मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक बोधकथा : आनंद चेंडू… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ एक बोधकथा : आनंद चेंडू ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक खूप गरीब माणूस… त्याचे नाव नारायण. शेतकरीच होता. अखंड काळ्या आईची सेवा करण्यात गुंतलेला. पण कोणत्याही वेळी त्याच्याकडे पहा.. कायम हसतमुख. सगळ्यांच्या मदतीला धावणारा, सगळ्यांना आपला सहारा देणारा. त्याच्या सान्नीध्यात जो कोणी येईल त्याला दिलासा वाटायचा. एक अनामिक सुख मिळायचे.

सगळ्यांनाच त्याचे कौतुक वाटायचे. कसा काय हा माणूस नेहमी आनंदी असतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडायचा. त्याच्यावर कितीही संकटे येऊ देत, कितीही अडचणी येऊन ही  हसतच त्यावर मात करायचा.

शेवटी न रहावून त्यालाच हा प्रश्न विचारून याचे रहस्य जाणून घेऊया ठरले.

एक दिवस गावामध्ये मोठी जत्रा होती. त्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ऐनवेळेस एका कार्यक्रमाचे सादरकर्ते येऊ शकत नसल्याचे कळवले. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण आयोजक नाराज झाले. त्यांना खूप वाईट वाटून दु:ख झाले.

पण नारायण होतं असं कधी कधी त्यात कशाला वाईट वाटून घ्यायचे म्हणाला… नेहमी प्रमाणे हसरा चेहरा ठेवला… आणि जाऊ दे बाकी जत्रा बघायला मिळतेय ना? त्या निमित्ताने जास्त वेळही मिळतोय या समाधानाने तो आनंदी झाला व तेथून जाऊ लागला.

तेवढ्यात आयोजकांनी त्याच्याच मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याला स्टेजवर बोलावले.

प्रश्न पहिला :- तुमचा व्यवसाय कोणता आणि त्यातील समस्या काय काय आहेत?

नारायण :- व्यवसाय म्हणजे फायदा तोटा आला. म्हणून मी शेती करत असलो तरी त्याला माझा व्यवसाय मानत नाही. काळ्या आईची सेवा करणं असं मी मानतो. त्यामुळे आईच्या सेवेतून फायदा मी बघतच नाही तर त्यातून मिळणारे फळ असे मी मानतो आणि मग आईने दिलेले फळ जसे आपल्या आईने केलेले जेवण कोणी एकटा नाही खात तर सगळे मिळून खातो तसे सगळ्या बांधवाना ते देण्याचा प्रयत्न करतो. यामधे मला मी कोणासाठी तरी काहीतरी करू शकलो याचे समाधान मिळते आणि मी आनंदी होतो.

यातील समस्या म्हणजे पाऊस वेळेवर पडत नाही पडलाच तर योग्य प्रमाणात पडत नाही, त्यातूनही चांगले पीक मिळाले तरी अडते, दलाल योग्य भाव देत नाहीत, वेळेवर वाहनेही उपलब्ध होतं नाहीत.अशा अनेक सांगता येतील…

प्रश्न दुसरा :- तरीही तुम्ही कसे समाधानी रहाता?

नारायण :- मी अशावेळी जगाकडे पहातो, माझ्यापेक्षा जास्त अडचणी असलेल्या लोकांकडे बघतो आणि यातूनही आशावाद अंगी घेऊन सतत काही चांगलं होणार आहे असे मनाला समजावतो. त्यामुळे मला मी दुसऱ्यांपेक्षा जास्त बरा आहे ही जाणीव होते आणि मी आनंदी होतो. जे होते ते चांगल्यासाठीच ही धारणा ठेऊन आता काहीतरी चांगले घडणार आहे हे जाणून त्या चांगल्याच्या स्वागतासाठी मी आनंदी होतो.जगाकडे पाहिल्यावर आपल्याला काहीतरी चांगले शिकायला मिळणार आहे आणि त्यातून मिळणारे ज्ञान हे प्रगतीसाठी उपयोगी ठरणार असल्याने प्रगतीचित्र डोळ्यापुढे आणून मी आनंदी होतो.

प्रश्न तिसरा :- तरी पण जे भल्या भल्याना जमत नाही ते तुम्ही कसे जमवता? काय आहे याचे रहस्य?

नारायण :- रहस्य तर काहीच नाहीये. हे एक सोपे तंत्र आहे. मी दुःख झाल्याचे तोटे जाणतो म्हणून मी सतत मनाला दुःखी न होण्याची करणे सांगत असतो. त्यामुळे मन दुःखी होतं नाही, पर्यायाने आनंदी होते.

दुसरे असे की आनंदाच्या मागे लागायचे नाही असे ठरवल्याने आनंद पुढे पळतोय आपल्या हाती लागतं नाही हे दुःख होतं नाही. दुसरे आनंदी बघितले की ते आनंदी राहू शकतात मग आपण का नाही असे मनाला सांगितले की मन निदान आनंदी रहायच्या प्रयत्नाच्या नादात नकळत आनंदी होते. किंवा कोणी दुःखी दिसला तर आपल्याला ते दुःख नाही ना या विचाराने आनंद मिळतो आणि दुःखीतांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करून जर त्याचे दुःख हलके केले तर त्या समाधानाने पण आनंदी रहाते.

तिसरे आणि महत्वाचे म्हणजे आनंद कोणती वस्तू नाही की ती मिळवायला पाहिजे. ती एक शाश्वत गोष्ट आहे जी स्वतःमधे असते याची कायम जाणीव ठेवली पाहिजे आणि आनंद कोणत्याही गोष्टीत नसून तो आपल्या दृष्टीत असला तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद दिसेल. मग आपोआप आनंद मिळेल.

आपण जेवढे जे देऊ त्याच्या कैक पटीने ते आपल्याकडे चेंडू जमिनीवर आपटल्यावर अधिक उसळून परत आपल्याकडे येतो तसा दुसऱ्यांना दिलेला आनंद परत आपल्याकडे येतो मग परत हाच आनंद आपण दुसरीकडे पाठवला तर तेथूनही हा आनंद चेंडू परत आपल्याकडे येतो आणि या आनंद चेंडूच्या टप्प्याचा आनंदही आपल्याला मिळून एक चिरंतन निरंतर आनंद अनुभव आपण घेऊ लागतो.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सत्य आणि फोन ::::: एक अलक ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? जीवनरंग ?

सत्य आणि फोन ::::: एक अलक ☆ श्रीशैल चौगुले ☆

सेवानिवृत्त्त वरिष्ठ आभियंता,जीवनप्राधिकरण विभाग,अधिकाऱ्याने आत्महत्या केलेली वार्ता सर्वत्र राज्यभर पसरली खरी. परंतु पोलीस तपास हेरखाते चौकशीत रात्री कुठून तरी चार फोन आलेले मोबाईलवरती आढळले. सदरील नंबरवर साईबरकडून हार्डवेअर सिस्टीम आॕडिओ काॕलींग ओपन करुन पाहिले तर एकच संदेश वेगवेगळ्या चार व्यक्तींनी केलेले ऐकविणेत आले.

“ हॕलो साहेब,तुमच्यावर दोन कोटी जलपुरवठा खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप असून सकाळी अटक सत्रासाठी आमचे हेरपथक येणार असून आपण मानसिकदृष्ट्या संतुलनाने सज्ज रहावे.”

रात्री ठिकः १२ः०५ ,१२ःः०७,१२ः०९व १२ः११.या वेळेत झालेले फोन आढळले.

व आत्महत्या पहाटे ४ः५४ च्या सुमारास झालेले तपासात निषपन्न झाले.

मात्र दुसऱ्या  दिवशी अधिकाऱ्यांचा वाढदिवस होता व त्यांना “महाराष्ट्र राज्य प्राधिकरण उत्कृष्ठ जीवन सेवा” हा विशेष सन्मानार्थ प्रशासकिय पुरस्कार जाहिर झालेली बातमी सर्व मिडीया प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती.

चौघांना ताब्यात घेतले असता आॕफिस स्टाफ मित्रवर्गाने वाढदिवस व पुरस्कार बातमी आश्चर्याचा आनंदी हेतूने थट्टा  केल्याचा एकच रिपोर्ट चारी मित्रांकडून आला.

परंतु फोनवरील थट्टेने एका सेवाशील अधिकाऱ्याला पुरस्कार सन्मानास जीवंतपणी पहाता न आलेचे दुःख सर्व जि.प .व प.स. पासून सर्व प्रशासकिय खात्यास लपवता आले नाही. शोकांजलीकरिता तीन दिवस सुट्टी प्राधिकरण खात्यास जाहिर झाले.

१५ आॕगष्ट रोजी हा पुरस्कार सन्मान त्यांचे पश्चात श्रीमती पत्नीस अर्पण करणेत आला.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन बोधकथा : प्रयत्नांती परमेश्वर… / करावे तसे भरावे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ दोन बोधकथा – प्रयत्नांती परमेश्वर… / करावे तसे भरावे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(१) प्रयत्नांती परमेश्वर…

अजय विजय दोघे मित्र. अभ्यासात खेळात अतिशय हुशार. दोघे मोठे झाल्यावर चांगले नाव कमावतील अशी सगळ्यांना खात्री. दहावी 90 टक्केपेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण झाले. दोघांनीही सायन्स निवडले.

परंतु 10 वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या दोघांनाही ते अवघड वाटू लागले. अजय प्रयत्नवादी असल्याने आजपर्यंतची घोकंपट्टी करून अभ्यास करायची पद्धत त्याने सोडून समजून घेऊन मग स्व अध्यनाची सवय लावून जिद्दीने आपल्या शिक्षण पूर्तीकडे पावले टाकू लागला.

विजय मात्र अवघड आहे… कसे जमणार… समजत नाहीये… अशी कारणे सांगून पहिल्या काही महिन्यातच त्याने शाखाच बदलून कॉमर्स निवडले आणि पुढील शिक्षण सुरु केले.तेथेही अकाउंट्स अवघड वाटल्याने क्लासला जाऊन तो बीकॉम झाला.

अजयही बी एस सी झाला. आवडू लागल्याने पुढे इंजिनिअर झाला. Ms करण्यासाठी परदेशात गेला.नोकरी करत शिक्षण  करत Ms पण पूर्ण केले आणि गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी पण लागली.

विजय मात्र बीकॉम नंतर ca करावे म्हणून त्यासाठी प्रयत्न करू लागला. पण अवघड… जमेना… दिले सोडून. Mba साठी ऍडमिशन घेतली पण तेही जमेना… लॉ करावे वाटून तेही प्रयत्न केले पण ते सुद्धा जमले नाही.

शेवट खूप खटाटोप करून कोणाच्या तरी वशिल्याने एका खाजगी कंपनीत चिकटला एकदाचा. पण पगार कमी म्हणून जेमतेम महिनाखर्च भागवून जीवन जगू लागला.

गावातले सगळे आश्चर्य चकितच झाले. असे कसे झाले? का झाले? दोघेही बुद्धिमान समजत असताना एकावर अशी परिस्थिती का आली?

गावातली एक आजी म्हणाली पडलो झडलो तरी चालेल पण प्रयत्न कधीच सोडले नाही पाहिजेत. ओल्या झाडावर चढू पहाणारे माकड चार फूट वर गेले तर तीन फूट खाली येते. परत प्रयत्न केला तर तसाच अनुभव येऊनही ते दोन फूट वर पोहोचलेले असते. असेच प्रयत्न चालू ठेवले तरच ते शेंड्यावर पोहोचू शकते.

किंवा दह्यात पडलेल्या बेडका प्रमाणे जो प्रयत्न सोडतो तो दह्यात बुडून मरतो पण जो प्रयत्न करत रहातो तो दह्याचे ताक करून त्यावर निर्माण झालेल्या लोण्यावर उभे राहून उडी मारून बाहेर पडून स्वतःची सुटका करू शकतो.

येथे अजयने प्रयत्न सोडले नाहीत. अपार कष्ट घेतले त्याचे फळ म्हणून त्याचे चांगले झाले. तर विजयने प्रयत्नच सोडले दुसरा मार्ग निवडला त्या मार्गावर पण अडचणी येताच जाऊदे म्हणून सोडून देत गेला परिणामी तो त्याच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकला. त्याचे वाईट काही झाले नाही असे म्हटले तरी फार प्रगती झाली नाही ध्येयापासून भरकटला हे सत्यही कोणी नाकारू शकत नाही.

म्हणूनच कोणी कधीच प्रयत्न करणे सोडू नये. त्यामुळे नकळत का होईना थोडी थोडी प्रगती होत असते हे निश्चित. मग ध्येय साध्य होणारच. कितीही झाले तरी प्रयत्नांती परमेश्वर हे खरेच.

(२) करावे तसे भरावे…

राहुल आणि सचिन दोघे जिवलग मित्र. दोघांनाही एक एकच मुलगा. सारख्याच वयाचे. राहुल आणि त्याची बायको रागिणी दोघेही चांगल्या कंपनीत नोकरीला. त्यामुळे त्यांचा मुलगा रोहन लहानपनापासून पाळणाघरात राहिला. अगदी पहिली पासूनच त्याला बोर्डिंग स्कुलमध्ये घातले. अगदी अद्ययावत सुविधा त्याच्यासाठी नेहमीच उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे खूप चांगले शिक्षण त्याने घेतले पण पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला आणि आपल्या आवडीच्या मुलीशी विवाह करून तेथेच स्थायिक झाला.

सचिन पण चांगल्या हुद्द्यावर चांगल्या कंपनीत कामाला. त्याची बायको सुप्रिया पण सुशिक्षित चांगल्या नोकरीत होती. पण मुलगा सर्वेशच्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली. काही दिवस ती घरीच होती. मग सर्वेश शाळेत जाऊ लागला आणि तिने ट्युशन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे ती घर तर सांभाळू शकत होतीच पण सर्वेशकडे लक्ष देतादेता आता अर्थार्जनही करू शकत होती.

सर्वेशही इंजिनियर होऊन अनेक छोटे मोठे कोर्सेस करून त्याने आधी काही वर्ष नोकरी करून स्वतःची इंडस्ट्री उभी केली. आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशी विवाह केला. ती पण त्याला व्यवसायात मदत करत होती.

अगदी दोन्ही मित्रांचे सगळेच उत्तम चालले होते.राहुल सचिन दोघेही रिटायर्ड झाले होते. राहुल रागिणीला मुलाबद्दल खूप अभिमान होता. पण रिटायर्ड झाल्यानंतर काही दिवस ते परदेशात जाऊन राहूनही आले पण परत आल्यावर त्यांना एकटेपण जाणवू लागले. मुलगा आपल्यापाशी नाही ही खंत सतावू लागली. रोहनला त्यांनी भारतात परत ये म्हणून सांगितले पण त्याने नकार दिला.

परंतु सचिन सुप्रिया अगदी समाधानाचे आनंदाचे जीवन जगत होते. नातवंडा बरोबर रमत होते. सर्वेश आई बाबांकडे विशेष लक्ष देत होता काळजी घेत होता.

राहुलला सचिनचा हेवा वाटू लागला. उगीचच मनात तणाव वाढून मैत्रीत अंतर पडू लागले.

काही दिवसात रागिणी देवाघरी गेली आणि राहुल याहूनच एकटा पडला. एकाकीपण खायला उठले तेव्हा रोहन काही दिवसांसाठी आला. त्याने राहुलला परदेशात या म्हटले पण राहुल तयार नसल्याने त्याने निर्विकारपने राहुलची व्यवस्था वृद्धाश्रमात केली आणि तो परदेशात जायला निघाला तेव्हा राहुल म्हटला नको रे रोहन मला असे येथे सोडून जाऊ. रोहन लगेच म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या सोयीसाठी मला पाळणाघरात ठेवले होतेच की. नंतरही तुमच्या पार्ट्या, नोकऱ्या याच्या आड मी येऊ नये म्हणून मला बोर्डिंगमध्ये ठेवलेच होते की. मग मी माझ्या सोयीसाठी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं तर कुठं बिघडलं?

नाईलाजाने राहुल वृद्धाश्रमात राहू लागला.

सचिन पण वयानुसार अशक्त झाला होता. पडल्याचे निमित्त होऊन त्याचे दोन्ही पाय अधू झाले होते. पण सर्वेश रोज रात्री सचिनची सेवा करायचा सुट्टीच्या दिवशी महिन्यातून दोनदा तरी पाटकुली घेऊन बाहेर नेऊन आणत होता.एकदा राहुलला भेटायला सुद्धा घेऊन गेला . सर्वेश सगळे आनंदाने करत असल्याचे पाहून राहुलने विचारले तू कसे हे करतोस? तेव्हा सर्वेश म्हणाला मी लहान असताना बाबांनी नाही का मला शी शू साठी नेले? साफही केले? मला पाठकुली घेऊन इकडे तिकडे फिरवले? अगदी माझ्या मुलासाठी पण केले. मग आता मी तेच त्यांच्यासाठी केले तर कुठे बिघडलं?

सचिन राहुलला भेटून गेला आणि मग त्याला त्याच्या आयुष्यातली मोठी चूक समजली. न कळतं तो बोलून गेला करावं तसं भरावं हेच खरं…

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शीरखुर्मा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ शीरखुर्मा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे 

(आम्हाला तर आता कशाचाच विचार करून चालणार नव्हतं कारण ते आमच्या दृष्टीने शेवटचं घर होतं.)  – इथून पुढे —- 

आडबाजूला भिंतीला टेकून बाळूभाई च्या दारात आम्ही दोघे उभे राहिलो. बाळूभाईंच्या घरातून येणाऱ्या जाणाऱ्याला निरखून पाहू लागलो.पण आमच्याकडे कुणी पाहत नव्हते. तर कुणी पाहूनही न पाहिल्यासारखे करत होते.

पाच मिनिटे आमचा हा असा कार्यक्रम चालू होता. एका क्षणी अचानक तीन-चार लोक बाळू भाईंच्यासोबत घरातून शीरखुर्मा पिऊन बाहेर पडले. त्यांना पाहून आम्ही आमची तोंडे बाजूला केली. ते लोक बाहेर जाताच आम्ही पटकन उडी मारून दरवाजात गेलो.  बाळू भाईंची  एक पोरगी चांद समोरच होती. ती आम्हाला, ” या ” म्हणाली त्यात्याबरोबर आम्ही समोर बसायला टाकलेल्या पोत्यावर दोघे अगदी ऐटीत जाऊन बसलो…!  योगायोगाने त्यावेळी आमच्या दोघांच्या अंगावर नवे नसले तरी थोडेफार बरे कपडे होते.

घरातून चांदची आई म्हणजेच भाभी बाहेर आल्या. आम्हाला पाहून त्यांनी विचारले, ” कुणाचे रे तुम्ही?”

बिचकत मी म्हटले, ” जानरावदादाचा. “

मी घाई घाईत आडनाव न सांगता फक्त माझ्या वडिलांचेच नाव सांगितले. ते एकूण भाभी म्हणाल्या बापूंचे व्हयं! बसा, बसा. मी आलेच शीरखुर्मा घेऊन… आणि मग काय वातावरण एकदमच बदललं…आम्ही जाम खुश झालो. थोड्याचवेळात भाभी पटकन दोन वाट्या शीरखुर्मा आणि बशीत पाच सहा चोंगे घेऊन बाहेर आल्या. आमच्या पुढे ते ठेवत म्हणाल्या, ” खावा.” आम्ही चमच्याने शिरखुर्मा खाऊ लागलो. हा हा हा… काय काय तो गोडवा! अगदी अमृतासमान होतं ते पक्वान आमच्यासाठी. भजासारखे गोल गोल दिसणारे ते चोंगे तर फारच गुलगुलीत होते. आम्ही एका वेळी ते दोन-दोन चोंगे  आमच्या दोन्ही गालातून कोंबत होतो. शीरखुर्मा तर तोंडाला वाटी लावूनच पीत होतो.

” थांबा दमानं प्या, अजून थोडं आणते मी, ” भाभी म्हणाल्या आणि चक्क त्यांनी लगेचच आम्हाला अजून एकेक चमचा शिरखुर्मा वाढला, प्रत्येकी दोन सोंग सुद्धा वाढले.

हासगळा चमत्कार कसा काय होत होता…! मलातर काहीच कळेत नव्हतं….  खरं सांगायचं तर तेवढा विचार करण्याचं ते माझं वय सुद्धा नव्हतं आणि ती वेळ सुद्धा नव्हती…

तेवढ्यात ”  बापू कसे आहेत? ” भाभींनी मला विचारले. तसे मी मानेनेच हो म्हटले. पण खरे तर त्यांचा प्रश्न ऐकून मला गांगरल्यासारखे झाले होते. कारण  बापू म्हणजे  ‘जानराव बापू’ ते गावातले सवर्ण जातीतले एक प्रतिष्ठित गृहस्थ होते ते गावचे माजी सरपंच होते.त्या उलट आमचे वडील म्हणजे नावाचेच जानराव,अत्यंत गरीब शेतमजूर. त्यांना सगळे नावानेच हाक मारायचे. केवळ आम्ही घरातलेच त्यांना आवडीने दादा म्हणायचो इतकेच. 

आपल्याला समजून घेण्यात  भाभींची काहीतरी गफलत झाली आहे ते माझ्या लगेच लक्षात आले होते. पण चला वडिलांच्या नावाचा आपल्याला काहीना काहीतरी फायदा होतोय ते माझ्या लक्षात येत होते. भाभी आणखी काही बोलणार आणि आपला पचका होणार त्यामुळे आम्ही चड्डीला हात पुसून घरातून तात्काळ पळ काढला…! आणि सरळ मशिदीच्या मागून चौकात आलो तिथे अजय आणि दादण्या भेटले. अजयने आम्हाला विचारले ” मिळाला का रे शीरखुर्मा तुमाला ?” 

” आरं, लई पोटभर खाल्ला “,मी म्हटले.

” आयला आम्हाला काहीच न्हाय मिळालं…! “,तो केविलवाणी तोंड करून म्हणाला. त्या दोघांच्याकडे पाहून मला खूपच वाईट वाटलं थोडा विचार करून मी म्हटलं,” चला माझ्याबरोबर. ” 

“कुठं” 

“बाळूभाईच्या घरी,शीरखुर्मा खायला.”

मग काय ते हरखलेच की!

मी पुढं आणि माझ्यामागे ते दोघं आणि त्यांच्या मागे भूषण येऊ लागला.

मी बाळू भाईंच्या घरात हळूच डोकवलं. त्यांच्या दुसऱ्या पोरीनं भाभींना  खुणावले, “मगाशी आये हुये वो लडकी पुनिंदा आये है.” 

” या….या आत या “,  भाभींनी मला पाहताच आत बोलावलं. 

” आमचे दोस्त हाईत त्यांना बी खायचंय हे… ” मी सांगितलं.

” बसा, बसा मी शीरखुर्मा आणते… ” असं म्हणून भाभी आत गेल्या. 

आम्ही चौघे एका ओळीत बसलो मी सगळ्यांना नीट बसवण्याचं काम करत होतो.

भाभींनी शीरखुर्मा देताच अजय व दादण्या हे दोघे शीरखुर्मा पिऊ लागले. “कुणाबरोबर आला वस्तीवरून?” भाभींनी मला प्रश्न केला. 

” आम्ही दोघे चालत आलो. ” भूषणकडे बोट दाखवत  मी म्हणालो.

“बापू आल्यात का?” 

” व्हयं आल्यात तिकडं गावात “, मी भाभींच्या प्रश्नाला कशीबशी वाकडीतिकडी उत्तरं देत होतो.

खरे तर मी या दोघांच्या वाट्या लवकर संपण्याची वाट बघत होतो.परंतू शीरखुर्मा गरम असल्यामुळे त्यांनाही तो भरभर पिता येत नव्हता. मी भूषणला इशारा केला. आम्ही दोघांनी बशीतला एकेक चोंगा घेत बशी मोकळी केली.तसा  ” ये माझं भाजं दे…! ” दादण्या जोरात ओरडला. 

” ये गप उठ, बास झालं… ” मी म्हणालो. 

तेवढ्यात भाभी म्हणाल्या, ” थांबा,थांबा अजून देते चोंगे पण भांडू नका.”

त्या बशी घेऊन चोंगे आणायला गेल्या तोपर्यंत आम्ही सगळे त्यांच्या घरातून फरार झालो.

आम्ही चौघे खुशीत पिपरणीच्या झाडाखाली आलो तिथे खेळू लागलो. तेवढ्यात तिकडून विकास आला.

” काय रे,  खाल्लास का शीरखुर्मा? ” दादण्यानं त्याला विचारलं. 

” न्हाय रं… मला कुणीच नेलं न्हाय शीरखुर्मा खायला. ” विकास नाराजीनं म्हणाला.

” आरं मग जा की ह्यांच्याबरोबर बाळूभाईच्या घरी.आरं लय मज्जा हाय नुसती. “दादण्या पुढे म्हणाला.

“काय लेका मला काहीच मिळालं नाही ,  मला घेऊन चला की तिकडं,”  विकास विनंती करू लागला.

थोडा विचार करून मी म्हटलं, ” चला ” मग सगळेच बाळूभाईच्या घराकडे निघालो. तशी ती दोघं मागे सरकली.

विकासला घेऊन मी बाळूभाईच्या घरी गेलो. तिथे पुन्हा तेच आम्हाला पाहताच बाळूभाईच्या दुसऱ्या मुलीने आपल्या आईला खूणवलं. आता मी थेट घरात शिरलो आणि विकास कडं बोट करून म्हणालो, ” ह्यो एकटाच राहिलाय त्याला लय भूक लागलीय.”

” बरं, बरं असुद्या या…या… बसा म्हणत बाबींनी तिसऱ्यांदा माझं स्वागत केलं.

आम्ही दोघे ऐटीत बसलो. भाभी शिरखुर्माची एक वाटी आणि चोंग्याची बशी घेऊन आल्या. वाटी खाली ठेवताच विकास ने एक भुरखा मारला. अन तेवढ्यात बाळूभाई घाईघाने घरात आले.आल्याबरोबर त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि आम्ही दोघे टरकलोच…! आम्ही दोघे पळण्याची गडबड करू लागलो. मी बशीतले दोन चोंगे हातात घेतले.

“अहो,जानराव बापूंची मुले आहेत “, भाभी म्हणाल्या.

” कोण? ही? ” भाई आमच्याकडे पाहून उत्तरले.

ते ऐकून मी तर गारठलोच…! आता आपली काही धडगत नाही. मी विकासला खूणवलं, उठण्याविषयी मी त्याला डिवचू लागलो पण तो काही केल्या वाटी सोडेना.

त्याचवेळी बाळूभाई भाभींच्या कानाला कान लावून माझी खरी ओळख सांगून लागले. माझ्या ते लक्षात आल्यावर मी उठून सरळ बाहेर पळू लागलो. माझ्यामागे चड्डी धरून विकासही बाहेर पडला….घारघाईत बाहेर पडताना अर्धी वाटी शिरखुर्मा त्याच्या अंगावर सांडला होता. त्याचे ओघळ त्याच्या गोलाकार ढेरीवरून सरळ खाली ओघाळत होते…

एका दमात पळत आम्ही वाड्यात येऊन चावडीत धापा टाकत दाखल झालो. माझ्या हातातल्या दोन चोंग्याचा  त्यावेळी पार भुगा झाला होता…. 

– समाप्त –

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शीरखुर्मा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ शीरखुर्मा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

शीरखुर्मा  हे एक वर्षातून एकदाच मिळणारे दुर्मिळ असे पक्वान ! रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी मोठा उत्सव असतो त्यांच्या आनंदाला त्यादिवशी उधान असते. त्यादिवशी मुस्लिम बांधव आपल्या सर्व नातेवाईकांना,शेजाऱ्यांना, प्रतिष्ठित, निमंत्रित, मित्रपरिवार, जमातवाले इत्यादी सर्वांना अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने आपल्या घरी बोलावतात आणि शीरखुर्मा खाऊ घालतात.

त्यादिवशी शीरखुर्मा हे जगातले सगळ्यात मोठे पक्वान असते. ती केवळ एक शिरखुर्माची वाटी नसते… तर ती वाटी असते बंधुत्वाची…! ती वाटी असते समतेचे प्रतीक…! एवढेच नव्हेतर ते असते समाजा समाजातील माणसांच्या प्रेमाचे अलोट प्रतिक…!   म्हणूनच तर गावातील कुठल्याही जातीचा माणूस असो तो वर्षातून एकदा आपल्याला शीरखुर्मा खायला मिळणार याची वाट पाहत असतो आणि तो खायला मिळाल्यावर स्वतःला भाग्यवान समजत असतो.

तसे पाहिले तर शीरखुर्मा म्हणजे  एक शेवयांची खीर असते जी मुस्लिमेत्तर लोकांच्या घरी सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता येते. त्यामध्ये सुद्धा दूध, केशर आणि महागातले ड्रायफ्रूट्स घातलेले असतात. तरीपण त्याला शीरखुर्माची गोडी येत नाही कारण शिरखुर्म्यात मुस्लिम बांधवांचे प्रेम असते… त्याचा गोडवा खिरीमध्ये मिसळलेला असतो.तर त्याची सर दुसऱ्या कशाला कशी येईल?

खूप वर्षापूर्वीची माझ्या बालपणीची एक गोष्ट आहे. त्यावेळी मी साधारणपणे 11ते 12 वर्षांचा असेन. तो एक रमजान इदचा दिवस होता.  सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते. आम्ही आंघोळ करून चावडीपुढे खेळत असताना पोपटदादा अचानक तिथे आला. तो खूपच खुशीत दिसत होता. दररोज याच वेळी तो अर्धी पावशेर घेऊन टाईट असायचा. त्यामुळे त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नसे. कोणाची तरी दारू पिऊन दुसऱ्याच कोणालातरी शिवीगाळ करणे,  कोणाबरोबर तरी भांडण करणे हे त्याचे रोजचे ठरलेले असे परंतु त्यादिवशी मात्र तो एकदम खडकमध्ये होता. विशेष म्हणजे तो आपल्या दोन्ही पायावर सरळ उभा होता…!

आपल्या ओठावरून जीभ फिरवत आमच्याकडे बघून तो म्हणतो कसा, ”  पोराहो, जावा… शीरखुर्मा पिऊन या, मी आत्ताच चार वाट्या शीरखुर्मा पिऊन आलो. ” एवढे बोलून त्याने एक जोरकास ढेकर दिला.

आम्ही त्याला विचारलं, ” दादा शीरखुर्मा म्हणजे काय असतं?”

“अरे येड्यांनो, आज  ईद आहे ना? त्यामुळं मुसलमानांच्या घरी प्रसाद म्हणून सगळ्यांना शीरखुर्मा देत्यात.”

तुम्हाला मोठ्या माणसांना देत असत्याला आम्हाला बाराक्या पोरांना कोण देणार?मी विचारले.

“अरे पोरांनो, ते लहानांना,थोरांना सगळ्यांनाच देत्यात जावा तुम्हाला बी देत्याल, आजच्या दिवशी कोण न्हाय म्हणणार न्हाय. ” 

 “पण,कुणाच्या घरी जायचं आम्ही? ”  मी विचारलं. 

“अरे, कोणाच्या बी घरी जायचं… समशेर,ताया, रमजानभाई, बरकतभाई जाफरभाई,मुन्नाभाई नाहीतर आपला बाळूभाई आहेच की..! त्याच्या घरी जा. सगळी आपलीच हाईत.

पोपटदादांनी आम्हाला अगदी सविस्तर माहितीदेवून आम्हाला शीरखुर्मा खायला जाण्यासाठी प्रोत्साहीत केले.

मग मी हळूच म्हटलं,” आम्हाला सोडा की कुणाच्यातरी घरी, तुमच्या वशिल्याने.”

“अरे,त्याला वशिला कशाला लागतोय?कोणीबी जातय कोणाच्याबी घरी आज सण आहे त्यांचा कोणी कोणाला नाही म्हणत नाही.जावा, पळा लवकर… “

“आईला ‘लईच भारी झालं की! मग जाऊ का मी समदीच ?%

” अरे जावा जावा लवकर नाहीतर सगळा शीरखुर्मा संपून जाईल… “

संपून जाईल म्हटल्याबरोबर आम्ही सणाट पळालो…

सगळेजण वाडा ओलांडून मशिदीकडे गेलो. तिथे माशिदीवर भलमोठ्ठा स्पीकर लावला होता.  स्पीकरवर बहारदार  कव्वाली ऐकायला येत होती.

सगळे मुस्लिम बांधव नवनवीन कपडे घालून डोक्यावर अर्ध चंद्राकर टोप्या घालून आनंदाने इकडून तिकडे धावत होते. समोर आल्यावर एकमेकांच्या गळाभेटी करत होते. त्यांच्या भाषेत एकमेकांना काहीतरी म्हणत होते. सगळेजण आपापल्या घराच्या विरुद्ध दिशेला जात होते. ते एकमेकांकडे शीरखुर्मा खायला जात होते असा त्याचा अर्थ होता. आम्ही ते सगळे लांबून पाहत होतो. तर गावातले बरेच लोक सुद्धा मुसलमानाच्या वाड्यातून अगदी मिटक्या मारत बाहेर येत होते. शीरखुर्मा खाऊन आलो म्हणजे गावात आपला किती वट आहे, आपली किती पथ आहे, मुसलमान लोक आपल्याला किती मानतात.हे प्रत्येकाच्याच देहबोलीतून जाणवत होते.

आमच्यातले दोघेजण समशेर भाईच्या वाड्याकडे गेले. दोघे आताराच्या घराकडे गेले. बरकत भाईच्या घराकडे मी आणि भूषण वळलो. बरकत भाईंचे घर खूप मोठे होते. इकडे गावी त्यांचा मटणाचा धंदा होता. घरातल्या महिलांचा बांगड्याचा धंदा होता. त्यामुळे घरात चांगलीच बरकत होती. परंतु त्या घरी माणसांची खूपच गर्दी असल्यामुळे आम्हाला आत जाण्याची डेरिंग होत नव्हती.

पांढराशुभ्र कुर्ता पायजमा घातलेले मोठमोठाले, दाढीवाले लोक,पान खाऊन लालसर तोंड झालेले ते मोठे लोक पाहिल्यावर आम्ही त्यांच्या दारातूनच काढता पाय घेतला.

बरकत भाईच्या शेजारीच एका मिलिटरीमनचे घर होते पण तिथे भाभी  घरी एकटीच होती. लहान पोरं कुठेतरी खेळायला गेली होती.  आम्ही तिच्या घरात डोकावल्यासारखं केलं तर आतून आवाज आला, ” कोण पाहिजे रे इनको? किसके लडके है तुम?” भाभींचा  असा आवाज कानावर पडताच आम्ही तिथून कलटी मारली अन थेट मशिदीच्या मागे उभे येऊन उभे राहिलो… मनात विचार केला आज काय आपल्याला शीरखुर्मा मिळत न्हाय. पण शीरखुर्मा न खाता घरी परत जायचं तरी कसं? मन माघर घ्यायला तयार होत नव्हते. मग मी भूषणला म्हटलं, ” काय होईल ते होईल आपण आता माघार घ्यायची नाही. ” भूषणही म्हणाला होय चाललं. ” शिरखुर्मा खाल्ल्याशिवाय आज घरी जायचं नाही. असा आम्ही चंगच बांधला होता. तेवढ्यात समोरून रामूसवाड्यातून आमचा नाना आला. तो स्वभावाला एकदम भारी आणि दिलदार माणूस होता. त्याच्याजवळ पैसे असल्यावर कोणी काही मागावं तो कोणाला नाही म्हणायचा नाही. प्रेमाच्या माणसावर तर तो  पैशांची उधळण अगदी मुक्तपणे करीत असे परंतू त्याचा एक वीक पॉइंट होता तो असा की तो अत्यंत स्वाभिमानी होता. त्याला कुणी कुणापुढे हात पसरलेलं आवडायचं नाही. आता आम्ही शीरखुर्मा पिण्यासाठी दारोदारी फिरतोय हे त्याला कधीच आवडलं नसतं. त्याला तसं कळलं तर तो आम्हाला फोकाने मारल्याशिवाय राहणार नाही. त्या भीतीनेच मग आमची गाळण उडाली! नानाला समोर पाहताच भूषण पळाला. मी ही त्याच्या मागे पळालो. बाकीचेही वाट दिसेल तिकडे पळाले.भूषण पुढे आणि मी मागे मशिदीला वेडा मारून रस्त्याने सरळ नळापर्यंत जाऊन नळापासून बोंदऱ्याच्या  बागेतून थेट धोंडीरामनानाच्या दुकानाला वळसा घालून गावात शिरलो…! पुढे भिमजी नानांच्या दुकानासमोरून तेली नानाच्या दारातून जाफर भाईंच्या दारात आलो.

जाफरभाई आपला गरीब मनुष्य होता.टेलरिंग काम करायचा. तो एक साधा टेलर होता. त्याच्याकडे नवीन कपडे कमी पण जुनेच कपडे जास्त शिवायला यायचे. तो आणि त्याची बहीण कसेबसे दिवस काढत होते. त्याची ती परिस्थिती आम्हाला माहीत असल्यामुळे त्यांच्या घरी शीरखुर्मा खाण्यासाठी जाताना मला वाईट वाटायला लागले.त्यामुळे आम्ही ते टाळले. त्याच्या पुढचं घर माझा वर्गमित्र असलेल्या फरीदचं होतं म्हणजे ते बंदच असायचं कारण ते सगळे लोक मुंबईला असायचे. फक्त झेंड्याला म्हणजे यात्रेला सगळे गावात यायचे.

फरीदचे घर ओलांडून आम्ही पुढे आलो पुन्हा त्या भाभीच्या दारात आलो जिने मघाशीच आम्हाला हाकललं होतं. आता त्यापुढे एकच घर होतं ते म्हणजे बाळू भाईचं. तेवढा एकच पर्याय आता आमच्याकडे होता. बाळूभाई सुद्धा अत्यंत गरीब मनुष्य होता.  त्याला चार मुली आणि दोन मुलगे होते. त्यांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय असल्याने संसार कसाबसा तरी चालत होता. आम्हाला तर आता कशाचाच विचार करून चालणार नव्हतं कारण ते आमच्या दृष्टीने शेवटचं घर होतं.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जॉब… — लेखिका : सुश्री गीता गरुड ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? जीवनरंग ?

☆ जॉब… — लेखिका : सुश्री गीता गरुड ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“वहिनी,माझ्या आईला तू उलट कशी बोलू शकतेस?”

नणंद रेश्मा आईचा कैवार घेत मालतीशी भांडायला अगदी अर्ध्या दिवसाची रजा टाकून आली होती. 

उन्हातून आली म्हणून मालतीने तिला माठातलं गार पाणी दिलं. 

“आज लवकर सुटलं ऑफीस?” मालतीनं विचारलं

“हे असं आमच्याशी गोडगोड बोलतेस नि आमच्या अपरोक्ष आमच्या आईला..अगदी पोरक्यासारखी वागणूक देतेस. बरोबर ना.”

जीजी डोळ्याला पदर लावून बसली. “बघ बाई आता तुच काय ते. तू झालीस तेंव्हा दुसरीपण पोरगीच झाली म्हणून हिणवलं सासूसासऱ्यांनी पण तुम्हा लेकींनाच गं माझी कणव.”

“आई,तू अजिबात रडू नकोस. तुझी लेक जीवंत आहे अजून. खडसावून जाब विचारते की नाही बघ. कुणाचं मिंध रहायची गरज नाही तुला. पेंशन आहे चालू तुझी. यांच्या जीवावर नाही जगत तू.” भरल्या गळ्याने रेश्मा आईचे डोळे पुसत म्हणाली.

“आत्या काय चाललय तुझं. खालपर्यंत आवाज येतोय,” नुकतीच  घरात पाऊल टाकत असलेली किमया आत्याजवळ आपली स्याक ठेवत म्हणाली. 

“या पोरीला माझा आवाज सहन होत नाही गं रेशम. आता तुझाही सहन होत नाहीए बघ.”जीजी असं म्हणत परत रडू लागली.

“एक मिनिट. हे काय चाललंय आणि आत्तू तू माझ्या आईवर का कावत होतीस मगाशी? पहाटे उठल्यापासनं आई घरात वावरतेय. एकतर कामवालीही मिळत नाहीए हल्लीच्या काळात. मिळाली होती एक धुणी धुवायला पण आजी रोज आपली चादर धुवायला टाकू लागली,कधीकधीच्या कपाटातल्या साड्या काढून तिला धू म्हणून सांगू लागली. ती बिचारी मावशी पळून गेली नंतर पोळ्या करायला बाई लावली तर तिच्या खनपटी बसू लागली..इतक्याच पातळ हव्या,एकसारख्या हव्या..तीही परागंदा झाली. 

डॉक्टर म्हणतात,आजीला अल्झायमर झालाय. गोळ्या चालू केल्यात पण ही कधी घेते,कधी खिडकीतून फेकून देते. त्यादिवशी कुंडीतही सापडल्या हिच्या गोळ्या. कुठेही नाक शिंकरते,थुंकते..ते सगळं आई स्वच्छ करतेय. हल्ली तर अंथरुणातही..पण हे सारं एका शब्दाने आई बोलली का तुला!नाही नं. का तर तुला त्रास होईल. तू तुझ्या घरी सुखी रहावस म्हणून. 

हल्ली ऐकूही कमी येऊ लागलय आजीला. डॉक्टर म्हणाले,आता या वयात ऑपरेशन नको. ही मोठमोठ्याने बोलते. मोठ्या आवाजात टिव्ही लावते. दोन खोल्यांचं घर आमचं. कसं अभ्यासात लक्ष लागणार गं आत्तू! तरी आई मला हिला काही बोलू देत नाही. तूच लायब्ररीत जाऊन अभ्यास कर म्हणून सांगते. 

आजीला तेलकट कमी द्यायला स़ागितलय म्हणून घरात सगळ्यांनाच कमी तेलाचं,थोडसं अळणी स्वैंपाक  का तर आजीला वाटू नये की आम्ही तिला टाकून चांगलंचुंगलं करुन खातोय. आजीचा मधुमेह वाढलाय म्हणून आजीसोबत आमचं सर्वांच गोडधोड बंद का तर तिला टाकून कसं खायचं! 

आत्तू, माझी आई घरात रहाते म्हणून आजवर तुम्ही तिला ग्रुहित धरीत आलात. उन्हाळ्याची सुट्टी पडली की खुशाल तुझी नि मोठ्या आत्तुची मुलं आमच्याकडे. का तर मालतीवहिनी घरातच तर असते. घरात कसलं डोंबलाचं काम असतं एवढं.. नुसत्या झोपाच तर काढते!”

“किमया”..कपडे धुऊन ते वाळत घालण्यासाठी पिळे भरलेली बादली घेऊन आलेल्या मालतीने लेकीला दटावलं. 

“आई, मी कधी आत्याच्या घरी रहायला गेली की आत्या असंच बोलायची तुझ्याबद्दल. घरात तर असते. अरे,हौस होती का माझ्या आईला घरी रहायची? तुमच्याइतकीच शिकलेली ती पण आजीने मला सांभाळण्यास नकार दिला होता. मला पाळणाघरात ठेवायचं नाही असंही बजावलं होतं..खिंडीतच पकडलं होतं तिला. राहिली मग ती घरात. घरी शिकवण्या घेऊ लागली तर तेही आवडत नसायचं आजीला. मुलांना शिकवायला बसली की काहीतरी कामं सांगून उठवायची. मुलांच्या आया मुलांना पाठवेनाशा झाल्या. 

काही माणसं नं फक्त ऐकून घेण्यासाठीच जन्माला आलेली असतात त्यातलीच माझी आई. मला आठवतं,एकदा मावशीकडे मुंजीला जायचं होतं आईला आणि आईचा कैरीहार आजीने दडवून ठेवला. आई शोधूनशोधून रडकुंडीला आली. बाबाही तापले होते तिच्यावर. आजीला कोण हसू येत होतं. मला फाइव्हस्टॉर चॉकलेटसाठी पैसे देऊन माझं तोंड गप्प केलं होतं तिने तरी मी रात्री आईला आजीची करामत सांगितलीच. बाबा संतापले होते. तिला जाब विचारायला उठले तर आईनेच त्यांना शांत झोपायला लावलं होतं. 

आताशी आजी फार चिडचिड करते.  वाढलेलं ताट भिरकावून देते. आत्तू, खरंच माझी आई वाईट आहे असं धरुन चालुया आपण. तू घेऊन जा तुझ्या आईला. उगा या छळवादात नको ठेवूस तुझ्या माऊलीस.”किमयाने आत्यापुढे हात जोडले. 

“न्हेलं असतं गं पण..अतुलची फायनल एक्झाम आहे ना.  आणि आमचं घर पडलं खाडीजलळ. तिथली हवा सहन होणार नाही तिला.”

“बरं मग..”

“मग काय निघतेच मी. बराच वेळ झाला येऊन.”

तेवढ्यात किचनमधून मालतीने आवाज दिला. वन्सं,आमटी केलीय चिंचगुळाची तुमच्या आवडीची नि नाचणीचे पापड तळतेय. एकत्रच बसू जेवायला. तुमचं चर्चासत्र संपलं तर हात धुवून घ्या. मी पानं वाढते. 

“वहिनी,तुझं गं पान कुठेय?”

“आत्तु,हल्ली आजी नीट जेवत नाही ना म्हणून आई तिला कधीच्या जुन्या गोष्टी सांगत भरवते. चार घास जास्त जातात तिचे.” 

रेश्माच्या डोळ्यात पाणी आलं. 

“अहं,आत्तू,भरल्या पानावर डोळ्यात पाणी आणू नाही,”आईच म्हणते असं. आत्तुचे डोळे पुसत किमया म्हणाली. कधीतरीची गोड आठवण सांगत सासूला घास भरवणाऱ्या आपल्या वहिनीकडे पाहून जेवणाआधीच त्या माहेरवाशिणीचं मन समाधानाने भरुन पावलं.

रेश्मा जायला निघाली तेंव्हा मालतीने तिला गुळपापडीचा डबा दिला. रेश्माला अजब वाटत होतं..कधीच उलट न बोलणारी आपली भाची आपल्याला आज एवढं का बरं सुनावत होती याचं.  किमया तिला खाली सोडायला गेली..तिचा हात धरुन म्हणाली,”सॉरी आत्तू,आज जरा जास्तच बोलले तुला पण..”

“पण..काय?”

“अगं महिना झाला आईच्या अंगावर जातय. माझी परीक्षा चालू म्हणून कोणालाच बोलली नाही ती. आठ दिवसांपूर्वी चक्कर येऊन पडली. डॉक्टरकडे न्हेलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ञांची चिठ्ठी दिली. तिथे सगळ्या तपासण्या झाल्या. रिपोर्टस आलेत. गर्भाशयात ट्यूमर आहे. मला आजीचा राग येतोय. हीच तिला सणावाराला गोळ्या घेऊन पाळी पुढेमागे ढकलायला लावायची. माझ्या लेकी यायच्यात. तू बाहेरची झालीस तर त्यांचं कोण करणार..देवाचं कोण करणार? आता माझ्या आईचं कोण करणार गं आत्तु?”

रेश्मा आपल्या भाचीकडे पहात राहिली. एक लेक तिच्या आईबद्दल जाब विचारायला आली होती. जाताना एक लेक तिला जाब विचारत होती!

लेखिका : सुश्री गीता गरुड

प्रस्तुती : सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तेजस्विनी… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तेजस्विनी… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे

(नवरदेव, त्याचे आई वडील व इतर नातेवाईक (मध्यस्थ) पोलीस स्टेशनात लाॅकअप मध्ये बंद झाले) – इथून पुढे.

“अरे विजय, अजून आप्पा, काका इतर मंडळी कोणीही आली नाही. काय समस्या आहे रे बाबा, मला तर काही समजेनासं झालंय. काय करू मी ? कसं करू ?

“आक्का शांत हो आणि मन घट्ट करुन ऐक. नवरदेव, त्याचे आई वडील व इतर मध्यस्थ पोलीस लाॅकअप मध्ये आहेत.” ” अरे देवा, हे काय घडलंय रे.माझी छकुली वधूवेषात, अंगाला हळद, लग्नमंडपात लोक जमलेले, दाराशी सजवलेला घोडा, वाजंत्रीवाले, एक हजार लोकांच्या जेवणावळीची तयारी. आणि हे काय घडलंय विपरीत. काय करू मी आता ? कसं सांगू छकुलीला ? कोणत्या तोंडानं सांगू ? केवढी अपराधी आहे मी तिची.देवा हा दिवस दाखविण्यापूर्वीच तू मला मारलं का नाहीस.”

“चूप, असं अशुभ बोलू नकोस ” छकुलीचा हात माझ्या ओठांवर होता.” माझं नशीब बलवत्तर कि त्या माणसाचा खरा चेहरा लग्नापूर्वीच माझ्यासमोर आला.लग्नानंतर ही घटना घडली असती तर मी किती अभागी ठरली असती. अशा नीच, नालायक माणसाच्या चेहर्‍यावरचा सभ्यतेचा बुरखा वेळीच निघाला ही आपली पुण्याई. मी ही शिकलेली आहे, सुविद्य आहे, आर्थिक पाठबळही आहे माझ्याजवळ. मग मला घाबरण्याचं कारण काय आहे.नकोय मला असला माणूस. त्याने कितीही माफी मागितली आणि लग्नाला तयार झाला तरी पण मला तो नकोय.उतरवते मी माझा मेकअप. लोकांना मात्र जेवण करून जायला सांगा.”

मी तर अगदी दिग्ड,मूढचं झाले होते.काय करावे सुचतच नव्हते.जणू मी निर्जीव पुतळाच झाले होते.छकुलीच्या लहानपणीच तिचे वडील एका अपघातात निवर्तले आणि मी माहेरी भावाच्या आश्रयाला आले.भावाने मात्र मला भक्कम सहारा दिला.मी ही मला जमेल तसे काम करीत राहिली.माझी छकुली मोठी गुणी पोर, आईचं दुःख जाणत होती ती.कधी कोणत्या गोष्टीचा हट्ट केला नाही कि कोणती गोष्ट मागितलीही नाही.आहे त्यात नेहमी समाधान मानलं. चांगली शिकली, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात प्राविण्य मिळवलं आणि आज स्वतःच्या मजबूत अशा पोलादी पायांवर ती उभी होती.आर्थिक स्वावलंबन तर होतंच पण तिचा आत्मविश्वासही दांडगा होता.अन्यायाविरूद्ध चीड होती. सत्याची चाड होती.अडलेल्यांना मदतीचा हात देणारी होती.तर दुष्टांना त्यांची जागा दाखवून देणारी मर्दानी दुर्गा होती, तेजस्विनी होती.

“छकुली छकुली,मला पुढचं बोलताच येईना.” नको रडूस आई, तुझं दुःख जाणते मी.पण आमचा यात काही दोष नाही. आम्ही कोणतंही पाप केलं नाही.मग आम्ही घाबरायचं कशासाठी ? ” ” पण बेटा हा जाती समाज, आजच्या विवाह सोहळ्याची ही तयारी ” ” कोणता जाती समाज. कोणी काही विचारणार नाही आम्हांला.कारण आमचा दोषच नाही कोणता.बाकी राहिलं जेवणावळीचं. त्याचं उत्तर मी दिलेलंच आहे. सगळ्यांना जेवून जायला सांग. मी कपडे बदलते माझे.” 

“नको छकुली, नको कपडे बदलवूस, नको मेकअप उतरवूस.नवरीला एकदा हळद लागली कि धुवायची नसते.अपशकून असतो तो.” ” पण मामी, मी काय करू. लग्न तर मोडलंय.दोषी बसलेत पोलीस लाॅकअप मध्ये. आणि मी तर अशी सडकी विचारसरणी ठेवणार्‍यांना नक्कीच धडा शिकवीन. मी गप्प बसणार नाही मामी “.

गप्प नकोच बसू तू आणि दोषींना धडाही शिकव. मी सुद्धा यासंदर्भात मदत करीन तुझी. खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहीन. पण हळद धुवू नकोस पोरी “

“मग काय करू मी,? कोण लग्न करील माझ्याशी ?

“या समाजात चांगली विचारसरणी असलेली मुलेही असतात बेटा. माझ्या आतेभावाचा मुलगा निलेश आहे. तो करील तुझ्याशी लग्न.अर्थात तो तुझ्यासारखा शिकलेला नाही. बी. काॅम झालाय. एका सी ए कडे प्रॅक्टीसही करतोय आणि सी ए चा अभ्यासही करतोय. तुझी इच्छा असेल तर मी बोलू माझ्या भावाशी “

छकुलीनं आपला आश्वासक हात मामीच्या हाती ठेवला.

“काय घडतंय मला तर कळतंच नव्हतं. मी नुसती बघत होती. ” वन्स तुम्हांला पसंत आहे ना निलेश. छकुलीला अगदी सुखात ठेवील तो ” ” होय गं बाई. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आता तूच आई हो छकुलीची “

“चला चला नवरदेवाला घेण्यासाठी ” सुक्या” ला पाठवा. माझ्या भाच्यालाच सजवलेल्या घोड्यावर बसवून नवरदेवाला ( निलेशला ) घेण्यासाठी पाठविले,लग्नमंडपातील वर्दळ वाढली होती.दाराशी नवरदेव पोहोचला होता.सुवासिनी औक्षण करीत होत्या.फटाक्यांची आतिषबाजी होत होती.नवरदेव नवरीला फुलांच्या पायघड्या घातल्या जात होत्या.भटजींची मंगलाष्टके चालू होती. आणि तो क्षणही आला 

तदेव लग्नं सुनदिन तदेव

ताराबलं चंद्रबलं तदेव ।

विद्याबलं दैवबलं तदेव

लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि 

आणि छकुलीनं वरमाला निलेशच्या गळ्यात घातली.

“लग्नाला आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये ” आप्पा माईकवरून घोषित करीत होते.

“वन्स विहिणींचा मानपान करायचा आहे. येताय ना तुम्ही ” एका स्वप्नातून मी जणू जागी झाले.” अहो वन्स, सर्व निर्विघ्नपणे पार पडलंय. विहिणींचा मानपान करायचाय. येताय ना तुम्ही.” मी उठले.विहिणींना नवीन कपडे, ओटीचं सामान, गोड खाऊ घालणे. सगळे विधी पार पडत होते.नवरदेव नवरीची सप्तपदी चालू होती.

“चला कन्यादान विधी सुरू करायचा आहे ” ” आप्पा, सगळं तू आणि वहिनीनं केलंय. कन्यादानही तुम्हीच करा आता. मी तर सगळी आशाच सोडली होती.आयुष्यभर दुःख भोगलेल्या मला हा धक्का सहन न होणारा होता. पण विघ्नहर्त्या गणेशानं सगळं व्यवस्थित केलं.काही पुण्य असेल माझ्या गाठीला ते कामी आलं आज ” असं बोलत असतांनाच मला भोवळ आली आणि मी कोसळले.” काय झालं आक्का,” सगळे माझ्याभोवती जमले, माझ्या चेहर्‍यावर पाणी शिंपडले, तशी मी पुन्हा शुद्धीत आले.” वन्स, खूप ताण करून घेतलाय तुम्ही. पण आता सगळं व्यवस्थित पार पडलं ना, आता कसली काळजी. पण शारीरिक थकवा आलाय तुम्हांला. तुम्ही आराम करा पाहू. मी सांभाळेन सगळं ” छकुलीही माझ्याजवळ आली होती.

“काही नाही झालंय बेटा आईला. थोडासा थकवा आहे. बरं वाटेल तिला. तू आपले धार्मिक विधी पार पाड. जा भटजी वाट पाहाताहेत तुझी “

रात्री  छकुलीचा विदाई सोहळाही पार पडला. आता मला फार रिते रिते वाटू लागले. उद्या सकाळी वरात परतीच्या प्रवासाला लागणार होती.

“निलेश, एक महत्वाचं काम राहिलंय माझं, ते पार पाडायचं आहे मला ” ” कोणतं काम राणी सरकार. तुझं काम ते माझं काम, आता आम्ही एक आहोत सुख आणि दुःखातही “

” माझ्या पहिल्या नियोजित वरा विरूद्ध स्टेटमेंट द्यायचंय मला पोलीस स्टेशनात.आणि पुढे कोर्टातही केस चालवायची आहे मला. फसवणूकीचा व मानहानीचा दावा करणार आहे मी ” ” जरूर कर राणी या लढाईत मी सुद्धा तुझी सोबत करीन.अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे.”

सकाळी वरात परतीच्या प्रवासाला निघाली आणि माझा ऊर दुःखावेगानं भरून आला.एक पोकळी माझ्या मनात निर्माण झाली.पण माझी तेजस्विनी मात्र हरली नव्हती. कठीण प्रसंगालाही सामोरी गेली.तिचा आत्मविश्वास वाढला होता.आणि या आत्मविश्वासात तिचं व्यक्तिमत्व झळाळून उठलं होतं. आता या तेजस्विनीला एका तार्‍याची सोबतही लाभली होती.माझ्यासाठी हा क्षण परमोच्च सुखाचा होता.या परमोच्च सुखाच्या क्षणीच परमेश्वरानं माझे डोळे मिटावे ही इच्छा होती.

“आक्का, आक्का, छकुलीला आशीर्वाद दे ना ” एका तंद्रीतुन पुन्हा मी जागृत झाले. माझी तेजस्विनी आता स्वतःच्या घरट्यात विसावणार होती. माझी तपस्या फळाला आली होती.विघ्नहर्ता गणपतीने सगळं व्यवस्थित पार पाडलं होतं. एक कृतार्थ समाधान माझ्या चेहर्‍यावर होतं.

– समाप्त –

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तेजस्विनी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तेजस्विनी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

” महाराज, जेवणाची काय काय तयारी झाली आहे ” ” सगळं झालंय बाईसाहेब, मावा बर्फी, गुलाबजाम तयार आहेत. तवा भाजीची तयारी झालीय.काबुली चणे, भरली वांगी तयार आहे ” ” आणि जेवणापूर्वीचे सगळे स्नॅक्स तयार आहेत ? ” ” होय बाईसाहेब, पाणीपुरी, दहीवडा, नुडल्स तयार आहेत. जेवणानंतर बर्फाच्या गोळा, कुल्फीही तयार आहेत.मुखशुद्धीसाठी मसाला पानही तयार असेल “

” महाराज, उद्या वरात परतीच्या प्रवासाला लागेल. त्यांच्यासाठी आणि पाहुण्यांसाठी काय तयार केलंय ” ” बाईसाहेब, मसाला शेव आणि मोहनथालची पाकिटे तयार आहेत. तुम्ही आता ती ताब्यात घ्या म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही आणि उद्या वरातीच्या परतीच्या प्रवासात इडली चटणी, मसाला पुरी, बटाट्याची सुकी भाजी फ्रेश तयार करून देईन ” ” छान महाराज,उत्तम तयारी केलीय, पाहुणे मंडळींनी हाॅलही गच्च भरलाय.दाराशी सजवलेला घोडाही आणलाय. नवरदेवाकडून ग्रीन सिग्नल मिळाला कि ” सुक्या “( नवरीचा भाऊ ) लगेच नवरदेवाला घेण्यासाठी जाईल.

” अगं अगं, मीरा, थांब थोडी, कोठे निघालीय ” ” काय ग आक्का, काय म्हणतेस ” ” अगं सुवासिनींच्या ओटीचं सामान कोठे ठेवलंय ” ” अगं, माझ्या रूममधल्या कपाटात ठेवलंय व्यवस्थित. प्रत्येक पाकिटात तांदूळ, खोबरं, एक रूपयाचं नाणं, आणि ब्लाउज पीसेस सगळं व्यवस्थित ठेवलंय आणि होय नवरीची विदाई करतांना सोबत देण्यासाठी गूळ पोळीही तयार केलीय ” ” शाब्बास बाई, लग्नासाठी सगळ्यांचा हातभार लागला कि कामं कशी व्यवस्थित पार पडतात “

” ए अप्पा, अप्पा, काय करतोहेस तू.” ” काय गं

आक्का ” ” अरे हवनकुंडं आणलंहेस काय ?” ” होय गं आक्का, आणलंय सगळं.त्यासाठी समिधा, शुद्ध तूप, खारीक, खोबरं, पूजा साहित्य सगळी व्यवस्थित तयारी केलीय आणि होय गुरूजींचाही फोन येऊन गेलाय, तेही येण्यासाठी निघालेत. थोड्या वेळात येथे पोहोचतील ” ” ठीक आहे. कर तू तुझी कामं “

” ए विठ्ठल, बाहेर कार आलीय. कोण आलं आहे बघ. स्वागत कर त्यांचं ” ” आक्का मुंबईचे काका आलेत. सोबत मुलगा व सूनबाईही आहेत ” ” या काका या, नमस्कार करते. कसा झाला प्रवास ? काही त्रास नाही ना झाला ? ” ” नाही बेटा, काही त्रास झाला नाही. अगदी मजेत झाला प्रवास, कुठे आहे आमची छकुली, सेलिब्रिटी गर्ल ” ” आहे ना, बोलावते, ए सीमा, छकुलीला बोलव जरा, काका आलेत ” ” आक्का नववधूचा मेकअप चाललाय ” ” असू दे गं, काकांना भेट म्हणावं पाच मिनीटे “

लाजरी,साजिरी,गोजिरी माझी छकुली मूळातच नक्षत्रासारखी सुंदर आणि आज तर वधूवेषात फारच खुलून दिसत होती.” छकुली मुंबईचे बाबा आलेत. नमस्कार कर त्यांना” ” छकुली नमस्कारासाठी वाकली तशी वरचेवर झेलत काकांनी तिला ह्रदयाशी धरले. ” नमस्कार काय करायला लावते बेटा तिला. मुलगी तर दुर्गेचं रूप असते.आणि दुर्गाची तर आपण पूजा करतो.तिला नमस्कार करायला लावून आपण पापाचे धनी कसे होणार. बाळा खूष राहा, सुखी राहा. जीवनात तुला सगळी सुखे मिळोत. नांदा सौख्य भरे ” म्हणत काकांनी आशीर्वादाचा हात तिच्या माथ्यावर ठेवला.माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आलं.” रडू नकोस बेटा, आजचा दिवस मोठा शुभ.तुझी चिमणी स्वतःच्या घरट्यात विसावणार आहे.स्वतःच्या घरट्याचा विस्तार करणार आहे.तुझी तपस्या सफल झाली बेटा.” “काका ” म्हणत मी ही नकळत काकांच्या ह्रदयावर विसावले.

“आई, काय करतेस तू ” ” अगं बेटा ही अन्नपूर्णा मावशी, शोभा मावशी, सखू मामी, मीना आत्या आल्यात बघ ” ” काय म्हणते आमची वधूआई. परमेश्वरानं आनंदाचा क्षण आणलाय जीवनात. आनंदानं साजरा करा “, सगळ्या सुवासिनींनी बांगड्या भरा. कासाराला बोलावलंय मी. बघा त्या कोपर्‍यात बसलाय.” मी सगळ्यांना बांगड्या भरण्यास पाठविले. ” काय ताई आक्काच्या कपाळाला तांदूळाचा मळवट भरला नाहीस अजून. नवरीची आई आहे ती ” अन्नपूर्णा बोलत होती.” “अगं होय, नुसती धावपळ चाललीय सगळ्यांची. कोणाच्या लक्षातच आलं नाही. ” सुमन, ए सुमन ” ” काय म्हणता वन्स ” सुमन आक्काच्या कपाळाला तांदूळाचा मळवट भर ना ” ” होय वन्स, मी करते ते काम “

वर्‍हाडींना फेटा बांधण्याचे काम सुरू होते. अरे वाजंत्रीवाले वाजवा ना जरा. सगळे धार्मिक विधी सुरू आहेत आणि तुम्ही वाजंत्री नाही वाजवत “. लगेच वाजंत्री सुरू झाली.वातावरण निर्मिती झाली. कामाला गती आली.

” आप्पा, आप्पा वरमाला कोठे ठेवल्यात ?” ” मला नाही माहित.फुलवाल्याने सकाळी आँर्डरची डिलीव्हरी दिलीय.तुम्ही कोठे ठेवलीय मला माहित नाही “. ” काय रे बाबा, ऐनवेळी घोटाळा नको व्हायला.सुनेत्रा शोध घे गं जरा ” होय मी शोधते ” ” आक्का गूरूजींनी जयमाला वधूवरांच्या खुर्चीवरच ठेवल्या आहेत ” ” ठीक आहे. एक काळजी दूर झाली “

आप्पा वेळ होत आली रे. अजून मुलाकडच्या मंडळींकडून काही निरोप नाही ” ” येतील, आली असेल काही अडचण. मी फोनही ट्राय करतोय केव्हाचा पण तो ही लागत नाही आहे. तू काळजी करू नकोस. मी पाहतो काय ते ” म्हणत आप्पा निघून गेला. माझी काळजी वाढली.मनांत नको नको त्या शंका येऊ लागल्यात. ” हे विघ्नेश्वरा  गजानना, तुझ्यावरचं सोपवलंय रे बाबा. तूच सगळ्यांचा त्राता, विघ्नहर्ता, तूच तार रे बाबा या संकटातून “.

पंधरा मिनीटे, वीस मिनीटे, अर्धा तास, एक तास. घड्याळ पुढे पुढे सरकत होतं आणि माझ्या काळजात धस्स होत होतं. लग्न मंडपातही कुजबूज सुरू झाली होती.” अहो मला आँफिस गाठायचेय.इन्स्पेक्शन सुरू आहे.म्हटलं नवरदेव नवरीला आशीर्वाद देऊ आणि लगेच निघू,पण इथे तर काहीच तयारी दिसत नाही आहे,वरातीचा घोडाही इथेच आहे. शुभ मुहूर्त कोणी पाळतच नाही आजकाल. आपल्याला पाहिजे तेवढा वेळ ही मंडळी घेतातच.वरातीची मिरवणूक, त्यात यांची नाच गाणी, नववधूचा मेकअप दोन दोन तीन तीन तास केव्हाच निघून जातात. मग लागतात लग्नं यांच्या सोयीनुसार.कोणी या संदर्भात बोलतही नाहीत. कारण काय तर लग्न ही आयुष्यात घडणारी एकमेव गोष्ट. हौस मौज आता नाही करायची तर केव्हा करायची, हा यांचा मुख्य सवाल.

” आप्पा, आप्पा, काय झालं ? लागला काय फोन ? ” होय आक्का, लागलाय फोन ” ” काय म्हणतात ते लोक ?, अजून का आले नाहीत ? विवाहमुहूर्त टळायला नको ” ” आक्का, मुलाला पुण्यात फ्लॅट विकत घेण्यासाठी पन्नास लाख पाहिजेत ” ” पण ही मागणी तर ठरली नव्हती. आता एनवेळी कसं काय मागत आहेत, आणि आपण कशी काय पूर्ण करणार “.

होय, ही मागणी तशी आपल्या आवाक्याबाहेरची आहे.मी ही सेवानिवृत्त माणूस,मलाही कुटुंबाची जवाबदारी आहे. काय करावं ? सुचतच नाही आहे. पण हे बघ, तू काळजी करू नकोस.मी काकांशी चर्चा करतो, चार लोकही सोबतीला घेतो आणि त्या लोकांची समजूत काढतो.छकुलीला काही कळू देऊ नकोस.लग्नमंडपातील लोकांनाही तू सांभाळून घे.करशील ना एवढं सगळं व्यवस्थित.” होय मी सांभाळते सगळं  तू बघ पुढे काय करायचं ते “,

आप्पा, काका समाजातील चार प्रतिष्ठित मंडळी नवरदेवाच्या जानसघरी गेली.( जानोसा — नवरदेव व वर्‍हाडी मंडळीसाठी केलेली राहण्याची व्यवस्था ) ” हे बघा विवाह हा सोहळा दोन जीवांच्या मधुर मिलनाचा, त्यात पैशांचा अडसर नसावा. मुलगा मुलगी दोघे शिकलेले आहेत. दोघांनाही चांगल्या नोकरी आहेत.ते वसवतील आपलं घरकुल “.

” होय ना,विवाह हा दोन जीवांच्या मधुर मिलनाचा क्षणच.पण नुसती स्वप्नेच कामी येत नाहीत,त्याला वास्तवाचीही जोड हवी. मुलाच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली. हाडाची काडं केलीत आम्ही अक्षरशः. आता सुख हवयं आम्हांला, मुलाला स्वतःचं घरकुल हवयं.त्यासाठी हवा पन्नास लाख रूपयांचा निधी.काही आम्हीही टाकू.काही तुम्ही टाका.तुमच्या मुलीच्या सुखासाठीच तर करतोय आम्ही हे सगळं “. ” बाई, आमच्रा मुलीचं सुख कशात आहे हे आम्ही जाणतो.तुम्ही मुलाला शिकवलंत, करिअर केलंत, पण आम्हीही कुठे कमी नाही पडत आहोत.मुलगी शिकलेली आहे. करिअरीस्ट आहे, अखंड लक्ष्मी येईल तुमच्या घरी. राहिला सवाल फ्लॅटसाठी पैसे देण्याचा. तेवढी ताकद माझी नाही.मी काही देऊ शकत नाही.

” देऊ शकत नाही ? मग लग्न मोडलं असं समजा. 

” काय ? लग्न मोडलं ? आमची मुलगी अंगाला हळद लावून नववधूच्या वेषात भावी जीवनाची स्वप्ने घेऊन तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची लग्नमंडपात वाट पाहातेय आणि तुम्ही लग्न मोडण्याच्या गोष्टी करताहेत ? लग्नापूर्वी तर ही बोलणी झाली नव्हती.तसं असतं तर आम्ही मुलगी दिलीही नसती.जरूर विचार केला असता या गोष्टीवर “

” मग आता विचार करा ना. आता मागतोय आम्ही.तुम्ही नाही म्हटलं तर दुसर्‍या मुलीवाले तयार आहेत ना ” ” अच्छा, तर हे कारण आहे होय. दुसरीकडे जास्त हुंडा मिळतोय म्हणून तुम्ही लग्न मोडताय ? शुद्ध फसवणूक आहे ही आमची.हुंडा मागणं आणि हुंडा देणं कायद्यानं गुन्हा आहे.हा अन्याय मी नाही सहन करणार “

” जा, जा तुम्ही, जे होत असेल तुमच्याकडून ते खुशाल करा ” 

” अहो, एवढा माज बरा नाही. मुलीचा बाप असलो तरी इज्जत आहे मला.चला काका पोलीस स्टेशनात FIR दाखल करायला,

नवरदेव, त्याचे आई वडील व इतर नातेवाईक ( मध्यस्थ ) पोलीस स्टेशनात लाॅकअप मध्ये बंद झाले.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अभी ना जाओ… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

अभी ना जाओ… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

सर्वकाही ठरवल्याप्रमाणे होईल असं गृहीत धरून दिवसाची सुरवात करतो परंतु आयुष्य कधी,कुठं अन कसं वळण घेईल हे सांगता येत नाही.असंच काहीसं कर्नलच्या बाबतीत घडलं.रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेल्या बायको नलिनीला कारनं धडक दिली.अंगावर चार-पाच ठिकाणी खरचटलं परंतु जोरात डोकं आपटल्यानं जागेवरच शुद्ध हरपली.मेंदूला जबर मार बसल्यानं दहा दिवस झाले तरी बेशुद्धच होत्या.त्या एका घटनेनं सगळंच बदललं.कर्नल,त्यांच्या दोन्ही मुली,जावई सगळेच प्रचंड तणावाखाली होते.

आयसीयूतला राऊंड संपवून डॉक्टर आले तेव्हा नातेवाईकांनी गराडा घातला.पेशंटविषयी माहिती दिल्यावर शेवटी डॉक्टर कर्नल बसले होते तिथं आले.हातातली काठी सावरत कर्नल उभे राहायला लागले.तेव्हा डॉक्टर म्हणाले“तुम्ही बसा”

“एनी गुड न्यूज..”कर्नलनी विचारलं तेव्हा डॉक्टरांनी नकारार्थी मान डोलावली. 

“तब्येतीत काहीच फरक नाही.जैसे थे. वेंटीलेटर सुरू करूनही आता बरेच दिवस झालेत. एकूण परिस्थिती पाहता सुधारणा होण्याची शक्यता नाही. तुम्हांला खोट्या आशेवर ठेवत नाही.पेशंटला होणारा त्रास,वेळ आणि पैसा याचा विचार करता निर्णय घेण्याची वेळ आलीय.”डॉक्टरांचं निर्वाणीचं बोलणं ऐकून मुलींच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तर दोन्ही जावई सुन्न.कर्नल मात्र बर्फासारखे थंड.

“काहीच करता येणार नाही का”थोरलीनं विचारलं.

“दुसऱ्या हॉस्पिटलला नेऊ”धाकटी. 

“आपण शक्य ते सगळे प्रयत्न केलेत पण पेशंटकडून काहीच प्रतिसाद नाही.तुम्हांला सेकंड ओपिनीयन किवा शिफ्ट करायचं असेल तर हरकत नाही.पुन्हा सांगतो,नो होप्स,इट्स टाइम टु टेक फायनल कॉल.”कर्नलच्या हातावर थोपटत डॉक्टर पुढच्या राऊंडला गेले.अनपेक्षितपणे समोर आलेल्या वास्तवामुळे मुली बावरल्या.जावई भावूक झाले.एवढं होऊनही कर्नल जरासुद्धा विचलित न होता शांत बसलेले होते. 

“पपा,”दोघी बहिणी वडिलांना बिलगून हमसून हमसून रडायला लागल्या.त्यांना धीर देताना कर्नलचे डोळे कोरडे तर चेहरा नेहमीसारखाच करारी,भावविरहीत.

“पपा,काहीतरी बोला”थोरली.

“काय बोलू!!आता बोलण्यासारखं काहीच राहील नाही.”कर्नल

“म्हणजे तुम्ही मान्य केलंत”

“दुसरा पर्याय आहे का?डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय.आता निर्णय आपल्याला घ्यायचाय.”

“काही निर्णय बिर्णय घ्यायचा नाही.ममाला दुसरीकडं शिफ्ट करू’”थोरली. 

“येस,”म्हणत धाकटीनं बहिणीच्या बोलण्याला दुजोरा दिला. 

“जागा बदलली तरी वास्तव तेच राहणार.डॉक्टरांचे प्रयत्न आपण पाहिलेत.नियतीनं वेगळाडाव टाकला.” कर्नल एकदम बोलायचं थांबले.

“इतक्या लवकर हार मानलीत.” 

“हार नाही,वास्तव स्वीकारलयं.तुम्हीही ते मान्य करा.”

“अजूनही वाटतंय की काहीतरी चमत्कार घडेल आणि ममा सुखरूप बाहेर येईल.”

“चमत्कार वैगरे फक्त सिरियल,सिनेमात होतात.खऱ्या आयुष्यात नाही.बी ब्रेव्ह,भावनेपेक्षा वस्तुस्थितीचा स्वीकार करा.ममा असती तर तिनं हेच सांगितलं असतं.”

“पपा,काहीच वाटत नाही का? किती सहज स्वीकारलं.”

“ जेव्हा आपण काहीही करू शकत नाही तेव्हा समोर येईल ते निमूटपणे स्वीकारणं केव्हाही चांगलं!! आयुष्य म्हणजेच व्यवहार बाकी भावना,प्रेम,आपुलकी, जिव्हाळा हे मनाचे खेळ.रोजच्या आयुष्यात त्याचा काडीमात्र उपयोग नाही उलट त्रासच.ममाला आता जास्त त्रास द्यायला नको.तिला मोकळं करू” दोघीं बहिणींनी एकदमच वडिलांकडं पाहीलं तेव्हा त्यांची नजर शून्यात होती.

“ग्रेट,मानलं पपांना,एवढं मोठा दु:खाचा डोंगर कोसळला पण तरीही मनाचा तोल ढळलेला नाही.”जावई. 

“पहिल्यापासून ते असेच आहेत.आनंद असो वा दु:ख ते नेहमीच बॅलन्स असतात.कधीच एक्साईट झालेलं पाहिलं नाही.नेहमीच प्रॅक्टिकल वागणारे.त्यांच्या मनातलं फक्त ममालाच समजायचं पण आता तीच…” धाकटीनं आलेला हुंदका दाबला. 

“मी नलूला भेटायला जातोय.कृपा करून कोणाला आत येऊ देऊ नका.आय वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ हर,सो प्लीज…”सावकाश पावलं टाकत कर्नल चालायला लागले.—-

थरथरत्या हातानं काचेचा दरवाजा ढकलून कर्नल आत आले.नर्सला थोड्यावेळासाठी बाहेर जाण्याची विनंती केली.बेडजवळ जाऊन उभे राहिले.गाढ झोपलेली नलिनी डोळे उघडून नेहमीसारखं प्रसन्न हसेल अन बोलायला लागेल अस क्षणभर वाटलं परंतु लगेच वास्तवाची जाणीव झाल्यानं वेदनेची जोरात कळ तळपायापासून मस्तकात गेली.हातपाय लटपटायला लागले.डोळ्यासमोर अंधारी आली.हातातली काठी जमिनीवर घट्ट रोवत तोल सावरला.भावनेचा भर ओसारल्यावर शांत झालेले कर्नल नलिनीच्या हातावर हात ठेवत म्हणाले “नलू,तुला असं बघायची सवय नाही.बास आता,हट्ट सोड,डोळे उघड.आम्हांला सोडून तू जाऊ शकत नाहीस. माझ्यासाठी,पोरींसाठी तुला थांबावं लागेल.आयुष्यभर समजूतदारपणे वागलीस.मग हे आत्ताच असं का वागतेयेस.तुझ्याशिवाय आयुष्य……बाप रे!!.तुला असं पाहून खूप असहाय्य वाटतंय,पूर्ण उद्ध्वस्त झालोय.मुलींना आधार देताना खंबीरपणाचा आव आणतो पण आतल्या आत ……..”इतका वेळ रोखलेला बांध फुटला.डोळे घळाघळा वहायला लागले.घशाला कोरड पडली.कर्नल स्टूलावर बसले.

“37 वर्षापूर्वी आयुष्यात आलीस.फार मोठी पुण्याई म्हणून तुझ्यासारखी जोडीदार मिळाली.माझ्या लहरी,विक्षिप्त वागण्याला कायमच सांभाळलं.खूप तडजोडी केल्या परंतू कधी बोलून दाखवलं नाहीस.सांभाळून घेतलंस.तक्रार न करता निमूट त्रास सहन केलास.सुखाचे दिवस केवळ तुझ्यामुळं पाहतोय.मुली आपआपल्या संसारात सुखी आहेत.मी देखील निवांत झालोय.तू खूप केलंस म्हणूनच आता तुला आनंद द्यायचा होता.नेहमी मी सांगायचं अन तू ऐकायच असं चालत आलं.हे बदलायचं होतं. तुझ्या आवडीच्या गोष्टी करायच्या.सगळा वेळ तुझ्यासाठीच.तू म्हणशील तसं वागून तुला हे सरप्राइज देणार होतो.अजून खूप बोलायचंयं राहिलंय, मन मोकळं करायचंय अन तू तर …….धिस ईज नॉट फेअर.ऐकतेयेस ना.तू चिडवायचीस तसा मी ‘इमोशनलेस माणूस’ नक्कीच नाहीये.स्वभावामुळे कधी बोललो नाही पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. नलू.. तुला माझी शपथ!!हे बघ,तुझ्या आवडीचं चाफ्याचं फूल आणलयं आणि ऐक,तुझं ऑल टाइम फेवरेट गाणं…..”मोबाईलवर रफीसाहेब गायला लागले  अभी ना जाओ छोडके……के दिल अभी भरा नही”  कर्नलनी सुद्धा भसाड्या आवाजात सुरात सूर मिसळला तेव्हा ट प ट प पडणाऱ्या डोळातल्या थेंबांनी मोबाईल भिजत होता.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चार अनुवादित लघुकथा : खेळण्याचे दिवस / शंभर रुपये / धर्म अधर्म / मला खेळू द्या ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चार अनुवादित लघुकथा : खेळण्याचे दिवस / शंभर रुपये / धर्म अधर्म / मला खेळू द्या ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

१. खेळण्याचे दिवस

घरातलं कपाट खेळण्यांनी भरून गेलं होतं. पत्नीचा विचार होता, कुठल्या तरी भांगारवाल्याला खेळणी विकून टाकावीत. मुले मोठी झाली होती. ती आता खेळण्यांकडे बघतही नव्हती. ती वैतागाने  पुटपुटली, त्यातली काही खेळणी सोडली, तर बाकीची अगदी नवीच्या नवी आहेत. ‘दर वर्षी वाढदिवस साजरा करायचो. खूप खेळणी यायची. त्यावेळी, इतर मुलांच्या वाढदिवसाला त्यातलीच काही खेळणी दिली असती, तर खेळण्यांचा असा ढीग लागला नसता. दर वेळी इतर मुलांच्या वाढदिवसाला बाजातून आणून नवीन नवीन खेळणी देत राहिलो. आता भांगारवाला काय देणार? शे-पन्नास.’

भाऊसाहेब म्हणाले, ‘जे झालं ते झालं. आपल्या मुलांचं लहानपण खेळण्यांशी खेळण्यात गेलं, ही आनंदाची गोष्ट आहे. आता तू म्हणालीस तर मी ही खेळणी गरीब मुलांच्यामध्ये वाटून येतो. बाकी काही नाही, तरी एक चांगलं काम केल्याचं समाधान’  

पत्नी काहीच बोलली नाही, तेव्हा तिचा होकार गृहीत धरून त्यांनी एका मोठ्या पिशवीत खेळणी भरली आणि ते इंडस्ट्रीयल एरियाच्या मागे बनलेल्या झोपडपट्टीकडे गेले. त्यांच्या मनात येत होतं, मुलं किती खूश होतील ही खेळणी पाहून. भाजी-भाकरी काय, मुलं कशीही खातातच. शरीर झाकण्यासाठी कापडे कुठून कुठून, मागून मागून मुलं मिळवतात. पण खेळणी त्यांच्या नशिबात कुठून असणार? ही खेळणी पाहून त्यांचे डोळे चमकतील. चेहरे हसरे होतील. त्यांना असं प्रसन्न पाहून मलाही खूप आनंद वाटेल. यापेक्षा दुसरं मोठं काम असूच शकत नाही.               

झोपडपट्टीजवळ पोचताच त्यांना दिसलं की मळके, फटाके कपडे घातलेली दोन मुले समोरून येत आहेत. त्यांना आपल्याजवळ बोलावून ते त्यांना म्हणाले, ‘मुलांनो, ही खेळणी मी तुम्हा मुलांना देऊ इच्छितो.  यापैकी तुम्हाला पसंत असेल, ते एक एक खेळणं तुम्ही घ्या….अगदी फुकट.’

मुलांनी हैराण होऊन त्यांच्याकडे पाहिलं. मग एक दुसर्‍याकडे पाहीलं. मग खूश होत त्यांनी खेळणी उलटी-पालटी करून पाहिली. त्यांना खुश झालेलं बघता बघता भाऊसाहेबांनाही आनंद झाला. काही क्षणात त्यांना दिसलं, मुलं विचारात पडली आहेत. त्यांचा चेहरा विझत विझत चाललाय. 

‘काय झालं?’

एका मुलाने खेळणं परत त्यांच्या पिशवीत टाकत म्हंटलं, ‘मी नाही हे घेऊ शकत. जर मी हे खेळणं घरी नेलं, तर आई-बाबांना वाटेल की मी मालकांकडून ओव्हरटाईमचे पैसे घेतले आणि त्यांना न विचारता त्याचं खेळणं घेऊन आलो. कुणी फुकटात खेळणं दिलय, हे त्यांना खरं वाटणार नाही. संशयावरूनच मला मार बसेल.’

दूसरा मुलगा खेळण्यापासून हात बाजूला घेत म्हणाला, ‘बाबूजी, खेळणं घेऊन करणार काय? मी फॅक्टरीत काम करतो. तिथेच रहातो. सकाळी उजाडल्यापासून ते रात्री अंधार पडेपर्यंत काम करतो. केव्हा खेळणार? आपण ही खेळणी कुणा लहान मुलांना द्या.’

मूळ कथा – खेलने के दिन  

मूळ लेखक – डॉ. कमल चोपड़ा   

अनुवाद – उज्ज्वला केळकर

२. शंभर रुपये

आलोक आपली पत्नी आभा आणि इतर नातेवाईकांना घेऊन, एक भाड्याचा टेंपो घेऊन, काही प्रेक्षणीय स्थळे पहाण्यासाठी सकाळीच निघाला होता. दिवसभर अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून प्रसन्न चित्ताने ते आता घरी परतू लागले होते. संध्याकाळ गडद होऊ लागली होती. थंडी पडू लागली होती म्हणून मग सगळे जण चहा घेण्यासाठी एके ठिकाणी थांबले. चहा घेऊन ते पुन्हा टेंपोत बसू लागले. टेंपोला लागून टेंपोचा ड्रायव्हर आत्माराम उभा होता. सगळे जण त्याच्या ड्रायव्हिंग कौशल्याची स्तुती करत टेंपोत चढू लागले.

आलोक म्हणाला, ‘मी सकाळपासून पहातोय. आपण सकाळपासून आत्तापर्यंत एकदाही हॉर्न वाजवला नाही. कुणालाही ओव्हरटेक केलं नाही. उलट मागून हॉर्न वाजवणार्‍यांना रस्ता देत गेलात. खरोखर आपण कमालीचे ड्रायव्हर आहात!’ त्याने भेट म्हणून शंभर रुपयाची एक नोट आत्मारामला दिली. त्याने कृतज्ञतापूर्वक नोट कपाळाला लावत म्हंटलं, ‘ मी ही नोट सांभाळून ठेवेन. खर्च नाही करणार!’

टेंपोत बसल्यानंतर आभा आपली नाराजी प्रगट करत म्हणाली, ‘ आपण चांगल्या कामाची नेहमी प्रशंसा करता. लोकांचा उत्साह, धाडस वाढवता, इथपर्यंत ठीक आहे! पण आत्ता ड्रायव्हरला शंभर रूपाये देण्याची काय गरज होती? ठरलेले पैसे तर आपण दिलेच होते.’    आलोक हसत म्हणाला, ‘कळेल तुलाही… मग तूच या गोष्टीचं समर्थन करशील.’

टेंपो घाटातून जाऊ लागला. धूसरता वाढली होती. समोरचं स्पष्ट दिसत नव्हतं. आत्माराम मात्र अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवत होता. भीतीने आभाने डोळे बंद केले आणि ती आलोकला चिकटून बसली. गाडी हळू हळू घाटातून बाहेर आली आणि सपाट रस्त्यावरून धावू लागली धूसरता नाहिशी झाली होती. आलोकने आभाला डोळे उघडायला सांगितले. आभा दीर्घ श्वास सोडत म्हणाली, ‘ आपल्या शंभर रुपयाची सार्थकता मला कळली.’

मूळ कथा – नो हॉर्न !           

मूळ  लेखक – अशोक वाधवाणी  

अनुवाद – उज्ज्वला केळकर

३. धर्म- अधर्म

‘ए पोरा, थांब. थांब. तू ही जी दगडफेक चालवली आहेस, ती कुणाच्या सांगण्यावरून?’ दंग्यात सामील झालेल्या एका किशोरवयीन मुलाला पोलिसाने विचारलं.

मुलगा गप्प बसला.

‘तुझं नाव काय?’ यावेळेचा आवाज अधीक कडक होता.

तरीही तो गप्प बसला.

मग आपला आवाज थोडा मृदु करत पोलिसाने विचारले, ‘देवळात जातोस?’

त्याने नकारार्थी मान हलवली.

‘मशिदीत?’

त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली.

‘चर्चमधे जातोस की गुरुद्वारात?’

किशोर अजूनही गप्पच होता.

‘कोणतं धर्मस्थळ तोडायला आला होतास?’ पोलिसांचा आता स्वत:वरचा ताबा सुटत चालला होता.

‘मी सगळी धर्मस्थळं तोडून टाकीन. ‘ तो मुलगा आपल्या मुठी आवळत म्हणाला.

‘कुठे रहातोस?’ पोलिसांनी आश्चर्याने विचारले.

‘अनाथाश्रमात. तिथे कुणालाच माहीत नाही, माझा धर्म कोणता आहे. लोकांना आपण जन्माला घातलेल्या मुलाचं पालन करता येत नाही, आणि निघालेत मोठे धर्माचं पालन करायला. ‘

क्रोध आणि तिरस्काराने बघत तो पुन्हा दगड हातात घेऊन दंगेखोरांच्यात सामील झाला. ‘ 

मूळ कथा – धर्म – अधर्म   

मूळ  लेखिका – सत्या शर्मा ‘ कीर्ति’

अनुवाद – उज्ज्वला केळकर

४.  मला खेळू द्या. 

नितिनने जोरदार शॉट मारला, तशी बॉल नाल्यात जाऊन पडला. आता त्या घाणेरड्या नालयातून बॉल बाहेर कोण काढणार?

चरणू मोठ्या आवडीने त्यांचा खेळ बघत होता. त्याला काही कुणी खेळायला घेतलं नव्हतं.

नितिन त्याला म्हणाला, ‘ए, त्या नालयातून बॉल बाहेर काढ. आम्ही तुला एक रुपया देऊ आणि खेळायलाही घेऊ.’

चरणूला लालसा वाटली. नाल्यात उतरण्यासाठी तो नाल्याच्या काठाला लटकला. अचानक त्याचे हात सुटले आणि तो घाणीत डोक्यावर पडला. ठाणे तडफडात हात-पाय मारायला सुरुवात केली. त्याने जशी काही आपल्या जिवाची बाजी लावली.

बाकीची मुले नाल्याच्या काठावर उभी राहून हसत-खिदळत होती. त्याने लावाकरात लवकर बॉल काढावा, म्हणून टी वॅट पहाट होती.

‘स्साला, खाली बघा… एका रूपायासाठी घाणीत घुसून …’

‘हे गरीब लोक इतके लालची असतात ना, एक रुपयाच काय, एका पैशासाठीसुद्धा ते आपला जीव देतील.’

एवढ्यात चरणू बाहेर आला. डोक्यापासून पायापर्यंत तो घाणीने लडबडलेला होता. हात, तोंड, कपडे सगळं घाणंच घाण.

‘हा घे तुझा रुपया आणि आण तो आमचा बॉल इकडे.’

चरणूने फेकलेल्या रूपायावर पाय ठेवून उभा राहिला आणि गंभीरपणे म्हणाला, ‘मी या एका रूपायासाठी इतका मोठा धोका पत्करला नव्हता.’

‘मग काय शंभर रुपये घेणार?’

‘नाही. मला तुमच्याबरोबर खेळायचं आहे.’

बाकीची मुले खदाखदा हसायला लागली जशी काही त्याने काही अजब गोष्ट सांगितलीय.

‘साल्या, तू आमच्याबरोबर खेळणार? अवतार बघ एकदा स्वत:चा, जसा काही एखादं डुक्कर चिखलात लोळून आलाय.’

‘मी खेळू इच्छितो. तुम्ही खेळा. मलाही खेळू द्या. बोला. खेळायला घेणार की नाही?’ आवाजावर जोर देत त्याने विचारले.

उत्तरादाखल नितिन चिडून म्हणाला, ‘सांगितलं ना एकदा… दे बॉल इकडे आणि पल इथून नाही तर… ‘

जो बॉल थोड्या वेळापूर्वी प्राण पणाला लावून चरणूने नाल्यातून काढला होता, तो बॉल रागारागाने त्याने पुन्हा त्या नाल्यात फेकून दिला. ‘बघतोच, तुम्ही तरी कसे खेळताय’, असा म्हणत तो गंभीरपणे तिथून निघून गेला.

मूळ कथा – खेलने दो  

मूळ लेखक – डॉ. कमल चोपड़ा   

अनुवाद – उज्ज्वला केळकर

अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print