तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!
तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.
पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.
एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.
गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!
आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.
कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये !
लेखिका : सुश्री दुर्गा भागवत
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाच्या लहरी…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
मनाच्या लहरी की लहरी मन !!!
अर्थात वरील विषय वाचल्या वाचल्या आपल्या मनात देखील असाच विचार आला असेल. हो न ? अहो, साहजिकच आहे. कळायला लागल्यापासूनची मनुष्याला असलेली मनाची सोबत मनुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम असते.
मन कसं असतं ? याची विविध उत्तरे देता येतील. आणि ही सर्व उत्तरे जरी खरी असली तरी मोठी गमतीशीर आहेत. कोणी त्याला चंचल म्हणेल, कोणी अचपल म्हणेल. कोणी अधीर म्हणेल तर कोणी बधिर म्हणेल. कोणी मनाला धीट म्हणेल तर कोणी सैराट म्हणेल. इतकं सार वर्णन केलं तरी कोणीही मनाचे इत्यंभूत वर्णन केले आहे असे छातीठोक पणे सांगू शकत नाही. कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्या प्रमाणे आपले मन कसे आहे ? तर
“अचपळ मन माझे नावरे आवरीता’
आपले मन हे समुद्रासारखे विशाल असते, अथांग असते. कधी कधी तर स्वतःला देखील आपल्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. एकाच वेळेला मन हे खंबीरही असते आणि तितकेच नाजूकही असते. ज्या प्रमाणे समुद्राच्या लाटांमध्ये फेस असतो, वाळू असते आणि लाटांबरोबर वाहून येणारे ओंडके सुद्धा असतात. अर्थात या ओंडक्याचा समुद्राच्या स्वाभाविक गती-प्रगती मध्ये फारसा फरक पडत नाही. पण मनुष्याच्या बाबतीत बरेच वेळा उलट घडते. कारण मनुष्याला आपले मन सागरा इतके विशाल करणे जमतेच असे नाही. ज्याप्रमाणे शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी किंवा योग्य त्या प्रमाणात ताणण्यासाठी व्यायामाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे मनाचे व्यायाम करणारा मनुष्य आपले मन योग्य त्या वेळी योग्य त्या प्रमाणात ताणू शकतो, विशाल करू शकतो. अर्थात हा सरावाचा भाग आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही.
गुंतणं हा आणिक एक मनाचा रंग आहे किंवा स्वभाव आहे. मनाच्या ह्या स्वभावाचा गैरफटका बरेच वेळा मन धारण करणाऱ्या देहाला सोसावा लागतो, मग त्याची इच्छा असो व नसो.
मन हे एक न दिसणारं तरीही असणार मानवाचे महत्वाचे इंद्रिय आहे. आजपर्यंत भलेभले थकले, पण मनाचा अंत खऱ्या अर्थाने लागला असे म्हणणारे अतिदुर्मिळ!! मला मन कळलं, मी कोणाच्याही मनातलं जाणू शकतो असे म्हणणे म्हणजे मोठी गंमत. कारण मनुष्य स्वतःच स्वतःचे मन जाणू शकत नाही तिथे दुसत्याचे मन काय जाणणार ? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की मन म्हणजेच ‘मी’ आहे. त्यामुळे भगवंताचा शोध आणि ‘मी’ चा शोध यामध्ये मूलभूत फरक काहीच नाही. पण व्यक्तिसापेक्ष त्यात फरक मानला जातो. म्हणून काही लोकं बाहेर देव शोधतात, तर काही आपल्या अंतरात देवाचा शोध घेतात.
सर्व संतांनी मनाचे वर्णन केले आहे.
“अचपळ मन माझे नावरे आवरीता”
– समर्थ रामदास
मन वढाय वढाय
उभया पिकाताल ढोर
किती हाकल हाकलं
फ़िरि येत पिकावर
– संत कवयित्री बहिणाबाई
“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धिचे कारण”,
– संत तुकाराम महाराज
“तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी”, अशी काहीशी अवस्था प्रत्येक मनुष्याची असते. मनाचे वर्णन कितीही केले तरी कमीच पडेल. मनाच्या लहरी किती आणि कशा कार्यरत असतात याचे नेमके असे कोष्टक नाही. मन स्थिर करणे म्हणजे एका अर्थाने त्या लहरींवर स्वार होणे. दैनंदिन जीवनात सामान्यपणे मनाच्या लहरी मनुष्यावर स्वार होतात आणि मनुष्याची अक्षरशः फरफट होते. खरंतर मनुष्याने या चंचल लहरींच्या छाताडावर स्वार होऊन जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे. थोड्याश्या प्रयत्नाने हे सहज साध्य होऊ शकते, फक्त तशी प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी.
(काही तांत्रिक कारणामुळे ” माझी जडणघडण ” या लेखमालिकेचा भाग आठवा दि. २७/८/२४ रोजी प्रकाशित होऊ शकला नाही, तो आजच्या अंकात प्रकाशित करत आहोत. वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)
आनंद आमच्या घरासमोर “गजाची चाळ” होती. वास्तविक चाळ म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येते तशी ती चाळ नव्हती. एक मजली इमारत होती आणि वरच्या मजल्यावर गजा आणि दोन कुटुंबे आणि खालच्या मजल्यावर तीन कुटुंबे राहत होती. पण तरीही गल्लीत ती “गजाची चाळ” म्हणूनच संबोधल्या जात असे. गजा मालक म्हणून तो राहत असलेला घराचा भाग जरा ऐसपैस होता. वास्तविक गल्लीतल्या कुठल्याच घराला (आमच्याही) वास्तू कलेचे नियमबद्ध आराखडे नव्हतेच त्यावेळी. कुठेही कशाही लांब अरुंद खोल्या एकमेकांना जोडल्या की झाले घर. पण अशा घरातही अनेकांची जीवने फुलली हे महत्त्वाचे.
गजाच्या घरात त्याची आई आणि त्याच्या लांबच्या नात्यातील बहिण “शकू” राहायचे आणि येऊन जाऊन बरीच माणसं असायची तिथे. कधी कधी गजाचे वडीलही दिसायचे मात्र गजा आणि शकू या बहीण भावांच्या नात्याबद्दल मात्र बऱ्याच गूढात्मक चर्चा घडायच्या.
गजाकडे आम्हा मुलांचं फारसं जाणं-येणं नव्हतं, पण गजाच्या शेजारी राहणाऱ्या दिघ्यांच्या कुटुंबातला आनंद आमच्यात खेळायला यायचा. आनंद, दिवाकर, अरुणा आणि त्याचे आई वडील असा त्यांचा परिवार होता.
आनंदची आई भयंकर तापट होती आणि सदैव कातावलेली असायची. त्यामुळे आम्ही आनंदच्या घरी खेळायला कधीच जात नसू पण आनंद मात्र आमच्यात यायचा. आम्ही त्याला आंद्या म्हणायचो. पुढे तोच “आंद्या” “आनंद दिघे” नाव घेऊन शिवसेनेचा एक प्रमुख नेता म्हणून नावारूपास आला ते वेगळं. पण माझ्या मनातला “आनंद” मात्र त्यापूर्वीचा आहे.
बालवयात आम्हा साऱ्या मुलांना फक्त खेळणं माहीत होतं. भविष्याची चिंताच नव्हती. पुढे जाऊन कोण काय करेल, कसे नाव गाजवेल याचा विचारही मनात नव्हता आणि “आनंद” अशा रीतीने लोकनेता वगैरे होण्याइतपत मजल गाठेल असे तर स्वप्नातही वाटले नाही कारण साध्या साध्या खेळात सुद्धा तोच प्रथम आऊट व्हायचा आणि आऊट झाल्यावर कोणाच्यातरी घराच्या पायरीवर गालावर हात ठेवून, पाय जुळवून पुढचा खेळ पहात बसायचा तेव्हा तो अगदी “गरीब बिच्चारा” भासायचा.
आज हे लेखन करत असताना खूप आठवणी उचंबळत आहेत. “आनंदची” खूप आठवण येत आहे. पुन्हा लहान होऊन त्याच्याशी संवाद साधावासा वाटतोय. तो आता या जगातही नाही. मनात दाटलेल्या भावना पत्रातूनच व्यक्त कराव्यात का ? कदाचित पत्र लिहिताना क्षणभर तरी त्याच्याशी बोलल्यासारखे वाटेल म्हणून.
प्रिय आनंद, स. न. वि. वि. खरं म्हणजे मला, तुला पत्र लिहिताना “सनविवि” वगैरे ठरलेले मायने नव्हते घालायचे. कारण त्यामुळे आपल्या मैत्रीच्या नात्यात उगीचच औपचारिकपणा जाणवतो. आपल्या मैत्रीत आपलं निरागस, आनंदी, खेळकर बाल्य अशा पारंपरिक शब्दांनी उगीचच बेचव होतं. आणि मला ते नको आहे. मी तुझा बायोपिक पाहिला. आवडला. तुझ्या भूमिकेतल्या त्या नटाने सुरेख अभिनयही केलाय. संहिता लेखन छान. तुझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर वास्तववादी प्रकाश पाडलाय. पण चित्रपट बघताना मला मात्र, ’टेंभी नाका, धोबी गल्ली ठाणे’ इथला अर्ध्या, खाकी चड्डीतला, मळकट पांढर्या शर्टातला मितभाषी, काहीसा शेमळट, भित्रा, गरीब स्वभावाचा पण एक चांगल्या मनाचा आनंद नव्हे आंद्या आठवत होता. जो माझा बालमित्र होता. तो मात्र मला या चित्रपटात सापडला नाही. आणि मग माझं मलाच हंसू आलं अन् वाटलं तो कसा सापडेल ? इथे आहे तो एक जनमानसातला प्रमुख राजकीय नेता आणि माझ्या मनातला आनंद होता तो माझ्याबरोबर, विटीदांडु खेळणारा, गोट्या, डबा ऐसपैस, थप्पा, लगोरी खेळणारा आनंद.. आईची रागाने मारलेली हाक ऐकली की खेळ अर्धवट सोडून पटकन घाबरत, धावत घरी जाणारा आनंद. लहान भाऊ, बहिणीला सांभाळणारा आनंद. एकदा मी तुला विचारलं होतं “तू आईला इतका कां घाबरतोस ?” तू एव्हढंच म्हणाला होतास, “मला तिला आनंदी ठेवायचे आहे.. ” आनंद, तुझ्या नावात आनंद होता पण तू कुठेतरी अस्वस्थ, खिन्न होतास का ? लहानपणी कळत नव्हते रे या भावनांचे खेळ. एक साधं गणित मी तुला सोडवून दिलं होतं आणि तुझी खिल्लीही उडवली होती. “काय रे ! इतकं साधं गणित तुला जमलं नाही ? इतका कसा ढब्बु ?” तू वह्या पुस्तकं घेऊन फक्त निघून गेलास. पण नंतर तू किती मोठी राजकीय गणितं सोडविलीस रे.. पुढच्या काळात तुझ्याविषयीच्या पेपरात येणार्या बातम्या, फोटो. लोकप्रियता वाचून मी थक्क व्हायची. अरे ! हाच का तो आनंद ? मी कधी विश्वासच ठेऊ शकले नाही. मी माहेरी ठाण्याला असताना एक दोनदा तुला भेटलेही होते. पण तू घोळक्यात होता. माझा बालमित्र आनंद, तो हा नव्हता. वाईट वाटले मला. पेपरात जेव्हां तुझ्या निधनाची बातमी वाचली, उलट सुलट चर्चाही वाचल्या. एका राजकीय नेत्याचे ते निधन होते. पण माझ्यासाठी फक्त माझ्या बालमित्राचे या जगात नसणे होते हे तुला कसे कळावे आणि त्यासाठी माझ्या डोळ्यात अश्रू होते. चित्रपट बघून मी घरी आले. मैत्रीणीचा फोन आला. “कसा वाटला मुव्ही ?” “छानच” अग ! आनंद आमच्या धोबी गल्लीत आमच्या घरासमोर रहायचा… पण हे काही मी नाही सांगितले तिला. कारण आपलं वेगळं नातं मी मनात जपलंय. उगीच एका राजकीय नेत्याशी असलेल्या नात्याचं मला मुळीच भांडवल करायचं नव्हतं आणि नाही. माझ्यासाठी फक्त ढब्बु आंद्या. कसं असतं ना लहानपण ? मुक्तपणे एकमेकांशी भांडणे, वाट्टेल ती नावे ठेवणे, टिंगलटवाळी करणे आणि तरीही मैत्रीच्या नात्यात कधीही न येणारी बाधा.. म्हणून का ते रम्य बालपण ? पण आनंद मला मनापासून तुझा अभिमान आहे. तुझ्या बालवयातल्या प्रतिमेसकट.
तुझी बालमैत्रीण.
माझं पत्र वाचून तुला नक्की काय वाटेल याचा विचार करत असताना मला आताही “गजाची चाळ” आठवते. काही वर्षांपूर्वी बदललेल्या धोबी गल्लीत गेले होते तेव्हा “गजाच्या चाळीचा” चेहराच बदलला होता. त्या संपूर्ण इमारतीचं शिवसेनेच्या कार्यालयात रुपांतर झालं होतं. त्या कपाळावर गंध, दाढीधारी प्रतिमेत लपलेला आनंदचा चेहरा मी शोधत राहिले…
☆ मी घर आवरत्येय… मोकळी होत्येय की गुंतत्येय !!!!!☆ डॉ. माधुरी जोशी☆
अखेर सह्या झाल्या. बिल्डिंग री डेव्हलपमेंटला गेल्याचं शिक्कामोर्तब झालं…. थोडा अवधी होता हातात… नवीन जागा मिळण्याचा भविष्यातला आनंद खुणावत होता…. आणि या भिंती मधला सारा भूतकाळ सतत सामोरा येत होता… आता चमचा नॅपकिन्स पासून कागदपत्रांपर्यंत किती आणि काय काय आवरायचं होतं. मनात ही वास्तू, आणि काही वस्तू सोडून जायची हलकीशी वेदना होती… पण घर आवरायलाच हवं होतं आणि खरं म्हणजे मनही!!! कामाला लागले आणि लक्षात यायला लागलं आवरणं कमी होतंय आणि आठवणींच्या साम्राज्यात गुंतणंच वाढतंय…
किती खोलवर रुजलेल्या, रुतलेल्या स्मृती.. एकेक आठवणींचं गाठोडं…. समोर आलेली फोटोंची पिशवी तर मनाला सगळ्यात जीवंत करणारी… सणवार, वाढदिवस, लग्नकार्य, ट्रीप्स, बक्षिस समारंभ, ट्रॉफ्या, एअरपोर्टवर मुलांना शिक्षणासाठी जातांना भरल्या डोळ्यांनी हासत दिलेले निरोप, दृष्टी आड, काळाच्या पडद्याआड झालेले वडीलधारे, कुणी सोबती, कुणी अगदी क्वचित भेटलेले तरी जवळचे, वाड्यातले, किती किती आठवणी…
तर काही कागदावर पेनानं उमटलेली अक्षरं, मनातल्या विचारांना सजवणारी… सुख दुःखाची, यशापयशाची, मन मोकळं करणारी…. कधी वर्तमानपत्रांनी दाद देऊन छापलेली, काही कविता, कार्यक्रमाची निवेदनं, त्यावरंच कुठल्याशा कोपऱ्यात लिहीलेले पत्ते, फोन नंबर्स…. चाललं मन गुंतत….
आणि अभ्यास, नोट्स, नोंदी, फेअर वर्क…. माझं संगीतातलं, मुलांचं इंजिनिअरिंगचं, यांचं गड किल्ल्यांचं… सुटत चाललेले, पिवळे पडलेले, क्वचित तुकडे पडणारे…. किती किती जुने कागद…. खूप दिवसात सापडंत नव्हतं ‘ ते ‘ पुस्तक…. कशात तरी दडलेलं. आनंदाच्या भरात तेच चाळलं… गुंतलं वेडं मन… अचानक सामोऱ्या येणाऱ्या जुन्या पावत्या… बिलं…. जगण्यातला इतक्या वर्षांचा आर्थिक आलेख मांडणाऱे… फोडायचंच राहिलेलं एखादं आहेराचं पाकिट आणि अमक्याकडून केंव्हातरी आलेला पण आज मिळालेला आहेर… आपलेच पैसे परत छुपा आनंद देणारे… मग ते पाकिट देणाऱ्यांच्या आठवणी… एखादी कपड्याखाली जपून ठेवलेली अन् आता चलनातंच नसलेली नोट…. चाललं… चाललं मन हिंडायला…. गंमत म्हणजे हे सारं आपल्या जागी होतंचकी.. निवांत, शांत पहुडलेलं…. या इथून निघण्यानी ते निघालं जागेवरून…. मोकळा श्वास घेतला कागदांनी…. स्मृती वगैरेंचे कागद परत आत गेले पाऊचमधे आणि सटरफटर गेले केराच्या टोपलीत… किती पसारा, , किती कागद, , किती काय जपलेलं, चुकून राहिलेलं, उगीच सांभाळलेलं…. आवरलं ते सगळं खरं पण मन मात्र आठवणींच्या गुंत्यात गुंतलेलं राहिलं….
इथून निघेपर्यंत स्वयंपाकघरात जेवणखाण बनणार होतं… ते शेवटी आवरू असं ठरवलं खरं…
पण रोज लागणाऱ्या भांड्यांपेक्षा किती तरी जास्त काही भांडी होतीच…. अनेक वर्ष जमवलेली. भांडी…. २५ लोक आले तरी घरात तयार असणारी वेळोवेळी घेऊन जमवलेली, हौसेची, आवडीची, मुलांची मुद्दाम नावं घालून घेतलेली, तर काही आहेरात आलेली, नावं नसलेली पण पदार्थ घालून शेजारपाजारची आलेली कन्फ्यूज्ड भांडी, मी जपून ठेवून मालक शोधणारी, काही तर बॉक्स मधूनही न निघालेली… कप, मग्ज्, न लागणाऱ्या बशा, दह्या दुधाचे सट, गंज, कल्हई लावलेली पितळी पातेली… लोखंडी तवे कढया पळ्या…. बापरे…. ४६ वर्षांचा पसारा…. सासुबाईंच्या वजनदार पितळी, स्टीलच्या भांड्यापासून अगदी निर्लेप तरीही हवाहवासा…. प्राणपणानी जपलेला, वाढवलेला पसारा… सारं सोबत होतं इतकी वर्षं….
पण आता मन आवरायला हवं होतं… मोजकं, गरजेचं, चांगलं, ठेवून मोकळं व्हायचं होतं… आणि मग भांडी निवडली…. गुंतलेल्या माझ्याच मनाविरुद्ध जणू लढंत राहिले….
मग असेच नातवंडांचे खेळ, कपडे, अगदी बॉक्स सुद्धा न उघडलेल्या गिफ्टस्,…. सगळं काढतांना मन अस्थिर… टाकणाऱ्या हाताला परत मागे खेचणारं… कधी आठवणींची कासाविशी कधी दुर्लक्ष झाल्याचा अपराधीपणा….
आवरणं कसलं…. मनाचं धावणं चारही दिशांना…. भूतकाळात.. कसं आवरायचं? आठवणींच्या गुंत्यातून कसं अलगद, न दुखावता सोडवायचं?यातलं काय ठेवावं? काय टाकावं? आता कुणाला दाखवायच्या आहेत त्या ट्रॉफ्या, सर्टीफिकेट्स, पत्र, लेख….. मुलं तर सगळ्यातून दूर… १००% प्रॅक्टीकल सल्ला देणारी…. नवीन पिढीच अशी… न गुंतणारी… स्पष्ट…..
आम्ही फार गुंतलोय का ? फारच भावनिक आहोत का?चुकलं का?
नाही नाही…. मन कबूल होत नाही…. कारण आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर क्षण अन् क्षण जगलो…. जे, जसं, जेंव्हा, जेवढं मिळालं त्यात आनंदात राहिलो. म्हणून तर पुढे श्रीमंत सिल्क नेसलो तरी आईच्या मायेचा चिटातला फुलांचा फ्रॉक, खणाचं परकर पोलकं आजही मनाजवळ आहे…. मुलांच्या घरात बॉयलर आले तरी तांब्याच्या लालभडक बंबाच्या ठिणग्या आणि पत्र्याच्या बादलीतल्या वाफाळत्या पाण्याची ऊब सोबत आहे… मिक्सर आले तरी पाटावरवंट्याचं खसखशीत वाटंण चवीत आहे…. वस्तू नाहीत पण आठवणी घट्ट आहेत…. मन गुंतून राहिलंय आजवर…
बरं या आठवणींचं तरी असं आहे…. आज फ्रीज जवळ गेलं की क्षणात विसरायला होतं काय घ्यायला आलो होतो ते… पण त्याच मनात ५वी, ६वी मधल्या नाना वाड्यातल्या शाळेत काव्य गायनासाठी गायलेल्या कविता लख्खं स्मरणात आहेत. किती उतारे, नाटकातले संवाद, समुहगीतं, अभंग, भावगीतं बंदिशी, तराणे…. मग शिक्षिकेची नोकरी करतांना मुलींचं यश, ते आलेले नंबर, त्या घोषणा…… हे सगळं आठवणीत आहे कारण सारं मन लावून, जीव ओतून केलंय. आज हे फोटो, सर्टिफिकेट्स पुन्हा ४० /५० वर्ष मागे नेतात ते त्या जिव्हाळ्यामुळे…
तेच स्वैपाकात.. प्रेमानं, मायेनं खाऊ घालण्याच्या भावनेत आहे. मग ती लोखंडी, पितळी, जाडजूड स्टीलची जुनी भांडी पण मऊ स्पर्श देतात. केवढी सेवा दिली त्यांनी…. ती टाकायची, नाकारायची कशी? ते कागद, पत्रं फोटो, ती पत्र, सर्टीफिकेट्स, भांडी, कपडे साऱ्यांनी तर सोहळा केला जगण्याचा…. पण मग मी मनाची समजूत घालते…. परत परत चाळण लावते…. मोजकं ठेवते…. काही दूर सारते… डोळे भरून पाहून घेते. तासाभरात आवरुया असं ठरवते सकाळी आणि दिवस कलायला येतो तरी मी त्याच पसाऱ्यात असते. पत्रं, भांडी, फोटो, पावत्या, पुस्तकं, कपडे सगळं सगळ्यांकडे आहेच…. एक गोड पसारा आयुष्यभर मांडलेला…
… सगळ्यांचं असंच होतं असेल का?आवरायला काढलं खरं…
पण किती प्रसंग, विषय, घटना, आनंद, दु:ख, यश अपयश… कुठेकुठे मन हिंडून येतं… हिंडवून आणतं….
पण भावनिक मनाला प्रॅक्टिकल मन समजावतं…. आवरायला लावतं सामान आणि भावना !!! तरी भावनिक मन चोरून याच्या नकळत काही पिशवीत भरतंच…………… आवरण्यातली ही गुंतवणूक !!
अप्पांनी रात्रीच मनाशी जुळवाजुळव करून कादंबरीचा आराखडा डोक्यात तयार करून ठेवला होता. पांढऱ्याशुभ्र कोऱ्या.. गुळगुळीत कागदांचा गठ्ठा.. पेन जागेवर आहे ना हे पाहीलं. त्यांनी विजयला सांगितले.. आज लेखनाला बसायचे आहे. आपल्या ‘दौलत’ बंगल्याच्या पश्चिमेकडे तोंडात करून असलेल्या खिडकीजवळचे टेबल म्हणजे त्यांची लिहीण्याची जागा.
स्नान वगैरे करुन.. शुचिर्भूत होऊन अप्पा आपल्या रिव्हॉलवींग चेअरवर बसले. बाजुला लेखनिक म्हणून त्यांचा मुलगा विजय.
हे अप्पा.. म्हणजेच जुन्या पिढीतील लोकप्रिय लेखक ना. सी. फडके. ते ज्या खुर्चीत बसले होते ती त्यांना भेट म्हणुन मिळाली होती. त्यांच्या पन्नासाव्या कादंबरीच्या.. ‘कुहु!कुहु!’ च्या प्रकाशन सोहोळ्यात.
तर अप्पांनी मजकूर सांगायला सुरुवात केली. अत्यंत वेगात. तो लिहुन घेतांना विजयची धांदल होई. ऱ्हस्व.. दीर्घ सांभाळायचे आणि अक्षरही सुंदर काढायचे यावर अप्पांचा कटाक्ष. चतकोर आकाराची १५-१६ पानं लिहुन झाली की अप्पा थांबत.
‘छान लिहिलं आहेस’ या अप्पांच्या शाबासकीसाठी विजय थांबुन राही. त्यांनी तसं म्हटल्यावर त्याचं हात दुखणं वगैरे पळुन जाई.
आप्पांच्या तोंडातून निघालेला शब्द अंतिम असे. सगळा पुर्ण विचार करुनच ते कथन करायला बसत. रात्री जेवण झाल्यावर पुन्हा एकदा ते आपल्या टेबलपाशी येत. लिखाणातल्या शुद्धलेखनाच्या चुका शोधून काढत. बाजूला असलेल्या समासात दुरुस्त्या लिहून ठेवत.
अशी फायनल झालेली कॉपी बघत रहावी अशी असायची. शिस्तबध्द.. नेटकेपणा.. आणखी देखणेपण लगेच नजरेत भरे.
अप्पांचे चिरंजीव विजय फडके सांगतात..
“आप्पा त्यांच्या खोलीत नसताना त्यांची फाईल उघडून ती बघावीशी वाटे. कागदावरच्या मार्जिनमध्ये आप्पांनी त्यांच्या झोकदार अक्षरात लिहीलेल्या शुध्दलेखनाच्या चुका बघाव्याशा वाटत. शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलेलं शुध्दलेखन माझ्या लक्षात नाही.. पण अप्पांच्या हाताखाली काम करता करता आपोआप लेखन शुद्ध होत गेलं. “
शेकड्यांनी कादंबऱ्या लिहिणारे सिध्दहस्त लेखक ना. सी. फडके. आणि त्यांचे लेखनीक म्हणुन काम करणारे त्यांचे चिरंजीव विजय फडके. दोघेहि ग्रेटच. आजच्या कॉम्प्युटर टायपिंगच्या जमान्यात तर ते अधिक मोठे वाटतात.
एक आश्रमात शिकला, महाशक्तींना आव्हाने देत समर्थ झाला, दुसरा शिकण्यासाठी वणवण भटकला, महाभागांकडून झालेले अपमान सोसूनही शांत राहिला.
एक विविध स्त्री रूपांना मोहवणारा मुरारी, दुसरा बालब्रह्मचारी.
राजकारण ते रण, दानव ते मानव, गीत ते नृत्य, मुरली ते सुदर्शन असा एक विश्वी विस्तारलेला, दुसरा आळंदीच्या पैसाच्या खांबाशी लेखणीत सामावलेला.
एकाने धर्माची स्थापना-अधर्माचा विच्छेद यासाठी युध्द केले, दुसऱ्याने खलाचे खलत्व संपवण्याचे पसायदान मागितले.
एक एकशेवीस वर्षे जगला, प्रचंड उलथापालथी घडवून, वृक्षाच्या तळाशी प्राणांतिक विध्द झाला.
दुसरा अवघ्या एकवीस वर्षात कार्य आटोपून वृक्षाच्या मुळाशी समाधीत बद्ध झाला.
अशी जीवनकथेत भिन्नता, पण वृत्तीची मात्र एकरूपता. बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण हे ठरवणे अवघड. एक योगेश्वर एक ज्ञानेश्वर. आधी एकाचे विस्तारणे आणि नंतर दुसऱ्याचे मूळ होऊन येणे, की आधी एकाने ज्ञानाचे मूळ लावून दुसऱ्याने त्याचा अर्थविस्तार करणे? जणू एकाने सर्व शक्तीनिशी समुद्र मंथन केले आणि दुसऱ्याने त्यातले अमृत आपल्या मुखी आणून घातले.
किंवा पहिल्याने स्वभावतः, सहजपणे जे केले ते दुसऱ्याने हळुवारपणे उलगडून दाखवले.
गीतेला मऱ्हाठीचा साज चढवताना ज्ञानदेवांनी जो अर्थविस्तार केला, तो अद्भुत आहे. गीतेचे मर्म सांगताना ते स्वतः विविध भूमिका जगले आहेत. ते अर्जुन होतात तेव्हा आपल्याच मनातल्या शंका स-विस्तार विचारतात. स्वतःकडे अडाणीपण घेतात. ते संजय होतात तेव्हा त्यांनाच रोमांच अनावर होतात.
ते भाष्यकाराच्या भूमिकेत जातात तेव्हा स्वतःकडे सानपण घेतात.
गुरूच्या कृपेला, व्यासांच्या प्रतिभेला अन श्रोत्यांच्या जाणतेपणाला श्रेय देऊन मोकळे होतात.
ते कृष्ण होतात तेव्हा मात्र त्याला कुरुक्षेत्रावर जे करता आले नाही ते करतात. ते अर्जुनाला खेंव देतात, त्याच्या चित्ताच्या आरशात कृष्णाला स्वतःला पाहू देतात. होरपळलेल्या अर्जुनाच्या चित्तावर उदार कृष्णमेघ होऊन बरसतात. त्याचा निर्मोही निळा शेला अर्जुनाच्या धनुष्याच्या प्रत्यंचेत गुंतू देतात. ते कृष्ण होतात तेव्हा त्याच्या अमानवी, दैवी वाटाव्या अशा कृतीमागचे मानवीपण आपल्याला उलगडून दाखवतात.
त्यांच्या कोवळ्या शब्दांत केवढे समंजस पौरुष दडले आहे!स्त्रीत्वाचा सन्मान, तिचे दुःख, त्यावरचा उतारा, सारं त्या बालयोग्याला किती नीट कळलं आहे!
अचाट पराक्रमाच्या गाथा, उत्कट प्रीतीच्या कथा आणि रणभूमीवरची गीता यातले कृष्ण जणू वेगवेगळेच असतात आपल्यासाठी.
आपल्यासाठी कालियामर्दन म्हणजे केवळ त्याचा अजून एक पराक्रम.
यमुनेच्या डोहात ठाण मांडून बसलेला कालियासर्प गोकुळवासियांचा काळ ठरत होता. यमुनेचे पाणी दूषित झाले होते.. कृष्ण कुठेही नेऊ शकला असता गोकुळाला!किंवा करू शकला असता तह कालियाशी.
पण त्याच्यासाठी यमुना निव्वळ नदी नाही. त्याच्या गोपालांना, त्याच्या गोधनाला पोसणारी त्यांची ती माता आहे. प्रत्यक्ष कृष्णाची तर ती सखी-सहचरी आहे.
कालिया तिच्या जलदेहाला तर विटाळतो आहेच, तिच्या पवित्रतेला नासवतो आहे. तिच्यासाठी हे अपमानजनक आहे. गोकुळाच्या लोकांसाठी तिचं पाणी म्हणजे अमृत होतं. तेच आता विषमय झालं होतं.
त्यामुळे गायी वासरं, मुलं लेकरं तिच्या तीरावर येईनात. पक्षीही तिच्यावरून उडेनात. मग कालियाचा नाश, विषाचे निर्मूलन आणि पुन्हा यमुनेने नांदते होणे. बालरूपातील कृष्णाचा अचाट पराक्रम.. इतके आपल्याला कळते.
पण ज्ञानेश्वर याच्याही पुढे जातात..
काळी सावळी कालिंदी. जीवनाने भरभरून वहाणारी, तिच्या जळांत उत्कट इच्छांची कमळे आणि तिच्या पात्रावरून मुक्त विहरणारे तिच्या स्वप्नांचे पक्षी. त्यांना तिच्यात जणू ‘कृष्णा’ दिसते. मुक्त, आत्मनिर्भर, सतत पुढे जात राहणारी मनस्वी युवती.
तिच्या मुक्ततेला बांध बसलाय कालियाचा, त्याच्या दुष्ट वासनांनी विळखा घालून तिला जखडलं आहे एका जागी. तिच्या वस्त्राला हात घातलाय इतकंच नव्हे, तर तिच्या
स्वाभिमानाला, तिच्या सन्मानाला डंख आहे हा. तिच्या मनात शल्य आहे या अवहेलनेचे. तिला दुःख आहे तिच्या अपमानाचे.
कृष्ण मानवापेक्षा संवेदनशील आहे. सहृदय आहे. त्याला तिची वेदना कळते. शरीराचीच नाही, मनाचीही.
तिच्या उरात काय सलते आहे हे त्यालाच कळते आहे फक्त.
‘हे असंच चालायचं’ म्हणून पाहत बसलेलं गोकुळ, ‘या क्रूर विषारी सर्पाला मारायला कोण धजावेल’ म्हणून मूकपणाने ती वाटच टाळणारे गोकुळ.. या भरल्या गोकुळात तो एकटाच आहे, ज्याला हे जाणवलं.
म्हणून कालिया मर्दनाचं वर्णन ज्ञानेश्वर केवळ पराक्रमाच्या अंगाने करत नाहीत. पराक्रम आणि पराभव या इतकंच महत्वाचं आहे ते प्रयोजन.
कृष्णाने पराक्रम करून कालियाचा पराभव केला त्यामागचा त्याचा हेतू गोकुळाचा पाण्याचा स्रोत शुद्ध करणं इतका मर्यादित असू शकत नाही, हे ज्ञानदेवांना जाणवलं. कालिंदीला दुःखमुक्त करणं, तिच्या हृदयातला सल काढून टाकणं हे कृष्णाचं प्रयोजन आहे.
म्हणूनच असा कृष्ण कृष्णेला तिचा सखा वाटतो. कारण त्यालाच हे समजतं..
तिला वाहू देणं, तिला निर्धास्तपणे उचंबळता येणं हे त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे!
गोकुळाला निर्धास्तपणे पाणी-धुणी करता येणं यापेक्षा कितीतरी अधिक महत्वाचं !
त्यामुळेच ज्ञानेश्वर लिहितात,
कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें ।
जेणें मियां जळत गोकुळ राखिलें ।
वासरुवांसाठी लाविलें ।
विरंचीस पिसे ।।
समस्त स्त्री जातीचं ऋण फेडणं सुचवतात ज्ञानेश्वर. तिचं दुःख संपवणं हे तिला मुक्त करणं नाही, तर तिचं ऋण फेडून आपण मुक्त होतो आहोत हे ज्ञानदेवांचा कृष्ण दाखवून देतो.
स्त्रियांबाबत अशी संवेदनशीलता ही आमची परंपरा आहे, ही प्रवाहित व्हायला हवी. असे कान्होबा-ज्ञानोबा जर पावलोपावली उभे रहातील तर हे शल्य मुळापासून उपसून टाकणं अशक्य नाही!
लेखिका : सुश्री विनीता तेलंग
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सरणावर टाकलेलं चारित्र्य… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
सोमवार संध्याकाळची वेळ होती. पुण्यात पाऊस अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे त्याचं कर्तव्य बजावत होता. एक पालक भेटायला येणार होते, पण अजून पोचले नव्हते. मी टेबलाशी बसून स्व. डॉ. स्नेहलता देशमुख यांचं “अरे संस्कार संस्कार” वाचत होतो. तितक्यात माझी पत्नी आतून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिनं तिच्या स्मार्टफोन वर एक व्हिडिओ मला दाखवला. तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलेला एक तरुण. मिशा नाहीत अन् दाढी राखलेला. गळ्यात बांगलादेश चा राष्ट्रध्वज आणि दोन्हीं हातात स्त्रीची अंतर्वस्त्रे एखाद्या विजयी वीरासारखी तो नाचवत होता.. !
तो व्हिडिओ मेंदूऐवजी आधी मनातच घुसला. काही क्षण तर आपण नेमकं काय पाहतो आहोत, हे समजून घेण्यातच गेले. तो व्हिडिओ मी आठ दहा वेळा वारंवार पाहत राहिलो. जल्लोष करणाऱ्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो.
साधारण पंचविशीचा किंवा त्याहूनही लहान वयाचा तो तरुण असेल. ७६ वर्षं वयाच्या आपल्या देशाच्या महिला पंतप्रधानांच्या घरी घुसतो, घरात नासधूस करतो, महिला पंतप्रधानांच्या कपड्यांचं कपाट उचकतो आणि त्यातून त्यांची अंतर्वस्त्रं काढून घेऊन ती अत्यंत उन्मादानं कॅमेऱ्यासमोर नाचवतो.. ! तो व्हिडिओ पाहताना एका बाजूला लाज वाटत होती, दुःख होत होतं अन् दुसऱ्या बाजूला विलक्षण संताप होत होता.
त्याच लिंकवर आणखी फोटो दिसायला लागले. काही तरुण अत्यंत आनंदानं पंतप्रधानांच्या साड्या गुंडाळून फिरत होते, त्यांचें ब्लाऊजेस दाखवत होते.. ! विशेष म्हणजे, यात बांगलादेशी तरुणीदेखील सहभागी होत्या आणि स्वतः स्त्री असूनही त्यांना ह्या कृत्याची किंचितही लाज वाटली नाही आणि त्यात काही गैर आहे असंही वाटलं नाही.. !
बांगलादेशातली राजकीय धुमश्चक्री मीही इंटरनेटवरुन पाहत होतो, माहिती घेत होतो. भारत-बांगलादेशचं निर्यात धोरण आता धोक्याच्या वळणावर आहे, हे सरळ सरळ दिसत होतं. बांगलादेशातली उद्योगव्यवस्था आणि साहजिकच अर्थव्यवस्था या दोन्हींचा बोजवारा उडाला तर येत्या काळात दयनीय अवस्था निर्माण होणार आणि बांगलादेशातले अल्पसंख्य नागरिक त्यांचं चंबूगबाळं उचलून, बायका-पोरं काखोटीला मारुन जगभर निर्वासित म्हणून फिरणार, हे सगळं कळत होतं. बांगलादेशातले एक कोटी हिंदू रहिवासी नागरिक आता काय करतील, हा प्रश्न गेल्या काही दिवसांत हजारदा मनात येऊन गेला असेल.. !
पण हे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले आणि जाणवलं की, या अल्पसंख्य हिंदूंमधल्या स्त्रिया अन् मुलींचं काय होईल ? “जीव वाचवायचा असेल तर शीलाला तिलांजली द्या” असा प्रकार सुरु झाला तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही, अशी सामाजिक परिस्थिती तिथं नग्नसत्य बनून उभी आहे.. ! सच्चिदानंद शेवडे गुरुजींचं “रक्तलांच्छन” हे पुस्तक तरुणांनी तर वाचावंच, पण त्याहीपेक्षा पालकांनीच वाचणं अधिक गरजेचं झालं आहे.
राजकीय आंदोलनाला एखाद्याची चिथावणी असू शकते, पाठिंबा असू शकतो, कट-कारस्थानं असू शकतात, हे सगळं मान्य. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणं आणि तिथं धुडगूस घालणं, फर्निचर पळवून नेणं हे खरोखर चुकीचं असलं तरीही त्या वागण्याला अख्ख्या जगात “जनक्षोभ” असं गोड नाव दिलेलं असल्यामुळे त्यातला सामाजिक गुन्हा आता जवळपास नामशेष झाला आहे.
पण देशातल्या तरुणांनी आंदोलन किंवा जनक्षोभाच्या नावाखाली महिला पंतप्रधानांच्या अंतर्वस्त्रांची माध्यमांसमोर जाहीर बीभत्स विटंबना करणं, हे आता काहीतरी भलतंच सांगू पाहतंय.. ! ह्या तरुणांच्या आयांना, बहिणींना, आत्यांना, मावश्यांना, माम्यांना हे फोटो बघून काय वाटलं असेल हो ? धर्म कुठलाही असो, पण स्त्री चारित्र्याची अशा पद्धतीनं जाहीर वासलात लावणं, हे आधुनिक जगाच्या कुठल्या जीवनशैलीत बसणारं आहे ?
आपल्या देशात हे घडलं असतं आणि अशा तरुणांवर गुन्हा दाखल झाला असता तर काय झालं असतं ? सगळ्यात पहिलं म्हणजे, घटना घडल्यानंतर चार पाच दिवसांनी माध्यमांनी या तरुणांना नराधम वगैरे म्हटलं असतं, दिवसरात्र महाचर्चांची गुऱ्हाळं चालवली गेली असती, शे दोनशे सामाजिक विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक यांनी सह्यांची मोहीम केली असती आणि आठ दहा नामांकित वकिलांची फौज उभी केली असती. दुसरी एखादी याहून सनसनाटी घटना घडेपर्यंत मीडियाचा तोफखाना सुरु राहिला असता. पंधरा दिवसांनी समाजच हा विषय विसरुन गेला असता. आजवर हे असंच घडत आलेलं आहे. पण आता जनक्षोभाचा नवा पैलू अवतार घेतो आहे.. ! राजकीय किंवा सामाजिक विरोधातून सुरु झालेलं वैमनस्य आता नैतिकतेला अन् महिलांच्या चारित्र्यालासुध्दा पायदळी तुडवत सुटलं आहे.
“पद्धतशीर विसंवेदन” नावाचं एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. माणसांना भावनिकदृष्ट्या बोथट किंवा संवेदनाशून्य कसं केलं जातं, याचं हे एक प्रमुख तंत्र आहे. ते वैयक्तिक आयुष्यापासून ते समाज, देश, राष्ट्र अशा सगळ्या पातळ्यांवर उपयोगात आणलं जातं. समाजात सर्वदूर सगळीकडे अनैतिक घटनांचा असा महापूर आणायचा की, लोकांच्या त्याविषयीच्या भावना, संवेदना तेच तेच पाहून, ऐकून, वाचून पार बोथट होत जातात. “आता नैतिकता आणि चारित्र्यापेक्षा आमची भावना महत्त्वाची” याच मार्गावर चालण्याचा पायंडा पाडला गेला तर आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्रात तर याची सुरुवात केव्हाच झाली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ते आनंदानं स्वीकारलं आहे. मराठी “कॉमेडी शो” ने या प्रकरणाचा शुभारंभ केव्हांच केला आहे. विनोदाच्या नावाखाली पुरुषांनी स्त्री भूमिका करणे हा तर उघड स्वैराचार चालला होता. “ह्याला विनोद म्हणा” असा आग्रह जर शरद तळवलकर, राजा परांजपे, राजा गोसावी, अशा लोकांच्यासमोर धरला असता तर ही माणसं झीट येऊनच पडली असती. समीर चौगुले नामक माणूस विनोद निर्मितीच्या नावाखाली काय काय आचरट चाळे करतो, हे इथे नव्यानं सांगायला नको. पुरुष कर्मचाऱ्याने ऑफिसात परकर परिधान करून जाणे, स्त्री ला जाहीर मुलाखतीत “पावसाळ्यात चड्डी कशी वाळवता” असा प्रश्न विचारणे, असले अनंत आंबट चाळे या माणसाने विनोद या नावाखाली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले आहेत. त्याची साथ द्यायला बाकीचे तथाकथित कलावंत आहेतच. विनोदाच्या नावाखाली गौरव मोरे “थंडीत तुझी कोळंबी होते” असं म्हणतो, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. वनिता खरात आणि समीर चौगुले विनोदाच्या नावाखाली एकमेकांना छातीवर धडकतात, त्याचा प्राजक्ता माळी आणि प्रसाद ओक वन्स मोअर देतात, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. एका स्टॅण्डअप कॉमेडी शो मध्ये अंकिता वालावलकर ” रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बॉयफ्रेंड अचानक कार थांबवून रस्त्यात उतरला आणि मूत्र विसर्जन करु लागला. “मी प्रकाशात पाहिलं तेव्हा कळलं की केवळ ह्याचा मेंदूच छोटा नाहीय” असं म्हणते, मराठी माणसांना तो विनोद वाटतो… !
आता ‘विनोद असेच असतात’ असा मराठी माणसांचा ठाम समज झाला असेल तर ते स्वाभाविकच आहे. कारण, विनोदाच्या नावाखाली वारंवार त्याचाच मारा करण्यात येतो आहे. समाजमन उथळ आणि आंबट होण्यात या असल्या प्रकरणांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे, हे आपणच लक्षात घेण्याची गरज आहे.
एकही स्त्रीवादी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत या प्रकरणाचा निषेधही करत नाही आणि तक्रारही करत नाही, हे तर त्याहून जास्त धक्कादायक आहे. मग आपण नेमकी कोणती संस्कृती जन्माला घालतो आहोत, ह्याचा विचार कुणी करायचा?
“सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे” असे समर्थांनी म्हटलेलं आहे. ते आपण नेमक्या कोणत्या बासनात गुंडाळून ठेवलेलं आहे? आणि कशासाठी?
आज बांगलादेशातल्या तरुण आंदोलकांनी चारित्र्याच्या बाबतीत जी नीच पातळी गाठली आहे, तिचं लोण जगभर पसरणार नाही, ह्याची कुणाला खात्री आहे? राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद अगदी अवश्य असू शकतात, पण ते महिलांच्या चारित्र्याची विटंबना करण्यापर्यंत यावेत, हा अध्याय गंभीर आहे. केतकी चितळे ला महाराष्ट्रात ज्या भाषेत ट्रोल केलं गेेलं आहे, त्यात हे नैतिकतेचं पारडं पार गंजून खलास होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसलेलं आहे.
समाजातल्या तरुण वर्गाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा घाणेरडा डाव महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरु आहे. त्या धगीचे चटके बसत असतानाच हे सांस्कृतिक प्रदूषणाचं वारं आणखी भर घालत सुटलं आहे, हे काळजीचंच लक्षण आहे.
कुटुंबांचा आपल्या घरातल्या तरुणांवर असलेला प्रभाव नष्ट होत चालला आहे का, असा शोध घ्यायला भरपूर वाव आहे. आपली मुलं मोठी झाली, वयात आली, त्यांना आपण स्वातंत्र्य दिलं, हे सगळं खरं. पण त्यांच्या वैचारिक संतुलनाचं काय, असा प्रश्न आता पालकांना स्पष्टपणे विचारण्याची वेळ आली आहे. आपली मुलं कुठं जातात, काय करतात, कुणासोबत फिरतात, कुणाच्या सहवासात असतात, त्यांची सामाजिक प्रतिमा कशी आहे, या सगळ्यांची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ? आपली मुलं स्मार्टफोनचा, इंटरनेटचा नेमका कशासाठी उपयोग करतात, हे पालकांना माहित असायला नको का ? आता या प्रश्नांची उत्तरं समाजानं सगळ्या पालकवर्गाला विचारायला हवीत. तरुणांच्या स्वातंत्र्याला, अभिव्यक्तिला, ऊर्जेला नैतिकतेची, विवेकाची आणि तारतम्याची भक्कम चौकट असणं ही केवळ आपलीच नव्हे तर संपूर्ण जगाची गरज आहे. कुटुंबव्यवस्थेनं तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवलं नाही तर, आज बांगलादेशातले फोटो दिसतायत, उद्या आपलीही मुलं त्याच गोष्टी करताना दिसली तर, त्या पापाला कुठल्याच प्रायश्चित्ताचा काहीही उपयोग नसेल…!
आपल्या भावना योग्य प्रकारे आणि सामाजिक- सांस्कृतिक- नैतिक चौकटीत राहूनच व्यक्त करणं, भावनांवर योग्य पद्धतीनं नियंत्रण मिळवणं आणि स्वतःला इतरांच्या स्वार्थाचा बळी होऊ न देणं ही कौशल्यं केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या तरुण पिढीला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर या सगळ्याचे फार भीषण परिणाम सगळ्यांना भोगावे लागण्याचा दिवस आता फार काही दूर असेल असं वाटत नाही.. !
हे हवं तेव्हढं पैकी घ्या तुमास्नी पर माझ्या लेकराला आपल्या मायची माया तेव्हढी तुमच्या देशात इकत घेऊन द्या…. आता तो लै मोठा सायेब झालाय न्हवं..
पार तिकडं सातासमुद्राच्या पल्याड… तिथं त्येला समंधी हायती घरची दारची गोतावळ्याची… घरात लक्ष्मीवानी बायकू दोन पोरं हायती… आनी बाकी मस हायती पैश्याला पासरी असल्यावानी… अन हिकडं म्या त्येची एकच आय हाय… तळहाताच्या फोडावानी जपला, वाढवला मोठा केला… त्यो चार वरसाचा असताना त्येचा बा ॲक्सिडंट मधी खपला.. तवापासून म्या एकटीनचं या माझ्या पोराचं केलं… तो दिसा माजी मोठा बापय गडी होत गेला नि म्या साडेतीन हाताचं मुटकुळं होऊन इथं एकलीच पडलेय… तुमच्या सारखी त्याचे मैतर येत जात असतात घराकडं त्याच्यकडनं सांगावा नि पैक्याची चवड आणून देतात… परं पोरगं एकदा बी नदरंला पडाया न्हाई… आपल्या अडानी, काळ्या रंगाच्या खेडूत आयची त्येला आता लाज वाटतीया… त्या गोऱ्या कातडीच्या बाईनं त्याच्यावर चेटू केलया.. त्यामुळं त्येला आपली आय, आपलं घर, आपलं गावं समध्याचा इसर पडलाया… त्येचा मैतर मला एकदा म्हनला मावशे रघुनाथ आता तिकडं घरजावई झालाय आनि इकडं कंदीच आयेला, गावाला भेटायला जायाचं न्हाई अशी शपथ घातलीया… तवा कुठं त्येला पैश्यापरी महलाची सुखं मिळतात… रघुनाथ सासूला नि सासऱ्यालाच आई बा मानतो… पन तुला अजून इसरला न्हाई म्हनून पैसंं तरी धाडतो… एव्हढी तरी काळजी घेतोय हे काय कमी हाय का… रघुनाथच्या मायन्ं त्या आलेल्या मैतराला त्यानं दिलेल्या पैश्यातलं एक बिंडोळं परत त्याच्या हाती देत म्हटलं तुमच्या तिकडं मायची माया जर इकत मिळत असलं तर तेव्हढी त्येला तुम्हीच इकत घेऊन देयाल का… एक आईचं तुटणारं आतडं तेव्हढ्यानं तरी कायमचं शांत होईल…
(पूर्वसूत्र – “आणखी एक. मनात आले ते बोललो नाही तर मलाच चैन पडणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही काल एवढा त्रास सहन करून दत्तदर्शनासाठी वाडीला गेलात तेव्हाच तुमच्या मनातल्या भावना महाराजांपर्यंत पोचल्या आहेत. आणि त्याच महत्त्वाच्या. त्यामुळे आता परत जाऊन दिवसभर काम करून पुन्हा पौर्णिमेच्या दर्शनासाठी आज दुपारच्या बसने नृ. वाडीला यायची धडपड कराल म्हणून मुद्दाम हे सांगतोय. दगदग नका करू. “
सासरे सांगत होते. मी आज्ञाधारकपणे मान हलवली. निरोप घेऊन पाठ वळवली. पण मन स्वस्थ नव्हतं. नकळत का होईना पण आपल्याकडून घडलेल्या चुकीमुळेच आपला संकल्प सिद्धीस जाण्यात अडथळा निर्माण झाल्याची खंत मनात घर करून राहिली होती. हातातून काहीतरी अलगद निसटून जात असल्याच्या भावनेने मन उदास झाले होते. तीच उदासी सोबत घेऊन माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता!!)
एरवी सगळ्यांशीच मोजकं बोलणारे माझे सासरे आज भावनेच्या भरात कां होईना अंत:प्रेरणेने जे बोलले ते माझ्या काळजीपोटीच होते. पण त्यातही त्यांच्याही नकळत एक सूचक संदेश दत्तगुरुंनी माझ्यासाठी पेरुन ठेवला असल्याची जाणिव या परतीच्या प्रवासात माझ्या अस्वस्थ मनाला अचानक स्पर्श करुन गेली आणि मी दचकून भानावर आलो. एरवी नंतर मला कदाचित कामांच्या घाईगर्दीत जे जाणवलंही नसतं तेच ही जाणिव नेमकं मला हळूच सुचवून गेली होती!मी अक्षरश: अंतर्बाह्य शहारलो. ‘आज पौर्णिमा आहे. मी मनात आणलं तर आज पुन्हा दुपारच्या बसने नेहमीसारखं निघून नृ. वाडीला जाणं मला अशक्य नाहीय. सासऱ्यांनी जे मी करीन हे गृहित धरलं होतं त्याचा तोवर मी विचारही केला नव्हता. पण आता मात्र मी काय करु शकतो, करायला हवं याची नेमकी दिशा मला मिळाली आणि मनातल्या मनात त्याचं
नियोजनही सुरू झालं!अर्थात ते जमेल न जमेल हे माझ्या स्वाधीन नव्हतं. जमायचं नसेल तर कांहीही होऊ शकतं. बस चुकणं, ती मिळाली तरी बंद पडणं, वाटेत अपघात होणं किंवा आज बॅंकेत पोचताच अचानक आॅडिट सुरु होणं, ए. जी. एम् अचानक ब्रॅंच व्हिजिटसाठी येणं असं कांहीही. यातल्या कोणत्याच गोष्टी माझ्या हातातल्या नव्हत्या आणि त्यापैकी कांही घडलंच तर त्याला माझा इलाजही नव्हता. अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं एवढंच मी करू शकत होतो आणि ते मी करायचं असं ठरवून टाकलं!!
त्यामुळे अर्थातच प्रवास संपताना मनातली अस्वस्थताही कमी झाली होती. ब्रॅंचला गेल्यानंतर मात्र असंख्य व्यवधानं तिथं माझीच वाटच पहात होती. त्यामुळे कामाचं चक्र लगेच सुरु झालं न् पुढे बराच वेळ श्वास घ्यायलाही फुरसत मिळाली नाही. रांजणेंच्याजवळ मनातला विचार बोलून ठेवायचंही भान नव्हतं. गर्दीचा भर ओसरला तेव्हा सहज माझं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं. दुपारचे दोन वाजून गेले होते. मी रांजणेना नेमक्या परिस्थितीची कल्पना दिली. सहज शक्य झालं तर आज सव्वातीनच्या बसने परत नृ. वाडीला जाऊन यायची इच्छा असल्याचंही त्यांना सांगितलं.
“अजून तुमचं जेवणही झालेलं नाहीय. मेस बंद होण्यापूर्वी तुम्ही लगेच जाऊन जेवून या. तोवर मी आधी कॅश टॅली करून ठेवतो. म्हणजे कॅश चेक करून तुम्हाला निघता येईल. बाकीची माझी कामं तुम्ही गेल्यानंतर मी केली तरी चालू शकेल. ” रांजणेंनी मला आश्वस्त केलं. त्याक्षणानंतर सगळं मार्गी लावून मी स्टॅंण्ड गाठलं. बसमधे मनासारखी जागा मिळाली. मान मागे टेकवून मी शांतपणे डोळे मिटले. आदल्या दिवशी याच बसमधे मी असाच बसलो होतो तेव्हा पुढे काय घडणाराय याबाबतीत मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. त्यानंतरच्या सगळ्याच घटना माझ्या नजरेसमोरुन सरकत जात असताना मला त्या स्वप्नवतच वाटत राहिल्या.
नृ. वाडीला पोचलो तेव्हा मनातली उत्कट इच्छा फलद्रूप झाल्याचं समाधान मन उल्हसित करीत होतं!दत्तदर्शन घेताना आत्यंतिक आनंदभावनेने मन भरून येत असतानाच माझी मिटली नजर ओलावली होती!
दर्शन झाल्यानंतर हीच कृतार्थ भावना मनात घेऊन मी पायऱ्या चढून वर आलो आणि मला वास्तवाचं भान आलं. रात्रीचे दहा वाजत आले होते. इथेच मुक्काम केला तर पहाटे वेळेत सांगलीला पोचून सहाची बस मिळवणं शक्य होणार नव्हतं. त्यासाठी मुक्कामाला सांगलीला जाणं आवश्यक होतं.
सांगली स्टॅंडला बस येताच मी घाईघाईने बसमधून उतरलो. पावलं नकळत सासुरवाडीच्या घराच्या दिशेने चालू लागताच मी थबकलो. तिथे जाणं मला योग्य वाटेना. काल सासऱ्यांनी पोटतिडकीने मला जे करु नका असं सांगितलं होतं नेमकं तेच मी केलेलं होतं. ‘आता त्यांच्याकडे जायचं तर हे लक्षात येऊन त्यांचं मन दुखावलं जाऊ शकतं. तसं होऊन चालणार नाही’ असा विचार मनात आला. मी परत फिरलो. खिशातल्या पैशांचा अंदाज घेतला. केवळ दोनतीन तास पाठ टेकण्यासाठी लाॅजवर जाणं ही त्याक्षणी गरज नव्हे तर चैन ठरणार होती हे लक्षात आलं आणि पुन्हा स्टॅण्डवर आलो. ती पूर्ण रात्र सांगली स्टँडवर बसून काढली!
स्टॅंडच्या बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. कारण मनातलं पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान त्यावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला स्वच्छ आठवले.
‘दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळेच ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकालाच जमत नाही. निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात. तेच आपल्या कसोटीचे क्षण!जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात…!’
त्या रात्री बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!
☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
जय भवानी •••जय शिवाजी••• म्हणताना उर जसा अभिमानाने भरून येतो ना, शिवाजीचे कर्तृत्व आठवून रक्तामध्ये एक अनोखी शक्ती निर्माण होऊन, एक जोष निर्माण होतो ना••••
तसाच •••किंबहुना त्याहुनही जास्त जोष, किमान सर्व पुरंदरे यांच्या अंगी येतो•••• तो म्हणजे शिवचरित्र, शिवाजी महाराज, घरोघरी पोहोचविणाऱ्या, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे हे नाव उच्चारले की••• हे आदरणीय व्यक्तिमत्त्व समोर दिसले की, आत्ताच 98 व्या वर्षी काढलेले उद्गार आठवतात ••• त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, मी माझ्या मनात एक आठ – नऊ वर्षाचे मूल जपलेआहे. त्यामुळे त्यांचे भाव हे मला चिरतरुण, दीर्घायू करायला मदत करत आहेत.
असेच छान छान उद्गार, छान छान विचार, आमच्या कानावर सतत पडत असल्याने, एक अभिमान वाटावा, असा आदर्श समोर आला••• अगदी ठरवलेले नसले तरी, त्यांची कृती, विचार, वागणे, बोलणे, रहाणे, हे सगळे नकळत मनावर बिंबवले गेले••• नव्हे मनात रुजले गेले आहे••• आणि हेच बीज अंकुरून आता कुठे तरी त्यांची पाऊलधूळ मला स्पर्श करण्याचे सामर्थ्य आले आहे असे वाटते.
विचारणारे विचारतात श्री बाबासाहेबांकडून तुला हा वारसा मिळाला आहे का? तर नक्कीच, अगदी अभिमानाने, ‘हो’ असे उत्तर येईल••• पण मुळात, पुरंदरे हा इतिहासच एवढा रोमांचक आहे की, त्यातून पुरंदरे नसणाऱ्यांना सुद्धा स्फूर्ती येईल•••
मी आता इतिहास म्हटले तो म्हणजे किती तरी पिढ्यानुपिढ्या आलेले रक्तातून रक्तात आलेले संस्कार हा पुरंदर इतिहास सुद्धा मला वाटतं बाबासाहेब यांच्यात संशोधनातून पुढे आला आहे पुरंदरे दप्तर यामध्ये असलेली रंजक माहिती ती पुन्हा नवीन पुरंदरे दप्तर यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली आहे पण म्हणतात ना गेल्या दहा पिढ्या बद्दल जास्त नाही सांगता आले तरी आज श्री बाबासाहेब पासून आमची मुले किंवा त्यांची नातवंडे अशा पिढ्यांमध्ये श्री बाबासाहेबांचा आदर्श घेतला जातो आहे त्यांच्याकडे बघून आम्ही बाबासाहेबांचे पुरंदरे या नात्याने वंशज आहोत आणि त्यांच्या कर्तुत्वाचा बोलण्याचा आणि खाण्याचा प्रचंड प्रभाव पडल्यामुळे आज मी जे काही थोडेफार लिखाण करू शकते ते शक्य झाले.
माझे वडील, सासवडचे श्री नानासाहेब पुरंदरे, एक अनोखे साहित्यप्रेमी, साहित्य रसिक होते••• त्यांनी फार जास्त लिखाण केले नसले तरी, श्री बाबासाहेबांसह अनेक साहित्यिक आमच्या घरी यायचे, राहायचे, साहित्यिक चर्चा व्हायच्या••• हे सगळे संस्कार, मनावर होत गेले••• आणि ज्या मातीत आपण रुजले गेलेलो असतो त्या मातीचे संस्कार, शिकवावे लागत नाहीत•••तर ते आपोआप होतात••• त्याप्रमाणे पुरंदर्यांचे संस्कार हे आपोआप झाले.
श्री बाबासाहेबांची चालणारी शिवचरित्र व्याख्यानमाला, ही आठवडाभराची पर्वणी असायची•• ती व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली जायची, पण त्या काळात घरी असलेला मुक्काम •••त्यात नामवंत लोकांबरोबर झालेल्या चर्चा •••यातून त्यांचे बारकाईने निरीक्षण होत होते •••त्याची छाप कुठेतरी मनावर खोल पडली गेली. •••
त्यामुळे स्वाभिमानी, पण नम्रपणा हा आपोआप गुण आला असावा••• लहानपणी त्यांच्या भाषणातूनच या बाबासाहेबांची ओळख झाली •••हे आपले काका आहेत हे सांगताना होणारा आनंद अवर्णनीय असायचा••• पण त्यांचे लहानपण मात्र आम्ही मोठे झाल्यावरच कळले.
सासवडच्या राहणाऱ्या मोरेश्वर पुरंदरे यांच्या कुटुंबात 29 जुलै 1922 रोजी या सुपुत्राचा जन्म झाला •••आणि हौसेने या बालकाचे नाव, ‘बळवंत’ ठेवले गेले••• तेच हे ब. मो. तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे•••
यांना लहानपणापासून त्यांच्या वडिलांमुळे गड किल्ल्याची आवड निर्माण झाली. वडील छान गोष्टी सांगायचे, तशी गोष्टी सांगायची आवड निर्माण झाली; आणि वयाच्या आठव्या वर्षी एक कीर्तनकार न आल्यामुळे, नरसिंह अवताराची गोष्ट त्यांना सांगायला लागली.
निर्भीडपणे सर्व लोकांमध्ये त्यांनी सांगितलेली ही कथा सगळ्या गावकऱ्यांना आवडल्यामुळे हेच त्यांच्या वक्तृत्वाचे मोठे कारण झाले.
याच गोष्टीचे साधर्म्य, शिवबांनी अफजल खानाचे पोट फाडले••• या कथेशी वाटून, त्यांना शिवचरित्राचा ध्यास लागला; आणि याच नादातून, ध्येयातून, त्यांनी शिवचरित्राची निर्मिती केली.
शिवचरित्र लिहून झाल्यावर, ते छापायला पैसे नसल्याने, भाजीपाला विकूनही त्यांनी ही रक्कम जमवली.
याच कथेतून, ध्येयासक्ती कशी असावी •••, पैसे नसले तरी कष्ट करण्याची तयारी असणे•••, आणि त्यासाठी पडतील ते कष्ट घेतले पाहिजेत •••आणि सगळ्यात महत्वाचे मनात जिद्द असावी••• असे अनेक गुण त्याचे महत्त्व हे न सांगता मनावर बिंबले गेले •••आणि यातूनच आपणही काही लिहावे •••कष्टाला डगमगू नये••• जिद्द धरावी हे गुण आले आहेत असे वाटते•••
श्री बाबासाहेबांच्या लिखाणाचा प्रभाव इतका पडला की, अलीकडे मी शिवाजीच्या दहा-बारा कथा पावसाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे •••त्यातील काही कथा मी माझ्या फेसबुक वरूनही प्रसारित केल्या आहेत.
बाबासाहेब हे कधीच प्रसिद्धी, कीर्ती, यांच्या मागे धावले नाहीत••• तर, शिवाजीच्या प्रेमापोटी, इतिहासाच्या ध्येया पोटी, आणि काहीतरी करून दाखवायची जिद्दीपोटी, ते आपले काम निस्वार्थीपणे करत राहिले••• आहेत •••आणि राहतीलही•••यात शंकाच नाही! त्यामुळेच, यातून झालेल्या परिणामामुळे, हा परिणाम फक्त बाबासाहेबां पुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्रात, भारतात, नव्हे तर••• विदेशातही जाणवू लागला••• आणि मग, त्यांची कृती इतकी सुंदर, ते खरोखर महान आहेत •••हे आपल्या कार्याने दाखवून दिल्यावर, वयाच्या 95 व्या वर्षी, त्यांना ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार मिळाला.
यापूर्वी त्यांना असंख्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पण आवर्जून सांगावेसे वाटणारी पुरस्कार म्हणजे, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, आणि पुरंदर्यांचे भूषण ठरलेले हे पुरंदरे भूषण!!!!!
त्यांचे मोठेपण सांगायचे झाले तर, त्यांचा धाडसी बाणा, लेखन शैली, स्मरणशक्ती, वक्तृत्व, आत्मविश्वास, आणि जिद्द••• हे वैशिष्ट्य, त्यांचे अनुकरण जे करु इच्छीतात, नियमितपणे त्यांचे लेखन वाचतात, ऐकतात, त्यांना आपोआप आशीर्वादाने मिळतोच; नव्हे हे सगळ्यांनी घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे.
अशा शिवशाहीर बाबासाहेबांची, वारसदार म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे •••त्यांच्याबद्दल एवढेच म्हणेन•••
श्री मंत सरदार,
बा वन कशी शिवाजी अभ्यासक,
बा णा शिवाजी धारक,
सा धी रहाणी उच्च विचारसरणी अंगीकारक,
हे रंब, भवानी उपासक,
ब हुमान अनेक संपादक,
पु ण्यनगरी चे रहिवासक,
रं ध्रोरंध्री शिवाजी ठासक,
द र महाराष्ट्रीयास प्रेरक,
रे शमी बोलीतून मनोवेधक,
पुरंदरे भूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे, आपणास आरोग्यमयी, उमेद देणारे, शांतीचे, समाधानाचे, राजा शिवछत्रपती गुणगौरव करणारे, प्रदीर्घ आयुष्य लाभलेले ••• आपली आशिष छत्रछाया, अशीच सगळ्यावर राहो••• हीच प्रार्थना •••
आणि बाबासाहेबांनी दिला, आत्मविश्वास, जिद्द, अभिमानाचा वसा,