श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। हाल ही में आपकी एक मराठी कथा “पबजी” e-abhivyakti में प्रकाशित हो चुकी है। हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है उनकी एक भावुक एवं मार्मिक मराठी कथा अनिश्चितता।)
☆ अनिश्चितता ☆
सकाळीच रोहितला जाग आली पण त्याला अंथरूणातुन उठावसं वाटत नव्हतं. रात्रीच्या जारणाने त्याची झोप पुर्ण झाली नव्हती. सवयीमुळे नेहमीच्याच वेळेवर त्याला जाग आली. पण डोळ्यांत झोप मात्र शिल्लक होती. अंग जड-जड वाटत होतं. डोकंही दुखत होतं. रात्री उशिरापर्यंत त्याला एकच विचार भेडसावत होता. कि काय होईल? या एकाप्रश्नाने त्याची झोप उडाली होती. वय 27 झाली होती. घरी बाबांची तब्येत बरी नव्हती. बाबांना दमाचा त्रास आहे. काही दिवसांपूर्वीच डाॅक्टरांनी निदान केलं होतं. बाबा म्हणत होते “मी जिवंत आहे तोवर संसाराला लागुन जा. मी गेल्यानंतर तुला कोणी विचारणार नाही. तो मोठा आहे. त्याचं लग्न झालंय. तो त्याच्या संसारात रमला आहे. तो तुझ्यावर लक्ष देणार नाही. त्यात तुझी आई म्हातारी ती काय करेल.” बाबांचं म्हणणं जरी भावनिक होतं पण ते योग्य होतं. कारण त्याच्या मोठ्या भावाचं लग्न होऊन चार वर्षंपेक्षा जास्त वेळ झाला होता. लग्नानंतर मोजून दोन महिने राहिला असेल तो. नंतर त्याच्या बायकोला घेऊन बड्या शहरात निघून गेला होता. गेला तो परतला नव्हता. एकंदरीत म्हणायचं झालं तर त्यानं पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. म्हणुन तो काही करेल ही उमेद बाबांनीही आणि रोहितनेही सोडली होती. जे काही करायचं ते रोहितलाच करायचं होतं. वय झालं म्हणुन बाबांची तब्येत बरी राहत नव्हती. आणि त्यातच दमाचं नादान. म्हणजे पायाखालची जमीन सरकली होती रोहितची. मोठ्या भावाच्या गोड गोड शब्दाना भुलून होतं तेवढं शेतही विकून टाकलं होतं. आणि आता सगळंच आयुष्य उन्हात उभं होतं. ते घरच तेवढं शिल्लक राहिलं होतं. आणि त्या घराची परिस्थिती बदलावी. आणि गेलेलं शेत परत मिळावं म्हणून म्हणुन रोहितने एका अशा जगात उडी घेतली होती जिथं काही निश्चीत नव्हतं. सगळं काही अनिश्चित होतं. ते क्षेत्र असं होतं कि ज्यात आपलं कोणीच नव्हतं. तिथं जायला त्याच्यासाठी दरवाजे बंद होते. खिडकी तेवढी उघडी होती. तो दरवाजा आतुन उघडण्यासाठी तो जिवाचे रान करत होता. घरची गरिबी आणि सुखी भविष्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला होता.
मुंबई म्हणजे पैसे वाल्यांची. आणि त्याच्याकडे तोच नव्हता. पण येणा-या काळावर आपल्या कौशल्याचा घाव घालून बदलावा. या निर्धाराने तो मुंबईत आला होता. सुरूवातीच्या चार- सहा महिन्यांच्या निराशेनंतर आता कुठेतरी जम बसायला लागला होता. काही अंशी त्याला यशही मिळू लागलं होतं. मुंबईने आता कुठे तरी त्याला आपलंसं करायला सुरूवात केली होती. पण जे काही मिळतं होतं त्यात त्याचं भागत होतं. आणि त्यांतच बाबांच्या आजाराचं निदान होणं. हे त्याला हैराण करून सोडणारं होतं. आता बाबांच्या इलाजासाठी त्याला पैसे हवे होते. ते कुठून नि कसे येणार? आणि आता पुढे काय?
बाबांचं म्हणणं होतं की लग्न कर. आता त्याच्या समोर तिहेरी संकट आलं होतं. हो संकटच म्हणावं लागेल. एक तर गेलेली शेती, लग्न आणि बाबांचा दवाखाना. भावाकडून त्याला अपेक्षा नव्हती. जे काही करायचं ते त्यालाचं करायचं होतं. आणि याच विचारांनी त्याला झोप आली नव्हती.
सकाळी उठला तेव्हा त्याचं डोकं दुखत होतं. शरीर जड-जड वाटत होतं. पण त्याकडे कानाडोळा करून तो अंथरूणातुन उठला. आणि आपल्या नित्याच्या कामाला लागला. तो कामावर जायची तयारी करत होता तेव्हा त्याला घरून फोन आला. ” बाबाना पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. तू लवकर घरी ये.” त्याने फोन ठेवला. आणि कामावर गेला. डोक्यात तोच विचार होता. रोहितने बाॅस कडे पैसे मागितले तेव्हा बाॅस म्हटला. ” अरे, आता तर जाऊन आला तू गावाकडे. आणि मागच्या महिन्यात तूझ्या किती सुट्या आहेत. पगाराची तारीख पण अजुन लांब आहे. कसा देऊ तुला पैसे?” म्हणत बाॅसने नकार दिला. पण थोडी विनवणी केल्यानंतर व त्याची सर्व हकीकत ऐकल्यानंतर बाॅस पैसे द्यायला तयार झाला. पण त्यापूर्वी त्याच्याकडून मरणाचं काम करून घेतले. थकलेल्या अवस्थेत तो घरी आला आणि न थांबता लगेच जायला निघाला.
गावी पोहोचल्यावर तो घरी न जाता सरळ दवाखान्यात गेला. डाॅक्टरांना भेटला. डाॅक्टरांशी भेट झाल्यानंतर बाहेर आला. तेव्हा समोर त्याचा भाऊ उभा दिसला. त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागला. पण भाऊने त्याला हाक दिली “रोहित” तो मागे वळला. आणि एखाद्या अनोळखी माणसाने माणसाकडे आवाज दिल्यावर जसं उत्तर दिलं जातं. तस त्याने त्याला पाहीले. आईही बाजुलाच दवाखान्यातील खुर्च्यावर बसली होती. “फक्त तुझेच नाही माझेही बाबा आहेत ते. आता यापुढचा इलाज मी करेल त्यांचा” रोहीतने त्याला काही उत्तर दिले नाही. पण बाजुलाच बसलेल्या आईला त्याच्या बोलण्यात त्याचा स्वार्थ वाटला. तीने शांतपणे त्याला उत्तर दिले ” आता काही नाही रं बाबा आमच्याकडे तुला हिस्सा देण्यासाठी. डोकी लापवण्यासाठी तेवढी झोपडी -हायलीय. जा घेऊन जा ती बी. पण अश्या येळेला नको येऊ बाबा मंधी. एकतर आधीच पोरगं मरतयं माझं” आईच्या या बोलण्याने भावाच्या डोळ्यांत पाणी आलं. रडतच त्याने आईचे पाय धरले. आणि म्हटला ” नाही आये, मी काही घेण्यासाठी नाही आलो. मोठा मुलगा म्हणुन माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी आलोय. चुकलं माझं, माफ कर मला” त्याच्या विरहाच्या दिवशी रडून-रडून डोळे सुजवून घेतलेली आईच्या डोळ्यांत आता मात्र एक थेंबही दिसत नव्हता. या आधीही त्याने अश्याच भावनिक गोष्टी बोलुन पार भिकेला लावलं होतं. म्हणुन त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आणि म्हणुन ती गप्प होती. आईने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणुन तो रोहित जवळ गेला. ” रोहित तू तरी सांग ना आईला. बघ ना ती कशी बोलतेय.” रोहितला मात्र त्याच्याबद्दल थोडीशीही तक्रार नव्हती. त्याने एक नजर आईकडे पाहिलं आणि भाऊकडे पाहून म्हटला. ” बाबा अजुन थोडेच दिवस………. ” अर्धवटचं बोलला आणि त्याचा अश्रंचा बांध फुटला. भाऊने त्याला मिठीत घेतले. आणि दोघेही ढसाढसा रडू लागले. दोघा भावांच्या कित्येक वर्षानंतरच्या भेटीने व त्या प्रेमळ मिठीने आईचेही डोळे पाणावले. ती ही निशब्द झाली होती.
© कपिल साहेबराव इंदवे
मु पो. मा. मोहीदा त श , ता. शहादा जि. नंदुरबार
मोब. 9168471113