणून ठेवले होते.’ बहु कठो म्हणे धनु जानकी, निपट कासव पृष्ठ समानकी l असा उल्लेख सीतास्वयंवरात आढळतो.

आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माणसाची सर्व गात्रे आवळली जातात.सर्व कारभार आटोपतो त्याला  ‘ कासवासमान ‘ गाड्डा( गात्रे) आवुळली म्हणतात.

एखादा श्रीमंत माणूस  अडचणीत असताना दुर्दैवाने त्याला गरिबाला जामीन रहाण्यासंबंधी विनंती करावी लागते.अशा अवस्थेला कोकणी भाषेत ‘ कासवाक कोंबो जमान ‘म्हणतात.

कासवाच्या पिलाची भूक कासवाच्या प्रेमळ नजरेने भागते असे म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात,’ कासवाचे बीळ आहे कृपादृष्टी ,दुधा नाही भेटी अंगसंगे। ‘

सशाच्या शिंगाप्रमाणेच कासवाचे तूप ही गोष्ट असंभवनीय असल्याने,जेव्हा असंभवनीय गोष्टीबद्दल चर्चा होते,तेव्हा तो प्रकार म्हणजे कासवाचे तूप आणण्याचाच प्रकार होतो.

कासवाच्या पाठीचा उपयोग पोटातले म्हणून जो रोग होतो त्यावर औषधासारखा होतो तर बस्तीप्रदेश ताणला जाऊन त्याच्याअंगी जे कठीण्य येते त्याला ‘ कासव्या रोग ‘ म्हणतात.

कासव काशिंदा या प्रकारचे एक झुडुप असून तरवडापेक्षा त्याची पाने बारीक असतात.

हातास किंवा पायास पाणी असलेला जो फोड होतो त्याला कासवफोड’ म्हणतात.प्रामुख्याने काटा टोचल्याने जे कुरुप होते त्यास ‘ कसवकुरुप’ म्हणतात.

पाण्यात राहून माशाशी वैर न करता पाण्यातील घाण खाऊन पाणी स्वच्छ करून प्रदूषणाचा समतोल राखणारे कासव आजही देवपण टिकवून आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे

: निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे

ऑफिस मधला एक सहकारी रामानंद आज सेवानिवृत्त झाला. त्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कोणी ही  सेवानिवृत्त होतानाचा हा दिवस खूपच वेगळा असतो.  सकाळी 9 ते संध्याकाळी 6, दिवस भर एकत्र काम करणे, खाणे- जेवणे, एकमेकांवर रागावणे, रुसणे, एकमेकांची काळजी घेणे, आपलं काम

जितकंं चांगले करता येईल तितका प्रयत्न करणे.  या सर्वात इतकी वर्षे कशी गेली कळतच नाही. सेवानिवृत्त होणारी व्यक्ती उद्यापासून आपल्यात नसणार ही हुरहुर सर्वांना अस्वस्थ करते. निवृत्त होणार्या व्यक्तीच्या  मनात तर भावनांचे काहूर माजलेले असते. काळीज गलबलून गेलेले असते.  मनातलं  वादळ, गलबलणं, चेहर्यावर दिसत असतं. खूप ह्रदयस्पर्शी असतो तो दिवस.

रामानंदच्या निरोप समारंभाचा प्रसंग.  आज प्रास्ताविकापासून सगळं  वातावरण घरगुती स्वरूपाचं होतं. प्रेमळ आणि साधेपणाचं होतं.  आपण घरी जसे एकत्र जमून छोटंसं स्नेहपूर्ण संमेलन करतो, अगदी तसं…..कुठेच औपचारिकता नाही, कुणाचा ईगो नाही, सर्वच जण आपापली post ची शाल आपल्या जागेवर ठेऊन मनमोकळ्या स्वच्छ मनाने एकत्र जमले होते. मनाच्या कोपर्यात चलबिचल होती, रामानंद उद्या पासून ऑफिस मध्ये असणार नाही याची.

रामानंद मॅनेजिंग डायरेक्टर श्री भट सर यांच्या ऑफिस मध्ये attendant म्हणून काम करत होता. पर्सोनल खात्याच्या श्री बाल्लीकर सरांनी त्याच्या कामाची मोजक्या पण अर्थपूर्ण, यथोचित आणि नेमक्या शब्दात प्रशंसा केली.  ते काही वरवरचे शब्द नव्हते.  त्यातलं खरेपण आम्ही सर्वांनी अनुभवलेलं होतं. त्याचं पटपट चालणं, चटचट काम करणं, भराभर फाईल्स पोहोचवणं. कधीच  कामचुकारपणा नाही, वेळकाढूपणा नाही कि कंटाळा नाही.  चालण्या बोलण्यात, काम करण्यात ex- serviceman ची शिस्त आणि तत्परता होती. नेहमीच स्वच्छ, व्यवस्थित  inshirt केलेला पेहराव.  गबाळेपणाला थारा नाही. ना वागण्यात, ना बोलण्यात, ना कामात. आजही त्यानं घातलेला गुलाबी शर्ट त्याला छान शोभत होता. त्याच्याच सहकारी मित्रांनी त्याला आज प्रेमानं भेट दिला होता.

स्टेजवर होते फक्त दोघं. भटसर आणि रोज सकाळी आल्यावर चहा देणारा रामानंद. मला भट सरांचही कौतुक वाटलं आणि मनातला आदर दुणावला.

रामानंदला तुला काही बोलायचं आहे का असं विचारण्यात आले.  खूपदा निवृत्त होणारा नाही बोलत. मन असंख्य आठवणीनी आणि भावनांनी व्याकुळ झालेलं असतं. डोळ्यांच्या काठांवर थोपवलेलं पाणी कोणत्याही क्षणी  कोसळेल असं वाटत असतं. पण रामानंदनं सुखद धक्काच दिला. तो बोलायला उभा राहिला.  …….” MD साहेबा, सब बडे साहेबा, और मित्रों…. हे शब्द मनाला स्पर्शून गेले. पहिल्यांदाच त्याचं इतकं सलग बोलणं ऐकलं. एरव्ही कामाशिवाय तो जास्त बोलत नसे. त्याच्या शब्दातून, भावना व्यक्त करण्याच्या शैलीवर भारतीय सैन्य दलातील हिंदीचा प्रभाव थक्क करणारा होता. अतिशय सहज, सोप्या भाषेत त्याने मनातले भाव व्यक्त केले. मनाच्या गाभार्यातून आलेल्या ह्रदयस्पर्शी भावना साध्या शब्दातूनही किती सुंदर परिणाम साधतात, हे सर्वांनी कडकडून वाजवलेल्या टाळ्यांनी सिद्ध केले.

सैन्य दलातून निवृत्ती घेऊन तो 18 वर्षांपूर्वी EDC त आला. आज तो याही सेवेतून मुक्त झाला.  मुलं अजून शिकत होती.  आर्थिक परिस्थिती पण जेमतेमच.  पण कुठेच त्रासिक पणा नाही, रड नाही, ” आणि दोन वर्षे वाढवून द्या, एक तरी  द्या……” अशी भीक नाही मागितली. शांत, समाधानी, नम्र स्वभाव. उद्यापासून काय करायचं ते आधीच ठेवलेलं. वयाची साठी आली तरी आरोग्य ठणठणीत कसं ठेवायचं ते त्याच्याकडून शिकावं.

Healthy mind stays in healthy body. समाधानी वृत्तीच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते. कामचुकारपणा? लबाडी, अति हव्यास, हेवेदावे, मत्सर, खरेपणाचा अभाव अशा वृत्तींमुळे आपण सुखाला मुकतो आणि आनंदाला पारखे होतो.

रामानंदची समाधानी वृत्ती, सतत  कार्यरत रहाण्याची धडपड, आणि साधेपणा खूपकाही शिकवून गेला. आभार मानताना त्यानं हिंदीतून व्यक्त केलेलं अस्खलित आणि ओघवतं मनोगत खूपच भावलं.

इतकी वर्षे आपल्या बरोबर असणार्या सहकारी मित्राची नवी ओळख सर्वांचंच मन हेलावून गेली. वयाच्या 18 व्या वर्षी भारतीय सैन्य दलात सामील होऊन 40 व्या वर्षापर्यंत तेथील कडक शिस्तीचे, कठोर परिश्रमांची नोकरी संपवून घरी आला. Ex serviceman म्हणून आमच्या ऑफिस मध्ये आला.  आता 58 व्या वर्षी निवृत्त झाला. आता तो त्यांच्या घराण्याचा पारंपारिक व्यवसाय आनंदाने करतो. मासे गरवण्याचा. म्हणजे गळ टाकून मासे पकडणे.

आधी देशसेवा, नंतर राज्यसेवा, आता पारंपरिक व्यवसाय.  सर्वार्थाने आयुष्यातली परिपूर्ती हीच आहे ना!

 

© सौ.अमृता देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी श्री मं ती ☆ सौ.अंजली गोखले

☆ विविधा : माझी श्री मं ती ☆ सौ.अंजली गोखले 

 

मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या अगोबाई! तुम्ही सगळे ऐकताय होय? माझे हे घर पहाताय होय? बर बर .

लांबू न कशाला डोकावताय ? या, मीच दाखवते हे घर म्हणजे बंगला !

हा मोठा हॉल , इथलं फर्निचर पॉश आहे ना? . ही मुलीची , पिंकीची खोली  हे बेडरूम, ही गेस्टरूम आणि हे किचन – स्वयंपाक घर .

सकाळी ९ ते ६ या बंगल्यावर माझच राज्य असत. या घराचे मालक म्हणजे आमचे साहेब आणि आमच्या वहिनी बाई मी आल्यावर ऑफिसला जातात. सकाळीच पिंकी शाळेला गेलेली असते. ९ नंतर हा बंगला माझा असतो.

इथली स्वच्छता, स्वयंपाक, वॉशिंग मशिन लावणं सगळ सगळं मी करते. १२ वाजता डबा न्यायला, डबेवाला येतो. साहेबांचा आणि बाई साहेबांचा डबा मी भरून देते. पिंकी आली की तिला वाढते. तिच्याशी गप्पा मारते आणिमग माझं जेवण करते. दुपारचं आवरून झालं की मी आणि पिंकी टि.व्ही . बघतो . तिचं कार्टून,  मध्ये माझी सिरीयल, तिथं जाहिराती लागल्या की पुनः कार्टून ! तीपण खूष मीपण खूष!

हा पण दुपारी 3 वा – मी तिला अभ्यासाला बसवते. आणि मी जरारेस्ट घेते. झोपते नाही म्हणायचं रेस्ट घेते. दिवसभर हा बंगला मीच वापरते. छान स्वच्छ ठेवते. या कामासाठी दरमहिना मला पंधरा हजार रु पगार मिळतो.

माझ्या संसाराला खूप मदत होते. मी शिकले नाही म्हणून हे काम करते. पण माझ्या मुलाला मी खूप शिकवणार आहे. कलेक्टर करणार आहे. म्हणून तर हा सगळा खटाटोप !

दिवस सगळा कामात जातो. पण संध्याकाळ झाली की मला माझी झोपडी आठवते. कधी एकदा घरीजाते आणि भाकऱ्या थापते असे मला होते. हा बंगला, इथले हे ऐश्वर्य माझ्यासाठी बुडबुडा आह . माझी झोपडी, राबणारा नवरा , माझं लेकरू, माझी गरीबी हीच माझ्यासाठी खरी श्रीमंती आहे.

 

© सौ.अंजली गोखले

मो   ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नकारानंतरची किंमत …अनुवाद… ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

☆ जीवनरंग : नकारानंतरची किंमत …अनुवाद… ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

रामलाल वर्माना विद्यार्थीदशेतच साहित्याची आवड होती. सरकारी कार्यालयातून मोठ्या ऑफिसरच्या पदावरून ते निव्रुत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या बँगा उघडून पाहिल्या. त्यात साहित्यविषयक मासिकं, नामवंत लेखक, कवी यांची पुस्तकं होती. जरी त्यांनी ती पूर्वी वाचलेली होती, तरीही त्यांनी ती पुन्हां चाळायला, वाचायला सुरुवात केली. स्वतः ही काही लेख, कथा त्यांनी लिहिल्या. त्यातलं काही साहित्य त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालं. आकाशवाणीवरही त्यांनी कथावाचन केलं. त्यांना मिळणारं मानधन आणि अर्धीमूर्धी पेंशन ते पुस्तकं खरिदण्यात खर्च करीत. ह्या वयात पुस्तकी किडा होण आणि सतत साहित्यात मग्न रहाणं हे त्यांच्या पत्नीला व सुनेला मुळीच आवडत नव्हतं. सुनेचं म्हणणं होतं की त्या जुन्या पुस्तकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

तरीही वर्मा निव्रुत्तीनंतर पंधरा वर्षं जगले. नि लेखन, वाचन करीत राहिले. त्यांना पान, तंबाखू, सिगारेट असं कोणतंही व्यसन नव्हतं. त्यांच्या मरणानंतर घरच्यांनी, हळूहळू त्यांची पुस्तकं, डायऱ्या, रद्दीत घालून टाकलं. त्यानंतर पाच वर्षांनी, विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट संशोधनाच्या कामासाठी त्याघरी आला. त्यातला एक विद्यार्थी म्हणाला, “आम्ही स्व. रामलाल वर्मांच्या साहित्यावर संशोधन करीत आहोत. त्याची पुस्तकं, हस्तलिखितं जे तुमच्याकडे असेल ते आम्हाला द्या. त्यांची योग्य ती किंमत द्यायला आम्ही तयार आहोत.” घरातली माणसं एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली.

मूळ हिंदी लघुकथा – नकारात्मक ऊर्जा

लेखक  –  श्री केदारनाथ ‘सविता ‘

लेखकांचा पत्ता –  पुलिस चौकी रोड, लालडिग्गी, सिंहगड गली, चिकाने टोला, मीरजापुर, २३१००१  (उ.प्र.) मो. ९९३५६८५०६८.

मराठी अनुवाद मीनाक्षी सरदेसाई मो.8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनुवादित साहित्य…एक देणगी…. ☆ सुश्री मंजुषा मुळे

☆ इंद्रधनुष्य : अनुवादित साहित्य…एक देणगी…. ☆ सुश्री मंजुषा मुळे 

केव्हाही थोडा निवांत वेळ मिळाला की पुस्तकांच्या दुकानात फेरफटका मारणे या माझ्या छंदाचे आता जणू व्यसनच झालंय, जे मला फार उपयोगी पडते आहे. त्यामुळेच आज एक गोष्ट मला आवर्जून तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते आहे.

पुस्तकांच्या कुठल्याही समृद्ध दुकानात गेलं की अनेक लेखकांची वेगवेगळ्या विषयांवरची असंख्य पुस्तकं तर तिथे असतातच. पण त्यांच्या जोडीने कितीतरी अनुवादित पुस्तकेही तिथे उपलब्ध असतात. पण अनेकदा माझ्या असे लक्षात आले आहे की अनुवादित पुस्तके अगदी आवर्जून, जाणीवपूर्वक दाखवली जात नाहीत. त्यामुळे मग वाचकांनीच आपणहून अशा पुस्तकांची मागणी करावी असे मला मनापासून सांगावेसे वाटते.

याचे कारण असे की मी अशी बरीच पुस्तके वाचते. काही इंग्रजी पुस्तकांचा मी मराठीत अनुवादही केला आहे. आणि ती वाचतांना, त्याहीपेक्षा त्यांचा अनुवाद करतांना एक गोष्ट मला नेहमीच प्रकर्षाने जाणवतआलेली आहे की, भाषा कुठलीही असली तरी त्यातून व्यक्त केल्या जाणाऱ्या भावनांची आणि विचारांची समृद्धता व ताकद, आपल्या मातृभाषेइतकीच प्रभावी असते.

मानवी भावना आणि विचार व्यक्त करण्याचे सर्वात जास्त परिणामकारक माध्यम म्हणजे भाषा. म्हणूनच आपल्या भाषे – व्यतिरिक्त, इतर भाषांमधून प्रकट होणारे विचारधनही आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी त्याचा आपल्या भाषेत अनुवाद करण्याचा विचार ज्यांनी सर्वप्रथम केला असेल त्यांचे खूप आभार मानायला हवेत.

असे अनुवादित साहित्य वाचण्याचा एक मोठा फायदा हा असतो की, त्यामुळे आपले स्वतःचे विचार आणि विचार करण्याची क्षमता आणि पद्धतही समृद्ध होऊ शकते, सकारात्मकपणे बदलू शकते.  याचे कारण असे की, विचार कुठल्याही भाषेत मांडले असले तरी, एकाच गोष्टीबद्दलचा वेगवेगळ्या लेखकांचा विचार वेगवेगळा असू शकतो. आणि कोणाच्याही विचारांवर त्याच्या संस्कृतीचा, भोवतालच्या परिस्थितीचा, जगण्याच्या पद्धतीचा, आयुष्याकडे बघण्या -च्या दृष्टिकोनाचा नक्कीच परिणाम होत असतो, यात दुमत  नसावे. त्यामुळेच वेगवेगळ्या भाषा असणाऱ्या वेगवेगळ्या देशातले, प्रांतातले साहित्यही खचितच वेगवेगळे असते. विचारांचे वैविध्य असलेल्या अशा अनेक भाषांमधल्या प्रचंड साहित्याचा रसास्वाद घेणे साध्य व्हावे यासाठी अनुवाद हा एकमेव सर्वोत्तम मार्ग आहे. आणि साहित्यसंपदेत मोलाची भर घालणारी ती एक देणगीही आहे.

आपल्याच देशातल्या प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती, आचारधर्म एकमेका – पेक्षा वेगळे आहेत,आणि त्या प्रत्येक भाषेमधील साहित्यात तिथल्या संस्कृतीचे आणि विचारधारेचे प्रतिबिंब पडलेले आहेच. फक्त मराठी भाषकांच्यापुरते सांगायचे तर त्या साहित्याचा मराठीत अनुवाद केला गेला तरच ही विविधता आपल्याला खात्रीने समजते. आत्तापर्यंत असे इतर भाषांमधील कितीतरी साहित्य मराठीत अनुवादित केले गेलेले आहे.

याचे सर्वात मोठे उदाहरण देता येईल ते श्री ज्ञानेश्वरी “चे संस्कृत भाषेतला अतिशय प्राचीन ग्रंथराज म्हणजे श्रीमद् भगवद्गीता. मानवी आयुष्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा हा महान ग्रंथ. पुढे कित्येक वर्षांनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी या ग्रंथाचा तत्कालीन प्राकृत मराठी भाषेत मुक्त अनुवाद केला आणि गीतेतल्या सातशे श्र्लोकांच्या जागी नऊ हजार ओव्या रचल्या. अर्थात याला रूढार्थाने केवळ अनुवाद केला असे म्हणणे वावगे आहे. कारण त्यात दिसून येणारी ज्ञानदेवांची अफाट बुद्धिमत्ता, विचारांची खोली आणि उंची, भाषेचे सौंदर्य, अतिशय चपखल दाखले,आणि ओघवती भाषा, ही सगळी उत्तम वैशिष्ठ्ये पाहता, ज्ञानेश्वरी हा एक स्वतंत्र आणि परिपूर्ण असा समृद्ध ग्रंथ उचीतपणे मानला जातो.

अलीकडच्या काळातली उदाहरणे द्यायची तर .. पूज्य श्री. रवींद्रनाथ टागोर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मा. शिवराम कारंथ,कन्नड साहित्यिक श्री. भैरप्पा, गुजरातीतले श्री. चूनिल… मला वाटते अनुवादित साहित्याबद्दल आणखी कितीतरी सांगण्यासारखे असले तरी, वाचनाची आवड आणि त्यातून चतुरस्त्र ज्ञान मिळवण्याच्या इच्छेपोटी वेगवेगळी पुस्तके वाचणाऱ्या वाचकांनी आवर्जून अनुवादित पुस्तके वाचण्यासाठी उद्युक्त व्हावे. इतर अनेक भाषांमधील साहित्य, जे अनुवादाच्या माध्यमातून जणू नव्याने निर्मिले जात असते, ते जातीच्या वाचकांनी जाणीवपूर्वक वाचावे एवढेच मी शेवटी आग्रहाने सांगेन. मग जुन्या जाणत्या विचारवंतांनी ,” अनुवाद म्हणजे अनुसृजन किंवा अनुनिर्मिती ” ही जी व्याख्या केलेली आहे, ती खरोखरच अतिशय सार्थ आहे, हे त्यांना मनोमन पटल्याशिवाय राहणार नाही.

 

© सुश्री मंजुषा मुळे

मो ९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चुकतंय कुठेतरी… ☆ बिल्वा सुहास पंडित 

☆ इंद्रधनुष्य :  चुकतंय कुठेतरी… ☆ बिल्वा सुहास पंडित 

 

कधीतरी एक बदल म्हणून, मजा म्हणून किंवा गरज म्हणून “English Accent “मध्ये बोललो तर ठीक आहे

पण जेव्हा आपल्या रोजच्या बोलण्यात मराठी पेक्षा जास्त इंग्रजी शब्द येतील

समजायचं,

आपलं कुठेतरी चुकतंय…

 

कधीतरी एक बदल म्हणून, “Style” म्हणून “Western Dress Up” करायला ठीक आहे

पण जेव्हा हाच पोशाख आता “Comfortable” आहे असे म्हणलं  जाईल

समजायचं,

आपलं कुठेतरी चुकतंय…

 

कधीतरी एक बदल म्हणून, जिभेचे चोचले पुरवायला “Pizza, Burger, Fastfood” खाल्ले तर ठीक आहे पण जेव्हा हेच आपले जेवण होऊन जाईल

समजायचं,

आपलं कुठेतरी चुकतंय…

 

आपल्या सगळ्यांनाच आपल्या “Professional Life” मध्ये इंग्रजी भाषेचा वापर कमी जास्त प्रमाणात करावा लागतो

पण जेव्हा मराठी लिहिताना ऱ्हस्व-दीर्घ, रफार नक्की कशावर द्यायचा असे प्रश्न पडतील

समजायचं,

आपलं  कुठेतरी चुकतंय…

 

जे संस्कार आपले नाहीत, ती संस्कृती ही आपली नाही.

 

© बिल्वा सुहास पंडित

9421174255

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इकडचे – तिकडचे “ज्ञानविस्तार” ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

संक्षिप परिचय 

मुळगाव : सांगली

सध्याचे ठिकाण: नवी मुंबई,  बेलापूर

नोकरी: स्टिल कंपनीत एक्पोर्ट म‌ॅनेजर

विडंबन, ललित लेखन, प्रासंगिक चारोळ्या लेखनाची  आवड

‘देवा तुझ्या द्वारी आलो’ (www.kelkaramol.blogspot.com), ‘माझे ‘टुकार ई-चार’ (www.poetrymazi.blogspot.com) या दोन अनुदिनीवर ( ब्लाॅग) नियमित लेखन

जोतिष शास्त्र अभ्यास

☆  विविधा : इकडचे – तिकडचे “ज्ञानविस्तार” – श्री अमोल अनंत केळकर

 

‘जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे

विचारे इकडे, तिकडे शोधुनी पाहे’

खरं म्हणजे  मंडळी हा विषय तसा काही नवीन नाही . पण जरा वेगळ्या पध्द्तीने मांडतोय एवढंच.

आता तुम्हाला हे माहीतच आहे की पारंपारिक शिक्षण आपले हे  शिशु ( सुसु )वर्गापासून सुरु होऊन पुढे  लौकिकार्थाने पदवीपर्यंत पूर्ण होते. ज्याला आपण पाठयपुस्तकी शिक्षण म्हणू. जे आपण बाल मंदिर, शाळा , महाविद्यालये इथून पूर्ण करतो. या सगळ्या संस्थेचे ध्येय एकच असते

चिरा चिरा हा घडवावा , कळस कीर्तीचा चढवावा

अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे

सत्य शिवाहुन सुंदर हे

वेगवेगळ्या टप्प्यात आपण हे शिक्षण घेत असताना आपले मार्गही बदलतात जसे मराठी मिडीयम , इंग्रजी मिडीयम  हिंदी -संस्कृत  किंवा पुढे कला -विज्ञान- वाणिज्य , मग त्याहीपुढे इंजिनिअरींग, वैद्यकीय, व्यवस्थापन  किंवा अशा अनेक वाटा .

एक मार्ग स्वीकारल्यावर शेवटच्या ठरलेले स्टेशन आले की  प्रवास संपला पाहिजे पण असे होत नाही. बघा ना, रेल्वे बजेट मध्ये गेली काही वर्ष  अमुक गाडयांचा मार्ग विस्तारीत केला आहे असे आपण वाचतो. म्हणजे एखादी गाडी मिरजेपर्यतच जाते  पण आता ती बेळगाव पर्यत जाईल  हा झाला  त्या गाडीचा विस्तार . ज्ञान घेण्याबाबतीत तसा  विस्तार आपण ही करतो मग तो आपल्या आपल्या नोकरी/व्यवसायास/प्रोफेशनला पूरक म्हणून असेल   किंवा निव्वळ  आवड छंद म्हणून असेल

‘अपारंपारिक शिक्षण’ किंवा ‘ज्ञान – विस्ताराची’ सुरुवात तशी लहानपणापासून नकळत झालेलीच  असते. आई – बाबा हे आपले पहिले गुरु . नियमित अभ्यासक्रमात नसलेल्या अनेक गोष्टी (संस्कार/आचरण इ इ) शिकवायला त्यांनी सुरवात केलेली असते . नंतर येतात ते आपले शाळेतील , आजूबाजूचे सवंगडी

मग हळूहळू आपली ओळख होते  पेपर , रेडिओ , दूरदर्शन (टीव्ही) या माध्यमांची. ज्ञान विस्ताराच्या या मार्गात  वयाच्या एका टप्प्यावर आपला संबंध वाचनालयाशी येतो .  इथेही अनेक गोष्टी कळतात, आपल्या ज्ञानाचे क्षेत्र विस्तारते. पुढे संगणक शिक्षण झाल्यावर वेगवेगळी संकेतस्थळे   आपले ज्ञान विस्ताराचे मार्ग बनतात आणि आज काल तर सोशल – मीडिया ( त्यातही फेसबुक , व्हाटसप )  हा तर ज्ञान विस्ताराचा जणू एक्स्प्रेस हायवेच झालाय. आता यात येणा-या किती गोष्टी ख-या असतात , अफवा असतात  किंवा दिलेले संदर्भ किती बरोबर – चूक असतात  हे ओळखणे ही एक ‘ कलाच ‘ आहे.  यात उतरलेल्यांना कले, कले ने ते समजत जातेही पण  सध्यातरी ज्ञान – विस्ताराचा हा ‘ राज ‘ मार्ग ठरला आहे यात शंका नाही

यात ही दोन प्रकार आहेत बरं  का. जस शाळेत आपण मुलांचे वर्गीकरण मिळणा-या गुणांनुसार  प्रामुख्याने दोन प्रकारे करतो १) हुशार २ ) मध्यम ( इथे ‘ ढ ‘ वगैरे प्रकार मला मान्य नाही )  तर  व्हायचं काय की  मुख्यतः दहावी बोर्डाच्या परीक्षेत वगैरे   एका ‘ मध्यम’ मुलाकडे  एखाद्या विषयाचे  दुसरे पुस्तक असायचे , किंवा काही तरी त्याला पुण्या-मुंबई कडच्या नातेवाईकांकडून  काही नोट्स वगैरे मिळायचे. ही बातमी  हळूहळू सगळीकडे जायची. ज्याच्याकडे त्या नोट्स किंवा काही वेगळे पुस्तक असायचे त्याबद्दल त्याला काही फार वाटायचे नाही . पण जी हुशार मुले असायची त्यांची मात्र  प्रचंड घालमेल व्हायची. अरे आपल्याकडे कसं नाही, काय असेल त्यात ? कसेही करून ते आपल्याला पाहिजे  इ इ मग ते पुस्तक / नोट्स त्या ‘मध्यम’ मुलाकडून मिळवल्या जायच्या. तो ही सहज द्यायचा , त्याला काही वाटायचे नाही. त्याच्यासाठी सामान्य अभ्यासक्रमच खूप असल्याने हे अतिरिक्त पुस्तक वाचले काय नाही वाचले काय फारसा फरक पडायचा नाही. तो आपलं सगळ्यांना देत रहायचा

आज हीच ‘ मध्यम ‘  मुले सोशल मीडियावर आपल्याकडे आलेले ज्ञान पुढे ढकलतात आणि हुश्शार मुले त्यावर अभ्यासाचा ‘ किस ‘ पाडतात ?

माफ करा थोडं विषयांतर झालं . पण मंडळी लहाणपणापासून  सुरु असलेली  ‘ ज्ञान – विस्ताराची  ‘  माणसाची उर्मी कायम राहील यात शंका नाही. पण यातही   पारंपारिक शिक्षणाबरोबरच अपारंपारिक शिक्षण असलेले

‘व्यवहार ज्ञान’  घेणे हे ही महत्वाचे नाही का ?

एखादवेळी गणितात थोडे कच्चे असले तरी चालेल पण माणसाने शब्दाला पक्के पाहिजे. हे

‘व्यवहार ज्ञान’ एकदा आत्मसात झाले की भले अक्षांश – रेखांशांच्या परिणामात गडबड झाली तरी  तुमचा जगण्याचा आलेख ( ग्राफ ) हा वर जाणाराच असेल यात शंका नाही  ?

चला मंडळी आवरत घेतो.

इधर चला में , उधर चला , जाने कहाॅ में किधर चला

वेळ झाली आहे आता जरा दुसरी कडे जाऊन तिथे आलेले

‘ज्ञानरूपी मोती’   ओजळीत गोळा करून इतरत्र देण्याची.

मज पामरासी काय थोरपण

पायींची वाहणं पायी बरी |

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव

म्हणती द्यानदेव तुम्हा ऐसें ||

???

( अ-ज्ञानी ) अमोल

१३/०६/२०२०

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शेवटचा दिवस…. ☆ श्री अरविंद लिमये

☆ इंद्रधनुष्य :  शेवटचा दिवस…. ☆ श्री अरविंद लिमये 

खूप वर्षांपूर्वी मी युनियन बँकेच्या सांगली शाखेत मॅनेजर होतो तेव्हा ‘मधू कांबळे’माझा स्टाफ मेंबर होता.जवळजवळ चार वर्षे आम्ही एकत्र काम केलेलं.ती जवळीक होतीच.पुढे खूप वर्षं उलटून गेल्यानंतर त्याची अचानक भेट झाली ,तो नुकताच रिटायर झाल्यावर आमच्या ‘युनियन बॅंक निवृत्तकर्मचारी संघटनेचा मेंबर झाला तेव्हा..!त्या मिटींगमधे गुलाबपुष्प देऊन माझ्या हस्तेच त्याचं स्वागत झालं होतं.मिटींग नंतरच्या चहापान कार्यक्रमात तो मुद्दाम माझ्या जवळ येऊन खूप मोकळेपणाने भरभरून बोलला.जुन्या आठवणींची उजळणी झाली.निघायची वेळ झाली तेव्हा मुद्दाम माझा पत्ता/मोबाईल नोट करून घेतलान् .’लेकीचं लग्न ठरलंय.ते झालं की मी खर्या अर्थाने रिटायर झालो म्हणायचं.पत्रिका छापून आल्या की घरी येऊन आमंत्रण देणाराय..’ म्हणाला आणि गेला.गेलाच.

अगदी अचानक.. अनपेक्षित..! लग्नाच्या तयारीची धावपळ… उत्साहाच्या भरात तब्येतीकडे झालेलं दुर्लक्ष..अचानक आलेला लो बीपीचा अटॅक..आणि त्याचं त्याच अवस्थेत जागच्याजागी कोसळणं.. ऐकून मला धक्काच बसला.लेकीच्या लग्नाची तारीख हाकेच्या अंतरावर आलेली..त्याच्यासकट सगळेच लगीनघाईत..घरातलं कामांच्या प्रचंड दडपणातलं आनंदी वातावरण…आणि…अचानक ध्यानीमनी नसताना हा घरचा कर्ताच अचानक गेला..! संपूर्ण घरावर शोककळा पसरली.आम्ही संघटनेचे प्रतिनिधी घरी सांत्वनाला जाऊन आलो.ते आवश्यकही होतंच.दिवसकार्य आवरलं. ठरल्याप्रमाणे संघटनेचे कार्यकर्ते फॅमिली पेन्शनसंबंधीचे फाॅर्म्स घेऊन मधूच्या घरी गेले. ते परतले ते भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह सोबत घेऊन…! घरचे सगळे आर्थिक व्यवहार मधूच्या पहात असे. त्याचे आर्थिक व्यवहार,गुंतवणूकी, नियोजन याबद्दल घरी कुणालाच काहीच माहीत नव्हतं.आपलं अचानक कांही बरंवाईट होईल असं त्याला वाटलं नसणार पण ते तसं झाल्यामुळे एक विचित्र त्रांगडं निर्माण झालं होतं एवढं मात्र खरं..!त्यातूनही मार्ग काढावा म्हंटलं पण घरच्यांना भरपूर शोध घेऊनही आर्थिक व्यवहाराच्या नोंदी वा कागदपत्रे कांहीच सापडलं नाही. बॅऺकेतल्या ठेवी, नाॅमिनेशन्स, म्युच्युअल फंड, शेअर्स, टॅक्स सेव्हिंग इनव्हेस्टमेंटस् सगळंच अधांतरी..! मुलीचं लग्न पुढं ढकललं असलं तरी जवळचाच मुहूर्त पाहून ते साधेपणानं का होईना लगेच करुन द्यायचं होतंच. पुढे खूप दिवसांनी संदर्भ शोधत हळूहळू सगळं मार्गी लागलं, तरी तोवर लग्न अक्षरश: कसंतरी उरकावं लागलं आणि त्यासाठी घ्याव्या लागलेल्या पैशांच्या सोंगासाठी नातेवाईकांनी केलेल्या तात्पुरत्या मदतीचं मिंधेपण आलं ते वेगळंच.

‘मृत्यू अटळ आहे’ हे सर्वज्ञात व सर्वमान्य सत्य! पण आपण ते स्वत:च्या बाबतीत सहजपणे गृहितच धरलेलं नसतं. ‘जेव्हाचं तेव्हा पाहू’ हीच काहीशी बेफिकीर वृत्ती असते बर्याचदा.पण जेव्हाचं तेव्हा पहायला आपण नसणार आहोत हेच नेमकं लक्षात घेतलं जातं नाही. या सगळ्यांची विलक्षण बोचरी जाणीव मला झाली, त्याला मधू कांबळे असा निमित्त झाला.

खरंतर या किती साध्या गोष्टी.तरीही तितक्याच महत्वाच्या.पण मला तरी ते महत्त्व मधू कांबळे गेल्यावर त्याच्या घरच्यांची ससेहोलपट होईपर्यंत कुठे जाणवलं होतं? आपण तरी आपली बायको, मुलगा, सून याना आपण मनोमन केलेल्या नियोजनाबद्दल सविस्तर कुठं काय सांगितलंय? सांगणं राहू दे, पण एकत्रित नोंद करुन तरी ठेवलंय का?हे विचार मनात आले आणि मी हादरलोच. आपण हे करायला हवं. करायलाच हवं..!

‘शेवटचा दिस’ यायचा तेव्हाच येणाराय. पण तो येणाराय कदाचित असाच. अचानक. न सांगता. शेवटचा दिस गोड व्हावाच पण तो आपल्यापुरताच नव्हे. आपल्यामागे आपल्या माणसांसाठीही. याकरता योग्य ते नियोजन प्रत्येकाने करायला मात्र हवं.

चारसहा दिवसांच्या प्रवासाची तयारीही आपण अगदी आधीपासून नियोजनपूर्वक करत असतो.मग न परतीच्या प्रवासासाठीची बांधाबांध काळजी पूर्वक करायला नको?त्या प्रवासाला जाताना आपण जे बरोबर नेणार आहोत त्या आपल्या कर्मांचं दस्तावेजीकरण परस्पर झालेलंच असतं. पण आपण आपल्या माणसांसाठी जे मागे ठेवणार आहोत त्याचे दस्तावेजीकरण आपणच निगुतीने नियोजनपूर्वक करायला हवंच. नाही का ?

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print