मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

माझं सर्व बालपण सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड नावाच्या छोट्याशा खेडेगावात आजीच्या सहवासात गेलं.

इथे घडलेल्या गमती – जमती, कथा – व्यथा आणि माझ्यावर झालेले भले – बुरे परिणाम; हे सर्व मी माझ्या पुस्तकात काहीही न लपवता मांडलं आहे.

माझ्या आजीचं नाव लक्ष्मीबाई… !

नावाप्रमाणेच ती होती. कपाळावर जुन्या रुपयाच्या कॉइन एवढं भलं मोठं कुंकू, नाकात बांगडीला लाजवेल एवढी मोठी नथ, काठापदराचं लुगडं घालून ती अशी चालायची; जसा राज घराण्यातला हत्ती निघाला आहे… ! म्हणायला अशिक्षित, पण व्यवहार चातुर्य PHD झालेल्या माणसाला लाजवेल असं…

तोंडानं फटकळ, पण मायेचा जिवंत झरा हृदयात घेऊन फिरायची… गावात जबरदस्त दरारा… ! 

एके दिवशी तिकडे तिचे वडील वारले आणि इकडे माझा जन्म झाला…

त्यावेळच्या भाबड्या कल्पनेनुसार, एका माऊलीने तिला सांगितले, ‘आगं लक्साबया… रडु नगो बाये, पांडुरंगाचे पोटी तुजा बापच जलमाला आलाय… !’ … पांडुरंग माझ्या वडिलांचे नाव… ! 

झालं, तेव्हापासून माझी आजी मला तिचा बापच समजायला लागली, आणि तेव्हापासून माझे विशेष लाड आणि कोड कौतुक सुरू झालं.

अख्खा गाव तिला मामी म्हणायचा, तिला घाबरायचा…. पण तिच्या प्रेमाने लाडावलेला मी तिला लहानपणी “ए लक्षे” म्हणून हाक मारायचो…. आजीचे वडील तिला याच नावानं हाक मारायचे, नातू पण त्याच नावाने हाक मारतो, म्हणजे खरोखरच आपला बापच नातवाच्या रूपाने जन्माला आला आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं… ! 

तिचा “बाप” असण्याचा, मग पुढे मी पुरेपूर फायदा घेतला.

करारी आणि कठोर बाई हि, परंतु कोणत्याही गरिबाच्या अडल्या नडल्या मदतीला ही सर्वात प्रथम पुढे येई.

सर्वांनाच हिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. गावातल्या श्रीमंतापासून ते गरिबातल्या गरीब घरापर्यंत कोणाच्याही घरात ती डायरेक्ट घुसायची… घरात जिथे उंच जागा सापडेल तिथे ती पायावर पाय टाकून बसायची…. आणि इकडे तिकडे पहात, पदराची दोन टोकं हाताच्या चिमटीत पकडत, स्वतःला वारा घालत, घरातल्या लोकांची हजामत करायची.

हतरून पांगरून आजुन काडली न्हाईत ? 

शेळ्याच्या लेंड्याच हित पडल्यात…

घरच नीट सारवलं न्हायी…

गाई म्हशीचं श्यान उचलायला का तुजा बा येणार हाय का ए… ? 

सुना म्हशीवानी खाऊन फुगल्यात…

ए टवळे डोक्याला त्याल लाव कि…. का तमाशात नाचायला जायचं हाय ? 

डोक्यावर पदुर घ्यायला तुज्या आईनं शिकावलं न्हाय का तुला, व्हय गं ए उंडगे… !

इतभर गजरा आणि गावभर नखरा…

……. तिची टकळी चालू असायची… तिच्या तावडीतून कुणीच सुटायचं नाही. येणारा जाणारा प्रत्येक जण तिची नजर चुकवून जायचा… ! 

यावेळी मी तिचा पदर धरून, डाव्या हाताने चड्डी सावरत शर्टाच्या उजव्या बाहीला शेंबूड पुसत सर्व काही पहात असे. चड्डी माझ्या मापाची मला कधीच मिळाली नाही.

‘ थोडी मोटी दे… वाडतं वय हाय… अजून मोटी दे…. हांग आशी… ‘ म्हणत दुकानदाराला माझ्या चड्डीची ऑर्डर आजीच द्यायची…

डावा हात हा फक्त चड्डी सांभाळण्यासाठी असतो आणि उजवा हात शेंबूड पुसण्यासाठी… त्या वयात हाताचे इतकेच उपयोग मला माहित होते.

तर सर्व उणीदुनी काढून झाल्यानंतर, पदरानं घाम पुसत, म्हातारी बिनदिक्कतपणे त्या घरात ऑर्डर सोडायची… ए टवळे, च्या टाक जरा मला… तुमाला आक्कल शिकवून दमले बया मी, तुमच्यापेक्षा गाडव बरं… वर तीच कांगावा करायची… ! 

चहा येईपर्यंत, माझी नाकाची फुरफुर चालूच असायची…

समद्या गावाचा शेंबूड तुलाच आलाय का काय मुडद्या ? असं म्हणत वैतागून उठत; ती मला दरा दरा ओढत घराबाहेर नेत, माझं नाक पदरात धरून असं शिंकरायची, की मृत्यु परवडला…. ! 

अजून थोडा जोर लावला असता, तर तीने माझा मेंदूच बाहेर काढला असता…

तुजं आसं हाय, शेंबूड आपल्या नाकाला, आन् रुमाल देतंय लोकाला… असं स्वतःशी पुटपुटत, मला कडेवर घेऊन ती परत घरात यायची.

यानंतर कान नसलेल्या, फुटक्या कपात, किंवा चार ठिकाणी चेंबलेल्या फुलपात्रात चहा यायचा. बऱ्याच वेळा जर्मन च्या “भगुल्यात” च्या यायचा… बशी नसली तर… आम्ही मग हा “च्या” गोल ताटात भरून भुरके मारत प्यायचो… आज जाणवतं, हा खऱ्या अर्थाने सोहळा होता… !!! 

….. आता कुठे आहे हे फुलपात्र ? ते जर्मनचं भांडं आणि तो कान नसलेला फुटका कप ??? 

 मी शोधतोय… ! आईच पत्र हरवलं… हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो, हे फुलपात्र… ते जर्मनचं भांडं आणि कान नसलेला फुटका कप सुद्धा तसाच हरवलाय… ! 

माणसं शिकत गेली आणि या जुन्या गोष्टी पुस्तकाच्या पानात दबून गेल्या… आठवण म्हणून ठेवलेल्या पिंपळाच्या जाळीदार पानासारख्या… ! 

आता या गोष्टी दिसतात फक्त जुन्या बाजाराच्या दुकानात… नाहीतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी घेऊन, अंताकडे वाटचाल करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या मनात… !!!

तर; बऱ्याच वेळा फुलपात्रातून किंवा फुटलेल्या कपातून, बशीत चहा सांडेस्तोवर दिला जायचा…

फुलपात्र आणि कप सोडून बशी सुद्धा चहानं भरलेली असायची… ! डाव्या हाताने चड्डी, उजव्या हाताने नाक सांभाळताना…. मला चहा प्यायलाच जमायचं नाही, मग माझी म्हातारी एक घोट स्वतः प्यायची, एक घोट मला पाजायची… ! हा चहा पिताना, माझ्या घशातून घुटुक घुटुक आवाज येत असावा… मला माहित नाही. पण यातही माझ्या आजीला कौतुक…

‘ बगा गं बायांनो, “माजा बाप” कसा घुटुक घुटुक च्या पितो, तुमाला दावते… ‘ म्हणत ती अजून चार फुलपात्रे नाक दाबून मला चहा पाजायची…

पुढे डोक्यावरून पाणी गेलं…

रडत खडत शिकलो…. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने डॉक्टर झालो… पुढच्या खाचखळग्यातून वाटा काढत चालत राहिलो… आयुष्यातली सगळी पानीपते हरलो… तरीही पुढे कष्ट करून मनातला “विश्वासराव” जिवंत ठेवला… ! 

आयुष्याच्या एका टप्प्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला लागलो… आर्थिक स्थैर्य आलं. मग अनेक उच्चभ्रू लोकांशी / ऑफिसशी संपर्क येऊ लागला. सुरुवातीला… “खेड्यातनं आलंय येडं, आन भज्याला म्हनतंय पेडं…. ” अशी माझी अवस्था होती. खेड्यातला येडा मी…. तिथले मॅनर्स आणि एटिकेट्स शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. चकचकीत आणि महागड्या कपांमध्ये चहा मिळू लागला… भल्या मोठ्या कपामध्ये / मगमध्ये सांडणार नाही, अशा पद्धतीने निम्माच चहा किंवा कॉफी असायची… ! 

पुढे मी सरावलो…

एकदा हि माझी खडूस म्हातारी… बऱ्याच वर्षांनी माझ्या घरी आली….

आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्राचा प्रमुख मी….

तिला एका मोठ्या पांढऱ्या स्वच्छ कपामध्ये मी तिला चहा दिला…

कपाला सोन्याचीच वाटावी, अशी सोनेरी रंगाची नक्षी होती…

शिकलेले मॅनर्स सांभाळत, भल्या मोठ्या कपामध्ये; सांडणार नाही अशा पद्धतीने तिला निम्मा चहा दिला होता. विहिरीत वाकून बघावं, तसं तीनं कपात वाकून बघितलं… कपातला अर्धा चहा बघून ती खवळली…. तिच्या स्वभावानुसार ती बोलली…. ‘येवडासा च्या ? ल्हान पोरगं हेच्यापेक्षा जास्त मुततंय… तू कंनच्या कंपनीत काम करतूय रं… ? सायबाला म्हणावं पाच धा रुपय पगार जास्त दे… घरात आलेल्या पावण्यांना कप भरून च्या पाजू दे… !’

पाच लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या तोंडात माझ्याच म्हातारीने सणसणीत चपराक हाणली. मलाही राग आला, गावाकडे चेंबलेल्या फुलपात्रात आणि फुटक्या कपात च्या पिणारी माजी म्हातारी, आज इतक्या मोठ्या, सुंदर सोनेरी नक्षीच्या कपात चहा पीत आहे, नातवाचं हिला काहीच कौतुक नाही… ??? मी तिला हे बोलून दाखवलं.

यावर जोरदार पलटवार करत म्हातारी म्हणाली, ‘ गप ए शेंबड्या… तूजा कप किती छोटा हाय, का मोटा हाय…. त्याला सोन्याची का चांदीची नक्षी हाय, त्याला किंमत नसती… या कपातून तू काय देतू, किती देतू, कोनच्या भावनेनं देतू त्याला जास्त किंमत आसती… !’ 

आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये दरवर्षी “मॅनेजमेंट” या विषयावर किमान चार सेमिनार असतात… असे मागील दहा वर्षात मिळून मी 40 सेमिनार अटेंड केले असतील… तू काय देतो, किती देतो, कोणत्या भावनेनं देतो त्याला जास्त किंमत असते… ! सेमिनार मध्ये किती कळलं मला माहित नाही… पण माझ्या म्हातारीने दोन मिनिटात मॅनेजमेंटचं सर्व सार सांगितलं… ! हातातला कप माझ्या हातातच राहिला… तिच्याकडे भारावून मी पाहत राहिलो… “कपावरची” सोनेरी नक्षी आता तिच्या “कपाळावर” उमटलेली मला भासली… !!! 

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

— क्रमशः भाग पहिला   

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि बालखिल्य… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ महर्षि बालखिल्य… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

महर्षी बालखिल्य हे महर्षी कृतु आणि सन्नीता यांचे पुत्र. प्रजोत्पादनासाठी आणि तपस्या करण्यासाठी महर्षी कृतु यांनी आपल्या केसांपासून त्यांना निर्माण केले. ते साठ हजार होते. त्यांचा आकार अंगठ्या इतका लहान होता. ते सूर्याचे उपासक होते. ते सूर्य लोकात रहात. पक्षांप्रमाणे एक एक दाणा वेचून ते आपला उदरनिर्वाह करत असत. ते सदैव सूर्याकडे तोंड करून फिरत असत. त्यांच्या तपस्येचे तेज सूर्याला मिळत असे. ते सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेडियमच्या तीव्रतेपासून जगाचे संरक्षण करीत असत.

बालखिल्य हा दैवी ऋषींचा समूह आहे. ते शरीराने लहान पण तपस्वी म्हणून महान आहेत.

एकदा महर्षी कश्यप यांनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी कृतु ऋषींना सांगितले तुम्ही माझ्या यज्ञात ब्रह्माचे स्थान ग्रहण करा व आपल्या सर्व पुत्रांना घेऊन या. महर्षी कृतुंनी आमंत्रण स्वीकारले. देवराज इंद्रही त्या ठिकाणी होते. महर्षी कश्यप यांनी सर्वांना यज्ञासाठी समिधा आणण्यास सांगितले. इंद्राने खूप समिधा आणल्या. पण बालखिल्य थोड्याच समिधा आणू शकले. इंद्राने चेष्टा केली. विचारले, हे वीतभर लाकूड घेऊन कशाला आलात? हा यज्ञ तुमच्या आकाराप्रमाणे छोटा असेल असे तुम्हाला वाटले का? बालखिल्ल्यांना उपहास समजला. तरीही कश्यप ऋषींसाठी शांत राहून ते म्हणाले, “आम्ही यज्ञासाठी समिधा आणल्या आहेत. त्यांच्या आकाराकडे न पाहता आमचा समर्पण भाव पहा. ” इंद्र म्हणाला, “ तुम्ही देवराज इंद्राशी बोलत आहात लक्षात आहे का? “ 

बालखिल्यांना खूप राग आला. इंद्राला धडा शिकवण्यासाठी ते म्हणाले, “ तुला इंद्रपदाचा गर्व आहे‌ म्हणून आम्ही संकल्प करतो की आम्ही आमच्या योगबलाने तुमच्यापेक्षा कैक पटीने शक्तिशाली, बुद्धिमान आणि सद्गुणी इंद्र निर्माण करू. ” इंद्र घाबरून कश्यपांकडे गेला. कश्यपांनी बालखिल्यांची समजूत घातली व सांगितले, “ जगात इंद्र एकच असणार तेव्हा त्याला क्षमा करा. ” बालखिल्यांना आपला संकल्प परत घेणे कठीण होते. ते म्हणाले, “ आम्ही संकल्प परत घेऊ शकत नाही. पण बदल करू शकतो. तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत आहात. तुमचा पुत्र अतिशय पराक्रमी, शक्तिशाली असा प्राणी असेल जो पक्षांचा इंद्र होईल. आमचा संकल्पही पूर्ण होईल आणि इंद्र पदाचे महत्व ही कमी होणार नाही. ” 

कश्यपांची पत्नी विनता हिने गरुडाला जन्म दिला आणि गरुड भगवान विष्णूचे वाहन बनले. तसेच त्याला पक्षांचे इंद्र असे नाव पडले.

त्यांनी बालखिल्य संहिता रचली. ते केदारखंडमध्ये तपस्या करीत होते. तिथे एक नदी आहे तिचे नाव बालगंगा.

ऋग्वेदाच्या आठव्या मंडलाच्या शेवटी एक परिशिष्ट आहे. त्याला बालखिल्यसूक्त असे म्हणतात.

एकदा गरुडाला खूप भूक लागली. त्याने वडिलांना विचारले, ‘ मी काय खाऊ?’ तेव्हा ते म्हणाले, “समुद्रात एक मोठे कासव आहे आणि वनामध्ये एक महाभयंकर हत्ती आहे. दोघेही खूप क्रूर आहेत. तू त्यांना खा. ” गरुडाने दोघांना पकडले व तो सोमगिरी पर्वतावर गेला. तिथे एका उंच वृक्षावर काही ऋषी उलटे लटकून तपस्या करत होते. गरुड त्याच फांदीवर बसला. त्याच्या वजनाने ती फांदी तुटू लागली. गरुडाने आपल्या चोचीत ती फांदी पकडली आणि कश्यप ऋषींकडे आला. कश्यप ऋषी म्हणाले, “ हे बालखिल्य ऋषी आहेत. त्यांना त्रास दिलास तर ते शाप देऊन तुला भस्म करतील. ” गरुडाला वाचवण्यासाठी त्यांनी बालखिल्य ऋषींना प्रार्थना केली की ‘ तुम्ही फांदीवरून खाली या. ’ बालकिल्ल्यांनी कश्यपांची प्रार्थना ऐकली. ते खाली आले आणि हिमालयात तपस्या करण्यासाठी निघून गेले.

असे हे आकाराने लहान पण कर्तृत्वाने महान असे तपस्वी बालखिल्य ऋषी. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक गंमत सांगू तुला ?…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक गंमत सांगू तुला ?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

“एक गंमत सांगू तुला. ?”

 

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला

पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला…

 

एक गंमत सांगू तुला…?

 

लहानपणी वाटायचं,

नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन, उसनी मित्रांची पुस्तके घेवून अभ्यास पूर्ण केला..

म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला

पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाॅटर झाला…

 

एक गंमत सांगू तुला….?

 

लहानपणी रिक्षातून आवडायचे फिरायला

पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..

म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फिरायला 

पण जीना उतरेस्तोवर

पाय लागतात लटपटायला…

 

एक गंमत सांगू तुला….?

 

लहानपणी १०✘१० ची खोली होती रहायला,

दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..

म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाॅक घेतला,

पण एकेक खोली आ वासून येते खायला…

 

एक गंमत सांगू तुला……?

 

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,

फार फार आनंद झाला पण भिती वाटते मनाला.. !

मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,

का ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

 

…. म्हणून सांगतो मित्रांनो…… आताच जगणं शिका.

आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा…

… ज्या क्षणी तुम्ही मरण पावता, त्या क्षणी तुमची ओळख एक ‘बॉडी’ बनुन जाते,

‘बॉडीला’ आणा, बॉडीला झोपवा,

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.

म्हणून आव्हाने स्वीकारा,

 

आवडत्या गोष्टीसाठी खर्च करा,

आवडत्या लोकांना वेळ द्या,

 

पोट दुखेपर्यंत हसा, कोणी बालिश 

म्हणाले तरी चालेल.

 

मनसोक्त नाचा, लग्नात, वरातीत. जिथे मिळेल तिथे नाचा.

अगदी लहान बाळासारख़ं जगा.

कारण,

 

‘मृत्यु’ हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाहिये, लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला ‘जिवंतपणा’ मेलेला असतो.

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘पिठोरी अमावस्या अर्थात वैश्विक ‘मातृत्व’ दिन‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ पिठोरी अमावस्या अर्थात वैश्विक ‘मातृत्व’ दिन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज श्रावण अमावस्या !! बैलपोळा, पिठोरी अमावस्या आणि मातृदिन असा त्रिवेणी संगम असलेला पावन दिवस !!!

अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती द्यूत खेळत होते. पंच (परीक्षक) म्हणून नंदी महाराज होते. खेळात माता पार्वती जिंकल्या होत्या. पण पंचाने म्हणजे नंदीने भगवान शंकर जिंकले असे जाहीर केले. याचा पार्वतीमातेला राग आला व तिने नंदीला शाप दिला की तुझ्या मानेवर लोकं जोखड ठेवतील आणि तुझा उपयोग शेतीच्या कामासाठी व इतर कामासाठी केला जाईल. नंतर नंदीने क्षमा मागितली तेव्हा पार्वतीमातेने त्याला वरदान दिले की श्रावण अमावस्येच्या दिवशी तुला काहीही काम सांगणार नाहीत, तुझी पूजा केली जाईल, तुला गोडधोड खाऊ घातले जाईल, तुझे कौतुक केले जाईल आणि तेव्हापासून आपल्याकडे ‘बैलपोळा’ हा सण साजरा करण्यात येतो. आपल्या संस्कृतीप्रमाणे घरात अगदी नवीन संगणक आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आपण तो सुरु करत नाही, अशा निर्जीव वस्तूंचीही पूजा होते, तिथे जन्म देणाऱ्या मातेला ही संस्कृती कशी विसरेल? माता, जननी, मातृभूमी आणि जमिनीतून धान्य पिकायला सहाय्यकारी ठरणाऱ्या बैलाचीही आपल्याकडे पूजा होणे क्रमप्राप्त नव्हे काय?

या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची, पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ “शिंगे रंगविली, बाशिंगे बांधिली, चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात बैलपोळा सामूहिकरीत्या साजरा केला जातो.

श्रावण अमावास्येला ‘पिठोरी अमावास्या’ असेही म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे – श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्‍वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्‍या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.

पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे. पूर्वी घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. या दिवशी महिला उपवास करतात. सायंकाळी स्नान करून घरातल्या मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे जेवण देतात. या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राची महिला पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ‘अतीत कोण?’ असा प्रश्न विचारायचा असतो. त्याचे उत्तर म्हणून आपल्या मुलाचे नाव घ्यायचे. म्हणजे पुत्र किंवा कन्या दीर्घायुषी होतात, अशी श्रद्धा आहे. घरातली कर्ती स्त्री डोक्यावर ‘पिठोरी’चं वाण घेऊन ‘माझ्यामागे कोण आहे?, चा घोष करत असे. घरातील मुलं तिला ‘मीच, मीच’ म्हणत प्रतिसाद दिला जात असत. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.

मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावास्या करून देते. म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे. आजच्या पावन दिनी दिवशी वंशवृद्धीकरिताही पूजा केली जाते. म्हणून यास ‘मातृदिन’ असेही म्हणतात. पण आज याला आणखी एक संदर्भ जोडला तर आणखी सयुक्तिक होईल असे वाटते. आपण आजच्या दिवसाला ‘मातृत्वदिन’ म्हणू शकतो. ‘माता’ होणे हे जन्म देण्याशी निगडित आहे तर मातृत्वभाव हा फक्त जन्म देण्याशी निगडीत नाही. हा तर वैश्विक भाव आहे. आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर समाजाला आज ‘मातृत्वभावा’ची विशेषत्वाने गरज आहे असे जाणवते.

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’, ‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’; ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद हि ‘नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला गेला असावा.

आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. मनी रुजवलेल्या मातृत्वाभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ (प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “छत्रपती शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसीकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” हा विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. भले मला माझ्या मुलास ‘शिवाजी’ बनवता आले नाही तर त्याला शिवरायांचा ‘मावळा’ बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन करेन असा पण प्रत्येक आईने करायला हवा. हा प्रयत्न थोड्या प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील.

आज ‘आंतरराष्ट्रीय मातृत्वदिन’ आहे. आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मला असा जाणवलं की नुसती कृतज्ञता व्यक्त करून आपले कर्तव्य संपेल ? नक्कीच नाही. तर एक मुलगा म्हणून माझं काही कर्तव्य नक्कीच आहे. मी माझ्या जन्मदात्रीचा मुलगा आहेच, भारतमातेचे पुत्र आहे, समाजपुरुषाचा पुत्र आहे. प्रत्येकासाठी माझी वेगवेगळी कर्तव्ये आहेत, ती योग्य रीतीने पार पाडता यावीत म्हणून मी माझ्या जीवनात प्राधान्यक्रम कशाला देणार हे ठरवावयास हवे. माझ्या अंगातील कौशल्ये अधिकाधिक समाजाभिमुख कशी होतील याचा विचार करावयास हवा. ‘मी आणि माझे’ यातून बाहेर पडून संपूर्ण समाज ‘माझा’ आहे ही भावना बळकट व्हावयास हवी. आज त्याचीच नितांत गरज आपल्या मातृभूमीस आहे, असे वाटते.

जसे भक्तामुळे देवास ‘देवपण’, अगदी तसेच लेकरांमुळे आईला ‘आईपण’ प्राप्त होते. भक्तच आपल्या भक्तीतून देवाचे देवपण सिद्ध करतो, तसेच प्रत्येकाने यथाशक्ती चांगले वागून, चांगली कर्म करून आपल्या आईच्या आईपणास गौरव प्राप्त करून दिला पाहिजे. मग ती आई असो, गोमाता असो कि भारतमाता !!. दैनंदिन व्यवहार करताना आपल्या अंगी ‘मातृभाव किंवा पुत्रभाव’ ठेवता आला तर देशातील भ्रष्टाचार, सामाजिक भेदभाव आणि इतर सर्व अनैतिक गोष्टी तात्काळ बंद होतील, यात बिल्कुल संदेह नाही.

आज आईचे स्मरण करताना बऱ्याच गोष्टी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत गेल्या. माझी आई ही एखादवेळेस जिजामाता नसेल, ‘श्यामची आई’ नसेल पण ती ‘आई’ होती हेच माझ्यासाठी पुरेसे होते. आज या नश्वरजगात आई नाही, पण तिने जे काही शिकविले ते ‘श्यामच्या आई’च्या शिकवणीपेक्षा कणभरही कमी म्हणता येणार नाही. ‘देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’* याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसूनही क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी अथक प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला उपाय नसेल..

मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.

चार मातीच्या भिंती

त्यात राहे माझी आई

एवढे पुरेसे होई

घरासाठी….. !!

जगातल्या सर्व मातांस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण!! श्रीरामसमर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कुमुदताई

आम्ही राहत असलेल्या गल्लीत शिरतानाच उजवीकडे एक खूप मोठा ओटा सदृश मोकळा चौथरा होता ज्यास आम्ही “घटाणा” असे म्हणत असू. हा घटाणा म्हणजे एक प्रकारचे गल्लीतले ‘ॲम्फीथिएटरच” होते. तिथे नाना प्रकारचे पारंपरिक, लोककलेचे आणि लोक कलाकारांचे कार्यक्रम विनामूल्य चालत. जसे की डोंबाऱ्याचा खेळ, मदारी, माकडांचा खेळ, डब्यातला सिनेमा, टोपलीतले नाग नागिण, पोतराज आणि असे कितीतरी. त्यातल्या सगुणा, भागुबाई, गंगुबाई, अक्का, माई, जंगल्या, आण्णा, आप्पा अशी नाना प्रकारची पात्रे आजही आठवली तरी सहज हसू येते. डोंबारीचा खेळ पाहताना हातात काठी घेऊन दोरीवर चालणारी ती लहान मुलगी पाहताना छाती दडपून जायची. पुढे आयुष्यात केलेल्या अनेक लाक्षणिक कसरतींचा संदर्भ या लहानपणी पाहिलेल्या खेळांशीही जोडला गेला ते निराळे पण आम्हा मुलांसाठी घटाण्यावरचे खेळ म्हणजे एक मोठे मनोरंजन होते. या पथनाट्यांमुळे आमचे बालपण रम्य झाले.

एक चांगलं लक्षात आहे की या खेळांव्यतिरिक्त मात्र आम्हा मुलांना त्या घटाण्यावर जाण्याची परवानगी नसायची कारण त्या घटाण्याच्या मागच्या बाजूला ट्रान्सजेंडर लोकांची वस्ती होती. ती चेहऱ्यावर रंग चढवलेली स्त्री वेशातील पुरुषी माणसे, त्यांचं टाळ्या वाजवत, कंबर लचकवत सैरभैर चालणं, दोरीवर वाळत घातलेले त्यांचे कपडे पाहताना विचित्र असं भयही जाणवायचं. कधीकधी घटाण्यावर रात्रीच्या वेळी ढोल वाजवत गायलेली त्यांची भसाड्या सूरातील गाणी ऐकू यायची. त्या गाण्यात अजिबात श्रवणीयता अथवा गोडवा नसायचा. आज विचार करताना वाटतं, त्यांच्या जीवनातील भेसूरता ते अशा सूरांतून व्यक्त करत असावेत.

पण तरीही मनात प्रश्न असायचे. ही माणसं अशी कशी? ही वेगळी का? यांचे आई वडील कोण? यांची वस्ती हेच यांचं कुटुंब का? या प्रश्नांची उत्तरे त्यावेळी कधीच मिळाली नाहीत पण आजही त्यावेळी उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न मनात आहेतच.

एकदा बोलता बोलता जीजी म्हणजे माझी आजी म्हणाली,
”मालु गरोदर असली आणि मी घरात नसले की शेजारची काकी बिब्बा मागायला यायची. मालु भोळसट. ती काकीला द्यायची बिब्बा. ”

बिब्बा नावाचं एक काळं, औषधी, सुपारी सारखं ‘बी’ असतं जे स्नायूंच्या दुखण्यावर उपयोगी ठरतं. हे बिब्बे वगैरे विकणाऱ्या बाया “बुरगुंडा झाला बाई बुरगुंडा झाला” अशाप्रकारे काहीतरी गाणी गात सुया, मणी, बिब्बे वगैरे विकत.
जीजी पुढे सांगायची, ”म्हणून तुझ्या आईला तुम्ही पाच मुलीच झालात. ”

मालु — मालती हे माझ्या आईचं नाव. मला जीजीचं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. मी तिला लगेच म्हटलं, “आम्ही मुली म्हणून तुला आवडत नाही का ?”
तेव्हा मात्र जीजी फार खवळली आणि तिने माझे जोरात गालगुच्चे घेतले पण मग दुसऱ्या क्षणी प्रेमाने जवळ घेऊन म्हणाली, ” नाही ग ! तुम्ही तर माझे पाच पांडव. ”

पण माझ्या मनात जे उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न आहेत त्यापैकीचा एक प्रश्न कुमुदताई या आकर्षक व्यक्तिमत्वाभोवती गुंतलेला आहे. घटाणा ओलांडून गल्लीतून बाहेर पडताना उजवीकडे एका जराशा उंच प्लिंथवर दोन बैठी पण वेगवेगळी घरे होती. एक समोरची खोली आणि आत एक स्वयंपाक घर. एक खिडकी हॉलची आणि एक खिडकी स्वयंपाकघराची. परसदारी दोन्ही घरांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे होती आणि पुढे मागे थोडा मोकळा परिसर होता. त्यातल्या एका घरात लैला आणि कासिमभाई हे बोहरी दाम्पत्य आपल्या इबू आणि रफिक या लहान मुलांसोबत राहत आणि दुसऱ्या घरात चव्हाणकाका आणि कुमुदताई हे नवविवाहित दांपत्य राहत असे. अतिशय आकर्षक असे हे दांपत्य. दोघेही गौरवर्णीय, उंच आणि ताठ चालणारे. त्यांच्याकडे पाहता क्षणी जाणवायचं की धोबी गल्ली परिसरातल्या जीवनशैलीशी न जुळणारं असं हे दाम्पत्य आहे. त्यांचा क्लासच वेगळा वाटायचा. चव्हाणकाका हे उत्तम वकील होते. अर्थात ते नंतर कळलं जेव्हा ते आमचे चव्हाणकाका झाले आणि त्यांच्या पत्नी आमच्यासाठी कुमुदताई झाल्या. आम्हा मुलांना नसेल जाणवलं पण ते नवविवाहित दांपत्य असलं तरी ते प्रौढ होते पण महत्त्वाचे हे होतं की सुरुवातीला काहीसे निराळे, वेगळ्या क्लासमधले ते वाटले तरी तसे ते असूनही खूपच मनमिळाऊ, हसरे आनंदी आणि खेळकर होते. आमच्याशी त्यांचे सूर फारच चटकन आणि छान जुळले. दोघांनाही लहान मुले फार आवडायची. शेजारच्या बोहरी कुटुंबातल्या रफिक आणि इबु वर तर ते जीवापाड प्रेम करत आणि कुमुदताई आम्हा मुलांना तर प्रचंड आवडायच्या.

मी प्रथम त्यांच्याशी कधी बोलले ती आठवण माझ्या मनात आजही काहीशी धूसरपणे आहे. मी आणि माझी मैत्रीण त्यांच्या घरावरून जात होतो. जाता जाता कुतुहल म्हणून त्यांच्या घरात डोकावत होतो. तेवढ्यात त्यांनीच मला खुणेने बोलावलं. खरं सांगू तेव्हा मला इतका आनंद झाला होता! कारण मला त्यांच्याशी नेहमीच बोलावसं वाटायचं पण भीडही वाटायची. आता तर काय त्यांनी स्वतःहूनच हाक मारली होती मला. मी धावतच गेले.
“तुझा फ्रॉक किती सुंदर आहे ग !”
हे त्यांच्याशी झालेल्या संभाषणातलं पहिलं वाक्य. मग मी फुशारकीत सांगितलं,
“माझ्या आईने शिवलाय माझा फ्रॉक. ”
“अरे वा ! तुझी आई कलाकारच असली पाहिजे. ”
“होयच मुळी. ”
आणि मग त्या दिवसांपासून कुमुदताईंची आणि आमची घट्ट मैत्री झाली.

उठसूठ आम्ही त्यांच्याच घरी. रविवारच्या सुट्टीत तर आम्हा सवंगड्यांचा त्यांच्याकडे अड्डाच असायचा. त्यांच्याबरोबर आम्ही खूप पत्ते खेळायचो. पत्त्यातले अनेक डाव. पाच तीन दोन, बदामसत्ती, नॉट ॲट होम, लॅडीस, झब्बू, ३०४ वगैरे. आम्ही आमच्या वयातलं अंतर कधीच पार केलं होतं शिवाय नुसतेच खेळ नसायचे बरं का. कुमुदताई उत्कृष्ट पाककौशल्य असणार्‍या गृहिणी होत्या. खेळासोबत कधीकधी कांदाभजी, सोडे किंवा अंडे घालून केलेले पोहे, वालाची खिचडी असा बहारदार चविष्ट मेनूही असायचा.

माझी धाकटी बहीण छुंदा त्यांना फार आवडायची. ती सुंदर म्हणून तिला चव्हाणकाका लाडाने “प्रियदर्शनी” म्हणायचे. त्यांचंही आमच्या घरी जाणं-येणं होतं. चव्हाणकाकांचं आणि पप्पांच अनेक विषयांवर चर्चासत्र चालायचं आणि “कुमुदताई” माझ्या आईची खूप छान मैत्रीण झाल्या होत्या. अर्थात यातही मैत्रीचं पहिलं पाऊल त्यांचंच होतं. आईकडून आणि जिजी कडूनही शिवणकामातल्या अनेक कौशल्याच्या गोष्टी अगदी आत्मीयतेने त्यांनी शिकून घेतल्या. आईने त्यांना कितीतरी पारंपारिक पदार्थही शिकवले. जसे कुमुदताईंकडून आमच्याकडे डबे यायचे तसेच आमच्याकडूनही त्यांना डबे जात. मग एकमेकींनी बनवलेल्या पदार्थांची चर्चाही घडे.

कुठल्याही अडचणीच्या वेळी कुमुद ताई आईची मदत घेत आणि हे दोन्हीकडून होतं. आम्हा मुलांना तर त्यांच्यासाठी काहीही करायला आवडायचे. त्या एकट्या असल्या तर अभ्यासाची वह्या पुस्तके घेऊन आम्ही त्यांना सोबत करायचो. असं खूपच छान नातं होतं आमचं. त्यांच्याबरोबर गाणी ऐकली, सिनेमे पाहिले. कितीतरी वेळा— बालमन कधी दुभंगलं तर त्यांच्यापुढेच उघडं केलं आणि त्यांनी आमच्या डोळ्यातलं पाणी वेळोवेळी टिपलं.

मग नक्की काय झालं ?
कुमुदताई गर्भवती झाल्या, चव्हाण काका आणि कुमुदताईंना ‘बाळ’ होणार म्हणून खरं म्हणजे सारी गल्लीच आनंदली. दुसऱ्यांच्या मुलांवर जीवापाड प्रेम करणारं, मुलांमध्ये रमणारं हे जोडपं आता स्वतः “आई-बाबा’ होणार ही केवढी तरी आनंदाचीच गोष्ट होती पण कळत नकळत का होईना जाणवायला लागलं होतं ते पडत चाललेलं अंतर, त्यांच्या वागण्या बोलण्यातला अधोरेखित फरक. बालमन बारकावे टिपण्याइतकं परिपक्व नसतं पण कुठेतरी आत संवेदनशील नक्कीच असतं.

आजकाल रोज येणाऱ्या कुमुदताई आमच्याकडे येईनाशाच झाल्या होत्या. अत्यंत तुटकपणे बोलायच्या. नंतर तर बोलणंही संपलं. गल्लीतल्या बाकीच्यांशी मात्र त्यांचं काही बिनसलं नव्हतं.

प्रश्नांची खरी उत्तरं फक्त “जीजी” कडे मिळायची. जीजी आपणहूनच म्हणाली एक दिवस, “ तुझ्या कुमुदताईंना विसर आता. आता नाही येणार त्या आपल्याकडे. ”
“पण का ?”
माझे डोळे तुडुंब भरले होते. कुमुदताईंसारख्या आवडत्या व्यक्तीला तोडणे कसे शक्य होते ?
“त्यांना भीती वाटते की तुझ्या आईचा चेहरा त्यांनी पाहिला तर त्यांनाही मुलगीच होईल. त्यांना मुलगी नको मुलगा हवाय. ”

हा मला बसलेला ‘मुलगी’ विषयीचा अनादर दाखवणारा एक प्रचंड धक्का होता. त्या क्षणी मी माझ्या आईला घट्ट मिठी मारली आणि तेव्हा एकच जाणवलं, ”माझ्यासाठी या जगात माझ्या आई इतकी महान व्यक्ती दुसरी कुणीच नव्हती. एक वेळ मी परमेश्वराची आरती करणार नाही पण माझ्या आईची महती गाणारी आरती जन्मभर करेन.”

आई आणि जीजीमध्ये सासू—सून नात्यातले वाद असतील पण अशा कितीतरी भावनिक, संवेदनशील संघर्षामय क्षणांच्या वेळी जीजी आईमागे भक्कमपणे उभी असायची.

शेतात उंचावर बसवलेल्या बुजगावण्यासारखं माझ्या मनातलं कुमुदताईंचं स्थान एकाएकी कोसळलं आणि रात्रीच्या भसाड्या आवाजातल्या ट्रान्स जेंडरांचं गाणं अधिक भेसूर वाटलं.

त्यानंतर चव्हाणकाका आणि कुमुदताईंनी घरही बदललं. ठाण्यातल्याच “चरई’ सारख्या प्रतिष्ठित भागात त्यांनी स्वतःचं मोठं घर घेतलं. चव्हाणकाकांची वकिली जोरात चालू होती. ठाण्यातील नामांकित वकील म्हणून त्यांची ओळख निर्माण होत होती. घटाण्या समोरची त्यांच्या घराची खिडकी कायमची बंद झाली आणि आमच्यासाठीही तो विषय तिथेच संपला.

आमच्याही आयुष्यात नंतर खूप बदल झाले. आम्ही मोठ्या झालो. भविष्याच्या वाटेवर आम्हा बहिणींची— आई वडील आणि आजीच्या प्रेम आणि मार्गदर्शनाखाली आयुष्ये फुलत होती. ’ मुलगा नसला तरी.. ’ हे वाक्य सतत कानावर पडत राहिलं तरीही कधी कधी ते चांगल्या शब्दांबरोबरही गुंफलेलं असायचं. “मुलगा नसला तरी ढग्यांच्या मुली टॅलेंटेड आहेत. ढग्यांचे नाव त्या नक्कीच राखतील. ” तेव्हा त्या व्यक्तिंबद्दल “ही माणसं आपल्या विचारांची” असंही काहीसं वाटायचं.

अनपेक्षित पणे एक दिवस, ध्यानीमनी नसताना आमच्याकडे चव्हाणकाका आणि कुमुदताई आले. मध्ये बर्‍याच वर्षांचा काळ लोटला होता. काळाबरोबर काळाने दिलेले घावही बोथट झाले होते. आमच्यावर लहानपणापासून झालेला एक संस्कार म्हणजे, “ झालं गेलं विसरून जावे, कोणाही विषयी विचार करताना केवळ त्यांच्या आनंदाचा, सुखाचा, अथवा त्यांच्याच भूमिकेतून विचार करावा. कुठलाही आकस मनात ठेवून टोकाची प्रतिक्रिया कधीही देऊ. नये. ”

कुमुदताईंना तीन मुली झाल्या. सुंदर गुणी, त्यांच्यासारख्याच आकर्षक. मुलगा झाला नाही. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर चव्हाण दांपत्य पेढे आणि बर्फी दोन्ही घेऊन आमच्याकडे त्या दिवशी आले होते.
कुमुदताईंनी माझ्या आईला घट्ट मिठी मारली. एक अबोल पण अर्थपूर्ण मीठी होती ती! एका वैचारिक चुकीची जणू काही कबुलीच होती ती. त्यानंतर कृष्णमेघ ओसरले. आकाश मोकळे झाले.

आज प्रातिनिधिक स्वरूपात विचार केला तर वाटते यात ‘कुमुदताईंना’ दोष देण्यात काय अर्थ आहे? सामाजिक वैचारिकतेचा हा पगडा असतो. अजून तरी समाज पूर्णपणे बदलला आहे का ?

—- क्रमशः भाग ९ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. इरावती कर्वे… लेखक : श्री बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

 ☆ डॉ. इरावती कर्वे… लेखक : श्री बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

डॉ. इरावती कर्वे

“ए दिनू मी जाते” अशी नवऱ्याला शंभर वर्षापूर्वी हाक मारणारी – – 

थोर समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, लेखिका डाॕ. इरावतीबाई कर्वे यांचा ११ ऑगस्ट हा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्राला ज्यांचा विसर पडला आहे अशा अनेक विद्वान व्यक्तीपैकी डाॕ. इरावतीबाई कर्वे याही एक आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन काॕलेजचे प्राचार्य डाॕ. दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या पत्नी व महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्नूषा आहेत.

बाईंचा जन्म म्यानमार येथे १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. वडीलांचे नाव गणेश हरी करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई होते. वडील म्यानमारमधील एका कंपनीत नोकरी करीत होते. मूळचे हे कुटुंब कोकणातले आहे. त्यांना पाच भाऊ होते. म्यानरमधील इरावती नदीवरुन त्यांचे नाव “इरावती” असे ठेवले. कुटुंबात त्यांना माई म्हणत. विद्यार्थी व मित्रपरिवारात त्यांना आदराने “बाई” असे म्हटले जायचे.

लालसर गोरापान रंग, उंच, धिप्पाड देहयष्टी, रसरसशीत कांती. ठसठशीत कुंकू. घट्ट बुचडा, नऊवारी साडी, निळ्या, निळ्या डोळ्यात चमकणारे प्रचंड बुध्दीचे तेज असे त्यांचे सुंदर व अत्यंत विलोभनीय व्यक्तीमत्व होते. पुण्यातील रस्त्यावरुन १९५२च्या सुमारास भरधाव वेगाने स्कूटर चालवीत डेक्कन काॕलेजकडे जाणाऱ्या या महान विदूषीकडे अवघे पुणेकर कुतूहलाने व आदराने पाहत असत.

वयाच्या सातव्या वर्षी हुजूरपागा शाळेत त्यांना दाखल केले. आणि मग त्या कायमच्या पुणेकर झाल्या. १९२२ साली त्या मॕट्रिक झाल्या. १९२६ साली फर्ग्युसन काॕलेजमधून त्या तत्वज्ञान विषय घेऊन बी. ए. झाल्या. आणि त्याचवर्षी त्यांचा फर्युसन काॕलजचे प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी प्रेमविवाह झाला. १९२८ साली त्या एम. ए. झाल्या. त्याचवर्षी महर्षि कर्व्यांचा विरोध असताना त्या अट्टाहासाने पी. एचडी करण्यासाठी जर्मनीला गेल्या. १९३० साली “मानवी कवटीची अरुप प्रमाणता”(A semetry of human skull) या विषयात त्यांना पी. एचडी मिळाली. तत्कालीन काळात स्त्रिया पदवीधर होणे हेच अवघड होते. बाई तर परदेशात जाऊन पी. एचडी. होऊन आल्या होत्या. पुण्यात त्यावेळी ही अपुर्वाईच होती. काही काळ त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात कुलसचिव पदावर काम केले. व नंतर त्यांनी डेक्कन काॕलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. संशोधन हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. त्यामध्ये त्या रमून गेल्या. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना फर्ग्युसन काॕलेजचे प्राचार्य रँग्लर र. पु. परांजपे यांचा सहवास लाभला होता. त्यांच्या घरीच त्या राहत होत्या. या विद्वान, ऋषितुल्य गुरुंचे संस्कार बाईंच्या व्यक्तीमत्वात गडदपणे ऊमटले. संशोधन, चिकित्सा, साहित्य, काव्य यांची अभिरुची त्यांच्या संस्कारात निर्माण झाल्या.

संशोधक हा त्यांचा मूळ पिंडच होता. संशोधन करण्यासाठी सारा भारतभर त्या फिरल्या. जगभर प्रवास केला. मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यामध्ये त्यांनी आयुष्यभर संशोधन केले. अखंड वाचन केले. शंभरहून अधिक संशोधनपर लेख लिहिले. जगभर व्याख्याने दिली. त्यांचे सारे लेखन चिंतनगर्भ आहे. चिकित्सा करतानाही अत्यंत सहृदयपणे विवेचन त्यांनी केले आहे. हिंदू समाजरचना, हिंदू समाज एक अन्वयार्थ, महाराष्ट्र अँड इटस् पीपल, किनशीप आॕरगनायझेशान इन इंडिया(नातेदारी संबध)असे पुष्कळ वैचारिक व संशोधनात्मक त्यांनी लेखन केले आहे. Kiniship organization in India या ग्रंथाने त्यांना जगप्रसिध्द कीर्ती मिळवून दिली. नात्यासंबधी शब्द, त्यांचा अभ्यास व स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. रुढअर्थाने त्या स्त्रीवादी नाहीत. परंतु त्यांच्या वैचारिक चिंतनातून आपसूकच स्त्रीवादी विचार प्रसवले आहेत. हे त्यांचे हवे तर द्रष्टेपण म्हणता येईल. स्रिया पुरुषाबरोबर समानतेचे हक्क मागतात. इरावतीबाईंनी स्त्रियांना समानतेचे हक्क काय मागता तर समानतेपेक्षा जास्तच मागा असे सांगितले. त्यांचे सासरे महर्षि कर्वे यांनी स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढले. परंतु इरावतीबाईंनी महिलासाठी वेगळ्या विद्यापीठाची गरजच नाही असे म्हटले. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने शिकू द्या असे सांगितले.

इरावतीबाईनी मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, संस्कृती याविषयी वैचारिक आणि संशोधनात्मक लेखन केलेच शिवाय त्यांनी जे ललित लेखन केले आहे ते फारच ऊच्च दर्जाचे केले आहे. महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या लेखनात ऊमटली आहे. त्यांच्या वैचारिक लेखनामुळे त्यांचे ललित लेखनही विलक्षण टापटिपीचे व हृदयगंम झाले आहे. “युगांत” मधील व्यक्तीरेखाने त्यांना मराठी साहित्यात अढळ स्थान प्राप्त करुन दिले आहे. महाभारतील गूढ व्यक्तीमत्वाचा शोध त्यांनी मानवंशशास्त्र व समाजशास्त्रीय अनुबंधाने घेतला आहे. हे पुस्तक वाचताना आपण देहभान विसरतो. भोवरा, युगान्त, परिपूर्ती असे पुष्कळसे ललित लेखन त्यांनी केले आहे. परिपूर्ती या पुस्तकात परिपूर्ती या शिर्षकाचा लघुकथेच्या अंगाने जाणारा त्यांचा आत्मलेख आहे.

एका समारंभात बाईंची ओळख करुन देताना अमक्याची सून, अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी अशी करुन दिली. समारंभ संपला. बाई घरी चालल्या. परंतु त्यांचे मन विलक्षण अस्वस्थ होते, मन सैरभैर झाले होते. त्यांना कसले तरी अपुरेपण जाणवत होते. काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. याच विचारात त्या घरी चालल्या होत्या. वाटेत मुलांचा खेळ चालला होता. बाईंना पाहताच एक मुलगा मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे!शूः शूः त्या बाई पाहिल्यास का? त्या बाई जात आहेत ना, त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का”. एवढ्या गलक्यातून ते वाक्य ऐकताच बाई चपापल्या. त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागले. आता त्यांना काहीतरी हरवले होते ते गवसले होते. मनाची परिपूर्ती झाली होती. समारंभातील अपूरी ओळख आता पूर्ण झाली होती. ” आधीच्या परिचयात प्रतिष्ठा होतीच. “कर्व्याची आई”या शब्दाने प्राणप्रतिष्ठा झाली.

खरेतर बाईनी ही गोष्ट उपहासाने लिहिली होती. स्त्री कितीही कर्तबगार झाली तरी ती कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची पत्नी अशीच असते, तिला स्वतःची वेगळी ओळख नसते. हे त्यांना सांगायचे होते. परंतु कर्व्याची आई ही त्यांची ओळख त्यांना जीवनाची परिपूर्ती वाटून गेली.

त्यांचे सारे ललित साहित्य असेच अंतर्मुख करणारे आहे. मनाचा तळ ढवळून काढणारे आहे. वैचारिक घुसळण करणारे आहे. एवढ्या विद्वान बाई, इंग्लिश सहीत अनेक पाश्चात्य भाषा अस्खलित बोलणारी पंढरपूरची वारी करते याचे मराठी माणसाला केवढे अप्रुप वाटायचे. अगोदर ऊंच असलेल्या बाई आणखी ऊंच वाटू लागायच्या. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून घेणारी ही बुद्धीप्रामाण्यवादी, प्रचंड विद्वान बाई वारीत सामील व्हायच्या. भक्ती आणि ज्ञान याचा केवढा हा मनोज्ञ संगम ! विद्वतेची, पांडित्याची भरजरी वस्त्रे बाजुला सारुन फाटक्या तुटक्या, दीन- बापुड्या गरीब वारकऱ्याबरोबर पांडुरंगाच्या ओढीने पंढरीला जाणारी ही पहिलीच भारतीय उच्चविद्याविभूषित विदूषी आहे.

बाईंना फक्त ६५ वर्षाचे आयुष्य लाभले. ११ आॕगस्ट १९७० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. परंतु एवढ्या आयुष्यात कोणी शंभर वर्षे जगून होणार नाही एवढे संशोधन व वैचारिक लेखन केले, खूप भ्रमंती केली. खूप व्याख्याने दिली. परदेशात लौकीक मिळविला. शंभर वर्षांपूर्वी स्त्री असल्याचा कोणताही अडसर न मानता विद्वत्तेच्या उंच शिखरावर विराजमान झाल्या. सनातनी पुण्यातल्या भर रस्त्यावर भरधाव वेगाने स्कूटर चालवणारी, फर्ग्यूसन काॕलेजच्या प्राचार्य असलेल्या आपल्या नवऱ्याला “ए दिनू मी जाते रे” अशी एकेरी बोलणारी … या महाराष्ट्राच्या विद्वान सुपुत्रीला त्यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्य साष्टांग दंडवत.

लेखक : श्री. बी. एस. जाधव

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कानडावो विठ्ठलू….  लेखक : श्री सचिन कुलकर्णी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? वाचताना वेचलेले ?

☆ कानडावो विठ्ठलू….  लेखक : श्री सचिन कुलकर्णी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, ’हा अभंग सर्वाना परिचित आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेला अभंग आहे. या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा करनाटकु. पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि करनाटकु म्हणजे कर्नाटक राज्यात. पण मग ज्ञानेश्वरमहाराज का करतील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल.

 पण या शंकेचे निरसन झाले, ४/५ वर्षांपूर्वी मला श्री. हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात. तेव्हा त्यांनी या शब्दांचा अर्थ असा सांगितला … कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा आणि करनाटकु म्हणजे नाटकी, करणी करणारा असा. हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते. आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो वाचल्यावर पुन्हा एकदा गाणं ऐकत गाण्याच्या रसास्वाद घ्या. मनाला खूपच आनंद मिळेल.

 पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्नकिळा फाकती प्रभा। 

अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा ॥१॥

 … ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे तेजःपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे.

 कानडा वो विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियेला वेधु। 

खोळ बुंथी घेवूनी खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु॥२॥

… प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे? तर तेजःपुंज असा हा विठ्ठल, कानडा म्हणजे अगम्य, न कळणारा असा आहे. तो नाटकी (कर नाटकु) आहे. अवघ्या विश्वामधे विविध रुपात (पशु, पक्षी, माणूस सारे स्थिरचर) वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे? सगळ्यांच्या भूमिका हाच तर करत असतो. त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे. माझे मन मोहून गेले आहे. त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे. त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही. खोळ म्हणजे पांघरुण किंवा आवरण. प्रत्येक प्राणीमात्रांत तो आहे. विविध रुपाची कातडी पांघरुन (खोळ बुंथी घेवूनी), जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे. एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ पण देत नाही ( आळविल्या नेदी सादु ). असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू? विविध रुपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही. असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे.

 शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु। हे तव कैसेंनि गमे। 

परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेंनि सांगे॥३॥

 … प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत. आईला, ‘बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ‘, हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वहात असते. तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत? परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे मध्यमा, पश्यंती म्हणजे ह्रुदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परा वाणी. विठ्ठलाशी बोलताना परा वाणी सुद्धा मुक होते. बोलणे खुंटते. शब्दावाचून संवाद होतो. जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही, शब्दावाचून कळते तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे. न बोलता कळते. एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना? दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परा वाणीला जेथे सांगता येत नाही तिथे वैखरीला (जीभेला) कसे बरे सांगता येईल?

 पाया पडु गेले तव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभू असे। 

समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे ॥४॥ 

 …. या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू? पायावर डोके ठेवायला गेले तर पाउलची न दिसे. समोर पहावे तर उभा आहे. पण माझ्या समोर उभा आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून हेच समजत नाही. अशाप्रकारे हा मला सारखा फसवत (ठकचि) आहे, ठकवत आहे. आपल्या अवतीभवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे.

 क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनी स्फूरताती बाहो।

क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।आसावला जीव राहो॥५॥ 

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे बाहु स्फुरण पावताहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल.. त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठी घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली.

बाप रखमादेवीवरु हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला। 

दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये। तव भीतरी पालटु झाली॥६॥ 

… हा विठ्ठल बाहेर नसून हृदयात वसतो असे कळले म्हणून त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली तर काय माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच आत्मा तोच. जिकडे पहावे तिकडे तोच. विश्वात तोच, विश्वापलीकडे तोच नाना मुखवटे घेवून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे. जणू काही भोळा सांब. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस? माझ्यासारख्याला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय बसतोस, पाया पडायला आले तर पाउले लपवतोस, समोर- मागे येऊन काय ठगवतोस, क्षेम(मिठी) द्यायला गेले तर हृदयात काय लपतोस. … कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक (करनाटकु) करणारा आहेस आणि अनाकलनीय (कानडा) आहेस.

ज्ञानदेव स्त्री(प्रकृती) भावाने विठ्ठलाशी(पुरुष =परमात्मा) बोलतात. हे बोलणे म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडे त्याची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध केला आहे.

लेखक : सचिन कुलकर्णी 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अलौकिकाच्या पालखीबरोबर… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ अलौकिकाच्या पालखीबरोबर… ☆ श्री सुलभा तेरणीकर

शाळा सुटली तेव्हा पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा निरोप घेताना कविताशाखेची एक मुळी बरोबर घेतली होती. पुढे महाविद्यालयाच्या प्रांगणात ती चांगलीच बहरली. साहित्याची विद्यार्थिनी नसूनदेखील कवितेचे प्रेम अखंड राहिले. इंदिरा संत, महानोर, ग्रेस, आरती प्रभू, पाडगावकर यांच्या कवितांनी दिवस नुसते घमघमत होते. 

ग्रंथालयाच्या प्रतीक्षायादीसाठी किती अधीर असायचे मन ! संग्रह पटकन हाती पडायचे नाहीत. मग उधार-उसनवारी, मिनतवारी करावी लागे. कविता क्वचित कानी पडत आणि पुन्हा वाट पाहणे संपत नसे. 

‘गडद नीलिमा चष्म्यावरचा, शर्टावरची बटणे काळी’… इंदिरा संतांच्या कवितेतल्या इंद्रधनूवर रेलणारी सुरंगा आपणच आहोत, असा भास होई, ‘तो चहा गुलाबी, ती चर्या खळाळणारी…’ असे काही वाचताना धूसर स्वप्नांची वाट आता दूर नाही, असे वाटे. आरती प्रभूंच्या ‘माझी वस्त्रं तुझी झाली’ या ओळींवर पतंग होऊन मन झेपावत असे. पाडगावकरांची ‘जांभळी नीज ये’ रेंगाळत राही. बोरकरांची ‘पाठमोरी पौर्णिमा’ शोधून वाचली जाई. 

‘पाठमोरी तू बीजेची रात्र, लावण्ये रमा हासुनी पाही वळोनी,

होऊ दे ना पौर्णिमा…’

दुर्बोधतेच्या घनवनाची तमा न बाळगता ग्रेसच्या कविता शोधायची अनिवार हौस फिटतच नसे. 

‘शून्यात गर्गरे झाड तशी ओढाळ  दिव्यांची नगरी 

वक्षात तिथीचा चांद तुझा की वैरी … ‘

…. या ओळींवर फिरफिरून नजर जात असे. महानोरांच्या रानाने तर साद घातलेली होती. राजबन्सी पाखराने खुणावले होते. हिंदी-मराठी चित्रपटगीतांतून, भावगीतांतून कविता भोवती रोषणाई करीत असे. गदिमांच्या गाण्यातले कडवे मनात अधोरेखित करीत असे. 

‘प्रिय नयनातील भाव वाचता 

चुकून दिसावा मोर नाचता 

दूर देशीचे बुलबुल यावे कधीमधी पाहुणे… ‘

… त्यातले छंद-प्रास आवडत, की शब्दांतून साकारणाऱ्या दृश्यांचा मोह अनावर होई, की नाद ओढ लावीत;ते कळायचे नाही. आपल्या कोवळ्या तारुण्याची जादू असावी, की काय, असेही वाटे. मग आपणही कविता कराव्यात, असे वाटे. जमिनीवर पाय काही ठरायचे नाहीत. 

त्यातच पुढे साहिरचे ‘तल्खियॉं’ हाती आले. त्यातल्या दाहकतेने चटका लावला. 

‘तेरे पैराहने रंगोंकी जुनूखेज़ महक 

ख्वाब बन बनके मेरे ज़हन में लहराती है ,

रात की सर्द  खामोशी में हर इक झोंके से 

तेरे अनफ़ास, तेरे जिस्म की ऑंच आती है

‘तुझ्या रंगीत वसनांचा उन्मादक गंध एखाद्या स्वप्नासारखा तरळतो. रात्रीच्या नि:शब्दतेत थंड झुळकीबरोबर तुझ्या श्वासांची, शरीराची दाहकता जाणवतीय.’ 

असे काही वाचल्यावर माझ्या सुसंस्कृत मनाच्या भिंती थरथरल्या. इंदिरा संतांच्या कवितेतल्या मणिबंधावर उतरणाऱ्या खुळ्या  पाखरासारखी मी धडधडत राहिले. 

आता पुढची कथा सांगायला हवी. मोठ्या वादळात कवितांची घरटी पार उध्वस्त झाली. छंद हरवले. शब्द निमाले. आवडीच्या कवितांचा संग्रह जवळ असावा, हे विलासी स्वप्न दूर-दूर जात राहिले. आकडेमोड, खर्चाची तोंडमिळवणी, देणी-घेणी, दुखणीबाणी यात किती चंद्र-सूर्याचे उदयास्त होऊन गेले, ते कळले नाही. बधिरपणातून सावरेपर्यंत बरीच चढण चढले. एखाद्या शांत पांथस्थाने झाडाखाली क्षणभर बसावे, तशी थोडी थांबले आणि कवितेची सृष्टी पुन्हा एकदा जवळ केली. जमेल तसे एकेक कवितासंग्रह घरी आणत गेले. रात्री उशागती दिव्याच्या सोबतीने कवितांची उजळणी करू लागले. सरत्या चैत्राच्या उत्तररात्री असते, तशी नक्षत्रांची आरास कुठली असायला? मंद दिव्याची सोबत पुरत असे. कळ्या-फुलांचे बहर नव्हते. वाळलेल्या काटक्यांच्या समिधा मात्र होत्या. 

स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीतली असल्याने कुसुमाग्रजांच्या क्रांतिघोषाच्या जयजयकारापासून, धगधगत्या यज्ञज्वाळेपासून दूर चालत आले होते खरी; पण आता त्यांची कविता माझ्यापाशी होती. 

‘नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगावरून उतरवीत ती माझ्यासमोर उभी राहिली… आणि अखेर देहाला बिलगलेलं झिरमिर आवरणही तिनं दूर फेकून दिलं…

निरभ्र सोलीव रूपाकडे पहात कवीनं विचारलं-

‘तू कोण?’

ती हसून उद्गारली – ‘मीच ती तुझी कविता !’

अखंड पाषाणातल्या सावळ्या मूर्तीसारखी कवीची कविता माझी झाली. वृत्तछंदाचे अलंकरण आता उरले नव्हते. प्रासाची पैंजणे नव्हती … ‘निशिगंध’ वाचत गेले. 

‘आणि अंतराळातील कृष्णविवरासारख्या असीम शून्यावस्थेत 

माझ्या असलेपणाची आरास..’

 …. असलेपणाची आरास? अवघ्या विश्वातले आपले चिमुकले अस्तित्व हाच उत्सव, तर मग जीवन हा तर नित्य आनंद सोहळा… माझ्या प्रौढपणीच्या पाठयपुस्तकातले पान  मोहरून उठले. व्यक्तिगत सुखदु:खाच्या संदर्भातले कवितेचे भान वैश्विक स्तरावर उंचावले गेले. त्याच्या पाऊलखुणा शोधत राहिले… 

‘विसरल्या उन्हातिल वाटा, विसरले पथातील काटे 

ही गुहा भयावह आता स्वप्नांसम  सुंदर वाटे

रसभाव भराला आले काव्याहून लोभसवाणे’

…. गदिमांच्या सहज सुचलेल्या मंजुळ गाण्याने काहीतरी सांगितले. बोरकरांची ही कवितादेखील काही कुजबुजून गेली….  

‘येते उदासता कधी ओल्या काळोखासारखी,

मध्यरात्री तिची पण फुले नक्षत्रपालवी…’

… दिवा मंद तेवताना ही रोषणाई कसली अन भोवती हा कोलाहल कसला? तो तुमच्या-आमच्या ‘असण्याचा’ सोहळा आहे. कवितेच्या अलौकिकतेच्या पालखीबरोबर दोन पावले चालायचे आहे ना… सर्वांच्यासह…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ कृष्णा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

(दहीकाल्याच्या निमित्ताने…)

कृष्णा, बंदी वासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदीवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्याबरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले, आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास! इतर गोकुळ वासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करता तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दृष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध, दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडलीस, सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं! थोडा मोठा झाल्यावर सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुरेचे राज्य मिळवलेस!

तारुण्य सुलभ भावने ने स्वयंवरासाठी गेलास, तुला द्रौपदीची आस होती का ?की पुढे काय घडणार याचे दृश्य रूप  तुला दिसले होते ?त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा “सखा” बनलास! दुर्गा भागवत म्हणतात की, मित्र या नात्याला “सखा” हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील हे नाते तू अधिक उदात्त केलेस! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव- पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास, योद्धा म्हणून नाही तर सारथी बनून!एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘सूतपुत्र’ म्हणून नाकारले,! सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर असतो हे तिने दाखवून दिले, पण शेवटी युद्धात तू सारथी  बनून जी पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्त्वाचा असतो हे द्रौपदीला दाखवून दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच देवरूप आणि मानव रूप यांच्या सीमेवर होतं! जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगात रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ, मथुरा सोडून द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलं म्हणून तुला ‘रणछोडदास’ नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्यांशी विवाह करून तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्ला च्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा,

तुझे नाव घेतले की आपोआपच गुणदोषातून मुक्ती मिळते असं वाटतं! कारण आपण काहीही घडलं तरी “कृष्णार्पण” असा शब्द वापरून ते संपवतो. सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या स्मरणात!

तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो, तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो. कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तृत्वाचा जन्म होणार असतो. आजचा गोपाळकाला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात! पावसाच्या सरींबरोबरच पुढील वर्ष आनंदात जाऊ दे हीच इच्छा आपण प्रकट करतो . चार वर्षांपूर्वी आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण किंवा परमेश्वराचे अस्तित्व न मानणारे “कोरोना” पुढे शरणागत झाले होते .तेव्हा माणसाच्या लक्षात आले की विज्ञानाने  कितीही मात केली तरी एक “हातचा “तुझ्याकडे, परमात्म्याकडे आहे हे मात्र आपण मान्य केले पाहिजे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुखी व्हायचं आहे का ? मग — लेखक – श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुखी व्हायचं आहे का ? मग — लेखक – श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

“कर्मा रिटर्न्स” हे विसरू नका !

एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. 

अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला “आधी आत तर जाऊया” असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, “गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू  तिथं थोडा आराम कर” असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. 

नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. 

*

हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, “मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे”

तो म्हणतो, “हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ”

त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात. 

त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात. 

हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. “मी बघतेच त्यांच्याकडे” असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, “तू आत जा. बाकी सोड माझ्यावर”

असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. 

*

असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात. 

अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. 

नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो. 

शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, “आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?”

तर तो तरुण म्हणाला, 

ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.

तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली, 

उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स”

असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. 

*

डीडी क्लास : मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही. 

“अमुकने माझ्या आयुष्याचे वाट्टोळे केले”

असं काहीजण म्हणतात. पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाट्टोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल. 

कर्म हे असे एक हॉटेल आहे, जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.

तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेले असते.

कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी सांगतो अन थांबतो. 

“दाग तेरे दामन के धुले न धुले 

नेकी तेरी कही तुले न तुले 

मांग ले गलतियो की माफी 

कभी तो खुद से ही  

क्या पता ये आँखे 

कल खुले न खुले !

 

लेखक : श्री धनंजय देशपांडे

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares