☆ रतन टाटा यांची एक अविस्मरणीय मुलाखत ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆
“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”
जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: “सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला, ती आठवण सांगाल का”?
रतनजी टाटा म्हणाले: “मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.”
पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.
मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.
त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.
चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.
पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”
मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.
मुलाने म्हटले: “मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”
वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?
#कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.
भावपूर्ण श्रध्दांजली
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
या नश्वर जगात मृत्यू अटळ आहे, तोच सत्य आहे, हे सर्वांना माहीत आहे, पण कधीतरी हा मृत्यू असू नये असे अगदी मनापासून वाटते. काल आदरणीय रतनजी टाटा यांचे निधन झाले आणि वरील विचार माझ्या मनात आला…!
काही माणसे मरण येत नाही म्हणून जगत असतात, तर काही माणसे जगता येत नाही म्हणून मरणाची वाट पहात असतात…
तर काही माणसे मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा निगुतीने उपयोग करून आपला देह आपल्या देशाच्या प्रगतीसाठी लावत असतात, त्यासाठी कणाकणाने झिजत असतात…
अहो, हे काही पारतंत्र्य काळातील स्वातंत्र्य सैनिकाचे वर्णन नसून आपल्या रतनजी टाटांचे माझ्या अल्पमतीने केलेले वर्णन म्हणता येईल…
टाटा उद्योग समूह!!!!
भारताच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असा एक मोठा उद्योग समूह. भारताला ज्याची गरज आहे, त्याची निर्मिती आम्ही करतो, असा नुसते न म्हणता प्रत्यक्षात तसे आचरण करणारा (नफा तोट्याची चिंता न करता….!) उद्योग समूह…! देशभक्ती हा या उद्योग समूहाचा ब्रँड झाला असे म्हटले तर वावगे होणार नाही…!
एकेकाळी तर ५०१ बार पासून ट्रक पर्यंत टाटा अनेक वस्तू बनवत असत…
लिहिण्यासारखे भरपूर आहे…,
असो….
आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांच्या कडा भिजल्याशिवाय राहणार नाहीत कारण ज्या पिढीने पारतंत्र्य अनुभवले नाही, त्यांनी आदरणीय रतन टाटांच्या रूपाने खरा देशभक्त कसा असतो, हे पाहीले असे म्हणता येईल…!
रतन टाटांनी सामाजिक बांधिलकी जपत, आपल्या मूल्यांशी किंचितही तडजोड न करता आपला उद्योग व्यवसाय तर वाढवला आणि याच बरोबर आपल्या देशाची शान आणि मान सतत उंच राहील यासाठी आटोकाट प्रयत्न केले…
त्यांचे अलिबाग जवळ घर होते. मांडवा येथे त्यांना अनेकदा पाहण्याचा योग आला आहे. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे त्यांचे अगदी थोडक्यात वर्णन करता येईल…
एखाद्या उद्योग समूहाच्या प्रमुखाचा मृत्यू होणे हे अगदी नैसर्गिक आहे, पण जेव्हा तिथे रतनजी टाटा असतात तेव्हा निव्वळ उद्योगपती रहात नाहीत, तर आपल्या घरातील कोणी असतात…! माझ्या सारख्या सामान्य मनुष्याच्या मनापर्यंत त्यांच्या मनातील देशभक्तीची ऊब झिरपते, हेच त्यांच्या जीवनाचे यश आहे असे मला वाटते…
आज भारतमाता सुध्दा दुःखी असेल कारण तिच्या एका सुपुत्राला ती आता पाहू शकणार नाही…
मरावे परि कीर्ती रूपे उरावे…!!!
आदरणीय रतनजी टाटांच्या चरणी माझी ही शब्द सुमनांजली सादर समर्पित!!!! 🌹🙏
☆ उंची आभाळाएवढी… पाय मात्र जमिनीवर… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अतिमहत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर, एका ठिकाणी तातडीच्या मिटिंगला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती. आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता. सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.
गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात आले की मागील एक चाक पंक्चर आहे, त्याने ती गाडी एका बाजूला घेतली. आणि सर्वाना उतरायला सांगितले. सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता. मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले. कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले. कोणी झुडुपाआड गेले.
अर्ध्या तासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली तरी मात्र मालक नाही दिसले. सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेनात. दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर, मालक हातात स्पॅनर घेऊन.. शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून.. घामाघूम होऊन.. चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हरला स्टेपनीचे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले.
आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकाऱ्यांना मिळाला. “थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात. नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात… मालक नाही होता येत. “
त्या उद्योगपतीचे.. म्हणजे मालकाचे नाव.. “श्री. रतन टाटा”.. नाशिक येथे नेल्कोची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला हा प्रसंग … बरंच काही शिकवून गेलेला.
नवरात्र हा सण प्रामुख्याने मातृशक्तीचे जागरण करणारा आहे. त्यानिमित्ताने हा लेख…!
“या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”‘
खरंतर आईचे वर्णन करायला आई हा एकच शब्द पुरेसा ‘ बोलका ‘ आहे.
आई म्हणजे दया, क्षमा, शांतीचा सागर !!!
आजच्या मंगलदिनी…..
जननीस वंदन !
गोमातेस वंदन !!
भूमातेस वंदन !!!
भारतमातेस वंदन !!!!
गुरुमाऊलीस वंदन !!!!!
‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’,
‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’;
‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’
… अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद ही ”नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला असावा.
आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘ मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. आईच्या मातृत्वभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ ( प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसिकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” आणि माझ्या लेकरास शिवाजी म्हणून घडवायला जमलं नाही तर किमान शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून तरी घडवेन, असा उदात्त विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. निसर्गाने दिलेला ‘निर्मिती’च्या नैसर्गिक अधिकाराचा स्त्री शक्तीने उचित उपयोग करून घ्यायला हवा. हा प्रयत्न काही प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील, असे वाटते.
‘ देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’ याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसून क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक’ न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा या पेक्षा चांगला उपाय नसेल असे मला वाटते..
मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.
मातीच्या चार भिंती
त्यात माझी राहे आई
एवढे पुरेसे होई
घरासाठी….. !!
आदरणीय मातृशक्तीस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण !!
(पूर्वसूत्र- खूप दिवस वाट पाहून त्या दोघांनी घरच्या विरोधाला न जुमानता नुकतंच परस्पर रजिस्टर लग्न करून टाकलं होतं. दोन्ही घरच्यांनी या लग्नाला ठाम विरोध होताच. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून या दोघांनाही त्यांनी बेदखल केलं. त्यामुळे सुजाता नेहमीच दडपणाखाली असायची. तिने नवऱ्याच्या शिक्षणाची आणि घरखर्चाची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन वेगळं बि-हाड केलं आणि तिची तारेवरची कसरत सुरू झाली. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर होता!)
हीच सुजाता बोबडे मला लवकरच येणाऱ्या त्या अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाला निमित्त ठरणार होती याची त्या क्षणी मला कल्पना कुठून असायला?)
ब्रँचचा चार्ज घेऊन झाल्यानंतर लगेचच मी महत्वपूर्ण ग्राहकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. घरापासून ब्रॅंचपर्यंतच्या रस्त्याला लागून थोड्याच अंतरावर असलेल्या ‘लिटिल् फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ चा मी मनोमन तयार केलेल्या आमच्या महत्त्वपूर्ण ग्राहकांच्या यादीत खूप वरचा नंबर होता. मिशनऱ्यांनी चालवलेल्या या संस्थेच्या बचतखात्यांत बरीच मोठी रक्कम शिल्लक असायची. शिवाय आठवड्यातून दोन-तीनदा तरी थोड्याफार रकमेचा भरणा नियमित होत असेच.
विशेषतः सोलापूर कॅम्पसारख्या लहान ब्रॅंचसाठी खास करुन अशा ग्राहकांना सांभाळणं गरजेचं असायचं. त्या दिवशी सकाळी थोडं लवकर निघून मी मिस् डिसोझांना भेटण्यासाठी प्रथमच त्या संस्थेत गेलो. मिस् डिसोझा ‘लिटिल् फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ च्या प्रिन्सिपल कम व्यवस्थापक होत्या. अतिशय शांत, हसतमुख चेहरा. प्रसन्न आणि आदबशीर वागणं. कॉन्व्हेंटमधील स्टाफ नन्सची कार्यतत्पर लगबग आणि लक्षात यावी, रहावी अशी काटेकोर शिस्त मी प्रथमच अनुभवत होतो. प्रकर्षाने जाणवणारी प्रसन्न शांतता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच तेजोमय भासणारी येशूची मूर्ती माझ्या मनावर गारुड करतेय असं मला वाटू लागलं!
मी स्वतःची ओळख करून दिली. मिस् डिसोझांनी माझं हसतमुखानं स्वागत केलं. गप्पांच्या ओघात मी चांगलं सहकार्य आणि सेवेबद्दल त्यांना आश्वस्त करून त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली तेव्हा मात्र त्या थोड्या गंभीर झाल्यासारख्या वाटल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा लोपला. नजरेतलं हसरेपणही अलगद विरून गेलं. पण क्षणभरच. लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं.
“सी मिस्टर लिमये.. ” त्या बोलू लागल्या.
आमच्या ब्रॅंचमधील सेवेबद्दल त्या फारशा समाधानी नव्हत्या. आक्रस्तळेपणा किंवा आदळआपट न करता त्यांच्या मनातली ती नाराजी त्यांनी अतिशय सौम्य पण स्पष्ट शब्दात आणि तेवढ्याच डिसेंटली माझ्यासमोर व्यक्त केली.
हाकेच्या अंतरावरच्या आमच्या ब्रॅंचमधे आठवड्यातून दोन दिवस हातातली कामं बाजूला ठेवून त्यांची स्टाफ नन् पैसे भरायला बँकेत यायची. साधारण वीस-पंचवीस हजारांची रक्कम बँकेत भरून परत जायला तिला किमान दोन तास तरी लागायचे. घाईगडबडीच्या कामांमुळे, एवढा अनावश्यक दीर्घकाळ एका स्टाफला स्पेअर करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांची तत्पर सेवेची सरळसाधी अपेक्षा होती आणि त्यात मी लक्ष घालावं अशी त्यांनी विनंती केली. ‘बँकेतला एखादा कॅशियर इथे पाठवून आठवड्यातले दोन दिवस इथून कॅश कलेक्ट करणं शक्य होईल का?’ असंही त्यांनी मला मोकळेपणानं विचारलं. यातून मार्ग काढायचं आश्वासन देऊन मी त्यांचा निरोप घेतला.
त्यांच्या विनंतीचा विचार करायचा तर दोन कॅश-काऊंटर्सपैकी एक काऊंटर थोडा वेळ बंद ठेवून तो कॅशिअर स्पेअर करणं मला प्रॅक्टिकल वाटत नव्हतं. दोघांपैकी हेडकॅशियरना या छोट्याशा कामासाठी पाठवणं योग्यही नव्हतं. रहाता राहिली सुजाता बोबडे. पण तिच्या सध्याच्या अवस्थेत तिला हे काम सांगणं रास्त नव्हतं.
‘खरंतर ब्रॅंचमधे नेहमी येणारी पेट्रोलपंपाची कॅश वगळता रिसिव्हि़ंग कॅशकाऊंटरला फारशी गर्दी नसायचीच. तरीही स्टाफ ननला बँकेत पैसे भरून बाहेर पडायला इतका उशीर का व्हावा?’ मला प्रश्न पडला.
मी सुजाताला केबिनमधे बोलावलं. ‘लिटिल् फ्लाॅवर’चा विषय काढताच ती चपापली.
“.. त्यांची कॅश.. मी नाही सर, सुहास गर्देच घेतात. “
“कां? रिसीव्हिंग काउंटरला आहात ना तुम्ही?मग तुम्ही कां घेत नाही?” माझा आवाज मलाच चढल्यासारखा वाटला.
मान खाली घालून ती गप्प उभी होती.
“कांही प्रॉब्लेम?”
तिचे डोळे भरून आले.
“ठीक आहे. तुम्ही जा. सुहासना पाठवा. मी त्यांच्याशीच बोलेन. “
ती केबिनबाहेर गेली. त्या क्षणी मला तिचा भयंकर रागही आला आणि तिची
कीवही वाटली.
पण जेव्हा सुहास गर्दे केबिनमधे आले आणि त्यांनी सर्व पार्श्वभूमी मला समजावून सांगितली तेव्हा मात्र ते ऐकून मला आश्चर्य तर वाटलंच आणि हसूही आलं. प्रश्न मी समजत होतो तेवढा गंभीर नव्हताच. गंमत म्हणजे एरवी स्ट्रिक्ट डिसिप्लिन असणाऱ्या मिशनरी सिस्टीममधल्या ‘लिटिल् फ्लॉवर’ मधील स्टाफ ननज् आणि मिस् डिसोझानाही बँकेमधे रोख रक्कम भरण्याच्या साध्या साध्या प्राथमिक नियमांचीही काहीच जाण नव्हती. रोख भरणा करायच्या रकमेतल्या नोटा कशाही उलट सुलट लावलेल्या असायच्या. शिवाय पैसे भरण्याच्या स्लिपमधे नोटांचं विवरणही, किती रुपयांच्या किती नोटा वगैरे.. , भरलेलंच नसायचं. त्यामुळे या सगळ्या दुरुस्त्या आणि त्रुटी प्रत्येकवेळी स्वतः दूर करून त्या स्टाफ ननसमोर पैसे मोजून घेण्यात खूप वेळ जायचा. तिला थांबावं तर लागायचंच शिवाय या एकाच कामात गुंतून पडल्यामुळे सुजाताच्या काऊंटरसमोर ग्राहकांची गर्दी वाढत गेली की सुजाता भांबावून जायची. आत्मविश्वास गमावून बसायची. त्यामुळे सहजसोपा आणि सोयीचा मार्ग म्हणून सुहास गर्देनी ‘लिटिल् फ्लॉवर’ची कॅश स्वीकारायचं काम स्वतःकडेच घेतलं होतं. यामुळे सुजातापुरता प्रश्न सुटला तरी ‘लिटिल् फ्लावर’ चा प्रश्न मात्र अधांतरीच राहिला होता. आता मात्र स्वतः पुढाकार घेऊन तो मलाच सोडवायला हवा होता.
खरंतर त्यांचं काय चुकतंय हे त्यांना भेटून कुणी आवर्जून समजून सांगितलेलंच नव्हतं. बँकेकडून चांगल्या आणि तत्पर सेवेची अपेक्षा करणाऱ्या त्यांना ते सांगणं मला त्याक्षणी आवश्यक वाटलं.
पूर्वनियोजित वेळ ठरवून मी पुन्हा मिस् डिसोझांची भेट घेतली. त्यांना संबंधित सगळे नियम, पध्दती व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्याचं महत्त्व विशद केलं. त्या दिवशीची भरणा करायची रोख रक्कम आणि त्यांचं स्लिपबुक मागून घेतलं. त्यांनी स्टाफ-ननलाही बोलावून समोर बसवून घेतलं. हे सगळं नीट समजून शिकून घ्यायला सांगितलं. नोटा कशा अॅरेंज करायच्या, त्यांचं विवरण स्लिपमधे कसं भरायचं हे सगळं मी त्यांना समजून सांगितलं. त्याबरहुकूम स्वतःच करूनही दाखवलं.
“मी आज बॅंकेत जाताजाताच आलोय. तुमची हरकत नसेल तर आज हे स्लिपबुक आणि पैसे मी स्वतः बरोबर घेऊन जातो. वेळ मिळेल तेव्हा स्टाफ ननला स्लीपबुक घेण्यासाठी नंतर पाठवून द्या”असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला. ब्रँचमधे पोचताच कॅश न् स्लीपबुक सुजाताच्या ताब्यात दिलं. थोड्या वेळानं नन् आली. स्लीपबुक घेऊन दोन मिनिटात परतही गेली. एका गंभीर बनू पहाणाऱ्या साध्या प्रश्नाचं हे सोपं उत्तर सर्वांसाठीच सोयीचं होणाराय हे लक्षात आलं आणि आठवड्यातून ठरलेले दोन दिवस बँकेत येतानाच त्यांच्याकडे जाऊन, कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मी ती बँकेत घेऊन येऊ लागलो. सर्व ग्राहकांच्या बाबतीत ही अशी सेवा देणं शक्यही नसतं आणि ग्राहकांची तशी अपेक्षाही नसते. पण कधीकधी अशा अपवादात्मक प्रसंगी प्रश्न लगोलग सुटावा व महत्त्वपूर्ण ग्राहकाचं समाधान व्हावं यासाठी असे निर्णय घ्यावेच लागतात. कायदा आणि व्यवहार यांची अशी सांगड परिस्थितीनुसार घालावीच लागते.
‘ब्रँच मॅनेजर’ हे पद दुरून पहाताना कितीही मानाचं आणि आकर्षक वाटत असलं तरी खरं तर ते जबाबदारीचंच जास्त असतं. ग्राहक, कर्मचारी आणि वरिष्ठ या परस्परविरोधी पातळ्यांमधला महत्त्वाचा दुवा म्हणून काम करताना सन्मानाची झूल अशी बऱ्याचदा स्वतःचा आब राखून उतरवून बाजूला ठेवावी लागते. मी तेच केलं होतं!
काही दिवस हे असंच सुरळीत सुरू राहिलं. पण अचानक एक दिवस कांही घटनांना अनपेक्षितपणे वेगळं वळण लागलं आणि एका अनपेक्षित क्षणी या सगळ्या चांगल्यात मिठाचा खडा पडला आणि पुढे मला मुळापासून हादरवून सोडणारी ती एक नाट्यपूर्ण कलाटणी ठरली जी क्षणकाळापुरतं कां असेना मला हतबल करून गेली होती!
पुढे मला येऊ पहाणाऱ्या एका अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाची हीच पार्श्वभूमी ठरणार होती आणि सुरुवात सुद्धा!!
सकाळी सकाळी मोबाईल उघडला. कुठल्या तरी ग्रुप वर एका प्रसिद्ध मंदिरातील देवीचा फोटो आला होता. देवीला सुंदर पिवळ्या धमक रंगाची.. सोनेरी काठाची साडी नेसवलेली होती. त्यावरुन मला समजलं..
‘आजचा रंग पिवळा’
नवरात्रीचे नऊ रंग.. जिकडे पहावं तिकडे आज पिवळा रंग दिसणार. मोबाईल बघुन झाला.. सहज खिडकीबाहेर नजर टाकली. एक आजीबाई छान शुचिर्भूत होऊन काठी टेकत देवीच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. नववारी पातळात.. हो पिवळंच होतं ते. त्या आजींनी पण आता हा बदल स्विकारला होता. आज अगदी दुपट्या मधलं तान्हं बाळ देखील आज पिवळ्या झबल्यात दिसेल.
कुठल्या तरी वर्तमानपत्राने आवाहन केले.. आणि ही प्रथा सुरु झाली. हो.. प्रथाच. कोणी काहीही म्हटले.. कितीही विरोध केला.. टिका केली तरीही ही प्रथा आता नवरात्रीची परंपरा म्हणूनच ओळखली जाणार आहे. सेलीब्रेटींपासुन तर अगदी घरकाम करणाऱ्या स्रियांपर्यंत हे त्या त्या रंगांचं आकर्षण पसरलं आहे. परवाचीच गोष्ट.. परवाचा रंग निळा होता. एक अगदी गरीब.. झोपडीत रहाणारे.. हातावरील काम करणारं कुटुंब देवीच्या दर्शनासाठी आलं होतं. नवर्याने असाच चुरगळलेला, रंग उडालेला निळा टी शर्ट घातला होता. त्याच्या बायकोकडे पुर्ण निळी साडी नसावी. कारण प्राधान्य प्लेन.. गडद निळ्या रंगालाच असतं. तर त्याच्या बायकोने मग अशीच एक साडी निवडली.. त्यात अंतरा अंतरावर निळी फुले होती. त्यांच्या लहानग्याच्या अंगावर पण असाच निळसर आकाशी शर्ट होता.
सुरुवातीला फक्त स्त्रियांसाठी हे आवाहन केले गेले. त्यांनी त्या त्या रंगांच्या साड्या परिधान करून फोटो पाठवावे. कधी कोणाकडे त्या रंगाची साडी नसायची. मग ती त्या रंगाचा सलवार कमीज घालुन फोटो पाठवु लागली. हळुहळु पुरुष वर्ग पण यात सामील झाला. आज दिसेलच.. पिवळ्या रंगाच्या विविध छटांचे शर्टस्.. शर्ट नसेल तर टी शर्ट.. कुर्ते.. झब्बे.
गणपती विसर्जन झाल्यानंतर आठवड्याने या ‘नवरात्रीचे नऊ रंग’ चे वेध लागतात. मोबाईलवल कोणत्या दिवशी कोणता रंग असणार त्यांचं कोष्टक येतं. कोणता रंग कुठल्या वारी असा काही नियम नाही.. पण नवरात्रीतल्या शुक्रवारी मात्र हिरवा रंग ठरलेला असतो. कपाटातील साड्यांच्या आढावा घेतला जातो. त्या त्या रंगांच्या साड्या बाहेर काढल्या जातात. वर्षभर त्यांना हवा.. उजेड ही लागलेला नसतो. मग कुठली साडी ड्रायक्लीनींगला द्यायची.. कुठली साडी फक्त इस्त्रीला द्यायची हे बघितलं जातं. ही लाल साडी.. मागच्या वर्षी नेसलेली.. खुपचं खराब झाली आहे. मग काय?मग तश्याच रंगाची.. पण थोड्या वेगळ्या शेडची साडी धुंडाळली जाते. आणि ती सापडते पण. चला.. या नवरात्रीत या साडीवर काम भागवुन घेऊ.. कुठे नवर्याला खर्चात पाडायचं.. असाही विचार केला जातो.
नवरात्रात सर्व रंगांचे.. सर्व प्रकारचे कपडे पाहायला मिळतील. पण अजुन त्या त्या रंगांच्या जीन्स काही अद्याप पहायला मिळाल्या नाही. तसंच पॅंटस्.. पायजामे.. किंवा धोतरही अजुन पर्यंत विविध रंगांमध्ये फारसे बघायला मिळत नाही.
सोशल मीडियावर या ‘आजचा रंग.. ‘ वर टीका करणारेही बरेच जण आहेत. ही आपली प्रथाच नाही.. हा मार्केटिंगचा फंडा आहे वगैरे वगैरे. पण तरीही कोणीही त्याकडे फारसं लक्ष देत नाही. कारण मुळातच आपल्याला.. म्हणजे भारतीयांना सण उत्सव साजरे करणं.. त्या निमित्ताने नटणं.. सजणं वगैरे गोष्टी आवडतात. आणि या कारणाने अनेक जण नवनवीन खरेदी करतात. अनेकांना रोजगार मिळतो. बाजारपेठेत पैसा फिरतो.
आणि त्याही पलीकडे पाहीले.. तर असं रोजचं वेगवेगळ्या रंगांचं वातावरण नजरेला किती सुखावतं. रोजचं तेच तेच रुटीन.. गर्दी यातुन काहीतरी वेगळं हवं असतंच ना आपल्याला. मग त्यासाठीच तर असतात हे..
उद्या जर कोणी मला म्हटलं की कोहिनूरला हिऱ्याचा दर्जा मिळाला तर?
मराठी भाषा अभिजात आहे की नाही याबाबत संशय होता का ?
ती अभिजात आहे की नाही हे कोणी ठरवलं ? सरकारने?
सरकार केव्हापासून अस्तित्वात आलं…… पंचाहत्तर वर्षांपूर्वी.
मराठी भाषा साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीची.
अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भाषेला अभिजाततेचा दर्जा देणा-या सरकारचा दर्जा काय?
तो आमच्या अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेपेक्षा मोठा आहे का?
ज्ञानदेवांनी अमृताचा दर्जा दिल्यानंतर या भाषेला आणखी काही मिळावं अशी कशाला अपेक्षा असावी?
कशासाठी आम्ही हा दर्जा मागण्यासाठी रदबदली करत होतो ?
कुसुमाग्रज एकदा म्हणाले होते मराठी भाषा म्हणजे राजभाषेचा सोनेरी मुकुट डोक्यावर चढवून अंगावर लक्तरे गुंडाळून मंत्रालयाच्या दारात कटोरा घेऊन उभी आहे असे वाटते.
मराठी भाषा अभिजातच आहे परंतु तिचं अभिजातत्त्व टिकवण्यासाठी कोणी पुढे येत आहे का?
संस्कृत भाषेला यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता म्हणे! पण ती भाषा आता उरली आहे का?
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ती लोप पावली तरी आम्हाला तिच्याशी घेणं देणं नाही.
आम्हाला फक्त तिला अभिजातत्त्व मिळाल्यानंतर केंद्राकडून जे काही तीन चारशे कोटी रुपये अनुदान मिळणार आहे तेवढ्यातच रस आहे का?
बरं निदान ते अनुदान मिळाल्यानंतर त्या अनुदानातून मराठी शाळा उभाराव्यात, किंवा सध्या चालू असलेल्या मराठी शाळा चिमणी पाखरांनी भरून जाऊन त्या चालू राहाव्यात यासाठी प्रयत्न होणार आहेत का?
अभिजात दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रामधील सगळ्या शाळात किमान दहावीपर्यंत मराठी शिकणे अनिवार्य होणार आहे काय?
घराघरात, निदान किमान मराठी घरात, हो निदान मराठी घरात तरी मराठी म्हणजे फक्त मराठी बोलली जाणार आहे का?
आमच्या मुलांना पहिलं अक्षर आम्ही ग शिकवणार की ए?
लहानपणी अक्षर ओळखीसाठी जी वाचन प्रक्रिया होते, तेव्हा आमच्या मुलांना आम्ही मराठी पुस्तके आणून देणार का इंग्लिश?
आम्ही मुलांना कॉन्व्हेंट मध्ये का घालतो, आम्ही मुलांना इंग्लिश मीडियम मधून का शिकवतो याचं समर्थन वेगवेगळ्या प्रकारे करणारी अनेक मराठी घरं आहेत. असतील. ती वाढत आहेत आणि वाढत राहतील.
एका हळूहळू लोप पावणाऱ्या आणि पुराणभाषा म्हणून भविष्यात मानली जाऊ शकणाऱ्या संस्कृत सदृश्य आणखी एका भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबाबत आपण अनंतोत्सव साजरा करूया.
हळूहळू एक एक मराठी शाळा बंद करूया.
घरामध्ये मराठी भाषेत बोलणं आपण विसरून जाऊया.
मित्र मंडळीं मध्ये सुद्धा आपण मराठी भाषेत बोलतो का?
किमान समोर भेटलेला माणूस, अनोळखी माणूस, मराठी आहे हे माहीत असून सुद्धा त्याच्याशी मराठीमध्ये संभाषण करीत नाही.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मंत्रालयात आणखी एक सर्टिफिकेट फ्रेम मध्ये लागून कुठल्यातरी भिंतीवर अडकवलं गेलं असेल.
फोटो बिटो काढून होतील.
प्रसिद्ध होतील आणि त्याचा उपयोग संपेल.
काही वर्षांनी ते तिथून निघून एखाद्या अडगळीच्या खोलीत पडणार नाही याची खात्री कोण देणार?
बघूया, ही घटना निदान श्रेय वादाच्या लढाईत तरी कुणाच्यातरी उपयोगी पडते का?
सिग्मंड फ्राईड हे व्यवसायाने डॉक्टर होते. रोग्याशी प्रत्यक्ष संबंध आणि स्वतःची शास्त्रीय प्रतिभा वापरल्याने फ्राईड यांना मानवासंबंधी विलक्षण साक्षात्कार झाला. त्यांना मानवाचे एक आगळेच दर्शन घडले. त्यांना असे आढळून आले की, माणसाला होणाऱ्या रोगांपैकी कितीतरी रोग असे असतात की ते दिसतात शारीरिक, पण त्यांचे कारण असते मात्र मनात.
त्यांना असेही आढळून आले की रोग्याचे शरीर निकोप असले तरी मन निकोप नसते. काही विशिष्ट वासना, अत्यंत प्रबळ इच्छा, ह्या ना त्या कारणांनी दाबून-दडपून टाकाव्या लागल्यामुळे शरीरात या विशिष्ट रोगाची निर्मिती करतात आणि बाह्य लक्षणे दिसायला लागतात. ह्याचे कारण मनामध्ये आहे. हे फ्राईडच्या लक्षात आलं. मग त्याने मनाचा अभ्यास केला. मनाचे दोन भाग असतात असे त्यांच्या लक्षात आले. पहिल्या भागाला फ्राईडनी नाव दिले ‘जाणीव युक्त मन’ (Conscious Mind) आणि दुसऱ्याला नाव दिले ‘नेणीवयुक्त मन’ (Subconscious Mind). !
फ्राईड यांना असे आढळून आले की स्वतःच दडवून ठेवलेल्या स्वतःच्याच ज्या वासनांची रोग्यांना जाणीव नसते, त्या वासना-इच्छा या ‘नेणीवयुक्त’ मनात डांबल्या गेलेल्या असतात. वासना किंवा इच्छारुपी या प्रबळ प्रेरणांच्या अंगी प्रचंड शक्ती असते. ही शक्ती अशी जबरदस्तीने डांबली गेल्यामुळे ती ज्ञानतंतुंवर दाब आणून शारीरिक विकृती वा रोग निर्माण करतात. मानवी मनाच्या क्रिया-प्रक्रियांचे अध्ययन करणाऱ्या शास्त्राला आपण “मानसशास्त्र”(Psychology) म्हणतो.
बहुतेकांना वाटतं ‘स्वप्ने ही भविष्य दर्शवितात, ‘ पण फ्राईडच्या मते स्वप्ने ही वस्तुतः भूतकाळ अथवा गतकाळाची निदर्शक असतात. त्यात भविष्य असं नसतंच. स्वप्न म्हणजे दाबलेल्या वासनांचे रुप ! असं ते म्हणतात. स्वप्न या अवस्थेत मनुष्य बेसावध असतो. पण बेशुद्ध नसतो. त्या वेळी त्याच्या ‘मनातले’, त्याच्या ‘नेणीवे’तले विचार बाहेर येत असतात. हाच धागा पकडून फ्राईडने नंतर आपल्या कितीतरी रोग्यांचे निदान हे त्यांचे स्वप्न ऐकून.. त्यांच्या मनात काय चाललंय हे आणि नेमकं काय त्यांच्याशी होत आहे.. हे ठरवून थिअरी तयार केली.. अशा पद्धतीने फ्राईडने स्वप्न आणि त्यांचा आपल्या रोग्याशी असलेला संबंध जोडला जो बऱ्याच अंशी खरा ठरला.
… एखाद्याबद्दल चांगली किंवा वाईट बातमी कळली की आपल्या मेंदूतून एक विशिष्ट प्रकारचा द्राव किंवा डोपामाईन रिलीज करण्यात येते.. जे मनुष्याला आनंद देतं किंवा नर्व्हस करतं.. जसं की रील बघितल्यानंतर जर त्या रिलमध्ये कोणी खाली धपकन पडला.. तर आपल्याला एक प्रकारचा आनंद होतो.. हसायला येतं.. पण ह्या मागे एक विज्ञान आहे.. तो पडला.. म्हणजे त्याला लागलं.. आता तो हालचाल करू शकणार नाही.. आपल्यापेक्षा तो दुर्बळ झाला.. आणि आपण आता त्याच्यापेक्षा कुठेतरी श्रेष्ठ झालो. असं काहीसं मेंदूच्या आतमध्ये माणसाला सुखावणार चालू असतं.. त्यामुळे मनुष्य आनंदी होतो.. ह्यूमन सायकॉलॉजी हा खरोखर अभ्यासाचा विषय आहे.. सिग्मंड फ्राईडने ‘इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’मधे स्वप्न हे आपले नसतातच आपल्या सबकॉन्शिअस माईंडमध्ये जे काही साठवून ठेवलेलं असतं त्याच्यावरची तुमची थॉट प्रोसेस ती असते. स्वप्नात जर तुमचे दात पडताना दिसत आहे तर तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे. असं तो सांगतो. जर तुम्हांला स्वप्नात तुम्ही नग्न अवस्थेत बघताय तर खऱ्या जगामध्ये तुमचा प्रभाव कमी आहे. असा त्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे. आपलाच मेंदू आपल्याला पॅरासाईट बनवून वेगवेगळ्या पद्धतीने वागवत असतो.. भीती घालत असतो.. आता मला परवा स्वप्नात दिसले की मी पप्पांना आयफोन गिफ्ट करतोय मला चांगला जॉब लागला आहे.. आता सबकॉन्शिअसमध्ये माझा जॉब आणि आयफोन याचाच विचार चालू असल्याने त्या पद्धतीचे स्वप्न मला पडलं.. सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंटचे काम चर्चेत असल्याने बायकोलाही चांगलं तीन रूमचं घर असल्याचं स्वप्न पडलं. त्यामुळे फ्राईडने सांगितलेली स्वप्नाबाबतची थेअरी खरी वाटते.. आधुनिक काळातल्या माणसाची स्वप्न मात्र फार कॉम्प्लिकेटेड झाल्याचे तो बोलतो.. आधी मनुष्य जंगलात राहायचा त्याच्या एवढ्या सा-या आशा अपेक्षा नव्हत्या. पोट भरणे किंवा अन्न, वस्त्र, निवारा ह्या पलीकडे त्याच डोकं नव्हतं.. पण आता मात्र माणसाचा अन्न, वस्त्र, निवारा खूप मोठा झाला आहे. फ्लॅट, फियाट आणि फ्रिजचे आकार वाढले आहे.. त्यामुळे स्वप्नातही त्याला तेच दिसते.
स्वप्नामध्ये आपल्याला टेक्स्ट किंवा अक्षरं कधी दिसत नाही.. स्वतःचे हात किंवा कुठल्याही प्रकारचा टाईम तुम्हांला दिसत नाही.. स्वप्नामध्ये नेहमी 80% सकाळच असते.. म्हणजे उजेडी स्वप्न जास्त असतात.. रात्रीचे म्हणजे अंधारातील बरीच कमी स्वप्ने असतात.. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी स्वप्नांमध्ये तुम्हांला टेक्स्ट किंवा अक्षरं लिहीता येत नाही.. वाचता येत नाही.. जर स्वप्नांमध्ये काही वाचायचा प्रयत्न केला तर जाग येणार किंवा स्वप्न तुटेल.. स्वप्नामध्ये स्वतःची बोटं सुद्धा आपल्याला मोजता येत नाहीत. म्हणजे काउंटिंग करता येत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या नैसर्गिक स्किल नाहीत ! मॅथस, आकडेमोड, टेक्स इंटरप्रिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप नंतर डेव्हलप केलेल्या आहेत.
मात्र आपण स्वप्नांमध्ये पळतो, झाडावर चढतो कारण त्या आपल्या नैसर्गिक स्किल आहेत.. स्वप्नांत आपण बोलत सुद्धा खूप नाही.. कारण सुरुवातीला इशाऱ्याचीच भाषा होती. स्वप्नात त्यामुळे काय बोलतो हे पण नीट कळत नाही! कारण आपला ब्रेन.. आपला मेंदू दहा हजार वर्ष जुनाच आहे मात्र टेक्नॉलॉजी ही अत्याधुनिक आहे.. त्याच्याशी मिळतेजुळते घेणे अजूनही मेंदूला जड जात आहे.
श्रावण आणि भाद्रपद म्हणजे वर्षां ऋतुतून संक्रमण करीत आलेली सृजन सृष्ठी. पावसामुळं धरणी ओली चिंब भिजलेली. ग्रीष्म ऋतुतील उष्णतेमुळे भेगाळलेली माती किंवा धरती! पाण्याला आसूसलेली माती. मृगाच्या प्रतीक्षेत तृषित असलेले सृष्टी चराचर चिंब भिजून तर जातेच. जाताजाता कस्तुरीचा गंध पण देऊन जाते. तरीपण तिला पावसाची ओढ ही असतेच.
सुरुवातीला असणारा पावसाचा तसेच मातीचा खट्याळपणा दिसून येतोच. नवं परिणीतासारखी आस लागून बसलेली दिसते. पावसाचा पण तोरा काही कमी नसतो. वेळी अवेळी, ज्यास्त करून रात्री पहाटे, मनाला येईल तेव्हा सृष्टीचे लाड पुरवत असतो. गेली अनेक युगे ते सांख्य सिद्धांत मांडत आपल अद्वैत प्रेम जगाला दाखवून देत असतात. प्रकृती काय किंवा स्वभाव काय त्याला औषध नाही. पुरुष काय किंवा पाऊस काय मनमानी स्वभाव जातच नाही. वारा काय किंवा विज काय त्यांचा चेतना गुण सोडत नाहीत. पृथ्वी काय किंवा धरा काय ती बहू प्रसवा आहे. मेघाची पालखी ही आकाशात अविरत सजलेली असतेच. श्रावण भाद्रपद कसे सण वार व्रतवैकल्यात निघून जातात. कृषीवल आपले काम करत असतोच. जेवढं काही पाऊस आणि माती यांच्या कडून घेता येईल, तेवढं तो काढून घेत असतोच. त्यांच्या सृजन शिलतेचा फायदा हा सर्व चराचर घटकाना मिळत असतोच.
असं असताना पंचभौतिक घटकच बंड करत आहेत! अवकाळी पाऊस अवकाळी वादळ हे बदलत्या निसर्गाचे चित्र! ह्यात दोष कुणाचा ? निसर्गाचा की मानवाचा? अलबत मानवच ह्याला कारणीभूत आहे! शोध नन्तर प्रगती, प्रगतशील मानव ह्या पंच भौतिक सृष्टीवर घाला घालतो आहे असं नाही काय वाटत? कमी वेळेत भरपूर अन्नधान्य पिकवण्यासाठी बऱ्याच रसायनाचा मारा करतो.
अशीच असंख्य उदाहरणे देता येतील. निसर्गाचा समतोल ढळत आहे. वर म्हणायचे कली युग आहे ! ह्याचाच परिणाम समाज घटकात दिसते. असो.
घटस्थापना
अश्विन प्रतिपदा ते दसरा असे दहा दिवस नवरात्री उत्सव साजरा केला जातो. ह्याच्या मागे बऱ्याच दंतकथा असल्या तरी, मुख्य सण हा स्त्री शक्तीचा जागर म्हणजेच सृष्टीच्या किमयेला आभार मानण्याचा उत्सव. परतीचा पावसाळा आणि त्यात कडक उन्ह आणि शरद ऋतुचे आगमन. सृष्टी विविध अंगाने भारलेली सौंदर्याने फुललेली. नटलेली. कडक उन्ह म्हणजेच ऑक्टोबर हिट. ती नदी ओढा तलाव जलसाठ्यातीला
जीवाणु व विषाणू ह्यांचा नाश करते, पाणी स्वच्छ करण्यासाठी मदत होते. रात्रीच्या शरद चांदण्यात ती ओझोनयुक्त होते. ह्याच वेळी आगस्ती ताऱ्याचा उदय होऊन पाणी निरजुंतुक होतं असते. वर्षांऋतू आणि शरदऋतुचा संधिकाल. सर्व नद्या ओढे विहीर तलाव पाण्याने गच्च भरलेले. म्हणेज दूर दृष्टीने परत वर्षां ऋतू येईपर्यंत तहान तृष्णा ह्याची भूक मिटलेली. कृषिवलांना आनंदी करणारी बाब. पुरेसा पाण्याचा साठा. ह्या किमयेच्या ऋणातून मुक्त करणारा हा उत्सव. सृष्टी आणि स्त्री ह्यांच्या गुणधर्मात निसर्गाच्या साधर्म्यातुन हा सण साजरा केला जातो
घट हेच शरीर. त्यातील पाणी हाच आत्मा. ह्या घटाची नवरात्रीसाठी स्थापना. घट हा मातीतून साकारलेला. घटाखालची माती ही सृष्टीचे द्योतक. त्रिगुणात्मक. काळ्या मातीत बीज पेरणे हे बहू प्रसवा असल्याचे द्योतक.
नवं रंध्राच्या नवं रात्री! वरुन फुलांच्या माळा. शक्तीची उपासना. स्त्री शक्ती असो वा सृष्टीची निसर्गाची शक्ती. धरती आहे म्हणून आकाश आहे, आकाश आहे म्हणून पाऊस आहे. सोबतीला वारा अन अग्नी पण. अश्या पंचभौतिक निसर्ग किमयेला, स्त्री शक्तीच्या कौतुकाचा सोहळा म्हणजेच नवरात्र आणि दसरा. ह्या मागची कारणमिमांसा गहन आहे.
परंपरागत चालत आलेला सण, उत्सव ह्याचं हल्ली विद्रुप स्वरूप बघायला मिळणे, ह्यासारखे दुर्दैव नाही. हिडीस अन विकृत प्रदर्शन त्याच बाजरीकरण! स्त्रीला तिचा सन्मान पूर्वीसारखा परत मिळेल काय.
वासना अंध नाराधम ह्या असल्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. गरबा नृत्य हल्ली फॅशन शो झाला आहे. किंवा दुर्गामातेची मंडळ विकृत स्वरूप दाखवत आहेत. रोजच्या जीवन प्रवासात स्त्री सुरक्षित आहे काय ? तुम्ही सुरक्षा देत नसाल तर, मग हे असली नाटके कश्याला ??
नवरात्री आणि रंग ह्यांचा काहीतरी सम्बन्ध असतो, असा जावईशोध पण हल्ली अलीकडेच लावला गेला. रंग! कापडं! आणि व्यापार! ह्या बाबत नं बोललेलं बरं! हा जिव्हाळ्याचा विषय ! तुम्ही नटा, सजा तो तुमचाच अधिकार आहे. तुमचे लाड, कौतुक पुरवून घ्यायला दुमत नाही. पण नवं रंगाचं गणित काही कळले नाही, आणि पचनी पडत नाही.
समाजात सर्व स्तरात स्त्री शक्तीने आज आघाडी घेतली आहे. त्यांचं असण समाजाला पूरक आणि प्रेरक आहे त्यात वाद नाही. बऱ्याच स्त्रियांचे काम उल्लेखनीय आहेत. अश्या स्त्रियांचा गौरव नक्कीच व्हायला पाहिजे, तो आम्हाला प्रेरक आहेच. काही गरजू गरीब स्त्रियांना लागेल ती मदत करणे हे पण समाजाच कर्तव्य आहे. अश्या उत्सवप्रसंगी त्यांना पुढे आणणं ही काळाची गरज आहे. तरच ह्या सणाचे औचित्य साधले जाईल. आणि स्त्री शक्तीचा मान राखला जाईल.
मुक्ती म्हणजे नक्की काय? मला वाटतं एखाद्या विचाराच्या स्त्रोतापर्यंत पोहोचणं म्हणजे मुक्ती. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणं ही एक आध्यात्मिक बाजू आहेच, पण तेव्हा नक्की काय घडत असावं? विचार करताना मला जाणवलं की एकुणात मुक्ती हे प्रकरण इंटरेस्टिंग आहे… अनेक जणांना त्याचं अप्रूप आहे काहींचं जीवन ध्येय आहे… तर हे काय आहे…
एकदा प्राणायमाच्या विषयी जाणून घेताना हळूहळू विषय श्वास जन्म-मृत्यू यावर आला. आणि मग जगण्याचा दृष्टिकोन नेमका कुठला योग्य ? अशा अर्थाची आम्ही चर्चा करत होतो. त्यावेळी मला आमच्या ओळखीतल्या एकांनी सांगितलं होतं की आपल्या या जन्मातली प्रत्येक गोष्ट ही केवळ आणि केवळ आपल्या विचारांतून निर्माण झाली आहे. आपण करणाऱ्या (काही जणांच्या दृष्टिकोनातून घडणाऱ्या) प्रत्येक कृती मागे हा विचार असतो. कधी प्रगट तर कधी सुप्त अवस्थेत. आपला जन्म कधी, कुठे, कसा झाला/होतो. आपलं शरीर, आपल्या इच्छा, वासना, जगण्याचा दृष्टिकोन हे सारंकाही आपल्या विचारांनी नियंत्रित केलं जातं/आहे. हे विचारच आपल्याला निवड करायला प्रेरणा देतात. ज्यांना याची जाणीव नाही अशा कमजोर व्यक्तींच्या दृष्टीने भाग पाडतात.
हे ऐकल्यानंतर मला असं वाटू लागलं की ज्यावेळी एखाद्याला ही गोष्ट पटून आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर त्याला वाटतं की याचा शोध घ्यावा… याच्या मुळापर्यंत पोहोचावं… तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा मुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू होत असावा.
मग त्याला हे जग नक्की कोण नियंत्रित करतं? अशी कुठली शक्ती आहे? तिचं स्वरूप स्थिर आहे का अस्थिर? या उत्तराचा ध्यास लागत असावा. आणि आयुष्यातल्या प्रत्येक घटनेकडे या दृष्टिकोनातून बघताना कधीतरी त्याला या प्रश्नाचा उगम सापडत असावा. मग या उगमापाशी पोहोचल्यानंतर त्याला एका परिपूर्ण अवस्थेचा अनुभव येऊन तो मुक्त होत असावा. कारण जिथे विचार आणि प्रश्न दोन्हींची निर्मिती थांबते आणि उत्तराचीही आस राहत नाही त्या क्षणापासून त्याचा मुक्तीकडे प्रवास वेगाने होत असावा किंवा तोच एखादा क्षण त्याला मुक्तता देत असावा? असं मला वाटतं.
मुक्तीच्या कल्पना आणि शक्यता अशाही असतील.. की आणखीन काही वेगळ्या? शोध चालू आहे… कधीतरी याचं उत्तर मिळेल.