श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ बोलायचे राहून गेले – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(या मूर्ख मुली, डोळयांवर पट्ट्या बांधतात की काय कोण जाणे. स्टेजवरचा हिरो स्वतःच्या आयुष्यात झीरो असतो, हें यांना कळतच नाही.) – इथून पुढे —
“अश्विन, तुला तुझ्या आईसमोर सांगते, माझ्या बहिणीचा नाद सोड, तिला फोन जरी केलास तर असशील तेथे येऊन तुझे पाय मोडून ठेवीन “
पर्स घेऊन वंदना बाहेर पडली, आता तिची स्कुटी कॉलेज रस्त्याला लागली. गेल्या वर्षीपासून ती फिजिक्स डिपार्टमेंटला लेक्चरर म्हणून लागली होती. आज तिला पहिला तास नव्हता. ती आपल्या खुर्चीवर येऊन बसली. आज तिचे डोके गरम झाले होते. वडील गेल्यानंतर तिने आईला आणि छोटया बहिणीला सांभाळले होते. वडिलांची अर्धी पेन्शन आईला मिळत होती, त्यात दोघींची शिक्षणे पार पडली. लहानपणापासून तिच्यावर जास्त जबाबदारी. तिने मिताला जास्त त्रास होऊ दिला नव्हता. सगळे आर्थिक व्यवहार, घरात काय हवं काय नको, तीच पहात होती. मग तिने M. SC केले आणि गावातील कॉलेजमध्ये लागली. बहिण मिता Bsc झाली, पण पुढे शिकेना किंवा नोकरीसाठी प्रयत्न करेना, म्हणून तिची चिडचिड व्हायची, त्यात आज मिता-अश्विन यांचं प्रकरण?
लहानपणापासून जबाबदाऱ्या पडल्याने ती रोखठोक झाली होती. कुणाच्या जास्त जवळ जात नव्हती. नाटकाचा ग्रुप होता पण तो पण नाटकापुरता. एकप्रकारचा कोरडेपणा तिच्या आयुष्यात आला होता. ती खुर्चीत शांत बसलेली पाहून त्याचवेळी आत आलेले जोगळेकरसर तिच्याकडे पहात म्हणाले “वंदना, आज एकदम गप्प?”
वंदना याच कॉलेजची विद्यार्थिनी.. ती फायनल इयरला असताना जोगळेकर नवीनच या कॉलेजला आले होते. अतिशय हुशार, देखणे – जोगळेकर सरांबद्दल तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होता. या
कॉलेजमध्ये फक्त जोगळेकर सरांसोबत तिला बोलायला आवडायचे. त्यांचे बोलणे तिला ऐकत रहावेसे वाटायचे.
“हो सर, थोडी विचारात होते. तुम्ही केव्हा आलात सर?”
“आत्ताच, पहिला तास मला नव्हता म्हणून जरा उशिरा आलो, घरी पण सर्व आवरून यावं लागत ना?”
“सर, मला पण पहिला तास नव्हता आज, म्हणून उशिरा आले. सर, तुम्हाला सायंकाळी थोडा वेळ आहे? थोडा बोलायचं होतं “
“हो, पाचला प्रॅक्टिकल संपतील मग समोरच्या रेस्टॉरंटमध्ये बोलू “
“हो सर, मी वाट पहाते “.
सर आपल्या वर्गावर गेले. वंदनाने पण वर्गावर जायची तयारी केली. आज सर सायंकाळी भेटणार याने तिला आत्तापासून आनंदी वाटत होते. सरांना सकाळचा घरचा विषय सांगायचा आणि त्त्यांचा सल्ला घ्यायचा. सर योग्य तेच सांगतील याबद्दल तिला खात्री होती आणि सरांबरोबर कॉफ़ी प्यायला मिळणार होती, मुख्य म्हणजे सर एक फुटावर असणार होते, त्यांच्या डोळ्यात पाहून बोलता येणार होतं..
वंदनाची लेक्चर्स पाचपर्यंत संपली. संपूर्ण दिवस काम केल्याने ती दमली होती, मग ती वॉशरूममध्ये गेली आणि तिने चेहेरा स्वच्छ धुतला. आता थोडया वेळाने सर भेटणार होते म्हणून ती जास्तीत जास्त बरी दिसण्याचा प्रयत्न करत होती. तिने आरशात पाहिले – तशा आपण सावळ्या , आई सारख्या. मिता गोरी, सुरेख बाबासारखी.. तिने परत परत आरशात वळून वळून पाहिले. आपण सावळ्या असलो तरी चेहेरा तरतरीत आहे, बांधा पण चांगलाच. उंची चांगली. मिता थोडी घारी, उंची थोडी कमी तिची. पण ती गोरी असल्याने आकर्षक दिसते.
सर उंच, कोकणस्थ असल्याने गोरे. आपण सरांना शोभून दिसू का?
पण हे मनातील मांडे. खरंतर सर दिसले की आपली ततपप होते, घाम सुटतो, अंगाला कंप सुटतो. असं का होतं? इतर पुरुष समोर आले तर आपण बिनधास्त असतो, कुणी जादा धिटाइ केली तर दोन कानाखाली द्यायला कमी करत नाही. मग सर समोर आले की…
सहा वाजता ती रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली. पाच मिनिटांनी सर आले. सकाळपासून ते पण कामात होते तरी सर तरतरीत दिसत होते. सरांनी तिला पाहिले, ते हसले आणि तिच्यासमोर येऊन बसले.
“थोडा उशीर झाला, कॉफी घेऊया काय?”
“हो सर “
सरांनी कॉफ़ी मागवली आणि ते म्हणाले
“बोल, काय बोलायचं होतं?”
वंदना मनात म्हणाली, ‘ खूप बोलायचंय सर, पण शब्द बाहेर पडत नाहीत.
मग ती म्हणाली “सर काही मनात शंका असली की मी तुमच्याशी बोलते, तुमच्याशी बोलले की बरं वाटतं.”
“हो कल्पना आहे, बोल.”
“सर, माझ्या बहिणीबद्दल मी काळजीत आहे, तिने स्वतः चे लग्न जमवलेय. जो मुलगा तिने निवडलाय तो माझा मित्र, नाटकातल्या ग्रुपमधील. पण तो स्वतः काही कमवत नाही, बरं त्याची या आधी दोन प्रेमप्रकरणे मला माहित, म्हणून मी विरोध केला, कोणत्याही परिस्थितीत लग्न होऊ देणार नाही असे तिला सांगितले. त्यामुळे मी डिस्टर्ब आहे सर..मी काय करावं अशा परिस्थितीत?”
“तुझी बहीण म्हणजे मिता ना? ओळखतो मी तिला. ती पण माझीच विद्यार्थिनी. काय असतं वंदना, हे वय वेडे असते. या वयात आंधळेपणाने प्रेम होते, म्हणून सांभाळले पाहिजे. मला वाटते सध्याच्या काळात स्त्री ने पण स्वावलंबी असायला हवं, आर्थिक आणि विचाराने सुद्धा. तुझी बहीण सध्या काही काम करत नाही, पैसे मिळवत नाही, त्यामुळे तिच्या डोक्याला आराम मिळतो, म्हणून हे असे उद्योग सुचतात. तू या लग्नाला विरोध केलास हें योग्यच, कारण पुरुष जर स्वतः साठी दोन पैसे कमवत नसेल तर उद्याच्या संसाराची जबाबदारी कशी निभावेल ? अर्थात तूझ्या बहिणीला यातून बाहेर काढणे, हें तुझे कौशल्य असेल. तिला कोणत्या तरी कामात अडकवून ठेवायचं किंवा तिचे लक्ष दुसरीकडे वळवायचं म्हणजे ती हें सारं विसरेल.”
“हो सर, तुम्ही योग्य बोललात, तिचे लक्ष दुसरीकडे वाळवायला हवे, म्हणजे कसे?”
“तिला कोणता तरी जॉब मिळत असेल तर पहा म्हणजे तिचे लक्ष तिकडे जाईल “
“हो सर, मी बघते, काहीतरी प्रयत्न करते “
“आणि माझी काही मदत हवी असल्यास सांग, मी तुझी काळजी दूर करण्यासाठी नेहेमीच असेन, बरं निघूया..”
सर उठले पाठोपाठ वंदना उठली. सरांनी कॉफ़ीचे बिल दिले आणि स्कुटर सुरु करून सर गेले. सर गेले त्या दिशेकडे वंदना पहात राहिली, लांब दूर जाईपर्यत..
वंदनाला कविता आठवली
“रोज इथे मी तुला भेटते, बोलायचे राहून जाते…. “
आजही सरांना मनातील.. अगदी आतल्या मनातील बोलायचे.. सांगायचे राहूनच गेले..
वंदना घरी आली तरी सरांच्या बोलण्याचा विचार करत राहिली. मिताला कुठे बिझी ठेवावे? तिला कसलीच आवड नाही, पण अश्विनपासून तिला लांब ठेवावेच लागेल.
– क्रमशः भाग दुसरा
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈