मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ढोलपथक आणि ती…” – लेखिका : सुश्री सोनाली सुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ढोलपथक आणि ती…” – लेखिका : सुश्री सोनाली सुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

सणसणीत लाथ हाणली त्याने पोटात. ती भेलकांडली. जीवघेणी कळ उठली. कशीबशी उठली ती. सारी रात्र अशीच तळमळत काढली. सकाळ झाली तसे मनाचे तुकडे अन् दुखणारे शरीर घेऊन कामाला लागली. एक यंत्र बनून गेली होती ती. सहन करायचं फक्त. कधीकधी तोंडातून शब्द निघाला तर अधिकचा मार ठरलेला. त्याला हवी असायची फक्त दारू. अन् हिनेच कमवायचं, राबायचं, घर चालवायचं, घरकामही करायचं. त्याची नोकर बनून सेवा करायची. त्याची प्रत्येक अवास्तव अपेक्षा पूर्ण करायची.

सहा महिने झाले होते फक्त लग्नाला. नोकरी करणारा, शहरात राहणारा नवरा मिळाला म्हणून लगेच होकार दिला तिने. पण महिनाभरात सारं चित्र पालटलं. त्याचं खरं रुप दिसू लागलं. फसवणूक झाली हे कळायला वेळ नाही लागला तिला. परतीचा रस्ताही बंद होता. माहेरी कुणीच नव्हतं. पळून जाणं किंवा सहन करणं, दोनच पर्याय होते. पहिल्यांदा तो दारू पिऊन आला तेव्हा कडाक्याचं भांडण झालं. रात्रभर रडत राहीली. सकाळी हिच्याकडे न पाहताच तो बाहेर पडला. शेजारीण चहा चपाती घेऊन आली.

“तिसरं लग्न आहे हे त्याचं…. ” बोलता बोलता तिने सांगितलं. तिला धक्काच बसला. ” पाहिल्या बायकोने जाळून घेतलं. दुसरी पळून गेली. तू तिसरी. “तिला रडू फुटलं.” असं रडून काय होणार, लढायला शिक. मी जिथे काम करते तिथे लावून घेते तुला. बोलू का मॅनेजरशी सांग. ” तिने लगेच हो म्हटलं. त्यालाही बरच होतं. फुकट पैसा मिळतोय, नाही कशाला म्हणणार? 

कष्ट दुपटीने वाढले होते तिचे. पण जगायला कारण सापडलं होतं. तो सुधारणार नव्हताच. आणि तिलाही जायला ठिकाण नव्हतं. घुसमट होत होती. मन मारुन जगू म्हटलं तरी त्यानं केलेला अपमान, खाल्लेला मार आठवून तिच्या जीवाचा संताप होत असे. एकदा कामावरून निघताना तिला ढोल ताशे ऐकू आले. मग रोजच ऐकू येऊ लागले. तिनं त्याबद्दल शेजारणीला विचारलं. ” हे होय? अगं गणपती जवळ आलेत ना. ढोल ताशा पथकात प्रॅक्टिस सुरु असते रोज. ” तिला नवल वाटलं. ” कोण कोण असतं तिकडे?”

” कोणीही जाऊ शकतं. अगदी तू सुद्धा. ” तिचे डोळे विस्फारले, ” खरच?” 

” खोटं का सांगु? अगं आउटलेट असते ती. कामाचा ताण, घरचा ताण सगळं विसरून मस्त ढोल वाजवतात. छान वाटतं. ” 

दुसऱ्याच दिवशी तिनं ढोल ताशा पथकात नाव नोंदवलं. सकाळीच जास्तीचा स्वयंपाक करून घेत असे ती. तो संध्याकाळी बराच उशीरा येई. ते पण तर्र होऊन. कामावरून परस्पर पथकात जाई ती.

” दम असला पाहिजे ताई वाजवण्यात. जोर लावून वाजव. “

शिकवणारा तिला म्हणत असे. ती आणखी मनापासून वाजवण्याचा प्रयत्न करत असे. त्यादिवशी ढोल वाजवता वाजवता वेळ कसा निघून गेला तिला कळलच नाही. घरी जायला उशीरच झाला होता. नेमका तो तिच्या आधी घरी पोचला. आधीच प्यायलेला, त्यातून ही उशीरा पोचली. त्यानं पट्टा काढला तिच्यावर उगारला. तिनं हिंमत करून तो वरच्यावर झेलला. त्याच पट्ट्याने त्याला झोडपून काढला. उचलला आणि कॉलर धरून फरफटत पोलीस स्टेशनला नेला. सगळी वस्ती बघतच राहीली. पोलिसांनी त्याला लॉक अप मध्ये टाकलं.

आज तिला वाजवताना बघून सगळे थक्क झाले होते. इतक्या दिवसांत साचलेला राग, तडफड सगळी बोटातून बाहेर पडत होती. शिकवणारा दादा तिच्याकडे बघतच राहिला!

लेखिका : सुश्री सोनाली सुळे

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे 

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शिक्षण हे वळण आहे दळण नाही…” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “शिक्षण हे वळण आहे दळण नाही” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी 

(पाच-सहा दिवस हा प्रकार सुरू होता कुणीतरी रोज सीटवर फुले वाहून गेल्यासारखा जात होता गुरुजींना वाटले की कोणीतरी मुली फुल गोळा करून ठेवत असाव्यात आणि ते विसरून जात असतील.)

 त्यानंतर एके दिवशी वर्गात शिकवत असताना त्यांनी पाहिले तर कोणीतरी एक व्यक्ती त्यांच्या गाडीच्या आसपास घुटमळताना त्यांना दिसली त्यांना वाटले कुणीतरी सीट ला ब्लेड वगैरे मारते की काय या विचाराने ते पटकन वर्गात बाहेर आले आणि ते ओरडले कोण आहे तिकडे त्याबरोबर ती व्यक्ती पळून गेली गुरुजींनी दोन-चार दिवस सलग लक्ष ठेवले पुन्हा चार दिवसांनी त्यांना कुणीतरी व्यक्ती गाडी पुढे घोटाळाताना दिसत होती आता मात्र गुरुजी सावध झाले ते शाळेच्या पाठीमागून गाडीपर्यंत गेले आणि त्या व्यक्तीचा हात त्यांनी पकडला आणि विचारले काय करत आहात? तो माणूस खूप घाबरला होता तो गावातलाच एक मध्यम वयाचा माणूस होता तो म्हणाला काही नाही हो गुरुजी तुमच्या गाडीची पूजा करतो आणि एवढी फुल वाहतो गुरुजींना काही प्रकार कळेना ते म्हणाले कशासाठी करता येईल सगळं? गुरुजींच्या मनात काही वेगळे शंका आली… माणूस नम्रपणे हात जोडून म्हणाला गुरुजी आमच्या सगळ्या वस्तीवरच्या लोकांची भावना आहे की गुरुजी ची गाडी ही आपल्याला प्राण वाचवायला मदत करणारी गाडी आहे इथे एखादा माणूस मरायला लागला तरी त्याला दवाखान्यात न्यायचं साधन नाही पण तुमच्या गाडीने आमच्यात असा विश्वास निर्माण झाला आहे की कमीत कमी गुरुजी ची गाडी आम्हाला दवाखान्यापर्यंत पोहोचवेल आणि काहीतरी दवा पाणी होऊन आम्ही वाचू नाहीतर इथली माणसं दवा पाण्या बिगर तडफडून मारत्यात हो आणि तो झटकन खाली वाकला आणि त्याने गुरुजींचे पाय धरले गुरुजींचे डोळे पाण्याने भरले गुरुजींनी त्या माणसाला उठवले त्या माणसाचे हात हातात घेतले त्याला घट्ट मिठी मारली म्हणाले नाही हो नका….. इतका मोठा मीही नाही आणि माझी गाडीही जमेल तेवढी मदत मी आपल्या गावाला करत जाईन अहो ते माझे कर्तव्यच होते माझ्या मुलाला वाचवणं हे माझं कामच आहे ना? गुरुजींमुळं आसपासच्या वाड्या वस्त्यावरची माणसं आपल्या मुलांना शाळेत पाठवायला लागली कारण त्यांचा गुरुजींवर विश्वास होता गुरुजी आपल्या मुलासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी करतील ही आशा त्यांच्याकडे होती. हे सगळं पाहिल्यावर मुख्याध्यापकांनाही खूप लाजल्यासारखे झाले ते आपल्या शिक्षकाला म्हणाले, ” सर तुम्ही करता हे काम चांगले आहे पण हल्ली असं करताना काही चूक झाली तर खूप त्रास होतो म्हणून मी तुम्हाला बोललो मला क्षमा करा”! गुरुजीं सारख्या शिक्षकामुळे ती शाळा उत्तम चालू लागली पालकांचा शाळेवरचा विश्वास वाढला गुरुजींनी तेथे नवनवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली. आसपासच्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली तालुक्यापासून गावाला रस्ता व्हावा म्हणून प्रयत्न केले गुरुजी ही सर्व कथा मला फोनवरून सांगत होते आणि माझे डोळे अक्षरशः वाहत होते मी म्हणलं सर तुमच्यासारखे शिक्षक हे आमची उद्याची आशा आहे 75 वर्षात फक्त आम्ही शाळेच्या दारापर्यंत विद्यार्थी आणू शकतो खऱ्या अर्थाने त्यांना सुशिक्षित करण्याची क्रिया अद्याप सुरू झालेली नाही आणि यापूर्वी आपल्याला पालकांना शिक्षित करणे गरजेचे आहे शहरातल्या हाय फाय शाळा ग्रामीण भागातल्या काही शाळांना मिळणारी मदत हे वाचून समाजाची एक धारणा होते की शिक्षकांना काय कमी सरकार सर्व देतं पण शाळेमध्ये विद्यार्थी यावा म्हणून जे प्रयत्न सरकार करते ते खरोखर गरजेचे आहेत दुपारच्या डब्यासाठी शाळेत पाठवणारे पालक आहेत कारण खरोखर त्यांच्याकडे अन्न नाही अशा दुर्गम भागातल्या वसाहती मधून शिकवणारे शिक्षक खरोखर आदरणीय आणि सन्माननीय आहेत शिक्षक हा केवळ एक अभ्यासक्रम शिकवीत नसतो एक पिढी घडवत नसतो एक मूल घडवत नसतो तर तो समाजालाही प्रेरणा देतो दिशा देतो खऱ्या अर्थानं समाज पुढे जाण्यासाठी एक सक्षम नवी पिढी तयार करतो हे करत असताना आपण शिक्षणाचा अर्थ फार मर्यादित घेतो मराठी हिंदी गणित विज्ञान हे विषय नाही त्याच्या पलीकडे जाऊन काही आदर्श निर्माण करतो! जो शिक्षक हे आदर्श त्याच्या वागण्यातून असतात त्याच्या कृतीतून असतात समाजाप्रती केलेल्या त्याच्या कार्यातून असतात विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने शिकवताना वापरलेल्या युक्त्यातून असतात म्हणून पाचवी ते दहावी शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहतात री युनियन शाळेतली होतात कारण ते संस्कार आणि तिथे काम करणारा शिक्षक खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्याला त्याच्या जीवनाला एक आकार देत असतो या साऱ्यासाठी शिक्षकाला न कळत एक आचारसंहिता वापरावीच लागते शिक्षक कुठे दिसावा? तर तो ग्रंथालयात दिसावा चर्चासत्रांमध्ये दिसावा व्याख्यानाला दिसावा नाटकांना दिसावा सभांना दिसावा भेळेच्या गाडीवर, पानपट्टीच्या दुकानात.. हॉटेलच्या बाकड्यावर शिक्षकांना समाज पाहू शकत नाही म्हणून शिक्षकाच्या वर्तनाला हे बांध आहेत आचारसंहित आहे ती जर त्याने सांभाळली नाही तर ते शिक्षक आदरास पात्र राहत नाही अशी जीवन प्रणाली जगणारे असंख्य शिक्षक आहेत जे खूप सुंदर काम करतायेत पण दुर्दैवाने ते लिहीत नाहीत त्यांच्या कामाचा प्रोपोगंडा होत नाही बोलवाला होत नाही त्यामुळे जनमानसामध्ये शिक्षकांबद्दलची प्रतिमा खूप चांगली नाही किंबहुना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने त्याचा टीचर करून टाकल्यामुळे ती टीचर तो टीचर या नावांची संबोधन त्यांच्या मागे लागली. शिक्षण विकत घेण्याची गोष्ट आहे असे लोकांना वाटू लागले आणि तिथेच समाज बिघडला आईचं प्रेम आणि शिक्षकाने पाठीवर हात ठेवून शिकवलेलं ज्ञान हे विकत घेता येत नसतं तुम्ही सिल्याबस चा काही भाग शिकवण्या लावून विकत घेऊ शकता पण हे नाही आणि मुळात शिक्षकाकडे खूप पैसा नाही त्यामुळे पैसे वाल्यांना सध्या समाजामध्ये मानसन्मान मिळतात खरंतर सर्वात सन्मानाचे आणि आदराचे स्थान हे समाजामध्ये शिक्षकालाच असले पाहिजे तरच तो समाज पुढे जाईल विकसित होईल ज्ञान विकत घेऊन तुम्ही खूप पैसे कमवाल पुढे जाल पण शिक्षकांनी जीवनाची जी आदर्श वाट दाखवलेली असेल त्यावर चालणारा मुलगा जेवढा सुखी समाधानी होईल तेवढे कोणीच होणार नाही त्याच्या हातून नेहमी उत्तम काम घडत राहील असा सुंदर समाज घडवण्याचे कार्य ज्या शिक्षकांच्या हातून घडते त्या शिक्षकाला द्यावयाचा सन्मान म्हणून शिक्षक दिन हा साजरा केला जातो फक्त… त्या दिवशीआपण या सन्मानास पात्र कसे राहू या या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे खेड्यापाड्यातल्या अनेक शिक्षकांना धडपडून काम करताना मी जेव्हा पाहते तेव्हा त्या गाडीवाल्या तरूण शिक्षकाची मला नेहमीच आठवण येते आजच्या या शिक्षक दिनी अशा सर्व शिक्षकांना मनापासून शुभेच्छा!

– समाप्त –

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(ज्यांनी आपल्या आई-वडिलांना असं रस्त्यावर सोडलं आहे, त्यांच्या आयुष्यात येईल का हा पश्चातापाचा दिवस ? … करतील का ते कधी आत्मपरीक्षण ?? … देतील का ते कधी कबुली जबाब स्वतःला ??? 

… येईल का त्यांच्याही आयुष्यात “पतेती”…??? मी त्या नववर्षाची वाट पाहत आहे… !!!) – इथून पुढे 

…कॅलेंडर प्रमाणे पारशी नववर्ष सुरू झाले… तो दिवस होता 15 ऑगस्ट ! 

15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन ! 

वर्दीमधली माणसं जेव्हा देशासाठी शहीद होतात, तेव्हा त्यांच्याभोवती तिरंगा गुंडाळला जातो…!

हा सन्मान मिळायला तेव्हढं भाग्य असावं लागतं….! 

तरीही त्यापुढे जाऊन मी धाडसाने म्हणेन… देशभक्ती करायला फक्त वर्दीची गरज नसते…

ज्याला जे काम नेमून दिलं आहे, त्यांनं ते प्रामाणिकपणे करणं म्हणजे देशभक्ती… ! 

….. विद्यार्थ्याने गुरुजन आणि आई-वडिलांचे ऐकून शिक्षण घेणे आणि त्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या भल्यासाठी करणे म्हणजे देशभक्ती !

….. डॉक्टरने, रुग्णसेवेला महत्त्व देऊन… Allopathy, Homeopathy, Naturopathy यासोबतच Sympathy आणि Empathy या पॅथींचाही वापर करणे म्हणजे देशभक्ती ! 

….. इतर कोणत्याही सरकारी / खाजगी सेवेत असलेले अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्वांचे बाबतीत सुद्धा हेच सांगता येईल…. !

….. रस्त्यावर न थुंकणे म्हणजे देशभक्ती…

….. चिरीमिरी न घेणे म्हणजे देशभक्ती…

….. मुली महिलांचा आदर करणे म्हणजे देशभक्ती…

….. आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे, ते मनोभावे करणं म्हणजे देशभक्ती….

अशा प्रकारची देशभक्ती केली तर, अंगावर घातलेलं कुठलंही वस्त्र, हे मग युनिफॉर्मच होईल ! 

वर्दी / युनिफॉर्म…. ही अंगावर घालायची गोष्टच नाही मुळी….. ती मनात घेऊन मिरवायची गोष्ट आहे… ! 

… फक्त दहा ते पाच नाही…. जन्मलेल्या तारखेपासून, मृत्यू होईपर्यंत सांभाळायची ती गोष्ट आहे… ! 

पूर्वी भीक मागणाऱ्या परंतु आता, शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांना या महिन्यात आपण युनिफॉर्म घेऊन दिले आहेत…. शाळेच्या फिया भरल्या आहेत… ! 

उद्या हीच मुलं मोठी होतील…. पुढे इतर कोणत्याही क्षेत्रात जातील, देशाची भक्ती करतील….

आणि म्हणून, याच मुलांना, “भारत” समजून, युनिफॉर्ममधल्या पोरांकडे पाहून मी त्यांना कडक सॅल्यूट ठोकला…. जय हिंद… वंदे मातरम… असं म्हणत मग आम्ही झेंडावंदन केलं.. !!! 

आधार हरवलेली… अंधारात चाचपडणारी ही माणसं, जेव्हा स्वयंपूर्ण होऊन… स्वतःच प्रकाशित होतात, तो क्षण पौर्णिमेचा ! आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मदतीने माझी अनेक माणसं या महिन्यात “प्रकाशित” झाली…. कदाचित यांच्याच प्रकाशाने रात्र उजळली… आणि मग 15 ऑगस्ट नंतर, श्रावणातली पौर्णिमा उगवली…

आली पौर्णिमा आली…. अल्लड, अवखळ धाकली बहीण म्हणून धावत आली, हातात राखीचे बंधन घेवून आली… रक्षाबंधन… !!! 

… रस्त्यावरील शेकडो आजी आणि ताईंनी मला राख्या बांधल्या. “जगात ज्याला जास्त बहिणी, तो खरा श्रीमंत”, अशी श्रीमंतीची व्याख्या ठरली; तर आज सगळ्या जगातला मीच एक श्रीमंत ! 

सर्वात श्रीमंत मीच असलो तरीही एका टप्प्यावर याचक सुद्धा मीच आहे….. इतक्या साऱ्या बहिणींना मी ओवाळणी तरी काय देऊ ? माझी पात्रता ती काय ? 

…. मग, कमरेत वाकलेल्या आजीला कमरेचा पट्टा देवून तिचा आधार झालो…

…. गुडघ्याच्या त्रासामुळे चालता येईना, त्या आजीला गुडघ्याचा पट्टा बांधून देवून, तीचा गुडघाच झालो…

…. आधाराशिवाय उभेच राहता येत नाही, अशा आजीला हातात काठी देऊन तीची काठीही झालो…

…. डोळ्याला दिसत नाही ? मग ऑपरेशन करून तिचा नेत्र झालो…

सुकलेल्या, वाळलेल्या, वठलेल्या झाडांवर पुन्हा पालवी फुटत नाही असं म्हणतात…

आईशपथ सांगतो, मी या झाडांवर त्या दिवशी हिरवीगार नाजूक पालवी उमललेली पाहिली आहे… ! 

हसताना यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मला, समुद्रातल्या एका संथ पण फेसाळलेल्या लाटेसारख्या भासतात… ! 

… रक्षाबंधनाच्या दिवशी, मी ही संथ लाट झालो… त्यांच्या काळजावर पडलेली मी एक छोटीशी सुरकुतीच झालो…. ! 

“नारळी भात” आमच्या नशिबात नसला, तरी अनेक याचकांना, कामाला लावून त्यांच्याकडून, जेवणाचे डबे तयार करून घेऊन; रस्त्यावरील गोरगरिबांना आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या याचकांना आमच्या “अन्नपूर्णा प्रकल्पाच्या” माध्यमातून देत आहोत.

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जाणीव झाली, श्रावण मास आत्ता चालू झाला गड्या…. !

… पण, हरलेल्या या चेहऱ्यांकडे पाहून मग माझ्या तोंडून शब्द निघाले…

श्रावणमासी हर्ष नसू दे

नसू दे हिरवळ चोहीकडे

सरसर शिरवे, भिऊ नको तू

आपोआप ते ऊन पडे

*

झालासा तो वाटतो सूर्यास्त

सूर्याला रे, अंत नाही गडे

तूच सूर्य हो, तूच प्रकाश हो

हो तू रे गरुड राजा, जो आकाशाशीं भिडे

(आदरणीय बालकवींची माफी मागून)

श्रावणातल्या पौर्णिमेचा चंद्र मनामध्ये जागा ठेवत, मग “श्रीकृष्ण जयंती” आली.

जे भिक्षेकरी; भीक मागणे सोडून देऊन काम करायला लागले आहेत; त्यांचा नवीन जन्म झाला असंच मला वाटतं…. माझ्यासाठी मग हेच बाळकृष्ण ! 

माझेच काही याचक लोक; आम्ही भिक्षेकरी (भिकारी) हाय, अजूनही असं काही वेळा उघडपणे सांगतात… मला त्यावेळी वाईट वाटतं… ! 

पण ज्या भिक्षेकर्‍यांनी भीक मागणं सोडून दिलं आहे; असे माझे “बाळकृष्ण” मग हा “कंस” फोडतात… तोडतात… भेदतात…

कंसातल्या भिकारी या शब्दाचा वध करून, स्वतःच तयार केलेल्या “बंदीशाळेतून” जेव्हा “गावकरी” म्हणून जन्माला येतात, तोच माझ्यासाठी जयंती सोहळा असतो… ! 

आम्ही दहीहंडी सुद्धा मांडली….. नव्हे रोज मांडत आहोत…

…. आमची दहीहंडी तीनच थरांची… भिक्षेकरी – कष्टकरी – गावकरी

तीनच थर आहेत, त्यामुळे वरवर दिसायला सोपी दिसते पण फोडायला त्याहून अवघड… ! 

ही दहीहंडी फोडायला आपण सर्वजण आम्हाला प्रोत्साहन देत आहात, पाठीमागून टेकू देऊन वरवर ढकलत आहात, सर्वतोपरी मदत करत आहात…. आम्ही ऋणी आहोत आपले ! 

आता आपल्याकडून एक वचन हवे आहे…..

‘आपण सर्वांनी भिक मागणाऱ्या व्यक्तीला भीक देणे बंद करूया… स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला मदत करूया… ! ‘ 

भीक आणि मदत या दोन शब्दामध्ये खूप फरक आहे….. आपल्या काहीही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर परावलंबी होत असेल तर ती भीक….. पण, आपल्या कोणत्याही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर स्वावलंबी होत असेल तर ती मदत ! …. पुण्य कमावण्याच्या नादात भीक देऊन एखाद्याला खड्ड्यात ढकलण्यापेक्षा, स्वावलंबी होण्यासाठी मदतीचा हात पुढे करून त्याला खड्ड्यातून बाहेर काढूया…

तरच ही तीन थरांची, दहीहंडी खऱ्या अर्थाने फुटेल… !!! 

जेव्हा ही दहीहंडी कायमची फुटेल, त्यावेळी मी रस्त्यावर येऊन जल्लोष करेन… नाचेन… गाईन आणि म्हणेन…. गोविंदा आला रे…. आला…. ! 

– समाप्त –  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही… ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

जे. के. राऊलिंग

वयाच्या १७ व्या वर्षी तिला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. २५ वर्षांची असताना आईचे आजारपणात निधन झाले. वयाच्या २६ व्या वर्षी ती इंग्रजी शिकवण्यासाठी पोर्तुगालला गेली. वयाच्या २७ व्या वर्षी लग्न झालं, तिचा पती तिच्याशी नेहमी गैरवर्तन करत असे, तरीही त्यांना मुलगी झाली.

वयाच्या २८ व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला आणि तिला गंभीर आजार असल्याचे निदान झाले. वयाच्या २९ व्या वर्षी ती फुटपाथवर लहान मुलीला सोबत घेऊन जगणारी एक लाचार आणि एकटी आई होती. वयाच्या ३० व्या वर्षी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..

पण… तिने तिचे ते काम करण्याचे ठरवले जे ती इतरा पेक्षा चांगले करू शकते आणि तिला लिखाणात ऋची असल्यामुळे तिने लिखाण करण्यास सुरुवात केली.

वयाच्या ३१ व्या वर्षी शेवटी तिने तिचे पाहिले पुस्तक प्रकाशित केले. वयाच्या ३५ व्या वर्षी तिने ४ पुस्तके प्रकाशित केली आणि तिला वर्षातील सर्वोतकृष्ट लेखिका म्हणून गौरविण्यात आले.

वयाच्या ४२ व्या वर्षी, तिने तिचे नवीन पुस्तक लिहिले आणि प्रकाशित झाल्यावर पहिल्याच दिवशी १ कोटी १० लाख प्रती विकल्या गेल्या, ही तीच महिला आहे जिने वयाच्या ३० व्या वर्षी आत्महत्येचा विचार केला होता आणि तिचे नाव आहे जे. के. राऊलिंग.

आज हॅरी पॉटर हा $१५ बिलियन पेक्षा जास्त किमतीचा जागतिक ब्रँड आहे.

सांगायचं तात्पर्य एवढच की आयुष्यात कधीही हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करण्याची जिद्द असेल तर अशक्य असं काहीच नाही, भले थोडा उशीर झाला तरी चालेल पण विजय हा निश्चित असतो.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनील देशपांडे 

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “Contact आणि Connection…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “Contact आणि Connection…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक… ?

घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.

त्यातील एकाने साधूला विचारलं,

“साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला.

पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?”

साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले.

साधू : “तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?”

पत्रकार : “येस !! का हो ?”

साधू : “घरी कोण कोण असत?”

आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं. कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.

तरी मूळ प्रश्नाचे “उत्तर” मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला.

तो म्हणाला : “माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण ! सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत. “

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?”

(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला. )

साधू : “तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?”

पत्रकाराने राग आवरत सांगितलं : “बहुतेक एक महिना झाला असावा.

साधू : “तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ? एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?”

(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)

तरी त्याने उत्तर दिले : “गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो”

साधू : “त्यावेळी किती दिवस एकत्र होता?”

पत्रकार (हळवा होत) : “तीन दिवस होतो”

साधू : “तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?”

(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला. )

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ?” वडिलांना विचारलं का ? की कसे आहात? आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?”

(असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं).

साधू : “बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको. तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते. तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही Connection नाहीय……

… You are not connected to him. आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी “लगाव” असणं वेगळं. कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते.

एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे, आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं… हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही… तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही. “ 

आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं.

एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला.

आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतयं….. आपण आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारी, सहकारी, समाज… सर्व फक्त contact मधे ठेवतो आणी गरज पडली की लगेच connection जोडतो…

सर्व एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही…

कसला संवाद नाही, कसल्या चर्चा नाहीत, सगळे स्वमग्न झालेत… !

आपण वरचेवर बदलत चाललोय…

हेच खरं आहे.. !

इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळं विसरलं जातंय….

कुणाला जवळ करायचं, कधी जवळ करायचं, हे चांगलच समजायला लागलयं…

प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे…

गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगलीच जोपासली आहे…

वाटलं तर प्रतिसाद द्यायचा नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं व ठेवणीतलं उत्तर तयार ठेवायचं… !

दाहक असलं… तरी सत्य हेच आहे…

… संपर्क, संवाद वाढवणं, एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं म्हणजेच connection..

वरील घटनेतील “साधू” म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी विवेकानंद होते.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शिक्षण हे वळण आहे दळण नाही…” भाग – १ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “शिक्षण हे वळण आहे दळण नाही” भाग – १ ☆ सुश्री शीला पतकी 

शिक्षण हे वळण आहे दळण नाही हे वाक्य एका माजी शिक्षण संचालकांचे आहे ज्यानी शिक्षण क्षेत्रामध्ये विविध प्रयोग केले. माझ्या शिक्षकी पेशातल्या सुरुवातीच्या काळात या वाक्याने मी खूप प्रभावित झाले आणि मग त्यानी या वाक्याचे स्पष्टीकरणही खूप सुंदर दिले होते. पुस्तकं तीच असतात आशयही तोच असतो पण काळानुरूप त्याचे अर्थ बदलत असतात त्यानुसार आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांचा आवाका जाणून त्या मुलांना शिकवणे

त्यासाठी नवीन नवीन संदर्भ शोधून वाचणे.. वाचन वाढवणे शिक्षणामध्ये नवे नवे प्रयोग करणे म्हणजे वळण आहे. तोच भाग शिकवायचा अनेक वर्ष म्हणून पाटी टाकल्यासारखे दळण टाकत जाऊ नका हा मोलाचा संदेश मी शिक्षक होण्याच्या सुरुवातीच्या काळात मला मिळाला. आणि मला लक्षात आले की शिक्षक फक्त एखादा पाठ शिकवत नसतो त्याच्या अनुषंगाने कितीतरी गोष्टी तो शिकवत असतो शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे खूप व्यापी आहे एखाद्या विद्यार्थ्यांच आयुष्य बदलून टाकण्याची त्याच्यात ताकद आहे आणि तो केवळ विद्यार्थ्यांचा नसतो तो पालकांना त्या मुलाबद्दल काहीतरी सांगतो समाजाला काहीतरी आदर्श निर्माण करून देतो समाजाप्रती सुद्धा त्याची कर्तव्य असतात ती पार पाडतो याचे खूप छान उदाहरण आजच्या दिवशी मला द्यावसं वाटतं आणि तीच गोष्ट मी आज सांगणार आहे

 एका वृत्त पत्रामध्ये अलक नावाचे एक नवीन सदर सुरू झाले होते म्हणजे अति लघु कथा चारच ओळीची कथा असायची. त्यामध्ये एक सुंदर कथा लिहिली होती नाव होतं “गाडी गुरूजीची” मी ती कथा वाचून त्याच्या खाली असलेल्या नंबर वरच्या त्या माणसाला फोन केला आणि त्यांना विचारले आपण काय करता? त्यांनी सांगितले मी शिक्षक आहे आणि मी लिहिलेली कथा ही माझ्या अनुभवातून लिहिलीय. मी म्हणलं खरं तर ही दीर्घ कथा व्हावी अशी असताना तुम्ही थोडक्यात लिहिली आहेत ते म्हणाले हो मी आत्ताच लेखन चालू केल आहे मी खूप लहान आहे अजून अनुभव घेतोय… ते कुठेतरी गडचिरोली वगैरे त्या भागामध्ये विदर्भात होते त्यानी ती सांगितलेली कथा किंवा त्यांचा अनुभव विलक्षण भावणारा होता. आजपर्यंत माझ्या लक्षात राहणारा असा होता. त्यांनी असं सांगितलं की माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात एका दुर्गम भागातल्या नेमणूकीने झाली तीन-चार शिक्षक असलेली ती शाळा.. चार खोल्या.. चार शिक्षक.. एक मुख्याध्यापक… आणि आसपासच्या वाड्यावरून वस्त्या वरून विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला येत असतात. जवळ असलेल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी म्हणजे शाळा असलेल्या गावापर्यंत जाण्यासाठी फक्त पायवाट होती कोणतंही वाहन त्या ठिकाणी जात नव्हतं काही शिक्षक सायकलवरून येत असत या नवीन तरुण शिक्षकाकडे मात्र एक गाडी होती ज्याला फटफटी असे म्हणत असत. ती घेऊन ते येत असत. शाळेच्या समोरील पटांगणात ते गाडी पार्क करायचे दिवसभराचे शिकवण झालं की संध्याकाळी पुन्हा त्या गाडीवरून आपल्या गावाकडे परतत असत.

 एकदा त्यांच्या वर्गातल्या मुलाच्या पायाला मोठी जखम झाली होती आणि तीन चार दिवस तो मुलगा काही शाळेला आला नाही शिक्षक तरुण आणि उत्साही होते काही नवीन करण्याची समाजाशी जोडले जाण्याची हौस होती ते त्या मुलाच्या घरी गेले आणि त्यांनी पाहिलं की मुलाला खूप मोठी जखम झालेली होती पण त्या जखमेत तू भरला होता पाय सुजला होता मुलगा निपचित तापाने फणफणलेला होता मुलाची अवस्था बिकट होती वस्तीवरचे सगळे लोकं जे आदिवासी होते.. उत्पन्नाची फारशी साधन नाहीत त्यामुळे दारिद्र्य होतं. झोपडीत एका घोंगडीवर पोरगं पडलेलं शिक्षकाने आपल्या मुख्याध्यापकाकडे त्या मुलाला आपण तालुक्याच्या ठिकाणी नेऊन उपचार करू शकतो का? असा प्रश्न विचारला त्यांचा हेतू प्रामाणिक होता की आपल्या मुख्याध्यापकाची परवानगी घेऊन हे करावे मुख्याध्यापक म्हणाले, ” नाही त्या फंदात पडू नका अजून नवीन आहात त्या पोराला आणखीन काहीतरी वेगळंच झालं तर तुम्हाला जबाबदार धरतील आणि त्याबरोबर शाळेलाही जबाबदार धरतील आपलं काम शिकवायचं आहे तेवढं करा”. पण शिक्षकाला काही ते पटेना त्याने तालुक्याच्या दवाखान्यामध्ये चौकशी केली आणि दुसरे दिवशी शाळा संपताना त्या मुलाला आणि पालकाला गाडीवर घालून ते दवाखान्यात घेऊन आले तिथे डॉक्टरने सांगितले की परिस्थिती अतिशय बिकट आहे पायामध्ये खूप इन्फेक्शन झाले आहे ते शरीरात पसरत चालले आहे पालकांना त्याची कल्पना दिली. गुरुजींनी पालकांची खाण्यापिण्याची व्यवस्था औषध पाण्याची व्यवस्था करून दिली रोज सकाळ संध्याकाळ ते मुलाची चौकशी करायला जात असत डॉक्टरांनी औषध गोळ्या मलमपट्टी सलाईन इत्यादी गोष्टी चालू केल्या मुळेआणि या मुलांची प्रतिकारक्षमता खूपच चांगली असल्यामुळे औषधाचा परिणाम वेगाने होऊ लागला दोन दिवसांनी मुलाचा ताप उतरला पस काढून टाकल्यामुळे जखमेलाही आराम पडला चार-पाच दिवसानंतर मुलाची जखम भरायला सुरुवात झाली मग डॉक्टरांनी ड्रेसिंग करण्याची माहिती पालकांना दिली मुलगा बरा होऊन त्याला शिक्षकाने घरापर्यंत आणून सोडले सगळ्या वाडीला अतिशय आनंद झाला कारण मुलाचा सुजलेला पाय त्याच्या मधून वाहणारा पु अंगामध्ये असलेला ताप हे पाहून हा मुलगा टिकणार नाही अशी सर्व लोकांना खात्री झाली होती परंतु गुरुजींमुळे मुलगा वाचला हे त्यांच्या लक्षात आले गुरुजींबद्दल सगळ्या गावाला म्हणजे त्या वाडीला खूप अभिमान तर वाटला पण आदर वाटू लागला गुरुजींना भेटल्याबरोबर लोक वाकून नमस्कार करू लागले गुरुजींच्या गाडीमुळे आपल्या पोराचे प्राण वाचले ही तिथल्या लोकांची भावना होती कारण तालुक्यापर्यंत रुग्णाला नेण्याचे कोणते साधन नव्हते गुरुजींच्या गाडीमुळेच ते शक्य झाले ही त्यांची धारणा होती 

पुढे चार आठ दिवस गेले गुरुजी संध्याकाळी शाळा सुटल्यावर गाडी वर बसायला गाडीजवळ आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की सीट वरती चार-पाच फुलं ठेवलेली आहेत. पाच-सहा दिवस हा प्रकार सुरू होता कुणीतरी रोज सीटवर फुले वाहून गेल्यासारखा जात होता गुरुजींना वाटले की कोणीतरी मुली फुल गोळा करून ठेवत असाव्यात आणि ते विसरून जात असतील.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

या महिन्यात बरेच सण येऊन गेले नागपंचमी पतेती, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी… वगैरे वगैरे… ! परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे 15 ऑगस्ट ! 

आयुष्याच्या सुरुवातीला भेटलेल्या भीक मागणाऱ्या आजोबांनी मला मदत केली होती, यानंतर मी आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करत होतो, परंतु या आजोबांसाठी किंवा ज्या समाजाने मला त्यावेळी मदत केली, त्यांच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही आणि आता त्यांच्यासाठी काहीतरी करावे या भावनेने ; 15 ऑगस्ट 2015 रोजी मी आंतरराष्ट्रीय संस्थेचे राजीनामा देऊन रस्त्यावर आलो.

आज नवव्या वर्षातून दहाव्या वर्षात आम्ही पदार्पण करणार आहोत. मधल्या काळात ज्या घटना घडल्या त्या विषयी 15 ऑगस्ट माझाही स्वातंत्र्य दिन या लेखात स्वतंत्रपणे सर्व काही लिहिले आहे. याचा ऑडिओ मी काही दिवसात आपणास पाठवून देईन.

या नऊ वर्षात 3000 पेक्षाही जास्त स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

माझ्या कामावर आणि माझ्यावर लोकांनी इतकं भरभरून प्रेम केलं, आशीर्वाद दिले आणि स्तुती केली… ती क्वचितच एखाद्या माणसाला त्याच्या जिवंतपणी मिळते ! 

हा भाग्यवान मीच आहे… !!!

पण गेल्या नऊ वर्षात मात्र एक शिकलो… स्तुती ही सोन्याच्या अलंकारासारखी असते… अंगभर घातलेले सोन्याचे दागिने एखाद्या सण समारंभात ठराविक वेळी छान दिसतात….

पण ते कितीही छान दिसले आणि मौल्यवान असले; तरी रात्री झोपण्याअगोदर मात्र हे दागिने उतरून ठेवावे लागतात… नाहीतर ते टोचतात… बोचतात !….. स्तुतीचंही तसंच, एखाद्या समारंभात “स्तुती अलंकार” तेवढ्यापुरते घालून मिरवायचे असतातच ; परंतु एका क्षणी ते स्वतःच उतरून सुद्धा ठेवायचे असतात… नाहीतर ते आपल्यालाच टोचतात आणि बोचतात सुद्धा.

सतत हे स्तुती “अलंकार” घालून फिरलं की त्याचा “अहंकार” निर्माण व्हायला सुध्दा वेळ लागत नाही.

आणि मग हा “स्तुती अहंकार”, अलंकार न राहता, आपल्यालाच टोचायला आणि बोचायला लागतो…

तेव्हा तो योग्य वेळी काढणं हेच बरं… ! 

असो…. ! 

तर, जो समाज आपल्याला मदत करत आहे, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करावे, त्यांनी दिलेल्या मदतीतून आपण काय दिवे लावले, हे त्यांनाही कळवावे, आपण योग्य रस्त्यावर आहोत का, हे पडताळून पाहावे, चुकत असेन तर सल्ले घ्यावे, आपल्याला जे समाधान मिळत आहे ते सर्वांना थोडेसे वाटावे… गेली नऊ वर्षे दर महिन्यात आपल्याला “लेखाजोखा” सादर करण्याचा फक्त हाच हेतू असतो !

… तर, ऑगस्ट महिना नुकताच सुरू झाला आणि आषाढातली “अमावस्या” समोर आली.

अनेकांची आयुष्यं सुद्धा अशीच असतात. आत्ता कुठे आयुष्य सुरू झालं म्हणता म्हणता, ” भाकरीचा चंद्र “ कुठेतरी हरवून जातो…. काळोख्या त्या रात्रीत भुकेल्या पोटी चाचपडत बसण्याशिवाय दुसरा मग त्यांना कोणताही पर्याय नसतो.

… कोणाचाही आधार नसलेल्या, उजेड हरवून बसलेल्या तीन ताई… यांना या महिन्यात हातगाड्या घेऊन दिल्या, व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल दिले.

… जिच्या डोळ्यातलाच सूर्य हरवला आहे… अशा अंध ताईला रक्षाबंधनाच्या अगोदर राख्या विकायला दिल्या.

… श्वास चालू आहेत म्हणून जिवंत म्हणायचे… असा एक जण रस्त्याकडेला एक्सीडेंट होऊन पडून होता, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याच्यावर उपचार केले, पूर्ण बरा झाला. निराधारांसाठी चालत असलेल्या एका वृद्धाश्रमामध्ये “सेवक” म्हणून त्याला रुजू करून दिला आहे. वृद्ध निराधार आजी आजोबांची सेवा करत स्वतःचं पोट पाणी आता तो सन्मानाने भरेल.

… अशाच एका मृत म्हणून घोषित झालेल्या युवकाला आपण उचलून आणले… ऍडमिट केले… आमच्या या प्रयत्नाला आशीर्वाद म्हणून निसर्गाने त्याच्यामध्ये “प्राण फुंकले”… पूर्णपणे खडखडीत बरा होऊन, आज तो एका चांगल्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत आहे…

अशा वरील सहा जणांना, या महिन्यात व्यवसाय टाकून दिले आहेत / नोकरी मिळवून दिली आहे, ते आता प्रतिष्ठेने जगू लागले आहेत… ! आपण प्राण कोणाला देऊ शकत नाही; परंतु भीक देणे बंद करून एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करून, प्रतिष्ठा नक्की देऊ शकतो… ! 

प्रतिष्ठा नसेल; तर प्राण काय महत्त्वाचे ? 

अमावस्या सरली म्हणता म्हणता, पतेतीची पहाट उगवली…. पारशी नववर्षाचा आदला दिवस म्हणजे “पतेती”… ! 

पतेती म्हणजे “पश्चात्तापाचा दिवस”… ! 

पतेती म्हणजे केलेल्या चुका मान्य करून “कबुलीजबाब” देण्याचा दिवस… !!

पतेती म्हणजे आत्मनिरीक्षणाचा दिवस… !!! 

शेपूट लपवून, माणूस असल्याचे ढोंग करत समाजात फिरणारी अनेक माकडं मला भेटतात. आपल्या आई-वडिलांना रस्त्यावर सोडून, या फांदीवरून त्या फांदीवर कोलांट उड्या मारत स्वतः मस्त मजेत जगत असतात…. या माकडांनी, अशा रस्त्यावर सोडलेल्या वृद्ध आई-बाबांना आम्ही रस्त्यावरच आंघोळ घालतो, नवीन वस्त्र देतो आणि एखाद्या वृद्धाश्रमामध्ये त्यांना दाखल करतो. जेव्हा या आई-बाबांना आम्ही रस्त्यात आंघोळी घालतो; त्यावेळी आता आम्हाला कुठेही “अभिषेक” करण्याची गरज उरली; असं मला वाटत नाही… ! आमचा अभिषेक तोच… आमची पूजा तीच… ! 

… अशा 75 आई बाबांना आजपर्यंत सुरक्षित स्थळी ठेवले आहे. आयुष्यात अशा 75 पूजा मांडल्या… ! 

जे जगले त्यांचे सून आणि मुलगा झालो…

जे गेले त्यांचे सून आणि मुलगा होऊन अंत्यसंस्कार केले… !

. अशा 75 आई-बाबांना आपण उचलून कुशीत घेऊ शकलो, याचे भाग्य समजू ? 

आनंद मानू ? हे सर्व करण्याची मला संधी मिळाली, यात समाधान मानून हसू ? ….

… की; सुकलेल्या पालापाचोळ्यासारखे कितीतरी वृद्ध आई-वडील अजूनही रस्त्यावर पडून आहेत, याचे दुःख मानू ? 

… कधीतरी सुगंधी असणारे, धगधगते आई बापाचे हे जीव, कापरासारखे वाऱ्याबरोबर उडून जातात… परत कधीही न येण्यासाठी… ! त्यांनी आयुष्यात पाहिलेली स्वप्नं मग, चिते मधल्या अग्नीत जळूनतरी जातात किंवा कायमची जमिनीत दफन तरी होतात… !!! धुरासारखी जळून गेलेली स्वप्नं, मग आकाशातले ढग होतात….. त्या आई-बाबांचे अश्रू आकाशातून कधीतरी असह्य होऊन, धो धो कोसळू लागतात…

आणि घराच्या खिडकीतून आपण डोकावून, कॉफीचा मग हातात घेऊन म्हणतो, ‘ यंदाचा पाऊस जरा जास्तच आहे नाही का ‘… ???

हा… हा.. पाऊस नसतो हो… ! 

पूर नदीला येतंच नाही…. हा पूर असतो गेलेल्या आई बापाच्या डोळ्यातला… ! 

… ज्यांनी आपल्या आई-वडिलांना असं रस्त्यावर सोडलं आहे, त्यांच्या आयुष्यात येईल का हा पश्चातापाचा दिवस ? … करतील का ते कधी आत्मपरीक्षण ?? … देतील का ते कधी कबुली जबाब स्वतःला ??? 

… येईल का त्यांच्याही आयुष्यात “पतेती”… ???

मी त्या नववर्षाची वाट पाहत आहे… !!!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुना गेम’ म्हणजेच आजचे जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’…!!! – लेखक श्री अनुराग वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

पुना गेम’ म्हणजेच आजचे जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’…!!! 🏸 – लेखक श्री अनुराग वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

‘बॅडमिंटन’ हा आज जगप्रसिद्ध खेळ आहे. जगभरात हा ‘बॅडमिंटन’ खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भारतातील प्रत्येक गल्लीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तसेच निवांत वेळेत ‘बॅडमिंटन’ लोकं रात्री खेळताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु ‘बॅडमिंटन’ या खेळाची जन्मभूमी कोणती हे फारसे लोकांना माहिती नसते किंवा काळाच्या ओघात लोकं या ‘बॅडमिंटन’ खेळाला परदेशी खेळ समजून मोकळे होतात.

परंतु या ‘बॅडमिंटन’ खेळाचा जन्म हा बाहेरच्या देशातील नव्हे तर ‘बॅडमिंटन’ या खेळाचा जन्म हा ‘पुण्यामध्ये’ झालेला आहे. तसे म्हणायला गेले तर ‘बॅडमिंटन’ हा खेळ ‘पुणेरी’ खेळ आहे. इंग्रजांची सत्ता पुण्यामध्ये स्थापन झाल्यानंतर ‘पुणे’ परिसरामध्ये ‘खडकी’ येथे इंग्रजांची कायमस्वरूपाची छावणी होती. पुण्यातील खडकी येथे ‘ऑल सेंट्स चर्च’ आहे. या ‘ऑल सेंट्स चर्च’ च्या ईशान्य दिशेला ‘फ्रियर रोड’ आहे या ‘फ्रियर’ रस्त्याच्या जागेवर पूर्वी एक मोकळी बखळ होती. हीच बखळ किंवा सध्याचा ‘फ्रियर रोड’ आजच्या जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’ खेळाची जन्मभूमी.

‘खडकी’ येथील छावणीमध्ये इंग्रज सैनिक त्यांना ज्यावेळेस कामामधून निवांत वेळ मिळत असे तेव्हा छावणी मधील सध्याच्या ‘फ्रियर रोड’ येथील मोकळ्या जागेमध्ये दोघे जण किंवा दोन जोड्या एकमेकांच्या समोर उभे राहून वल्ह्याच्या आकाराच्या फळ्या बनवुन ‘बुचाची वर्तुळाकार चकती’ बऱ्याचवेळेस यामध्ये दारूच्या बाटलीचे बुच असायचे. हे हवेत उडवून टोलवून खेळत असे. ही ‘बुचाची चकती’ खाली पडू न देता टोलविणे एवढाच या खेळाचा भाग होता.

जेव्हा ही ‘बुचाची चकती’ वल्ह्यासारख्या फळीने हवेमध्ये उडवून मारली जात असे तेव्हा ही ‘बुचाची चकती’ हवेमध्ये स्पष्ट दिसावी यासाठी स्वतः खाऊन फस्त केलेल्या ‘कोंबड्यांची पिसे’ या ‘बुचाच्या चकतीला’ चिकटवित असत किंवा खोचून ठेवीत असत. या ‘पिसे’ लावलेल्या ‘बुचाच्या चकतीला’ गंमत म्हणून इंग्रज अधिकारी ‘बर्ड’ असे संबोधत असत. तसेच हा हवेमध्ये उडणारा ‘पक्षी’ सतत इकडून तिकडे फिरत असे म्हणून म्हणून त्याला ‘येरझारा करणारा कोंबडा’ किंवा ‘शटल कॉक’ असे म्हणत असे. अश्या प्रकारे ‘बॅडमिंटन’ या खेळाचा जन्म झाला त्याला इंग्रजांनी ‘पुना गेम’ असे नाव दिले.

इ. स १८७० साली काही इंग्रज सैनिक हे जेव्हा आपल्या घरी म्हणजेच ‘इंग्लड’ येथे जाण्यास निघाले तेव्हा मायदेशी जाणाऱ्या या इंग्रज सैनिकांनी ‘बॅडमिंटन’ या खेळाचे साहित्य म्हणजे खास ‘पुणेरी शैलीने’ बनवलेले ‘शटल कॉक’ म्हणजेच मराठी मधला ‘येरझारा करणारा कोंबडा’ आपल्या सोबत ‘इंग्लंड’ येथे घेऊन गेले. संपूर्ण भारतामधून पहिले विदेशात गेलेले ‘क्रीडासाहित्य’ हे पुण्यामधून गेले होते हे विशेष. तसेच भारतीय ‘क्रीडा साहीत्याची’ ही पहिली ‘निर्यात’ होती.

पुणेरी शैलीमध्ये’ बनवलेले ‘शटल कॉक’ हे ‘इंग्लंड’ मध्ये पोहोचले आणि तेथील सैनिकांमध्ये हा ‘पुना गेम’ अधिकाधिक प्रसिद्ध होऊ लागला. तेव्हा ह्या ‘पुना गेम’ बाबत ‘ग्लुस्टरशायर’ या परगण्यात राहणाऱ्या ‘ड्युक ऑफ न्यू फोर्ट’ हा राजघराण्याशी संबंधित असलेला ‘उमराव’ याच्यापर्यंत ह्या ‘पुना गेम’ बाबत बातमी जाऊन पोहोचली. हा ‘उमराव’ क्रीडाप्रेमी होता तसेच हा ‘उमराव’ सतत नवीन क्रीडाप्रकारांच्या शोधात असे.

त्याच्या कानावर जेव्हा ‘पुना गेम’ बद्दल माहिती पोहीचली तेव्हा ज्या इंग्रज सैनिकांना ‘पुना गेम’ बद्दल माहिती होती तेव्हा त्या ‘ग्लुस्टरशायर’ येथील राजघराण्याशी संबंधित ‘उमरावाने’ ‘पुना गेम’ माहिती असलेल्या इंग्रज सैनिकांना आपल्या राहत्या घरी बोलवून घेतले. ‘पुना गेम’ माहिती असलेले इंग्रज सैनिक ‘पुना गेम’ कसा खेळायचा याचे प्रात्यक्षिक दाखवायला ‘ग्लुस्टरशायर’ येथे पोहोचले आणि त्यांनी राजघराण्याशी संबंधित असलेल्या ‘उमरावाला’ आणि आमंत्रित लोकांना जेव्हा ‘पुना गेम’ इतका आवडला की त्याचे सगळ्या ‘इंग्लंड’ देशामध्ये फार कौतुक झाले आणि संपुर्ण ‘इंग्लंड’ देशामध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला.

तसेच या ‘पुना गेम’ बद्दल कसे खेळतात याची प्रात्यक्षिके दाखवली गेली ते ठिकाण म्हणजे ‘ड्युक ऑफ न्यू फोर्ट’ यांचे ‘बॅडमिंटन’ गाव. इंग्लंडमधील ‘बॅडमिंटन’ गावी इंग्रजांनी ‘पुना गेम’ ह्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले गेले म्हणून तेथील लोकांनी या ‘पुना गेम’ या खेळाचे नाव ‘गेम ऑफ बॅडमिंटन’ असे केले. यामुळे पुण्यामध्ये जन्मलेल्या ‘पुना गेम’ हे नाव इंग्रजांनी पुसून टाकले.

परंतु काही वर्षांमध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ सोबत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ इ. स. १८७७ च्या सुमारास इंग्लंड येथून परत भारतामध्ये आणला आणि या ‘पुना गेम’ म्हणजेच आत्ताचे ‘बॅडमिंटन’ या खेळाचे नियम तत्कालीन भारतामधील ‘कराची’ सध्याचे (पाकिस्तान) येथे या ‘पुना गेम’ उर्फ ‘बॅडमिंटन’ खेळाची नियमावली पुस्तिका बनवली गेली. आजपर्यंत या ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ याच्या नियमावलीमध्ये फारच थोडे बदल करण्यात आलेले आहेत.

असा हा पुण्यातील ‘खडकी’ येथे जन्म झालेला ‘पुना गेम’ आज जगभर ‘बॅडमिंटन’ या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या भारतामध्ये आणि तो देखील पुण्यामध्ये जन्म घेतलेला ‘पुना गेम’ आपण आजही विदेशी खेळ म्हणून गणला जातो. असा हा पुण्यात जन्माला आलेला ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ हा खेळ पुण्याने जगाला दिलेली एक देणगी आहे हे नक्की.

संदर्भग्रंथ:-

१. क्रीडा ज्ञानकोश:- सुरेशचंद्र नाडकर्णी

२. A Journey To The Badminton World:- Zuyan Wang.

३. शहर पुणे एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा:- सुरेशचंद्र नाडकर्णी, संपादक अरुण टिकेकर, निळूभाऊ लिमये फाउंडेशन, २०००

लेखक : श्री अनुराग वैद्य.

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो कृष्ण आहे… लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीता जोशी ☆

सुश्री सुनीता जोशी 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तो कृष्ण आहे… लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीता जोशी

 कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत……

…. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला.

…. नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले.

…. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली.

…. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं.

 

कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला.

…. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो.

कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात.

…. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे………

 

पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे ….

सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे ….

द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे ….

मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे ….

सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे……..

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनीता जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंकार स्वरूप… ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ ओंकार स्वरूप... ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

ओंकार स्वरूप गणेशाचे रूप.. श्री गणेशाची पूजा अर्चा झाली, आरती झाली, छोट्याशा देव्हार्‍यात विराजमान झालेली गणेश मूर्ती.. भरजरी शेला गळ्यात मोत्यांची माळ प्रसन्न चेहरा, हार दूर्वा फुलांनी सजलेला असा श्री गणेश फारच सुरेख मंगलमय वाटत होता मला तर कधी तो बालरूपात वाटतो तर कधी प्रौढ तर कधी चक्क, भरभरून आशीर्वाद देणारे आजोबा.. !

माझं मलाच हसू आल. अन् पूजेचे साहित्य आवरताना सहजपणे… “ओंकार स्वरूप गणेशाचे रूप.. “

या ओळी मी गुणगुणात होते.

ते बघून माझ्य नातू आणि नात दोघेही म्हणाले..

आजी या श्री गणपतीची कितीतरी नाव आहेत नाही..

गणनायक, गणपती, गजमुख.

अरे गणांचा नायक म्हणून गणनायक गणपती सर्व गुणांचे अधिष्ठान असलेला गुणपती रिद्धी-सिद्धींचाअधिपती 

विद्येची देवता आहे म्हणून! श्री गणेशाय नमः असे प्रथम पाटीवर गिरवूनच आपण विद्येचे धडे घेतो विद्येला प्रारंभ करतो. षड्रिपूंवर विजय मिळवण्यासाठी विघ्न विनाशक. आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी न डगमगता समतोल बुद्धीने वागण्याची क्षमता प्राप्त व्हावी यासाठी आपण शरण जातो ते विघ्नविनाशक विघ्नेश्वराला! याचं रूप गुण यावरून ही सगळी याची वेगवेगळी नावं आहेत. अशा या श्री गणेशाचं आगमन झालंय. आता याची पूजा अर्चना, आरती रोजचा प्रसाद, मोदक सगळंच कसं मनापासून करावसं वाटतं. दहा दिवस त्याचा पाहुणा म्हणून पाहुणचार केला तरी तो आपल्यातच मनात घरात त्यानं कायम स्वरूपी वास्तव्य करावं अशी मनापासून प्रार्थना करावी. “

“हो तर सोसायटीच्या गणपतीची आम्ही मुले मस्त पूजा आरती करतो हं. तू पण ये एकदा आणि बघ आम्ही कसं करतो ते.. ! गणपतीची आरास तर प्रत्येकाने घरातल्या काही कुंड्या फुलझाडांसहित आणून ठेवलेत. मुलींनी मस्त रांगोळ्या काढल्या. वर्गणी वगैरे काही नाही हं.. सोसायटीच्या सभासदांनीच तसं ठरवलंय फळांचा नैवेद्य करायचा म्हणजे वायाही जाणार नाही आणि कमी पडणार नाही. खव्याचे मोदक मात्र कुणीतरी आणत असतात. संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि बायकांसाठी, पुरुषांसाठी 

उखाणे स्पर्धा सुद्धा ठेवलीय. हॉलमध्ये अगदी शांत संगीत याची टेप लावून ठेवली. खूप धमाल येईल नाही? “

हे आपल्या सोसायटी पुरतं झालं पण आता चौका चौकातल्या गणपतीची आरास खरंच अगदी पाहण्यासारखी असते. पण मोठमोठ्या कर्कश्य आवाजात 

गाणी लावून ठेवतात ना त्याचा फार त्रास होतो.

श्री गणेश खरंतर निसर्ग संरक्षण, ज्ञानमय, विज्ञानमय स्वरूपाचं आगळच दर्शन घडवतो पण आपण मात्र सगळी हिरवाई नष्ट करतो. पान फुलं, हार तुरे, अन सगळ्या सजावटी पाण्यामध्ये विसर्जन करून ध्वनीवर्धक लावून देवाला, सगळ्या समाजाला उलट त्रास देतो. प्रदूषण वाढवतो. बहुतेक जण आता मातीचा गणपती आणतात आणि घरीच विसर्जित करतात ही खरंच चांगली गोष्ट आहे. सुधारणा करायची म्हटलं की दुसऱ्याकडे बोट दाखवतो. आपण सुसंस्कृत लोक आपली मुल्ये जपूनही संस्कृती सांभाळत उत्सवाचे स्वरूप निखळ आनंदाचे, मनोरंजनाचे चांगल्या उपक्रमाचे करू शकतो. पूर्वीपासून काही मंडळे असे उपक्रम राबवत आहेत. आता बहुतेक मंडळे, असा गणेशोत्सव करू लागले आहेत. ही जमेची बाजू आहे.

तुम्हा मुलांना आम्ही ‘आमच्या वेळी.. ‘असं म्हटलं की गंमतीचा विषय होतो. पण खरं सांगू.. नुसती पूजा -अर्चा करून, भोवताली, ध्वनी प्रदूषण असेल तर हा बुद्धी दाता प्रसन्न होणार नाही. या उत्सवात कसं प्रसन्न वातावरण त्याच्याभोवती हवं आणि त्याला मनापासून साद घालायला हवी. श्रद्धेन नतमस्तक व्हायला हवं तोच एक सत्य आहे हे प्रमाण मानलं तर आपलं जीवन सुखकर होईल. चला तर आपल्यापासूनच सुरुवात करूयात. “मी हसतच म्हटलं.

… सगळं पटल्याने नातू म्हणाला. “खरं आहे अन् योग्यही.. ! आपणही दूर्वा फुले पत्री वाहूयात श्री गणेशाला. आणि आपल्या कुटुंबियांवर, आपल्या देशावर येणारी विघ्न दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करूया. “. त्याला पुस्ती जोडत मी म्हणाले.. “कहाणी सारखं म्हणूयांत ‘ऐका परमेश्वरा श्री गणेशा तुमची कहाणी… निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाच्या वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देऊळे राऊळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा आपण आज घेऊया. व उतणार नाही मातणार नाही म्हणूयात. “

हात जोडून घरातील सगळ्यांनीच गणपतीची प्रार्थना केली. मनंही प्रसन्न झाली.

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print