मराठी साहित्य – विविधा ☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बघता बघता गणपतीचे दहा दिवस संपत  येतात. दरवर्षी गणपती बाप्पा चे स्वागत आपण जोरात करतो आणि दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला त्याला निरोप ही देतो! “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात गणपतीचे विसर्जन होते. तो पाहुणा गणपती आपल्याला इतका लळा लावतो की त्याचे विसर्जन करताना खूप वाईट वाटते!

कोरोनामुळे गणपती उत्सवावर आलेल्या मर्यादा संपल्या आणि पुन्हा एकदा ढोल ताशांच्या गजरात, डॉल्बी म्युझिक मध्ये गणपतीचे आगमन झाले! तसाही माणूस उत्सव प्रिय असतो. त्यातून महाराष्ट्रात तर सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणरायाला वंदन केले जाते. बुद्धी दाता गणेश आणि शक्ती स्फूर्तीदायी शिवाजी महाराज या दोन्हीचा जयजयकार महाराष्ट्रात होतो. या दोन्हीचा उद्देश समाजात स्फूर्ती राहावी, जिवंतपणा राहावा, समरसता यावी असाच आहे!

पण अलीकडच्या काळात या उत्सवांना काही वाईट गोष्टींची किनार लागलेली होती. कित्येक तास चालणाऱ्या मिरवणूका, सजावटी मधील अतिरिक्त स्पर्धा तसेच गुंडगिरी, दारू पिऊन नाचणे यासारख्या अनेक गोष्टी गणेशोत्सवा दरम्याने होऊ लागल्या.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की परमेश्वर तिथे हस्तक्षेप करतो असं मला मनापासून वाटतं!हे आपल्या ला कोरोनाच्या निमित्ताने बघायला मिळाले. अजूनहीघरगुती गणपती बसवतात तिथे गणपतीचे पावित्र्य टिकवले जाते.. सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी ही गणेशाचे पावित्र्य रहावे यादृष्टीने अनेक गोष्टी केल्या जातात. तरीही

काही वेळा स्वच्छतेसंबंधी गोष्टी लोकांकडून पाळल्या जात नाहीत. महानगरपालिका विसर्जनासाठी विविध ठिकाणी निर्माल्य कुंडआणि  विसर्जनासाठी पाण्याचे टॅंक  ठेवते, त्यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त लोकांना लागली आहे. पुण्याचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर असतो आणि महाराष्ट्रातच काय तर देश परदेशातही त्याचे महत्त्व फार आहे!

दरवर्षी अनंत चतुर्दशी येते, गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी! पण काही वेळा हा दिवस अगदी लक्षात राहण्याजोगा गेला आहे,. जसे की लातूर, किल्लारीचा मोठा भूकंप अनंत चतुर्दशीच्या पहाटे झाला, हजारो लोक बेघर झाले, घरे कोसळली, लोक मृत्युमुखी पडले, पण त्या ठिकाणी सर्व समाजाने भरभरून मदत पाठवली. कधी कधी या काळात अतिरिक्त पावसामुळे पूर येणे, गावंच्या गावे पाण्याखाली जाणे यासारख्या घटनाही घडल्या. विघ्नहर्ता गणेशाने अशा काळात लोकांमध्ये एकमेकाबद्दल सहभावना निर्माण केली की ज्यामुळे लोकांना समाजभान आले. कित्येक ठिकाणी अशी संकटे येऊन गेल्यावर उत्सव खर्च कमी करून मदतीसाठी पैसा पाठवला गेला. श्री गजानन अशा गोष्टींना प्रेरित करत असतो असे वाटते..

वैयक्तिक पातळीवर गणेशाचा उत्सव हा घराघरात साजरा होतोच. त्यानिमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येते. एकमेकांबद्दल चे राग, द्वेष, मतभेद याचे विसर्जन माणूस करतो. यासाठी दुर्वा या प्रतीकात्मक आहेत. दूर्वा किंवा हरळी जशी जमिनीला चिकटून वाढत वाढत जाते, तसेच कुटुंबाने एकमेकांशी चांगले संबंध ठेवून हरळी प्रमाणे आपल्या समाज जीवनाचा विस्तार केला पाहिजे. दुर्वांप्रमाणेच चांगल्या भावना वाढीला लावल्या पाहिजेत! शाडू मातीचा गणपती आपण पाण्यात विसर्जन करतो पण ती माती विरघळून जशी पाण्यात तळाशी पुन्हा एकत्र येते, पुढच्या वर्षी नवीन निर्माणासाठी उपयोगी असते. तशीच आपली वृत्ती अधिकाधिक एकत्र येण्याची आणि चांगले निर्माण करण्याची राहण्यासाठी हा गणराया आपल्याला शिकवत असतो!

जाता जाता गणराया आपल्याला किती गोष्टी शिकवत असतो. इतर देवतांपेक्षा गणपती आपल्याला जवळचा वाटतो. त्याची प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याला सजीव रूप देतो. लहान मुलाबाळां पासून सर्वांनाच गणपती बाप्पा जवळचा वाटतो. अलीकडे शाळांमध्ये सुद्धा गणपती स्थापन करतात. त्यानिमित्ताने अथर्वशीर्ष, गणपतीच्या आरत्या आणि काही स्पर्धांचे ही आयोजन करण्यात येते. नकळतच मुलांवर चांगले संस्कार घडतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हा काही ना काही कारणाने धार्मिकते बरोबरच समाजाशी ही जोडलेला आहे. गणपतीचा संबंध बुद्धीशी जोडलेला असल्यामुळे सहाजिकच मुलांना बुद्धीदात्या गणपती बद्दल खूप प्रेम असते!

गणपती  विसर्जनासाठी उचलल्यानंतर ती जागा रिकामी राहू नये म्हणून त्या जागी एखादे देवाचे पुस्तक ठेवायचे प्रथा आमच्या घरी होती. प्रत्येक गोष्टीबाबत आपल्या पूर्वजांनी इतका बारीक विचार केला आहे याचे विशेष वाटते!

असा हा गणपती बाप्पा विसर्जन करताना  सर्वांनाच वाईट वाटते. यावरून मला महादेव शास्त्री जोशांची “मोरभट” म्हणून वाचलेली एक कथा आठवते. त्यातील कथेतील मोर भटजी गणपतीचे इतके भक्त होते की गणपती विसर्जनासाठी पाण्यात सोडला की त्यांना अक्षरशः रडू येत असे आणि तो रिकामा पाट घरी घेऊन येताना त्यांचे मन विषण्ण होत असे. पाट रिकामा घरी येऊ नये म्हणून त्या रिकाम्या पाटावर वाळू किंवा विसर्जनाच्या ठिकाणची माती घरी आणून तो पाट गणपती च्या जागी ठेवण्याची प्रथा आहे…

गणपतीचे विसर्जन म्हणजे त्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीला आपण पुन्हा त्याच्या मूळ अवस्थेला म्हणजेच पाण्यामध्ये, मातीत रूपांतर करून सोडून देतो. गणपतीचे हे विसर्जन आपल्याला थोडे विरक्त व्हायला शिकवते. या गणपती प्रमाणेच आपल्याला सुद्धा एक दिवस या माती आणि पाण्यात विसर्जित होऊन जायचे आहे, हे जग सोडून जायचे आहे याची जाणीव मनापासून होत राहते! अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होताना खरोखरच अंतरीचा उमाळा भरभरून वाहतो आणि आपण म्हणतो, “गणपती बाप्पा मोरया” पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला!”

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘पितृपक्ष : कृतज्ञता पर्व‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

पितृपक्ष : कृतज्ञता पर्व ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

जगातील सर्वाधिक प्राचीन संस्कृती कोणती असा प्रश्न आपण google वर search केला तर त्याचे स्वाभाविक आणि एकमेव उत्तर येईल हिंदू संस्कृती!! आपली हिंदू संस्कृती नुसती पुरातन नाही तर ती सर्वसमावेशक, विज्ञानाधिष्ठीत, सनातन ( याचा खरा अर्थ नित्यनुतन असा आहे ), पर्यावरणाचे रक्षण करणारी (इको फ्रेंडली), ऐहिक सुख प्राप्त करून देऊन पारमार्थिक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लावणारी, थोडक्यात सांगायचे तर ‘आपले घर ते संपूर्ण विश्व’ असा वैश्विक (global) विचार करायला प्रवृत्त करणारी शांतताप्रेमी संस्कृती आहे. आपली संस्कृती आपल्याला वेगवेगळे गुण विविध सणांच्या माध्यमातून नकळत शिकवीत असते, फक्त आपण आपले डोळे, कान उघडे ठेवायला हवेत. हल्ली आपल्याकडे संस्कार वर्ग घ्यावे लागणे किंवा संस्कार करावे लागणे हा एक सामाजिक आजार आहे, ही एक प्रकारची सामाजिक वेदना आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये. पूर्वी संस्कार घराघरातून आणि समाजाकडून आपसूक (नकळत) व्हायचे. संस्कार पानपट्टीवर विकली जाणारी वस्तू आहे का ? हजारो वर्ष परंपरा पाळूनझ एकप्रकारे तपश्चर्या करून  ते संस्कार मागील पिढी पूढील पिढीकडे ते संक्रमित करीत असते. ती साखळी तोडण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. मागील पन्नास-साठ वर्षात मात्र आपण हे संस्कार पुढील पिढीत संक्रमीत करण्यात अयशस्वी झालो की काय ? असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे, असे वाटते.

राम’दास’ असलेल्या हनुमंताला त्याच्या शक्तीचा विसर पडला होता, पण जाबुवंताने स्मरण करून दिल्यावर हनुमंताला त्याच्या शक्तीचा शोध लागला आणि तो पुन्हा आपल्या पूर्वीच्या विराट क्षमतेने कार्यरत झाला. आपल्याला ही आपल्या विराट हिंदुतेजाचा विसर पडला आहे, आजच्या काळातील जांबुवंत यथाशक्ती आपल्याला आपल्या शक्तीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण गंमत अशी आहे की आजचे समाजकंटक किंवा हितशत्रू विविध शक्कली लढवून त्या जांबुवंतालाच आणि पर्यायाने हिंदू समाजालाच तुच्छ लेखण्याचे काम इमाने इतबारे करीत आहेत. याचा परिणाम म्हणजे आपल्या परंपरा पाळण्याची आपल्याच मुलाना लाज वाटू लागली आहे. आपल्या श्रद्धास्थानांबद्दल आपल्याला लाज वाटणे ही आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे. काही रूढी काळाच्या ओघात चुकीच्या पद्धतीने रुजल्या असतील, काही कालबाह्य झाल्या असतील, पण त्याचा तपशीलात जाऊन अभ्यास न करता नुसती दूषणं देणं आणि अक्रियाशील राहणे हे आजच्या सुशिक्षित समाजास शोभणारे आहे का? आपण काय खावे ? कधी खावे ? दंत मंजन कोणते वापरावे इथपासून ते अंगाला कोणता साबण लावावा हे सुद्धा आजचे तथाकथित अभिनेते (idol) आणि अभिनेत्री ठरवतात आणि आपली तरुण पिढी त्याची री ओढते, याला स्वातंत्र्य म्हणायचे ? साधा विचारही आपल्याला सुचू नये की आपण उष्ण कटिबंधात राहतो, त्यानुसार आपली पोशाखरचना राहिली आहे आणि असायलाही हवी, पण आजची आपली पोशाख रचना पूर्णपणे पाश्चात्य झाली आहे. काय योग्य आणि काय अयोग्य, याचा विचार करायला आपल्याकडे वेळच नाही. आपण नुसते अंधानुकरण करीत आहोत, नाही का?

आपल्या संस्कृती उत्सवप्रधान आहे. प्रत्येक उत्सवातून योग्य तो सामाजिक संदेश देण्याचे काम केले गेले आहे. होळी आपल्याला वर्षभरातील वाईट विचार, वाईट आठवणी, वाद, हेवेदावे जाळून नष्ट करायला शिकविते, गुढी पाडवा चांगल्या गोष्टीची मुहूर्तमेढ रोवण्यास सांगतो, गोपाळकाला संघटन करायला आणि सर्वांची सुखदुःख वाटून घ्यायला (sharing) शिकवितो. हाच खरा समाजवाद आहे, ( कालमार्क्स ने बहुतेक श्रीकृष्ण चरित्र वाचलेलं असावं). गणपती नेतृत्वगुण शिकविणारा (leadership) आणि बुद्धिदाता आहे. पण, सध्या आपले उत्सव कसे साजरे करायचे हे आपण ठरवत नसून आजची प्रसारमाध्यमे ठरवत आहेत असे दिसते आणि त्याचे खापर मात्र आपल्या सनातन हिंदुधर्मावर फोडतात. आपणही हे स्वातंत्र्य अगदी सहजपणे मीडियाच्या हातात सुपूर्द केलं आहे. एखाद्या चित्रपटातील लोकप्रिय गीत आपण होळी, गणपती, गोविंदा कुठेही लावतो, त्या गीताचे बोल काय आहेत, त्याचा अर्थ काय आहे, संगीत कोणत्या दर्जाचे आहे, याचं थोडेही सामाजिक भान आपण पाळत नाही. कोणत्याही धार्मिक उत्सवाचा मूळ हेतू हा समाजातील सात्विकता वाढावी, मनुष्याच्या सृजनशक्तीला चालना मिळावी, सामाजिक ऐक्य वाढावे आणि एकूणच वातावरण मंगलमय व्हावे असा असतो. पण काही सन्माननीय अपवाद सोडल्यास  सध्याच्या सार्वजनिक उत्सवांचे किंवा अगदी खासगी उत्सवांचे स्वरूप बघितले तर तो सोहळा ( event) आहे की उत्सव आहे, हेच पटकन कळत नाही. त्यामुळे आपल्या सारख्या सामान्य मनुष्याचे मन मात्र सुन्न होत आहे. उत्सवाच्या निमित्ताने होणारी आर्थिक  ‘उलाढाल’ बघितली तर कोणताही देव त्या मंडपाच्या आसपास देखील फिरकेल असे वाटत नाही. आपण सर्वांनी निरक्षीर विवेक बुद्धीने आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे.

गणपती गावाला गेले की येणारा काळ मम्हणजे पितृपक्ष. लौकिक अर्थाने हा काही उत्सव नाही किंवा उत्सवाचा, सणांचा काळ नाही. पण या पितृपक्षात आपल्याकडे मृत्यू पावलेल्या पूर्वजांचे स्मरण करून सश्रद्ध अंतकरणाने श्राद्ध करण्याची पद्धती आहे. श्राद्ध करण्याची विशिष्ठ पद्धती पूर्वी विकसीत केली गेली. Hardware कोणतेही असले तरी त्यातील software एकच आहे आणि ते म्हणजे आपापल्या पुर्वजांबद्दल विनम्रतेने कृतज्ञता व्यक्त करणे. आपला जन्म होणं किंवा तो कोणाच्या घरी होणं हे आपल्या हातात नाही, माता पित्यांची निवड आपल्या हातात नाही, ती आपल्या पूर्वजांनी, आईवडिलांनी केलेली आपल्या वरील एक कृपाच आहे. ज्या घरात आपण जन्मास येतो त्या घराचं नाव, ऐश्वर्य, परंपरा आणि अशा सर्वच गोष्टी आपल्याला वारसाहक्काने मिळतात. त्या ऋणातून अंशतः मुक्त होण्याचा कालावधी म्हणजे पितृपक्ष. या कालावधीत जाणीवपूर्वक इतर शुभ कार्य करु नये असा संकेत अनेक वर्षे पाळला जायचा. खरं तर ह्या पितृपक्षास ‘निषिद्ध’ समजणे साफ चुकीचे आहे. वर्षातील ३६५ दिवसातील जेमतेम १५ दिवसांचा हा कालावधी आहे. एका अर्थाने हा कालावधी ‘आरक्षित’ आहे. या  काळातील वातावरण सुद्धा विशिष्ठ गोष्टीसाठी लाभदायक असते, आयुर्वेदातील तज्ञ आपल्याला आणिक माहिती देऊ शकतील. या काळात पित्त प्रकोप होतो आणि त्यासाठी भाताची ( तांदळाची ) खीर ही पित्तशामक आहे.

या पितृ पंढरवड्याचा आणखी एक अर्थ आहे, तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मागे वळून पाहताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करूयाच पण आपल्या व्यक्तिगत आयुष्याचे सिंहावलोकनही आपण या निमित्ताने करू शकतो. गुढीपाडव्याला जर आपण एखादा नवीन नियम केला असेल किंवा नवीन उद्योग सुरु केला असेल, तर हा कालावधी हिंदू वर्षाचा साधारणपणे मध्य आहे. मागच्या सहा महिन्यात आपण काय केले?, करू शकलो?, काय चुकलं?, काय बरोबर झालं ? या सर्वांची वस्तुनिष्ठ उजळणी आणि आढावा घेऊन आपण आणखी  नव्या उमेदीने कार्यास लागलो तर यशाची दसरादिवाळी नक्कीच आपल्या आयुष्यात येईल. समर्थानी अखंड सावधान राहावे’ असे सांगितले आहे ते यासाठीच. दैनंदिन आयुष्यात आपल्याला बऱ्याच लोकांची हस्ते परहस्ते मदत होत असते. आपण विमान, ट्रेन, रिक्षा, बस, टॅक्सी अशा विविध वाहनांनी गरजेनुसार प्रवास करीत असतो. त्या वाहनांच्या चालकाचे नाव देखील आपल्याला माहित नसते, पण हे सर्व जण आपल्याला आपल्या गंतव्य स्थानी सुखरूप नेऊन सोडत असतात, तसेच आपला दूधवाला, फुलपुडी देणारा, डॉक्टर, किराणा माल पुरविणारा, वकील, मोची, भाजीविक्रेता आणि समाज जीवनाचे विविध घटक आपले जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी सतत झटत असतात. या सर्वाप्रति कृतज्ञता असणे आणि किमान वर्षातून एकदा ते  व्यक्त करणे आपले आद्यकर्तव्यच नव्हे काय ?

सर्वसाधारणपणे अमुक एक गोष्ट केली की काय फळ मिळते असा प्रश्न प्रत्येक कर्म करताना सामान्य मनुष्याच्या मनात येतो. वरील लेख वाचताना हाच प्रश्न आपल्या सारख्या सुजाण वाचकांना पडू शकतो. मलाही हे सांगताना आनंद होत आहे की वरील लेख वाचून काय होईल ते माहित नाही पण त्यानुसार आपल्याला कृती करता आली तर मात्र ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानात 

सांगितल्याप्रमाणे  “भूतां परस्परे पडो। मैत्र जीवांचे।।” याची अनुभूती येईल आणि आत्यंतिक मानसिक समाधानाचा लाभ होईल यात तिळमात्र संदेह नाही.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गणराज आला… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गणराज आला … ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

सकाळी जाग आली ती या ओळी गुणगुणतच…

दोन ओळी सुचल्या त्या काम करता करता गुणगुणत राहिले. आणि पुढे इतकं काही सुचू लागलं की काम बाजूला ठेवून मला त्या लिहून काढाव्या लागल्या. पूजा करतानासुद्धा इतकी तन्मयता झाली असेल की नाही माहिती नाही, पण या ओळी लिहिताना मात्र एक विलक्षण तन्मयता, आनंद, चैतन्य जाणवत होतं. लिहिल्यावर जाणवलं की ही एक साधीसुधी आरती म्हणता येईल अशी रचना आहे. गणपतीची विविध नावं यात गुंफली गेली आहेत.

गणेशाने हे काम करून घेतलं असावं.

अबीर गुलाल उधळीत आमुचा ‘गणराज’ आला|

आमुचा ‘गणपती’ आला||

*

ढोल, ताशे, झांजांचा नाद ‘विनायका’ तव त्रिभुवनी निनादला|

नाद तव त्रिभुवनी निनादला||

*

दारी सडा रांगोळी तोरण सजले ‘गजानना’ तुज स्वागतासाठी|

गजानना तुज स्वागतासाठी||

*

धूप, दीप, अत्तर, गुलाब ‘हेरंबा’ तुज वाहतो दुर्वांच्या राशी|

वाहतो मस्तकी दुर्वांच्या राशी||

*

मोदक लाडू पेढे ‘लंबोदरा’ पंगत प्रसादाची,

वाढली पंगत प्रसादाची|

*

म्हणू आरती करु प्रार्थना ‘एकदंता’ तव चरणापाशी|

प्रार्थना तव चरणापाशी||

*

बुद्धी, शक्ती अन् कलेचे ‘विनायका’ लाभो वरदान आम्हाला|

देशी वरदान आम्हाला ||

*

‘भालचंद्रा’ तव कृपेने सौख्य- सुख-शांती लाभो भक्तांना|

लाभो आम्हा भक्तांना||

*

जळो भेदभाव नुरो वासना ‘विघ्नेशा’ अहंकाराला दे आमुच्या मुक्ती|

आम्हास दे आता मुक्ती ||

*

चराचरातील तुझ्या रूपाशी ‘गजवक्रा’ राहो सदा प्रीती||

‘गौरीपुत्रा’ राहो सदा प्रीती||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गौरीमायला निरोप…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गौरीमायला निरोप…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींच आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना… सगळं घर त्यांना फिरून दाखवलं. दोघींना  नीट बसवलं. दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशीची लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण, दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी  प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह  भरला होता.

तो दिवस गडबडीतच गेला. रात्री निवांत  दोघींसमोर बसले… मनातलं तिला ओळखता येतच…. तरी सांगितलं… तिच्याशी बोललं की मन  शांत  होत.

तीन दिवसांच्या पाहुण्या म्हणून  आलेल्या गौरी….. निघाल्या की परत…. मुरडीचा कानवला, दहीभाताचा नैवेद्य दाखवला. अक्षता टाकल्या… जाता जाता  निरोप देताना म्हटलं..

…. “ आई… क्षणभर जरा थांब ग.. तुझ्या लेकीबाळींचा निरोप सांगते तुला…  गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस.. त्यामुळे तुझं सांगणं  सगळ्यांनी ऐकलं बरं का… त्यामुळे आम्ही अन्न वाया  नाही घालवलं.. मोजकच केलं.. खूप जणींनी  मला हे सांगितलं. त्यांचा  स्वयंपाक  लवकर झाला. एका ताईंची सवाष्ण दरवर्षी अडीच वाजता  जेवायची. यावर्षी त्यांनी तुला बारालाच नैवेद्य दाखवला. तुझी आरती करून साडेबाराला घरच्यांना जेवायला वाढलं. खूप आनंदानी ताईंनी मला हे सांगितलं.

लेकी सुनाच घरच्या लक्ष्मी आहेत ते सर्वांना  फार  पटलं बघ… किती जणींनी पहिल्यांदाच तुझ्यासमोर बसून श्रीसूक्त, देवी अथर्वशीर्ष, नवीन नवीन आरत्या म्हटल्या. तुझी गाणी गायली.. तू  ऐकली  असशीलच  तरीपण सांगते ग आई…

…. बऱ्याच जणी शहाण्या आणि सुज्ञ झाल्या. तू सांगितलं तसंच वागल्या… घरचे पण आनंदित झाले.

हळूहळू  जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत.. सगळ्याजणी…. रूढी, परंपरा, रीती, रिवाज यांचा पगडा मनावर अजून खूप आहे. नव्हे.. त्याचे दडपण  आहे. बदल करताना  मनात अजून  भीती मात्र आहे ग……

… काय होतं आई खरं सांगू का… बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की वाटतं आपण बदल केला म्हणूनच  हे असं झाल. लगेच मनात संशय येतो देवी  किंवा देव आपल्यावर  कोपला तर नसेल…

आमचं कसं आहे.. आमची प्रगती, भरभराट झाली, चांगल्या गोष्टी घडल्या की आम्हाला वाटतं ते आमचं कर्तृत्व….. माझ्यामुळेच ते झालं.. मी कष्ट केले म्हणून ते झालं.. अस आम्ही म्हणतो..

तेव्हा” ही देवाची कृपा “अस क्वचितच म्हणतो….. पण विपरीत काही झालं की आम्ही आपलं देवावर  ढकलून देतो… हे अगदी खरखुर आमच्या मनातल आज तुला सांगते बरं का…

…. पण आता नाही…. आता आम्ही शहाणे होऊ… तू सांगितलं आहेस तसेच वागू…. तसं  तुला आश्वासन देते…. भेटूया आता पुढच्या वर्षी….. पुनरागमनायच…. “ 

.. असं म्हणेपर्यंत डोळे भरून आले होते. घर शांत झालं होतं. त्यांचं येणं आनंदाचं, सुखाचं समाधानचं असतं. घर भारुन टाकणार असतं. इतर कशाचीच आठवण या तीन दिवसात येत नाही. त्याच्याभोवतीच मन फिरत असतं. हे दिवस झटकन  जातात..

…. आता लक्षात येतं… त्यासाठीच गौरी घरी येतात.. मन तृप्त करायला.. भरपूर सुख आनंद द्यायला…

 राहिलेले दिवस त्यांच्या आठवणी काढत  जातात.. सुखदुःख, राग, लोभ, करत  संसार चालूच राहतो……

हात जोडून तिला सांगितलं…… “ गौरीमाय तू अपार सुख देणारी आहेस. तुझा आशीर्वादाचा हात  सदैव आमच्या पाठीवर असू दे. हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. तू  साथीला असलीस की आम्हाला बळ येतं ग माय… “ 

.. तुझ्याच लेकीबाळी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर – लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

परवा मी आणि आशा शिवाजी मंडईत भाजी आणायला गेलो होतो. तो  गणपती उत्सवाचा सहावा दिवस होता. तिथं शिरीष रेळेकर नेहमीप्रमाणे हमखास भेटायचाच. अतिशय शिस्तबद्धपणे आपली ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा शिरीष आज लवकर शटर ओढून लगबगीने कुठं चाललाय म्हणून मी त्याला टोकलं. तर म्हणाला, संजय पाटलांच्या घरी गणपतीचा देखावा बघायला चाललोय, आम्ही सगळे मित्र. !फेसबुक वर त्यांनी टाकलंय ते बघा…

संजय पाटील म्हणजे कसदार लिहिणारा, उत्तम अभिवाचन करणारा, नाटक चळवळीत अतिशय गांभीर्यानं आणि जबाबदारीनं वावरणारा, आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्त होऊन आपल्याला हवंय तसं कलंदर जगणारा आमचा मनस्वी दोस्त! गेली तीन-चार वर्ष तो आणि त्याचा मुलगा सारंग आपल्या घरातल्या गणपतीची आरास खूप वेगळ्या पद्धतीने सजवतात. गेल्या वर्षी त्याने सांगली संस्थानच्या गणपती पंचायतन मंदिराची प्रतिकृती केली होती. त्याच्या आधीच्या वर्षी विठ्ठल आणि तुकाराम हा विषय घेऊन आरास मांडलेली. त्याही आधी कॅमेरा ही संकल्पना घेऊन घरातलं गणपती डेकोरेशन केलेलं. यावेळी नक्कीच काहीतरी खास असणार म्हणून तिथूनच त्याला फोन लावला. म्हटलं, ‘संजयराव सगळा गाव संस्थानच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला… नाहीतर सार्वजनिक मंडळांचे देखावे बघायला झुंडीने जातो हे माहित होतं. पण ही सगळी गर्दी तुझ्या घराकडे का चालली आहे, बाबा!… तुझी परवानगी असली तर आम्ही पण येतो रात्री.’

रात्री चिन्मय पार्कमधल्या त्याच्या घरातल्या हॉलमध्ये दहा बाय सहाच्या अडीच फूट उंचीच्या त्या स्टेजवर अवघी नाट्यपंढरी साकारलेली पाहिली आणि थक्क झालो. तिथं महाराष्ट्राच्या  नाट्य इतिहासातले गाजलेले नऊ रंगमंच दोन टप्प्यात बसवले होते. त्यातील प्रत्येक रंगभूमीवर विष्णुदास भावे यांच्या पहिल्या नाटकाच्या खेळातल्या नांदी पासून मराठी नाटक परंपरेच्या समृद्ध प्रवासात मैलाचा दगड ठरलेल्या नऊ नाटकातले नऊ प्रसंग, त्यातल्या हुबेहूब नेपथ्यासह आणि पात्रांसह मांडलेले होते… आणि हे सगळं प्रत्येकाला नीट समजावं, म्हणून बारा मिनिटांचा एक शो प्रदर्शित होत होता.

सुरुवातीला खोलीत अंधार व्हायचा. आणि फक्त मधला गणपतीची शाडूची मूर्ती असलेला रंगमंच उजळायचा. दीड बाय दोन फुटांच्या त्या बॉक्स मधल्या रंगमंचावर शाडूच्या मूर्तीसमोर संगीत नाटकातली असंख्य पात्रं एकत्रितपणे नांदी म्हणत असलेला प्रसंग डोळ्यासमोर आला. नांदीतील त्या गणेश स्तवनाने क्षणात मन शे-दीडशे  वर्षांची संगीत नाटकांची सफर करून आलं. संजय पाटलांच्या निवेदनातून एकेक गुपित उघड व्हावं तसं एक एक नाटक उलगडायचं… आणि तो रंगमंच उजळून निघायचा. तिथल्या प्रवेशानुसार असलेले संवाद ऐकू यायचे. पहिल्या रंगमंचावरील प्रकाश मंद होत बंद व्हायचा आणि दुसरा ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा. ‘नटसम्राट’मधील दृश्याबरोबरच श्रीराम लागूंचा पल्लेदार आवाज कानावर यायचा. त्या रंगमंचावरील संवाद संपता संपता तिसरा दामोदर हॉल, मुंबईचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा आणि सखाराम बाईंडर मधील निळू फुले बोलू लागायचे. त्यानंतर यशवंत नाट्यमंदिर, मुंबईच्या रंगमंचावर ‘गेला माधव कुणीकडे’ दिसू लागायचं. ऐकू यायचं. ते संपता संपता रवींद्र नाट्य मंदिरचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा… आणि ‘अश्रूंची झाली फुले’मधील काशिनाथ घाणेकर लाल्या होऊन बोलू लागायचे. मग नुकत्याच जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातला पूर्वीचा रंगमंच प्रकाशमान होत श्रीमंत दामोदर पंतांच्या भूमिकेतला भरत जाधव बोलू लागायचा. मग ‘चार चौघी’तला तो जळजळीत डायलॉग कानात शिरत पुण्यातलं बालगंधर्व  नाट्यमंदिर उजळून निघायचं. त्यानंतर पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वाडा चिरेबंदीचा सेट दिसायचा, पात्रं बोलू लागायची. पुढे सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रा. अरुण पाटील दिग्दर्शित ॲमॅच्युअर ड्रामॅटिक असोसिएशनच्या ‘तू वेडा कुंभार’ या व्यंकटेश माडगूळकरांच्या नाटकातील प्रसंग उभा रहायचा. आणि सगळ्यात शेवटी संजय पाटील यांचा सुपुत्र सिनेमॅटोग्राफर, नेपथ्यकार ज्याला नुकतंच एका शॉर्ट फिल्म साठी जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये एका शॉर्ट फिल्मसाठी विशेष अवार्ड मिळालं आहे… अशा सारंग पाटील यांनी केलेल्या व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वाटसरू’ या नभोनाटयाचं नाट्यमंचीय रूपांतर सादर व्हायचं.

हे सगळंच अद्भुत होतं. जणू अवघी नाट्यसृष्टीच त्या एका छोट्याशा स्टेजवर साकार झाली होती. दीड बाय दोन फुटाच्या प्रत्येक रंगमंचावरची पात्र, त्या पात्रांच्या प्रमाणात असलेल्या रंगमंचावरील

 नेपथ्यामधील वस्तू, इमारतींचे भाग… सगळंच अद्भुत! लहानपणी आपण किल्ले करत आलो, त्या किल्ल्यांच्या पलीकडले खूप    ॲडव्हान्स्ड, प्रगत असं रूप म्हणजे संजय पाटलांच्या घरात गणपतीच्या आराशीतून काळाच्या पडद्याआड गेलेला पण मिनीएचर सारख्या एका लघु रंगमंचावर प्रसन्नपणे आविष्कृत होणारे ते नऊ देखावे. जणू एखाद्या व्यापारी पेठेतील प्रमुख रस्त्यावरच्या, भव्य-दिव्य सार्वजनिक गणपती मंडळाचा देखावाच त्या दहा बाय सहा च्या घरगुती स्टेजवर साकार झाला होता. संकल्पक सारंग पाटील, नेपथ्यातील वस्तू तयार करणारा त्याचा मित्र आकाश सुतार, स्टेज  तयार करणारा राजू बाबर, प्रकाशयोजना करणारा कौशिक खरे आणि सारंग चे आई वडील म्हणजेच संजय पाटील आणि सौ. जाई पाटील हे हौशी आणि प्रयोगशील दांपत्य या सर्वांनीच हा गणपती उत्सव आजच्या घडीला कसा साजरा करायला हवा याचा एक नवा आदर्श धडाच समाजाला घालून दिला आहे… आज  गोंगाटात उद्देश हरवून बसलेल्या, विकृतीकडे झुकलेल्या, उत्सवांच्या बदलत्या स्वरूपातून बाहेर पडून तुमच्या आमच्यासारख्यांना दाखवलेला आशेचा समृद्ध असा नवा किरण आहे. त्याबद्दल पाटील परिवाराचे खूप खूप आभार!

लेखक – श्री महेश कराडकर

प्रस्तुती : श्री अमोल केळकर 

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.in,

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

kelkaramol.blogspot.com 

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्यात नवीन निनावी व्हायरस – लेखिका – सुश्री प्रिया माळी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यात नवीन निनावी व्हायरस – लेखिका – सुश्री प्रिया माळी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

हा प्रसंग माझ्या घरातच घडला आहे. सोमवार दि. 29/7/2024 रोजी सकाळी 8. 00 वाजताच माझ्या आईचा फोन आला. मला कसे तरी होत आहे. मी लगेच चिंचवडवरून आईला पुण्यात आणले. डायरेक्ट जहांगीर हाॅस्पीटल गाठले. वरवर पहाता आईला विशेष काही झाल्याचे जाणवत नव्हते. डाॅक्टरांनी जुजबी औषधे दिली. आता 29, 30, 31 जुलै त्या औषधांवर उपचार चालू होते. पण या काळात  खाल्लेले अजिबात पचत नव्हते अगदी औषधेही पचत नव्हती. शुगर व डायबेटीसच्या गोळ्या अख्ख्याच्या अख्खया उल्टीवाटे बाहेर पडत होत्या. परत 1 ऑगस्टला जहांगीर हाॅस्पिटल गाठले. हाॅस्पीटलमध्ये अक्षरश पाय ठेवायलाही जागा नव्हती. रूम शिल्लक नाही, डे केअर काॅट शिल्लक नाही….

सगळ्यात विदारक परिस्थिती म्हणजे आठ दिवसांपुर्वी बायपास झालेल्या एका रूग्णाला घेऊन त्यांचे नातेवाईक आले होते. पण त्या पेशंटसाठीही बेड शिल्लक नव्हता. त्यालाही हाॅस्पीटल ॲडमिट करून घेत नव्हते. त्यामानाने आमची केस वरवर फार सोपीच वाटत होती. डाॅक्टरांनी आम्हाला सांगितले तुमचा पेशंट दुसरीकडे कुठेही न्या. आम्ही इथे औषध उपचार करणार नाही…

आता ओळखीने कोणत्या हाॅस्पीटलमध्ये बेड शिल्लक आहे का हे पहाणे सुरू झाले. रूबी, मंगेशकर, पुना हाॅस्पीटल, जोशी कुठेच बेड शिल्लक नाही. शेवटी काॅरपोरेशनचे एक डाॅक्टर त्यांच्या ओळखीने वडगाव शेरी येथील सिटी केअर मध्ये ॲडमिट करता येईल असे कळाले….

तो पर्यंत केस हातातून निसटत चालली होती. आईची शुध्द हरपली. ॲम्ब्युलन्सला बोलावूनही ॲम्ब्युलन्स आलीच नाही. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. शेवटी मलाच गाडी काढून हाॅस्पीटलपर्यंत आईला न्यावे लागले. आय. सी. यू. त दाखल करावे लागले. तिथे एम. आर. आय. व इतर टेस्टची सोय नाही मग डाॅक्टरच्या चिठ्ठ्या घेत आमची यात्रा सुरू झाली. मोठ मोठे हाॅस्पीटल पण पेशंट आपल्या दवाखान्यात येत आहे हे नुसते बघणारा स्टाफ. शेवटी एकेकाला कामाला लावत सगळ्या टेस्ट पुर्ण केल्या. कशातच काही आढळले नाही. परत आय. सी. यू. सलाईन N. S इत्यादी सोपस्कार चालूच होते. रात्रंदिवस आम्ही दवाखान्यात थांबलेलो. काय झाले  हे कळत नव्हते. थोडे फार सोडियम कमी झाले होते पण त्याने मेंदूवर अटॅक झाला होता. लोक ओळखण्यात अडचण येत होती. रात्र दिवस कळत नव्हते, खाण्या पिण्याचे भान नव्हते. जेवायला दिले तरी आत्ताच तर जेवले ना मी असे सांगत आई चालढकल करू लागली. नंतर नंतर बोलणेही दुरापास्त झाले. दवाखान्यात आजूबाजूला पाहिले तर असेच सगळे पेशंट. सत्तरच्या पुढचे सगळे. उलट्या व विस्मरणाने हैराण पेशंट…..

डाॅक्टरांना खोदून खोदून विचारल्यावर व्हायरल आहे एवढीच माहिती देत होते. पण व्हायरस unknown आहे हे सांगत होते. एवढ्यात….

दोन पेशंट दगावले व ओळखीमधले दोन जण दगावले. आता डाॅक्टरही अंदाजाने औषधे म्हणजे फक्त सलाईन व सोडियम सलाईन लावत होते. एका हाताला एकाच वेळेला दोन बाटल्या या प्रमाणे दोन हातांना चार बाटल्या चालू होत्या. नंतर तर पायातूनही सलाईन चालू केले. बरेच सलाईन कॅथेटरमार्फत युरिनवाटे बाहेरच पडत होते. आता कोणत्याच टेस्ट शिल्लक राहिल्या नव्हत्या.

आता अधून मधून शुध्दीवर आल्यावर आईचा घोषा सुरू झाला तुझ्या घरी मला ने. मी तुझ्या पाया पडते अशी विनवणी सुरू झाली. शेवटचा उपाय म्हणून काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले तू चालल्याशिवाय डाॅक्टर  घरी सोडणार नाही म्हणाले आहेत. त्यासाठी तुला थोडे खावे लागेल हे सांगितल्यावर जिवाच्या निकराने आईने नारळपाणी एकदाचे संपवले आणि दोन तासांनी पाच सहा पावले एकदाची चालली. हट्टाने घरी आली. येताना मणिपाल हाॅस्पिटलमध्ये न्युरोसर्जनची अपाॅईंमेंट घेतली. तिथेही सगळे ओ के च रिपोर्ट आले. एकदाचे घरी आल्यावर एक दोन दिवसात एकदम ओ के झाली. आत्ता बरी आहे. पण…..

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजही डाॅक्टर खाजगीत हेच सांगत आहेत की  हा unknown virus आहे. यावर अजून तरी औषध नाही. सलाईन हाच मार्ग अवलंबावा लागत आहे. तसेच यापुढे गौरी गणपती व इतर सणांच्या काळात ह्या व्हायरसचे संक्रमण वाढणार आहे. पण सरकारी यंत्रणेने जी घोषणा करणे आवश्यक आहे ती केली जात नाही. तरी…….

सगळ्यांनी मास्क लावा, अनावश्यक गर्दीत जाणे टाळा. अंगावर दुखणे काढू नका. हे माझे नाही तर डाॅक्टरांचे सांगणे आहे. फक्त हे सांगणे खाजगीत बोलले जाते हे लक्षात घ्या….    

लेखिका : सुश्री प्रिया माळी

पुणे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्ण — एक विचार… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

कृष्ण — एक विचार… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

हे नाथ नारायण वासुदेव

कृष्ण नामाचा हा जप मुखाने गात राहिले की भरकटलेल्या मनाला एकदम उभारी येते असा माझा नित्याचा अनुभव आहे. का बरे असे होत असावे? याचे उत्तर एकच!

कृष्ण ही एक अद्भुत शक्ती आहे, आत्मतत्त्व आहे, परब्रह्म आहे.

 परित्राणाय साधुनाम्

 विनाशायाच दुष्कृताम्

 धर्मसंस्थार्पनार्थाय संभवामि युगे युगे

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी पार्थ अर्जुनास असे वचन दिले आहे. संत जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी मी युगानुयुगे येतच राहणार, अवतार घेतच राहणार.

बंदीवासात टाकलेल्या देवकीची एकापाठोपाठ एक सात मुले तिच्या भावाने, कंसाने मारल्यानंतर या कंस मामाचा, या दुष्ट शक्तीचा विनाश करण्यासाठी आठव्या कृष्णाचा जन्म झाला. श्रावण वद्य अष्टमी, मुसळधार पावसाने या बाळकृष्णाचे स्वागत केले. याच वेळी गोकुळात नंद आणि यशोदेस कन्यारत्न प्राप्त झाले. वसुदेवाने या आठव्या बाळाला वाचविण्यासाठी टोपलीत घालून भर पावसात पूर आलेल्या यमुना नदीतून गोकुळात नेले. बाळाच्या पावलाच्या अंगठ्याचा पाण्याला स्पर्श होताच यमुना नदी दुभंगली आणि रस्ता तयार झाला. यशोदेच्या पुढ्यातील कन्या, नंदा हिला घेऊन वसुदेव परत येऊन दाखल झाला. कंस त्या बाळाला आपटून मारणार एवढ्यात त्या बालिकेचे विजेत रुपांतर झाले आणि कडकडून आकाशवाणी झाली, ” हे कंसा! तुझा काळ गोकुळात वाढत आहे. ” ही कथा आपण सर्वजण जाणतो. सांगायचा मुद्दा हा की ही किमया त्या ईश्वरी शक्तीचीच आहे. कृष्णाचीच आहे. देवकीच्या उदरी जन्माला आलेले हे बाळ सामान्य नसून दैवी आहे.

आपण म्हणतो,…..

 कुठे शोधिसी रामेश्वर अन्

 कुठे शोधिसी काशी

 हृदयातील भगवंत राहिला

 हृदयातून उपाशी

भगवंत आपल्या हृदयात आहे असे समजूनही, मान्य करूनही हृदयस्थ परमेश्वराची पूजा करणे आपल्याला जमत नाही. यासाठीच या भगवंताची विविध सगुण रूपे आपण समोर ठेवतो आणि त्याची भक्ती भावाने पूजा करतो. या हृदयातील भगवंताला आपण कधी बाळकृष्णाच्या रूपात पाहतो. ते बाळ लेणी घातलेले गोड गोंडस रूप पाहून मन प्रसन्न होते. गोपाळांसंगे गाई चरायला नेणारा, दह्यादुधाची मडकी फोडून चोरून नवनीत खाणारा, उपरांत मैया मै नही माखन खायो असे म्हणणारा, कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण आपण पाहतो आणि उल्हसित होतो.

राधेचा कृष्ण, मीरेचा कृष्ण, यमुनाजळी गोपींसंगे रासक्रीडा करणारा कृष्ण, गोपींची वस्त्रे पळवणारा कृष्ण आणि बासरीच्या सुराने आसमंत धुंद करणारा मुरलीधर कृष्ण, कोसळणाऱ्या पावसापासून नगरजनांचे रक्षण करणारा गोवर्धन गिरीधारी कृष्ण आणि बंदीवासातील सोळासहस्त्र स्त्रियांचा उद्धारक कृष्ण अशी कृष्णाची विविध रूपे आपण पाहतो आणि हरखून जातो. सत्यभामेच्या अंगणात पारिजातकाचे झाड लावून त्याच्या सुगंधित फुलांचा सडा रुक्मिणीच्या महालात पडावा अशी किमया करून एकाच वेळी दोन्ही राण्यांना

संतुष्ट करणाऱ्या कृष्णाला काय म्हणावे? या कृष्णाच्या लीलाच अगम्य! खरं सांगायचं तर हे तत्त्वच अत्यंत दुर्बोध आहे.

दुर्योधनाचा अत्याचार थांबविण्यासाठी पांडवांच्या पाठी उभा असलेला कृष्ण तर संपूर्ण वेगळा. दुर्योधनाला शस्त्रास्त्रे पुरवून हा श्रीकृष्ण जातीने पांडवांसोबत उभा राहिला. या द्वारकेच्या राण्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले.

कुरुक्षेत्रावर मध्यभागी रथ उभा केल्यानंतर आपल्याच भाऊ बंधाना, पितामह भीष्मांना, गुरु द्रोणाचार्यांना समोर पाहून अर्जुन संभ्रमित झाला, आणि मी यांना कसे मारावे? त्यापेक्षा भिक्षान्न सेवन करणे मी पसंत करेन असा विचार अर्जुनाच्या मनात आल्यावर त्याला गीता सांगणारा कृष्ण कोण होता? कृष्ण हा परमोच्च कोटीचा विचार! मारणारा तू कोण? या ठिकाणी गीतेच्या उपदेशाचा प्रारंभ होतो. शरीर आणि शरीरी यातील फरक श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला. शरीर हे विनाशी आहे तर शरीरी अविनाशी आहे. तेव्हा समोर असलेल्या या शरीरांचा नाश ठरलेलाच आहे. तुझे काम फक्त विहित कर्म करण्याचेच आहे.

 अविनाशी तु तत्विद्धी ये न सर्वमिदं ततम्

 विनाशमव्यव्स्याय कश्चितकर्तुमर्हति 

 त्या अविनाशी तत्वाला समजून घे. संपूर्ण संसार याच तत्त्वाने व्यापलेला आहे. या तत्त्वाचा कोणीच विनाश करू शकणार नाही हे फार मोठे सत्य श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि पर्यायाने आपल्यालाही सांगितले आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन अर्थात कर्तव्य कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, त्यापासून मिळणाऱ्या फळात नाही. कर्म फळाचा हेतू कधीही मनात आणू नकोस, या अशा उपदेशाने आपल्या सामन्यांनाही कृष्णाने जागृत केले आहे.

गीतेच्या अकराव्या अध्यायात श्रीकृष्णाने पार्थास विश्वरूप दर्शन दिले. ते पाहून पार्थ भयभीत झाला. यातून इतकेच समजायचे की जनतेच्या रक्षणासाठी संपूर्ण विश्वात, चराचरात हे कृष्णतत्व सामावलेले आहे.

कृष्ण हे एक सत्य आहे. सत्य हे अखंड आणि अविनाशी आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात…

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ

श्रीकृष्णाने हे तत्व आचरणात आणले. रामाला राज्याभिषेक आणि वनवास सारखाच होता. सोन्याची द्वारका आणि त्याचा विनाश हे सारखेच होते. उद्धवाला त्याने सांगितले होते की मी भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्व काळात एकाच स्वरूपात असतो हे सत्य आहे. काम, क्रोध, लोभ यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्यामुळे तो कायम आनंद रूपच आहे.

अशा या सत्याची, परब्रम्हाची निष्काम भक्ती केल्याने भगवंताची प्रत्यक्ष भेट होणे सहज शक्य आहे. अखंड नामजप हे या भक्तीचे अत्यंत समर्थ असे साधन आहे. चला गाऊया

 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

 हे नाथ नारायण वासुदेव

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।। पुनरागमनायच ।। ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ ।। पुनरागमनायच ।। ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

श्रावण मास कसा सरला ते कळलंच नाही. व्रतवैकल्ये, श्रावणाची रिमझिम, हवं हवेस वाटणार सोनेरी कोवळ उन ! हवेत गारवा ठेवत. भाद्रपद मास आलाच ! 

दोन चार दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाची गोड चाहूल होतीच ! त्याची तयारी पण चालू झाली. गणेश मूर्ती ठरवण्यासाठी कुंभार वाड्यात नेहमीप्रमाणे हेलपाटे. पण आनंदाचे ! मूर्तिकाराला अनेक सूचना, रंगसंगतीचा सल्ला ! तो पण हो दादा हो ! अगदी सालाबादप्रमाणेच, तुमचा बाप्पा सजवून तुम्हाला सुपुर्द करतो ! काळजी सोडाच ! सकाळी लवकरच येणार ना. बाप्पाला न्यायला ! 

होय महादू नक्कीच लवकर येणार, नन्तर मग गर्दी खूप वाढते. महादू कुंभार हा अख्या गावातील एकमेव मूर्तिकार ! पण अव्वल दर्जाचा कलाकार. दादांचा स्वभाव त्याला माहित होताच ! गणेशोत्सव व गणपती बाप्पाची मूर्ती ह्यात प्रत्येकाच भाव विश्व गुंतलेलं असतच ! 

आले आले म्हणत, बाप्पा वाजत गाजत आले.

घरोघरी बाप्पा विराजमान पण झाले. त्यापूर्वीच आरास, सजावट मखर आणि घरातील पण रंग रंगोटी झालेली ! रोज नवीन पक्वान्न, आरत्या, मंत्रपुष्पांजलीची चढाओढ रात्री चक्री भजन. दिवसभर फटाक्यांची आतषबाजी ! गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौराई आणि गणेश भोजन उर्फ मोठा नैवेद्य. हो त्याच दिवशी राधा अष्टमी चा योग असतो.

त्यातच श्रावण मासात राहिलेली सत्यनारायण पूजा.

दिवस कसे सरले ते कुणालाही कळलं नाहीच !

आणि तो दिवस येऊन ठेपला ! नको नकोसा वाटणारा ! 

आज अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पा येऊन दहा दिवस कसे सरले ते कळलंच नाही. ह्या दहा दिवसांत घर कस भरभरून गेल्याच जाणवत होतं. वर्षातील अपूर्वाई तर होतीच. रोज नवविध पक्वान्न, पूजा, आरती, मंत्रपुष्पांजली, कस सगळं साग्र संगीत चाललं होतं. आज शेवटचा दिवस, मनाला हुरहूर लागली होतीच. आज गणपती बाप्पाच विसर्जनकाल येऊन ठेपला होता. गुरुजींची वाट बघत दादा उभे होते.

गुरुजी लवकर येउ नयेत अस वाटत होतं.

 जरा अंमळ चार वाजताच गुरुजी आले, घरी पण सर्व तयारी झाली होतीच, गुरुजी नी गडबड केली, चला अजुनी वरच्या आळीत जायचं आहे.

 तस दादांनी मुकटा सोहळ नेसल व बाप्पाची आता बाप्पासमोर आरती करण्यासाठी उभा ठाकले आरत्या झाल्या, मंत्रपुष्पांजली झाली. पंच खाद्य तसेच दहीभात पाट वड्या, कडबोळी इत्यादी प्रसादाचा नैवेद्य झाला.

 गुरुजींनी अक्षता हातात घेतल्या 

 ।।”यांतु देवागणांनाम सकळ पुर्वमादाय 

 इच्छित कामना सिद्धर्थम

 पुनरागमनायच ” ।।

 अस मंत्र म्हणुन अक्षता “श्री मुर्ती “वर टाकल्या तस डोळ्यात टचकन पाणी आलं, सर्वांचे डोळे ओले झाले, पाट रिकामा होणार, केलेला थाट आरास निर्माल्यागत होणार. घर ओकबोक वाटु लागणार होतं पण नाइलाज होता.

 मंडळी वर्षातुन एकदा बाप्पा येणार दहा दिवस राहणार, कोड कौतुक करून घेणार व बघता बघता दहा दिवस कसे निघुन गेले ते कळतच नव्हते. दहा दिवसांत घर कस भरलेलं वाटत होतं, रोज नवीन पक्वान्न, नैवेद्य आरती, मंत्रपुष्पांजली जागर इत्यादी गोष्टींची रेलचेल. जगण्याचा एक एक क्षण सोहळाच! शिकवत होता.

बघा मंडळी जे जे पार्थिव आहे ते ते विसर्जित होण्यासाठीच!! मग बाप्पा असो वा तुम्हींअम्ही, सकळ पशु पक्षी, चराचर पार्थिव च की ! पार्थिव म्हणजे काय ? 

तर जे जे पंचभुताने निर्मित ते ते सर्व पार्थिव. ह्या नियमात सर्व सजीव श्रुष्टी आलीचकी म्हणजे एक ना एक दिवस आपलं पार्थिव शरीर सोडुन आपणास पण गेले पाहिजेच ! 

विसर्जन आपलं पण होणारच हे त्रिकालाबाधित सत्य ! बाप्पाचं अनंत चतुर्दशी ही तिथी ठरलेली आहे. तस तुमची आमची तिथी ठरलेली नाही ! ते सर्व बाप्पाच्या हातात !

एक ना एक दिवस आपल्याला विसर्जित व्हावं लागणार ! श्रुष्टी नियमच आहे तो. जुनी पान गळुन पडणार नवीन पालवी येणार, जसा वसंत ऋतु येतो तसाच ग्रीष्मही येतो

हीच निसर्गाची ख्याती आहे. 

पान फुल फळ मोहर काही झाड, याना पण विसर्जित व्हावं लागतच की, विविधरंगी फुल उमलतात, विविध गंध ते देतात, फळात रूपांतर झाले की आपलं अस्तीत्व ते फळात ठेऊन बाजुला होतात. नवीन रोप त्याच बहरण, त्याच अस्तीत्व, वयात आलं की कळी ते फुल, फुल ते निर्माल्य त्याचा गंध शेवटी मातीत पार्थिव रुपात विसर्जित होतो. हेच तर श्रुष्टी चक्र आहे, मग गणपती असो व इतर तुम्ही आम्ही सजीव ! 

हो पण गम्मत अशी आहे की, मन व आत्मा हे अविनाशी, ते परत सृष्टीत अनेक रुपात पुनर्जन्म घेतात च की !

गीतेत श्रीकृष्ण म्हणतात

 “पुनरपि जननं पुनरपि मरण म ।

पुनरपि जननी जठरे शयनम”।।

 याचाच अर्थ “

।।” इच्छीत कामांना सिद्धर्थम पुनरागमना यच ” ।।

पार्थिवं शरीर जन्म घेणे व परत मरणे व परत पुनर्जन्म घेणे ! हाच सृष्टी चक्राचा नियम मग तो कोणी ही असो. तुम्हाला आम्हाला चुकलेल नाही, हेच गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्याने बाप्पाला सांगायचं असत ! अस नाही का वाटत तुम्हाला ? 

 

म्हणूनच मला ह्या तत्वावर काव्य सुचलं ते तुम्हाला कस वाटलं, विचार योग्य आहेत का ते जरूर कळवा..

☆ विश्व चक्र ☆

असेन मी नसेन मी 

सुगंध जतन करेन मी

कोण मी कोण तु ? 

फुल मी पान तु 

बहरू सदैव चराचरी

 

निर्माल्य मी निर्माल्य तु

येता ग्रीष्म हा ऋतु

मिसळु चैतन्य नवे

होऊन माती श्रांत तु

 

थेंब थेंब बरसता

नवं संजीवनी वर्षा ऋतु

फुटून येऊ पानोपानी

फळ मी पान तु

 

सृजनशील गीत गात

नवजन्माने मग परतु

असेन मी असशील तू

सुगंध कुपी देशील तू

 “पुनरागमनायच”

… हाच संदेश आपल्याला बाप्पाकडुन घ्यायचा आहे 

अस नाही का वाटत तुम्हाला ! 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ११ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ११ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

श्रावण

श्रावण आणि बालपण यांचं अतूट नातं आजही माझ्या मनात मी जपलेलं आहे. आम्ही एका गल्लीत राहत होतो. ज्या गल्लीत एकमेकांना चिकटून समोरासमोर घरं होती आणि तो असा भाग होता की एकमेकांना लागून आजूबाजूलाही अनेक लहान मोठ्या गल्ल्याच होत्या. कुठल्याही प्रकारचं सृष्टी सौंदर्याचं वातावरण तेथे नव्हतंच म्हणजे श्रावणातली हिरवा शालू नेसलेली अलंकृत नववधूच्या रूपातली धरा, श्रावणातलं ते पाचूच बन, मयूर नृत्य असं काही दृश्य आमच्या आसपासही नव्हतं. फारतर कोपर्‍यावरच्या घटाण्यावर हिरवं गवत मोकाट वाढलेलं असायचं. आमच्या घराच्या मागच्या गॅलरीतून खूप दूरवर धूसर अशी डोंगरांची रांग दिसायची आणि वर्षा ऋतूत त्या डोंगरावर उतरलेलं सावळं आभाळ जाणवायचं.

श्रावणातल्या ऊन पावसाच्या वेळी आकाशात उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य मात्र आम्ही डोळा भरून पाहायचो. लहानपणी आम्हाला श्रावण भेटायचा तो तोंडपाठ केलेल्या बालकवी, बा. भ. बोरकर, पाडगावकर यांच्या कवितांतून. नाही म्हणायला काही घरांच्या खिडकीच्या पडदीवर कुंडीत, किंवा डालडाच्या पत्र्याच्या डब्यात हौशीने लावलेली झाडं असायची. त्यात विशेष करून झिपरी, झेंडू, सदाफुली, तुळस, कोरफड, मायाळू क्वचित कुणाकडे गावठी गुलाबाच्या झाडावर गुलाब फुललेले असायचे. गल्लीतलं सारं सृष्टी सौंदर्य हे अशा खिडकीत, ओसरीवर पसरलेलं असायचं. ज्या घरांना परसदार होतं त्या परसदारी अळूची पानं, कर्दळ, गवती चहाची हिरवळ जोपासलेली असायची पण मुल्हेरकरांच्या परसदारी मात्र मोठं सोनचाफ्याचं झाड होतं ते मात्र श्रावणात नखशिखान्त बहरायचं त्या सोनचाफ्याचा सुगंध सर्वत्र गल्लीत दरवळयचा. या दरवळणाऱ्या सुगंधात आमचा श्रावण अडकलेला असायचा. या सुवर्ण चंपकाच्या सुगंधात आजही मला बालपणीचा श्रावण कडकडून भेटतो.

श्रावणातील रेशीमधारात मात्र आम्ही सवंगडी मनसोक्त भिजलोय. “ये ग ये ग सरी माझे मडके भरी” नाहीतर “येरे येरे पावसा तुला देतो पैसा ” ही धम्माल बडबड गीतं पावसाच्या थेंबांना ओंजळीत घेऊन उड्या मारत गायली आहेत. गल्लीतले रस्तेही तेव्हा मातीचे होते. पावसात नुसता चिखलच व्हायचा. चिखलाचं पाणी अंगावर उडायचं. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतानाचा तो बालानंद अनुभवला. श्रावणातली हिरवळ आमच्या मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यात अशा रितीने बहरायची. आमच्या मनातला श्रावणच पाचूचं बन होऊन उतरायचा. एकीकडे ऊन आणि एकीकडे पाऊस.. “आला रे आला पाऊस नागडा” करत मस्त भिजायचे.
संस्कार, परंपरा, त्यातली धार्मिकता, श्रद्धा, त्यामागचं विज्ञान, हवामान, ऋतुमान, विचारधारा या सर्वांचा विचार करण्याचं आमचं वयच नव्हतं. श्रावणातले सगळे विधी, सण सोहळे, पूजाअर्चा, व्रतं, उपवास हे आमच्यासाठी केवळ आनंदाचे संकेत होते आणि गल्लीत प्रत्येकाच्या घरी कमी अधिक प्रमाणात ते साजरे व्हायचेच.

माझे वडील निरीश्वरवादी होते असं मी कधीच म्हणणार नाही पण आमच्या कुटुंबात काही साजरं करण्यामागे कुठलाही कर्मठपणा नसायचा, सक्ती नसायची पण श्रावण महिना आणि त्यात येणारे बहुतेक सर्व सण आमच्या घरात आनंदाने साजरे व्हायचे. आज हे सगळं आठवत असताना माझ्या मनात विचार येतो की अत्यंत लिबरल, मुक्त विचारांच्या कुटुंबात, कुठल्याही कठीण नियमांना बिनदिक्कत, जमेल त्याप्रमाणे अथवा सोयीप्रमाणे फाटे फोडू शकणाऱ्या आमच्या कुटुंबात श्रावण महिन्याचं त्या अनुषंगाने येणाऱ्या रितीभातींचं उत्साहात स्वागत असायचं आणि या पाठीमागे आता जाणवते की त्यामागे होतं पप्पांचं प्रचंड निसर्ग प्रेम ! निसर्गातल्या सौंदर्याचा रसिकतेने घेतलेला आस्वाद आणि जीवन वाहतं रहावं म्हणून केलेला तो एक कृतीपट होता. धार्मिकतेचं एक निराळं तत्त्व, श्रद्धेच्या पाठीमागे असलेला एक निराळा अर्थ आमच्या मनावर कळत नकळत याद्वारे बिंबवला गेला असेल आणि म्हणूनच आम्ही परंपरेत अडकलो नाही पण परंपरेच्या साजरेपणात नक्कीच रमलो. तेव्हाही आणि आताही.

श्रावण महिन्यात घरी आणलेला तो हिरवागार भाजीपाला.. त्या रानभाज्या, ती रानफळे, हिरवीगार कर्टुली, शेवळं, भुईफोडं, मेणी काकडी, पांढरे जाम, बटाट्यासारखी दिसणारी अळू नावाची वेगळ्याच चवीची, जिभेला झणझणी आणणारी पण तरीही खावीशी वाटणारी अशी फळे, राजेळी केळी, केवड्याचे तुरे या साऱ्यांचा घरभर एक मिश्र सुगंध भरलेला असायचा. तो सुगंध आजही माझ्या गात्रांत पांघरलेला आहे.

श्रावण महिन्यातले उत्सुकतेचे वार म्हणजे श्रावणी शनिवार आणि श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारी शाळा ही अर्धा दिवस असायची. सकाळच्या सत्रात उपास म्हणून चविष्ट, खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, लिंबू पिळलेली साबुदाण्याची खिचडी आणि संध्याकाळचे सूर्यास्ताच्या थोडं आधी केलेलं भोजन. शनिवारचा आणि सोमवारचा जेवणाचा मेनूही ठरलेला असायचा. सोवळ्यात चारी ठाव स्वयंपाक रांधायचा. त्या स्वयंपाकासाठी आईने आणि आजीने घेतलेली मेहनत, धावपळ आता जाणवते.

शनिवारी वालाचं बिरडं, अळूच्या वड्या, पंचामृत, अजिबात मीठ न घालता केलेली पिवळ्या रंगाची मूग डाळीची आळणी खिचडी आणि पांढरे शुभ्र पाकळीदार ओल्या नारळाच्या चवीचे गरमागरम मोदक, शिवाय लोणचं, पापड, काकडीची पचडी हे डाव्या बाजूचे पदार्थ असायचे आणि त्या दिवशीचं वैशिष्ट्य म्हणजे हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेला हा पाकशृंगार. सभोवती रांगोळी आणि मधल्या घरात ओळीने पाट मांडून त्यावर बसून केलेलं ते सुग्रास भोजन! पप्पाही ऑफिसमधून लवकर घरी यायचे. ते आले की आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो, उदबत्तीच्या सुगंधात आणि वदनी कवळ घेताच्या प्रार्थनेत आमचं भोजन सुरू व्हायचं. आई आणि जीजी भरभरून वाढायच्या. त्या वाढण्यात भरभरून माया असायची. तसं आमचं घर काही फार मोठं नव्हतं पण झेंडूच्या फुलांनी सजलेला देव्हारा आणि भिंतीवर आणि चुलीमागे तांदळाच्या ओल्या पीठाने काढलेल्या चित्रांनी आमचं घर मंदिर व्हायचं. पप्पा आम्हाला जेवताना सुरस कहाण्या सांगायचे. एका आनंददायी वातावरणात जठर आणि मन दोन्ही तृप्त व्हायचं.

श्रावणी सोमवारही असाच सुगंधी आणि रुचकर असायचा. त्यादिवशी हमखास भिजवून सोललेल्या मुगाचे बिर्ड असायचे. नारळाच्या दुधात गूळ घालून गरमागरम तांदळाच्या शेवया खायच्या, कधीकधी नारळ घालून केलेली साजूक तुपातली भरली केळी असायची आणि त्या दिवशी जेवणासाठी केळीच्या पानाऐवजी दिंडीचं मोठं हिरवगार, गोलाकार पान असायचं. या हिरव्या पानात आमचा श्रावण आणि श्रावण मासातल्या त्या पारंपरिक पदार्थांचा सुगंध भरलेला असायचा. विविध पदार्थांचा आणि विविध फुलांचा सुगंध ! आणि या सगळ्या उत्सवा मागे कसली सक्ती नव्हती, परंपरेचं दडपण नव्हतं.. मनानं आतून काहीतरी सांगितलेलं असायचं म्हणून त्याचं हे उत्साही रूप असायचं. आमच्या जडण घडणीच्या काळात या परंपरेने आम्हाला जगण्यातला आनंद कसा टिकवावा हे मात्र नक्कीच शिकवलं. या इथे मला आताही— आमच्या वेळेचं आणि आत्ताचं— कालच आणि आजचं याची कुठेही तुलना करायची नाही. फक्त या आज मध्ये माझ्या कालच्या आनंददायी आठवणी दडलेल्या आहेत हे मात्र नक्की.

नागपंचमीला गल्लीत गारुडी टोपलीत नाग घेऊन यायचा. आम्ही सगळी मुलं त्या भोवती गोळा व्हायचो. गारुडीने पुंगी वाजवली की टोपलीतून नाग फणा काढून बाहेर यायचा. छान डोलायचा. मध्येच गारुडी त्याच्या फण्यावर टपली मारायचा. गल्लीतल्या आयाबाया नागाची पूजा करायच्या. एकाच वेळी मला भीती आणि त्या गारुड्याचं खूपच कौतुक वाटायचं.

जन्माष्टमीला आई देव्हाऱ्यातला एक लहानसा चांदीचा पाळणा सजवायची आणि त्यात सॅटीनच्या पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची वस्त्रं घातलेला लंगडा बाळकृष्ण ठेवायची. यथार्थ पूजा झाल्यानंतर आई सोबत आम्ही,

श्रावण अष्टमीला देवकी पोटी
आठवा पुत्र जन्माला आला
छकुला सोनुला तो नंदलाला
जो बाळा जो जो जो जो रे कृष्णा…

असे गीतही म्हणायचो. त्यानंतर लोणी, दहीपोह्याचा, डाळिंबाचे लाल दाणे पेरून केलेला सुंदर दिसणारा आणि असणाराही प्रसाद मनसोक्त खायचा. एखाद्या जन्माष्टमीला आम्ही कुणाकडे होणाऱ्या संगीत मैफलीलाही हजर राहिलो आहोत. रात्रभर जागरण करून ऐकलेलं ते भारतीय शास्त्रीय संगीत कळत नसलं तरी कानांना गोड वाटायचं. ताई आणि पप्पा मात्र या मैफलीत मनापासून रंगून जायचे.

मंगळागौरीच्या खेळांची मजा तर औरच असायची. कुणाच्या मावशीची, मोठ्या बहिणीची अथवा नात्यातल्या कुणाची मंगळागौर असायची. फुलापानात सजवलेली गौर, शंकराची बनवलेली पिंडी, दाखवलेला नैवेद्य, सारंच इतकं साजीरं वाटायचं !
नाच ग घुमा कशी मी नाचू
अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई
एक लिंबं झेलू बाई 

अशा प्रकारची अनेक लोकगीतं आणि झिम्मा, फुगड्या, बस फुगड्या, जातं, गाठोडं असे कितीतरी खेळ रात्रभर चालायचे. मंगळागौरीच्या आरतीने समारोप झाला की झोपाळलेले डोळे घेऊन पहाटेच्या अंधारात घरी परतायचे. या साऱ्यांमध्ये एक महान आनंद काठोकाठ भरलेला होता.

दहीकाल्याच्या दिवशी टेंभी नाक्यावरची सावंतांची उंच टांगलेली दहीहंडी बघायला आमचा सारा घोळका पावसात भिजत जायचा. यावर्षी कोण हंडी फोडणार ही उत्सुकता तेव्हाही असायची पण पैसा आणि राजकारण याचा स्पर्श मात्र तेव्हा झालेला नव्हता.

राखी पौर्णिमेला तर मज्जाच यायची. बहीण भावांचा हा प्रेमळ सण आम्ही घरोघरी पहायचो पण आम्हाला भाऊ नाही याची खंत वाटू नये म्हणून स्टेशनरोडवर राहणारी आमची आते भावंडं आवर्जून आमच्या घरी राखी बांधून घ्यायला येत. गल्लीतल्याच आमच्या मित्रांनाही आम्ही राख्या बांधलेल्या आहेत. मी तर हट्टाने पप्पांनाच राखी बांधायची. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणूनच ना राखी बांधायची मग आमच्या जीवनात आमचं रक्षण करणारे आमचे बलदंड वडीलच नव्हते का? त्या अर्थाने ते दीर्घायुषी व्हावेत म्हणून मी त्यांना राखी बांधायची. माझ्यासाठी मी रक्षाबंधनाला दिलेला हा एक नवीन अर्थ होता असे समजावे वाटल्यास.. याच नारळी पौर्णिमेला आम्ही सारे जण कळव्याच्या खाडीवर जायचो. खाडीला पूर आलेला असायचा. समस्त कोळी समाज तिकडे जमलेला असायचा. घट्ट गुडघ्यापर्यंत नेसलेलं रंगीत लुगडं, अंगभर सोन्याचे दागिने आणि केसात माळलेला केवडा घालून मिरवणाऱ्या त्या कोळणी आजही माझ्या नजरेसमोर आहेत.

समिंदराला उधाण आलंय
सुसाट सुटलाय वारा
धोक्याचा दिला इशारा
नाखवा जाऊ नको तू दर्याच्या घरा..

अशी गाणी गात, ठेक्यात चाललेली त्यांची नृत्यं पाहायला खूपच मजा यायची. आम्ही खाडीत नारळ, तांब्याचा पैसा टाकून त्या जलाशयाची पूजा करायचो आणि एक सुखद अनुभव घेऊन घरी यायचो. घरी सुगंधी केशरी नारळी भात तयारच असायचा. तेव्हा जाणवलं नसेल कदाचित पण या निसर्गपूजेने आम्हाला नेहमीच निसर्गाजवळ ठेवलं असावं.
श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. दिवे अमावस्यानंतर श्रावण सुरू होतो आणि पिठोरी अमावस्येला तो संपतो. अंधाराकडून प्रकाशाकडे— हेच ते तत्त्व. तो असतो मातृदिन.

आमची आई देवापाशी बसून डोक्यावर हिरव्या पानात केळीचे पाच पेटते दिवे घेऊन आम्हाला विचारायची, “अतित कोण?”

मग आम्ही म्हणायचो, “मी”

असं आई चार वेळा म्हणायची आणि पाचव्या वेळी विचारायची, “सर्वातित कोण ?”

तेव्हाही आम्ही म्हणायचो, “मी”

काय गंमत असायची ! माय लेकीतल्या या तीन शब्दांच्या संवादाने आम्हाला जीवनात एकमेकांसाठी कायमस्वरूपी प्रेम आणि सुरक्षितताच बहाल केली जणू.

सर्वात हृद्य सोहळा असायचा तो माझी आजी डोक्यावर दिवा घेऊन पप्पांना विचारायची “अतित कोण?” तेव्हांचा. सोळाव्या वर्षापासून वैधव्यात काढलेल्या तिच्या उभ्या जन्माची एकमेव काठी म्हणजे आमचे पप्पा. आईच्या हातून दिवा घेताना पप्पांचे तेजस्वी डोळे पाणावलेले असायचे. तिच्या सावळ्या, कृश, कायेला त्यांच्या बलदंड हाताने मीठी मारून ते म्हणायचे,

“सर्वातित मीच”

या सर्वातित मधला श्रावण मी कसा विसरेन आणि कां विसरू ?

क्रमशः भाग अकरावा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समर्थशिष्या- संत वेण्णाबाई – लेखिका : सुश्री विजयश्री तारे जोशी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

समर्थशिष्या- संत वेण्णाबाई  लेखिका : सुश्री विजयश्री तारे जोशी ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेणा स्वामिनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केश संभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवे साठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राब राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.

ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.

चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नाम स्मरण करा असे सांगितले.

विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.

समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.

समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.

त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगावेगळी शिष्या 

जय जय रघुवीर समर्थ 

लेखिका : विजयश्री तारे जोशी, कोल्हापूर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares