सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – काळूचे दु:ख ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
नेहेमी आनंदात असणारा काळू कुत्रा, आज असा उदास होऊन अवेळीच घरी आलेला पाहून, त्याच्या आईने, मिल्कीने त्याला विचारलं…” काय झालं काळू? रोज तुला हाका मारुन मारुन मी अक्षरशः दमून जाते, तरी तू येत नाहीस. आणि आज कसा आलास? आणि इतका उदास का दिसतो आहेस? कुणी मारलं का तुला ?”
मग खूप दुःखी स्वरात काळूने आपल्या मनातली व्यथा सांगितली …..
“आई, ज्या बंगल्याच्या बाहेर मी रोज बसायचो, तिथे रात्री मी जे काही पाहिलं ना, त्यामुळे मला फार वाईट वाटतंय.”
“असं काय पाहिलंस तू तिथे?”
“आई तिथे माझ्यासारखे किती तरी कुत्रे आणि नोकर – चाकर रहातात. काल एका अगदी छोट्याशा, बाहुली-सारख्या मुलीला त्यांनी कपड्यात गुंडाळले, आणि अंधारात दूर कुठेतरी तिला एकटीलाच सोडून, ते परत आले. एखादा माणूस इतका निर्दय आणि दुष्ट असू शकतो, याचा मी विचारही करू शकत नाही. त्या बिचारीने त्या माणसांचा काय गुन्हा केला होता? सांग ना आई.”
त्याचं बोलणं ऐकून मिल्कीचेही डोळे भरून आले होते. गळा दाटून आला होता. जड आवाजात ती म्हणाली…..
“बाळा आपल्यासाठी लहान मुलं ही फक्त लहान मुलंच असतात. पण ती माणसांची दुनिया आहे. तिथे मुलं औरस-अनौरस, म्हणजे कायदेशीर-बेकायदेशीर तर असतातच, पण त्याबरोबरच, ती लिंग-भेदाचीही बळी ठरतात. त्या मुलीच्या बाबतीतही असेच काहीतरी झालेलं असेल.”
आईने लहान मुलांच्या बाबतीत जे कुठले शब्द वापरले होते, ते काळूला समजणं अशक्य होतं. आणि ते समजण्यासाठी आपण असमर्थ आहोत, असं काळूला वाटत होतं
मूळ हिंदी कथा : सुश्री मीरा जैन
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈