मराठी साहित्य – विविधा ☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त निबंध)

गंगेच, यमुनेचैव, गोदावरी सरस्वती।

नर्मदे , सिंधू ,कावेरी ,जलेस्मिन संन्निधिं कुरु ।।

दररोज सकाळी देवाची पूजा करत असताना, देवा जवळच्या कलशात सर्व नद्यांना आपण आवाहन करतो. त्यावरूनच नदीचे महत्व किती आणि कसं असतं पहा बरं!

पण आज ती व्यथित आणि दुःखी झालीय . तिची व्यथा कोणी तिर्हायितानी सांगण्यापेक्षा तिने स्वतः सांगितली तर ते जास्त सयुक्तिक ठरेल. आणि मग तिच्या व्यथेवरील उपचार, व्यष्टी ते समष्टी पर्यंत कसे आणि काय करायचे याचा विचार करावा लागेल .ती स्वतःची महानता प्रथम सांगायला लागली .भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला देवत्व दिलं.राष्ट्रगीतातही नावं घेतली. ऋग्वेदामध्ये आमच्या अनेक प्रार्थना आहेत. आम्हाला केवळ पाण्याचा प्रवाह न मानता, ईश्वरी तत्त्वाचा अविष्कार , देवता स्वरूप मानून, मंदिरं बांधली. मानव, प्राणी, पक्षी, जंगलं, शेती, वीज निर्मिती, जल पर्यटन किती किती सांगू ! या सगळ्यांच्या जीवनदायीनी आहोत आम्ही! स्कंद पुरणात एक श्लोक आहे”, न विभाती  नदी हीनो पृथ्वीय भूसुरत्तमं। नदीहीनो हय्यं देश प्रसिद्धोपि न शोभते”।। देशातल्या जणू रक्तवाहिन्या आहोत आम्ही.

पण हाय ,हाय! ही सगळी माझी महानता असली तरी आज माझी काय दूरदशा आहे, असं म्हणण्यापेक्षा, या माणसाने काय दुर्दशा केलीये असं म्हणावं लागेल .मी, आम्ही अमृत गंगा. पण घाणीची अंघोळ घालून विषगंगा करून टाकलय आम्हाला .त्यामुळे माझ्या अंगा खांद्यावर खेळणारे मासे, कासव, मगरी, वगैरे जलचर आजारी पडून मरत आहेत. आणि ते खाऊन माणसंही मेंदू आणि पोटाच्या विकाराने आजारी पडत आहेत. चार लाख लोक मृत्यू पावत आहेत. आणि ही गोष्ट डब्ल्यू. एच. ओ. चा अहवालच सांगतो. शहरांमधली विसर्जित केलेली घाण, कचरा ,औद्योगिक उत्सर्जक वस्तू, किरणोत्सारी पदार्थ माझ्या पोटात टाकून माझी नरकावस्था करून टाकलीय. कुठवर सहन करू मी हे सगळं? 2009 मध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालात माझ्यासह दीडशे अशा माझ्या भगिनी प्रदूषित असल्याच सांगितलंय. आणि 2019 मध्ये ती संख्या 300 इतकी झाली . हे चित्र जीवसृष्टीचा संकट काळ जवळ येत असल्यासच आहे ना? मला माणसाला विचारावसं वाटतं, “तुमची जीवनदायी मी  माझे उपकार फेडणार, कृतज्ञ होणार, की माझ्या अस्तित्वाशीच खेळणार रे ? माझ्या अस्तित्वाची भवितव्याची मला घोर काळजी लागलीय.

क्रमशः… 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गोष्टी शाळेतल्या प्रवेशाच्या…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “गोष्टी शाळेतल्या प्रवेशाच्या…” ☆ सुश्री शीला पतकी 

जून महिना सुरू झाला की शालेय प्रवेशाची लगबग चालू होते माझ्या सेवा सदन प्रशालेत संस्थेला वसतिगृह असल्याने आसपासच्या ग्रामीण भागातून बऱ्याच ऍडमिशन येत असत अर्थात वस्तीगृहालाही संख्येची मर्यादा होतीच…. 64 सालापासून वसतिगृह चालू आहे त्याला एक चांगली परंपरा आहे नाव आहे मुलींच्या सुरक्षिततेची हमी आहे त्यामुळे पालकांचा ओढा सेवासदन मध्ये प्रवेश घेण्यासाठी नक्कीच असतो त्याप्रमाणे एक पालक त्यांचे वडील आणि मुलगी असे तिघे प्रवेशाला आले वसतीगृहा मध्ये त्यांना सांगण्यात आलं की शाळेत ऍडमिशन असेल तरच आम्ही वस्तीगृहात प्रवेश देऊ त्यामुळे ते शाळेच्या ऑफिसमध्ये गेले इयत्ता सहावी मध्ये ऍडमिशन हवी म्हटल्यानंतर क्लार्कने सांगितले की मधल्या वर्गांमधून ऍडमिशन नसतात आमच्या मूळ पाचवीतून येणाऱ्या मुलींमुळे  संख्या भरलेल्या असल्यामुळे आम्ही तिथे ऍडमिशन देऊ शकत नाही …..ते गृहस्थ थोडे नाराज झाले ते म्हणाले मुख्याध्यापकांना भेटू का..? क्लार्क म्हणाले  भेटा हरकत काहीच नाही पण अवघड आहे. त्यानंतर ते माझी वाट पाहत थांबले मी अकरा वाजता ऑफिसमध्ये आले कारण सुट्टीचे दिवस होते सुट्टीत आकारात एक ऑफिस असे आल्याबरोबर ते आत मध्ये आले म्हणाले माझ्या मुलीला ऍडमिशन हवी आहे आणि इयत्ता सहावी मध्ये असल्यामुळे तुमचे क्लार्क नाही असे म्हणतात आणि वस्तीगृहात प्रवेश शाळेत ऍडमिशन झाल्याशिवाय होत नाही त्यामुळे तिथे ऍडमिशन होत नाहीये मी म्हणलं अगदी बरोबर आहे पाचवी आणि आठवी मध्ये फक्त ऍडमिशन चालू आहेत अन्य वर्ग भरलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला ऍडमिशन देऊ शकत नाही ते म्हणाले नाही बाई बघा ना एखादी विद्यार्थिनी करून घ्या असा त्यानी आग्रह धरला मी म्हणाले.. बसायलाच जागा नाहीये वर्गामध्ये पन्नास संख्येचा वर्ग आहे आमची शाळा जुनी आहे तिथे आम्ही 65 विद्यार्थ्यांनी बसवतोय आता यापेक्षा किती जास्त मुली बसवणार…? त्यांच्याबरोबर आलेल्या आजोबांनी मला गळ घातली ताई असं करू नका बघा आम्ही ग्रामीण भागातन आलोय मी म्हणलं आजोबा खरोखर जागा नाही हो ते मला म्हणाले नाही आम्ही शेतकरी माणसं पोरीला शिकवावं म्हणत्यात म्हणून शिकायला आणलं इथं तुमची शाळा चांगली आहे पोरगी हुशार आहे बघा जरा काहीतरी.. मी त्यांच्यापुढे ऍडमिशनचा तक्ता टाकला आणि म्हणाले हे पहा याच्यामध्ये एवढ्या संख्या आहेत मी कुठे बसवणार आता मात्र ते समोरचे पालक थोडे रागावले उठून उभे राहिले ते जरा एका पायाने लंगडत होते ते खुर्चीला घरून बाजूने माझ्या खुर्चीच्या बाजूला येऊन उभा राहिले आणि म्हणाले बाई मी सैनिक आहे पायामध्ये माझ्या गोळी घुसलेली त्यामुळे निवृत्त करण्यात आलेले आहे बॉर्डरवर माझ्या पायात गोळी लागली मी जायबंद झालो आज ही माझ्या पायात गोळी तशीच आहे मला असंख्य वेदना होत आहेत पेन्शन मला मिळते पण आता मी वडिलांबरोबर शेती करतो. मी वडिलांच्या बरोबर जाण्याच्या ऐवजी वडील माझ्याबरोबर येतात हे दुर्दैव आहे आम्ही या देशासाठी सीमेवर गोळ्या झेलतो तुम्ही आमच्या एका मुलीला ऍडमिशन देऊ शकत नाही फक्त 7 डिसेंबर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तुम्हाला आमची आठवण येते का?.. मी त्यांचं बोलणं मुकाट्याने ऐकून घेत होते ते व्यथीत होऊन खुर्चीत येऊन बसले मी त्यांना पाण्याचा ग्लास दिला फोन करून ऑफिस मधल्या क्लार्क ला बोलून घेतलेम्हणाले ऍडमिशन फॉर्म घेऊन ये क्लार्क कडून त्या मुलीचा ऍडमिशन फॉर्म भरून घेतला वस्तीगृहाकडे निरोप दिला अमुक अमुक मुलीची ऍडमिशन झालेली आहे तुम्ही तिला वसती गृहा मध्ये प्रवेश द्या… मी त्यांच्यासाठी चहा मागवला आमच्या क्लार्क ला काही कळेना की एवढी गर्दी असूनही बाईंनी ऍडमिशन कशी काय केली मी माझ्या पर्स मघून 125 रुपये काढले आणि क्लार्क बरोबर फॉर्म पाठवून दिला त्याला म्हटलं पावती करून आणून द्या आता ते आजोबा थोडेसे वरमले त्यांनाच वाईट वाटलं ते उठून हात जोडून म्हणाले ताई माझा मुलगा काही बोलला तर ते मनात धरू नका अहो त्याला अजून देशाची खूप सेवा करायची होती पण पायात गोळी गेल्यामुळे तो जखमी म्हणून परत आला आणि मग त्याची अशी चिडचिड होते त्याच्या वतीने मी माफी मागतो मी पटकन त्यांचा हात धरला म्हणला नाही आजोबा त्यांनी आज आमच्या डोळ्यात अंजन घातलाय मी त्यांची ऋणी आहे ते काय चुकीचं बोलले अगदी खरं आहे ते… जीवावर उदार होऊन माणसं तिथे लढताहेत म्हणून आम्ही इथे शांतपणे काम करतोय आणि त्यांचा अगदी खरयं 15 ऑगस्ट 26 जानेवारी 6 डिसेंबर हे साजरे केले की आम्ही आमची जबाबदारी संपली असं समजतो पण देशाप्रती इतकं राबणाऱ्या माणसाला आपण थोडं प्रेमाने विचारलं पाहिजे ना..? त्याची मदत करायला हवी मी हा विचारच केला नाही माझं चुकलं आता यानंतर मी माझ्या प्रत्येक वर्गात सैनिकाच्या मुलीसाठी एक जागा नक्की ठेवेन आणि हा बदल तुमच्यामुळे झाला आहे हे माझ्या कायम लक्षात राहील नंतर त्या सैनिकांना  खूप वाईट वाटलं ते म्हणाले मॅडम माफ करा मी आपल्याला खरं तर हे बोलायला नको होतं पण मी बोललो पण केवळ माझ्या मुलीला तुमच्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा हीच भावना होती आपण राग मनात धरू नका.. मी म्हणाले छे छे मी मुळीच रागावले नाही आपण निष्काळजी रहा, मी या मुलीचा इथला स्थानिक पालक असते आपण याची कोणतीही काळजी करू नका त्या तिघांनाही मनःपूर्वक आनंद झाला मुलगी हुशारच होती त्यामुळे काही प्रश्न नव्हता… प्रत्येक जून महिन्यात मला.या प्रसंगाची आठवण येते आणि पायात गोळी असलेला तो सैनिक मला आठवतो ते उठले आणि प्रवेशासाठी संस्थेच्या ऑफिसमध्ये गेले जाताना मी त्यांना ऑफिसच्या दारापर्यंत पोहोचवायला गेले आणि खरोखर मी मनात त्या माणसाला सॅल्यूट ठोकला इतकं तर मला करायलाच पाहिजे होतं ना……..!

त्यानंतर माझे क्लार्क मला म्हणाले बाई सहावी तले प्रवेश संपलेत ना मग तुम्ही कसा दिला मी म्हणलं अनंता नियमापेक्षा जगात खूप गोष्टी मोठ्या असतात आणि नियम आपण बनवलेले असतात ते लक्षात ठेव तोही असं म्हणाला बाई तुम्ही ही ग्रेट आहात मी म्हणाले नाही आता लक्षात ठेव यापुढे प्रत्येक वर्गात एक जागा सैनिकांच्या मुलीसाठी ठेवायची आणि त्याने हसून मान हलवली

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कांचनगंगा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ कांचनगंगा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

हिमाचल प्रदेशातल्या  बलजीत कौरने आज एक मोठा पराक्रम केला.एकाच मोसमात तिने चार शिखरांवर चढाई केली. ती सर्व शिखरे आठ हजारांवर उंचीवरची होती.यात एव्हरेस्ट आणि कांचन गंगा या शिखरांचाही समावेश आहे.

यावरून आठवली ती कांचन गंगा ची पहिली मोहीम.१९८७-८८ घ्या आसपास ही मोहीम आखली गेली.यापुर्वी असा प्रयत्न झाला होता..पण केवळ सरकारी किंवा लष्करी पातळीवर.

आठ हजारांवर उंचीवर असलेल्या शिखरावर चढाई करण्याची ही मोहीम नागरी होती‌.या मोहीमेच्या तयारीसाठीच दोन वर्षे लागली.

यासाठी खर्च होता साधारण पंचवीस लाख रुपये.आणि एवढी रक्कम गोळा करणं सोपं नव्हतं.या खर्चाची जुळवणी करण्यासाठी मग या टीमने समाजातील मान्यवरांना पत्रे पाठवली.त्यात एक पत्र पाठवले होते जेआरडी टाटांना.

जेआरडींनी त्यांना भेटायला बोलावले. मोहीमेचा नेता वसंत लिमये आणि दिलीप लागु भेटायला गेले.जेआरडी टाटा त्यांच्या हनीमून साठी दार्जिलिंगला गेले होते.. तेव्हा तिथून त्यांना कांचनगंगाचे शिखर दिसले होते.त्यावेळी त्यांना काय वाटलं यांचं त्यांनी रसभरीत वर्णन केलं.तासभर गप्पा झाल्यावर त्याचं फलित काय..तर मोहिमेला अर्धा खर्च टाटा समूहाच्या कंपन्यांकडून उचलला गेला.

या मोहिमेत चोवीस जण असणार होते.त्या सर्वांना सर्वोत्तम दर्जाचे गिर्यारोहण साहित्य लागणार होते..जे भारतात कुठेही उपलब्ध नव्हते.परदेशातुन मागवण्यासाठी आयात परवाना गरजेचा होता.

मग केंद्र सरकारशी संपर्क साधुन स्पेशल लायसन मिळवले, आणि दहा लाख रुपयांचं साहित्य मागवलं गेलं.

मोहीमेचा कालावधी होता साडेतीन महीन्यांचा.यामध्ये ‘8 man day’ असे शिध्याचे खोके बनवले गेले.म्हणजे..आठ माणसांना एका दिवसासाठी लागु शकणार्या शिधासामुग्रीचा एक खोका.त्यामुळे प्रत्यक्ष मोहीमेच्या काळात वाहतूक करणं खुप सोयीचं गेलं.या सामानाची बांधाबांध करण्यासाठीच दोन महिने लागले.

मोहीमेच्या आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व गिर्यारोहकांना आमंत्रित केले…आणि कांचनगंगा वर रोवण्यासाठी तिरंगा प्रदान केला.

मोहीम सुरु झाली.एक महीन्याच्या प्रयत्नानंतर सर्व जण बेसकॅंपवर पोहोचले.मजल दरमजल करत अजुन उंचीवर जाऊन लागले.उणे तापमान.. प्रचंड थंडी..हिमवादळे..यांना तोंड देत सर्वांची आगेकूच सुरू होती.

पण त्यांना यश मिळाले नाही.कांचनगंगा पासुन अवघ्या पाचशे फुटांपर्यंत उदय कोलवणकर पोहोचला होता.. पण हिमबाधेमुळे त्याला पुढचा प्रयत्न सोडावा लागला.चारुहास जोशी पण जवळपास पोहोचला होता..पण त्यालाही हिमदंशामुळे माघार घ्यावी लागली.

लौकिकार्थाने ही मोहीम जरी यशस्वी झाली नाही..तरी त्यातुन खुप गोष्टी साध्य झाल्या.याच अनुभवाच्या जोरावर नंतर १९९८  साली ह्रषिकेश जाधव आणि सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट वर पाऊल ठेवले‌.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हो.. आम्ही मध्यमवर्गीय होतो..!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

हो.. आम्ही मध्यमवर्गीय होतो..!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

साधारण 20-25 वर्षांपूर्वी  “मध्यमवर्गीय” ही जमात अस्तित्त्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा ‘ब्रँड’ होता.

घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकूण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6  हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही.  म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती…..एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं…पक्कं गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.

अन्नाच्या बाबतीत,”पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको” असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची,”खाऊन माजावं, पण टाकून माजू नये.”

कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या… अशी साधी साधी समीकरण असायची. घरातली पुरूषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खावून घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी – भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा ‘कुचकरा’ किंवा ‘फोडणीचा भात’.  जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.

मुलांची शाळा म्हणजे ‘टेन्शन’चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. 200-300 रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज 2 वर्ष जायचा. 

पुस्तकांचा जरा ‘जुगाड’ असायचा. म्हणजे समजा ‘अ’ ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर ‘ब’ ला 70% किमतीत विकायचा.. अन् मग ‘ब’ तीच पुस्तकं  ‘क’ ला 40% मधे विकायचा.

Purchase Cost, Selling Cost, depreciated Value हे कामापुरतं “अर्थशास्र”  सगळ्यांनाच येत होतं. एकदा विकत घेतलेली पुस्तकं तीन वर्षं सर्रास वापरली जायची. 

पुस्तकाच्या या 3 वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल,अहिल्याबाई अशा “दूरदृष्टी च्या” व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.

बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाज फिरत असायची. पण शाळेत असतांना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवाॅटर अशी Destinations मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाहीत.

पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा,जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा ‘अ’ करून मोकळा व्हायचा… म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त  चित्रकलेतच “स्कोप” उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानावर यायचा…

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत.मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं,त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ‘ इगो बिगो’ कोणाचा आड येत नव्हता..

स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा.. त्यातही लहान बाळाचं स्वेटर,कपडे,दुपटे,झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला अाठवायचं नाही..

पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना “यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू..” आणि मुलांना, “तुला रिक्षा  घेवून देवू चालवायला” अशी  “जागतिक” धमकी मिळायची..

12 वी नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं ….Proposals.. हे आजच्या काळातले  “Highly Personal Issues”  त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते, तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात  Space.. …बाकी सगळा ‘लेकुरवाळा’ कारभार!!

आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा ‘बाबा’ लोकांचा प्रांत होता.प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी  RD , LIC काढलेल्याच असायच्या…..आणि  त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी !!! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा ‘एजंट’ त्या काळी उदयाला आलेला नव्हता.आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा… Share market म्हणजे जुगार.. हा ‘समज’ अगदी पक्का होता..

‘फॅमिली डॉक्टर’ हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण ‘नीतिमत्ता’ वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया,  पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा ‘व्यावहारिक’ पवित्रा असायचा.

जसा ‘फॅमिली डॉक्टर’ तशीच एक फॅमिली ‘बोहारीण’ पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही  ‘बोहारिण’ एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई  जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी ‘तहा’ ला सुरवात व्हायची..तिची गाळणी खपवायची घाई….तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा!!! खूप घासाघीस करून  ‘Deal’ चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या  कार्यक्रमात 2-3 तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या.शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..

खरं सांगू का.. …मध्यमवर्गीय ही काही ‘परिस्थिती’ नाहीये, ती  “वृत्ती” आहे……साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा ‘कणा’.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित ‘कर’ भरणारे, वाहतुकीचे काटेकोर ‘नियम’ पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत ‘मतदान’ करणारे.

असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..अचानक 1990-91 मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्यापर्यंत यायला 10-12 वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याचं  ‘ वादळ ‘ झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण..

प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही……अचानक ‘प्रोफेशनल’ झालो. माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.

पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या.Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या ‘गोंडस’ नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ  Packages  मधे गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा…

कवी :अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी एक असमंजस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी एक असमंजस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

या पूर्वी माझा डोळसपणा व माझा कानसेन पणा आपण वाचला आहे. आज तर मला माझ्या समजुती की गैरसमजुती ? शहाणपणा की मूर्खपणा ? यातच गोंधळ होऊ लागला आहे. आणि मी सामान्य नसावी असे वाटू लागले आहे. हे असे वाटण्याची कारणे पण सांगते. मलाच माझ्यावर शंका येऊ लागली आहे.

तर काही दिवसांतील अनुभव सांगते. मी अनेक वर्षे सकाळी लवकर चालायला जात असते म्हणजे आपले मॉर्निंग वॉक. तर यात विशेष काय? सगळेच जातात ना ? असे मला वाटते. पण चालायला आल्यावर छान निसर्ग ( असेल तर ) बघावा. गवतावर चालावे, फुलांचा,गवताचा,झाडांचा मंद सुगंध भरून घ्यावा. स्वतःशी मस्त संवाद करावा. काही काळ फोन,इतर साधने यांना विश्रांती द्यावी. अशी माझी समजूत आहे. म्हणून मी फोन शक्यतो घरी ठेवते. पण यात रमणारी मी मूर्ख ठरते. कारण बघावे त्यांच्या कानात निरनिराळी बटणे ( आपले हेडफोन्स ) दिसतात. एकदा तर चांगलीच गंमत झाली. माझ्या शेजारून चालणारी मुलगी अचानक माझ्याशी बोलू लागली. मला तेच हवे असते. मी कुठेतरी वाचले होते, दोन माणसे एकमेकांशी बोलत आहेत हे सर्वात सुंदर दृश्य आहे. मी तर माणूस वेडी. ती बोलत आहे हे बघितल्यावर मी पण बोलू लागले. आणि थोड्याच वेळात ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागली. कारण ती त्या बटण सदृश्य हेडफोन मधून अनेक कि.मी. जवळ असलेल्या व्यक्तीशी बोलत होती. आणि मी तिच्याशी. मग माझ्या विषयी तिचे गैरसमज होणारच. अजून एक गंमत अनुभवास येते. बरीच मंडळी जाता येता झाडाची पाने तोडतात व काही अंतरावर टाकून देतात. हे बघून मला मात्र वाईट वाटते. असे वाटते त्या झाडांनी तुमचे काय बिघडवले आहे? तसे सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक विचित्र नजरेने बघतात. काही मंडळी तर गवतावर बसतात. आणि हाताने त्याच जागेवरचे गवत उपटतात. बरेचदा आपण हे करत आहोत हे पण त्यांच्या लक्षात येत नाही. मी लक्षात आणून दिले की तेच विचीत्रपणे बघणे अनुभवते.

माझा अजून एक मूर्खपणा सांगते. त्याच मॉर्निंग वॉक वरून परतत असताना मला एक वेगळाच छंद जडला आहे. ज्यांचे नळ चालू आहेत व पाणी वाया जात आहे ते बंद करायचे. ज्यांच्या पाण्याच्या टाक्या ओसंडून वहात आहेत त्यांना त्यांच्या घरात जाऊन सांगायचे व वाहणारे पाणी बंद करायला लावायचे. आणि रस्त्यावर वाहणाऱ्या नद्या बंद करायच्या म्हणजेच रस्ते स्वच्छ करणे थांबवायचे. आहे ना वेडेपणा? कारण आम्ही बिल भरतो, आमचा नळ आहे तुम्हाला काय करायचे आहे? अशी मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागतात. तरी मी काही सुधारत नाही. याच पाण्या बाबत आमचा वेडेपणा सांगते. तर आम्ही काय करतो ते सांगते म्हणजे तुम्हाला पण पटेल. आम्ही  डाळ,तांदूळ,भाज्या धुतलेले पाणी एका छोट्या बादलीत घेतो आणि ते कुंड्यातील झाडांना घालतो. कपडे धुतलेले पाणी सडा टाकायला वापरतो. कपडे पिळलेले पाणी संडास,बाथरुम धुवायला वापरतो.पाणी प्यायला देताना शक्यतो अर्धा ग्लास देतो. लागले तर पुन्हा देता येते. आणि तरीही उरलेच तर एका भांड्यात साठवतो. ते कुठेही वापरता येते. गाड्या नळीने न धुता अशा साठवलेल्या पाण्यातून धुणे/पुसणे करतो. पण पक्ष्यांना मात्र एका मोठ्या भांड्यात आवर्जून पाणी ठेवतो.

आहे ना वेडेपणा?

हीच गोष्ट लाईटची घराबाहेरील लाईट रात्र रात्र चालू असतात. बरे हे काम करायला रस्त्यावरील सरकारी दिवे चालू असतात. काहींच्या घरात संडास, बाथरुम यातील लाईट चोवीस तास चालू असतात. आपल्याला खटकले आणि विनंती करून सांगितले तरी उत्तर तेच मिळते. आम्ही बिल भरतो. आमच्या घरात किंवा बाहेर लाईट ठेवतो. तुम्हाला काय करायचे आहे? आम्ही मात्र प्रत्येकाच्या हाताला व मनाला सवय लावून घेतली आहे, ज्या खोलीतील काम होईल त्या खोलीतील लाईट बंद करायचे. आहे ना वेडेपणा?

एक असाच वेडेपणा नुकताच अनुभवला. मतदान करण्यासाठी सुट्टी मिळाली होती. शनिवार रविवार याला जोडून सुट्टी होती. म्हणजे उत्तम योग. आणि त्याचा फायदा उच्च विद्या विभूषित हुशार लोकांनी घेतला. मस्त जोडून रजा घेऊन छान थंड हवेची ठिकाणे गाठली की. आणि आमच्या वयाची काही मूर्ख माणसे ७/८ तास प्रवास करुन मतदानासाठी पोहोचली. आणि आमच्या सारखे कर्मचारी तर ऊन,तहान सगळे विसरून,स्वतःला होणारे त्रास विसरुन मतदान अधिकारी म्हणून काम करत होते. आहे ना मूर्खपणा?

असे बरेच वेडेपण आहे. जाता जाता अजून एक वेडेपणा सांगते. हल्ली मस्त रात्री केक कापून मोठ्या आवाजात गोंधळ करुन  Happy Birthday साजरा करतात. केक तोंडाला फासतात. आम्ही मात्र वाढदिवस सकाळी साजरा करतो. सुवासिक अंघोळ घालतो. गोडाचे जेवण करतो. औक्षण करतो. देवळात जाऊन आशीर्वाद घेतो. एखाद्या संस्थेत त्या दिवशी जेवणाचा होणारा खर्च देतो. आहे ना वेडेपणा?

इतरांचे उच्च आवाजातील संगीत, डीजेचे व अपरात्री फटाक्यांचे आवाज ऐकणारे आम्ही. स्वतःच्या घरात कुलर लावताना त्याचा आवाज इतरांना त्रास देईल का? हा विचार करून आपला फॅन लावून झोपणारे आम्ही. आहोत ना वेडे?

तर मंडळी असे वेडेपणाचे बरेच किस्से आहेत. नमुना म्हणून काही सांगितले. आणि आपल्याच मंडळींचा सल्ला घ्यावे वाटले. म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “पप्पू पास झाला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“पप्पू पास झाला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

…” अगं रखमे का गं असं कसनुसं त्वांड घेऊन बसलीयास!… कसला एव्हढा पेच पडलाय तुला? … परवाच्या दहावीच्या परिक्षेत तुझा पप्पू पास झाला न्हवं!… आखरीला त्येचं घोडं गंगेत न्हायलं कि!… तू त्यो पास व्हावा म्हनुनशान दर वरसाला कसलं कसलं उपास तपास करत व्हतीस.. हायं ठावं मला!…पप्पू आता लै मोठा झाला… मिळलं कि तालुक्याला त्येला एखादी नोकरी बिकरी!… मगं धाडलं कि पगाराचं पैसं तुला!… सुटका व्हईल बघ तुझी या काबाडकष्टातनं!… खाशील चार घास बघशील सुखाचं चार दिस… अगं आता हातातोंडाशी आलेला घास असताना तू हसत खेळत राहायचं सोडून बैजार का गं?… माझंच बघ कि  समंध तुला ठावं हाय न्हवं… दोन पोरं पोटाला असून बघ कशी बेवारसा परमानं जगणं जिती… जाईल तिकडं त्येंना मुलूख थोडा हायच म्हनायचा..आनि  मागचा दोर त्येंनी कापून कवाच टाकला… सोताचा संसार घरदार केल्लं नि मला म्हातारीला ,आपल्या घरला, गावाला इसरून गेलं… देवाची किरपा म्हनून डुईला छप्पार न  भाताची पेज करून खायला चार दाणं भातं पिकवणारी  जमिन हायं म्हनून तरले बघ… चार कायबाय बोला चालायला तुझ्यासारखी मैतरनी हायती तवा रोजचा दिस सरतो एकल्याला.. न्हाई तर काय बी खरं न्हवतं… परं रखमे तुझं तर लै बेस हाय कि… तरी बी काळजीनं काळी ठिक्कर पडलीयास कि… काय झालं, घडलं ते तर सांगशिल का न्हाई?”…

.”.. काय बोलायचं गोदाक्का!… संसाराचा खेळखंडोबाच लिवलाय माझ्या नशिबात!… त्यो ह्या जल्मात संपतोय का न्हाई कुनास ठावं.?.. सावकाराकडं चाकरीला धनी व्हतं पाच सा वरसा मागं त्येंना त्या सावकाराच्या खुनाच्या भानगडीत जे पकडून नेलया ते तिकडं जेलात… अजून कोर्ट कचेरीत खरा खोट्याचा निवाडा होतोय जनू.. किती दिसं, महिनं का वरिस जातील याला मोजदाद कुठवर करायची?… वकिलाला पैका द्यायला धडुत्यात तो असायला हवा कि!… शेतावर भांगलयाला जातं व्हते त्यावर पोराचं नि माझं प्वाटं तरी भरत व्हतं!… सरपंच देव मानूस बघं त्येनं पोराची शाळंची काळजी घेतली… तवा कुठं दहावी पतुर प्वारं शिकलं बघं.. न्हाई म्हनायला चार पाच येळेला गटांगळ्या खाल्या त्यानं बी.. पन तड गाठली… तुला हे काय म्या नव्यानं सांगायला हवं.!.. तुझ्या समोरच सगळं घडत बिघडतं गेललं दिसतं व्हतंच कि!… त्ये येळेला तू माझी जिवाभावाची भनीवानी आधार देत व्हतीस कि!…पन तुला यातली आतली गोम काय व्हती ती ठावं नसंल.?.. अगं शाळंपायी माझा पप्पू त्या सरपंचांच्या घराकडंच दिसरात गुरावानी दावणीला बांधल्यावानी तिकडचं कि गं!… मीच त्येला जाता येता हाळी मारून बोलयाची… पप्पू बोलायचा ,’आये तू माझी काय बी काळजी करू नगंस.. मी हथं बेस हाय बघ… सरपंच मला म्ह़नातात दहावी झाल्यावर तालूक्याला बाजार समिती वर नोकरीला लावतो म्हनून.. तवर इथली चार पडत्त्याल ती कामं करत जा… ‘चांगलं दिसं येनार ह्या आशेवर पप्पू नि मी राहिलो बघं… पन ते चार दिस आमच्या पतूर कधीच आलं  न्हाईत… अन पप्पू मातर ते दिस येतील या खुळ्या आशेवर बसला नि राबराबत राहिला… संतरंज्या घालन्या काढन्यापासून, घरातली संबंध काम उरकन्यापर्यंत, विलेक्शन च्या मोर्चात, सभंत, लोकांना पैसं, धोतार, लुगडी वाटन्या पतूर.. पोस्टार लावणं म्हनू नको, ते घरघरात जाऊन सरपंचालाच मत द्या असा परचारचं म्हनू नको….. लोकांना मतदानादिवशी घेऊन आणयाला… आनि कशा कशाला पप्पू धावत व्हताचं… त्येला बी आपलं सरपंच निवडून यावं असं लै वाटतं हुतं… अगदी इमानदारीनं खपत हुता…त्या टायमाला  एक दिस बी घराकडं त्यो आला न्हाई कि कवा माझ्या नदरंला पडाया न्हाई… सरपंचा च्या घरला इचारलं तर ‘त्ये बेनं असलं इकडं तिकडं बोंबलत गावातनं.. ‘असं काहीबाही वंगाळ सांगायचे… मला लै भ्या वाटायचं.. पप्पू ची लै काळजी वाटत हूती.. एक दोन बाऱ्या त्येच्या दोस्तांच्या कडं त्येची इचारपूस बी केली.. पन त्येंनी बी’ काय कि पप्पू ला दोन दिसा माघारापासून बघितालाच न्हाई  असं जरा दबकतच बोलले… तोच कोन तरी मधीच त्वांड उघडलाच.. सरकारी हॉस्पिटलात पडलाय तो… कवाधरनं.’.. माझ्या पायाबुडीची वाळूच सरकली नव्हं… म्या तडक हॉस्पिटल गाठलं.. त्येच्या वारड बाहीर पोलीस उभा व्हता… मला त्यांनी आत सोडायची परमिशन न्हाई म्हनून अडवून धरलं.. म्या रडत भेकतं त्या पोलीसाचं पाय धरलं म्हनलं एक डाव नदरनं त्येला माझ्या लेकराला कसा हाय ते बघू द्या.. मगं मी हथनं हालन.. डोळ्याचं पानी खळंना आणि हृदयाचं पानी पानी झालेलं… काय झालं ?कशानं झालं ?कुणा मुळं ?कशा कशाचा पत्तया लागंना… सरपंचाची माणसं सारखी येत जात व्हती… त्या फौजदारी संगट हसत खिदळत बोलत असताना मला कळालं… सरपंच निवडणुकीत हरला व्हता… त्येचा राग धरून सरपंचाची पोरं जितलेल्ल्या  पुढाऱ्यांच्या माणसांना  लाठ्या काठ्या, सुरे तलवारी घेऊन मारायला धावले.. त्यांच्या बरोबर पप्पू पण व्हता.. बरीच हाणामारी, डोकी फुटली, हातपाय तोडले…पप्पूच्या डोक्याला जबराट लागलं… कुणीतरी उचलून त्येला हास्पिटलात टाकला.. सरपंच येऊन फौजदाराला सांगून गेला…’ हि दंगा करणारी माझी माणसं न्हाईत.. कुणीतरी भाडेकरू गुंड आणलेले दिसतात… तुम्ही यांना खुशाल जेलात टाका.. पन माझं नावं मातर कुठचं आणायचं न्हाई… आनि यांच्या घराकडं पन कळवू नका… उगाच माझ्या डोसक्याला न्हाई तो ताप व्हईल… तेपरीस इथचं पडनात का.’.. . एव्हढं त्या पोलीसांनी सांगितलं.. म्या पप्पूला आत जाऊन बघितलं तर त्येच्या डोक्याला प्लॅसटर.. हातपाय बांधलेलै.. नाकाला नळकाडं… बघितलं.. तिथली ती सिस्टर म्हनाली लै सिरियस केस हाय… कधी काय व्हईल काय नेम न्हाई… तवा… म्या तशीच बाहीर येऊन शान डोकं धरून बसून राहिलं… देवाला नवस करत… कोन येनार हायं माझ्या मदतीला अश्या वकताला… दिसरात ततचं काढले… पन अजून काई फरक दिसना..फौजदार मला महनले पोलीस केस झालीया… पप्पूला गुन्हेगार शाबूत केलयं.. जिता राहयला तर जेलात ठिवनार अन त्या आदुगर गेलाच तर केस बंद करून टाकनार…गोदाक्का माझ्या पप्पूनं  आपुनच ती केसच आताच  बंद करून टाकली… घराकडं निघाले तर वाटत तू भेटलीस…गोदाक्का माझा पप्पू इतकं दिसं नापास होत व्हता आनि नेमका यावेळेला तो पास झाला तवा…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कै. सुहास विनायक सहस्त्रबुद्धे, माझे पती, एक डॉक्टर म्हणून सेवाव्रती, अतिशय मृदू स्वभावाचे, 11 एप्रिल 2024 रोजी त्यांचे निधन झाले आणि माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली!

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीवर ती जोडी अवतरते, तसे आम्ही दोघे संसारात बांधले गेलो. आमची दोन्ही घरे मध्यम परिस्थितीतील, शिक्षणाला महत्त्व देणारी, त्यामुळे माझ्या एम्.ए.पर्यतच्या शिक्षणानंतर स्वाभाविकच लग्नाचा विषय निघाला आणि डॉक्टर सुहास सहस्त्रबुद्धे ( एम बी बी एस्) हे स्थळ आल्यानंतर लवकरच आमचे लग्न झाले!

ह्यांच्याविषयी सांगायचे तर त्यांना मेडिकलला जाण्याची प्रथमपासूनच इच्छा होती. त्यामुळे चिकाटीने अभ्यास करून त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवली. त्याचवेळी त्यांची इतर भावंडेही इंजीनियरिंगला, कॉमर्सला, अशी शिकत होती. माझ्या सासऱ्यांची सरकारी नोकरी होती. एकट्याच्या उत्पन्नात एवढ्या मुलांची शिक्षणे करणे खरोखरच अवघड होते. तरीही कै. मामा आणि कै.आई यांनी मुलांसाठी खूप कष्ट घेऊन शिक्षण पूर्ण केली..

M.B.B.S. झाल्यानंतर पुढे शिकण्याची इच्छा असूनही घरच्या परिस्थितीचा विचार करता यांनी सर्व्हिस करायचे ठरवले आणि मेडिकल ऑफिसर म्हणून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ते रुजू झाले. तो काळ आणीबाणीचा होता. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करताना खूपच त्रास सहन करावा लागत होता. नवीन नोकरी असल्यामुळे रजा, सुट्टी मिळत नसे, पण चिकाटीने ह्यांचे काम चालू होते.  आणीबाणीतील आठ दिवसांच्या रजेत 20 फेब्रुवारी 1976 रोजी आमचे लग्न पार पडले!

पुढे तीन महिन्यानंतर म्हणजे मे महिन्यात आमचे  पाटण येथे बिऱ्हाड झाले.  संसाराची खरी सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने ह्यांची ओळख झाली.

ते नेहमी दवाखान्यात व्यस्त असत..तरी त्यातूनही सब सेंटर असलेल्या चाफळ, कोयना नगर या ठिकाणी दवाखान्याची व्हिजिट असली किंवा सातारला महिन्याची मीटिंग असली की जीपने आम्ही जात असू आणि तेवढीच ट्रीप करून येत असू. यथावकाश या संसारात मी ही रमले!

19 ऑक्टोबर 1977 रोजी  केदारचा जन्म झाला. आम्ही दोघेही त्याच्या बाललीलात रमून गेलो. ह्यांना लहान मुलांची खूप आवड, त्यामुळे केदार खूप लाडका !

पुढे शिरपूरला बदली झाली.नोव्हेंबर 1979 च्या दरम्यान कन्या- प्राचीचा जन्म झाला आणि आमच्या चौकोनाचे चारी कोन पूर्ण झाले!

1981 मध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटलला ह्यांची मेडिकल ऑफिसर म्हणून बदली झाली. तेथे गव्हर्नमेंट कॉलनीत असलेल्या प्लॉटवर आम्ही घर बांधले व दवाखानाही सुरू केला. त्याच प्लॉटवर माझे धाकटे दीर – प्रकाश सहस्रबुद्धे यांचेही घर, दुकान होते. दोन्ही घरातील संबंध खूप छान होते. आता आमची दोन मुले, दिरांच्या दोन मुली, सासुबाई आणि आम्ही चौघे असे गोकुळासारखे नांदते घर झाले!

सिव्हिल हॉस्पिटल ला मेडिकल ऑफिसर म्हणून यांनी रक्तपेढीमध्ये असताना  खूप काम केले. रक्तदान शिबिरे आयोजित करणे, नियमितपणे  कॅंप घेऊन रक्त गोळा करणे , चाकोरी बाहेर जाऊन ही काही रुग्णोपयोगी कामे करणे हे  चालू असे. सिव्हिल हॉस्पिटल मध्येच ब्लड बँकेवर मेडिकल ऑफिसर, CMO, RMO अशा वेगवेगळ्या पोस्टवर काम केले.हे काम करत असताना योग्य वेळी योग्य ते निर्णय घेणे त्यांना जमत असे.सर्वांशी मिळून मिसळून तसेच आपल्या पदाचा मान राखून ते काम करत असत.शांत स्वभावामुळे लोकांना त्यांचा आधार वाटत असे.याच काळात ओगलेवाडी, कवठेमहांकाळ,नांद्रे याठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून  त्यांनी चांगले काम केले.

सतत तीन वर्षे त्यांना शासनाचा उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळाला. हे सर्व करत असतानाच त्यांचे सोशल वर्क ही चालू होते. एड्स जागृतीच्या काळात अनेक संस्थांमध्ये व्याख्याने, शिबिरे वारंवार घेत असतच. कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी तेथे काम करत असलेल्या श्री. अडसूळ सर यांच्याबरोबर एक प्रोजेक्ट केला. शंभर मुलींची निवड करून त्यांना वर्षभर योग्य आहार, टॉनिकच्या गोळ्या तसेच दर महिन्याला वैद्यकीय तपासणी अशा तऱ्हेने मदत करून त्यांच्या हिमोग्लोबिन मध्ये वाढ करता येते हे या प्रकल्पाने दाखवून दिले. तसेच एकल पालक असलेल्या, लांबून येणाऱ्या मुली निवडून त्यांना येणारा बसखर्च देणे व कॉलेजमध्ये येण्याविषयी प्रवृत्त करणे यासाठी दहा मुलींवर दरमहा लागणारा खर्च  स्वतः करून साधारणपणे पाच हजार रुपयांची मदत त्याकाळी त्यांनी केली.

नोकरीची बत्तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर  नातवंडांसाठी पुणे आणि दुबई असे वास्तव्य केले. लहान मुलांची आवड त्यामुळे  त्यांनी अत्यन्त आनंदाने  जमेल तेवढी मुलांना मदत केली. आमचे स्नेही, बापट सर तर त्यांना कौतुकाने “बालमित्र” म्हणत!कोणत्याही लहान मुलाला रमवण्याची कला त्यांना अवगत होती.. “आता उरलो उपकारापुरता” म्हणत म्हणत  2015 पासून ह्यांनी ” स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटर” ला अगदी कमी मानधन घेऊन रोज तीन चार तास काम सुरू ठेवले होते.

कोरोनाच्या काळात तेथील काम बंद झाले होते. तसेच नकळत ह्यांना वयाची चाहूल जाणवू लागली होती..

गेल्या एक-दीड वर्षात घरातील काही दुःखद घटनांमुळे त्यांचे मन अधिकच हळवे झाले होते. त्या गोष्टीचा ह्यांच्या मनावर नकळत खोल आघात झाला..

तब्येत थोडीशी खालावली. तरीही ते आपला आहार, व्यायाम याबाबत खूप जागरूक होते.स्वत: मितभाषी होते पण सहवासात गप्पिष्ट माणसे लागत.त्यांना नातेवाईक आणि मित्रमंडळी त गप्पा ऐकायला आवडत असे.आणि एखादंच मार्मिक वाक्य बोलून ते वातावरण हलके फुलके ठेवत.

माझ्या साठी त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या.. एक म्हणजे मला प्रवासाची आवड म्हणून यूरोप ट्रीप ला पाठवले! दुसरं त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या लेखनाला प्रोत्साहन देऊन माझी दोन पुस्तके प्रकाशित केली! दुसऱ्या साठी करणे हा त्यांच्या मनाचा केवढा मोठेपणा होता.

प्रथमपासूनच त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी अतिशय साध्या होत्या. शिळी भाकरी, दाण्याची चटणी आणि साईचं दही हा आवडता नाश्ता होता. जेवणामध्ये आमटीचे प्रेम फार होते. गोड पदार्थ जवळपास सगळेच आवडत असत पण “शिरा” हा त्यात अत्यंत आवडीचा! देवाची पूजा करणे हे आवडीचे काम होते. मन लावून देवपूजा करत असत, म्हणूनच की काय परमेश्वराने त्यांना जास्त त्रास होऊ न देता आपल्याकडे नेले. आमच्या घरात गोंदवलेकर महाराजांची भक्ती, सेवा केली जात असे. “श्रीराम” हा तारक मंत्र नेहमीच जपला जाई.

माझ्या संसारातील प्रत्येक आठवणीचा क्षण हा त्यांच्याशी गुंफलेला होता. आता क्षणोक्षणी ही आठवणींची माला माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि जन्मोजन्मी आमची साथ अशीच राहू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ AMOR FATI – आमोर फाटी : नशिबावरचा विश्वास – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ AMOR FATI – आमोर फाटी : नशिबावरचा विश्वास – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय… याचा अर्थ आहे नशिबावरचा विश्वास“.

आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते… अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे… अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे. 

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला.  त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती. 

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल असे वाटते?

“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” ..  अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

… पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला, “अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही.”

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला, “आग लागली हे बरं  झालं. माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”

आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याचे हे उदाहरण म्हणता येईल – नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे. ६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.

# कदाचित तुमचा जाॅब गेला असेल,

# कदाचित तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

# कदाचित तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला असाध्य रोग झाला असेल,

# कदाचित तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

# कदाचित आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता – – “ याला आमोर फाटी म्हणतात.” 

संकलन : प्रा. माधव सावळे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “युवर मेडिकल रिपोर्ट इज नॉट फेवरेबल. यू आर मेडिकली अनफिट..” रिसेप्शनिस्टचे शब्द ऐकून मला धक्काच बसला.

“यू मे कॉल ऑन अवर मेडिकल ऑफिसर डाॅ.आनंद लिमये.ही इज अ राईट पर्सन टू टेल यू द करेक्ट रिझन.” ती म्हणाली.

मी नाईलाजाने जड पावलांनी पाठ फिरवली. ‘कां?’ आणि ‘कसं?’ या मनातल्या प्रश्नांना त्याक्षणी तरी उत्तर नव्हतं. आता डॉ.आनंद लिमये हाच एकमेव आशेचा किरण होता! मला अचानक बाबांनी दिलेल्या दत्ताच्या फोटोची आठवण झाली.एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी माझ्या शर्टचा  खिसा चाचपला.पण..पण तो फोटो मी नेहमीसारखा आठवणीने खिशात ठेवलेलाच नव्हता.सकाळी निघतानाच्या गडबडीत माझ्या नकळत मी तो फोटो घरीच विसरलो होतो.तीच रुखरुख मनात घेऊन मी डॉ. आनंद लिमये यांच्या क्लिनिक समोर येऊन उभा राहिलो..)

माझं तिथं येणं त्यांना कदाचित अपेक्षित नसावं.मला पहाताच ते काहीसे अस्वस्थ झाल्याचा भास मला झाला.मी तिथे येण्यामागची सगळी पार्श्वभूमी त्यांना थोडक्यात सांगितली. अतिशय पोटतिडकीने त्यांना माझी सगळी कर्मकहाणी सांगून स्टेट बँकेतली ही नोकरी या परिस्थितीत माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे त्यांना पटवून द्यायचा माझ्यापरीने प्रयत्न करीत राहिलो. ते काहीसे चलबिचल झाल्याचे जाणवले.

“पण तुमच्या ब्लड, यूरिन, स्टूल सगळ्याच रिपोर्ट्समधे निगेटिव्ह ईंडिकेशन्स आहेत. अशा परिस्थितीत मी फेवरेबल मेडिकल रिपोर्ट कसा देणार? आणि आता तर मी ऑलरेडी माझा रिपोर्ट ब्रॅंचला सबमिट केलेला आहे.अशा परिस्थितीत…”

“पण डॉक्टर, मुंबईला आयुष्यात मी प्रथमच आलोय. त्यामुळे हवापाण्यातल्या बदलामुळे मला नुकताच ताप येऊन गेला होता.मेडिकल टेस्टच्या एकदोन दिवस आधीच ताप उतरला होता. रिपोर्ट्समधल्या त्या त्रुटी हा त्याच्याच परिमाण असणार ना?माझी औषधं अजून सुरु आहेत आणि या त्रुटी औषधाने यथावकाश दूर होणाऱ्याच तर आहेत.मग केवळ त्यामुळे बँकेत नोकरी करण्यासाठी मी कायमस्वरूपी अनफिट कसं काय ठरु शकतो?” 

“हो, पण तुम्ही तुमच्या आजारपणाबद्दल मला आधी कल्पना द्यायला हवी होतीत ना? मेडिकल टेस्ट कांही दिवस पुढे ढकलता आली असती. अॅट धीस स्टेज… आय ॲम हेल्पलेस. सॉरी.. आय कान्ट डू एनिथिंग…”

खूप आशेने मी इथे आलो होतो. निराश होऊन बाहेर पडलो. खूप एकटं.. खूप निराधार वाटू लागलं.अंधारुन आलेल्या मनात प्रकाशाची तिरीप यावी तशी ‘त्या’ची आठवण झाली आणि… ‘त्या’नेच मला सावरलं! हो.. ‘त्या’नेच..! कारण त्याची आठवण झाली त्याच क्षणी ‘सगळं सुरळीत होईल काळजी नको’ हे बाबांचे शब्दही आठवले. मनात ध्वनित झालेल्या त्या शब्दांनी ‘तो’च मला दिलासा देतो आहे असा भास झाला आणि मी सावरलो!आता स्वस्थ बसून चालणार नाही, अखेरपर्यंत शक्य असतील ते सगळे प्रयत्न आपणच करायला हवेत याची जाणिव झाली. लहानपणापासून वेळोवेळी कानावर पडलेले बाबांचे शब्द मला आठवले आणि मी सावरलो….!मनात उमटत राहिलेले त्याच शब्दांचे प्रतिध्वनी मला दिलासा देत माझ्या विचारांना योग्य दिशा  देत राहिले…

‘त्याच्याकडे कधीच कांही मागायचे नाही. जे घडेल ते मनापासून स्वीकारायचे. खंबीरपणाने त्याला सामोरे जायचे. आपल्या हिताचे काय आहे ते आपल्यापेक्षा तोच जाणतो. आणि योग्य वेळ येताच आपल्याला तो ते न मागता देतोही. आपण कर्तव्यात कसूर करायची नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नाही. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आलंच, तर ते दीर्घकाळाचा विचार करता आपल्या हिताचंच होतं हे नंतर जाणवतंच…’ मनात घुमणारा बाबांचा शब्द न् शब्द मला त्या हताश मनोवस्थेत योग्य मार्ग दाखवून गेला. मनावरचं दडपण थोडं कमी झालं.

‘काहीही अडचण आली तरी बँकेच्या नंबरवर मला लगेच फोन कर’ हे निरोप घेतानाचे भावाचे शब्द मला आठवले.मनात उलटसुलट विचारांनी पुन्हा गर्दी केली…..

‘त्याला फोन करायलाच हवा. हे सगळं त्याला सांगायलाच हवं… पण.. पण कसं सांगायचं? काय वाटेल त्याला हे सगळं ऐकून? त्याने आणि घरी आई-बाबांनीही आपण आज स्टेट बँकेत जॉईन झालोय हेच गृहीत धरलंय.आता हे सगळं ऐकून काय वाटेल त्यांना..?”

मी मनावर दगड ठेवून  जवळच्याच पोस्टात गेलो. भावाला फोन लावला खरा पण रिसीव्हर धरलेला माझा हात भावनातिरेकानं थरथरु लागला. मोजक्या शब्दात सगळं

सांगतांनाही आवाज भरून येत होता. सांगून संपलं तरी क्षणकाळ त्याच्याकडून काही प्रतिसादच आला नाही. त्याला सावरण्यासाठी तेवढा वेळ तरी आवश्यक होताच.

“हे बघ, तू स्वतःला सावर. डिस्टर्ब होऊ नको. अजूनही यातून काही मार्ग निघेल” तो म्हणाला.

“नाही निघणार…”मी रडवेला होऊन गेलो..”कसा निघणार..?”

“आपण प्रयत्न तरी करु.मी माझ्या मॅनेजरसाहेबांशी बोलतो. स्टाफ डिपार्टमेंटमधे त्यांच्या चांगल्या ओळखी आहेत. ते नक्की मदत करतील. काळजी करू नकोस.मी आधी माझ्या साहेबांशी बोलून बघतो.तू थोड्या वेळाने मला फोन कर. आपण बोलू सविस्तर”

मी रिसिव्हर खाली ठेवला. त्याक्षणी मन स्वस्थ झालं. काहीतरी मार्ग निघण्याची थोडीशी कां असेना पण आशा निर्माण झाली होती.

हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरु राहिला. अथक प्रयत्न, संपर्क,गाठीभेटी, रदबदल्या सगळं झाल्यानंतर अखेर या सगळ्या प्रकरणाला अनपेक्षित पूर्णविराम! हाती कांही न लागताच अखेर सगळं हातून निसटून गेलंच. स्टेट बँकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्दसुद्धा झाली आणि नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली..!

केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी स्टेट-बँकेत पुन्हा नव्याने अर्ज केला. याच दरम्यान पूर्वी मेहुण्यांच्या ओळखीतून खाजगी नोकरीसाठी त्यांनी शब्द टाकला होता त्याची परिणती म्हणून शिवडीच्या ‘स्वान-मिल’मधल्या पीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपुंज्या पगाराची नोकरी मिळाली. नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली..!

पुढे जे काही घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच होतं. पण तरीही जणू काही कुणीतरी ते मुद्दाम घडवत होतं. ‘कुणीतरी’ म्हणजे माझ्या मनात मी श्रद्धेनं जपलेला ‘तो’च होता! कारण वरवर योगायोग वाटणाऱ्या पुढे घडत गेलेल्या सगळ्याच घटना अघटीत वाटाव्यात अशाच होत्या हे माझं मलाच जाणवत होतं. आणि आत्तापर्यंत घडलेल्या या सगळ्या नकारात्मक  बारीकसारीक घटना म्हणजे ‘त्या’नेच केलेले या सगळ्या अनिश्चिततेतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचे पूर्वनियोजन होते याचा प्रत्ययही आला. पण तोपर्यंतचा संघर्षाचा काळ मात्र माझी आणि माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणाराच होता!

‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरित्या शब्दशः खरेही ठरले!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मला मंडईत जायला फार आवडते. हिरव्यागार ताज्या भाज्यांचे ढीग बघताना मनाला प्रसन्न वाटते. 

भाजी विकणारे ओळखीचे झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा आनंदही असतो. बरं हा नुसता आनंद नाही तर त्यांच्याकडून शिकायला पण  मिळते.

 

एक काका फक्त पालेभाज्या विकतात. त्या दिवशी गेले तर काका खुर्चीवर बसले होते. शेजारी एक टेबल मांडले होते आणि त्यावर पालेभाज्या निवडून प्लास्टिकच्या पिशवीत भरून पॅक करून ठेवल्या होत्या .मला सांगायला लागले

 

“मुलांनी  हे सुरू केले आहे .पुढची पिढी आहे ..नवीन काही करायचं म्हणते करू दे. आता आपण जरा मागे राहूया असं ठरवलं आहे बघा..”

 

मुलगा उत्साहात सांगायला लागला “काकू तुम्हाला काही हवं असेल तर मला व्हाट्सअप करा. घरपोच निवडलेली भाजी आम्ही पुरवतो. माझे तीन मित्र मिळून आम्ही हे चालू केलेले आहे.”

 भाजीचं काम मुलाच्या हाती सोपवलं तरी त्याला मदत करत काका बसले होते. त्यांच्या या निर्णयाच मला अप्रूप  वाटलं. त्यांनी मला एक छान धडा दिला.

 

ऊन ,वारा ,पाऊस  झेलत ..एक आजी गेले कित्येक वर्ष विड्याची पानं विकत आहेत.  हळूहळू म्हाताऱ्या होत जाताना मी त्यांना पाहते आहे .मांडी घालून त्या बसलेल्या असतात. टोपलीत पानं सुंदर पद्धतीने मांडून ठेवलेली असतात .देताना हळुवारपणे  हाताळतात. सैलसर बांधून देतात. मुक्तपणे खळखळून नेहमी हसत असतात.

कस जमत आजींना हे…..अस नेहमी माझ्या मनात येत.

 

एक कानडी भाजीवाले आहेत. त्यांना दोन मुली आहेत .आपल्या मुलीच पुढे धंदा चालवणार आहेत हे त्यांनी ओळखले आहे.

त्यांच्या सावळ्या, तरतरीत ,हसतमुख अशा दोन मुली त्यांना मदत करतात. बारा वाजता त्यांची शाळा असते .पण सकाळी दोन तास त्या वडिलांच्या हाताखाली काम करतात. आनंदाने शांतपणे त्या भाजी वजन करून देत असतात .

मला त्या मुलींचे फार कौतुक वाटते. आत्तापासूनच त्या शिकत आहेत पुढे त्या निश्चितच यशस्वी होतील.

 

एक बाई स्वतःच्या शेतातली  भाजी घेऊन बसलेल्या असतात. बाकीच्या भाज्यांची पोती  नवरा होलसेल मध्ये विकतो. तोपर्यंत त्या भाजी विकतात.

भाजी विकून झाली की तिथेच मिळणार शेव, फरसाण ,गाठी ,चुरमुरे, फळं घेऊन ठेवतात.

” पोरा बाळांना आवडतं ना म्हणून घेऊन जायचं .

मला सांगत होत्या.

 

सगळ्यात शेवटी फुलं घ्यायला सरू कडे जाते .ती गेल्या गेल्या”या काकु”म्हणते.

तिथे एक माणूस चहा विकतो. अगदी दोन-तीन घोट मावतील असा त्याचा छोटासा कप आहे. तो चहा ती आग्रहानी पाजते. आज फुलं दिल्यानंतर तिने टपोरा गुलाब त्यात घातला .

“हा तुमच्या बाप्पाला …आणि त्याला सांगा सरूच्या नवऱ्याला जरा अक्कल दे..”

“हो ग केव्हाच सांगितलं आहे”

मग काय म्हणाला तुमचा बाप्पा……..

तो म्हणाला 

सरू   शहाणी ,समंजस सोशीक आहे. संसारासाठी कष्ट करतीय. असं म्हणून तुझं कौतुक करत होता.”

 

” नेहमीसारखं गोड गोड बोलून लावा मला वाटेला “….

असं हसत  ती म्हणाली. मी पण हसून घेतलं …

बाप्पाच्या हातात काही नाही हे तिला पण माहित आहे आणि मला पण…..

 

या सगळ्याजणी पहाटे उठतात.  मार्केट यार्डला जातात. तिथे फुलं,भाज्या घेतात .टेम्पोत बसून इथे येतात. रस्त्यावर बसून विकतात. किती कष्ट करतात. हा विचार केला की मी त्यांच्याकडून शिकते.

मग उगीच छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करत नाही .

 

मनात खूप संमिश्र भावनांची मंडई भरलेली असते ….

आजकाल ती फार  जाणवायला लागलेली आहे…

जीवन आनंदाने कसं जगावं हे शिकवणारे  माझे हे गुरु …

आसपास वावरत आहेत….

शिकत राहते त्यांच्याकडून…

श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले मग आपण कोण?

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares