सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की ग्यारहवीं कड़ी स्पर्शगंध… । सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं। आज पढ़िये स्पर्शगंध… एक वार्तालाप, संभवतः स्वयं से? इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #11
☆ स्पर्शगंध… ☆
जाणिवेत पुरून उरतो तो…
कळतंय का, मी काय म्हणत्ये ते?
असाच आहेस, सगळं माझ्याकडून ऐकायचं असतं तुला, हो ना!
पण खरं सांग, हा अनुभव तुलाही आलाय ना !
म्हणजे बघ ना, फुलं हातात घेतली की त्यांचा मुलायम स्पर्श गुदगुल्या करतो, चेहऱ्यावर आपोआप हास्य खुलतं, आणि ह्याचा स्पर्शाचा सुगंध अंगभर पसरतो, दरवळतो… तो परिमळ अवतीभोवती प्रसन्नता ठेवून जातो…
एखाद्या तान्ह्याला उचलून घे, मग बघ काय होतं ते… इंग्लिशमध्ये bundle of joy म्हणतात ते उगीच नाही… ते गोंडस रूप डोळ्यात भरून घ्यावं, त्याच्या इवल्या इवल्या बोटांचा स्पर्श हृदयाचा ठाव घेतो… त्याला खाली ठेवलं तरी निरागसतेचा गंध वातावरण उत्साही करतो… एक निर्मळ आनंद देऊन जातो… नवनिर्मितीचा ध्यास पूर्ण करतो, नवीन नात्यांची वीण गुंफू लागतो…
शाळा सुरू व्हायच्या आधी नवीन पाटी, पुस्तकं, वह्या, दप्तर ह्यांच्या स्पर्शाने जीवनाची दिशा ठरवली जाते, आणि ज्ञानरुपी सुगंधाने आयुष्य समृद्ध होते… हा स्पर्शगंध आयुष्य घडवतो, माणूस घडवतो…
बरसणारी प्रत्येक सर मातीच्या कणाकणाला स्पर्शून जाते, आणि सृजनातल्या तृप्ततेचा गंध आसमंताला गवसणी घालतो…
असाच असतो हा स्पर्शगंध… हवाहवासा… जसा तुझ्या मिठीतील स्पर्शातून भावनांना मोकळं करून जबाबदारीच्या गंधातून आपलं अस्तित्व टिकवणारा…
क्षितिजाला नजरेनेच स्पर्शून स्वप्नांचा दरवळ आयुष्य जगायला शिकवतो…
सूर्योदय, सूर्यास्त ह्यांची बात काही वेगळीच आहे… जन्म ह्या जाणिवेला क्षणोक्षणी फुलवत, विधात्याच्या परीस स्पर्शाने, आपल्या पावलांचे ठसे मागे ठेवत अनुभवाचा गंध मृत्यूला सामोरं जायची शक्ती देणारा असतो…
कळतंय का तुला?
आता तू काय म्हणणार आहेस हे तुझ्या स्मित हास्यातून कळतंय बरं…
माझ्यावरील प्रेमामुळे तू हे बोलतोस, पण तुझा स्पर्शगंध अंग अंग मोहरून टाकतो, जो आर्ततेच्या स्पर्शातून पूर्णत्वाच्या गंधाकडे नेतो… तुझ्या विचारांचा स्पर्श जेव्हा शब्दांमधून गंधाळतो, तेव्हा समर्पणाची गझल बनते, जसा तुझ्या ओठांचा स्पर्श होताच मुरली संगीत सुगंधाचे वेड लावते…
मग तुझं माझं असं काही उरत नाही, कारण तो स्पर्शगंध तुझ्या माझ्यातील अंतर नष्ट करून सावळ्या रुपात विलीन होतो…
© आरुशी दाते, पुणे