श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ रंगभुलैय्या…. भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆
अभि, समीर आणि अश्विनी कॉलेजपासूनचे खास मित्र. कॅम्पसमधून तिघेही कॅंम्बेमधे सिलेक्ट झाले आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या करियर मधे त्यांनी पहिले पाऊल टाकले.
अभि आणि अश्विनी मनानं खूप जवळ असल्याचं परस्परांना जाणवत होतंच पण त्यांच्या ‘आणाभाका’ झाल्या त्या पुण्यात ते एकाच कंपनीत जॉईन झाल्यानंतरच.
सौरभ हा या सर्वांचा कॅंम्बे मधला बॉस. त्यांच्यापेक्षा वयाने थोडासाच सीनियर पण तसा बरोबरीचाच. हसरा, तरतरीत, मनमोकळा आणि प्रसन्न ! सौरभ म्हणजे सुगंध. त्याच्या नावातच जसा सुगंध होता तसा तो त्याच्या व्यक्तिमत्त्वातही भरून राहिलेला होता.समीरचा तो खास मित्र झाला. पण अभिला मात्र तो फ्लर्ट वाटायचा. ऑफिसमधे मुलींबरोबरची त्याची उठबस अभिला वेगळी वाटायची. पण स्वतःचं हे मत त्याने कुठंच व्यक्त केलेलं नव्हतं. अश्विनी मात्र या सगळ्यापासून चार हात दूरच असायची.
समीर अजून सडाफटिंगच होता आणि कदाचित त्यामुळेच होमसिकसुद्धा.सौरभ बरोबरच्या ड्रिंक पार्टीजचा अपवाद वगळता बहुतेक विकेंडसना तो घरी पळायचाच.
अभि-अश्विनीचं लग्न ठरलं आणि अभिने कॅम्बेतून एक्झिट घेऊन बेटर प्राॅस्पेक्ट्स् साठी कॉग्निझंट जॉईन केली. त्यावेळी समीर,अश्विनीलाही तो ऑप्शन होताच पण अश्विनी धरसोड वृत्तीची नव्हती. त्यामुळे ती तिथेच राहिली.समीरची मात्र थोडी चलबिचल सुरू होती. पण अखेर ‘कॅम्बे सोडण्यापेक्षा सौरभला सोडून येणं माझ्या जीवावर येतंय यार..’ असं म्हणत तोही तिथेच राहिला. आणि ते खरंही होतं. त्याची आणि सौरभची छान मैत्री जमली होती. आणि प्रोजेक्टस् डेव्हलपमेंटच्या दरम्यान त्यांचं ट्युनिंगही चांगलं जमायचं.
एका वीकेंडला गावी गेलेला समीर सोमवारी नेहमीसारखं परत येणं अपेक्षित होतं. पण ऑफिसला निघण्याच्या तयारीच्या गडबडीत असताना अश्विनीला त्याचा मेसेज आला.
‘डिटेन्ट फॉर इमर्जन्सी मॅटर. कमींग ऑन वेनस्डे.प्लीज इन्फाॅर्म सौरभ’ हा त्याचा निरोप द्यायला अश्विनी सौरभच्या केबिनमधे गेली तेव्हा सौरभला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या क्षणी तो तिलाच बोलवून घ्यायचा विचार करीत होता. नेहमीप्रमाणे प्रसन्न हसत त्याने अश्विनीला हे सांगितलं तेव्हा अश्विनीही गोंधळून गेली क्षणभर.
“का? काही महत्त्वाची असाइनमेंट आहे कां?” तिने विचारलं.
“नाही “तो म्हणाला,” पण एक खास गुड न्यूज आहे तुझ्यासाठी.या स्टेजला स्ट्रीक्टली कॉन्फिडन्शीअल पण लवकरच ऑफिशियल डिक्लेअर होईल.”
न्यूज तिच्या प्रमोशनची होती ! ऐकताच क्षणी अश्विनीला आनंदाश्चर्याचा सुखद धक्का बसला खरा पण सौरभसमोर मात्र अश्विनीने तो क्षण खूप शांतपणे स्वीकारला. घरी आली ते या आनंदलहरींवर तरंगतच. इतका वेळ हा आनंद अभिशी शेअर करायचा मोह तिने आवरला होता. पण आता मात्र तिला रहावेना. पर्समधून गडबडीने ती मोबाईल काढणार एवढ्यात डायल टोन सुरू झाला. हा अभिचाच असणार असं मनाशी म्हणत तिने उत्साहाने नंबर पाहिला तर तो अभिचा नव्हता. समीरचा होता. तरीही तिचा विरस झाला नाही कारण ही गुड न्यूज आवर्जून शेअर करावी एवढा समीर खास मित्र होताच की.
“हाय समीर” ती म्हणाली. पण तिकडून मिळालेला समीरचा रिस्पॉन्स तिला कांहीसा गंभीर वाटला. त्याचा आवाज थोडा भरून आल्यासारखा जाणवला.
“समीर, काय झालं रे? तब्येत बरी आहे ना ?”
“हो.माझी बरी आहे.. पण आई… ” त्याला पुढे बोलवेचना.
“आईचं काय ? काय झालंय त्यांना.. बोल ना समीर “
तो कसंबसं बोलू लागला पण त्याने सांगितलं ते ऐकता ऐकता अश्विनीच अस्वस्थ झाली. तिच्या घशाशी हुंदका दाटून आला. तिने तो महत्प्रयासाने आवरला. स्वतःला सावरलं. पण समीरला मात्र आपला भावनावेग थोपवता येईना.
” समीर, हे काय लहान मुलासारखं ?सावर स्वतःला.हे बघ आईंना सांभाळ.त्यांना तू धीर देशील की स्वतःच खचून जाशील ? होईल अरे सगळं व्यवस्थित. आणखी एक.रहावत नाहीय म्हणून सांगते. अभि आणि मी दोघेही आहोत तुझ्याबरोबर. कसलीही मदत लागली तर कळव नक्की.तू खचून जाऊ नकोस. ओके? अरे,प्रोजेक्टची कसली काळजी करतोस? आम्ही सर्वजण मिळून करू मॅनेज.डोन्ट वरी. टेक केअर.”
सगळं ऐकलं आणि अश्विनीचा मूडच गेला एकदम. क्षणापूर्वीचा मनातला आनंद पाऱ्यासारखा उडून गेला.तिला कॉलेजचे दिवस आठवले. मोकळ्या वेळेत कॉलेजपासून जवळचं घर म्हणून सर्वांचा राबता समीरच्या घरीच असायचा.तिला तेव्हाची समीरची आई आठवली.या साऱ्यांची ऊठबस ती किती उत्साहाने करायची. त्यांच्या वयाची होऊन त्यांच्या हास्यविनोदात रमून जायची. आणि आज हे असं अचानक?
अभिलाही ही बातमी ऐकून धक्काच बसला. त्याने लगोलग समीरला फोन केला.कितीतरी वेळ त्याच्याशी बोलत त्याला धीर देत राहिला. पण स्वतः मात्र स्वतःचीच आई संकटात असल्यासारखा हळवा होऊन गेला..!
तो आनंदाचं शिंपण करीत उगवलेला दिवस आनंद करपून गेल्यासारखा असा मावळला..!
दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलेल्या अश्विनीनं लिफ्टमधे पाऊल ठेवलं तर समोर समीर..!
” समीर,.. तू ? ” तो कसनुसा हसला.” तू इथे कसा?आई कशा आहेत? ” तो गंभीरच झाला एकदम.पण लगेच त्याने स्वतःला सावरलं आणि शेकहॅंडसाठी हात पुढे केला.
“अश्विनी, काँग्रॅटस् “
“कशाबद्दल?”
मनाच्या या अस्वस्थतेत कालची गुड न्यूज ती पार विसरूनच गेली होती..!
” फाॅर गेटिंग प्रमोशन.यू डिझर्व इट अश्विनी”
अश्विनीला काय बोलावं समजेचना.तिला खरंतर हा विषय नकोसाच वाटू लागला.
“समीर,त्याचं काय एवढं?इटस् स्टील अ रूमर. मे बी रॉंग ऑल्सो.आणि तसंही इट् वोण्ट मेक एनी डिफरन्स फॉर मी”
” का?तुला नकोय प्रमोशन?”
“सहज मिळेल ते मला सगळं हवंय.अट्टाहासाने कांहीच नकोय.एकच सांगते. या विषयाचा मला आत्ता त्रास होतोय. आत्ता या क्षणी आय ॲम वरीड फाॅर यू. आई कशा आहेत? डॉक्टर काय म्हणतायत?”
“टेस्ट रिपोर्टस् आज संध्याकाळी येतील. मगच लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरेल.”
“हो पण मग तू कां आलायस इथं? प्रोजेक्टची काळजी करू नको असं म्हटलं होतं ना मी?
“हो पण नेक्स्ट वीक सौरभ स्टेटस् ला चाललाय. पुन्हा लवकर भेटायचा नाही.म्हणून मग..”
“म्हणून आलायस इथं?डोकं ठिकाणावर आहे का तुझं? तू.. तू जा बघू परत.”
“खरं सांगू अश्विनी? मी तिथं नाही थांबू शकत. म्हणून आलोय. आई काय गं.. शी इज ब्रेव्ह इनफ. बट आय अॅम नॉट. शिवाय तिथं दादा-वहिनी आहेतच. आईची ट्रीटमेंट मार्गी लागेपर्यंत मी इथंच कम्फर्टेबल असेन.” बोलला आणि तडक सौरभच्या केबिनच्या दिशेने निघून गेला. अश्विनीचे मग कामात लक्षच लागेना.
————
” अश्विनी,चल.चहा घेऊ “
“आत्ता? इतक्या लवकर?”
” मला बोलायचंय तुझ्याशी. प्लीज “
त्याला नाही म्हणणं तिच्या जीवावर आलं. काही न बोलता ती जागची उठली.
समोरच्या वाफाळलेल्या चहाकडे समीरचं लक्षच नव्हतं. तो शून्यात नजर लावून कुठेतरी हरवून गेलेला होता.
” समीर…समीsर “
“अं ?..काय?” तो दचकून भानावर आला.
“बोल. काय झालं? काय म्हणाले सौरभ सर?”
“कशाबद्दल?”
“कशाबद्दल काय? त्यांना भेटायला गेला होतास ना तू? मग? काय म्हणाले ते? तुझ्या रजेबद्दल त्यांना प्रॉब्लेम नाहीये ना कांही?”
“प्रॉब्लेम त्याला कां असेल?प्राॅब्लेम मलाच आहे.पर्सनल.”
“कसला प्रॉब्लेम?”
“अश्विनी, रागावणार नसशील तर एक विचारु?”
“रागवायचं काय त्यात? विचार.”
“एक फेवर करशील माझ्यावर?”
“फेवर काय रे? वेडा आहेस का तू? मी करू शकेन असं कांहीही सांग. मी नक्की करेन “
“तू माझ्यासाठी तुझं प्रमोशन रिफ्यूज करशील?”
“त्याचं आत्ताच काय?”
“कां? मनात आणलं तर तूच करू शकशील असं नाहीये कां हे?”
“अरे, पण जे अजून ऑफरच झालेलं नाहीय ते रिफ्यूज करण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि हे असं अचानक कसं काय आलं तुझ्या डोक्यांत?”
समीरला वाटलं होतं ती पटकन् हो म्हणेल. पण तसं झालं नव्हतं.आता हिला कां ते सांगायलाच हवं. तो कसेबसे शब्द जुळवत राहिला.
“तुला मी पूर्वी कधी बोललो नव्हतो अश्विनी.पण आज सांगतो. नवीन सुरू होणाऱ्या प्रोजेक्टस्साठी इथे ‘सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर’ ची पोस्ट क्रिएट होणाराय हे मला सौरभनं पूर्वीच सांगितलेलं होतं. आपल्या संपूर्ण टीममधे आपल्या दोघांचेच परफॉर्मन्स आणि म्हणूनच ॲपरेझल्स् चांगले होते. टीम लीडर म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करता प्रमोशन मलाच मिळणार हे मी गृहीत धरलेलं होतं. ते तुला मिळालं याचा आनंद आहेच अश्विनी. पण फरक पडला आहे तो माझ्या आईच्या कॅन्सर डिटेक्शनमुळं……”
बोलता-बोलता समीरचा आवाज आणि डोळे भरून आले. तो बोलायचा थांबला. अश्विनी तो सावरायची वाट पहात राहिली…
क्रमशः……
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈