प्रत्येक दिवशी सूर्य एकाच दिशेला आणि साधारण सकाळीं त्याचं वेळेला उगवतो तरीही गंमत बघा प्रत्येक दिवस हा रोज अगदीं निराळाच असतो. कधी खूप आशा एकवटल्या असताना हवे तसे मनासारखे घडत नाही आणि कित्येकदा ध्यानीमनी नसताना परमेश्वराने लीला केल्यागत खूप काही आपल्या कल्पनेपेक्षाही आपल्या पदरात घालतो की आपली ओंजळ भरगच्च भरते.
मागील सोमवार असाच माझ्यासाठी काहीही कल्पना नसतांना खूप काही देणारा असा उजाडला. अमरावतीला मनापासुन तळमळीने समाजासाठी भरघोस काम करणारे सुप्रसिद्ध गोविंद काका कासट आणि सुदर्शनजी गांग ह्यांनी भरीव प्रेरणा मिळवून देणारा “चंदू चॅम्पियन” ह्या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन सरोज टॉकीज मधे केले होते. त्या चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठीच्या निमंत्रक यादीत माझे नाव असल्याने मला एक सुखद धक्का दिला. आणि त्यामुळेच मी एक खूप जास्त सकारात्मक आणि शब्दात वर्णन करता येणार नाही असा सुंदर चित्रपट बघण्याचे भाग्य मला लाभले. आता ह्या चित्रपटाविषयी माझ्या शब्दात.
त्यासाठी आधी आपल्याला हे मुरलीधर पेटकर कोण, त्यांचे कार्य काय हे जाणून घ्यावे लागेल. मुरलीकांत पेटकर हे स्वतः एक अत्यंत विलक्षण जीवन जगले आहेत. पेटकर म्हणजे एक नम्र , अत्यंत प्रामाणिक, आणि समर्पित जीवन जगणार अफलातून व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. त्यांनी कठोर परिश्रमाने विलक्षण सिद्धी प्राप्त केली.
त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1944 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथील पेठ इस्लामपूर भागात झाला. त्यांनी भारतीय सैन्यात कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) मध्ये जवान म्हणून काम केले. सिकंदराबादमध्ये असताना त्यांनी बॉक्सर म्हणून लढा दिला. १९६५ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात नऊ गोळ्या लागल्याने पेटकर अपंग झाले होते. त्याच्या दुखापती बऱ्या झाल्यावर त्यानी हार न मानण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा पोहणे आणि इतर खेळांमध्ये भाग घेऊ लागले.
अखेरीस, त्यांनी भारताला पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. पेटकरांनी 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धा जिंकून 37.33 सेकंदाचा नवा विश्वविक्रम केला. फक्त पोहणेच नाही तर स्लॅलम, भालाफेक आणि अचूक भालाफेक यातही ते निपुण होते.
चंदू चॅम्पियन हा बायोपिक भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर ह्यांच्या जीवनावर आधारित आहे. “मुरलीकांत पेटकर यांची कथा ही मुक्त भारताची कथा आहे”, ट्रेलरमध्ये म्हटले आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर, मुरलीचा प्रवास देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रतिबिंबित करतो, कारण तो निर्धाराने महानता मिळवण्यासाठी अनेक अडचणींवर मात करतो.
1965 च्या भारत-पाक युद्धात नऊ गोळ्या लागल्याने मुरलीकांत पेटकर ऑलिम्पिक मेडल च्या ध्यासाने पोहण्याकडे वळले. मूलतः भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र आणि सेवा शाखेतील बॉक्सर, त्याने इतर खेळांमध्येही प्रावीण्य मिळवले, 1968 पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक स्लॅलममध्ये अंतिम फेरी गाठली, चार वर्षांनंतर (1972, जर्मनी गेम्स) पोहण्यात सुवर्णपदक मिळवण्याआधी.
त्याच्या नावावर ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदांचा विश्वविक्रम आहे. त्यांच्या कामगिरीच्या 46 वर्षांनंतर भारताने 2018 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्याच्या जिद्द आणि कर्तृत्वामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने खास अपंग खेळाडूंवरील पुस्तकात पेटकरचा उल्लेख करण्यास प्रवृत्त केले.
सुशांत सिंग राजपूतचा एमएस धोनी, फरहान अख्तरचा भाग मिल्खा भाग आणि विनीत कुमार सिंगचा मुक्काबाज यांसारख्या चित्रपटांची आठवण हा चित्रपट बघताना होते. खुप दिवसांनी टॉकीज मधे बघितलेला अतिशय चांगला सिनेमा खुप काही शिकवून कायम आठवणीत राहील.
सुलु जेव्हा सिबीएस वर उतरली तेव्हा तीन वाजले होते.सुलु बीवायके कॉलेज मध्ये शिकत होती.शेवटच्याच वर्षाला होती.सध्या कॉलेजला सुट्ट्या होत्या.. दिवाळीच्या..त्यामुळे ती गावी घरी गेली होती.
तिचं गाव नाशिकपासून तास दिड तासाच्या अंतरावर होतं..निफाड जवळ.एका मैत्रीणीकडुन तिला काही नोट्स घ्यायच्या होत्या.. म्हणून ती नाशकात आली होती.
आज तिच्या सोबत तिची लहान बहीण होती..लाली तिचं नाव.आठ दहा वर्षांची होती.पहील्यांदाच ती नाशकात आली होती.शहर म्हणजे काय हे ती केवळ ऐकुन होती.बसमधुन उतरल्या पासून ती नुसती इकडे तिकडे बघत होती.सगळीकडे गर्दी..माणसांची..गाड्यांची.. सिग्नलला तर त्यांना खुप वेळ थांबावं लागलं.एवढ्या सगळ्या गाड्या कुठुन येतात.. आणि कुठं जातात हाच प्रश्न तिच्या मनात आला.
तिचं गाव सोडून ती कधी कुठे गेलेलीच नव्हती.तिचं गाव अगदीच छोटं..खेडचं म्हणा ना! तिच्या त्या एवढ्याश्या गावात तिच्या ताईचा रुबाब खुप.शहरात शिकणारी मुलगी ना! कुणाला नाशिकहून काही आणायचं असलं तर तिच्या ताईचीच सर्वांना आठवण यायची.मोबाईल मधलं काही अडलं तरी सुलुताईच लागायची सर्वांना.लालीला खुप अभिमान वाटायचा आपल्या ताईचा.
आत्ताही तिनं पाहिलं.. किती सहजतेने ती या शहरात वावरत होती.सिबीएस वरुन उतरल्यावर तिनं समोरुनच बस पकडली.कुठली बस.. किती नंबरची बस..कुठुन येते.. कुठे जाते सगळं काही तिला माहीत.
“ताई मला टी शर्ट पॅन्ट घेणार ना तु?मग चल ना..”
“हो लाली.. माझं काम झालं ना..की मग आपण जाऊ शालीमारला..”
“आणि गंगेवर पण ना?मला आईस्क्रीम खायचीए”
“हो..हो.. आहे माझ्या लक्षात”
दोघी बसमधून उतरल्या.कॉलेज रोडवरची दुकाने..शोरुम्स.. बिल्डिंग पाहून लाली अचंबित झाली.सुलुने तिचा हात घट्ट पकडला.. एका बिल्डिंग मध्ये त्या आल्या.सुलुने सहजपणाने लिफ्ट खाली बोलावली.दोघी जणी लिफ्टमध्ये शिरल्या.दरवाजा आपोआप बंद झाला.
“हं..ते पाच नंबरचं बटन दाब”
सुलु म्हणाली.लालीला खुप मजा वाटत होती.लिफ्ट थांबली.. दरवाजा उघडला.दोघीजणी एका फ्लॅटमध्ये आल्या.
सुलुच्या मैत्रिणीनं दोघींना पाणी दिलं..मग सरबत दिलं.लालीच्या तोंडुन शब्दच निघत नव्हता.तो फ्लॅट..ते उंची फर्निचर.. आणि याही पेक्षा सुलुची ती मैत्रीण..तिची आई.. सगळ्यांच्या पुढे आपण खुपच गावंढळ दिसतो आहोत.. नाही आपण गावंढळच आहोत असंच तिच्या मनानं घेतलं.
सुलुचं काम झालं.दोघी खाली उतरल्या.सगळीकडे दुकानच दुकानं.
“ताई मला पॅन्ट..ते बघ तिकडे.. किती मोठ्ठं दुकान आहे”
लाली मागेच लागली.सुलुने तिची समजुत घातली.
“आपण तिकडे शालीमारला जाऊ.. इकडे खुप महाग असतात कपडे”
लाली खुप चिडली.तिला ताईचा रागच आला.मघाशी त्या फ्लॅटमध्ये जाऊन आल्यानंतर तिला आपली ताई एकदमच गावंढळ वाटायला लागली.त्यात ताईने आता इकडुन पॅन्ट घ्यायची नाही म्हणून सांगितलं.पाय आपटतच ती ताईचा हात धरुन चालत होती.
“ताई..पाय दुखायला लागले माझे..मला रिक्षात बसायचं”
“नाही लाले..ती बघ आलीच बस”
सुलुने ओढतच तिला बसमध्ये खेचलं.बस खचाखच भरली होती.लालीला आता खुप कंटाळा आला होता.आजूबाजूला रिक्षा..कार्स..टु व्हिलर्स धावत होत्या.. आणि ती ताईचा हात धरुन कशीबशी उभी होती.
शालीमारला दोघी उतरल्या.लालीच्या मनात ताई बद्दल खुप राग भरुन राहिला होता.तिकडे किती छान मोठ्ठी दुकानं होती.. रस्ते..इमारती..ती श्रीमंती..आपली ताई ही अशीच..खेडवळ..गावठी.. काही काही घेऊन देत नाही मला.पळुन जावसं वाटतं मला.
इकडे शालीमारला पण दुकानच दुकानं..गर्दीच गर्दी..रोड क्रॉस करताना ताई तिला ओढत होती..पण..
..पण गडबडीत ताईचा हात सुटला.इकडे तिकडे बघती तर ताई कुठे? कुठे गेली ताई?
लाली घाबरली..बावरली.. सगळ्या बाजूंनी माणसंच माणसं..पण तरीही तिला एकटेपणाची जाणीव झाली.डोळे भरुन आले.बाजुला एक मारुतीचे मंदिर होतं.तिथल्या पायरीवर बसुन ती रडायला लागली.
तिचं ते रडणं ऐकुन एक बाई तिच्या जवळ आली.
“काय नाव तुझं बाळ?”
असं म्हणून तिची समजुत घालु लागली.तुला खाऊ देते..गाडीत फिरवते.. असं खुप काही काही सांगु लागली.
मघाशी या सगळ्या गोष्टी लालीला हव्या होत्या..पण त्या ताईच्या सोबतीने.
लालीचं एकच वाक्य.. मला ताई पाहिजे.. मला तिच्याकडे जायचं.मघाची ती बाई आता लालीवर चिडली.तिचा हात धरुन ओढु लागली.बाजुला असलेल्या रिक्षात ती लालीला घेऊन जाऊ लागली.
लाली जीवाच्या आकांताने ओरडली..
“ताई.. ताई..”
तेवढ्यात कुठुनतरी तरी सुलु आली.ती शोधतच होती लालीला.त्या बाईच्या खाडकन कानाखाली मारत तिनं लालीला ओढून जवळ घेतलं.
गर्दी जमली.. पोलिस आले. .त्या बाईला आणि रिक्षावाल्याला घेऊन पोलीस निघून गेले.. गर्दीही पांगली.
सुलुनं लालीला घट्ट धरून ठेवलं होतं.लालीला आता खुप सुरक्षित वाटत होतं.तिच्या मनात आलं..आपली ताई खरंच किती ग्रेट..किती शुर आहे.मघाशी आलेला राग आता कुठल्या कुठे पळून गेला होता.
ताईची ओढणी धरुन लाली म्हणाली..
“ताई..चल ना आता घरी लवकर..आई वाट पहात असेल.”
“अगं हो हो.. आपल्याला अजुन खरेदी करायचीए.. आईस्क्रीम खायचं आहे.. जायचं ना गंगेवर?”
अलीकडच्या काळात नामशेष झालेली मी चूल! अजूनही कुठे कुठे माझं अस्तिव आहेच! तस ते जगाच्या इतिहासात कोणत्या ना कोणत्या प्रकारे राहील यात तिळमात्र शंका नाही! फार पूर्वीच्या काळापासून अस म्हणण्या पेक्षा मी यावत चंद्र दिवाकर! जगाच्या अस्तित्वातच मी आहे! माझं रूप अग्नी महाभूता पासून झालेलं! सूर्य नारायण हेच त्याच प्रतीक! अवकाशात माझं प्रतिबिंब!
तस धरतीच्या पोटात असलेला तप्त लाव्हारस हे पृथेवरच प्रतीक! मी कुठे नाही ? चराचरात माझं अस्तित्व आहे ते अग्नी महाभूताच्या रुपात! पाण्याच्या थेंबात पण मी आहेच! काळ्याजर्द मेघात घर्षण झाले की मी रुपेरी सौंदमीनीच्या रुपात मी भूतलावर अवतरते! माझं उष्ण दाहक रूप हे मानवाच्या हितकरता! माझ्याशिवाय जीवनाची भट्टी पेटत नाही! मी आहे म्हणूनच आयुष्य आहे!
।।अहं ही वैश्वानरो देवो प्राणिनांम देह आश्रिता ।।
।। प्राण आपनो समयुक्तम पश्चमन्यांम चतुर्वीधम ।।
मीच तो अग्नी तुमच्या शरीरात राहून प्राण व अपान वायूचे पोषण करतो व तुम्ही घेतलेल्या चतुर्वीध अन्नाचा पचन करतो! शरीर पोषण म्हणजेच जीवन यापन पण करतो.
ऋषीमुनींची मी आवडती! त्यांनीच मला प्रथम ह्या पृथ्वीवर पचारण केल! माझ्या आयुष्याचा अग्नी तृप्त करण्यासाठी मला वेळोवेळी समिधा अर्पण केल्या! व माझी भूक भागवली!
होम यागादी कृत्यात मी प्रथम प्रविष्ट झाले! ते नन्तर मग प्रत्येक प्राणिमात्रांची भूक भागवण्याचे श्रेय व काम माझ्याकडे जस आले, तसा माझा जन्म झाला! मला चूल म्हणून नामकरण करण्यात आलं!
तसे कित्येक आकारात मी असले तरी, माझा मूळ आकार त्रिकोणीच! तीन दगडाची चूल!! माझा अवतार हा मूळ आदी मायेचा! विश्व साकारण्यासाठी माझी उत्पत्ती! तीन कोन तीन दगड! त्रिगुणात्मक माझी रचना! सत्व रज तम!
तिन्ही गुणांचा समन्वय साधण्यासाठी अग्निरूपी इंधनाची तजवीज पण करून ठेवली!
अग्निप्रधान महाभूताचे प्रतीक असलेल आदिमायेच रूप म्हणजेच मी!!! माझ्या शिवाय आयुष्य हे अपूर्ण!
प्रचंड ज्वाळा उत्पन्न करण्याची क्षमता! वेदनेची धग उष्णता चटके सोसण्यासाठी मला त्रिकोणी आकारात बंदिस्त व्हावं लागलं! एकदा मी पेटले की
कुणाचेही ऐकत नाही! येईल ते इंधन, मग ते कोणत्याही झाडाचं, असो त्याला भस्म सात करण्याची शक्ती मला देवांनी दिली! मला शमविण्यासाठी ऋषी मुनीनी
दूध ह्या पूर्ण अन्न निवडले!
राखेच्या आड मी धगधगत असतेच!
चुलीच्या बंदिस्त वातावरणात, माझं काम योग्य होत असावे अस विश्वकर्म्यला वाटले असावे .
माझा अन स्त्रीचा सम्बन्ध फार जुना आहे! सक्ष्यात अन्नपूर्णा देवीनेच मला प्रगट केलं . भगवान शंकराला ज्यावेळी भूख लागली, त्यावेळेस मला पाचारण करून बोलवलं! त्यावेळी पासूनच काम आजपर्यंत सतत चालूच आहे!
भूख ही मानवी प्राण्यांची गरज लक्ष्यात घेऊन, शाक पाक सिद्ध करण्याची जबाबदारी एकदम मला व पार्वती अन्नपूर्णेवर आली . हेच जगाच्या उत्पत्ती चे मूळ कारण असावे!
भूक भागवण्यासाठी प्रत्येक्षात शंकर म्हणाले होते
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।।
ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्ष्यां देही च पार्वती ।।
माता च पार्वती देवी पिता देवो माहेश्वरा ।।
भगवान शंकर म्हणतात ज्ञान व वैराग्य मिळवण्यासाठी मला भिक्षा वाढ! मला सर्वज्ञान मिळू दे! विश्व दर्शन पण होऊ दे व ते फक्त तुझ्यामुळे शक्य आहे .
जगाच्या संगोपनाची शक्ती, भूख भागवण्यासाठीची युक्ती फक्त माझ्यात व स्त्रीत्वात आहे! मानवीय म्हणा किंवा पक्षी वा पशूंची म्हणा भूख ही अनेक प्रकारची आहेच . स्त्रीला चूल व मूल हे कधी चुकले आहे का ? मग ती स्त्री अडाणी असो वा शिकलेली असो, त्यातच तर जीवनाचे गुपित दडले आहे .
स्त्री काय किंवा मी काय, आमच्या दोघीत साधर्म्य आहेच म्हणूनच आमची निर्मिती ईश्वरीय आहे. आज माझं रुपडच बदलुन टाकलं आहे! बर्शन ची शेगडी, इलेक्ट्रॉनिक शेगडी, सौर ऊर्जेची शेगडी, वाटर हिटर, मोठया पावाच्या भट्ट्या, तंदुरी, टर्बाईन, ही सर्व माझीच रूपे!
आहेत आणि सदैव राहतील! फक्त मानवाची गरज भागविण्यासाठी!!!
खरे तर या भागात मी डार्कवेब वरील ‘रेड रूम’ याबद्दल भाष्य करणार होतो, पण मागील दोन भागात काही जणांनी विचारणा केली होती, ‘जर डार्कवेब इतके भयंकर असते तर लोक ते का वापरतात?’ किंवा ‘डार्कवेबचा वापर फक्त हॅकरच करतात का?’
एखाद्याला हे प्रश्न खूप बाळबोध वाटतील, पण हे प्रश्न बिलकुल बाळबोध नाहीत. कारण या प्रश्नांची उत्तरे आपल्या मनातील अनेक प्रश्नांचे निरसन करतात. त्यामुळे आजचा लेख याच प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात देणारा आहे. ‘काही प्रमाणात’ हा शब्दप्रयोग यासाठी केला, कारण इथे येणारा माणूस कोणत्या मानसिकतेचा असतो हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. अनेकदा माणसाची मानसिकता त्याला कुणी ‘ओळखत असते’ त्यावेळी वेगळी, आणि ‘ओळखत नसते’ त्यावेळी वेगळी असू शकते.
पहिल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे झाले तर डार्कवेबचा वापर अनेक जण वेगवेगळ्या कारणासाठी करतात. त्यातील काही लोकांचा उद्देश चांगला असतो तर काहींचा वाईट.
ज्यावेळी कुणी डार्कवेबचा वापर करतो त्यावेळी ९९% त्याला त्याची ओळख लपवायची असते. डार्कवेब वापरण्यासाठी उपयोगात आणले जाणारे टोर ब्राउजर हेच काम करते. नव्वदच्या दशकात अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आला होता. नाव होते शहंशाह. त्या चित्रपटात नायक पोलीस असतो. पण चित्रपटातील खलनायकांशी सामना करताना त्याला त्याचा गणवेश आड येणार असतो. कायद्याच्या चौकटीत राहून खलनायकांशी सामना करणे त्याला अवघड असते. त्यासाठी तो एक युक्ती योजतो. दिवसा लाचखोर पोलीस बनतो आणि रात्री शहंशाह बनून त्याच गुंडांना शिक्षा करतो. ज्यावेळी तो आपली ओळख बदलतो त्यावेळी आपोआपच त्याच्या मर्यादा कमी होतात. हीच गोष्ट इथेही असते. आपल्याला जर हे माहिती असेल की आपल्यावर कुणाचेतरी लक्ष आहे, किंवा कुणीही आपल्याला ओळखू शकतो, तर आपल्यावर अनेक मर्यादा येतात. तेच ज्यावेळी आपल्याला कुणी ओळखणार नाही अशी आपली खात्री पटते, आपले धारिष्ट्य वाढते.
ज्यावेळी आपण इंटरनेटचा वापर करत असतो त्यावेळी आपली ओळख असते आपल्या कॉम्प्युटरचा आयडी. जो एकमात्र असतो आणि तो कधी बदलता येत नाही. आता काहींच्या मनात असाही प्रश्न निर्माण होईल, जर आयडी बदलता येत नाही तर टोर ब्राउजर आपली ओळख कशी बदलते? याचे उत्तर आहे मास्किंग. थोडक्यात नवीन मुखवटा चढवणे. ज्यावेळी तुम्ही एखादा मुखवटा चढवतात त्यावेळी तुम्ही बदलत नाहीत, तर तुम्ही दुसरेच कुणी आहे असा भास निर्माण होतो. तो एक प्रकारचा बनाव असतो. ‘बदलणे’ आणि ‘बदलला आहे’ असे वाटणे यात फरक असतो. टोर ब्राउजर तुमच्या खऱ्या आयपीवर दुसऱ्याच एखाद्या आयपीची लेअर चढवते. अशा अनेक लेअर चढल्यावर तुम्ही इतरांशी जोडले जातात. त्यामुळे तुम्ही खरे कोण हे शोधणे अवघड होऊन बसते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मी इथे ‘अवघड होते’ हा शब्द वापरला आहे, ‘अशक्य होते’ असे म्हटलेले नाही. कारण मी पहिल्यांदाच सांगितले आहे, टोर ब्राउजर आयपी बदलत नाही तर असलेल्या आयपीवर वेगळ्या आयपीची लेअर चढवते. जर एखाद्याने एकेक करून शेवटपर्यंत जायचेच ठरवले तर शेवटचा आयपी हा खराच असणार आहे. तो शोधण्यात जो वेळ लागेल त्या वेळात माणूस स्वतःला वाचविण्याचा वेगळा उपाय शोधतो.
डार्कवेबचा वापर चांगल्या कामासाठी देशाच्या सुरक्षा यंत्रणा, सैन्य तसेच पोलीस यंत्रणा यांच्याकडून केला जातो. यामागील उद्देश म्हणजे समजा अशा ठिकाणाहून एखादी माहिती लिक झाली तरी त्यावर सहसा विश्वास ठेवला जात नाही. आपोआपच लोकांचा अविश्वास हे एक प्रकारे त्यांच्यासाठी सुरक्षाकवच म्हणून काम करते. काही पत्रकार देखील गोपनीय माहिती मिळविण्यासाठी किंवा ती उघड करण्यासाठी डार्कवेब वापरतात. त्याच प्रमाणे हॅकिंग क्षेत्रात करिअर करणारे लोकही नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी, त्याचे प्रयोग करण्यासाठी डार्कवेबचा वापर करतात. डार्कवेबसाठी वापरले जाणारे टोर ब्राउजर हे दर दिवसांनी नवीन अपडेट घेऊन येते. यावर कोणत्या जाहिराती नसतात, ते वापरायलाही फुकट आहे, तरीही याचे अपडेट येतात म्हणजे कुणीतरी त्यावर कायम काम करत असणार ना? मग त्यांना पैसा कोण देत असेल? याचा विचार केलाय कधी? अनेकांचा विश्वास बसणार नाही पण यासाठी फंडिंग करणारे अमेरिकन सरकार तसेच गुगल इंजिन सारख्या कंपन्या आहेत.
डार्कवेबच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मोठमोठे घोटाळे उघड झालेले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी अनेक अप्रिय घटना वेळेआधीच रोखण्यात यश मिळवले त्याचे कारणही हे डार्कवेब हेच आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू याच्या अगदी विरुद्ध आहे. छापा सोबत काटा असतोच ना. तो तर निसर्गनियम आहे. त्याला डार्कवेब तरी अपवाद कसे असणार? पण ते मात्र पुढील भागात.
English मध्ये 50च्या वर कविता व short philosophical write ups लिहिल्यानंतर Divine Meet नावाचे booklet प्रकाशित झाले.
मराठीत पण कविता, ललित, चारोळ्या व निवडक दासबोध निरूपण असे अमृतकण नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
विविधा
☆ ✍️सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
सहजता म्हणजे नैसर्गिकता..
म्हणजेच कृत्रिमतेच्या विरुद्ध…
साधा सरळ विचार व आचार. काहीही मनात आले, येऊ द्यावे शांतपणे विचार करत करत कोणतीही कृती न करता विचारांना निघून जाऊ द्यावे. त्याची जागा दुसर्याने घेतली तरीही हाच प्रकार चालू ठेवावा.
काही दिवस असे केले की कोणत्याही विचारांकडे तटस्थपणे पहाणे जमते. काहीही विशेष परिणाम दिसत नाहीत व मग जी कृती केली जाते ती अतिशय संयमाने विचारपूर्वक घडते. परिणाम काहीही असोत, सध्याच समाधान मिळते कारण सहजता येते. कोणताच व कशाचाच अट्टाहास त्यात नसतो. म्हणून जे व जसे घडत जाते त्याकडे विवेकाने पहाण्याची दृष्टी मिळते व कृतीत साहजिकच आनंद मिळतो.
समाधान हे नेहमी अपूर्णतेतच असते हे निश्चित मानावे.
मोठे ध्येय ठरवण्यापेक्षा छोटे काहीतरी निश्चित करावे, ते करत असतानाच जर समाधान मिळाले तर पुढे ठरवलेले पूर्ण होईलच त्याचबरोबर आताचा वेळ सत्कारणी लागेल. क्षणाक्षणाचा आनंद मिळेल.
एखादा चांगला लेख video वाचनात आला की त्याचा त्याच क्षणी आनंद घ्यावा याचा लेखक कोण, त्यांचे इतर लेख कोणते वगैरे नी पाठपुरावा करत बसले तर कदाचित त्यांचे सगळेच साहित्य आवडेल असे नाही, उलट वेळ वाया जाऊ शकतो. एकाचेच एककल्ली वाचन, श्रवण करण्यापेक्षा विविध प्रकार हाताळावेत म्हणजे तो motto टिकून रहातो व जे हवंय, रुचतंय तेच मिळत जातं. तसंही सत्य एकच असतं, ते कोणी कसंही मांडू देत. यात स्वत: चीच आवड जपली जाते व अट्टाहासाचा त्रागा वाचतो.
आताचा आनंद उद्यावर किंवा इतर कुठे कसा असेल? हे उमगले की शांतता येते. हे लिहिणे सुध्दा कोणताही कशाचाही जोर नाही. जे जे जसे असेल ते तसे तसे मनापासून स्वीकारणे हा साधा सरळ योग आहे.
तुलना, अपेक्षा, मोठमोठी स्वप्ने आपले आताचे आयुष्य बिघडवत असतील तर ते पूर्ण झाले तरी काय उपयोग?
पूजा हा ध्यानाचा सगळ्यात मोठा राजमार्ग!!! पण तिथेही हेच, असेच, ह्यानेच, त्यानेच, हा देव तोच देव, ही उपासना ती उपासना मग मन भरकटते व पूजा फळत नाही. एक श्लोक भगवंताकडे बघत आनंदाश्रूसकट म्हंटल्या गेला व कृतज्ञता जाणवली की झाली पूजा!!!
इतकं साधं सरळ असताना नको त्या उपचारात अडकणे म्हणजे कृत्रिमताच.
आईवर निबंध लिहून, तिला भारी भेटवस्तू देण्यापेक्षा “आई” ही “कृतज्ञ हाक” तिला गहिवरून टाकणार नाही का? देवाचेही अगदी तसेच आहे.
तो आपल्या आतच असल्यामुळे सगळे जाणतो व अनैसर्गिक जे आहे ते तो ओळखतो सुध्दा!! हेच सत्य आहे.
आपणच आपले खूष रहायचे तर तो आतील परमात्मा मनापासून प्रेम करतो व त्याच्यासारखा सतत आनंदी रहाण्याचा आशिर्वाद देतो.
आनंद ही आत्मवस्तू आहे, ती इतरांवर अवलंबून कशी असेल?
नेमकं जगावं कसं ? तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं…!
तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही….!
आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत… आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…!
चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं….,!
“पुढे चला… पुढे सरका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस….
खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच…
पण कुणावर विशेष लोभ नाही…
कोणावर राग तर मुळीच नाही…
कुणाचा द्वेष नाही…
कुणाचा तिरस्कार नाही…
आपला संबंध फक्त तिकिटापुरता… !
कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही…
कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही…
दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं…
येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे…
मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते….
प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं ….
आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं….
पण त्या गावात अडकायचं नाही….
आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या “ठेसनावर” जायचं….
“शिंगल” बेल मारली की थांबायचं… “डबल” मारली की निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे…. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही…!
हा शेवटचा स्टॉप आहे….समद्यानी उतरून घ्या… असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की “आपल्या घरी” निघून जायचं…. !
उद्या कुठे जायचं ? कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल…. ? हे ठरवणारा वेगळा असतो…
उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही… ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही…. सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही…
शाश्वत एकच आहे… तो म्हणजे प्रवास…!
आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…!
आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… प्रवास सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…!
वैद्यकीय
नेहमीप्रमाणेच या महिन्यात सुद्धा रस्त्यावर अनेक लोक असे सापडले, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, अक्षरशः हात किंवा पाय कापावे लागले,अनेक गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं…. पाण्याबाहेर माशाला काढल्यानंतर तो जसा तडफडेल, तसे तडफडणारे लोक पाहिले… कागद फाटतो तसा, गाल फाटलाय… गळा कापलाय… नारळ फुटतो, तसं डोकं फुटलंय… आणखी हि बरंच काही दिसतं…!
डॉक्टर असून सुद्धा, हे पाहताना माझी चलबीचल होते… शेवटी मी सुद्धा माणूसच आहे…!
माझ्याही पेक्षा जास्त, तुम्ही सर्व संवेदनशील आहात आणि म्हणून मी असे कोणतेही फोटो / व्हिडिओ शेअर करत नाही…!
असो…
पण हि माझी माणसं कालांतराने बरी होतात… रानफुलं हि…. यांना ना पाणी लागत… ना खत लागत… ना मशागत….!
“प्रेमाचं” आणि “मायेचं” टॉनिक यांना पुरतं…!!!
जवळपास दोनशे किलोचं साहित्य मी माझ्या गाडीवर आणि बॉडीवर घेऊन रोज फिरत असतो दिवसभर…. पण आतली गोष्ट सांगतो…. माझ्याकडे कोणतंही औषध नसतंच मुळात… !
मी फक्त “प्रेमायसिन” आणि “मायामायसिन” हे दोनच टॉनिक घेऊन फिरत असतो…!
हिच दोन औषधे, सर्वच्या सर्व रोगांवर जालीम इलाज आहेत…. !
अं… हं…. ! मेडिकलमध्ये मिळणार नाहीत हि औषधे…
तुम्ही “तुमचा कप्पा” खोला… प्रेमायसिन आणि मायामायसिन… आधीपासूनच निसर्गाने आपल्याला भरभरून दिली आहेत… ती तुम्हाला या कप्प्यात मिळतील….
गरज आहे; ती हि औषधे मनापासून वापरण्याची … !!!
या औषधांना एक्सपायरी डेट नसते…. कधीही कुठेही ही औषधे वापरता येतात… कोणताही साईड इफेक्ट नाही….
झालाच तर फक्त फायदा आणि फायदाच होतो … देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही…!
Try करके देखो, अच्छा लगता है …!!!
भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी
एक प्रौढ महिला…. घरात सर्व लोक असूनही, मुलाबाळांनी तिचा गोडवा पातेल्यात काढला,या गोडव्याचा आमरस करून खाऊन झाल्यानंतर, तिला कोय म्हणून उकिरड्यावर फेकून दिलं ….
म्हाताऱ्या सासू सोबत जगणारी, एक तरुण महिला; आपल्या मुलांना घेऊन जगण्याची लढाई लढत आहे… नवरा नावाचा प्राणी”बेधुंद” असतो…मुलं आणि सासूला जगवण्यासाठी थोडा वेळ हि ताई काम करते…. थोडा वेळ सासूसह भीक मागते…! (हिच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली आहे)
चुकून मार्ग चुकलेला एक तरुण… !
आपणही आडवाटेवर खूपदा चुकून चुकतो… चुकायची इच्छा कुणाचीच नसते, परंतु परिस्थिती रस्ता चुकायला लावते… मग एखाद्याची आपण वाट पाहतो… कोणीतरी येईल आणि मला रस्ता दाखवेल…
आपण रस्त्यावरच्या एखाद्याला पोटतिडकीनं पत्ता विचारतो…. तेव्हा एखादा “तो”, तोंडातली तंबाखूची गुळणी आवरत, पण अगदी मनापासून आपल्याला सांगतो…”आता सरळ जावा… मंग दोन फाटे फुटतील, तिथं डाव्या हाताला वळा…. थोडं फुड गेला की एक चौक लागंल… चौकातनं उजव्या हाताला वळा… तीतं मारुतीचं मंदिर लागंल… मारुतीच्या मंदिराला वळसा घातला की मंग आलं तुमचं ठिकाण…!”
भेटलेला “हा” आपल्या आयुष्यातला वाटाड्या…!!!
पत्ता सोपाच असतो, परंतु कोणीतरी सांगितल्याशिवाय कळत नाही…!
जेव्हा आपण चुकलेलो असतो, तेव्हा एखाद्या अशा पत्ता सांगणाऱ्या “वाटाड्याची” मात्र गरज असते…
आपणा सर्वांच्या मदतीने या तरुणाचा मी वाटाड्या झालो… !
या तिघांनाही आपण स्वतंत्रपणे तीन हात गाड्या घेऊन दिल्या आहेत…
यावर ते भाजीपाला विकतील, लिंबू सरबत विकतील किंवा भंगाराचा व्यवसाय करतील…. काहीही करोत… पण माणसं म्हणून जगतील…!
रस्ता वर्षानुवर्ष तिथेच होता….पोचायचं ठिकाण सुद्धा वर्षानुवर्ष तिथंच जवळच होतं… ते वाट चुकले होते… मी फक्त तुमच्या साथीने; “वाटाड्या” होऊन त्यांना वाट दाखवली…. बाकी माझं काहीही कर्तुत्व नाही…. !!!
4. जिला कुणीही नाही अशी एक मावशी, दोन लहान मुलं पदरात असणारी एक विधवा ताई…. फरशीवर पाणी सांडल्यानंतर ते अस्ताव्यस्त जसं कुठेही दिशाहीन फिरतं तसाच दिशाहीन फिरणारा एक तरुण….!
तिघेही गटांगळ्या खात होते…. फक्त एका काडीचा आधार हवा होता… आपल्या सर्वांचे वतीने तिघांनाही हा काडीचा आधार दिला आहे.
तिघांनाही छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीने आर्थिक मदत केली आहे.
वरील सहा जणांच्या आयुष्याविषयी जर लिहायचं ठरवलं तर सहा स्वतंत्र पुस्तक होतील….!
तुटून फुटून गेली होती ही माणसं…. पण हरकत नाही, आयुष्याला आकार द्यायला स्वतःला तोडून फोडूनच घ्यावं लागतं…!
भीक न मागता यांना काम करायला सांगितलं आहे… त्यांना हे सुद्धा सांगितलं आहे की, फक्त नशिबावर विश्वास ठेवू नका… निसर्गाने सुद्धा हाताच्या रेषांआधी प्रत्येकाला बोटं दिली आहेत…. ती काम करण्यासाठी… मेहनत करण्यासाठी… भविष्य बघण्यासाठी नव्हे…!
शैक्षणिक
दुसरी- तिसरी -पाचवी, सातवी- बीबीए – कम्प्युटर सायन्स – यूपीएससी… आमची मुले या इयत्तांमध्ये शिकतात…!
या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत…!
माझ्या आयुष्यावर जे पुस्तक लिहिलं आहे…. ते आपण विकत घेतलं आणि म्हणून मी या मुलांच्या फिया भरू शकलो…!
जी मुलं राहिली असतील त्यांच्या फीया जूनच्या पहिल्या आठवड्यात भरणार आहोत…!
ज्यांना या अगोदर शाळाच माहीत नव्हती, अशा सर्व मुला मुलींना मॉडर्न स्कूल, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन देत आहोत.
यातला एक जाणता मुलगा परवा रागाने मला म्हणाला, ‘असल्या भिकारी आई बापाच्या घरात माझा जन्म झाला म्हणून माझं आयुष्य वाया गेलं… चांगल्या घरात जन्मलो असतो तर माझ्या आयुष्याची अशी वाट नसती लागली… मला जर वरदान मिळालं; तर मी पहिल्यांदा आई बाप बदलेन…’
त्याला फक्त इतकंच सांगितलंय…. ‘आतापर्यंत भर समुद्रात जे जहाज तुला घेऊन आलंय त्या जहाजाला विसरू नकोस… या जहाजाविषयी कृतज्ञता बाळग… नाहीतर इथपर्यंत सुद्धा आला नसतास…. वादळ आलं; की दिशा बदलायची असते बाळा… जहाज नव्हे…!
डोळे तपासणी
ज्यांना डोळ्यांचे काही त्रास आहेत, अशा सर्वांना आपण महिन्यातील एका दिवशी, एका ठिकाणी जमा करतो आणि त्या सर्वांना एकत्रितपणे घेऊन डोळे तपासणी / ऑपरेशन साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिथे एक तर त्यांना चष्मा मिळतो किंवा डोळ्यांचं ऑपरेशन होतं.
परंतु आमच्याकडे असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतके शारीरिक त्रास आहेत की, त्यांना आमच्याबरोबर, आमच्या गाडीत बसून तिथं येणं सुद्धा जमत नाही… ऑपरेशन आणि तपासणी तर दूरच…
अशांसाठी आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे. रस्त्यावरच डोळे तपासणी करून आम्ही रस्त्यावरच आता त्यांना चष्मे द्यायला सुरुवात केली आहे.
जवळपास अंधत्व आलेल्या माझ्या या लोकांना जेव्हा दिसू लागतं… तेव्हा माझ्या नजरेत नजर घालून माझ्याशी ते मायेनं बोलतात… आणि त्या प्रत्येक डोळ्यात मला मग सूर्य दिसतो…. !
सुरकुतलेले खरबरीत हात मग किरण होऊन माझ्याकडे झेपावतात…. आणि हे किरण, माझ्या मस्तकाचे, गालाचे आणि हाताचे मुके घेतात…!
आणि मग सुर्य आकाशात नाही… तो आपल्या आई – बाबा,आजी आणि आजोबाच्या डोळ्यात आपल्याच घरी आहे हे उमगतं…!
कोण म्हणतं सूर्याजवळ जाणं अशक्य आहे…? आपले बाबा आणि आजोबा यांच्या जवळ एकदा मनापासून जाऊन बघा… सूर्य तिथे भेटेल…!
चंद्रावर जाण्यासाठी कोणत्याही यानाची गरज नाही… आईचे / आजीचे पाय एकदा मांडीवर घेऊन बघा…. चंद्र तिथे भेटेल…!!
जे काही थोडंफार करू शकलो तुमच्या साथीनं, त्या प्रत्येक वेळी डोळ्यातून आनंदाश्रू गालावर ओघळले…
अश्रूंचा हा खारट स्वाद कोणत्याही मिठाई पेक्षा कमी नव्हता…!
माझ्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण केवळ तुम्हा सर्वांमुळे आले आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या पायाशी सविनय सादर…!!!
जीवघेण्या ग्रीष्म ऋतूची काहिली पृथ्वीचे अंग प्रत्यंग जाळतेय. जागोजागी भेगा पडून विच्छिन्न झालेली ही वसुंधरा जणू भग्न मूर्तीसारखी भकास बघतेय एकटक आसमंताकडे! या कोमलांगी प्रेयसीला समीराचे उष्ण श्वास अंतर्बाह्य पोळत आहेत, त्यावर ‘चंदनाची चोळी’ देखील शीतलता प्रदान करायला असमर्थ आहे! नजरेत प्राण एकवटून तिच्या अंतरीची आस वाट बघतेय, कुठं दिसतोय का ‘शामलवर्णीय मेघदूत’ अन त्याची चंचल खट्याळ सखी विद्युल्लता! कारण या दूताने ग्वाही दिल्याशिवाय तिचा प्रियतम अवतरतच नाही. अन एक दिवस या जीवघेण्या प्रतीक्षेचा अंत होतो. श्यामवर्णी मेघांच्या सेनेची अति जलद गरुडभरारी आसमंतात दृष्टिपथास येते! एका बाजूने आक्रमण करीत करीत संपूर्ण नीलाकाशाला व्यापून टाकीत युद्ध जिंकल्याच्या आनंदात त्यांचे गडगडाटी हास्य पृथ्वीला तिच्या प्रियकराची चाहूलच वाटते. मेघाच्या संगती त्याची प्रेयसी विद्युलता आपले चपलांगी हास्य करीत मेघांना रुपेरी रंगाने सजवते. हा जामानिमा तयार झाला की येतो पाऊस. आपल्या प्रेयसी वसुंधरेला कोवळ्या नाजूक सरींच्या स्पर्शाने हलकेच गोंजारून मग मात्र आवेगाने तिचे अंग अंग आपल्या सहस्रबाहू जलधारांनी कवेत घेत बरसतो! या प्रणयाचे साक्षीदार असतात वृक्षलता, आनंदाने आपला पिसारा फुलवून नर्तन करणारे मयूर आणि पावसाच्या एका थेंबानेच तृप्त होणारा चातक!
मंडळी, पाऊस म्हटला की सामान्यजनांना सय येते ती वाफाळलेल्या अदरक घातलेल्या कडक मीठी चाय अथवा जायफळ घातलेल्या धुंद वाफेने गंधाळलेल्या कॉफीची, सोबतीला गरमागरम कांद्याची किंवा तत्सम भजी असली तर ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा आमची! पण या ‘कवी’ नामक फुलपाखरी गिरकी घेत पावसाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींची जातकुळीच वेगळी हो! आपण त्यांच्या शब्दभ्रमाच्या भुलभुलैयात मस्तपैकी जाणून बुजून बंदिस्त होऊन मज्जा मज्जा करीत ‘अंगे भिजली जलधारांनी’ असा अनुभव घ्यायचा!
या मनोहर हिरवाईने लगडलेल्या, रंगीबेरंगी सुमनांच्या ताटव्याने बहरलेल्या वर्षाऋतूचा देखणा नायक असतो ‘पाऊस’! मराठी माणसाच्या मनांमनांत रुजलेले हिरवेजर्द काव्य म्हणजे बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांचे ‘बालभारती’ त प्रस्थापित ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।’ ही आद्य पाऊस कविता! कितीही वेळा वाचा, हिची सर्वकालीन हिरवीकंच हिरवाई कधीच कोमेजत नाही. या बहुप्रसवी भूमीचे सृजन याच पावसाने फुलते. उन्हाने त्रासलेल्या मानवाला तर हा पाऊस म्हणजे आनंदच नव्हे तर नवसंजीवनी देणारा ठरतो. म्हणून तर पावसाळा हा ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ (कवयित्री-शांताबाई शेळके) आहे.
‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा,
पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा’
लहान मुलांची (त्यांच्या लहानपणापासूनच) अन पावसाची गट्टी अश्शी घनदाट असते, की ‘ये रे ये रे पावसा रुसलास का माझ्याशी गट्टीफू केलीस का’ (कवयित्री-वंदना विटणकर) असे ती त्यालाच विचारतात. उत्तर मिळाले नाही तर मग ही मुले पाऊसदादाला सरळ एका ढब्बू पैशाचे आमिष द्यायलाही कमी करत नाहीत. म्हणून तर अखिल बालक मंडळी पहिल्या पावसाची एंट्री व्हावी म्हणून ‘ये रे येरे पावसा तुला देतो पैसा’, असे घोकत असतात. गोड छकुल्याने असा पैसा दिला की, गहिवरलेला आज्ञाधारक पाऊस लगेच हजर झालाच म्हणून समजा!
आता बाळ थोडं मोठं झालं की त्याला अवचितच शाळा नामक खलनायिका भेटते. मग काय आता कवितेचा रागरंगच बदलतो. ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’ (कवी-मंगेश पाडगावकर) असे म्हणत शाळेला वैतागलेली पोरं मग डायरेक्टली भोळ्या शंकरालाच साकडे घालतात. बघा कशी गंमत आहे, धो धो पाऊस अंगणात अन रानावनात कोसळतोय अन ही आई नावाची बाई मुलाला घरात कोंडून ठेवतेय! किती हा हिचा जाच! मग तिची विनवणी अन लांगूल चालन करावे लागणारच ना. ‘ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे’ (आमच्या अति लाडक्या कवयित्री-वंदना विटणकर) अन एकदाचं बाहेर पडलं की धुमशान पळतंय कसं बघा पोरगं पावसाच्या सरी झेलायला, अन गम्माडी गंमत करायला, दोस्तांबरोबर फेर धरत गाणी हवीच- ‘पिरपिर पिरपिर पावसाची, त्रेधा तिरपिट सगळ्यांची’ (परत वंदनाताईच हो!) किंवा झालंच तर ‘अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ । ढगाला उन्हाची केवढी झळ । थोडी न् थोडकी लागली फार । डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।’ (कवी- संदीप खरे)
मैत्रांनो, आता जाऊ या तिथं, जिथं राधा अधीर होऊन म्हणतेय ‘रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणिच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे?’ (जनकवी पी. सावळाराम) निसर्ग कवी बा. भ. बोरकरांची ‘सरींवर सरी आल्या ग’ ही सदा प्रफुल्लित कविता आठवते कां? गोकुळात बरसणारा पाऊस, हिरवेगार कदंब वृक्ष, यौवनाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या वेली, मेघांची गर्जना, विजेची पैंजणे आणि कृष्णधुन आळवणारी त्याची वेणू, यांच्या तालासोबत मनमोहक रंगांनी सजलेले आपले पिसारे फुलवीत मिरवणारे मयूर! त्यांच्यासोबत दुग्धधारांसारख्या भासणाऱ्या धवल जलधारांत सचैल न्हालेल्या गोपींचे कृष्णाशी एकरूप होण्याचे वर्णन बोरकरांनीच करावे! (ही समग्र कविता ऐकावी यू ट्यूब वर पु ल देशपांडेंच्या स्वरात!)
☆ सरिंवर सरी: सरिंवर सरी… ☆
सरिंवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग
गोपी झाल्या भिजून-चिंब, थरथर कापती निंब-कदंब
घनांमनांतुन टाळ-मृदंग, तनूंत वाजवी चाळ अनंग
पाने पिटिती टाळ्या ग, सरिंवर सरी आल्या ग
मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधून
वनांत गेला मोर भिजून, गोपी खिळल्या पदी थिजून
घुमतो पावा सांग कुठून? कृष्ण कसा न उमटे अजून?
वेली ऋतुमति झाल्या ग, सरिंवर सरी आल्या ग
हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग
दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून
मी-तू-पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून
सरिंवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनि धाल्या ग
सरिंवर सरी: सरिंवर सरी….
कवी ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो’ ही कविता मेघांनी आच्छादलेल्या आकाशासारखी गूढरम्य आहे. जणू विरहाचे दुःख डोळ्यांच्या पापण्यांतच थिजल्यासारखे वाटते!
‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने’
मंडळी या निसर्गराजाच्या वर्षाऋतूत भावानुरागी कवीचे मन बरसणाऱ्या जललहरीं सोबत थुई थुई नाचत असते. या पावसाचे नखरेल रुप विविधरंगी आणि बहुढंगी! कधी कोमल हलकेच थेंबाथेंबाने अंगण भिजवणारा रोमांचकारक शिडकावा जणू स्मितहास्याची हळुवार लकेर, वा मंद शीतल समीराची झुळुकच, अथवा रसरंगात दंग असलेल्या मैत्रिणींच्या अंगांवर शिंपडलेले तजेलदार गुलाबपाणी समजा! या पावसाचा मूड पण वेगवेगळा असतो बरं कां! एखाद्या मैफिलीत जाणत्या शास्त्रीय गायकासारखा इंद्रधनुष्याच्या किनारीने नटलेली निलाकाशी शाल पांघरून कधी द्रुत तर कधी विलंबित तालात तो गायनी कला दर्शवतो, तर कधी हाच पाऊस नद्या, नाले, तडाग इत्यादींची तृष्णा एकाच वेळी भागवण्याकरता रसरसून अतिवेगाने अविरत बरसत असतो.
ग्रीष्म ऋतूच्या गर्मीत तिष्ठत असलेल्या विराणी धरेला पहिल्याच भेटीत हळुवारपणे कवेत घेत तिच्यावर मृदगंधाची पखरण करणारा हा पहिला पाऊस तर कवीला अतिप्रिय, त्याच्या प्रणयिनीची आठवण करून देणारा! मंगेश पाडगावकर यांच्या प्रणयधुंद कवितेतील या ओळी पहिल्या ओलेत्या भेटीचे अत्तर शिंपीत येतात.
‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।’
मैत्रांनो, या रमणीय वर्षा ऋतूचा अनुभव घेतल्यानंतर आता लेखाच्या अंती याच पावसाचे रौद्ररूप देखील स्मरण्याची वेळ आलीय! आकाश भयावह काळ्याकभिन्न राक्षससदृश मेघांनी संपूर्णपणे आच्छादलेले, त्यातच मध्ये मध्ये आपली समग्र शक्ती एकवटत सुरु असलेले विजेचे भीषण तांडव, नदी नाल्यांचा जीवानिशी मांडलेला आकांत ऐकणारे कुणीच नाही. ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ (कवी- ग. दि. माडगूळकर) असा प्रलयंकारी घनघोर पाऊस वेड्यासारखा मुसळधार कोसळतोय. इतके दिवस पेरणी करून आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थिजले. अन आता त्याच पिकाची नासाडी करीत त्याच्या कमकुवत खोपट्याकडे तुच्छ नजरेने पाहणाऱ्या मस्तवाल पावसाला शेतकऱ्याची कारभारीण शिवी घालतेय, ‘आरं गाभ्रीच्या पावसा!’ (कवी – स्वप्निल प्रीत)
‘आरं गाभ्रीच्या पावसा! आता कशी दया आली
कवतिक नाही तुजं, जवा तहान आटली ।।धृ।।
ओली ठिगळाची चोळी, वर छप्पर गळते
कागदाच्या होडीवानी माजं खोपटं बुडते ।।१।।
आला पडशाचा ताप, कशी जाऊ मी कामाले
तुझा नाचणारा मोर, घास देतो का पोटाले ।।२।।
रित्या पोटी बाप ग्येला, डोळं होतं आभायाला
फक्त आईच्या डोयांत, तवा पाऊस पाह्यला ।।३।।
त्याच दुष्काळात माझं, सारं सपान सुकलं
आता नको तुझी माया, मन तुले उबगलं ।।४।।
प्रिय वाचकांनो, वरील लेखाकरता मी मुद्दामच बहुतेक गेय कविता निवडल्या आहेत. तुम्हाला भावणारी पावसाची नटरंगी रूपे एन्जॉय करतांना वाफाळत्या ‘चाया गरम’ बरोबर यू ट्यूबवर या कवितांचा आशयघन आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका बरं कां! धन्यवाद!
☆ ‘निरागसता आणि इमानदारी…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं..
साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, “व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?” मास्तर मंजे कंडक्टर.
मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं.
आरं देवा… मंग तिकीट??
त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय.
मग आता???
“तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही.”
सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले. गडबडीत बाकी न्हाय वाचलं.”
“अहो आज्जी. आपण फक्त सांगू तसं. असंबी त्ये बेंन कुणाचं काय ऐकत नाहीत, तरिबी उगा वाईच खडा टाकून बघू. त्येबी, तपासणीसाठी आले तर मग बघू…”
दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही.
डोक्यावरचा पदर सावरत, हळूच म्हणाली,
“नशिबी गरिबी पूजल्या, त्ये परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार.”
ह्या सगळ्या झांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टॅण्ड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, बाहेर कुणी तपासनीस नव्हता. आजीला म्हटलं, “आज्जी, आता सुमडीत उतरा. अन हिकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या भैर पडा.”
आजी कैच बोलली नै.
बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आज्जी दिसली. म्हंटलं…
“आज्जी अजून इथंच?”
आज्जीनं चोळीत खुपसलेलि पर्स काढली, त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं.
आज्जीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काऊंटर वरनं काढलं होतं. मला म्हणाली
“टाक फाडून. म्या भैर आल्यावर फाडणारंच व्हते.
माघारी जाताना मात्र, न इसरता आधी तिकीट काढील.”
म्हटलं, आज्जी…. “पैकं जास्त झालं असतील तर नाष्टा द्या हॉटेलात…”
आज्जी हसली…. म्हणाली “जिच्या दर्शनाला आले, त्या अंबा बाईनं तिची जबाबदारी पार पाडली.
कुठलं गालबोट नं लावता आणलं इथवर. वाटेत उतरवलं असते मला, पकडलं गेले अस्ते तर. पण त्या अंबा बाईनं चार चौघात लाज राखली.
दंड भराय इतकं पैकं न्हाईत पण मग आता म्या किमान हाय तेव्हढं तिकीट काढून, फाडून टाकलं म्हंजे झालं की रं हिशेब बराबर….आता जाताना मात्र इस्रायची न्हाई तिकीट काढायला.
महालक्ष्मीच्या दारात जायचं अन त्येबी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून… हे बरं न्हाई …”
मी काहीच नं बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आज्जी गेली अंबाबाई च्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले.
ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं.
असली गोडं माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे, एखादेवेळी आर्थिकदृष्ट्या दुबळं असतीलही, तो भाग अलाहिदा पण निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोकं, मातीशी घट्ट जोडलेली आपल्या महाराष्ट्राची मुळ ओळख म्हणजे हीचं सोन्यानं बनलेली माणसं.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर
खरे तर,पत्र लिहिण्याचा अट्टाहास नकोच आहे. कारण आपण तर सतत एकमेकांच्या जवळच असतो.त्यामुळे माझ्या आत काय खळबळ उडाली आहे ते तू जाणतो आहेस.तूच माझा सखा सोबती आहेस.
पण कधी कधी वाटतं तू मला एकटीला चालायला यावं म्हणून मध्येच थोडावेळ हात सोडतोस की काय…कारण मग मला एकटे पण जाणवत,..आणखी मग लहान मुलांसारखे गांगरून जायला होतं..
मी एखादी गोष्ट बरोबर करते आहे ना? तुला ते आवडेल का? अश्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी पडते.
देवा,तू सर्व मानवाला चांगल्या गोष्टी दिल्या आहेस.
पण वेळेवर कधी सापडत नाहीत.आता,मला मान्य आहे की ही आमचीच चूक आहे. तरी पण हे देवा, तुझ्या समोर जी आमच्या जीवनात उलथापालथ होते आहे.तेव्हा मात्र गडबडायला होतं.आणी मग तुझ्या शिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे,. बरं
तेव्हा तू नेहमीच आमच्या हृदयात राहा.आत्माराम,जो एक चैतन्य पुरुष आहे. तो जागता पहारा देत आहे याची सतत जाणीव होऊ दे.त्यासाठी चांगली बुध्दी दे.व
आम्हाला सतत तुझ्या सेवेची आठवण येऊ दे.आणी जे रोज काहीतरी आम्ही चुकतो ते तू माफ करशील ना.. बसं बाकी काहीच मागणार नाही.
जीवन सार्थकी लावायचे आहे.त्यासाठी मार्गदर्शन हवं आहे.तुच कर्ता आणि करविता आहेस.त्यामुळे आमच्या साठी जे चांगले आहे.तेच तू देणार ही खात्री आहे. त्यासाठी फक्त तू सोबत राहा. एवढीच इच्छा आहे.. बाकी,तुझी आठवण झाली नाही, असा एकही दिवस नसावा…हिच अपेक्षा..
आता,हे पत्र लिहून घेणार पण तूच आहेस.कोटी कोटी रूपांत असणार्या रोज वेगवेगळ्या घटनां मधून विश्व रुप दर्शन देणार्या
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं…??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
सोहम ट्रस्टचे हितचिंतक आणि माझे मित्र यांनी एके दिवशी व्हाट्सअप वर एका कुटुंबाची माहिती दिली आणि यांच्या संदर्भात काही करता यईल का ? असं विचारलं. दि 14 मे 2024 रोजी मी या कुटुंबाला भेटायला त्यांच्या घरी गेलो.
घर कसलं ? दोन इमारतींमध्ये एक मोकळी जागा… तिथे या कुटुंबाने संसार मांडला होता…!
एक चिमणा…एक चिमणी… चिमण्याची वृद्ध आई आणि चिमणा चिमणीची दोन लहान पिल्लं एवढा हा संसार…!
चिमणा धडधाकट होता, तो रिक्षा चालवायचा… बाहेर जाऊन, वृद्ध आई आणि लहान पिल्लांसाठी दाणे गोळा करून संध्याकाळी घरी परत यायचा….!
चिमणी सुद्धा चिमण्याला मदत करायची… तिच्या परीने संसाराला हातभार लावायची….
चिमण्याची वृद्ध आई घरट्यात दिवसभर एकटी असायची…. पिल्लं शाळेतून घरी आली की त्यांना पंखाखाली घेऊन गोष्टी सांगायची….
एकंदर सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं…. आणि एके दिवशी खरंच दृष्ट लागली…
काही वैद्यकीय परिस्थितीमुळे चिमण्याचा डावा पाय अक्षरशः खुब्यातून कापून काढावा लागला…
घरचा कर्ता पुरुष खाटेवर असहायपणे पडून होता… खंबीर नवऱ्याची असहाय्य अवस्था पाहून, खांबा आड लपून चिमणी मनसोक्त रडून घ्यायची…
चिमण्याच्या वृद्ध आईचा डावा डोळा पूर्ण निकामी, त्याही अवस्थेत ती पिलांना धीर द्यायची….होईल बाळांनो, सगळं व्यवस्थित काळजी नका करू, चला तुम्ही अभ्यासाला लागा….! ती धीर द्यायची.
अभ्यासाचं नाटक करत पिलंही मग पुस्तकाच्या आड लपून पोटभर रडून घ्यायची…
आपण खचलो नाही, हे नाटक दिवसभर म्हातारी उत्तम वठवायची…. पण रात्री सर्व सगळे झोपले की पाय तुटलेल्या पोराकडे पाहून हिला जोरात रडावसं वाटायचं…. पण रडायचीही चोरी…. कारण ती जर रडली तर बाकीचे सगळे तुटून जातील….!
मण्यांना जोडणारा आपण धागा आहोत…. हा धागा तुटला तर मणी निखळतील, याची म्हातारीला पुरेपूर जाणीव होती….
एक डोळा अधु …तरीही ही म्हातारी धडपडत चाचपडत दाराची कडी हळूच काढून घराबाहेर जायची… बाहेर रस्त्यावर एकही माणूस नसायचा….
बेवारस कुत्री, मांजरं, अगोदरपासूनच आकाशाकडे तोंड करून कोणालातरी ओरडून त्यांच्या भाषेत काहीतरी सांगत असायची… ही भाषा करुण असते….
म्हातारी मग त्यांच्याच आवाजात आवाज मिसळून त्यांच्यातलीच एक व्हायची…
जनावर आणि माणूस यांच्यात मग फरकच उरायचा नाही…!
दुःखाला जात पात धर्म लिंग काहीही नसतं…!
कुत्र्या मांजराच्या साथीने रडून घेऊन ती मन मोकळं करायची …. हळूच घरात येऊन चिमण्याच्या डोक्यातून हात फिरवायची… जिथून पाय तोडला आहे, त्या जखमांवरच्या पट्ट्यांवर खरबरीत हात फिरवायची…
वेदनेनं तळमळत असलेल्या चिमण्याला झोप तरी कशी यावी ? तो जागाच असायचा…
तो आईला विचारायचा , ‘आई इतक्या रात्री दिसत नसतानाही बाहेर कुठे गेली होतीस ??
‘अरे बाळा, आज दिवसभर नळाला पाणीच आलं नाही…. आता रात्री तरी पाणी येतंय का ? हे बघायला बाहेर नळावर गेले होते… तू झोप !’
तो इतक्या त्रासातही गालात हसायचा आणि विचारायचा, ‘नळाला पाणी येतंय की नाही, हे बघायला दोन तास लागतात आई ?’
‘अरे तसं नव्हे, आपल्या दारासमोर इतकी कुत्री मांजरं रडत होती… मलाही झोप येईना, मग बसले त्यांच्याच सोबत जरा वेळ….’
‘त्यांच्यासोबत तू सुद्धा रडत होतीस ना आई ? कुत्र्या मांजरांच्या आवाजाबरोबर मिसळलेला मला तुझा आवाज सुद्धा कळतो की गं आई …’
कापलेल्या पायाच्या वेदनेपेक्षा, डोक्यात उठलेली ही सणक जास्त वेदनादायी होती….!
म्हातारी तेवढ्यातून सुद्धा हसायचं नाटक करत म्हणायची, ‘मला मेलीला काय धाड भरली रडायला… भरल्या घरात ?’
एक डोळा नसलेल्या आजीचा, दुसरा डोळा मात्र यावेळी दगा द्यायचा… या दोघांचं संभाषण ऐकून…. तो स्वतःच पाणी पाणी व्हायचा …
आणि हेच पाणी मग चिमण्याच्या गालांवर अभिषेक करायचे…. म्हातारीच्या नकळत….!
चिमणा मग तोडलेल्या पायाच्या पट्ट्यांवर दोन्ही हात ठेवून वेदनेनं कळवळत आईला म्हणायचा, ‘आई बहुतेक नळाला पाणी आलंय बघ आत्ता…’
हो रे हो, म्हणत म्हातारी पुन्हा धडपडत घराबाहेर जायची आणि दोन तास घरात परत यायचीच नाही…!
दिवसभर थांबवून ठेवलेलं पाणी, आता मध्यरात्री कोसळायचं एखाद्या धबधब्यासारखं…!
घराबाहेर नळाला पाणी येत असेलही… नसेलही…. परंतु चिमण्याची उशी मात्र रोज सकाळी ओली चिंब भिजलेली असायची…. कशामुळे काही कळलं नाही बुवा !
हा मधला काळ गेला…. या काळामध्ये चिमणीने आणि वृद्ध आजीने घरटं सांभाळलं….
काही काळानंतर, हा सुद्धा जिद्दीने उठला…. म्हणाला, ‘फक्त डावाच पाय कापला आहे…. रिक्षा चालवायला अजून माझे दोन हात शिल्लक आहेत…. रिक्षाचे ब्रेक दाबायला उजवा पाय लागतो, तो ही माझ्याकडे शिल्लक आहे…. इतकं सगळं शिल्लक आहे, तर मग मी गमावलंच काय… ?
त्याच्या या वाक्यावर आख्य्या घरात चैतन्य पसरलं…!
याही परिस्थितीत काही काळ सुखाचा गेला…. पण, अशी काही परिस्थिती उद्भवली की त्याच्या चिमणीला गुडघ्याचे आजार उद्भवले आणि ती कायमची अपंग झाली….!
स्वतःचा पाय कापला जाताना जितका तो व्यथित झाला नसेल, तितका तो चिमणीला अपंग अवस्थेत पाहून व्यथित झाला…. कोलमडला…. !
एक पायाचा चिमणा आणि दोन्ही पाय असून नसलेली चिमणी…. दोघांच्याही डोक्यावर घरटं सांभाळण्याची जबाबदारी….!
नळाला पाणी आलंय का बघते म्हणत, म्हातारी मात्र रोज रात्र रात्रभर घराबाहेर राहू लागली…. उश्या भिजतच होत्या… पुस्तका आड दोन्ही पिलांचे डोळे सुजतच होते….
याही परिस्थितीत तो खचला नाही… नेहमी तो म्हणायचा, ‘माझे दोन हात आहेत आणि उजवा एक पाय आहे मी काहीही करू शकतो….!’
ज्यांच्याकडे सर्व काही आहे आणि तरीही ज्यांना काही करायचं नसतं, अशांसाठी ही चपराक आहे !
या सर्व अवस्थेत या जिद्दी कुटुंबाने परिस्थितीशी सामना केला…. जुळवून घेतलं….!
परंतु आता मात्र या परिस्थितीला सुद्धा खरोखर दृष्ट लागली….
चिमण्याच्या हाताला काहीतरी इन्फेक्शन झालं ….
ते वाढलं…. आणि डॉक्टरांनी उजवा हात कापावा लागेल असं सांगितलं….!
या वाक्याबरोबर मात्र पहिल्यांदाच चिमणा कोसळला आणि त्यानंतर म्हातारी….!
चिमणीला तर पायच नव्हते, ती खाटेवरच पडून होती…. म्हणून तिच्यावर कोसळायची वेळ आलीच नाही… पण आता मात्र ती पूर्णतः ढासळली….!
दोन्ही लहान पिलं आजीच्या थरथरत्या पंखाखाली निपचित पडली…. !
हीच ती वेळ…. माझ्या मित्राने मला सांगितले या कुटुंबासाठी काही करता येईल का ते बघ….
आणि म्हणून आज मी इथे होतो….!
गेले तीन तास मी इथे आहे…. आयुष्यातले चढ उतार रोज बघायची मला सवय आहे…
तरीही चिमणा चिमणी आणि म्हातारीच्या वेदना ऐकून…. एक फोन येतोय हं… असा बहाणा करत, मी किती वेळा घराबाहेर आलो असेन याची गणती नाही….!
इतक्या वेळा घराबाहेर आलो, पण म्हातारीच्या घराबाहेर मला कुठेही नळ मात्र दिसला नाही…. !
म्हातारीच्या मनातला तो नळ, मला किती वेळा भिजवून गेला…. कसं सांगू…?
शेवटी चिमण्याला आणि म्हातारीला हात जोडून म्हणालो, ‘आम्ही तुम्हाला काय मदत करू ?’
ते स्वाभिमानी कुटुंब यावेळी निःशब्द झालं… आणि मला माझीच लाज वाटली…. !
‘चिमण्या, जोपर्यंत तू “समर्थ” होत नाहीस तोपर्यंत किराणा भरून देऊ…?’ मी निर्लज्जपणे विचारलं.
‘नको माऊली’, चिमण्या अगोदर म्हातारी हात जोडत बोलली.
‘पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ ?’
‘नको काका; आम्हाला दोघांनाही स्कॉलरशिप मिळते त्यात आमचं शिक्षण होतं…’ मोठी पोरगी चिवचिवली…
खाटेवर अगतिकपणे पडलेल्या ताईकडे मीच पाय तुटलेल्या माणसासारखा गेलो आणि तिला म्हणालो, ‘अगं ताई, तुझ्या उपचारांचा खर्च करूया का आपण…?’
ती म्हणाली, ‘नको दादा माझा सगळा उपचार ससून मध्ये सुरू आहे, तिथं काही पैसे लागत नाहीत… शिवाय ससून मध्ये एक समाजसेवी संस्था आहे ती आम्हाला मदत करते आहे….’
शेवटी पाय ओढत, चिमण्याकडे गेलो आणि म्हणालो, ‘अरे बाबा, तू तरी सांग, आम्ही कशी मदत करू तुम्हाला…?’
माझे जोडलेले हात हाती घेऊन डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, ‘डॉक्टर, माझा उजवा हात कापला जाऊ नये इतकीच प्रार्थना करा…
‘मी परत रिक्षा चालवून माझं संपूर्ण कुटुंब पुन्हा चालवू शकेन, इतकीच प्रार्थना करा…’
‘मी आणि माझं कुटुंब कोणावर सुद्धा अवलंबून राहणार नाही इतकीच प्रार्थना करा…’
‘आणखीही काही दुःख मिळाली तर ती सहन करण्याची ताकद मला मिळो, इतकीच प्रार्थना करा….’
‘बस आणखी तुमच्याकडून दुसरं काहीही नको…!!!’
त्याने नमस्कारासाठी हात जोडले…
त्याच्या या वाक्यावर मला रहावलं नाही…. आपोआप त्याच्या खांद्यावर मी डोकं टेकवलं आणि माझा बांध फुटला…
त्याचा खांदा माझ्या अश्रूंनी भिजला….
या उपरही माझ्या खांद्यावर हात थोपटून तोच म्हणाला, ‘काळजी करू नका डॉक्टर… सगळं काही होईल व्यवस्थित…. !!!
कोण कोणाला मदत करत होतं …हेच कळत नव्हतं…!
यानंतर म्हातारी लगबगीने उठून बाहेर जायला निघाली…. अस्तित्वातच नसलेल्या नळाला पाणी येतंय की नाही, हे बघण्यासाठी म्हातारी कदाचित बाहेर गेली असावी… आता ती दोन तास येणार नाही, हे मला माहीत होतं….!!!
एका गरीब कुटुंबाला मदत करायला गेलेलो मी, तिथून बाहेर पडताना आज मीच खूप श्रीमंत झालो…
सुख म्हणजे नक्की काय असतं, हे मलाही आजच समजलं… !!!
(अत्यंत महत्त्वाची टीप : हे स्वाभिमानी कुटुंब स्वतःच्या तोंडाने काहीही मागत नसलं, तरी सुद्धा यांच्या घराला छप्पर नाही, फाटकी ताडपत्री आहे, येत्या पावसाळ्यात ही फाटकी ताडपत्री आणखी फाटून घराचा चिखल होणार आहे. घरात दोन अपंग व्यक्ती, वृद्ध आई आणि दोन लहान मुलं राहतात…. सबब या कुटुंबाने काहीही मागितले नाही तरी आपण त्यांच्या घराला पत्रे लावून देणार आहोत. बघू. त्याच्या घरून निघताना तो माझ्या खांद्यावर थोपटून म्हणाला होता, ‘डॉक्टर, काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित…. त्याच्या याच शब्दांवर माझाही विश्वास आहे ….!!!)