आज राखी पौर्णिमा !भाऊ नी बहिणीचे नाते दृढ करण्याचा दिवस !रेशीम धागा बांधूनही वज्राहून कठीण, बंध तुटता तुटणार नाही असे मनाने मनाशी बद्ध होण्याचा क्षण !! भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे जाते. हातावर रेशीम रेशमी राखी बांधते ••••आणि औक्षण करून भावासाठी दीर्घायु प्रार्थना करते ••••ही पारंपारिकता••• हे संस्कार •••मन मोहरून येते!! किती आनंद वाटतो हे सांगायला नकोच••••
आपले हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत न्यायला पाहिजे ••• हे पण आपल्यावर झालेले संस्कार ! मग विचार आला ••• हे सगळे आपल्या पिढीपर्यंत ठीक होते ••• पण आजच्या युगात एक अपत्य असणार आहे. मग त्यांना बहिण भावाचे नाते कसे कळणार ?
त्यातल्या त्यात ही पिढी सुद्धा बरीच म्हणावी लागेल. कारण आपल्याला बहिण-भाऊ असल्याने मुलांना काका, मामा, मावशी, आत्या, ही नाती आहेत; त्यामुळे चुलत, मामे, मावस, आते बहीण किंवा भाऊ पण आहेत. त्यामुळे आताची ही पिढी याच बहिण-भावां समवेत रक्षाबंधन करू शकत आहे ; पण पुढे काय? या पिढी नंतरची पिढी ••• म्हणजे या एकुलत्या एक अपत्याला, एकुलते एक अपत्य. मग त्यांना तर काका, मामा, मावशी, आत्या असणारच नाही. पर्यायाने असे बहिण-भाऊ पण असणार नाहीत. मग आपली ही गोड पारंपारिकता, आपली इतकी चांगली संस्कृती, पुढे जाणार कशी?
काळाची हीच पावले ओळखून त्या दृष्टीने आपण काही गोष्टी का अनुसरू नयेत ? स्वतंत्र भारतापासून आपण नेहमी प्रतिज्ञेत म्हणतो ;सारे भारतीय माझे बांधव आहेत••• मग हे वाक्य फक्त प्रतिज्ञा पुरते न मर्यादित ठेवता ;खुल्या मनाने आपणच काही नाती निर्माण केली पाहिजेत. अलीकडे बऱ्याच जणी जवानांना राखी पाठवून सैनिक हे देशाचे, पर्यायाने आपलेही रक्षण करतात; म्हणून ते भाऊ झाले, या भावनेतून त्यांच्याशी बहिण-भावाचे नाते दृढ करू पाहतात. किती उत्तम उदात्त विचार आहे पण यातून खंत वाटते आपण ज्यांना राखी पाठवतो तो भाऊ कोण आहे हेच आपल्याला कळत नाही जीवन भरात एकदा का होईना पण आपण पाठवलेला राखी भाऊ आपण पहावे हे येथेच ना मनात पण मग जेव्हा कोणी कोणताही जवान दिसेल तोच आपला भाऊ मानायचे आणि उगीच मनाचे समाधान करून घ्यायचे. यातून खरेच हेतू साध्य होतो का ?जरी हेतू साध्य नसेल होत तरी भावनिक बंध निश्चित निर्माण होतात •••
पण मग यातूनच हा क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी, जातीयवाद धर्मवाद सगळे बाजूला सारून, अशी नाती आपणच निर्माण करायला पाहिजेत. असे वाटते. आपण आपल्या आजूबाजूची, परिचयाची, वेगळ्या धर्मातील, वेगळ्या जातीतील, व्यक्तीला बहिण भाऊ मानून, त्यांच्याशी असे नाते प्रस्थापित केले पाहिजे. म्हणजे मग हाच आदर्श आपली पुढची पिढी जे एकुलते एक आहेत ते डोळ्यापुढे ठेवतील.
; आणि नकळत त्यांचे एकटेपण दूर होण्यास मदत होईल. रक्ताच्या नात्या पेक्षा ही मानलेली नाती जास्त महत्त्वाची असतात.
नुसतेच वेगवेगळ्या जाती-धर्माचे बांधव करणे गरजेचे नाही तर अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांगगृहे येथील काही जणांना अगदी व्रत घेतल्यासारखे तेथे जाऊन हा दिवस साजरा केला ;तर त्यांना सुद्धा आपले कोणी आहे, हा विश्वास, जो त्यांना मिळणे अत्यंत गरजेचे असते ; तो विश्वास ते नाते आपण दृढ केले पाहिजे.
खरंच असे रक्षाबंधन मनापासून प्रसिद्धीसाठी नव्हे जर आपण सुरू केले तर खऱ्या अर्थाने हा आदर्श आपण नव्या पिढीपुढे स्थापन करू शकू ;आणि एवढी गोड परंपरा, एवढी चांगली संस्कृती हिचा र्हाद न होता ती वेगळ्या प्रगल्भ अर्थाने वृद्धिंगत होईल ••••आणि खरोखरच आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनाच म्हणावे वाटेल••••एक सोडून बाकी साऱ्या बंधू-भगिनींनो••••
☆ भय इथले संपत नाही – कवी:- माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆
☆ भय इथले संपत नाही ☆
*
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते…..
*
ते झरे चंद्र सजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया…..
*
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला…..
*
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे !!
*
कवी:- माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस
… लता दीदींचे स्वर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा साज, यांतून ज्या एका कवितेचं ग्रेसफूल गाणं झालं… ती ही, गूढरम्य कवी मानलं गेलेल्या कवी ग्रेस यांची कविता वाचनात आली. आणि… भय… या सारख्या आदिम आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या संवेदनेवरची ही कविता आहे हे लक्षात आलं. आणि मग ग्रेस यांच्या अतर्क्य, अनाकलनीय, पण अपरिमित सुंदर अशा भावविश्वात प्रवेश करायचं ठरवलं.
ग्रेस यांच्या कविता अतिशय दुर्बोध, दुर्गम आहेत असं म्हंटलं जातं… पण असंही म्हंटलयं की… ग्रेस यांच्या कवितांच्या शब्दांच्या अर्थाच्या उंबरठ्यावर थबकू नका. त्यांच्या वेदनेशी रममाण व्हा… मगच ही कविता कळेल.
कवी ग्रेस यांना त्यांची आई सोडून गेल्याचं दु:ख ते पचवूच शकले नाहीत. तिच्या आठवणी, संध्याकाळच्या कातरवेळी अधिकच दाटून यायच्या. आणि अंधार व्हायला सुरुवात झाली की तो काळोख त्यांचं आख्खं मन काबीज करायचा आणि एका अनामिक अशा भयाने, भीतीने ते व्यापून जायचं आणि मग अशावेळी त्यांच्यातल्या त्या बालकाला आपल्या आईची तीव्रतेने आठवण व्हायची. कारण भीती वाटली की मूल आईचा आधार, पदर शोधतं!
भय…. तसं म्हंटलं तर… आपल्या आनंदाचं निधान असलेली प्रत्येकच गोष्ट, व्यक्ती, तिचा आधार तुटण्याचं भय असतंच आपल्या मनात ! नाती, मैत्री, जुळलेले अनुबंध तुटण्याचं, कायमचे दुरावण्याचं, विपन्नता येण्याचं, अवहेलना नशिबी येण्याचं… अशा अनेकविध गोष्टींच भय सतत आपल्या मनात असतंच ! आणि मग संध्याकाळी मनाची व्याकुळता, कातरता अधिकच गहिरी होते.
कवीच्या मनाची इथे तीच अवस्था झाली आहे. कवी म्हणतो……
काहीही झालं तरी, केलं तरी, भय इथले संपत नाही ! आणि मग माझं व्याकुळ मन तुझ्या आठवणींनी भरून येतं. एक अनामिक अशी भीती दाटून येते मनात ! मग मी ती घालविण्यासाठी तू मला शिकविलेली शुभंकर अशी गीते म्हणू लागतो. कारण… बाहेरचा आणि मनातलाही काळोख दूर करण्याचं, त्या येऊ घातलेल्या तमाला दूर सारण्याचं सामर्थ्य आहे त्या लावलेल्या दीपज्योतींमध्ये आणि भोवताल उजळवून टाकणा-या त्या मंद, शांत, स्निग्ध प्रकाशात, त्या उच्चारलेल्या पवित्र अशा शब्दरवांत ! हे तुझेच तर संस्कार आहेत ना !
आठवणींत रमलेला कवी अचानक आपल्याला… आसक्ती-अनासक्तीच्या, जन्म-मृत्यूच्या फेऱ्याच्या अनाकलनीय अशा विश्वात घेऊन जातो. आणि मग सुरू होते रूपकांची बांधणी आणि उभारणी… आणि वाहू लागतो प्रतिमा आणि प्रतिकांचा एक ओघ, एक खळाळता, शुभ्र, फेनिल प्रवाह !
एकीकडे रोमा-रोमांत, रंध्रा-रंध्रात झिरपत जाणारं, झरत जाणारं ते चंद्र-चांदणचु-याचं.. सुखाचं चांदणं मन प्रसन्न करून जातं. पुन्हा अशाच वेळी मनाला… धीर धरी रे… असं समजावत… आकाशातून… जमिनीवर यायचं असतं. धरतीची भगवी माया….
विरक्त वृत्ती समजून घ्यायची असते. सगळं तिचंच आहे, तिच्यातूनच निर्माण झालयं… पण ती धरती किती अलगद तिच्यातलं मीपण कातरून टाकते… नि:संग होते, अलिप्त होते, अगदी निरपेक्ष भावनेने. तिची भगवी माया, विरक्त वृत्ती या रूपकातून व्यक्त होते… सगळं देऊन मोकळी होते ही माया! आईची माया तरी याहून कुठे वेगळी आहे??
कवीने… जन्म-मृत्यूचं रहाटगाडगं स्पष्ट करतांना झाडाचं फार सुंदर रूपक वापरलं आहे. झाड मोठं झालं की त्याची बीजं परत त्याच्या पायाशी निजतात… म्हणजे रुजतात… पुन्हा झाडाचा जन्म होतो… अशी ही संपणं… रूजणं… उगवणं… बहरणं… संपणं… हे चक्र सातत्याने सुरुच असतं. तद्वतच जन्म-मृत्यूचं ही आहे. जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. म्हणूनच मृत्यू चं भय बाळगू नये.
पुढील ओळींत कवीला, आईचे मंद, हळवे, वात्सल्य, ममतेने भरलेला बोल आठवला. त्याच्या भय व्याप्त मनाला हा हळुवार, अलवार प्रेमाचा स्पर्श आठवला. आणि कवीने तो…
सीता वनवासात जातांना सोबत घेऊन गेलेल्या राघव शेल्या च्या स्पर्शाच्या रूपकाच्या कोंदणात अगदी अलगद, चपखल बसवला. अतिशय देखणी बांधणी रूपकाची !!
आठवणींचं असं असतं ना की त्या सरता सरत नाहीत. आठवणींचं चांदणं झरतंच असतं… स्त्रवतंच असतं… झिरपतंच असतं… आणि मनाला वाटतं असतं… अजुन ही चांदरात आहे!! त्यामुळे च मग त्याच आठवणींचं दु:ख, त्या वेदना, तो सल… सतत सतत असतो… बोच जाणवंत असते अहर्निश! मग होतं काय…. की… परमेश्वराच्या प्रार्थनेत आपण आपल्या दु:खाचं रडगाणं गात रहातो, स्तोत्र म्हणावं तसं! आपलं दु:खच उगाळत बसतो, गुणगुणत बसतो. आणि त्याच्यातच अडकून बसतो. अलिप्त होता आलं पाहिजे खरं तर! इंद्रियसुखा च्या पलीकडे जाऊन, माया, मोह त्यागून विरक्त होता आलं पाहिजे. असंच अभिप्रेत असावं यात असं वाटतं.
यमन रागातलं हे गीत ! यमन…. पाण्यासारखा तटस्थ राग! जो रंग मिसळला तसा होतो, आणि कानाला गोड वाटतो. त्यामुळे ग्रेस नी जरी हे गीत आईला उद्देशून, आईसाठी लिहिले असेल तरी… आपल्याला प्रिय असणाऱ्या कुणाही व्यक्तीसाठी ते व्यक्त होणं असू शकतं. म्हणूनच तर ग्रेसच्या कवितांच्या गाभा-यातलं गूढ, आत थेट उतरून प्रवेश केल्यानंतरच उकलतं आणि अंतरंग प्रकाशित होतं… हेच खरं !
आम्ही राहत असलेल्या गल्लीत दोन मथुरे नावाचे परिवार होते. एक कोपऱ्यावरचे मथुरे आणि दुसरे शेजारचे मथुरे. त्यांचे एकमेकांशी चुलत नाते होते पण फारसे सख्या मात्र नव्हते. एकमेकांविषयी दोघेही बोटं मोडूनच बोलायचे. कोपऱ्यावरचे मथुरे यांचं फारसं कुणाशी सख्य नव्हतं पण दुसऱ्या मथुरेंच्या घरी आम्हा मुलांचा अड्डा जमायचा आणि त्याला कारण होतं “बेबी आत्या आणि नलुआत्या”. त्यांच्या आईंना आम्ही “काकी” म्हणायचो. सावळ्या, उंच, कृश बांध्याच्या, व्यवस्थित चापूनचोपून सुती नऊवारी लुगडं नेसणाऱ्या काकींचा तसा गल्लीत दरारा होता. काकी पाकनिपुण होत्या. त्यांच्या हातची मसुराची आमटी मला फार आवडायची. ढणढण पेटलेल्या चुलीतली लाकडं थोडी बाहेर काढून बीडाच्या तव्यावर सुरेख, मऊसूत तेलावर लाटलेल्या सुंदर पुरणपोळ्या निगुतीने भाजत. तो केशर वेलचीयुक्त सुगंध आजही माझ्या नाकात आहे. काकी उपासतापास, अनेक धार्मिक व्रतवैकल्ये करायच्या. सगळ्यांशी फार जवळिकतेने नसल्या तरी गोडच बोलायच्या.
मात्र काकींविषयी गल्लीत कुणकुण असायची. काकी म्हणे पहाटेच्या प्रहरी उठून ओलेत्याने पिंपळाच्या वृक्षाभोवती उलट्या फेऱ्या मारतात. त्यांना मंत्रतंत्र ज्ञान कळतं. त्या करणी करतात. “करणी कवटाळ काकी” अशी संबोधनं त्यांच्या बाबतीत वापरलेली कानावर यायची पण त्याचबरोबर त्या ही सर्व कर्मकांडं का करतात याच्या कारणांचीही चर्चा व्हायची.
“दोन प्रौढ कुमारिका आहेत ना घरात! त्यांची लग्न कुठे जमत आहेत ? वयं उलटून गेली आता कोण यांच्याशी लग्न करणार आणि जमलं तरी घोडनवऱ्याच ना ?” असं काहीबाही अत्यंत अरोचक भाष्य कानावर पडायचं. ते गलिच्छ वाटायचं आणि ते ज्यांच्या अनुरोधाने उच्चारलं जायचं त्या नलुआत्या आणि बेबीआत्या आम्हाला तर फारच आवडायच्या. त्याचे कारण, वयातलं अंतर विसरून त्या आमच्याबरोबर सापशिडी, गायचोळा, सागरगोटे, काचापाणी, पत्ते असे अनेक बैठे खेळ अतिशय मनापासून खेळायच्या. आम्हाला काही बेबी आत्याचा काळा वर्ण, बोजड कुरळे केस अथवा नलुआत्याचे जरा जास्तच पुढे आलेले दात, किरकोळ शरीरयष्टी, विरळ केस हे सारं कुरूप अथवा असुंदर आहे असं वाटायचंही नाही. खरं सांगायचं तर बालमनाला भावणारं, आकर्षित करणारं जे काही असतं ना ते समाजाच्या वैचारिक चौकटीत बसणारं नसतंच. आमच्यासाठी नलूआत्या आणि बेबी आत्या तशा होत्या. कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं. मैत्रिणी म्हणाव्यात तर वयात खूप अंतर होतं पण प्रत्येक वेळी नात्याला नाव असलंच पाहिजे का ? वय, रूप यापलिकडचं, नावाशिवाय असलेलं हे नातं मात्र खूप हवंस, सुरक्षित आणि गोड होतं. बालपणीचा एक आनंददायी कोपरा होता.
माझी मोठी बहीण अरुणाताई हिला तर मी “मुक्काम पोस्ट बेबी आत्या आणि नलुआत्या” असंच म्हणायचे. काय असेल ते असो पण ताईचं आणि त्यांचं विशेष नातं होतं. खरं म्हणजे ताई तर मुंबईला आजोबांकडे राहायची पण जेव्हा ती घरी यायची तेव्हा पहिली धावत बेबीआत्या— नलुआत्यांकडे जायची आणि त्याही तिच्या आवडीचं, ती येणार म्हणून काही मुद्दामहून केलेलं तिला प्रेमाने भरवायच्या. पुढे घडलेल्या ताईच्या प्रीती विश्वात या दोघींचा सक्रिय वाटा होता हेही नंतर कळले. दोघांच्याही नंतरच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरे, स्थलांतरे झाली पण हा जिव्हाळा, हे प्रेम आयुष्यभर टिकून राहिले हे विशेष. एकमेकांना भेटण्याची त्यांची प्रचंड धडपड मी अनुभवलेली आहे. तो आनंद, त्या मिठ्या, अश्रु आजही दृष्टीत आहेत. काय होतं हे ? काय असतं हे ? कोणतं नातं ?
नलुआत्या आणि बेबीआत्या या दोघीही कलाकारच होत्या. सुरेख भरतकाम करायच्या. त्यांच्या दारावर लावलेल्या एका पडद्यावर एक सुरेख रेशमाच्या धाग्याने विणलेली बाई म्हणजे उत्कृष्ट भरतकामाचा नमुना होता. संक्रांतीत चौफेर फुललेल्या काट्यांचा, पांढराशुभ्र तिळगुळ त्या करायच्या. ती कल्हई लावलेली पितळेची परात, मंद पेटलेली शेगडी, थेंब थेंब टाकलेलं साखरेचं पाणी आणि त्यावर हळुवार हात फिरवत फुलत चाललेले ते तिळाचे दाणे माझ्या नजरेत आजही आहेत. इतका सुंदर तिळगुळ मी त्यानंतर कधीच पाहिला नाही.
मनाच्या स्मरण पेटीत ठळक गोष्टी तशाच्या तशा टिकल्या असल्या तरी अनेक गोष्टी पुसूनही गेल्या असतील पण आज हे लिहिताना मला वेगळ्या जाणिवा जाणवत आहेत. माझं आणि माझ्या सवंगड्यांचं त्यांच्याभोवती एक बालविश्व गुंफलेलं होतंच पण त्या दोघींच्या भावविश्वात आम्ही होतो का ? तेवढी आमची मानसिक क्षमता नव्हतीच. त्या वयात तेव्हा एवढेच कळत होतं की या दोघींसाठी “वर संशोधन” चालू आहे आणि त्यांची लग्नं काही जमतच नाहीत. “त्यांची लग्नं” हा गल्लीतला त्यावेळचा महत्त्वाचा चर्चेचा विषय होता. नकाराच्या अनंत फेऱ्यात त्यांच्या मनाच्या काय चिंध्या झाल्या असतील इथपर्यंत तेव्हा आम्ही पोहोचू शकलो नाही. पण घोडनवऱ्या, प्रौढ कुमारिका हे शब्द मात्र खूप सतावायचे.
त्याच काळात एक धक्कादायक घटना गल्लीत घडली ती म्हणजे ठाण्यातील प्रसिद्ध “मराठे सोनारां”च्या दुकानात काम करणाऱ्या भाई नावाच्या तरुणा बरोबर बेबीताईने पळून जाऊन लग्न केले. एका उच्च जातीय मुलीने एका बॅकवर्ड जातीच्या मुलाशी अशा पद्धतीने लग्न करणं हा फार मोठा गुन्हाच होता जणू ! जबरदस्त धक्का होता. काकीने तर अंथरूणच धरलं.
“समाजात तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही.. ”
“काकीच्या उपवासतापासाचा काय परिणाम झाला ? करण्या केल्या ना ? भोगा आता ! असं दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं भलं होत नसतं.. ”
अशा अनेक उलटसुलट भाष्यांचे प्रवाह कानावर आदळत होते. काहीसं नकोसं, भयंकर घडले आहे एवढंच जाणवत होतं आणि नलुआत्याची यावर काय प्रतिक्रिया होती ? तिला दुःख, आनंद, द्वेष काय जाणवत होतं ?
ती इतकंच म्हणाल्याचं मला आठवतंय, ” बरं झालं ! निदान बेबीचं लग्न तरी झालं. ”
या वाक्याच्या आत तिच्या मनातलं, “माझं काय आता ?” हे ऐकू येण्याचं कदाचित माझं वय नव्हतं.
मात्र या घटनेनंतर नलुआत्याने वर संशोधन या विषयात पास होण्यासाठी अनेक धाडसी प्रयोग केले. कुरूपत्वात भर टाकणारे पुढे आलेले दात दंतचिकित्सकाकडे जाऊन काढून घेतले. किती वेदना तिने सहन केल्या. त्यावेळी या शस्त्रक्रिया कुठे प्रगत होत्या ? असं काही करून घेण्याचा ट्रेंडही नव्हता. यावरही समाजाचे कुत्सित फिदीफिदीच असायचे. डोक्यावर कृत्रिम केसांचा भारही नलुआत्याने चढवला. छान, तलम, रंगीत साड्या नेटकेपणाने आणि जाणीवपूर्वक ती नेसू लागली. आहाराकडे लक्ष देऊ लागली. कपोल, कटी, वक्ष या अवयवांची जपणूक करू लागली. या नव्या नलुआत्याच्या आतली नलुआत्या मात्र कुठेतरी हरवत चाललेली आहे असे त्यावेळी वाटले. कधीकधी ही नवी नलुआत्या खूप केविलवाणी, खचलेली ही वाटायची. मात्र या तिच्या सर्व प्रयत्नांची फलश्रुती परिणामकारक झाली. अखेर स्वजातीतला, मध्यमवर्गीय, नोकरी असलेला, संसाराची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असणाऱ्या एका साध्या परिस्थितीतल्या कुटुंबातल्या, प्रथमवर प्रौढवयीन, सज्जन मुलाशी नलुआत्याचे लग्न जमले.
“चि. सौ. कां. नलिनी मथुरे” असे पत्रिकेवर नाव झळकले आणि समस्त गल्लीने या अति प्रतिक्षित विवाह सोहळ्यास जातीने हजेरी लावून “शुभमंगल सावधान” म्हणून आनंदाने मंगलाक्षता उधळल्या.
या विवाहास आमंत्रण नसतानाही बेबीआत्याने चोरून हजेरी लावली होती आणि नलुआत्याने तिला भर मांडवात मिठी मारली होती— हे दृश्य मी आजही विसरलेले नाही.
या सगळ्या घटनांचा आज जेव्हा मी विचार करते तेव्हा त्याविषयी खूप काही बोलावसं वाटतं.
बेबीआत्याने खालच्या जातीतल्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं हे चुकलं का ? जातीधर्माचा इतका पगडा का असावा की तो गुन्हाच ठरावा ? ती असहाय्य होती म्हणून तिच्या हातून हे अविवेकी कृत्य घडले का ? ती समाजाच्या दृष्टीने सुखी नसेलही पण तिने तिच्या आयुष्याशी केलेली तजजोड तिच्यासाठी समाधानकारक असेलही. यात जातीचा संबंध कुठे येतो ?
त्यावेळी लपत छपत एक विचार माझ्या मनात आला होता की मुलीचं लग्न जमणं, ते होणं किंवा न होणं हे इतकं मोठं आयुष्याची उलथापालथ करणारं आहे का ? पुढे भविष्यात आपल्यावरही जर अशी वेळ आली तर ? घोडनवरी, प्रौढ कुमारिका ही कळकट विशेषणे आपल्या पदरी आली तर ? तर यावर मात करायला हवी. व्यक्तिमत्त्वाची मजबूत घडण करून स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. समाजाच्या अशा हीन प्रहाराचे बळी न ठरता वेगळ्या वाटेवरून जाता आले पाहिजे, वेगळे आदर्श निर्माण करायला हवेत.
प्रातिनिधिक स्वरूपात जेव्हा मी बेबी आत्या आणि नलुआत्यांना पाहते तेव्हा जाणवतं की त्यांच्यात अनेक कला होत्या. त्या कलांना त्याकाळी वाव मिळाला असता तर किंवा त्यांनीच त्यांच्यातील असलेल्या गुणांचा आदर राखून त्यांना अधिक प्रगत करून एक समर्थ आयुष्याची वाट आखली असती तर ? स्वसन्मान, स्वतःची ओळख मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर ? कदाचित त्या काळासाठी ते आव्हान असेल पण अशक्य होते का ? केवळ लग्न होणे ही एकमेव इतिश्री होती का आयुष्याची ? आज मुलींसाठी बदललेला काळ अनुभवत असताना हे तुलनात्मक विचार मनात जरूर येतात. आज लिव्ह—ईन—रीलेशनपर्यंत पर्यंत काळ पुढे गेलेला आहे. पण त्याचबरोबर अजूनही “लग्न” या विषयावर व्हावे तितके विचारमंथन झालेले दिसत नाही. समाजाच्या डोळ्यातली भिंगं व्हावी तितकी स्वच्छ झालेली वाटत नाहीत. “प्रौढ कुमारिका” या शब्दामागचं भीषण वास्तव निपटलेलं नाही वाटत.
पण बालपणीच्या या घटनेनंतर स्त्रीसक्षमता म्हणजे काय या विचारांचा एक झरा माझ्या मनात त्या वेळेपासून उसळला होता हे नक्की.
☆ ‘आनंदवन प्रयोगवन’ – लेखिका : सुश्री सुलभा तांबडे ☆ माहिती प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
डॉ. विकास व डॉ. भारती यांच्या सोबत दोन – तीन तास गप्पा मारल्या नंतर त्यांची खरी ओळख होते. बाबा आमटे यांच्यासारखा वाटवृक्ष असल्यामुळे विकास यांच्या कार्याची ओळख फारशी समाजाला झाली नाही. याची सल त्यांच्या बोलण्यातून जाणवली. पण आनंदवन व सोमनाथ प्रकल्पातील सर्व कल्पकता ही विकास यांची आहे. ते स्वतः अभियंता आहेत.
आनंदवन बाबा आमटेनी सुरु केले ते कुष्ठरोग्यासाठी तिथे त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. प्रचंड मोठा आणि विस्तीर्ण आवार तोही प्लास्टिक मुक्त. कुठेही कसलाही केरकचरा नाही. असं हे आनंदवन आणि तिथे जे जे प्रकल्प राबविले ते समजून घ्यायचे असतील तर “आनंदवन प्रयोगवन “ हे पुस्तक वाचलंच पाहिजे.
पुस्तकाच्या नावाप्रमाणेच इथे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत, तेही माफक खर्चात व भविष्यातही इतर खर्च करावा लागणार नाही हा दृष्टीकोण ठेवून. स्वयंपाक घरातील बाहेर पडणाऱ्या कचऱ्यापासून गोबर गॅस चालवला जातो. त्यामुळे गॅस खर्च वाचतो. शिवाय त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. स्वयंपाकघर एकच सर्वांनी तिथेच वेळेत येऊन जेवायचे असा नियम आहे. सर्वच हातांना काम करण्याची संधी असल्यामुळे त्या प्रोजेक्ट चे नाव संधीनिकेतन असे आहे. इथे काम करणाऱ्या लोकांना कुणाला हात नाही, पाय नाही, हात आहे तर बोटं नाहीत, डोळे असून कमी दिसते, कान असून ऐकायला येत नाही तरीही हे सर्व निरंतर कार्यमग्न. अनेक प्रकारच्या वस्तू इथे बनविल्या जातात त्याची विक्रीही केली जाते.
५० भाग माती, ४०भाग वाळू, १०भाग सिमेंट अशा मिश्रणापासुन विटा तयार करून त्या सावलीत वाळवून नंतर ४ ते ५ दिवस पाणी मारून त्या बांधकामाला वापरल्या आहेत. त्यामुळे आजतागायत गळती नाही, पंखा लागत नाही. अगदी कमी खर्चात घरं बांधली आहेत.
सोमनाथ २५० एकराचा शेती प्रकल्प. इतक्या मोठया क्षेत्रात केवळ एकच विजेची मोटार. सभोवताली जंगल असल्यामुळे जमिनीत पाण्याचे प्रमाण आहे. थोड्याश्या उंचवट्यावर पाणी अडवले आहे आणि तिथे बंधारा घातला आहे. हा बंधारा बांधण्यासाठी शेजारच्या खेड्यापाड्यातील सहा महिने प्लास्टिक कचरा, खराब ट्रकच्या मोठ्या टायर असे गोळा केले. सिमेंट काँक्रीटच्या मिश्रणामध्ये गोळा केलेला प्लास्टिक कचरा क्रश करून बंधाऱ्यावर ठेवलेल्या टायरमध्ये भरला. टायरची मांडणी तीन पायऱ्यांप्रमाणे केल्याने पर्यटकांना झऱ्याचा अनुभव घेता येतो. या बंधाऱ्यातील पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून सिमेंटच्या बांधलेल्या पाठामधून संपूर्ण शेतीवर फिरवले जाते. या जमिनीचाच 21 एकराचा भाग उंचावर असल्यामुळे तिथे फक्त विजेची मोटर वापरली जाते. या प्रकल्पावरती पोस्ट ऑफिस आहे. इथे कुणाचे पत्र येत नाही. पण पोस्टात अनेक कष्ट करणाऱ्या लोकांच्या ठेवी आहेत. शेती कसायला दिली जाते. वाट्याला आलेल्या जमिनीवर आतल्या बाजूला भातशेती व बाहेर तूर लावली जाते. तुरीचे उत्पन्न त्या राबणाऱ्या शेतकऱ्याला. जेव्हा हा प्रकल्प सुरू केला त्या वेळेला या प्रकल्पातील धान्य भाजीपाला लोक घ्यायला कचरत होते. आज तिथे तिथल्या पिकाला प्रचंड मागणी आहे. हेमलकसा व आनंदवन इथली गरज भागल्यानंतर राहिलेला उत्पादित माल विकला जातो.
इथल्या अर्ध्या भागावर जंगल निर्माण केले आहे. दरवर्षी १ मे ते १५ मे उन्हाळी शिबिर घेतले जाते. या शिबिरातील मुलं-मुली नवीन झाडे लावणे, जंगलाची साफसफाई करणे या सर्व गोष्टी करत असतात. त्यामुळे तिथे घनदाट जंगल तयार झाले असून या जंगलात आपल्याला प्राणी देखील आढळतात.
‘गोकुळ‘ हे अनाथ बालकांसाठी चालवले जाते. अंध व मूकबधिरांसाठी देखील येथे शाळा आहेत.
२०० लोकांचा वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदाचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत. हे सर्व कलाकार कुष्ठरोग बाधित आहेत.
आनंदवन मध्ये सूतकताई, विणकाम, लाकूड काम, पत्र्यापासून विविध वस्तू तयार करणे, संगीत यांचेही शिक्षण दिले जाते. आज तिथे शास्त्र, कला, वाणिज्य व कृषी या चार शाखांचे महाविद्यालय असल्याने आसपासच्या खेड्यातील असंख्य मुलं आनंदवनशी जोडली आहेत.
मुक्तीसदन बरेच रोगी बरे होऊन जातात पण काही तिथेच रेंगाळतात अशांसाठी मुक्तीसदन मध्ये त्यांची राहण्याची सोय केली आहे.
उत्तरायण वृद्धांसाठी वानप्रस्थाश्रम यालाच ज्ञानपेढी असे नाव आहे. मृत व्यक्तीला दफन केले जाते आणि त्यावरती लगेच एक झाड लावले जाते. त्यामुळे तिथे बगीचाच तयार झाला आहे.
‘Give them a chance not a charity’ या तत्वानुसार इथे काम सुरु आहे.
हे पुस्तक तर वाचण्यासारखे आहेच पण त्याहीपेक्षा तिथे जाऊन पहाणं हे भारीच आहे.
(..या पुस्तकाचे लेखक आहेत स्वतः श्री. विकास आमटे)
लेखिका : सुश्री सुलभा तांबडे
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ “कवीची कीर्ती.. चोराला उपरती!…” – लेखक : श्री धनंजय कुरणे☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
वाचून आश्चर्यानं थक्क व्हावं, अशी बातमी एका मित्रानं आज व्हाट्सअपवर पाठवली. आजच्या टाईम्समध्ये ती छापून आली आहे. बातमी आहे नेरळ मध्ये घडलेल्या एका विलक्षण घटनेबद्दल!
नेरळमध्ये राहणारे सौ. उषा आणि श्री गणेश घारे दहा दिवस गावाला गेले होते. गावाहून परत आल्यावर, ‘आपल्या घरात चोरी झाली आहे, ‘ हे त्यांच्या लक्षात आलं. घरातल्या काही वस्तू चोरीला गेल्या होत्या. मात्र एका खोलीच्या एका कोपऱ्यात घरातला LED टीव्ही पडलेला दिसला आणि शेजारी एक चिठ्ठी ठेवलेली दिसली…. ती चिठ्ठी दस्तूरखुद्द चोर महाशयांनी लिहिली होती…
त्यात लिहिलं होतं….
“मला माहिती नव्हतं की हे घर ‘कवी नारायण सुर्वे’ यांचं आहे. याबाबत मला आधी माहिती असतं तर मी हे घर फोडलंच नसतं आणि टी. व्ही. आणि इतर वस्तू चोरल्याच नसत्या!”
चिठ्ठीच्या शेवटी ठळक अक्षरात ‘SORRY’ असंही लिहिलं होतं.
सौ. उषा घारे या कवी नारायण सुर्वे यांच्या कन्या आहेत. सध्या त्या आपल्या पतीसोबत, नेरळला कै. नारायण सुर्वे यांच्या घरात रहात आहेत.
पोलिसांनी ‘चोराची चिठ्ठी’ ताब्यात घेतली आहे. दहा दिवसांच्या कालावधीत चोर अनेकदा या घरात आला असावा आणि एका खेपेदरम्यान त्याला ‘नारायण सुर्वे’ यांचं पोर्ट्रेट व फोटो दिसले असावेत… ‘आपण एका लोकमान्य कवीच्या घरी चोरी केली, ‘ याची त्याला खंत वाटली असावी, म्हणून त्यानं चोरलेला टीव्ही परत आणून ठेवला असावा, असा पोलिसांचा कयास आहे…. ‘ चोर फारसा शिकलेला नसावा हे त्याच्या बाळबोध लिखाणावरून सिद्ध होतं, ‘ असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटना तशी छोटी पण असामान्य आहे. नारायण सुर्वे यांचा मृत्यू होऊन चौदा वर्षं झाली आहेत. पण त्यांच्या कीर्तीचं गारुड आजही असं आहे, की एका चोरालाही आपल्या कृत्याची उपरती व्हावी! व्वा! वाचून खूप छान वाटलं.
पाश्चिमात्य देशात साहित्यिकांना कसा मान मिळतो, याबाबतची हकीकत एका मित्राकडून पूर्वी ऐकली होती…. तो एकदा फ्रान्सच्या टूरला गेला होता. एका ठिकाणी जात असताना, हायवेवर एका विशिष्ट ठिकाणी सर्व गाड्या एकदम ‘स्लो’ होत होत्या आणि अगदी ‘वीसच्या स्पीडनं’ जात होत्या. मित्रानं टूर गाईडला याबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला, ” इथे हायवेच्या शेजारी आमच्या देशाला साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवून देणारा एक लेखक राहतो. ‘त्याच्या सध्याच्या लेखनात व्यत्यय नको म्हणून सर्व गाड्या हळू चालवाव्या’ असं आवाहन सरकारनं केलं आहे!” हे ऐकून मी अक्षरशः उडलोच होतो.
आजची नेरळमधली बातमी वाचूनही अगदी अशीच अवस्था झाली.. मला वाटतं नारायण सुर्वेना आयुष्यात अनेक मान – सन्मान, पुरस्कार मिळाले असतील.. पण आजचा हा पुरस्कार फारच ‘वरच्या दर्जाचा’ आहे..
या ‘साहित्यप्रेमी’ चोर महोदयांमुळे ‘मजबूर’ सिनेमातला एक संवाद आठवला…
अमिताभ प्राणला म्हणतो,
“मायकल, सुना हैं कि चोरों के भी उसूल होते हैं!”
त्यावर प्राण म्हणतो,
“ठीक सुना हैं तुमने… चोरों के ही तो उसूल होते हैं!”
लेखक : धनंजय कुरणे
संग्राहक : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘रक्षाबंधन…‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
“मणीबंधावर जरी हे कंकण।
तरी हृदयातील उजळे कणकण।”
आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीची थोरवी किती वर्णावी ? असे म्हटले जाते की परब्रह्माचे वर्णन करता करता वेद ही निःशब्द झाले. आणि तेही “नेति नेति… ” असे म्हणू लागले. हीच गोष्ट आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मास पूर्णपणे लागू होते असे आवर्जून सांगावेसे वाटते.
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।।२।। अशी प्रार्थना माउलींनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आहे. अखिल विश्वातील प्रत्येक घटकामध्ये नुसते सामंजस्य नव्हे तर ”मैत्र भाव असावा” असे म्हटले आहे. ‘मैत्री’ आणि ‘मैत्र’ यामध्येही मूलभूत फरक आहे. इथे जन्मणाऱ्या प्रत्येक जीवास मैत्र लाभावे आणि त्याचे जीवन उजळून निघावे यापेक्षा उदात्त भावना कोणती असू शकेल ?
लग्नात भावाच्या खांद्यावरील शेला वहिनीच्या शालीला बांधणारी ताई/बहीण, ‘गृह’ प्रवेशाच्यावेळी ‘मला तुझी मुलगी सून म्हणून दे’ असे मायेच्या हक्काने मागणारी बहीण आज न्यायालयात कमीअधिक प्रमाणात इस्टेटीसाठी भांडत असल्याचे पाहायला मिळत आहे…! आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना आपण पहात असू.
याउलट, बालपणी कौतुक करणारा, वाढदिवसाला कॅडबरी आणणारा, स्वतःच्या खिश्याला कात्री लावून बहिणीला पैसे देणारा भाऊ बहिणीकडे भाऊबीजेसाठी जाताना दिसत आहे असे म्हणता येत नाही…
… तो व्हाटसपप वर शुभेच्छा देऊन आणि एक दोन स्मायली टाकून आपले कर्म उरकताना दिसत आहे…
सध्या भाऊ बहिबहिणीच्या या पवित्र नात्यातील अकृत्रिम स्नेह संपून त्यात अनामिक कृत्रिमता आली आहे की काय ? असे वाटावे अशी स्थिती आहे…
*द्रौपदी- श्रीकृष्ण’ यासारखे शुद्ध नाते सध्या फक्त पुस्तकात राहिले आहे का ? असे नाते संबंध ज्या भारतात उदयास आले तिथे आज अशी परिस्थिती असावी ? याचा विचार प्रत्येक बहीण भावाने अवश्य करावा…
आज हे सर्व लिहिताना माझ्या मनात लेखक म्हणून, एक भाऊ म्हणून संमिश्र भावनांचे ‘कल्लोळ’ आहेत, कदाचित आपल्या मनातही तसेच असेल…. ! एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली भावंडे मोठी झाल्यावर इतकी का बदलत असातील ? नात्यात तूट येते की मनात फूट पडते ? नात्यातली अकृत्रिम स्नेहाची भावना जाऊन त्यात कोरडा व्यवहार का यावा? आणि तो नक्की कधीपासून लागला ?
शिक्षण वाढलं म्हणून की? खिशात पैसा वाढला म्हणून? अंगावरील वस्त्रे बदलली म्हणून की घरातील सुब्बता वाढली म्हणून ?
सर्व भाऊबहिणींनी याचा शांतपणे विचार करावा, खिशात काही नसताना, घरात काहीही नसताना, माझी भावंडं माझ्या सोबत आहेत, हेच आनंदी राहण्यासाठी पुरेसे असे…. ! शाळेत घडलेली एखादी घटना/ गंमत कधी एकदा आपल्या भावंडांना सांगतो आहे असे होत असे…. ! आज तसे पुन्हा व्हावे असे प्रत्येकाला वाटतं असेल, हो ना? मग चांगल्या गोष्टीत आपणच पुढे व्हायला हवे… ! आपण आनंद निर्माण करावा आणि तो सर्वांना मुक्तहस्ते वाटावा हे सर्वात चांगले आणि सर्वांच्या हिताचे….
रक्षाबंधनाच्या शुभदिनी आपण असा प्रयत्न करून पाहू. आपण सर्वांनी ठरविले तर समाजामध्ये काही दिवसांत याचे आशादायक आणि उबदार चित्र दिसू लागेल.
आज सर्व जण आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतील, तिला आपापल्या ऐपतीनुसार भेटवस्तू देतील/घेतील. मनात प्रश्न निर्माण होतो की ज्या देशात अशा उदात्त संकल्पनांचा जन्म झाला, त्यांचे संवर्धन झाले आणि त्याच देशात स्त्रियांवर अनेक प्रकारचे अत्याचार व्हावेत! यापेक्षा दुर्दैव काय असू शकते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे बंध तो दिवस साजरा करून संपला की जीर्ण होतात की नष्ट होतात? आपण फक्त सोहळे साजरे करतोय का? नक्की यामागे काय कारण असू शकेल? आपण सर्वांनी ‘समाज’ म्हणून यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
चिंतन करताना असे ही लक्षात आले की आपण फक्त आपल्या मुलांना एकमेकांना राखी बांधण्यास सांगितली, पण त्यामागील विशाल आणि उदात्त दृष्टिकोन, थोडक्यात त्यामागचे ‘मर्म’ समजावून सांगण्यात आणि त्याप्रमाणे आचरण करण्यात आपण समाज म्हणून थिटे पडलो असेच खेदाने म्हणावेसे वाटते. आजची परिस्थिती पहाता ‘पारंपरिक’ पद्धतीने हा सण साजरा करून चालणार नाही. आज प्रत्येकाने एकमेकांच्या रक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आपल्याकडे व्यापक अर्थाने सांगितले जाते.
“धर्मो रक्षति रक्षित:।”
आज आपण ना धड शुद्ध मराठीत बोलू शकत ना हिंदीत ना इंग्रजीत. आपण तीनही भाषांची मिसळ करुन एक वेगळीच भाषा निर्माण केली आहे असे दिसते. “जशी भाषा तशी संस्कृती”. त्यामुळे आपल्या संस्कृतीचाही ऱ्हास होत आहे. पाश्चात्यांचे अनेक सण आपण आज ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणून आनंदाने साजरे करतो. पण आपले जे सण (सर्वच सण!!) खऱ्या अर्थाने वैश्विक जाणीव निर्माण करणारे आहेत त्या सणांचा प्रसार आणि प्रचार आपण जगभर का करू शकलो नाही. आपण त्याचा विचार केला नाही की आपल्याला त्याची जाणीवच झाली नाही ? या सर्व गोष्टींचे चिंतन आपण सर्वांनी आजच्या मंगलदिनी करावे अशी माझी नम्र विनंती आहे. आपण सर्व सुजाण वाचक आहात, त्यामुळे माझ्या विनंतीचा आपण उचित आदर कराल, असा विश्वास वाटतो.
देशावर आज अनेक संकटे आहेत, अनेक समस्या आहेत. या सर्व प्रश्नांचे बिरबलाच्या कथेप्रमाणे एकच उत्तर आहे ते म्हणजे ‘हिंदू’ संघटन!! ( हिंदू म्हणजे तो फक्त जन्मांने हिंदू नव्हे तर या देशाला, भारतमातेला आपली आई मानणारा कोणीही असेल, त्याची उपासना पद्धती कोणतीही असेल ). आपण सर्वांनी त्यासाठी कटिबद्ध होऊ आणि खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरे करू. या पवित्र दिनी मी माझ्या भारत मातेसाठी काय करू शकतो, याचा विचार आपण करू. एका गीताने लेखाचा समारोप करतो.
करी बांधु या पवित्र कंकण॥ धृ॥
इतिहासाच्या पानोपानी पुर्व दिव्य ते बसले लपुनी।
रम्य भविष्याची त्यामधुनी भव्य मंदिर पुनश्च उभवुन॥१॥*
*
निजरुधिराची अर्घ्ये अर्पुन ज्यांनी केले स्वराष्ट्रपूजन।
या कहाणीतले आटपाटनगर आहे पुणे; पण ही कहाणी मात्र काहीच उणे नसलेल्या पुण्याची नाही. गतवैभवाच्या खुणा लोपल्याबद्दल खंत वाटणाऱ्या मनासाठी शाब्दिक सांत्वन नाही, विस्मृतीचं दु:खरंजन नाही; पण त्यात कालप्रवाहाची मोठी वळणे आहेत. पिढ्यांच्या उदयास्ताच्या पाऊलखुणा आहेत. ‘हिंगण्याच्या माळावर’ या कावेरीबाई कर्वे यांच्या छोटेखानी पुस्तकातून माझ्यासमोर एका शतकाने स्वतःभोवती गिरकी घेतल्याचे दृश्य साकारते. मला तेच सांगायची उताविळी होते. कावेरीबाई कर्वे म्हणजे महर्षी कर्व्यांच्या सूनबाई. भास्करराव कर्व्यांच्या पत्नी. या पुस्तकात त्यांनी स्त्रीशिक्षण संस्थेचा इतिहास अशा काही हृद्य, पण संयमी शब्दांत लिहिला आहे, की हातातून पुस्तक सोडवत नाही. तो इतिहास, भूगोल, संस्कृतीचा आलेख आहेच; त्याशिवाय समाजमनाचे स्फुरण त्यात ठायी-ठायी विखुरलेले आहे. काळाच्या हृदयात जपलेल्या घटनांचा वेध त्यांनी अशा जिवंत भाषेत घेतलेला आहे, की ती आपल्यासमोर घडलेलीच वाटते…
त्यांच्या घरंदाज भाषेच्या शैलीत अण्णांचे जीवनचरित्र, संस्था, विकासाचे टप्पे, दैनंदिन कार्यक्रम, विद्यार्थिनींच्या आठवणी, कार्यकर्त्यांची निरलस सेवा यांची सुंदर गुंफण केलेली आहे. ते सर्वच सांगायचा मोह होतो; पण त्यातल्या काही गोष्टी सांगायला हव्यातच.
१८९१ मध्ये धोंडो केशव कर्वे हे एक सामान्य माणूस होते, अशा शब्दांत सुरुवात करून शतायुषी, महर्षी, भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे या समर्पित व्यक्तीच्या जीवनाची, कार्याची, कर्तव्याची, कर्तृत्वाची सावली होऊन राहिलेल्या दीर्घायुषी संस्थेच्या इतिहासाची पाने त्यात उलगडतात.
हिंगण्याच्या रस्त्याबद्दल लिहितात- हिंगण्याचा रस्ता चालून येणं मोठं दिव्य असं. मृत्युंजय महादेवाच्या देवळापर्यंत कसाबसा रस्ता होता. त्यानंतर कालव्यावरून हिंगण्यास जावं लागे. बैलगाड्या जाऊन झालेल्या चाकोऱ्या व त्यात मिसळलेल्या पायवाटा हाच काय तो रस्ता. त्यावरून कोथरुडपर्यंत जाता येत असे. १९०९ मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क सपत्नीक आश्रमाच्या भेटीला आले असता, लोकल बोर्डानं वनदेवीपर्यंत कसातरी रस्ता केला; पण तिथून कालव्यावरच्या पुलापर्यंत झालेल्या प्रचंड चिखलावर फळ्या टाकल्या होत्या. त्यावरूनच गव्हर्नरसाहेब व बाईसाहेब चालत आश्रमापर्यंत पोहोचले…
संस्थेच्या लोकांना मात्र या दिव्यातून नेहमीच जावं लागे. म्हणून संस्थेतल्या महादेव केशव उर्फ तात्या गाडगिळांनी १९१९ मध्ये एक मंडळ स्थापन केलं. त्याचं नामकरण ‘वेडपट मंडळ’ असं झालं. त्यात संस्थेच्या मुलीदेखील सहभागी झाल्या. दर रविवारी वनदेवीच्या डोंगरावर आठ वाजता सारे जमत असत. मग वर गेलं, की मोठमोठे दगडधोंडे उचलून उतारावरून खाली लोटले जात. पुढच्या रविवारी पुन्हा हाच उद्योग. मग टेकडीच्या पायथ्याशी जमा झालेल्या दगडगोट्यांना रस्त्यावरच्या खड्ड्यात टाकले जाई. त्यावर कुदळफावड्यांनी माती घालून सारखं केलं जाई. वर रणरणणारं ऊन, अणकुचीदार दगड, साप, विंचू याची तमा न करता अनवाणी पायानं ही वेडी माणसं राबत राहिली. पुढे त्याच वर्षी जिल्हा लोकल बोर्डानं रस्ता तयार केला आणि पुढे तर तो हिंगणे-पुण्याचा छानसा रस्ता तयार झाला.
आता पुणे- हिंगणे रस्त्यावरचे दुथडी भरून वाहणारे ते तीन ओढे नाहीत. काटेकुटे, खाचखळगे, अंधार, निर्मनुष्य रस्त्यावरचं भयदेखील नाही. वनदेवीचा डोंगरदेखील कापला गेला आहे. सिमेंटच्या जंगलानं त्याला गिळलं आहे. रस्त्यावरचे पुरातन वटवृक्षही गेले आहेत आणि त्यांनी धरलेल्या सावल्याही नाहीत. त्यावरचे पक्षी उडून गेले आहेत आणि त्या आश्रमहरिणी देखील गेल्या… स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संस्थेत शिकायला आलेल्या मुली शतकापूर्वी येण्याजाण्याच्या रस्त्यावर श्रमदान करीत; पण ते वेडपटांचं मंडळही गेलंच.
अण्णांच्या साठाव्या वर्षीची १९१८ची नोंद कावेरीबाई लिहितात-
वाढदिवसाला अण्णांचे मोठे बंधू भिकाजीपंत कर्वे मुद्दामहून आले होते. प्रथम मुलींची शिस्तबद्ध कवायत झाली. न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांचं बॅण्डपथक होतं. मूळ झोपडीपासून प्रगती होत गेलेल्या कार्यालयाच्या इमारतीपर्यंत स्त्रीशिक्षणाच्या विकासाचे फलक घेऊन मुली अण्णांपाशी येऊन थांबल्या. एका विधवा मुलीकडून व एका विद्यार्थिनींकडून, अशी दोन मानपत्रं अण्णांनी स्वीकारली, तेव्हा अण्णांना आनंदाश्रू अनावर झाले… ‘
‘१९३८ मध्ये १८ एप्रिलला अण्णांना ऐंशी पूर्ण झाली. संस्थेतल्या मुलींसाठी पोहण्याचा तलाव करण्याचं ठरलं. पहिली कुदळ अण्णांनी मारली. तलावाचं काम सुरु झालं. तलाव पाण्यानं तुडुंब भरला. पुढच्या वर्षी १८ एप्रिल १९३९ रोजी आंब्यांची पानं, पताका लावून तलाव सुशोभित केला होता. मुली, पाहुणे जमले. डॉ. खोत यांच्या वडिलांचं नाव तलावाला दिलं. ‘कृष्ण तलाव’. उद्घाटन प्रसंगी सर्वांत आधी तलावात अण्णा उतरले… ‘ .. संस्थेतल्या मुलींना पोहता यावे, अशी चालकांची जिद्द होती. वैधव्याने जीवनाच्या आनंदाला वंचित झालेल्या जखमी पक्षिणींना आकाशात भरारी मारता यावी म्हणून तर अण्णांनी हे कार्य आरंभले होते.
कावेरीबाईंनीं शतायुषी अण्णांच्या दीर्घायुषी संस्थेचा आलेख खूप तपशिलाने मांडलेला आहे. तो वाचताना वाटत राहिले- कार्य संपले, की त्याचे प्रयोजनही संपते.
मग आता वेगळे काय आहे तिथे? शतकाच्या कालप्रवाहात स्त्रीशिक्षणाच्या कार्याचा वृक्ष झाल्यावर या अण्णांच्या संस्थेचे -तिथल्या इतिहासाचे- खास महत्त्व काय आहे? सतीची चाल, विधवांचे प्रश्न, परित्यक्ता… एकेक प्रश्न सुटले. शिक्षणाचे मोल तर आम्हाला ठाऊक आहे. सामाजिक प्रश्नांची धार हळूहळू बोथट झालेली आहे…
माझ्या प्रभात फेरीच्या वेळी वनदेवीच्या डोंगरापलीकडच्या वस्तीतून रोज शाळेला जाणाऱ्या मुली चिवचिवताना दिसतात. त्या आमच्या मैत्रिणी सांगतात-‘आईला लांबून पाणी आणावं लागतं. पण आम्ही रोज अंघोळ करतो आणि शाळेला जातो. ‘ मला प्रश्नांची उत्तरे मिळतात. कर्व्यांच्या शाळेत जाणाऱ्या पोरींना शिकून डॉक्टर व्हायचे आहे. उद्या पाणी मिळेल. पक्की घरे मिळतील. पायात घालायला बूट देखील मिळणार आहेत त्यांना. अण्णांनी त्यांना स्वप्ने पाहायचे बळ शंभर वर्षांपूर्वीचे दिले आहे… कावेरीबाईंचे हिंगण्याचे माळरान बहरतेय. आश्रमहरिणी आता येतील- जीवनाच्या आनंदाची वाट शोधत…
☆ नववधू प्रिया मी बावरते — ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆
श्रावण धारा कोसळत होत्या अंगणात ऊन पावसाचा खेळ सुरु होता, तर माझ्या मनात त्या मंगळागौरीच्या आठवणींचा फेर चालू होता.
त्याचं असं झालं, भाऊजींचं लग्न झालं आणि जावेच्या रुपानें मैत्रीण म्हणून बिल्वा आमच्या घरांत आली. पहिला वहिला सण आला मंगळागौरीचा. भाऊजींची आणि बिल्वाची नव्याची नवलाई अजून ताजी, साजरी, गोजरी आणि लाजरी अशी टवटवीत होती. चोरटे स्पर्श, कुठं बिल्वाची लांबसडक वेणी ओढ, तर कधी पाणी उडव: असे चोरटे क्षण ते दोघेजण लाजून साजून साजरे करत होते.
सौ. बिल्वा खूप साधी आणि मुलखाची लाजाळू होती. सासु- सासरे समोर असले की ही नवऱ्याच्या वाऱ्याला ही उभी राहात नसे. भाऊजींना चहा देतांना सुद्धा या लाजाळू झाडाच्या पापण्या खाली झुकलेल्याच असायच्या. तिचं म्हणणं “वडिलधाऱ्यां समोर बरं दिसतं कां हे असले अल्लड अवखळ वागणं ?”
तर अश्या या बिल्वाची, माझ्या जावेची पहिली मंगळागौर होती. दोन्ही घरचे पाहुणे उपस्थित झाले होते. हिरव्यागार शालूमध्ये ठसठशीत दागिन्यांमध्ये आमची ही नववधु चौरंगावरच्या मंगळागौरीइतकीच सजली होती. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आपल्या बायकोकडे भाऊजींची नजर पुन्हा पुन्हा वळत होती. भाऊजींच्या खाणाखुणांना दाद न देता या बाईसाहेब त्यांना नजरेनीच दटावत होत्या.
दिवसभराचा कार्यक्रम संपला. आता आली झिम्मा फुगडी खेळण्याची वेळ. तेव्हा मात्र हे लाजाळूचं झाड संकोच सोडून अवखळ वारं झालं होतं.
सगळ्यांबरोबर सगळे खेळ अगदी दणक्यात, अगदी देहभान विसरून खेळले गेले. तिची ती भरारा फुगडी बघून कुणी तरी म्हणालं, “चल बाकीचें राहूदे, आता तुझ्या नवऱ्याला गरागरा फिरव. “
“इश्य !”असं म्हणून पळायच्या बेतात होत्या बाईसाहेब. पण भाऊजींनी मात्र हात धरून तिला मैदानातच आणलन. सभोवती आम्ही लगेच फेर धरला आणि ओरडलो, “भाऊजी सोडू नका हं हिला. ” आणि मग काय भाऊजींना तेच तर पाहिजे होते.
बोलताबोलता पायांचा ताल आणि फुगडीचा वेग यांनी सूर धरला. मग रिंगणांत नवराबायकोची फुगडी चांगलीच रंगली. अगदी दणदण दणक्यात.
कशी कोण जाणे, बिल्वाला एकदम भोंवळ आली आणि ती भाउजींच्या अंगावर कोसळली. त्यांनी तिला सावरलं.
बराच वेळ झाला, ती दोघं दूर होईनांत. आम्हाला वाटलं भाऊजी तिला सोडत नव्हते म्हणजे मस्करीच चाललीय.
मध्येच कुणीतरी वडिलधारं ओरडलं, “अरे तिला चक्कर आली असेल. खाली बसवा तिला हात धरून. कुणीतरी पाणी आणा रे लवकर. “
खाली बसायच्या ऐवजी बिल्वाने तर डोळेच मिटून घेतले. होते. आणि भाऊजींचा चेहरा अगदी फोटो काढण्यासारखा झालेला होता.
हा काय प्रकार आहे बाई । कुणाला काहींच कळेना, आणि ते दोघे तर जागचेही हलेनात. अखेर भाऊजींच्या खट्याळ मेव्हणीच्या लक्षांत सारा प्रकार आला. पुढे होऊन जिजाजींच्या शर्टच्या बटणामधून सौ. ताईची नाजुक केसांची बट तिनें नाजुकपणे सोडवली आणि म्हणाली. ” जिजाजी, पुढच्या मंगळागौरीला बटणांऐवजी हुक असलेला शर्ट घाला, म्हणजे सगळ्यांसमोर नेहमी नेहमी असा सिनेमा घडायला नको. ”
सगळे गडगडाटी हसले. नुसता टाळ्यांचा, हास्याचा धबधबाच जणू काही कोसळला. आणि बिल्वा !! ती तर गालावर गुलाब फुलवून केव्हाच आत पळाली होती.
…. तर मंडळी अशी फुलली ही आमच्या घरातील बिल्वा-भाऊजींची पहिली वहिली मंगळागौर.
☆ कर्तव्य ‘रेखा’ ओलांडताना !☆ श्री संभाजी बबन गायके☆
शेगाव रेल्वे स्टेशन. संध्याकाळची शेवटची एक्सप्रेस निघून गेली आणि काही मिनिटांतच फलाट रिकामा झाला. रेखताईंची ड्युटी थोड्याच वेळात ड्युटी संपणार होती. आता युनिफॉर्म बदलून सिव्हिल ड्रेस चढवायचा आणि घराकडे निघायचे अशा विचारात असतानाच त्यांना ती दिसली… फलाटावरील शेवटच्या एका बाकड्यावर काहीशा विचारमग्न अवस्थेत… शून्यात नजर लावून! रेखाताईंनी आपल्या चेंजिंग रुमकडे जाण्याचा विचार बदलला. तिच्याकडे काही पिशवी वगैरे दिसत नव्हती. सोबत कुणीही नव्हते आणि इतक्यात कोणतीही प्रवासी गाडी या स्टेशनवर थांबणार नव्हती… शिवाय ती बाई दोन जीवांची दिसत होती… दिवस भरत आलेले!
ताईंनी तिच्याजवळ जाऊन तिला हटकले तर म्हणाली “आत्या येणार आहे.. तिला घ्यायला आलेय!”. “एक्स्प्रेस तर मघाशीच निघून गेली की तुझ्यासमोरूनच! नाही आली का तुझी आत्या?” त्यावर ती बाई निरुत्तर झाली… तिला बाई म्हणायचं कारण तिच्या गळ्यात असलेलं ते मंगळसूत्र! लग्नाला एका वर्षापेक्षा जास्त दिवस उलटले असतील असं वाटतं नव्हतं. एकोणीस- वीस वर्षांची पोरच ती!
ती खोटं बोलते आहे हे ताईंनी अनुभवाने ओळखलं. तिला जरा जरबेच्या आवाजातच सांगितले… ”घरी जा.. आणि रिक्षेने जा! अशा अवस्थेत तुझं पायी जाणं बरोबर नाही!”
“कुठे राहतेस?” या प्रश्नावर तिने तिचे राहण्याचे ठिकाण सांगितले. याच गावातल्या स्टेशनवर GRP मध्ये म्हणजे General Railway Police खात्यात खूप वर्षे सेवा करीत असल्याने आणि जवळपास राहत असल्याने ताईंना सारा परिसर चांगलाच माहित होता. सहज चालत जाण्यासारखे अंतर तर नव्हतं.. आणि गर्भारपणात आणि ते ही दिवस भरत आल्याच्या दिवसांत तर नव्हतंच नव्हतं!
ती पोर हळूहळू पावलं टाकीत स्टेशनच्या बाहेर जायला निघाली. स्टेशनच्या पाय-या उतरून बाहेर पडली आणि तिथेच घुटमळली. ताईंचे तिच्यावर लक्ष होतंच. ती पोरगी काही रिक्षात बसली नाही. ती काही घरी जाण्याच्या मन:स्थितीमध्ये असेल असं दिसत नव्हतं!
ताई स्टेशन सोडून तिच्या मागोमाग निघाल्या. तशी ती फार दूर गेलेली नव्हती. पण आपण तिचा पाठलाग करतो आहोत, असे तिला वाटू नये म्हणून ताईंनी आपला वेग कमी ठेवला होता. अन्यथा तिने भलतंच काही केलं असतं.. अशी शक्यता होती.
ताईंचा सहकारी विशाल जाधव त्याची ड्युटी संपवून स्टेशन बाहेर पडत होता. ताई स्टेशन सोडून बाहेर का पडत आहेत.. आणि ते सुद्धा युनिफॉर्मवर.. हे त्याला समजेना.
नियमानुसार ताईंची जबाबदारी सस्टेशनच्या हद्दीपुरती मर्यादित होती. पण का कुणास ठाऊक आज त्यांना या मर्यादेबाहेर जावंसं वाटलं. असंच होतं त्यांच्याबाबतीत. का कुणास ठाऊक पण काही विपरीत घटना घडायची असली की त्यांचं मन त्या ठिकाणी जा असं सुचवायचं. गेल्या कित्येक वर्षांच्या सेवेत त्यांनी कितीतरी अपघात, आत्महत्या पाहिल्या होत्या. जमेल त्यांना स्वतःहून मदतीचा हात दिला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जीवापाड मेहनत करून त्या रेल्वे पोलिसात भरती झाल्या होत्या आणि आज हवालदार पदावर पोहोचल्या होत्या. आज यावेळी स्टेशनबाहेर पडताना ताईंनी वरीष्ठांना कल्पना दिली नाही.. कारण एकतर ड्युटी संपली होती आणि तेव्हढा वेळच नव्हता!
त्यांच्यापुढे चालणारी ती पोरगी तिच्या घराच्या रस्त्याकडे वळणार नाही हे त्यांनी ताडले.
“ताई, इकडे कुठं स्टेशन सोडून?” विशालने विचारले. तो तिला ताई म्हणायचा! “ती समोर चाललेली पोरगी बघतलीस का? तिचा काहीतरी भलताच विचार दिसतोय. एक काम कर… तुझ्या अंगावर सिविल ड्रेस आहे. तू तिच्या मागोमाग चाल… मी मागून येतेच.. मला युनिफॉर्म वर बघून तिला संशय येईल! आणि लोकही विनाकारण गर्दी करतील”
आणि तिला शंका होती तसंच झाली… ती पुढं चालणारी घराच्या दिशेने न वळता गजानन महाराजांच्या मंदिराच्या मागील बाजूने गेलेल्या दुस-या रेल्वे ट्रॅकच्या दिशेने निघालेली होती… त्या मार्गावरून यावेळी ब-याच ट्रेन्स जात-येत असतात… आणि त्याबाजूला तशी कुणाची गजबजही नसते. काही वेळातच अंधार पडणार होता. आता या दोघांनीही आपल्या पावलांचा वेग वाढवला. ती पोरगी सारखी मागे वळून बघत होती… तिला आपण दिसू नये म्हणून ताई एखाद्या आडोशाला जात… आणि पुन्हा पाठलाग सुरू करत. येणा-या जाणा-यांना विनाकारण संशय येऊ नये याची काळजी घेत ते दोघे तिच्या दिशेने निघाले. कारण विनाकारण आरडाओरडा केला असता तर ती पोरगी भेदरली असती आणि काही भलतंच होउन बसलं असतं! त्या पोरीचं लक्ष नव्हतंच. ट्रॅक वरचे दोन्ही बाजूंचे सिग्नल हिरवे झालेले होते… ट्रेन तिथून जाण्याची वेळ झालीच होती.. कोणतीही ट्रेन काही क्षणांत तिथे पोहोचणार होती!
आता मात्र हे दोघेही पळत निघाले… तिचं लक्ष नव्हतंच.. आवाज देऊनही काही उपयोग नव्हता… विशाल दादाने पुढे धावत जाऊन तिला रुळावर जाण्याच्या आधीच आडवे होऊन तिचा रस्ता रोखून धरला…. तेंव्हा ती भानावर आली! ताई क्षणार्धात तिच्याजवळ पोहोचल्या!
“काय विचार आहे? घरी जायचं सोडून इकडं कशाला आलीस? मरायचंय पोटातल्या बाळाला सोबत घेऊन?” या प्रश्नांची तिच्याकडे उत्तरे होतीच कुठे? डोळे अश्रूंनी डबडबले आणि पाठोपाठ जोराचा हुंदका उमटला गळ्यातून. ताईंनी तिच्या खांद्यावर थोपटले आणि मग तिला स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवू दिले!
“शांत हो! काय झालं मला सांगशील? तुझ्या नव-याचा मोबाईल नंबर दे! त्याने तुला असं एकटीला घराबाहेर पडू दिलंच कसं?” एवढ्यात एक मालगाडी भरधाव अप ट्रॅकवरून धडधडत निघून गेली! त्या पोरीनं त्या गाडीकडे एकदा पाहिलं आणि डोळे मिटून घेतले!
बराच वेळ झाल्यावर तिने कसाबसा नव-याचा नंबर सांगितला. ताईंनी आपल्या मोबाईलवरून त्याला कॉल लावला. पलीकडून हॅलो असे काळजीच्या सुरातील प्रत्युत्तर ऐकताक्षणीच ताईचा रागाचा पार चढला…. ”असशील तिथून आणि असशील तसा निघून ये… !” तिचा नवरा होता फोनवर. त्याने कसाबसा ठिकाण विचारले आणि तो बाईकवर निघाला…. ”लगेच पोहोचतो, मॅडम!”
तो पर्यंत त्या बाजूने जाणारे काही बघे तिथे थांबून झाला प्रकार समजून घेण्याच्या प्रयत्नात होते. ताईंनी त्यांना पिटाळून लावले. त्या पोरीचा नवरा पोहोचलाच… घामाघूम होऊन. ती घरातून निघून बराच वेळ झाला होता आणि तो तिला गावभर शोधत होता. ती मोबाईल घरीच ठेवून बाहेर पडली होती.. घरात काहीतरी कटकट निश्चित झाली असावी!
ताईंनी त्याला झापझाप झापलं. या पोरीच्या जीवाला याच्यापुढं काही झालं ना तर पहिलं तुला आत टाकीन.. असा सज्जड दम दिला! “अरे, या दिवसांत व्याकूळ असतात पोरी. त्यांना समजून घ्यायला पाहिजे की नको? तुझ्याही बहिणी असतीलच की लग्न करून सासरी गेलेल्या? त्यांच्या सासरच्यांनी त्यांना असं वागवलं तर चालेल का तुला? तुझ्या घरच्यांना समजावून सांग…. म्हणावं…. ही सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे!”
तो खाली मान घालून सारं ऐकून घेत होता. त्याच्याही डोळ्यांत पाणी होतं… आज आपण बायको आणि मूल अशी दोन माणसं गमावून बसलो असतो, याची जाणीव त्याला झालेली दिसत होती. ताईंनी एका कागदाच्या तुकड्यावर स्वतःचा मोबाईल नंबर लिहून तिच्याकडे दिला. “घरी जाऊन आधी तुझ्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह कर आणि कधी गरज पडली तर विनासंकोच फोन कर.. आणि असा वेडेपणा पुन्हा कधीच करू नकोस…. बाळ झाल्यावर सगळं काही ठीक होईल!”
त्या पोरीचा नवरा रेखाताईंचे, विशालदादांचे पुन्हा पुन्हा आभार मानून बायकोला बाईकवर घेऊन सावकाश गाडी चालवत तिथून निघाला. ती पोरगी ताईंकडे पहात हात हालवत राहिली… नजरेआड होईतोवर!
इकडे ताई स्टेशनकडे लगबगीने निघाल्या. ताई स्टेशनबाहेर गेल्याचं कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. ताईंनीही कुणाला काही सांगितलं नाही.. out of the way आणि out of jurisdiction जाऊन काम करण्याची परंपरा तशी कमीच आपल्याकडे!
युनिफॉर्म बदलून ताई घराकडे निघाल्या! गजानन बाबांच्या मंदिरासमोरून जाताना त्यांनी कळसाकडे पाहून हात जोडले… आणि आरती सुरू झाल्याचा शंख वाजू लागला…. ताईंची सेवा गजानन महाराजांच्या चरणी रुजू झाली होती ! रेखाताईंनी आजवर अशा अनेक लोकांना बचावले आहे. त्यांचे आशीर्वाद त्यांनी प्राप्त केले आहेत. त्याचे एक ताजे उदाहरण म्हणजे रेखताईंचे पती नुकत्याच झालेल्या एका गंभीर अपघातातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. चांगल्या कर्मांची फळे परमेश्वर आपल्याला देतोच, अशी रेखाताईंची श्रध्दा आहे. त्यांच्या अनुभवांचे संकलन त्या करणार आहेत. सकारात्मक गोष्टींचा प्रसार व्हावा, म्हणून मी हा लेख त्यांच्या संमतीने लिहिला आहे. यात प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू नाही.
(नुकत्याच केलेल्या शेगाव-पुणे रेल्वे प्रवासात GRP हवालदार रेखाताई वानखेडे नावाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी महिलेशी संवाद करण्याचा योग आला. त्यांच्याकडून अशा कितीतरी गोष्टी ऐकायला मिळाल्या. प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर अर्थात ‘आऊट ऑफ वे ‘ जाऊन केवळ माणुसकीच्या भावनेतून समाजाची सेवा करणारी माणसं आपल्या भोवती आहेत, याचा आनंद झाला. त्यांनी सांगितलेल्या अनेक अनुभवांपैकी हा एक अनुभव थोडेसे लेखन स्वातंत्र्य घेऊन सुहृद वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. रेखाताईंना, विशाल जाधव यांना तुम्ही मनातून का होईना… आशीर्वाद, शुभेच्छा द्यालच, कौतुकाचे चार शब्द लिहाल, अशी खात्री आहे ! )
काही वर्षापूर्वी एक माणूस खाकी अर्धी चड्डी घालून मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये गाडीतून उतरला. मालवणहून मुंबईत तो पहिल्यांदाच आलेला असतो….
उतरताच मुंबईने त्याला आपला रंग दाखवला, त्याची पिशवी चोरीला जाते. आता करायचे काय ह्या मायानगरीत? असा प्रश्न त्याच्या मनात आला..
मुंबईत एकमेव माणूस ओळखीचा माणूस आणि आधार तो म्हणजे गंगाधर. खिश्यात पैसा नाही, मग चालत गंगाधरचे घर गाठले. त्याकाळी दुसर्याला आधार देण्याची प्रथा होती. दुसर्या दिवशी गंगाधरने त्याला ह. रा. महाजनी (लोकसत्ता दैनिकचे संपादक आणि अभिनेता रविंद्रचे वडील)च्या पुढ्यात उभे केले, कारण त्याला नोकरीची गरज होती. या अर्धचड्डीत उभ्या असलेल्या माणसाला महाजनीने नाव, गाव विचारले आणि ते ऐकताच महाजनी म्हणाले, अरे शब्दकोडे सोडवून पाठवतोस तो तूच का.. ?
मग आजपासून शब्दकोडे रोज बनवून देणे, हीच तुझी नोकरी. अश्यातर्हेने पोटापाण्याचा प्रश्न तर सुटला होता. पुढे वेळ मिळेल तेव्हा, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून त्याने नाव कमावले आणि त्यामुळे त्याची ओळख महाराष्ट्राच्या मान्यवर लोकांबरोबर झाली..
पुढे स्वस्थ न बसता दिनदर्शिका काढली, ती सुरुवातीला दुसर्याकडून छापून घेतली, पण नंतर स्वतःची प्रेस काढून, दिनदर्शिका प्रकाशित केली. दिनदर्शिकाचे मागचे पान रिकामे असे, म्हणून त्यावर भविष्य आणि अनेक गृहोपयोगी गोष्टी छापल्या. त्यामुळे दिनदर्शिकेची लोकप्रियता आणि खप खूप वाढला, मग दुसर्या भाषेत पण, दिनदर्शिका छापणे सुरू केले. खूप पैसा मिळवल्यावर दादर इथे एक इमारत विकत घेतली. ज्या इमारतीमध्ये आज पारसी लोक त्याचे भाडेकरू आहेत…
ही यशोगाथा आहे मालवणहून आलेल्या एका मराठी तरुणाची, ज्यांचे नाव आहे…
“कालनिर्णयकार.. “
“आदरणीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर” यांची आणि त्यांना सुरुवातीच्या काळात मदत करणारा तो सद्गृहस्थ गंगाधर म्हणजे “कवि गंगाधर महांबरे”..
एका मराठी माणसाची ही यशोगाथा केवळ प्रेरणा मिळावी म्हणून थोडक्यात सादर…
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈