मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – दोन ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – दोन ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)

(चेरीने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेली सीमा चेरीने पाठवलेले पत्र टेबलावर भिरकावून देते. ज्यात तिने आपला जीवनपट मांडला आहे. पण त्याचे आता दूसरे वाचन चालू आहे……आता पुढे)

एके दिवशी आईनं सांगितलं ,”चेरी बेटा तुझं लग्न ठरवतोय. मुलगा देखणा आहे. तुमची जोडी फार शोभून दिसेल. शिवाय तो सी.ए.आहे. त्या फॅमिलीचे खूप बिजनेस आहेत… वेगवेगळ्या क्षेत्रातले …त्या सर्वांची मॅनेजमेंट त्याच्याच हातात आहे. घराणं आपल्यापेक्षा धनाढ्य आहे. जॉइंट फॅमिली आहे. लोक फार चांगले आणि शिकले-सवरलेले पण आहेत. एकदा तुझं लग्न झालं की तुझ्या भैयाच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याबरोबर मलाही साउथ आफ्रिकेत शिफ्ट व्हावे लागेल .तुझं माहेरी येणं…. आपली पुन्हा भेट होणं…. कितपत शक्य होईल? काहीच माहित नाही. या सगळ्या  विचारांनीच माझा जीव तिळतिळ तुटतोय …माझी रात्रीची झोप पण उडून गेलीय. पण काय करणार?निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य मला कुठे आहे?…. पण आर्थिक बाबतीत म्हणशील तर तुझ्या नावावर दोन फ्लॅट, एक बंगला, बँकेत भरपूर पैसा- ज्वेलरी असं सगळं तुझ्या बाबांनीआधीच करून ठेवलंय.”

मोठ्या दणक्यात माझं लग्न झालं… आणि एका छोट्या कैदेतून मोठ्या कैदेत माझी विदाई झाली. इथे कशात काही कमी नाही, पण खूप काही कमी आहे, हे मला इथं राहिल्यावर कळलं.

लग्नाच्या दुसऱ्या दिवसा पासूनच माझ्या दुर्दैवाला सुरुवात झाली .माझी ‘मुँह दिखाईकी’ रस्म चालू होती. त्याच वेळी माझ्या नणदेचे पती चक्कर येऊन पडले…. अन् पाच मिनिटातच त्यांचं हार्टफेलनं देहावसान झालं. घरात दुःखाचा सागर उमडला. त्यातून बाहेर यायला दोन तीन महिने लागले. नंतर आमच्या नणंदबाई आपला बंगला भाड्याने देऊन मुलीसह आमच्याकडेच राहायला आल्या. त्यात गैर काहीच नव्हतं. पण तेव्हापासून माताजी आणि आणि वन्सबाई या दोघींनी मला तू पांढऱ्या पायाची आहेस .अवदसा आहेस .तुझी नजर फार वाईट आहे. तू सगळ्यांना खाऊन बसणार आहेस. अशा तऱ्हेचे व अर्थाचे टोमणे मारायला सुरुवात केली. हे सगळं कमी होतं म्हणून की काय …लग्नानंतर सहा महिन्यातच आई वारली. इथेच! साउथ आफ्रिकेत जायच्या आधीच.अन् मायेच्या सावलीला मी मुकले.आता जगात माझं असं कोणीच नाही .नवरा सुद्धा!

घरातल्या लोकांची वागणूक जरा विचित्र आहे हा माझा संशय हळूहळू दृढ होत गेला.अमावस्या,पौर्णिमा ,प्रदोष, शनिवार अशा दिवशी नेहमी नाही ,पण कधी कधी घरात रात्री बारा वाजल्यापासून विशेष पूजा चालायची. पूजा बाबूजी करायचे. ह्यांना कपाळभर गुलाल लावला जायचा .थोड्या वेळातच हे अंगात येऊन घुमू लागायचे .यांना पूजेच्या मधेच प्रश्न विचारले जायचे. आणखी सुबत्ता…. आणखी धन…. व्यापारात जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा पाडाव….. प्रश्न मुख्यतः या बाबतचेच असायचे. मला हे सगळे थोतांड वाटायचे.

“अलकनंदे, कपाळावर आठ्या नकोत. नीट लक्ष देऊन पूजा पहा.” माताजी माझ्यावर गुरगुरायच्या.

पण पूजा साहित्यातल्या लिंबं, गुलाल ,सुया, काळ्या बाहूल्या …यासारख्या वस्तू पाहून माझ्या अंगावर काटा यायचा. पशुबळी पण कधी कधी दिला जायचा. कधी कवट्या मांडून पूजा चालायची. मला पूजेच्या ठिकाणी बसावंच लागायचं .

सकाळी उठून पहावं तर सगळ्यांचं वागणं नार्मल! चहाच्या टेबलावर सगळ्यांच्या गप्पा ,थट्टामस्करी, हसणं सगळंअगदी नेहमीप्रमाणं! माताजी-बाबूजींच्या बोलण्यात मी यांचा उल्लेख कधीतरी एकदा’ बीच का बच्चू,असा ऐकला होता… म्हणजे लहानपणापासून ह्यांचा उपयोग ते माध्यम म्हणून करून घेत असावेत ….किंवा यांना हिप्नोटाईज करत असावेत… नाहीतर यांची दुभंगलेली पर्सनॅलिटी असावी…. असा माझा संशय होता. एकीकडे कुटुंबवत्सल, शांत, हुशार असा नॉर्मल माणूस ..आणि दुसरीकडे तो अंगात येऊन घुमणारा विचित्र ‘बीच का बच्चू’!

लग्नानंतरची दहा वर्षे मी हाच प्रकार झेलत आलेय. आत्तापर्यंत नणंदेची मुलगी, जावेची मुलगी, मुलगा सगळीच मोठी आणि कळती झालीत. पण लहानपणापासून ती या कर्मकांडात आनंदाने सामील होत आलीत .शिक्षणाने पण त्यांच्या विचारात काहीच फरक पडलेला नाही. कारण त्यांचा माईंड- सेटच तसा ॲबनार्मल  झाला आहे. हेच त्यांचे संस्कार आहेत. या घरात मी एकटीच मूर्ख आणि नास्तिक! तशी तर घरातली मोठी माणसे पण खूप शिकलेली आहेत. आपले उद्योग धंदे उत्तम प्रकारे चालवताहेत. अडाणी थोडीच आहेत !पण या विचित्र पूजांबाबत अबालवृद्ध सगळेच पूर्ण अंधश्रद्धा आहेत… आणि सगळ्यांचाच एक अलिखित नियम म्हणजे त्यातला कोणीही याबाबत घराबाहेर काही सांगत नाही.

मला मूलबाळ झालं नाही. होणार तरी कसं? पती-पत्नीला एकत्र येऊच दिलं नाही तर ! हे लहानपणापासूनच ‘बीच का बच्चू!..व्रत,उपास-तापास, अनुष्ठानं यामुळं त्यांना स्त्रीसंग बरेचदा वर्जच असतो. कधी कधी मला त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात माझ्या बद्दल प्रेम भाव दिसतो… पण अचानक ‘तो बच्चू’ त्यांच्यावर हावी होतो. अन् केविलवाणा चेहरा करून ते माझ्या जवळून दूर निघून जातात …पण माझ्या मनाला मी कसं समजावू? सासरी प्रवेश केल्यापासूनच दांपत्य जीवनाबद्दलची माझी सुंदर स्वप्नं, माझ्या सोनेरी आशा, माझी उमेद,अपार उत्साह… सगळ्याचा चुराडा चुराडा झालाय. माझं मन नेहमी ठणकत असतं. आतल्या आत रडत असतं आणि एकाकीपणा अनुभवत ‘वांझ ‘हे विशेषण खाली मान घालून ऐकत मी जगत राहते.

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – एक ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – एक ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)

या नव्या छोट्या गावात आल्यापासूनच सीमा उदास झाली होती. तिचं कशातच मन लागत नव्हतं .पण काय करणार? अजयचा जॉबचअसा होता. दर तीन वर्षांनी बदली… नवं गाव… नवा बंगला किंवा फ्लॅट…नव्यानं संसार मांडायचा… ओळखीपाळखी होऊन जरा रुळतोय तोपर्यंत पुन्हा बदली !अजय अखंड कामात गुंतलेला,तर मुलं शिक्षणासाठी सासरी- पुण्याला.शेवटी नाईलाजानं, टाईमपास म्हणून ,तिनं बंगल्या समोरच्या मोठ्या बागेत लक्ष घालायला सुरुवात केली. हळूहळू तिचं मन त्यात रमू लागलं. एके दिवशी माळी वाफे तयार करत होता आणि ती त्याला सूचना देत बागेचे निरीक्षण करत होती. वेगळ्या रंगाच्या फुलांनी लगडलेल्या जास्वंदी वरून अचानक तिची नजर शेजारच्या खूप मोठ्या अलिशान बंगल्याकडे गेली…

…अन् ती आनंदानं जोरात किंचाळलीच ,”हेअ चेरी!”  नकळत चार-पाच पावले चालून ती तिथल्या कंपाउंड पर्यंत ही गेली .बंगल्याबाहेरच्या बागेत उभ्या असलेल्या दोन तरुणींपैकी एकीचं लक्ष सीमाकडं गेलं. तिच्या चेहऱ्यावर ओळख पटल्याचे भाव पण आले. पण….. अनपेक्षितपणे डोक्यावरचा पदर हनुवटीपर्यंत खाली ओढून ती तेथून निघून गेली. सीमाच्या जिवाचा संताप- संताप झाला. एवढा घोर अपमान!…” मीच मूर्ख!” पुटपुटत तिनं मान वळवली.

‘पहिल्यापासूनच ही मस्तवाल आहे’. तिचं विचार चक्र चालू झालं.’ मान्य आहे की ही गर्विष्ठ मुलगी….अलकनंदा उर्फ चेरी होती दिसायला शाळेत सर्वात सुंदर…. अभ्यासात पहिला नंबर न सोडणारी…. आणि हो ,सर्वात श्रीमंत सुद्धा! ड्रायव्हर तिला मोठ्या कारमधून  शाळेत सोडायला आणि घेऊन जायला यायचा. पण… पण त्याचं आत्ता काय? मला तिने बहुतेक ओळखलं होतं… मग दोन शब्द हसून बोलण्यानं तिचं काही बिघडणार होतं ?….जाऊ दे ,म्हणून सोडला तरी सीमाच्या मनातून चेरीचा विषय जात नव्हता.

साधारण दोनेक महिन्यानंतरची गोष्ट .सीमाला त्यांच्या लेटर बॉक्स मध्ये एक जाडजूड पाकीट मिळालं. उघडलं, तर एक पाच पानांचं मोठं पत्र .पत्राच्या शेवटी लिहिलं होतं , ‘अभागी चेरी.’ सीमाचा राग उफाळून आला. म्हणजे ती चेरीच होती…हट् आलीय मोठी तालेवार!…अभागी म्हणे….नौटंकी करतेय….

टेबलावर भिरकावून दिलेले पत्र, नंतर कधीतरी तिनं कुतूहलापोटी वाचायला घेतलं….आणि भारावून गेल्यागत ती वाचतच राहिली.

आपण तिला एक घमेंडखोर ,श्रीमंती तोर्‍यात वावरणारी ,इतर मुलींना तुच्छ लेखणारी, शिष्ठ मुलगी समजत होतो ..किती चूक होतो आपण! सीमाचं मन तिला खाऊ लागलं. रात्री अंथरूणावर आडवी झाली तरी ती अस्वस्थच होती. तिच्या मनातून चेरीचे ते पत्र जाईचना. त्यातली एक एक वाक्यंं तिला जास्ती जास्ती बेचैन करत होती. ‘तू पत्र न वाचता फाडून टाकलस तरीही ते चूक ठरणार नाही .’माझ्या त्या दिवशीच्या वागण्यानं तू मला असभ्य समजू शकतेस.’ ‘तुम्हा मैत्रिणींना माहित नव्हतं पण तेव्हाही मी सप्रेस्ड, दब्बू अशीच मुलगी होते.’ ‘ शेजारच्या तुझ्या बंगल्याच्या लेटर बॉक्समधे पत्र टाकणं हे ही माझ्या दृष्टीने एक मोठं धाडसच आहे.’

‘बापरे, कसलं हे कैद्यासारखं जीवन.’ सीमाचे विचार चालू झाले .मग तिला पडून रहावेना. उठून तिनं पत्र हातात घेतलं आणि त्यातली अक्षरंं पुन्हा तिच्याशी बोलू लागली……

अगं या घरातच काय पण माहेरीही मी दबावाखालीच जगत होते. तुला मी कशी विसरेन गं ?दहावीपर्यंत आपण एकाच वर्गात शिकलोय .तुमचा तो ‘पंचकन्यांचा बिंदास ग्रुप!’… मला तुमचा फार हेवा वाटायचा. माझ्यावरची बंधनंं मला टोचायची. इतरांना रुबाब वाटला तरी माझं कारनंं येणं जाणं हेही एक बंधनच होतं.

माझ्या बाबांचा डायमंडच्या बिझनेस!…. खूप वैभव मी अनुभवलं …..आणि आताही अनुभवतेय .त्यात सुख असतं गं, पण समाधान आनंद नसतो .स्वतःच्या मनातले बोलण्याचा, मनासारखे वागण्याचाअधिकार, तसाही आमच्यासारख्या अर्थोडॉक्स मारवाडी समाजात मुलींना नसतो. भरभरून जीवन जगणं मला माहीतच नाही. मला डॉक्टर व्हायचं होतं. पण मी बारावीत असतानाच बाबा वारले आणि घराची सत्ता भय्या -च्या हातात आली. त्याचा माझ्या शिक्षणाला विरोध होता. त्यामुळे मग मला बीएससीवरच समाधान मानावं लागलं. घरात तर त्यापूर्वीच वरसंशोधन सुरू झालं होतं.शिक्षण संपल्यानंतर आयुष्याच्या पुढचा टप्पा म्हणजे लग्न !

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाहुली…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख

? जीवनरंग ?

☆ बाहुली…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆ 

तो आज जाम खूश होता. आजच गर्भलिंग चाचणी करून आले होते . डॉक्टरांनी एकच शब्द उच्चारला “अभिनंदन अजितराव !” बस्स! एवढ्या एका शब्दानं अजितला आभाळ ठेंगणं झालं होतं. काय करु अन् काय नको असं झालं होतं. सुमित्राची आता नीट काळजी घेतली पाहिजे. जेवण,खानपान, येणंजाणं सर्व काही लक्षपूर्वक केलं पाहिजे.

याच विचारात गर्क होऊन तो नेहमी प्रमाणेच आरशासमोर दाढी करत उभा होता. आवडतं गाणं गुणगुणत. गालावरून हात खाली येईल तसा आणखीन रंगात यायचा, आणखीन जोरात गाणं गुणगुणायचा. तेवढ्यात एक छोटीशी, सुंदर बाहुली त्याला आरशात दिसू लागली. गोल चेहऱ्याची, नाजूक गुलाबी ओठ, टपोरे पिंगट डोळे,गोरे गोबरे गाल, काळे कुळकुळीत केस. एक बट हळूच डोळ्यावर रेंगाळणारी. बाकीचे केस डोक्यावर घेऊन सुंदरशा बो मध्ये बांधलेले. ओठावरचं मोहक हसू पाषाणह्रदयालापण पाझर फुटवणारं! किती गोड, किती मोहक, किती सुंदर ……..

अजित त्या बाहुलीकडे एकटक पाहत राहिला…अगदी भान हरपून….जणू ती त्याच्याकडे बघूनच स्मीत करत आहे. असं त्याला वाटलं. तो गरकन वळला. बाहुली घेण्यासाठी हात पुढे करतो तोच तिचा चेहरा रक्ताने माखू लागला. हळूहळू रक्त खाली ठिपकू लागलं. अन् बघता बघता तिचं डोकं छिन्न विछिन्न होऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळलं तसा तो ओरडत उठून बसला. अंग घामानं पूर्ण भिजलेलं, नजर सैरावैरा धावत होती,  त्या बाहुलीचा शोध घेत. हातपाय थरथर कापत होते. घशाला कोरड पडली होती.

त्याच्या ओरडण्यानं सुमित्रापण  जागी झाली. लाईट लावून बघते तर तिचा नवरा धापा टाकत,  घाबरलेल्या नजरेने काही तरी शोधत होता. “अहो काय झालं?”….तिच्या हाकेनं तो आणखीन दचकला. सुमी त्याच्या जवळ जाऊन त्याला शांत करू लागली. थोडं पाणी दिलं . तसा तो थोडासा भानावर आला.

“पुन्हा तेच स्वप्न का?” तिचा केविलवाना प्रश्न.

त्याने मानेनेच होकार भरला.

आता पर्यंत घरातली सगळीच जागी झाली. खोलीचं दार वाजलं. सुमीनं दार उघडताच सासुबाई धावतच आत आल्या. “काय झालं गं सुमी?.. तू बरी आहेस ना…!”

“मला काही नाही झालं .ह्यानांच भयानक स्वप्न पडत आहेत.”

“हत्तेच्या एवढंच ना ..!त्यात काय एवढं ओरडण्या सारखं?”

“तसं नाही मामांजी. तीच तीच भयानक स्वप्न सारखी सारखी येत आहेत. ऐकल्यावर जीव घाबरा होऊन जातो माझापण.”

अजित अजून भारावल्या अवस्थेतच. शून्य नजरेन एकटंक जमीनीकडे बघत बसलेला.

“तुम्ही दोघंपण थोडावेळ बसा इथंच मलापण खूप भीती वाटतेय.” तिने विनंती केली. तशी दोघ बाजूच्या बाकड्यावर बसली. रात्र अशीच संपून गेली.

सकाळी नेहमीप्रमाणे तो अॉफीसला जाण्यासाठी निघाला. रात्रीच्या गोंधळाची झलक डोळ्यात अजून तरळत होतीच. मनाच्या एका कोपऱ्यात भीतीच सावट मूळ धरत होतं.

सुमित्राला दिवस गेले होते. डॉक्टरांनी मुलगा असल्याची खात्री दिली होती .त्यामुळे सगळी खूप आनंदात होती. पहली मुलगी होतीच पाच वर्षांची. आणि आता मुलगा आहे म्हटल्यावर सगळे तिची खूप काळजी घेत होते. सासू,सासरे,नवरा अन्  माहेरचीपण सगळीच तिला तुपात घोळत होती. तीपण आनंदात होती नव्या पाहुण्याचे स्वागत कसं करायचं याच विचारात ती गूंग असायची.

पण आता अजितच्या स्वप्नांमुळे ती थोडीशी चिंतीत झाली होती. एकसारखीच भयानक स्वप्नांमुळे त्याच्याइतकच तीपण घाबरली होती. यामाग काहीतरी कारण आहे हे नक्की पण काय हे काही कळेना त्यामुळे जास्तच भय निर्माण झालं होतं.

दिवसेंदिवस अजितच्या स्वप्नांची भयानकता वाढू लागली. कधी ती बाहुली वरून एकदमच त्याच्या अंगावर येऊन पडायची,तशीच रक्ताळलेल्या अवस्थेत, कधी तिचे तुकडे,तुकडे होऊन त्याच्याभोवताली गोल गोल फिरत असल्याचा भास त्याला होत होता. तर कधी तोच बाहुलीच्या शरीराचे एकेक अवयव तोडून टाकताना तो स्वतःला पहायचा. किती भयानक, किती विक्षिप्त, किती अवर्णनिय…..

त्या दिवशी तर कहरच झाला. नेहमीप्रमाणे तो अॉफीस मध्ये बसून काम भरभर संपवण्याच्या घाईत होता. जवळच्या टेबलावरचे चव्हाण त्याला सारखं वेळ संपत आल्याची जाणीव करून देत होते. “अरे आवर लवकर, अॉफीस सुटायची वेळ झाली. तरी तू आपला फाईलीत तोंड खुपसून बसला आहेस.”

“अरे झालंच रे, फक्त दोन मिनिटं”  तो उत्तरला

अन् पुढच्याच क्षणी पेनमधून रक्ताचे थेंब ओघळताना दिसू लागले अन् बघताबघता संपूर्ण कागद रक्ताळून गेला. तो किंचाळून उठला आणि अॉफीसभर सैरावैरा पळू लागला. तो जाईल तिथं रक्ताळलेला कागद त्याच्या पुढ्यात हजर… काय करावे सुचेना …..या दारातून त्या दारात असा तो पळतच राहिला. अॉफीस मधील सगळेजन मात्र त्याची अवस्था बघून अचंबित झाली. काय झालय कोणालाच काही कळेना. कारण तो रक्ताळलेला कागद फक्त त्यालाच दिसत होता. बाकीतर सारे फक्त त्याला सैरावैरा पळताना बघत होते. शेवटी एकाने त्याचा हात धरून थांबण्याचा प्रयत्न केला अन् तो तिथेच भोवळ येवून खाली पडला. सगळ्यांनी मिळून त्याला दवाखान्यात नेले.

काही दिवस दवाखान्यात उपचार घेतल्यावर तो घरी आला. पंधरा दिवसाची सुट्टी घेतली होती. आराम करण्यासाठी. पण त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. दवाखान्याच्या औषधाबरोबर बुवा बाबाचा इलाजपण चालू होता. पण कशालाच यश येईना अन् कारण काही कळेना.

त्या रात्री मात्र अघटीत घडलं. रात्रीचे दोन वाजले असतील. अजितला अचानक जाग आली ….नव्हे कोणीतरी हलवून हलवून उठवत होतं त्याला. तीच होती. ती बाहुली.

“उठा झोपताय काय…..मला कायमचं झोपवलत..पण  मी नाही तुम्हला झोपू देणार….”

ती बोलत होती आज…..त्याला काहीच कळेना…तो स्वप्नात आहे का जागेपणीच ती त्याच्याशी बोलत आहे…… तो पार घाबरलेला…..

“अगं कोण तू…का छळतेस मला…काय वाईट केलय मी तूझं ???” प्रश्नच प्रश्न…आणखीन काय बोलणार तो..?

“काय वाईट केलय ?  जीव घेतलात तुम्ही माझा…. “रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिच्या डोळ्यातून रक्त मिश्रीत अश्रू गालावर ओघळत होते.

“मी आणि जीव घेणार, कसं शक्य आहे. साधं मछर सुद्धा मारायचं धाडस होत नाही माझ्याच्यानं अन् तुझा जीव काय घेतोय मी….?”

ती हसू लागली. तिच्या विकट हास्याने खोली हादरून गेली.

“विसरलात इतक्यात…… मागच्याच वर्षी तुम्ही माझ्या शरीराची खांडोळी खांडोळी करून मारून टाकलंत मला. माझ्या आईच्या पोटातच. आईने किती विरोध केला. पण ऐकला नाहीत तुम्ही. मुलगी नको म्हणून…आणि आता मुलगा आहे म्हणून तिची काळजी घेताय…जपताय तिला….मी त्याला जन्मूच देत नाही. माझी जशी खांडोळी झाली तशी त्याची पण करून टाकते.” असं म्हणतं ती उंचावरून वेगाने सुमीच्या पोटावर वार करण्यासाठी बाणासारखी कोसळू लागली. तसा तो लगेच आडवा झाला. तिला थांबवलं. त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो ओरडला “थांब…..थांब…मला…..मला….. वेळ दे थोडा.”

ती थांबली. “आता बोला… मी काय वाईट केलतं तुमचं की जन्मायच्या आधीच तुम्ही मला संपवून टाकली. काय गुन्हा केलाय मी सांगा…? मला जन्मायचं होतं, हे जग बघायचं होतं, आईच्या कुशीत लपायचं होतं, तुमच्या बोटाला धरून चालायचं होतं… किती स्वप्न पाहिली होती मी…पण …काय केलंत तुम्ही……माझ्या शरीराबरोबर माझ्या स्वप्नांच्या सुद्धा चिंध्या करून टाकलात…..काय वाईट केलतं मी तुमचं….. ?”  तिला पुढचं बोलवेना…ती ओक्साबोक्षी रडू लागली…..

अजितला त्याची चूक उमगली. भयंकर गुन्हा त्याच्या हातून घडला होता. आपण सुशिक्षित, सुसंस्कृत असून देखील कसं रानटी राक्षसासारखं वागलो !……त्याचं त्याला हे सगळं अपमानास्पद वाटू लागलं…..तो रडू लागला..त्या छोट्याशा बाहुलीसमोर कळवळून बोलू लागला……” बाळा मी अंधळा झालो होतो. मुलगाच पाहिजे म्हणून हट्टाला पेटलो होतो. चुकलं माझं, माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला. मी तुझा गुन्हेगार आहे. मला हवी ती शिक्षा कर. मी तयार आहे…….”

तो दोन्ही गुडघे टेकून तिच्या पुढे हात जोडून रडू लागला…. “हं…मी काय शिक्षा करणार , तुमच्यासारख्या कित्येक हट्टी माणसांमुळे माझ्या सारख्या अनेक मुली शिक्षा भोगत आहेत. कोणताही गुन्हा न करता…मी काय शिक्षा करणार…!”तिचा खिन्न आवाज त्याच्या जिव्हारी लागला. तिची जगण्याची तळमळ त्याला जाणवत होती. तो म्हणाला…”पोरी…. परत ये…..तुझ्या आईच्या कुशीत परत ये…..मी तुला कधीच अंतर देणार नाही…..परत ये पोरी…. परत ये……..!”तो बोलत राहिला…..

त्याच्या विनवणीने ती कासावीस झाली…..तिने आकाशाकडे पाहिले तसं..गडगडाट सुरू झाला….विजा चमकू लागल्या…..बेभान पाऊस बरसू लागला…..जणू…त्याच्या विनवणीने नियतीला सुद्धा पाझर फुटला……क्षणातच त्या बाहुलीचे रुपांतर एका तेजस्वी ज्योतीत झाले अन् ती ज्योत हळूहळू सुमीच्या पोटाजवळ जावून तिच्या उदरात सामावून गेली………

असेच काही दिवस गेले. अजित आता पूर्ण बरा झाला होता. ती रात्र फक्त त्याने अन् त्याच्या जन्माला येणाऱ्या कन्येनेच अनुभवली होती. तो शांत होता. तिच्या येण्याची वाट पाहत होता.

आज पहाटेच सुमीला कळा सुरू झाल्या. दवाखान्याची लगबग चालू झाली. तातडीने तिला अॉपरेशन थेटर मध्ये घेण्यात आले. काही वेळातच एक छोटंसं बाळ हातात घेऊन एक नर्स बाहेर आली. “मुलगी झाली..किती गोड आहे बघा…!” ती म्हणाली. तसे घरातली सगळी एकमेकांकडे थोड्याशा नाराजीने अन् प्रश्नांकित नजरेने पाहू लागले. अजितने मात्र आनंदाने, उत्साहाने बेभान होऊन तिला कुशीत घेतले. इतरांच्या नाराजीची त्याला बिलकूल पर्वा नव्हती. तो तिला हातात घेऊन निरखू लागला. ती तशीच होती,अगदी बाहुली सारखी…गोड…सुंदर….लाघवी… ! त्याने कुशीत घेताच ती गोड हसली..अन् तो प्रेमाने तिचे पापे घेऊ लागला. डोळ्यातूनपण  अश्रूरुपाने आनंद ओसंडून वाहत होता. त्याच्या मागून येणाऱ्या डॉक्टरच्या माथ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते. बाबाची बेबी कशी झाली याचं रहस्य काही त्यांना उलगडत नव्हतं. ते अजित कडे बघून म्हणाला, “मला काही कळेना तुम्हाला काय सांगावं,हे कसं काय झालं?”

“डॉक्टर साहेब, मी फार खूश आहे. माझ्या मुलीनं माला माफ केलं. मी आता गुन्हेगार नाही.” अजित उत्तरला.

 बाप लेक एकमेकांकडे बघून हसत होती.अन् डॉक्टर आळीपाळीन त्या दोघांकडे बघत होते.पण ते रहस्य मात्र कुणालाच कळू शकलं नाही…शेवट पर्यंत…!

जल है तो कल है।

बेटी है तो फल है।।

© सौ. जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुखवटे – सुश्री शिल्पा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ?

मुखवटे – सुश्री शिल्पा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

जगाच्या कानाकोपर्‍यातून जमलेल्या सगळ्या नातेवाईकांच्या गाठीभेटी. सिऍटलमधे नुकताच पार पडलेला पुतण्याचा मनोरम्य हृदयस्पर्शी  लग्नसोहळा. एकत्र आलेली दोन कुटुंबे आणि दोन् भिन्न संस्कृतींचा संगम. आणि आता  लग्नघरातून परतताना जडावलेली पावले. 

सिऍटलहून विमानप्रवास करुन आम्ही फिनीक्स स्कायहार्बरवर उतरतो. सामान गोळा करुन बाहेर येतो.  माझा नवरा उबर टॅक्सी बोलावतो. ती पाच मिनिटात येते. सामान ट्र्ंकमधे ठेवले जाते. मी माझ्या सासर्‍यांना हात धरुन पुढच्या सीटवर बसवते. पट्टा लावून देते. मागच्या सीटवर माझा नवरा, मुलगी आणि मी असे स्थानापन्न होतो. एकदम नवीन असलेल्या आलिशान लेक्ससमधून पोटातले पाणीही न हलता आम्ही निघतो. पोटातले पाणी स्थिर राहाते तसे डोक्यातले विचार मात्र कितीही सुखदायी गाडी असेल तरी स्थिर कुठे राहतात? माझ्या डोक्यात चक्रे सुरु होतात. 

आधी घरी गेल्या गेल्या काहीतरी गरम जेवण बनवायला हवे असते. कोणीच दुपारचे जेवलेले नसते. ब्याऐंशी वर्षांचे वृद्ध सासरेही थकलेभागलेले दिसत असतात.  मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी करु हे मनाशी ठरते. कपडे धुवायला लावायला हवे असतात. दुसर्‍या दिवशी सकाळी कामासाठी लगेच निघायचे असल्याने त्याचीही तयारी करायची असते. लॉसएंजेलिसला सकाळी लवकारची फ्लाईट असते. त्याचे चेकइन मी फोनवरून लगेच करून घेते. कामाच्या जागी देण्यासाठी काही डॉक्युमेंट्स बनवायची असतात. दोन आठवड्याने असलेल्या युजर कॉन्फरन्साठी तयारी करायची  असते. टॅक्सीत बसल्या बसल्या मनातल्या मनात माझे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवणे सुरु होते.  त्याच्या दुसऱ्या स्लाईड पर्यंत मी येते. 

“तुम्ही एअरफोर्समधे आहात?” माझा नवरा उबरवाल्याला विचारतो. त्याचे नाव शेन असते.  त्याने सामान ठेवताना तिथे एरफोर्सचा  युनिफॉर्म ट्रंक मधे बघितलेला असतो. शेन म्हणतो, “येस… मी फ्लोरिडा आणि टेक्ससमधल्या  एअरफोर्सबेसवर कॅडेट इन्सट्र्क्टर आहे.” तो इतर माहीतीही देतो. फिनिक्सपासून शंभर मैलावर त्याचे घर असते. तो फुटबॉल गेम बघायला आलेला असतो आणि आता जाता जाता काही उबर बिझिनेस मिळाला, तर तो करुन तो रात्रीचा घरी परतणार असतो. “या महागड्या गाडीची किंमत भरुन काढण्यासाठी उबर चालवण्याचा धंदाही तो करतो साईडला” हेही तो हसतहसत सांगतो. एअरफोर्स म्हटल्यावर माझ्या डोक्यातले पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन थांबते. पाचव्या स्लाईडला मी बुकमार्क करते. संभाषणात मधेच पडून मी त्याला सांगते की त्याच्याशेजारी इंडिअन एअरफोर्समधला फेलो सर्व्हिसमन बसला आहे. माझे सासरे एकेकाळी इंडिअन एअरफोर्समधे रडार इंजिनिअर असतात. मग त्या योगायोगाबद्दल आश्यर्य व्यक्त केले जाते. दोघेही एकमेकांच्या कामाबद्दल चर्चा करतात. १९६२ साली ते कसे मिसिसिपीला आलेले असतात ह्याची देवाणघेवाण होते.  शेन अभिमानाने त्याची मुलगी एम्बरी रिडल युनिव्हर्सिटीत पायलट बनण्याचे शिक्षण घेत असल्याचे सांगतो. 

मी पाचव्या स्लाईडकडे परत वळते. इतक्यात पुढून परत एक प्रश्न येतो. मागच्या सीटच्या रोखाने. “So  what do you do?” माझ्याही नकळत मी उत्तरासाठी तोंड उघडते. पण तो प्रश्न हवेत असतानाच, बाउंड्रीवर बॉल पकडावा, तसा अलगद माझ्या नवऱ्याने केंव्हाच झेललेला असतो. तो त्याचे प्रोफेशन आणि सर्व काही विशद करून सांगू लागलेला असतो. माझे उत्तर देण्यासाठी उघडलेले तोंड बंद व्हायला वेळ लागतो. नवऱ्याचे उत्तर देऊन संपते. टॅक्सीत थोडावेळ शांतता पसरते. मग माझी मुलगी कुठल्या शाळेत आहे, हवामान कसे बदलते आहे याची चर्चा सुरु होते.  

माझ्या पॉवरपॉइन्टच्या स्लाईडचा बुकमार्कच हरवून जातो. जे काही क्षणाभरापूर्वी घडले ते माझ्या डोक्यात फेर धरू लागते. “तुम्ही काय करता”, हा प्रश्न किती सहजपणे फक्त मलाच विचारला असणार असे नवऱ्याला वाटलेले असते. उबरवाल्यानेही तो रिअर व्ह्यू आरशात बघत त्यालाच विचारला हा त्याचा दावा असतो. माझ्या नवऱ्याने उत्तर दिल्यावर मला काही विचारावे असे त्या उबरवाल्याला वाटलेलेही नसते की जास्त चौकशा नकोत म्हणून तो गप्प असतो? की बायका, त्यातूनही भारतीय, कदाचित काही करत नसाव्यात असे त्याला वाटले असावे. त्याने मला विचारले नाही ह्याचे शल्य असते असेही नाही. आणि असेही नसते की त्याने जाणूनबुजून हे केलेले असते. त्यातूनही त्याची स्वतःची मुलगी तर आता पायलट बनत असताना असे बुरसटलेले विचार कुणाचे असावेत हेही पटत नाही. मग हे नेमके असते तरी काय? की हि विचारसरणी कुणा एखाद दुसऱ्या माणसाची नसून हे समाजमनाचे प्रतिबिंब असते म्हणून मला जास्त खटकते? जागा-वेळ-काळ-देश बदलेले तरी त्या टॅक्सितल्या दोन पुरुषांनी किती प्रातिनिधिक स्वरूपात समाजमनाचे दर्शन दिले असे मला वाटून जाते. 

आमचे घर येते. माझ्या सासऱ्याना हात देऊन मी खाली उतरवते. ते उतरत असताना, शेन माझ्या सासऱ्याना म्हणतो, “Thank you for your service for the country, no matter what the country is.” मी त्याचे मनापासून आभार मानते आणि म्हणते, “Yes , but as for airforce, there is only one sky, and we all share it, no matter what country it is.” तोही मनापासून हसतो आणि संमतीदर्शक मान हलवतो. टॅक्सी निघून जाते. 

पुढे मला हेही म्हणायचे असते कि,  की याच आकाशात तुझी मुलगी पायलट होऊन उडणारे आणि याच आकाशाखाली कित्येक कर्तबगार स्त्रिया या जगाचे रहाटगाडगे नीट चालावे म्हणून कष्ट करत आहेत आणि यशस्वी होत आहेत. मात्र ते मनातल्यामनात राहून जाते. 

मी घरात येते. बॅगा ठेऊन हात धुऊन खिचडी फोडणीला टाकायला घेते. गौरी नुकत्याच होऊन गेलेल्या असतात. उभ्याच्या गौरींचे दोन मुखवटे असतात म्हणे.  त्यातला घर सांभाळणाऱ्या गृहिणीचा, या संध्याकाळसाठी मी तोंडावर चढवते. आणि दुसरा कोर्पोरेट एक्झिक्युटिव्हचा,  दुसऱ्या दिवसाच्या फ्लाईट साठी ठेऊन देते. 

देवघरात ठेवलेल्या आदिमाया-शक्तीची साग्रसंगीत पूजा, उपास-तापास नवरात्रीचे दिवस असल्याने घराघरात सुरु असतात.  

आणि एकीकडे खिचडीच्या फोडणीसोबत माझ्या पॉवरपॉईंट स्लाईड्स खमंग बनू लागतात. 

ले.: सुश्री शिल्पा कुलकर्णी 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बोधकथा – कर्माची परतफेड ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? इंद्रधनुष्य ? 

☆ बोधकथा – कर्माची परतफेड ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

एकदा एका राजाने आपल्या तीन मंत्र्यांना,  “ तुम्ही जंगलात जाऊन एक एक पोते भरून फळे घेऊन या “, असा आदेश दिला. 

पहिल्या मंत्र्याने विचार केला की, प्रत्यक्ष राजानेच आपल्याला फळे आणायला सांगितली आहेत, म्हणून आपण चांगल्या प्रतीचीच फळे घेऊन गेले पाहिजे. त्याप्रमाणे त्याने चांगली फळे शोधून घेतली.

दुसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजाने सांगितले आहे तर खरे, पण राजा तर इतर कामात इतका व्यस्त असतो की, तो कशाला एक एक फळ तपासून पाहणार आहे? म्हणून त्याने मिळतील ती चांगली वाईट फळे आणली.

तिसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजा कशाला पोते उघडून पाहणार आहे की, त्यात फळे आहेत की आणखी काही ? तो तर बाहेरून फक्त पोत्याचा आकार पाहील, म्हणून त्याने जंगलात न जाताच पाला पाचोळा आणि फळांच्या आकाराचे दगड धोंडे भरून आणले.

दुसऱ्या दिवशी तिघेही मंत्री आप आपली पोती घेऊन दरबारात हजर झाले. फळे काय आणि किती आणलीत हेही न पाहता राजाने प्रधानजींना आदेश दिला की, या तिघांनाही राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी एक महिना स्थानबद्ध करण्यात यावे आणि त्यांनी जमा करून आणलेल्या फळां व्यतिरिक्त इतर आहार त्यांना देण्यात येऊ नये.

पहिल्या मंत्र्याने चांगली फळे जमा केली होती, त्यामुळे त्याने चांगली फळे खात खात एक महिना मजेत घालवला.

दुसऱ्या मंत्र्याने जी काही चांगली फळे जमा केली होती त्यावर थोडे दिवस चांगले घालवले पण पुढे कच्ची आणि सडलेली फळे खावी लागल्यामुळे तो आजारी पडला.

तिसऱ्या मंत्र्याने दगडधोंडेच जमा करून ठेवल्यामुळे त्याची तर पहिल्या दिवसापासूनच उपासमार झाली.

तात्पर्य :~

चांगल्या वाईट कर्माचे फळ योग्य वेळ येताच त्याच्या त्याच्या कर्त्याला न चुकता शोधून काढते.

 

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुनरागमन… ☆ श्री बिपीन कुलकर्णी

श्री बिपीन कुलकर्णी

 

? जीवनरंग ?

☆ पुनरागमन… ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆ 

घरात श्री च्या प्राण प्रतिष्ठेची गडबड. माझ्या आठवणीत आम्हा भावंडाना भाऊंकडून बारीक बारीक सुचने बरोबरच हे केलं कां ..? ते का नाही केलं ..? असंच कां ? तसंच कां? वगैरे सुरु असायचं. सगळं त्यांच्या सूचनेबर चालवून घ्यावं लागायचं. आई मात्र शांत असायची नजरेतून बोलायची आणि आमच्या कपाळावरच्या आठ्या विरून जायच्या.

आज हा पारंपरिक सणांचा, व्रत-वैकल्याचा धार्मिक वसा भाऊ, आई, काका ह्यांच्या कडून आमच्या पिढी कडे आला. त्या बरोबरच भाऊंचा हा स्वभाव वारसा जणू हक्काने माझ्याकडे. मुलं म्हणतात पण … बाबा, तुम्ही सुद्धा ना …अगदी भाऊंसारखे…!!!  मी चमकतो. अरेच्या…! “खरंच की”. पण त्याचवेळी जाणवतं कीं आपल्या अगोदरची पिढी किती बारीक सारीक विचार करायची. त्या वेळी जेंव्हा केव्हां अश्या प्रकटलेल्या विचारातून त्यांचा हेकेखोरपणा नाही, तर त्या त्या कृतीतून होऊ शकणाऱ्या चुका टाळण्याची कदाचित ती धडपड असावी.

क्षणभर मनात विचार येतो की भाऊंचे पैलतीरावरून  पुनरागमन की मला दिसू लागलेला पैलतीर…??

 

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र- मी स्वप्न पाहिलं होतं ते फक्त कर्तव्यपूर्तीचं आणि कितीही यश आणि ऐश्वर्य प्राप्त झालं तरीही न उतण्या-मातण्याचं त्या स्वप्नाची पूर्तता हेच माझं जीवन ध्येय होतं आणि ते ध्येय साध्य झाल्याचं समाधान हीच माझ्या उर्वरित आयुष्याला पुरूनही उरुन राहील अशी कृतार्थता..!

मला मिळालेली ही स्वस्थताच माझ्या मुलाला उत्तुंग स्वप्ने पहात उंच झेपावण्यासाठीचं विस्तिर्ण आकाश देऊ शकली.)

पिढीनुसार फक्त परिस्थितीतच नाही तर मुलांच्या आचारा-विचारातही फरक पडत जातो. तसा तो माझ्या मुलाच्या बाबतीतही पडत असणारच हळूहळू. पण त्याचं संगोपन करत असताना,तो मोठा होत असताना, त्याच्या आचार-विचारातला फरक आम्हाला फारसा जाणवलाच नव्हता. आमच्या पिढीतल्या बऱ्याच आई-बाबांचे संपूर्ण व्यवधान, मुलांची संख्या मर्यादित असल्यामुळे असेल, पण त्यांच्या मुलांभोवतीच केंद्रित झालेले असे.त्यांच्या प्रत्येक हालचालीवर,  प्रत्येक निर्णयावर,प्रत्येक मतांवर त्यांच्या आई-बाबांना कांही ना कांही म्हणायचे असायचेच. मित्रांच्या गप्पात डोकावून आई-बाबा एखादं वाक्य जरी बोलले तरी त्यांच्या मुलांना ते रुचायचं नाही. मुलं मग त्यांच्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त करीत रहायची.पालक म्हणून मुलांच्या बाबतीतली जागरुकता कितीही आवश्यक असली, तरी त्यांच्या ‘स्पेस’मधे आपण अतिक्रमण तर करीत नाही ना याचे भान पालकांकडून बऱ्याचदा राखले जात नसे.यातील ‘स्पेस’ या शब्दाचा आणि अपेक्षेचा जन्म आमच्या सलिलच्या पिढीतलाच. आमच्या लहानपणी कुठल्याच वयोगटाची ‘ स्पेस ‘ ही गरज नसायचीच. तेव्हाची घरं म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’अशीच. खूप नंतर हळूहळू शेजारही ‘परका’ होत चाललाय, पण त्या काळी मात्र वाडा संस्कृतीतला शेजार एकमेकांच्या घरात घरच्या सारखाच वावरे.

या पिढीत त्यामुळेच असेल मुलं मित्रांमधेच जास्त रमतात. शिवाय मनातल्या बारीक-सारीक गोष्टीही मोकळेपणाने आई-बाबांशी नाही तर मित्रांशीच बोलून मन मोकळं करतात. आमच्याबाबतीत तरी हा प्रश्न कधीच येणार नाही असं आपलं आम्हाला वाटत होतं. कारण सलिल मित्रात रमायचा, त्याच्या मित्रांचं आमच्या घरी जाणंयेणं असायचं, तरीही तो आमच्याशीही मोकळेपणाने बोलायचा. पण त्यादिवशी मात्र आमच्यातला संवाद नकळत का होईना तुटत चाललाय का अशी एक पुसटशी शंका माझ्या मनात डोकावून गेलीच.सलिल सातवी- आठवीत असतानाची ही गोष्ट. रविवारचा दिवस होता.संध्याकाळ  होत आली तसे त्याचे तीन चार मित्र त्याला खेळायला बोलवायला आले. आमच्या घरासमोरच्या विष्णूघाटावरील ग्राउंडवर त्यांचा क्रिकेटचा ‘रियाज’ तासनतास चालायचा. रविवारीच नाही फक्त तर रोज संध्याकाळी. त्या दिवशी  हॉलमध्ये त्याच्या मित्रांच्या गप्पा रंगलेल्या. मी बाहेर जाण्यासाठी म्हणून हॉलमधे आलो तेव्हा सलिलच बोलत होता आणि तो मला पाहून बोलता-बोलता वाक्य अर्धवट सोडून कावराबावरा होऊन बघत राहिलेला. मी आपलं हसून दार उघडून निघून गेलो तरी माझं ते हसणं वरवरचंच होतं.’हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय का’ हीच अनाठायी शंका मनात ठाण मांडून बसलेली. मी परत येईपर्यंत टीम क्रिकेट खेळायला गेलेली होती. मी माझ्या मनातली शंका आरतीला बोलून दाखवली तेव्हा ती हसलीच एकदम.

” काही नाही हो. त्यांच्या त्यांच्या गप्पा असतात. आपण लक्ष नाही द्यायचं ”

” हो पण त्याने तरी लपवायचं कशाला?”

” त्यांची खेळाची नियोजनं असतात ती.किंवा इतर विषय. आपण प्रत्येक गोष्ट सांगत बसतो का त्याला. आवश्यक असेल तेवढंच सांगतो. हो ना? मुलांचंही तसंच असतं. त्याला सांगावसं वाटतं ते तो न विचारताही सांगतो.”

“अगं पण..”

“हे बघा, ‘तू कितीही वेळ खेळ पण अभ्यास झाल्याशिवाय मी टीव्ही बघून देणार नाही आणि झोपूनही देणार नाही हे लक्षात ठेव.’असं एकदा सांगितलंय न् तो ते करतोय. मग काळजी कसली?”

तिचं त्याच्यावर आवश्यक तेवढं लक्ष होतं म्हणून मी निश्चिंत असायचो. पण त्याचा दहावीचा रिझल्ट लागला आणि त्याची वकिली करायची जबाबदारी मोठ्या विश्वासाने त्याने माझ्यावरच टाकली. कारण वकिली करायची होती ती त्याच्या आईकडे..!

तोवर दहावीनंतर पुढे काय करायचं, कोणत्या साईडला जायचं, पुढे त्याने काय व्हायचं हे त्याला गृहीत धरून हिने मनोमन ठरवूनच टाकलेलं होतं. त्याला सायन्स आणि मॅथस् मधे खूप चांगले मार्क्स होते तसेच चारही भाषांमधेही. ‘ अवांतर वाचनाची आणि क्रिकेटची टोकाची आवड वर्षभर बाजूला ठेवून त्याने मी सांगते म्हणून अभ्यास एके अभ्यास केला असतान एक वर्ष भर, तर तो बोर्डातही आला असता’ यापेक्षाही आपला बोर्डातला नंबर थोड्याच मार्कात हुकल्याचं त्याला काहीच वाईट वाटत नाही याचं हिला वाईट वाटत होतं आणि रागही येत होता. तरीही काही न बोलता ती शांत होती.त्याने सायन्सलाच जायचं हे तिने ठरवलं होतं म्हणण्यापेक्षा गृहितच धरलेलं होतं. कारण चांगलं करिअर म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर हे सर्रास गृहीत धरलेलं असण्याचा तो काळ.त्यातून अनेक वर्षे शिक्षकी पेशात ती विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका  म्हणून कार्यरत.शाळेतले तिचे शिष्य प्रत्येक गोष्ट तिला विचारुन करायचे. त्यामुळे सलिलच्या बाबतीतला योग्य तो निर्णय तिने स्वतःशी घेऊन ठेवलेलाच होता. त्यात गैर असं कांही नव्हतंही.पण त्यामुळेच आज सलिलची वकिली तिच्याकडे करायची वेळ मात्र माझ्यावर आली होती. कारण त्याला सायन्सला जायचंच नव्हतं.

त्यालाही त्याचा म्हणून काही एक विचार आहे, त्याची काही स्वप्नं आहेत, हे मला त्याच्याबाबतीत जाणवलं ते त्यावेळी प्रथम.

“बाबा, तुम्ही सांगा ना आईला. ती तुमचंच ऐकेल. मला सायन्सला जायचं नाहीये. “

“मग कुठे जायचंय?”

“कॉमर्सला”

“कॉमर्सला ?”मला आश्चर्यच वाटलं.”कॉमर्सला का?”

“असंच”

त्याच ‘असंच ‘ हे उत्तर मला स्विकारता येईना.काय बोलावं तेही सुचेना.निर्णय घ्यायला एक दोन दिवसांचा अवधी होता. तोवर त्याची समजूत काढता येईल असा मी विचार केला.

“हे बघ,तुझी आई फक्त ‘आई’ म्हणून हे सांगत नाहीये. ती स्वतः टीचिंग लाईनमधे आहे. ती हे का सांगतेय ते तू नीट समजून घे आणि तुला कॉमर्सलाच का जायचंय हेही तिला पटवून दे. हवं तर माझ्यासमोर दोघं बोला. मी तुला शब्द देतो, तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही होऊ देणार नाही. पण शक्यतो आईला दुखवून काही करायला नको. हो की नाही?” माझ्यापेक्षा तो त्याच्या आईशी जास्त अॅटॅच्ड होताच. म्हणूनच तर त्याला तिला दुखवायला नको होतंच.त्यामुळे मी सांगितलेलं त्याला लगेच पटलंही.

त्यानंतरचा त्यांचा संवाद म्हणजे वाग्युद्ध नसलं तरी ‘वाद विवाद स्पर्धा’ नक्कीच होती. आणि अर्थातच कसलेला प्रतिस्पर्धी समोर असल्यामुळे हरला सलिलच.त्याचा तेव्हाचा कसनुसा चेहरा आजही मला आठवतोय.

“तुला सायन्स-गणित या विषयांमधे चांगले मार्क्स असताना सायन्सला न जाता कॉमर्सला जाणं माझ्या दृष्टीने तरी अनाकलनीयच आहे.”

“मला चारही भाषांत चांगले मार्क आहेतच की. सायन्स गणितात मी खूप अभ्यास केला म्हणून स्कोअरिंग झालंय.त्या विषयांचा मी आवडीने अभ्यास केला म्हणून नाही.”

“भाषांचा तरी अभ्यास मनापासून आणि आवड होती म्हणूनच केलायस ना ? मग आर्टस्  कां नाही?काॅमर्सच कां?”

“आर्टस् ला जाऊन करिअरचं काय ?”

“तुझं अवांतर वाचन चांगलं आहे. इतिहासाची तुला आवड आहे. तू इंग्लिश लिटरेचर मधे पोस्ट ग्रॅज्युएशन कर. एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षांची तयारी कर.”

“मला सरकारी अधिकारी होण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीय.”

“कॉमर्सला जाऊन तरी काय करणारायस? कुठंतरी नोकरीच ना?”

“आम्ही सर्व मित्र दांडेकर मॅडमशी बोललोय सविस्तर. नोकरी खेरीजही इतर अनेक संधी उपलब्ध असू शकतात. काय करायचं ते पुढचं

 पुढं बघता येईल.”

“पुढचं पुढं नाही.आत्ताच ठरवायचं. उद्या निर्णय चुकले म्हणून आयुष्यातील फुकट गेलेली वर्षं परत येणार नाहीयेत. तुझे मित्र कॉमर्सला जाणार म्हणून तू कॉमर्सला जातोयस हे मला पटत नाही.”

“मित्र जातायत म्हणून मी जात नाहीयेss” सलिल रडकुंडीलाच आला ” बाबाs.., तुम्हीतरी सांगा ना हिला. मला क्रिकेट खेळायचंय. ट्रेकिंगला जायचंय.ते सगळं मनापासून करून मी अभ्यास करणाराय. मग न आवडणाऱ्या विषयांच्या अभ्यासाचं ओझं मी कां म्हणून वाढवून घ्यायचं ?”

“तुला दहावीपर्यंतच्या अभ्यासात कॉमर्सचा एकही विषय नव्हता.ते विषय आवडतील हे गृहीत धरून तू कॉमर्सला जाणार. उद्या ते विषय नाही आवडले तर..? मग सगळंच अधांतरी.”

सलिल निरुत्तर झाला. केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात राहिला. मी त्याला नजरेनेच दिलासा देऊन शांत करायचा प्रयत्न केला पण आपले भरून आलेले डोळे लपवत तो उठून त्याच्या रुममधे निघून गेला.आरती अस्वस्थच.

“तुम्ही तरी सांगा, समजवा ना हो त्याला.”

“मी बोलतो त्याच्याशी. समजावतो त्याला.पण कॉमर्सच्या विषयात न आवडण्यासारखं काही नसतं हे माझ्या अनुभवावरून मी तुला सांगतो. तो शहाणा आहे. समंजस आहे. त्याच्या मनाविरुद्ध काही करायला नको एवढं लक्षात ठेवू या. अखेर आयुष्य त्याचं आहे. आपण आपली मतं सांगू.तो घेईल त्या निर्णयाला मनापासून पाठिंबा देऊ.”

तिलाही हे पटलं असावं.पण कळलं तरी वळायला मात्र दुसरा दिवस उजाडावा लागला.

त्या रात्री सलिलला बाहेर घेऊन जाऊन मी त्याच्याशी सविस्तर बोललो. तुला क्रिकेट मधेच एवढा इंटरेस्ट आहे, तर त्यात करिअर कर. फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर क्रीडा पत्रकार विश्लेषक अशा अनेक संधी त्याही क्षेत्रात असतील असंही त्याला सुचवलं.

“बाबा, खेळाकडं मी करिअर म्हणून नाही तर आवड म्हणून बघतो. खेळ, ट्रेकिंग, अवांतर वाचन हे फक्त आवड म्हणूनच मला जपायचंय. मी कोणतंही करिअर केलं तरी या सगळ्या आवडी रिलॅक्सेशन म्हणूनच मला जपायच्यात”

त्याचा निर्णय ठाम होता.

“मी आहे तुझ्याबरोबर. अर्थात तुझ्या आईच्या गळ्यात घंटा बांधायचं काम मात्र तुझं. ती तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही. तू निश्चिंत रहा “

तो हसला. त्याने होकारार्थी मान हलवली. आम्ही घरी आलो.

“मग काय ठरलं?”आरतीने उतावीळपणे विचारलंच.

“आज रात्रभर विचार करतो. उद्या सकाळी नक्की सांगतो ” सलिल शांतपणे म्हणाला.आमचं बाहेर बोलणं झालं तेव्हा तो स्वतःशीच हसला तेव्हाच त्याने आईचं काय करायचं ते मनाशी ठरवलेलं आहे  हे मी ओळखून होतो. काय ठरवलंय याबद्दल मात्र मलाही उत्सुकता होतीच.

दुसऱ्या दिवशी सकाळी चेहऱ्यावर नाराजी घेऊन तो किचनमधे घुटमळत राहीला.

“आई,…”आई वाट पहात होतीच. ” आई,मी तुझ्या मना विरुद्ध काहीही करणार नाहीय.तू म्हणतेस तशी मी सायन्सला ऍडमिशन घेतो. अभ्यासही चांगला करतो.” मी आश्चर्याने पहातच राहिलो. तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद. पण सलिल गंभीरच होता..”..पण, कोणत्याही कारणाने मी नापास झालो तर मात्र तू मला दोष द्यायचा नाहीस.” तो बोलला आणि चोरट्या नजरेने माझ्याकडे पहात बाहेर निघून गेला.आरती हतबुद्ध होऊन फक्त पहात राहिली.

” बघितलंत ना? हा असला अधांतरी आज्ञाधारकपणा काय कामाचा?”

” त्याने पडतं घेतलंय ना?

झालं तर मग “

“व्हायचंय काय? उद्या तो खरंच नापास झाला तर तुम्ही दोघेही दोष देणार मलाच. नकोच ते. होऊ दे त्याच्या मनासारखं. पण तरीही मी त्याला बजावून सांगणाराय. कॉमर्सला जा पण क्रिकेट खेळत आणि बाहेर उंडारत कशीबशी डिग्री मिळवलीस तर मला चालणार नाही.त्या क्षेत्रातली उच्च डिग्री मिळवण्याची तयारी असेल तरच मी मान्य करीन. नाहीतर सायन्सला जाऊन नापास झालास तरी चालेल” तिने तसे स्पष्ट शब्दात त्याला बजावलेही. आणि त्यानेही ते मान्य केले.

आता कसोटी सलिलची होती.त्या कसोटीला तो पुरेपूर उतरला.सीए करता करता बरेच विषय आणि अभ्यासक्रम सारखाच आहे हे लक्षात घेऊन त्याने एम्.काॅमसुध्दा पूर्ण केले.तेही  डिस्टिंक्शनमधे.सीएची परीक्षा बुद्धी न् हुशारी इतकीच

चिकाटीचीही परीक्षा घेणारी.पण सीएही त्याने फर्स्ट अॅटेम्टलाच यशस्वीपणे पूर्ण केले. त्याच्या बरोबरीचे एक-दोन मित्रही सीए झाले. ते मल्टिनॅशनल कंपनीत हाय पॅकेजवर रुजूही झाले. सलिलने मात्र स्वतःची प्रॅक्‍टिस सुरू करण्याचा निर्णय घेतला.

योग्य वेळ आल्यावर मोकळेपणानं तो आमच्याशी जे बोलला, त्यातून त्यांचे स्वप्न न् आयुष्याकडे पहाण्याचा त्याचा नेमका दृष्टिकोन स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला होता.

‘मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करून स्वतःच्या बुद्धीचा उपयोग दुसऱ्याच्या फायद्यासाठी करू देण्यापेक्षा त्याच बुद्धीचा उपयोग करून मी स्वतः प्रॅक्टिस केली तर इतर स्थानिक गरजूंनाही त्यांची आयुष्यं उभी करायला मी मदत करु शकेन. मल्टीनॅशनल कंपन्यातील पगाराइतका आर्थिक लाभ मला प्रॅक्टिस सुरू केल्याबरोबर मिळणार नाही याची मला कल्पना आहे. पण कांही वर्षातच माझ्या व्यवसायात स्थिर होऊन मी माझं आयुष्य त्या सर्वांपेक्षाही अधिक अर्थपूर्ण रितीने जगू शकेन आणि तेच माझं ध्येय आहे.पुण्यामुंबईल्या हाय पॅकेजसाठी मला पहाटपासून स्वतःला चरकात पिळून घ्यायचं नाहीय..’ हे त्याचे विचार स्वतःच्या आयुष्याचा त्याने किती खोलवर विचार केलाय याचेच निदर्शक होते.

“बाबा, मी आपल्या सर्व कुटुंबाची आर्थिक जबाबदारी अजून किती महिन्यांनी घ्यावी असं तुम्हाला वाटतं..?”प्रॅक्टिस करायचा निर्णय घेतल्यानंतर त्याने मला विश्वासात घेऊन विचारलं होतं.

“गरज म्हणशील तर तू कधीच नाही घेतलीस तरी चालू शकेल.तेव्हा त्याचे दडपण नको. केवळ पैशासाठी व्यवसायवृद्धी करायची तर तत्त्वांशी तडजोड करावी लागेल.ते यश तात्पुरतं समाधान देणारं असेल.तुझे हे क्षेत्रही निसरड्या वाटांचेच आहे हे लक्षात ठेव. चार पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण तोल जाऊ देऊ नकोस.एरवी तुझं भलंबुरं तू जाणीवच.” मी त्याला सांगितलं होतं.

आज प्रॅक्टिस सुरू करून पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे. त्याने फक्त सधनताच नाही तर निखळ यश आणि नावलौकीकही मिळवलाय. आज जवळजवळ वीस कर्मचारी असलेलं त्याचं ऑफिस माझ्या अभिमानाचा विषय आहे.त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक लाभ देत व्यवसायवृद्धीतला योग्य वाटा तो न मागता त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. अनेक सामाजिक उपक्रमांशी त्याने स्वतःला जोडून घेतलेय. सूनही कर्तबगार आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलावर तिचीही खंबीर सक्रिय साथ त्याला मिळते आहे.

माझ्या बाबांच्या आणि माझ्या आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांना तिलांजली न देता तीही स्वप्ने मुलासुनेने स्वतःच्या स्वप्नांशी जोडून घेतलेली पहायला मिळणं यापेक्षा आमच्यासाठी वेगळी कृतार्थता ती काय असणार..?

हे होतं स्वप्न. माझं..,माझ्या बाबांचं न् माझ्या मुलाचं. त्या स्वप्नांचा हा मागोवा. पिढी बदलेल तशी परिस्थितीनुसार स्वप्नेही वेगळी. पण तिन्ही पिढ्यात स्वप्नांइतकाच त्यामागचा विचारही महत्त्वाचा. पिढी बदलते तसे विचारही बदलतात. पण त्यामागची भावना तितकीच निखळ असते याचेही हा मागोवा एक निदर्शक म्हणता येईल. आमची तिघांचीही आयुष्यं आणि स्वप्नेही त्या त्या पिढीचं सर्वार्थाने प्रतिनिधित्व करणारी नसतीलही कदाचित. तरीही वैयक्तिक संदर्भ थोडेफार वेगळे असले तरी भू बरंमिका मात्र जवळपास अशाच असतील याची मला खात्री आहे.

पूर्णविराम

 ©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-वडील अतिशय प्रसन्न,शांतपणे गेले.जाताना ते आम्हाला पैशात मोजता न येणारं असं भरभरुन खूप कांहीं देऊन गेलेत.स़स्कारधन तर होतंच आणि जणूकाही स्वतःची सगळी पूर्वपुण्याईही ते आम्हा कुटुंबियांच्या नावे करुन गेलेत नक्कीच.त्यांनी मनोमन कांहीं स्वप्न म्हणून जपलं असेल तर ते फक्त आम्हा सर्वांच्या समाधानी सुखाचं…!)

या पार्श्वभूमीवरचा माझ्या कळत्या वयानंतरचा माझा जीवन प्रवास.हा प्रवास बाबांच्याइतका खडतर नव्हता तरीही खाचखळग्यांचा होताच. सरळ साधा नव्हताच. त्यामुळे रुढार्थाने कांहीएक स्वप्न उराशी बाळगावं आणि त्या दिशेने अथक प्रयत्न करून ते पूर्ण झाल्याचं समाधान मिळवावं एवढी उसंत आम्हा भावंडांपैकी कुणालाच मिळाली नव्हती. आम्ही दोघे पाठचे भाऊ पहिलीपासून एकाच वर्गात.मी त्याच्यापेक्षा सव्वा दोन वर्षांनी लहान,त्यामुळे लहानपणापासून त्याच्याशी खेळत आणि भांडतच मी लहानाचा मोठा होत होतो. तो सात वर्षाचा होताच पहिलीत जाऊ लागला तेव्हा त्याच्या बरोबर मीही.तो तिसरीत गेला तेव्हा मुख्याध्यापकांच्या अधिकारात माझी पहिली आणि दुसरीच्या परीक्षा घेऊन त्यांनी रीतसर मलाही तिसरीत प्रवेश दिला. तेव्हापासून अकरावीपर्यंत आम्ही दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात टाकून एकत्र शाळेत जायचो. एकाच बाकावर बसायचो. माझ्यापुरतं तरी वयातलं अंतर पुसूनच गेलं होतं. तो माझा फक्त भाऊच नाही तर माझा मित्रच झाला होता.ती मैत्री अजूनही तशीच आहे. तो माझ्यापेक्षा बुद्धीने अतिशय तल्लख. अभ्यासात खूप हुशार. त्याचे भाषा आणि सायन्स  सर्वच विषयात चांगले स्कोअरिंग होत असे. पहिल्या पाच नंबरात तो असायचाच. आणि त्या पाचही नंबरात फक्त एखाद-दुसऱ्या मार्कांचेच अंतर असे. त्यांची पहिल्या नंबरासाठी  सतत चुरस असे. अर्थात तेव्हा मैत्रीसारखी स्पर्धाही  निकोप असायची. त्यांच्यापाठोपाठ माझा नंबर. अर्थात सहावा.पण पाचवा नंबर आणि मी यात दहा-बारा मार्कांचं अंतर असायचं. तरीही शाळेत आणि घरी ‘ लहान असून इतके मार्ग मिळवतो ‘ म्हणून कणभर का होईना जास्त माझंच कौतुक व्हायचं. माझ्या भावाला इंजिनीयर व्हायचं होतं. ते त्याचं जिवापाड जपलेलं स्वप्न होतं. मला अर्थातच भाषा विषय खूप आवडायचे. वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, अभिनय,निबंधलेखन अशा सगळ्या कलांमध्ये मला विशेष गती. शाळेतल्या सर्व वर्षांत या सगळ्या स्पर्धांमधे  माझा पहिला नंबर ठरलेलाच असे. अर्थात जे आवडतं ते करीत त्यातून आनंद मिळवायचा एवढंच तेव्हा समजत असे.त्याचं छंदात, स्वप्नात रुपांतर, परिस्थिती  अनुकूल असती तर कदाचित झालंही असतं. पण तसं व्हायचं नव्हतं. आम्ही दोघेही अकरावीत असताना अचानक वडिलांचं आजारपण उद्भवलं. त्यापुढची त्यांची नोकरी ते निभवत राहिले तरी अनिश्‍चिततेच्या भोवर्‍यातच सापडली. हक्काच्या रजा संपल्या नंतर जेव्हा बिनपगारी रजा होत तेव्हा ऑफिसमधे सर्वजण सांभाळून घेत असले तरी दर महिन्याला हातात येणारा पगार थोडा जरी कमी आला तरी घराचा आर्थिक डोलारा डळमळू लागे. मॅट्रिकचा रिझल्ट लागला. मला जेमतेम फर्स्ट-क्लास आणि भावाला डिस्टिंक्शन मिळाले होते. माझ्या आनंदाला उधाण आलेले पण भाऊ मात्र हिरमुसलेला. त्या काळी मॅट्रिक नंतरही चांगल्या नोकऱ्या मिळत. पण माझं वय खूप लहान आणि मोठ्या भावाचं मात्र नोकरीचं वय झालेलं. त्यामुळे त्याने मिळेल ती नोकरी करायची आणि माझं कॉलेज शिक्षण होईपर्यंत घरची जबाबदारी घ्यायची. आणि मला नोकरी मिळाली की मी ती जबाबदारी स्वतःकडे घ्यायची असा वडिलांशी चर्चा  करुन आईने नाईलाजाने निर्णय घेतला आणि भावाची समजूत काढली. त्या रात्री डोक्यावर पांघरूण घेऊन तो घुसमटत रडत होता. का ते सगळं माझ्यापर्यंत पोचलेलंच नव्हतं.मी खोदून खोदून विचारलं तरी भाऊ ‘काही नाही’ म्हणाला. मग दुसऱ्या दिवशी मी आईच्या खनपटीलाच बसलो तेव्हा आईने जे ठरवलं होतं ते माझ्या गळी उतरवलं. ऐकलं आणि कॉलेजला जायचा त्या वयात इतरांना होणारा आपसूक आनंद मी हरवूनच बसलो. भाऊ आधीच अबोल, आता तर घुमाच झाला. तो रोज लायब्ररीत जाई, पेपरमधल्या नोकरीच्या जाहिराती वाचून अर्ज करी. टेलिग्राफ ऑफिसमधे त्याला नोकरी मिळाली.गोव्याला पोस्टींग झालं.ट्रंक घेऊन तो सर्वांचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. या सगळ्या उलघालीत इंजिनीयर व्हायचं त्याचं स्वप्न उध्वस्त झालं होतं आणि ती बोच त्याच्याइतकीच माझ्याही मनात सलत राहीलेली.मग अर्थातच मी सुखद स्वप्न पहायचा माझा अधिकारही विसर्जित करून टाकला.त्यानंतर स्वप्न पाहिलं ते फक्त भावाचे हे उपकार कधीच न विसरण्याचं.तेव्हा गोव्यासारख्या महागाईच्या ठिकाणी दरमहा जेमतेम दोनशे रुपये त्याच्या हातात येत. त्यातल्या दीडशे रुपयांची तो न चुकता घरी मनिऑर्डर करी. राहिलेल्या पन्नास रुपयात पुढे स्टेट बँकेत नोकरी मिळेपर्यंतची दोन वर्ष त्यांनी कशी काढली होती ते खूप वर्षं उलटून गेल्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर  गप्पांच्या ओघात त्यांनी मला ओझरतंच सांगितलं,तेव्हा ते ऐकूनही माझ्याच अंगावर सरसरून काटा आला होता. अतिशय काटकसरीत का होईना पण आई-वडिलांच्या सहवासात सुरक्षित छपराखाली मी रहात असताना, माझ्यापेक्षा खूप हुशार असूनसुद्धा केवळ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा म्हणून त्याच्यावर पडलेलं जबाबदारीचं ओझं स्वतःचंच कर्तव्य म्हणून त्याने मनापासून पारही पाडलं होतं. माझ्या मनावरचं ओझं आणि जबाबदारीची जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती.त्या मनोवस्थेत मी माझी कॉलेजची चार वर्षे एकाग्रतेने अभ्यास करीत एक एक दिवस मोजून काढलीत.हे करीत असताना मनातली अस्वस्थता कमी व्हावी म्हणून आणि त्याक्षणी ते मीच करायला हवं म्हणूनही, तेव्हा आठवड्यातले रिकामे मिळणारे शनिवार-रविवार हे दोन दिवस मी एका ठिकाणी अकाउंटस् लिहायची कामं घेऊन स्वतःला गुंतवून ठेवलेलं होतं. ते दोन पूर्ण  दिवसभर खाली मान घालून काम करावं तेव्हा महिन्याला वीस रुपये मिळत. ते पैसे साठवून मी माझ्या लहान भावाचे युनिफॉर्मचे दोन जोड, त्याची वह्या पुस्तकं, माझे दोन शर्ट आणि पायजमे, आणि कॉलेजसाठीचा रेल्वेचा पास एवढे खर्च बाहेरच्या बाहेर करू शकायचो. हे प्रथम भावाच्या लक्षात आलं तेव्हा तो माझ्यावर खूप चिडला होता.’ हे सगळं करताना तू मला विश्वासात घेऊन बोलला का नाहीस ‘ या त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. तो गोव्याहून एक्स्टर्नल ग्रॅज्युएशन च्या परीक्षेसाठी वर्षातून फक्त एकदा मिरज सेंटर घेऊन घरी येऊ शकायचा. तो स्वतःची इतकी ओढ करीत असताना त्याच्या जीवावर दोन वेळा बसून खाणं मला नको वाटायचं. त्या क्षणी मीच करायला हवं अशी ही एकच गोष्ट होती. हे सगळं या शब्दात त्याला सांगून मला त्याला दुखवायचं नव्हतं. अखेर आईने त्याची समजूत काढली तेव्हा ‘पैसे मिळविण्यापेक्षा ग्रॅज्युएशनला जास्तीत जास्त स्कोरिंग करायची तुझी जबाबदारी तू पार पाडणं महत्वाचं आहे ‘असं मला त्याने बजावून ठेवलं होतं. ते तर मी करणार होतोच पण त्याच्या सांगण्या-समजावण्यातली  कळकळ पाहून कोणत्याही कारणाने मी कमी पडून उपयोगाचं नाही हे स्वतःला रोज नव्याने बजावत असायचो.त्या चार वर्षांत माझी स्वप्नं यश मिळवून आई-बाबांना न् भावाला कृतार्थतेचं समाधान द्यायचं याच परिघाभोवती फिरत असायची.

पुढे भावाला स्टेट बँकेत आणि दोन वर्षानंतर मला युनियन बँकेत जॉब मिळाला आणि नाही म्हटले तरी अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात कमी झाली. त्यानंतर मी भावाला त्याच्या आर्थिक जबाबदारीतून मोकळं केलं, तरीही आम्हा दोन्ही लहान भावांना वेळोवेळी काय हवं नको याकडे त्याचं बारीक लक्ष असायचंच. पुढे आम्ही आमचे संसार सुरू करून अन्नाचा शेर असेल तिथे फिरत राहिलो. परस्परांना लिहिलेली पत्रे आणि कारणपरत्वे गरज निर्माण होईल तसं मदतीला आम्हा सगळ्या भावंडांकडे धाव घेणारी आई ही दोनच संपर्काची साधने. तरीही आम्ही मनाने सतत जवळच असायचो. दोघांच्याही सुरु झालेल्या बँकिंग क्षेत्रातील निसरड्या वाटांवरूनच्या वाटचाली पाय न घसरु देता उत्कर्षाच्या दिशेने चालू राहिल्या ते अर्थातच आई-बाबांनी वेळोवेळी केलेल्या संस्कारांमुळेच. या प्रवासातही यशासाठी हव्यासापायी कोणतीही अनाठाई तडजोड न करायचं बंधन आम्ही कोणी न सांगताच आमच्या स्वप्नांना घालून घेतलेले होतं. त्यामुळे वेळोवेळी मिळालेली प्रमोशन्स असोत,कधी सोयीची तर कधी गैरसोयीची पोस्टिंग्ज असोत,इतरांना अप्राप्य असं सतत मिळत रहाणारं ‘ जॉब सॅटिसफॅक्शन ‘ असो, सगळं आम्हाला मिळत गेलं. यातलं काहीच आम्ही अट्टाहासाने स्वप्न उराशी बाळगून, तडजोडी करून मिळवलं नाही.आणि ते सगळं आम्ही समाधानाने स्वीकारत गेलो. आज त्या समाधानाबरोबर कृतार्थताही आहे.

मी स्वप्न पाहिलं होतं ते फक्त कर्तव्यपूर्तीचं आणि कितीही यश आणि ऐश्वर्य प्राप्त झालं तरीही न उतण्या-मातण्याचं. त्या स्वप्नाची पूर्तता हेच माझं जीवन ध्येय होतं आणि ते ध्येय साध्य झाल्याचं समाधान हीच माझ्या उर्वरित आयुष्याला पुरूनही उरुन राहील अशी कृतार्थता..!

मला मिळालेली ही स्वस्तात माझ्या मुलाला उत्तुंग स्वप्ने पहात उंच झेपावण्यासाठीचं विस्तिर्ण आकाश देऊ शकली.

क्रमश:….

 ©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये  

(पिढीनुसार बदलत गेलेल्या तीन पिढ्यांच्या स्वप्नांचा हा मागोवा. . !अर्थात तीन वेगळ्या गोष्टी आणि तरीही एकसंध परिणामाचा ठसा उमटवू पहाणाऱ्या. . . !!)

मी, माझे वडील आणि माझा मुलगा. आम्हा तिघांचाही आपापल्या आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन ‘व्यक्तीनुरुप आणि अर्थातच पिढीनुरुप’ कसकसा बदलत गेला या दिशेने विचार करायचा तर कां आणि कसं जगायचं हे जसं मी मनाशी ठरवलं होतं तसं त्या दोघांनीही ठरवलं असणारच हे गृहीत धरलं, तर ते त्या त्या वेळी आपल्यापर्यंत पोचलेलं नव्हतं हे माझ्या आत्ता प्रथमच लक्षात येतंय.  आज वडील हयात नाहीयेत. माझ्या मुलाच्या संदर्भातल्या सगळ्याच आठवणी इतक्या ताज्या आहेत की त्याचा त्याच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठीचा प्रवास कसा घडत गेला हे त्या त्या वेळी नेमके याच पध्दतीने जाणवले नसले, तरी आज लख्ख आठवतेय,  जाणवतेय आणि त्याच्याबद्दल मन अभिमानाने भरुनही येतेय.

आम्हा तिघांचीही आयुष्यं वृक्षाच्या एकमेकांत गुंतलेल्या फाद्यांसारखीच. एकरुप तरीही स्वतंत्रपणे प्रकाश शोधत वाट चोखाळत राहिलेली. . !

आम्हा तिघांचीही स्वप्ने प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार आणि परिस्थितीनुसारही वेगवेगळी.  बाबांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा.  त्या काळातील कुटुंब व सामाजिक व्यवस्थेनुसार वैयक्तिक आयुष्याचे निर्णय ज्याचे त्याला घ्यायचं स्वातंत्र्य फारसं कुणाला नसेच. बाबांची गोष्ट तर त्याहीपेक्षा वेगळी.  बाबांची परिस्थिती आणि आयुष्यात त्यांची झालेली होरपळ हे त्या पिढीचं प्रातिनिधिक चित्र म्हणता येणार नाही.  अर्थातच त्या काळात सर्वसामान्य कुटुंबातले तरुण चाकोरीबद्ध आयुष्य स्विकारणारेच. तथापी वेगळा मार्ग स्विकारुन प्रतिकूल परिस्थितीतही एका विशिष्ट ध्येयासाठी जिवाचं रान करणारी माणसं अपवादात्मक का होईना त्याही काळी होतीच.

माझ्या बाबांचं आयुष्य मात्र सरळ रेषेतलं सहजसोपं नव्हतंच. आयुष्याला वेळोवेळी मिळत गेलेल्या कलाटण्या त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्याच होत्या.  ते तान्ह्या वयाचे असतानाच वडील गेलेले. आणि बाबा शाळकरी वयाचे असतानाच आईही गेली.  मोठा भाऊ अतिशय तापट आणि तिरसट.  अनपेक्षित डोईवर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्यामुळे असेल पण बाबांचा मोठा भाऊ सतत कातावलेलाच.  अशा परिस्थितीत बाबांच्या त्या पोरवयातील भावनिक गरजेचा विचार कुठून व्हायला? दोष परिस्थितीचाही होताच पण त्यामुळे मोठ्या भावाच्या संसारातील या धाकट्या भावाचं आस्तित्व आश्रितासारखंच असायचं.  कसेबसे शिक्षण संपताच नोकरी मिळवून बाबा त्या घुसमटीतून बाहेर पडले. त्या काळातील प्राधान्यक्रमानुसार त्यांना  मिळालेली पोस्टातील नोकरी म्हणजे वरदानच. तोवरच्या संपूर्ण खडतर आयुष्यामुळे हरवत चाललेला आत्मविश्वास लग्न होऊन आई त्यांच्या आयुष्यात आली तेव्हा त्यांना परत मिळाला होता.  या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या बाबांचं सुखाचा समाधानाचा संसार एवढं एकच स्वप्न होतं. अर्थात आईचंही. सासर माहेरचा दुसरा कुठलाही आधार नसताना कोवळ्या वयात मोठ्या हिमतीने माझी आई पदर खोचून माझ्या बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.  आम्ही सर्व भावंडे मार्गी लागेपर्यंत रुढार्थाने म्हणावं तर त्यांचा संसार तसा काटकसरीचा.  मीठभाकरीचाच.  आर्थिक चणचण तर पाचवीलाच पुजलेली.  तरीही त्यांनी त्याची झळ आम्हा मुलांपर्यंत कधीच पोहोचू दिली नव्हती. स्वतः चटके सहन करून आमच्या       स्वास्थ्यासाठी ते अखेरपर्यंत झटत राहिले.  हे सगळं करत असताना त्या परिस्थितीत फार मोठी स्वप्ने पहाणं बाबांना शक्य नव्हतंच.  आणि पहायची म्हंटलं तरी भविष्यात अंधारच होता जसा कांही. तरीही त्यांना आनंद हवा असायचा जो त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीत शोधला. आम्हा मुलांना सतत उपदेशाचे डोस न पाजवता स्वतःच्या वागण्या बोलण्यातून,  कृतीतून आमच्यावर ते चांगले संस्कार करीत राहिले. आपली मुलं आर्थिक सुबत्तेपेक्षा चारित्र्यसंपन्न व्हावीत हेच त्यांचं स्वप्न होतं.  त्याकाळी  सर्वच पालकांचा हाच विचार असे. तरीही टोकाचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे माझे आई न् बाबा दोघांचेही गुणविशेष होते. दोघेही देवभोळे नव्हते, पण दत्तमहाजांवरची त्यांची अढळ श्रद्धा हाच त्यांचा श्वास होता. मानेवर जू ठेवावा तशा पोस्टाच्या त्या काळातल्या प्रचंड कामाच्या रगाड्यात त्यांना श्वास घ्यायला जिथं फुरसत नव्हती तिथे कर्मकांडात अडकून पडणं दूरचीच गोष्ट. तरीही त्यांचं  नित्य दत्तदर्शन कधीही चुकलेलं नव्हतं.  त्यांना प्राप्त झालेली वाचासिध्दी,  दृष्टांत होऊन मिळालेल्या दत्ताच्या प्रसाद-पादुका हे त्यांचंच नव्हे तर आम्हा सर्व कुटुंबियांचंच आनंदनिधान होतं. अखेरपर्यंत बाबा निष्कांचन राहिले, पण वाचासिध्दीच्या कृपाप्रसादाचा त्यांनी कधीही बाजार मांडला नाही. असा माणूस भौतिक सुखाची स्वप्नं पहाणं शक्य नव्हतंच. बाबांना दीर्घायुष्य नाही मिळालं. नातवंडाचं सुख फार दूरची गोष्ट. त्याना सूनमुखही पहाता आलं नाही. तरीही ते अतिशय प्रसन्न ,  शांतपणे गेले.

जाताना ते आम्हाला पैशात मोजता न येणारं असं भरभरुन खूप कांही देऊन गेलेत.  संस्कारधन तर होतंच आणि जणूकांही स्वतःची सगळी पूर्वपूण्याईही ते आम्हा कुटुंबियांच्या नावे करुन गेलेत नक्कीच. त्यांनी मनोमन कांही स्वप्न म्हणून जपलं असेल तर ते फक्त आम्हा सर्वांच्या समाधानी सुखाचं. . ! त्या स्वप्नपूर्तीचं समाधान ते जिथं असतील तिथवर त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचलेलं असेल. 

क्रमश:….

  ©️ अरविंद लिमये, सांगली

(९८२३७३८२८८)

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विज्ञान कथा – लादेन विरघळला – भाग 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? जीवनरंग ??‍?

☆ विज्ञान कथा – लादेन विरघळला – भाग 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

एकदम माझ्या मनात कसे आले, कुणास ठाऊक ? मी पटकन उठून आत देवघरासमोर आलो . देवासमोर उदबती लावली, आणि मोठ्याने” रामरक्षा” म्हणायला सुरुवात केली . अहो आश्चर्यम् ! इकडे लादेन भितीने थरथरायला लागला, कापायला लागला . मला अवसान चढले . माझी रामरक्षा म्हणून संपत आली तसा लादेन विरघळायला लागला . जसा तो तयार होत गेला, तसाच नाहिसा होत गेला . माझ्या डोळ्यांनी मी ते प्रत्यक्ष्य अनुभवत होतो . रामरक्षा संपल्या संपल्या मी भीमरूपी स्तोत्र म्हणायला सुरवात केली . लादेनचे अस्तित्व नाहीसे झाले होते . माझ्या समोर अगदी छोटासा चकचकीत गोळा शिल्लक राहिला होता मी पटकन त्याची कागदामध्ये गुंडाळी केली आणि जाळून टाकली .

     एवढे सगळे नाट्य घडेपर्यंत बराच अवधी निघून गेला होता . मी फार मोठ्या दिव्या मधून बाहेर पडलो होतो . काही तासातच म ला जबरदस्त अनुभव आला . कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही .

   माझ्या मनातून भिती पार नाहिशी झाली होती . मला खूप म्हणजे खूप हलके वाटत होते . मोठ्या तापासून उठल्यावर कसे वाटते, तसे मला वाटत होते . फार वाईट, विघातक घडण्यापासून मी स्वतःला, गावाला आणि देशाला वाचवले आहे असेच मला वाटत होते . .

     देवाच्या कृपेने मी या ‘ संकटामधून बाहेर आलो . मला जाणवले, लादेन ही फक्त व्यक्ति नाही . ती अतिशय वाईट, विनाशकाली वृती आहे . आपल्या प्रत्येकाच्यात ती निश्चित आहे . पण त्याचबरोबर चांगल्या विचारांचा पगडाही आपल्यावर तेवढाच आहे . आपल्या जवळ सुसंस्कारांचा अनमोल ठेवा आहे . त्यामुळे वाईट विचारांपासून आपण फार लवकर परावृत होतो . अरे म्हंटले की का रे म्हणण्याची आपली वृत्ती नाही . अतिरेक्यांच्या रुपात ही राक्षसी – लादेन वृत्ती सगळ्या जगाला त्रास देत आहे . आपले भारतीय सैनिक आपल्या देशाचे, आपले रक्षण करायला सदैव तयार आहेत . आपणही रक्षणकर्त्या परमेशवराला विनवणी करू” या लादेन वृतीपासून आमचे, आमच्या मुलांचे, आमच्या देशाचे रक्षण कर .”

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares