☆ सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले, भगवान विष्णुला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत.
गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. भिकुशेट आपल्या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्यांनी भक्तांचा मोठा आदरसत्कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्णुसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली.
यावर भिकुशेट म्हणाले,”मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्णुला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे.” लोक म्हणाले आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्हा भिकुशेटच्या पेढीवर गेले असता भिकुशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.
भिकुशेटने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिकुशेटच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या.. ते कृत्रिम पाय होते. ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला.
भिकुशेट म्हणाले,” भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्या विष्णुला सोन्याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता पण या विष्णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्याचांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत.”
तात्पर्य –मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा
लेखक : अज्ञात
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आषाढी अमावस्या !! दीप पूजन…. काय बरं कारण असावं? ज्या दिव्यांनी पूजा करायची त्याच दिव्याची पूजा करायची?
विचार करताना वाटले आपण ज्याचे उपकार घेत असतो त्याला वर्षातून एकदा तरी कृतज्ञतेची पावती द्यावी हा संस्कार तर यातून देत असावेत.
म्हणजे बघा ना, वर्षभर पूजेसाठी रोज आपण ज्या ज्या दिव्यांनी देवांना औक्षण करतो, ज्या दिव्यांनी वाढदिवस, स्वागत, सण समारंभ ई. महत्वाचे दिवस आनंदी, सकारात्मक करतो त्या दिव्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दिव्यांचीच पूजा केली जात असावी.
श्रावण महिना तर सणांचा राजाच. दररोज म्हटले तरी पूजा अर्चा चालू असते. मग अशावेळी दिवे स्वच्छ केलेले असले तर कामं सोप्प ना? मग त्या निमित्ताने दीप पूजन म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारल्या सारखेच ना?
पण मग आजीने सांगितले, समई ही घरातील कर्त्या बाईचे प्रतीक आहे. त्या मधे असलेली वात म्हणजे तिचा प्राण आणि त्यातून निर्माण झालेली ज्वाला म्हणजे दिवा. बघा सगळे त्या समईचेच कर्तृत्व… पण किती सहज ती हे कामं त्या दिव्याच्या नावाने करते?
म्हणजे असते समई… ती
तिच्यातली ज्योत….. ती
तिच्यातली ज्वाला…. ती
पण हे सगळे मिळून तो… दिवा.
समई, मशाल, निरंजनाची आरती, मेणबत्ती, मंदिरात असलेल्या हंड्या, दिवटी, कंदील हा शब्द वापरत असले तरी तो शब्द मराठी नाही, त्याला बत्तीच म्हणायचे, पणती,अजूनही दिव्यांची रूपे ही स्त्रीलिंगीच आहेत पण नाव मात्र दिव्याचे….
हेच तर आपल्या संस्कृतीचे खरे प्रतीक… संसाराच्या मंदिरात ही समई तेवत रहाते पण ती त्याचाशी एकरूप होऊन त्याच्या नावाने सगळे आनंदाने करताना घरदार उजळवून टाकते म्हणूनच घराचे मंदीर होते.
मग अशा समईला जेव्हा खरंच खूप काम असणार आहे त्या आधी थोडा आराम दिला तर नव्या दमाने नव्या जोषाने ती काम करू शकेल या भावनेतून फक्त डाळफळाचा नैवेद्य ( साधा सोपा स्वयंपाक ) म्हणजे स्वयंपाकातही तिला दिलेली ही थोडी सूट… म्हणजे तिच्या प्रती दाखवलेली कृतज्ञता…. अशा समयांचे अर्थात दिव्यांचे पूजन म्हणजे नारी कार्याची ठेवलेली जाण…. म्हणूनच काही ठिकाणी मातृका पूजनही असते.
अजूनही म्हणजे जेव्हा तो नसतो सूर्य / चंद्र हे नैसर्गिक दिवे, तेव्हा तिची रूपे त्याचे कार्य करू शकतात…. पण ती नसेल तर? देवाची किंवा इतर पुण्यकर्मे अधूरी…. ज्योतीतून ज्योत निर्माण करणे तिलाच जमते…. मग असे तिचे… पर्यायाने नारीचे महत्व जाणून तिच्या कार्याची जाण ठेऊन तिला कृतज्ञता द्यायचा आजचा दिवस…. अंधःकारातून खऱ्या अर्थाने तेजाकडे घेऊन जाणाऱ्या तिने ज्याला सर्वस्व अर्पण केले त्या दिव्याचा दिवस….
चला ते तेज तिचं महत्व खऱ्या अर्थाने जाणून घेऊ या आणि प्रार्थना करू…
पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात. काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृदगंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो.त्यांची रिमझिम माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं! पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात. अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करतात.
पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून जातो.
मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देते. अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! मन मोर नाचू लागतो तेव्हा सुंदर आठवणींचा पाऊस आपल्या मनात भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. कधी मंद बरसत, कधी रिपरिप तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…
☆ “घर थकलेले संन्यासी…” – लेखक : प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
घर थकलेले संन्यासी
हळूहळू भिंतही खचते ….
नागपुरातल्या प्रताप नगर, रविंद्र नगर, टेलिकाॅम नगर परिसरातून रोज जाणेयेणे करताना ग्रेसच्या या ओळी मनात येतात. नागपूर म्हणजे तसे ऐसपैस अघळपघळ शहर होते. ४० – ५० वर्षांपूर्वी तत्कालीन नोकरदारांनी थोडे शहराच्या बाहेर मोकळ्या हवेत घर बांधूयात म्हणत दक्षिण, नैऋत्य नागपुरात मौजा जयताळा, मौजा#e-abhivyakti भामटी, मौजा परसोडी शिवारात प्रशस्त प्लाॅटस घेतलेत. त्यावर खूप नियोजन करून सुंदर टुमदार घरे बांधलीत. त्यात आपल्या कुटुंबाचा, मुला नातवंडांचा विचार करून छान ३००० ते ५००० चौरस फुटी प्लाॅटसवर प्रशस्त वास्तू उभारल्यात. तळमजला आणि पहिला मजला.
त्या प्लाॅटसवर तेव्हाच्या मालकांनी छान छान झाडे लावलीत. जांभूळ., पेरू,आंब्यासारखी फळझाडे, पारिजातक, सदाफुली, चाफ्यासारखी फुलझाडे, मोगरा, मधुमालती, गुलमोहराचे वेल. आपण लावलेले आंब्याचे झाड आपल्या नातवाला फळे देईल, फुलझाडांची फुले रोज देवपूजेला कामाला येतील, मोकळी हवा मिळेल, मस्त जगू हे साधे सोपे, कुणालाही न दुखावणारे स्वप्न.
सुरूवातीच्या काळात मुख्य शहराबाहेर वाटणारी आणि “कुठच्याकुठे रहायला गेलात हो !” अशी पृच्छा सगळ्यांकडून होणारी ही वस्ती शहर वाढल्याने अगदी शहराचा भाग झाली. सगळ्या सोयीसुविधा इथे मुख्य शहरासारख्याच किंबहुना त्यापेक्षा वरचढ उपलब्ध होऊ लागल्यात. घरमालक सुखावलेत. तोपर्यंत ते त्यांच्या निवृत्तीच्या आसपास पोहोचले होते. मुले हाताशी आलेली होती. मुलींची लग्ने झालेली होती, ठरलेली होती. सगळं छान चित्र.
पण १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या संगणक क्रांतीने जग बदलून गेले मग नागपूर तरी त्याला कसे अपवाद असणार ? संगणक क्रांती नागपूरच्या आधी पुणे, हैद्राबाद, बंगलोर ला आली. होतकरू, हुशार तरूणांचे नोकरीनिमित्त फार मोठे स्थलांतर सुरू झाले. काही काहींचे तर अगदी सातासमुद्रापार अमेरिकेत स्थलांतर झाले.
सुरूवातीला “माझा मुलगा बे एरियात आहे, डाॅलर्समध्ये कमावतोय. गेल्या वर्षी आम्ही दोघेही जाऊन आलो अमेरिकेत. म्हातारा म्हातारीला मुला – सुनेने पूर्ण अमेरिका दाखवून आणली हो. अगदी लास वेगासला नेऊन कॅसिनोत कधी नव्हेतो जुगारही खेळलो.” असे कौतुक झाले.
पण नंतर अमेरिकेत गेलेले, पुणे बंगलोरला गेलेले मुलगा – सून नागपूरला परतण्याची चिन्हे दिसेनात. तिथली प्रगती, तिथल्या संधी इथे नव्हत्या. नातवंडांचा जन्म जरी नागपुरात झाला असला तरी त्यांची वाढ, शाळा या सगळ्या घाईगर्दीच्या महानगरांमध्ये झाल्याने त्यांना नागपूर हे संथ शहर वाटू लागले. इथे फक्त आपले आजी – आजोबा राहतात, हे आपले शहर नाही हे त्यांच्या मनात बिंबले गेले. त्यात त्यांचाही काही दोष नव्हता. करियरला संधी, उभारी मिळणारी ठिकाणे कुणालाही आपलीशी वाटणारच. घरमालक आजी आजोबा नागपूरला अगदी एकटे पडलेत. तरूणपणी एकत्र कुटुंबात वाढावे लागल्याने राजाराणीच्या संसारासाठी आसुसलेल्या या पिढीला आता हा राजाराणीचा संसार अक्षरशः बोचू लागला. भरलेले, हसते खेळते असावे म्हणून बांधलेले घर आता फक्त झोपाळ्याच्या करकरणार्या कड्यांच्या आवाजात आणि संध्याकाळी मावळत्या सूर्यासोबत अंगणातल्या झाडांच्या लांब सावल्यांमध्ये बुडून जायला लागले. मुला – नातवंडांच्या संसाराची वाढ लक्षात घेऊन बांधलेले चांगले ८०० – ८५० फुटांचे प्रशस्त स्वयंपाकघर सकाळी साध्या भातासोबत फोडणीचे वरण आणि संध्याकाळी त्याच उरलेल्या भाताला फोडणी दिलेली बघू लागली. स्वयंपाकघरातल्या ताटाळात असलेल्या ३० – ४० ताटांवर धूळ जमू लागली. सकाळ संध्याकाळ एक कुकर, दोनतीन भांडी, एक कढई आणि दोन ताटल्या एवढ्यातच भांड्यांचा संसार आटोपू लागला.
मालकांची मुलेही पुण्यात, बंगलोरला स्थाइक झालीत. ही दुसरी पिढीही आता निवृत्तीच्या आसपास आली होती. त्यांची मुलेही तिथेच रमली होती, पोटापाण्याच्या उद्योगाला लागली होती. नागपूरच्या त्यांच्या फेर्या वर्षातून सणांसाठी एकदोन वेळा किंवा ते ही जमेनासे झाले तर म्हातारा – म्हातारीला पुणे बंगलोरला बोलावून तिथेच महालक्ष्म्या गणपती हे सण साजरे होऊ लागलेत. “आमच्या घरच्या महालक्ष्म्या या वर्षी म्हैसूरला बसल्या होत्या हं” हे अभिमानाने सांगण्यातल्या सुरांत “कधीकाळी महालक्ष्म्यांसाठी लागतील म्हणून खूप फुलझाडे, केळीच्या पानांसाठी केळी नागपूरच्या घरात लावलेली होती त्यांचा या वर्षी उपयोगच झाला नाही. सगळी तशीच सुकून गेलीत.” हा सूर मनातल्या मनातच खंतावू लागला.
म्हातारा – म्हातारी आजारी पडू लागलेत. हाॅस्पिटलायझेशन साठी मुले येऊ लागलीत. ती पिढी तर यांच्यापेक्षा जास्त थकलेली. “बाबा / आई, तुम्ही तिकडेच चला ना आमच्यासोबत. सगळ्यांनाच सोईचे होईल.” असा व्यावहारिक मार्ग निघू लागला. म्हातारा – म्हातारी सहा महिने, वर्ष आपल्या वास्तूपासून, जीवनस्वप्नापासून दूर राहू लागलेत.
जीवनक्रमात अपरिहार्य म्हणून दोघांपैकी एक देवाघरी गेल्यावर तर राहिलेल्या एकट्यांचे जिणे अधिकच बिकट होऊ लागले. छोटीछोटी दुखणीखुपणी, अपघात अगदीच असह्य होऊ लागले. नागपुरात रूजलेले, वाढलेले हे वृक्ष आपल्या मुळांपासून तुटून दूरवर कुठेतरी रूजण्यासाठी नेल्या जाऊ लागलेत. नाईलाज असला तरी ही मंडळी मुला नातवंडांमध्ये रमू लागलीत. नागपुरातली घरे मात्र यांच्या जाण्याने यांच्यापेक्षा जास्त थकलीत.
अशा विस्तीर्ण प्लाॅटसवर आणि मोक्याच्या जागांवर बिल्डरांचे लक्ष गेले नसते तरच नवल. एवढ्या मोठ्या प्लाॅटवर फक्त २ माणसे राहतात ही बाब त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाला पटण्यासारखी नव्हती. अशा टुमदार घरांचे करोडोंचे व्यवहार होऊ लागलेत. त्याजागी ५ – ६ मजली लक्झरीयस फ्लॅटस बांधले जाऊ लागलेत. थकलेली घरे जमीनदोस्त झालीत. सोबतच घर मालक मालकिणींची स्वप्नेही नव्या फ्लॅटस्कीमच्या खोल पायव्यात गाडली जाऊ लागलीत. एक दीड कोटी रूपये मिळालेत तरी ते घर, त्याच्याशी निगडीत स्वप्ने, त्याचा टुमदारपणा, ऐसपैसपणा याची किंमत कितीही कोटी रूपयांमध्ये होऊ शकत नाही ही जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी काळीज पोखरत राहिली.
थकलेल्या संन्यासी घराची भिंत अशीच हळूहळू खचत राहिली.
लेखक : प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
प्रस्तुती : मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अमेरिकेत “9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे.
दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या.मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.
“डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.
या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.
वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.
पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.
“डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली.
तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.
एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.
विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की “मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.‘
सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही.
प्रवासी म्हणाला, “या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव ‘डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे.”
बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव निधी घातला.
‘डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.
दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही ‘डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.
आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो. आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे, असे वारंवार सिद्ध होते.
‘डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे
लेखक : अज्ञात
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ ‘प्रिय देशबंधू / भगिनींनो,..‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
प्रिय देशबंधू / भगिनींनो,
आज तुम्ही माझी पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी करीत आहात. मागील साधारण १०० वर्षात माझ्या मागे अनेक गोष्टी घडून गेल्या. अनेक नेते आले आणि गेले , भारताला स्वातंत्र्य (खंडित…!) मिळाले. आम्ही जहाल होतो हे फक्त पुस्तकात राहिले आणि अहिंसेच्या नादानपणाने कळस गाठला. तुम्हाला फक्त माझा एकच अग्रलेख आठवत असेल कारण पाठ्यपुस्तकात तो निदान तितका तरी छापला गेला आणि आजही तो टिकून आहे. असो….!
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अशा शीर्षकाचा आम्ही अग्रलेख लिहिला. त्याने आपल्या देशात जनजागृती झाली पण ब्रिटिश सरकारची माझ्यावर वक्रदृष्टी झाली. ते लोकं निमित्त्तच पाहात होते. मग त्यांनी माझ्यावर खटला भरला. मला शिक्षा झाली आणि मी मंडालेला गेलो. हे तुमचे माझ्यावर केलेली भाषणे ऐकून पाठ झाले आहे, याचि पूर्ण जाणीव मला आहे.
आपल्याकडे सध्या एक प्रथा सुरू झाली आहे. काही निवडक आणि दिवंगत नेत्याची पुण्यतिथी साजरी केली, त्यांच्या प्रतिमेला हार घातला, त्यांच्या त्यागाबद्दल चार गौरवोद्गार काढले, वृत्तपत्रात सरकारी खर्चाने पानभर जाहिरात दिली की तुम्ही आपल्या मर्जीनुसार वागायला मोकळे. असे वर्तन मागील अनेक वर्षे मी पहात वैकुंठातून पाहात आहे. आज अगदीच राहवले नाही म्हणून हा पत्र प्रपंच.
आमच्यावेळी स्वातंत्र्य मिळवणे हेच तरुणपिढीचे ध्येय होते आणि तेच योग्य होते. आज खंडित का होईना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आज त्याला ७५ पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत. मागील ७५ वर्षात आपण आपल्या पुढील पिढीला कोणता इतिहास शिकवला? पराजयाचा की विजयाचा? आपल्याला खूप मोठा वारसा लाभला आहे, पण आपण त्याकडे उघडे डोळे ठेवून पूर्णपणे डोळेझाक केली आहे. सरकारने सर्व काही करावे आणि आपण मात्र हातावर हात ठेवून बसावे अशी मानसिकता ब्रिटिशांच्या काळात होती. अर्थात त्यांनी ती प्रयत्नपूर्वक निर्माण केली होती. मागील ७५ वर्षात तुम्ही त्याची री ओढलीत. आंगल् भाषेला माझा विरोध असण्याचे कारण नाही. पण माझी अपेक्षा अशी होती की तुम्ही आंगल् भाषा शिकाल आणि जगाला गीता, ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, दासबोध समजून सांगाल. पण आपण तर अभ्यासक्रमात याचा समावेश होऊच दिला नाही…..
याला मी काय म्हणावे ?
प्लेगच्या साथीत ब्रिटिशांनी अनन्वित अत्याचार केले तेव्हा चाफेकर बंधूंनी त्यांचा सूड घेतला. इथे संसदेवर हल्ला करणाऱ्या नराधमांना माफी मिळावी म्हणून येथील बुद्धिजीवी स्वाक्षरीची मोहीम काढत आहेत.
पुढील पिढीला आपण नक्की काय देणार आहोत, याचा तरी विचार करा…
आज जे प्रश्न देशापुढे आ वासून उभे आहेत, त्यातील किती प्रश्न आपण आपल्या (अ)कर्तृत्वाने निर्माण केले आहेत आणि किती प्रारब्धवश आहेत…?
थोडा विचार करा…
माझ्या समकालीन असलेल्या काही लोकांनी जहाल ठरवले आहे. आता तसेच बोलून दाखवणे क्रमप्राप्त नव्हे काय ?
माझ्या नंतर मोहन ने स्वातंत्र्य चळवळीची धुरा हातात घेतली. स्वातंत्र्य मिळाले पण त्यातील स्व मात्र आपल्याला अद्याप गवसला आहे असे म्हणता येईल ? तुम्हाला असा विश्वास आहे ? आणि नसेल तर त्याला जबाबदार कोण ? यासाठी तुम्ही काय करणार आहात ?
ब्रिटिशांनी आपल्याला मला काय त्याचे? असा विचार करायला शिकविले? आणि तुम्ही मागील अनेक वर्षे हेच करीत आहात ?
असं ऐकतोय की तुम्ही स्वातंत्र्य मागील अनेक राष्ट्रपुरुषांची त्यांचा जन्माने प्राप्त झालेल्या जातींमध्ये विभागणी केलीत…!अरे याला बुध्दी म्हणायचे की विकृती ? ज्ञानाला मान देणारा भारतीय इतका विकृत कसा झाला रे….! आपला पुढारी सांगतोय, कुठल्या तरी पुस्तकात काहीतरी छापून आले म्हणून तुम्ही असे मुर्खासारखे वागू पहात आहात ? स्वतःची बुध्दी वापरणार की नाही ?
एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की आपल्याला फक्त राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे, आपण स्वतंत्र विचार करण्या इतपत अजून परावलंबीच आहोत….
आज माझी पुण्यतिथी साजरी करताना, वरील मुद्द्यांचा विचार आवर्जून करा. ही माझी विनंती नाही. अर्ज विनंती करणाऱ्यातला मी नाही. ठोकून सांगतोय. भले तर देऊ गांधीची लंगोटी, नाठाळाच्या हाती मारू काठी हे तुकोबांचे तत्त्वज्ञान जगणारा मी आहे.
तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लोकमान्यांनी आजच हे पत्र का लिहिले असेल ? आपला प्रश्न रास्त आहे. पण तुम्हीच पहा ना ? आज तरुण काय करतोय ? आपल्या लेकीबाळी सुरक्षित आहेत ? ज्या छत्रपतींचे नाव घेऊन प्रत्येक पक्ष राजकारण करीत आहे, त्या छत्रपतींच्या किल्ल्याची दशा आणि दिशा काय झाली आहे ? ज्यांना शिवबांनी तलवारीने पाणी पाजले, त्यांची हिंमत किती वाढली आहे ?
मला तर वाटते आहे की पुन्हा भारत मातेच्या पोटी जन्म घ्यावा आणि पुन्हा एकदा सरकारचे, नव्हे येथील जनतेचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहावा.
पण मला खात्री आहे. तुम्ही सर्वजण देशभक्त सुजाण नागरिक आहात. थोडी वाट चुकली असेल तर या पत्राने पुन्हा योग्य वाटेवर याल आणि आपल्या भारत मातेला पुन्हा एकदा विश्वविजयी केल्याशिवाय राहणार नाही. सुज्ञास आणिक सांगायची गरज पडत नसते….!
संस्थेत कामाला जाण्यासाठी मी घरातून निघाले साधारणपणे साडेबारा एक ची वेळ होती मी गेटच्या बाहेर आले तर आमचे सर भेटले.मी म्हणाले सर कुणीकडे चालला आहात?… ते म्हणाले, शनी देवळाकडे… मी म्हटलं चला मी सोडते तुम्हाला… आणि मग रिक्षा केली माझ्या शेजारी बसलेले माझे शिक्षक हे माझे पूर्वीचे मुख्याध्यापक ज्यांच्या नावाने मी तो ट्रस्ट चालवते ते श्री तडवळकर सर होते. मग रिक्षात बसून मी संस्थेत झालेल्या ऍडमिशन्स ..असलेले शिक्षक.. इंग्रजी माध्यमाचे प्रवेश बंद झालेले तुडुंब भरलेले वर्ग… याबद्दल मी सर्वांना माहिती देत होते मी विस्तृत पणे काय योजना केली आहे ते विचारत होते हे …सर्व बोलणे समोरचा रिक्षावाला मुलगा छान पद्धतीने ऐकत होता. सरांना मी दत्त चौकात सोडलं आणि मी संस्थेत येण्यासाठी निघाले.
त्यावेळेला रिक्षावाल्या पोराने विचारलं ,बाई तुम्ही शाळेत शिकवता का?.. मी म्हणाले हो. मी शिक्षिका आहे…. मी त्याला विचारलं तू किती शिकला आहेस? . तो म्हणाला मी बारावी पास आहे. तो मुस्लिम समाजाचा होता तो म्हणाला आमच्याकडे जास्त शिकत नाहीत लगेच कामधंद्याला लावतात त्यामुळे पुढे इच्छा असून मी शिकू शकलो नाही. कारण घरात माणसं खूप आहेत प्रत्येकाला कमवावाच लागतं. मग मी नापास मुलांवर करीत असलेल्या कामाची त्याला माहिती दिली त्याला त्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे असे मला लक्षात आले संस्थेजवळ रिक्षा आल्यावर त्याला मी पैसे दिले आणि त्याला म्हटलं तुला शाळा पाहावयाची आहे का? .. तो म्हणाला हो मला खूप आवडेल…. मग मी त्याला संस्थेत घेऊन आले प्रत्येक वर्गात त्याला फिरवलं त्याची थोडी माहिती मुलांना दिली आणि मुलांना म्हणाले बघा त्याची इच्छा असून त्याला शिकता येत नाही तुम्ही नापास झाला तरी तुम्हाला पालकाने पुन्हा शिकण्याची संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करा मग तोही मुलांना म्हणाला… अरे खूप चांगले चांगले शिक्षक तुम्हाला मिळालेले आहेत आणि आई बाबा सुद्धा छान आहेत.. शिकल्यावर तुम्हाला चांगले काम मिळेल आणि तुमचे आयुष्य सुधारेल
….त्याच्या परी तो दोन वाक्य बोलून गेला चारही वर्गातून आल्यानंतर मी त्याला दारापर्यंत सोडायला गेले काही झालं तरी तो तरुण पोरगा होता त्याच्या मनामध्ये अशा अस्था निर्माण झाल्याच पाहिजेत त्याने मला मध्येच प्रश्नही विचारला तुम्ही याचा पगार घेता का? मी म्हणाले नाही एक रुपया सुद्धा घेत नाही त्याला त्याचे खूप आश्चर्य वाटले होते दारापर्यंत आल्यावर तो मुलगा मागे वळला आणि झटकन माझे दोन्ही हात हातात घेतले थोडासा झुकला आणि म्हणाला “आप महान पुरुष हो “…हे कुठेतरी बहुदा त्याने वाचलेले किंवा ऐकलेल वाक्य असावं मला खूप हसायला आलं तो प्रचंड भारावलेला होता मी म्हणलं नाही नाही महान स्त्री हू असं म्हण पाहिजे तर पुरुष नको रे त्यावर तो हसला …वही वही… आम्हाला कुठल्या एवढ्या चांगलं बोलता येते मॅडम तुम्ही मला एवढ्या प्रेमाने शाळा दाखवली लय छान वाटलं लई मोठं काम करता हो तुम्ही खरच मॅडम तुम्ही महान आहात!… मी म्हणलं नाही अरे प्रत्येकाने समाजासाठी असं थोडं काम करायलाच पाहिजे अगदी तू तुझ्या रिक्षात सुद्धा एखादा गरजू आजारी म्हातारा माणूस फुकट नेऊन सोडलास किंवा अडवाडवी न करता सोडलास तरीसुद्धा ते एक मोठं काम आहे हे लक्षात ठेव….! त्याने पुन्हा एकदा माझ्यासमोर कमरेपासून मान झुकवली आणि हसत हसत तो रिक्षा घेऊन निघून गेला……..!
मला वाटतं आपल्या तरुण मुलांना अशा कामाची ओळख करून देणे गरजेचे आहे तर त्यांच्यामध्ये आपण असं काम करावं अशी भावना निर्माण होईल त्यांच्यासमोर जो आदर्श असेल तो त्यांना नक्की भारावून टाकतो शाहरुख खान सलमान खान हे आज त्यांचे आदर्श झालेत तेही कदाचित खूप चांगलं काम करत असतील पण त्यापेक्षा ते जे पात्र साकारतात त्याच्यावर त्यांचे प्रेम असते त्या पात्राच्या आदर्श भूमिकेवर नसते आता तरुण मुलांचे हिरो बदलण्याची गरज आहे त्यासाठी त्यांना चांगले काही दाखवणे आणि ऐकवणे गरजेचे आहे असे मला वाटते तुम्हाला ही असेच वाटते ना?…. मग आपण एक छोटासा आदर्श त्यांच्यासमोर उभा करायला काय हरकत आहे….!
☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
स्व.अर्देशिर गोदरेज
गोदरेज या भारतीय कंपनीने उत्पादनावर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी साठी इंग्रजांशी पंगा घेतला. गोदरेज कंपनी माहीत नाही अशी एकही व्यक्ती असणे शक्य नाही. भारतीय व्यापाराला उंचीवर नेऊन ठेवण्यात या कंपनीचा मोठा हात आहे. या कंपनीच्या संस्थापकांनी आपल्या प्रॉडक्टवर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी इंग्रजांशी पंगा घेतला. त्याची कहाणी :-
१८९४ मध्ये मुंबईच्या दोन तरुण वकिलांनी खळबळ माजवली होती. एकाने साउथ आफ्रिकेत तर एकाने ईस्ट आफ्रिकेत. दोघांचे विचारही एकच होते. वकिली पेशातं असलो तरी अजिबात खोटं बोलायचं नाही. त्यातील एक होते महात्मा गांधी व दुसरे होते अर्देशिर गोदरेज. ज्यांनी गोदरेज समूह बनवला. सत्यवचनी असणारे आर्देशीर आपल्या या स्वभावामुळे वकिली पासून लवकरच दूर झाले. व १८९४ मध्ये ते मुंबई येथे परत आले. एका फार्मासिटीकल कंपनीत केमिकल असिस्टंटची नोकरी सुरू केली. परंतु पारसी बाणा असल्यामुळे आपणही आपला स्वतःचा काही व्यवसाय करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. काम केमिस्ट चे असल्यामुळे त्यांना एक कल्पना सुचली. आपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी कात्री आणि ब्लेड तयार करूया. ही उत्पादने फक्त ब्रिटिश कंपन्याच तयार करत होती. म्हणून त्यांचा हा विचार पक्का झाला.
सुरुवातीच्या भांडवलासाठी त्यांनी पारसी समाजातील एक हितचिंतक श्री मेरवानी यांच्या कडून ३००० रुपये कर्ज घेतले. आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनं एका ब्रिटीश कंपनीसाठी तयार करायला सुरुवात केली. हे प्रॉडक्ट विकण्याची जबाबदारी त्या कंपनीची होती. गोदरेज यांचे म्हणणे असे होते की, ते त्यांच्या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असे लिहितील. पण ब्रिटिश कंपनीचे म्हणणे होते की जर प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असं लिहिलं तर उत्पादनाची विक्री होणार नाही. म्हणजे प्रॉडक्ट तर गोदरेज यांनी तयार करायचे पण विकणार मात्र ब्रिटिशांच्या नावाने.
दोन्ही पक्ष आपापल्या बाजूला ठाम राहिल्याने त्याचा परिणाम असा झाला की गोदरेज यांना त्यांचा पहिला वहिला धंदा बंद करावा लागला. त्यांचं प्रोडक्ट चांगलं नव्हतं म्हणून नाही, तर माझ्या देशात तयार झालेल्या वस्तूला मी दुसर्या देशाचं नाव का देऊ? या तत्त्वाशी ठाम राहिल्यामुळे.
पहिलि व्यवसाय बंद पडल्यानंतर आर्देशीर निराश झाले. त्यांनी आपली नोकरी चालूच ठेवली. पण डोक्यातून व्यवसाय जात नव्हता. एक दिवस वर्तमानपत्रातील एका बातमीने त्यावर त्यांची नजर गेली. मुंबईतील चोरीची घटना होती ती आणि त्या बरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडून एक निवेदन पण देण्यात आलं होतं की, “सर्व लोकांनी त्यांच्या घराच्या आणि कार्यालयाची सुरक्षा सुधारावी.” आर्देशीर च्या डोक्यात व्यवसायाचा किडा पुन्हा वळवळू लागला. कुलूप तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्या वेळी भारतातील सर्व कुलपं हाताने तयार केली जात. ती सुरक्षित नव्हती. त्यांनी अशी कुलपं बनवायचं ठरवलं की, जे तोडणं कठीण असलं पाहिजे. कुलपं तयार करण्याच्या कल्पनेसह ते पुन्हा मेरवानजी कडे गेले. पहिले कर्ज न फेडल्याबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली आणि मग त्यांच्या समोर कुलपाची नवी योजना मांडली.
मेरवानी स्वत: एक व्यापारी होते. त्यांनी पण वर्तमान पत्रातील ती बातमी वाचली होती. थोड्या चर्चे नंतर मेरवानींनी त्यांना मदत करण्याचे कबूल केले. सक्सेस हाय वे पुस्तकात मेरवानी आणि त्यांच्यातील संवाद असा लिहिला आहे की, जेव्हा मेरवानींनी त्यांना विचारले, ‘‘मुला, तुमच्या जातीत किंवा घरात असं कोणी आहे का? की ज्यांनी कुलूप तयार केलं आहे?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘‘मी पहिला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या सारख्या महान माणसाच्या मदतीनं मी नक्कीच सर्वश्रेष्ठ बनून दाखवीन.’’
जिद्द आणि आत्मविश्वास याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर अशा रितीने मेरवानी कडून आर्देशीर यांना परत कर्ज मिळाले. ७ मे १८५७ गोदरेज यांनी कामाला सुरुवात केली. बॉम्बे गॅस वर्क्सच्या बाजूला कुलपं बनवण्याचं काम सुरू केलं. गुजरात आणि मालबार हून १२ शिकलेले कारागीर आणले गेले. ‘अँकर’ या नावाने कुलपं बाजारात आली. या सगळ्यात महत्त्वाचं होतं ते एक वर्षाच्या गॅरेंटीचं पत्र ज्यामुळे त्याच्या विक्रीला मागणी आली. तेव्हा कोणत्याही कुलपाला गॅरेंटी नव्हती. गोदरेजचं कुलूप दुसर्या कोणत्याही चावीने उघडू शकत नव्हते.
अशा तर्हेने गोदरेजचं ताळं म्हणजेच कुलूप भारताच्या लोकांचं विश्वासाचं स्थान बनलं आणि आर्देशीर गोदरेज यांचा बिझनेस चांगला चालू लागला. आता त्यांना नवीनवीन उद्योगांची कल्पना सुचू लागली. मग गोदरेजचं कपाट बनवलं गेलं. कुलपं आणि कपाट हे गोदरेजचे ब्रँड झाले तरीही आर्देशीर गोदरेज यांना अजून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. १९०६ मध्ये ते टिळकांच्या संपर्कात आले आणि स्वदेशी सिद्धांत अवलंबण्याची शपथ घेतली. आत्ता पर्यंत त्यांचा धाकटा भाऊ फिरोजशाह हाही त्यांच्या व्यवसायात सामील झाला. दोन्ही भावांचा कुलूप आणि कपाट व्यवसाय वाढत होता. भारतीयांवर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे भारतीयांवर विविध प्रकारचे कर लागू होते.
आर्देशीर गोदरेज त्यामुळे खूप विचलित होते. १९१० मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेऊन व्यापार सुरू केला होता, त्याला एक भगिनी होती, तिचे नाव बॉयस होते. सीएच्या सल्ल्यानुसार गोदरेजनी बॉयसला आपला पार्टनर बनवले. मग कंपनीचे नाव ठेवले गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काही दिवसांनी बॉयसने कंपनी सोडली, परंतु आर्देशीरने आजही कंपनीचे नाव तेच ठेवले, ‘गोदरेज अँड बॉयस’.
नंतर आर्देशीर लोकांच्या थेट संपर्कात आले. मग त्यांनी आंघोळीच्या साबणाचे उत्पादन सुरू केले. तेव्हा भारतात असलेल्या साबणात पशूंची चरबी वापरली जात असे. त्यामुळे हिंदूंची मन दुखावली जात म्हणून साबण तयार करण्याची व्यावसायिक संधीचा विचार त्यांनी केला. १९१८ साली गोदरेज कंपनीने दोन साबण तयार केले. असे एकेक उत्पादन वाढू लागली आणि गोदरेजचा कारभार वाढू लागला. हळूहळू कुटुंबातील मेंबर या बिझनेस मध्ये सामील झाले. मग वॉशिंग मशीन, फ्रीज, हेअर डाय, फर्निचर अशी उत्पादनं वाढू लागली आणि गोदरेज कंपनी नावारूपास आली आणि ‘मेड इन इंडिया’ हे वाक्य लिहायला नकार देणार्या ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून गादरेज कंपनीने आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढवला. मनात तत्त्व होतं, एक सचोटी होती आणि देशाबद्दल प्रखर अभिमान होता. म्हणूनच हे सगळं शक्य झालं. व्यवसायात पाऊल ठेवलं आणि तो व्यवसाय नावारूपाला आणला, इतका की, आज इतकी वर्षं झाली तरी गोदरेजचं स्थान अढळ आहे.
संकलन – मिलिंद पंडित
कल्याण
प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ “सोडायला शिका…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एकदा मी देवपूजा करत होतो. पूजा करताना मी समईची ज्योत पेटविली.त्या ज्योतीला लावून अगरबत्ती पेटवताना उदबत्ती हातातून निसटली. गडबडीत उदबत्ती पकडण्याचा प्रयत्न करताना माझा हात समईला लागला.समई खाली कलंडताना तेलासकट देव्हाऱ्यातील हळदी कुंकवाच्या पंचपाळावर पडली आणि झालेला राडा सावरायला जवळपास अर्धा तास गेला.
खाली पडणारी अगरबत्ती पकडण्याच्या हव्यासापोटी हे सर्व झाले.अगरबत्ती खाली पडली असती, तर विशेष असा काय फरक पडला असता!अगरबत्ती काही मोडणार नव्हती किंवा वाया जाणार नव्हती. आणि समजा वाया गेलीही असती तरी तिची किंमत ही साफसफाईसाठी वाया गेलेला वेळ,तेल, हळदी,कुंकू, तांदूळ,तेलकट झालेलं मंदिर यापेक्षा तर जास्त नक्कीच नव्हती.
आपण आयुष्यातसुद्धा अशाच उदबत्तीसारख्या अनेक गोष्टी उगीचच धरण्याचा प्रयत्न करत असतो.क्षुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी निसटून जातात. त्यामुळे क्षुल्लक गोष्टी सोडून देणेच हितकारक.
मला रामराम केला नाही,
मला निमंत्रणच दिलं नाही,
स्टेजवर माझं नावच घेतलं नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत,
माझा फोन घेतला नाही,
मला बसायला खुर्चीच दिली नाही,
मला उधारी मागितली,
मला कोणी मदतच केली नाही, माझ्या पोस्टला लाईक केले नाही,
साडीच हलकी दिली..इ. इ.
किरकोळ बाबी,अहंकार सोडा आणि मग पहा….
निसटून चाललेल्या नात्यांमधे पुन्हा आपलेपणा येईल.
अहंकार आपल्याला आपल्या माणसापासून तोडतो.अहंकार लगेच सोडता येणार नाही, पण कठीणही नाही.आजच प्रयत्न सुरू करा.
किरकोळ मतभेद मिटवा आणि आनंदी व्हा.
मतभेद पराकोटीचे,गंभीर स्वरुपाचे असतील तर तो विषय मात्र वेगळेपणाने, शांतपणाने मिटवा.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈