मराठी साहित्य – विविधा ☆ गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी — महर्षी व्यास… — लेखक – डॉ. प. वि. वर्तक ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

☆ गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी — महर्षी व्यास… — लेखक – डॉ. प. वि. वर्तक ☆ डॉ. ज्योती गोडबोले

आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीला झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.

व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे नाव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना ‘व्यास’ ही पदवी मिळाली. पराशर ऋषींपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणांमध्येही  वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की ‘ तू स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.’ 

व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेही नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे. महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनी ही अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई; तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत. महाभारतात असे 8800 गूढ श्लोक आहेत.

महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडू, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ, सायण्टिस्ट होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे पूरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे त्यांनी ‘गुणविधी’ हे सायंटिफिक नाव त्यांनी त्या तत्त्वांना योजले. गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे २३ असतात हेही त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोसोम्स २३ आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेही सायन्सने आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रही अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि.१६ ऑक्टोबर ५५६१ इसवीसनपूर्व  या दिवशी झाले हे मी निश्चित ठरवू शकलो.

अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ.सनपूर्व १२००० वर्षे या काळी ढळले होते हे मानते, यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. ‘जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात’, असे व्यास म्हणतात, तेहि आजचे विज्ञान मानते आहे.

महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.

‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|’ व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे’, असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आईन्स्टाईन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अंतराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि २७ चतुर्युगांनी म्हणजे किमान २१६ वर्षांनी परतला, तरी तो जिवंत राहिला आणि रेवती तरुणच राहिली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.

परा व अपरा या दोनही  विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःच शिष्य संजय यास दिली होती; येवढे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले; त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात.

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : डाॅ.प.वि.वर्तक – पुणे

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – २ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – २ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

इंदिराबाई

(“लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा, हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले, तरी मनाने त्यात आहे बरं का!” तुझी दुर्गाबाई.) – इथून पुढे 

इंदिराबाईंना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न मिळाल्याची खंत मात्र या प्रिय मैत्रिणीच्या पत्रात जाणवते. तसंच इंदिराबाईंनाही दुर्गाबाई म्हणजे त्यांच्या साहित्याचा आधार वाटतात. दोघीही मनस्वी, प्रखर स्वाभिमानी आणि विदुषी असल्या तरी दोघींचं एकमेकींवर जबरदस्त प्रेम! एकमेकींविषयी आदर आणि ओढ पाहून मला अनेकदा डॉ. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई आठवतात. अशा या इंदिराबाई आणि दुर्गाबाईंच्या पत्रांचे ‘पोस्टमन’ होण्याचे भाग्य मला लाभले!

इंदिराबाई म्हणतात, “सर्वसामान्य लोकांच्या भावनांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य ज्याप्रमाणे माझ्या कवितेत नाही, त्याप्रमाणे ते माझ्या वाचनातही नाही. माझ्या कवितेची लोकप्रियता ही विशिष्ट लोकांपुरतीच आहे.” हे वाचून ‘जो संग तुझपे गिरे, और जख्म आये मुझे’ अशी माझी अवस्था झाली. आता तर माझा सर्वतोपरी हट्ट असतो की, प्रत्येक कार्यक्रमातून इंदिराबाईंच्या काव्यरत्नांचे हार पेटीत केवळ जपून न ठेवता, जास्तीत जास्त (अ)सामान्य रसिकांसमोर उलगडून दाखवावेत. हा माझा खारीचा प्रयत्न जरी असला तरी तो (सर्व)सामान्यांचेही हृदय पाझरवणारा आहे, हे मी प्रत्यक्ष मैफिलीत अनेकदा अनुभवले आहे.

कुणी निंदावे त्याला, करावा मी नमस्कार  

कुणी धरावा दुरावा, त्याचा करावा मी सत्कार!

असे साधेसुधे सूत्र घेऊन जगणाऱ्या इंदिराबाईंच्या कविता म्हणजे तरलता, निसर्गरम्यता आणि भावनांनी ओथंबलेल्या तरल कवितांचा मोरपिशी स्पर्श! भावनांचे हळवे प्रकटीकरण म्हणजे इंदिराबाईंची लेखणी! 

इंदिराबाईंची कुठलीही कविता वाचताना चित्ररूप डोळ्यासमोर येते, ही तिची ताकद आहे. त्यांची ‘बाळ उतरे अंगणी’  म्हणताना तर दुडुदुडु धावणारं गोंडस बाळ डोळ्यासमोर येतं. अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील कुठल्याही अजीव वस्तूतसुद्धा अक्कांना चैतन्य दिसतं. त्यात बाळाच्या पायाला स्पर्श करणारी ‘मऊशार काळी मखमली माती’ आणि ‘चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण’ म्हणताना सजीव होऊन माती आणि अंगण बाळाभोवती प्रेमाची पखरण करतात असं जाणवतं.

‘किती दिवस मी मानीत होते,

ह्या दगडापरी व्हावे जीवन

पडो ऊन वा पाऊस त्यावर,

थिजलेले अवघे संवेदन

दगडालाही चुकले नाही,

चुकले नाही चढते त्यावर

शेवाळाचे जुलमी गोंदण,

चुकले नाही केविलवाणे

दगडफुलाचे त्यास प्रसाधन!’

दगडासारख्या निर्जीव गोष्टींमधेही सजीवपणा जाणवणारं किती संवेदनशील मन असेल अक्कांचं! गंमत म्हणजे ‘वंशकुसुम’ हा कवितासंग्रह तर पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय त्यांनी!

‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,

गुलबाशीच्या फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो..

काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यात

एवढेच बोलली ती, घागरीला हात देत…’

या कवितेत तमाम ‘स्त्री’जातीची कथाच (नव्हे व्यथाच) अवघ्या चार ओळीत वर्णिलेली आहे. ‘अल्पाक्षरी’ कवितेत इंदिराबाई वैश्विक सत्य अगदी सहजपणे सांगून जातात.

‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले

आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…

सूर्यकिरण म्हणाले, घालू दारात रांगोळी

शिंपू पायावरी दव, म्हणे वरून पागोळी…!’

अशा कविता म्हणजे अक्का आणि निसर्ग अशी नात्याची सुंदर गुंफण आहे. त्यांची प्रत्येक कविता, एखादं फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं तशी, किंवा एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. दवबिंदूला जसे स्पर्श करतानाच, तो फुटून जाईल की काय, या भीतीनं या कवितेतील कवितापण जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता ही त्या कवीचं ‘बाळच’ असते.

‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ

दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ!’

यातील ‘तुळस वेल्हाळ’ म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच किंवा सहीच जणू! अक्कांची 

‘किती उशिरा ही ठेच, किती उशिरा ही जाण

आता आजपासूनिया माझे, आभाळाचे मन’

ही आत्मस्पर्शी, आत्मभान असलेली कविता वाचून तर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. प्रत्येकानं आभाळाचं मन ल्यायचं ठरवलं, तर या धर्तीवर केवळ आनंदच उरेल नाही?

इंदिराबाईंच्या शांत, सौम्य स्वभावाचा आणखी एक वेगळा पैलू त्यांच्या प्रारब्ध या कवितेत जाणवतो. प्रारब्धालाही ठणकावून सांगणाऱ्या व प्रसंगी मन कठोर करणाऱ्या अक्का म्हणतात, 

‘प्रारब्धा रे तुझे माझे,

नाते अटीचे तटीचे

हारजीत तोलण्याचे,

पारध्याचे सावजाचे…

जिद्द माझीही अशीच,

नाही लवलेली मान,

जरी फाटला पदर, 

तुझे झेलते मी दान…

काळोखते भोवताली 

जीव येतो उन्मळून,

तरी ओठातून नाही,

*_ तुला शरण शरण…!’_*

ही कविता कठीण प्रसंगी ताठ मानेनं उभ राहण्याचं बळ देते. तसंच, पती ना.मा. संत गेल्यावर लिहिलेली,

‘कधी कुठे न भेटणार,

कधी काही बोलणार

कधी कधी न अक्षरात, 

मन माझे ओवणार

व्रत कठोर हे असेच, 

हे असेच चालणार…’

यात अक्कांचं, सात्विक, सोज्वळ, तेजस्वी, ओजस्वी आणि निश्चयी व्यक्तिमत्त्व दिसून येतं. “चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत.” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात.

‘मराठी काव्याला पडलेली एक सुंदर मोरस्पर्शी निळाई’ असं कवयित्री शांताबाई शेळके  इंदिराबाईंबद्दल म्हणतात, तेव्हा मी अक्कांच्या निळाईत बुडून जाते आणि वाटतं….. 

किती तुला आठवावे, किती तुला साठवावे,

जिवाभावा एक ध्यास, एकरूप व्हावे व्हावे!

सूर्याचे तेजःकण आणि चंद्राची शीतलता त्यांच्या लेखनात आहे. चंद्रसूर्याची साथ आपल्याला आयुष्याच्या अंतापर्यंत आहे, तशीच साथ मला इंदिराबाईंच्या तेज, रंग, रूप, गंध ल्यालेल्या कवितेची आहे. सोनचाफ्याच्या पावलांनी माझ्या घरी आलेल्या त्यांच्या कविता म्हणजे आनंदी पाखरंच आहेत! म्हणूनच इंदिराबाईंच्याच शब्दांत म्हणावसं वाटतं…..

गेली निघून हासत, घर भरले खुणांनी

सोनपाखरे टिपावी, किती वाकूनी वाकूनी…!

— समाप्त — 

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

हे देखील करायला हवे…

“…भांडता सुद्धा आलं पाहिजे. आपली बाजू प्रभावीपणे मांडता आली पाहिजे. भांडण करणं म्हणजे दादागिरी करणं, दहशत निर्माण करणं, अथवा उद्धटपणा दाखवणं

असा अर्थ नव्हे. आपली अस्मिता विनाकारण दुखावली गेली अथवा पणाला लागत असेल तर भक्कमपणे बोलणं

आपल्याला जमलं पाहिजे.”

असं पपा नेहमी सांगायचे. एकीकडे शालीनता, नम्र वाणी, शब्दातील गोडवा जपणे, कुणाला दुखावलं जाईल असं न बोलणं, अशा तर्‍हेचे बोधामृत प्राशन करीत असताना मध्येच ‘”तुला उत्तम भांडताही आलं पाहिजे हं !!”

असं जेव्हां पपा सांगायचे तेव्हां या विरोधाभासाची

मला नुसती गंमतच नव्हे तर आश्चर्यही वाटायचं.

पण त्याचा प्रत्यय यायचा होताच.

एकदा गणिताच्या पेपरात ,वेगळ्या पद्धतीने गणित सोडवल्यामुळे, उत्तर बरोबर असतानाही त्या उदाहरणाला बाईंनी मला मार्क्स दिले नाहीत. परिणामी त्या दोन मार्कांनी माझा क्रमांक एकाने खाली गेला. मी खूप खट्टु झाले होते. माझ्या पद्धतीने यथाशक्ती मी गणिताच्या बाईंना “माझे मार्कस उगीच कमी केले”  असल्याचे निदर्शनास आणून दिले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.  बाईंची प्रतीक्रिया शून्य होती. मी आपली “जाऊदे”  या मोड मधेच राहिले. गेला नंबर मागे तर गेला..असं मुळमुळीत धोरण धरुन गप्प बसले.

तेव्हां पपा म्हणाले ,”प्रश्न गुणानुक्रमाचा नाहीय्. तुला जर खात्री आहे, तुझं गणित बरोबरच आहे तर ते पटवून देण्यात कमी का पडावंस? तू मुख्याध्यापिकांना सांग.”

“पपा,तुम्ही भेटाल का त्यांना? एकदम मुख्याध्यापिकांना

भेटायची मला भीती वाटते.”

“नाही मी नाही भेटणार त्यांना.हे तुलाच करायचेय्. हा तुझा प्रश्न तुलाच सोडवायचाय्. आधी पटवून देण्याचा प्रयत्न कर, नाहीतर  भांड त्यांच्याशी तुझ्या हक्काच्या मार्कांसाठी. काही हरकत नाही.”

“पण पपा त्यांनी मला बेशिस्त वर्तनासाठी शिक्षाच केली तर?.”

“बघूया.” पपा एव्हढच म्हणाले.

पण एक पलीता पेटवला होता मनात.

मग मी भीतभीतच, दुसर्‍या दिवशी माझा गणिताचा पेपर घेऊन मुख्याध्यापिकांच्या रुममधे गेले. तशी शाळेत वर्गाच्या कामानिमीत्त मी अनेक वेळा इथे आले होते. डेंगळे बाई चांगल्या स्वभावाच्या होत्या. प्रेमळ, समंजस,  रागवायच्या पण तरी आदर वाटायचा त्यांच्याबद्दल. पण यावेळी कारण वेगळं होतं. म्हणून फार दडपण आलं होतं. पाऊल पुढे मागे होत होतं. “जाऊच दे”  वाटत होतं. पपा काहीही सांगतात.मदत तर करत नाहीत.

त्यांचाही थोडासा रागच आला होता मला पण नेहमीप्रमाणे त्यांच्या डोळ्यातील तीक्ष्ण झाक माझा विश्वास बळावत होती. माघार का? हेही बळावत होतं.

मग मी धैर्य गोळा करुन डेंगळे बाईंना माझी समस्या सांगितली.  “मला वर्गात शिकवलेल्या पद्धतीनेही

गणित सोडवता येत होतं पण ही पद्धत थोडी कमी लांबीची व सोपी वाटली म्हणून मी ती वापरली” वगैरे सर्व मी त्यांना पटवून दिले.मग मुख्याध्यापिका डेंगळे बाईंनी

गणिताच्या बाईंना बोलावून घेतलं. मला जायला सांगितलं.

“मी बघते काय ते” असंही म्हणाल्या.

दुसर्‍या दिवशी गणिताच्या बाईंनी माझे प्रगती पुस्तक मागवले. पेपरातले दोन मार्क्स वाढवले आणि वरचा क्रमांकही दिला.

मला न्याय मिळाला. माझ्या बोलण्याचा उपयोग झाला.

पण माझी मैत्रीण जिचा वरचा नंबर मिळाल्याचा आनंद माझ्यामुळे लोप पावला, ती नाराज झाली. मी थेट मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली म्हणून गणिताच्या बाईंनीही राग धरला. त्यावेळी सर्व वर्गच ,”स्वत:ला काय समजते” या भावनेनी माझ्याशी वागत असल्याचं जाणवलं. काही दिवस हे वातावरण राहिलं.

आजही मनात गुंता आहे. मी बरोबर केलं की चूक?

त्या वेळच्या कारणाची धार आता जरी बोथट झाली असली तरी योग्य ठिकाणी योग्य ते बोलायला कां घाबरायचं?

हे एक सूत्र पुढे अनेक वेळा संरक्षक शस्त्र जरुर बनलं.

अनेक संघर्षाच्यावेळी, अडचणीच्या वेळी त्याने साथ दिली हे मात्र खरं…

– क्रमशः भाग पाचवा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – २ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – २ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(श्री. निलेश नीलकंठ ओक यांच्या भाषणावर आधारित.)

आता आपण दक्षिण अमेरिकेत जाऊ या. Paleontology, Archaeology and Astronomy या सगळ्यांचा मिळून उत्तम असा पुरावा मिळतो.  सुग्रीव सांगतो आहे की क्षीरसागर ओलांडून गेलात की तिथे तुम्हाला मंदेहा नावाचे नाना प्रकारचे डोंगरावरून खाली उलटे टांगलेले असे भयावह राक्षस दिसतील. उलटे टांगलेले म्हटल्याक्षणी आपल्या डोळ्यासमोर येतात ती वटवाघुळे. आता कोरोनाच्या संदर्भात तर आपल्याला माहितीय की या वटवाघूळांच्या मुळेच बॅक्टेरिया पसरले. आपल्या प्राचीन ग्रँथात या विषाणू जिवाणूंनाच राक्षस म्हणून संबोधले गेले आहे. उदा. आपल्या शतपथ ब्राह्मणात असे वर्णन आले आहे की आपल्या मृगाजीनावर बसण्यापूर्वी ते नीट झटकून साफ करून घ्या म्हणजे त्यातले सगळे राक्षस निघून जातील. वटवाघळे खरे तर जगभर पहायला मिळतात, मग इथल्याच वटवाघूळांच्या मध्ये काय विशेष आहे? तर इतर ठिकाणची वटवाघळे frugivorous असतात, बहुतेक करून छोटे किडे, फळे इ वर जगतात, पण दक्षिण अमेरिकेतली ही वटवाघळे म्हणजे vampire bats ही प्राण्यांच्या रक्तावर जगतात. मेलेल्या वटवाघूळांची कवटी बघितली तर समजते त्यांचे दात, सुळे  आणि जबडे किती तीक्ष्ण असतात ते. त्यामुळे त्यांच्या पासून जपून रहायला सुग्रीव सांगतो आहे.

आता कोणी म्हणेल की एवढाच एक पुरावा आहे का तुमच्याकडे तर नाही. तिथे एक विलक्षण जबरदस्त असा पुरातत्वीय पुरावा आहे. तो पुरावा  म्हणजे तिथल्या डोंगरावर असलेली त्रिशूळाच्या आकाराची आकृती. श्री. चमनलाल आणि पुण्याच्या डॉ. प. वि. वर्तकांनीही याबद्दल लिहिले आहे. जेव्हा स्पॅनिश लोक तिथे आले तेव्हा त्यांनी तिथल्या स्थानिक रहिवाश्यांना विचारले की हे तुम्ही तयार केले आहे का तर त्यांनी सांगितले आम्ही नाही आणि आमच्या पूर्वजांनी पण नाही हे केलेले. त्यामुळे तिथल्या रहिवाश्यांना सुद्धा माहीत नाही की हे कोणी केले आणि का केले आहे ते. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाल्मिकी रामायणात मिळतात. आताच्या काळात त्याला Candelabra of Andes असे म्हणतात. तिथल्या डोंगरावर  ६०० ते ८०० फूट उंच त्रिशूळाची आकृती आहे. त्यात खणलेले चर २ ते ३ फूट खोल आहेत. समुद्रावरून १२ मैल दूरपर्यंत ते दिसू शकतात. डॉ. वर्तकांच्या पुस्तकात तर असेही लिहिले आहे की या आकृत्या फक्त आकाशमार्गाने जाणाऱ्यांना म्हणजे विमानातून जाणाऱ्यांनाच दिसू शकतात. सुग्रीव सांगतोय..

त्रिशिरा: कांचन: केतूस्तालस्तस्य महात्मन:

स्थापित: पर्वतस्याग्रे विराजति सवेदिक:

(त्रिशूळाच्या आकाराचा सुवर्ण ध्वज तिथे पर्वताच्या शिखरावर चमकताना दिसेल. त्याच्या पायाशी वेदिका पण दिसेल.)

त्या नंतर सुग्रीव हे कोणी केले त्याबद्दल सांगतो आहे.

पूर्वस्यां दिशी निर्माणं कृतं तत्  त्रिदशेश्वरै:

तत: परं हेममय श्रीमानुदयपर्वत:

(या आकृत्या उदय पर्वतावर इंद्राने पूर्व दिशा दर्शविण्यासाठी बनवल्या आहेत. पूर्व दिशेचा देव म्हणून सुद्धा इंद्र मानला जातो. इथे कृतं चे दोन अर्थ निघू शकतात. एक तर केले अशा अर्थी. दुसरं म्हणजे रामायण जर त्रेता युगात घडले असे धरले तर त्याच्याही आधी कृत युगात इंद्राने हे तयार केले असे म्हणावे लागेल.)

आता दक्षिण दिशा-

सुग्रीव आता दक्षिणेला जाणाऱ्या गटाला सूचना देतोय. दक्षिणेला जाणाऱ्या गटात त्याने तीन महत्वाच्या लोकांना घेतले आहे कारण सीतेला घेऊन रावण दक्षिणेला गेला हे त्यांना समजले होते. सीतेचे अलंकारही त्यांनी ओळखले होते. त्यामुळे ही दिशा महत्वाची होती. त्या तीन महत्वाच्या व्यक्ती म्हणजे अंगद, जांबवान आणि हनुमान. 

सुग्रीव वर्णन करायला सुरुवात करतो ते पार नर्मदा नदी पासून. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, वेण्णा इ. नद्या आणि त्यांच्या भोवतीच्या प्रदेशाचे वर्णन तो करतोय. नंतर येते कावेरी. त्यानंतर मलय पर्वतावर तुम्ही जाल तेव्हा तिथून तुम्हाला अगस्त्य तारा दिसेल ,तो तारा जो आदित्या एवढा तेजस्वी आहे. याच्या उत्तरेला इतर कुठल्याही ठिकाणाहून हा तारा दिसणार नाही. ताम्रपर्णी नदीच्या जवळ हा भाग आहे. अगस्त्य तिथे कसा दिसेल तर जणू त्याचा एक पाय महासागरात आणि एक त्या पर्वतावर. नकाशात जिथे आडवी रेषा दिसते तिथपर्यंतच रामायण काळात अगस्त्य तारा दिसत होता. (आता पार दिल्ली पर्यंत दिसतो.) 

दक्षिण दिशेकडे जात जात तुम्ही शेवटी कुठे जाणार आहात तर तो प्रदेश आहे यमाची राजधानी आताचे अंटार्क्टिका. पितृ लोक आहे देवांचा लोक नाही. अतिशय अवघड अशी ती जागा आहे. तिथे जाणेही अवघड आणि गेलात तर परत येणे अवघड. आपल्याला आताही माहिती आहे की अंटार्क्टिकाला भेट देणे किती अवघड आहे ते. तर सुग्रीव सांगतोय असा असा प्रदेश तिथे आहे पण तुम्ही तिथे जाऊ नका.

पाश्चात्य समजुती प्रमाणे अंटार्क्टिका चा शोध इ स 1773 च्या आसपास लागला. पण इथे 14000 वर्षांच्या पूर्वी सुग्रीव त्याच भागाचे वर्णन करतो आहे. काही अतिशय जुन्या इटालियन navigators कडच्या नकाशाच्या मध्ये अंटार्क्टिका खंड दाखवला आहे आणि एवढेच नाही तर त्यावर नद्या दिसत आहेत. आताचा अंटार्क्टिका खंड पूर्णपणे बर्फ़ाने झाकलेला आहे. एक काळ असाही होता जेव्हा अंटार्क्टिकावर बर्फ नव्हते. तेव्हा तिथे नद्या होत्या. 

चार्ल्स हॅपगुड यांच्या पुस्तकात असा नकाशा दाखवला आहे जो मृगाजीनावर चितारला आहे. त्याला ‘पिरी रीस मॅप’ असे म्हणतात. त्यात actually अंटार्क्टिका खंड दक्षिण अमेरिकेशी जमिनीने जोडलेला आहे. (16 th century मॅप) ऑटोमन साम्राज्यातील Turkish admirer या नकाशा बद्दल सांगतोय की त्याने हा नकाशा हिंद चा अरेबिक नकाशा,पोर्तुगीज, सिंध, हिंद आणि चीन इथल्या नकाशांवरून बनवला आहे. इथे हिंद हा शब्द येतोय.

१६ व्या शतकातला नकाशा, सुग्रीवाचा नकाशा यांच्या तुलनेत १९ व्या शतकातल्या युरोपियन लोकांच्या नकाशात अंटार्क्टिका चा भाग रिकामा दाखवला आहे.  याचाच अर्थ पिरी रीस नकाशाचा मूळ स्रोत खूप प्राचीन असला पाहिजे. ज्या अंटार्क्टिका खंडा बद्दल पाश्चात्यांना १८,१९ व्या शतका पर्यंत खात्रीलायक माहिती नव्हती त्याची सविस्तर माहिती सुग्रीव १४००० वर्षांच्या पूर्वी देतोय. भारतीयांनो आपल्याला अत्यन्त अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे, नाही का?

– समाप्त – 

लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘डॉ. स्नेहलता देशमुख आणि पांढरा ढग’ – लेखक : श्री श्रीकृष्ण म्हसकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘डॉ. स्नेहलता देशमुख आणि पांढरा ढग’ – लेखक : श्री श्रीकृष्ण म्हसकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याशी निगडित एक अतिशय तरल आठवण आहे. मंडळाच्या एका कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांना पार्ल्याहून ठाण्याला आणायची जबाबदारी माझ्याकडे होती. ठरल्या वेळी मी त्यांच्या घरी पोचलो आणि आम्ही ठाण्यासाठी निघालो.

गाडीत सर्वसाधारण विषयांवर गप्पा चालू होत्या.  कांजूरमार्ग येथे पोचल्यावर त्यांनी खिडकीतून   एक पांढरा ढग  बघितला आणि म्हणाल्या,  “हा किती एकटा आहे!”

मी त्यांना म्हटले, “या अशा ढगाकडे कधीही बघितले की मला ‘डॅफोडिल्स’ कवितेतील पहिली ओळ आठवते. I wandered lonely like a cloud…. या एका ओळीत खूप काही अर्थ आहेत, जे मला अनेकदा आतून काहीतरी संवेदना देत असतात, ज्या अजूनपर्यंत मी कोणाकडे व्यक्त केलेल्या नाहीत.”

देशमुख ताई म्हणाल्या, “जरूर सांगा.”

मी म्हटले, “हा एकांडा ढग स्वतःच्या मर्जीने वाऱ्याबरोबर उंडारतोय. त्याला कोणाची कसलीही अपेक्षा पूर्ण करायचे ओझे नाही, कारण तो रिकामा आहे. व्रतस्थ आहे, कारण त्याच्याकडे आता देण्यासारखे काहीच नाही. त्यातून ना पाणी पडत ना त्याची सावली कोणाला मिळत. तरीही त्याचे अस्तित्व तो जाणवून देत आहे, दखल घ्यायला लावत आहे. हा ढग आणि आपले वार्धक्य एकाच पातळीवर असतात. कारण दोघांकडे द्यायला काही शिल्लक नसते, तर एक कृतार्थ भाव मनात असतो. हे ढग एकटे असतात. कारण झुंड फक्त काळया ढगांची असते. त्यांचा कडकडाट होतो. ते खूप गरजतात. पण त्यांना वाटले तरच पाणी देतात नाहीतर हुलकावणी देतात, जी लोकांच्या जिव्हारी लागू शकते. सूर्य किरणे काळया ढगांना चांदीची झालर लावतात, तर हा एकटा ढग शुभ्र चंदेरी असतो.

या एकट्या ढगाकडे बघितले की जीवनाच्या पक्वतेची अनुभूती येते आणि वयाच्या एका टप्प्यावर आलेले एकटेपण सोसायची उमेद देते. हे ढग आणि एकाकी माणसे कधी विरून जातात हे कळतच नाही.

या एका ढगा कडे बघितले की असेच विचार अनेक वर्षे माझ्या मनात रुंजी घालत आहेत. वर्डस्वर्थच्या कवितेची सुरुवात एका विरक्त भावनेने होताना, तो एकटा आहे हेच त्याला अधोरेखित करायचे असेल कदाचित. कारण पुढची सगळी रचना माणसे आणि त्याची गर्दी वगैरे सांगते.”

माझे बोलणे ताई एकाग्रतेने ऐकत होत्या आणि नंतर म्हणाल्या, “अहो म्हसकर, या विवेचानातून तुम्ही माझ्या मनात अनेक वर्षे अनुत्तरित असलेल्या एका प्रश्नांचे उत्तर देऊन टाकले आहे. तुमची मी खूप आभारी आहे.”

मी विचारले, “कोणता प्रश्न आहे तो?”

तेव्हा त्या म्हणाल्या, “या एकट्या आणि एकाकी ढगाच्या मनात उगाच हिंडताना काय बरे विचार येत असतील?”

पुढचा ठाण्यापर्यंतचा सगळा प्रवास निशब्द होता.

लेखक : श्री श्रीकृष्ण म्हसकर

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ = आषाढी अमावस्या = ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ = आषाढी अमावस्या = ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज आषाढी अमावस्या! आषाढाचा शेवटचा दिवस! 

आषाढघन अोथंबायच्या थांबून श्रावणसरींच्या हाती आपला वसा देणारा निसर्गाचा अद्भूत खेळ!!याच अमावस्येला लोक दिव्याची अवस म्हणतात तर कोणी गटारी अमावस्या म्हणतात.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्यामुळे नक्की काय म्हणायचं? दिव्याची••••• का गटारी•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं!

या दिवशी छान पुरणाची दिंड करतात. किंवा हल्ली कणकेची दिंड करून ती डाऴफळादारखी शिजवतात.आणि मग स्त्रियांना दुसरा उद्योगच नसल्याप्रमाणे त्या खायला अजून काही वेगवेगळंया पदार्थांची रेलचेल  करतात. मग अशावेळी श्रावण सुरू होणार म्हणून नको इतके ढोसून गटारात पडून गाढवावरून धिंड ••••• कि घरच्या लक्ष्मीच्या हातची दिंड ••••• हे ज्याचे त्याने ठरवायचे !

उद्यापासून श्रावण सुरू होणार.सणांची उत्सवांची रेलचेल राहणार. त्यासाठी लागणाऱ्या समया निरांजने देवापुढे ठेवायची साधने घासून लखलखीत करायची. मग ही अमावस्या जाऊन प्रकाश यावा  म्हणून हे दिवे उजळायचे•••• कि तुमच्या अंगातील दिवे पाजळायचे•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं!

ह्या उजळलेल्या ज्योती किती समाधान शांती देत असतात ते खरं तरं अनुभवायचं असतं. पण या ज्योतीच्या प्रकाशात न्हायचं•••• कि मनाची अमावस्या करून घेऊन गटारगंगेत पडायचं? ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

दिप उजळून दिव्याचा झगमगाट दिव्याचे तेज हे सारे आनंदाने पाहून तमसो मां ज्योतिर्गमय प्रार्थना करून दिपोज्योती नमोस्तुते म्हणायचं••••• कि  श्रावण येणार या नावाखाली बार किंवा चार मंडळींची टोळकी जमवून चिअर्स गीते म्हणायची••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

आपले संस्कार आपली संस्कृती नेहमी आपल्याला  चांगले शिकवत असते. त्याचे स्मरण या अशा उत्सवाच्या सणाच्या निमित्ताने करायचे असते. मग अशा छान क्षणी त्याप्रमाणे संस्कारांची दिवाळी साजरी करायची••••• कि मदिरापानाचे सोहाळे करत संस्कृतीचे दिवाळे काढायचे•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

त्यावरून आजच् दिव्याचं महत्व जाणून दिव्याची आरास करायची किंवा दिव्याची रोषणाई करायची ••••• कि हातात बाटली ग्लास घेऊन मदिरेची षोषणाई करायची?••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

दिवे लाऊन अंधारावर मात करून त्यावर अधिराज्य गाजवायचे?••••• कि स्वत:ची शुद्ध हरखून झिंगत राहून घाणेरड्या अंधारात अंग माखायचं? ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

आधुनिक जगातआपण सारेच वावरत आहोत. काळाप्रमाणे चालायला सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. पण त्याबरोबर चांगल्या वाईटाचा विचार करणारी सारासार बुद्धीही जागृत ठेवली पाहिजे. ज्या त्या वेळेचे महत्व काय आहे हे जाणले पाहिजे आणि मग अशावेळी ज्योतीने ज्योत लावून प्रेमाची गंगा वाहण्याचा मिळालेला संदेश जपायचा ••••• कि पेल्याला पेला लावून गटारगंगा दाखवणारा मार्ग धरायचा?•••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

निसर्गाने दिलेले दोन दिवे•••• सूर्य आणि चंद्र! कालचा अंधार सूर्याच्या पहिल्या किरणाने निघून जातो आणि चंद्राच्या तेजाने अंधारही अंधार वाटत नाही म्हणून या दोन्ही दिव्यांचे आभार मानायचे•••• कि दिव्यांची गरजच नाही म्हणत स्वत: होऊन उजेड विरहित दरीत उडी मारायची ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं ! 

पण मला वाटते दिवे जरी उजळत असले तरी त्यावर पण सारखे वापरून चिकटपणा घाण याचा थर जमा होत असतो. हे सगळे साफ करायला पाहिजेच म्हणजे येणारा प्रकाश काजळी विरहित प्रकाशणारी ज्योत ही अधिक तेजोमयी शांत होत असते.म्हणून देवापुढचे ,मनातले , ज्ञानाचे सारे दिवे आज धुवून लख्ख करूया आणि चांगले चकचकीत करून त्यात आशेचे तेल कर्तृत्वाची वात लाऊन हे दिप प्रज्वलीत करू या!

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देवळाबाहेरचा विठ्ठल… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

🌸 विविधा 🌸

☆ देवळाबाहेरचा विठ्ठल… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो.. एक चक्कर संपूर्ण कॉलनी ला मारून, सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून, मध्येच सुरेल किलबिल पक्षांची एकुन आणि डोंगराच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृत्य कृत्य करण्यास आतुर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तसा तर माझा नित्य दिनक्रम..

प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला drive करणारा एक फॅक्टर आहे आणि हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे अखंड सुरू आहे..

आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली.. अगदी एखाद किलोमीटर वर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी ही घुटमळलो तेथे.. पाहिले तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचे ‘ज्योती कलश छलके…’ गात होती..

कपडे बेताचेच.. घरची गरिबी प्रचंड असावी.. पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती.. तिच्या तेजस्वी रुपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती.. तिचा तो दीड वर्षाचा भाऊ सुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता.. शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तो ही कौतुकाने पाहत होता..

मला कळेना.. किती सुखद अनुभव.. माझी सकाळ सार्थकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लागलो.. एका मागे एक सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायची च नव्हती.. मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो.. हळू हळू गर्दी ओसरली.. आणि आता मी एकटाच होतो.. काही वेळाने त्या गान सरस्वती ने गाणे थांबवले. मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसले.. तिच्या बाजूलाच तिने एका छोट्याश्या पाटीवर काही अक्षरे लिहिली होती.. ती पाटी वाचली आणि मी ही थबकलो..

‘मला शिकायचंय..’

दोनच शब्द.. पण माझे कुतूहल शिगेला पोचले.. आस्थेने तिची चौकशी केल्यावर मला कळले तीचे नाव कस्तुरी होते.. आणि तिच्या भावाचे प्रसन्न.. कस्तुरी चे बाबा संगीत विशारद होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले होते.. तेव्हा पासून, म्हणजे साधारण वर्ष भरपासून ते घरीच असायचे.. घरची गरिबी सुरवातीपासूनच होती पण बाबांच्या अपघाताने ती दरिद्र्याकडे वळली.. आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकच हे कुटुंब कमवत होते. संस्कारा शिवाय हे दांपत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीही देऊ शकत नव्हते.. त्यात कस्तुरी ला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली.. आणि याचे दुःख कस्तुरी च्या बोलण्यातून जाणवत होते. मला समजलंच नाही बोलता बोलता एक तास कसा संपला..

“काका मला निघायला हवे.. आई ला मदत करायची आहे..” असे म्हणून कस्तुरी, प्रसन्न ला अंगावर घेऊन लगबगीने निघाली.. ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती.. ‘मला शिकायचंय..’

विचारांच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो.. माझ्या मुलीचे demands मला आठवू लागले. अमुक एक प्रकारचीच बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट, आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतांचा चाललेला आटापिटा.. सगळे डोळ्यासमोरून हटतच नव्हते.. 

मला शिकायचंय.. शिकण्यासाठी केव्हढी तपश्चर्या करावी लागतेय.. सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यात ही भीक न मागता फक्त एकच अपेक्षा, मला शिकायचंय..

खरंच मला जड होते का तिला शिकवणे?? असे किती पैसे लागतील??? महिना दोन ते तीन हजार ..जास्तीत जास्त.. मला खरंच फार नव्हती ही रक्कम.. पण द्यावे की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता. कुटुंबाला घेऊन एकदा हॉटेलिंग करताना अतिशय मामुली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली.. कसे असते ना..

समाजासाठी आपण काही तरी करायला हवे हे स्वतःसह इतरांना मी आज पर्यंत हजारो वेळा सांगितलंय. पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले आहे.. लाज वाटली स्वतःची.. आणि एक निर्णय झाला..

दिवसभर मी कस्तुरी च्या admission साठी माझे सो कॉल्ड सगळे resources वापरले. तिच्या वडिलांना भेटलो.. कागदपत्रे घेतली आणि तिचे admission आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले ..कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली ती पुढे किती तरी वर्षे.. ते कुटुंब आमचे कधी झाले ते कळलंच नाही.. साधारण आठ एक वर्षांनी कस्तुरी ला तिच्या कुटुंबीयांसमवेत आपल्या गावी जावे लागले ते कायमचे…. हळू हळू संपर्क तुटला.. आणि कस्तुरी विस्मृतीत गेली..

परवा सहज टीव्ही लावला..आणि एका सुरेल आवाजाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं.. reality show मध्ये एक तरुणी गाऊन झाली होती.. आणि अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला.. संगीत क्षेत्रातले दिग्गज तीचे कौतुक करताना थकत नव्हते.. एका कॉर्पोरेट मध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आले की “या यशाचे श्रेय कुणाला..” तर ती लगेच म्हणाली “विठ्ठला ला..”

म्हणजे..???

“होय त्या विठ्ठला ला ..त्या परमेश्वराला, जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिरा बाहेर भेटला.. मला योग्य दिशेला जायचे होते पण काकांनी ती हिम्मत केली आणि मला शाळेत घातलं.. कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेल आजही ..पण माझ्या आणि प्रसन्न च्या आयुष्याचं सोनं झाले.. काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका..”

माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते.. कस्तुरी ने आज मला खूप मोठे केले.. पण मी खरंच काय केलेलं.. एक छोटीशी मदत ..आणि एक आयुष्य घडले.. स्वतचा अभिमान नव्हे पण बरे वाटले.. एव्हढे समाधान मी कधीच अनुभवले नव्हते.. हे मला आयुष्यभर पुरणार होते..

‘देवळाबाहेर चा विठ्ठल…’ माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या या नंतरच्या पंढरी चा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो..

सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते.. आणि प्रार्थना करायची होती, ‘तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे.. मला दिलास काही वर्षांपूर्वी ..आणि जीवन काय हे मला कळले.. आणि देवळाबाहेरचे असे विठ्ठल बरेच होऊ देत.. कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी,सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत.. त्यांना या विठ्ठलाची गरज आहे.

संकलन : श्री माधव सावळे 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – १ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – १ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

इंदिराबाई

२६ जानेवारी २००१ ला ‘पद्मश्री’ मिळाल्याची बातमी आली आणि सर्वात प्रथम आठवण आली ती आदरणीय इंदिराबाई आणि कुसुमाग्रज यांची ! वास्तविक पाहता माझं आणि इंदिराबाईंचं नातं काय? या नात्यानं मला काय दिलं? गर्भरेशमी कवितेचा ध्यास, गर्भरेशमी कवितेचा नाद… त्यांनी मला जो कवितेचा ‘राजमार्ग’ दाखवला त्या वाटेवर बकुळ, प्राजक्त आणि सोनचाफ्याचा सडाच अंथरला होता. या वाटेवरून जाताना सुगंधच सुगंध होता. मला त्यांच्या कवितांनी अक्षरश: वेढून टाकलं, मोहून टाकलं आणि त्यांच्याच कवितेच्या ओळी आठवल्या….

‘केव्हा कसा येतो वारा,

जातो अंगाला वेढून

अंग उरते न अंग,

जाते अत्तर होऊन…’

असं अंग अत्तर अत्तर होऊन गेल्यावर, आणखीन जीवनात आनंद तो अजून कुठला?

इंदिराबाई आज आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच नाही. त्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, अगदी कुठलीही लहानसहान गोष्ट करताना त्या, सतत सखीसारख्या माझ्या सोबतच असतात. त्यांची कविता गाताना तर त्यांचं ‘चैतन्य’ माझ्या रक्तारक्तातून वाहत असतं.

‘होऊन माझ्यातून निराळी,

मीच घेतसे रूप निराळे.

तुझ्या संगती सदा राहते,

अनुभविते ते सुखचि आगळे

तुझ्यासवे मी विहरत फिरते,

चंचल संध्यारंगामधुनी

तुझ्यासवे अंगावर घेते,

नक्षत्रांचे गुलाबपाणी!’…

या नक्षत्रांच्या गुलाबपाण्यात माझे सूर चिंब भिजून जातात आणि,

“होकर मुझही से निराली,  लेती हूँ मै रूप निराला

तेरे संग सदा रहती हूँ,

अनुभव करती सुख अलबेला”

या संपूर्ण कवितेचा भावानुवाद मला हिंदीत सहज सुचतो नि ‘माझी न मी राहिले’ अशी अवस्था होऊन जाते. 

१३ जुलैला इंदिराबाईंच्या निधनाची वार्ता ऐकली आणि,

‘एक तुझी आठवण,

वीज येते सळाळून

आणि माझी मनवेल,

कोसळते थरारून…’

अशी माझ्या मनाची अवस्था झाली आणि गेल्या ५-६ वर्षांचा काळ डोळ्यांसमोर सरसर उलगडत गेला. ६ वर्षांपूर्वी इंदिराबाईंना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ दिला गेला. त्या समारंभाची सांगता मी त्यांच्याच ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ आणि ‘कधी कुठे न भेटणार’ अशा दोन कवितांनी केली होती. कार्यक्रम संपल्या संपल्या आदरणीय तात्यासाहेबांच्या (कुसुमाग्रजांच्या) आज्ञेवरून ‘रंगबावरा श्रावण’ व ‘घर नाचले नाचले’ (निवड कुसुमाग्रजांची भाग १ व २) अशा इंदिराबाई, कुसुमाग्रज व शंकर रामाणींच्या कवितांच्या कॅसेट्सची हळूहळू तयारी सुरू झाली. त्यानिमित्तानं कवितांचं वाचन सुरू झालं. जर एखाद्या बाईला खानदानी, भरजरी साड्या एकानंतर एक उलगडून दाखवल्या तर ‘ही निवडू का ती निवडू…’ अशी तिची स्थिती होईल, अशीच या कवितांच्या बाबतीत माझीही स्थिती झाली. इंदिराबाईंच्या शब्दात सांगायचं म्हणजे, … 

‘कुणी ठेविले भरून, शब्दाशब्दांचे रांजण

छंद लागला बाळाला, घेतो एकेक त्यातून…’

अशा त्याच्या शब्दासाठी, माझी उघडी ओंजळ

शब्द शब्द साठविते, जसे मेघांना आभाळ… 

असंच झालं.

२३ ऑगस्ट १९९७ रोजी तात्यासाहेबांच्या सूचनेवरून इंदिराबाईंच्याच गावी, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याकरीता बेळगावला प्रकाशन सोहळा करायचे ठरवले. त्या दिवशी दुपारी दूरदर्शन, चॅनलवाली मंडळी इंदिराबाईंची प्रतिक्रिया विचारत होती. इतकं थोर व्यक्तिमत्त्व, पण हातचं न राखता इंदिराबाई अगदी सहजपणे म्हणाल्या, “आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे! माझ्या कविता आज पद्मजाच्या गळ्यातून फोटो काढल्यासारख्या चित्रमय होऊन, जिवंत होऊन रसिकांसमोर येत आहेत. माझी कविता फक्त पद्मजाच गाऊ शकते. तीच फक्त तिचं कवितापण जपू शकते!” प्रत्यक्ष साहित्यसम्राज्ञी, काव्यसम्राज्ञी, मायमराठी माऊलीने दिलेला फार मोठा आशीर्वाद होता तो माझ्यासाठी!

अक्कांच्या प्रेमाखातर अत्यंत उत्साहाने, या सोहळ्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे ‘तरुण भारत’ बेळगांवचे संपादक श्री. किरण ठाकूर, साहित्यिक व न्यायमूर्ती डॉ. नरेंद्र चपळगांवकर, देशदूतचे संपादक श्री. शशिकांत टेंबे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक अशोक जैन, प्रख्यात लेखिका डॉ. श्रीमती अरुणा ढेरे तसेच बेळगांवचेच थोर कविवर्य शंकर रामाणी वगैरे सारी मंडळी अगत्याने आली होती. तुफानी पावसातही सभागृह श्रोत्यांनी ओसंडले होते. या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक नाशिकच्या भालचंद्र दातार आणि परिवाराने नेटाने झटून हा सोहळा एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही नेत्रसुखद आणि संपन्न करायचा घाट घातला होता. प्रत्येकाला वाटलेल्या सोनचाफ्यांच्या फुलांचा ‘मंद सोनेरी सुगंध’ हॉलभर दरवळत होता. सोनचाफी रंगाची साडी परिधान केलेल्या इंदिराबाईंचे, फुलांनी सजवलेल्या एका कमानीखालून स्टेजवर आगमन होत असताना त्यांचीच कविता  

‘दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले

आज येणार अंगणी, सोनचाफ्याची पाऊले..’

असं मी म्हणत असताना, इंदिराबाईंवर पुष्पवृष्टी झाली आणि त्यावेळी छप्पर फाडून टाकणाऱ्या टाळ्यांच्या  कडकडाटात त्यांचं स्वागत झालं. कविवर्य ग्रेस यांनी या प्रसंगाचं वर्णन म्हणजे, “जगात कुठल्याही कवीचा याहून मोठा आणि योग्य सत्कार तो काय असू शकतो? मीरेची एकट, एकाकी विरह वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कुणी तोलून धरली असेल तर ती या इंदिराबाईंनीच! त्या कविता तुम्ही गायलात पद्मजाबाई, त्या ऐकताना खरंच सांगू का तुम्हाला! मीराच ज्यावेळी आपल्या सखीच्या कानात गुणगुणत सांगते आपल्या वेदनेचे स्वरूप…

दुखियारी प्रेमरी, दुखडा रोमूल

हिलमिल बात बनावत मोसो

हिवडवामे (हृदयात) लगता है सूल… इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….!”

इंदिराबाईंच्या ‘रंग बावरा श्रावण’ कॅसेट प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबईहून निघताना इंदिराबाईंच्या सख्ख्या मैत्रिणीने, आदरणीय दुर्गाबाई भागवतांनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या. 

“लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा, हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले, तरी मनाने त्यात आहे बरं का!” – तुझी दुर्गाबाई.

– क्रमशः भाग पहिला 

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – १ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – १ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(श्री. निलेश नीलकंठ ओक यांच्या भाषणावर आधारित.)

 आपण बघितले की रामायणाचा काळ आहे 14000 वर्षांपूर्वीचा. आणि खगोलशास्त्रीय उल्लेखांच्या आधारावर श्री.नीलेश ओक यांनी ते सिद्ध केले आहे. आताच्या काळातील भौगोलिक वैशिष्ट्ये, जमीन, नद्या, समुद्र जसे आहेत तसेच ते 14000 वर्षांपूर्वी नव्हते. 

वाल्मिकी रामायणात आलेले भौगोलिक वर्णन आताच्या काळातील पुरातत्व शास्त्र, जीवाष्म शास्त्र, समुद्रशास्त्र, हवामानशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूगोल, अनुवंशशास्त्र, खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय आणि भारता बाहेरील काही निवेदने, वृत्तांताच्या आधारे मिळालेले पुरावे यांच्याशी अतिशय सुंदर तऱ्हेने जुळतात. 

सीतेच्या शोधा साठी जेव्हा वानरसेना निघाली तेव्हा सुग्रीव त्यांना कोणी कुठे कसे जायचे ते समजावून सांगतो आहे. सुग्रीवाने त्या वानरसेनेचे चार भाग पाडून त्यांना चार दिशांना जायच्या सूचना दिल्या आहेत. 

दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या वानरसेनेच्या गटाला सुग्रीव सांगतोय की तुम्ही जेव्हा या भूभागाच्या (म्हणजे भारताच्या) आग्नेय दिशेला तुम्ही महेंद्र पर्वतावर याल तेव्हा तिथून तुम्हाला अगस्त्य हा तेजस्वी तारा दिसेल तो फक्त तिथूनच तुम्हाला दिसू शकेल आणि तो सुर्या इतका तेजस्वी दिसेल. आता यात वैशिष्ट्य हे आहे की अगस्त्य फक्त तिथूनच का दिसेल असे म्हटले आहे तर त्या काळात तो फक्त भारताच्या अगदी दक्षिण टोकावरूनच दिसू शकत होता इतरत्र कुठूनही नाही. आता अगस्त्य हा तारा अगदी नवी दिल्ली येथूनही दिसतो. यावरून सुद्धा तो काळ 14000 वर्षांपूर्वीचा होता हे समजते. परत कारण तेच, पृथ्वीची परांचन गती.

पावसाळा उलटून गेल्यावर सुग्रीवाने आता सगळ्या वानरसेनेला एकत्र केले आहे. राम लक्ष्मण आणि सुग्रीव एके ठिकाणी बसले आहेत. सुग्रीव पहिल्यांदा पूर्व दिशेला अँडीज पर्वता पर्यंत वाटेत काय काय दिसेल ते सांगतो आहे. दक्षिण दिशेला भारतापासून अंटार्क्टिका पर्यंत काय काय दिसेल ते सांगतो आहे. याचा अर्थ असा नाही की वानरसेना अँडीज पर्वता पर्यंत किंवा अंटार्क्टिका पर्यंत जाऊ शकणार होती किंवा गेली होती. सुग्रीव फक्त सांगतोय. उलट सुग्रीव या ठिकाणी स्वच्छ सांगतो आहे की अंटार्क्टिका पर्यंत जाऊ नका. पश्चिमेला भारतापासून आल्प्स पर्यंत तो काय काय दिसेल ते सांगतो आहे. 

आपण आधी पूर्व दिशे पासून सुरुवात करू. सुग्रीवाने चार दिशांना जाणारे चार गट केले. प्रत्येक गटाचा एक नेता ठरवला. पूर्व दिशेला जाणाऱ्या गटाचा नेता होता विनता. त्यासाठी आपल्याला आधी थोडी अनुवंशिकता आणि पुरातत्व शास्त्र यांच्या अनुषंगाने विचार करावा लागेल. नव्या जेनेटिक संशोधनातून हे समजते की दक्षिण भारतापासून ते ऑस्ट्रेलिया ते दक्षिण अमेरीके पर्यंत एक जेनेटिक सिग्नल नजरेस पडतो. South East Asia, पापुआ न्यूगिनी, अंदमान निकोबार इ देशांचा यात समावेश आहे. यातून तो जेनेटिक ट्रेल जातो असे संशोधन आहे. पुरातत्वीय पुरावे हे सांगतात की माणसाचे अस्तिव दक्षिण अमेरिकेतील चिले येथे 33,000 BCE पासून आहे तर पनामा येथे 50,000 BCE पासून आहे. त्यामुळे सुग्रीवाने 12209 BCE च्या काळातील भौगोलिक वर्णन केले तर त्यात नवल वाटायला नको.

आता सागरीशास्त्राच्या दृष्टिकोनातून 14,000 BCE च्या वेळी पृथ्वीचा नकाशा कसा असू शकेल ते बघू. त्या वेळी आशिया खंड उत्तर अमेरिकेशी सरळ सरळ जमिनीने जोडलेला होता. तसेच भारतही इंडोनेशिया, लाओस, थायलंड अगदी ऑस्ट्रेलिया पर्यंत भागांशी सरळ जमिनीने म्हणजे land mass ने जोडलेला होता. आणि हे का तर त्यावेळी समुद्रसपाटी आताच्या काळा पेक्षा 120 ते 140 मीटर्स खाली होती म्हणून बरीचशी जमीन उघडी पडली होती.

आता सुग्रीव सांगतोय की तुम्ही त्या दिशेला जाल तेव्हा तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेची माणसे दिसतील. ज्यांच्या कानाची पाळी खांद्यापर्यंत लोम्बलेली असेल, त्यांचे ओठ लांबत जाऊन छाती पर्यंत ओघळले असतील. काही लोक कच्चे अन्न, कच्चे मासे खाताना दिसतील. ( इथे सुशी ची आठवण आल्या खेरीज रहात नाही). आता सुद्धा लाओस मध्ये पौडांग स्त्री, इंडोनेशिया मधील कानाची पाळी खांद्या पर्यंत ओघळलेली अशी स्त्री, खूप लांब जीभ असल्याचे डेकोरेशन केलेला द. अमेरिकेतला माणूस किंवा लांब कृत्रिम हनुवटी असलेली माणसे आजही दिसतात. South East Asia ते पापुआ न्यु गिनी येथे अशी चित्र विचित्र केश वेष भूषा केलेली वेगवेगळ्या टोळ्यांची माणसे आजही बघायला मिळतात. आफ्रिकेतही तऱ्हेतऱ्हेची माणसे ज्यांचे ओठ, कान अनैसर्गिक पणे ओघळलेले दिसतात. लांब कशाला अगदी आपल्या देशात दक्षिणेतील  सुपर माची नावाच्या एका  तेलगू सिनेमातील वयस्कर नटीच्या कानाची भोके अशीच खांद्यापर्यंत ओघळलेली आजही बघायला मिळतात. अगदी तस्सेच चित्रविचित्र माणसांचे वर्णन रामायणात सुग्रीवाच्या तोंडून वदवले आहे.

आता सुग्रीव ७ वेगवेगळ्या द्विपांची वर्णने करतो आहे. सुवर्ण द्वीप, रजत द्वीप, यवद्वीप  म्हणजे ओट्स इ.  त्या त्या बेटावर सोन्या चांदीच्या खाणी होत्या. यवद्वीपावर मोठ्या प्रमाणात यवाची शेती होत होती.  त्या काळात भारत खूप तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बाहेरच्या देशांना देऊन तिकडून सोने, चांदी आयात करत होता. आणि ज्या ज्या बेटावरून सोने चांदी येत होती त्या त्या बेटांच्या नावाने ते सुवर्ण किंवा चांदी ओळखली जाते होती. जसे की जामबुनद सुवर्ण, सुवर्णद्वीप सुवर्ण, पारुजम, परू येथे मिळणारे सुवर्ण इ.

या सात बेटांच्या मधील वेगवेगळ्या (प्रॉव्हिन्सस) प्रांतांच्या चिन्हाच्या (एमब्लेम) मध्ये अशी नावे येतात. उदाहरणार्थ इंडोनेशियाच्या एका प्रॉव्हिन्स च्या चिन्हावर ‘ जय राया’ असे लिहिले आहे. कलीमंथन उत्तरा, बाली द्वीप जया, जावा बेटांच्या चिन्हावर ‘शक्ती भक्ती प्रजा’ असे लिहिलेले आहे. पापा इंडोनेशियाच्या एका चिन्हावर ‘ कार्य स्वाध्याय’ असे लिहिलेले आहे. बिननेक तुंगल इक म्हणजे  चक्क Unity in  diversity असे इंडोनेशियाच्या गरुडाच्या चित्राखाली लिहिलेले आहे. त्यानंतर पुढे त्या वेळच्या ज्वालामुखीचे, तलावांचे वर्णन त्यात येते.

आता आपण प्रशांत महासागर (क्षीरसागर) ओलांडून जाऊया. पॉलीनेशियातील भाषांचा संस्कृतीशी कसा संबंध येऊ शकतो याचा अभ्यास Uschi Ringleb नावाची एक कॅनेडियन संशोधक करते आहे. पॉलीनेशियातील एक नृत्यप्रकार आहे उला डान्स म्हणजे ‘सीवा’ डान्स. त्यांच्या भाषेत सीवाचा अर्थ नाच. इथे सीवा म्हणजे नृत्य करणारा आपला नटराज आठवल्या खेरीज रहात नाहीच. पॉलीनेशियाच्या काही भागात s चा h होतो आणि त्यामुळे सीवा चा हिवा. त्यामुळे तो नृत्यप्रकार हिवा डान्स म्हणून पण प्रसिद्ध आहे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘नातीगोती की नातीगोची’ – लेखिका : सौ. दीपा बंग ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘नातीगोती की नातीगोची’ – लेखिका : सौ. दीपा बंग ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

खूप प्रतिष्ठित घरातलं चांगलं स्थळ समृध्दीसाठी चालून आलं होतं. पण पी.एच.डी.झालेली समृध्दी मात्र तयार नव्हती, ह्या विवाहासाठी.

तिला हवं असलेल्या कोणत्याच गोष्टी तिला त्या नात्यात दिसत नव्हत्या.

अमोल कमवता होता. देखणी, पीळदार शरीरयष्टी लाभलेल्या,एकुलत्या एक असलेल्या मुलामध्ये एकच अवगुण होता.

तो अवगुण म्हणजे त्याला आई ,वडील होते. त्याची शी,शू काढणारी, जगाच्या वाईट नजरेतून वाचवण्यासाठी रोज मीठ मोहरी ओवाळून टाकणाऱ्या त्याच्या आजीची तब्येत अजून ठणठणीत होती. थोडक्यात, घरात येणाऱ्या सुनबाईला एक नाही, दोन नाही, चक्क तीन लोकांना सांभाळायचं होतं.

धुणं,भांडी,फरशी , फर्निचर पुसायला, दिवसभर काम करायला होते दोन गडी आणि जरी पोळ्यांना बाई होती. तरी त्या तिघांसोबत राहणे म्हणजे फार मोठा जाच! असंच त्या भोळ्या मनाला वाटत होतं.

समृध्दीच्या आईला तिची व्यथा कळली. ती मनातून हळहळली. ही व्यथा दूर व्हायलाच पाहिजे, असा तिने चंग बांधला. तुर्तास हे स्थळ बाजूला सारले गेले.

एके दिवशी समृध्दी, आपल्या फुलांनी समृद्ध बागेत चहा पित असताना शेजारचा छोटू पेपर घेऊन आला. त्या पेपरमध्ये काही प्रश्न होते. ते सोडवण्यासाठी त्याला समृध्दीची मदत हवी होती.

प्रश्न होता, “अचानक रात्री नवरा आजारी पडल्यावर तुम्ही एकटे असताना काय कराल?”

दुसरा प्रश्न होता, “अचानक दोनच महिन्यांचं तुमचं बाळ रडू लागलं आणि तुम्ही एकटे आहात, तर तुम्ही काय कराल?”

तिसरा प्रश्न होता, “तुम्हाला ताप आला आणि तुमचा नवरा ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकत नसेल तर तुम्ही काय कराल?”

कमनशिबी आहोत आपण. कारण आपल्या देशात पी.एच.डी.झाली तरी जीवनात असल्या प्रश्नांना सामोरे कसे जायचे ? ह्याचे शिक्षण देत नाहीत.

पेपर वाचून तिला अनुमान आला होता की हे पेपर छोटू घेऊन येण्यामागे नक्कीच आईचं सुपीक डोकं होतं. आपल्या आईला लहानपणापासून ह्याच पद्धतीने शिकवण देताना तिने अनेक वेळा पाहिले होते.

हो किंवा नाही अशी तट नव्हती.विचार करायला वेळ मिळाला. आणि समृध्दीला कळत होतं की जीवनात असे अनेक प्रसंग येतात, जेथे आपल्याला कुणीतरी सोबत हवंच असतं.

समृध्दी आज नावासारखी विचारांनी पण समृध्द झाली होती.सरळ उठून आईच्या गळ्यात पडून रडली.लगेच अश्रू पुसत, हसत हसत, लाजत म्हणाली , “आई मी अमोलशी लग्नाला तयार आहे.

“पण आई! ही नातीच सगळी गोची करतात.स्वतंत्रता हिरावून घेतात. म्हणून मनात शंका होती गं. मनासारखं जगता नाही ना येत इथं.”

आई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, “इथं तुझीच गोची होते.काळ बदलला. मग सासू कडे बघायचा दृष्टिकोन नको का बदलायला? आता विचारसरणी बदलली. मैत्रीचं नातं रुजायला लागलं. वैचारिक मतभेद असले तरी मने जिंकता आली पाहिजेत .

लग्नानंतर  घरात सासू,सासरे असल्यावर जबाबदारी लवकर पडत नाही.

आमच्या काळात दहा बारा वर्षानंतर कुठं जबाबदारी पडायची. तुम्हा मुलींना मात्र एकटं राहून लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून घरात काय हवं नको ते पहावंच लागतं. अनुभव कमी पडतो. मग भांडणतंटे आणि सगळंच अघटित घडू लागतं.

पटतंय का?”

समृध्दी डोळ्यावरचा चष्मा पुसत होती.चष्म्यावरची धूळ साफ होता होता तिच्या मनावरचं नात्याबद्दलचं मळभही दूर झालं होतं.

पण हे मळभ परत कधीच तिच्या जीवनात येऊ नये म्हणून आईने शेवटचे शब्द गरम तेला सारखे तिच्या कानात ओतले,

” बाळ! एकटं राहून जर माणूस सुखी राहु शकला असता तर आज सगळ्यात जास्त  अनाथाश्रमातील मुलेच सुखी असती. “

 नात्यातील गोची संपून आज नातीगोती सांभाळण्यास समृध्दी सज्ज होती.

  

लेखिका : सौ. दीपा बंग

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares