मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अजून पहाट उगवायचीय….” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? जीवनरंग ?

“अजून पहाट उगवायचीय….☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

उगवतीला तांबड नुकतंच फुटू लागलं. कावळ्यांची काव काव, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आणि आणि तेव्हढ्यात राजा कोंबडयानं एक खर्जातली धारदार बांग दिली. मग त्या वाडीवरच्या इतर कोंबडयांनी आपला सुरात सूर मिसळला. उषाचं कोवळं उन अंधाराच्या दुलईला गुंडाळून ठेवून लागलं. घराघरांतून चुली फुलू लागल्या. जागी झालेली वाडी हळूहळू आपल्या नेहमीच्या कामाला लागली.

चंद्राक्काला आज श्वास घ्यायलासुद्धा उसंत मिळणार नव्हती. आज तिच्या लेकीची सुंदरीची सुपारी फुटायची होती… सुंदरीनं नशीब काढलं तिला तहसीलदार नवरा मिळाला होता नि चंद्राक्काला स्वर्ग दोन बोटं उरला होता… घरची माणसं, पै पाव्हणं जमू लागली होती. संध्याकाळी चारच्या सुमारास तिकडची मंडळी येणार आहेत असा सांगावा आला होता. सकाळपासून चंद्राक्काचं घड्याळ आज जरा जोरातच पळत होतं… तयारी सुरु झाली आणि बघता बघता अर्धा दिवस संपला; तरी चंद्राक्काची लगबग चालूच होती.. संध्याकाळी पाव्हणं जेवुन जाणार; म्हणजे एक का दोन गोष्टी असणार होत्या.. गोडाधोडाचा स्वयंपाक त्यात जावयाला काय गोड आवडत असेल याचा अंदाज… डाव उजवं.. ताट कसं पंचपक्वानानं भरून गेलं पाहिजे यातच चंद्राक्का बुडून गेली.

दुपारचा सूर्य कलला… घरातल्या गणगोतांचा कलकलाट वाढत गेला. तशात पाव्हण मंडळीं खळयात उतरली. घरातल्या बायांनी जावयासाकट आलेल्या पाव्हण मंडळींचं औक्षण केले. पुरुष मंडळीं जावयासह सोप्याकडे निघाले. तेव्हढ्यात राजा कोंबडयानं आपला लाल तुरा असलेली मान उंचावून एक जोरदार बांग देत त्यांना सामोरा गेला. जणू काही तुमचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे अश्या थाटात तो डौलात चालत गेला.

 पाव्हणं ते पाहून अचंबित झाली. जावयाचं लक्ष त्याच्यावर खिळून राहिले… कितीतरी जण वेगवेगळे बोलत होते. पण जावयाच्या मनात तो कोंबडा मात्र घर करून राहिला. शिष्टाचार झाला आणि कार्यक्रम सुरु झाला. काय द्यायचं, काय घ्यायचं. मानपान विषय रंगु लागला. तेव्हा जावई मधेच म्हणाला,

“ फक्त नारळ नि मुलगी एव्हढंच दया! आणि आजच्या जेवणाला तो कोंबडा घाला!” आपल्या बापाकडं बघत जावई पुढं म्हणाला,

 “ मी काय म्हणतो आबा हे इतकचं असुद्या. आता ठरलं म्हणजे ठरलं. जास्त वेळ न दवडता सुपारी फोडा नि कधी आणायचा लग्नाचा घोडा ती तारीख ठरवा”.

जावयाचं हे बोलणं पाव्हण्या मंडळींनी उचलून धरले. पण ते ऐकून चंद्राक्काला धक्काच बसला.. देणं घेणं नाही, मानपान नाही, किती किती सालस माणसं म्हणावीत तरी. पण रितीप्रमाणं गोडधोड जेवण असतयं ते सोडून कोंबडं कापायला सांगितलं म्हणून खट्टू झाली. तसं तिनं एकदा आडून सांगून पाहिलं पण जावयाच्या पुढं पाव्हणं मंडळींचं काहीच चाललं नाही.

तशी चंद्राक्का म्हणाली,

“अवो एक का मस घरात धा कोंबड्या आहेत! करूया कि चमचमीत तुमच्या पसंती प्रमाणं मग तर झालं!”

“धा कोंबड्या राहू द्या बाजूला, तो समोर आलेला कोंबड्याचंचं झणझणीत जेवण होऊ द्या” अशी जावयानं पुष्टी दिली.

“करूया कि! त्या कोंबड्या परास आणखी बाजरीचं दुसरं कोंबडं असं करून घालते कि तुम्ही सगळी बोटं चाटत राहशिला!”चंद्राक्का म्हणाली…

“हे बघा मामी आम्हाला तोच कोंबडा हवाय. दुसरं घालणार असाल तर सुपारी फुटायची नाही. तेव्हा काय ते आताच सांगा.. नसलं जमत तर आम्ही माघारी निघतो”जावयानं निकराचं बोलणं केलं.

चंद्राक्काचे सगळे मार्गच बंद झाले.. एक-दोन जणांनी मध्यस्तीचा प्रस्ताव बुजुर्ग मंडळींपुढे ठेवून पाहिला, पण तोड निघण्याऐवजी तुटण्याची पाळी आली. नाईलाज झाला आणि तोच कोंबडा घालण्याशिवाय पर्याय उरला नाही…

मग घरातल्या मंडळींनी लेकीच्या भल्यासाठी राजा कोंबडा कुरबान केला तर बिघडलं कुठे असं चंद्राक्काला समजवून सांगू लागले.

चंद्राक्का बिचारी दुःखी कष्टी झाली. तिच्या उरात कालवाकालव सुरू झाली… एकिकडे मुलीच्या लग्नाची सुपारी आणि ती फुटण्यासाठी घरच्याच जीवापाड प्रेमानं जतन केलेल्या कोंबडयाची कुरबानी. हे दु:ख तिच्या एकटीचंच असल्यामुळे इतरांना तिच्या भावना कळल्या नाहीत.

अखेर हो ना करता करता शेवटी तो निर्णय झाला आणि त्या कोंबड्याला धरून आणलं. आपल्या कशासाठी आणलय गेलंय हे त्या मुक्या प्राण्याला समजलं..

राजा कोंबड्याला धरून सोप्यातून परसात जाताना एकवार सगळ्या मंडळीकडे त्याने पाहताना चंद्राक्काची दयाद्र नजरेला त्याची नजर भिडली आणि शेवटचा सलाम करावा तसा त्याने एकदाच कॉक कॉक केलं…

 आणि पुढे मानेवरून सुरी फिरवून घेतली. क्षण दोन क्षणाची तडफड मानेची आणि धडाची झाली. चंद्राक्काला वाटलं ती सूरी आपल्याच मांनेवरून फिरली गेलीय. तिच्या डोळ्यातूनं टचकन अश्रू ओघळले…

रात्री आठच्या सुमारास स्वयंपाक तयार झाला. अष्टमीचा चंद्र वर आकाशात लुकलुकणार्‍या चांदण्यासाह प्रकाशू लागला. पण आजा त्याचही तेज निष्तेज वाटत होतं. चांदण्यांच्या प्रकाशात खळयात ताटावर ताट फिरतं होते. हसणे खिदळण्याच्या दंग्यात कोंबड ओरपून खाणं चालल होत… त्यानं जेवणाची लज्जत वाढली होती. चंद्राक्का जरा दुरूनच ते पाहात होती. वरवर हासू दाखवत होती आणि आतून आपलंच काळीज शिजवून घातलं आहे या दुखात ती बुडाली होती…

रात्री उशिरापर्यंत जेवणावळ चालली आणि मध्यरात्रीच्या सुमारास जावई आणि पाव्हण मंडळीं निरोप घेऊन गेली. घरातले इतर नातेवाईक जेवून झोपी गेले. एकटी चंद्राक्का त्या रात्री जेवली नाही आणि चांदण्यांच्या प्रकाशात मुक्यान आपले अश्रु वाहू देत राहिली.

तोच तिच्या कानाशी कुणी बोलले,

‘चंद्राक्का नको रडूस! तसं माझं आयुष्य राहिलं होतं किती? अंग कुणी तरी मानेवर कधीतरी सुरी फिरवून मारण्यापेक्षा घरच्या माणसांच्या कामाला आलो यातच माझं सोनं झालयं! किती जिवापाड जपलंस मला आजवर.. मागे दोन-चार वेळा चोरांनी पकडून नेला होता पण माझ्या ओरडण्याने तू मला सोडवून आणलंस. राजाचा दिमाख तूच मला दिलास!’

चंद्राक्काला हुंदका आवरेना ती म्हणाली,

“असं होईल कधी वाटलं नव्हतं बघ!. तू दुपारी दिमाखात त्यांना स्वागतासाठी गेलास काय आणि त्याच रात्री त्यांच्या जेवणासाठी तुझी कुरबानी व्हावी काय? हि विपरीत लिला का दिसावी?”

‘आपल्या सुंदरीच्या लग्नाला माझाही हातभार लागायला हवा होता ना. मग तो असा आला त्यात काय बिघडल’ राजा कोंबड्यान समजूत घातली.

ती रात्र उसासे टाकत विलय पावत गेली. पहाटेचं तांबड फुटू लागलं. आज कितीतरी दिवसात ते नेहमी पेक्षा अधिकच लाल गडद दिसतं होतं. कावळ्यांची काव काव, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आणि आणि…

चंद्राक्काचे जागराणाने डोळे जडावले होते तिला वाटतं होतं कि… राजाची बांग झाल्याशिवाय पहाट काही व्हायची नाही….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या परदेशी पाहुण्याच्या आठवणीत…! ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

?जीवनरंग ?

त्या परदेशी पाहुण्याच्या आठवणीत…! ☆ श्री संदीप काळे ☆

मुंबईला 23 फेब्रुवारी रोजी “व्हाईस ऑफ मीडिया” आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दरवर्षी मी आशितोष कांबळे या चित्रकाराकडून मोमेंटो तयार करून घेतो. यावर्षी देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने मोमेंटो तयार करण्यासाठी मी आशितोषला भेटण्यासाठी वाशीला गेलो.

घराची कडी वाजवल्यावर आशितोषच्या बहीणीने दरवाजा उघडला. ती म्हणाली, “दादा खाडीवर गेला आहे. ”

मी विचारले, “खाडी किती दूर आहे आणि तो तिथे का गेला आहे?”

त्यावर तिने उत्तर दिले, “खाडीवर परदेशी पाहुणा आला आहे. त्याला पाहण्यासाठी दादा तिथे गेला आहे. ”

मी आश्चर्याने विचारले, “परदेशी पाहुणा म्हणजे कोण?”

ती म्हणाली, “एक परदेशी पक्षी आहे, जो आपल्या भारतीय मैत्रिणीला भेटण्यासाठी दरवर्षी वाशीच्या खाडीवर येतो. काही दिवस इथे राहतो आणि मग परत जातो. त्याच पाहुण्याला पाहण्यासाठी दादा गेला आहे. ”

ज्या दिशेने खाडी आहे, तिकडे मी निघालो. थोडं अंतर चालल्यावर, पक्ष्यांच्या थव्याजवळ काही लोक उभे असलेले दिसले. मी थोडं पुढे गेल्यावर आशितोष मला दिसला. तिथे दोन पक्षी होते—एक, जो मी कधीच पाहिला नव्हता आणि दुसरा, जो सातत्याने खाडीच्या कडेला असतो. आशितोष आणि त्याचे दोन-तीन मित्र त्या दोन्ही पक्ष्यांच्या भोवती ये-जा करत होते.

तो कधीही न पाहिलेला पक्षी थोडासा पुढे जायचा, मग मागे यायचा आणि आपले पंख पसरून त्या दुसऱ्या पक्ष्याला सामावून घ्यायचा. मी आशितोषला विचारलं, “घरी ताई ज्या पक्ष्यांच्या प्रेमाविषयी बोलत होती, हेच ते दोन पक्षी आहेत का?”

आशितोष माझ्यावर ओरडला आणि म्हणाला, “चूप बस, बाबा!” माझ्या जवळ येत त्याने हळू आवाजात सांगितलं, “अरे संदीप, हळू बोल! इथल्या लोकांना याबद्दल फार काही माहिती नाही. नाहीतर उद्यापासून हे पक्षी बघायला येथे गर्दी जमेल. ”

मी त्याला विचारलं, “नेमका प्रकार काय आहे, ते सांग. काही अडचण नाही. ”

त्यावर आशितोष म्हणाला, “मागच्या सात वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा नर परदेशी पक्षी दुसऱ्या देशातून या मादी पक्ष्याला भेटायला इथे येतो. परवा तो इथून परत जाणार आहे. माझे काही मित्र आले होते, त्यांना हे दाखवण्यासाठी मी आलो होतो. ”

मी विचारलं, “हा पक्षी दरवर्षी याच वेळी इथे येतो आणि किमान दहा दिवस थांबतो हे तुम्हाला कसं समजलं?”

आशितोष म्हणाला, “सतीश राजन नावाचे माझे एक पक्षी निरीक्षक मित्र आहेत. त्यांनी मला पक्ष्यांच्या हालचाली, त्यांचे वर्तन, आणि पक्ष्यांमधील प्रामाणिक नात्यांविषयी महत्त्वाची माहिती दिली होती. त्यामुळे मीही पक्ष्यांचे निरीक्षण करायला सुरुवात केली. एकदा मी आणि सतीश खाडीच्या कडेला बसलो होतो, तेव्हा आम्हाला हे दोन पक्षी वेगळेच वाटले.”

आशितोष पुढे म्हणाला, “खाडीमधल्या बाकीच्या पक्ष्यांमध्ये असलेला एक पक्षी एका वेगळ्या परदेशी पक्ष्याबरोबर काय करतोय, हे आम्हाला आश्चर्य वाटलं. सतीशने अनुमान काढलं आणि मला सांगितलं की, हा नर परदेशी पक्षी दरवर्षी याच मादीला भेटायला इथे येतो. पुढच्या वर्षीही लक्ष ठेवून राहा, तो नक्कीच परत येईल.”

मी त्याला विचारलं, “हेच ते दोन पक्षी आहेत, हे आपण नेमकं ओळखायचं कसं?”

त्यावर सतीश म्हणाला, “यासाठी आपल्याला दोन-तीन दिवस त्यांचं निरीक्षण करावं लागेल. त्यांच्या हालचाली, एकमेकांशी असलेलं प्रेम, आणि त्यांचे वेगळेपण ओळखलं की आपल्याला खात्री पटते.

सतीशने ज्या पद्धतीने मला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही दोघांनीही त्या दोन्ही पक्ष्यांची ओळख पटवण्यासाठी एक युक्ती लढवली. आम्ही दिवसभर त्या पक्ष्यांना दोन-तीन वेळा अन्न देत असू. दोन-तीन दिवस हे सलग सुरू राहिल्यावर त्या पक्ष्यांना आमच्यावर विश्वास वाटायला लागला. ते पक्षी हळूहळू आमच्याकडे येऊ लागले आणि आम्हाला स्पर्शही करू लागले.

ते दोघं एकमेकांच्या समवेत राहायचे, एकमेकांकडे सतत पाहायचे आणि एकमेकांना सातत्याने स्पर्श करत राहायचे. नित्यनेमाने बागडणं, उड्या मारणं, आणि एकमेकांच्या अंगावरून फिरणं हे सारं त्या दोघांमध्ये होत होतं. आम्ही अनेक वेळा त्यांना हातात घेऊन पुन्हा खाली सोडायचो.

त्या दोन्ही पक्ष्यांची ओळख पक्की करण्यासाठी आम्ही त्यांच्या शरीरावर, पंखाच्या वरच्या आणि खालच्या भागात गडद रंग लावला. चौथ्या दिवशी आम्ही खाडीवर गेलो, तेव्हा त्या दोघांपैकी एकच पक्षी तिथे बसलेला होता. तो परदेशी पक्षी त्या दिवशी आलाच नव्हता. दुसऱ्या दिवशीही तो दिसला नाही.

सतीशने यावर अनुमान काढलं की, दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा परदेशी पक्षी त्याच्या प्रिय पक्षी मादीला भेटण्यासाठी येतो. मला तेव्हा यावर फारसा विश्वास बसला नाही. पण दुसऱ्या वर्षीही, अगदी याच वेळेत आम्ही त्या परदेशी पक्ष्याला त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आलेलं पाहिलं. आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं.

त्या पक्ष्यांचा पाहुणचार करण्यासाठी आम्ही त्यांना रोज धान्य खायला घालत असू. ठरलेल्या वेळेत तो परदेशी पक्षी पुन्हा उडून जात असे. अनेक वर्षांपासून आम्ही त्या दोघांमधलं प्रेम पाहात आलो आहोत. मी एकदा सतीशला विचारलं, “जर तो पक्षी तिला इतकं प्रचंड प्रेम करतो, तर तिला सोबत घेऊन परदेशी का जात नाही?”

यावर सतीश म्हणाला, “प्रत्येक पक्ष्याची उड्डाण क्षमता वेगळी असते. काही पक्ष्यांना त्यांच्या मर्यादा माहीत असतात. माणसांप्रमाणे अतिविश्वासाने त्यांचं आयुष्य चालत नाही. पक्ष्यांची जगण्याची पद्धत जरा वेगळी असते. ” सतीशने त्या एकट्या मादी पक्ष्याला “देशी मैना” असं नाव दिलं होतं. “

आता आज ना उद्या, यावर्षीसुद्धा तो प्रियकर परदेशी पक्षी आपल्या मायदेशी, त्याच्या प्रेयसीला इथेच सोडून जाणार होता. आशितोष त्या दोन्ही पक्ष्यांना दाणे भरवत होता. त्याचे पाय आणि हात चिखलाने माखले होते. एका परदेशी पाहुण्याचा आपण पाहुणचार करतोय, याचा आनंद त्याच्या मनामध्ये होता. उद्या खाडीवर पाहिलं तर, तो परदेशी पाहुणा उद्याही इथे राहील का नाही, याची खात्री नव्हती. मात्र, तो परदेशी प्रियकर कधी जाणार आहे, याची माहिती मात्र देशी मैनाला नक्की असावी.

त्या दिवशी आम्ही घरी परतलो. कामाविषयी चर्चा सुरू होती, पण माझं लक्ष मात्र त्या परदेशी पक्षी आणि देशी मैनेकडेच होतं. घरी जेवायला बसल्यावर मी आशितोषला विचारलं, “वहिनी कुठे आहेत? दिसत नाहीत. ”

पण आशितोष काहीच बोलला नाही. मला काहीतरी खटकलं.

मी पुन्हा वहिनीचा विषय काढला. यावर त्याची बहीण म्हणाली, “काय सांगावं दादा, सध्या सगळं नवलाईचं आहे. कॉलेजमध्ये असताना दादाच्या मैत्रिणीने दादाला दिलेलं एक ग्रीटिंग पाहिलं. त्यावरून वहिनी रागारागाने माहेरी निघून गेली. ”

तिच्या जाण्याला आता एक वर्ष झालं. कसं असतं बघा माणसाचं प्रेम—थोडासा गैरसमज झाला की सगळं संपतं.

बोलता बोलता आशितोषने त्यांच्या बहिणीविषयीही सांगितलं. ताईचा नवरा, जो उच्च शिक्षण घेतलेला होता, नोकरीनिमित्त परदेशात गेला आणि तिथेच त्याने ऑफिसमधील एका प्रचंड श्रीमंत सहकाऱ्याशी दुसरं लग्न केलं. याला आता दहा वर्षे झाली.

मला त्या दोघांना काय बोलावं हेच सुचत नव्हतं. माझ्या डोक्यात तीन वेगवेगळ्या कथा एकाच वेळी सुरू होत्या—दोन्ही पक्ष्यांची प्रेमकहाणी, आशितोष आणि त्याची बहीण यांची कथा. त्या दिवशी मी घरी निघालो. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी पुन्हा आशितोषकडे गेलो. घरी गेल्यावर समजलं की आशितोष वाशीच्या खाडीवर गेला आहे.

मी खाडीवर गेलो तर मला दिसलं की आशितोष त्या एकट्या देशी मैनेला जवळ घेऊन तिचे अश्रू पुसत होता. मला पाहताच आशितोषला डोळ्यांतले अश्रू आवरले नाहीत. तो म्हणाला, “परदेशी पाहुणा बिचारीला सोडून गेला रे, संदीप. आता वर्षभर ती वाट पाहणार. पुन्हा तो वर्षभरानेच येईल. ”

आशितोषने मुठीत असलेले उर्वरित दाणे देशी मैनाच्या समोर टाकले आणि आम्ही जड पावलांनी घरी निघालो. काम करताना आशितोषचा मूड अजिबात नव्हता. तो जे चित्र काढत होता, त्यात नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते.

मी आल्या पावलानेच परत घरी निघालो. वाटेने जाताना माझ्या मनात प्रश्न उभा राहिला—खरं प्रेम कोणतं? घर सोडून जाणारी पत्नी, पैशासाठी दुसरं लग्न करणारा ताईचा नवरा, की दरवर्षी न चुकता त्याच वेळेला आपल्या प्रेयसीला भेटायला परदेशातून येणारा प्रियकर पक्षी? हल्ली माणसांना पक्ष्यांसारखं वागा असं म्हणायची वेळ आली आहे—ते पक्षी पहा कसं नि:स्वार्थीपणे एकमेकांवर प्रेम करतात, असे म्हणायची वेळ आली आहे. बरोबर ना?

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भिक्षा… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ भिक्षा…  ☆ सौ. प्रांजली लाळे

आजही त्याला आठवतोय तो दिवस.. अगदी लख्खपणे.. गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या गेटपाशी झोळी घेऊन उभा राहिलेला तो.. भिक्षा घेण्यासाठी झोळी पसरवलेला, आतुरतेने साठे काकूंची वाट पहात होता..

काकूही त्याची वाट पहायच्या. त्याचं गोजिरवाणे रुप अगदी मनाला स्पर्शून जायचं. खुप कमी वयात पोरका झालेला श्रीधर पाचवीच्या वर्गात शिकत होता. गावातील एका मराठी शाळेत शिकताना मास्तरांचा खरपूस मार खाणंही त्याला गोड वाटे. घरी रागावणारं आपलं असं कोणी नव्हतंच. कोकणातील एका छोट्या गावात त्याचं घर होतं.. डोक्यावर छत होतं.. पण स्वयंपाक रांधायला कोणी नव्हतं. घरातील साफसफाई करायचा.. गावात ज्याला मदत लागेल तशी कामंही करुन द्यायचा. जिथे कमी तिथे श्रीधर. गावातील माणसंही प्रेमळ होती. पण कोणी जास्त श्रीमंत तर कोणी खुप गरीब.

साठेकाकू म्हणजे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या सुविद्य पत्नी होत्या.

भिक्षा मागून जगणाऱ्या श्रीधर बद्दल अपार माया दाटून येई त्यांच्या मनात. घरात आर्थिक सुबत्ता होती. मुलंही शहरातील चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कशाचीच कमी नव्हती. माहेरी गरीबी होती. तरीही त्या काळात काकूंनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. पण त्याकाळी पुरुषी अहंकारापुढे स्त्रियांना नतमस्तक व्हावे लागे. ‘काय कमी आहे आपल्याला? सगळं काही तर आहे.. ‘ असे म्हणून घरातील चार भिंतींमध्ये कोंडले गेलेले जीवन होते साठे काकूंचे.. घरातील कामं आवरली की पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचण्यात वेळ घालवायच्या. पण पुढे शिकण्याची मनातील सुप्त इच्छा कधी कधी उफाळून यायची..

एक दिवस श्रीधर दारात आला. भिक्षांदेही म्हणत.. घरातील भाजी पोळी देण्यासाठी दरवाजा उघडला.. मग विचारपूस केल्यावर समजलं की त्यालाही शिकण्याची प्रचंड आवड आहे. खूप छान वाटले काकूंना. पण तरीही त्यांनी दटावले.. “हे बघ बाळा, तुला जर मोठा साहेब व्हायचे असेल तर कष्ट करावे लागतील.. आजपासून तुला मी भिक्षेऐवजी पुस्तकं वाचायला देईल.. तुझी पोटाची भुक तर भागेल पण बुद्धीच्या भुकेचे काय?” दरवेळी काकूंकडून नवनवीन पुस्तके वाचायला मिळू लागली, कधी शाळेची फी तर कधी वह्या-पुस्तके तर कधी गणवेषही!!

श्रीधर अनाथ असला तरी मेहनती होता. अभ्यासात हुशार होता. पण पोटात काही नसले की काही सुचायचे नाही त्याला. सहावी सातवीपर्यंत भिक्षा मागून त्याचे पोट भरत असे.. तो गावातील सर्व काकूंचा खरंच ऋणी होता.. पण साठे काकूंकडून मिळालेली पुस्तकरुपी भिक्षा त्याला आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.. दहावीला श्रीधर तालुक्यातून पहिला आला.. हा आनंद कोणाला सांगावा, असं त्याचं आपलं कोण होतं त्याला !! 

साठे काकूंना बाहेरुनच आवाज दिला.. ”काकू’.. आज मला भिक्षा नको.. फक्त तुमचे आशीर्वाद हवेत.. “

काकूंनी आतून आवाज दिला.. “श्रीधर बाळ” क्षीण आवाज आला आतून.. श्रीधर आत गेल्यावर त्यानं काकूंना तापाने फणफणलेलं पाहिलं.. पटकन मीठ-पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेऊ लागला.. एक तासानं काकूंना थोडंफार बरं वाटू लागलं.. आताशा त्याला स्वयंपाकही छान करता येऊ लागला होता. काकूंना त्यानं कणकेची पेज बनवून खाऊ घातली.

तेवढ्यात साठे काका आले..

अतिशय अहंकारी माणूस. श्रीधर सारखा गरीब मुलगा, तोही घरात बघून खूपच संतापले व त्याला घराबाहेर होण्यास सांगितले.. श्रीमंत गरीबांमधली दरी कधी मिटणार होती कुणास ठाऊक. असो..

श्रीधरचं पुढील शिक्षण स्कॉलरशिपवर पुर्ण झालं. म्हणतात नं लोखंडाचे सोने व्हायला परीसस्पर्शाची गरज असते.. तसेच काही तरी साठे काकूंनी झालेलं होतं.

श्रीधरनं महाविद्यालयात शिकतांना एका दुकानात नोकरी धरली.. ‘कमवा व शिका’ ह्या प्रेरणेतून तो द्विपदवीधर झाला. तिथेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. यु. पी. एस. सी. ही पास झाला. लवकरच याच जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला.

सुखाचे दिवस आले. पण गावातील ते जुने दिवस तो कधीच विसरू शकत नव्हता. जीवनाच्या ज्या वळणावर तो येऊन ठेपला होता ते वळण अतिशय सुंदर होते. अनेक हालअपेष्टा, अवहेलना, कष्ट.. वेळी खाण्यास काहीच न मिळाल्याने पाणी पिऊन झोपणे सर्व काही आठवून त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.. साठे काकूंची ती भिक्षा खुप महत्वाची ठरली त्याला आत्मनिर्भर होण्यासाठी !!

आज त्याची पावलं आपल्या गावाकडे वळली.. गावातलं घर तसंच उभं होतं त्याची वाट पहात. घरातील धूळ झटकली.. घर डोळे भरुन पाहून घेतलं.. गावात फेरफटका मारताना साठे काकूंना आवर्जून भेटला.. त्याच्या आयुष्याच्या महासागरातील दिपस्तंभ होत्या त्या. काळ पुढे सरकला होता.. पण त्या तिथेच होत्या, स्थितप्रज्ञं..

साठे काकांना जाऊन दोन वर्षे लोटली होती.. काकू एकट्याच रहात होत्या. दोन्ही मुलं अधुनमधून यायची.. पण बाकी अशा एकट्याच रहायच्या तिथे त्या.. श्रीधरनं वाड्याच्या दरवाजाची कडी वाजवली. थोड्या वेळाने दरवाजा उघडला..

काकूंनी प्रथम ओळखलंच नाही.. उंच, रुबाबदार, सुटबुटातला साहेब माणूस.. काकूंसमोर नतमस्तक झाला. श्रीधर काकूंच्या पदस्पर्शाने कृतकृत्य झाला. काकूंचे थकलेले हात डोक्यावरुन फिरले आणि श्रीधरच्या डोळ्यातील अश्रुंना वाट मिळाली, “काकू आज मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जायला आलोय. तुम्ही नाही म्हणणार नाहीत ही आशा आहे. ” 

“नाही रे बाळा, मी ह्या वाड्यातच ठिक आहे.. आपली स्वप्नपुर्ती इथेच तर झाली. सवयीचं आहे हे घर.. “

“पण आता मला तुमच्या मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे. तुम्ही केलेल्या भिक्षारुपी मदतीची परतफेड करायची आहे. “

खुप आग्रहानंतर साठे काकू शहराकडे निघाल्या.. ‘तिथे शहरातही तुम्ही आजुबाजुच्या झोपडपट्टीतील मुलांना असंच मार्गदर्शन करणार आहात.. ‘ असं श्रीधरनं म्हणताच काकूंना कोण आनंद झाला, माहिती आहे.. ? त्यांची पावलं आपोआपच शहराकडे वळाली..

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरचं… बाहेरचं… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

? जीवनरंग ?

☆ घरचं… बाहेरचं… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

परगावी शिकत असलेली लेक घरी आली म्हणून कौतुकानं इडली सांबाराचा बेत केला.

“काय गं आई.. तू घरी कशासाठी करतेस हे पदार्थ ? म्हणजे इडली छान असते तुझी.. पण सांबार… ते आमटीचं मावस नाहीतर चुलत भावंड होतं गं तुझं.. सांबार हॉटेलातलच खरं.. ऑथेंटिक.. आपण नं… इडली हॉटेलातच खात जाऊ किंवा हॉटेलमधून मागवत जाऊ.. ” माझा चेहरा इवलुसा झाला..

पन्नासएक वर्षांपूर्वी आमच्या मिरजेतील ‘श्रीकृष्ण भुवन’ सारख्या उडपी हॉटेलात मिळणारं इडली-चटणी-सांबार आम्हाला स्वर्गीय वाटायचं.. वर्षातून एखादे वेळीच खायला मिळणारा हा पदार्थ अमृतासमान भासायचा.. लेकरांना फार आवडते म्हणून आमची माऊली बिचारी पाट्या-वरवंट्यावर वाटून इडली करायची.. सांबार मसाला ही कल्पनाही तेंव्हा नव्हती. वाटलेलं जिरं-खोबरं घालून ती सांबार करायची.. आणि कृतार्थतेनं आम्हाला रविवारचा पूर्ण दिवस आणि सोमवारचा अर्धा दिवस खाऊ घालायची.. चमचा आणि इडली यांची झटापट करत आम्ही कसेबसे इडलीचे तुकडे तोडायचो.. नि केवळ आकाराशी इमान राखणाऱ्या त्या इडलीला आपलसं करायचो.. नंतर मिक्सर आला तरी परिस्थिती फारशी बदलली नाही..

एखादं माहेर, मेनकासारखं मासिक आणि रुचिरासारखं पुस्तक सोडलं तर नूतन पाकशास्त्राचा कोणताही गुरू नसण्याच्या त्या काळात नवीन पदार्थ असा कितीसा बरा होणार? पावभाजी, पंजाबी डिशेस यांसारखे नवनवीन पदार्थ अवतरत होते आणि “आई” नावाची जमात त्याचे प्रयोग नवरा आणि मुले या सहनशील प्राण्यांवर करत होती..

तव्यापासून विभक्त व्हायची इच्छा नसलेला तुकडा तुकडा गॅंग डोसा, लाल तवंगाच्या झणझणीत मिसळीच्या नावालाही लाज आणणारी मंद पिवळ्या रंगातील चिंच-गुळ हा चवीची परमावधी असणारा मसाला घालून केलेली… खरंतर मटकीची उसळ असणारी तथाकथित मिसळ, मुलांच्या पोटात जास्तीतजास्त भाज्या जाव्यात हा एकमेव उद्देश ठेऊन बीट, दुधी, गाजर.. एवढे अपुरे म्हणून की काय पण गवार, घेवडा वगैरे समस्त भाज्यांची मांदियाळी घालून केलेला पावभाजी नामक पदार्थ… अशी किती नावे घ्यावीत.. ?

हे कमी होते म्हणून की काय.. पंजाबी डिशेसनी खाद्य रंगमंचावर प्रवेश केला.. पंजाबी भाजी बनवण्यापूर्वी… एवढं तूप, पनीर हृदयाला चांगलं नाही, कांदा-टोमॅटोच्या भाऊगर्दीत भाज्यांची चव काय लागणार.. असा संशयकल्लोळ पदराला खोचून केलेलं बटरपनीर, पालकपनीर पंजाबपेक्षा महाराष्ट्राकडचंच वाटायचं..

आईची एखादी मैत्रीण पुण्या-मुंबईहून यायची नि आईला रव्याचा केक, आईस्क्रीम, मॅंगोला असले शहरी फॅन्सी पदार्थ शिकवून जायची.. पुढचे काही दिवस केक नामक रव्याचा टुटीफ्रुटी घातलेला शिरा, चमच्याला शिरकाव करू न देणारी बर्फ नि दूध यांची आईस्क्रीमनामक जोडगोळी.. जर्द पिवळ्या आकर्षक रंगाचं मॅंगोला नावाचं एकाच वेळी मिट्ट गोड, आंबट नि कडु अशा चवींचं (अ)पेय… अशा पदार्थांची स्वयंपाकघर नावाच्या स्थळी प्रयोगशाळा उघडली जायची…

हे पदार्थ बनवतानाचा आईचा सळसळता उत्साह.. पोरांना नवनवे पदार्थ खिलवायची उमेद… आणि मोठ्यांना उलटून बोलणे हे महापातक असण्याचा तो काळ पाहता, पदार्थ कसाही झालेला असला तरी आम्हा पोरांची त्याविषयी बोलण्याची प्राज्ञा नसे.. !! आम्ही बापुडे तो पदार्थ चेहऱ्यावर हसरे भाव ठेऊन जिभेला बायपास करून डायरेक्ट पोटात ढकलत असू..

” हे काय करून ठेवलय.. ? ” या वडिलांच्या तिरसट प्रश्नामुळे आईच्या दुखावलेल्या अंत:करणावर आमचे हसरे चेहरे औषध ठरत… !!

प्रत्येक पदार्थात कमी तेल-तूप, बेताचं तिखट नि मसाले, सोड्याचा कमीत कमी वापर, भाज्यांचा नि कडधान्यांचा वर्षाव करून पदार्थाला कमीत कमी चमचमीत नि जास्तीत जास्त पौष्टिक बनवणारी आमची आई त्या काळात आम्हाला खाद्यजीवनातील खलनायिका वाटत असे..

आम्ही मुले मोठी झालो.. आम्हाला फुटलेली शिंगे आम्हाला नाही तरी आईला दिसू लागली..

“अगं तू कशाला त्रास घेतेस.. आम्ही बाहेरच खाऊ.. ” असे मधात घोळवलेले शब्द आईच्या तोंडावर फेकून आम्ही हॉटेलिंगचा आनंद लुटू लागलो.. हॉटेलच्या चमचमीत आणि झणझणीत पदार्थांनी आईच्या सात्त्विक पदार्थांवर सरशी मारली…

आईने वरणभात, पोळीभाजी, पुरणपोळ्या, गुळपोळ्या… फारतर दडपेपोहे, भजी, थालीपीठ, धिरडी, अळुच्या वड्या, सुरळीच्या वड्या, मसालेभात.. असले पदार्थ करावेत..

या मतावर आम्ही ठाम झालो..

“*** हॉटेलात कसली मस्त पावभाजी असते.. एकदा खाऊन बघ.. ” म्हणत पित्ताचा त्रास असणाऱ्या आईला हॉटेलात नेऊन पावभाजी खाऊ घालण्याचा बेमुर्वतपणाही केला..

नि तिखट भाजी सहन न झालेल्या आईला पावाला पाव लावून खाताना पाहून निर्लज्जपणे तिची टिंगल केली.. आज तिच्या वयाला पोहोचल्यावर ते आठवतं, डोळे आपोआप वाहू लागतात.. नि स्वत:ची लाज वाटते.. !!

माझं लग्न ठरलं.. प्रत्येक नववधुप्रमाणे अनेक स्वप्नं उराशी बाळगून सासरी पाऊल टाकलं.. “हृदयाकडचा मार्ग पोटातून जातो.. ” असल्या वाक्यांनी प्रभावित व्हायचं ते वय होतं.. भरपूर मसाले, तिखट, तेल यांची सोबत घेऊन हॉटेलच्या पदार्थांची बरोबरी करण्याचा मी आणि माझ्या समवयीन जावेनं लावलेला सपाटा.. आमच्या नवऱ्यांनी नि सासुसासऱ्यांनी कौतुक करत बिनबोभाट झेलला… !!

ती माणसेच सज्जन.. !!! कधीकधी दोघे भाऊ.. मित्रांचं निमित्त काढून बाहेरच जेवून येत.. हा भाग वेगळा… !!

“रविवारी संध्याकाळी स्वयंपाकघराला सुट्टी” अशी सकृतदर्शनी आम्हा जावा-जावांना खुशावणारी घोषणा सासऱ्यांनी केली… त्यात आमच्या पदार्थांच्या धास्तीचा वाटा किती नि आमच्या काळजीचा हिस्सा किती… हा संशोधनाचा विषय… !!

यथावकाश पोटी कन्यारत्न जन्मलं… हे रत्न त्याच कुटुंबाचा अंश असलं तरी त्यांच्याइतकं सहनशील आजिबात नव्हतं नि नाही… आठ महिन्याच्या लेकरासाठी पुस्तके वाचून केलेल्या खिमट, लापशी, सूप्स, भाज्या घालून केलेला गुरगुट्या भात, उकड अशा बेचव पदार्थांना पहिल्या चमच्याला ” फुर्र.. फुर्र… ” करून एखाद्या निष्णात फलंदाजाला लाजवेल एवढ्या लांबवर तो पदार्थ तोंडातून उडवून.. नि मामीने केलेल्या चमचमीत इडली-सांबाराला मिटक्या मारून… तिने तिचे पाळण्यातले पाय दाखवले..

माझी पोर मोठी होत होती… त्याचबरोबर माझ्यातली आईही जोमाने वाढत होती.. एक म्हण आहे, “लेकराला खाण्यापेक्षा माऊलीला खायला घालण्याची इच्छा जास्त प्रबळ असते.. ” त्यानुसार मराठी, दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज, इटालियन, कॉंटिनेंटल, चाट.. , केक्स, आईस्क्रीम्स, कोल्ड-ड्रिंक्स.. कसले कसले पदार्थ पुस्तकात वाचून, यु-ट्युबवर पाहून करायला सुरुवात केली..

कोविडच्या काळात तर विचारूच नका.. !! मऊ झालेल्या चिकट नूडल्स, लसणाचा व मिरचीचा कमीत कमी वापर केल्याने बेचव झालेलं मांचुरियन, केवळ घरी करायच्या अट्टाहासापोटी जन्माला घातलेला कसातरी पिझ्झा…. जाऊदे… नावं तरी किती घ्यायची? यांचा एक घास घेऊन जेवणाला रामराम ठोकणारी माझी लेक पाहिली की माझ्यातलं मातृत्त्व चारी मुंड्या चीत होतं… !!

“आई, हे पदार्थ घरी नाही चांगले होत.. हॉटेलातलेच चांगले लागतात गं..

तू घरी कशाला व्याप करतेस? तू आपले मराठी पदार्थ.. फारतर डोसे, पराठे घरी करत जा… पावभाजी, पंजाबी, कॉंटिनेंटल, इटालियन आपण कधीतरीच खाऊ.. पण हॉटेलमधेच खाऊ.. उगीच हे पदार्थ घरी करून दुधाची तहान ताकावर कशाला भागवायची?” असं ती जेंव्हा कोणताही संदेह न ठेवता स्पष्टपणे सांगते तेंव्हा परीक्षेत नापास झाल्यासारखं वाटतं…

माझं कुठे चुकत असेल? मी एवढ्या मायेनं नि निगुतीनं पदार्थ करते.. अगदी हॉटेलसारखा करायचा प्रयत्न करते.. तरीही तो हॉटेलसारखा होतच नाही आणि हिला आवडत नाही..

कुठे चुकत असेल माझं? विचार केला.. केला.. नि लक्षात आलं… पदार्थ करताना माझ्यातली आई, बायको, जीवशास्त्राची विद्यार्थिनी सतत आड येते. तेल-तूप, लोणी, पनीर, चीज घालताना हृदय नि रक्तवाहिन्यांचं जाळं डोळ्यासमोर दिसू लागतं. साखरेचा डबा कॅलरीचा हिशोब नि मधुमेहाचं दर्शन घडवतो.. तिखट, मिरच्या, मसाले.. पोटात खड्डे पाडतात.. त्यांच्या दर्शनानंच पोटात जाळ पेटल्याचा भास होतो.. अजिनोमोटो, खाद्यरंग वगैरे कधीही शरीरात कॅन्सरला जन्माला घालतील.. हे सतत वाटत राहतं.. रेसिपीत दिलेल्या प्रमाणात तेल, तूप. तिखट, मसाले टाकायला हात धजत नाही… सगळं अगदी कमी कमी वापरलं जातं.. मग पावभाजी मिळमिळीत होते, नूडल्स चिकट होतात, पिझ्झा बेचव होतो, सांबार आमटीचा मामेभाऊ होतं, पंजाबी भाज्या पंजाबी रहातच नाहीत.. मिसळ नेभळट होते… साजुक तूप घालून केक केक न राहता मिठाईचा भाऊबंद होतो.. नि खिशालाही झेपत नाही… आईस्क्रीमचं तर न बोललेलंच बरं…

पैसा हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन रसनेला लालूच दाखवत नि शरीराला डावलत बनवलेल्या मसालेदार, चमचमीत, चविष्ट, रंगीत अशा हॉटेलच्या पदार्थांसमोर… आपल्या जीवाभावाच्या माणसांचं पोषण आरोग्य, दीर्घायुष्य हेच उद्दीष्ट असणाऱ्या गृहिणीचे, आईचे….. चवीत, चमचमीतपणात मार खाणारे पदार्थ कसे जिंकतील?

आता मी ठरवलंय… फक्त. आपले साधे सरळ मराठी पदार्थ घरी करायचे.. नि पावभाजी, मिसळ, इटालियन, मेक्सिकन, चायनीज, कॉंटिनेन्टल पदार्थांसाठी सरळ हॉटेल गाठायचं… !! उगीच आपल्या हौसेची शिक्षा घरच्यांना कशाला.. ? आपणही खूश… आपली पोरंही खूश.. आणि हॉटेलवालेही खूश. नाहीतरी सरकारनं परवाच्या अर्थसंकल्पात आपल्याला एवढी सूट कशासाठी दिलीय? पैसा बाजारात फिरावा म्हणूनच नां?

एखादा पदार्थ कधीतरीच खावा… पण तो जिभेला, चवीला न्याय देऊन खावा.. केवळ टिकमार्कपुरता नको.. त्यावेळी कॅलरीज, पोट, हृदय… सगळं बाजूला ठेवावं.. नि जिव्हालौल्य मनमुराद उपभोगावं.. !!

आता तुम्ही म्हणाल ‘ आमची मुलं नाहीत हो अशी… आणि मीही नाही तशी.. मी अगदी चविष्ट बनवते आणि माझ्या मुलांना ते फार आवडतं बरं का… !! माझ्या स्वयंपाकाचं फार कौतुक होतं घरात.. ‘ 

तसं असेल तर चांगलंच आहे.. पण मग मला एकच सांगा.. हॉटेलं भरून का वाहतात ?

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘दैव‌ देतं आणि कर्म नेतं…’ – भाग- २ –  (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक– अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘दैव‌ देतं आणि कर्म नेतं…’ – भाग- २ –  (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक– अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(गुंतवणूकदार कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावू लागले, पण या घटनेला जबाबदार लोक तोंड लपवून बसले. शेवटी वैतागून मनीषने सर्व काही विकले आणि कर्जदारांचे पैसे फेडले. तरी अजूनही काही देणे बाकी होतेच.) – इथून पुढे

मनीष सर्वकाही हाताळण्याचा प्रयत्न करत होता. त्याला सर्वकाही परत सुरळीत करायचे होते. पण त्याला कल्पना नव्हती की त्याची पत्नी या परिस्थितीत त्याला सोडून निघून जाण्याच्या विचारात आहे.

या भाड्याच्या घरात राहायला आल्यापासून परिस्थिती आणखी बिकट झाली होती. मीनलला नोकरांची सवय झाली होती, त्यामुळे घरातील कामे ती करत नव्हती. आई तिला सर्व काही मदत करण्याचा प्रयत्न करत असे, पण ती छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करायची. लव्हलीला सांभाळतही नव्हती. आता तर असे दिवस आले की ती मनीषशीही भांडायला लागली. ती म्हणायची की “अशा भिकार परिस्थितीत मला अजून किती काळ जगावे लागेल. मी घरातील कामे करू शकत नाही. किमान एक तरी नोकर लव्हली ला सांभाळण्यासाठी ठेवा. मी हे सर्व कसे हाताळू? मी यापूर्वी मुलं सांभाळलेली नाहीत.”

“अगं तू असं कसं बोलतेस? मीनल, आई लव्हली वर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करते, आणि लव्हली तुझी मुलगी आहे. तू तीला सांभाळू शकत नाहीस म्हणजे काय?”

“आता हेच माझे आयुष्य असणार आहे का? तू मला पैशांची सवय लावली व तुझ्यावर अवलंबीत बनवले आहेस. तुमची श्रीमंती पाहूनच माझ्या माहेरच्यांनी माझे येथे लग्न लावले ना?”

तिचे बोलणे ऐकून मनीष स्तब्ध झाला. “तू ज्या घरातून या घरात आलीस, त्या घरात काहीच सोयीसुविधा नव्हत्या. आता जर आपले चांगले दिवस नसतील तर वाईट दिवसही जास्त दिवस रहाणार नाहीत. कृपया मला थोडा वेळ दे. मी ऑफिसमधून त्रासून घरी येतो. आणि तू पुन्हा कटकट सुरू करतेस. “

मीनल तिच्या खोलीत जाऊन बसायची. जेवण सुद्धा वाढत नव्हती, ना इतर काही काम करायची. फक्त आईच लव्हलीला प्रेमाने खायला घालायची आणि झोपवायची.

पण आज मीनल एवढं मोठं पाऊल उचलेल, हे त्याला अपेक्षित नव्हतं. आज ती मनीषच्या घराचा उंबरठा ओलांडून कायमची निघून गेली होती.

मनीषने धाडस करून तिच्या आईला फोन केला तेव्हा त्याला कळलं की ती तिथेही गेलेली नव्हती. तिच्या काही मित्रांना विचारलं, तेव्हा त्याला कळालं की तरुण नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यासोबत ती गेली आहे. हे ऐकलं तर मनीषच्या पायाखालची जमीनच सरकली.

मुलीच्या अशा कृतीने तिच्या आईलाही धक्का बसला. मीनलच्या अशा वागण्याची त्यांना अपेक्षा नव्हती. तिच्या मुलीच्या डोळ्यांवर पैशांचा असा काय पडदा पडला होता की ती कुटुंबाला कुटुंब मानत नव्हती. अगदी एक वर्षाच्या मुलीलाही सोडून निघून गेली.

पण आयुष्य कुणासाठीही थांबून रहात नाही. इकडे आईने लव्हली आणि घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. मनीषने सर्वकाही परत मिळवण्याचा जोमाने प्रयत्न करायला सुरुवात केली. आता त्याचा फक्त एकच उद्देश होता की त्याला भरपूर पैसे कमवायचे आहेत. शेवटी त्याच्या कष्टांना फळ मिळाले. दोन महिन्यांनंतर मनीषने कारखान्याच्या विम्याची केस जिंकली आणि विम्याचे पैसे मंजूर झाले.

क्लेममधून आलेल्या पैशातून सर्वात आधी कर्ज फेडले. उरलेल्या पैशातून एक घर खरेदी केले आणि तिथे रहायला गेले. उरलेल्या पैशातून नवीन व्यवसाय सुरू केला. व्यवसायाचे चांगले ज्ञान आणि बाजारपेठेतील त्याची पत यामुळे मनीषचा हा व्यवसाय ही चांगला चालला. आपल्या व्यवसायात हळूहळू तो प्रगती करत होता आणि एके दिवशी अचानक मीनल परत आली.

तिला अचानक आलेलं पाहून मनीषला आश्चर्य वाटले. आता सहा महिन्यांनी परत येण्याला काय अर्थ होता? मीनलला आता त्याच्या आयुष्यात पुन्हा तिचे स्थान हवे होते आणि ती त्याची माफी मागत होती. पण मनीषने तिचा स्विकार करण्यास ठामपणे नकार दिला.

 मीनलने तिच्या आई वडिलांना मनीषच्या घरी बोलावले. ती लोकं घरी आली, पण त्यांनी मनीषचीच बाजू घेतली.

“पण आता मी कुठे जाऊ? माझ्याकडे काहीही नाही. तरुणनेही मला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. आणि मी लव्हलीची आई आहे. तिच्यावर माझा अधिकार आहे”

मीनल अचानक लव्हलीवर बोलली आणि तिला उचलून घेतले. पण लव्हली मीनलपासून सुटका करण्यासाठी धडपडू लागली. दीड वर्षांची मुलगी तिला ओळख देत नव्हती व स्वतःला सोडवता न आल्याने ती जोरजोरात रडू लागली.

मनीष तिरस्काराने म्हणाला, “तू आणि लव्हलीची आई ? माफ कर, तुला मुलांना कसं सांभाळायचं तेही माहित नाही. बघ ती लहान मुलगीही तुझ्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत आहे. तु कधी तिला प्रेमाने जवळ तरी घेतले होते का? तु ज्या मार्गाने आलीस त्याच मार्गाने चालती हो. आता या घराशी तुझा काहीही संबंध नाही. आणि आमच्या आयुष्यात तुला कुठलीही जागा नाही. “

मीनलने मोठ्या आशेने तिच्या आईवडिलांकडे पाहिले. पण यावेळी तिचे बाबा म्हणाले, “आमच्याकडून काहीही अपेक्षा धरू नकोस. तु आधीच हा विचार करायला हवा होतास. तुला कुणी फसवावं एवढी काही लहान मुलगी नव्हती तू. तू एका मुलीची आई होतीस. अगं, कुटुंबाला, तुझ्या बाळाला तू कसे सोडून जाऊ शकतेस, हा साधा विचार करूनही तुझ्या हृदयाला पाझर फुटला नाही ?”

शेवटी, जेव्हा कोणीही तीची बाजू घेतली नाही, तेव्हा मीनलला तिथून गुपचूप निघून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. काही दिवसांनी तिचा आणि मनीषचा घटस्फोट झाला. मीनल, आता एक छोटीशी नोकरी करून कशीतरी जगते, तोच मनीष आता त्याच्या आई आणि मुलीसोबत आनंदी जीवन जगत आहे.

– समाप्त –  

मूळ इंग्रजी कथालेखक : अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘दैव‌ देतं आणि कर्म नेतं…’ – भाग- १ –  (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक– अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘दैव‌ देतं आणि कर्म नेतं…’ – भाग- १ –  (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक– अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

मनीष ऑफिसमधून थकून भागून घरी आला तेव्हा त्याची एक वर्षाची मुलगी लवली बाहेर पोर्चमध्ये खेळतांना दिसली. घरात अजूनही अंधार होता. त्याला वाटले की कदाचित वीज गेली असेल, पण शेजारी तर दिवे चालू होते. मग आई, पत्नी मीनल घरात असताना अजून कोणी घराचे दिवे कसे लावले नाहीत याचे त्याला आश्चर्य वाटले.

त्याने मुख्य दरवाजा उघडला आणि पोर्चमध्ये आला. त्याची ब्रिफकेस बाजूला ठेवली आणि हातरुमालाने लव्हलीचं नाक साफ केलं. त्याच्या मनात विचार येऊ लागला की एक वर्षाची मुलगी पोर्चमध्ये एकटी काय करत असेल? आई तर यावेळी तिच्यासोबतच असते.

त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि तो लव्हलीला उचलून घेत घरात आला. त्याने आधी बाहेरील खोलीचे दिवे लावले. समोरचे दृश्य पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण खोली अस्ताव्यस्त होती. बिस्किटं इकडे तिकडे पडली होती आणि आई सोफ्याशेजारी जमिनीवर बेशुद्ध पडली होती. आईला अशा अवस्थेत पाहून त्याने मीनलला मोठ्याने आवाज दिला, “मीनल, मीनल, तू कुठे आहेस? लवकर ये, बघ आईला काहीतरी झालंय. “

पण मीनलकडून काहीच उत्तर आलं नाही. शेवटी त्याने लव्हलीला खाली ठेवून आईला उचलून सोफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. तो धावत स्वयंपाकघरात गेला आणि एका ग्लासात पाणी घेऊन आला. त्याने आईच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडलं.

तेव्हा आई थोडंफार शुद्धीवर आली. त्याने आईला पाणी प्यायला दिले.

आईला थोडे बरे वाटल्यावर मनीष म्हणाला, “काय झालं आई, मीनल कुठे आहे? ती शेजारी गेली आहे का? की मंदिरात गेली आहे? आणि तु घरातील दिवे का लावले नाही ? लव्हली बाहेर एकटीच का खेळत होती?” मनीष लागोपाठ प्रश्न विचारत होता.

अचानक आई रडू लागली. आईला रडताना पाहून मनीषच्या मनात धस्स झाले. “काय झालं आई, नीट सांग. तू का रडत आहेस?”

आई रडत म्हणाली, “ती सून……”

“मीनलला काय झालं?” मनिष अस्वस्थ होत बोलला.

“सुन घर….घराबाहेर पडली. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबली नाही. मला म्हणाली की मला तुमच्यासोबत राहायचे नाही. इथे माझे भविष्य नाही. मी तिच्या पाया पडले बेटा, पण तिने मला दूर ढकलले. मग काय झालं माहित नाही? डोळ्यांसमोर अंधार पसरला. आणि आता तू आल्यावर मला शुद्ध आली आहे. “

मनीष हताश होत धप्पकन जमिनीवर बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, “तीला माझी नसेलही, पण लाडक्या मुलीचीही पर्वा नाही. एक आई तिच्या मुलीला असं सोडून कशी जाऊ शकते?”

त्याच्या आईचे मन तिच्या मुलाला अशा प्रकारे हताश झालेले पाहून खूप हादरले. डोळे पुसत तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली,

“ती म्हणाली की तीला लव्हलीची कोणतीही जबाबदारी नको आहे. तीला आयुष्य मुक्तपणे जगायचे आहे. ती तुझी नात आहे, तूच तिची काळजी घ्यावी. माझा याच्याशी काहीही संबंध नाही’. ” बोलता बोलता आई पुन्हा रडू लागली.

आई आणि मुलगा दोघेही एकमेकांचे अश्रू पुसू लागले. ते दोघेही का रडत आहेत, हे छोट्याशा लव्हलीला समजत नव्हते. दोघांना रडताना पाहून तीही रडू लागली.

तीन वर्षांपूर्वी मनीष आणि मीनल यांचे लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. त्याचा व्यवसाय चांगला चालला होता. मनीष आणि त्याचे वडील व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे हाताळत होते. पैसेही भरपूर येत होते. कशाचीही ददात नव्हती. मनीषचे आई आणि वडील एवढे ऐश्वर्य असूनही जमिनीवर होते. ते खूप साधे जीवन जगत होते.

मीनल एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. त्याच्या काकूने मध्यस्थी करीत मीनलचे लग्न मनीषशी लावले होते. घरी नोकरचाकर काम करायचे त्यामुळे मीनल ला घरी फारसे काम नव्हते म्हणून आईंनी तिला तिचे शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले.

मीनलने अभ्यास तर सुरू केला, पण तिला शिक्षणाची विशेष आवडत नव्हती. घरी एवढं सगळं चांगलं असतांना अजून शिकून, अभ्यास करून काय करायचं? तिला कुठं नोकरी करायची आहे असं तिला वाटायचं. म्हणूनच ती कॉलेजच्या नावाखाली घरातून बाहेर पडायची, पण कधी कॅन्टीनमध्ये, कधी चित्रपट पाहण्यासाठी, कधी नवीन नवीन मित्रांसोबत शाॅपिंगसाठी जात असे.

मीनल ला उधळपट्टीची सवयच लागली होती. दररोज ती मनीषकडे पैसे मागायची. पैशांची कमतरता नाही म्हणून मनीष ही तिला काहीच विचारत नसे.

आई मनीषला म्हणायची, “बेटा, ज्या व्यक्तीने इतके पैसे कधी पाहिले नाहीत, ती ते नीट वापरू शकणार नाही. माणसाने नेहमी हात सांभाळून खर्च करावा. ती पैसे मागते आणि तू ते देतोस. ती पैसे कुठे खर्च करते हे देखील विचारत नाहीस. “

मनीष हसण्यावारी नेत म्हणायचा, “आई, ती बाहेर जाते. म्हणून तीलाही हातखर्चाला पैसा हवा असतो. “

“बेटा हातखर्च आणि निरुपयोगी खर्च यात फरक आहे. हे काय तुला समजत नाही. “

आईचे बोलणे ऐकून मनीष हसला.

“आई, मी त्यासाठीच तर कमावतोय. इतके कमावल्यानंतरही, जर बायको पैशामुळे नाराज होत असेल, तर माझ्या कमावण्याचा काय उपयोग? त्यात ती कॉलेजला जाते, तिच्या मैत्रीणींसोबत थोडीफार मजा करते. “

आई हिरमुसली झाली व मुलासमोर काहीही बोलू शकली नाही.

गेल्या वर्षी जेव्हा लव्हलीचा जन्म झाला, तेव्हा घरात ती मोठी आनंददायी घटना होती. पण दहा महिन्यांपूर्वी कारखान्याला आग लागली, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. अजूनही विम्याची रक्कम मिळाली नाही कारण कोणीतरी खोटी अफवा पसरवली की कारखान्याला जाणूनबुजून आग लावण्यात आली होती. म्हणून तेव्हापासून चौकशीच सुरू आहे.

दरम्यान, मनीषच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. गुंतवणूकदार कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावू लागले, पण या घटनेला जबाबदार लोक तोंड लपवून बसले. शेवटी वैतागून मनीषने सर्व काही विकले आणि कर्जदारांचे पैसे फेडले. तरी अजूनही काही देणे बाकी होतेच.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी कथालेखक : अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माहेर… भाग-२ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ माहेर… भाग-२ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – स्वातीला किती तरी काळानंतर अशा जिवंत वातावरणाचा अनुभव येत होता. कुणी तरी अगदी जवळचं, आत्मीय भेटावं, तसा तिला आनंद झाला होता. वस्तू घेणार्‍या ग्राहकांच्या डोळ्यात दिसणारी आशा, उमंग, लाचारी यासारखे भाव तिला स्वत:चेच वाटले. किती तरी वर्षांपूर्वी ती हेच भाव घेऊन, या बाजारात नेहमीच येत होती. आता इथून पुढे)

दोघेही एका कपड्यांच्या हातगाडीपासून काही अंतरावर उभे होते. एक बाई तिथे आपल्या एका मुलाला घेऊन कपडे घ्यायला आली होती. तिने ठेलेवाल्याकडून मुलाच्या मापाची शर्ट-चड्डीची एक जोडी खरेदी केली आणि मुलाला घातली. त्याला ती अगदी बरोबर बसत होती. मुलगा नवीन कपडे पाहून खुश झाला. आता केवळ पैसे देणं बाकी होतं. ती भावाबद्दल विक्रेत्याशी घासाघीस करू लागली.

‘‘मेहुल, तुला आठवतं, अंशचा पहिला वाढदिवस होता. त्यावेळी त्याच्यासाठी कपडे घ्यायला आपण याच बाजारात आलो होतो. ‘ स्वातीने प्रेमळ नजरेने त्या मुलाकडे बघत म्हंटले.

‘हो. त्यावेळी आपला नाईलाज होता. कमाई कमी होती नं!’

‘कमाई कमी होती, पण जीवन छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी झळकत होतं.

मी पण व्यापार्‍यांशी या बाईप्रमाणेच घासाघीस करायची आणि त्याने किंमत कमी केली, की खूप खुश व्हायची. ’

आज मात्र ती बाई आणि तो मुलगा यांच्या नशिबात खुशी नसावी. खूप घासाघीस केल्यानंतरही त्या व्यापार्‍याने जो भाव सांगितला, तेवढे पैसे बाईकडे नव्हते.

तिच्याकडे वीस रुपये कमी होते. वीस रुपये कमी घेऊन कपडे देण्यासाठी ती गयावयाकरत होती. पण व्यापार्‍याने त्यासाठी आपली असमर्थता दर्शवली. तो म्हणाला, ‘ताई, यापेक्षा एक रुपयादेखाल कमी होऊ शकत नाही. माझेदेखील घर आहे. परिवार आहे. तिकडेही मला लक्ष द्यायला हवं!’

त्या बाईकडे शेवटी एकच उपाय उरला. त्या मुलाच्या अंगावरचे कपडे काढून व्यापार्‍याला परत करणं. ती जेव्हा तसं करू लागली, तेव्हा तो मुलगा मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. बघता बघता त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो म्हणू लागला, ‘तू मला नवे कपडे घेऊन देण्यासाठी आणलस, तर का घेऊन देत नाहीयेस?’ तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, बेटा, हे कपडे चांगले नाहीयेत.

आपण तुला दुसरे चांगले कपडे आणू!’ पण मुलाला काही ते म्हणणं पटलं नाही. त्याचं झगडणं चालूच होतं. बालहट्टामुळे बाईपुढे धर्मसंकट उभे राहिले. ती जोर लावून त्याने घातलेले कपडे काढायचा प्रयत्न करत होती, तर मुलगा पूर्ण ताकदीनिशी कपडे घट्ट पकडून ठेवत होता.

आता मेहुलला रहावलं नाही. तो ठेलेवाल्याजवळ गेला आणि त्याने बाईला ऐकू जाणार नाही, इतक्या हळू आवाजात ठेलेवाल्याला विचारले, ‘किती कमी पडताहेत?’

साहेब, वीस रुपये. जितके कमी करणं शक्य असेल, तेवढे मी केले. आता याहून कमी करणं खरंच मला शक्य नाही. नाही तर मी मुलाला रडू दिलं नसतं. ‘

‘तू त्यांना कपडे दे. ते गेले, की मी तुला वीस रुपये देईन. त्यांना सांगू नकोस, की बाकीची रक्कम मी देतोय, नाही तर त्यांना वाईट वाटेल. ’ मेहुल हे हळू आवाजात बोलला आणि स्वातीपाशी येऊन उभा राहिला.

‘राहूदेत त्याने घातलेले कपडे’ ठेलेवाला म्हणाला. ‘दे पैसे. वीस रुपये कमी आहेत ना, चालेल. ’

बाईने तिच्याजवळ असलेली रक्कम व्यापार्‍याच्या हातावर ठेवली.

‘आता खुश ना?’ व्यापार्‍याने प्रेमाने मुलाला विचारले. बालकाने निर्मळ नजरेने आपली प्रसन्नता व्यक्त केली.

बाई व्यापार्‍याला आशीर्वाद देत-देत आणि मुलाच्या गालावरील अश्रू पुसत पुसत निघून गेली.

बाई आणि तिचा मुलगा थोडे दूर गेल्यावर मेहुलने त्या व्यापार्‍याचे पैसे देऊन टाकले.

‘आज मला माझा हरवलेला मेहुल परत मिळाला. ’ खुश होत स्वाती म्हणाली.

‘स्वाती, आज मी ऑफीसमध्ये हरवलेल्या मेहुलला शोधण्याखेरीज दुसरं काही कामच केलं नाही. चार वाजता मला तो मिळाला आणि मी तुला लगेचच फोन केला. ’

स्वातीने मेहुलचा हात धरला. ‘चल! आता मला काहीच नको. जे हवं होतं, ते मिळालं. ’

‘अरे ! इथपर्यंत आलोय, तर राजस्थानी कचोरी खाल्ल्याशिवाय कसं जायचं?

राजस्थानी कचोरी खाल्ल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये आइसक्रीम खाल्लं. अंशूला पहिल्यांदा त्याच हॉटेलमध्ये त्यांनी आइसक्रीम खिलावलं होतं.

बाजारात चक्कर मारून ती दोघे बाईक ठेवलेल्या ठिकाणी परत आली.

मेहुलने स्वातीला मागे बसवले आणि बाईक पळवली. तो घराकडे जाणारा रास्ता नव्हता. स्वातीने विचारले, ‘इकडे कुठे? घेरी नाही जायचं?’

‘नाही. अजून एक ठिकाण बाकी आहे.’

‘कुठे?’

‘जवळच आहे.’

त्या जवळच्या जागेबद्दल स्वाती काही अंदाज बांधू लागली, पण तिचे सगळे अंदाज चुकीचे ठरले. त्या जागी मेहुलने बाईक उभी केली, तेव्हा ती चकित झाली.

‘इथे जायचे!’ बोटाने इशारा करत तो म्हणाला.

काव्य-रसिकांचं स्वागत करणारा तो टाउन-हॉल स्वातीला तिच्या माहेरासारखाच वाटला.

— समाप्त —

मूळ गुजराती कथा – पीयरियां 

मूळ गुजराती लेखक –  श्री यशवंत ठक्कर

मोबाईल: 9427539111

हिंदी अनुवाद – मायका 

हिंदी अनुवादक – राजेन्द्र निगम

अहमदाबाद 380059, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माहेर… भाग-१ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ माहेर… भाग-१ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

‘मेहुल, आज ऑफीसमधून लवकर येऊ शकशील? स्वातीने विचारलं. |

‘का?’

‘आज रात्री आठ वाजता टाउन-हालमधे कवि संमेलन आहे. तिथे खूप चांगले चांगले कवी येणार आहेत. तू आलास तर जाता येईल. ’ 

जेव्हा जेव्हा, कविता, नाटक, साहित्य याविषयी चर्चा होत असे, तेव्हा तेव्हा मेहुलला हसू यायचं. हसत हसत तो म्हणाला, ‘हे कवी साले कल्पनेच्या जगातून कधी बाहेरच येत नाहीत. त्यांना दुसरा काही काम-धंदा आहे की नाही?’

‘मेहुल, जायचं नसेल, तर माझी काही हरकत नाही. पण, असं बोलून कुणाचा अपमान करणं योग्य नाही. ’

‘बघ. तू नाराज झालीस. जसा काही मी तुझ्या माहेरच्या लोकांचा अपमान करतोय. ’ 

नेहमीसाखी स्वाती गप्प बसली. पण, ती मनातल्या मनात मेहुलला प्रश्न केल्याशिवाय राहू शकली नाही. ‘मेहुल’ हा माझ्या माहेरच्यांचा अपमान करण्यासारखं नाही आहे? माहेर म्हणजे काय, केवळ आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी एवढंच? ज्या कवींच्या कवितांनी मला प्रेम करायला शिकवलं, एकटी असताना मला हसायला शिकवलं, एकटी एकटी असताना मला रडायला शिकवलं, ते कवी म्हणजे काय माझं माहेर नव्हे? आजा मी जी आहे, जशी आहे, त्यात माझे आई-वडील आणि माझे शिक्षक यांच्याबरोबरच या कवींचंही महत्वाचं योगदान आहे. हे मी तुला कसं समजाऊ? ते समजण्यासाठी तुझ्याजवळ हृदयच नसेल तर…. ’

स्वाती मेहुलसाठी टिफिन तयार करायच्या कामाला लागली. पण वातावरणात उदासीनता भरून राहिली.

ऑफिसला जायच्या वेळी, मेहुल वातावरण बदलण्याच्या दृष्टीने म्हणाला, ‘स्वाती, तुला माहीत आहे, मी पहिल्यापासूनच जरा प्रॅक्टिकल आहे. कल्पनेचे घोडे दौडविण्यात मला मुळीच रस नाही. मला कामही खूप असतं. जबाबदारीही खूप आहे. आपल्याला अंशचाही विचार करायचा आहे. त्याला चांगल्या हॉस्टेलमधे ठेवायचं आहे. उच्च शिक्षणानंतर त्याला परदेशात पाठवायचं आहे. अशात केवळ साहित्याचाच राग आळवून चालणार नाही. ’

स्वाती मूकच राहिली. मेहुलने वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. ‘स्वाती, तुला कविता, कथा, नाटक यांचा शौक आहे, पण हे सगळं तू टी. व्हीवरून बघू शकतेस नं? आता तर नेटवरही या गोष्टी मिळतात. ’

‘मेहुल, नेट वर तर पोळी-भाजीही असते, पण त्याने पोट नाही भरत. टी. व्हीवर हिरवीगार झाडेही खूप असतात, पण त्यांची सावली नाही मिळत. टी. व्हीवरचा पाऊस आपल्याला भिजवत नाही. ठीक आहे. कवि-संमेलन ही काही फार मोठी गोष्ट नाही. गेलो नाही, तरी चालेल. आपल्या जबाबदार्‍या आधी. ’ स्वातीने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिचे रडवेले डोळे मेहुलच्या नजरेपासून लपू शकले नाहीत.

‘तुला खुश ठेवण्यासाठी मी किती जीव तोडून मेहेनत करत असतो. तरी तुझ्या डोळ्यात पाणी. तुला काय हवय, हे मला कळतच नाही. ’ मेहुलचा आवाज जरा तीक्ष्ण झाला.

‘मला माझा हरवलेला मेहुल हवाय, जो छोट्या छोट्या गोष्टींनी खूश व्हायचा. ’ स्वाती कसं तरी म्हणाली.

‘छोट्या छोट्या गोष्टी!’ मेहुल हसला आणि ऑफीसला जायला निघाला.

स्वाती एकटीच राहिली. तिने मनभर रडून घेतलं. ती विचार करू लागली, ‘असं जीवन जगणं अवघड आहे. वाटतय, रोजचा दिवस जसा कॉपी – पेस्ट होत चाललाय. यात नवीन काहीच होत नाहीये. जे व्हायचं होतं, ते झालं. जे रोज होत होतं, ते एकसारखंच. कविता, नाटक, संगीत, प्रवास या सगळ्याशिवाय जीवन थांबत नाही, पण या सगळ्यामुळे जीवनाला एक गती मिळते. हे सगळं समजून घेण्यासाठी मेहुलजवळ वेळच नाही. त्याचं जीवन वेगाने धावणार्‍या ट्रेनसारखं आहे आणि माझं जीवन यार्डात पडून राहिलेल्या एखाद्या डब्यासारखं.

सगळी कामं आवरून ती बिछान्यावर पडली. पडल्या पडल्या हाच विचार करू लागली. विचार करता करता तिचे डोळे जडावले.

 मोबाईलची रिंग वाजली, तेव्हा तिने डोळे उघडले. फोन मेहुलचा होता. बोलणं सुरू करण्यापूर्वी तिने घड्याळाकडे पहिले. चार वाजायला आले होते.

‘हॅलो स्वाती, काय करते आहेस?’

‘बस! आत्ताच उठते आहे. ’ 

‘तू असं कर, रिक्शा करून सहा वाजता गावात ये. मी न्यायला आलो, तर उशीर होईल. आपण लक्ष्मी हॉलवर भेटू. ‘

‘पण का? काही खरेदी करायची आहे का? माझ्याकडे खूप कपडे आहेत. ’

‘मी एकत्र भेटण्याबद्दल बोलतोय. खरेदीबद्दल नाही. मी फोन ठेवतोय. कामात आहे. यायचं विसरू नकोस. ’

 स्वातीला वाटलं, मनवण्यासाठी एखादी साडी किंवा ड्रेस घेण्याच्या विचारात असेल, पण त्यात काय अर्थ आहे? अशा छोट्या गोष्टीत तिला आजिबात रस उरलेला नाहीये आता. आज नाकारच द्यायचा. मला कपडे आणि दागिने जमा करण्यात मुळीच रस नाही.

ती लक्ष्मी-हॉलशी पोचली. मेहुल अपली बाईक पार्क करून तिचीच वाट बघत होता.

‘मेहुल, काही खरेदी करायचीय?’ स्वाति साडीच्या दुकानाकडे नजर वळवत म्हणाली.

‘हो‘

‘काय घ्यायचय?

‘हे. ’ तिथे एक बाई डोक्यात घालण्यासाठे सुशोभित, कलाकुसरीची बोरं विकत होती. ( बोर म्हणजे भांगेत घालायचा दागिना. मारवाडी बायकांचा पदर त्या बोरापुढे कधी येत नाही. ) मेहुलने तिच्याकडे बोट दाखवत म्हंटलं.

 ‘ओह ! मला याची खरोखरच गरज आहे. ’ स्वाती पळतच तिकडे गेली आणि बोर पसंत करण्यात मश्गुल झाली. मेहुल स्वातीला जसा काही समजू लागलाय, अशा पद्धतीने तिच्याकडे पाहू लागला.

‘दहा रुपये द्या नं!’ मेहुलकडे बघत ती म्हणाली.

‘क्रेडिट कार्ड नाही चालणार?’ त्याने गमतीने विचारले. किती तरी दिवसांनंतर तो असं गमतीदार बोलला होता. स्वातीला छान वाटलं.

बोर खरेदीनंतर मेहुलने स्वातीला कपडे खरेदीविषयी विचारलं, पण ती नको म्हणाली.

 ‘ मग चल, बाजारात एक फेरफटका मारू! बाजारात बोरासारखीच आणखी एखादी गोष्ट वाट बघत असेल. ’ तो पुन्हा गमतीने म्हणाला.

स्वाती आठवू लागली. शेवटचं बाजारात ती कधी आली होती? नक्की दिवस आठवत नाही, पण पंध्रा वर्षे तरी झाली असतील. मेहुलचा धंद्यात थोडा थोडा जम बसू लागला होता. कमाई कमी होती, त्यामुळे खरेदीसाठी या बाजारातच यावं लागे.

बाजार आजही वेगवेगळ्या वस्तूंनी आणि लोकांनी भरलेला आहे. गरीब व मध्यम वर्गाचे लोक कपड़े, चप्पल, कटलरी, खेळणी यासारख्या वस्तू खरेदी करताहेत. व्यापारी आपआपल्या वस्तू विकण्यासाठी जाजम, सतरंजी घालून बसले आहेत. चार-सहा फुटांची जागाही कमाईसाठी पुरेशी होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यापाशी जे काही कौशल्य होते, ते, ते पणास लावत होते. ग्राहक, वस्तूंसाठी घासाघीस करत होते. व्यापार्‍यांचं ओरडणं, कलकलाट गाड्यांच्या हॉर्नचं संगीत, जोतजोरात वाजणारी गाणी, ‘जागा द्या… जागा द्या… ‘, ‘गाय आली.. गाय आली… ‘ सारख्या किंकाळ्या वातावरणाला चैतन्य प्राप्त करून देत होत्या.

स्वातीला किती तरी काळानंतर अशा जिवंत वातावरणाचा अनुभव येत होता. कुणी तरी अगदी जवळचं, आत्मीय भेटावं, तसा तिला आनंद झाला होता. वस्तू घेणार्‍या ग्राहकांच्या डोळ्यात दिसणारी आशा, उमंग, लाचारी यासारखे भाव तिला स्वत:चेच वाटले. किती तरी वर्षांपूर्वी ती हेच भाव घेऊन, या बाजारात नेहमीच येत होती.

— क्रमश: – भाग १

मूळ गुजराती कथा – पीयरियां 

मूळ गुजराती लेखक –  श्री यशवंत ठक्कर

मोबाईल: 9427539111

हिंदी अनुवाद – मायका 

हिंदी अनुवादक – राजेन्द्र निगम

अहमदाबाद 380059, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोठा… भाग – २ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ मोठा… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(तेवढ्यात एक झोपाळा रिकामा झाला. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे अधीर धावत जाऊन त्या झोपाळ्यावर बसला आणि झोके घेऊ लागला.) – इथून पुढे 

पूर्वी आजोबा चालू शकायचे, तेव्हा ते रोज संध्याकाळी अखिलला बागेत घेऊन यायचे. तेव्हा अखिल स्वच्छंदपणे बागडत असे. आजोबा बाकावर बसून इतर आजोबांशी गप्पा मारायचे. अखिल इतर मुलांबरोबर पकडापकडी, लपाछपी, साखळी खेळायचा. शिवाय घसरगुंडी, चक्र, झोपाळे वगैरे होतेच. नंतर आजोबा आजारी पडले. त्यांना घरातल्या घरातपण एकट्याने चालता येत नाही आता. वॉकर घेऊन आजी त्यांना टॉयलेटला नेते. तेवढंच त्यांचं चालणं.

आज मात्र त्याची मनःस्थिती वेगळीच होती. ‘अधीरला कसं सांगायचं हे? त्याला कळेल; पण तो घाबरणार नाही, असं. ‘ 

दोन झोके घेतले मात्र, अधीरला आजीचं आठवलं. तो मग धावतच अखिलकडे गेला, ” दादा, दादा, सांग ना. आजी कुठे गेली?”

” आपण बसू या. मग सांगतो. “

बाक भरलेले होते. मग ते खाली हिरवळीवरच बसले.

“दादा, आता सांग ना. आजी…. “

“आपली आजी ना, अधीर, देवबाप्पाकडे गेली. “

“हो? मग परत कधी येणार?” 

” नाही. परत नाही येणार. ” 

” का पण?”

“देवबाप्पाकडे गेलेले परत येत नाहीत. तिथेच राहतात ते. “

“मग आपल्याला आजी कुठची?”

आता अधीरलाही रडायला येऊ लागलं. मग अखिलने त्याला जवळ घेतलं. थोडा वेळ रडल्यावर अखिलने स्वतःचे व अधीरचे डोळे पुसले.

“हे बघ, अधीर. बाबा ऑफिसात आणि आई शाळेत गेल्यावर आपल्यालाच आजोबांची काळजी घ्यावी लागणार. “

“पण आपल्याला तर चहा करायला येत नाही. “

“मी शिकेन चहा करायला. “

“मग मी तुला मदत करीन. आणि आजोबांना बाथरूममध्ये नेताना तू एका बाजूने धर, मी दुस-या बाजूने धरीन. ” 

दोघे घरी आले, तेव्हा आजी कुठेच दिसत नव्हती. आजोबा झोपले होते. कदाचित नुसतेच डोळे मिटून पडले असतील. घरात फक्त बायकाच होत्या. बाबा, काका, मामा…… कोणीच पुरुष घरात नव्हते. आत्याचे डोळे रडून रडून सुजले होते. काकी, मामी आणि इतर बायका गप्पच होत्या. कियानची आजी आणि शेजारच्या बिल्डिंगमधल्या एक बाई बोलत होत्या.

“आजी शेवटपर्यंत आजोबांचं व्यवस्थित करत होत्या. आता या नोकरीला जाणार, म्हटल्यावर पंचाईतच आहे. ते तसे बेडरिटन…. “

” रिटन नाय हो. रिडन. बेडरिडन. आता तसे वृद्धाश्रम झालेत, म्हणा. त्या पिंकीच्या आई सांगत होत्या. त्यांनी त्यांच्या सास-यांना ठेवलंय ना, त्या वृद्धाश्रमातला स्टाफ एकदम अ‍ॅरोगंट आहे. “

“मग घरी आणलं त्यांना? “

” छे हो. सहा महिन्यांचे पैसे आगाऊच भरले आहेत. ती मुदत संपल्यावर दुस-या वृद्धाश्रमात ठेवणार, म्हणाल्या. “

आंघोळ करून आलेल्या उमाच्या कानावर हे पडलं. न राहवून ती बोलली, ” हे बघा. वृद्धाश्रमाच्या गप्पा इथे नकोत. बाबांना आधीच धक्का बसलाय. त्यात हे कानावर पडलं, तर ते हाय खातील. आणि आम्ही आमच्या बाबांना घरीच ठेवणार. ” 

” नाही हो, अखिलची आई. मी आपलं सांगितलं. सोयी आहेत, म्हटल्यावर…. ” 

“हा विषय बंद. ” 

मघापासून काळजीत असलेल्या आत्याने सुटकेचा निश्वास सोडला.

काकी म्हणाली, ” अखिल, अधीर, तुम्ही आंघोळ करून घ्या. मी पाणी काढून देते आणि टॉवेल आणून देते. “

अखिलने अधीरला आंघोळ घातली. स्वतःही केली.

केस पुसताना अखिलला आठवलं, त्याने कितीही जोर लावून केस पुसले, तरी आजी केसांना हात लावून बघायची आणि कुठे ओलसर असतील, तर खसखसा पुसून द्यायची.

अधीर तर काय, आजी केस पुसायला लागली, की मोठमोठ्याने ओरडायला लागायचा. मग आजी शांतपणे त्याला समजवायची, ” डोक्यात पाणी मुरलं, तर सर्दी होते. केस पुसताना तुला दुखत असेल, तर आपण सरळ तुझं चकोट करून घेऊ या. वाटल्यास शेंडी ठेवू या. ” मग अधीर घाबरून गप्प बसायचा.

अखिलची मुंज झाली, तेव्हा आई, बाबा, आजोबा सगळे मागे लागले होते, “चकोट करू या. छान दिसेल मुंजा. ” पण अखिल अजिबात तयार नव्हता. मग आजीने फतवा काढला, ” मुंज अखिलची, केस अखिलचे, तर निर्णयही अखिलच घेणार. ” अखिल खूश झाला.

पण आजी एवढ्यावरच थांबली नाही. तिने बाबा, काका आणि इतरांचे मुंजीतले, काही छोट्या बाळांचे जावळाचे फोटो गोळा केले. एका मासिकातले मोठमोठ्या माणसांचेही फोटो दाखवले. “हल्ली, अरे, फॅशन आलीय चमनगोटा करायची. आणि समजा, तुझे केस कापलेच, तर महिन्या-दीड महिन्यात हा बगिचा पुन्हा वाढणार, ” त्याचे केस कुरवाळत आजी म्हणाली.

“नक्की?”

“नक्की. अगदी शंभर टक्के. “

“पण कापताना दुखणार?” 

“एवढं पण नाही. आता तुला मी त्या छोट्या बाळांचे फोटो दाखवले ना?जावळ काढतानाचे. “

“मुलं चिडवतील?”

“चिडवायला लागली, तर तूच उलट सांग त्यांना, ‘किती हलकं वाटतं!’ “

शेवटी अखिल हसतहसत तयार झाला होता.

शेजारच्या काकूंनी दारातूनच अखिलला हाक मारली आणि हातातला मोठा जेवणाचा डबा त्याच्याकडे दिला, ” स्वयंपाकघरात नेऊन ठेव. कोणाला जेवायची इच्छा नसणार. पण काहीतरी पोटात तर गेलं पाहिजे. आजोबांना औषधं घ्यायची असणार. तू आणि अधीर – तुमची आंघोळ झाली, तर आमच्याकडेच या जेवायला. आणि तिथेच अभ्यास वगैरे करत बसा. इथे कोणकोण येत राहणार…. ” 

आजी नेहमी सांगायची, काकू ओरडत असल्या, तरी स्वभावाने खूप चांगल्या आहेत. ते अखिलला आता पटलं.

अखिलला काकूंची खूप भीती वाटायची. खूप कडक होत्या त्या.

एकदा दुपारी अखिल आणि कियान जिन्यात कॅचकॅच खेळत होते. दोनदा बॉल काकूंच्या दारावर बसला. तेव्हा काकू बाहेर येऊन ओरडल्या, ” दुपारच्या वेळी घरात बसून बैठे खेळ खेळा. ” त्यामुळे तो काकूंच्या बाजूला फिरकत नसे. पण आज नाईलाज होता. म्हणून तो पटकन काकूंना बोलवायला गेला. त्याही चटकन आल्या. आणि केवढी मदत केली त्यांनी! 

त्याउलट कियानची आजी त्याला मस्त वाटायची. त्याच्याकडे कधी गेलं, की आजी तिच्या खोलीत टीव्ही बघत बसलेली असायची. भूक लागली, की कियान स्वतःच स्वयंपाकघरात जायचा आणि डबे उघडून यांच्यासाठी खायला आणायचा.

मग अखिलला डॉक्टरांची आठवण झाली. त्याला डॉक्टरांचा रागच आला होता. स्वतःहून सोडाच, पण आजोबांनी सांगितलं, तरी ते हॉस्पिटलला, अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करत नव्हते. नुसतेच गप्प बसून राहिले होते.

आता अखिलच्या लक्षात आलं, आजी गेल्याचं डॉक्टरांना कळलं, तरी आजोबांना धक्का बसेल, म्हणून ते तेव्हा काहीच न बोलता आई-बाबांची वाट बघत बसले होते. नंतरही त्यांनी आईकडे, आजोबांसाठी एक गोळी काढून दिली आणि सांगितलं, “यांना त्रास झाला, तर रात्री जेवल्यानंतर ही गोळी द्या. म्हणजे शांत झोप लागेल. “

अखिल तसा नेहमीच सगळ्यांशी बोलायचा. पण इतरांचं बोलणं, त्यामागचा अर्थ, बोलणा-याचा स्वभाव, प्रामाणिकपणा याची जाणीव आज झाली, तेवढी त्याला कधीच झाली नव्हती.

या पाच-सहा तासात आपण ख-या अर्थाने मोठे झालो आहोत, असं त्याला वाटलं.

– समाप्त –

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोठा… भाग – १ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ मोठा… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

दुपारी आजीने अधीरला तयार केलं आणि त्याला बसपर्यंत सोडायला निघणार, तेवढ्यात अधीरने रडायला सुरुवात केली, “माझ्या पोटात दुखतंय. मी शाळेत जात नाय. ” 

“थांब. तुला औषध देते. पटकन बरं वाटेल. ” आजीने औषधाची बाटली आणली.

“नको. हे कडू आहे खूप. “

“पण लगेच बरं वाटेल तुला. “

“नाय. तेवढं दुखत नाय. कमी दुखतंय. ” 

“मग शाळेत जा तर. ” 

या सगळ्यात स्कूल बस निघून गेली.

‘अरे बाप रे !आता याला शाळेत पोचवायला जावं लागणार!’आजीला थोडा स्ट्रेस आला.

तेवढ्यात अखिल शाळेतून घरी आला.

“अखिल, याला शाळेत पोचवून येशील बाळा?माझ्याने जाववत नाही आहे. “

“का? आज बस नाही आली?” 

“ह्याच्या पोटात थोडंसं दुखतंय म्हणत होता. त्यामुळे बस चुकली. टीचरकडे नेऊन पोचव. आणि बसवाल्या काकांना सांग, संध्याकाळी बसमधून घेऊन यायला. ” 

“चल, ” अखिल अधीरला घेऊन शाळेकडे निघाला.

शाळेत गेला, तर बसमधली मुलं आधीच उतरली होती.

“मी तुला टीचरकडे सोडतो आणि परत जातो हं, ” अखिल म्हणाला. अधीर काही बोललाच नाही.

शाळेच्या गेटकडेच चार छोटी मुलं हातात हात धरून रस्ता अडवून उभी होती.

“दाsदाss”भेदरलेल्या अधीरने अखिलचा हात घट्ट पकडला.

“काय झालं?”

त्या मुलांनी अधीरच्या दादाला बघितलं मात्र, ती घाबरून पळत सुटली.

“तू मारामारी केलीस त्यांच्याशी?” अखिलने अधीरला विचारलं.

“नाय. मी फक्त मानसला धक्का मारला. तो विशेषच्या अंगावर पडला. विशेषचा धक्का लागून आरव पडला. आरव अन्मेषला धरायला गेला, तर अन्मेषपण खाली पडला. ”

“तू एवढ्या जोरात धक्का मारलास मानसला?” 

“नाही. मी हळूच ढकलला होता. ” 

तेवढ्यात शाळेची बेल झाली.

अखिलने घरी आल्यावर ही गोष्ट सांगितली, तशी आजी हसतहसत म्हणाली, ” मला वाटलंच होतं, ह्याने काहीतरी मस्ती केली असणार. म्हणून शाळेत जायला घाबरतोय आणि पोटात दुखायचं नाटक करतोय.

“किती वाजले?”आजोबांनी विचारलं, तेव्हा अखिलने गृहपाठ करताकरताच म्हटलं, “आजोबा, गेल्या पाच मिनिटात चौथ्यांदा विचारताय तुम्ही. “

आजी हसायला लागली, ” काही नाही, अरे. चहा हवा असणार त्यांना. करते, करते. जरा जेवण तरी खाली उतरू द्यायचं. बरं. करते चहा. चहा आणि बिस्किटं घ्या आता. नंतर थोड्या वेळाने तिखट सांजा करते. अधीर यायची वेळ झाली की. गरम असेल तर खातो नीट. नाहीतर चिवडत बसतो. “

“आजी, तू त्याचेच लाड कर, ” अखिल रुसल्या सुरात बोलला.

“अरे, तुझेपण लाड करतेच की मी. आज दुधीभोपळ्याची भाजी तू नीट खाणार नाहीस, म्हणून सांडगे-पापड तळले ना तुझ्यासाठी!”

“ते सगळे पोचले आपल्या गंतव्यस्थानी. आता चहाची हुक्की आलीय. “-आजोबा.

“करते हो, “आजी गुडघ्यावर हात ठेवून जरा पुढे वाकली आणि उठायला गेली. पण उठण्याऐवजी ती धप्पकन पुन्हा सोफाचेअरवर बसली आणि तिची मान लुढकली.

“अगं, काय झालं?” आजोबांनी काळजीने विचारलं. अखिलही धावला. पण आजी जराही हलली नाही.

“अरे, शुद्ध गेली वाटतं तिची. पाणी शिंपड तिच्या तोंडावर. ” 

अखिलने आजीच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तिच्या डोळ्यांना पाणी लावलं. पण आजी तशीच.

 मग मात्र आजोबा घाबरले. ” अरे, डॉक्टरांना फोन कर. आई-बाबांनाही फोन कर. शेजारच्या काकूंना बोलाव. “

“आजोबा, डॉक्टर म्हणताहेत- तासाभरात दवाखान्यात जायला निघणार. आधी तुमच्याकडे येतो. “

“दे माझ्याकडे फोन. मी बोलतो. ‘डॉक्टरसाहेब, हिची शुद्ध गेलीय. अटॅक आल्यासारखं वाटतंय. तुम्ही लगेचच या. ‘ “

“बरं, बरं. निघतो मी. “

मग आई-बाबांना फोन करून अखिल शेजारच्या काकूंना बोलवायला गेला.

डॉक्टरांनी आजीची नाडी तपासली. पापण्या वर करून डोळे तपासले. बीपी तपासलं.

“माझं सगळं वेळच्या वेळी करायच्या गडबडीत तिच्या स्वतःच्या गोळ्या बरेचदा घ्यायच्या राहून जातात. मलाच आठवण करून द्यावी लागते तिला, “आजोबा म्हणाले, “डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावं लागेल का? तुम्ही हॉस्पिटल ऑथॉरिटीजशी बोलून घ्या. म्हणजे लगेचच अ‍ॅडमिट करतील ते. “

डॉक्टरांनी हातानेच त्यांना ‘थांबा’ अशी खूण केली. आणि काकूंच्या मदतीने आजीला बिछान्यावर आणून झोपवलं.

डॉक्टर आजीला सीपीआर द्यायला लागले. ते एवढा जोर लावत होते, की आजीला दुखणार, असं अखिलला वाटलं. पण आजीच्या चेह-यावर ना दुखण्याची खूण दिसत होती, ना तिच्या तोंडून ‘हायहुय’ फुटत होतं. थोडा वेळ प्रयत्न करून डॉक्टर थांबले. अखिलला म्हणाले, ” मला प्यायला पाणी आण थोडं. ” 

“काय…. काय झालंय तिला?” आजोबांनी काळजीने विचारलं.

पण डॉक्टर आजोबांकडे फक्त बघत राहिले.

“तुम्ही… हॉस्पिटलला… फोन… करा ना, डॉक्टर. अ‍ॅम्ब्युलन्सही बोलवा. माझी सून येईल तोपर्यंत. “

पण डॉक्टर काहीच बोलले नाहीत.

“चहा घेणार का?” काकूंनी विचारलं. पण डॉक्टरांनी हातानेच ‘नको’ अशी खूण केली.

तेवढ्यात उमा आली.

“काय झालं, डॉक्टर, आईंना?”

“शी इज नो मोअर. मॅसिव्ह अटॅक असणार. “

उमाचे डोळे पाण्याने डबडबले. अखिल जाऊन आईला बिलगला.

आता कुठे आजोबांना सत्य परिस्थितीची जाणीव झाली. काकूंनी त्यांना प्यायला पाणी दिलं.

तेवढ्यात महेशचा फोन आला. तो निघाला होता. उमाला त्याच्याशी बोलायला सुधरेना. मग डॉक्टरच बोलले त्याच्याशी.

काकूंनी उमाला विचारून एकेका नातेवाइकाला फोन लावायला सुरुवात केली.

आजीच्या फोनचा टायमर वाजला. अधीर शाळेतून यायची वेळ झाली होती.

उमाने अखिलला जवळ घेतलं आणि म्हटलं, ” आता हळूहळू सगळे जमायला लागतील….. पुढचे विधी बघून अधीर घाबरून जाईल. तू त्याला घेऊन बागेत जा. माझ्या पर्समधले पैसे घे. दोघंही काहीतरी खा पोटभर आणि मग खेळायला जा. ” 

आजी पुन्हा दिसणार नाही, या विचाराने अखिल सद्गदित झाला होता. त्याने जाऊन झोपलेल्या आजीला मिठी मारली, तिचा पापा घेतला आणि तो निघाला.

“हॉटेलात खायचं आपण? किती मज्जा ना! पण आजी ओरडणार नाय ना?” 

अखिलच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

“तू रडतो कशाला, दादा?”

“नाही रे. रडत नाही मी. डोळ्यात काहीतरी गेलं. “

मोठ्या माणसांशिवाय असा अखिल पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आला होता. मग त्याने मेन्यूकार्ड बघितलं. त्या पदार्थांच्या किमतीही बघितल्या. आयुष्यात पहिल्यांदाच. मग आपल्याकडचे पैसे आणि बिल यांचाही त्याने हिशेब केला.

अधीर मिटक्या मारत खात होता. अखिलच्या घशाखाली काहीच उतरत नव्हतं. मघासच्या सगळ्या गोष्टी ‘अ‍ॅक्शन रिप्ले’प्रमाणे त्याच्या डोळ्यांसमोर येत होत्या.

बागेत जात असताना समोरच्या बिल्डिंगमधल्या मावशी भेटल्या, ” काय रे, काय झालं तुझ्या आजीला? ब-या होत्या ना त्या? पहिल्यांदा मला वाटलं, तुझे आजोबाच गेले की काय? मग कळलं, आजी गेल्या म्हणून. “

अखिलला त्यांच्या बोलण्याचा खूप राग आला. तो काहीच बोलला नाही.

त्या गेल्यावर अधीरने विचारलं, ” दादा, त्या मावशी काय म्हणत होत्या? आजी कुठे गेली?”

“बागेत गेल्यावर सांगतो. “

तेवढ्यात एक झोपाळा रिकामा झाला. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे अधीर धावत जाऊन त्या झोपाळ्यावर बसला आणि झोके घेऊ लागला.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares