मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

शिक्षण- B.A B.Com शालेय शिक्षण ज्युबिली कन्या शाळा मिरज, महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालय

छंद- वाचन, लिखाण, शिवण मैदानी खेळात (खोखो, कबड्डी, ऍथलेटिक्‍स, अनेक बक्षिसे एक वर्ष विलिंग्डन जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड)

पुरस्कार- १) कौशिक प्रकाशन सातारा २) मराठी विज्ञान परिषद इस्लामपूर  ३) ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी ४) रामकृष्ण मिशन

आणखी बरेच लहान-मोठे निबंधातील पुरस्कार (सकाळच्या मुक्तपीठ स्मार्ट सोबती मध्ये आलेले लेख, राष्ट्रसेविका समितीच्या हस्तलिखितासाठी गेली पाच वर्षे लेखकांची निवड, नवरत्न नाथ नगरी दिवाळी अंकांमधून आलेले लेख)

☆ मनमंजुषेतून : मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

आम्ही शेतात रहात असल्यामुळे साप, विंचू, चोर यांच्यापासून रक्षण होण्यासाठी कुत्र्याची गरज होती. योगायोगाने सुंदर ठुसक्या बांधण्याची, पिवळे ठिपके असलेली कुत्री कुठून तरी अचानक आली आणि आमची होऊन राहिली. नामकरण झालं पिंकी. टॉमी कुत्रा आणि पिंकी परिसराचे राखण छान करायचे. आमच्या लहान मुलांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते आणि आणि ते दोघे मिळवून मुलांना छान सांभाळायचे. आता पिंकी छान रुळली होती. आता तिला पहिल्यांदाच पिल्लं होणार म्हणून तिची बडदास्त चालली होती. लवकरच तिला दहा पिल्ल झाली. अगदी गोंडस पिल! त्यांच्यासाठी एक छोटसं घर तयार केलं. बाळंतिणीची व्यवस्थाही छान चालली होती. पिंकी  बाहेरून आली की पिल्ले धावत जाऊन पिण्यासाठी तिला झुंबा याची. एक दिवस अचानक पिंकी गायब झाली. खूप शोध घेतला, पण नाही कुठेच नाही. पिल्लांना आम्ही खाऊ घालून वाढवत होतो. एके दिवशी अचानक दुपारी एका कुत्र्याचा आक्रोश ऐकायला आला. पिंकीचा होता तो आक्रोश. पोट खपाटीला अंगावर गोमाशा, गळ्यात नायलॉन च्या कुरतडून तोडलेल्या दोरीचा थोटुक अशी अवस्था पाहिली आणि खात्री पटली की तिला कोणीतरी पळवून नेल होत. दुरून आल्याने ती धापा टाकीत होती. पिलांच्या जवळ जात होती. पिल तोपर्यंत आईला विसरली होती. तिचा रागरंग बघून पिल्ल दूर जायला लागली. रात्री बाळासाठी कडा उतरून येणारी हिरकणी मला आठवली. आम्ही पिंकीला खायला देत होतो, जवळ घेत होतो. पण तिला फक्त पिल जवळ हवी होती. मी एक आई असल्याने मला कल्पना सुचली. दोन  पिलांना उचलून तिच्या पोटाजवळ नेल आणि (अहो आश्चर्यम्) पिलानी आईला ओळखलं. माया, वात्सल्य, प्रेम, करुणा, अत्यानंद सगळ्या भावना ओसंडून वहायला लागल्या. बिन दुधाची कोरडीच, पण सगळ्या भावनांनी तट्ट भरलेली आचळ पिल्ल चुकू चुकू ओढायला लागली. मोकळ्या पोटी प्रेमाचा पान्हा फुटला होता. आता पुन्हा ती पिलां बरोबर आपल्या घरात रहायला लागली. पिल्ल मोठी झाली. त्यांचा सर्वांना जीव लागला होता. चांगलं घर बघून, त्यांना ओवाळून, ‘नीट सांभाळा हो’ असो सांगून हळूहळू दिली गेली. प्रत्येक पिल्लू देताना डोळ्यात पाणी उभ रहायचं पण कुठंतरी भावनांवर नियंत्रण ठेवायला हवच ना! मातृ मंदिरात पिंकी एकटीच राहिली. दिवस रहात नाहीत.

आता टॉमी आणि पिंकी दोघेही म्हातारे झाले. टॉमी कॅन्सर होऊन देवाघरी गेला. दोघांनीही आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. न फिटणारे. आता पिंकीचे ही खाणेपिणे कमी झाले. तिला डोळ्याला ही कमी दिसायला लागले. तिचे हाल होऊ नयेत, अशी आम्ही रोज प्रार्थना करीत होतो. दिवाळीचा आनंद सर्वांना मिळवून दिलान. दिवाळीतला लाडू खाल्लान. आणि दुसरे दिवशी सकाळी शांत पणाने प्राण सोडलान.

मातृमंदिर ओसाड झालं. मोकळं झालं. तेथेच तिची उत्तरक्रिया करून वर चाफ्या च झाड लावलं आणि त्या झाडावर पाटी लावली “मातृमंदिर”

 

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निष्ठा..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग : निष्ठा..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

आपल्या समाजसेवा अरणार्‍या पत्नीमुळे पतीदेव जाम वैतागले होते. वेळी-अवेळी ऑफीसमधून घरी यायचे, तर घराला आपलं कुलूप. किती तरी वेळा घराला कुलूप असल्यामुळे मित्रांच्या समोर त्यांना लज्जित व्हावं लागलं होतं. एके दिवशी अगदी दृढपणेत्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं , ‘समाजसेवेच्या निमित्ताने कुठे कुठे भटकत असतेस कुणास ठाऊक? आजपासून तुझं घराबाहेर जाणं बंद.’

पत्नीने कुठल्याही प्रकारे वाद न घालता मान हलवून मूक संमती दिली. दोन –  तीन दिवसांनंतर एकदा त्यांची सेक्रेटरी कुठल्या तरी गाण्याच्या धूनवर मान हलवताना त्यांना दिसली. त्यांना एकदम पत्नीच्या मौन स्वीकृतीची आठवण झाली.. तत्काल त्यांनी काम थांबवलं आणि खरं काय आहे, ते जाणून घेण्यासाठी ते अचानक घरी आले.

घरात त्यांना जे दिसलं, ते पाहून त्यांचे डोळे जसे फाटलेच. घरात पाच – सहा गरिबाची, फाटक्या-तुटक्या कपड्यातील घाणेरडी वाटणारी मुले पाटी आणि पेन्सील घेऊन बसली होती. त्यांची पत्नी त्यांना आकडे मोजायला शिकवत होती आणि ती मुले तन्मयतेने शिकत होती.

 

मूल कथा – निष्ठा   मूळ – लेखिका – हंसा दीप

[email protected]

1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON-M2N2W7 Canada

+647 213 1817

 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लोककथा- उंट आणि माणूस.. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ जीवनरंग : लोककथा- उंट आणि माणूस.. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

एका दूर दूरच्या वाळवंटी प्रदेशात कुठेही पाणी नव्हतं तरी माणसे तिथे रहात होती.  वाळवंटातल्या प्राण्यांना पाणी कसे मिळवायचे आणि साठवायचे हे माहीत होते,  माणसं त्यांच्या मागावर जायची,  त्यांनी साठवलेलं पाणी तर प्यायचीच वर त्यांना भूकेला मारूनही खायची. एक भल्या उंटाने एका थोड्या कमी दूष्ट माणसाला त्याबाबत छेडले.. तेव्हा  तो कमी दूष्ट माणूस म्हणाला… “माणसं आळशी असतात रे!  शिवाय मूल्याशिक्षण वगैरे घेऊनही ती मूल्ये हवी तेव्हा धाब्यावर बसवतात.” तो भला उंट त्या कमी दूष्टाच्या  ज्ञानाने थक्क आणि अवाक् झाला.  त्यावर तो माणूस म्हणाला शिवाय माणसांना उपकार केल्याची फेड कशी करून घ्यायची हे ही चांगले कळते.  आता मी तुला एवढे ज्ञान दिले त्या बदल्यात मला पाण्याचा साठा दाखव.   उंटाला वाटले बरोबरच आहे,  याला पाणी दाखवणे त्याचे कर्तव्यच आहे असे समजून तो त्या कमी दूष्टाला पाठीवर घेऊन पाण्याकडे निघाला. थोड्याच वेळात तो माणूस पेंगुळला आणि झोपीही गेला.  इकडे हा उंट बिचारा चालतोय… चालतोय… त्याला वाटेत भेटलेल्या जवळ जवळ सर्वांनीच माणसाला पाण्याचा साठा दाखवू नये,  असा सल्ला दिला परंतू उंट बिचारा उपकाराच्या ओझ्याने एवढा दबून गेला की कोणाचे काही न ऐकता तो आपला चालतोय… चालतोय..जसा पाण्याचा साठा जवळ आला तशी माणसालाही जाग आली.  तो उंटावर खूप रागवला… “अरे किती लांब आलोय आपण, मूर्ख! शोधत बसतील ना सगळे मला! ” उंटाची ट्यूब थोडी उशीरा का होईना पेटली.  पण माणसाशी पंगा कशाला घ्या,  म्हणून तो शांतपणे म्हणाला, ” पाणी हवं असेल ना तेव्हा थोडा काळ तरी सग्यासोय-यांचा विरह होणार. ”  शिवाय परत जातानाही तुम्ही झोपणार त्यामुळे पाण्याची वाट तुम्हाला कळणार नाही,  त्यामुळे फक्त आतापुरती तहान भागेल एवढे पाणी पिऊन घ्या!  पुन्हा तहान लागली तर आणखी काही  ज्ञानकण ओता….

आता परतफेड करण्याची पाळी माणसाची होती!

© डॉ. मंजुषा देशपांडे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतीबिंबाचा कवडसा ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

☆ विविधा : प्रतीबिंबाचा कवडसा –  सौ.सुनिता गाडगीळ☆

छान बंगला  ‘मृदगंध अभिरुचीपूर्ण बांधणीची साक्ष पटवणारा . त्याच्या पाठी मागच्या बाजूला माईंची खोली होती. त्या खोलीतून अधून-मधून रडन्याचा  आवाज ऐकू येत होता माईंच्या समोर त्यांची नातसून पाठमोरी उभी होती. सुरेखा स्वयंपाक घरात होती. नव्या सुनेला  जेऊ घालावं म्हणून काजू कतली बनवत होती .सुरेख a ला माईंच्या खोलीतली बोलणी नीट ऐकू येत नव्हती .तिच्या कपाळाला त्यामुळे आठी पडली होती. काय सांगत असणार आहेत माझ्या कागाळ्या लग्नातलं पुन्हा दुसरं काय सासूच्या बाबतीत सुरेखाच्या मनाची पाटी कोरी नव्हती. लोक तोंडावर बोलत नाहीत पण यांच्या फाटक्या तोंडामुळे सासूबाईंच्या नादाला ही लागत नाहीत लग्न होऊन या घरात आल्यापासून हेच सुरु आहे .आता रेवाला जर काही म्हणत असतील तर मात्र मी शांत बसणार नाही .सुरेखा तरातरा माईंच्या खोलीत गेली. पहिल्यांदाच रागावून बोलली. पानावर या मगाशीच बोलला मी त्या नवीन आलेल्या मुलीला वेळेवर चार घास गरमागरम खाऊ देत माझ्या कागाळ्या जर चालू असतील ना तर तुमच्याबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे पण खूप आहे. मी तोंड मिथुन राहिले राहिले ना सांगा सांगा ना.. दोघींना कळेचना सुरेखाला काय झालं आपल्या माणसांची साथ आयुष्यभराची असते ती हवी आहे ग मला हे हवे होते हे सोडून गेले .टपटपणार या डोळ्यांमधली ताकद संपल्यासारखे त्यांचे डोळे दिसू लागले .त्यांचे ते डोळे बघून सुरेखा स्वयंपाक घरात आली.

माईंना भूक लागली असणार या स्वयंपाकाच्या नादात जेवणाची वेळ चांगलीच पुढे गेली म्हणत तिने पानात पोळी वाढली . कोकणातलं माहेर असलेल्या सुरेखाला गरम भात पहिल्यांदा खवासा वाटायचा पण एक चपाती आणि असेल ती भाजी खाल्ल्या शिवाय सुरेखाला त्या भात खाऊ द्यायच्या नाहीत. नवीन आलेल्या सुनेला तशीच सक्ती करतील म्हणून सुरेखा विचारायला गेली होती. अस्मिता तुला पहिल्यांदा गरम गरम…… भात वाढू …..?सुरेखाच्या कानावर माईंचा आवाज येत होता.,

सुनबाई तुला सांगते मी या घरात आले तेव्हा इथला स्वयंपाक मला आवडत नव्हता मला हिरवी मिरची ,खोबरं सगळं घालून केलेला चमचमीत स्वयंपाक आवडायचा पण मी इथे मनाला मुरड घातली .सासूबाईंच्या   शिकले .तुझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडीप्रमाणे राल तर त्याच्या पोटाचे हाल होणार नाहीत. घरचे जेवण व्यवस्थित असते की पुरुषांची तब्येत चांगली राहते. त्यांची तब्येत चांगली राहते  जग जिंकता येईल. सुरेखाला भात आवडतो हे मला माहीत आहे पण आमटी-भात, दहीभात त्यामुळे त्यात तिचे कसे होणार…..! दिवसभर स्टॅमिना राहायला नको……? मी यासाठी तिच्याशी अशी वागते होते ग ….!. जिव्हाळा होता त्यामागे. सगळंच फोडून नाही सांगता येत आमच्या वयाच्या माणसांना ….माझं काही चुकलं का सांग बरं बाळा… सासु झालेल्या  सुरे आला आता माईन मधला आईचा ओलावा हवा हवासा वाटला. नव्या नवरीची आई व्हायला निघालो आहोत आपण, त्यासाठी इतकी वर्ष आपल्या संसाराची सावली झालेल्या माईंचा आशीर्वाद घ्यायलाच हवा.

सुरेखा झटकन बाहेर आली. माईंच्या पायाशी नम्रपणे वाकली. आपल्या त्याची क्षमा मागण्यासाठी…,  माईंनी तिला पोटाशी उचलून धरले. नव्या सुनेला तिच्या आईच्या प्रतिबिंबाची कवडसा मृदगंध बंगल्यात दिसू लागला होता. त्याकडे बघत असल्याने पानात अगोदर आमटी-भात वाढण्याचा प्रश्न विचारण्याचा संभ्रम संपला होता.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ अनपेक्षित (भावानुवाद) ☆ सुश्री माया महाजन

☆ जीवनरंग : अनपेक्षित –  सुश्री माया महाजन ☆

पती-पत्नी दोघांनी मिळून मुलांना मोठ्या कौतुकाने लाडाकोडात मोठे केले. उत्तम खाणे-पिणे महागड्या शाळांतून शिक्षण, ब्रॅण्डेड कपडे, पादत्राणे-प्रत्येक मागणी पूर्ण करत गेले. मुलं पण बुद्धिमान होती, उच्चशिक्षित होऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळविल्या. मोठ्या हौसेने त्यांची लग्न करून दिली. आता लेक सुना नातवंडामध्ये आयुष्य सुख-समाधानात जात होते.

वृद्धावस्था आली तसा दोघांना आता थकवा जाणवू लागला. त्यामुळे घरातच असत. नवर्‍याचा खोकला आणि बायकोचं गुडघे दुखीने कण्हणे ऐकले की मुलांच्या सुनांच्या कपाळावर आठ्या पडत. काही दिवसानंतर म्हातारा-म्हातारीला असे जाणवू लागले की मुलं सुना त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांच्याशी बोलायला कोणाला वेळ नाही आणि कोणी त्यांची तब्येतही जाणून घ्यायला उत्सुक नाहीत. हळूहळू त्यांच्या जेवणखाणाची कोणी काळजी करेना.

एक दिवस म्हातारे जोडपे असेच काळजी करीत बसले असताना त्यांचा आठ वर्षांचा नातू तिथे आला आणि विचारू लागला, ‘‘आजोबा, ओल्ड एज होम काय असतं?’’ आश्चर्याने आजोबांनी विचारले, ‘‘का बरं?’’ नातू म्हणाला ‘‘मम्मी पप्पा म्हणत होते की म्हातार्‍या लोकांसाठी ते खूप छान घर असतं. तुम्हाला तिथे पाठविण्याविषयी बोलत होते.’’ म्हातारा-म्हातारीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला बस् आता आणखीन नाही सहन होत. पंधरा दिवसांनंतर घरासमोर एक टॅक्सी थांबली. म्हातार्‍या जोडप्याने आपले सामान टॅक्सीत ठेवले. मुलांना-सुनांना सांगितले आम्ही दुसर्‍या कॉलनीत फ्लॅट घेतलाय, आता तिथेच राहणार मुला-सुनांना वाटले  चला न मागताच इच्छा पूर्ण झाली. सुंठी वाचून खोकला गेला. वाईटपणा घ्यायची वेळ नाही आली.

दोनच दिवसानंतर पाच-सहा लोक हातात काही पेपर घेऊन आले. मुलांना दाखवत म्हणाले, ‘‘हे घर आम्ही विकत घेतलंय हे तोडून इथे हॉस्पिटल बांधणार आहेात. तुम्हाला एक आठवड्यातच घर रिकामं करावं लागेल, नाही तर…’’

मुलांच्या, सुनांच्या पायाखालील जमीनच हादरली. आई वडिलांशी केलेल्या दुर्व्यवहाराचा, अत्याचाराचा परिणाम इतक्या लवकर होईल याचा त्यांना अंदाज नव्हता आला.

मूळ हिंदी कथा – अप्रत्याशित – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ लघुकथा : डाकू, व्यवहार ☆ भगवान वैद्य ‘प्रखर’

श्री भगवान वैद्य प्रखर

☆ जीवनरंग : लघुकथा : डाकू, व्यवहार –  श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆

☆  डाकू  ☆

एका गावांत दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावांतील कित्येक घरांत घुसून लोकांना जबर मारहाण केली आणि घरांत जो कांही मौल्यवान ऐवज सापडला तो घेऊन पसार झाले. दुसर्‍या दिवसांपासून गावांत पोलीसांचा अहोरात्र बंदोबस्त सुरु झाला.

पोलीस बंदोबस्त सुरु होऊन अवघे चार दिवस सुद्धा झाले नाही तोच गावकर्‍यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी केली की पोलीस बंदोबस्त तात्काळ काढून घेण्यांत यावा. डाकूंचे काय ते आम्ही स्वत; बघुन घेऊ.

मोर्चा काढणार्‍यांमधे गावांत कोंबड्या पोसणारे आणि गावांतील तरुण लेकी-सुनांचे पालक यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

☆  व्यवहार ☆

‘काय हो, तुमचे चोरी गेलेले सामान सापडले काय?’

‘होय, नव्वद टक्के सामान हाती आले.’

‘अरे वा, बरेच हाती आले म्हणायचे. आमचेकडे चोरी झाली होती तेव्हां तर प्रयत्नांची पराकाष्टा करुन ही जेमतेम पन्नास टक्केच सामान हाती आले होते. उरलेले सर्व चोर आणि पोलीस यांच्यातच लंपास झाले.’

‘म्हणूनच तर…आम्ही जरा व्यावहारिक मार्ग पत्करला. पोलिसांमार्फत प्रयत्न करण्याऐवजी सरळ चोरांशीच संपर्क साधला.’

 

© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

संपर्क : मो. 9422856767, 8971063051  * E-mail[email protected] *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अहिंसा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर 

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग : अहिंसा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर 

सर्व तयारी करून  आम्ही पार्टीसाठी निघण्याच्या बेतात होतो. स्वयंपाकघराची खिडकी बंद करायला  गेले, तेवढ्यात एक झुरळ उडतउडत आत शिरलं.

झाडू घेऊन मी त्याला झोडपलं. मेलं ते. ते मेल्याची खात्री करून घेतल्यावर त्याला कागदात बांधून  पुडी करताकरता माझ्या मनात आलं, ‘बिचारं घरात शिरलं, तेव्हा त्याला  कल्पनाही नसेल की दोन मिनिटात  मृत्यू त्याच्यावर  झडप घालणार आहे. शेवटी त्यालाही स्वतःच्या जीवाची किंमत असणारच ना !मला अधिकार आहे का त्याचा  जीव घेण्याचा?’ मला  अशा वेळी नेहमी वाटतं, तसंच खूप अपराधी वाटलं. पण माझाही नाईलाज होता. मी त्याला ‘सॉरी ‘म्हणून  पुडी कचऱ्याच्या डब्यात  टाकली.

पार्टीत यांनी, नुकतीच बदली होऊन आलेल्या एका सहकाऱ्याशी माझी ओळख करून दिली. तेवढ्यात यांना कोणीतरी हाक मारली, म्हणून  हे तिकडे गेले.

त्याचा पहिला प्रश्न :”तुमी  नॉनव्हेज खाता का?” त्याने सगळं सोडून  हे विचारणं, तेही ओळख झाल्याझाल्या, मला  विचित्र वाटलं.

पण मी त्याला उत्तर दिलं. माझं ‘नाही ‘हे उत्तर ऐकताच  त्याला एवढा प्रचंड आनंद झाला की त्याने मला, दुसऱ्या जिवंत प्राण्याला  खाणं  किती  क्रूरपणाचं, किती अमानुष आहे  वगैरे लेक्चर  द्यायला  सुरुवात केली.

“अहो, पण नॉनव्हेज  खाणारे लोक काय जिवंत प्राण्याला उचलून थोडंच  तोंडात टाकतात?”

पण तो ऐकून घ्यायलाच तयार नव्हता.

“आम्ही लोग ना मॅडम, जमीनच्या खाली  उगलेल्या भाज्यापण नाय खाते. म्हणजे बटाटा, रतालू…. काय हाय? तेच्याबरोबर जमीनच्या आतले  किडे येएल ना? ”

“पण त्या भाज्या तर आपण धुऊन  घेतो ना? मग किडे पोटात  कसे जाणार? ”

“पण पानीमध्ये ते मरून जाएल ना? ”

“आणि मला एक सांगा सर, जमिनीच्या वर  उगवणाऱ्या भाज्या  खाता तुम्ही? ”

“हो. ”

“पण मग त्यांच्यात पण जीव असतोच ना? सजीवच असतात त्या. भाज्या, फळं….. ”

“नाय म्हंजे…  तेंच्यातला  जीव दिसून येत नाय ना. किडे कसे हलतात!”

मग त्याने एकदम त्याच्या हायर ऍथॉरिटीला संभाषणात खेचलं.

“आमचे स्वामी हाय ना, ”  इथे त्याने हात जोडून नमस्कारही केला, “ते  चालताना पायामधे चप्पल, शूज कायपण नाय घालते. कारण तेच्याखाली किडे येएल, तर ते मरेल ना!”

तेवढ्यात पुन्हा  स्टार्टर्स आले. याने त्याला  सतरा प्रश्न विचारून त्यातल्या एका पदार्थाचे तीन -चार तुकडे घेऊन  चवीने खाल्ले.

आजूबाजूचे सगळे पापकर्म करताहेत आणि याच्या चेहऱ्याभोवती मात्र तेजोवलय आलंय, असा मला भास झाला.

“मी तुम्हाला एक विचारू, सर? ”

“विचारा ना, मॅडम. ”

“म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. ”

“नाय. बोला. ”

“तुम्ही तुमच्या घरात पेस्ट कंट्रोल करून घेता? “माझ्या डोक्यात मघासपासून वळवळणारा किडा या निमित्ताने बाहेर पडला.

“पेsस्ट कंsट्रोल? ”

“हो. पेस्टकंट्रोल.तुम्ही घरात करून घेता? ”

“पेस्टकंट्रोssल….” त्याने आवंढा  गिळला आणि मग उत्तर दिलं, “पेस्ट कंट्रोल……. करतो ना.  ते तर करायलाच  लागतो. दुनियादारी हाय ना !”

माझ्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव बघितले आणि “बॉसला तर अजून  भेटलाच नाय, “असं काहीतरी पुटपुटत त्याने तिथून काढता पाय घेतला.

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

फोन नं. 9820206306.

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओळख ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग : ओळख – श्रीमती उज्ज्वला केळकर 

नयनाच्या घरापुढे एक पेरूचं झाड होतं. एक दिवस झाडाच्या एका बेचक्यात बुलबुलाच्या एका जोडीने घरटं बांधलं. मग एक दिवस बुलबुलीने त्यात दोन अंडी घातली. काही दिवस अंड्यावर बसल्यावर त्यातून दोन पिल्लं बाहेर आली. बुलबल-बुलबुली त्यांच्यासाठी रोज, दाणे, फळातला गर, बिया, कीडे-मकोडे आणायची. त्यांच्या चोचीत घालायची.

त्यांच्यात आता थोडी थोडी शक्ती येऊ लागली. ती घरट्याच्या बाहेर आली. जवळच्या डहाळीवर बसली. बुलबल-बुलबुली वरच्या फांदीवर बसून कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागली. त्यांच्या पंखात आणखी बळ आलं. मग ती वरच्या फांदीवर मग झाडाच्या शेंड्यावर बसू लागली. बुलबल-बुलबुलीला आकाश ठंगणं झालं.

पिलांच्या पंखात आणखी बळ आलं आणि एक दिवस ती भुर्रर्र भुर्रर्र करत आकाशात उडून गेली. आई वडलांची ओळख विसरली.

नयना स्वैपाक करता करता त्यांच्या हालचाली मग्न होऊन बघायची.

एक दिवस नयनाला आपल्या पोटात नव्या जिवाची जाणीव झाली. ती आनंदून गेली. काही दिवसांनी तो जीव पाय पसरू लागला. लाथा मारू लागला.  कुशीवर वळू लागला. एक दिवस बाहेर येऊन नयनाच्या कुशीत विसावला. चुचुक चुचुक करत तिच्या स्तनातील दूध चोखू लागला.

एक दिवस बाळ रांगू लागलं. मग चालू लागलं. मौज-मस्ती करू लागलं. नयना मायेने त्याच्याकडे बघू लागली. लाड, प्रेम करू लागली. त्याचं पालन-पोषण करू लागली.

तो शाळेत जाऊ लागला. चांगल्या मार्कांनी पास होऊ लागला. तो तरुण झाला. कॉलेजमध्ये जाऊ लागला. तो खूप शिकल. त्याला मल्टीनॅशनल कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. मनोहर-नयनाला वाटलं आकाश ठेंगणं झालं.

एकदा त्याला अमेरिकेतून बोलावणं आलं. अधीक चांगली, अधीक लठ्ठ पगाराची नोकरी. तो विमानात बसला. भुर्रर्र भुर्रर्र करत आकाशात उडून गेला. नवीन प्रदेशात वसला. आई वडलांची ओळख विसरला.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा : लेक लाडकी या घरची ☆ सुश्री निशा डांगे

सुश्री निशा डांगे 

☆ जीवनरंग : लघुकथा – लेक लाडकी या घरची – सुश्री निशा डांगे

मृणाल माझी सून चार वर्षांपूर्वी सोनपावलाने घरात आली. तिच्या येण्याने जणू काही घराचा स्वर्गच झाला. क्षणार्धात तिने सर्वांची मने जिंकली. सतत हसतमुख असणाऱ्या मृणालणे आपल्या हास्यातुषाराने घरातील वातावरण आनंदी केले. घरातील सर्वच जबारदाऱ्या कौशल्यपूर्वक सांभाळून ती आपली वैद्यकीय सेवा करीत असे. माझ्या सर्व मैत्रिणींना हेवा वाटावा अशी सून मला लाभली. कधी सुनेची लाडकी मुलगी झाली कळलेच नाही. एकदम मागून येऊन मला बिलगायची. “आई” म्हणून तोंडभरून प्रेमाने हाक मारायची. मृणाल आजही तशीच बिलगते, मायेने आमचं सगळं करते पण तिच्या हास्यातील खळखळणं केव्हाच संपलंय. केवळ आमच्यासाठी हृदयात अपार दुःख साठवून कृत्रिम हास्य तिच्या ओठांवर असते. ती कधी जाणवू देत नाही पण मी तिची आई झालेय नं आता त्यामुळे तिचं दुःख माझ्या नजरेतून सुटत नाही. झोपेत ओली झालेली उशी मला तिच्या अंगावर पांघरून घालतांना दररोज दिसते.

मंदारला जाऊन आज चार वर्षे झालीत. मृणाल माहेरी न जाता आमच्यासाठी सासरी थांबली. मंदार आमचा एकुलता एक मुलगा तो गेल्यावर आम्ही एकाकी पडलो . मृणालने नवरा गेल्याचे दुःख पचवून मंदारची सर्व जबाबदारी उचलली. आम्हा म्हाताऱ्यांची आधारकाठी झाली. मृणाल आणि मंदार एकाच वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते. एक दिवस मंदार मृणालला घरी घेऊन आला व आम्हाला म्हणाला ही तुमची होणारी सून . मुलाने असे परस्पर सूत जुळवले त्याचं जरा मनाला लागलं पण मृणालला पाहताक्षणी वाटले इतकी गोड, गुणी मुलगी आम्हालाही शोधून मिळाली नसती. फार थाटामाटात विवाह सोहळा होऊन मृणाल सून होऊन घरी आली. दोघेही एकाच इस्पितळात काम करत होते. नवीन जोडप्याचा सुखाचा संसार चालू होता आणि अचानक एका अपघातात मंदार गेला. लग्नाच्या एका महिन्यात मृणालला वैधव्य प्राप्त झालं. ह्या प्रचंड आघातातून सावरून तिने मंदारचे नेत्रदान करण्याचा निर्यण घेतला. म्हणाली आई,” मंदारचे डोळे राहिले तर मला सतत वाटेल तो मला बघतोय, त्याच्या सुंदर डोळ्यांनी हे सुंदर जग दुसऱ्या कोणालाही पाहू दे.” आम्हाला तिचा निर्णय पटला. मंदारचे नेत्रदान झाले.

आज मी सुद्धा एक निर्णय घेतलाय तो म्हणजे माझ्या सुनेचा पुर्विवाह करण्याचा. तिलाही हक्क आहे आयुष्याची पुन्हा नविन सुरुवात करण्याचा, पुन्हा खळखळून हसण्याचा. तिच्यासाठी स्थळ शोधत असतांना महेश कुळकर्णी नावाच्या मुलाचे तिच्या योग्य एक स्थळ सांगून आले. ते भेटण्यासाठी आले तेव्हा मुलाला बघून मृणालच्या दुःखाचा बांध फुटला ती एकदम रडू लागली. ,” मृणाल काय झाले? तू एकदम अशी…….”

“आई, हा ……. म्हणून तिने महेशच्या डोळ्यावरच्या गॉगलकडे हात दाखविला. मग महेशच तिला सावरून बोलू लागला हा तोच गॉगल आहे जो तुम्ही मला मंदारच्या डोळ्यांसाठी भेट म्हणून इस्पितळात माझ्या बिछान्यावर ठेवून गेला होतात. त्यासोबत एक चिठ्ठीही होती असे म्हणत त्याने खिशातील एक कागद तिच्या समोर ठेवला त्यात लिहिले होते मंदारच्या डोळ्यांची काळजी घ्या. मंदारची खरी काळजी तर तुम्ही आहात न मी तीच घेण्यासाठी आलोय.

©  सुश्री निशा डांगे

पुसद

मो 84218754

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अबोली ☆ सुश्री मानसी चिटणीस

☆ मनमंजुषेतून :  अबोली  – सुश्री मानसी चिटणीस

लहानपणापासूनच मला अबोली आवडते..माझं नाव अबोली का ठेवलं नाहीस म्हणून मी  आईवर  कितीदातरी रूसले

असेन. आमच्या मागच्या अंगण्यात अबोलीचं रान होतं. मी रोज फुलं वेचून आणायचे आणि हट्टाने आजीकडून त्याचा गजरा करून घ्यायचे. रोज वेणीत माळायचे. त्या अबोलीच्या गजऱ्यासाठी मी माझे केस ही वाढवले होते..

चुकला पिर मशीदीत तशी मी बघावं तेव्हा त्या अबोलीच्या रोपांसोबतच असायचे..असं कोणतं नातं , ऋणानूबंध आमच्यात होते काय माहित पण माझं अबोली वेड कायम राहिलं..

लग्न झाल्यावर कित्येक वर्ष गेली आणि संसारीक अबोल्यात माझीच अबोली झाली..अंगणातली अबोली मनात लपून गेली आणि मी अबोली होत गेले. तिचे केशरी रंग रुजवत राहिले रोज नव्याने. अबोली होवून जगताना तिला नेहमीच समजायची माझी भाषा अन् मला तिची सळसळ मोहवायची.

साधारण वर्षभरापुर्वी एका झाडवाल्याकडे मला ती मिळाली  आणि माझं अबोलीप्रेम पुन्हा उफाळून  आलं. एखादी जिवलग मैत्रीण भेटावी असा आनंद झाला. वर्षभर ती छान फुलली, डवरली, मोहरली पण  साधारण महिनाभरापुर्वी काही कारणास्तव आम्हाला सगळ्यांनाच  पंधरा दिवस गावाकडेच रहावं लागलं आणि त्यावेळात घरातली सगळी झाडे सुकून गेली त्यात माझी प्रिय अबोली सुद्धा सुकली..

मन उदास होतं एकदम. ही झाडं म्हणजे माझा जीव की प्राण..पुन्हा नवी झाडं आणली , रुजवली तेव्हा जरा जिवात जिव आला..पण अबोली काही गवसली नाही..मी आजूबाजूच्या साऱ्या नर्सऱ्या शोधल्या पण कुठेच सापडली नाही आणि मनाची तलखी मात्र वाढत राहिली. असेच आठ दहा दिवस गेले..

एक दिवस दळण टाकायला गिरणीत चालले होते तेव्हा एका घराच्या अंगणात ती मला दिसली आणि मी हरखले. भराभर गिरणीत जाऊन दळणाचा डबा ठेवला आणि जवळपास धावतच पुन्हा त्या घराजवळ  आले आणि दाराची कडी वाजवली. एका काकूंनी दरवाजा उघडला. मी मागचा पुढचा विचार न करता एका दमात बोलून गेले,”मला अबोली खूप आवडते. मी घेऊ का दोन रोप तुमच्या बागेतली ? “त्यांनी आश्चर्याने मला आपादमस्तक न्याहाळले आणि हो..घ्या. एवढे बोलून दरवाजा लावून घेतला.

मी तेवढ्या परवानगीनेही खूष झाले. अलगद तिथली दोन रोपं जमिनीतून मोकळी केली आणि घरी घेऊन आले. आल्या आल्या मोगऱ्याच्या शेजारच्या कुंडीत त्यांना जागा करून दिली. पण दोन दिवस दोन्ही रोपं रुसल्यासारखी वाटत होती..मलाही करमेना त्यांना गोंजारत राहिले वेळेवर पाणी घालत राहिले..

आज सकाळी झाडांना पाणी घालायला ग्रिल  उघडलं तर काय..!दोन्ही रोपांतून दोन पिटुकल्या  कळ्या नुकत्याच उमलल्या होत्या , जशाकाही माझ्याकडे डोळे मिचकावून हसत होत्या..खूप खूप खूप आनंद झाला मला..

अबोलीने माझी मैत्री स्विकारलीय..आता ती पुन्हा फुलेल..बहरेल..मोहरेल माझ्या इतकुश्या अंगणात आणि मनातही..

 

© सुश्री मानसी चिटणीस

चिंचवडगाव

फोन : 9881132407

Please share your Post !

Shares
image_print