मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – १ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – १ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

३१ मार्च… भारताच्या पहिल्या एम. बी. बी. एस. महिला वैद्य अर्थात लेडी डॉक्टर म्हणून प्रचंड गाजलेल्या मराठमोळ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन

जन्म: ३१ मार्च १८६५, पारनाका, कल्याण.

मंडळी, काय एकेक रत्ने होऊन गेली या मराठी मातीत. भक्ती, शक्ती, स्वातंत्र्य, कला, नाट्य, चित्रपट, उद्योग, शिक्षण असे कोणतेही क्षेत्र असो मराठी माणसाने कायम आपले पहिले पाऊल टाकले आहे. पण हल्लीचे नास्तिक आणि तथाकथित पुरोगामी नतद्रष्ट राजकारणी या सर्व उच्च व महान व्यक्तींना समाजात जातीपातीचे विष पेरत सामान्य जनतेच्या मनात विशिष्ट जातीत टाकून संपवण्याचे काम करत आहेत. आजच्या उत्सवमूर्ती आनंदीबाई जोशी या त्यापैकीच एक महान व्यक्तीमत्व आहे. कल्याण तालुक्यातील पारनाका गावात सरकारी खात्यात काम करणारे गणपतराव अमृतेश्वर जोशी आणि गृहिणी गंगाबाई जोशी या मध्यमवर्गीय को. ब्रा. दांपत्याच्या पोटी ज्येष्ठ अपत्य म्हणून आनंदी हे कन्यारत्न जन्मले. आनंदीबाईंचे पाळण्यातले नाव यमुना होते. पुढे वयाच्या ९व्या वर्षी २० वर्षांनी मोठे आणि पुण्यातील मुख्य टपाल कचेरीत (सिटी पोस्ट) कारकून असलेले गोपाळराव जोशी या बिजवराशी आनंदीबाई विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतर गोपाळरावांनी पत्नीचे नाव आनंदी ठेवले. आनंदीबाई १४व्या वर्षी गरोदर राहील्या आणि पोटी एक मुलगा जन्मला. पण दुर्दैवाने पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने केवळ १० दिवसातच आनंदीबाईंचे बाळ दगावले. या घटनेने प्रचंड व्यथित झालेल्या आनंदीबाई खूप व्यथित झाल्या. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षण घेण्यास कारणीभूत ठरली. पत्नीला शिक्षणाची आवड आहे हे गोपाळरावांनी बरोबर ताडले. त्याकाळी विविध विषयांवर लोकहितवादींची शतपत्रे हे मासिक प्रकाशित व्हायचे. गोपाळराव शतपत्रे नियमित वाचत असत. शतपत्रात आलेल्या एका सदरावरून गोपाळरावांनी प्रेरणा मिळाली आणि त्यांनी पत्नीस इंग्रजीचे शिक्षण देण्याचा निश्चय केला. गोपाळरावांची टपाल खात्यात नोकरी असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. कोल्हापूर, मुंबई, भूज, कलकत्ता, बराकपूर, श्रीरामपूर (बंगाल) इ. ठिकाणी गोपाळरावांच्या बदल्या झाल्या. प्रत्येक वेळी आनंदीबाई पतीसोबत गेल्या. गोपाळराव आनंदीबाईंना शिकवित असत. कोल्हापूरात असताना गोपाळरावांची ख्रिस्ती मिशनऱ्यांशी ओळख झाली. मिशनऱ्यांच्या लोकांशी चर्चा केल्यावर गोपाळरावांच्या मनात आनंदीबाईंना अमेरिकेत पाठवून प्रगत शिक्षण द्यावं असं आलं. तसे तर गोपाळरावांना स्वतःलाही अमेरिकेला जायची इच्छा होती, परंतु त्यांना जमू शकलं नाही. आनंदीबाई अतिशय बुद्धिमान होत्या आणि त्या एकपाठी होत्या. आनंदीबाईंनी इंग्रजीसह अन्य विषय पटकन आत्मसात केले. पण आनंदीबाईंना अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे तशी व्यवस्था करण्यात आणि आनंदीबाईंच्याबरोबर कोणीतरी सोबत जायला शोधण्यात गोपाळरावांची २-४ वर्षे गेली. याचा सुगावा समाजात लागला त्यामुळे आनंदीबाईंना समाजात, शेजाऱ्यापाजाऱ्यांत विचित्र आणि विपरीत अनुभव आले. त्याकाळी नवरा बायको असे फिरायला सहसा जात नसत त्यामुळे आनंदीबाई गोपाळरावांबरोबर फिरायला जातात, इंग्रजी शिक्षण घेतात याचे कुतूहल म्हणून या जोडप्याला पाहायला लोक गर्दी करत असत. लोक गोपाळरावांना ठीक ठिकाणी गाठून विचारत असत की तुम्ही ही ठेवलेली बाई आहे का? या सर्व प्रकाराने आनंदीबाईंना खूपच मनस्ताप होत असे आणि अपमानास्पद वाटत असे. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदीबाई आपला अभ्यास निष्ठेने करत असत. पुढे श्रीरामपूर (बंगालमधलं) येथे असताना गोपाळरावांनी आनंदीबाईना अमेरिकेला पाठवायचं नक्की केले. आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन वैद्यक शास्त्र शिकायचं अस ठरवलं. पण या आधीची घटना विस्मयकारक होती. ते साल होतं १८८०. न्यूजर्सीतल्या रोशेल या गावातील श्रीमती कार्पेंटर या एकदा त्यांच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. तिथे पडलेलं मिशनरी रिव्ह्यू नावाचं मासिक त्यांनी सहज चाळायला घेतलं. त्यात गोपाळराव जोशी व आर.जी. वाईल्डर यांची पत्रं छापून आली होती. त्यावरून कार्पेंटरबाईंना समजलं की गोपाळ जोशी हे आपल्या पत्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायच्या प्रयत्नात आहेत. कार्पेंटरबाईंच्या मनात न पाहिलेल्या आनंदीबद्दल अतीव स्नेहभाव जागृत झाला. त्यावेळी अजून एक विस्मयकारक घटना घडली. कार्पेंटरबाईंना एक नऊ वर्षांची आमी नावाची मुलगी होती. आमी आईला म्हणाली आई, मला स्वप्न पडलं की तू हिंदुस्थानात कुणाला तरी पत्र पाठवत आहेस. कार्पेंटरबाई चकित झाल्या. गोपाळराव जोशी यांना पत्र पाठवण्यापूर्वी कार्पेंटरबाई नकाशात कोल्हापूर शोधत होत्या. (कारण मासिकातलं गोपाळ जोशींचं पत्र कोल्हापूरहून पाठवलेलं होतं). तेव्हा कार्पेंटरबाईच्या मनात भारतातील शहरं असा विचार होता. परंतु मुलीने येऊन हिंदुस्थान हा शब्द उच्चारला हे कसं? तिला तर काहीच ठाऊक नव्हतं. सर्वच आक्रित होतं. पुढे कार्पेटरबाईनी पत्रव्यवहार करून आनंदीबाईंशी स्नेहसंबंध जोडले. आनंदीबाई कार्पेंटरबाईना मावशी म्हणून संबोधत असत. कार्पेंटरबाईच्या आधारामुळे आनंदीबाईंना अमेरिकेत पाऊल टाकता आलं. कार्पेटरबाई आनंदीबाईना आनंदाचा झरा म्हणत. अमेरिकेत जाण्यापूर्वी श्रीरामपूरच्या (बंगाल) बॅप्टिस्ट महाविद्यालयाच्या सभागृहात आनंदीबाई जोशींनी मी अमेरिकेत का जाते या विषयावर सुमारे ५०० श्रोत्यांपुढे अगदी अस्सल मराठी ब्राह्मणी पेहरावात (नऊवारी पात्तळ) उभे ठाकून अस्खलित इंग्रजीत व्याख्यान दिलं. आनंदीबाईंचं हे भाषण खूप वाचण्यासारखं होतं. पृथ्वीच्या पाठीवर हिदुस्थानाइतका मागासलेला देश दुसरा नाही. देशातील लोकांना आपल्या गरजा पूर्ण करताना स्वावलंबन करता येत नाहीत. वैद्यकशास्त्र स्त्रियांची हिंदुस्थानच्या प्रत्येक भागात खूप जरुरी आहे. सभ्य स्त्रिया पुरुष वैद्याकडून चिकित्सा करून घेण्यास इच्छुक नसतात. असे महत्त्वाचे मुद्दे आनंदीबाईनी श्रोत्यांसमोर मांडले. त्यामुळे भारतात महिला डॉक्टरांची किती नितांत गरज आहे हे ओळखून आनंदीबाई डॉक्टरची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या. पण अमेरिकेत जाताना प्रत्येक ठिकाणी आनंदीबाईना सतत संघर्ष करावा लागला. १८८३ साली १८व्या वर्षी एका अमेरिकन बाईच्या सोबतीने आनंदीबाईंनी दोन महिने जहाजाने प्रवास करत एकाकी प्रवास केला. 

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद… – लेखक : डॉ. अशोक माळी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आनंद… – लेखक : डॉ. अशोक माळी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन. माझा जुना पेशंट असावा. सोबत त्याचे वडीलही होते. मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलई पेढे. मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला.   बापानंही त्याचं अनुकरण केलं.

“मुलगा दहावी पास झाला.” बाप बोलला.

“अरे वा, छानच की!….किती मार्क मिळाले?” मी विचारलं.

“बासष्ट टक्के आहेत.” मुलगा बोलला.

“फर्स्ट क्लास मिळालाय त्याला.” बापानं कौतुकानं मुलाच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं.

“चांगले मार्क आहेत.” मी म्हटलं.

“मग काय तर?….गेल्या वर्षी पन्नास टक्के होते. एका वर्षात बारा टक्क्यांची प्रगती म्हणजे चेष्टा नाही.”

“खूपच छान….आता पुढं काय करायचं ठरवलंय?” मी विचारलं.

“अजून ठरलं नाही. निकाल आलाय तेव्हापासून पेढेच वाटतोय….आम्हांला सगळ्यांना एवढा आनंद झालाय की बस्स….हा आनंद साजरा केला की बघू पुढं काय करायचं ते.”

आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत अप्पूची एक मैत्रीण आली पेढे द्यायला.

“किती मार्क पडले गं?” मी तिला विचारलं.

“नाईनटीफाईव्ह परसेंट.”

“अभिनंदन.” मी म्हटलं. मला वाटलं होतं की तिचे मार्क ऐकून तो मुलगा किंवा त्याचे वडील थोडे खजिल होतील. पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी त्या मुलीलाही पेढे दिले आणि अभिनंदन केलं. “खूप छान मार्क मिळवलेस पोरी, बापाचं नाव केलंस बघ.”  मुलाचे वडील बोलले.

ती मुलगी निघून गेली आणि मुलगाही बाहेर गेला.

“याच्या बऱ्याच दोस्तांनाही नव्वद पंचाण्णव टक्के मार्क आहेत. बासष्ट टक्के मार्क मिळवूनही आम्ही पेढे वाटतोय याचं त्यांना  आश्चर्य वाटतंय.तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात चांगले मार्क मिळालेत म्हणणाऱ्या…..बाकी सगळे ‘फक्त बासष्ट टक्के मार्क?’ या नजरेनं पाहत असतात.”

“हो ना?”

“खरं सांगू डॉक्टर?….प्रत्येक मुलाची एक कुवत असते….एक आवड असते. त्या मुलीला पंचाण्णव टक्के मार्क मिळाले म्हणून माझ्या मुलाला तितकेच मार्क मिळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे जगत असतो. आमच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे त्याला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बारा टक्के मार्क जास्त मिळालेत….. हा तर आनंदसोहळाच आहे की आमच्यासाठी.”

“खरं आहे. आपण आपली तुलना इतरांशी करून स्वतःच्या आनंदात विरजण टाकत असतो…..तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला.” मी म्हटलं.

“हे सगळं अनुभवातून शिकलो डॉक्टर. मी दहावीत असताना मला चाळीस टक्के मार्क पडलेले. त्यामानानं माझ्या मुलाला खूपच चांगले मार्क आहेत. मला चाळीस टक्के मार्क असताना मी त्याला बासष्टच टक्के मार्क का मिळाले म्हणून का रागवावं?”

“ग्रेट.”

“मला चाळीस टक्के मिळाले म्हणून माझे वडील मला लाख टक्क्याने बोलले होते…. माझ्या मोठ्या भावांना सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होते ना?”

“ते भाऊ आता काय करतात?”

“एक शिक्षक आहे आणि एक खाजगी नोकरीत आहे.”

“तुम्ही शेतीच करता ना?”

“हो ! वडिलार्जित दोन एकर होती आता वीस एकर आहे. मी स्वतः अठरा एकर घेतलीय. स्वतःची डेअरी आहे. खताची एजन्सी आहे. गेल्या वर्षी नुसता टोमॅटो चाळीस लाखांचा झाला….शंभर रुपये दर होता बघा तेव्हा टोमॅटोचा.”

आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत मुलगा आत आला आणि वडिलांना हाताला धरून घेऊन गेला.

माझ्या डोक्यात विचार आला की ही माणसं खरी प्रॅक्टिकल. जे आहे त्यात समाधान मानणारी. आनंद उधळणारी आणि आनंद वेचणारी…..आणि जीवनातलं यश अपयश हे केवळ दहावीच्या मार्कांवर अवलंबून नसतं हेही त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं!

लेखक : डॉ.अशोक माळी, मिरज

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाकी उरलेला गोयंकर बाब… – लेखिका – सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ बाकी उरलेला गोयंकर बाब… – लेखिका – सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(नुकतीच बा.भ. बोरकरांची पुण्यतिथी  झाली. त्यानिमित्ताने)

बा. भ. बोरकरांबद्दल काय लिहावं? त्यांची पहिली कविता माझ्या वाचनात आली ती अर्थात ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’. मराठी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शाळकरी किंवा महाविद्यालयीन गोयंकर विद्यार्थ्याने ही कविता आपल्या भाषणात कधी ना कधी म्हटलेली असतेच. मीही त्याला अपवाद नव्हते. चौथीत असताना गोवा स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाची सुरवात मी ह्याच कवितेने केली होती. अर्थात तेव्हा ती शाळेतल्या बाईंनी माझ्याकडून घोटवून घेतली होती. काव्यगुण वगैरे कळायचे वय नव्हतेच ते, पण त्यातल्या सहज सोप्या, त्या वयात उमजेल अश्या उपमा आवडल्या होत्या.

पण पुढे दहावी-अकरावीला येईपर्यंत बोरकरांची हीच कविता इतक्या शाळकरी बाळबोध भाषणांमधून ऐकली की  मला ती कविताच बाळबोध आणि शाळकरी वाटायला लागली. दोष कवितेचा नव्हता, कविता वापरून वापरून गुळगुळीत करणाऱ्या लोकांचा होता, पण एखादं भरजरी, गर्भरेशमी वस्त्र देखील रोज वापरलं तर चार-आठ दिवसात जसं कळकट आणि बोंदरं होऊन जातं तशी ही कविता मला त्या वेळी भासायला लागलेली होती.

पुढे मराठी भाषा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ’तेथे कर माझे जुळती’ आणि ‘जीवन त्यांना कळले हो’ ह्या सारख्या बोरकरांच्या कविता वाचल्या तेव्हा हळूहळू कळायला लागले की बोरकर कवी म्हणून किती मोठे आहेत ते. ह्याच दरम्यान कधीतरी त्यांची लावण्य रेखा ही कविता वाचनात आली आणि तेव्हा मात्र मी पूर्ण भारावून गेले. अगदी आजही ही कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत आणि बोरकरांची लावण्य रेखा ह्या माझ्या सर्वात आवडत्या मराठी कविता आहेत. त्यातले शेवटचे कडवे तर मला प्रचंड आवडते. 

‘देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातूनफाके शुभ्र पार्‍यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा’

त्याच्या पहिल्या दोन ओळी वाचून मला माझ्या आजोबांची आठवण होते. हाती आले ते आयुष्य घेऊन प्रामाणिकपणे जगले ते, आणि त्यातूनही जमेल तेव्हढे त्यांनी समाजासाठी केले. मी त्यांची सर्वात धाकटी नात, मी त्यांना पाहिलेच मुळी त्यांच्या पक्व म्हातारपणी, बरे-वाईट सर्व जीवनाच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्यावर स्थिरावलेल्या शांत डोहाप्रमाणे ते झाले होते त्या वेळी.

पुढे मीही मराठीत लिहायला लागले तेव्हा बोरकर मला वेगळ्या अर्थाने उमगायला लागले. माझ्या लेखनात माझ्याही नकळत काही कोंकणी शब्द डोकावून जातात, कुंपण हा शब्द मला येत नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा वंय ह्या शब्दाला पोफळीचा शिडशिडीत, सडपातळ गोडवा आहे. टाकळा ह्या मराठी शब्दाला एक कोरडा खडखडीत भाव आहे, पण त्याचेच कोपरे घासून गोलाकार केले की कोंकणीत ते रोप तायकिळो बनून लाडिकपणे आपल्या भेटीस येतं.

बाकीबाब बोरकरांचं सांगायचं झालं तर त्यांचं अस्सल गोयंकारपण बोरकरांनी कधीच सोडलं नाही. त्यांच्या कवितेतून भेटणाऱ्या अनेक  कोंकणी शब्दांमधून पदोपदी गोवा डोकावतो. एखाद्या वर्गात शिक्षक गणिताचे अवघड प्रमेय सोडवून दाखवत असतात, सर्व मुले एकाग्र चित्ताने ते प्रमेय उतरवून घेत असताना, एखादा खोडकर मुलगा फळ्यावर लक्ष द्यायचे सोडून वर्गाच्या खिडकीतून बाहेर डोकावत असतो आणि त्याच्यामुळेच तो वर्ग जिवंत वाटतो, नैसर्गिक वाटतो, तसे ते बोरकरांच्या कवितेतले खिडकीबाहेर डोकावणारे व्रात्य कोंकणी शब्द. त्या शब्दांशिवाय बोरकरांची कविता इतकी अर्थवाही आणि नादमधुर झालीच नसती.

फूल औदुंबरालाही येते, पण ‘आलिंगन चुंबनाविना हे मीलन आपुले झाले ग, पाहा पाहा परसात हरीच्या रुमडाला सुम आले ग’ ह्या ओळींमध्ये जी अर्थगर्भ गेयता आहे, अध्यात्माची सांवळी छटा आहे ती ‘पहा पहा बागेत हरीच्या औदुंबराला फूल आले गं’ ह्या ओळीत उमटलीच नसती.

गोव्याच्या सुरंगीच्या, जाईच्या, सुक्या मासळीच्या, पहिल्या पावसानंतर घमघमणाऱ्या तांबड्या मातीच्या खरपूस वासाने दरवाळणारी बोरकरांची कविता. गोव्याच्या तत्कालीन संस्कृतीचा, बोरीसारख्या जुवारी नदीकाठच्या, नारळी पोफळींनी नटलेल्या निसर्गरम्य गावात गेलेल्या बालपणाचा ठसा बोरकरांच्या लेखनात ठाई ठाई दिसतो. देवळातली भजने आणि चर्चच्या घंटा ऐकत बोरकर लहानाचे मोठे झाले.

हिंदू एकत्र कुटुंबातील गोतावळा, भरल्या घरचे सणवार, पोर्तुगीझ शिक्षणामुळे झालेली युरोपीय कवितेची  संस्कृतीची, जीवनपद्धतीची ओळख, बालपणापासून मराठी संत साहित्य, अभंग-भूपाळ्या नित्य कानावर पडत आल्यामुळे नकळतच मनात खोल रुजलेला भारतीय तत्त्वविचार आणि मुळातला सौंदर्यासक्त, रसलोलुप आणि तरीही अध्यात्माने भारावलेला पिंड ह्या सर्वांचे एकत्रित, अजब मिश्रण बोरकरांच्या कवितेत दिसते.

मी बोरकरांपेक्षा कितीतरी लहान, त्यांच्या नातवंडांच्या पिढीची. पण ज्या आणि जश्या वातावरणात बोरकर वाढले जवळजवळ तश्याच सांस्कृतिक वातावरणात मीही वाढले. बोरकरांची जडणघडण झाली ती पारतंत्र्याच्या जोखडाखाली असलेल्या गोव्यात. माझा जन्मच झाला स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग असलेल्या गोव्यात. राजकीय परिस्थिती वेगवेगळी असली तरी सांस्कृतिक परिस्थिती मला घडवणाऱ्या गोव्यात बरीचशी तशीच होती. त्यामुळे बोरकरांच्या कवितेतून डोकावणारा गोवा मलाही माझाच वाटतो.

१९३७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जीवनसंगीत ह्या बोरकरांच्या दुसरया काव्यसंग्रहातल्या कविता वाचताना मला हे खूप जाणवलं. ह्या संग्रहातल्या कविता ह्या बहुतांशी संस्कृतप्रचुर, तांब्यांच्या, केशवसुतांच्या कवितेची छाप असलेल्या. तरीही त्या कवितांमधून दिसणारे गोयंकार बाकीबाबांचे दर्शन फार लोभस आहे. कोंकणीत सांगायचे तर अपुरबायेचे!

इतुक्या लौकर न येई मरणा’ ही कविता म्हणजे एका सौंदर्यासक्त, जीवनावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक गोयंकाराचे हृदगतच आहे, ‘रेंदेराचे ऐकत गान, भानहीन मज मोडुनी मान, चुडतांच्या शेजेवर पडून भोगू दे मूक निःशब्दपणा’ ही इच्छा फक्त एक सच्चा गोयंकारच व्यक्त करू शकतो. रेंदेर म्हणजे माडाच्या झाडावर चढणारा आणि माडाच्या थेंबथेंब टपकणाऱ्या नीरेसाठी वर खाच करून तिथे मातीचे मडके लावणारा टॉडी टॅपर. ही नीरा पुढे माडाची फेणी करण्यासाठी आणि पावाचे पीठ आंबवण्यासाठी वापरली जाते. पायाच्या बेचक्यात माडाचे झाड कवटाळून तुरुतुरु वर चढणारा, कमरेला कोयती आणि मातीचे मडके बांधलेला रेंदेर हा माझ्याही पिढीने बघितलेला आहे.

ह्याच कवितेत बोरकरांनी झऱ्यासाठी वझरा हा खास कोकणी शब्द वापरलेला आहे. ह्याच कवितेतल्या ’तिखट कढीने जेवूनि घ्यावे मासळीचा सेवित स्वाद दुणा’ ह्या ओळी ऐकूनच पु. ल. देशपांडे ह्यांच्या आजीने, म्हणजे बाय ने बोरकरांना ’अच्च गोयंकार व्हो’ म्हणजे ‘सच्चा गोवेकर आहे हा’ हे सर्टिफिकेट दिले होते असा उल्लेख पुलंच्या त्यांच्या आजोबांवरच्या लेखात आहे.

जीवनसंगित मधल्याच ‘दवरणे’ आणि ‘मुशाफिरा’ ह्या दोन कवितांमध्ये बोरकरांनी ज्या उपमा आणि शब्द वापरले आहेत आणि जी शब्दचित्रे रेखाटली आहेत ती एकदम खास गोव्याची आणि त्यातही, बोरी गांवची आहेत. दवरणे किंवा कटे म्हणजे भारशिळा. पूर्वीच्या काळी लोक पाठीवर ओझे घेऊन मैलोनमैल चालत. तेव्हा त्यांना पाठीवरचा भार टेकता यावा, क्षणभर विश्रांती घेता यावी म्हणून वाटेवर असे  दवरण्याचे दगड किंवा कटे बनवलेले असत. गोव्यात जांभा दगड खूप. त्याच्या शीळा एकावर एक रचून बनवलेली हे कटे, एखाद्या रणरणत्या निष्पर्ण माळावर वाटसरुंची वाट पहात वर्षानुवर्षे उभे असत. खुद्द माझ्या कुंकळ्ळी गावात असे बारा कटे आणि त्याभोवती वस्त्या होत्या.

अश्या ह्या उजाड माळावरच्या एकाकी ‘दवरण्या’चे वर्णन बोरकरांनी ’शांत विरागी’ असे केले आहे, ज्यावर त्यांनीही आपल्या हृदयावरचे ओझे खाली ठेवून आपले कवीमन उघडे केले. ‘मुशाफिरा’ ही कविता म्हणजे तर बोरकरांच्या बोरी गांवचे रेखाटलेले एक विलक्षण चित्रदर्शी शब्दचित्र आहे. ‘सांज दाटली शिरी, परतली घरा भिरी, सांवळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा, स्तब्ध मार्ग तांबडा, वळत जाय वाकडा, मोडक्या पुलाकडून तार जाय बंदरा’ ह्या ओळींमधल्या प्रत्येक शब्दातून बोरकरांचे अस्सल गोयंकारपण दिसते. कातरवेळेचा स्वतःचा असा एक विलक्षण दुखरा, हळवा करणारा उदास मूड असतो तो ह्या ओळींनी अत्यंत समर्थपणे पकडला आहे.

ह्याच कवितासंग्रहातल्या ’वारुणी रात’ ह्या कवितेत बोरकरांनी शेतातली कापणी ह्या अर्थी ‘लुवणी’ हा खास गोव्याचा कोंकणी शब्द वापरलेला आहे. ‘अर्धे लुवल्या अर्धे  मळल्या अफाट त्या शेतात’ ह्या ओळीत जी नादमधुर गेयता आहे ती ’अर्धे कापल्या, अर्धे मळल्या’ ह्या ओळीत नसती उतरली. करवंटीच्या ऐवजी योजलेला करटी-वाटी हा शब्दप्रयोग तसाच गोव्याची आठवण करून देणारा आहे.

‘सागरा’ ह्या कवितेत त्यांनी समुद्राच्या लाटांचे वर्णन करताना हिरव्या-निळ्या ह्या शब्दप्रयोगाऐवजी, ‘पाचव्या-निळ्या’ ही विशेषणे वापरली आहेत. गोव्याच्या कोंकणीत हिरव्या रंगाला ’पाचवो’ म्हणतात. त्यात पाचूच्या रंगाचा हे अध्याहृत आहे. पुढे बोरकर एका ठिकाणी ’भीतीचा किंवाटा’ हा शब्दप्रयोग करतात. किंवाटा म्हणजे कोंकणीत आवेग, तो भीतीचाही असतो, प्रेमाचाही असतो. इथे लाटा ला यमक म्हणून बोरकरांनी किंवाटा हा शब्द वापरलाय.

संधीकाल ही कविता तर गोव्याच्या एका उन्हाळी संध्याकाळचे अतिशय सुंदर वर्णन करते. वसंत सरून गिम म्हणजे ग्रीष्म ऋतू सुरु झालेला आहे, परसातील आंबा ‘फळभारे रंगा’ आलेला आहे. कैऱ्या खायला तुरतुरीत खारींची येजा त्या आंब्यावर सुरु झाली आहे. ‘चपल चानिया धावत तुरतुर झटती सर्वांगा’ ह्या एका लयबद्ध ओळीत बोरकरांनी हे शब्दचित्र रेखाटले आहे. चानी म्हणजे कोंकणीत खार. खार हा शब्द न वापरता त्याऐवजी चानी हा खास कोंकणी शब्द वापरून बोरकरांनी अनुप्रास साधला आहे.

ह्याच कवितेत फुलपाखरासाठी त्यांनी ’पिसोळे’ हा खास कोंकणी शब्द वापरला आहे जो पुढेही त्यांच्या अनेक कवितांमधून दिसतो. ‘चपळ पिसोळी चतुर चोरटी भुरभुरती जवळी’ ह्या ओळीत संगीत आहे, लयबद्धता आहे जी ‘चपळ फुलपाखरे चतुर चोरटी’ ह्या शब्दप्रयोगात कधीच आली नसती.

बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्या थोर कवीच्या कवितेतून सर्व काव्यगुण वजा केले तरी जो बाकी उरतो तो गोयंकार बाब मला फार फार लोभसवाणा वाटतो.

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “थरथरला धरणीधर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “थरथरला धरणीधर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“नारायण! नारायण!… देवा खाली मर्त्य लोकात मानवांची गर्दी…जत्रा भरली जत्रा पाहिलीत का.!..  नजरं ठरतं नाही तिथवरं पसरलेली!…त्यांचा कुणी क्रिकेट नामक क्रिडेतला विजयी  शर्मणे नामविधान रोहीत, विराट सूर्य,ऋषभदेव , समुह तिथे अवतरणार आहे म्हणे त्या सगळया भक्त गणांना दर्शन देण्यासाठी!… कसलासा द्वि संवत्सराचा  विश्वाचा  रौप्य चषकाची विजयी श्री मिळवून आणली आहे त्यांनी त्याचा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेत सगळे!…अबब काय तो अलोट जनसागर!… त्यांच्या जयजयकाराच्या आरोळ्यांच्या ध्वनी कंपनाने येरु गडगडून  खाली कोसळला.त्यांची प्रचंड उर्जा नि शक्ती बघून  क्षीरसागर पण भयभीत होऊन आक्रसून मागे मागे हटला.! .. संध्यावंदनाच्या समयाला जन सागराच्या महाकाय  लाटांवर लाटां त्या तिथे येऊन धडका देऊ लागल्यात… खरी  भरतीची वेळ  क्षीरसागराची ,उचंबळून किनाऱ्यावर येऊन धडका देण्याची होती…पण त्या जनसागराचे ते महाप्रचंड रूप पाहून तो भयभीत झाला.. आपला काही टिकाव त्या पुढे लागणार नाही हे त्याला कळून चुकले म्हणून त्याने सपशेल माघार घेऊन शांत राहणे पसंत केले…रवीला देखील तो सोहळा ऑंखेदेखा हाल पाहायचा होता..पण त्याला दुसरीकडे अपाॅईटमेंट असल्याने थांबता आले नाही..बिचारा किरमिजी,तांबूस चेहरा करून हिरमुसून  निघून गेला…वरुणाने देखील हलकासा शिडकावा करत वातारणात तप्त मृतिकेचे सुंगंधी अत्तराचे सिंचन करण्यात धन्यता मानली… मरूतगण मंद मंद झुळूकेने वाहत असताना त्या जन सागराच्या आनंदाच्या लहरी लहरींना कुरवाळत राहिला आणि त्याचा मोद सगळ्या आसमंतात दूर दूर नेऊन पसरू लागला… संध्या रजनी हसत खेळत पदन्यास करत  अवतरली, तिच्या पायीचे नुपूर पदपथावरील दिव्यांत खड्या सारखे झळाळले…पदपथावरील झाडे लता वेली आपल्या माना उंच उंचावून सरसावली, आकाशीच्या प्रांगणात निळा मखमली जाजम अंथरला त्यावर शशांक आणि लखलखत्या चांदण्या दाटीवाटीने सज्जा सज्जातून तो सोहळा पाहण्यासाठी उत्सुक झाल्या…वसुंधरेवर पौर्णिमेचा चांदणचुरा उधळू लागल्या…हे देवेंद्रा !एक वारी ..लाख वारी विठोबाची पंढरपूरास निघालेली आणि दुसरी हि अनुपम्य वारी सोहळा  चाललेला पाहून… विजयी यात्रेचा  रथ  द्वारकेतून आणलेला पाहूनच  काही कलुषितानी कांगावा केला त्यांना मुळी  विजयी सोहळ्यात स्वारस्य नव्हतेच मुळी.. असं जरी असलं तरी जगज्जेतेपदाचा अश्वमेधाचा वारू  विचरून आलाय…मानवाने आता देवगणांची जागा घेतली की!… कोण विचारतोय तुम्हाला तुमच्या देवलोकाला!…  अब कि बार …मानव के लिए खुले स्वर्ग द्वार…आता तुम्हालाच त्यांचं मांडलिकत्व घ्यावं लागलं बरं.!.. असा हा भव्य दिव्य सोहळा पाहून डोळयाचे पारणे का बरं नाही फिटायचे!…त्या देवासाठी लाखावरी भक्त वेड्यासारखे धावून आलेत.. मानवाच्या राज्याचा विजयी डंका दुमदुमला…आणि  आणि देवळाचा  गाभारा काय आता अख्खं देऊळच रिते, ओस पडून गेले… संपली सद्दी आता तुमची देवा… हरी हरी म्हणत मानवाचा करा हेवा… मी त्यावेळीच तुम्हाला धोक्याची सुचना केली होती.. मानवाला अचाट बुद्धीचं वरदानं देऊ नका बरं.. तो दिवस दूर असणार नाही इंद्रालाच करील घाबरंघुबर… आता आला ना प्रत्यय आपल्या त्या घोड चुकीचा.. अहो असं ऐकलयं मानवांच्या राज्यात चुकीला माफी नाहीच…त्यांनी देखील आपली पूर्वापार चालत आलेली घटना कालमानानुसार  अपडेट करून घेण्यास सुरुवात केलीय ..चित्रगुप्ताला म्हणावं तुला देखील अपडेट व्हर्जन आणल्या शिवाय पर्याय नाही….आजवरी कुठल्या देवदेवतांच्या जत्रेला झाली नसेल ईतकी प्रचंड गर्दी  पाहून माझी छाती सुद्धा दडपून गेली… आता स्वर्गलोकी राहण्यात काहीच मतलब उरला नाही… आपला  जर उदो उदो करून घ्यायचा असेल पृथ्वी सारखे स्थान नाही… एकजात सगळे मानव कायमचं वेडानं झपाटलेले असतात… तिथं एकच अमर सत्य आहे दुनिया झुकती है बस् झुकानेवाला चाहिए… आणि त्यांची तर रांग न संपणारी आहे… देवा मी सुद्धा त्या रांगेत उभा राहायला निघालोय… तुम्ही येताय का कसे.. नाहीतर मला निरोपाचा तांबुल द्या.. हा मी मार्गस्थ झालो… नारायण ! नारायण!… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ छोटासा ब्रेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ छोटासा ब्रेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर

एकाच ऑफिसमध्ये काम करत असुनही रामची आणि माझी भेट बर्याच वर्षांत झाली नव्हती.त्या दिवशी अचानकच तो भेटला.ऑफिसमध्येच.दाढी थोडीशी वाढलेली.. कपाळावर भस्माचे पट्टे.इकडचं तिकडचं बोलणं झालं. म्हटलं.. चल चहा घेऊ.

तर तो म्हणाला.. नको माझं पारायण चालु आहे.

“अजुन करतोस तु पारायण?”

“हो वर्षातुन दोन पारायण करण्याचा नियमच आहे माझा. गुरुपौर्णिमा,आणि दत्त जयंती.”

हो.माहीत आहे मला. पण अजुनही करतो म्हणजे विशेषच की. होतं का वाचन या वयात?”

“हं..आता सगळेच नियम नाही पाळले जात. पण करतो. जसं जमेल तसं”

रामच्या घरी पुर्वीपासुनच दत्त भक्ती. आता ‘गुरुचरित्र’ पारायण करणं म्हणजे त्याचे अनेक नियम.पारायण करणार्याची अंतर्बाह्य शुचिर्भूतता..सोवळे,ओवळे..वाचनाची लय..पारायण काळातील आहार.. ते पांढऱ्या धाबळीवर झोपणे.. पारायणानंतरचे उद्यापन, महानैवेद्य.

हे सगळं रामकडुन आता या वयात कसं होत असेल?

“हे बघ..जेवढं जमेल तेवढं करायचं.आता मी वाचनही संध्याकाळी करतो.दिवसभर ऑफिस झालं की मग घरी गेल्यानंतर स्नान करून वाचनाला बसतो.तेही खुर्चीत. मांडी घालुन आता खुप वेळ नाही बसता येत.नियम म्हणशील तर या काळात बाहेरचं काही खात नाही. आपल्या कडुन होईल तेवढं करायचं.अखेर भावना मोठी.

कारण गुरुचरीत्रातच तर म्हटलंय..

‘अंतःकरण असता पवित्र..

सदाकाळ वाचावे गुरुचरित्र’

एकीकडे पारायण सुरु असतानाच वारकर्यांना ओढ लागते ती पंढरीची.शेतकर्यांनाही जरासा विसावा, चेंज हवाच असतो ना!आता आषाढ सुरु झाला. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या  पंढरपुरच्या वेशीजवळ येऊ लागतात.वर्तमान पत्रात फोटो, बातम्या येऊ लागतात.

पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थाटात स्वागत.

‘आज सासवड मध्ये पालख्या पोहोचल्या.

वाखरी  गावात रिंगण रंगले..

पंढरपुरात पालख्या दाखल..

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली.

एकंदरीतच आषाढ महीना म्हणजे थोड्याशा विश्रांतीचा.आपल्या नेहमीच्या रुटीनपासुन वेगळं काही करण्याचा.ईश्वरभक्ती करण्याचा.निसर्गाच्या जवळ जाण्याचा.छोटासा ब्रेक घेण्याचा.

बर्याच कुटुंबात एक परंपरा असते.आषाढ महीन्यात देवीला नैवेद्य अर्पण करण्याची.गावाच्या वेशीवर असलेल्या ग्रामदेवतेला खिर पुरीचा नैवेद्य दाखवायचा.पावसाळ्यात साथीचे आजार जास्त प्रमाणात पसरतात.मग आपल्या लहानग्यांना त्याची बाधा होऊ नये यासाठी देवीला साकडे घालायचे.हा नैवेद्य बनवणे यालाच अनेक घरांमध्ये ‘आखाड तळणे’ असं म्हटलं जातं.

एकेकाळी व्यापारी वर्गासाठी हा महीना  लाडका असायचा.म्हणजे बघा.. दोन तीन महीन्याची लग्नसराई आता संपलेली आहे. पुर्वी आषाढात लग्न होत नसायचे. तर लग्नसराईत चांगला धंदा झालेला.मुलांच्या शाळा आता रेग्युलर सुरु झाल्या आहेत.वह्या, पुस्तके, दप्तर वगैरे ची खरेदी पण आटोपली आहे. गाठीशी बर्यापैकी पैसा.दोन तीन महीने धावपळ, दगदग झालेली.अर्थात ती पण हवीहवीशी. 

तर आता या महीन्यात आराम करायचा. सगळा आसमंत हिरवागार झालेला आहे.बाहेर छान पाऊस पडतो आहे. गावागावांत तर  निसर्ग बहरलेला आहेच.पण शहरांच्या आसपासही हिरवाई पसरलेली आहे ‌छोटे मोठे धबधबे कोसळत आहे.वर्षा सहलीसाठी पर्यटकांचे थवे बाहेर पडत आहे.

अगदीच काही नाही तर आपल्या बाल्कनीत बसुन चहाचे घोट घेत पावसाचा  आनंद घ्यायचा.बस्स..आपल्यासाठी जगायचं.मग श्रावण सुरु झाला..सणवार सुरु झाले की आहेच सगळ्यांची धावपळ.

आषाढात गिर्हाईकी नाही.. धंदा शांत.पण त्याचा खेद करायचा नाही. कारण त्या पिढीतल्या लोकांचं म्हणणंच असायचं..

‘आषाढ मंदा..तो सालभर धंदा’

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘थॅंक यू डॉक्टर…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘थॅंक यू डॉक्टर…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

(‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून)

डॉ. बी.सी. रॉय

नमस्कार मैत्रांनो!

“आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतीचा पाया रचणारे डॉ. विल्यम ऑस्लर यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, ‘चांगला डॉक्टर रोगावर उपचार करतो; महान डॉक्टर हा रोग असलेल्या रुग्णावर उपचार करतो.”           

डॉ. बिधान चंद्र अर्थात डॉ. बी.सी. रॉय (१ जुलै, १८८२ – १ जुलै, १९६२) हे MRCP, FRCS या परदेशातील सर्वोत्तम पदव्यांनी अलंकृत असे निष्णात डॉक्टरच नाही तर आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी होते. ते आधुनिक पश्चिम बंगालचे प्रणेते आणि दुसरे मुख्यमंत्री (१९४८-१९६१) होते. १९६१ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. १ जुलै १९६२ रोजी रॉय ह्यांचे त्यांच्याच जन्मदिवशी निधन झाले. १९९१ पासून भारतात १ जुलै हा त्यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन आपण ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा करतो.   

मी शपथ घेतो की….. डॉक्टर म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्याला लढायचे असते ते रोग्याच्या आजाराशी. डॉक्टरांची ‘आचारसंहिता’ पूर्वापार चालत आलेली आहे. याबाबत एक उदाहरण आठवले. प्रत्यक्ष रावण पुत्र इंद्रजिताने लक्ष्मणावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्याने लक्ष्मण बेशुद्ध पडला होता. या निकराच्या लढाईत देखील, बिभाषणाच्या सांगण्यावरून रामाने सुषेण या रावणाच्या राजवैद्याला पाचारण केले. राज्याच्या आचारसंहितेपेक्षा आपल्या वैद्यकीय व्यवसायाची ‘आचारसंहिता’ पाळीत सुषेणाने हनुमानाद्वारे आणल्या गेलेल्या संजीवनी औषधीचा योग्य उपयोग करीत लक्ष्मणाला मृत्यूच्या द्वारातून परत आणले. आश्चर्य असे की रावणाने यावर आक्षेप घेतला नाही. हिप्पोक्रेटस असो वा चरकाची शपथ, त्यातील सर्वात प्रमुख गोष्ट आहे, “एक डॉक्टर म्हणून माझे प्रथम कर्तव्य रुग्णसेवा हेच असेल. यापरीस कुठलीही बाब माझ्या दृष्टीने गौण आहे.” मंडळी, दुसऱ्या महायुद्धात चिनी सैनिकांसाठी चिकित्सक म्हणून गेलेल्या निस्वार्थ डॉक्टर कोटणीस यांचे चीन मध्येच वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी प्लेगच्या साथीत रुग्णसेवा करतांना त्याच आजाराने निधन झाले. आपले चीनशी कितीही राजनैतिक वैर असू दे, पण संपूर्ण चीन देशासाठी डॉक्टर कोटणीस हे आजही श्रद्धास्थान आहेत. 

मेडिकल शिक्षण आणि वैद्यकीय उपचार सेवा तेव्हां अन आता- ‘आमच्यावेळी असे नव्हते हो! तेव्हाचे डॉक्टर म्हणजे साक्षात देवच! आता तर नुसता बाजार झालाय!’ मंडळी, लक्षात असू द्या, बदल हाच जीवनाचा स्थायी भाव आहे. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सरकारी मेडिकल कॉलेजेस सुरु झालीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे डॉक्टर पेशंटचे प्रमाण १:१००० असायला हवे. आपल्या देशाच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून १९८०च्या दशकात खाजगी महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. मार्च २०२४ मधील (नॅशनल मेडिकल कौन्सिल) च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण ७०६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी ३८६ सरकारी आहेत तर ३२० खाजगी आहेत. डॉक्टर पेशंटचे प्रमाण आपल्या देशात १: ९००, म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांपेक्षाही चांगले आहे. 

मी दोनही क्षेत्रात कार्य केले आहे. इथे मला सर्वात मोठा फरक जाणवतो ते उपलब्ध निधीचा. सरकारी रुग्णालयातील पायाभूत सुविधा कमी, डॉक्टरांची संख्या कमी, (रिक्त जागा हे कायमचे दुखणे) मात्र एका बाबतीत सरकारी क्षेत्र दुथडी भरून वाहते, ते म्हणजे पेशंटची संख्या. गरीब रुग्ण अजूनही सरकारी दवाखान्याचा आधार घेतात. बहुतेक प्रायव्हेट दवाखान्यात पेशंटची आवक कमी! सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भरपूर पेशंट बघायला मिळतात. यात अपवाद नक्कीच आहेत. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातही हुशार विद्यार्थी आहेत. शेवटी चिकाटी, मेहनत आणि जिज्ञासू वृत्ती ही महत्वाची. अतिशय वेदनादायी भाग म्हणजे भरमसाठ फी भरून ‘मॅनेजमेंट कोट्यात’ आपल्या पाल्याला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात घालणारे पालक. जिथे सुरुवातच ‘मेडिकल सीट’ विकत घेण्यापासून होते, त्या विद्यार्थ्याच्या भविष्यकालीन ATTITUDE विषयी मी काय बोलावे?

आता उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांमुळे डॉक्टर आणि पेशंटमधील दरी रुंदावत चालली आहे. कट प्रॅक्टिस, अनावश्यक वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांच्या फीमधली तफावत, पंचतारांकित रुग्णालयाकडे डॉक्टर आणि पेशंट्सचा वाढता कल, डॉक्टरांनी गावात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे टाळणे, एक ना दोन! बघा मंडळी, डॉक्टर समाजाचाच एक हिस्सा आहे. जिथे सामाजिक निष्ठा आणि नैतिकतेचे सर्व क्षेत्रात अवमूल्यन होते आहे, तिथे डॉक्टर त्याला अपवाद कसे असतील? समाज म्हणतो, “डॉक्टरांनी त्यांच्या पांढऱ्या कोटासारखी स्वतःची स्वच्छ प्रतिमा जपायला हवी!” मात्र कांही घटना अशा घडतात की दवाखान्यात आणण्याआधीच पेशंट सिरीयस होता, डॉक्टरांनी शक्य ते सर्व उपचार केले, पण हाताबाहेर गेलेला आजार पेशंटचा बळी  घेऊन गेला! अशा परिस्थितीत शोकमग्न नातेवाईकांचा क्रोध अनावर होऊन त्यांनी डॉक्टरला मारहाण करणे आणि त्याच्या क्लिनिकची तोडफोड करणे हे योग्य नव्हे.

एखाद्या दवाखान्याची गुणवत्ता तपासायची असेल तर त्यासाठी एक महत्वाचा निकष म्हणजे डॉक्टर मंडळी रोग्याची तपासणी सरासरी किती वेळ करतात. ‘तेव्हा’ आणि ‘आता’ यामध्ये बराच फरक पडला आहे. तेव्हांची फॅमिली डॉक्टरची संकल्पना अतिशय उत्कृष्ट होती. बहुतेक डॉक्टर्स पदवीधर असायचे (MBBS, RMP, LMP, Homeopath, Ayurvedic). मात्र त्यांच्या हाताला ‘गुण’ होता, मोजकीच बाटलीबंद औषधे, गोळ्यांच्या पुड्या आणि अगदी क्वचित इंजेक्शन यात त्यांचे उपचार बंदिस्त असायचे. रोग्याची संपूर्ण हिस्टरी, सखोल तपासणी, अनुभवाने आलेले वैद्यकीय ‘ज्ञान’, उपजत आणि कमावलेली सेवावृत्ती, यातून बहुदा अचूक निदान साधले जात होते. वैद्यकीय चाचण्या गरज असल्यास क्वचित व्हायच्या. परंतु याहून अधिक होता तो त्यांचा रोगी आणि त्याच्या नातेवाईकांशी सतत सुरु असलेला सुसंवाद, आश्वासक नजर आणि प्रेमळ वागणूक! त्यांच्या निदानाविषयी आणि दिलेल्या उपचारावर रोग्यांचा पूर्ण विश्वास असायचा. यातूनच बरे झाल्यावर अनुभवांती पेशंट डॉक्टरला खुशाल मनाच्या देव्हाऱ्यात बसवायचे. या विश्वासामुळे रोगी आज्ञाधारक बाळासारखे डॉक्टरची प्रत्येक सूचना अंमलात आणत असत. तंत्रज्ञान तितकेसे विकसित नसूनही ‘क्लिनिकल जजमेण्ट’ जबरदस्त असायचे. 

‘क्लिनिकल जजमेंट’ (चिकित्साविषयक निर्णयक्षमता)  

डॉ. विल्यम ऑस्लर म्हणतात, “वैद्यकीय उपचार ही दवाखान्यात प्रत्यक्ष काम करून शिकण्याची कला आहे, क्लासरूममधील धडे गिरवून ती साध्य होत नाही! आजकालचे वैद्यकीय शिक्षण पुस्तकी ज्ञानाच्या आहारी गेले आहे. प्रत्यक्ष व्यावहारिक वैद्यकीय ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. म्हणून भरगच्च आधुनिक वैद्यकीय चाचण्यांवर भर दिला जातोय. मात्र गेल्या ४-५ वर्षांपासून रोग्याशी ‘सुसंवाद’ साधण्याचे ‘शिक्षण’ मेडिकलच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षांपासून देण्यात येत आहे. 

एक गोष्ट मला प्रकर्षाने मांडायची आहे की मार्कांसहित मेडिकल शाखेकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा खरोखरच मनापासून कल (aptitude and ability) आहे कां हे निरपेक्ष वस्तुनिष्ठ चाचण्या घेऊन ठरवले पाहिजे. हे कां तर एक विद्यार्थ्याला डॉक्टर बनवण्यासाठीचा ७० % खर्च समाज उचलत असतो. मग पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांनी समाजाला १००% उत्तम वैद्यकीय सेवा देणे हे उपकार नव्हेतच, तर ते डॉक्टरांनी फेडायचे समाजऋण आहे, अगदी बँकेतून एजुकेशनल लोन काढून तो हफ्ते भरतो तसेच. कधी तर MBBS ची आवड नसूनही पालकांच्या दबावाखाली किंवा अन्य कारणांनी ती डिग्री घेतल्यावर कांही हुशार पण असमाधानी विद्यार्थी IAS किंवा UPSC च्या परीक्षांकडे वळतात. एक अभिमानाची बाब ही की पुण्यातील AFMC मधून पास झालेले डॉक्टर भारतीय लष्करात सेवादाखल होतात! अशा डॉक्टर प्लस लष्करी अधिकाऱ्यांना माझा कडक सॅल्यूट!!!

जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य ही केवळ रोग किंवा अशक्तपणाचा अभाव नसून संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची स्थिती आहे. 

लेखाच्या अंती खालील मुद्दे नमूद करते.

*डॉक्टर माणूस आहे, देव नव्हे, त्याच्याजवळ जादूची कांडी नाही.  

*डॉक्टरांना त्यांचे वैयक्तिक आणि खाजगी आयुष्य असते, त्यांना कधीतरी त्यांच्या कुटुंबाला वेळ देणे आवश्यक असते. अशा वेळेस ते त्यांचा वैयक्तिक अधिकार म्हणून गंभीर आजार नसलेल्या रुग्णाचा उपचार करण्यास नकार देऊ शकतात. मात्र रोगी गंभीररित्या आजारी असेल तर माणुसकीच्या नात्याने ते दुसऱ्या डॉक्टरकडे रोग्याला पाठवायची व्यवस्था करू शकतात. 

*प्रत्येक रुग्ण आणि त्याचा रोग हे वेगवेगळ्या वेळी डॉक्टरांसमोर वेगवेगळी आव्हाने उपस्थित करीत असतात, त्यातून सर्वोत्तम मार्ग काढणे आणि प्रयत्नात कुठेही कसूर न ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. *मोठ्या कॉर्पोरेट दवाखान्यात डॉक्टर हा तेथील साखळीचा एक दुवा असतो, त्यातील आर्थिक नियोजनात बहुतांश डॉक्टरांचा सहभाग नसतो. 

*डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणे हे रोग्याचे परम कर्तव्य आहे. आजकाल हॉस्पिटल हॉपिंग (सेकंड, थर्ड किंवा त्याहून अधिक डॉक्टरांचे सल्ले घेणे), Mixopathy चा अवलंब करणे आणि आपले उपचार करणे, हे प्रकार वाढीस लागले आहेत. 

*डॉक्टरांनी रुग्णाला निरोगी जीवनशैलीचे महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यात संतुलित आहार, व्यायाम, योग आणि ध्यान यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यासाठी त्यांनी स्वतः निरोगी जीवन शैलीचा अंगीकार करायला हवा! सिगारेट पीत पीत रोग्याला ‘तू सिगारेट पिणे बंद कर’ असे सांगणार का डॉक्टर?

वरील मुद्यांवर वाचकांनी आत्मचिंतन करून आपल्या सेवेशी तत्परतेने हजर असलेल्या डॉक्टरांच्या व्यवसायाचा आदर करीत त्यांच्यावर विश्वास ठेवावा, तसेच आपल्या आजाराची आणि आधी घेतलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती त्यांच्यासोबत शेअर करावी असे मी आवाहन करते.  

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥        

(“सर्वजण सुखी होवोत, सर्वजण रोगमुक्त असोत, सर्वजण मंगलमय घटनांचे साक्षीदार राहोत आणि कोणालाही दुःखाचे भागीदार बनण्याची वेळ ना येवो!”)

डॉक्टर्स डे च्या सर्वांना निरामय शुभेच्छा!!!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्ण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ कृष्ण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे………

पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ‘आपल्यासाठी आपल्या हिताचं काय हे आपल्यापेक्षा त्याला जास्त समजतं. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आल्यासारखं वाटलं तरी त्यातच आपलं हित आहे हे नंतर जाणवतंच’ कधीकाळी बाबांच्या तोंडून कानावर पडलेल्या या शब्दांचा रोख गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या माझ्या संपूर्ण आयुष्याला नेमकी आणि वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनांकडेच असावा असा विश्वास वाटण्याइतका या शब्दांचा नेमका अर्थ या अनुभवांनी मला समजून सांगितला होता.’त्या’ला मी इतकी वर्ष मानत आलो होतो.या सर्व घटनाक्रमांच्या निमित्ताने ‘त्या’ला जाणण्याची प्रक्रियाही माझ्या मनात नकळत सुरू झाली!)

असोशीने धरून ठेवायला धडपडत होतो ते हातातून निसटून गेलं होतं आणि जे मिळणं शक्यच नाही असं गृहित धरलं होतं ते मात्र अगदी अनपेक्षितपणे मला मिळालं होतं! स्टेट बँक आणि युनियन बँक यांच्या बाबतीतले परस्परविरोधी  असे हे दोन प्रसंग ‘सगळं सुरळीत होईल,काळजी नको.’ हे बाबांचे शब्द सार्थ ठरवणारेच होते!

समोर गडद अंधार पसरलेला असताना निरंजन साठे माझ्या आयुष्यात आले होते. आणि मला डॉ. कर्डकांकडे  सुपूर्द करून गेले होते.होय.कारण मला नेमणूकपत्र मिळालं ते होतं डाॅ.कर्डक यांच्याच अधिपत्याखालील रेक्रूटमेंटसेलला जाॅईन होण्यासाठीचं!डाॅ.कर्डक आणि निरंजन साठे यांचं हे अल्पकाळासाठी असं माझ्या आयुष्यात येणं माझ्या मनावर  अमिट ठसा उमटवणारे ऋणानुबंध जसे तसेच माझ्यावरील ‘त्या’च्या कृपालोभाची प्रसादचिन्हेसुद्धा!

युनियन बँकेत मी १३ मार्च १९७२ रोजी जॉईन झालो आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. बँकिंगक्षेत्रातल्या माझ्यासारख्या नवोदितांना सुरुवातीचा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरिएड म्हणजे खूप मोठे दडपण वाटत असे.तो प्रोबेशन पिरिएड समाधानकारक पूर्ण झाला तरच नोकरीत कायम केल़ जायचं. हे सहा महिने रजाही मिळणार नव्हती. म्हणून मग जॉईन होण्यापूर्वीच मी घरी जाऊन सर्वांना भेटून यायचं ठरवलं. त्या भेटीत समाधान मात्र मिळालं नाहीच. हळूहळू परावलंबी होत चाललेले माझे बाबा अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या नेमक्या गरजेच्यावेळी मला त्यांच्याजवळ रहाता येत नाहीये या विचाराने मी अस्वस्थ होत असे.त्यांचा निरोप घेऊन निघालो तेव्हा अंथरुणावर पडल्या पडल्याच त्यांनी स्वतःचा थरथरता हात क्षणभर कसाबसा  वर उचलून मला आशीर्वाद दिला. तेच हळवे क्षण सोबत घेऊन मी बाहेर पडलो आणि आयुष्यातल्या नव्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं!

लवकरच माझ्या निर्णयक्षमतेची कसोटी पहाणारं एक प्रलोभन  माझी वाट पहात दबा धरून बसलेलं होतं याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती. माझा प्रोबेशन पिरिएड संपला आणि मी नोकरीत कन्फर्म झालो,त्याच दिवशी मला एक पत्र आलं आणि ते युनियन बँकेतल्या सुरळीत सुरू झालेल्या माझ्या रुटीनला परस्पर छेद देणारं ठरलं!

पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे मध्यंतरीच्या काळात मी भावाच्या सल्ल्याप्रमाणे स्टेट बँकेच्या नवीन भरतीच्या जाहिरातीनुसार पुन्हा अर्ज केला होता आणि तिथे नव्याने पुन्हा रिटन टेस्ट न् इंटरव्ह्यूही देऊन आलो होतो. अर्थात तेव्हा माझ्या दृष्टीने तो फक्त एक उपचार होता. म्हणूनच असेल मी ते विसरूनही गेलो होतो. पण नेमकी त्याचीच आठवण करून देणारं हे पत्र होतं. स्टेट बँकेकडून नवीन अपॉइंटमेंट ऑफर करणारं ते पत्र पाहून मला क्षणभर आश्चर्यच वाटलं.दुसऱ्याच क्षणी आता यापुढे कसलीच अस्थिरता नको असंच वाटत राहिलं. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं योग्य ठरेल? पुन्हा नवीन नोकरी, पुन्हा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड..सगळं सुरळीत होईल? आणि नाही झालं तर? पुन्हा ती विषाची परीक्षा नकोच‌.

मी ते पत्र ड्राॅवरमधे ठेवून दिलं आणि तो विषय माझ्यापुरता मिटवून टाकला. घरी सविस्तर तसं कळवून टाकलं. माझं पत्र मिळताच भावाचा लगेच फोन आला. त्याने मला वेड्यातच काढलं.म्हणाला,

“हे बघ,असा अविचार करू नकोस. आजच तुझ्या पत्राला मी सविस्तर इन्लॅंडलेटर लिहिलंय.आईलाही कांही लिहायचंय म्हणाली म्हणून ते घरी तिच्याकडे ठेवून आलोय. तिचं लिहून झालं कि ती ते पोस्टात टाकेल. सर्वबाजूने विचार केला तरीही स्टेट बँक जॉईन करणंच तुझ्या हिताचं आहे हे लक्षात ठेव. ते कसं हे सगळं सविस्तर पत्रात लिहिलंय. ते वाच आणि तसंच कर.”

मी मनाविरुद्ध ‘हो’ म्हटलं आणि फोन ठेवला. लगेच त्याचं पत्रही आलं. पत्रातला प्रत्येक मुद्दा योग्य आणि बिनतोड होता.

एकतर त्या काळी या परिसरात युनियन बँकेच्या फक्त दोन ब्रॅंचेस होत्या. कोल्हापूर आणि जयसिंगपूर.याउलट स्टेट बँकेचं ब्रॅंचनेटवर्क मात्र तालुका  पातळीपर्यंत विस्तारलेलं होतं. त्यामुळे युनियन बँकेत बदली मिळणं शक्य नव्हतंच पण स्टेट बँकेत मात्र अल्पकाळात सोईच्या जागी सहजपणे बदली मिळू शकणार होती.पे स्केल्स आणि इतर सवलतीही  युनियन बँकेच्या तुलनेत स्टेट बँकेच्याच आकर्षक होत्या. युनियन बँकेची प्रमोशन पॉलिसी ‘स्ट्रीक्टली ऑन सिनॅरीटी बेसिस अशीच होती, त्यामुळे प्रमोशनच्या संधी जवळजवळ नव्हत्याच.स्टेट बँकेत मात्र हीच पॉलिसी मेरीटला प्राधान्य देणारी होती.

हे सगळं वाचून पुन्हा उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले. आईने लिहिलेला मजकूर वाचून तर मी हळवाच होऊन गेलो. मी लवकरात लवकर जवळचं पोस्टींग मिळून तिकडं यावं म्हणून ती अधीर झाली होती. तिने लिहिलेला शब्द न् शब्द माझ्या मनात रुतत चालला होता.

‘हे झोपूनच असतात.बोलणं जवळजवळ हवं-नको एवढंच. त्यांना त्रास नको म्हणून या विषयी मुद्दाम काही सांगितलेलं नाहीये.तू जवळ आलास, अधून मधून कां होईना भेटत राहिलास तर त्यांनाही उभारी वाटेल.’

हे वाचून बाबांच्या आठवणीने मी व्याकुळ झालो. भावनेच्या आहारी जाऊन कां होईना पण मी मन घट्ट केलं. आता ‘स्टेट बँक’ हेच आपलं नशीब हे स्वीकारलं. युनियन बँक सोडायची हा निर्णय पक्का झाला. पण तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच.

‘बाबा हिंडतेफिरते असते तर त्यांच्याशी बोलता आलं असतं. त्यांनी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवला असता.’ हा विचार मनात घोळत असतानाच मी हातातल्या इन्लॅंडलेटरची घडी घालू लागलो आणि क्षणभर थबकलोच. आत दुमडायचा जो आडवा फोल्ड असतो तो उलटा धरून त्यावर गिजबीट अक्षरात कांही मजकूर लिहिला असल्याचं माझ्या लक्षात आलं. पाहिलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. हे बाबांनी तर लिहिलं नसेल? छे! कसं शक्य आहे?बाबांचं अक्षर आणि असं? विश्वासच बसेना. पण ते बाबांनीच लिहिलेलं होतं! थरथरत्या हाताने लिहिल्याचं स्पष्ट जाणवत होतं. आणि म्हणूनच ते वेडंवाकडं आणि केविलवाणं दिसत होतं. मात्र प्रयत्नपूर्वक एकेक अक्षर जुळवायचा आटापिटा करून मी ते वाचल्यानंतर जे कांही हाती लागलं ते मात्र खरंच लाखमोलाचं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माऊलींचा हरिपाठ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

माऊलींचा हरिपाठ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

सर्वप्रथम मी निवेदन करतो की हरिपाठावर या आधी अनेक संत आणि अधिकारी सत्पुरुषांनी चिंतन लिहिले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या पाठावर ‘काही’ लिहिणे हे खरंतर माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाचे काम नाही, तरीही मी माझ्या सद्गुरूंच्या आधाराने यथामती लिहिण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करीत आहे.  

भगवंत प्राप्तीचा सर्वांगसुंदर मार्ग सर्व संतांनी स्वानुभूतीने सामान्य मनुष्यासाठी खुला करून दिला आहे. मनुष्य स्वाभाविकच स्वतःवर प्रेम करतो, त्यानंतर तो त्याच्या आवडीच्या माणसांवर, त्याच्या वस्तूंवर, घरादारावर, गाडी घोड्यावर, संपत्तीवर प्रेम करीत असतो. संत सांगतात त्याप्रमाणे हे प्रेम अंशतः का होईना स्वार्थी असतेच असते. या नश्वर जगात मनुष्य निःस्वार्थी प्रेम करू शकत नाही. जो मनुष्य निःस्वार्थी प्रेम करतो, तो सर्वांना आवडतो, त्यामुळे ती देवालाही प्रिय होतो. एका गीतात श्री. वसंत प्रभू म्हणतात

“जो आवडतो सर्वांना | तोचि आवडे देवाला|`” 

परमार्थ साधणे म्हणजे अधिकाधिक निःस्वार्थ होणे. परमार्थ मार्गात गुरू शिष्याला नाम देतात आणि मग शिष्य त्या नामाचा अभ्यास करून परमार्थ साधण्याचा यत्न करीत असतो. माऊलींचे गुरू निवृत्तीनाथ यांनी त्यांना हरिनाम दिले. त्या नामाचा अभ्यास करून ज्ञानदेवांनी ज्ञांनदेव ते ज्ञानेश्वर  इतकाच पल्ला गाठला नाही तर विश्वाची माऊली होऊन अवघाचि संसार सुखाचा करीन अशी ग्वाही दिली. माऊली म्हणतात,

“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥”

{अर्थ:- संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात. तो संसार मी सुखाचा करीन याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपा वर मिथ्या भासलेला आहे. ते ब्रह्म सुखरूप आहे. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे. असे मी ज्ञानसंपादन करून संसार सुखरूप करून टाकीन इतकेच काय त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन. हे जाणण्याकरीता त्या पंढरपूरास वारीला जाऊन माझे माहेर जो श्रीविठ्ठल त्याला मी आलिंगन देईल. त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याईचे फळ मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले. त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले. म्हणजे तो भक्त परमात्मरूपच होतो. असे माऊली सांगतात.

सामान्य मनुष्याला स्वतःचा प्रपंच नेटका करता येतोच असे नाही, कारण त्याच्या प्रपंचात स्वार्थ जास्त असतो. संत होणे म्हणजे अत्यंत निःस्वार्थ होणे. म्हणून सर्व संत विश्वाचा प्रपंच करतात आणि सद्गुरू कृपेने ज्ञानेश्वरांसारखे संत विश्वमाऊली होत असतात.

माउलींचा हरिपाठ हा सर्वमान्य आणि लोकप्रिय हरिपाठ आहे. आजही अनेक ठिकाणी त्याचे नित्य पठण केले जाते. सातशे वर्षांपूर्वी लिहिलेला हरिपाठ गावोगावी कसा पोहचला असेल आणि मागील सुमारे सातशे वर्षे तो नित्य म्हटला जात असेल तर जागतिक आश्चर्य नव्हे काय ? 

भगवन्नामाचे महात्म्य, महत्व आणि महती आपल्याकडील सर्व संतांनी मुक्त कंठानी गायिली आहे. ‘बिनमोल परंतु अमोल’ अशा नामांत मुक्ती, भुक्ती व भक्ती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे आई सर्वसंतांनी उच्चरवाने प्रतिपादित केले आहे. नामाने भवरोग नाहीसा होतो इतकेच नव्हे, तर सर्व शाररिक व मानसिक रोग नाहीसे करण्याची अगाध शक्ती भगवंताच्या नामांत आहे. प्रपंच व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी, विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात. अत्यंत नाजूक व साजूक असे भगवंतांचे प्रेमसुख मिळण्याचे भाग्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकालाच प्राप्त होते. संसार ‘असार’ नसून तो परमेश्वराच्या ऐश्वर्याचा अविष्कार आहे अशी दृष्टी नामानेच प्राप्त होते. कर्म, वर्ण व धर्म यांचे बंड मोडून भगवतप्राप्तीचा मार्ग संतांनी केवळ नामाच्या बळावर सर्वाना खुला केला आहे. हरिपाठ म्हणजे विठूमाऊलीच्या गळ्यातील सत्ताविस नक्षत्रांचा हार आहे, असे म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण शिकवणुकीचे सारं म्हणजे हा हरिपाठ आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये. एक कल्पना मांडतो. भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या सुमारे नऊ हजार ओव्या आणि हरिपाठाचे सत्तावीस अभंग. नऊ हजार ओव्यांचा अभ्यास सामान्य मनुष्याला तसा कठीणच जाणार यात वाद नसावा. पण तरीही ज्याला थोड्या वेळात आणि कमी श्रमात परमार्थ प्राप्ती करायची आहे त्याने या सत्तावीस अभगांचा अभ्यास केला तरी त्याचे काम होईल असे माऊली सांगतात. या हरिपाठ चिंतनाच्या निमित्ताने आपली सर्वांची नामावर असलेली निष्ठा आणिक वृद्धिंगत होवो ही सद्गुरू आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना  करतो, सर्व सुजाण वाचकांना नमन करतो.

जय जय राम कृष्ण हरी।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ताकास तूर न लागू देणे… लेखिका – सुश्री मुग्धा पानवलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ताकास तूर न लागू देणे लेखिका – सुश्री मुग्धा पानवलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

‘ताकास तूर न लागू देणे.’ ही म्हण आपणास परिचित आहेच. 

या म्हणीचा प्रचलित अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्याला अजिबात पत्ता लागू न देणे. 

पण इथे ताक हा  दही घुसळून केलेला पेयपदार्थ आणि तूर म्हणजे एक द्विदल कडधान्य अभिप्रेत नाही. तसा असता तर या म्हणीचा आणि त्याच्या अर्थाचा अर्थाअर्थी संबंध लागला नसता. तर याविषयी वेगळी माहिती आहे ती अशी…

इथे ‘ताक’ शब्द नसून ‘ताका’ शब्द आहे.   

ताका म्हणजे कापडाचा तागा. जुन्या शब्दकोशात हा अर्थ दिला आहे. 

आणि तूर हे द्विदल धान्य असा अर्थ इथे नाही. हातमागावर कापड विणण्यासाठी धागे गुंडाळून घ्यायचे जे विणकराच्या डोक्यावरचे आडवे लाकूड/तुळई असते तिला ‘तूर’ असे म्हणतात. हा ही शब्दकोशातील अर्थ आहे. 

म्हणजे या म्हणीचा शब्दशः अर्थ असा की, ताग्याचा आणि तुरीचा संबंधच येऊ न देणे.  थोडक्यात एखादी गोष्ट पार पडण्यासाठी जो कळीचा घटक आहे, तोच होऊ न देणे किंवा होणार नाही ह्याची काळजी घेणे.

तर अशी आहे ‘ताकाच्या तुरी’ची गंमत ! 

लेखिका : सुश्री मुग्धा पानवलकर

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares