मराठी साहित्य – विविधा ☆ “वाद, वितंड आणि चर्चा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “वाद, वितंड आणि चर्चा…☆ श्री जगदीश काबरे ☆

जगातील कोणत्याही दोन व्यक्ती या कधीच पूर्णपणे एकमताच्या असू शकत नाहीत–अगदी नवराबायकोही कितीही एकमेकांच्या जवळ असले तरीसुद्धा त्यांच्यात मतभिन्नता असतेच. मतभिन्नता असणे हे खरे तर जिवंत मनाचे लक्षण आहे. त्यामुळे दोन विचारी माणसे एकमेकात वादसंवाद करू शकतात; तर दोन अविचारी माणसे मात्र फक्त वितंडवाद घालू शकतात. पण विचारी माणसाचा अहं जेव्हा त्याच्या बुद्धीप्रामण्यावर हवी होतो तेव्हा मात्र समोरच्या माणसाने त्याची एखादी क्षुल्लक चूक दाखवली तरी त्याचा अहं दुखावतो आणि मग तो चूक कबूल करण्याच्या ऐवजी त्या चुकीचे समर्थन करायचा प्रयत्न करताना बेताल होत जातो. ‘समोरचा माणूस आपल्या चुका काढतो म्हणजे काय!’, असा अहंकार त्याला बेताल होण्यास भाग पाडतो. खरे तर असे लहानसहान वाद तात्पुरत्या स्वरूपातील असायला हवेत. हे वाद कानाआड करून पुन्हा नव्याने एकमेकांशी नितळ मनाने आपण संवाद साधायला हवा. पण आपल्या मनात मात्र त्या माणसाविषयी आकस ठेवणारा दृष्टिकोन निर्माण होतो आणि भविष्यात त्याच्याशी वागताना याच चष्म्याने त्याच्याकडे बघत आपण बोलत राहतो.

म्हणून मला असे वाटते की, निदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी तरी अहंकाराला आपल्या बुद्धीप्रामण्यावर विजय मिळवून देऊ नये. जसे नवराबायकोमध्ये लहानसहान वाद होतात म्हणून ते लगेच घटस्फोटावर जात नाहीत, तसेच चळवळीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आपसातील लहानसहान वादांमुळे एकमेकांना शत्रू न मानता आणि मनभेद न करता मतभेद खुल्या मनाने स्वीकारले पाहिजेत. म्हणूनच म्हटले आहे की, ‘वादे वादे जाय ते तत्त्वबोध:’ पण हे केव्हा शक्य होईल, तर वादांकडे आपण मन प्रगल्भ करणारी चर्चा म्हणून पाहू तेव्हाच. पण वादाकडे जर आपण आपला अपमान करणारे शब्द समजायला लागू तर मात्र वाद हे चर्चा न ठरता हारजीतीच्या खेळावर उतरतात आणि त्यांचे वितंडात रूपांतर होते. ज्या वेळेला माणसाला प्रश्न पडत नाहीत, शंका निर्माण होत नाहीत आणि फक्त आदेश पाळणे, आज्ञाधारकपणा हा गुण समजला जातो त्या वेळेला मात्र कुठलाही वाद होण्याची शक्यता नसते. कारण अशी माणसे फक्त यंत्रमानवासारखी असंवेदनाशील सांगकामे असतात. पण विचारी माणसे संवेदनाशील असल्यामुळे सतत प्रश्न विचारत राहतात, शंका उपस्थित करतात म्हणून त्यांच्यात सतत वादविवाद होत असतात. हे वादविवाद माणसाला नवीन काही शिकण्यास आणि प्रगत होण्यास मदत करणारे असायला हवेत, असे वाटत असेल तर अहंकाराला आपल्या काबूत ठेवायला हवे. अन्यथा आज्ञाधारक मेंढरू आणि आपण यात फरक तो काय?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्याचा त्याचा देव्हारा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

ज्याचा त्याचा देव्हारा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

परवा एका उद्योजक मित्राच्या, तुम्ही बरोबर वाचलेत, उद्योजक मित्राच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला जाण्याचा योग आला ! उद्योगपती मित्र असायला मी कोणी नेता थोडाच आहे ? असो ! तर त्याने दिलेले त्याच्या बंगल्याचे “ध्यान” हे नांव वाचून, खाली घसरणारी ढगळ हाप पॅन्ट, त्यातून अर्धवट बाहेर आलेला मळलेला शर्ट आणि नाकातून गळणारे मोती, असे शाळेत असतांनाचे त्याचे त्या वेळचे ध्यान डोळ्यासमोर आले आणि मी मनांतल्या मनांत हसलो ! पण पठ्याने पुढे मोठ्या मेहनतीने पैसा कमवला आणि त्याच्या बरोबर थोडं फार नांव !

बंगल्यात शिरल्या शिरल्या उजव्या हाताला एक मोठ देवघर होतं. अनेक देवादिकांच्या मोठ मोठ्या तसबीरींनी त्याची भिंत भरून गेली होती, पण माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या जवळ जवळ माझ्या उंचीच्या शिसवी देव्हाऱ्याने ! मित्राची आई त्या प्रचंड देव्हाऱ्या समोर आतील असंख्य देवांच्या लहान मोठ्या मूर्तिची, स्वतः एका चौरंगावर बसून पूजा करत होती ! मला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण माझा मित्र पक्का नास्तिक आहे हे मला ठाऊक होतं. म्हणून तो देव्हारा बघून मी त्याला म्हटलं, “अरे तू एवढा देव देव कधी पासून करायला लागलास ?” “कोण म्हणत ?” “अरे मग हे एवढ मोठ देवघर त्यात तो भला मोठा देव्हारा, हे कशाचं लक्षण आहे ?” “तुला खोटं वाटेल, पण आजतागायत मी आपणहून या देवघरात पाऊल ठेवून त्यांच्या पुढे कधीच हात जोडलेले नाहीत किंवा त्यांच्याकडे काहीच मागितलेले नाही ! माझा माझ्या मनगटावर पूर्ण भरोसा आहे !” “मग हे सगळं…. ” “आई साठी ! त्या देव्हाऱ्यात अनेक देव देवता आहेत, पण मी त्या देव्हाऱ्या समोर डोळे मिटून जेव्हा केव्हा उभा राहतो तेव्हा मला फक्त आणि फक्त त्यात माझ्या आईची मूर्ती दिसते, जिला मी मनोमन नमस्कार करतो, जी माझ्यासाठी सार काही आहे !” त्याच्या त्या उत्तराने मी अंतर्मुख झालो हे नक्की!

मध्यन्तरी बऱ्याच वर्षांनी सुट्टीत गावाला गेलो होतो. एकदा सकाळी गावातून फिरता फिरता, माझ्या लहानपणीच्या शाळेवरून जायची वेळ आली. तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली आणि सगळी चिल्ली पिल्ली आपापल्याला वर्गातून शाळेच्या अंगणात, कोणी खेळायला, कोणी डबा खायला बाहेर उधळली ! मी गेट समोर उभा राहून माझे बालपण आठवत उभा राहिलो ! आताही शाळेत डोळ्यात भरेल असा कुठलाच बदल झालेला जाणवला नाही मला ! नाही म्हणायला, शाळेच्या अंगणातलं पारावरच एक छोटंस मंदिर मला कुठे दिसेना. त्या क्षणी मला काय झालं, ते माझं मला कळलच नाही, मी बेधडक शाळेत शिरून हेडमास्टरची रूम गाठली. तर त्यांच्या त्या खुर्चीत एक चाळीशीची स्मार्ट मॅडम बसली होती.

ओळख पाळख वगैरे झाल्यावर मी त्यांना म्हटलं “माझ्या आठवणी प्रमाणे आपल्या शाळेच्या अंगणात पारावर एक छोटस मंदिर होतं, ते दिसलं नाही कुठे ?” “त्याच काय आहे ना जोशी साहेब, ते मंदिर ना मी इथे बदली होऊन आल्यावर फक्त मागच्या अंगणात शिफ्ट केलंय !” “ओके ! मॅडम, मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी असलो तरी मला विचारायचा तसा अधिकार नाही, पण आपल्याला एक प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?” “अवश्य विचारा जोशी साहेब, त्यात राग कसला !” “नाही म्हणजे मला तुम्ही तसं करायच कारण कळेल का ?” “जोशी साहेब मी जेंव्हा इथे चार्ज घेतला, तेंव्हा पहिल्याच दिवशी सगळ्या शिक्षकांना सांगितलं, की मी मंदिर मागे शिफ्ट करणार आहे आणि त्या वेळेस सुद्धा आपल्याला पडलेला प्रश्नच बहुतेकानी मला विचारला !” “मग तुम्ही त्यांना काय सांगितलंत ?” “मी त्यांना म्हणाले, माझी देवावर श्रद्धा आहे पण मी अंधश्रद्ध नाही किंवा त्याचे अवडंबर पण माजवत नाही ! मला असं वाटतं की आज पासून तुम्ही आपापला वर्ग, हाच एक ‘देव्हारा’ मानून, त्यात असलेल्या प्रत्येक विद्यार्थीरुपी नाजूक, ठिसूळ दगडातून सगळ्यांना हवी हवीशी सुबक छान, मूर्ती घडवायच अवघड काम करायच आहे ! तीच त्या प्रभूची सेवा होईल असं मला वाटतं. माझं म्हणणं त्यांना पटलं आणि त्यांनी त्या प्रमाणे वागून, कामं करून गेली सतत पाच वर्ष ‘तालुक्यातील उत्कृष्ट शाळा’ हे बक्षीस आपल्या शाळेला मिळवून दिलं आहे जोशी साहेब !” मॅडमच ते बोलणं ऐकून काय बोलावे ते मला कळेना ! मी त्यांना फक्त नमस्कार केला आणि शाळे बाहेर पडलो ! घरी जातांना, त्या चिमुकल्यांचा चिवचिवाट बराच वेळ कानावर पडत होता !

डिसेंबरचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. कशी कुणास ठाऊक, पण पहाटे पाच वाजताच जाग आली आणि या अशा थंडीत मस्त आल्याचा, गरमा गरम चहा प्यायची इच्छा झाली ! बायकोला उठवायचं जीवावर आलं, म्हटलं बघूया स्टेशनं पर्यंत जाऊन कुठली टपरी उघडी आहे का. कपडे करून खाली उतरलो. रस्त्यावर तसा शुकशुकाट होता. एरवी भुकणारी कुत्री पण दुकानांच्या वळचणीला गप गुमान झोपली होती. लांबून एका रस्त्यावरच्या चहाच्या टपरीचा दिवा पेटलेला दिसला आणि माझा जीव जणू चहात पडला म्हणा नां ! जवळ जाऊन बघितलं तर तो सामानाची मांडा मांडच करत होता. “अरे एक कडक स्पेशल मिळेल का ?” “साहेब पाच मिनिट बसा. आत्ताच धंदा खोलतोय बघा. ” मी बरं म्हणून त्याच्या टपरीच्या बाकडयावर बसलो. थोडयाच वेळात त्याने रोजच्या सवयी प्रमाणे, चहा उकळल्याचा अंदाज घेवून, तो चहा दुसऱ्या भांड्यात एका फडक्याने गाळला. आता फक्त काही क्षणांचाच अवधी आणि ते पृथ्वीवरचे अमृत माझ्या ओठी लागणार होतं ! त्याने मग दोन ग्लास घेवून एका ग्लासात पाणी ओतलं आणि एका ग्लासात चहा. ते पाहून मी आधाशा सारखा हात पुढे केला, पण त्याने माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून, ते दोन ग्लास आपल्या हातात घेतले आणि मेन रोड वर जाऊन काहीतरी मंत्र म्हणून, पहिल्यांदा पाण्याचा आणि नंतर चहाचा ग्लास असे दोन्ही रस्त्यावर ओतले ! मला काहीच कळेना ! इथे त्याच पहिल बोहनीच गिऱ्हाईक चहासाठी तळमळतय आणि त्याने तो चहाचा पहिला ग्लास चक्क रस्त्यावर ओतला ! मी काही विचारायच्या आतच त्याने दुसरा चहाचा ग्लास भरून माझ्या पुढे केला. मी चहा पिता पिता त्याला म्हटलं “अरे तो ताजा चहा आणि पाणी रस्त्यावर कशाला टाकलंस?” “साहेब मी रोजचा पहिला चहा देवाला अर्पण करतो बघा!” “देवाला ? अरे पण मला त्या मेन रोडवर तुझा कुठला मुदलातला ‘देव्हाराच’ दिसत नाही आणि तुला त्यातला देव दिसून त्याला तू तुझा पहिला चहा अर्पण पण केलास ! खरच कमाल आहे तुझी !” “साहेब कमाल वगैरे काही नाही. माझ्या बापाने सुरु केलेली ही टपरी आता मी चालवतोय, पण त्याने शिकवल्या प्रमाणे हा रोजचा रीती रिवाज मी न चुकता पाळतोय बघा ! साहेब शेवटी देव सगळीकडे असतो असं म्हणतातच नां ? प्रश्न फक्त श्रद्धेचा असतो, खरं का नाही ?” त्याच्या या प्रश्नावर मी फक्त हसून मान डोलावली आणि त्याला पैसे देऊन सकाळी सकाळी मिळालेल्या सुविचाराचा विचार करत घरचा रस्ता पकडला !

मंडळी, शेवटी कोणाचा ‘देव्हारा’ कुठे असेल आणि त्यात तो किंवा ती कुठल्या देव देवतांची पूजा अर्चा करत असतील, हे सांगणे तसे कठीणच ! शेवटी, तो चहावाला मला म्हणाला तसं, प्रश्न शेवटी श्रद्धेचा असतो, हेच त्रिकाल बाधित सत्य, नाही का ?

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खोलवर विचार करा – मूळ इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ खोलवर विचार करा – मूळ इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

… तुमचा जीवनरक्षक कोण आहे??

अनीता अल्वारेज, अमेरिकेतील एक व्यावसायिक जलतरणपटू. तीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान स्पर्धक म्हणून इतर स्पर्धकांसह जलतरण तलावात उडी घेतली आणि उडी मारताच ती पाण्याखाली गेल्यावर अचानक बेशुद्ध पडली.

जिथे संपूर्ण जमाव फक्त विजय आणि पराभवाचा विचार करत होता, तिथे अनिता नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ पाण्याखाली असल्याचे तिच्या प्रशिक्षक अँड्रिया यांच्या लक्षात आले.

जगज्जेतेपदाची स्पर्धा सुरू आहे हे सर्व काही क्षणात अँड्रिया विसरली व एक क्षणही वाया न घालवता आंद्रियाने स्पर्धा सुरू असतांनाही जलतरण तलावात उडी घेतली. तेथे असलेल्या हजारो लोकांच्या काही लक्षात येईपर्यंत अँड्रिया अनितासोबत पाण्याखाली होती.

पाण्याखाली गेल्यावर अँड्रियाने अनिताला स्विमिंग पूलाच्या तळाशी पाण्याखाली बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. अशा स्थितीत पाण्याखालून ना हात पाय हलवून इशारा करता येतो, ना मदतीसाठी कुणाला आवाज देणे शक्य होते. अशा परिस्थितीत अँड्रियाने बेशुद्ध अवस्थेतील अनिताला बाहेर काढल्याचे बघून हजारो लोक अक्षरशः सुन्न झाले. आपल्या समयसुचकतेमुळे अँड्रियाने अनिताचा जीव वाचवला.

ही घटना आपल्या आयुष्याशी जोडून बघता आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक मोठा प्रश्न सोडवला असल्याचे जाणवेल !

किती माणसं आपल्या आयुष्याशी जोडलेली असतात हे आपल्या लक्षातही येत नाही, आयुष्यात आपल्याला कितीतरी जण दररोज भेटत असतात, पण मनुष्य प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्ट काही उकल करून सांगू शकत नाही. आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही तो कुठेनाकुठेतरी बुडत असतो, कोणत्या ना कोणत्या समस्येला तो सामोरा जात असतो, मनावर कसलातरी दबाव घेऊन तो आयुष्यात अस्वस्थ होत असतो, पण कुणाला ते सांगू शकत नाही, किंवा कुणाला सांगण्याइतपत कुणी जवळचं उपलब्ध नसतं.

जेव्हा माणूस आपल्या वेदना, त्रास कोणाला सांगू शकत नाही, तेव्हा मानसिक ताण इतका वाढतो की तो स्वतःला सगळ्या जगापासून, सगळ्यांच्या नजरेपासून दूर, एकांतात, स्वतः ला चार भिंतीत कैद करून घेतो. ही अशी नाजूक वेळ असते जेव्हा माणूस आतल्याआत बुडायला लागतो, त्याची इच्छा संपलेली असते, सहनशीलतेचा अंत झालेला असतो. ना कोणाशी बोलणे, ना कोणाला भेटणे. ही मानसिक परिस्थिती मानवासाठी सर्वात धोकादायक असते.

जेव्हा माणूस त्याच्या अशा बुडण्याच्या अवस्थेतून जात असतो, तेव्हा इतर सर्व प्रेक्षक ज्याच्या त्याच्या आयुष्यात व्यस्त असतात. हा माणूस मोठ्या संकटात सापडला आहे याची कोणालाच पर्वा रहात नाही. एखादी व्यक्ती काही दिवस गायब झाली तरी काही काळ लोकांच्या ते लक्षातही येत नाही.

अचानक काही घटना घडली तेव्हा लोक जमले तर त्याच्याविषयी विचार करतात, की हा पूर्वी किती बोलायचा, आता तो बदलला आहे किंवा त्याला गर्व झाला आहे की आता तो मोठा माणूस झाला आहे. तो बोलत नाही तर जाऊ द्या, आपल्याला काय करायचं! किंवा त्यांना असं वाटतं की जर तो आपल्याला आता दिसत नाही तर तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही.

अनिता एक निष्णात व्यावसायिक जलतरणपटू असूनही ती बुडू शकते तर कोणीही त्यांच्या आयुष्यातील वाईट काळातून जाऊ शकतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. पण त्या इतर लोकांशिवाय एकादी अशी व्यक्ती असेल जी तुमच्या मनाचा कल, मनःस्थिती ताबडतोब ओळखू शकेल, तिला न सांगता सर्व काही आपसूकच कळेल, तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर नेहमी नजर ठेवेल, थोडासा त्रास झाला तरी तो येऊन तुम्हाला तुमच्या समस्या विचारेल.

तुम्ही तुमची वागणूक ओळखा, स्वतःला प्रोत्साहन द्या, तुम्ही स्वतः ला सकारात्मक बनवा आणि अँड्रियासारखे प्रशिक्षक बनून तुम्ही दूसऱ्याचा जीव वाचवा.

आपल्या सर्वांनाच अशा प्रशिक्षकाची खरी गरज आहे… असा प्रशिक्षक कोणीही असू शकतो. तुमचा भाऊ, बहीण, आई, वडील, तुमचे कोणी मित्र, कोणी तुमचे हितचिंतक, कोणी नातेवाईक, कोणीही, जो न सांगता तुमच्या भावना, स्वभावातील बदल ओळखून लगेच सकारात्मक कारवाई करू शकेल.

खोलवर विचार करा व वेळीच शोधा, जीवनातील तुमचा जीवन प्रशिक्षक कोण आहे ते….

 

मूळ इंग्रजी लेखक- अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तर समजून घ्यावे की…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ “तर समजून घ्यावे की…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच, आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, ” इहलोकातील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. “

कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला; तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटूंबीक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.

 बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा, असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.

वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाच्या फाळणी बरोबरच संपुष्टात आले, नातेवाईक देणे / घेणे वादातून संपले,

पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला.

*

कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो, फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता, ह्याला मी किती मदत केली होती…

सगळे कटू अनुभव जमा झाले असतील, कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.

नाती बिघडली, सबंध बिघडले, वाट्याला एकटेपण आले, आता कुणाचे फोन येत नाहीत, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.

तरीपण एक नातं अजून टिकलं आहे, एक फोन चालु आहे, ते नातं मुलीचं.

तितक्यात मुलीचा फोन येतो, ती विचारते— ” पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झालं काय ?” 

नाना प्रश्न काळजीचे, आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात उरतं…

थोडा पश्चातापही होत असतो, मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे ?

लोक मुलगा झाला कि, स्वतःला भाग्यवंत समजतात, मला असे वाटते, ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होय.

एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवावे, यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. तेव्हा मुलगी म्हणते,

“बाबा काळजी करू नका मी आहे ना !!…. “

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीतेचे वैशिष्ट्य – भाग – ३ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

☆ गीता जशी समजली तशी… – गीतेचे वैशिष्ट्य – भाग – ३ ☆ सौ शालिनी जोशी

गीतेचे वैशिष्ट्य

पारंपारिक शब्दाना नवीन अर्थ देणे हे गीतेचे एक विशिष्ट्य आहे.

१) धर्म — येथे धर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्म असा अर्थ नाही. यांना धर्म पेक्षा संप्रदाय म्हणणे योग्य. धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.’धृ- धारयति इति धर्म:l’ धर्म म्हणजे समाजाची तर धारणा करणारा विचार किंवा कर्म . धर्म म्हणजे मार्ग किंवा सहज स्वभाव किंवा कायदा, नियम. तसेच धर्म म्हणजे कर्तव्य. तोच अर्थ गीतेला अपेक्षित आहे. त्यालाच गीता स्वधर्म म्हणते. प्रत्येक माणसाचा त्या त्या वेळचा स्वधर्म असतो. त्या त्यावेळी तो करणे कर्तव्य असते. उदाहरणार्थ पित्रुधर्म, क्षत्रिय धर्म, या दृष्टीने आई-वडिलांचे सेवा करणे हा मुलांचा तर मुलांचे पालन करणे त्यावेळेचा आईचा धर्म असतो.आणि राष्ट्रप्रेम हा प्रत्येक नागरिकाचा धर्म.प्रजा रक्षण हा अर्जुन क्षत्रिय होता म्हणून त्याचा धर्म होता. म्हणून गीतेच्या दृष्टीने स्वतःचे कर्तव्य म्हणजेच स्वधर्म .

२) यज्ञ– यज्ञ म्हटले की समोर येते आणि कुंड, तूप, समिधा इत्यादी साहित्य आणि हवन, स्वाहाकार अशा क्रिया. पण गीतेच्या दृष्टीने ममता व आसक्ती रहित असलेले, सर्व काळी सर्वांच्या कल्याणासाठी केलेले कर्म हाच यज्ञ. ‘इदं न मम’ या भावनेने केलेले कर्म हाच यज्ञ. यज्ञात आहुती देताना त्याच्यावरचा हक्क सोडून ते देवतेला अर्पण केले जाते. कर्माचे बाबतीत आसक्ती व ममता सोडून ईश्वरार्पण बुद्धीने केकेले कर्म हाच यज्ञ. मग अन्नपदार्थाबाबत अनासक्तीने केलेले अन्नग्रहण हे यज्ञ कर्मच, ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’.असा हा निस्वार्थ कार्याला प्रतिष्ठा मिळवून देणारा यज्ञ.

३) पुजा– येथे पुजेसाठी हळद-कुंकू, फुले, निरांजन, नैवेद्य, पाणी कशाचीच गरज नाही. ही पूजा स्वकर्मानी करायची आहे. गीता म्हणते, ‘स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानव:l ‘शास्त्रविधिने नेमून दिलेले कर्म कर्ता भाव सोडून भगवंताला अर्पण करणे म्हणजेच कर्माने भगवंताची पूजा करणे.म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात तुझ्या सर्व क्रिया, खाणे, दान, तप सर्व कर्तुत्वभाव सोडून माझ्यासाठी कर. हीच पूजा, येथे पान, फुल, फळ कशाची गरज नाही. अशी ही शुद्ध कर्माने केलेली पूजा गीतेला अपेक्षित आहे. कर्म हे साध्य नसून ईश्वराची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याचे साधन आहे. ईश्वरावर जो प्रेम करतो त्याची सर्व कर्मे पुजारूपच होतात.

४) संन्यास — गीता म्हणते, ‘ज्ञेय:स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षतिl’ जो कोणाचा द्वेष करत नाही, कशाची इच्छा करीत नाही तो नित्य संन्याशीच जाणावा. म्हणजे गीतेला अपेक्षित असलेल्या संन्यास हा घरदार सोडून वनात जाण्याचा आश्रम संन्यास किंवा भगवी वस्त्रे घालून यज्ञादि कर्माचा त्याग करण्याचा नाही. हा वृत्ती संन्यास आहे. त्यासाठी वासना कामनांचा, फलाशेचा त्याग अपेक्षित आहे. निष्क्रिय होणे नाही. हा बुद्धीत आहे. कर्म सोडणे या बाह्यक्रियेत नाही. गीतेचा संन्यास हा कर्माचा नसून मी, माझे पणाचा आहे. कर्तुत्वमद आणि फलेच्छा टाकण्याचा आहे. असा संन्यासी लोकसंग्रहासाठी कार्य करतो. घरात राहूनही हा साधणे शक्य आहे.

५) अव्यभिचारी भक्ती– भक्ती म्हणजे भगवंताविषयी प्रेम, त्याची पूजा, नामस्मरण, प्रदक्षिणा करणे एवढा मर्यादित अर्थ नाही. ही भक्ती स्थळ, काळ, प्रकार यांनी मर्यादित आहे. ती संपते व सुरू होते. स्वकर्म आणि कर्मफळ त्या सर्वात्मकाला अर्पण करणे हीच भक्ती. विश्वाच्या रूपाने श्रीहरीच नटला आहे हे जाणून आपल्या सकट सर्व ठिकाणी त्याला पाहणे हेच अव्यभिचारी भक्ती. तेव्हा प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत भगवंत आहे हा अभेदभाव पटला की प्रत्येक व्यवहार हा भगवंताशीच होतो.’ जे जे देखे भूतl ते ते भगवंत’l हा भाव हीच ईश्वर भक्ती. अशा प्रकारे भक्तीचे व्यापक रूप जे विहितकर्मातून साध्य होते ते गीता दाखवते. प्रत्येकांत देव पाहून केलेला व्यवहार शुद्ध होतो. व्यवहार व भक्ती दोन्ही एकच होतात.

६) अकर्म– व्यवहारात आपण सत्य -असत्य, धर्म -अधर्म या विरोधी अर्थाच्या जोड्या म्हणतो. त्या दृष्टीने कर्म -अकर्म ही जोडी नाही. अकर्म म्हणजे म्हणजे कर्म न करणे नव्हे, तर सामान्य कर्मच यावेळी निरपेक्ष बुद्धीने फलाची अपेक्षा न ठेवता कोणताही स्वार्थ न ठेवता, ईश्वरार्पण पद्धतीने केले जाते.त्यावेळी ते फळ द्यायला शिल्लक राहत नाही. करून न केल्यासारखे होते. त्यालाच अकर्म म्हणतात. म्हणजे इंद्रियांच्या दृष्टीने कर्म होते पण फळाचे दृष्टीने ते अकर्म. कर्माशिवाय माणूस एक क्षणभरही राहू शकत नाही. अशावेळी स्वस्थ बसणे हे ही कर्म होते. म्हणून निष्काम, सात्विक कर्म म्हणजेच अकर्म. थोर लोकांचे कर्म अकर्मच असते. लोकांना ते कर्म करतात असे वाटत असले तरी फलेच्छा व कर्तृत्व भाव नाही आणि लोकहिताचा उद्देश. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने फल रहित बंधरहित क्रिया म्हणून अकर्म.

७) समाधि– गीतेतील समाधी व्यवहारातील समाधी पेक्षा वेगळी आहे. व्यवहारात साधू पुरुषांना गतप्राण झाल्यावर खड्ड्यात पुरतात त्याला समाधी म्हणतात. गीता समाधी सांगते ती कर्म करत असतानाच प्राप्त होते .कर्म होत असतानाही आत्मस्थितीचे समत्व बिघडत नाही. बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. तेव्हाची योगस्थिती म्हणजे परमेश्वराशी ऐक्य तीच समाधी. अष्टांग योगातील शेवटची पायरी ही समाधी. अशाप्रकारे नेहमीच्या व्यवहारातील धर्म, यज्ञ, पूजा, संन्यास, समाधी, भक्ती, अकर्म या शब्दाला वेगळे अर्थ देऊन गीतेने क्रांतीच केली आहे. येथे कोणतेही कर्मकांड नाही. श्रद्धा एकमेव परमात्म्यावर. या सर्व क्रिया कोणत्याही भौतिक साधनाशिवाय केवळ कर्मातून साध्य होतात. हे दाखवणे हेच गीतेचे वैशिष्ट्य. १८व्या अध्यायात भगवंत सांगतात, ‘ स्वे स्वे कर्मण्यभिरत:संसिद्धि लभते नर:l’ विहित कर्म तत्परतेने व उत्कृष्टपणे केल्याने साधकाला आत्मसिद्धी प्राप्त होते. अशाप्रकारे गीता हे आचरण शास्त्र आहे. आचरण्याची वेगळी वाट दाखवते.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शुभेच्छा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “शुभेच्छा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

तसं तर परिस्थिती जरासुध्दा बदललेली नसते …. तारीख नुसती बदलते..

चोवीसचं पंचवीस झालं .. .. वाटतं की नवीन वर्ष आलं…. नवीन वर्ष आलं..

 

काय झालं बरं वेगळं… अगदी काही नाही…

जरा विचार केला की लक्षात येतं दिवस येतात आणि जातात..

आपणच आपल्याला समजून घ्यायचं…..कारण बाकी कोणी घेत नाही..

शहाण्यासारखं वागत राहायचं….. आपल्या परीने…

कालच्या चुका आज करायच्या नाही असं निदान ठरवायचं तरी .. .. उद्याची फारशी काळजी करायची नाही… भरपूर काम करायचं …. कष्ट करायचे..

मुख्य म्हणजे….. कशाची आणि कोणाकडून अपेक्षा करायची नाही..

झालं .. इतकंच तर असतं…..

नूतन वर्षाच्या वास्तव शुभेच्छा ……

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाणं आपलं आपल्यासाठी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गाणं आपलं आपल्यासाठी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

एखादं गाणं आपल्या आयुष्यात कुठल्या वेळी आपल्या कानावर पडतं त्यावर त्या गाण्याची आणि आपली नाळ किती जुळणार हे अवलंबून असतं असं मला वाटतं. आपल्या मनात त्यावेळी लागलेला एखादा विशिष्ट सूर आणि त्या गाण्याचा सूर जर जुळला तर ते गाणं आपल्या जिव्हाळ्याचं होतं. मग त्याचा राग, त्यातली सुरावट, ते कुणी गायलंय, कुठल्या वेळी गायलंय, त्यातले शब्द, त्याचा अर्थ, या सगळ्या पलीकडे जाऊन ते गाणं आपल्याला एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीने, बऱ्याच भेटीनंतर समोर दिसताच आनंदाने बिलगावं तसं बिलगतं. आणि मग पुढे एखाद्या चित्रपटाच्या पार्श्वसंगितासारखं आयुष्यातल्या अनेक प्रसंगात ते गाणं आपल्या मनात त्याच्या विशिष्ट सुरावटीसह रुणझुणत राहतं. अनेक अर्थाने आपल्याला समृद्ध करत राहतं. अशावेळी त्या गाण्याचा मूळ भाव काय, त्याची रचना कशी आहे, कुठल्या प्रसंगात केली आहे, अशा कुठल्याच गोष्टींचा प्रभाव त्यावर पडत नाही. ते गाणं अगदी आपलं आपल्यासाठीच खास झालेलं असतं. आपण आपल्या मनातले, स्वप्नातले विशेष रंग, विशेष सूर त्या गाण्याला दिलेले असतात. आणि त्या भावनेतूनच आपण ते गाणं पुन्हा पुन्हा आपल्या मनात आळवत राहतो.

काही गाणी अशीच मनाला भिडलेली आहेत. त्या त्या वेळी कुठल्या प्रसंगात ती आपल्यासमोर आलेली आहेत ते सुदैवाने माझ्या लक्षात राहिलं आहे. त्यामुळे त्याला अनुसरून असलेला एखादा प्रसंग समोर आला की आपल्या प्ले लिस्टच्या लूपवर टाकल्यासारखी ती आपोआपच सुरू होतात. 

पण त्यातलं एक गाणं फार खास आहे. कारण बऱ्याचदा ते मनात रुणझुणत असतं….. 

‘भय इथले संपत नाही…’. कविवर्य ग्रेस यांचे अफाट शब्दरचना असलेलं शिवाय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं अजरामर ठरेल यात शंकाच नाही. पण या गाण्याची गंमत म्हणजे देवकी पंडित, राहुल देशपांडे यांनी देखील हे गाणं गायलं आहे आणि त्या प्रत्येक वेळी ते तेवढेच प्रभावशाली ठरलं आहे. त्यामुळे ग्रेसांच्या आणि हृदयनाथांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो. 

हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं, तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. अकरावीतली गोष्ट आहे. स्केचिंग करून घरी परत येताना बरीच संध्याकाळ झाली होती. विठ्ठल मंदिराच्या समोरच्या एका छोट्याशा खाजगी रस्त्यावरून मी आमच्या घराकडे निघाले होते. त्या रस्त्यावर पुष्कळ फुलझाडी आहेत. कारण आजूबाजूला बंगले आणि काही जुन्या अपार्टमेंट आहेत. अगदी कातर म्हणावी अशी ती वेळ. झाडांची स्केचेस काढून आम्ही मैत्रिणी परत घरी निघालो होतो. रात्रीच्या रस्त्यावरच्या लाईटमध्ये झाडांच्या पडणाऱ्या सावल्या किती वेगळ्या दिसतात. या विषयावर मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत होतो. या निद्रिस्त सावल्या जास्त मोहक की मूळ झाडं? असा आमचा चर्चेचा विषय होता. गप्पा मारता मारता मधल्या एका टप्प्यावर माझी मैत्रीण दुसरीकडे वळली आणि मग मी एकटीच हळूहळू पावलं टाकत घराकडे निघाले. एकटेपणाने वेढलं तसं दिवसभराचा धावपळीचा थकवा चांगलाच जाणवायला लागला. अगदी थोडं अंतर चालणंसुद्धा नको झालं होतं. त्यात पाठीवर जड सॅक, हातामध्ये मोठं स्केचबुक घेऊन उद्याच्या सबमिशनचा विचार मनात चालू होता.

बाहेरचं वातावरण मात्र प्रसन्न होतं. थंडीचे दिवस होते. हवेत सुखद गारवा होता. रस्त्यावरच्या झाडांमुळे, फुलांचा खूप सुंदर असा मंद वास येत होता. रस्त्यावर बराच शुकशुकाट होता. तुरळक सायकलवरून जाणारे कुणी किंवा बंगल्याबाहेर उभे असणाऱ्या काही व्यक्ती असं सोडलं तर फारशी रहदारी नव्हती. तसाही तो रस्ता खाजगी आणि आतल्या बाजूला असल्यामुळे फारशी वर्दळ त्यावर नसायचीच. त्यामुळे माझा तो लाडका रस्ता होता. त्या रस्त्यावरच एका बंगल्याच्या खाली एक कारखाना होता. कारखाना म्हणजे एक मोठी पत्र्याची दणकट शेड होती आणि त्याला मोठ्या खिडक्या होत्या. आत मध्ये भरपूर लाईट लागलेले असायचे आणि तीन-चार लोकं काहीतरी काम करत असायचे. काय काम करायचे ते माहित नाही पण त्या जागेवर बऱ्याचदा फेविकॉलचा वास यायचा. कसला तरी कटिंगचा आवाज यायचा. तिथे उशिरापर्यंत साधारण नऊ-साडेनऊपर्यंत काम चालायचं. तर त्या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधीही, गडबड, गोंधळ ओरडा नसायचा. पण तिथे संध्याकाळ झाली की कायम रेडिओ विशेषतः आकाशवाणी चॅनल चालू असायचा. आणि त्या रेडिओवरची गाणी रस्त्यावर दूरपर्यंत ऐकू यायची. 

त्यादिवशी असाच रेडिओ चालू होता आणि जशी जशी मी त्या कारखान्याच्या जवळ आले तसं माझ्या कानावर हे सूर पडले ‘ भय इथले संपत नाही…’ आणि का कोण जाणे सुरुवातीचे हे शब्द ऐकून मी थबकलेच. हळूहळू जसं ते गाणं पुढे जायला लागलं तशी मी त्याच्यात इतकी रंगून गेले की नकळत मी त्या कारखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या चाफ्याच्या झाडाखाली येऊन उभी कधी राहिले ते माझं मलाही कळलं नाही. अगदी शांतपणे कान देऊन जणू झाडांना, गाण्याला किंवा अगदी रस्त्यालासुद्धा माझ्या असण्याचा त्रास होणार नाही अशी काळजी घेत मी ते गाणं ऐकू लागले. वातावरणाची मोहिनी असेल, मनातली स्थिती असेल किंवा आणखीन काही असेल पण त्या गाण्यानं त्या दिवशी मला अगदी अलगदपणे कवेत घेतलं ते आजतागायत. ‘ झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायचे ‘ हे शब्द माझ्या कानावर पडायला आणि बरोबर त्याचवेळी मी उभ्या असलेल्या झाडावरून चाफ्याचं एक फुल गळून माझ्या पायापाशी पडायला एकच गाठ पडली. त्यासरशी एका विशिष्ट तंद्रीत मी पटकन वर बघितलं. सहज आकाशाकडे लक्ष गेलं. स्वच्छ चांदणं होतं. फुल पडण्याचा योगायोग काहीतरी वेगळाच होता. काय झालं ते कळलं नाही. झाडावरून फुलानं सहजपणे ओघळून पडावं तसं त्या गाण्यानं माझं मी पण बाजूला सारून मला आपल्या कवेत घेतलं. आजही अगदी हे लिहीत असतानासुद्धा मला ती भारावलेली अवस्था आठवते. 

नक्की कशाचं भारावलेपण होतं ते माहित नाही. इतकं जाणवलं की हे सूर आपले आहेत. आपल्यासाठी आहेत. आपल्याला आता कायम सोबत करणार आहेत. आणि ते गाणं माझं झालं. त्यानंतर येणाऱ्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात विशेषतः जेव्हा जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा तेव्हा हे गाणं मला आठवतं. पण वेदना घेऊन नाही तर कसली तरी अनामिक ऊर्जा आणि चैतन्य घेऊन ते गाणं येतं. मला हे गाणं नेहमीच सर्जनशीलतेला उद्देशून म्हटलं आहे असं वाटतं. कदाचित त्यावेळी माझ्या डोक्यात सबमिशनचे विचार असतील ते पूर्ण करण्याचा ताण असेल त्यावर या गाण्यानं थोडं आश्वस्त झाल्यासारखं वाटल्याने असेल. पण मला ते गाणं .. निर्मिकाला निर्मितीचं भय हे कायम व्यापूनच असतं पण तरीही त्या भयाला सहजतेने सामोरं जावं, सश्रद्ध शरण व्हावं मग निर्मिती तुम्हाला पुन्हा संधी देते .. असं सांगणार वाटतं. 

…… निर्मिक आणि निर्मिती यांच्यामधल्या निरंतर चालणाऱ्या खेळात निर्मिकाला लाभणारा उ:शाप वाटतं.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ How is the Josh…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“How is the Josh…! ☆ श्री संभाजी बबन गायके 

— कोण म्हणतं आभाळाला स्पर्श करता येत नाही?

 रमण नावाचा एक तरुण. त्याचे वडील तीस वर्षे सैन्यात शिपाई होते. उत्तम कामगिरी बजावल्याने त्यांना मानद कॅप्टन अशी बढती मिळाली होती. आपल्याही मुलाने सैनिक व्हावे, नव्हे सैन्य अधिकारी व्हावे, अशी त्यांची इच्छा असणं स्वाभाविक होतं. पण रमण अभ्यासात रमला नाही. त्याला हॉटेलचे क्षेत्र खुणावत राहिले. त्यातून Hotel Managementची पदवी प्राप्त करून तो एका मोठ्या हॉटेलात शेफ म्हणून रुजू झाला…ही नोकरी त्याने तीन वर्षे केली!

 पण त्याच्या वडिलांचे स्वप्न त्यालाही पडू लागले होते. वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्या जोरावर त्याने आणखी मेहनत घेतली..अभ्यास केला..व्यायाम केला आणि Junior Commissioned Officer म्हणून तो सेनेत भरती झाला. त्याचे पहिले पद होते…नायब सुबेदार. अनुभव आणि ज्ञान पाहून श्री.रमण यांना

इंडीयन मिलिटरी अकॅडमी मध्ये Mess In-Charge पदाची जबाबदारी देण्यात आली.

सैन्य अधिकारी बनत असलेल्या साहेब लोकांना उत्तम भोजन देण्याची त्यांची जबाबदारी बनली. पण इथेच त्यांचा दृष्टिकोन बदलला. प्रशिक्षणार्थी तरुण आणि आपण यांत फरक आहे तो शिक्षणाचा आणि आत्मविश्वासाचा..त्यांनी समजून घेतले. त्या तरुणांशी त्यांनी मैत्री संबंध प्रस्थापित केले. त्यांनी कसा अभ्यास केला, कसे परिश्रम घेतले ते सारे जाणून घेतले. सेवेतील सक्षम लोकांना भारतीय सेनेत अधिकारी होण्याची संधी दिली जाते. श्री.रमण यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर ही संधी साधली. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले..पण रमण खचून गेले नाहीत. त्यांनी अभ्यास आणखी वाढवला…आणि हे करत असताना त्यांनी कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. याचेच फळ त्यांना तिस-या प्रयत्नात मिळाले. Officer Cadre परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले….वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंत त्यांना संधी होती….अगदी शेवटच्या क्षणी त्यांना यशश्री प्राप्त झाली.

 जिथे इतरांना जेवण वाढले, अधिकाऱ्यांना salute बजावले, तिथेच मानाने बसून भोजन करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले ..अधिकारी बनून भारत मातेची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले…बाप से बेटा सवाई बनून शेवटी अधिकार पदाची वस्त्रे परिधान केलीच!

नुकत्याच झालेल्या IMA passing out parade मध्ये मोठ्या अभिमानाने त्यांनी अंतिम पग पार केलं…त्यावेळी त्यांच्या मनात किती अभिमान दाटून आला असेल नाही?

 लेफ्टनंट रमण सक्सेना ….एका अर्थाने यश Success ना म्हणत असताना successful होऊन दाखवणारा लढाऊ तरुण!

चित्रपटात हिरो होणं तसं तुलनेने सोपे असेल…हॉटेलात काम करून चित्परपटात हिरो बनलेले आपण पाहिलेत…पण सैन्लायाधिकारी झालेला असा तरुण विरळा! लाखो सक्षम तरुण मुलांमधून निवडले जाणे म्हणजे एक कठीण कसोटी असते!

 सक्सेना साहेबांनी दाखवलेली ही जिद्द प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात सक्सेना साहेबांना उपयोगी पडेल, यात शंका नाही! जय हिंद! 🇮🇳

जय हिंद की सेना! 🇮🇳

यातून सर्वांना प्रेरणा मिळू शकेल.

माझा उद्देश फक्त आपल्या तरूणांचे कौतुक करण्याचा असतो…त्यातून एखादा मुलगा, मुलगी प्रेरणा घेईल…अशी आशा असते. तशी उदाहरणे मी पाहिली आहेत, म्हणून हा लेखन प्रपंच. ज्ञानी माणसांनी या विषयावर अधिक लिहावे. जय हिंद !

(How is the Josh…! ही आपल्या सैनिकांची हल्लीची घोषणा आहे. उरी सिनेमा आल्यापासून ही घोषणा प्रसिद्ध झाली. तुमच्यात किती उत्साह आहे…यावर High sir असे उत्तर दिले जाते !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक उल्लेखनीय धाडस… लेखक : श्री सागर आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ एक उल्लेखनीय धाडस… लेखक : श्री सागर आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पुण्यातील मराठी मुलीने बदलायला लावला अमेरिकी शाळांतील शिवरायांचा इतिहास; पुढील शैक्षणिक वर्षापासून औरंगजेबाची महती बाद; छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा धडा 11 वीच्या शालेय इतिहास समाविष्ट!

पुण्यातील बाणेर येथील श्री अतुल जयकुमार आवटे यांची पुतणी, त्रिशा सागर आवटे ही अमेरिकेतल्या मॅडिसन स्टेट मधल्या वेस्ट हायस्कूल मध्ये 11वीला शिकते. एकदा त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेब यावर असलेला एक धडा क्लासमध्ये शिकविला जात होता. त्यात औरंगजेब किती सर्वश्रेष्ठ होता, याबद्दल लिहिलेले आहे, ते शिकविले जात होते. त्यावेळेस त्रिशाने धाडस करून क्लासमध्ये टीचरला सांगितले की, हे खरे नाही, हा खोटा इतिहास आहे व छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते. शिवरायांबद्दल सगळा खरा इतिहास तिने वर्गात इतिहास सांगितला. अलेक्झांडर च्या कथा ऐकून वाढलेल्या अमेरिकन मुलांना शिवरायांचा हा धाडसी इतिहास रोमांचित करून गेला. टीचरलाही हा इतिहास नवा होता; पण इंटरेस्टिंग वाटला. त्यानंतर त्यांच्या टीचरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खूप वाचन केले व सगळी माहिती मिळवली. याचा परिणाम असा झाला की, आता त्या शाळेमध्ये पुढील वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर संपूर्ण एक धडा समाविष्ट केला जाणार आहे, जेणे करून तेथील विदयार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते, हे कळावे.

त्रिशाने केलेल्या या धाडसाबद्दल एक भारतीय म्हणून खरंच खूप अभिमान आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा धडा पुढील शैक्षणिक वर्षांपासून समाविष्ट करणार, याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे पण खूप आभार.

लेखक : सागर आवटे ( Trisha’s father ), Madison City, Wisconsin State.

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “चल उड़ जा रे पंछी… समय हुआ बेगाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “चल उड़ जा रे पंछी… समय हुआ बेगाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

हीच आता आपल्या आयुष्याची दोरी आहे बरं… पहाटेचं तांबडं फुटल्या पासून अखंड दिवसभर पंख पसरून निळ्याशार आकाशात गगन विहार करत राहता येईल.. पण संध्याकाळी तांबुस किरमीजी किरणांचा सडा सांडल्यावर आपल्या सगळ्यांना या दोरीवरच रात्रीचा आसरा घेण्यासाठी हीच एकमेव आता जागा शिल्लक राहिली आहे… थोड्या दाटीवाटीने राहायला लागणार आहे ,पण त्याला इलाज नाही… आता पूर्वीसारखं सुटसुटीत स्वतंत्र घरट्यात राहायची लागलेल्या सवयीला बदलावं लागणार आहे.. कारण आता काळ फारच झपाट्याने बदलत चाललाय बरं.. शहरातील वनराई ची हिरवीगार जंगल भुईसपाट करून तिथं आता सिमेंटच्या टोलेजंग जंगलांची व्याप्ती वाढत चालली असल्याने आपली म्हणणारी झाडांची कत्तल करण्यात आली… ती माणसांची जमात आपली घरं बांधताना आपल्याला बेघर करून राहिली… त्यामुळे आपण आता आपलं छप्परच काय पण दुपारच्या कडक उन्हात झाडाच्या सावलीला सुध्दा मुकलोय.. पोट भरण्यासाठी चारापाणी दाण्यासाठी शहरभर उंच उंच उडत जातोय… पण अन्नाचा कण फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो… आणि जिथे तो दिसतो तिथं तर आपल्याच जातभाईंची झुंबड उडून गेलेली बघावी लागते… कुणाचं एकाचं तरी अश्याने पोटभरत असेल कि नाही.. काही कळत नाही.. जिथं मोठ्यांची ही कथा तिथं कच्चीबच्ची पिलांना कोण आणि कसं पोसणारं… काळ फारच वाईट आलाय… आपल्या जगण्यावर गदा आलीय.. भुकबळी, तहानबळी आणि दिवसरात्र उन्हाळा पावसाळा नि हिवाळा असं उघड्यावर राहणं आपलं जगणचं संपवून टाकायला लागला.. आपली संख्या रोडावत चाललीय.. आता तो दिवस दूर नसेल इतिहासात नोंद असेल या धरेवर पक्षी गणांचं कोणेऐकेकाळी वास्तव्य होतं… बस्स इतकाच दाखला शिल्लक राहील.. तेव्हा आता आपण जितके आहोत तितके एकत्र राहणे हेच श्रेयस्कर राहील… या दोरीवरच सध्या आपला कठीण काळ कंठावा लागेल… त्या माणूस नावाचा स्वार्थी प्राण्याने स्वताची जमात वाढवत वाढवत गेला नि या वसंधुरेचा, निर्सगाचा र्हास करत सुटला.. ना हवा शुद्ध राहीली ना पाणी… त्याला स्वताला देखील यासाठी खूपच धावाधाव करावी लागत आहेच… मुबलक होतं तेव्हा त्याने नुसती नासाडीच केली. जे जे आयतं मिळत गेलं ते ते नुसतं ओरबाडत गेला… त्याचं भवितव्य उजाडत गेलं नि आपलं मात्र उजाडलं गेलं… कधी भविष्यातील पिढीचा विचार त्यानें केलाच नाही… ना स्वताच्या ना इतर प्राणांच्या.. माणूसकीला कधीच हद्दपार करून बसलेला भूतदयेला कितीसा जागणार म्हणा… आणि मगं भोगावी लागताय त्या दुष्परिणामांची फळं त्याच्याबरोबर विनाकारण आपल्याला… जो चोच देतो तो चारा देखील देतो हे कोरडं तत्वज्ञान ठरलयं आताच्या या काळात.. त्या माणसाचा अलिकडे काही भरंवसाच देता येत नाही.. कुठच्या क्षणाला कसा वागेल ते देवाला देखील सांगता येणार नाही… आता हेच बघा ना ज्या दोरीवर आपण बसलोय ती आपल्या आधाराची जरी असली तरी खऱ्या अर्थाने ती आपल्या आयुष्याची दोरी आहे बरं.. ती कुठून कशी तुटेल, तो माणूस कधी तोडेल,हे काही सांगता यायचं नाही.. ती तशी तुटलीच तरी आपल्या जीवाला धोका असणार नाही.. आपण लगेच सावधगिरीने हवेत पंख पसरून विचरू लागू… मात्र मागच्या पानावरून पुढच्या पानावर आपलं विस्थापिताचं पुन्हा नव्याने जगणं सुरू होताना किती जण मागे उरतील हे त्या परमेश्वरालाच माहीत असेल…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares