मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीमध्ये आणि लगतच्या शेकडो किलोमीटर्स परिसरात श्वास दुर्लभ आहे. सपाटीवर मुबलकतेचा अंगरखा पांघरून वा-यासवे पिंगा घालणारा प्राणवायू शिखरावर चढता-चढता अगदी मलूल झालेला असतो. खोल डोहात बुडी मारून तळावर पहुडलेला एखादा शिंपला वर आणावा तसा प्रत्येक श्वास सैनिकांना आसमंतातून कुडीत ओढून घ्यावा लागतो…. शिंपल्यातून मोती मिळवावा तसा! 

सैनिक देहाच्या माळावर श्वासांचं शिंपण करतात ते सीमांचं रक्षण करण्यासाठी…. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! ह्या श्वासांचं आयुष्य वाढवायला हवं हा विचार छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा पुण्य-प्रभाव असलेल्या एका सहृदय दांमप्त्याच्या हृदयावर कोरला गेला तो परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅप्टन श्री. बानासिंग यांच्या एका वाक्यामुळे!

श्री. योगेशजी चिथडे भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात तर सौ. सुमेधाताई चिथडे या त्यांच्या सहधर्मचारीणी पुणे शहरात शिक्षिका म्हणून कार्यरत. चिथडे दांम्पत्याचे एकुलते एक चिरंजीव देशाच्या सीमेवर भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. प्रवाहपतिताप्रमाणे जीवन जगणे योगेशजींना आणि सुमेधाताईंना पसंत नाही. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे ‘देहातून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण या देशाचे काही देणे लागतो’ हे सुमेधाताईंच्या मनात रूजलेले वाक्य! अंगावर लष्करी गणवेश नसला तरी देशसेवा बजावता येते हे सुमेधाताईंनी योगेशरावांच्या साथीने अंगिकारलेल्या कार्यातून दाखवून दिले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे, वीरपत्नींचे अश्रू पुसण्याचा वसा या दोघांनी घेतला आणि प्रत्यक्षात गावा-गावात जाऊन काम सुरू केले. सणावाराला या वीरपत्नींना, वीरमातांना आपल्या घरी माहेरपणाला आणणे, त्यांच्या घरी सणासुदीचे खाद्यपदार्थ पोहोचवणे, आर्थिक नियोजन करण्यात जमेल ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य हे दांमप्त्य केवळ स्वबळावर आणि स्वयंस्फूर्तीने करीत होतेच. यानिमित्ताने त्यांचा सैनिकीसेवेमधील अनेकांशी निकटचा संबंध आला. शूरवीरांचा सन्मान करण्याच्या अशाच एका उपक्रमात परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅपन बानासिंग साहेब यांचे चिथडे कुटुंबात येणे झाले आणि ‘आम्ही सैनिकांसाठी आणखी काय करू शकतो?’ या सुमेधाताईंच्या प्रश्नावर बानासिंग साहेबांनी उत्तर दिले होते… जवानों की सांसों के लिए कुछ कर सकते है तो किजिए…. सैनिकांच्या श्वासांसाठी काही करता आले तर करा!” 

ह्या एका वाक्याने चिथडे पती-पत्नींना एक वेगळीच दिशा दाखवली. त्यांनी तत्परतेने या दिशेला आपला मोर्चा वळवला. सियाचीन आणि आसपासचा परिसर ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याला सियाचीन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जवान तैनात ठेवावे लागतातच. एका आकडेवारीनुसार सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर आणि परिसरात आज पर्यंत सुमारे अकराशे सैनिक देशरक्षणाच्या कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेले असून यातील सर्वाधिक बळी हिमप्रपात, हिमस्खलन आणि विशेषत: श्वसनासंबंधींच्या आजारांनी घेतलेले आहेत! म्हणजे येथील सर्वांत मोठा शत्रू म्हणजे हवामान… इथल्या वातावरणातील ऑक्सिजनचा कमालीचा तुटवडा आणि जीवघेणी थंडी! 

High Altitude Pulmonary Oedema, Acute Mountain Sickness, Frost Bite Chilblains, Hypothermia, Snow Blindness हे सियाचीन मध्ये तैनात सैनिकांना आणि परिसरातील नागरीकांना भेडसावणारे जीवघेणे आजार. या आजारांवरील सर्वांत महत्त्वाचा उपचार म्हणजे रूग्णाला कृत्रिम ऑक्सिजन देणे! 

सियाचीन जवळ परतापूर येथे भारतीय लष्कराचे विशेष रूग्णालय कार्यरत आहे… याला सार्थ नाव आहे… Siachen Healer… to heal म्हणजे बरे करणे! या रूग्णालयात केवळ सैनिकच नव्हेत तर आसपासचे नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक यांनाही आरोग्यसेवा पुरविल्या जातात. इतर ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे करणे सियाचीनमधील लहरी हवामानामुळे कठीण असते. म्हणून या ठिकाणी कृत्रिमरित्या ऑक्सिजन निर्मितीची गरज असते आणि तशी सुविधाही भारतीय लष्कराने उपलब्ध करून दिली आहे. बाणासिंग साहेबांच्या सोबत झालेल्या संभाषणातून ह्या यंत्रणेला अत्याधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे हे चिथडे दांम्पत्याने ओळखले आणि चिकित्सक अभ्यास सुरू केला. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने मोठा पराक्रम गाजवला होता, पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडले होते. या अलौकीक पराक्रमाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष जवळ येऊन ठेपले होते. यानिमित्त भारतीय सैनिकांना अभिवादन म्हणून भारतीय जनतेच्या स्वयंस्फूर्त आर्थिक सहभागातून ‘ऑक्सिजन निर्मितीचा अत्याधुनिक, सुसज्ज प्लांट भेट म्हणून देण्याची कल्पना श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधाताई योगेश चिथडे यांना सुचली! ही एक खरोखर अभूतपूर्व कल्पना होती! सरकार, सैन्य तर आपल्या सैनिकांच्या कल्याणाची तजवीज कायमच करीत असते, पण नागरीकांचाही यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असतो. देश आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो असा प्रश्न प्रत्येकाला खरा तर पडलाच पाहिजे!

 खरं तर हे काम म्हणजे स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासारखे मोठे काम होते. भरपूर संशोधन केल्यानंतर चिथडे साहेबांनी जर्मनीतील एक कंपनी ऑक्सिजन यंत्रणा पुरवू शकेल हे शोधून काढले. पण ही यंत्रणा विकत घेणे, वाहतूक करणे, यंत्रणा प्रत्यक्ष कार्यांन्वयित करणे यासाठी सुमारे अडीच कोटी इतका मोठा खर्च येणार हेही दिसले! शिवाय विविध प्रशासकीय परवानग्या मिळवणे, विविध यंत्रणांशी संपर्क साधणे, त्यांना योजना समजावणे इत्यादी आव्हाने तर होतीच. पण चिथडे पती-पत्नींनी हे शिवधनुष्य स्वत: पुढाकार घेऊन पेलण्याचा प्रण केला! पैशांचं सोंग आणणे अशक्यच असते. देशप्रेमी लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळवणे हा एकमेव मार्ग होता. गरज अडीच कोटी रूपयांची होती! सुमेधाताईंनी आपल्या अंगावर असलेले सुवर्णालंकार विकले आणि त्यातून आलेले एक लाख पंचवीस हजार आठशे पंधरा रूपये ‘सिर्फ’ मध्ये जमा केले आणि ऑक्सिजन प्लांट साठी निधी संकलनाच्या कार्याचा सुवर्ण-शुभारंभ केला! ‘सिर्फ’ म्हणजे आकड्यांनंतर लिहिला जाणारा ‘फक्त’ या अर्थाचा शब्द नव्हे! योगेशराव आणि सुमेधाताई खूप आधी पासूनच सैनिकांसाठी, वीरपत्नींसाठी, त्यांच्या मुलांसाठी, वीरमाता-पित्यांसाठी अगदी ग्रामीण भागात जाऊन काम केलेले आहे! त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन ‘Soldiers’ Independent Rehabilitation Foundation(SIRF) अर्थात ‘सिर्फ’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. आधी केले आणि मग सांगितले या उक्तीनुसार कार्यास सुरूवात केल्यामुळे योगेशराव आणि सुमेधाताईंना या अभूतपूर्व उपक्रमासाठी निधी देण्याचे आवाहन इतरांना करण्याचे नैतिक बळ प्राप्त झाले. योगेशजी आणि सुमेधाजी आपापल्या नोक-या सांभाळून निधी-संकलनाच्या कार्याला लागले. सियाचीनची, तिथल्या भौगोलीक, हवामान-विषयक, आरोग्यविषयक बाबींची माहिती मिळवली, मूळ समस्या, तिच्यावरील उपाय याचा सविस्तर विचार केला. यावर आधारीत पीपीटी प्रेझेंटेशन तयार केले आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील हजारो लोकांना दाखवले आणि सैनिकांच्या श्वासांसाठी सामान्य जनतेच्या भावनांना साद घातली. निधी-संकलनाच्या यानिमित्ताने चिथडे पती-पत्नींना आलेल्या ब-या-वाईट अनुभवांचे तर एक पुस्तकच तयार होईल! वृद्धाश्रमात राहणारी आणि तिच्या लेकाने खाऊसाठी दिलेले वीस रूपये सैनिकांसाठी देणारी एक माता, माझा वर्षभराचा पगार घ्या असे म्हणणारी एक मोलकरीण भगिनी, बोहनी झालेली नसतानाही गल्ल्यातील एकावन्न रूपये काढून देणारा गरीब भाजी विक्रेता, आमच्या काही महिन्यांच्या पेन्शनची रक्कम या कार्यासाठी घ्या असे म्हणणा-या वीरपत्नी, आपले खाऊचे पैसे देणारी एक आठ-नऊ वर्षांची बालिका असे ‘नाही रे’ गटातील एका बाजूला आणि ‘आहे रे’ गटातील काही कंजुष श्रीमंत एका बाजूला! आपल्या विचाराच्या प्रचारासाठी सुमेधाताईंनी तेरा दिवस तेरा घरांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याचे व्रतही पार पाडले! योगेशजींच्या समवेत चार हजारांहून अधिक कुटुंबांशी, अनेक संस्था, व्यक्ती यांचेशी संपर्क साधला. स्वत:चे वैय्यक्तिक आयुष्य, सणसमारंभ, कौटुंबिक समारंभ दूर ठेवले. तरीही पुरेशी रक्कम जमा होत नाहीये असे पाहून स्वत:चे राहते घरही विकण्याची तयारी केली. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली.

– क्रमशः भाग पहिला.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शब्दकळा…’ – लेखिका : श्रीमती अरुंधती ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘शब्दकळा…’ – लेखिका : श्रीमती अरुंधती ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

सूनबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या. मधेच म्हणाल्या, “ अगबाई ! आज निरांजन नुसतंच कुरवाळलेलं दिसतंय ! “ बी. ए. मराठी असलेल्या सूनबाईंना वाक्याचा अर्थ कळायला अंमळ वेळच लागला. अर्थ लागला तेव्हा हसू आणि राग या दोन्हीचं मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेह-यावर उमटला. सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फणकारा दाखवावा हे तिला कळेचना !

मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न – समृद्ध आहे. तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या, कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत. ‘ शर्करा अवगुंठित’ शब्दांचा वापर लीलया होत असे.

आमचे एक परिचित होते. घर म्हणजे नांदतं गोकुळ. मुलांच्या दंग्यानं अन् पसा-यानं तिथल्या आजी कावलेल्या असत. ‘ आवरलेलं घर ‘ हे दृष्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच. कधी त्यांच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत. पसा-यात बुडालेल्या आजी सहज बोलून जात, “ कार्टी बसतील तिथे * ठेवतात ! “ हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं. आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही.

माझी एक धष्टपुष्ट मैत्रीण कामावरुन येताना जिमला जाऊन येत असे. त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेले. तिच्याकडे सासूबाई आणि आजेसासूबाई अशा दोघीही होत्या. सासूबाई साधारण सत्तरीच्या. मैत्रिणीला यायला थोडा उशीर होणार होता. त्यामुळे सासूबाई भराभर कामं उरकत होत्या. मी आपलं सहज म्हटलं “ काकू, तुम्ही अजूनही फिट आहात अगदी !” लगेच आजी उद्गारल्या “ काय करणार बाई, तरण्या झाल्या बरण्या अन् म्हाता-या झाल्या हरण्या! “ मी उगीच अंग चोरुन अन् सावरून बसले.

म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच. फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत !

वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुलाशी झालं, तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली “ हडळीला नव्हता नवरा अन् झोटिंगाला नव्हती बायको ! आता जोडी छान जमली. “

आजोळी पूर्ण सुट्टी घालवल्यानंतर ( तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले टूर किंवा ट्रीप्स नसायच्या. कधी वडिलांच्या मूळ गावी, कधी आईच्या माहेरी मुक्काम. हाच बदल. ) जूनमधे शाळेत गेले. पहिला दिवस, मराठीच्या बाई वर्गात आल्या. गप्पा टप्पा सुरु झाल्या. मधेच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या “ वा ! गालांवर अगदी रुई फुललीय ! “ क्षणभर मी गोंधळले आणि मग अर्थ कळून रुईतच खुद्कन हसले होते.

अगदी शेलक्या शब्दात उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत. आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे, रंग काय चाटायचाय ! “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पो सारखा पडलेला असतो, “ असा होई. खरं तर वरची वाक्यं मनं दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई. ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.

चांगलं पण बोललं जाई बरं का ! एखादी मुलगी सुदृढ असेल तर “ अहो, दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल “ एखादीसाठी “इतकी रूपवान आहे की वाटेवरचा चोरसुद्धा उचलून नेईल “ (म्हणजे काय म्हणायचे असेल? ) कोणी सुग्रण असेल तर “ अहो, पुरणपोळी विरघळते तोंडात, पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपत बसाल !”

आताच्या काळात एखादी स्त्री ‘ब्युटीफुल, गॉर्जियस ‘ दिसत असेल. तेव्हा ‘चारचौघींसारखी ‘, ‘ दहाजणीत उठून दिसेल अशी ‘, ‘ लाखात एक’ असे उल्लेख असत आणि त्यावरून रूपाचा अचूक अंदाज येई.

अर्थात पुरुषवर्गही यातून सुटत नसे. शेलकी विशेषणं त्यांच्यासाठीही असत. ‘आग्यावेताळ’, ‘जमदग्नीचा अवतार’, ‘दुर्वास मुनी’, ‘पिंपळावरचा मुंजा’, ‘पाप्याचं पितर’, ‘लुंग्यासुंग्या’ वगैरे वगैरे ! बरं शब्दकोषात याचे अर्थ शोधायची गरजच नव्हती. आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे. ‘ फाटका इसम ‘ मात्र मी बरेच दिवस शोधत होते ! ‘मदनाचा पुतळा ‘ बापकमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती. अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते. शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती.

गॉसिपिंग त्याही काळात होतंच. घरातल्या ज्येष्ठा व्हरांड्यात, ओट्यावर, अंगणातल्या बाजांवर निवडण टिपण करत मस्त वेळ घालवत. “ हातपाय लुळे अन् जीभ चुरुचुरु वळे “ असं माझी आजी म्हणे. अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे !

ही अशी खमंग, लज्जतदार, मर्मभेदी, वर्मभेदी, कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली होती. आता तर ती परोठे, ठेपले, पिझ्झा, बर्गरच्या संस्कृतीत विलीन झाली आहे. आंग्लाळलेल्या मराठीत तो ठसकाच नाही, ती मज्जा नाही ! पिढीगणिक भाषा बदलत जाते. ‘ ती व्यक्ती’ चा ‘ तो व्यक्ती ‘ कधी झाला समजलं तरी का ? आज प्रसिद्धीमाध्यमांवर जे मराठी बोललं जातं, ते ब-याचदा अनाकलनीय असतं. “ ** पण नांदा “ ! भाषा जिवंत राहायलाच हवी ! सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ नाही का आपण आवडीनं खातो. तसंच, ही मराठी पण आपलीच आहे, नाही का ?  

लेखिका: श्रीमती अरुंधती

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

प्रा. भारती जोगी

 काव्यानंद

☆  शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सुवर्णाक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे सावरकरांनी, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेली अजरामर नाट्यकृती “ संन्यस्त खड्ग ! “ १८ सप्टेंबर १९३१ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आता शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे याची! 

या नाट्यकृतीतल्या… वैश्विक अनुभूती आणि एका वेगळ्याच विरहानुभूतीचा स्पर्श लाभलेल्या, भैरवी रागातल्या अवीट आणि अमीट सुरांची झालर असलेल्या एका नाट्य पदाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरंतर सावरकरांच्या भावना, कल्पना आणि विचारांचं… उदात्त, उन्नत आकाश दोन बोटांच्या चिमटीत धरणं, सामावणं शक्यच नाही. पण तरीही हे शिवधनुष्य… काही क्षणांपुरतं का असेना… पेलून बघणार आहे…

नाट्यपद…

शत जन्म शोधितांना। शत आर्ति व्यर्थ झाल्या। 

शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या |

*

तेव्हा पडे प्रियासी| क्षण एक आज गांठी |

सुख साधना युगांची| सिद्धीस अंती गाठी। 

*

हा हाय जो न जाई| मिठी घालू मी उठोनी |

क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी |

हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाशी संबंधित आहे. बुद्धांच्या सांगण्यावरुन ‘शाक्य’ सेनापती विक्रमसिंह आणि शाक्य जनता, शस्त्र त्याग करून संन्यास घेतात. काही काळ जातो. दरम्यान विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचना नावाच्या युवतीशी प्रेमविवाह करतो. लग्नाला वर्ष उलटल्यानंतर वल्लभ आणि सुलोचना यांच्या मिलनाचा / भेटीचा योग येतो. आणि… तो बहुप्रतिक्षित मधुर मिलनाचा क्षण येतो… पण हाय रे दैव! 

त्याचवेळी, कोसल देशाचा राजा… विद्युतगर्भ याने आक्रमण केल्याची वार्ता येते आणि शाक्य राष्ट्राला वाचवण्यासाठी, वल्लभालाही पाचारण केले जाते. कपिलवस्तुचा पाडाव टळावा म्हणून संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. वल्लभही मग संन्यास धर्माचा संन्यास घेत… युद्धात उतरतो. म्हणून नाटकाचं नाव.. “संन्यस्त खड्ग!!”

मिलनाच्या क्षणीच झालेली ताटातूट, त्यामुळे सुलोचनेच्या मनाची झालेली अवस्था, विरह वेदनेचे, हतोत्साहित, विकल, असहाय असे मनोभाव… सगळ्याच… विभाव, अनुभाव आणि संचारी भावांसह, रस निष्पत्ती पर्यंत पोहोचविणारं हे नाट्यपद!! 

 सुलोचना आपल्या प्रिय सखीला… नलिनीला, वल्लभाच्या ऐनवेळी असं निघून जाण्याने, तिच्या मनात उठलेलं भावनांचं वादळ, विचारांचा कल्लोळ… कथन करते आहे…. ते शब्दांकन म्हणजे हे पद! 

सुलोचना अगतिक होते आणि म्हणते… असा पती लाभावा म्हणून मी शत जन्म शोधत राहिले गं! त्यासाठी मी शत-शत/अगणित, आरती केल्या. परमेश्वराच्या आळवण्या केल्या. तो भेटावा म्हणून शतजन्म वाट पाहिली. पण सखी, बघ ना, काय झालं…

‘शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या! ‘

… या ओळींमध्ये शब्द.. शत सूर्य मालिका…. सावरकरांचं विश्वाच्या भव्यतेचं आकर्षण आणि विराटतेची ओढ व्यक्त झाली आहे. उत्तुंग कल्पना शक्ती, आशयातील भावोत्कटता जाणवते आहे. त्यातूनच सुलोचनेची मनोवस्था डोळ्यासमोर येते. ‘ दीपावली विझाल्या ‘ यातला विझाल्या हा अगदी अनवट असा शब्द प्रयोग…. तिच्या मनातले, मिलनोत्सुक आशेचे… शत-शत दीप विझले.. हे सूचित करतो… अगदी प्रत्यक्षानुभूतीच दिलीयं!

पुढील ओळीत सुलोचना म्हणतीये…

‘ तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गांठी!

सुख साधना युगाची, सिद्धीस अंति गाठी!‘

… या ओळी म्हणजे… यमक आणि श्लेष या दोन्ही अलंकाराच्या गाठभेटीचा उत्तुंग आणि उत्कट क्षण!! 

प्रिय मिलनाचा, शत जन्म वाट पाहिलेला क्षण, आज गांठी आला, गाठला एकदाचा, प्राप्त झाला, मिळाला…. असं वाटतंय! आणि मनात एकच विचार येतोयं की… शतजन्माच्या माझ्या साधनेने, सिध्दी गाठली. साधना आणि सिद्धीची गाठ पडली!! प्रिय आराधना, तपस्या, साधना सफल झाली.

 गाठी या शब्दांत, यमक आणि श्लेष या भाषालंकारांचा उपयोग करून… या पदातल्या, सुलोचनेच्या भावनांची अगदी… ये हृदयीचे, ते हृदयी…. म्हणजे प्रेक्षक वृंद हृदयी… गाठी घातली अंती… हीच भावना येते.

शेवटच्या दोन ओळी तर… कल्पनेची उत्तुंगता, आशयघनता, शब्दकळा, आणि भावनोत्कटता या सगळ्याचाच परिपूर्ण, परिपक्व, परिणाम म्हणावा ! 

सुलोचना सांगतीये… अगदी सजीव, सगुण, साकार दर्शन… त्या एका कृतीची साक्षात्कारी अनुभूती देत की…

हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी

क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी!! 

… सखी, बघ ना, तो मधुर मिलनाचा क्षण आला… मी उठून माझ्या वल्लभाला मिठी घालायला गेले… आणि… आणि, निमिषार्धात्.. तो क्षण.. क्षणात निसटून गेला गं माझ्या हातून.. अगदी काही कळायच्या आत!… किती ही वैश्विक अनुभूती! आध्यात्मिक किनार लाभलेली! कुठेतरी याच ओळी आठवतात… ‘ पाया पडू गेले तव, पाऊलचि ना दिसे!!! ‘ 

विरहाची काळ हा प्रदीर्घ भासतो, मात्र मिलनाचा काळ अत्यल्प भासतो.. असंही सुचवलयं ! ‘ क्षण तो क्षणात गेला…. ’ या सावरकरांच्या ओळीचं खरं मोल जाणून, भाषाप्रभू पु. ल. म्हणतात… ‘ या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल द्यायला हवं. ‘ 

हा खरा गौरव आहे त्या… ओळी सुचलेल्या क्षणांचा, सुलोचनेच्या हातून निसटलेल्या त्या हुरहुर लागलेल्या क्षणांचा ! 

या पदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे… हे मिलनाच्या आधीचं नाही तर नंतरचं विरह गीत आहे. हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहुर लागते. भैरवी रागातल्या सुरांची झालर असलेलं हे नाट्यपद… ‘आर्ति व्यर्थ झाल्या’ मधली आर्तता आणि ‘ क्षण तो क्षणात गेला ’ मधली क्षणभंगुरता स्पष्ट करतं… प्रेक्षकांच्या हाती मात्र खूप काही, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावून गेलं… असंच म्हणावसं वाटतं.

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रैन बसेरा…! ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ रैन बसेरा…! ☆ श्री सुलभा तेरणीकर

ज्यासाठी यात्रा आरंभिली होती, तो क्षण आला आणि प्रवासाला निघाल्यापासून मनावर आलेला ताण सैल झाला. आईच्या काशीयात्रेची सांगता व्हायची होती. काशीची गंगा घेऊन रामेश्वराला अभिषेक केला होता आणि तिथली वाळू म्हणजे, सेतू घेऊन ती गंगेत अर्पण करायचा संकल्प होता. बनारसच्या गंगेच्या पात्रात नौकेत बसून तो पार पडला आणि यात्रेचा एक चरण तिच्या कृतार्थ भावनेच्या साथीनं संपला. तिच्या दृष्टीनं ही केवळ पारंपरिक धर्मयात्रा नव्हती, की भौगोलिक आनंदपर्यटन… ती एक भावनिक यात्रा होती. काळाच्या ओघात हरवून गेलेल्या आधीच्या पिढ्यांच्या स्त्रियांना कदाचित डोळा भरुन गंगा पाहण्याचं भाग्य लाभलं नसेल म्हणून तिनं ध्यास घेऊन ही प्रतीकात्मक यात्रा केलेली होती. गंगा न पाहिलेल्या अज्ञात स्त्रियांसाठी मीदेखील या यात्रेत नकळत सहभागी झाले होते ती एक सहप्रवासिनी म्हणून…

पण प्रवासात निघाल्यापासून विरोधाभासाचा जो विलक्षण अनुभव येतो, त्याची आवर्तनं मात्र सुरु होतीच. घरातून बाहेर खेचून नेणारी अन् पुन्हा कोटरात परतायची ओढ लावणारी अदृश्य शक्ती मला दमवीत होती. नमवीत होती. माझ्यासमोर भरतीचा-रितं होण्याचा खेळ सुरू होता.

माळव्यातून जाताना पाहिलेली सरसोची पिवळी शेतं, त्रिवेणी संगमावर सैबेरियातून आलेले शुभ्र पक्ष्यांचे लक्ष थवे, एकाकी देवळात शरपंजरी पडलेली गंगापुत्र भीष्मांची महाकाय मूर्ती, भारद्वाजांच्या तपोभूमीत थाटलेले गरिबांचे संसार, अस्वच्छता, घाणीचं साम्राज्य, फाटक्या अंगाचा सायकलरिक्षावाला, खपाटीला पोट गेलेला गंगेवरचा म्हातारा नावाडी अन रात्रीचा निवारा देणारा गरीब यात्रेकरूंचा बिनभिंतींचा रैन-बसेरा… नोंदी संपेनात.

बनारसचे घाट संधीप्रकाशात न्हाऊन निघालेले होते. पंचगंगेच्या संगमाजवळच्या घाटावर नावाड्यानं सांगितलं -“इथंच कबीरांना गुरु रामानंद भेटले.. ” मी विचारलं, “कबीरांचा मठ कुठं आहे?” उत्तर आलं-“मालूम नहीं.. “

मग दुपारी सारे जण विश्राम करीत असताना कसल्याशा तिरीमिरीत बाहेर पडले. कबीर चौराहा परिसरात विचारत, चौकशी करत एका अरुंद गल्लीच्या तोंडापाशी पोहोचले. तिथून म्हशींचे गोठे, व्यावसायिकांची दुकानं, गॅरेजं, घरं पार करता-करता क्षणभर थांबले. वाटलं, परत फिरावं. कबीरांच्या ढाई अक्षर प्रेमाच्या ओढीनं आपण आलो खरं; पण… फसलोच पुरतं. बाह्य आडंबराच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या, ‘आपण कुठलंही मत मांडलं नाही अगर कोणत्या मताचं खंडन केलं नाही’, असं स्पष्ट सुनावणाऱ्या कबीरांचं देऊळ शोधणं; मोठा विरोधाभास तर नाही ना… या विचारानं थोडी गोंधळले. पण समोरच तटबंदीसारख्या भिंतीत प्रवेशद्वार दिसलं. त्या कमालीच्या साध्या वास्तूनं खुणावलं. आत एका ऐसपैस वाड्याला सामावून घेतलं होतं. माणसांची वर्दळ तुरळक होती. ओवऱ्यात, छोट्या अभ्यासिकांतून साधक बसले होते. मी चबुतऱ्यावरच्या मंडपात पोहोचले. स्मृतिकक्ष होता तिथं. गोरखपंथी साधूंचा त्रिशूल, जीर्ण खडावा, रामानंदांनी दिलेली जपमाळ, एक काष्ठपात्र, कबीर वापरीत तो चरखा… अन अंधाराचं अस्तित्व सांगणारा समाधीपाशी तेवणारा क्षीण दिवा..

कबीरांनी देह ठेवल्यावर मागे राहिलेल्या फुलांवर त्यांच्या शिष्यानं- श्रुतिगोपालनं -त्यावर बांधलेली समाधी… फुलांची समाधी… म्हणूनच त्यावर फूल अर्पण करण्याच्या संकेतापासून मुक्त असावी.. युवा कबीराचं छायाचित्र पाहत असताना बावीस-तेवीस वर्षांचा देवेन्द्र… शुभ्रवेष धारण केलेला तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी माझ्या मदतीस आला.

कबीरांचं साधनास्थळ, जिथं सत्संग करायचे, ती जागा दाखवीत म्हणाला, ” आपने नीरू टीला नहीं देखा?” मग मंदिराच्या जवळच्या जागेत आम्ही पोहोचलो. बाहेरच्या दृश्यांशी पूर्ण विसंगत असं ठिकाण होतं. शेताचा तुकडा, वृक्षांची सळसळ, संगमरवरात विसावलेले नीरू व निमा. लहरतारा तलावात ज्येष्ठ पौर्णिमेला या दाम्पत्याला कमळात एक दिव्य बालक सापडलं होतं… नरहरपुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या वेळच्या जंगलात, कसाई वस्तीत त्यांनी त्या बाळाला आणलं. वाढवलं. विणकराचा चरखा त्याच्या हाती दिला. कबीरांचं बालपण जिथं गेलं, त्या ठिकाणीच त्यांनी साधना केली आणि दलित, उपेक्षित, वंचित, दुःखी जनांना ईश्वराच्या भक्तीचा राजरस्ता दाखवून दिला. मुल्ला मौलवी, पंडित यांच्या माणसांना देवापासून दूर नेण्याच्या परंपरेवर आघात केले… निर्भयपणे, स्पष्टपणे अन अत्यंत प्रवाही भाषेत सामान्यांना समजावलं… बाह्य उपचारांचा अस्वीकार केला. धर्माच्या नावाखाली चाललेल्या विकृतीचा धिक्कार केला. मनुष्यात भेद करणाऱ्या कृतींचा निषेध केला. हृदयस्थ परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी प्रेरित केलं… देवेन्द्रशी बोलताना इतिहास आठवत होते. ऐकत होते.

१९३५ मध्ये हरिजन चळवळीची सुरुवात गांधीजींनी त्याच साधनास्थळापासून आरंभिली होती. राष्ट्रीय नेते, अभ्यासक, विचारवंत इथवर येऊन गेले होते. कबीरांच्या भाषावैभवापाशी गुरुदेव रवीन्द्रनाथ नतमस्तक झाले होते… या आणि अशा कितीतरी गोष्टी ऐकल्या. सहाशे वर्षांपूर्वी या इथे नांदलेलं चैतन्य पांघरून 

नीरू टीला पुन्हा ध्यानस्थ झाला..

कबीर साहित्याचे निस्सीम चाहते व गाढे अभ्यासक डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांनी कबीरांबद्दल सांगितलेल्या ओळी पुन्हा आठवायलाच हव्यात. “ऐसे थे कबीर… सिरसे पैर तक मस्त मौला, स्वभावसे फक्कड, आदतसे अक्कड, भक्त के सामने निरीह, भेषधारी के आगे प्रचंड, दिल के साफ, दिमाग के दुरुस्त, भीतरसे कोमल, बाहरसे कठोर, जन्मसे अस्पृश्य, कर्म से वंदनीय… ” 

आमच्या यात्रेच्या परतीचा प्रवास सुरू व्हायचा होता. चार रात्रीचा रैन-बसेरा सुटायचा होता. घरी परतायचं होतं. माघ पौर्णिमेचा चंद्र गंगेत उतरला होता. सृष्टीत वसंतागमनाची वार्ता होती. नीरू टीलामधला निःशब्द काळोख मात्र माझं मन उजळून टाकीत होता…

चल हंसा वा देस जहॅं पिया बसे चितचोर…. ज्या देशात नित्य पौर्णिमा असते अन् एकच नव्हे, तर करोडो सूर्य प्रकाशतात.. जिथं कधीही अंधार होत नाही, अशा देशी जायची वाट शोधायची, तर… थोडा अंधारही सोबत बांधून घ्यावा… नाही का? 

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीखंड, पाडवा आणि फटक्याची गोष्ट… – भाग-१ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ श्रीखंड, पाडवा आणि फटक्याची गोष्ट… – भाग-१ ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे ऑगस्ट महिन्याची 13-14 तारीख होती. शाळेमध्ये विद्यार्थिनीची 15 ऑगस्ट साठी विविध कार्यक्रमाकरिता तयारी करून घेण्यात येत होती. पि. टी. चे शिक्षक संचलनाची तयारी करत होते… नृत्य बसवणारे नृत्य बसवून घेत होते…

स्वराज्य सभेचे मंत्रिमंडळाच्या भाषणाची तयारी चालली होती… एकूण शाळेत विविध कार्यक्रमाची रेलचेल होती आणि त्याचा सराव चाललेला होता. बाकी मग ग्राउंड आखणे झेंडा व्यवस्थित आहे का पाहणे इत्यादी कामे लक्षपूर्वक केली जात होती. वर्गावरती सगळ्यांना नोटीसही गेली होती की 15 ऑगस्टला सकाळी सात वाजता सर्वांनी झेंडावंदनासाठी हजर राहावे. दुसरे दिवशी माझ्या वर्गातील म्हणजे मी ज्याचे क्लास टीचर होते.. आठवी अ.. त्या वर्गातील दोन-तीन मुली आल्या आणि म्हणाल्या,.. बाई बोलायचे थोडं.. मी म्हणाले, काय? त्या मुलाने सांगितले आपल्या वर्गातल्या सर्व मुलींनी 15 ऑगस्टला न येण्याचे ठरवले आहे कारण दुसऱ्या दिवशी पासून चाचणी परीक्षा सुरू आहे त्याच्या अभ्यासासाठी घरीच रहावे असे सर्वांचे ठरले आहे. मी म्हणलं “ठीक आहे असं काही होत नाही तू जा बाळा मी त्यांना समजावेन” त्या दिवशी सातवा तास मला ऑफ होता वर्गावर असलेल्या शिक्षकांकडून मी तास मागून घेतला आणि सातव्या तासाला वर्गावर गेले मुलींना वाटले बुलेटिन पिरेड आहे मी म्हणाले चला आज गणित घेणार नाहीये मी गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणल्यावर सर्वांना आनंद मुलीने टाळ्या पिटल्या आणि मग एक गोष्ट सांगायला सुरुवात केली…

मुलींनो गोष्ट आहे खूप जुनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या कालावधीतली आपले अनेक क्रांतिकारक या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि त्यांना पकडून तुरुंगात डांबले जात असे त्यामध्ये 19/ 20 वर्षाची मुले होती त्यांना एका बरॅकित घातले होते म्हणजे एक आठ बाय आठ चा खोलीवजा तुरुंग. त्यामध्ये ही चार मुले राहत होती. जमावा मध्ये इंग्रजांन विरूद्ध भाषण केले म्हणून त्यांना पकडून आणलेले होते व शिक्षाही झालेली होती. येरवड्याच्या तुरुंगात ही सगळी मंडळी होती त्यामध्ये जागा नसल्यामुळे त्यांना बी क्लासमध्ये जागा दिली होती. त्या ठिकाणाच्या सुविधा जरा वेगळ्या असतात तिथे जरा वयस्कर नेते होते इन्कम टॅक्स भरणारे लोक होते आणि त्या ठिकाणी इतर कैद्यांना दररोज सकाळी गंजी देत असत म्हणजे पिठाची पेज त्या ऐवजी या बी क्लासमध्ये त्यांना दूध देत असत या चारी तरुणांनी ठरवले की आपल्याला जे दूध मिळते त्याचे आपण पाडव्या दिवशी श्रीखंड करून खाऊ पण या दुधाचे दही कसे लावायचे? तर त्यातील एक तरुण थोडा शिकलेला असल्यामुळे त्याला स्टोअर मध्ये काम दिले होते तो स्टोअर किपर म्हणून काम करीत असे त्याने त्याच्या स्टोअरमधून येताना धोतराच्या कनवटीला एक छोटासा तुरटीचा तुकडा चोरून आणला आणि त्या सर्वांनी सकाळी मिळालेले दूध तुरटी फिरवून विरजण लावलं त्यावेळी साखरेची पुडी वेगळी मिळायची या सर्वांनी ती साखर साठवून ठेवली होती खरंतर त्या चौघांना सकाळी दोघा दोघांच्या पाळीने दोन पायली दळण दळावे लागे त्या दिवशी दोघांनी उपाशीपोटी दळण दळले कारण दुसऱ्या दिवशी श्रीखंड खायचं काम होत ना आणि पाडवा साजरा करायचा होता. मग त्यांनी संध्याकाळी जे घट्ट लागलेले दही होते ते धोतराच्या फडक्यात बांधून रात्री तुरुंगाच्या गजाच्या बाजूला बांधून ठेवले आणि त्याच्या खाली एक भांडे ठेवले गंमत म्हणजे त्या चक्क्यामधून जे पाणी खाली पडत होते त्याचा टप टप असा आवाज येत होता तुरुंगामध्ये रात्री 10 नंतर लाईट बंद आणि पुन्हा लाईट लावण्याची कुणालाही परवानगी नसे. फक्त जेलर हे काम करू शकत पण तेही क्वचितच नियम म्हणजे नियम रात्री पहाऱ्यावर असणाऱ्या शिपायाला ही टप टप टिकी टिकी सारखी ऐकू आली तो घाबरला त्याला वाटले कुणीतरी तुरुंग फोडत आहे. कारण सगळे क्रांतिकारी त्यामुळे हे सहज शक्य होते त्याने तातडीने अधिकाऱ्यांना बोलवले त्यांनी प्रत्येक बऱ्याकीत जाऊन तपास करायला सुरुवात केली की आवाज कुठून येतोय….. रात्रीची निरव शांतता…. अधिकाऱ्याच्या हातात बॅटरी…. प्रत्येक बर्याकि मध्ये तो प्रकाशझोत टाकून तपास होत होता… दिवसभराच्या कामाने कैदी गाढ झोपलेले…. एकेक बऱ्याक पाहत असताना तो पुढे पुढे येत होता बुटांचा टाॅक टाॅक आवाज आणि पुढे प्रकाश झोत बाकी सर्वत्र अंधार या चार मुलांच्या बरॅकित आवाज येतोय त्याच्या लक्षात आले. त्याने सर्वत्र बॅटरी फिरवली तर त्याला एक गाठोडे बांधलेले आणि त्यातून पाणी पडण्याचा आवाज येतोय हे लक्षात आले त्याने आत येऊन काठीन ढोसून उठवले आणि विचारले, “क्या है ये?” त्यावर दोघे घाबरून गेले ते म्हणाले, “हमे कुछ पता नही” पण उरलेल्या दोघातील एका तरुणांनी उत्तर दिले, ” “हमारा कल त्योहार है और हम श्रीखंड बनाके खा रहे है” त्याला श्रीखंड म्हणजे काही कळलं नाही पण धोका काही नाही हे पाहून तो खुश झाला. और कल देख लेंगे असं म्हणत तो निघून गेला दुसऱ्या दिवशी यांच्या अंघोळ्या झाल्या अंघोळ्या म्हणजे शिट्टीवर तांबे ओतून घेणे.. चार चार तांब्यामध्ये आंघोळ पूर्ण करावी असा शिरस्ता होता अंघोळ झाल्यावर या तरुणांनी गंध लावले. देवाचे नामस्मरण केले श्रीरामाला वंदन केले जय श्रीराम घोषणा दिली आणि तयार झालेले चक्क्यात साखर मिसळून तयार झालेली श्रीखंड खालले नंतर “वंदे मातरम वंदे मातरम” ची घोषणा दिली कारण त्यांना ठाऊक होते आता आपल्याला शिक्षा होणार आहे… एकदा भीती गेली की मग काय? त्यांना लगेच बोलावणे आलेच अधिकाऱ्याने त्यांना शिक्षा सुनावली या दोन तरुणांना हात वर बांधून पाच वाजेपर्यंत टांगून ठेवा आणि पाठीवरती वीस फटके चाबकाचे मारा. शिक्षा सुनावल्यावर हे दोघे मोठ्याने घोषणा देत राहिले, ” वंदे मातरम जय श्रीराम भारतमाता कि जय”त्यांना ओढत शिपायाने बांधण्यासाठी नेले त्यांचे हात बांधून ठेवले आणि पाठीवरती वीस फटके मारायला सुरुवात केली.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज मी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हटले की कसे सावरून बसतो, कान टवकारून ऐकतो. आणि माहिती, भाषण म्हटले की सतरंजीचे दोरे काढतो. आता सध्याच्या काळात हे दोरे म्हणजे अंगठ्याने भरकन पुढे ढकलणे (सोप्या भाषेत म्हणजे स्क्रोल करणे).

 श्रावण महिना सुरु झाला की अनेक सण, उत्सव यांना सुरुवात होते. उपास, व्रतवैकल्ये यांना सुरुवात होते. त्यात श्रावणी सोमवार या दिवसाचे खास महत्व असते. कित्येक मंडळी बाकी काही नाही तरी श्रावणी सोमवार आवर्जून करतात. आपल्याला वाटले असेल मी आता श्रावण महिन्याचे महत्व सांगणार की काय? पण तसे नाही हो! हे सगळे तर सर्वांना माहितच आहे. आणि आपल्या कडे शंकराची मंदिरे पण खूप आहेत.

तर माझे पण असेच होते श्रावण महिना आला की मी पण अत्यंत भाविक होते. आणि कोणत्या शंकर मंदिरात दर्शनासाठी जाता येईल, अशी संधी व मैत्रिणी शोधत असते. मागच्या वर्षी असेच मैत्रिणी मिळून ओतुरच्या कपर्दिकेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. तिथले वैशिष्ठ्य लहानपणी पासून ऐकून होतो. त्या वेळी मोठ्या माणसांच्या बरोबर दर्शन घेतले होते. पण ते नंतर विस्मरणात गेले. म्हणून श्रावणी सोमवारी जाण्याचे ठरवले. जायचे म्हणजे थोडीफार माहिती असावी म्हणून आपल्या गुगल बाबांना विचारले तर त्यांनी सचित्र इतिहास समोर ठेवला की! अगदी नावा पासून माहिती सांगितली.

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन अशी शिवमंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही मंदिर ही शेकडो वर्षे जुनी आहेत. त्यातीलच एक शिवमंदिर म्हणजे पुणे शहराच्या उत्तरेला जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरामधील मांडवी नदीच्या तीरावर असणारे कपर्दिकेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिराला 900 वर्ष जुना इतिहास आहे. या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी महादेवाची मोठी यात्रा भरते.

तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावरती उभ्या असणाऱ्या पिंडी’ हे तेथील वैशिष्ठ्य.

या ठिकाणी शिवलिंगावर कोरड्या तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावर उभ्या असणाऱ्या तांदळाच्या पिंडी भाविकांचे प्रमुख आकर्षण असते. म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक श्रावणी सोमवारी जवळपास 1 लाखाहून जास्त भक्त दर्शनासाठी येत असतात. या सोबतच श्रावणी सोमवारच्या यात्रेनिमिताने या ठिकाणी कुस्त्यांचा देखील आनंद आपल्याला घेता येतो. सोबतच मंदिराशेजारीच संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांचे समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन संजीवन समाधीपैकी ही एक आहे तसेच जगभर प्रसिद्ध असणाऱ्या ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राचे हे उगमस्थान आहे.

मंदिराचा इतिहास-

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे या मांडवी नदी तीरावर अनुष्ठानासाठी बसले असता त्यांनी एक वाळूचे शिवलिंग तयार केले होते. शिवलिंग तयार करताना त्यांना त्या वाळूत एक कवडी मिळून आली त्या कवडीत एक शिवलिंग सापडले. संस्कृतमध्ये कवडीला कपर्दीक असे म्हणतात त्यावरून या शिवलिंगाचे कपर्दीकेश्वर असे नामकरण करण्यात आलं आणि सन 1200 च्या शतकात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. चंद्राकार मांडवी नदी तीरावर निसर्गरम्य परिसरात हे पुरातन भव्य मंदिर वसलेले आहे. शिवलिंगाच्या स्थापनेपासूनच येथील पुजारी यांनी प्रत्येक वर्षी याच शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या पिंडी बांधण्यास सुरुवात केली. ती परंपरा आजही सुरू आहे.

सगळे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात –

  1. पवित्र श्रावण महिन्यातील सर्व सोमवार
  2. महाशिवरात्री
  3. त्रिपुरारी पौर्णिमा
  4. मंदिराजवळ असणाऱ्या बाबाजी चैतन्य महाराजांचा समाधी सोहळा.

ज्या ठिकाणी जायचे त्याची माहिती आधीच घ्यावी आणि तिथे जाऊन आल्यावर आपले अनुभव सांगावेत. असे वाटते.

कपर्दिकेश्वर मंदिराची पूर्ण माहिती घेऊन आम्ही श्रावणी सोमवारी सकाळी लवकर ओतूर येथे पोहोचलो. तेथील जत्रा, मंदिर, तांदुळाच्या पिंडी सगळे बघण्याची उत्सुकता होतीच. जत्रा पण खूप लहानपणी बघितली होती. असे वाटत होते, लवकर पोहोचलो आहोत. एक तासात दर्शन घेऊन लगेच परत येता येईल. गाडीत तर हे पण ठरवत होतो की दर्शन घेतल्यावर अजून कुठे जाता येईल? पण प्रथम मोक्ष दात्याच्या दर्शनाची ओढ होती. म्हणून तिथे पोहोचलो.

तेथे गाडी पार्किंग साठी मोठीच व्यवस्था होती. आणि पार्किंग ते मंदिर हे जवळच साधारण दीड ते दोन किलोमीटर होते. आणि त्या दरम्यान सगळी जत्रा! सगळी दुकाने इतकी मोहात पाडणारी होती. विशेषत: स्त्रियांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. निरनिराळी ज्वेलरी, स्वयंपाकाची विविध भांडी, पिशव्या, हेअर पिन, क्लिप्स अगदी काय बघू आणि काय नको असे झाले होते. विविध खाद्य पदार्थ होतेच. पण अगदी निग्रहाने सगळी कडे मनावर दगड ठेवून दुर्लक्ष केले. एकमेकींचे हात धरुनच जावे लागले. कारण गर्दीच इतकी होती. आणि त्यात एकमेकींना सांगत होतो, प्रथम दर्शन घेऊ आणि येताना खरेदी करु. कारण पुढे काय होते माहितीच नव्हते.

सगळ्या गर्दीतून वाट काढत कसे बसे मंदिरा जवळ पोहोचलो. साधारण आपण मंदिराच्या आत प्रवेश करताच चप्पल काढतो. आम्ही पण काढणार होतो. पण एकूण गर्दी पाहून दर्शन रांग कुठे आहे ते पहावे म्हणून पुढे गेलो. तर काय सांगावे… दर्शना पूर्वीच मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली. आणि चप्पल न काढण्याचा शहाणपणाचा निर्णय योग्य ठरला. आणि जागोजागी चप्पल काढा आणि इथे ठेवा असा दुकादारांचा आग्रह टाळला याचेही समाधान वाटले. मंदिराच्या मागच्या बाजूने ३०/४० दगडी पायऱ्या चढून जायचे होते. तेथेही चप्पल कुठे काढावी ही चिंता होतीच. शेवटी माझी नेहमीची युक्ती कामी आली. चप्पल काढून एका पिशवीत ठेवून ती आपल्या जवळच ठेवावी हे सर्वांनाच पटले आणि तसेच केले. त्या मुळे एक चिंता तर मिटली.

इतके गोल फिरून आल्यावर वाटले आता दर्शन होणार! एका छोट्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. आणि देव किती दूर आहे याची थोडी कल्पना आली. कारण आत बऱ्याच बांबूच्या काठ्या लावून गोल गोल ओळी फिरवल्या होत्या. सगळ्या ओळी फिरत फिरत २/३ तास फिरलो तरी त्या रांगा संपेचनात. आणि पायात काही नसल्याने खडे चांगलेच टोचत होते. थोडे पुढे गेल्यावर त्याचे गुपित कळले. बरीच माणसे त्या बांबूच्या मधून रांगेत मधे मधे शिरत होती. मग आमचा नंबर कसा लागावा? अशा रांगेत फार गमती अनुभवल्या.

त्या रांगेत शेजारी भेटले. जुन्या मैत्रिणी भेटल्या. छोटी मुले तर मस्त इकडून तिकडून फिरण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला आपली छोटी मुले पुढे पाठवून ( बांबूच्या खालून ) त्या मुलाच्या निमित्ताने पुढे पुढे जात होत्या. आमच्या मनात एकच विचार येत होता. मोक्षदात्याच्या दर्शनाला थोडे कष्ट तर होणारच! असे सहज दर्शन होणार नाही. आणि ती मानसिकता असल्या मुळे सगळ्याचा आनंद घेत होतो. त्यात एक सात्विक महिला भेटली. तिथले झाड त्याची महती, दर्शनाने मोक्षप्राप्ती कशी होते. रांगेत मधे शिरू नये. देवाच्या दारी थोडे कष्ट सोसावे. आपल्या शरीराला कष्ट सोसावे लागले, पायाला खडे टोचले, तहान भूक सहन केली तर ते दर्शन मोक्षाप्रद नेते. तिने स्वतः कोणकोणती ठिकाणे किती शारीरिक कष्ट सोसून पहिली व दर्शन घेतले हे अगदी रंगवून रंगवून सांगितले. तिच्या त्या मोक्षाचा रस्ता दाखवण्या मुळे आम्ही फारच भारावून गेलो. आणि आता तिच्या पाया पडावे अशा विचारात होतो. तेवढ्यात आमचे लक्ष विचलित झाले. थोड्या वेळाने आम्ही मोक्ष दर्शनाचा मार्ग दाखवणाऱ्या महिलेला शोधू लागलो. अचानक ती कुठे गेली कळेचना! काही वेळाने ती महिला आम्हाला कष्ट घेऊन केलेल्या दर्शनाने कसा मोक्ष मिळतो हे पटवून स्वतः मात्र बांबूच्या मधून सगळ्या रांगा ओलांडून ७/८ रांगा पुढे मोक्षदात्याच्या दर्शनाला बरीच पुढे निघून गेली होती.

बऱ्याच रांगा ओलांडल्यावर, बरेच खडे पायात टोचवून घेतल्यानंतर त्या मोक्षदात्याच्या समोर दर्शनाला उभे राहिलो. आणि तो सोहळा, त्या जगप्रसिद्ध तांदुळाच्या पिंडी बघून ४/५ तासाच्या सर्व कष्टाचे सार्थक झाले.

इतके तास तिथे उभे राहिल्या नंतर ती जत्रा, खरेदी सगळे दुर्लक्षित झाले. त्यात एक बरे होते, आपण रस्ता चुकू अशी शक्यता व चालण्याचे कष्ट नव्हते. कारण गर्दीच आम्हाला ढकलून ते काम करत होती. आपण फक्त एकमेकींचे हात धरून उभे राहायचे. पार्किंग पर्यंत गर्दीने आपोआप आणून सोडले. आणि इतके तास झाल्या नंतर इतर ठिकाणी जाण्याचा प्रश्नच नव्हता.

असे मोक्षदात्याचे दर्शन व ती छोटी सहल अगदी अविस्मरणीय झाली.

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सोलापुरी भाकरी, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. शेंगा चटणीचा बोलबाला खूप होतो, पण बिचाऱ्या भाकरीला कोणी विचारत नाही. जोंधळ्याची, म्हणजेच ज्वारीची भाकरी ही तब्येतीला खूप चांगली असते, असं काही डॉक्टर सांगतात. इथेही पुन्हा डाव्या विचारसरणीचे डॉक्टर्स ” ज्वारी हा पिष्टमय पदार्थ असल्याने त्या मुळे शुगर वाढते ! ” असं ठणकावून सांगतात.

भाकरी ही पौर्णिमेच्या चंद्रासारखी असावी, तिच्यावर चंद्रावर असलेली हरणांची जोडी असावी ( थोडी जास्त भाजल्यावर ती करपते ).

गोल भाकरी करणे ही सुद्धा एक कला आहे. भाकरी करताना एक प्रकारे तीनताल वाजतो, धा s धा s धा s धा, भाकरी फिरवली जाते पुन्हा धा s धा s धा s धा. धिं हे अक्षर जरी वाजत नसलं तरी, मात्रा मात्र बरोबर असतात. अशा तीनतालात ज्या बायका भाकरी करतात, त्यांच्या भाकऱ्या सुंदर होतात. माझी मोठी बहीण अश्विनी देशपांडे हिने केलेली भाकरी खरंच सुंदर असते.

आमचे जगन्मित्र गुरुसिद्धय्या स्वामी ह्यांची एक बहीण बाळीवेसेत राहते. तिच्याकडे आम्ही एकदा जेवायला ( खास भाकरी खायला ) गेलो होतो. भाकरीतली वाफ आणि त्याच्या पापुद्र्यातले हाताला बसणारे चटके खात, भाकरी खाणे, हा विलक्षण योग तिथे आला. बिचारीचा प्रेमळपणा पण इतका, की पहिली भाकरी खाता खाता ताटात थंड होते, म्हणून ” ती अर्धी बाजूला ठेवा, ही दुसरी खावा ” भावावर असणारी मृदू माया आणि हाताला चटके देणारा हा ‘भाकरी योग’ आयुष्यभर लक्षात राहिला.

तसं सोलापूरच्या लोकांना भाकरीचं फार कौतुक नाहीये, कारण बहुतेक सोलापूरच्या घराघरांतून अशा भाकरी करणाऱ्या खूप माऊली आहेत. भाकऱ्या बडवण्यासाठीच आपला जन्म आहे, अशी सुद्धा काहीजणींची भावना आहे.

दोन वेळची चटणी भाकरी मिळाली की माणूस खूश होतो. खारब्याळी, रोट्टी आणि शेंगा च्यटणी साधं सोप्पं जेवणाचं गणित. त्यामुळे प्रॉपर सोलापुरी माणूस बाहेर फारसा जातही नाही आणि रमत देखील नाही.

” भाकर तुकडा खाल्ला का न्है अजुक ?” म्हणजे ‘जेवण झालं की नाही ?’ असं विचारलं जातं. पोळी म्हणजे ती फक्त पुरणाची, साधी पोळी म्हणजे ” चपाती “

एकंदरीतच पोळी, भाकरी, पुरणपोळी, धपाटे आणि थालीपीठ हे पदार्थ, अस्सल तबलावादकाने वाजविलेल्या कायद्यासारखे असतात. एकही मात्रा इकडची तिकडे होत नाही. हळू हळू भाकऱ्या खाणारे ( आता दीड भाकरी सकाळी दीड संध्याकाळी ) कमी होत चालले, तशी बायकांची भाकरी करायची सवयदेखील मोडायला लागली.

पुरुष जे जे काही करू शकतात, ते ते बायका करू शकतात, पण बायका जशी भाकरी करतात तशी भाकरी, पुरुष कधीच करू शकत नाहीत. पोळ्या करणारे पुरुष आहेत. पण ते फक्त भाजण्याची क्रिया करू शकतात. बाकी पोळी लाटणे आणि भाकरी थापणे यावर बायकांची अजूनतरी मक्तेदारी आहे.

आता भारतातून अमेरिकेत गेलेली मुलं, यू ट्यूब बघून किंवा आयांना विचारून पोळ्या करतात, पण भाकरीच्या कुणी मागे लागत नाही. अगदी सांगायचं झालं तर अजून शहरातल्या पोरीसुद्धा भाकरीच्या नादी लागत नाहीत.

मावळात तांदळाची भाकरी करतात, डोसा किंवा दावणगिरी डोसा, स्पंज डोसा, (निर डोसा, ज्याला खूप निऱ्या असतात) यांची महाराष्ट्रातील मावस बहीण म्हणजे, मावळातली तांदळाची भाकरी.

जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळेला तयार होणारी भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी. स्वभावाने खूपच तापट असते, म्हणून फक्त भोगीच्या दिवशीच फक्त तिला वापरतात. पुण्याच्या परिसरात भाकरी म्हणजे बाजरीचीच, ज्वारीची पाहिजे असल्यास सांगावं लागतं, जसं मराठवाड्यात स्टेट बँक म्हणजे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँकेला इंडिया बँक असं म्हणतात तसं.

भाकरीची अनेक भावंडं आहेत, सगळ्यात लहान आणि खूप खोडकर भाऊ ज्याला आई पाठीत जास्त धपाटे घालते, तो ‘धपाटे’.

आता पुण्या मुंबईत ‘ लोणी धपाटे ‘ या नावाने काहीही विकलं जातं. नुसता तेलात डाळीचा बॅटर घालून तव्यावर भाजणे म्हणजे, धपाटे नसतात रे sss !

धपाटे का करावे ? पूर्वी सोलापूरहून पुण्याला यायचं म्हणजे प्रवासात किमान दोन जेवणं व्हायची ( हीच लाल परी आठ आठ तास घ्यायची पुण्यात पोचायला, विजापुर औरंगाबाद तर सकाळी सहा वाजता विजापुरहून निघाली की, संध्याकाळी सहा वाजता कशीबशी औरंगाबादला पोचायची. दोन ड्राइव्हरच्या झोपा व्हायच्या. त्यामुळे प्रवासात जेवण्यासाठी या धपाट्यांचा शोध लावलाय, आपल्या हुशार पूर्वजांनी. जास्त वेळ टिकावा आणि त्यासोबत शक्यतो तोंडी लावायला कशाची गरज पडू नये, ही त्यावेळची गरज होती.

थालीपीठ हा देखील भाकरीचा भाऊच. करणाऱ्या सुगरणीच्या बोटांचे ठसे आणि चार छिद्रमय थालीपीठ किती लोकांच्या नशिबात आहे काय माहीत ! मला तरी थालीपिठाचा पृष्ठभाग चंद्रावर असलेल्या जमिनीसारखा वाटतो. त्यात तेल आतपर्यंत मुरावं म्हणून केलेली छिद्रे ही चंद्रावरच्या फोटोत दिसलेल्या जमीनीसारखी वाटतात.

पुण्यात हॉटेलात मिळणारी थालीपीठ ही खाद्य वस्तू, म्हणजे मर्तुकडी आणि हडकुळ्या माणसासारखी भासतात. थालीपीठ कसं लुसलुशीत असायला हवं, आता कशाच्याही नावावर काहीही विकतात आणि आपण ते खातो ( घरी करायला नको, म्हणून त्यालाच चांगलं म्हणून मोकळेही होतो. )

आता काही ठिकाणी मल्टिग्रेन नावाचं एक आभूषण ह्या सगळ्या खाद्य पदार्थांवर आलंय. हेल्थ कॉन्शस लोक अशा नवनवीन कल्पना शोधून काढतात. तशी मल्टिग्रेन थालीपीठ मिळतील. गिरणीत सांडलेली सगळी पिठं एकत्र करून त्यांचं थालीपीठ म्हणजे मल्टिग्रेन थालीपीठ.

मक्याची पण भाकरी करतात. ती कधी फारशी खाण्यात आली नाही. ती थोडीफार पंजाबात लग्न होऊन गेलेल्या बहिणीसारखी गलेलठ्ठ आणि तिच्या सोबत ” बरसोंका साग ” बरसो से खाते हैं इसलिये, सरसोंका च्या ऐवजी बरसोंका !

रोठ हा देखील भाकरी सदृश पदार्थ. इकडे विदर्भात तर, एके दिवशी पोळ्याभाकरी करताना नवऱ्याशी भांडण झालं आणि बायको चिडली, ” मी नाही पोळ्याभाकरी करणार ” असं म्हणून, तिने पोळ्या करायला केलेले गोळे, रागारागाने दिले चुलीत फेकून आणि गेली निघून बाहेर. नवऱ्याला लागली होती कडक भूक, त्याने ते चुलीतले गोळे काढले बाहेर आणि त्यावरची राख फुंकून घातले वरणात, ते गोळे झाले कडक म्हणून त्यावर भरमसाठ तूप घातलं, त्याला ते इतकं आवडलं की तो एक नवीन पदार्थ तयार झाला. त्याचं नाव दाल भाटी. खरं तर तो तेव्हा पुटपुटला होता ” दाल भागी ” म्हणजे बायकोने गोळे दाल दिये चुल्हे में और भाग गयी. पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि दाल भाटी तयार झाली असावी, असा माझा अंदाज आहे बरं का !

‘वरण फळं ‘, ‘चकोल्या ‘अशा नावाचा पण एक पदार्थ महाराष्ट्र आणि विदर्भात जास्ती दिसतो. ” रोज रोज काय मेलं त्या पोळ्या भाजायच्या, असं म्हणून एखाद्या गृहिणीने, शेजारच्या गॅसवर उकळत्या आमटीत लाटलेल्या पोळ्यांचे तुकडे टाकले आणि झाली वरण फळं तय्यार ! वरून लसणीची फोडणी, खोबरं वगैरे साज शृंगार नंतर केला गेला असावा.

अरेच्या ! भाकरीपासून झालेली सुरुवात बघा कुठे कुठे पोचली, सगळ्यात शेवटी काय ? तर असेल चाकरी तर मिळेल भाकरी, किंवा बहिणाबाईंच्या ओळी तर जगप्रसिद्ध आहेतच,

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर.

लेखक : सतीश वैद्य

 फोन नं. : 9373109646

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकल है भाई ! इधरकेही है !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ लोकल हैं भाई ! इधरकेही हैं ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

लोकल हैं भाई ! इधरकेही हैं !

अंधेरी रातों में.. सुनसान राहोंपर कुणी मसीहा निकले ना निकले… पण या ठिकाणी खरे शहेनशाह असतात ती ही मंडळी ! (या वाक्यातील अंधेरीचा मुंबईतील अंधेरीशी काहीही संबंध नाही.) तर… ही मंडळी चतुष्पाद वर्गातील आणि केनाईन प्रकारातील असतात. आता कुणी केनाईन (म्हणजे फ्रेंच-इंग्लिश भाषेतील कुत्रा हा शब्द) ला K-9 असं समजू आणि लिहू शकत असेल तर त्याला आपण काय करणार? 

लहानपणी तमाम बालकवर्ग यांना भूभू या संबोधनाने ओळखातो… पण हा भूभू जेंव्हा भोभो करीत मागे लागतो तेंव्हा बालकांची बोबडी वळते, हेही खरेच. पुल्लींगी कुत्रा म्हणजे एक कुत्रा. आणि स्त्रीलिंगी कुत्री. अनेकवचन कुत्रे असे असतात. पण अनेक कुत्री असा अर्थ प्रचलित आहे. फार वेगळ्या अर्थाने, विशेषत: महिला वर्गात ‘कुत्री’ हा एकवचनी अपशब्द वापरात आहे. परेश रावलांच्या तोंडी ‘कुत-या’ ही शिवी तर सिनेरसिकांना अत्यंत गोड लागते. खरं तर हिंदीवाले कुत्र्या हा शब्द कुतरीया असा उच्चारतात. असो.

श्वान मानवाच्या जवळ आले आणि अगदी घरचे झाले त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. इथे श्वानप्रेमी आणि श्वानविरोधक असा विषय काढला तर खूपच लिहावे लागेल.. म्हणून थांबतो. पण भटके कुत्रे हा एक अत्यंत गंभीर विषय म्हणावा लागेल…. रात्री उशीरा घरी आणि तेही एकट्या-दुकट्याने (हो… दुचाकीवर दोघे असले तरी) परतणा-या वाटसरु लोकांना हा विषय पक्का माहीत आहे. भय इथले संपत नाही याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल.

कुत्रे धावत्या वाहनांचा, विशेषत: दुचाकी वाहनांचा पाठलाग का करीत असावेत, यावर खूप संशोधन झालेले आहे. दुचाकी, हलकी वाहने(कार, रिक्षा इ. ) आणि नंतर अवजड वाहने असा श्वानांचा पसंतीक्रम असतो, हेही निरीक्षण आहे.

कुत्रे दुचाकीच्या मागे लागले आहेत… आणि दुचाकीस्वाराच्या पोटरीचा लचका तोडला आहे, असे फार क्वचित झालेले असावे… आणि झालेच असेल तर त्याचे कारणही निराळेच असावे! कार चालक मात्र या चाव्यातून बचावतात… कारण ते आत सुरक्षित असतात. दुचाकीचालक जखमी होतात ते घाबरून वाहन दामटताना वाहन घसरल्यामुळे किंवा कुठेतरी धडकून. वाहन एका जागी स्थिर थांबले की कुत्रेही थांबतात आणि काहीच सेकंदात शांत होऊन निघून जातात, असा अनुभव आहे. इराक मध्ये अमेरिकी सैन्य घुसले आणि तिथे काहीच न सापडल्याने गोंधळून गेले होते. यावर ताईम्स ऑफ इंडिया मधल्या एका स्तंभात जग सूर्या नावाने लिहिणा-या लेखकाने इराक म्हणजे धावती कार.. तिच्यामागे धावणारे अमेरिकी सैन्य… थांबलेली कार आणि आता करायचे नक्की काय? अशा संभ्रमात पडून जागच्या जागी थांबलेले कुत्रे असे चित्र शब्दांनी रंगवले होते. हो… या स्तंभ शब्दावरून आठवले…. कुत्रे आणि खांब यांचा खूप निकटचा संबंध आहे. पण खूप बारीक पाहिलं तर कुत्र्यांना खांबच पाहिजे असतो, असे नाही. उभ्या असलेल्या कोणत्याही वस्तूवर हे प्राणीमित्र आपला ठसा उमटवू शकतात. कारण त्यांचे साध्य ठरलेले आहे.. साधन नव्हे! 

सर्वच हिंस्र श्वापदं आपला आपला इलाखा निश्चित करण्याच्या बाबतीत खूप सतर्क असतात. आता या सीमारेषा ठरवायच्या कशा? यावर त्यांनी एक अत्यंत सोपा उपाय शोधून काढला आहे… अनादी कालापासून. लघुशंका! इथे लघु म्हणजे अत्यंत थोडे असा अर्थ घेण्यास हरकत नाही. एन. जी. सी. , डिस्कवरी वाहिन्यांच्या कृपेने सामान्य लोकांना फक्त चित्रे, प्राणीसंग्रहालये यांतून पहावे लागणारे प्राणी घरबसल्या पाहण्याची सोय झाली. त्यातून मग प्राण्यांची इत्यंभूत माहिती दिसू लागली… (बिचा-या प्राण्यांच्या खाजगी जीवनाचा भंग मात्र पदोपदी होतानाही दिसू लागला!) 

वाघ, सिंह आपल्या सीमा कोणत्या आहेत, हे इतरांना सहज समजावे म्हणून परिसरातील झाडांवर आपल्या मूत्राचा अगदी मोजक्या प्रमाणातील फवारा मारताना आपण पाहिले असेल. म्हणजे संबंधित जागा मालक जवळपास नसतानाही आगंतुकास सहज समजावे की Tresspassers will be prosecuted! आणि तरीही कुणी घुसलाच तर त्याचं काही खरं नसतं.. हे समस्त प्राणीजगत जाणून असते. बरं, हे marking करताना ज्याच्या साठी ह्या खाणाखुणा पेरलेल्या असतात त्याला सहज गंध मिळेल याचीही काळजी घेतली जाते… नाहीतर आपले सरकारी फलक… वाहन उभे करून झाल्यावरच समजते की आजतर P-2. आणि तोपर्यंत इटुकली पिटुकली पावती फाडून झालेली असते.

दुस-या प्राण्याच्या नाकासमोर ही खूण असेल, त्याला ती सहज हुंगता यावी, अशाच उंचीवर ही फवारणी अचूक केली जाते. आता, आपले कुत्रे जरी आपल्या आश्रयाने रहात असले तरी त्यांनी आपापसात आपले जागावाटप निश्चित करून घेतलेले असते. त्यांची वार्डरचना अगदी अचूक असते. बाहेरचा कुणी आला की त्याला सीमेच्या पलीकडे पिटाळून लावणे एवढंच काम सर्व मिळून करतात. बाकी संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न जास्त असतो. म्हणून कुत्रे विजेच्या खांबावर विशिष्ट उंचीवरच खूण करून जातात. दुस-या कुत्र्याला उभ्याउभ्याच (अर्थात आडव्या आडव्याच) तो वास हुंगता यावा आणि तिथून मुकाट पुढे निघून जाता यावं) गोष्टी लक्षात याव्यात, अशी योजना असते. आता खांब कमी असतील आणि परिसर मोठा असेल तर मग कुत्रे अन्य मार्ग शोधतात. दुचाकी, मोटारी यांचे टायर्स अगदी सोयीचे ठरतात. रबरावरील खुणा लवकर मिटत नाहीत… यासाठीच टायर long lasting म्हणवले जात असावते! म्हणून कुत्रे याच वस्तूवर टांग वर करतात! बाहेरून आलेला कुत्रा अगदी सहज ह्या पाट्या पाहतो… आणि शारीरिक ताकद मर्यादित असेल तर पुढील मार्गावर निघून जातो.. शेपूट योग्य त्या ठिकाणी लपवून.

आता आपण जर आपली ही गंधीत दुचाकी घेऊन निघालो आहोत… आणि हा गंध भलत्याच श्वानांचा असेल तर आपण ज्या गल्लीतून जातो निघालो आहोत त्या गल्लीतील बाहु(दंत)बली सभासद लोकांना आक्षेप असणं साहजिकच नव्हे काय? हे लोक दुचाकी, कारच्या नव्हे तर त्यांच्या टायर्स वरील शत्रूपक्षाच्या सुकलेल्या खुणांचा मागोवा घेत धावत असतात.. आणि आपल्याला वाटतं की ते आपल्या मागे धावताहेत! असं घडत असताना (दुचाकीवरील) व्यक्तींनी आपलेही पाय थोडे वर उचलून धरले आणि सरळ रेषेत मार्गाक्रमण करीत राहिले तर काम होते… ते पहारेकरी त्यांच्या सीमा ओलांडून पुढे येत नाहीत.. उलट मागून येणा-या दुस-या वाहनांच्या मागावर… नव्हे वासावर राहतात… त्यांचे आपले वैय्यक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही! 

पण आपण नेहमीच त्यांच्या मार्गातून ये जा करीत असू, आणि ती ही रात्री… तर काही दिवसांनी हे ड्युटीवर असलेले पहारेकरी आपल्या ओळखीचेही होऊ शकतात. त्यांना अधोन्मधून चापानी देत गेलं की तर मग आपली साधी तपासणीही होत नाही. पण एखादेवेळी पहारेकरी बदलला गेला आहे आणि आपल्याला ते ठावे नाही, तर अशावेळी अतिआत्मविश्वास नडू शकतो.

एवढं सगळं असलं तरी भीतीही वाटतेच. यावर उपाय म्हणून काही लोक मार्ग बदलतात. पण असे मार्ग नसतातच मुळात. दाट मनुष्यवस्ती, गर्दी किती आहे! यावर एक गमतीशीर उपाय सांगणारा एक विडीओ सध्या खूप बघितला जातो आहे… काही लोक रात्री दुचाकीवरून गल्लीत घुसले आहेत….. अर्थात जागरूक कुत्रे त्यांच्या मागे धावाताहेत… दुचाकीवरील लोक ओरडून म्हणताहेत… लोकल ही भाई… इधर के ही हैं…. (आम्ही इथलेच आहोत भावांनो! स्थानिक निवासी आहोत… !) आणि हे ऐकून ते कुत्रे आपले आक्रमण रहित करतातही… असे दिसते!) टोल नाक्यावर साधारण असा संवाद ऐकू येत असतो.. पण हा मोकाट टोळश्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी वापरलेला फंडा मात्र अजब आणि मनोरंजन करणारा आहे. मात्र ही सबब सर्वच कुत्र्यांना समजेल असे नाही! त्यामुळे सावधान! आणि हो… शक्य झाल्यास वरचेवर वाहनांचे टायर्स पाण्याने स्वच्छ करीत जावे, हे उत्तम !

(या लेखात एकट्या मुलाला, व्यक्तीला गाठून त्याचा चावे घेऊन जीव घेणा-या कुत्र्यांचा विचार केलेला नाही! हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दिल्लीत एका व्यक्तीचा मोकाट कुत्र्यांनी जीव घेतल्याची घटना ताजी आहे!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जोडपी / जोड्या ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

☆ जोडपी / जोड्या ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

“ ए सोनू, तुमची जोडी अगदी स्वर्गातबनल्या सारखी आहे. अगदी इंग्रजी मध्ये म्हणतात त्याप्रमाणे “Made for each other ” … मिनू सोनूला सांगत होती…..

सोनू तिला म्हणाली की “ अग असे काही नसते…. जोड्या स्वर्गात जुळवल्या जातात आणि पृथ्वीवर त्या प्रत्यक्षात दिसतात असे म्हणतात ते खरे आहे… “ 

या दोघींचा संवाद ऐकून मी विचारमग्न झालो….

आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक जोड्या पाहिल्या,

काही जवळून तर काही दुरून….

काही चित्रपटात तर काही प्रत्यक्षात..

काही नात्यातील तर काही परक्या….

… स्वतःची जोडी ही अशीच एका सावध/बेसावध क्षणी जुळली गेली….

आयुष्याच्या मध्यान्ह होताना असे लक्षात आले की जोड्या स्वर्गात जुळतात हे कदाचित खरे असेल, पण त्या या पृथ्वीवर जुळण्यासाठी, नव्हे जुळवून घेण्यासाठी मात्र काहीतरी वेगळे कौशल्य जोडीतील दोघांकडे लागते.

महान लेखक व. पू. काळे एका ठिकाणी लिहितात,

लग्न पत्रिकेवर गणपतीचे चित्र छापून आणि लक्ष्मी प्रसन्न असे लिहून संसार घरी लक्ष्मी रूपाने येणारी गृहलक्ष्मी होऊ शकत नाही. तर तिच्यातील लक्ष्मीची जागृती करण्याचे काम ज्या पतीला जमते, त्याचा प्रपंच सुखाचा होण्याची शक्यता असते.

पतीसाठी घरदार सोडून आलेल्या, नवऱ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीला आपल्या नवऱ्याचे घर आपले वाटावे, किमान इतकं तरी त्या नवऱ्याने आणि सासरच्या माणसांनी तिच्याशी सौजन्याने वागले पाहिजे….

आधी संवाद, मग सहवास, पुढे त्यातून विश्वास आणि अकृत्रिम स्नेह…

आणि 

मुख्य म्हणजे प्रपंचात राहिलेल्या ‘गाळलेल्या’ जागा रिकाम्या न ठेवता ज्याला दिसतील त्याने मूक राहून भरणे…

हे यातील काही टप्पे असू शकतील….

एकेमकांना जाणून घेत, घरातील माणसांशी जुळवून घेत, दैनंदिन व्यवहारात प्रेम, माया, स्नेह जपत, वाढवत केलेला प्रमाणिक व्यवहार पती पत्नीचे नाते दृढ आणि उबदार करीत असतो आणि याला जर सम्यक सुखाची जोड मिळाली तर मग पती पत्नीच्या नात्याला बहार येते, मोगऱ्याचे ताटवे बहरू लागतात….

ज्या जोडप्यांनी, जोड्यांनी असे प्रयोग करून पाहिले असतील, अनुभवले असतील, लेख वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले असेल….

प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला समजून घेत आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करू….

आपल्याला नक्की जमेल…. शुभेच्छा!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर

वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यानं आपल्या पुस्तकांच्या विक्रीचा आढावा घेतला.. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्या पुस्तकांच्या जवळपास चार कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.

मानधनातुन अफाट पैसा कमावणारा हा अब्जाधिश लेखक..

सॉमरसेट मॉम..

आपल्या लेखणीच्या बळावर समाजातील उच्च समजली जाणारी मंडळी त्याच्या स्नेहात होती‌. त्याच वर्तुळात त्याचा वावर होता… भारतात जेव्हा तो आला होता.. तेव्हा तर व्हाईसरॉयचा खास पाहुणा म्हणूनच आला होता. आपल्या प्रचंड इस्टेटीतला काही भाग काढून त्यानं सॉमरसेट मॉम प्रतिष्ठान सुरु केलं. अनेक होतकरु लेखकांना पैसा उपलब्ध करुन दिला..

त्याचं लेखन अतिशय शिस्तशीर.. सकाळी नऊ ते दुपारी एक ही त्याची लिहीण्याची वेळ.. अगदी रोजच्या रोज.. सुट्टी नाही.. सण नाही.. वार नाही.. रविवार पण नाही.. प्रवासात असलं तरीही खाडा नाही..

रोजच्या रोज काय सुचणार? पण नाही.. तो टेबलपाशी जाऊन बसायचाच.. ती एक शिस्तच लावून घेतली होती त्यानं.. काहीच सुचलं नाही तर कागदावर सही करून परत परत गिरवायचा.

मुळचा तो लघुकथा लिहिणारा.. पण त्याने अनेक कादंबऱ्या लिहिल्या.. नाटकं लिहिली.. चित्रपट लेखन केलं.. लेखक म्हणून त्याची प्रतिमा तेजस्वी होती.. पण..

.. पण त्याच्या आयुष्याला एक दुसरीही बाजू होती.

सॉमरसेट मॉम बोलताना अडखळत बोलायचा.. तोतरा.. त्यामुळे त्याच्या मनात न्युनगंड निर्माण झाला होता.. सगळ्यांपासून दुर दुर रहायचा.. खास करुन स्त्रियांपासून..

आणि यातूनच त्याच्यात लैंगिक विकृती निर्माण झाली होती.. त्यानं चार लग्न केली.. पण ती टिकली नाहीत.. सगळेजण आपल्या वाईटावर आहेत असंच त्याचं म्हणणं असायचं.. सगळ्यांबद्दल मनात संशय.. त्यामुळे भांडणं.. ‌मग अवहेलना..

त्याला एक मुलगीही होती. सायरा तिचं नाव.. तिच्याशी तर त्याचं अजिबात पटलं नाही.. तिच्यावर त्यानं नाही नाही ते आरोप केले. ती कशी लबाड आहे.. वाईट चालीची आहे हे तो वारंवार सांगु लागला. एका अमेरिकेन मासिकात त्यानं सायराचं चारित्र्यहनन करणारी लेखमालाच लिहिली.

पण लोकांना ते आवडलं नाही.. त्याच्या नेहमीच्या प्रकाशकांनी पण ते ग्रंथरूपात आणण्यास नकार दिला.

त्याची एक आजी होती.. ती पण थोडंफार लेखन करायची. लहान मुलांसाठी तिनं अनेक छोटी छोटी पुस्तकं तिनं लिहिली होती.. वाटायचं तिला आपल्या नातवानं पण ती वाचावी.

पण सॉमरसेटनं ती कधीच वाचली नाही.. तो तिला भेटतही नसे.. खुप दुस्वास करायचा. आपल्या अगोदर आपल्या घराण्यात कुणी लेखन केलंय याच गोष्टीचा राग त्याच्या मनात कायम होता.

वयोमानानुसार आजी म्हातारी झाली.. अनेक व्याधी तिला जडल्या.. पण मरतेसमयी तिच्या जवळ फुटकी कवडीही नव्हती. ‌पैशाच्या अभावी ती उपचार घेऊ शकली नाही. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेली ॲन आजी वाट पाहु लागली.. नातवाची..

.. पण मॉमने तिची घोर उपेक्षा केली. तो तिला भेटायला आलाच नाही.. बेवारस मरणच तिच्या नशिबी होतं.

सॉमरसेट मॉमची ही दोन रुपं. वयाच्या पंचाहत्तरीत त्यानं लेखन थांबवलं.. आणि वयाच्या नव्वदीत आल्यावर त्याला जाणवलं….

…. काय मिळवलं मी? माझं सगळंच चुकत गेलं.. माझं सगळं आयुष्य फुकट गेलं..

आत्महत्येचे विचार त्याच्या मनात चोळु लागले.. पण ती वेळच आली नाही.. ऐश्वर्यसंपन्न असलेला सॉमरसेट मॉम वयाच्या ब्याण्णव्या वर्षी एकाकी अवस्थेत हे जग सोडून गेला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares