मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्यात नवीन निनावी व्हायरस – लेखिका – सुश्री प्रिया माळी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यात नवीन निनावी व्हायरस – लेखिका – सुश्री प्रिया माळी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

हा प्रसंग माझ्या घरातच घडला आहे. सोमवार दि. 29/7/2024 रोजी सकाळी 8. 00 वाजताच माझ्या आईचा फोन आला. मला कसे तरी होत आहे. मी लगेच चिंचवडवरून आईला पुण्यात आणले. डायरेक्ट जहांगीर हाॅस्पीटल गाठले. वरवर पहाता आईला विशेष काही झाल्याचे जाणवत नव्हते. डाॅक्टरांनी जुजबी औषधे दिली. आता 29, 30, 31 जुलै त्या औषधांवर उपचार चालू होते. पण या काळात  खाल्लेले अजिबात पचत नव्हते अगदी औषधेही पचत नव्हती. शुगर व डायबेटीसच्या गोळ्या अख्ख्याच्या अख्खया उल्टीवाटे बाहेर पडत होत्या. परत 1 ऑगस्टला जहांगीर हाॅस्पिटल गाठले. हाॅस्पीटलमध्ये अक्षरश पाय ठेवायलाही जागा नव्हती. रूम शिल्लक नाही, डे केअर काॅट शिल्लक नाही….

सगळ्यात विदारक परिस्थिती म्हणजे आठ दिवसांपुर्वी बायपास झालेल्या एका रूग्णाला घेऊन त्यांचे नातेवाईक आले होते. पण त्या पेशंटसाठीही बेड शिल्लक नव्हता. त्यालाही हाॅस्पीटल ॲडमिट करून घेत नव्हते. त्यामानाने आमची केस वरवर फार सोपीच वाटत होती. डाॅक्टरांनी आम्हाला सांगितले तुमचा पेशंट दुसरीकडे कुठेही न्या. आम्ही इथे औषध उपचार करणार नाही…

आता ओळखीने कोणत्या हाॅस्पीटलमध्ये बेड शिल्लक आहे का हे पहाणे सुरू झाले. रूबी, मंगेशकर, पुना हाॅस्पीटल, जोशी कुठेच बेड शिल्लक नाही. शेवटी काॅरपोरेशनचे एक डाॅक्टर त्यांच्या ओळखीने वडगाव शेरी येथील सिटी केअर मध्ये ॲडमिट करता येईल असे कळाले….

तो पर्यंत केस हातातून निसटत चालली होती. आईची शुध्द हरपली. ॲम्ब्युलन्सला बोलावूनही ॲम्ब्युलन्स आलीच नाही. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. शेवटी मलाच गाडी काढून हाॅस्पीटलपर्यंत आईला न्यावे लागले. आय. सी. यू. त दाखल करावे लागले. तिथे एम. आर. आय. व इतर टेस्टची सोय नाही मग डाॅक्टरच्या चिठ्ठ्या घेत आमची यात्रा सुरू झाली. मोठ मोठे हाॅस्पीटल पण पेशंट आपल्या दवाखान्यात येत आहे हे नुसते बघणारा स्टाफ. शेवटी एकेकाला कामाला लावत सगळ्या टेस्ट पुर्ण केल्या. कशातच काही आढळले नाही. परत आय. सी. यू. सलाईन N. S इत्यादी सोपस्कार चालूच होते. रात्रंदिवस आम्ही दवाखान्यात थांबलेलो. काय झाले  हे कळत नव्हते. थोडे फार सोडियम कमी झाले होते पण त्याने मेंदूवर अटॅक झाला होता. लोक ओळखण्यात अडचण येत होती. रात्र दिवस कळत नव्हते, खाण्या पिण्याचे भान नव्हते. जेवायला दिले तरी आत्ताच तर जेवले ना मी असे सांगत आई चालढकल करू लागली. नंतर नंतर बोलणेही दुरापास्त झाले. दवाखान्यात आजूबाजूला पाहिले तर असेच सगळे पेशंट. सत्तरच्या पुढचे सगळे. उलट्या व विस्मरणाने हैराण पेशंट…..

डाॅक्टरांना खोदून खोदून विचारल्यावर व्हायरल आहे एवढीच माहिती देत होते. पण व्हायरस unknown आहे हे सांगत होते. एवढ्यात….

दोन पेशंट दगावले व ओळखीमधले दोन जण दगावले. आता डाॅक्टरही अंदाजाने औषधे म्हणजे फक्त सलाईन व सोडियम सलाईन लावत होते. एका हाताला एकाच वेळेला दोन बाटल्या या प्रमाणे दोन हातांना चार बाटल्या चालू होत्या. नंतर तर पायातूनही सलाईन चालू केले. बरेच सलाईन कॅथेटरमार्फत युरिनवाटे बाहेरच पडत होते. आता कोणत्याच टेस्ट शिल्लक राहिल्या नव्हत्या.

आता अधून मधून शुध्दीवर आल्यावर आईचा घोषा सुरू झाला तुझ्या घरी मला ने. मी तुझ्या पाया पडते अशी विनवणी सुरू झाली. शेवटचा उपाय म्हणून काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले तू चालल्याशिवाय डाॅक्टर  घरी सोडणार नाही म्हणाले आहेत. त्यासाठी तुला थोडे खावे लागेल हे सांगितल्यावर जिवाच्या निकराने आईने नारळपाणी एकदाचे संपवले आणि दोन तासांनी पाच सहा पावले एकदाची चालली. हट्टाने घरी आली. येताना मणिपाल हाॅस्पिटलमध्ये न्युरोसर्जनची अपाॅईंमेंट घेतली. तिथेही सगळे ओ के च रिपोर्ट आले. एकदाचे घरी आल्यावर एक दोन दिवसात एकदम ओ के झाली. आत्ता बरी आहे. पण…..

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजही डाॅक्टर खाजगीत हेच सांगत आहेत की  हा unknown virus आहे. यावर अजून तरी औषध नाही. सलाईन हाच मार्ग अवलंबावा लागत आहे. तसेच यापुढे गौरी गणपती व इतर सणांच्या काळात ह्या व्हायरसचे संक्रमण वाढणार आहे. पण सरकारी यंत्रणेने जी घोषणा करणे आवश्यक आहे ती केली जात नाही. तरी…….

सगळ्यांनी मास्क लावा, अनावश्यक गर्दीत जाणे टाळा. अंगावर दुखणे काढू नका. हे माझे नाही तर डाॅक्टरांचे सांगणे आहे. फक्त हे सांगणे खाजगीत बोलले जाते हे लक्षात घ्या….    

लेखिका : सुश्री प्रिया माळी

पुणे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्ण — एक विचार… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

कृष्ण — एक विचार… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

हे नाथ नारायण वासुदेव

कृष्ण नामाचा हा जप मुखाने गात राहिले की भरकटलेल्या मनाला एकदम उभारी येते असा माझा नित्याचा अनुभव आहे. का बरे असे होत असावे? याचे उत्तर एकच!

कृष्ण ही एक अद्भुत शक्ती आहे, आत्मतत्त्व आहे, परब्रह्म आहे.

 परित्राणाय साधुनाम्

 विनाशायाच दुष्कृताम्

 धर्मसंस्थार्पनार्थाय संभवामि युगे युगे

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी पार्थ अर्जुनास असे वचन दिले आहे. संत जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी मी युगानुयुगे येतच राहणार, अवतार घेतच राहणार.

बंदीवासात टाकलेल्या देवकीची एकापाठोपाठ एक सात मुले तिच्या भावाने, कंसाने मारल्यानंतर या कंस मामाचा, या दुष्ट शक्तीचा विनाश करण्यासाठी आठव्या कृष्णाचा जन्म झाला. श्रावण वद्य अष्टमी, मुसळधार पावसाने या बाळकृष्णाचे स्वागत केले. याच वेळी गोकुळात नंद आणि यशोदेस कन्यारत्न प्राप्त झाले. वसुदेवाने या आठव्या बाळाला वाचविण्यासाठी टोपलीत घालून भर पावसात पूर आलेल्या यमुना नदीतून गोकुळात नेले. बाळाच्या पावलाच्या अंगठ्याचा पाण्याला स्पर्श होताच यमुना नदी दुभंगली आणि रस्ता तयार झाला. यशोदेच्या पुढ्यातील कन्या, नंदा हिला घेऊन वसुदेव परत येऊन दाखल झाला. कंस त्या बाळाला आपटून मारणार एवढ्यात त्या बालिकेचे विजेत रुपांतर झाले आणि कडकडून आकाशवाणी झाली, ” हे कंसा! तुझा काळ गोकुळात वाढत आहे. ” ही कथा आपण सर्वजण जाणतो. सांगायचा मुद्दा हा की ही किमया त्या ईश्वरी शक्तीचीच आहे. कृष्णाचीच आहे. देवकीच्या उदरी जन्माला आलेले हे बाळ सामान्य नसून दैवी आहे.

आपण म्हणतो,…..

 कुठे शोधिसी रामेश्वर अन्

 कुठे शोधिसी काशी

 हृदयातील भगवंत राहिला

 हृदयातून उपाशी

भगवंत आपल्या हृदयात आहे असे समजूनही, मान्य करूनही हृदयस्थ परमेश्वराची पूजा करणे आपल्याला जमत नाही. यासाठीच या भगवंताची विविध सगुण रूपे आपण समोर ठेवतो आणि त्याची भक्ती भावाने पूजा करतो. या हृदयातील भगवंताला आपण कधी बाळकृष्णाच्या रूपात पाहतो. ते बाळ लेणी घातलेले गोड गोंडस रूप पाहून मन प्रसन्न होते. गोपाळांसंगे गाई चरायला नेणारा, दह्यादुधाची मडकी फोडून चोरून नवनीत खाणारा, उपरांत मैया मै नही माखन खायो असे म्हणणारा, कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण आपण पाहतो आणि उल्हसित होतो.

राधेचा कृष्ण, मीरेचा कृष्ण, यमुनाजळी गोपींसंगे रासक्रीडा करणारा कृष्ण, गोपींची वस्त्रे पळवणारा कृष्ण आणि बासरीच्या सुराने आसमंत धुंद करणारा मुरलीधर कृष्ण, कोसळणाऱ्या पावसापासून नगरजनांचे रक्षण करणारा गोवर्धन गिरीधारी कृष्ण आणि बंदीवासातील सोळासहस्त्र स्त्रियांचा उद्धारक कृष्ण अशी कृष्णाची विविध रूपे आपण पाहतो आणि हरखून जातो. सत्यभामेच्या अंगणात पारिजातकाचे झाड लावून त्याच्या सुगंधित फुलांचा सडा रुक्मिणीच्या महालात पडावा अशी किमया करून एकाच वेळी दोन्ही राण्यांना

संतुष्ट करणाऱ्या कृष्णाला काय म्हणावे? या कृष्णाच्या लीलाच अगम्य! खरं सांगायचं तर हे तत्त्वच अत्यंत दुर्बोध आहे.

दुर्योधनाचा अत्याचार थांबविण्यासाठी पांडवांच्या पाठी उभा असलेला कृष्ण तर संपूर्ण वेगळा. दुर्योधनाला शस्त्रास्त्रे पुरवून हा श्रीकृष्ण जातीने पांडवांसोबत उभा राहिला. या द्वारकेच्या राण्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले.

कुरुक्षेत्रावर मध्यभागी रथ उभा केल्यानंतर आपल्याच भाऊ बंधाना, पितामह भीष्मांना, गुरु द्रोणाचार्यांना समोर पाहून अर्जुन संभ्रमित झाला, आणि मी यांना कसे मारावे? त्यापेक्षा भिक्षान्न सेवन करणे मी पसंत करेन असा विचार अर्जुनाच्या मनात आल्यावर त्याला गीता सांगणारा कृष्ण कोण होता? कृष्ण हा परमोच्च कोटीचा विचार! मारणारा तू कोण? या ठिकाणी गीतेच्या उपदेशाचा प्रारंभ होतो. शरीर आणि शरीरी यातील फरक श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला. शरीर हे विनाशी आहे तर शरीरी अविनाशी आहे. तेव्हा समोर असलेल्या या शरीरांचा नाश ठरलेलाच आहे. तुझे काम फक्त विहित कर्म करण्याचेच आहे.

 अविनाशी तु तत्विद्धी ये न सर्वमिदं ततम्

 विनाशमव्यव्स्याय कश्चितकर्तुमर्हति 

 त्या अविनाशी तत्वाला समजून घे. संपूर्ण संसार याच तत्त्वाने व्यापलेला आहे. या तत्त्वाचा कोणीच विनाश करू शकणार नाही हे फार मोठे सत्य श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि पर्यायाने आपल्यालाही सांगितले आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन अर्थात कर्तव्य कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, त्यापासून मिळणाऱ्या फळात नाही. कर्म फळाचा हेतू कधीही मनात आणू नकोस, या अशा उपदेशाने आपल्या सामन्यांनाही कृष्णाने जागृत केले आहे.

गीतेच्या अकराव्या अध्यायात श्रीकृष्णाने पार्थास विश्वरूप दर्शन दिले. ते पाहून पार्थ भयभीत झाला. यातून इतकेच समजायचे की जनतेच्या रक्षणासाठी संपूर्ण विश्वात, चराचरात हे कृष्णतत्व सामावलेले आहे.

कृष्ण हे एक सत्य आहे. सत्य हे अखंड आणि अविनाशी आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात…

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ

श्रीकृष्णाने हे तत्व आचरणात आणले. रामाला राज्याभिषेक आणि वनवास सारखाच होता. सोन्याची द्वारका आणि त्याचा विनाश हे सारखेच होते. उद्धवाला त्याने सांगितले होते की मी भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्व काळात एकाच स्वरूपात असतो हे सत्य आहे. काम, क्रोध, लोभ यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्यामुळे तो कायम आनंद रूपच आहे.

अशा या सत्याची, परब्रम्हाची निष्काम भक्ती केल्याने भगवंताची प्रत्यक्ष भेट होणे सहज शक्य आहे. अखंड नामजप हे या भक्तीचे अत्यंत समर्थ असे साधन आहे. चला गाऊया

 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

 हे नाथ नारायण वासुदेव

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।। पुनरागमनायच ।। ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ ।। पुनरागमनायच ।। ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

श्रावण मास कसा सरला ते कळलंच नाही. व्रतवैकल्ये, श्रावणाची रिमझिम, हवं हवेस वाटणार सोनेरी कोवळ उन ! हवेत गारवा ठेवत. भाद्रपद मास आलाच ! 

दोन चार दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाची गोड चाहूल होतीच ! त्याची तयारी पण चालू झाली. गणेश मूर्ती ठरवण्यासाठी कुंभार वाड्यात नेहमीप्रमाणे हेलपाटे. पण आनंदाचे ! मूर्तिकाराला अनेक सूचना, रंगसंगतीचा सल्ला ! तो पण हो दादा हो ! अगदी सालाबादप्रमाणेच, तुमचा बाप्पा सजवून तुम्हाला सुपुर्द करतो ! काळजी सोडाच ! सकाळी लवकरच येणार ना. बाप्पाला न्यायला ! 

होय महादू नक्कीच लवकर येणार, नन्तर मग गर्दी खूप वाढते. महादू कुंभार हा अख्या गावातील एकमेव मूर्तिकार ! पण अव्वल दर्जाचा कलाकार. दादांचा स्वभाव त्याला माहित होताच ! गणेशोत्सव व गणपती बाप्पाची मूर्ती ह्यात प्रत्येकाच भाव विश्व गुंतलेलं असतच ! 

आले आले म्हणत, बाप्पा वाजत गाजत आले.

घरोघरी बाप्पा विराजमान पण झाले. त्यापूर्वीच आरास, सजावट मखर आणि घरातील पण रंग रंगोटी झालेली ! रोज नवीन पक्वान्न, आरत्या, मंत्रपुष्पांजलीची चढाओढ रात्री चक्री भजन. दिवसभर फटाक्यांची आतषबाजी ! गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौराई आणि गणेश भोजन उर्फ मोठा नैवेद्य. हो त्याच दिवशी राधा अष्टमी चा योग असतो.

त्यातच श्रावण मासात राहिलेली सत्यनारायण पूजा.

दिवस कसे सरले ते कुणालाही कळलं नाहीच !

आणि तो दिवस येऊन ठेपला ! नको नकोसा वाटणारा ! 

आज अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पा येऊन दहा दिवस कसे सरले ते कळलंच नाही. ह्या दहा दिवसांत घर कस भरभरून गेल्याच जाणवत होतं. वर्षातील अपूर्वाई तर होतीच. रोज नवविध पक्वान्न, पूजा, आरती, मंत्रपुष्पांजली, कस सगळं साग्र संगीत चाललं होतं. आज शेवटचा दिवस, मनाला हुरहूर लागली होतीच. आज गणपती बाप्पाच विसर्जनकाल येऊन ठेपला होता. गुरुजींची वाट बघत दादा उभे होते.

गुरुजी लवकर येउ नयेत अस वाटत होतं.

 जरा अंमळ चार वाजताच गुरुजी आले, घरी पण सर्व तयारी झाली होतीच, गुरुजी नी गडबड केली, चला अजुनी वरच्या आळीत जायचं आहे.

 तस दादांनी मुकटा सोहळ नेसल व बाप्पाची आता बाप्पासमोर आरती करण्यासाठी उभा ठाकले आरत्या झाल्या, मंत्रपुष्पांजली झाली. पंच खाद्य तसेच दहीभात पाट वड्या, कडबोळी इत्यादी प्रसादाचा नैवेद्य झाला.

 गुरुजींनी अक्षता हातात घेतल्या 

 ।।”यांतु देवागणांनाम सकळ पुर्वमादाय 

 इच्छित कामना सिद्धर्थम

 पुनरागमनायच ” ।।

 अस मंत्र म्हणुन अक्षता “श्री मुर्ती “वर टाकल्या तस डोळ्यात टचकन पाणी आलं, सर्वांचे डोळे ओले झाले, पाट रिकामा होणार, केलेला थाट आरास निर्माल्यागत होणार. घर ओकबोक वाटु लागणार होतं पण नाइलाज होता.

 मंडळी वर्षातुन एकदा बाप्पा येणार दहा दिवस राहणार, कोड कौतुक करून घेणार व बघता बघता दहा दिवस कसे निघुन गेले ते कळतच नव्हते. दहा दिवसांत घर कस भरलेलं वाटत होतं, रोज नवीन पक्वान्न, नैवेद्य आरती, मंत्रपुष्पांजली जागर इत्यादी गोष्टींची रेलचेल. जगण्याचा एक एक क्षण सोहळाच! शिकवत होता.

बघा मंडळी जे जे पार्थिव आहे ते ते विसर्जित होण्यासाठीच!! मग बाप्पा असो वा तुम्हींअम्ही, सकळ पशु पक्षी, चराचर पार्थिव च की ! पार्थिव म्हणजे काय ? 

तर जे जे पंचभुताने निर्मित ते ते सर्व पार्थिव. ह्या नियमात सर्व सजीव श्रुष्टी आलीचकी म्हणजे एक ना एक दिवस आपलं पार्थिव शरीर सोडुन आपणास पण गेले पाहिजेच ! 

विसर्जन आपलं पण होणारच हे त्रिकालाबाधित सत्य ! बाप्पाचं अनंत चतुर्दशी ही तिथी ठरलेली आहे. तस तुमची आमची तिथी ठरलेली नाही ! ते सर्व बाप्पाच्या हातात !

एक ना एक दिवस आपल्याला विसर्जित व्हावं लागणार ! श्रुष्टी नियमच आहे तो. जुनी पान गळुन पडणार नवीन पालवी येणार, जसा वसंत ऋतु येतो तसाच ग्रीष्मही येतो

हीच निसर्गाची ख्याती आहे. 

पान फुल फळ मोहर काही झाड, याना पण विसर्जित व्हावं लागतच की, विविधरंगी फुल उमलतात, विविध गंध ते देतात, फळात रूपांतर झाले की आपलं अस्तीत्व ते फळात ठेऊन बाजुला होतात. नवीन रोप त्याच बहरण, त्याच अस्तीत्व, वयात आलं की कळी ते फुल, फुल ते निर्माल्य त्याचा गंध शेवटी मातीत पार्थिव रुपात विसर्जित होतो. हेच तर श्रुष्टी चक्र आहे, मग गणपती असो व इतर तुम्ही आम्ही सजीव ! 

हो पण गम्मत अशी आहे की, मन व आत्मा हे अविनाशी, ते परत सृष्टीत अनेक रुपात पुनर्जन्म घेतात च की !

गीतेत श्रीकृष्ण म्हणतात

 “पुनरपि जननं पुनरपि मरण म ।

पुनरपि जननी जठरे शयनम”।।

 याचाच अर्थ “

।।” इच्छीत कामांना सिद्धर्थम पुनरागमना यच ” ।।

पार्थिवं शरीर जन्म घेणे व परत मरणे व परत पुनर्जन्म घेणे ! हाच सृष्टी चक्राचा नियम मग तो कोणी ही असो. तुम्हाला आम्हाला चुकलेल नाही, हेच गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्याने बाप्पाला सांगायचं असत ! अस नाही का वाटत तुम्हाला ? 

 

म्हणूनच मला ह्या तत्वावर काव्य सुचलं ते तुम्हाला कस वाटलं, विचार योग्य आहेत का ते जरूर कळवा..

☆ विश्व चक्र ☆

असेन मी नसेन मी 

सुगंध जतन करेन मी

कोण मी कोण तु ? 

फुल मी पान तु 

बहरू सदैव चराचरी

 

निर्माल्य मी निर्माल्य तु

येता ग्रीष्म हा ऋतु

मिसळु चैतन्य नवे

होऊन माती श्रांत तु

 

थेंब थेंब बरसता

नवं संजीवनी वर्षा ऋतु

फुटून येऊ पानोपानी

फळ मी पान तु

 

सृजनशील गीत गात

नवजन्माने मग परतु

असेन मी असशील तू

सुगंध कुपी देशील तू

 “पुनरागमनायच”

… हाच संदेश आपल्याला बाप्पाकडुन घ्यायचा आहे 

अस नाही का वाटत तुम्हाला ! 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ११ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ११ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

श्रावण

श्रावण आणि बालपण यांचं अतूट नातं आजही माझ्या मनात मी जपलेलं आहे. आम्ही एका गल्लीत राहत होतो. ज्या गल्लीत एकमेकांना चिकटून समोरासमोर घरं होती आणि तो असा भाग होता की एकमेकांना लागून आजूबाजूलाही अनेक लहान मोठ्या गल्ल्याच होत्या. कुठल्याही प्रकारचं सृष्टी सौंदर्याचं वातावरण तेथे नव्हतंच म्हणजे श्रावणातली हिरवा शालू नेसलेली अलंकृत नववधूच्या रूपातली धरा, श्रावणातलं ते पाचूच बन, मयूर नृत्य असं काही दृश्य आमच्या आसपासही नव्हतं. फारतर कोपर्‍यावरच्या घटाण्यावर हिरवं गवत मोकाट वाढलेलं असायचं. आमच्या घराच्या मागच्या गॅलरीतून खूप दूरवर धूसर अशी डोंगरांची रांग दिसायची आणि वर्षा ऋतूत त्या डोंगरावर उतरलेलं सावळं आभाळ जाणवायचं.

श्रावणातल्या ऊन पावसाच्या वेळी आकाशात उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य मात्र आम्ही डोळा भरून पाहायचो. लहानपणी आम्हाला श्रावण भेटायचा तो तोंडपाठ केलेल्या बालकवी, बा. भ. बोरकर, पाडगावकर यांच्या कवितांतून. नाही म्हणायला काही घरांच्या खिडकीच्या पडदीवर कुंडीत, किंवा डालडाच्या पत्र्याच्या डब्यात हौशीने लावलेली झाडं असायची. त्यात विशेष करून झिपरी, झेंडू, सदाफुली, तुळस, कोरफड, मायाळू क्वचित कुणाकडे गावठी गुलाबाच्या झाडावर गुलाब फुललेले असायचे. गल्लीतलं सारं सृष्टी सौंदर्य हे अशा खिडकीत, ओसरीवर पसरलेलं असायचं. ज्या घरांना परसदार होतं त्या परसदारी अळूची पानं, कर्दळ, गवती चहाची हिरवळ जोपासलेली असायची पण मुल्हेरकरांच्या परसदारी मात्र मोठं सोनचाफ्याचं झाड होतं ते मात्र श्रावणात नखशिखान्त बहरायचं त्या सोनचाफ्याचा सुगंध सर्वत्र गल्लीत दरवळयचा. या दरवळणाऱ्या सुगंधात आमचा श्रावण अडकलेला असायचा. या सुवर्ण चंपकाच्या सुगंधात आजही मला बालपणीचा श्रावण कडकडून भेटतो.

श्रावणातील रेशीमधारात मात्र आम्ही सवंगडी मनसोक्त भिजलोय. “ये ग ये ग सरी माझे मडके भरी” नाहीतर “येरे येरे पावसा तुला देतो पैसा ” ही धम्माल बडबड गीतं पावसाच्या थेंबांना ओंजळीत घेऊन उड्या मारत गायली आहेत. गल्लीतले रस्तेही तेव्हा मातीचे होते. पावसात नुसता चिखलच व्हायचा. चिखलाचं पाणी अंगावर उडायचं. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतानाचा तो बालानंद अनुभवला. श्रावणातली हिरवळ आमच्या मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यात अशा रितीने बहरायची. आमच्या मनातला श्रावणच पाचूचं बन होऊन उतरायचा. एकीकडे ऊन आणि एकीकडे पाऊस.. “आला रे आला पाऊस नागडा” करत मस्त भिजायचे.
संस्कार, परंपरा, त्यातली धार्मिकता, श्रद्धा, त्यामागचं विज्ञान, हवामान, ऋतुमान, विचारधारा या सर्वांचा विचार करण्याचं आमचं वयच नव्हतं. श्रावणातले सगळे विधी, सण सोहळे, पूजाअर्चा, व्रतं, उपवास हे आमच्यासाठी केवळ आनंदाचे संकेत होते आणि गल्लीत प्रत्येकाच्या घरी कमी अधिक प्रमाणात ते साजरे व्हायचेच.

माझे वडील निरीश्वरवादी होते असं मी कधीच म्हणणार नाही पण आमच्या कुटुंबात काही साजरं करण्यामागे कुठलाही कर्मठपणा नसायचा, सक्ती नसायची पण श्रावण महिना आणि त्यात येणारे बहुतेक सर्व सण आमच्या घरात आनंदाने साजरे व्हायचे. आज हे सगळं आठवत असताना माझ्या मनात विचार येतो की अत्यंत लिबरल, मुक्त विचारांच्या कुटुंबात, कुठल्याही कठीण नियमांना बिनदिक्कत, जमेल त्याप्रमाणे अथवा सोयीप्रमाणे फाटे फोडू शकणाऱ्या आमच्या कुटुंबात श्रावण महिन्याचं त्या अनुषंगाने येणाऱ्या रितीभातींचं उत्साहात स्वागत असायचं आणि या पाठीमागे आता जाणवते की त्यामागे होतं पप्पांचं प्रचंड निसर्ग प्रेम ! निसर्गातल्या सौंदर्याचा रसिकतेने घेतलेला आस्वाद आणि जीवन वाहतं रहावं म्हणून केलेला तो एक कृतीपट होता. धार्मिकतेचं एक निराळं तत्त्व, श्रद्धेच्या पाठीमागे असलेला एक निराळा अर्थ आमच्या मनावर कळत नकळत याद्वारे बिंबवला गेला असेल आणि म्हणूनच आम्ही परंपरेत अडकलो नाही पण परंपरेच्या साजरेपणात नक्कीच रमलो. तेव्हाही आणि आताही.

श्रावण महिन्यात घरी आणलेला तो हिरवागार भाजीपाला.. त्या रानभाज्या, ती रानफळे, हिरवीगार कर्टुली, शेवळं, भुईफोडं, मेणी काकडी, पांढरे जाम, बटाट्यासारखी दिसणारी अळू नावाची वेगळ्याच चवीची, जिभेला झणझणी आणणारी पण तरीही खावीशी वाटणारी अशी फळे, राजेळी केळी, केवड्याचे तुरे या साऱ्यांचा घरभर एक मिश्र सुगंध भरलेला असायचा. तो सुगंध आजही माझ्या गात्रांत पांघरलेला आहे.

श्रावण महिन्यातले उत्सुकतेचे वार म्हणजे श्रावणी शनिवार आणि श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारी शाळा ही अर्धा दिवस असायची. सकाळच्या सत्रात उपास म्हणून चविष्ट, खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, लिंबू पिळलेली साबुदाण्याची खिचडी आणि संध्याकाळचे सूर्यास्ताच्या थोडं आधी केलेलं भोजन. शनिवारचा आणि सोमवारचा जेवणाचा मेनूही ठरलेला असायचा. सोवळ्यात चारी ठाव स्वयंपाक रांधायचा. त्या स्वयंपाकासाठी आईने आणि आजीने घेतलेली मेहनत, धावपळ आता जाणवते.

शनिवारी वालाचं बिरडं, अळूच्या वड्या, पंचामृत, अजिबात मीठ न घालता केलेली पिवळ्या रंगाची मूग डाळीची आळणी खिचडी आणि पांढरे शुभ्र पाकळीदार ओल्या नारळाच्या चवीचे गरमागरम मोदक, शिवाय लोणचं, पापड, काकडीची पचडी हे डाव्या बाजूचे पदार्थ असायचे आणि त्या दिवशीचं वैशिष्ट्य म्हणजे हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेला हा पाकशृंगार. सभोवती रांगोळी आणि मधल्या घरात ओळीने पाट मांडून त्यावर बसून केलेलं ते सुग्रास भोजन! पप्पाही ऑफिसमधून लवकर घरी यायचे. ते आले की आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो, उदबत्तीच्या सुगंधात आणि वदनी कवळ घेताच्या प्रार्थनेत आमचं भोजन सुरू व्हायचं. आई आणि जीजी भरभरून वाढायच्या. त्या वाढण्यात भरभरून माया असायची. तसं आमचं घर काही फार मोठं नव्हतं पण झेंडूच्या फुलांनी सजलेला देव्हारा आणि भिंतीवर आणि चुलीमागे तांदळाच्या ओल्या पीठाने काढलेल्या चित्रांनी आमचं घर मंदिर व्हायचं. पप्पा आम्हाला जेवताना सुरस कहाण्या सांगायचे. एका आनंददायी वातावरणात जठर आणि मन दोन्ही तृप्त व्हायचं.

श्रावणी सोमवारही असाच सुगंधी आणि रुचकर असायचा. त्यादिवशी हमखास भिजवून सोललेल्या मुगाचे बिर्ड असायचे. नारळाच्या दुधात गूळ घालून गरमागरम तांदळाच्या शेवया खायच्या, कधीकधी नारळ घालून केलेली साजूक तुपातली भरली केळी असायची आणि त्या दिवशी जेवणासाठी केळीच्या पानाऐवजी दिंडीचं मोठं हिरवगार, गोलाकार पान असायचं. या हिरव्या पानात आमचा श्रावण आणि श्रावण मासातल्या त्या पारंपरिक पदार्थांचा सुगंध भरलेला असायचा. विविध पदार्थांचा आणि विविध फुलांचा सुगंध ! आणि या सगळ्या उत्सवा मागे कसली सक्ती नव्हती, परंपरेचं दडपण नव्हतं.. मनानं आतून काहीतरी सांगितलेलं असायचं म्हणून त्याचं हे उत्साही रूप असायचं. आमच्या जडण घडणीच्या काळात या परंपरेने आम्हाला जगण्यातला आनंद कसा टिकवावा हे मात्र नक्कीच शिकवलं. या इथे मला आताही— आमच्या वेळेचं आणि आत्ताचं— कालच आणि आजचं याची कुठेही तुलना करायची नाही. फक्त या आज मध्ये माझ्या कालच्या आनंददायी आठवणी दडलेल्या आहेत हे मात्र नक्की.

नागपंचमीला गल्लीत गारुडी टोपलीत नाग घेऊन यायचा. आम्ही सगळी मुलं त्या भोवती गोळा व्हायचो. गारुडीने पुंगी वाजवली की टोपलीतून नाग फणा काढून बाहेर यायचा. छान डोलायचा. मध्येच गारुडी त्याच्या फण्यावर टपली मारायचा. गल्लीतल्या आयाबाया नागाची पूजा करायच्या. एकाच वेळी मला भीती आणि त्या गारुड्याचं खूपच कौतुक वाटायचं.

जन्माष्टमीला आई देव्हाऱ्यातला एक लहानसा चांदीचा पाळणा सजवायची आणि त्यात सॅटीनच्या पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची वस्त्रं घातलेला लंगडा बाळकृष्ण ठेवायची. यथार्थ पूजा झाल्यानंतर आई सोबत आम्ही,

श्रावण अष्टमीला देवकी पोटी
आठवा पुत्र जन्माला आला
छकुला सोनुला तो नंदलाला
जो बाळा जो जो जो जो रे कृष्णा…

असे गीतही म्हणायचो. त्यानंतर लोणी, दहीपोह्याचा, डाळिंबाचे लाल दाणे पेरून केलेला सुंदर दिसणारा आणि असणाराही प्रसाद मनसोक्त खायचा. एखाद्या जन्माष्टमीला आम्ही कुणाकडे होणाऱ्या संगीत मैफलीलाही हजर राहिलो आहोत. रात्रभर जागरण करून ऐकलेलं ते भारतीय शास्त्रीय संगीत कळत नसलं तरी कानांना गोड वाटायचं. ताई आणि पप्पा मात्र या मैफलीत मनापासून रंगून जायचे.

मंगळागौरीच्या खेळांची मजा तर औरच असायची. कुणाच्या मावशीची, मोठ्या बहिणीची अथवा नात्यातल्या कुणाची मंगळागौर असायची. फुलापानात सजवलेली गौर, शंकराची बनवलेली पिंडी, दाखवलेला नैवेद्य, सारंच इतकं साजीरं वाटायचं !
नाच ग घुमा कशी मी नाचू
अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई
एक लिंबं झेलू बाई 

अशा प्रकारची अनेक लोकगीतं आणि झिम्मा, फुगड्या, बस फुगड्या, जातं, गाठोडं असे कितीतरी खेळ रात्रभर चालायचे. मंगळागौरीच्या आरतीने समारोप झाला की झोपाळलेले डोळे घेऊन पहाटेच्या अंधारात घरी परतायचे. या साऱ्यांमध्ये एक महान आनंद काठोकाठ भरलेला होता.

दहीकाल्याच्या दिवशी टेंभी नाक्यावरची सावंतांची उंच टांगलेली दहीहंडी बघायला आमचा सारा घोळका पावसात भिजत जायचा. यावर्षी कोण हंडी फोडणार ही उत्सुकता तेव्हाही असायची पण पैसा आणि राजकारण याचा स्पर्श मात्र तेव्हा झालेला नव्हता.

राखी पौर्णिमेला तर मज्जाच यायची. बहीण भावांचा हा प्रेमळ सण आम्ही घरोघरी पहायचो पण आम्हाला भाऊ नाही याची खंत वाटू नये म्हणून स्टेशनरोडवर राहणारी आमची आते भावंडं आवर्जून आमच्या घरी राखी बांधून घ्यायला येत. गल्लीतल्याच आमच्या मित्रांनाही आम्ही राख्या बांधलेल्या आहेत. मी तर हट्टाने पप्पांनाच राखी बांधायची. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणूनच ना राखी बांधायची मग आमच्या जीवनात आमचं रक्षण करणारे आमचे बलदंड वडीलच नव्हते का? त्या अर्थाने ते दीर्घायुषी व्हावेत म्हणून मी त्यांना राखी बांधायची. माझ्यासाठी मी रक्षाबंधनाला दिलेला हा एक नवीन अर्थ होता असे समजावे वाटल्यास.. याच नारळी पौर्णिमेला आम्ही सारे जण कळव्याच्या खाडीवर जायचो. खाडीला पूर आलेला असायचा. समस्त कोळी समाज तिकडे जमलेला असायचा. घट्ट गुडघ्यापर्यंत नेसलेलं रंगीत लुगडं, अंगभर सोन्याचे दागिने आणि केसात माळलेला केवडा घालून मिरवणाऱ्या त्या कोळणी आजही माझ्या नजरेसमोर आहेत.

समिंदराला उधाण आलंय
सुसाट सुटलाय वारा
धोक्याचा दिला इशारा
नाखवा जाऊ नको तू दर्याच्या घरा..

अशी गाणी गात, ठेक्यात चाललेली त्यांची नृत्यं पाहायला खूपच मजा यायची. आम्ही खाडीत नारळ, तांब्याचा पैसा टाकून त्या जलाशयाची पूजा करायचो आणि एक सुखद अनुभव घेऊन घरी यायचो. घरी सुगंधी केशरी नारळी भात तयारच असायचा. तेव्हा जाणवलं नसेल कदाचित पण या निसर्गपूजेने आम्हाला नेहमीच निसर्गाजवळ ठेवलं असावं.
श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. दिवे अमावस्यानंतर श्रावण सुरू होतो आणि पिठोरी अमावस्येला तो संपतो. अंधाराकडून प्रकाशाकडे— हेच ते तत्त्व. तो असतो मातृदिन.

आमची आई देवापाशी बसून डोक्यावर हिरव्या पानात केळीचे पाच पेटते दिवे घेऊन आम्हाला विचारायची, “अतित कोण?”

मग आम्ही म्हणायचो, “मी”

असं आई चार वेळा म्हणायची आणि पाचव्या वेळी विचारायची, “सर्वातित कोण ?”

तेव्हाही आम्ही म्हणायचो, “मी”

काय गंमत असायची ! माय लेकीतल्या या तीन शब्दांच्या संवादाने आम्हाला जीवनात एकमेकांसाठी कायमस्वरूपी प्रेम आणि सुरक्षितताच बहाल केली जणू.

सर्वात हृद्य सोहळा असायचा तो माझी आजी डोक्यावर दिवा घेऊन पप्पांना विचारायची “अतित कोण?” तेव्हांचा. सोळाव्या वर्षापासून वैधव्यात काढलेल्या तिच्या उभ्या जन्माची एकमेव काठी म्हणजे आमचे पप्पा. आईच्या हातून दिवा घेताना पप्पांचे तेजस्वी डोळे पाणावलेले असायचे. तिच्या सावळ्या, कृश, कायेला त्यांच्या बलदंड हाताने मीठी मारून ते म्हणायचे,

“सर्वातित मीच”

या सर्वातित मधला श्रावण मी कसा विसरेन आणि कां विसरू ?

क्रमशः भाग अकरावा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समर्थशिष्या- संत वेण्णाबाई – लेखिका : सुश्री विजयश्री तारे जोशी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

समर्थशिष्या- संत वेण्णाबाई  लेखिका : सुश्री विजयश्री तारे जोशी ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेणा स्वामिनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केश संभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवे साठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राब राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.

ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.

चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नाम स्मरण करा असे सांगितले.

विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.

समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.

समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.

त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगावेगळी शिष्या 

जय जय रघुवीर समर्थ 

लेखिका : विजयश्री तारे जोशी, कोल्हापूर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणसाची ओळख… लेखक – अज्ञात  ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 माणसाची ओळख… लेखक – अज्ञात  ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो, ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते.

माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी. अर्थात या पासिंग फेजेस असतात. त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही. आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा !

पण तरीही, फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये.

माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे. माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही.

प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच. पण त्या सगळ्या अडचणींवर, कसोट्यांवर मात करून अखेरपर्यंत आपल्या सोबत उरतात….. ती खरी आपली माणसं. ज्यांचे हात उगीचच निसटले ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं.

रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं आणि प्रत्येकवेळी तसा हट्टही आपण करायचा नसतो. निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त.

ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची. ऊस काढताना कोयत्याने पाचट सोलून काढतात, तशी माणसांची निवड करत रहावी लागते कायम. सरावाने ‘ओरिजिनल’ माणसं ओळखू येतात आपल्याला. भले ती चुकत असतील लाखदा, पण आपला हात सोडून जाणार नाहीत, त्यांची आपल्यावर असलेली माया कदापि आटणार नाही.

अशी चांगली माणसंही असतात आपल्या आयुष्यात अनेक…. ती मात्र जपायला हवीत.

काही लोकांसाठी आपण केवळ ‘सोय’ असतो. ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात, गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात. आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली ते माणूस जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं, तो क्षण फार फार दुखरा असतो.

जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला…. नाही असं नाही. पण कोणावर विश्वास टाकायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला ठरवावंच लागतं. नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन बावळटपणा ठरू शकतो.

माणसं जोखणं जमायलाच हवं. समोरच्या माणसाचं ‘असत्य’ रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते. खोटंनाटं, उलटंपालटं बोलून-वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं. त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात. मग तर त्यांची कीव येते अक्षरशः….. का वागत असतील माणसं अशी? स्वतःसह इतरांना का फसवत असतील?

ज्यांच्याशी अगदी पटतच नाही, त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं. कटुता आणून, खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत. झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं, तितकी सहजता आपल्यात असावी. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रत्नमंजुषा – – ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

रत्नमंजुषा – – ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

लहानपणीच्या आठवणींत वडिलांच्या बदल्या, सामानसुमानाची त्यांची आवराआवर, मित्रमैत्रिणींची ताटातूट, परिसराचं हरवणं यांनी फार मोठा भावबंध निर्माण केलेला आहे. तेरेखोल ते दाभोळपर्यंतचा समुद्रकिनारा, कोल्हापूरजवळचं वडगाव, पंढरपूरजवळचं मंगळवेढा या सर्वांवर स्मृती-विस्मृतीची छाया धरते आणि फक्त आठवते ती बदलीच्या सामानात पुस्तकांसाठी झालेली वडिलांची कासाविशी आणि संसारातल्या वस्तूंसाठी आईची घालमेल.

काचसामान फुटेल म्हणून वडील कुणातरी शिपायाकडे ते सुपूर्द करीत. सुंदरसा पाळणा गरजूकडे रवाना होई. भांडीकुंडी ओझं होतं म्हणून भेटीदाखल दिली जात. त्यांची भाराभर पुस्तकं मात्र ट्रंकेत रचली जात. मोठा ग्रामोफोन बडे गुलाम अली खाॅंसाहेबांच्या ‘याद पियाकी आये’ सह आम्हाला जागवणाऱ्या-झोपवणाऱ्या लता मंगेशकरांच्या ‘रघुनंदन आले आले’ किंवा ‘दिलसे भुला दो तुम हमें’ सह काळजीपूर्वक बांधला जात असे आणि पुढची मजल गाठण्यासाठी आमचा प्रवास सुरु होत असे. कालांतराने रेकॉर्ड्सची जागा रेडिओनं घेतली; पण पुस्तकांचं ओझं मात्र वाढत गेलं.

प्रपंचाचे तडाखे झेलत त्यांनी पुस्तकाचा लहानसा संसार उराशी जपला; सरकारी व्हिक्टोरियन बंगल्यातून भाड्याच्या घरात आत्मीयतेनं सांभाळला. दर वर्षी चैत्रात गच्चीत पसरून ऊन देणं, झटकणं, नवीन कव्हर घालणं, खळ लावून नीटनेटकी करणं, नाव घालणं, त्यांची सूची करणं, त्यांना बांधून ठेवणं आणि त्याचा मनमुराद वापर करणं, देखभाल करणं- हा त्यांचा नित्यक्रम असे.

पुढे कळत्या वयात मला संग्रहाच्या अंतरंगाची थोडी ओळख झाली. त्याचं आकर्षण वाचनाबरोबर वाढत गेलं. मग मला त्यांच्याजवळचं थॉमस केम्पीचं ‘द इमिटेशन ऑफ ख्राइस्ट’, जे. कृष्णमूर्तींचं ‘नोटबुक’ ‘बृहद्स्तोत्ररत्नाकर’ ‘नवनीत’, ‘महाराष्ट्र सारस्वत’, दाते-कर्वे यांचे कोश, लाला हरदयालांचं चरित्र नेहमी हवं असे. शब्दार्थकोश, सुवचनांचे कोश, औषधी बाड; वाग्भट, सुश्रुत यांचे ग्रंथ -अशी सूची संपत नसे. आपले व्यक्तिगत खर्चाचे कोणतेही आडंबर न माजवता त्यांनी हळूहळू जमवलेली ग्रंथसंपदा… मी मात्र त्यावर डोळा ठेऊन असे. त्यांच्या पुस्तकांची मालकी मीच मिरवीत असे. मग ते पुस्तक कुठे गेलं म्हणून शोधत राहत असत. हा पुस्तकांचा लपाछपीचा खेळ त्यांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे थांबला. आता ती सारी पुस्तकं मूकपणे माझ्या स्वाधीन झालेली आहेत. हारीनं कपाटात उभी आहेत आणि विखरून गेलेल्या मलाच सावरीत आहेत. माझीच देखभाल करीत आहेत.

त्यांच्या संग्रहातलं एक पुस्तक मी विशेषकरून वाचते, चाळते, नेहमी जवळ ठेवते. श्रीधर श्यामराव हणमंते यांनी संपादित केलेला अभिनव असा ‘संख्या संकेतकोश’ मला प्रिय झालेला आहे. ‘संख्या संकेत’ कोशात संख्येत सांगितलेलं ज्ञान आहे. या लेखकाने प्रयत्नपूर्वक कणाकणानं टिपून मिळवलेली माहिती आणि त्याचं संकलन म्हणजे अद्भुत, रोमांचकारी असा ठेवा आहे. शून्यापासून अब्जापर्यंत संख्येशी संकेतानं जोडलेल्या माहितीचा हा साठा म्हणजे जिज्ञासू, ज्ञानार्थींना अनमोल खजिना वाटेल. सामान्यांना हवाहवासा वाटेल, असा आहे. बहात्तर यक्षप्रश्न, नव्वद रामायणं, बावीस श्रुती, सोळा शृंगार, चौसष्ट योगिनी, एकोणपन्नास मरूदगण, अष्टनायिका, अठरा पुराणं, महाभारताची पंच्याण्णव उपपर्व, एकशेआठ उपनिषद, अठरा अक्षौहिणी दळभार, चंद्राच्या षोडषकला, चौदा विद्या, मराठ्यांची शहाण्णव कुळं, शंभर कौरवपुत्र… असे कितीतरी तपशील त्यात आहेत. वेद, पुराणं, योगवसिष्ठ, भगवद्गीता, यांच्यासारखे धर्मग्रंथ, महाकाव्यं, चरित्रग्रंथ यांमधून; तसेच नियतकालिकांमधून संग्रहित केलेला हा प्रचंड लेखाजोखा विस्मयकारक आहे. त्यात ज्ञानाचे, संस्कृतीचे, परंपरेचे, शास्त्रांचे, तंत्राचे, मानवी स्वभावाचे, प्रपंच आणि परमार्थाचे, व्यवहारज्ञानाचे किती तरी प्रवाह वाहताना दिसतात. त्यातलं कुतूहल संपतच नाही. प्रत्येक पानागणिक नाविन्याचं नवं दालन उघडत राहतं आणि संख्या संकेतांकोशाशी मैत्र जुळते. त्यात मला खूप नवीन शब्द मिळाले, संज्ञा कळल्या, अर्थ लाभले. त्याबद्दल किती सांगावं?…….

… “चार गोष्टी एकत्र असणं नवरदेवाच्या भाग्याचं – वधू ज्येष्ठ कन्या असणं, अल्पवयीन मेहुणा असणं, सासूबाई स्वतंत्र बाण्याच्या आणि सासरे सदैव प्रवासावर. या सर्व गोष्टी एकत्र असणं जावयाच्या भाग्याच्या होत. ” 

… ” दहा गोष्टी व्यवहारात वर्ज्य- चाकर – गर्विष्ठ, मुलगा- अति लाडका, शत्रू- कपटी, विद्वान-स्तुतिपाठक, रोगी-पथ्य न करणारा, गायक – मानी ” 

… “त्रयोदशगुणी विडा – पान, सुपारी, चुना, कात, लवंग, वेलदोडा, जायफळ, जायपत्री, कंकोळ, केशर, खोबरं, बदाम आणि कापूर या तेरा जिनसा मिळून केलेला विडा.”

… ” आठ प्रमुख कारागीर ताजमहालाचे – अमानत खाॅं शिराजी -कंदाहार, इसा गवंडी -आग्रा, पिरा सुतार-दिल्ली, बन्नुहार, जातमल्ल, जोरावर (नक्षीकाम करणारा), इस्माईल खान रुमी (घुमत बनवणारा), रामलाल- काश्मिरी बाग करणारा… ” 

… “आठ शब्दांमागे ‘महा’ हे विशेषण निषिद्ध. जसे- शंख, तैल, मांस, वैद्य, ज्योतिषी, ब्राह्मण, यात्रा व निद्रा या आठ शब्दांमागे; ‘महा’ विशेषण उपयोगात आणू नये. त्याचा विपरीत अर्थ होतो. उदा. महानिद्रा म्हणजे चिरनिद्रा. “

असं कितीतरी मनोरंजक, माहितीपर ज्ञानवर्धक असं पानोपानी विखुरलेलं आहे. वाचता-वाचता दोन पुराणकालीन बल्लवाचार्यांची नावं मिळाली- नल राजा व भीम यांची. आणि गोड, स्वादिष्ट उंची पक्वान्नांना नळपाक आणि तिखट, तामसी पदार्थांसाठी भीमपाक अशा संज्ञा आहेत, ही देखील माहिती मिळाली. वसतिस्थानांच्या देवतांबद्दल- अष्टवसूंबद्दल संख्या संकेतकोश सांगतो- ‘आप-निर्मल जल, अनिल-मोकळी हवा, प्रभास-भरपूर प्रकाश, प्रत्यूष -उषेचं दर्शन, ध्रुव-दिशासूचन, सोम-चंद्रभोगी अंगण, धरा-टणक जमीन आणि पावक म्हणजे अग्निहोत्राची सोय- या आठांविना वसतिस्थानाला शोभा नाही… ‘ 

आपल्या पूर्वजांच्या वास्तूच्या संकल्पनेचं अष्टदल माझ्यासमोर तर उलगडलंच ; पण त्यातील एका संकल्पनेपाशी मन क्षणभर थांबलं… ‘चंद्रभोगी अंगण… ‘ अन मग मी हरखले. थांबलेलं मन कल्पनेच्या अवकाशात भरारी घेऊ लागलं. चंद्रभोगी अंगण… गुजगप्पा, साईसुटयोचा खेळ, रातराणी किंवा पारिजातकाच्या गंधाने अडवलेला छोटासा कोपरा… जमिनीच्या तुकड्यानं बहाल केलेल्या अंगणाच्या संकल्पनेवर चंद्रभोगी शब्दानं धरलेली चंद्रप्रकाशाची किमया पाहून मन थरारलं. पुस्तकातल्या ज्ञानाच्या, माहितीच्या खजिन्याला- रुक्मिणीच्या तुळशीदळानं जसं तुळियेलं, तसं त्या खजिन्याला या एका शब्दानं पारडं जड करून अक्षरश: तोलून धरलं… अंगणात विहार केलेल्या बालपणानं – तारुण्यानं, संध्याछायेनं चंद्रभोगी अंगणापाशी थबकून चांदण्याचं लेणं ल्यालं. देता आलं, तर पुढच्या पिढीला चंद्रभोगी अंगणाचं आंदण द्यावं…

… या कोशानं मला दिलेला हा शब्द- ‘चंद्रभोगी अंगण’ मी आपलासा केलेला आहे. जपलेला आहे. मिरवलेला आहे. त्यानं दिलेला दिलासा, सांत्वन मी अनुभवते. ही माझी रत्नमंजुषा आहे. खूप-खूप रहस्यमय गोष्टींची सुरसकथा आहे. जगाच्या अगाध ज्ञानाची छोटीशी खिडकी आहे. पानोपानी विखुरलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वेबसाइट्स आहेत. मजसारख्या संगणक- निरक्षर व्यक्तीसाठी उघडलेल्या अक्षय्य ज्ञानदालनासाठी या ग्रंथातलं पान न पान सज्ज आहे. मूकपणे माझ्यासाठी कधीही तत्पर असलेल्या पुस्तकानं एकाकी वाटचालीतल्या खाचखळग्यातून मला सावरलेलं आहे. क्वचित चंद्रभोगी अंगणाची बिछायत माझ्यासमोर उलगडते. चांदण्यांची ओढणी अस्तित्वावर लहरते.

…वडिलांच्या चंद्रमौळी घरात छत पाझरत असताना वडिलांचे भिजलेले डोळे आठवतात. आमच्यावर आणि पुस्तकांवर पांघरूण घातलेलं स्मरतं. त्या सर्वांचा खोल अर्थ सांगण्यासाठी ‘चंद्रभोगी अंगण’ धावून येतं… 

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तांदळाचे दगाबाज मोदक – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ तांदळाचे दगाबाज मोदक – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

आत्तापर्यंत 1760 रीळं पाहून आणि शंभर रेसिप्या वाचून उकडीचे मोदक म्हणजे हातचा मळ वाटू लागले. मग डी मार्टमधून तांदळाचं पीठ आणलं. उकळत्या पाण्यात चमचाभर गावरान तूप आणि मीठ घातलं. चमच्याने हलवून तांदळाचं पीठ कालवलं. झाकून ठेवलं. कोमट झाल्यावर परातीत काढून हाताने मळलं. गोळ्यावर पातेलं पालथं घालून ठेवलं.

नारळ फोडण्याचे विविध विधी.

आधी नारळाच्या सगळ्या शेंड्या काढून त्याखाली त्याचे जे दोन डोळे आणि ओठ असतात ते मोकळे केले. नारळाच्या तोंडात सुरी घालून गोल फिरवली. नारळाचं पाणी चहाच्या गाळणीने पातेल्यात गाळून घेतलं. मग ओट्यावर नारळ धरून लाटण्यानं मारलं. मग बाल्कनीच्या कठड्याच्या भिंतीवर नारळाला आपटलं. मग जाड्या कडप्प्यावर धरून आपटलं. मग जिना उतरून खाली गेले आणि पेवमेंट ब्लॉकवर नारळ ठेवून वरून दगडाने ठोकलं.

हातोडी, दगड, उलथने, सुरी, लाटणे सर्व हत्यारांच्या मदतीने नारळाचे सविस्तर विच्छेदन केले. मग कुणीतरी सांगितल्यानुसार खोबरे सहजपणे निघावे म्हणून नारळाचे तुकडे गॅसवर ठेवले.

करवंटीवरचे उरलेसुरले धागे जळू लागले आणि चमत्कारिक वास सुटला. भयंकर हिंसाचारानंतर नारळाचे तुकडे ताटात पडले.

माझ्याकडे नारळाची खोवणी नाही. खोवणी हा शब्द मला खोबणी या शब्दासारखा वाटतो. आणि मला डोळ्याच्या खोबणीत सुरी घालायची भीती वाटते; त्यामुळे मी ती खरेदी करत नाही

त्यामुळे चाकूने नारळाच्या पाठीवरचे कडक सालटे सोलून काढले. मग ते गुळगुळीत पांढरे खोबरे किसणीवर बारीक किसून घेतले. त्यात गूळ, विलायचीचा चुरा, जायफळाचा किस घालून जाड बुडाच्या कढईत शिजवले.

त्यानंतर पातेल्याखाली दडवलेला पांढरा गोळा बाहेर काढला. हाताला तूप लावून त्यातला छोटा गोळा घेतला. तो हातावर थापतानाच कडेने फाटू लागला. त्याला मऊ पण यावा म्हणून त्यात दूध आणि साय घातली. तर ते जास्तच पातळ झालं. लाटता लाटता तुटू लागलं. मग ते विसविशित, भुसभुशीत द्रव्य हातावर धरून थापटून थापटून चपटं केलं. मध्यभागी दाबून त्याच्यात नारळाचे सारण भरावे म्हणून चमचा सारणाच्या कढईत घातला तर सारण दगडासारखे कडक होऊन बसले होते.

मग हातातली पुरी बाजूला ठेवून सारणात दूध आणि साय घातली. पुन्हा एकदा गॅसवर ठेवून हलवा-हलवी सुरू केली. सारण पातळ दिसू लागलं. मग त्यावर बाजारातून आणलेला खोबऱ्याचा चुरा टाकला. पुन्हा एकदा हलवून घेतलं. थोडं मऊ झाल्यानंतर एका चमच्याने ते पुरीवर ठेवले. पण ते गरम असल्यामुळे पुरी चिकटली नाही. कडक सारणामुळे ती फुटू लागली. काही केल्या सारण आणि पारी एकत्र नांदायला तयार होईनात.

एका बाईप्रमाणे मोदकाला कळ्या पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण कळ्या तुटून हातात येऊ लागल्या. आता या कळ्यांचा हार करून गणपतीच्या गळ्यात घालावा की काय असे वाटू लागले. मोदकाची पारी लाटेपर्यंत सारण पुन्हा-पुन्हा कडक होऊ लागले. मला वस्तूच्या आकाराचा मोह नाही पण वस्तूला कुठलातरी एक आकार तर दिला पाहिजे की नाही…. पण मोदक कुठलाच आकार धरायला तयार होत नव्हते.

आता पारीच पाहू का सारणाचं पाहू…. असं करता करता “एक तरफ उसका घर एक तरफ मैकदा… ” अशी अवस्था झाली. मग गमे जिंदगीतून सुटका मिळवण्यासाठी मी एका ताटाला तूप लावलं. आणि पुन्हा एकदा सारण गरम करून पटकन ताटात ओतलं आणि बाळाला झोपवण्यासाठी घाई-घाईने थोपटावं तसं थापलं. सुरेख नारळी वड्या तयार झाल्या. पांढऱ्या पिठाच्या पातळ पातळ भाकरी थापून भाजल्या. अशाप्रकारे भाकरी आणि नारळी वड्या असे दोन उपपदार्थ तयार झाले.

ज्या बायका कळीदार मोदक तयार करतात त्यांनी छान छान व्हिडिओ टाकून आम्हाला नादी लावू नये ही नम्र विनंती. तुम्ही तुमच्या घरात करून खा की. आम्हाला का मनस्ताप मोगरा जाई जुई च्या कळ्यांचा गजरा करून डोक्यात घालावा हार करून गणपतीच्या गळ्यात घालावा पण शहाण्या बाईने मोदकाच्या कळ्यांच्या नादी लागू नये.

लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सुखाची जत्रा…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “सुखाची जत्रा…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

गोष्ट मे महिन्यातील आहे. रविवारचा दिवस होता. सकाळी सकाळी नऊ वाजता बायकोला घेऊन भाजी आणायला गावात चाललो होतो. मोटारसायकलवर आम्ही निघालो होतो… आणि हिने मागून बडबड सुरु केली.

“जरा जीवाला चैन नाही माझ्या. जरा जरा म्हणून काही चव नाही आयुष्यात. नुसतं घर घर करून जीव आंबून चाललाय.” 

मी गाडी थांबवून म्हणलं “काय झालं सकाळी सकाळी. का चिडली आहेस.?”.. तर हिचे डोळे भरलेले.

मी परत विचारलं, “ बोल काय हवंय तुला.. ?” भेळ पाणीपुरी तिला आवडतं. म्हणलं “ खायची का भेळ.. ?” तर म्हणाली “हितं खाऊन काय करू.. ?” 

मी म्हणलं “ मग कुठ खायची आता..? “ 

तर म्हणली, “ पुण्याच्या सारसबागेत नवऱ्यासोबत भेळ खायची माझी लै इच्छा होती आयुष्यात. पण तुम्ही सतत कार्यक्रमात. सतत चळवळीत. आता पोरं पण मोठी व्हायला लागली. सगळा रंगच गेला माझ्या आयुष्यातला. चला वांगी घेऊ भरलेली वांगी करते.”

मी किक मारली. गाडी सुरू केली. ती मागे बसलेली होती. गाडी सरळ एस. टी. स्टँडवर आणली. पार्किंगमध्ये गाडी लावली. तसं ही म्हणाली, “ इकडं कशाला आणलं.?” मी शांतपणे म्हणलं “आता काहीच बोलू नकोस. माझ्या सोबत शांतपणे चल. ” पोरं घरात होती. त्यांना सुट्ट्या सुरू होत्या. आई वडील असल्यामुळे पोरांची चिंता नव्हती.

समोर कवठेमहांकाळ ते स्वारगेट ही साडेनऊची एस. टी. उभी होती. मी हिचा हात धरला आणि थेट एस. टी. त बसलो. ही लागली ओरडायला. “ काय चाललंय हे. मूर्खपणा नुसता. चला घरी. ”

त्यावर मी म्हणलं, “ आज काही झालं तरी सारसबागेतच तुला भेळ खायला घालणार. ” 

त्यावर ती घाबरली. आणि गाडीतून झटकन खाली उतरली. मी पळत खाली उतरून तिचा हात धरला. म्हणलं “हे बघ घरात काही अडचण नाही. आई आण्णा आहेत पोरांजवळ. मी सांगतो त्यांना काय असेल ते. तू शांत रहा “.. खूप विनवण्या करून तिला गाडीत आणून बसवलं.

घरी आईला फोन करून आईला जे काही सांगायचं ते सांगितलं. स्वारगेट चे तिकीट काढले. प्रवास सुरू झाला. सायंकाळी पाच वाजता आम्ही सारसबागेत होतो. हातात भेळ होती. मी तिला भरवत होतो. तिथं बसलेल्या एका कॉलेजच्या पोराला आमचा फोटू काढायला लावला. मी तिला हाताने भेळ भरवली. एक तास थांबलो. परत काही काळ पुण्यात चालत हिंडलो. रात्रीचं जेवण केलं. आणि रात्री अकराच्या गाडीने माघारी निघालो. ते दुसऱ्या दिवशी सकाळी कवठेमहांकाळ.

बिचारी पार थकून सुकून गेली होती. पण खुलून आणि उजळून निघाली होती. तिची मागणी फार मोठी नव्हती. फक्त ठिकाण आणि अंतर तीनशे किलोमीटर वर दूर होतं. मी फक्त मनाची तयारी करून ते अंतर आमच्या ओंजळीत भरलेलं होतं. कधी कधी संसारात असा वेडेपणा केल्याशिवाय घराच्या उंबरठयावर सुखाची जत्रा भरत नसते.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

एक सोळा वर्षाचा मुलगा मेडिकलच्या दुकानात जातो. तिथे एक आजोबा कॅन्सरसाठीची औषधे घेत असतात. खरंतर त्यांना ती महागडी औषधे परवडत नसतात पण त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला असल्याने ते कशीबशी पैशांची सोय करून औषधे घ्यायला आलेले असतात. तो मुलगा हे सगळे पहात असतो आणि न राहवून तो आजोबांना त्यांच्याबद्दल विचारतो. सत्य कळल्यावर तो खूप विचारात पडतो की असे हजारो, लाखो लोक या देशात आहेत की त्यांना ही महागडी औषधे परवडत नाहीत. पण तरीही काहीच पर्याय नसल्याने ते इतकी महाग औषधे खरेदी करतात. तो मुलगा आता यावर पर्यायांचा विचार करायला लागतो. यातूनच त्याच्या भावी उद्योगाचा पाया रचला जातो.

हा मुलगा म्हणजे ठाण्यातील वय वर्ष फक्त २२ असलेला ‘अर्जुन देशपांडे’ जो जगातील सर्वात तरुण उद्योजक आहे. त्याने स्थापन केलेल्या ‘जेनेरिक आधार’ या कंपनीचा टर्नओव्हर आहे मात्र पंधराशे कोटी रुपये !

१६ वर्षाच्या अगदी कोवळ्या वयात अर्जुनने ‘जेनेरिक आधार’ कंपनी स्थापन केली. कंपनीचा मूळ उद्देश हाच होता की गरजू आणि गरीब लोकांना अतिशय स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत. त्यासाठी त्यांनी औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गाठले. तेथून स्वस्तात औषधे खरेदी करून ‘जेनेरिक आधार’ नामक मेडिकलच्या दुकानातून त्याची विक्री सुरू केली. जी औषधे उत्पादकांकडून विकत घेऊन मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या स्वतःचे लेबल लावून अतिशय महाग विकतात तीच औषधे जेनेरिक आधार मध्ये अतिशय स्वस्त दरात मिळतात. मध्ये कुठलेही दलाल आणि इतर खर्च नसल्याने ते ही औषधे इतक्या कमी किमती विकू शकतात.

आजच्या घडीला देशभरात ‘जेनेरिक आधार’ ची तीन हजार मेडिकलची दुकाने आहेत. जिथून औषधे खरेदी करून लोकांचे हजारो लाखो रुपये वाचत आहेत.

तसेच अर्जुनने आज दहा हजार पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार देऊ केला आहे.

त्याच्या या कर्तुत्वाची दखल रतन टाटा सारख्या दिग्गज व्यक्तीनेही घेतली. रतन टाटांनी त्याला भेटायला बोलवून केवळ प्रोत्साहनच नाही तर त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूकही केली. याचे कारण सांगताना अर्जुन सांगतो कि आपल्या देशातील अगदी दुर्गम खेड्यातही औषधे उपलब्ध व्हावीत अशी अर्जुनप्रमाणे रतन टाटांचीही इच्छा आहे. आजपर्यंत अर्जुनला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. वय वर्षे केवळ २२ असलेल्या अर्जुनला आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली तसेच जपान सारख्या अतिप्रगत देशात मानाने बोलवले जाते. त्याचे व्याख्यान ऐकायला लोक गर्दी करतात. जपानने तर त्याला अतिशय स्वस्त दरात मोठे कर्ज दिले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनीही अर्जुनला भेटायला बोलवून त्याची प्रशंसा केली. द्रौपदी मुर्मुशी तर त्याचे आता आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.

सध्याच्या चंगळवादी तरुणाई मध्ये अर्जुन देशपांडे हा एखाद्या लखलखत्या हिऱ्यासारखा चमकतो आहे. ज्याला आपल्या देशाचा अतिशय अभिमान आहे. त्याला आपल्या भारत देशाला अमेरिका अथवा इंग्लंड न बनवता अभिमानास्पद भारतच बनवायचा आहे.

अशा या लखलखत्या हि-याला, अर्जुनला मानाचा मुजरा !

लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print