मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – १ –  लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – १ –  लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. खरं तर राजा होता की डाॅक्टर होता की पुढारी होता की शेतमजूर होता याला महत्व नाही. पण आटपाट नगर म्हटलं की ‘तिथं एक राजा होता’ असं म्हणायची तोंडाला आणि ऐकायची कानाला इतकी सवय झालीय की म्हणून टाकलं आपलं रितीप्रमाणं. , “तिथं एक राजा होता “. या गोष्टीपुरतं नेमकं सांगायच झालं तर तो चार पोरींचा बाप होता हे महत्वाचं. उद्योग त्याचा काही का असेना, मुलींचा बाप हे महत्वाच ! शिवाय प्रत्येक घरातला बाप हा कुटुंब प्रमुख म्हणून आपल्यापुरता राजाच असतो की आपल्या कुटुंबाचा.

सर्वसत्ताधारी ! तसाच हा ही. तर त्याला चार मुली होत्या. एखादी मुलगी असली तर मागच्या जन्मीचं पाप, उरावरची धोंड अस काय काय काय असतं. इथं तर चार मुली ! संस्कृत मध्ये एक वचन आहे ना, ” एकैकमपि अनर्थाय किमुयत्र चतुष्ठयम् ” एक अनर्थकारक असतं तर चार एकत्र आल्यावर किती मोठा अनर्थ होईल!सुभाषित आहे वेगळ्या संदर्भातलं. पण मुलींच्या बापाच्या दृष्टीने ते इथं अगदी फिट्ट बसत. एक मुलगी झाली तेव्हा मनाची समजूत घातली ‘पहिली बेटी मुलगा होईल तिच्या पाठी’, म्हणून तिचे थोडेफार लाडही झाले. पण दुसरीही मुलगी ! तिसरीही मुलगी ! बापाच्या उत्साहाचा पारा खाली खाली आणि रागाचा पारा वरती

वरती. मुलींची अनुभवी आज्जी म्हणाली, ” वाट पहा, आता चौथ्यांदा नक्की बेटा होणार. अनेकदा तिघींच्या पाठीवर मुलगा होतोच. कसलं काय!, चौथीही मुलगीच. मग थकल्या भागल्या मुलींच्या आईनी लवकरच राम म्हटला, कायमचा!. मुली म्हटलं

की कधी ना कधी लग्न ही होणारच. दुपट्यातनं बाहेर पडून आपल्या दोन पायावर मुली चालायला लागल्या की त्यांना सगळं जग उठल्या बसल्या लग्नाचीच आठवण करून देत असतं. तसच या मुलींच्याही मनात लहानपणापासून घट्ट धरुन ठेवलेलं, लग्नाशिवाय आपलं काही खरं नाही. लग्न तर करायलाच हवं. मुलीच्या जातीनं दुसर करायचचं काय म्हणा ? एकदा आज्जीनं सांगितलं.

सगळ्यांनी माना डोलावल्या. सगळ्यांनी म्हणजे थोरल्या तिघींनी. धाकटी जरा अवखळच.

” म्हणजे काय ? मुलींनी लग्नाशिवाय दुसरं काहीच कसं करायचं नाही ? मुलगी लग्न करते तेव्हा एक मुलगाही लग्न करतोच ना ? “

” अगं मग त्याशिवाय का मुलीचं लग्न होतं ?”

सगळ्या तिच्या अडाणी प्रश्नावर फिसफिसल्या.

” तसं नाही, तसं नाही, तसं नाही, मला म्हणायचं होतं की मुलगा लग्न करुन स्वस्थ बसतो का घरात ? त्याचे आधीपासूनचे सगळे उद्योग चालुच असतात की नाही नंतर पण?”

कोण असल्या तिरपांगड्या मुलीबरोबर बोलणार? 

तरीही तिचं आपलं चालायचंच.

” काय ग ताई, अभ्यास करायला काय होतय तुला ? यंदाही नापासच झालीस ना ? “

” होऊ दे झाली तर. तिला थोडीच नोकरी चाकरी करायची आहे? कशी गोरीगोमटी नक्षत्रासारखी मुलगी कुणीही हासत उचलून नेईल. “

” शी, कुणी उचलून नेलं तर चालेल तुला ताई ? लाजतेस काय अशी ? तू म्हणजे काय बाजारातली भाजी आहेस ? तुला तुझं काही मतबीत आहे की नाही ?”

भारीच बाई ढालगज ही धाकटी. हा एकूण घरादाराचा अभिप्राय! 

दिवस काही बसून रहात नाहीत. आज्जी आता थकली आणि तिची भुणभुण सुरु झाली.

वेळेवारीच आपल्या समया उजवलेल्या ब-या. बापालाही ते एकदम पटलं. आधी आपल्या पोरींची पारख आपणच करावी म्हणून त्यांनी आपल्या चारी पोरींना समोर बसवलं. पहिल्या तिघी, साज-या, गोज-या, लाजाळू, खालमानी, सालसपणानी येऊन ओठंगून उभ्या राहिल्या. धाकटी जरा अवखळ, आईवेगळी. म्हणून जरा आज्जीची लाडावलेली. बापानं दुर्लक्षलेली. शिवाय वय थोडं लहान.

बापाने बापाला शोभेल अशा गंभीरपणाने मुलींना बोलावण्याचा उद्देश सांगितला. ” “आता तुमची लग्न करायचा इरादा आहे. इतके दिवस तुमची जबाबदारी माझी होती. मीच तुमचा कर्ता धर्ता. माझ्या जीवावर तुम्ही लाडाकोडात वाढलात. सगळ्यांनी माना डोलावल्या.

” म्हणजे काय ? बाबा कसले लाड केलेत हो तुम्ही ? दोन वेळेला जेवाय खायला घालून अंगभर कपडे दिले एवढेच ना? ” धिटुकलेपणाने धाकटी बोलली. बाबा सकट चमकून सगळ्यांनी माना वर केल्या.

” काय तरी हा अबूचरपणा ? असं बोलतात का कोणी बापाला?”

 थोरलीने तिला चिमटा काढला. तर किंचाळत ती म्हणाली ” काय चुकीचं बोलले ग मी ताई ? तुम्ही सुद्धा? “

दुसरीनं तिला डोळ्यानी दटावलं.

तिसरी घाई गर्दीन म्हणाली, ” नाही, नाही. खरं आहे बाबा. तुम्ही ना तिच्याकडे लक्ष नका देऊ. तुमच्या मुळेच तर आम्ही जगलो. तुमचं नशीब ते आमचं नशीब. “

“असं कसं, असं कसं, असं कसं होईल पण ? ज्याचं त्याचं नशीब वेगळंच असतं. स्वतंत्र असतं. ज्याचं 

शरीर जसं स्वतंत्र असत ना, तसं ज्याचं त्याचं नशीब पण स्वतंत्र असतं. ” पुन्हा धाकटी बोलली.

” गप गं, कळतं का काही तुला ? “

” पण परवाचं तर सगळे म्हणतं होते ना धाकट्या आत्याला सासुरवास होतो तर तिचं नशीबच तसलं.

मग आजोबांचं श्रीमंत नशीब का नाही बरं तिचं झालं ?का वाईट झालं तर तिचं नशीब आणि चांगलं झालं की तिच्या बाबांचं नशीब. “

” गप गं बाई. तुझं तुला तरी कळतं का तू काय बोलती आहेस ते ? “

“कळतं. तुम्हालाच कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते. आंधळ्या आहात तुम्ही सगळ्या. “

‘हे बघ तू सध्या गप्प बस. तुझं मत मी विचारलेलं नाही. विचारेन तेव्हा सांग. ” बाबाच असं म्हणाले तेव्हा ती गप्प बसली. पण आपल्याला विचारलं की अगदी मनात असेल ते स्पष्ट सांगायचं असं तिने ठरवून टाकलं. मग अगदी गोष्टीतल्या सारखच घडलं. बाबांनी प्रत्येकीला विचारल, ” तू कोणाच्या नशिबाची बाई ? ” 

“तुमच्याच की बाबा. ” 

प्रत्येकीन खालमानेनं उत्तर दिलं. बाबांना स्वर्ग दोन बोटे उरला. किती मान देतात पोरी. आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत. “छान, आता तुमच्यासाठी मी नवरे शोधतो.

सगळ्यांनी माना डोलावल्या. मग गोष्टीत सांगितल्याप्रमाणेच त्यांच्या बापाच्या मते चांगली असलेली स्थळे पाहून थाटामाटात लग्ने लावून दिली. मग रितीप्रमाणे सगळ्याजणी एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या आणि नवऱ्या शेजारी गाडीत बसल्यावर नवऱ्याकडे पाहून खुदकन हसल्या. धाकटीला मनातल्या मनात सगळाच खुळचटपणा वाटत होता. तसं ती चुलतीला म्हणाली सुद्धा. तर हीच खुळचट असल्यास्रख चुलतीनं तिच्याकडं बघितलं.

थोरली पहिल्या बाळंतपणासाठी आली आणि महिनाभरात परत जायची घाई करायला लागली. नवऱ्याला एकटं ठेवणं तिला धोक्याचं वाटत होतं. चुलती म्हणाली, ” अगं पण घरात आक्काताई आहेत ना त्यांना रांधून घालायला ?”

अक्काताई म्हणजे तिची विधवा चुलत जाऊ. तर ती पटकन म्हणाली, ” म्हणून तर काळजी वाटते ना ! ” आणि तिने जीभ चावली. धाकटीला थोरलीची फार फार दया आली. ही थोरली दिसायला सगळ्यात उजवी.

म्हणून म्हणे नवऱ्याची लाडकी. आणि तिची ती अक्काताई? ती म्हणजे तो नुसता पठाण. फदक फदक चालायची आणि तिच्या मागच्या पुढचे गोलवे हिंदकळायचे. सगळ्या पुरुषांच्या नजरा आपल्या तिथेच. थोरलीला आपल्या नवऱ्याचा म्हणून तर भरोसा वाटत नव्हता आणि धाकटीला ती कायम काळी ढुस्सं आणि नकटी चिपटी म्हणून चिडवायची. धाकटीला वाटलं या गोऱ्या गोमटीला तरी कुठे सुरक्षित वाटतय ? आता हिचा नवरा बहकला तर दोष कुणाच्या नशिबाचा ? बाबांच्या की हिच्या ? 

दुसरीच्याही संसाराची रडकथा वर्षभरातच कानावर आली. आधीपासूनच म्हणे त्याला दारूचं व्यसन.

लग्न झाल्यावर पैसा पुरेना. म्हणून जोडधंद्यासारखा तो जुगार खेळायला लागला होता. आता घरचे म्हणायला लागले

” नशीब तिचं “

“मग तेव्हा कशा सगळ्यांनी माना डोलावल्या होत्या आम्ही बाबांच्या नशिबाच्या म्हणून? अं?” धाकटी बोलली.

आता या चोंबडीनी आत्ता बोलायलाच हवं होतं का ? असं प्रत्येकीच्या मनात येऊन गेलं.

 तिस-या बहिणीची तिसरीच त-हा. तिला तर लागोपाठ तिन्ही मुलीच झाल्या. सासरच्यांनी तिला सळो की पळो करुन सोडलं. सासू तर उठबस म्हणायची, ” आई तशी लेक आणि दोहीची खोड एक. ” नवरा तसा शिकला सवरलेला. तो आपला मुखस्तंभ. सासूनं सरळ आपल्या माहेरची एक मुलगी पाहिली आणि आपल्या मुलाचं दुसरं लग्न लावून दिलं. ही बहिणही रडत भेकत माहेरी आली. तर सगळे तिला म्हणाले, ” हे बघ, एकदा नीट पाहून तुझे आम्ही लग्न लावून दिलं होतं. आता तू आणि तुझं नशीब. “

 — क्रमशः भाग पहिला 

लेखिका : डाॅ. तारा भवाळकर 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्युआर कोड आणि लग्न” – लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “क्युआर कोड आणि लग्न” – लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

आज बऱ्याच दिवसांनी केके उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला .

योग कसला केकेनेच फोन करून बोलावले होते.तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच असतो.पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे आम्हाला आवडते.

गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले. सहज म्हणून मी ते उघडले तर ती लग्नपत्रिका वाटत होती.पण त्यावर कोणाचेच नाव छापले नव्हते फक्त मोठा क्यूआर कोड होता.

मी ते केके दाखविले.तसा तो हसला.

“भाऊ डिजिटल लग्नपत्रिका आहे ही “

“अरे वा “असे म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करायचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हते.

“भाऊ ज्यांना पत्रिका दिलीय त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ते” असे म्हणून त्याने स्वतःचा फोन घेऊन स्कॅन केला .ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्न पत्रिका आणि एक गूगल फॉर्म आला .

” हा फॉर्म भरून द्यावा लागेल .तू येणार आहेस का ? ” त्याने विचारले.

मलाही उत्सुकता वाटली.

मी होय म्हणालो.

“हे बघ, त्यानी कधी येणार विचारले आहे . म्हणजे सकाळी की संध्याकाळी ?”केकेने विचारले.

मी गमतीने म्हटले” दोन्ही वेळेस”.

त्याने माणसेच्या कॉलममध्ये दोन आकडा टाकला.

“भाऊ, त्याने मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलावले आहे .म्हणजे संध्याकाळीच जाऊ.सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत.”

“दोन स्लॉट ?” मी प्रश्नार्थक चेहरा केला.

“सकाळी अक्षता टाकायला एक स्लॉट .जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट .”त्याने उत्तर दिले.

मग संध्याकाळी किती वाजता जायचे त्याचे टायमिंग लिहिले .

“भाऊ एक तास पुरे का ? आठ ते नऊ लिहितो “त्याने माझा होकार समजून लिहिले .

“जेवण काय हवेय ?” त्याने पुन्हा प्रश्न केला.

“अरे जे आहे ते खाऊ ? “मी चिडून म्हटले.

“तसे नाही भाऊ .हल्ली लग्नात काऊंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात .त्यांनी लिस्ट दिलीय त्यातून पदार्थ निवड” माझ्या हाती फोन देत तो म्हणाला.

जेवणाचे बरेच पदार्थ लिस्टमध्ये होते.अगदी लोणचे सॅलेड पासून पान सुपारी पर्यंत.वरती माझे नाव होते.

जवळजवळ वीस पदार्थ होते .मी त्यातून भात,पुरी वरण, बासुंदी ,पनीर भाजी, सॅलेड ,आईस्क्रीम सिलेक्ट केले .

“वा भाऊ, मोजकेच जेवतोस ? छान सवय आहे .लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता ये नऊ ला हॉलमधून बाहेर पडू .” केकेने त्याचा मेनू सिलेक्ट करीत फॉर्म सबमिट केला.

लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये पोचलो .

अरे, हॉलचा दरवाजा बंद होता. लग्न कॅन्सल झाले की काय ?माझ्या मनात शंका .

पण केके बेफिकीर दिसला .त्याने दरवाजावरील क्यू आर कोड स्कॅन केला. ताबडतोब त्याला ओटीपी आला त्याने दरवाजावरील कीपॅडवर ओटीपी दाबला आणि दरवाजा उघडला .

आतमध्ये नेहमीसारखे लग्नाचे वातावरण होते.पण कुठेही गडबड गोंधळ दिसत नव्हता .आम्ही स्टेजवर पाहिले तर वधुवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती.

पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे क्यूआर कोड दिसत होते .

“भाऊ आहेर किती देणार ?” केकेने विचारले.

“पत्रिका तुला आहे मला नाही ?” माझ्यातील मराठी माणूस जागा झाला .

त्याने हसून मान डोलावली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यूआर कोडवर हजार रु स्कॅन केले .पैसे पोचल्याची रिसीट मिळाली .मग त्याने ओळखीच्या लोकांना भेटायला सुरवात केली .

अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवलेल्या डिस्प्ले मध्ये केकेचे नाव आले.तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला .नवऱ्याची आणि माझी माझी ओळख करून दिली .नवरा अर्थात केके ला ओळखत होता . बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा.आमचा एक फोटो काढला .

“चल जेवू या ?”

केके मला घेऊन खाली गेला .तिथेही मोजकीच माणसे जेवत होती . केकेने काऊंटरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो .पाच मिनिटात आमची दोन ताटे घेऊन एक वेटर टेबलवर आला .

आयला ! मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते .

“केके ,दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर ? “मी केकेच्या ताटातील गुलाबजामकडे पाहून कुतूहलाने विचारले .

“मिळणार नाही ? त्या दिवशी चान्स होता सिलेक्ट करण्याचा तो सोडलास .याला चंचल मन म्हणतात.”

केके शांतपणे जेवू लागला .अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळे आमचे जेवण पटकन संपले अर्थात त्यातील पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचे पोट भरले होते.सवयीनुसार मी बासुंदी वाटी अजून एक मागून घेतली .

“भाऊ नऊ वाजत आले” त्याने मोबाईल दाखविला .

च्यायला ! मोबाईलमध्ये अलार्म वाजत होता .

“अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना ?”मी चिडून केकेला म्हटले.

“त्यासाठी दहा मिनिटे वाढवून दिलीत.पण नंतर बाहेर नाही पडलो तर दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा नवरी सोबतच बाहेर पडू .मंजूर आहे का ?” त्याने शांतपणे मला विचारले.

मी नाईलाजाने मान डोलावली .

तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते . त्यावर एक व्हाट्स अप नंबर दिला होता. बहुतेकजण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते .ग्रुपफोटो ही बरेचजण काढत होते .फोटो काढले की त्या व्हाट्स अप नंबरवर सेंड करत होते.

“केके हा काय प्रकार ?”माझा पुन्हा एक प्रश्न.

“भाऊ इथे फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील .म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल. ” केके सहज स्वरात म्हणाला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजाने ओटीपी नंबर दाबून बाहेर पडला.

बाहेर येताच मी केके ला विचारले “यामागे डोके तुझेच ना ?”

केके हसला .

“भाऊ लग्न मनासारखे एन्जॉय केलेस ना ? थोडी शिस्त आणि कठोरपणा आहे .पण सर्वाना मनाप्रमाणे एन्जॉय करता आले ना .आता बघ ना तुझा वेळ वाचला .तुला पाहिजे ते मनासारखे खाता आले .अन्न फुकट गेले नाही.लोकांची धक्काबुक्की नाही .वधूवराना घाई नाही .स्टेजवर पाकीट द्यायला रांग नाही .तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आले . तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळे केले .तू जितका जास्त वेळ दिला असतास तितकाच वेळ आम्हीही घेतला असता “.केके हसून म्हणाला .

“पण ही आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात ?” मी विचारले.

“त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो .लग्न दुपारचे जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखीच त्यामुळे खूप गडबड उडाली होती.अरे ,लग्नाचे विधीही करू देत नव्हते.वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे.पुन्हा फोटोही काढायचे. जेवायला ही गर्दी .त्यात हॉल छोटा .अन्नाची प्रचंड नासाडी .बिचाऱ्या कदमांनी खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता.त्यांच्याकडून काहीच कसर बाकी ठेवली नाही तरीही लोक बडबड करीत होती .नावे ठेवत होती. पैसे खूपच खर्च केले होते पण नियोजन नव्हते .मग मीच ठरविले यावर काहीतरी मार्ग काढायचा . आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावले म्हटले हेच वापरून नियोजन करायचे.त्यात हे लग्न ठरले .मग मी वधू वर त्यांचे आईवडील आणि खास नातेवाईक याची मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली. दोन्हीकडून किती माणसे येतील ? त्यात दिवसभर कोण असणार ? पटकन येऊन कोण जाणार ? याची वर्गवारी केली .जेवण फुकट घालवायचे नाही हा दोन्ही पार्ट्याचा प्रमुख आग्रह होता.विधी पूर्ण झाले पाहिजे यावर दोघांचे एकमत होते.थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते .मग काय लावले आपल्या पोरांना कामाला .आपल्या पोरांनाही काम मिळाले माझे ही थोडे सुटले तुलाही मनासारखे जेवण मिळाले ” केके माझ्या हातावर टाळी देत म्हणाला .

“धन्य आहेस बाबा तू ” मीही त्याला हात जोडीत म्हणालो .

लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चाकं – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चाकं – भाग 2 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

(त्याने व्हील चेअरच्या चारी बाजुंनी टीनचे दरवाजे बनवून घेतले, त्यामुळे ती कितीही हलली, डुलली तरी संतुलन बिघडून ती खाली पडणार नाही. कोणत्याही तर्‍हेची दुर्घटना घडू नये, म्हणून सुरक्षिततेसाठी तिथे कुलूपही लावले ) — इथून पुढे — 

‘तू माझ्यासाठी एक पिंजराच बनवलास हेनरी’ कैमी म्हणाली. हे ऐकल्यानंतर तो हसला. तेव्हापासून उन्हाळातल्या प्रत्येक संध्याकाळी तो पिंजराच तिचा साथीदार असतो.

आज कुलूप लावल्यानंतर कैमीच्या खांद्यावर हात ठेवत, हेनरी म्हणाला, ‘केवळ आजचाच दियास फक्त… उद्या या वेळेला तुझी सर्जरी होईल. मग रिकव्हरीचे काही दिवस. मग तू स्वतंत्र होशील. नंतर, ना पिंजरा राहील, न चाकाची खुर्ची. ’ 

कैमिलाच्या डोळ्यातही चमक आली. कोविदमुळे, इतर आजार आणि गैरजरूरी सर्जरी इस्पितळातले लोक पुढे पुढेच ढकलत होते. करोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, तारखा पुढे पुढेच जात चालल्या. शेवटी आता कुठे सर्जरीचा दिवस उगवला. इस्पितळात जाण्यासाठी बॅग तयार केली. हेनरी अतिशत खुश होता. कैमिलाला बाहेर सोडून कुलूपाची चावी खिशात ठेवून फिरत होता. कधी आत यायचा. कधी बाहेर जायचा.

कैमिलाला बाहेर बसून खूप वेळ झाला. नवी पाझलवाली गेम खेळता खेळता ती थकून गेली. तिने हाक मारली, ‘हेनरी, मला तहान लागलीय. ‘ 

सामान्यत: हेनरी एकदा हाक मारली की लगेच ऐकायचा. आज जरा वेळ लागला. कैमिला वाटलं, कदाचित बाथरूममध्ये गेला असेल. सध्या त्याला जरा जास्तच वेळ लागतो. आजा-काल त्याला ऐकायलाही कमी येऊ लागलय. हियरिंग एड्सही बदलायला हवीय. कसं बोलवायचं त्याला? कितिदा म्हंटलं त्याला, एक मोबाईल तरी घेऊयात. पण त्याचं म्हणणंही खरं होतं. तो म्हायचा, ‘उगाच खर्च कशाला वाढवायचा?’ 

आपल्या जवळ असलेली काठी ठोकून ठोकून कैमिने आवाज केला. जवळ असलेलं वर्तमानपत्र खुर्चीवर वाजवण्याचा प्रयत्न केला. हॅलो, हाय सारखे तर्‍हे-तर्‍हेचे आवाज तोडाने काढले, पण हेनरी आला नाही.

समोरच्या रस्त्यावरून एक दंपत्य फिरत फिरत चाललं होतं. कैमिने त्यांना जवळ यायची खूण केली. प्रथम ते घाबरले, पण नंतर समस्या समजताच ते आनंदाने दरवाजाजवळ उभे राहिले. बेल वाजवली. कडी खटखटवली. कैमि उत्सुक नजरेने हेनरीची प्रतीक्षा करत राहिली. पण, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग तिने मदत करणार्‍या दांपत्याला सांगितले, ‘प्लीज, आपण मागच्या दरवाज्याने आत जा. आत कम्प्यूटरजवळ चावी ठेवलेली असेल. ती घेऊन या. ’

ते आत जाऊ शकले नाहीत. दरवाजा आतून बंद होता. ते दार खटखटू लागले, पण दार उघडलं नाही. येता-जाता आणखी काही लोक जमा झाले. अर्ध्या आसाच्या अथक प्रयत्नांनंतर कैमिलाला विचारून त्यांनी पोलिसांना कळवलं॰ 

कैमि हैराण झाली. तिला कळतच नव्हतं की अखेर हेनरीला झालय तरी काय? तिला वाटलं, रात्री नीट झोप लागली नसेल. त्यामुळे कदाचित डुलकी लागली असेल. अनेकदा त्याला रात्री नीट झोप लागत नसे. पण आता तर खूप वेळ झाला. इतका गाढ झोपला असेल, तर पोलीस तरी त्याला कसे उठवणार? 

पोलीस आले. थोड्याशा प्रयत्नांनंतर त्यांनी कुलुप तोडले. समोर खुर्चीवर हेनरी बसला होता.

‘मिस्टर हेनरी.. ’ काहीच उत्तर मिळालं नाही.

ऑफिसरने हेनरीच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला, तशी तो खाली पडला. जसा काही कुठल्या तरी स्पर्शाची वाट बघतोय. काही क्षण त्याच्या श्वासोच्छवासाची चाहूल घेतल्यावर ऑफिसरने मान हलवली आणि अ‍ॅम्ब्युलंस बोलावली. या गोष्टी इतक्या झटकन झाल्या, की समोरचं दांपत्य आवाक झालं. सगळ्यांची हलणारी डोकी काही सांगत होती. बाहेर जाऊन कैमिलाला कसं सांगायचं? 

पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. ‘मिसेस कैमिला आपल्याला काही सांगायचं आहे.

कैमिलाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ती समोर रस्त्याकडे बघत होती.

‘सॉरी, आपले पती हेनरी… ’ 

तरीही ती काही बोलली नाही. लोकांना वाटलं, ती आक्रोश करेल. पण, तिथे केवळ शांतता होती. कदाचित एका विशिष्ट वयानंतर मन आशा गोष्टींसाठी तयार होत असेल. या धावपळीनंतरही आणि अ‍ॅम्ब्युलन्सची पींपीं ऐकूनही ती गप्पच होती, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. तिला तिच्या पिंजर्‍यातून बाहेर काढण्यासाठी पोलीसांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा तीही त्याच्यासारखीच लुढकली. दैवयोगाने तिचा श्वास मात्र चालू होता. तिला ताबडतोब हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. घरातून दोन अ‍ॅम्ब्युलन्स निघाल्या. एकात हेनरीचे शव होते. दुसरी कैमिलाला इमरजन्सी विभागात पोचवत होती.

थोड्या वेळातच कैमिला धोक्याच्या बाहेर आली. अजूनही ती बेशुद्धच होती. सात दिवस ती शुद्धीवर आलीच नाही. तेव्हा सगळ्या कायद्याचं, नियमांचं पालन करत हेनरीचे अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या शेजार्‍यांना सांगितलं गेलं. फोनच्या डायरीतून नंबर घेऊन, मिळालेल्या एक-दोन नातेवाईकांनाही कळवलं गेलं. काही आले. काहींनी शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली वाहीली.

पूर्णपणे शुद्धीवर येऊन सर्जरीयोग्य बनण्यासाठी कैमिलाला एक महिना लागला. त्यानंतर जिथे तिचं ऑपरेशन होणार होतं, त्या हॉस्पिटल मधे तिला पोचवलं गेलं. ऑपरेशन कुठे आहे, हेनरी का नाही आला, याबद्दल तिने काहीच विचारलं नाही. कदाचित तिला कळलं असावं.

डॉक्टरांच्या दृष्टीने यावेळी सर्जरी करणं महत्वाचं होतं. त्याप्रमाणे सर्जरी झाली. पाच दिवसांनंतर जेव्हा तिला घरी पाठवायचं ठरलं, जेव्हा तिला हेनरीबद्दल सांगण्यात आलं. तेव्हा, ती तटस्थपणे म्हणाली, ‘मला माहीत आहे. ’ आणि पुहा गप्प झाली.

हॉस्पिटलमधून एक नर्स तिच्याबरोबर आली होती. कैमि काही सेकंदांसाठी उभी राहयाची आणि पुन्हा खाली बसायची. काही दिवसांच्या, नर्सच्या आणि फिजिओथेरपीस्टच्या अनवरत प्रयत्नांनंतर, तिच्या पायांनी तिच्या शरिराचा भार सहन करणं मान्य केलं.

हळू हळू आपल्या पायांनी घराच्या प्रत्येक खोलीत, ती चांगल्या तर्‍हेने फिरू लागली. एके दिवशी एका कोपर्‍यात उभ्या केलेल्या व्हील चेअरकडे तिचं लक्ष गेलं, तिकडे लक्ष जाताच, तिला व्हील चेअरच्या मागे हेनरी उभा असलेला दिसला. ती त्यावर बसली. तिला वाटलं, त्यामुळे ती हेनरीच्या हातांचा स्पर्श अनुभवू शकेल.

अनेकदा, जेव्हा उशीर व्हायचा, तेव्हा ती रागावायची. तो सॉरी म्हणत घाई करू लागे, तर त्यात आणखीनच उशीर व्हायचा. तो सॉरी सॉरी म्हणत, मान हलवायचा आणि हसायचा. ती तीच व्हील चेअर होती. हेनरी तिला ढकलायचा आणि तिला मागे असलल्या त्याच्या उपस्थितीची जाणीव व्हायची. व्हील चेअरवर बसलेली ती कधी आपल्या पायांकडे बघायची, तर कधी हेनरीच्या हाताच्या स्पर्शाचा अनुभव घ्यायची.

एकदा तिचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या ब्राऊन लिफाफ्याकडे गेलं. ते हेनरीचं पत्र होतं. पत्र कसलं, मृत्यूपत्रच होतं जसं काही. एक वाक्य मोठ्या मोठ्या अक्षरात पुन्हा पुन्हा लिहिलं होतं, ‘जर देणं शक्य असेल, तर माझे पाय माझ्या पत्नीला द्या. ’ एक एक अक्षर तिच्या डोळ्यांवर समुद्राच्या लाटांप्रमाणे थपडा मारत होतं.

‘हेनरी, तू जर मला विचारलं असतंस, विकल्प दिला असतास, तर मी व्हील चेअरचीच निवड केली असती. ’

ती कधी स्वत:च्या पायाकडे बघायची, कधी व्हील चेअरकडे, ज्या पिंजर्‍यात ती आत्तापर्यंत कैद होऊन राहिली होती. आज घराचा काना-कोपरा बघत होती. तिथे चालण्यासाठी इतके दिवस तिचे पाय बेचैन झाले होते. आता ती गतिमान झाली होती आणि हेनरी स्थिर. हेनरीचे पाय माझे होते, आता मी त्याचे पाय बनेन. तिने लगेचच हेनरीचा फोटो उचलून व्हील चेअरवर ठेवला आणि त्याच्या स्थिरतेला गती देऊ लागली. अनेक वर्षांचं कर्ज होतं. मरेपर्यंत चुकवलं, तरी उऋण नाही होऊ शकणार. आत्ता आत्तापर्यंत हेनरी तिची सेवा करत होता. आता कैमिलाला संधी मिळाली, तर तो गप्प झाला.

व्हील चेअरवर ठेवलेल्या फोटोतील हेनरीचा चेहरा बघणंही तिला असह्य झालं. जर खरोखरच हेनरी व्हील चेअरवर असता, तर कसं वाटलं असतं? कदाचित ते सत्य कैमिला किती वेदनादायी झालं असतं. हा विचार मनात येताच तिला वाटलं, इतकी वर्षे तिचा भार चाकं उचलत होती. पण हेनरीचं मन, रोज किती भार उचलत होतं, त्याला गणतीच नाही. कैमिलाजवळ चाकं होती. हेनरीजवळ तर ना पाय होते, ना चाकं. आपले पाय तर त्याने पहिल्या दिवसापासून कैमिला देऊन टाकले होते.

“ओ हेनरी!” 

हाहाकारी मौनामधे तिचे ओठ अस्पष्टसे पुटपुटले. तिने त्वरेने हेनरीचा फोटो व्हील चेअरवरून उचलला.

कैमिच्या पायांना जशी चाकं लागली होती. इतके दिवस स्थिर असलेल्या पायांनी आता पुन्हा गती घेतली होती.

– समाप्त – 

मूळ हिन्दी कथा – “पहिए“

हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – [email protected]

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चाकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चाकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

एकाच घरात दोन विश्व. एक गतिमान आणि दुसरं स्थिर.

व्हील चेअरवर धसून बसलेल्या कैमिलाच्या जगात चाकं चालायची, पण ती स्थीर असायची. हेनरी स्वत: चालायचा आणि पत्नीलाही ढकलायचा. कित्येक वर्षापूर्वी व्हील चेअर प्रथम घरात आली, तेव्हा जराही कल्पना नव्हती, की एक दिवस कैमिला यातच सामावून जाईल.

एक दिवस गडद काळोखात कैमिला कशाला तरी धडकली आणि पडली. त्यावेळी डॉक्टरांनी कमीत कमी दहा दिवस तरी चालू नका, म्हणून सांगितले होते. हेनरीने तिच्या सोयीसाठी लगेचच व्हील चेअर आणली होती आणि तिच्यावर तिला बसवून तो अगदी मनापासून ती ढकालायचा. म्हणायचा, ‘तुझ्यासाठी इतकं तरी मी करू शकतोच ना कैमी! उद्या चालू लागलीस की माझी गरज नाही पडणार. आता निदान मी तुझ्या अवती-भवती तरी राहू शकतो. ’ त्यावेळी प्रत्येक क्षणी हेनरीच्या प्रेमाचा अनुभव घेत, आस-पास बघत मस्करी करत ती म्हणायची, ‘वाटतय, याच चेअरवर कायमचं राहावं. तुझं प्रेम मिळतं ना! माझ्या खांद्यावरचे तुझे हात मला असहाय्य वाटू देत नाहीत.

हेनरी हसत हसत तिचे गाल थपथपायचा.

‘खरच हेनरी, इतक्या दिवसात आपलं एकदाही भांडण झालं नाही.’

‘भांडण नाही. वाद म्हण. एखाद्या गोष्टीवर वाद घालणं म्हणजे भांडण नाही.’

‘या आधी तू असं कधी म्हणाला नाहीस. तुझे डोळे भांडणासारखेच गरगरायचे’

हेनरीने हे बोलणं अगदी सहज थट्टेवारीत घेतलं आणि म्हणाला, तुला पाहून डोळे चक्रावले जात असतील, एवढंच! पण कैमी, पाय चांगले असले तरी तू बसून राहू शकतेस. व्हील चेअरवर नाही, या शानदार सिंहासनासारख्या खुर्चीवर. तेव्हाही मी तुझ्या मागेच राहीन. ’ 

कैमिला हे गमतीत बोलली खरी, पण काही वर्षात ते तिचं जीवनच झालं. बर्फावरून ती घसरली होती. केवळ पायच घसरले नव्हते. सगळं शरीरच आखडलं होतं.

महिनाभर बिछान्यावर पडून राहिल्यानंतर, फिजियोच्या अथक प्रयासाने शरीराची बाकी अंगे सक्रिय झाली, पण पायाची स्थिती सुधारली नाही. त्यानंतर ती पुन्हा आपल्या पायावर उभी राहू शकली नाही. विशेषज्ञ चिकित्सकांच्या टीमचं म्हणण की काही वर्षांनंतर पायांची क्षमता आपोआप वाढेल. त्यावेळी सर्जरीनंतर तिला चालता येईल.

पुढच्या पाच वर्षांच्या दरम्यान अनेकदा, एकामागून एक अनेक चेकप झाले. अनेक वर्षं या व्हील चेअरमध्ये कैदेत राहिल्यानंतर अखेर सर्जंरीसाठी हिरवा झेंडा दाखवला गेला. उद्या सर्जरी आहे. त्यानंतर तिला नेहमीसाठी या चेअरमधून मुक्ती मिळेल.

हेनरी खूप आशावादी होता. तो खुश होता. आता कैमि लवकरच चालायला लागेल. तिला असं असहाय्य बघणं, त्याला खूप त्रासदायक वाटायचं. त्याला ते जुने दिवस आठवायचे. त्यावेळी कैमिचे पाय एखाद्या जागी कधीच टिकायचे नाहीत. तिची जबर इच्छाशक्ती हेनरीला हैराण करायची. घरकाम, नोकरी आणि मित्रमंडळी. कधी मॉल, कधी पार्क, प्रत्येक ठिकाणी सगळी कामं निपटत ती धावत राह्यची. एकाच वेळी, धावत-पळत अनेक कामे करायची तिची सवय होती. तिची धाव-पळ आशा तर्‍हेची असे, की जणू एखादं मिनिट उशीर झाला, तर जशी काही दुनियाच थांबेल. तिच्या हाता-पायात असं सामंजस्य होतं, की मेंदूकडून सूचना येताच ते आपापली ड्यूटी करू लागत. तिचा उत्साह पाहून हेनरी चकित व्हायचा. स्वत: काही करायच्या ऐवजी कैमिवरच अवलंबून राह्यचा. अनेक कामे कैमिसाठी जशी काही रांग लावून उभी असायची. अजून हे करायचय, ते करायचय, या दरम्यान सूर्य आपला प्रकाश घेऊन विश्रांतीसाठी निघून जायचा, तेव्हा कैमिला वाटायचं, आजचा दिवस संपला आणि आता उद्यापर्यंत तिलाही आपले शरीर बिछान्यापर्यंत घेऊन जायचय. तिच्या या गतीचा हेनरीला वैताग यायचा. हेनरीला प्रत्येक काम आरामात, सावकाश करण्याची सवय होती. स्टोअरमधे भाजी, दूध, फळे घ्यायला जायचा तेव्हा काळजीपूर्वक एकेक केळं निवडत बसायचा. जोपर्यंत तो दुसरे फळ निवडू लागायचा, तोपर्यंत कैमि इतर सगळी खरेदी आटपून तिथे हजर व्हायची.

हेनरीला वाटायचं, तो नालायक आहे. कोणत्याच कामाचा नाही. इतका वेग तो कुठून आणणार? तो म्हणायचादेखील, ‘कैमि, देवाने तुझ्या पायाला चाकं लावून पाठवलय आणि माझ्या पायाला हळू हळू चालण्यासाठी साखळदंड. त्याच्या अशा हलक्या-फुलक्या बोलण्याची कैमिला खूप मजा वाटे. ‘हेनरी, आपल्या प्रेमाच्या बेड्यात तू मला चांगलच अडकवलयस. तू जसा आहेस, तसाच मला आवडतोस!’

‘मग आता मला कमी ओरडा खायला लागेल नं? ‘

एक चुंबन घ्यायची कैमिला, कारण हेनरीच्या या धिम्या गतीमुळे ती अनेकदा चिडचिडायचीसुद्धा. यावरून दोघांची अनेकदा भांडणंसुद्धा व्हायची. त्याच्या धिम्या गतीमुळे कैमिलाच्या ख्ंद्यावरील कामाचा बोजा वाढायचा. मग ती अधून-मधून त्याला टोमणेही मारायची. हेनरीच्या हातात गप्प बसून सहन करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. यामुळे कधी कधी घरात इतकी शांतता, स्तब्धता असायची की ती दोघांनाही टोचायची. एक-दोन दिवसात मग सगळं सामान्य होऊन जात असे.

प्रकृती चांगली असल्याने कैमिला अनेकदा पडून उठायची. पण, त्या दिवशी, बर्फात ती जी पडली, ती स्थिती भयावह होती. ती तिला व्हील चेअरमधे कैद करून गेली. हेनरी रिटायर्ड झाला होता आणि कैमिलाला कंपलसरी रिटायरमेंट घ्यावी लागली. तेव्हापासून हेनरी तिचा केवळ पतीच नाही, तर कैमिचा पायही बनला होता. तिला जेव्हा कशाची गरज असेल तेव्हा, हेनरीच असायचा. अनेक वेळा, अनेक गरजेच्या गोष्टी ती आपल्या जवळच्या टेबलावर ठेवून घ्यायची. हेनरीला वारंवार त्रास द्यावा लागू नये, असं तिला वाटायचं. तरीही काही ना काही राहायचच. कदाचित बर्‍याच वर्षांच्या शीघ्र गतीचा आणि मंद गतीचा हिशेब बरोबर होत चाललाय. आता हेनरीच तिचे पाय होते, जे मंद गतीने का चालोत, निदान चालत तरी होते. कैमिचे जलद धावणारे पाय दुर्भाग्याने आता थांबलेच होते. जेव्हापासून ती खुर्चीशी बांधली गेलीय, तिला अनेक वेळा वाटलं, जसे काही तिचे पाय कधी चाललेच नाहीत. चालणारे लोक तिला जादुगार वाटतात. ती कधी त्यांच्या पायाकडे तर कधी आपल्या पायांकडे बघायची. तिला जाणवायचं आपल्या पायांनी चालणार्‍या माणसाला कधी वाटतच नाही, की तो गतिमान आहे. गती आहे, तर जीवन आहे.

एका खुर्चीत कैद असलेलं जीवन काय जीवन आहे? खुर्चीत सामावलेलं तिचं जीवन, पायाचं मौन, ती असहाय्यशी झेलत होती. विविध अवयवांचं सामंजस्य निभावताना पायांनी जसा काही असहकार पुकारला होता. या धावत्या जगात पायांची जंगली जिद्द तिला दिवसेंदिवस जशी काही खात होती. हेनरीला दाखवण्यासाठी ती वर-वर हसायची, पण आतल्या आत खूप रडायची. हे रडू तीळ तीळ करत तिच्या जीवनेच्छेला गिळत होतं.

तिच्या या थांबलेपणाची पूर्ण कल्पना हेनरीला होती. कैमिला आशा स्थितीत बघणं, हे त्याच्यासाठी शिक्षेपेक्षा काही कमी नव्हतं. तिला जास्तीत जास्त मदत करून तो, ती शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करायचा. तिच्या अन्य गराजांबरोबरच, तिच्या मनोरंजनाचाही तो विचार करायचा. पण, लाख इच्छा असूनही तो कैमिची विवशता, लाचारी कमी करू शकत नसे. घरात दोनच माणसे, पण दोघेही आपआपल्या परिघात बंदिस्त होती. आता दोघांच्यात कधीही वाद होत नव्हते. भांडणे होत नव्हती. नेहमी नाकावर राग असणारा हेनरी आता अगदी शांत होऊ लागला होता.

दोघेही निवृत्त. दोघांची पेन्शन बेताची. गरजाही बेताच्याच. हलकं-फुलकं खाणं आणि एक ठरीव दिनचर्या. मनाला वाटेल तेव्हा निजावं, मनाला वाटेल तेव्हा उठावं. साठ-बासष्ठचं वय म्हणजे फार काही नाही. पायांनी साथ दिली असती, तर यापुढचा प्रवास हा खुशीचा प्रवास झाला असता. कैमिची एकच इच्छा आता बाकी राहिली होती. ती म्हणजे, जीवनात एकदा तरी चालण्याचा आनंद घेणं. आपल्या पायांवर उभं राहून मनमुराद चालण्याची तिची इच्छा होती. या वेळेची वाट बघता बघता तिचे डोळे दगड होऊन गेले होते.

थंडीमधे वेळ निघून जात असे. पण उन्हाळ्यात जेव्हा सगळं शहर घराबाहेर लोटलेलं दिसे, तेव्हा ती उदासपणे येणार्‍या – जाणार्‍या लोकांकडे असासून पाह्यची. रोज संध्याकाळी हेनरी तिची व्हील चेअर व्हरांड्यात आणून त्याच्या टोकाशी नेऊन ठेवत असे, म्हणजे येणार्‍या – जाणार्‍या लोकांकडे बघून तिला आपला वेळ घालवता येईल.

कैमी कधी पुस्तक वाचायची. कधी थंड हवेत एखादी डुलकी काढायची. पण वैताग आणणारी गोष्ट ही होती, की अनेकदा संतुलन बिघडल्याने व्हील चेअरचे लॉक उघडायचे. अनेकदा ती पडता पडता वाचली होती. हेनरीने यावर उपाय शोधून काढला होता. त्याने व्हील चेअरच्या चारी बाजुंनी टीनचे दरवाजे बनवून घेतले, त्यामुळे ती कितीही हलली, डुलली तरी संतुलन बिघडून ती खाली पडणार नाही. कोणत्याही तर्‍हेची दुर्घटना घडू नये, म्हणून सुरक्षिततेसाठी तिथे कुलूपही लावले.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिन्दी कथा – “पहिए“

हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – [email protected]

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – २ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

?जीवनरंग ?

☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – २ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

(त्यानंतर बक्षिस वितरण सुरू झालं. उत्तेजनार्थ दोन बक्षिसं जाहीर जाहीर झाली. हॉल टाळ्यांच्या गजराने घुमत होता.) – इथून पुढे —

तृतीय क्रमांक पुकारला. द्वितीय क्रमांक पुकारला माझं नाव कुठेच नव्हतं. मी खूप नाराज झालो होतो. आत्ता इथून कसं निघायचं याचा विचार करत होतो. बोलणारा निवेदक मुरलेला होता त्याने प्रथम क्रमांक पुकारताना वातावरण लय टाईट केलं. माझी धडधड केव्हाच बंद झाली होती. निश्चितच आपण तरी प्रथम क्रमांक नसणारच याची खात्री होती. मी निघायचं कसं याचा विचार करत होतो.

तेवढ्यात प्रथम क्रमांक स्पर्धकाचं नाव आहे नितीन चंदनशिवे. अशी घोषणा झाली. मी उभा राहिलो आणि परत खाली बसलो. टाळ्या वाढल्या होत्या. मी कसातरी उभा राहिलो. स्टेजवर गेलो आणि पाडगावकरांच्या हस्ते ते बक्षीस घेतलं. टाळ्या जोरात वाजायला सुरवात झाली तशी टाळ्याऐवजी मला बच्चनचा ताशाचा आवाज येत राहिला.

ती ट्रॉफी आणि तीन हजाराचे पाकीट घेऊन मी बाहेर आलो.

 मी कधी एकदा स्टेशनवर जाऊन मंगल आणि बच्चनला भेटीन असे झाले होते. फार आनंद झाला होता. मी अगोदर खडकी बाजारात आलो सागर स्वीटसमधून पावशेर गुलाबजाम घेतले आणि कॉर्नर हॉटेलमधून तीन बिर्याणी पार्सल घेतल्या. मी आयुष्यात पहिल्यांदा स्पेशल रिक्षा केली, आणि स्टेशनजवळ आलो. मला माहित होतं यावेळी मंगल कुठे असणार ते. जय हिंद थिएटर जवळ गेलो तर एका रिक्षात गिऱ्हायकाबरोबर मंगल बसलेली दिसली. तिथेच थांबलो कारण तिथे जाणं म्हणजे तिच्या शिव्या खाणं होतं. रात्रीचे सव्वा नऊ झाले होते. कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस फ्लॅटफार्मला थांबली होती. गाडी जाईपर्यंत बाहेरच थांबलो. गाडी निघून गेली थोड्या वेळाने फ्लॅटफार्म रिकामे झाले.

 मी आमच्या बाकड्यावर जाऊन बसलो. वारंवार मी केशवसुत यांचे छायाचित्र असलेली ती केशवसुत करंडकची ट्रॉफी पाहत होतो. आणि आपण कसे सादरीकरण केले असेल याचा विचार करू लागलो. फ्लॅटफार्मवरच्या घड्याळाकडे नजर गेली रात्रीचे बारा वाजत आले होते. पुन्हा एकदा विडा मळला आणि तोंडात बार भरला. पहिली पिचकारी मारली तशी नजर पलीकडच्या बाजूला गेली. बच्चन आणि मंगल दोघेही हातात हात घालून चालत जिन्याच्या दिशेने जाताना दिसले. मी मोठ्याने ओरडलो “बच्चन भाय…”… त्या दोघांनी फक्त हात उंचावला आणि माझ्या बाजूला येणारा जिना चढू लागले. बच्चनच्या हातात काळी पिशवी दिसली. म्हणजे याने पण बिर्याणी आणली वाटतं. रोज त्याच्या हातातलं पार्सल बघून होणाऱ्या आनंदाने आज रागाची जागा घेतली. कारण मी पण बिर्याणी आणली होती. ते दोघे अगदी जवळ आले तसे मी विडा थुकला आणि पिशवीतली ट्रॉफी काढून सरळ मंगलच्या हातात देत बच्चनला म्हणालो बच्चन “जंग जिती हमने।”….

पहिल्यांदा मंगलने माझ्या गालाचा चिमटा घेतला. डोक्यावर हात फिरवत तिने मला छातीशी कवटाळून धरलं. आणि पाठीवर खूप जोरात थाप मारत म्हणाली बघ “मी म्हणलं होतं की नाही तू जिंकणार म्हणून… ” लगेच बच्चनने खांद्यावरचा ताशा कमरेत घातला आणि अंग वाकडं करून नाचून त्याने वाजवायलाच सुरवात केली. मी पण थोडा नाचलोच. त्याला मंगलने थांबवलं आणि म्हणाली “चला जेवण करून घेऊ. मला निघायचं आहे. ” आत्ता तिला कुठे जायचे आहे आम्हाला चांगलं माहीत होतं. मी म्हणालो मी आपल्यासाठी बिर्याणी आणि गुलाबजाम आणलंय. बच्चनपण म्हणाला पण बिर्याणी आणली आहे. मंगल म्हणाली, “असुद्या खाऊ सगळं त्यात काय एवढं. ” आम्ही तिघांनी मिळून तेवढी सगळी बिर्याणी खाल्ली. मला पहिल्यांदा जाणीव झाली की, आपली भूक मोठी आहे आणि जेवनपण भरपूर लागतं आपल्याला. तिघेही पाणी पिऊन आलो. बाकड्यावर बसलो. एवढे सुंदर सेलिब्रेशन आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही. मी डबल विडा मळायला घेतला अर्धा मंगलला दिला. दोघांनी तोंडात बार भरला. बच्चनने बिडी पेटवली आणि म्हणाला वाटलं नव्हतं तुला बक्षिस मिळेल म्हणून.

“नितीन ऐकव ना परत तिच कविता आणि तशीच. ” मी ऐकवली पण खरं सांगू स्पर्धेच्या सादरीकरणापेक्षा खूप उत्तम बोललो. दोघांनीही टाळ्या वाजवल्या.

मंगल निघून गेली तिचं गिऱ्हाईक तिची वाट पाहत होतं याची जाणीव बच्चनला आणि मला होतीच. ती गेल्यानंतर बच्चन आणि मी दोघेच बोलत बसलो. मी म्हणालो “बच्चन ही ट्रॉफी कुठे ठेवायची?” तेव्हा बच्चन म्हणाला, “त्यावर तुझं शाईने नाव लिही आणि मी सांगतो तसं कर. ” मी पेनातील शिस काढून त्यातली शाई बाहेर काढून माझं फक्त नाव लिहिलं. तेवढ्यात महालक्ष्मी एक्सप्रेस फलाटावर दाखल झाली. प्रवासी उतरले काही चढले. गाडी निघाली तशी बच्चनने माझ्या हातातली ट्रॉफी हिसकावून घेतली आणि धावत्या रेल्वेच्या एका डब्यात खिडकीतून मोकळ्या शीटवर टाकली आणि हसत हसत माघारी आला. मी खूप प्रयत्न केला त्याला अडवण्याचा पण त्याने बाजी मारली. मला बच्चनचा खूप राग आला. कमरेखालची भाषा ओठांवर आलेली होती तोच बच्चन म्हणाला “आ बैठ इधर” मी त्याच्या शेजारी बाकड्यावर बसलो तसा बच्चन म्हणाला, “हे बघ ही गाडी गेली. त्यात तुझी ट्रॉफीपण गेली. आता एक दिवस इतका मोठा हो इतका मोठा हो सगळ्या जगात तुझं नाव झालं पाहिजे. मग तुझी ट्रॉफी कुणीतरी स्वतःहून तुला आणून देईल त्यावेळी त्या माणसाचे पाय धर. ” माझ्यासाठी हे सगळं अजब होतं. बच्चन बोलत होता मी ऐकत होतो. ताशा वाजवणारा माणूस मला जगण्याचं कसलं सुंदर तत्वज्ञान सांगून गेला. आणि कशासाठी जगायचं हे शिकवून गेला.

तेवढ्यात मंगल आली. तिचं गिऱ्हाईक वाट पाहून चिडून दुसरीला घेऊन गेलं होतं. ती ही बसली मग आमच्याबरोबर. मला आठवतंय आम्ही रात्रभर झोपलो नाही. गप्पा मारत राहिलो. पहाटे थोडा डोळा लागला. सूर्य उगवायच्या आत फलाट सोडावं लागायचं. आम्ही उठलो बाहेर टपरीवर चहा घेतला. का कुणास ठाऊक पण मी खिशातील पाकीट बाहेर काढलं आणि एक हजार मंगलला आणि एक हजार बच्चनच्या हातात देत म्हणालो, “मंगल तुला एक साडी घे आणि मेकअपचं सामान घे जरा नटून थटून धंद्यावर थांबत जा… आणि रेट वाढवून सांगत जा. ” मी गमतीने हसत बोलत होतो. तिने नकार दिला पण मी जबरीने तिच्या हातात पैसे दिलेच. तिचे पाणावलेले डोळे स्पष्ट दिसत होते. बच्चनला म्हणालो, “तुला एक ड्रेस घे, आणि असा ताशा वाजव असा ताशा वाजव सगळं जग नाचत इथं आलं पाहिजे. ” त्याने नकार बिकार न देता हजार रुपये खिशात ठेवत मंगलला नेहमीप्रमाणे गमतीने बोलला “क्या मंगलाबाय शादी करेगी मेरेसे?” त्यावर कायम शिव्या घालणारी मंगल खूप लाजून लाजून हसली… त्याच धुंदीत पुन्हा विडा मळला. बच्चनने बिडी पेटवली. आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला तो पुन्हा संध्याकाळी तिथेच भेटण्यासाठी..

आज दिवस बदलले आहेत. मी माझ्या संसारात माझ्या नव्या जगात आहे. सहा वर्षांपूर्वी मंगल वारली. दोन महिने ससूनला पडून होती. बच्चन शेवटपर्यंत तिच्याजवळ होता. मी दोनदा भेटून आलो. मला पाहून खूप रडली होती ती. माझाही हुंदका आवरला नव्हता. बच्चनचा हात हातात गच्च दाबून धरला होता तिने. त्यांच्यात एक प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं. मंगल गेली तेव्हा बच्चन खूप रडला होता. तिचं अंत्यविधीचं सगळं मीच केलेलं होतं.

त्यानंतर बच्चनला दोन दिवसात दोनदा जाऊन भेटलो. म्हणलं “काय हवं असेल तर सांग नाहीतर चल घरी माझ्याजवळ राहा. ”तर तो नाही म्हणाला. अंगावर आलेले चांगले कपडे पाहून लांबूनच बोलत होता. मलाच त्याचा राग आला आणि मग “अबे हरामके, मंगलके दिवाने म्हणत त्याला गच्च मिठी मारली. त्याचा निरोप घेतला. नंतर त्याला भेटायला बऱ्याचवेळा गेलो दिसला नाही. जिवंत आहे की नाही माहीत नाही. पण जेव्हा पाऊस पत्र्यावर पडायला सुरुवात होते तेव्हा, आणि माझ्या कवितेवर समोर जमलेले पब्लिक टाळ्या वाजवत राहतं तेव्हा, माझ्या डोळ्यात बच्चन आणि बच्चनचा ताशा नाचत असतो. आणि मंगल मला छातीशी गच्च कवटाळून भिजवत राहते. ही दोन माणसं माझ्या आयुष्यात आलीच नसती तर… माझ्यातला कवी आणि लेखक जन्माला आलाच नसता.

– समाप्त – 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

?जीवनरंग ?

☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं. मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता. रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती. बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो. मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती. पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता. फटाक्यांचा माळा वाजत होत्या. ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता. तासभर धिंगाणा सुरूच होता. त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली. झोप लागत नव्हती. भूक लागली होती. उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.

विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला “क्या कालू झोपला नाहीस अजून”. “अगं बच्चन अजून आला नाही”… असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली. ओठावर दोन बोटं गच्च दाबून थुकलो. पिचकारी फ्लॅटफार्मच्या बाहेर गेली. हा माझा छंद होता.

बारा वाजले होते जय हिंद थिएटर जवळ होतं. शेवटचा खेळ संपत आला तशी मंगल उभी राहत म्हणाली, ”चल आलेच मी तासाभरात”. असं म्हणून ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक कटाक्ष टाकला आणि तोंडातला विडा बोटाने धरून भिरकावला. मंगल कोण कुठली माहीत नाही. आसऱ्याला एकत्र जमलेल्या गर्दीला एकच नातं असतं ते म्हणजे परिस्थितीचं. आणि म्हणाल तर फक्त ओळखीचं. मंगल इथं धंदा करत होती. शरीर विकून फक्त पोट भरत होती. मी बॅचलर मुलगा. दिवसभर काम आणि कॉलेज करून रात्र काढायला स्टेशनवर येणारा. इथं मी खरी जिंदगी जगलो. फार नाही पण तीन साडे तीन महिने तर नक्कीच.

अर्ध्या तासाने मंगल पुन्हा आली. चिडलेली आहे हे लगेच ओळखलं. आल्या आल्या तिने इशारा केला आणि मी तंबाखू मळायला लागलो. तिच्यासाठी विडा मीच मळत असे. विडा तिच्या हातावर देत म्हणालो “आज लवकर आलीस.. ” “अरे आज निकाल लागला ना, थिएटर रिकामच सालं. गिऱ्हाईकच नाही. जे रोजचे दोघेजण असतात तेपण दिसले नाहीत. तो नालायक नवीन आलेला पोलीस दोनशे रुपये फुकटचे घेऊन गेला. साला… हफ्ता आम्हाला पण द्यायला लागतो काळू “… तिचं बोलणं थांबवत मी आवंढा गिळत विचारलं “जेवलीस?”. मान झटकत छया करत खूप उपाशी असल्याचा इशारा तिने दिला. पण त्यातूनही ती म्हणाली “ तू खाल्लस काय?” मी नाही म्हणालो. त्यावर तिने पुन्हा विचारलं “बच्चन कुठाय” (शिवी)….. ? मी सांगितलं “आज मिरवणुकीत ताशा वाजवायला गेलाय तो”. मंगलने पण तंबाखू थुकली आणि म्हणाली, “थांब कायतरी बघते खायला.. काही नाही मिळालं तर आत्ता महालक्ष्मी येईल पुणे स्टेशनला जाऊ”. तेवढ्यात गाडीचा आवाज आलाच. मंगल म्हणाली, “चल त्या बाजूला जायला हवं नाहीतर उपाशी राहायला लागल आज चल उठ लवकर “.. मी चादर गुंडाळून हातात घेतली आणि आम्ही निघणार तेवढ्यात बच्चनचा आवाज आला. “ये काळू ये मंगला, अरे रुखो मुझे छोडके कहा जाते. ” या दोघांची हिंदी अशीच.

खांद्यावर ताशा अडकवलेला आणि हातात काळी पिशवी घेतलेला ताशेवाला बच्चन दिसला की मला बाप भेटल्यागत वाटायचं. त्याचं वय असेल चाळीस पंचेचाळीस. कधीतरी बोलण्यात परभणीच्या कोणत्यातरी भागातला आहे एवढंच कळलं होतं. बाकी काहीच माहिती नव्हती. त्यादिवशीपण हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी दाखवत आम्हाला दोघांना म्हणाला “चलो खाना खाते है”

आम्ही लगेच बाकड्यावर बसलो पिशवी फोडली. गरम बिर्याणी तिघांसाठी आणली होती त्याने. मटण कशाचं म्हणून मी कधीही विचारलं नाही. मंगल म्हणाली “काय बच्चन आज लय खूष.. ‘ त्यावर ताशावर हात मारत बच्चन बोलला “बडी सुपारी मिली दो सो रुपया मिला. सौ का बिर्याणी लाया तेरे लिय.. ” बिर्याणी कधी संपली आणि पोट कधी भरून ढेकर आला कळलं नाही. रेल्वेच्या नळावर हात धूवून पाणी प्यालो आणि बाकड्यावर येऊन बसलो.

बराच वेळ तिघांच्या गप्पा चालायच्या. झोप आली की, मग आपापल्या बाकड्यावर जाऊन आम्ही झोपायचो.

त्याच फ्लॅटफॉर्मवर माझ्या बऱ्याच कवितांचा जन्म झालाय. आणि माझासुद्धा…

ताशेवाला बच्चन या बच्चन बरोबर गप्पा मारत असताना तो एकदा म्हणाला होता की, “काळ्या एक दिवस मी असा ताशा वाजवीन की या दफणभूमीतले मुडदे पण बाहेर येऊन नाचतील. ” त्याच्या या एका वाक्याने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला. साला साधा ताशा वाजवणारा माणूस पण हा सुद्धा एक ध्येय ठेऊन आहे आणि त्याच्या कलेशी किती इमान राखून आहे. कधी कधी मंगलपण लावण्या ऐकवायची. सोलापूरच्या तमाशात कामाला होती असे सांगायची. नंतर नवरा वारल्यावर तमाशा बंद झाल्यानंतर एका मुलाला भावाकडे ठेऊन ती या धंद्यात आणि पुण्यात आली होती. आम्हां तिघा कलाकारांची भेट रोज रात्री इथेच व्हायची. त्याचा ताशा तिची लावणी आणि माझी कविता असायची. त्यावेळी मी कधीच सभागृहात किंवा स्टेजवर कविता म्हणली नव्हती. फक्त लिहायचो आणि बडबडत बसायचो. माझं पब्लिक ही फक्त दोन माणसं. त्यांनी दिलेली जी दाद असायची ती दाद जगातल्या कोणत्याच कवीच्या वाट्याला आली नाही हे मी फार अभिमानाने सांगीन.

रात्री साडेअकरा वाजता मी हजेरी लावायचो ती उपाशी पोट घेऊनच. कारण कोणतंही नातं नसणारी पण हक्काची ही दोन माणसं मला उपाशी झोपू देत नव्हती. आणि मी जे म्हणेल ते ते मला खायला देत गेली. रूमची सोय झालेली असतानासुद्धा मी यांच्यासाठी फ्लॅटफॉर्म सोडायला तयार नव्हतो.

एकदा वर्तमान पेपरला सरस्वती विद्या मंदिर येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धा असल्याची जाहीरात वाचली. बक्षीस तीन हजार रुपये होतं. मी बच्चनला आणि मंगलला ती वाचून दाखवली. माझी जायची कोणतीच इच्छा नव्हती पण बच्चन बोलला “तू जा इथं. ” मंगलनेही तेच वाक्य पुन्हा गिरवले. मला हुरूप चढला. पण घाबरलो होतो म्हणलं, “मला जमणार नाही बोलायला. आपला काय नंबर येणार नाही. आणि मी काय स्टेजवर जाणार नाही. ” त्यावर बच्चन म्हणाला, “देख जितने केलिय मत खेल. तू सिर्फ इधर जैसे बोलता है वैसेच उधर बोल. ” त्यावर मंगल म्हणाली “आणि अजून पंधरा दिवस वेळ आहे. प्रॅक्टिस कर. ” ती तमाशात काम केलेली असल्यामुळे प्रॅक्टिस वैगेरे तिला माहीत होतं.

मी तयार झालो. माझे लाडके मराठीचे प्राध्यापक रोकडे सर यांच्याकडून शिफारस पत्र घेतलं आणि नाव नोंदणी झाली. मग प्रॅक्टिस सुरू झाली. अनेक कवितांमधून माझी भारत माझा देश आहे ही कविता बच्चनला आवडायची त्याने तिच म्हणायला सांगितली. झालं तयारी झाली आणि स्पर्धेच्या आदल्या रात्री दोघांनीही शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं उद्या भेटू काळू. आणि दोघेही अंधारात गेले. एकाच वयाचे होते दोघेही. तिला गिऱ्हाईक मिळालं नाही किंवा मिळालं तरीसुद्धा ते शारीरिक एकत्र येत होते. दोघांमध्ये प्रेम होतं का नव्हतं ते त्यांनाच माहीत. पण दोघेही कुणाला यायला उशीर झाला तर एकमेकांबद्दल काळजी करायचे. मी त्यांना चिडवायचो सुद्धा. अर्थात भाषा कमरेखालची असायची. जी मी इथेच शिकली होती.

स्पर्धेचा तो दिवस आठवतोय. शंभरच्यावर स्पर्धक आले होते आणि मंगेश पाडगावकर प्रमुख पाहुणे होते त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होतं. माझा नंबर आला मी जीव लावून कविता सादर केली. डोळ्यासमोर फक्त फ्लॅटफार्म आहे असे मनावर गोंदवून आणि समोर फक्त बच्चन आणि मंगलच आहेत असा विचार करून मी माझी आयुष्यातली पहिली कविता सादर केली. स्पर्धक संपले होते. अर्धा तास ब्रेक होता. त्यानंतर बक्षिस वितरण होतं. मी थांबावं का निघावं असा विचार करत होतो. कामाला सुट्टी टाकली होती. म्हणलं जाऊन तरी काय करायचं बसू इथंच. निदान पाडगावकरांना तरी बघून होईल. अर्धा तास खूप जीवघेणा गेला. पुन्हा हॉल गच्च भरला.

 प्रमुख पाहुणे पाडगावकर आणि इतर स्टेजवर स्थानापन्न झाले. कार्यक्रम सुरू झाला एक दोन मनोगतं झाली. नंतर पाडगावकर बोलले. आणि त्यानंतर बक्षिस वितरण सुरू झालं. उत्तेजनार्थ दोन बक्षिसं जाहीर जाहीर झाली. हॉल टाळ्यांच्या गजराने घुमत होता.

– क्रमशः भाग पहिला

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सहानुभूति…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘सहानुभूति…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

मी एका घराजवळून जात असताना अचानक मला त्या घरातून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्या मुलाच्या रडण्याच्या आवाजात एवढी वेदना होती की आत जाऊन ते मूल का रडत आहे हे जाणून घेण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.

आत गेल्यावर एक आई तिच्या दहा वर्षाच्या मुलाला हळूवारपणे मारतांना दिसली आणि ती स्वतःही मुलासोबत रडत होती. मी पुढे होऊन विचारले की, “ताई, या लहान मुलाला तुम्ही का मारताय? आणि तुम्ही स्वतःही का रडत आहात. “

ती म्हणाली, “भाऊ, याचे वडील देवाघरी गेले आहेत आणि आमची परिस्थिती खूपच नाजूक आहे. याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी लोकांच्या घरी धुणं, भांडी, साफसफाई ची कामं करते आणि घराचा व याच्या शिक्षणाचा खर्च कसाबसा भागवते. आणि हा नालायक दररोज शाळेत उशीरा जातो आणि घरीही उशीरा येतो. कुठेही भटकत फिरतांना तो मुलांसोबत खेळण्यात गुंगून जातो आणि अभ्यासाकडे ही लक्ष देत नाही. त्यामुळे त्याचा शाळेचा गणवेश दररोज घाण होऊन जातो ज्यामुळे शाळेत शिक्षकही रागावतात. “

मी त्या मुलाला आणि त्याच्या आईला कसंतरी थोडेफार समजावून सांगितले आणि तेथून निघालो.

ही घटना होऊन थोडे दिवस उलटले होते आणि एके दिवशी सकाळी मी काही कामानिमित्त भाजी मंडईत गेलो होतो. तेव्हा अचानक माझी नजर त्याच दहा वर्षाच्या मुलावर पडली ज्याला घरात मार खाताना मी बघितले होते. मला दिसले की, तो मुलगा बाजारात फिरत होता आणि दुकानदार त्यांच्या दुकानासाठी भाजी विकत घेऊन पोत्यात भरतांना त्यातील थोडीफार भाजी खाली जमिनीवर पडलेली राहिली की, हा मुलगा लगेच ती उचलून आपल्या पिशवीत ठेवत होता.

हे बघून माझी उत्सुकता ताणली गेली व हे काय प्रकरण आहे असा विचार करत मी त्या मुलाच्या मागे गुपचूप जाऊ लागलो. त्याची पिशवी या खाली पडलेल्या व त्याने वेचलेल्या भाजीने भरल्यावर तो रस्त्याच्या कडेला बसला आणि जोरजोरात ओरडून ती भाजी विकायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर धुळ व चिखलाचे पुट जमा झाले होते, गणवेश धुळीने माखलेला होता आणि डोळे पाणावलेले होते. असा दुकानदार मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो.

त्याने बाजारात ज्या दुकानासमोर आपले छोटेसे दुकान मांडले होते, अचानक त्या दुकानातून एक माणूस उठला आणि त्याने लाथेने या मुलाचे दुकान लाथाडून टाकले आणि ओरडत शिव्या देत त्या मुलाला दूर ढकलून दिले.

मुलाच्या डोळ्यात अश्रू आले व मुकाट्याने पुन्हा त्याने तो विखूरलेला भाजीपाला गोळा करायला सुरुवात केली आणि काही वेळाने घाबरत त्याने आपली भाजी दुसऱ्या दुकानासमोर विकायला ठेवली. यावेळी ज्याच्या दुकानासमोर त्याने आपले छोटेसे दुकान मांडले होते तो चांगला माणूस असावा, कारण ती व्यक्ती त्या मुलाला काहीच बोलली नाही.

थोड्याशाच भाज्या होत्या आणि त्या इतर दुकानांपेक्षा कमी भावाने विकत होता म्हणून लवकरच त्याच्या जवळची भाजी विकली गेली. तो मुलगा उठला आणि त्या बाजारातील कपड्याच्या दुकानात गेला. माजी विकून आलेले पैसे त्या दुकानदाराला दिल्यानंतर दुकानात ठेवलेलं शाळेचं दफ्तर उचललं आणि काहीही न बोलता तो परत शाळेत गेला. मी पण त्याच्या मागे मागे जाऊ लागलो होतो.

मुलाने वाटेत रस्त्यावरील नळावर तोंड धुवून तो शाळेत गेला. मी पण त्याच्या मागे शाळेत गेलो. मुलगा शाळेत गेला तेव्हा त्याला एक तास उशीर झालेला होता. त्याच्या शिक्षकाने त्याला छडीने जोरदार फटके दिले. मी पटकन वर्गात जाऊन शिक्षकांना विनंती केली की या निरागस मुलाला मारू नका.

शिक्षक म्हणाले की तो रोज दीड तास उशिरा येतो, आणि भीतीपोटी त्याने शाळेत वेळेवर यावे म्हणून मी त्याला दररोज शिक्षा करतो. मी त्याच्या घरीही अनेकवेळा हे कळवले आहे.

मार खाल्ल्यावर तो मुलगा बिचारा वर्गात बसून अभ्यास करू लागला. मी त्याच्या शिक्षकाचा मोबाईल नंबर घेतला आणि घराकडे निघालो. घरी पोहोचल्यावर लक्षात आले की मी ज्या कामासाठी भाजी मंडईत गेलो होतो तेच नेमके मी विसरलो होतो. सायंकाळी तेथून परतताना मी बघितले की ते निरागस बालक घरी गेले आणि त्याच्या आईने त्याला पुन्हा मारहाण केली. रात्रभर माझं डोकं भणभणत होतं.

सकाळी उठल्यावर मी ताबडतोब मुलाच्या शिक्षकाला फोन करून विनंती केली की थोडा वेळ काढून त्यांनी मंडईला पोहोचावे. शिक्षकाने होकार दिला. सूर्य उगवला आणि मुलाची शाळेत जायची वेळ झाली. मुलगा आपले छोटे दुकान थाटण्यासाठी घरातून थेट बाजारात गेला.

मी तिच्या घरी गेलो आणि त्याच्या आईला म्हणालो, “ताई, माझ्यासोबत चला. तुमचा मुलगा शाळेत उशिरा का जातो हे मी तुम्हाला दाखवतो. “

“आज मी याला सोडणार नाही…. आता याला दाखवतेच… ” असं बडबडत ती लगेच माझ्यासोबत निघाली. मुलाचे शिक्षकही बाजारात आले होते. आम्ही तिघेही बाजारात तीन ठिकाणी जाऊन उभं राहिलो, आणि गुपचूप त्या मुलाकडे बघायला लागलो. आजही त्याला नेहमीप्रमाणे अनेक लोकांकडून फटकार आणि धक्काबुक्की सहन करावी लागली होती. आणि शेवटी तो मुलगा भाजी विकून कपड्याच्या दुकानात गेला.

अचानक माझी नजर त्याच्या आईवर पडली. तीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या. मी त्याच्या शिक्षकाकडे पाहिले. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावरून मला असे जाणवले की जणू त्यांच्या हातून त्या निरपराध बालकावर अन्याय झाला होता आणि आज त्यांना त्यांची चूक कळाली होती.

त्याची आई रडत रडतच घरी गेली आणि शिक्षकही पाणावलेल्या डोळ्यांनी शाळेत गेले. आजही मुलाने आलेले पैसे दुकानदाराला दिले आणि जाऊ लागला तेव्हा दुकानदाराने त्याला लेडीज सूट चे कापड दिले आणि म्हणाला, “बाळा, तू जमा केलेल्या सर्व पैशांचे हे कापड आहे. त्यांचे सर्व पैसे मिळाले. हे कापड आता तू घेऊन जा. “

मुलाने ते सूटचे कापड घेऊन शाळेच्या दप्तरात टाकले आणि शाळेत गेला. मी ही मागावर होतोच. शाळेत यायला आजही त्याला एक तास उशीर झालेला होता. तो थेट शिक्षकाकडे गेला, त्याचे दफ्तर बेंचवर ठेवले, आणि छडी ची शिक्षा स्वीकारण्यासाठी त्याने हात पुढे केला. शिक्षक आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी मुलाला कवेत घेतले आणि ते रडू लागले. त्यांना पाहून मलाही अश्रू अनावर झाले. मी स्वतःला सावरत पुढे झालो, शिक्षकांना शांत केले आणि मुलाला विचारले की पिशवीतील सूट चे कापड कोणासाठी आणले आहेस.

मुलाने रडून उत्तर दिले की, “माझी आई श्रीमंत लोकांच्या घरी मजूर म्हणून काम करते. तिच्याकडे चांगले कपडे नाहीत व जे आहेत ते फाटलेले आहेत, शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे नाहीत आणि माझ्या आईकडे पैसे नाहीत, म्हणून मी माझ्या आईसाठी हा सूट विकत घेतला आहे. “

“मग आज हे सूट चे कापड घरी नेऊन आईला देणार का?” मी मुलाला प्रश्न विचारला.

त्याच्या उत्तराने माझ्या आणि त्या मुलाच्या शिक्षकाच्या पायाखालची जमीन सरकली. मुलगा म्हणाला, “नाही काका, सुट्टी झाल्यानंतर मी शिंप्याला ते शिलाईसाठी देईन. ” शाळा सुटल्यावर दररोज काहीना काही काम करून त्याने शिंप्याकडे थोडे पैसे जमा केले होते. ते ऐकून आमचा कंठ दाटून आला.

आपल्या समाजातील कितीतरी गरीब आणि विधवा स्रियांच्या बाबतीत असे किती दिवस चालणार, त्यांची मुले सणाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी किती दिवस तळमळत राहणार, असा विचार करून मी आणि शिक्षक रडत होतो.

अशा गरीब विधवांना देवाने दिलेल्या आनंदात काही अधिकार नाही का? आपण आपल्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या इच्छेतील काही पैसे काढून आपल्या समाजातील गरीब आणि निराधारांना मदत करू शकत नाही का?

आपण सर्वांनी एकदा शांतपणे विचार करावा. आणि हो, जर तुमचे डोळे अश्रूंनी भरले असतील तर ते बाहेर पडू देण्यास अजिबात संकोच करू नका. शक्य असल्यास, ही प्रेरणादायी कथा त्या सर्व कर्तबगार लोकांना सांगा जेणेकरून आमच्या या छोट्याशा प्रयत्नाने कोणत्याही कर्तृत्ववान व्यक्तीच्या हृदयात गरीबांबद्दल सहानुभूतीची भावना जागृत होईल. आणि ही कथा कोणातरी गरीबाच्या घरात आनंदाचे कारण बनू दे.

मुळ हिंदी कथा लेखक- अज्ञात.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मॉ’र्ड’न मम्मा… श्री मंदार जोग  ☆  प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ मॉ’र्ड’न मम्मा… श्री मंदार जोग  ☆  प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

रविवारचा दिवस. गर्दीने लडबडलेला एक मॉल जणू काही फुकट वस्तू वाटप सुरू आहे अशी गर्दी. त्यात एक चौकोनी कुटुंब. नवरा जीन्स आणि टीशर्ट घालून खाली सँडल्स किंवा लिंकिंग रोड crocs वगैरे घालून टिपिकल कंटाळलेला चेहरा घेऊन फिरत. मुलं वारा प्यायलेल्या वासरासारखी उधळलेली. बहुतेक बाग, मैदान, चौपाटी अश्या गोष्टी फार बघितल्या नसाव्यात. अर्थात हल्ली सज्जन, पांढरपेशे लोक अश्या ठिकाणी सहकुटुंब जाऊ शकत नाहीत इतकी गलिच्छ गर्दी तिथे असते ही गोष्ट वेगळी! तर ह्यांच्या दोन मुलांमधे अंतर साधारण पाच ते सात वर्षे. म्हणजे पहिली मुलगी असल्याने किंवा लग्नानंतर लगेच “डिफॉल्ट सेटिंग” मध्ये झाली असल्याने पुढे कॉन्फिडन्स आणि अनुभव जमा झाल्यावर “planned” असा नशिबाने सेकंड attempt मध्ये(च) झालेला वंशाचा दिवा. टिपिकली अश्या वृत्तीचे बिनडोक लोक वंशाचा दिवा पेटे पर्यंत आपली मेणबत्ती इतकी घासतात की शेवटी तीन चार पणत्या पदरात पडून त्यांची मेणबत्ती संपून जाते! असो ह्यांची पणती… आपलं.. ह्यांची मुलगी साधारण आठ ते नऊ वर्षांची आणि दिवा साडेतीन ते चार वर्षांचा. पण गोष्ट ह्यापैकी कोणाचीच नाहीये. गोष्ट आहे अजून एकही शब्द न लिहिल्याने लेट एन्ट्री घेणाऱ्या नायिकेची. त्या मुलांच्या आईची. सॉरी मम्माची ! 

तर ही मुलांची मम्मा, नवऱ्याला जान म्हणून आपल्याला जानू म्हणवून घेणारी ही “मॉर्डन” (हो त्यांच्या बेश्टी ग्रुपच्या इंग्रजी डिक्शनरी मधे मॉडर्न ऐवजी मॉर्डन म्हणायची प्रथा आहे. ) नारी अतिशय प्रातिनिधिक आणि टिपिकल आहे. मग ती कितीही कसोशीने आपले वेगळेपण जपायचा प्रयत्न करत असली तरीही! तिचं असं झालं की चाळीस पन्नास वर्षांपूर्वी मुंबईतून स्थलांतरित होऊन बोरिवली आणि मुलुंड ह्या मुंबईच्या सीमेपल्याड (आमच्या दृष्टीने शिवाजी पार्कचा सिग्नल ओलांडला की मुंबई संपते हा भाग वेगळा. असो!) एखाद्या वसई, नालासोपारा, डोंबिवली, ठाणे, कल्याण, बदलापूर, विरार, भिवपुरी किंवा पनवेल वगैरे सारख्या ठिकाणी बिऱ्हाड थाटलं. त्यांनीही दिव्याच्या प्रयत्नांत आपली मेणबत्ती वितळवत जन्माला घातलेल्या तीन पणत्या पैकी ही एक. नंतर अखेर वंशाला दिवा मिळाल्यावर वडील बोअरवेल ला पाणी लागल्यासारखे थांबले! असो! तर तिच्या सरळमार्गी वडिलांनी आयुष्यभर कॉलर घामाने भिजू नये म्हणून त्यावर रुमाल ठेऊन लोकलला लटकत सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करून यथाशक्ती संसार रेटलेला असतो. फारसा बुध्यांक नसलेली चारही मुलं जेमतेम ग्रॅज्युएट होतात. हिने टिपिकली फर्स्ट attempt सेकंड क्लास बीए वगैरे केलेल असत. एक बहीण लग्न करून पुण्याला, दुसरीने गावातच रिक्षावाल्याशी लफड केल्याने तिला तिच्या मावशीच्या ओळखीने आणलेल्या स्थळी एकदम लखनौ किंवा पंजाब मध्ये पाठवलेली असू शकते. हिच्या भावाने म्हणजे वंशाच्या दिव्याने बहुतेक वेळेला दहावी नंतर विविध पर्याय जोखाळून शेवटी “हार्डवेअर डिप्लोमा” नामक अत्यंत जटिल कोर्स रेल्वे स्टेशन समोरच्या इमारतीत असलेल्या अनेक इन्स्टिट्युट पैकी एकात केलेला असतो आणि लग्नानंतर हिच्या घरातील पहिला “असेंम्बल्ड कॉम्प्युटर” त्यानेच बनवलेला असतो! आज साधारण बत्तीशीचा तो “मामा, मामी कधी आणणार” हा प्रश्न ऐकून कसनुस तोंड करून भाचरांच्या तोंडात डेअरी मिल्क कोंबून आपल्या तोंडातील गुटख्याची चुळ थुंकावी लागणार नाही ह्याची काळजी घेत असतो!

हिने मात्र नशीब काढलेल असत. हिचा नवरा मुळात हुशार, अनेकदा एकुलता एक, मुंबईत पार्ले पूर्व किंवा हिंदू कॉलनी किंवा गिरगाव अश्या ठिकाणी येथे वडिलोपार्जित घर असलेला, प्रेमळ आईवडील असलेला, उच्चशिक्षित, आयटी, bfsi किंवा एखाद्या सर्व्हिस सेक्टरशी संबंधित नोकरीत असलेला, नियमित परदेश वाऱ्या करणारा अथवा उत्तम चालणाऱ्या फॅमिली बिझनेसच्या तयार सिंहासनावर आरूढ झालेला सुस्वभावी आणि निर्व्यसनी अथवा लपून हळूच व्यसन करणारा “गुड बॉय” असतो. लपून हळूच व्यसन म्हणजे मित्रांबरोबर सिगारेट ओढली की घरून खिशातून आणलेली कोथिंबीर हातावर घासायची म्हणजे वास राहात नाही. मित्रांबरोबर एखादी बिअर घेतली तर बॅगेत कॅरी करत असलेल्या मिनी टूथपेस्टने हॉटेलच्या सिंक मध्ये दात घासायचे असे चाळे करणारा महाभाग!

तर त्यांचं लग्न होत. मुळात अग्रेसिव्ह असलेल्या हिला काही महिन्यात आपल्याला काय लॉटरी लागली आहे हे सहज लक्षात येत. मग हिच्या बापाच्या “quest for वंशाचा दिवा” ने जेरीस येऊन चार मुलांना वाढवणारी हिची ढालगज आई रोज दोन तास होणाऱ्या फोन कॉल्स दरम्यान “संसारावरची पकड” ह्या तिच्या आईने तिच्या आईकडून घेऊन हिच्या सुपूर्त केलेल्या अनुभवाच्या पुस्तकातील एकेक धडा तिला वाचून दाखवते आणि मुलगी तो व्यवस्थित इम्प्लिमेंट करते! नव्या नवलाईत नवऱ्याला मुठीत ठेवायला जे काही लागत ते ती त्याला बरोब्बर देत असते आणि नवरा त्या क्षणभराच्या आनंदासाठी नकळत आयुष्यभराच्या गुलामीकडे ओढला जात असतो! मग काही महिन्यांनी एक क्षण किंवा प्रसंग असा येतो की मुलगा आपली शिफ्ट झालेली लॉयल्टी (पक्षी गुलामी) दाखवून देतो आणि मुलाच्या आईवडिलांना आपला मुलगा आपला राहिला नाही हे लक्षात येत! 

मग ह्यांची पहिली मुलगी दीडेक वर्षांची झाल्यावर प्ले स्कूल मध्ये जाऊ लागते. तिथे भेटणाऱ्या अनेक “समविचारी” आणि “समबुध्यांक” आणि समपार्श्वभूमी मम्माज बरोबर हिची ओळख होते आणि मग अचानक जिम, महागडे पार्लर, झुंबा, किटी पार्टी, सोशल मीडियावर गॉगल लावलेले फन विथ बेष्टीज छाप फोटो असा हीचा प्रवास सुरू होतो. सुरवंटाचे फुलपाखरू होते ! म्हणजे फुलपाखरू कसं हातात धरलं की त्याचे रंग हाताला लागतात तसंच हिचंही असतं ! हुशार माणसाला हिच्याशी दोन मिनिटे संवाद झाल्यावर वरचे रंग उडून आत असलेला मठ्ठ सुरवंट लगेच लक्षात येतो! मग सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पहिली मुलगी असल्याने किंवा लग्नानंतर लगेच “डिफॉल्ट सेटिंग” मध्ये झाली असल्याने पुढे कॉन्फिडन्स आणि अनुभव जमा झाल्यावर “planned” असा वंशाचा दिवा first attempt मध्ये होतो! आणि आयुष्य कृतार्थ होत!

मुलं हळूहळू मोठी होत असतात. नवरा आपल्या पदरी पडलं पवित्र झालं ह्या नात्याने कॅरी ऑन करत म्हातारा होत असतो आणि ही मात्र दर वर्षी अधिकाधिक तरुण आणि “मॉर्डन” दिसायच्या प्रयत्नात विनोदी दिसत असते. त्यात तो शोभत नसलेला खोटा श्रीमंती ऍटीट्युड आणि इंग्रजी बोलणे हिचं कचकड्याची बाहुली असणं ओरडून ओरडून जगाला सांगत असतात!

तर रविवारची संध्याकाळ. मॉल मध्ये गर्दी. नवरा आणि मुलगी शांत उभे. ही थुलथुलीत पोट दाखवणारा घट्ट स्लिव्हलेस टॉप, खाली मांड्यात रुतणारी स्ट्रेच जीन्स, त्याखाली हाय हिल सँडल्स, धारावी मेड प्राडा बॅग, लालसर डाय मधून अगोचर पणे दिसणाऱ्या काही पांढऱ्या केसांना झाकत डोक्यावर सरकवलेला महाकाय गॉगल, मेकअप चे थर लिंपलेला चेहरा अश्या गेटप मध्ये! नवरा कॉलेज गँगच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये गप्पा मारत. मुलगी बापाचा हात धरून आजूबाजूला बघत. ही आणि वंशाचा दिवा किड्स सेक्शन मध्ये. ही मुलाला एक टीशर्ट घालते. मग त्याला घेऊन नवऱ्याजवळ येते. नवऱ्याला म्हणते “Jaan see no is this t-shat happening to anshil?” नवऱ्याला मेल्याहून मेल्यासारखं होत. आजूबाजूला असलेल्या हुशार लोकांना अजून एक कचकड्याची बाहुली बघायचा आणि तिचं इंग्रजी ऐकल्याचा अनुभव येतो ! चांगल्या शाळेत शिकणारी तिची लहान मुलगी डोक्याला हात लावते. ते बघून बहुतेक आपल्या घरातील कचकड्याच्या बाहुल्यांची परंपरा संपून “संसारावर पकड” ह्या ग्रंथाचे विसर्जन करायची वेळ भविष्यात येणार असते हे जाणवून नवरा थोडा सुखावतो आणि परत मोबाईल मध्ये डोकं खुपसतो! आणि आपली नायिका, मॉर्डन मम्मा एक सेल्फी काढून तिच्या किट्टीपार्टी बेस्टीच्या ग्रुपमध्ये सेल्फी पोस्ट करते “एन्जॉइंग फन विथ फॅमिली इन अमुक तमुक मॉल”!- 

लेखक : श्री मंदार जोग

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन आणि दोन बावीस… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ दोन आणि दोन बावीस… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

(अचानक मला जाणीव झाली की हे घर कोणा दुसऱ्याचं आहे, अशा अवस्थेत पाहून मला कोणीतरी ठार वेडी समजतील. माझ्या  वजनदार कपड्यांना पाहून कोणीतरी मला चोर किंवा डाकू  समजलं तर नवल नाही. मी  जरा भानावर आले.) – इथून पुढे —- 

जरा बुद्धीने  काम केले पाहिजे.  नेमकं काय करू, कागदावर फोन नंबर लिहून इथे तो ठेवून जाते.  पण माझ्याजवळ ना कागद होता ना पेन.  अशा बेचैनीच्या अवस्थेत पाय लटपटत होते.  काही हरकत नाही, घरी परत जाऊन कागद आणि पेन घेऊन यायचा  होता.  कित्येक वेळा बर्फात  पडता- पडता, वाचता – वाचता  कशीबशी मी घरी परत आले.   कागद पेन आणला त्यावर मेसेज लिहिला, कुरिअर कंपनीची चूक सांगितली  आणि माझा फोन नंबर दिला.  त्यांच्या दरवाजाच्या  कडीवर तो कागद फोल्ड करून ठेवून दिला आणि आपल्या घरी परत आले. 

घरी आल्यानंतर  दर दहा मिनिटांनी फोन चेक करत राहिले,  दरवाजा टक जरी वाजला तरी कान टवकारून ऐकत राहिले. संपूर्ण दिवस हयाच गोंधळात  गेला. माझ्या त्या चिट्ठीचं उत्तर संध्याकाळपर्यंत देखील मिळालं नाही.  ना माझा फोन वाजला ना कोणी दरवाजा वाजवला.  डोळे आणि कान  पुरते व्याकुळ झाले होते. माहित नाही काय झालं  होतं. साधारणतः  पाच वाजेपर्यंत  प्रत्येकजण कामावरून घरी येतो.  त्या घरातील लोकं पण आली असतील. कदाचित जेवण जेवत असतील,  जेवण जेवू  देत त्यानंतर जाते. 

वेळेच मोजमाप करता त्यांच्या जेवणाचा  व मेल चेक करण्यापर्यंतचा  वेळ जोडल्यानंतर  २ एवेन्यू रोडवरची माझी तिसरी चक्कर मारण्यासाठी मी ‌साडेसात  वाजता घरातून  निघाले.  ह्या वेळेस खूप आशेने बेल वाजवली परंतु आता पण काही उत्तर आलं नाही!  निराश होऊन परत निघणारच होते तेवढ्यात वरच्या खिडकीत ‌लाईट दिसून आली.  ह्याचा अर्थ घरात कोणीतरी आहे. आशेच्या ह्या किरणांनी माझ्या चेहऱ्यावर  एक वेगळीच चमक पसरली.. आता मला माझी पुस्तके मिळूनच जाणार. 

पुन्हा बेल वाजवली. काहीच उत्तर नाही.  इकडून तिकडून  फिरून यायचे.. बेल वाजवायचे आणि जोरात दरवाजा  ठोठवायचे.  साहजिकच आता माझा धीर सुटत चालला होता.  सभ्यपणाचा बुरखा फेकून माझ्या ज्या हरकती चालल्या होत्या त्या आजूबाजूचे दोन शेजारी खिडकीतून पहात होते. 

मोठालं  जॅकेट आणि कानटोपीमधून कोणीच ओळखू शकत नव्हते की ह्या पेहरावात स्त्री आहे की पुरुष,  एक चोर आहे की एक कादंबरीकार (लेखक)! आता मी उड्या मारून मारून वरती  घरात  कोणी  माणूस  किंवा माणसाची  सावली तरी दिसते  का ते पहाण्याचा प्रयत्न करत होते.  तीन मिनिटे पण झाली नसतील… पी.. पी… पी.. असा सायरन वाजत पोलिसांची गाडी येऊन थांबली. तेच झालं  ज्याची शंका होती.  त्या  घरातील  लोकांनी मला चोर-डाकू समजून पोलिसांना फोन केला होता. ह्या आकस्मिक घडणाऱ्या बदलामुळे मी अजिबात घाबरले नाही, उलट ह्या गोष्टीचा आनंद झाला की आता तरी हे लोक दरवाजा उघडतील आणि मला माझे पॅकेज देतील.  हा माझा हक्क होता.  त्या पॅकेजमध्ये जी पुस्तके  आहेत , त्यांची मी मालकीण आहे, तोच आत्मविश्वास माझ्या चेहऱ्यावर झळकत होता. 

पोलिस आॅफीसर माझ्या जवळ आला….” “काय प्रॉब्लेम आहे मॅडम,  मी असं ऐकलं आहे की, तुम्ही इथे वारंवार आला आहात. मला सांगाल कशासाठी?”

मी एकदम आरामात…”हॅलो सर ”  म्हणून त्यांना घटित घटना सांगू लागले….” सर, मी ह्याच गल्लीत २२ नंबरच्या घरात राहते.  माझं एक पॅकेज चुकून यांच्या घरी डिलीवर केलं गेलं आहे.  मला फक्त माझं पॅकेज घ्यायच आहे. हे लोक घरात आहेत तरीही दरवाजा उघडत नाहीत.  जर यांच्या घरी माझं  पॅकेज आलं नसेल तर तसं त्यांनी मला सांगावं. मी लगेच निघून जाईन. “

मी एका दमात माझी दयनीय अवस्था पोलिसांना सांगितली. पोलिस हसायला लागला.  त्याचं  हास्य खूप बालिश होतं..  जसं की बाॅम्ब फुटण्याची बातमी मिळावी ‌आणि  माहित पडावं की  छोट्या मोठ्या फटाकड्या पेटवून लोक आपला सण साजरा करत आहेत.

त्याचवेळी आतून एक सभ्य गृहस्थ आले. मी त्याला अशी टवकारून  बघू लागले जणू कोणत्या तरी भित्र्या माणसाला चांगलाच धडा शिकवण्याचा प्रयत्न  मी  केला आहे.  एवढा धडधाकट माणूस आतमध्ये होता आणि माझ्याशी बोलायची हिम्मत नाही केली ! घाबरट कुठचा ! विनाकारण पोलिसांना बोलावलं. ह्याच्यापेक्षा तर मी चांगली आहे जी  धाडसाने इथे उभी आहे. अचानक माझ्या पायामध्ये स्थिरतेचा आभास होत होता आणि अनायास चेहऱ्यावरचा रुबाब वाढला होता. 

पोलिसांनी त्याला विचारलं…” मॅडमचं एखादे पॅकेज तुमच्या घरी आले आहे का जरा बघाल.? “

तो लगेचच आत गेला आणि पाच -सात मिनिटांनी एक पॅकेज घेऊन आला आणि पोलिसांना दिलं. पोलिसाने पॅकेजला मागून -पुढून, खाली – वर पाहून मला विचारलं…” काय ह्या तुम्ही आहात”  त्यावर माझ नाव लिहिलं होतं. मी म्हटलं….” हो सर, ही माझी पुस्तके आहेत. हे बघा माझं ड्राईव्हिंग लायन्सेस.”

पोलिसाने ड्राईव्हिंग लायन्सेस आणि पॅकेजवरील नाव चेक केलं आणि माझ्या हाती सोपवलं. 

“खुप खुप धन्यवाद सर”  असं म्हणत मी त्या पॅकेजला छातीशी कवटाळलं व पोलिसांचे असे काही आभार मानले जसंकाही  कुठल्या तरी आईचं हरवलेलं  मूल मिळवण्यासाठी  त्यांनी मदत करावी.  हे असे अचानक पोलिसांच्या येण्याने आजूबाजूच्या घरातील खिडक्यामध्ये हालचाली दिसू लागल्या होत्या. 

पोलिस आपली गाडी स्टार्ट करून निघून गेले.  मी पण माझी पावलं तेजगतीने चालवत तिथून निघाले.  घरात येऊन मी पुस्तके उघडली, त्यांना आलटून पालटून पाहिलं आणि कपाटात रीतसर ठेवून दिली.  एक संपूर्ण दिवस एका वेगळ्याच त्रासात निघून गेला होता. तणाव, बेचैनी – घालमेल आणि  अविश्वासात. 

ह्या घटनेला पूर्ण एक वर्ष झालं. कपाटात ठेवलेल्या त्या दोन्ही पुस्तकांना उघडून पाहण्याची  पण वेळ आली नाही. पण ज्या दिवशी ह्या पुस्तकांना प्राप्त करण्यासाठी एवढी प्रयत्नांची शिकस्त केली होती की त्याची आठवण आजही तेवढीच डोळ्यासमोर जिवंत  होती. आज पुन्हा त्या दोन्ही पुस्तकांवर सहजच नजर पडली तेव्हा चेहऱ्यावर आपोआप हास्य झळकलं….तेच  परिचित  हास्य जे त्या दिवशी पोलिसाच्या व माझ्या चेहऱ्यावर आणि आठवणीत कैद होतं. 

दोन आणि दोन बावीसच्या मध्ये  माझ्या घरापासून ते त्या घरापर्यंत  चक्कर मारणं म्हणजे कोणा मोठ्या यात्रेपेक्षा कमी नव्हतं. बावीसच दोन मध्ये रूपांतरित होणं किती सोप्पं होतं..  परंतु दोनाचे  बावीस होणं किती कठीण !  साधं – सोप्प गणित,  आयुष्यभराचं ज्ञान किंवा एक नवीन कोडं. 

पुस्तकांना  स्पर्श  करताना  निरंतर  मोजमाप करत ; भाषा आणि अंकामध्ये  समाविष्ट  असलेल्या जीवनातील  एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर, जे मृगजळाप्रमाणे  आयुष्यभर  पळवत राहतं आणि प्रथमा पासून अंतापर्यंताच्या  मध्यावर  झुलवत  ठेवतं. 

– समाप्त – 

मूळ हिंदी कथा : दो और दो बाईस

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

अणुशक्ती नगर मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन आणि दोन बावीस… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ दोन आणि दोन बावीस… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

शेजारी आलेल्या पोलिसांच्या गाडीने मला पुरतं सावध केलं. दोन पोलिस बाहेर आले, इकडे -तिकडे त्यांनी पाहिलं आणि निघून गेले. ते निघून जाताच सहजच ते क्षण डोळ्यासमोर तरळले जेव्हा माझा पोलिसांशी प्रत्यक्ष सामना झाला होता. दोन आणि दोन बावीस ह्या अंकानी पुर्ण एक दिवस माझ्या आयुष्यातील भुतकाळात कायमचा लिहून ठेवला होता. त्या दिवशी माझ्या दोन पुस्तकांचं एक पॅकेज भारतातून टोरंटोला येणार होतं. मी सकाळपासून आॅनलाईन ट्रैक करत होते. आता इथे पोचलं, मग तिथे पोचलं. आॅनलाईनचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान पण कमी नाही. कुरिअर तिथेच आहे की पुढे निघाले आहे हे पाहण्यासाठी, दर अर्ध्या तासांनी मी चेक करायची. आणि शेवटी वेब सर्च केल्यानंतर माहित पडलं की ते पॅकेज घरामध्ये डिलीवर झालं आहे. कोणत्या घरात ! मी तर इथे आहे, इथे तर ‌कोणीच आलं नाही ! 

सुशीमचा टोमणा मला जिव्हारी लागला…. ” तुझं आणि कुठे दुसरं घर आहे काय?”

मी आधीच डोळ्यात तेल घालून वाट पहात असताना या टोमण्याने माझं अंतर्मन खूपच दुखावलं गेलं. मी अशा काही नजरेने सुशीमकडे बघितलं की त्याने गप्प बसण्यातच आपलं भलं आहे हे तो समजून गेला. पुन्हा पुन्हा ट्रैकींग नंबर चेक केला. कदाचित मी चुकीचा नंबर दिला असेल आणि नवीन सुधारणा केल्यानंतर रिझल्टचा हा मार्ग नक्की बदलेल. मी सतत क्लिक करत राहिले. ट्रैकींगचा रिझल्ट तोच येत होता. कोणताच बदल नाही. हिरव्या रंगाचा टिकमार्क ओरडून ओरडून ‌सांगत होता की पॅकेज तुमच्या घरी पोहचले आहे.

“नसत्या उपद्रवाला मी स्वतः हून आमंत्रण देते” हा आरोप घरातल्यांनी कित्येक वेळा माझ्यावर. लावलेला आहे, परंतु माझा काही दोष नसताना येणाऱ्या संकटाकडे मी कधी लक्ष दिलं नाही. आज पण हेच झालं. म्हणूनच ह्या समस्येतून निघणे माझीच जबाबदारी होती.

बाहेरचा व्हरांडा तर बर्फाने भरून गेला होता. असं वाटत होतं की कुणीतरी पोती भरभरून बर्फ आमच्या घरासमोर ओतला आहे. ह्या बर्फाच्या ढिगाऱ्यावर जरी पुस्तकांचे पॅकेज ठेवले असते तरी वरच्यावर दिसून आले असते. परंतु सहा नंबरचा चष्मा असूनही डोळ्यावर विश्वास न ठेवता मी त्याचं शोधकार्य चालू ठेवलं. दरवाजातून बाहेर जाईपर्यंतच कित्येक अडचणी आल्या. खोऱ्याने बर्फ काढून काढून आधी रस्ता बनवला. दरवाजा मोर साचलेल्या बर्फात उकरून -उकरून पाहिलं की कुठे ताज्या, बर्फाच्या थरांमध्ये पॅकेज दबून तर गेलं नसेल.

परंतु पॅकेज कुठे नव्हतंच, तर ते मिळणार कसं ! बर्फाचे इवलेसे कण इकडून तिकडे पडत असताना माझ्या हातावर पडून जणू हसत होते. असं ग्लोव्हज न घालता बर्फात हात घालण्याची कधी मी हिम्मतही करू शकत नव्हते. पण आता पॅकेज शोधण्याचं असं काही भूत माझ्या डोक्यात शिरलं होतं की माझे नाजूक हात बर्फाच्या ढिगाऱ्यात वारंवार जाताना जराही कचरत नव्हते. डोक्यातील उष्णता सरळ हातापर्यंत पोहचून थंडीलाही मात देत होती. का कोण जाणे राहून राहून मनात हीच शंका येत होती की कदाचित पॅकेज पाठवलंच नसेल.

तरीही तात्काळ ह्या शंकेचं खंडनही झालं कारण.. जर पॅकेज पाठवलंच नसतं तर आॅनलाईन ट्रैक कसं झालं असतं ! आता, जर ट्रैक होत आहे तर हयाचा अर्थ सरळ आहे की पॅकेज पाठवलं गेलं आहे आणि डिलीवर पण केलं गेलं आहे.

माझ्या रागाने आणि चिंतेने घरात भूक हरताळची वेळ आली होती. किचनमध्ये जाऊन खाना बनवण्याचे तर लांबच.. मी त्याबाबत विचार देखील करत नव्हते. आता एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे, कंपनीच्या १- ८०० नंबर वर फोन करून विचारावं.

गडबडीत फोन डायल केला. साधारणतः अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर माझा फोन उचलला. तो अर्धा तास माझा ब्लडप्रेशर न जाणे कुठुन कुठे घेऊन गेला होता. माझ्या रक्तवाहिन्या फुटण्याच्या मार्गावर होत्या. पायात एवढं बळ आलं होतं की पॅकेजच्या सर्व मार्गावर चालत, भटकत भटकत पुन्हा फोनच्या जवळ आले होते. काही वेळ रेकॉर्डेड मेसेज वाजत राहिला आणि पुन्हा म्युझिक.. नंतर कोणीतरी खूपच सुसभ्य आवाजात बोललं -‌” माझं नाव स्टीव आहे, मी आपली काय मदत करु शकतो?”

घाईगडबडीत मी त्याला भारतातून टोरंटोला पोहचणाऱ्या पॅकेजबद्दल सविस्तर सांगितले आणि अगदी शब्दांना जोर देऊन सांगितले की, ” सर, माझं पॅकेज माझ्यापर्यंत अजून पोहोचले नाही. मी घरातच होते. आपल्या आँनलाईन साईटवर ट्रैकिंगची पुर्ण माहिती नाही आहे. “

“असं होऊच शकत नाही मॅडम, तुमच्या पत्यावर, २ एवेन्यू रोडवर पॅकेज डिलीवर केलं गेलं आहे. “

“२ एवेन्यू रोड? परंतु सर, मी २२ एवेन्यू रोडवर राहते. ” 

“तुम्ही जो पत्ता दिला आम्ही तिथेच डिलीवर केलं आहे मॅडम. फोन करण्यासाठी आपले धन्यवाद. “

म्हणजे, हे चुकीच्या पत्त्यावर गेले आहे! २ एवेन्यू रोड इथेच आहे काॅर्नरवर. मी सुटकेचा निःश्वास टाकला. आता मात्र मला २ एवेन्यू रोडवर लगेचच जायला हवं आणि पॅकेज त्यांच्याकडून परत आणायला हवं. बाहेरच्या सर्दीपासून सुरक्षित राहण्यासाठी जॅकेट, ग्लोव्हज, टोपी, आणि गमबूट घालून मी निघाले. फार दूर नव्हते ते घर, परंतु बर्फाच्या घसरगुंडीवरून चालता चालता खूप वेळ लागला तिथे पोहचायला. गल्लीच्या काॅर्नरवर, २ एवेन्यू रोडवर पोहचल्यावर बघितलं.. घराच्या आजूबाजूला सगळीकडे शांतता होती. कशीबशी बर्फाचे ढिगारे पार करून मी दरवाजा जवळ पोहचले. घंटी वाजवली, दरवाजा थोपटला. चारी बाजूला पांढऱ्याशुभ्र बर्फा व्यतिरिक्त तिथे काहीच दिसल नाही. कोणताज आवाज नाही.. असं वाटत होतं की तिथे कोणीच रहात नाही, कोणी का नसेना मला फक्त पॅकेजशी मतलब आहे.

हे भगवंता, जर इथे कोणी रहातच नाही आहे तर पॅकेज घेतलं कोणी असेल! आता मात्र माझ्या पुस्तकांविरूद्ध कोणतं तरी हे षडयंत्र दिसून येत होतं… असा विचार करणे मुळात मुर्खपणाचे होते. परंतु अशा भयानक परिस्थितीत एखादा मनुष्य आणखीन काय विचार करू शकतो बरं ! डोकं अगदी वाऱ्याच्या वेगाने विचार करत होतं, आतल्या लोकांपर्यंत हा मेसेज कसा पोहचवायचा. कदाचित ह्या घरातील सगळी लोकं कामावर गेली असतील. पण जर असं असतं तर पॅकेज इथे दरवाजाजवळ असतं. आता मी माझ्या घरासारखा कोण्या दुसऱ्याच्या घराबाहेरचा बर्फ उकरून -उकरून पाहू लागले. अचानक मला जाणीव झाली की हे घर कोणा दुसऱ्याचं आहे, अशा अवस्थेत पाहून मला कोणीतरी ठार वेडी समजतील. माझ्या वजनदार कपड्यांना पाहून कोणीतरी मला चोर किंवा डाकू समजलं तर नवल नाही. मी जरा भानावर आले.

– क्रमशः भाग पहिला.

मूळ हिंदी कथा : दो और दो बाईस

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

अणुशक्ती नगर मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares