मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेमानं मन जिंकावं… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ प्रेमानं मन जिंकावं… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

(मुलगी आपल्या नातवालाच पसंत आहे म्हटल्यावर कमलताई काही बोलल्या नाहीत. रोहन आणि रश्मीचं लग्न थाटामाटात पार पडलं.) इथून पुढे —

रविवारी वीस ऑक्टोबरच्या दिवशीही सुहासिनी आणि कमलताई नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता चतु:शृंगी मंदिरात जाण्यासाठी निघाल्या. तिथून दशभुजा गणपतीचे दर्शन घेऊन घरी परत येईपर्यंत त्यांना साडेसात वाजले. पाहतो तर काय, प्रवेशद्वाराजवळच “राणीज किचन-सिल्वर ज्युबिली” असं भलं मोठं बॅनर लागलेलं होतं. कमलताईंचा फोटो असलेला “वुई लव्ह यू कमलाजी” बॅनर झळकत होता. लॉनवर मंडप बांधून तयार होता. रंगीबेरंगी दिवे झगमगत होते. स्टेजच्या समोर पन्नासेक निमंत्रित पाहुणे उत्सवमूर्तीची वाट पाहत बसलेले होते. चोहीकडे उत्साहाचं वातावरण होतं. आपल्या मुलानं, सुधीरनं हा कार्यक्रम आयोजित केला असावा असं त्यांना वाटलं. कमलताईंना हे सगळंच अनपेक्षित होतं पण ह्या सरप्राइजमुळे त्या मोहरून गेल्या.      

इतक्यात स्टेजवर सिल्क साडीत, कपाळावर टिकली, हातात चुडा आणि वेणी घातलेली रश्मी हातात माइक घेऊन प्रगट झाली आणि म्हणाली, “उपस्थित मान्यवरांना नमस्कार! पंचवीस वर्षापूर्वी आजच्या दिवशीच माझ्या आज्जेसासू कमलताईंनी ह्या ‘राणीज किचन’ची मुहूर्तमेढ रोवली. 

इवलेसे रोप लावियेले दारी। 

त्याचा वेलू गेला गगनावेरी । असा तो बहरत गेला. ‘राणीज किचन’च्या ऊर्जितावस्थेचे संपूर्ण श्रेय श्रीमती कमलताईंचेच आहे. अधिक वेळ न दवडता, आजच्या समारंभाच्या उत्सवमूर्ती श्रीमती कमलताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सुनेसोबत स्टेजवर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद.” 

टाळ्यांच्या कडकडाटात कमलताईं स्टेजवर आल्या. रश्मीनं त्यांना शाल आणि श्रीफळ दिलं. त्यांच्या हातात माईक दिला.  

कमलताई बोलायला उभे राहिल्या, “आज मला माझे पितृतुल्य सासरे बाळकृष्णपंत आणि माझे पती नरहरपंत ह्यांची प्रकर्षाने आठवण येतेय. माझे सासरे म्हणायचे की मुलांमुलींना सरस्वतीची उपासना करायला शिकवाल आणि सुनेला एखाद्या राणीसारखं, लक्ष्मीसारखं वागवाल तर तुमचं अख्खं कुटुंब आनंदात राहिल. 

माझ्या सासू-सासऱ्यांनी मला राणीसारखंच वागवलं. ‘कमल कुठलेही कार्यक्षेत्र उत्तमरीतीने सांभाळू शकेल’ हे त्यांचे शब्द माझ्या मनात वज्रलेपासारखे कोरले गेले आणि त्या दिवसापासून माझ्यातली नकारात्मकता संपून गेली. 

‘राणीज किचन’चं निमित्त झालं. नोकरदार मंडळीना स्वच्छ घरगुती जेवण पुरवता येईल आणि काही गरजू लोकांना रोजगार पुरवता येईल ह्या हेतूने मी ह्या व्यवसायात आले. बाहेरच्या ऑर्डरी येत राहिल्या. त्याच्या सोबतच नियमितपणे ऑफिसात दुपारचे डबे पाठवायचं सुरू झालं. पंचवीस डब्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज दोनशे डब्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. ठरावीक संख्येनंतर दर्जा बिघडेल की काय, ह्या भीतीने लोकांची मागणी असतानादेखील आम्ही तिथेच थांबलो आहोत. 

हे सगळं कर्तृत्व माझं आहे असं मी अजिबात मानत नाही. माझ्या सासऱ्यांनी दाखवलेली सकारात्मकता, माझ्या पतीची अनमोल साथ आणि माझी सून सुहासिनी हिचा ह्यात फार मोठा वाटा आहे. आजवर माझ्या सुनेनं सगळी नाती सांभाळत हे कुटुंब आनंदाने पुढं नेलं आहे. तिच्या रूपानेच आमच्या कुटुंबात लक्ष्मी नांदतेय. 

माझे सासरे म्हणायचे, ‘उत्तर भारतीय लोक कन्येला ‘बिटियारानी’ आणि सुनेला ‘बहूरानी’ म्हणतात. मुलीला आणि सुनेला ते राणीचा मान देतात आणि आमच्या इथं काय होतं? माहेरी ‘बिटीयारानी’ असलेली कन्या सासरी आली की ‘नौकरानी’ होऊन जाते. माझी सून ह्या घरची राणी आहे ह्याचा विसर पडायला नको म्हणून मी तिला राणी म्हणूनच बोलावते.  

खरं तर, आपली आई आपलं पालनपोषण करून आपल्याला मोठं करते. वयात येताच सासरच्या घरी पाठवणी करते. तिथंही सासूच्या रूपात आपल्याला आई भेटते. सासू आपली काळजी घेते. 

कालांतराने आपली सून येते आणि सुनेच्या सहवासात आपण अधिक वेळ व्यतीत करतो. आपल्या वृद्धापकाळात सूनच आईसारखी आपली काळजी घेते, सेवा करते. आईवडिलांचं घर सोडून दुसऱ्या घरची एक ‘बिटियारानी’ आपल्याकडे येते, आपला वंश पुढे नेते तर मग आपणही तिला सुरूवातीपासूनच राणीसारखं वागवायला नको का? 

अर्थात ज्या राण्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपलं स्वत:चं असं वेगळं राज्य स्थापन केलंय मी त्यांच्याविषयी बोलत नाहीये. मी तशी खूप भाग्यवान आहे. देवानं मला खूप छान सून दिली आहे. 

उद्यापासून ‘राणीज किचन’चे व्यवस्थापन आमच्या घरची राणी म्हणजेच माझी सून सुहासिनीकडे सोपवतेय. मी ‘राणीज किचन’ पाहत असताना ती घर सांभाळायची पण आता माझी नातसून दुसरीकडे नोकरी करते आहे. बघू या, भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ते. आमच्या पाठीशी तुम्हा सगळ्या तृप्त जीवांचे आशीर्वाद सदैव असू द्यावेत, एवढीच माझी प्रार्थना आहे. नमस्कार !”

कमलताई स्टेजवरच्या खुर्चीत स्थानापन्न होताच रश्मीने माईक घेतला. आज्जेसासूकडे पाहून हसत म्हणाली, “आज्जी ! मी नोकरी सोडून तुमच्या नातवासोबत इकडेच आलेय. जे काही करायचं ते आम्ही इथंच करू. मी तुमच्या सेवेला आणि माझ्या सासूबाईंच्या मदतीला असेन. कारेकरांच्या पुढच्या पिढीतल्या राणीचा मान माझाच आहे.”

त्यानंतर तिने विनम्रपणे आज्जेसासूंना नमस्कार केला. नातसुनेला तोंड भरून आशीर्वाद देताना कमलताई गहिवरल्या, त्यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. 

कमलताईंच्या जवळचे सगळेच नातेवाईक रौप्यमहोत्सवी सोहळ्याला जमले होते. हे सगळं कसं काय शक्य झालं ह्याचं गूढ त्यांना उकलेनासं झालं. तितक्यात कमलताईंच्या हातात पाकिट देत सुधीर म्हणाला, “आई, डिलीव्हरीसाठी ते लोक आले आहेत. हे ऑर्डरचे राहिलेले बाकीचे पैसे !”  

“सुधीर राजा, ऑर्डर कुणाची होती ते सांगितलं नाहीस!” पाकिट हातात घेत कमलताईंनी विचारलं. 

सुधीरनं हळूच त्यांच्या कानात सांगितलं, “आई, आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निमंत्रितांच्यासाठी दिलेली जेवणाची ही ऑर्डर आहे. आणि ही ऑर्डर कारेकरांच्या पुढच्या पिढीतल्या राणीसाहेब रश्मींची आहे. मी त्यात फक्त मदतनीसाचं काम केलं आहे.” 

कमलताई कातर आवाजात बोलल्या, “राणी, मानलं ग तुझ्या निवडीला. तुझी सून तर माझ्या सुनेपेक्षाही सरस निघाली आहे! मी तुझ्या सुनेचा विनाकारण दुस्वास केला पण तिनं मात्र ह्या आज्जेसासूचं मन प्रेमानेच जिंकून घेतलं हो..” 

कमलताईंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याचवेळी हॅट्स ऑफ टू कमलताई! हिप-हिप हुर्रे !! ह्या निनादात अख्खा मांडव दणाणून गेला होता.   

— समाप्त —

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेमानं मन जिंकावं… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ प्रेमानं मन जिंकावं… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

रात्रीचे दहा वाजत आले होते. कमलताईंची ही रोजची झोपायची वेळ. मिताहार, नियमित झोप, सकाळचं फिरणं, योगा आणि वाचन. अगदी कशी आखीव रेखीव दैनंदिनी, त्यात फरक नाही. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी केव्हाच ओलांडली आहे तरी त्या अजूनही दैनंदिन जीवनात कमालीच्या सक्रिय आहेत. 

येत्या वीस ऑक्टोबरला ‘राणीज किचन’ला पंचवीस पूर्ण होत आहेत, त्यामुळे आज त्यांची झोप काहीशी चाळवलेली होती. त्यांच्या डोळ्यांसमोर गतस्मृतींनी एकच गर्दी केली होती. 

कारेकरांच्या कुटुंबात सामील होऊन त्यांना साठेक वर्ष होत आली असावीत. लग्न झालं त्यावेळी कमल मॅट्रिक परीक्षा पास झालेली अठरा वर्षाची कन्या होती. सासरे बाळकृष्णपंत कारेकर, हिंदीचे प्राध्यापक आणि नावाजलेले साहित्यिक होते. त्यांचे पती नरहरपंत ह्यांचे इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच नरहरपंत एका शाळेत शिक्षकही होते.       

दरम्यान पहिलं अपत्य सुधीर आणि त्यानंतर कन्या मेधाचा जन्म झाला. नरहरी एमएची परीक्षा पास होऊन शहरातल्या एका नामांकित महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर ते सुटाबुटातले साहेब झाले. त्यांचं व्यक्तिमत्वच पार बदलून गेले. नरहरींना मॅट्रिक पास कमल खटकायला लागली. कमलनं पुढं शिकावं म्हणून त्यांनी रेटा लावला.

कमलला पुढं शिकायची इच्छा नव्हती. सुनेची ही घालमेल सासऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. 

एके दिवशी त्यांनी नरहरीला सुनावलं, ‘नरहरपंत, मला मान्य आहे की तुम्ही उच्चविद्याविभूषित झाला आहात. प्रतिष्ठित लोकांत तुमची उठबस असते. मॅट्रिक पास झालेली कमल तुम्हाला खटकत असावी. ती सामान्य गृहिणी असेल हे कबूल. परंतु ती एक आज्ञाधारक पत्नी, प्रेमळ आई आणि उत्तम सुगरण आहे. सगळ्यांची पोटं सांभाळताना, ती मोठ्यांची मनंही सांभाळते. ते सगळं सोडून तिनं फक्त तिच्या महत्वाकांक्षेकडे भर दिला तर तुम्हाला चालेल का, हे आधी ठरवा. तुमचं तिच्यावर प्रेम असेल तर तिला स्वेच्छेने आणि तिच्या सवडीने विकसित होऊ द्या. तुमच्या इच्छेखातर जबरदस्तीने तिच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका. 

तिनं मनात आणलं तर ती कुठलंही कार्यक्षेत्र गृहक्षेत्राइतकंच उत्तमरीत्या सांभाळू शकेल, हे मी खात्रीने सांगतो. समोरच्यांची मनं प्रेमानेच जिंकावी लागतात, त्यांचा दु:स्वास करून नव्हे. कमल जशी आहे तशी स्वीकारण्यातच तुमचं सुख दडलेलं आहे. तिला सुखी ठेवा आणि तुम्हीही सुखी व्हा.’ 

त्यानंतर नरहरीपंतांनी कमलवर कसल्याही बाबतीत सक्ती केली नाही. कमलमध्ये मात्र आमूलाग्र बदल घडत गेला.

नरहरपंत त्यांच्या रात्रीच्या वाचनासाठी महाविद्यालयाच्या लायब्ररीतून इंग्रजी कादंबऱ्या आणायचे. एकदा सहज म्हणून कमलनं पर्ल बकचं ‘द गुड अर्थ’ पुस्तक चाळलं. त्या कादंबरीनं तिच्या मनाचा ठावच घेतला. त्यानंतर अनेक ग्रंथ ती धडाधड वाचत गेली. 

एकदा कमलला लिओ टॉलस्टायची ‘ॲना करेनिना’ कादंबरी वाचताना नरहरीपंतांनी पाहिलं आणि ते इतके आनंदून गेले की तिचे हात हातात घेऊन त्यांनी तिला गर्र्कन फिरवली. त्यानंतर त्या उभयतांत पुस्तकांवरच्या चर्चा झडत गेल्या. नरहरपंत पुन्हा एकदा कमलच्या प्रेमात पडले. 

चिरंजीव सुधीर आणि कन्या मेधा ह्यांची अभ्यासात उत्तम प्रगती सुरू होती. कारेकर कुटुंबियांच्या मस्तकांवर साक्षात सरस्वतीचा वरदहस्त असावा. सायन्स विभागात सुवर्णपदक मिळवत द्विपदवीधर झालेल्या सुधीरला खूप ठिकाणाहून बोलावणी आली. परंतु त्याने स्वतंत्र क्लासेस सुरू करणेच पसंत केले. आपल्या ज्ञानाचा उपयोग एकाच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना न होता शहरातल्या सगळ्याच गरजू विद्यार्थ्यांना व्हावा हा एकमेव शुद्ध हेतू त्यामागे होता. पैसा कमवणे नाही. लवकरच कन्या मेधाचे लग्न झाले आणि त्यानंतर ती विदेशात स्थायिक झाली. 

कोणतं निमित्त होतं, ते आठवत नाही. परंतु एके दिवशी नरहरीपंतांनी त्यांच्या महाविद्यालयातील मोजक्या प्राध्यापक मंडळींना आणि प्राचार्यांना घरी जेवायला बोलावले होते. सगळ्यांनी स्वयंपाकाचं मनापासून कौतुक केले. 

पुढच्याच आठवड्यात प्राचार्यांच्या घरी कुठला तरी कार्यक्रम होता आणि त्यांना आदल्या आठवड्यात आस्वाद घेतलेल्या भोजनाचाच मेनू हवा होता. त्यांनी कमलताईंना गळ घातली. त्यांचा आग्रह मोडवला नाही. कमलताईंनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी पंचवीस लोकांचं जेवण पहिल्यांदा पुरवलं. ती कमलताईंची पहिली कमाई होती. आणि अगदी अनपेक्षितपणे ‘राणीज किचन’ची मुहुर्तमेढ रोवली गेली. तारीख होती वीस ऑक्टोबर! 

मग हळूहळू विविध कार्यक्रमाच्या ऑर्डरी येत राहिल्या. दुपारी ऑफिसात डबे पुरवायचं काम आलं. नरहरीपंतानी बंगल्याच्या मागच्याच बाजूला असलेल्या हॉलमध्ये अद्ययावत अशा किचनची व्यवस्था करून दिली. व्यवसायात नरहरीपंतांची साथ-सोबत होती. सगळंच कसं आलबेल चाललं होतं. कमलताईंचा संसारगाडा सुरळितपणे सुरू होता. 

अचानक एके दिवशी देवाजींनी नरहरीपंतांच्यासाठी खास पालखी पाठवली. कसलं दुखणं नाही, खुपणं नाही. नरहरपंत अचानक देवाघरी गेले. प्रिय पतीला, जिवलग मित्राला भगवंतानंच नेलं तर कमलताईंनी तक्रार तरी कुणाकडे करायची?

‘राणीज किचन’मुळे आयुष्याचं रहाटगाडगं चालू राहिलं. बघता बघता नरहरीपंतांना जाऊन पाच वर्ष झाली आणि पुढच्या आठवड्यात ‘राणीज किचन’ला पंचवीस वर्षे होतील. असा विचार करता करता निद्रादेवीनं कमलताईंच्या डोळ्यांवर अलगद शाल पांघरली.

दुसऱ्या दिवशी सकाळी कमलताई ब्रेकफास्ट घेत होत्या. तेवढ्यात सुधीरनं त्यांच्या हातात एक पाकिट देत सांगितलं, “आई, ह्या रविवारी संध्याकाळी पन्नास लोकांच्यासाठी ऑर्डर आहे. ते पाच हजार रूपये ॲडव्हान्स देऊन गेले. उरलेले पैसे ते त्या दिवशी संध्याकाळी देतो म्हणाले. फूड डिलिव्हरी ते स्वत: घेऊन जाणार आहेत.” 

कमलताईंनी कॅलेंडरकडे पाहिलं. कपाळावर बारीकशा आठ्या उमटवत त्या म्हणाल्या, “सुधीर बाळा, ऑर्डर घ्यायच्या आधी मला विचारायला हवं होतंस किंवा राणीला विचारायला हवं होतंस. बरं असू दे. आज तू पहिल्यांदाच ऑर्डर घेतलीस. ह्यापुढे कस्टमरला माझ्याकडे किंवा राणीकडे पाठवत जा.”  

‘होय आई’ म्हणून सुधीर तिथून सटकले. 

काही तरी आठवल्यासारखं करून कमलताईंनी सुनेला आवाज दिला, “अगं ए राणी, तुझ्या त्या बॉबकटवाल्या, बिन-टिकलीच्या सुनेचा फोन आला होता का ग? ती येणार आहे का इतक्यात?”  

सुहासिनी स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाल्या, “होय सासूबाई. काल रात्री तिचा फोन आला होता. तिनं तुम्हाला नमस्कार सांगितलाय. तुमचं काही काम होतं का तिच्याकडे? तिला फोन करायला सांगू का तुम्हाला?.” 

कमलताई फाडकन् म्हणाल्या, “ती तुझी सून आहे. माझं काय काम असणार आहे त्या बिन-टिकलीकडं? म्हणे फोन करायला सांगू का !”  

खरं तर, सुहासिनीनं पहिल्यांदा रश्मीचा बॉबकटवाला फोटो कमलताईंना दाखवला होता तेव्हाच त्यांनी नाक मुरडलं होतं. रश्मीला पाहायला जातानादेखील यायला त्यांनी साफ नकार दिला होता. ‘मी माझी सून लाखात एक आणलीय. बघू तू कशी निवडतेस तुझी सून. मी नाही येणार जा.’ असं म्हणून त्या फुरंगटून बसल्या होत्या. 

हसतमुख, उच्चशिक्षित एमबीए केलेली, संस्कारी कुटुंबातल्या चुणचुणीत रश्मीला प्रत्यक्ष पाहिल्यावर, तिच्याशी संवाद साधल्यावर सुहासिनीच तिच्या प्रेमात पडल्या होत्या. सगळ्यांनाच रश्मी खूप आवडली. मुलगी आपल्या नातवालाच पसंत आहे म्हटल्यावर कमलताई काही बोलल्या नाहीत. रोहन आणि रश्मीचं लग्न थाटामाटात पार पडलं.  

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणक्या… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पाणक्या… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पहिले – रोज सकाळी सहा वाजता विजयरावांना जाग यायची। आज पण त्यांना जाग आली तेव्हा किचन मधून आवाज ऐकू येत होता. बायको वसुधा गेल्यानंतर ते रोज स्वतःचा चहा स्वतः बनवत असत, मग आज कोण आलं? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. एवढ्यात काल रात्री श्याम आलेला आहे आणि तो हॉलमध्ये झोपलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. – आता इथून पुढे)

ती बाहेर आली तर त्यांना त्यांचं घर आज वेगळंच वाटलं, आपले अस्ताव्यस्त घर आज एवढे व्यवस्थित कसे, असा त्यांना प्रश्न पडला, कोचावरील कापड आज व्यवस्थित बसलेले होते, चप्पल बूट चपलाच्या स्टॅन्ड वर ठेवलेले होते. पेपरांची रद्दी बांधून ठेवलेली होती, हॉलमधील फोटोंचे जुने हार काढलेले होते, ते किचनमध्ये गेले, श्यामने सर्व भांडी धुवायला काढली होती, भांड्याचा स्टॅन्ड पुसून ठेवला होता.गॅसची शेगडी, बर्नर स्वच्छ पुसलेले दिसत होते, डायनिंग टेबल चकाचक दिसत होते, फ्रिज आतून बाहेरून स्वच्छ झाला होता, खिडकीवरची जळमटे नाहीशी झाली होती, बाथरूम टॉयलेट स्वच्छ दिसत होते, विजयरावांना वाटले आज किती दिवसांनी एखाद्या बाईचा हात फिरावा आणि घर स्वच्छ व्हावं तसे घर स्वच्छ दिसत आहे.

विजयरावांना पाहताच श्यामने त्यांच्यासमोर चहा आणि बिस्किटे ठेवली. ” श्याम अरे केवढे व्यवस्थित घर केलेस हे॰ मला असं व्यवस्थित घर ठेवायला जमायचे नाही, तू गेलास की पुन्हा माझा आजागळ संसार सुरु होईल “.

” दादासाहेब आम्ही मुंबईत आलो की तुम्ही आमच्याकडे यायचं, मला युनिव्हर्सिटी कडून मोठा फ्लॅट मिळेल. “

” बघू बघू, तुला जागा तर मिळू दे!”

” दादासाहेब तुमची भेट झाली आनंद वाटला. आता माझं नऊ च विमान आहे. मला आता जायला लागेल, तुमचा मोबाईल नंबर द्या, बहुतेक दोन महिन्यांनी आम्ही सर्व मुंबईत येऊ, मग तुम्ही आमच्याकडे यायचं. “

दादासाहेबांना नमस्कार करून श्याम निघाला. विजयरावांना तो जाताना वाईट वाटले, जेमतेम एक रात्र शामू राहिला, पण लळा लावून गेला, नाहीतर आपला मुलगा सुनील, रोज रात्री नऊ वाजता फोन करतो पण ते कर्तव्य म्हणून, त्यात ओलावा नसतो, आपल्या जर्मन सुनेने आपल्याला एकदाच पाहिले, तिला आपल्या बद्दल प्रेम कसं वाटणार? विजयरावांना आपल्या पुढच्या आयुष्याची पण काळजी वाटत होती, सुनील जर्मनीला बोलावतो पण त्याच्या लग्नाआधी आपण जर्मनीला गेलो होतो, पण पंधरा दिवसात परत आलो, जर्मनीमधील थंडी, जेवण मानवेना. आपल्याला भारताची सवय, आपले हात पाय फिरते आहेत तोपर्यंत ठीक, पण नंतर….., एखादा वृद्धाश्रमच शोधायला हवा.

दिल्लीत गेल्यावर सुद्धा श्यामचा रोज फोन येत होता. त्याची बायको मुलगी पण फोनवर बोलायची, आणि दोन महिन्यांनी एक दिवस त्याचा अचानक फोन आला  “आम्ही सर्वजण मुंबईत येतोय, कलिना भागात युनिव्हर्सिटीने मोठा फ्लॅट दिलाय. ” आणि चार दिवसांनी श्याम त्याची बायको आणि मुलगी मुंबईत आले सुद्धा. दोन दिवसांनी शाम भली मोठी गाडी घेऊन आला आणि विजयरावांना आपल्या घरी घेऊन गेला. त्या अत्यंत पॉश वसाहतीमध्ये युनिव्हर्सिटीने शामला सहा खोल्यांचा फ्लॅट दिला होता. दारात शोफर सह गाडी. बाहेर बगीचा, जवळच मोठे गार्डन, या एरियात आपण मुंबईत आहोत असे त्यांना वाटेना, श्यामच्या पत्नीने आणि मुलीने त्यांना वाकून नमस्कार केला. श्यामची पत्नी साधना विजयरावांना म्हणाली  ” दादासाहेब मी पण इंदोरचीच, संपूर्ण दाते कुटुंबाबद्दल इंदूर शहराला आदर आहे, दादासाहेब तुम्ही आता इथेच राहायचं, कृपा करून एकटे राहू नका. “

श्याम दादासाहेबांना म्हणाला ” काल मी सुनीलशी बोललो, तो पण म्हणाला बाबांनी एकटे राहण्यापेक्षा तुमच्या सोबत राहणे केव्हाही चांगले, त्यांना या वयात सोबत हवीच,’ विजयराव गप्प बसले, ते पण एकटे राहून कंटाळले होते, संध्याकाळी शामने विजयरावांचे आवश्यक तेवढे सामान त्या घरी आणले.

आता विजयराव मजेत राहू लागले, श्याम आणि साधना रोज युनिव्हर्सिटीत जात होते, पण जाताना किंवा आल्यानंतर त्यांची चौकशी करत होते, श्यामची मुलगी त्यांच्या नातीसारखीच गप्पा मारत होती, कॉलेजमधील गमती जमती सांगत होती, श्यामच्या फ्लॅटमध्ये स्वयंपाकी होता, इतर कामासाठी माणूस होता, त्यामुळे विजयरावांना काहीच करावे लागत नव्हते. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी शाम त्यांना नाटकांना किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जात असे, विजयरावांना शास्त्रीय संगीताची फार आवड, मुंबईत इच्छा असूनही त्यांना जाता येत नव्हते, आता त्यांना गाण्याच्या मैफिली ऐकण्यासाठी मुद्दाम गाडी ठेवलेली होती.

आपले बाबा आता एकटे नाहीत श्यामच्या कुटुंबात आहेत हे पाहून सुनीलचे फोन अनियमित येऊ लागले. विजयरावांना सुद्धा सुनीलची किंवा सुनीलच्या मुलीची पूर्वीसारखी आठवण येत नव्हती. उलट त्यांना श्यामची मुलगी मिहिरा जास्त जवळची वाटू लागली. आई बाबांना वेळ नसेल तेव्हा मिहिरा त्यांना गाण्याच्या मैफिलीला घेऊन जाऊ लागली.

एकंदरीत विजयराव दाते आता मुंबईत मजेत होते. इंदूर सुटल्यानंतर एवढे सुख त्यांना कधीच मिळाले नव्हते. रोज सकाळी फिरायला जाणे, बागेत मित्रांसमवेत गप्पा, मग घरी येऊन पेपर वाचन, आंघोळ मग नाश्ता त्यानंतर ते त्यांच्या आवडीच्या शास्त्रीय संगीतात रमत असत. कधी किशोरीताई ऐकत, कधी कुमार गंधर्व कधी शोभा गुर्टू. कधीकधी नव्या गायकांनासुद्धा ते ऐकत. दुपारी जेवणानंतर थोडी वामकुक्षी, कधी टी.व्ही.वर इंग्रजी सिनेमा पाहणे, सायंकाळी फिरून येणे, रात्री शाम -साधना आली की एकत्र बसून जेवण.

विजयरावांना ७५ वर्षे पुरी झाली, त्या दिवशी श्यामने एका नवीन गायकाला घरी बोलावून त्याचे गाणे विजयरावांना  ऐकवले. श्यामची मुलगी मेहरा पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. सारं कसं आनंदात छान चाललं होतं. असेच एकदा रात्र जेवताना साधनाचे लक्ष दादासाहेबांच्या पायाकडे गेले. पायाला सूज आली होती. तिने शामला दादासाहेबांचे पाय दाखवले. शनिवारी श्याम त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी सुजे वरच्या गोळ्या दिल्या. हळूहळू त्यांचे पोट मोठे दिसू लागले. श्यामला शंका आली त्याने दुसऱ्या दिवशी लीलावतीमध्ये नेऊन सर्व तपासण्या केल्या, डॉक्टरनी  “लिव्हर सोरायसिस’ चे निदान केले. पोटात पाणी जमा होऊ लागले होते, ते काढावे लागत होते. श्यामने सुनीलला सर्व कळवले, त्याने बाबांना जर्मनीला नेऊन सर्व उपचार करतो असे कळवले पण विजयराव जर्मनीला जायला तयार झाले नाहीत, पुण्याच्या खडीवाले वैद्यांचे पण उपचार सुरू होते, पण आजार कमी होईना. हळूहळू विजयरावांचे पोट मोठे आणि हातापायाच्या काड्या दिसू लागल्या, त्यांच्या तब्येतीचा वृत्तांत श्याम सुनीलला नियमित कळवत होता, पण सुनीलला भारतात येणे जमेना. कधी त्याच्या मुलीची परीक्षा जवळ येत होती तर कधी पत्नीची तब्येत बरी नसायची, हळूहळू विजयरावांना अन्न जाईना, शेवटी त्यांना लीलावती मध्ये ऍडमिट केले गेले. दर दोन दिवसांनी पोटातील पाणी काढले जात होते. पण विजयराव हॉस्पिटलमध्ये कंटाळू लागले. मग घरीच एका खोली त्यांची हॉस्पिटल सारखी व्यवस्था केली. घरीच ऑक्सिजन लावला, एक नर्स दिवस-रात्र घरी ठेवली. पण विजयरावांची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागली.

२२ जूनची रात्र, मुंबईत भरपूर पाऊस सुरू होता, विजयराव अन्न पाणी घेत नव्हते, पोटात असह्य वेदना सुरू होत्या, श्याम आणि साधना त्यांच्या आजूबाजूलाच होते. रात्री ११ च्या सुमारास विजयरावांना घरघर लागली, श्यामने फोन करून लीलावतीच्या डॉक्टरांना घरी बोलावले, डॉक्टर आले त्यांनी विजयरावांची तब्येत पाहिली, नर्सला ऑक्सिजन काढायला सांगितला, विजयराव तोंडाने  “पा पा ‘करू लागले म्हणून डॉक्टरनी श्याम कडे पाहिले, श्यामने चमच्याने त्यांच्या तोंडात पाण्याचे दोन थेंब टाकले, त्याच क्षणी विजयरावांनी प्राण सोडला.

श्याम ओक्साबोक्शी रडत होता, साधना रडत रडत त्याला सांभाळत होती. साधनाने फोन करून सुनीलला जर्मनीला ही बातमी कळवली. त्याला लगेच येणे शक्य नव्हते. ही बातमी कळताच श्यामचे आजूबाजूचे प्रोफेसर मित्र आणि युनिव्हर्सिटीतील लोक जमा झाले.

त्या रात्री श्यामने विजयरावांच्या प्रेताला अग्नी दिला.

घरी अनेक जण शामला साधनाला भेटायला येत होते. युनिव्हर्सिटीचे कुलगुरू श्यामला भेटायला आले, श्यामने त्यांना दादासाहेबांचा इंदूरचा वाडा,  त्या वाड्यात आपण”पाणक्या ” म्हणून आलो, पण दादासाहेबांनी आपल्याला शिक्षण घेऊ दिले एवढेच नव्हे तर शाळेत पालक म्हणून स्वतः उभे राहिले, ती कृतज्ञता आपल्या मनात सदैव राहिली, आपले आई-वडील आपल्याला फारसे माहित नाहीत पण दादासाहेब आई-वडिलांच्या जागी कायमच राहिले. श्याम पुढे म्हणाला ” शेवटची दहा वर्षे दादासाहेब आपल्या सोबत राहिले हे आपले भाग्य, पण त्यापेक्षा दादासाहेबांना शेवटच्या क्षणी  या “पाणक्याने ” त्यांच्या तोंडात पाण्याचे थेंब टाकले, हे माझे परमभाग्य.

 – समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणक्या… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पाणक्या… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

( मागील भागात आपण पहिले- ” होय पण या त्या वेळच्या गोष्टी होत्या, त्यावेळी आम्ही इंदूरच्या संस्थानिकांचे रावसाहेब होतो, सध्याची माझी ओळख म्हणजे एका बँकेतून रिटायर झालेला माणूस “.  ” असू दे, पण तुम्ही इंदूरच्या रावसाहेबांच्या पोटी जन्म घेतला हे विसरू नका, माझ्यासारख्या कित्येक आश्रीतांना तिथे अन्न वस्त्र निवारा मिळाला होता. ” आता इथून पुढे )

जेवता जेवता विजयरावांचे आणि श्यामचे बोलणे सुरू होते, इंदूरच्या आठवणी काढल्या जात होत्या, मातोश्रींची  ( विजयरावांच्या आईची ) आठवण निघाली. विजयरावांचे जेवण संपले, तसे ते नेहमीप्रमाणे आपले ताट घेऊन धुवायला घेऊन जात होते एवढ्यात श्याम उठला आणि त्याने त्यांचे ताट आपल्याकडे घेतले.            ” दादासाहेब मी येथे असताना तुमची ताट भांडी तुम्ही धुवायची नाही.’ शेवटी हा काही ऐकायचा नाही म्हणून विजयराव गप्प बसले. श्यामने झटपट भांडी धुतली. ओटा आवरला आणि तो विजय रावांबरोबर हॉलमध्ये गप्पा मारायला आला.

” हं, आता सांग, तू होतास कुठे इतकी वर्ष? “

“सांगतो दादासाहेब, ” श्यामच्या डोळ्यासमोर सर्व बालपण सरकू लागलं, ” दादासाहेब इंदूर जवळच्या एका खेड्यातला एक गरीब मुलगा, घरची अत्यंत गरिबी, वडील देवीच्या साथीत गेले, तुमचे मुनीमजी गावात खंड वसुलीसाठी येत, माझी आई त्यांना हात जोडून म्हणाली, ” माझ्या मुलाला कुठेतरी अन्नाला लावा, नाही तर इथे भूक भूक करत मरेल तो “, दिवाणजी मला घेऊन आले  आणि तुमच्या वाड्यावर ठेवले, तुमच्या वाड्यावर मी पाणी भरायचो, तुमच्या मातोश्रींनी मला कधी उपाशी ठेवलं नाही, घरात जे शिजायचं तेच माझ्या ताटलीत असायचं, एकदा एक प्रसंग घडला कदाचित तो तुमच्या लक्षात नसेल, पण माझं आयुष्य बदलणारा ठरला. तुम्ही कॉलेजात गेलात की मी तुमची पुस्तकं वह्या उघडायचो आणि वाचायचा प्रयत्न करायचो. एकदा तुम्ही अचानक घरात आलात, तर माझ्या मांडीवर पुस्तक उघडलेलं होतं आणि मी वाचायचा प्रयत्न करत होतो, तुम्ही ते पाहिलंत आणि मला विचारलंत, ” श्याम पुस्तक वाचावीशी वाटतात तुला?,  शाळेत जाशील का? जाणार असशील तर मी व्यवस्था करतो. ” मी ‘हो’ म्हंटल, मग तुम्ही मुनीमजींना सांगून माझं नाव शेजारच्या शाळेत घातलेत आणि मी आनंदाने शाळेत जायला लागलो, शाळेत पालकाचे नाव  लिहायची वेळ आली, तेव्हा दादासाहेब तुम्ही तुमचं नाव दिलत, केवढे उपकार तुमचे या अनाथ मुलावर.”

” त्यात विशेष काही नाही श्याम, गोरगरिबांना शिक्षण द्यायचं हे आमच्या संस्थानिकांचं ब्रीद होतं, आम्ही ते पाळत होतो इतकंच ‘                             ” दादासाहेब एकदा शाळेत पालकांचा मेळावा होता, प्रत्येकाने आपल्या पालकांना शाळेत आणायचं होतं, मी हे तुम्हाला सांगितलं, त्या दिवशी तुम्ही तुमच्या कॉलेजात न जाता माझ्या शाळेत माझे पालक म्हणून आलात. “

” अजून हे सर्व तुझ्या लक्षात आहे श्याम “.

” सर्व गोष्टी माझ्या लक्षात आहे दादासाहेब, मी दरवर्षी पहिलाक नंबर मिळवत शाळेत शिकत होतो. तुम्ही त्यानंतर पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेला होतात. मी दहावीत बोर्डात आलो. स्कॉलरशिप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी रायपूरला गेलो, त्याच वेळी माझी आई निधन पावल्याची बातमी आली, मी तिचे शेवटचे दर्शन घेतले आणि रायपूरला गेलो, त्यावेळेपासून तुमचा इंदूरचा वाडा सुटला, बारावीनंतर स्कॉलरशिप घेत लखनऊला गेलो. लखनऊला  “सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लाँग्वेज ‘ मधून फ्रेंच आणि जर्मन भाषेमध्ये मास्टर्स केले. तेथे पुन्हा स्कॉलरशिप घेऊन फ्रान्समध्ये फ्रेंच तत्वन्यान मध्ये पीएच.डी। केले, आणि मग केंब्रिज विद्यापीठात फ्रेंच तत्वज्ञान शिकवायला लागलो. श्याम बोलत होता आणि विजयराव आ वासून ऐकत होते. खडतर परिस्थितीत श्यामने घेतलेले शिक्षण ऐकून त्यांना त्याचं खूप कौतुक वाटलं, त्याचबरोबर आपला जन्म श्रीमंत घराण्यात होऊन सुद्धा आपण बँकेत नोकरी करण्याएवढीच प्रगती केली याचं त्यांना वैषम्य वाटले.

” श्याम कौतुक वाटतं तुझं, आमच्या वाड्यात पाणी भरणारा मुलगा केंब्रिज विद्यापीठात प्रोफेसर झाला, तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत, मग सध्या तू कुठे असतोस? “

” दादासाहेब, आपलं मुंबई विद्यापीठ फ्रेंच तत्त्वज्ञान विभाग सुरू करत आहे, याकरता मला इथे बोलावून घेतले आहे, पण या आधीची गेली दोन वर्षे  मी दिल्ली विद्यापीठात  फ्रेंच तत्त्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. पण पुढील दोन महिन्यानंतर  मी मुंबई विद्यापीठाचा फ्रेंच तत्त्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून जॉईन होईल.”

” बापरे शाम तेवढा मोठा माणूस तू, आणि माझ्या घरची भांडी घासलीस आज!”   “मी मोठा जगासाठी असेन कदाचित, पण इंदूरच्या दातेंसाठी नाही “

” मग शाम, तुझं लग्न, बायको…..”

“दादासाहेब माझी बायको इंदोरचीच आहे, ती पण तुमच्या कुटुंबाला ओळखते, साधना तिचं नाव, माझ्यासारखी ती पण लखनऊला जर्मन भाषा शिकण्यासाठी होती.      “मग ती पण केब्रिज ला जर्मन भाषा शिकविण्यासाठी आली. आम्ही त्या काळात लग्न केलं. आम्हाला एक मुलगी आहे, “मिहिरा ” तिचं नाव. मिहिरा दिल्लीत दहावी शिकते, माझी पत्नी साधना सध्या दिल्ली विद्यापीठात जर्मन भाषा शिकवते, पण आता ती माझ्याबरोबर मुंबई विद्यापीठात येईल. “

एवढ्यात विजयरावांना जर्मनीहून त्यांच्या मुलाचा सुनीलचा फोन आला. बोलण्यासाठी श्याम हा विषय होता. त्याच्याविषयी किती बोलू नि किती नको असं विजयरावांना झालं, मग शाम सुनिलशी बोलला, सुनिलच्या बायकोबरोबर जर्मनमध्ये बोलला. ती दोघेही श्यामशी बोलून फारच प्रभावीत झाली.

रात्री 10 ही विजयरावांची झोपायची वेळ. श्याम म्हणाला  ” दादासाहेब तुम्ही बेडरूम मध्ये झोपा, मला चटई आणि चादर द्या मी हॉलमध्ये झोपतो, विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या आधीच शाम बेडरूम मध्ये गेला आणि त्यांच्या बेडवर त्यांची गादी चादर व्यवस्थित करून दिली. बेड खाली असलेली चटई आणि चादर घेऊन तो हॉलमध्ये आला, विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही ऐकणार नाही हे माहीत असल्याने ते गप्प राहिले.

रोज सकाळी सहा वाजता विजयरावांना जाग यायची। आज पण त्यांना जाग आली तेव्हा किचन मधून आवाज ऐकू येत होता. बायको वसुधा गेल्यानंतर ते रोज स्वतःचा चहा स्वतः बनवत असत, मग आज कोण आलं? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. एवढ्यात काल रात्री श्याम आलेला आहे आणि तो हॉलमध्ये झोपलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं.

क्रमश: भाग २ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणक्या… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पाणक्या… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

विजयराव देवाचे स्तोत्र म्हणत होते, सायंकाळचे सात वाजले होते, स्तोत्र म्हणता म्हणता विजयरावांच्या डोक्यात विचार येत होते, थोड्या वेळाने कुकर लावू, दुपारी हॉटेल मधुरमधून मागवलेली आमटी व भाजी आहे, फ्रिजमध्ये दही आहे. विजयरावांची ही नेहमीची पद्धत, सायंकाळी सातच्या सुमारास देवापुढे निरंजन लावायचे, मग स्तोत्र म्हणायचे. वसुधा आजारी पडेपर्यंत देवाचे सर्व तीच पहायची. त्यामुळे रात्री आठ पर्यंत विजयराव पार्कमध्ये फिरत. वसुधा आजारी पडली आणि विजयरावांचे फिरणे थांबले. बाहेर पडायचे ते फक्त बाजारहाट करण्यासाठी, आता बऱ्याच गोष्टी ऑनलाइन होतात, त्यामुळे बाहेर जाणे कमीच, पेन्शन बँकेत जमा होते, सुनील चा फोन रात्री नऊ वाजता नेहमीचाच, तोपर्यंत जेवून घ्यायचे आणि त्याच्या फोनची वाट पाहायची, असा त्यांचा दिनक्रम.

सव्वासाच्या सुमारास बेल वाजली, विजयरावांनी होल मधून बाहेर पाहिले, मध्यम वयाचा एक गृहस्थ बाहेर उभा होता.

कोण पाहिजे? विजयरावांनी विचारले.

” दादासाहेब एवढ्या वर्षांनी तुम्ही ओळखणार नाही मला.’

” दादासाहेब ‘ ही हाकच इंदोरची. इंदूरच्या घरात सर्वजण त्यांना दादासाहेब म्हणत.

” तुम्ही इंदोरहून आलात का,? दादासाहेबांनी विचारले.

“नाही ‘, दादासाहेब मी शामू, तुमच्या इंदोरच्या वाड्यात कामाला होतो लहानपणी.

“कोण शामू? अरे तू म्हणजे……., दादासाहेब थोडं थोडं आठवू लागले.” दादासाहेब मी शामू “पाणक्या’, तुमच्या दातेंच्या वाड्यावर मी पाणी भरायचो। आठवलं नाही का?’

” अरे तू शामू?’, दादासाहेबांनी संपूर्ण दार उघडलं.

” कुठे होतास इतकी वर्ष?

शामू आत आला आणि दादासाहेबांच्या पाया पडला.

” अरे एवढा मोठा झालास तू, माझ्या पाया काय पडतोस, ये. ये. बस.’

” नाही दादासाहेब पहिल्यांदा तुम्ही बसा ‘.

” बर बाबा ‘, म्हणत विजयराव कोचवर बसले. त्याच क्षणी शामू येऊन त्यांच्या पायाकडे बसला आणि त्यांचे पाय चुरू लागला.

” अरे शामू काय करतोस हे?, माझे पाय दाबतोस, केवढा मोठा झालास तू.’ “मोठा झालो इतरांसाठी, तुमच्यासाठी नाही दादासाहेब. अजून मी  ” पाणक्या ‘ शामूच आहे तुमच्यासाठी. तुम्ही माझे अन्नदाते मालक, तुमच्या वाड्यावर मिळणाऱ्या तुकड्यावर माझे बालपण गेले, ते कसे विसरू?”

” ते जुने दिवस होते रे बाबा, इंदूर मध्ये आम्ही रावसाहेब, संस्थानिकांचे सरदार होतो. पण ते सर्व संपले आता. या मुंबईत आम्हाला कोण विचारतो?’

” कोणी विचारू न विचारू, तुम्ही माझे अन्नदातेच आहात,”

” ते असू दे, तू आधी त्या खुर्चीवर बस पाहू “.तसा शामू एका लहानशा स्टुलावर बसला.” कुठे होतास इतकी वर्ष? माझ्या अंदाजाने 35 40 वर्षानंतर दिसतोयस तू मला.”

” हो दादासाहेब, इंदूरला तुमच्या वाड्यावर होतो तेव्हा आठ नऊ वर्षाचा होतो. आणि तुम्ही कॉलेजमध्ये होतात.“

” हो बहुतेक तेव्हा मी एम. कॉम.ला होतो. मग मी बँकेत लागलो आणि मग भारतभर बदल्या. शेवटी मुंबईत येऊन स्थायिक झालो.”

” मग इंदूरचा वाडा आणि त्यातले संस्थानिकांचे सरदार सरदार, एवढी माणसं? नोकर मंडळी? “

” सगळा पोकळ वासा होता तो, संस्थानिकांचे सरदार म्हणून सगळा खर्च सुरू होता. आमच्या पाच-सहा पिढ्यांनी नुसतं बसून खाल्लं. तळ्यात साठवलेलं पाणी किती दिवस पुरणार? त्यासाठी झरा हवा असतो, तो झरा तलाव रिकामा करू देत नाही., आमच्या कुटुंबात झराच नव्हता. शेवटी मी निर्णय घेतला, कर्ज अंगावर येत होतं, सगळे डाम दौंल बंद केले. नोकर चाकर कमी केले, आई वडील गेल्यावर मी बँकेत नोकरी धरली.”

” आणि दादासाहेब एवढा मोठा वाडा? “

“वाडाही कोसळत होता मागून, तो विकला,  आता त्या ठिकाणी मॉल उभा राहिलाय, कालाय तस्मै नमः”

“हो दादासाहेब, मी पाहून आलो.“

” तू इंदूरला गेला होतास? “

” हो तर, तुमच्या शोधात होतो मी, दोन वर्षांपूर्वी खूप वर्षांनी भारतात आलो, पहिल्यांदा इंदूरला गेलो तर वाड्याच्या ठिकाणी मॉल उभा,, शेवटी तुमचा पत्ता शोधत शोधत या ठिकाणी आलो.”

” मग पत्ता मिळाला कसा?”

” इच्छा असली तर मार्ग सापडतो दादासाहेब, मी इंदोरहून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही कोणत्यातरी बँकेत नोकरीला लागला होतात, हे माहीत होतं, मात्र कुठली बँक हे माहीत नव्हतं, मग मी भारतातील प्रमुख बँकांच्या ऑफिसमध्ये पत्र लिहून तुमचा पत्ता विचारला, पण तुमचा सध्याचा पत्ता कोणाला माहित नव्हता. इंदूर मध्ये चौकशी केली तेव्हा कोणी अचलपूर, नागपूर तर कोणी पंढरपूरचा पत्ता दिला, या प्रत्येक शहरात तुमचा पत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही, शेवटी मुंबईत जीपीओ मध्ये या नावाचे पत्र कोणत्या पत्त्यावर देता अशी चौकशी केली आणि हा सांताक्रूझ चा तुमचा पत्ता मिळाला.”

” धन्य आहे तुझ्यापुढे! एवढी आठवण ठेवून तू येथे पोहोचलास याचे मला कौतुक वाटते, तू भेटलास आणि दादासाहेब अशी हाक मारलीस, मी इंदूरला असल्यासारखे वाटले. रम्य आठवणी असतात रे त्या. आता मी मुंबईत एकटाच राहतो, बायको वसुधा चार वर्षांपूर्वी गेली, मुलगा सुनील जर्मनीत स्थायिक झालाय, तिथल्या मुलीशी लग्न करून तेथेच सेटल झालाय. इंदूरचा वाडा विकला मी कारण कर्ज फार झालं होतं. रावसाहेबांचा तोरा मिरवताना खर्च सुरूच होते. उत्पन्न नव्हते. आता परत इंदूरमध्ये जाऊन छोट्या घरात राहणे कमीपणाचे वाटते, नोकरीत शेवटचा स्टॉप मुंबई होता, सुनील चे शिक्षण पण होते, या दृष्टीने मुंबईत सेटल झालो, पण इंदूर ते इंदूर, तिथली मजा मुंबईत नाही, स्वच्छ शहर, खाण्यापिण्याची लय लूट, गाणे संगीत भरपूर.     “अरे शामू पण तू मुंबईत राहतोस कुठे?”                                 ” दादासाहेब, आता यापुढे मी मुंबईतच राहणार आहे. त्याविषयी सर्व सांगतो नंतर, पण दादासाहेब, आज मात्र मी या घरी रहाणार आहे.”                        ” अरे रहा ना, मी पण इथे एकटाच,आहे. बोलायलाही कोणी नाही. सुनील चा रोज रात्री नऊ वाजता फोन येतो, त्याची मुलगी आहे पाच वर्षाची ती पण बोलते., कधी कधी सून बोलते, बरं दुपारची आमटी भाजी आहे, दही आहे, भात लावतो थोडा.”

” मी लावतो दादासाहेब, तुम्ही बसा. मला फक्त तांदळाचा डबा दाखवा.”

” अरे मी करतो भात मला रोजची सवय आहे. “

” नाही दादासाहेब, मी असताना तुम्हाला कसलेही काम करू देणार नाही, तुम्ही बसा. “

विजयरावांनी शामला तांदळाचा डबा दाखवला. त्यातून तोडे तांदूळ घेऊन शामने गॅसवर भात लावला. फ्रिज उघडून दही बाहेर काढलं, फ्रिज मधून दोन अंडी बाहेर काढून त्याचे हाफ आमलेट तयार केले. छोट्या पातेल्यात सकाळची आमटी भाजी झाकून ठेवली होती. ती गॅसवर गरम केली. भांड्याच्या स्टॅन्ड वरून ताटे, वाट्या, ग्लासेस बाहेर काढले, आणि दोन ताटे तयार केली. त्यातील एक टेबलावर ठेवले. शेजारी पाणी ठेवले आणि म्हणाला, “दादासाहेब बसा.”                             विजयराव टेबलावर जेवायला बसले, त्यांनी पाहिलं दुसरे ताट घेऊन श्याम खाली फरशीवर बसला होता.

” अरे शाम वर बस जेवायला.’

“नाही दादासाहेब, तुम्ही जेवत असताना याआधी मी कधी तुमच्या सोबत बसलो नाही आणि यापुढे बसणार नाही. “

“अरे शाम, ते दिवस गेले, मागचे विसरायचे आता. “

” नाही विसरणार दादासाहेब, एका खेड्यातल्या अनाथ मुलाला तुमच्या घरात आश्रय मिळाला, “पाणक्या ” होतो मी. तुमच्या घरात आडावरून पाणी भरत होतो, रोज प्रत्येकाच्या खोलीत पाण्याचा तांब्या नेऊन ठेवत होतो, तुम्ही कॉलेजमधून किंवा खेळून आलात की मला हाक मारत होतात, मी तुम्हाला पाण्याचा तांब्या आणून देत असे, जेवणाची वेळ झाली की तुमचे ताट तुमच्या खोलीत आणून देत असे, मग तुमच्या खोलीत माझी जेवणाची ताटली घेऊन येत असे आणि खाली बसून जेवत असे.”

” होय पण या त्या वेळच्या गोष्टी होत्या, त्यावेळी आम्ही इंदूरच्या संस्थानिकांचे रावसाहेब होतो, सध्याची माझी ओळख म्हणजे एका बँकेतून रिटायर झालेला माणूस “. ” असू दे, पण तुम्ही इंदूरच्या रावसाहेबांच्या पोटी जन्म घेतला हे विसरू नका, माझ्यासारख्या कित्येक आश्रीतांना तिथे अन्न वस्त्र निवारा मिळाला होता. “

क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोट्रेट – भाग-३ (अनुवादीत कथा) – मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह – हिन्दी अनुवाद – श्री सुशांत सुप्रिय ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ पोट्रेट – भाग-३ (अनुवादीत कथा) – मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह – हिन्दी अनुवाद – श्री सुशांत सुप्रिय ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले- ट्रिओलीने बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण त्याच्या तोंडातून शब्द काही फुटला नाही. म्हणून त्याने तोंड बंद केलं. मग त्याने दुसर्‍यांदा तोंड उघडलं आणि हळूच म्हणाला, ‘पण मी कसा विकणार?’त्याने आपले हात उचलले आणि असहाय्यसे खाली पडू दिले. आता इथून पुढे )               

‘महाशय हे पेंटिंग मी कसं विकू शकेन? त्याच्या आवाजात जणू सार्‍या दुनियेची उदासी सामावली होती.

‘होय! बरोबर आहे.’ गर्दीतले लोक म्हणत होते. हा तर त्याच्या शरीराचा हिस्सा आहे.’

‘ ऐका.’ आणखी एक व्यापारी जवळ येत म्हणाला, ‘मी आपल्याला मदत करेन. मी आपल्याला श्रीमंत बनवेन. आपण दोघे मिळून एकत्रितपणे या पेंटिंगच्या बाबतीत काही तरी निर्णय घेऊ शकू. होय की नाही?’

ट्रिओलीने काळजीने त्याच्याकडे पाहीलं. ‘महाशय हे पेंटिंग आपण कसं खरेदी करू शकाल? हे खरेदी केल्यानंतर आपण याचं काय करणार? आपण ते कुठे ठेवाल? आज आपण ते कुठे ठेवाल? आणि उद्या रात्री कुठे ठेवाल? ‘

‘ओ… हो… मी हे कुठे ठेवणार?  कुठे बरं मी हे ठेवणार?… चला बघू या. मला वाटतं, हे पेंटिंग मला जर माझ्याजवळ ठेवायचं असेल, तर मला तुलाही माझ्यासोबत ठेवायला हवं. हे तर गैरसोयीचं आहे. या पेंटिंगची तोपर्यंत काहीच किंमत नाही, जोपर्यंत आपला मृत्यू होत नाही. तुझं वय किती आहे मित्रा?’

‘एकसष्ठ.’

‘पण आपण काही जास्त आरोग्यासपन्न दिसत नाही आहात.’ व्यापार्‍याने ट्रिओलीला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत नीटपणे न्याहाळलं. एखादा शेतकरी म्हातार्‍या घोड्याला न्याहाळतो ना, अगदी तसं.

‘मला हे मान्य नाही.’ ट्रिओलीने त्याच्यापासून दूर जात म्हंटलं. ’अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मला हे मुळीच पसंत नाही.’ तो वळला आणि चालू  लागला. चालता चालता तो सरळ एका उंच माणसाच्या हातात जाऊन पडला. त्याने आपले हात सरळ पुढे केले आणि त्याच्या खांद्याला धरले.

‘ऐक मित्रा’ त्या अनोळखी व्यक्तीने हसत हसत म्हंटलं, ‘आपल्याला पोहण्यात आणि उन्हात शेकण्यात आनंद मिळतो का?’ ट्रिओलीने चमकून त्याच्याकडे पाहिले.

‘बोर्देऊच्या महान महालातून आलेलं स्वादिष्ट भोजन आणि लाल मद्य आपल्याला पसंत आहे का?’ ती व्यक्ती अजूनही हसत होती. त्याच्या चमकदार शुभ्र दातांच्यामधून एक सोनेरी तेज दिसत होतं. तो अतिशय मृदुपणाने बोलत होता आणि त्याचा हात अजूनही ट्रिओलीच्या खांद्यावर होता. ‘काय, आपल्याला या गोष्टी पसंत आहेत?’

‘ हो! खूपच आवडतील मला या गोष्टी करायला.’  ट्रिओली गोंधळून म्हणाला.

‘आपण कधी आपल्या पायासाठी खास प्रकारचे बूट बनवून घेतले आहेत? ‘

‘नाही.’

‘तसं करण्याची आपली इच्छा आहे?’

‘असं बघा….’

‘आपण न्हाव्याची सुविधा घेऊ इच्छिता, जो रोज सकाळी आपली दाढी करेल आणि आपले केस कापून छोटे करेल.’ ट्रिओली केवळ उभं राहून एकटक त्याच्याकडे बघत राहिला. ‘ एका जाड्या पण आकर्षक अशा युवतीकडून आपल्या शरिराचं प्रसाधन करून घेणं आपल्याला आवडेल?’ गर्दीतले कुणी कुणी हसले. ‘आपल्या बिछान्यात आपल्या उशाशी एक घंटी ठेवायला आपल्याला आवडेल का, की जी ऐकून रोज सकाळी एक सेविका आपला नाश्ता घेऊन येईल? मित्रा, या सगळ्या गोष्टी आपल्याला पसंत आहेत?’ ट्रिओली कसलीही हालचाल न करता त्याच्याकडे एकटक बघत राहिला.

हे बघ, कॅन्सासमध्ये असलेल्या ब्रिस्टल हॉटेलचा मी मालक आहे. मी आपल्याला आमंत्रण देतो, की आपण माझे अतिथी बनून तिथे या आणि आपले उरलेले जीवन तिथे ऐशो- आरामात जगा.’ तो माणूस जरासा थांबला, कारण श्रोत्यांना हे सगळं चांगल्या रीतीने समजण्यासाठी वेळ मिळावा, असं त्याला वाटत होतं. ‘आपली एक मात्र जबाबदारी असेल, ‘ तो पुढे म्हणाला, ‘खरं तर मी त्याला आपली सुख-सुविधाच म्हणेन, ती म्हणजे, आपण समुद्र किनार्‍यावर माझ्या स्वत:च्या विभागात, पोहण्याची वस्त्रे घालून आपला वेळ घालवाल. माझ्या अतिथींमध्ये फिराल. उबदार उन्हात आराम कराल. समुद्रात पोहाल आणि समुद्र किनार्‍यावरच मद्य प्राशन कराल. आपल्याला हा प्रस्ताव मान्य आहे का?’

‘आपल्या लक्षात येतेय नं, आपण असं करण्याने माझ्या हॉटेलमधील सगळे अतिथी, आपल्या पाठीवर सुतीनेने रंगवलेले शानदार पेंटिंग नीटपणे पाहू शकतील. आपण सुप्रसिद्ध व्हाल आणि लोक म्हणतील, ‘तो, तोच माणूस आहे, ज्याच्या पाठीवर दहा लाख फ्रॅंकचे पेंटिंग चितारलेले आहे. ‘

‘श्रीमान आपल्याला हा विचार पसंत आहे का? आपल्याला हे सगळं करायला आवडेल का?’ 

ट्रिओलीने हातमोजे घातलेल्या त्या उंच व्यक्तीकडे पाहिलं. मग हळूच म्हंटलं, ‘आपण खरोखरच मला हा प्रस्ताव देत आहात का? ‘

‘होय. मी खरोखरच आपल्याला हा प्रस्ताव देतोय.’

‘थांबा.’ व्यापार्‍याने मधेच हस्तक्षेप केला. ‘ सज्जनहो, बघा! आमच्या समस्येवर माझ्याकडे हे उत्तर आहे. मी हे पेंटिंग विकत घेईन. मग मी एका शल्य चिकित्सकाची सेवा घेईन. तो आपल्या पाठीवरील आपली त्वचा काढेल. मग आपण आरामात जिथे हवं, तिथे जाऊ  शकाल आणि मी आपल्याला जी अपार धनराशी देईन, त्याचा उपभोग आपण घेऊ शकाल.’

‘मग काय माझ्या पाठीवर त्वचाच असणार नाही.?’

‘नाही. नाही. कृपा करून आपण अशी चुकीची समजूत करून घेऊ नका. मला चुकीचं समजू नका. शल्य चिकित्सक आपल्या पाठीवरची जुनी त्वचा काढून घेऊन नवी त्वचा प्रत्यारोपित करेल. ही गोष्ट अगदी सहज-सोपी आहे.’

‘काय? असं करता येईल?’

‘ही मुळीच अवघड गोष्ट नाही.’

‘अशक्य आहे हे!’ हातमोजे घातलेली व्यक्ती म्हणाली.’ त्वचा-प्रत्यारोपणाच्या इतक्या मोठ्या प्रयोगाच्यासाठी हे खूप वय्यस्क झाले आहेत. या प्रयोगात यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे. माझ्या मित्रा, या प्रयोगात आपल्याला मृत्यूही येऊ शकेल.’

‘काय? यात माझा मृत्यू होऊ शकेल?’

‘जाहीर आहे. आपण ही शल्य चिकित्सा सहन करू शकणार नाही. केवळ पेंटिंगच वाचेल. ‘

‘अरे देवा…. ‘ ट्रिओली किंचाळला.

भयभीत होऊन त्याने तिथे जमलेल्या लोकांकडे पहिले. सगळे गप्प होते, एवढ्यात मागचा बाजूने एक आवाज आला, ‘जर कुणी या म्हातार्‍याला खूप मोठी रक्कम दिली, तर कुणास ठाऊक, हा आत्महत्यादेखील करायला तयार होईल.’

हे ऐकून कुणी कुणी हसले. व्यापारी अस्वस्थ होत, गालीचावर आपले पाय घासू लागला.

‘इकडे या.’ तो उंच माणूस रुंद हसू हसत म्हणाला, ‘आपण आणि मी जाऊन स्वादिष्ट भोजन करूयात. भोजन करता करता आपण या विषयावर चर्चा केली तर कसं होईल? आपल्याला भूक लागलीय नं? ‘

ट्रिओलीने अप्रसन्न होत त्याच्याकडे पाहीलं. त्याला त्या व्यक्तीची लांबलचक, लवचिक मान मुळीच आवडली  नाही. तो जेव्हा बोलायचा, तेव्हा तो आपली मान सापाप्रमाणे पुढच्या बाजूला टाकायचा.

‘भाजलेलं बदक आणि लाल मद्य.’ तो माणूस बोलत होता. ‘त्याबरोबर हलकी-फुलकी मिठाई’ आपण आधी भोजन करूयात. ट्रिओलीची नजर वर छ्ताकडे गेली. त्याच्या तोंडाला पाणी सुटले.

‘आपल्याला बदक कसं खायला आवडेल? ‘ तो माणूस बोलतच होता. बाहेरून चांगलं भाजलेलं, कुरकुरीत, की…’

‘मी आपल्यासोबत येतोय.’ ट्रिओली घाईने म्हणाला. आपला शर्ट त्याने आधीच उचलला होता. आता त्याने तो घातला. ‘ थांबा महाशय, मी येतोय. आणि मिनिटभरातच तो आपल्या नव्या संरक्षकाबरोबर या चित्रप्रदर्शातून बाहेर पडून गायब झाला.

काही आठवड्यानंतर सुतीनेने बनवलेली एक पेंटिंग ब्यूनोस एयरेसमधे विक्रीसाठी आली. त्या पेंटिंगमध्ये एका युवतीचा चेहरा होता. असाधारण असे ते पेंटिंग होते. त्याची चौकट अतिशय सुंदर होती. त्या चौकटीवर मोठ्या प्रमाणात रंगरोगण केलेलं होतं. त्यामुळे किंवा त्याचमुळे केवळ, लोक आपापसात बोलत होते. चर्चा करत होते. कॅन्सासमधे ब्रिस्टल नावाचे कोणतेही हॉटेल नाही. त्या म्हातार्‍याच्या स्वास्थ्याबद्दल त्यांना चिंता वाटत होती. त्याच्या सहीसलामत असण्यासाठी, खुशालीसाठी  ते प्रार्थना करत होते.  त्याबरोबरच ते  आशा करत होते, की तो म्हातारा जिथे कुठे असेल, तिथे एक मोठी, जाडजूड युवती त्याच्या शरीराच्या प्रसाधनासाठी हजर असेल. एक सेविका रोज सकाळी त्याच्या बिछान्यावर त्याचा नाश्ता  घेऊन येत असेल. 

 – समाप्त  –

मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह

हिन्दी अनुवादखाल हिंदी अनुवादक  – सुशांत सुप्रिय मो. -8512070086

मराठी स्वैर अनुवादपोट्रेट  अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोट्रेट – भाग-२ (अनुवादीत कथा) – मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह – हिन्दी अनुवाद – श्री सुशांत सुप्रिय ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ पोट्रेट – भाग-२ (अनुवादीत कथा) – मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह – हिन्दी अनुवाद – श्री सुशांत सुप्रिय ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले- तो साकाळ होईपर्यंत ट्रिओलीच्या पाठीच्या त्वचेवर काढलेलं पेंटिंग गोंदवत राहिला. ट्रिओलीला आता स्पष्ट आठवलं, जेव्हा शेवटी त्या कलाकाराने बाजूला सरून म्हंटलं, ‘ चला. झालं आपलं पेंटिंग’, त्यावेळी बाहेर प्रकाश पसरला होता. रस्त्यावरून लोकांच्या येण्या-जाण्याचे आवाज ऐकू येऊ लागले होते. आता इथून पुढे)

‘मला हे पेंटिंग बघायचय.’ ट्रिओली म्हणाला. मुलाने तिथला आरसा उचलला आणि भिंतीवरच्या मोठ्या आरशापुढे ट्रिओलीला उभं करून,त्याच्या मागे लहान आरसा धरत त्याने त्याला पाठीवरचे पेंटिंग दाखवले. ट्रिओलीने पेंटिंग नीटपणे न्याहाळण्यासाठी आपली मान उचलली.

‘अरे देवा….’ तो ओरडला. ते एक चकित करणारं दृश्य होतं. त्याची सगळी पाठ रंगांनी चमकत होती. तिथे अनेक रंग चमकत होते. सोनेरी, हिरवा, निळा, काळा लाल… किती तरी  रंग. त्वचेवर गोंदलेलं गोंदण गाढ होतं. ते पेंटिंग सजीव वाटत होतं. त्या मुलाच्या अन्य पेंटिंगची वैशिष्ट्येही त्यात दिसत होती.

‘हे जबरदस्त आहे.’

‘मलादेखील माझं हे पेंटिंग चांगलं वाटतय.’ मुलगा म्हणाला. मग तो थोडा मागे सरकला आणि पारखी दृष्टीने पेंटिंग पाहू लागला. ‘ हे एक सुंदर पेंटिंग झालय. मी त्यावर माझी सही करतो.‘ मग त्याने मशीन हातात घेऊन, पाठीच्या त्वचेवर   पेंटिंगच्या उजव्या बाजूला आपलं नाव गोंदवलं चॅम सुतीने.

* * * * *

ट्रिओली नावाचा तो म्हातारा प्रदर्शनाच्या खिडकीतून तिथे लावलेल्या पेंटिंगकडे एकटक बघत स्तब्धसा उभा होता. खूप काळापूर्वीची ही गोष्ट होती. वाटत होतं, जशी काही ही वेगळ्याच कुठल्या तरी जन्मातली गोष्ट आहे.

आणि तो मुलगा? चॅम सुतीने…. त्याचं काय झालं? त्याला आठवलं, पहिल्या महायुद्धानंतर परतल्यानंतर त्याला त्या मुलाची अनुपस्थिती जाणवली होती. त्याने जोसीला त्या मुलाबद्दल विचारलं.

‘ माझा तो छोटा पेंटर कुठे आहे?’

‘कुणास हाऊक, तो कुठे निघून गेला!’ तिने उत्तर दिले.

‘कदाचित तो परत येईल.’

‘असंच होवो. कुणास ठाऊक?’

त्याच्याबद्दल ती दोघे बोलली ती, ती शेवटचीच वेळ होती. त्याच्यानंतर लगेचच ते ‘ले हॅब्रे’ ला गेले. तिथे मोठ्या संख्येने नावाडी रहात. तिथे व्यापार करणं खूप फायद्याचं होतं. मोठे खुशीचे दिवस होते ते. दोन महायुद्धातील मधला काळ. बंदराजवळ त्याचे छोटेसे दुकान होते. तिथेच रहायला आरामशीर घर होते आणि कामाची मुळीच कमतरता नव्हती.

मग दुसरे महायुद्ध सुरू झाले. जोसी मारली गेली. जर्मन फौजा तिथे पोचल्या आणि त्याबरोबरच त्याच्या व्यापाराचा शेवट झाला. त्यानंतर कुणालाही आपल्या हातावर चित्र नको होते. कुणालाही गोंदवून घ्यायचे नव्हते. आता नावीन काही काम शिकायचं म्हंटलं, तर तो खूप म्हातारा झाला होता. निराश होऊन  तो पॅरीसला गेला. त्याला काहीशी आशा होती, की या मोठ्या शहरात जगणं सोपं होईल. पण तसं झालं नाही.

आता युद्ध समाप्तीनंतर त्याच्यापाशी काही साधने उरली नव्हती, ना पैसा, ना ऊर्जा, की तो आपला छोटासा व्यापार पुन्हा सुरू करू शकेल. जगण्यासाठी काय करायला हवं, हे जाणून घेणं, त्याच्यासारख्या म्हातार्‍यासाठी सोपं नव्हतं. विशेषत: भीक मागण्याची त्याची इच्छा नसताना. पण मग तो कसा जिवंत रहाणार?

त्याने पेंटिंगकडे एकटक बघत विचात केला, हे पेंटिंग तर माझ्या जुन्या मित्राचे आहे. त्याने आपला चेहरा खिडकीच्या काचेच्या अगदी जवळ आणला. आतमधील प्रदर्शनाकडे बघितले. प्रदर्शनातील भिंतींवर त्याच चित्रकाराची आणखीही अनेक चित्रे टांगलेली होती. अनेक लोक प्रदर्शनात लावलेली चित्रे बघत फिरत होते. हे एक विशेष प्रदर्शन होते. अचानक कुठल्या तरी आवेगाने ट्रिओली वळला आणि प्रदर्शनाचे दार उघडून तो आत गेला. ती एक लांबलचक खोली होती. खाली फरशीवर मद्याच्या रंगाचा गालीचा पसरलेला होता. परमेश्वरा, इथे सगळं कसं सुंदर आणि ऊबदार आहे. तिथे असलेले बहुसंख्य कलाप्रेमी पेंटिंग्जची वाखाणणी करत होते. ते सगळे नीट-नेटके, प्रतिष्ठित, सभ्य लोक होते. प्रत्येकाच्या हातात, सूची-पत्र होते. ट्रिओलीला त्याच्याच जवळून, त्यालाच संबोधणारा एक आवाज ऐकू आला. ‘तू इथे काय करतोयस? ’ ट्रिओली निश्चल उभा राहिला.

‘कृपा करून तू या माझ्या प्रदर्शनातून बाहेर निघून जा.’ काळा सूट घातलेला एक माणूस म्हणत होता.

‘ का? मला पेंटिंग बघण्याची परवानगी नाही? ‘

‘मी तुला इथून निघून जायला सांगतोय.’  पण ट्रिओली आपल्या जागी तासाच दृढपणे उभा राहिला. अचानक त्याला आपण पराजित आहोत, अपमानित झालो आहोत, असे वाटू लागले.

‘ इथे गडबड, गोंधळ करू नकोस.’ तो माणूस म्हणत होता. ‘चल. इकडे या बाजूला ये.’ त्याने आपला जाडजूड गोरा हात ट्रिओलीच्या खांद्यावर ठेवला आणि त्याला दरवाजाकडे जोरात ढकलू लागला. मग काय?

‘ आपला माझा खांद्यावरचा हात काढून घ्या.’ ट्रिओली किंचाळला. त्याचा आवाज त्या  प्रदर्शनाच्या खोलीत घुमला आणि सगळे लोक त्या आवाजाच्या दिशेने वळले. सगळे खोलीतले चेहरे दुसर्‍या बाजूने त्या आवाजाच्या दिशेकडेच बघत होते. सगळे आपआपल्या जागी गुपचूप उभे राहून हे भांडण बघत होते. त्यांच्या चेहर्‍यावर असा भाव होता, की बाकी काही का होईना तिकडे, आम्ही ठीक आहोत. आमच्यावर काही संकट ओढवलेले नाही. दूर होईल ही समस्या.

‘माझ्याजवळदेखील या पेंटरने बनवलेले हे पेंटिंग आहे.’ तिथल्या एका पेंटिंगकडे बोट दाखवत ट्रिओली ओरडला. ‘तो माझा मित्र होता. माझ्याजवळ त्याने दिलेले असेच एक पेंटिंग आहे.’

‘हा कुणी तरी वेडा दिसतोय.’

‘अरे, कुणी तरी पोलिसांना बोलवा. ‘

आपल्याला मागे वळवत अचानक ट्रिओली त्याच्या पकडीतून सुटला. त्याला थांबवण्यापूर्वीच, तो ओरडत खोलीच्या दुसर्‍या टोकाकडे पळाला. ‘ मी आपल्या सर्वांना दाखवतो’, असं म्हणत त्याने आपला ओव्हरकोट काढून फेकून दिला. मग त्याने आपलं जाकीट आणि शर्टदेखील काढून टाकला. तो वळला. त्याची उघडी पाठ आता लोकांच्याकडे होती. ‘हे बघा. ‘ भराभरा श्वास घेत तो म्हणाला. ‘बघितलंत आपण? हे पेंटिंग तेच आहे ना! ‘

अचानक त्या खोलीत नि:स्तब्ध शांतता पसरली. जो जिथे होता, तिथेच थांबला. न हलता, न बोलता. ते सगळे अस्वस्थसे  त्याच्या पाठीवर गोंदलेले  पेंटिंग एकटक पहात होते. पेंटिंग पाठीवर होते आणि त्यातील रंग पाहिल्यासारखेच अजूनही उठावदार दिसत होते. लोक म्हणू लागले, ‘अरे देवा, हे पेंटिंग खरोखरच इथे आहे.’

‘ हे त्याच्या सुरुवातीच्या पेंटिंगसारखं आहे.’

‘हे सारं विलक्षण आहे…  विलक्षण आहे… ‘

‘आणि बघा ना, चित्रकाराने इथे आपली सहीदेखील केली आहे.’

‘ हे  त्याचे जुने पेंटिंग आहे. कधी बनवले त्याने हे पेंटिंग?’

न वळता  ट्रिओली म्हणाला, हे पेंटिंग १९१३ मधे बनवलं. १९१३च्या पानगळीच्या वेळी. सुतीनेला गोंदण्याचे काम कुणी शिकवलं? त्याला ते काम मी शिकवलं. आणि या चित्रात जी युवती दिसते आहे, ती  कोण होती? ती माझी पत्नी होती.’

त्या प्रदर्शनाचा मालक गर्दीला धक्के मारत ट्रिओलीकडे येत होता. तो शांत आणि अतिशय गंभीर होता. त्याच्या ओठांवर आता एक हसू खेळत होतं. ‘ मी हे पेंटिंग विकत घेईन. ऐकलत मान्यवर, मी म्हंटलं, मी हे पेंटिंग विकत घेईन.’

‘आपण हे पेंटिंग कसं विकत घेऊ शकाल? ‘ ट्रिओलीने हळुवारपणे विचारले.

‘ या पेंटिंगसाठी मी आपल्याला दोन लाख फ्रॅंक्स देईन. ‘

‘छे:: छे: असं करू नका.’ गर्दीतील कुणी तरी फुसफुसला. ‘याची किंमत त्याच्या वीस पट तरी जास्त असली पाहिजे.’

ट्रिओलीने बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण त्याच्या तोंडातून शब्द काही फुटला नाही. म्हणून त्याने तोंड बंद केलं. मग त्याने दुसर्‍यांदा तोंड उघडलं आणि हळूच म्हणाला, ‘पण मी कसा विकणार?’त्याने आपले हात उचलले आणि असहाय्यसे खाली पडू दिले.

पोट्रेट – क्रमश: भाग २ 

मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह

हिन्दी अनुवादखाल हिंदी अनुवादक  – सुशांत सुप्रिय मो. -8512070086

मराठी स्वैर अनुवादपोट्रेट  अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोट्रेट – भाग-१ (अनुवादीत कथा) – मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह – हिन्दी अनुवाद – श्री सुशांत सुप्रिय ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ पोट्रेट – भाग-१ (अनुवादीत कथा) – मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह – हिन्दी अनुवाद – श्री सुशांत सुप्रिय ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

थंडीचा काळ जरा लांबलाच होता. शहरातील गल्ल्यांमधून अतिशय थंड वारे वहात होते. बर्फवृष्टी करणारे ढग आभाळात गडगडत होते.

ट्रिओली नावाचा तो म्हातारा माणूस, रुए दी रिवेलीच्याजवळ वेदनेने आपले पाय घासत फुटपाथवरून चालत होता. तो थंडीने पिचला होता आणि बिचारा दु:खी होता.

काच लावलेल्या दुकानात अनेक गोष्टी सजवून मांडून ठेवल्या होत्या. अत्तराच शिशे रेशमी टाय, हिरे, टेबल – खुर्च्या, पुस्तके इ. अनेक गोष्टी होत्या तिथे, पण तो या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जात होता. वाटेत त्याला एक चित्र प्रदर्शन लागलं. चित्र प्रदर्शने त्याला नेहमीच आवडायची. या प्रदर्शनात काचेच्या पलीकडे प्रेक्षकांना बघण्यासाठी अनेक चित्रे होती, पण त्यातील एक कॅन्व्हास विशेष लक्ष वेधून घेत होता. ते चित्र बघण्यासाठी तो तिथे थांबला. चित्र बघितलं आणि त्याला वाटू लागलं, ‘हे चित्र आपण बघितलय. पण कुठे?’ अचानक स्मृतीने त्याच्या डोक्यात टकटक केली. प्रथम कुठे तरी पाहिलेली, कुठली तरी गोष्ट, तिची जुनी आठवण, मन व्यापून गेली. त्याने ते चित्र पुन्हा पाहिले. एका निसर्ग दृश्याचे ते पेंटिंग होते. जोरदार वार्‍यामुळे झाडांचा एक समूह एका बाजूला झुकलेला होता. चौकटीबरोबर तिथे एक पट्टी होती. त्यावर चित्रकाराचे नाव लिहिलेले होते: चॅम सुतीने (१८९४-१९४३ ) .

त्या  पेंटिंगकडे टक लावून बघत असताना ट्रिओली विचार करू लागला की या पेंटिंगमध्ये असं काय विशेष होतं, की जे आपल्याला  ओळखीचं वाटलं. कसलं अजबसं विचित्र पेंटिंग आहे हे. तो विचार करत राहिला. पण मला हे आवडतय. चैम सुतीने…. सुतीने… !

‘अरे देवा…! तो अचानक ओरडला. ‘हा तर माझा जुना छोटा मित्र आहे. पॅरीसमधील सगळ्यात दिमाखदार, शानदार दुकानात त्याचं पेंटिंग टांगलं गेलय. विचार करा, केवढा प्रतिभावान आहे माझा दोस्त! की होता म्हणू? ’

म्हातार्‍याने आपला चेहरा खिडकीच्या काचेच्या जवळ नेला. तो त्या मुलाचा चेहरा आठवू लागला आणि त्याला तो आठवलाही. केव्हाची गोष्ट आहे बरं ही? बाकीच्या गोष्टी इतक्या सहजपणे त्याला आठवल्या नाहीत. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. किती जुनी? वीस… कदाचित् तीस वर्षांपूर्वीची असेल. एक मिनिट… हं! पहिल्या महायुद्धापूर्वी १९१३ची गोष्ट आहे ही. हो! हेच वर्ष! आणि हा सुतीने…. कुरूप मुलगा… सुतीने. सुतीने कुरूप होता, पण त्याला तो आवडायचा. त्याच्यावर तो प्रेम करत होता. दुसर्‍या कुठल्याही कारणाने नाही, तो चित्रे काढत होता. केवळ चित्रे काढत होता असं नाही, तर उत्तम चित्रे काढत होता. याच कारणाने सुतीने त्याला आवडायचा.

किती सुरेख चित्रे काढत होता तो. आता त्याला काही गोष्टी स्पष्टपणे आठवू लागल्या  फाल्गुएरा शहरात, होय, तेच शहर. तेव्हा तिथे एक स्टुडिओ होता. तिथे केवळ एक खुर्ची होती. एक घाणेरडा सोफा होता. त्यावर तो चित्रकार मुलगा झोपत असे. तिथे दारूच्या नशेत धुंद झालेल्या लोकांच्या पार्ट्या होत. स्वस्तातली पांढरी दारू मिळत असे. प्रचंड भांडणे व्हायची. तिथे नेहमीच या मुलाचा उदास चेहरा दिसायचा. तो आपल्या कामाबद्दल सतत विचार करायचा. ट्रिओली विचार करू लागला. आता त्याला सगळं स्पष्टपणे आठवू लागलं. छोटयातलं छोटं तथ्य, त्याला त्या वेळाच्या काही वेगळ्या घटनांची आठवण करून देत होतं.

उदाहरण सांगायचं झालं, तर तिथे गोंदवण्याचा मूर्खपणा झाला होता. तसं पाहिलं, तर तो वेडेपणाच होता. ते कसं सुरू झालं? अरे… हं! एक दिवस तो श्रीमंत झाला होता. श्रीमंत झाला होता म्हणजे काय, तर त्या दिवशी त्याची नेहमीपेक्षा जरा जास्त कमाई झाली होती. असंच झालं होतं. मग त्याने दारूच्या खूप बाटल्या खरेदी केल्या होत्या. आता त्याला, तो दारूच्या खूप बाटल्या घेऊन स्टुडिओत शिरताना दिसत होता. मुलगा तेव्हा चित्रफलकाच्या समोर बसला होता. ट्रिओलीची पत्नी खोलीच्यामधे उभी होती. चित्रासाठी एक खास पोझ घेऊन ती उभी होती आणि सुतीने तिचं चित्र रंगवत होता.

‘आज रात्री आपण छोटीशी पार्टी करूयात. फक्त आपण तिघे…’ खोलीत शिरत ट्रिओली म्हणाला.

‘का रे बाबा? आपण कशासाठी पार्टी साजरी करणार आहोत?’ वर न बघताच मुलाने विचारले. ‘ तू आपल्या पत्नीला घटस्फोट देत आहेस का, म्हणजे ती माझ्याशी लग्न करू शकेल! हे तर कारण नाही ना पार्टी करण्याचं?’

‘नाही.’ ट्रिओली म्हणाला. ‘मला आज माझ्या कामाचे बरेचसे पैसे मिळाले आहेत.’

‘पण मला आज काहीच मिळालं नाही. तरीही आपण पार्टी करायला काहीच हरकत नाही! ’ ती तरुणी पेंटिंग पहाण्यासाठी त्याच्या जवळ आली. ट्रिओलीदेखील तिथे आला. त्याच्या एका हातात दारूची बाटली होती आणि दुसर्‍या हातात ग्लास.

‘ नाही.’ मुलगा ओरडला. ‘कृपा करा. नको. आत्ताच हे चित्र आपण पाहू नका. ‘त्याने झपाट्याने चित्रफलकावरून ते पेंटिंग काढले आणि भिंतीशी उभे करून ठेवले आणि त्याच्यापुढे तो उभा राहिला पण ट्रिओलीने ते पेंटिंग पाहिले होते.

तेच पेंटिंग तो आता काचेआड पहात होता.

त्यावेळी ट्रिओली त्या मुलाला म्हणाला होता, ‘हे अद्भूत आहे. तू बनवलेली सगळीच पेंटिंग्ज मला आवडतात. हे तर अप्रतिम आहे.’

‘समस्या ही आहे, की मी बनवलेली पेंटिंग्ज काही पौष्टिक नाहीत. ती खाऊन मी माझं पोट नाही भरू शकत!’ मुलगा उदास होऊन म्हणाला.

‘पण तरीही ती पेंटिंग्ज अप्रतीम आहेत.’ दारूने भरलेला एक ग्लास त्याच्या हातात देत ट्रिओली म्हणाला, ‘घे. पी. ही गोष्ट तुझे चित्त प्रसन्न करेल!‘ त्याने आजपर्यंत त्या मुलाइतका करूण आणि उदास चेहर्‍याचा माणूस बघितला नव्हता.

‘ मला आणखी थोडी दारू दे .’ मुलाने म्हंटले. ‘आपल्याला पार्टीच साजरी करायचीय, तर ती  त्या पद्धतीनेच साजरी करायला हवी. ’

तिथून सगळ्यात जवळ असलेल्या दुकानातून ट्रिओलीने दारूच्या सहा बाटल्या खरेदी केल्या आणि त्या घेऊन तो स्टुडिओत आला. मग तो तिथे बसला आणि सगळे आरामात दारू पिऊ लागले.

‘अतिशय श्रीमंत असलेले लोकच आशा तर्‍हेने पार्टी करू शकतात.’

‘हे खरं आहे.’ मुलगा म्हणाला.

‘जोसी तुला काय वाटतं? खरं आहे नं हे?‘

‘अगदी खरं आहे.’

‘ही अगदी उत्तम दारू आहे. आपण ही पितोय. आपण भाग्यवान आहोत.‘

हळू हळू अगदी व्यवस्थितपणे ते पीत होते. खूपशी दारू पिऊन झाल्यावर ते नशेने धुंद झाले. पण तरीही दारू पिण्याच्या त्या प्रक्रियेतील औपचारिकता ते निभावत होते.

‘ऐका.’ ट्रिओली म्हणाला. माझ्या मनात एक जबरदस्त कल्पना चमकतेय. मला एक पेंटिंग हवय.  छानदार पेंटिंग, पण मला वाटतं, ते पेंटिंग तू माझ्या त्वचेवर बनावावस.  माझ्या पाठीवर. मग माझी इच्छा अशी आहे, की तू बनवलेल्या पेंटिंगवर तू गोंदण कर. त्यामुळे ते नेहमीसाठी माझ्याजवळ राहील. ‘

‘तुला वेड लागलय.’ मुलगा म्हणाला.

‘ गोंदवायचं कसं, हे मी तुला शिकवेन. हे अगदी सोपं आहे. लहान मुलगादेखील हे करू शकेल. ‘

‘विक्षिप्त आहेस झालं. अखेर तुला  हवय तरी काय?’

‘मी तुला दोन मिनिटात सगळं शिकवेन.’

‘हे अशक्य आहे.’

‘तुला असं वाटतं का, की मी जे काही बोलतोय, ते मला कळत नाही.’

’हे बघ. मी एवढंच म्हणतोय, की तू आता नशेत धुंद झाला आहेस. तू काही तरी बरळतोयस तुझा हा विचार म्हणजे दारूच्या नशेची उपज आहे.‘ मुलगा म्हणाला.

‘मी दारूच्या नशेत आहे, हे खरं आहे. पण मी काही तरीच बरळत नाही. मी जे बोलतोय, ते मला नीट कळतय. तू माझ्या पत्नीचा या पेंटिंगसाठी मॉडेल म्हणून वापर कर. माझ्या पाठीवर जोसीचं एक भव्य चित्र काढ आणि ते गोंदव. ‘

हा काही चांगला विचार नाही आणि शक्यता अशीही आहे, की मी योग्य रीतीने गोंदवण्याचे काम करू शकणार नाही.’

‘ हे अगदी सोपं काम आहे. मी तुला दोन मिनिटात हे काम शिकवेन. मग तू स्वत:च बघशील. मला खात्री आहे, ते काम तू नीट करू शकशील. आता मी जाऊन गोंदण्याचे सगळे साहित्य घेऊन येतो.’

अर्ध्या तासात ट्रिओली जाऊन परत आला. ‘ मी सगळं जरूरीचं सामान घेऊन आलोय.

तो प्रसन्नतेने म्हणाला. त्याच्या हातात एक भुर्‍या रंगाची सुटकेस होती. ‘यात गोंदण्यासाठी आवश्यक असलेली सगळी उपकरणे आहेत.’ तो म्हणाला.

त्याने सुटकेस उचलून जवळच्या टेबलावर ठेवली. त्यात विजेवर चालणार्‍या वेगवेगळ्या आकाराच्या सुया, रंगीत शाईच्या बाटल्या होत्या. त्याने गोंदवण्याचे सगळे सामान बाहेर काढून टेबलावर ठेवले. त्याने सुईच्या तारेचा प्लग, विजेच्या सॉकेटमध्ये घातला. मग त्याने  उपकरण आपल्या हातात घेतले. स्वीच सुरू केला. नंतर त्याने आपलं जॅकेट उतरवलं आपली डाव्या हाताची बाही दुमडली.

‘आता बघ. माझ्याकडे नीट काळजीपूर्वक बघ आणि मी तुला दाखवतो, की हे काम किती सोपं आहे! मी माझ्या बाहूवर किती सहजपणे कुत्र्याचं चित्र काढतो. नीट बघ.’ मुलाच्या मनात कुतूहल निर्माण झालं.

‘ठीक आहे. आता मी तुझ्या बाहूवर याचा अभ्यास करतो.’ गोंदण्याची सुई घेऊन मुलगा ट्रिओलीच्या दंडावर निळ्या रंगाने गोंदवू लागला.

बघितलंस, हे किती सोपं आहे.’ ट्रिओली म्हणाला. ‘लेखणी आणि शाई याचा उपयोग करून चित्र बनवण्यासारखं हे आहे. दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे, की गोंदवण्याचे काम थोडे संथ गतीने करावे लागते.’

‘ ही काही फार मोठी गोष्ट नाही. तू तयार आहेस? आपण काम सुरू करूया?’

‘अरे, मॉडेल कुठे आहे?’ ट्रिओलीने विचारले.

‘जोसी तू इकडे ये. ‘ मुलगा अतिशय उल्हसित झाला होता. सगळं काही व्यवस्थितपणे करत होता. एखादं मूल खेळण्याशी खेळायला उत्सुक असतं, तसा तो उत्साहित झाला होता.

‘ ती कुठे उभी राहू दे? ‘

‘ त्या ड्रेसिंग टेबलाजवळ उभी राहू दे. ती कंगव्याने आपले पुढे आलेले केस,  नीट-नेटके करत असेल. तिचे केस असे खांद्याशी आलेले असतील. त्यातून कंगवा फिरवताना मी तिचं पेंटिंग करेन.’

‘छानच! तू जबरदस्त प्रतिभाशाली आहेस. ‘

‘प्रथम मी एक साधारणसे पेंटिंग करेन. मला ते आवडलं, तर त्यावर मी गोंदेन. ‘ मुलगा म्हणाला. एक रुंद ब्रश घेऊन तो ट्रिओलीच्या उघड्या पाठीवर पेंटिंग करू लागला.

‘आता हलू नकोस….. हलू नकोस.’ तो जोसीला म्हणाला. त्याने पेंटिंग सुरू केलं. तो हळू हळू इतका एकाग्र झाला, की  की त्या एकाग्रतेने दारूच्या नशेला निष्प्रभ केलं.

‘ठीक आहे. झालं आता. ‘ तो जोसीला म्हणाला.

तो साकाळ होईपर्यंत ट्रिओलीच्या पाठीच्या त्वचेवर काढलेलं पेंटिंग गोंदवत राहिला. ट्रिओलीला आता स्पष्ट आठवलं, जेव्हा शेवटी त्या कलाकाराने बाजूला सरून म्हंटलं, ‘ चला. झालं आपलं पेंटिंग’, त्यावेळी बाहेर प्रकाश पसरला होता. रस्त्यावरून लोकांच्या येण्या-जाण्याचे आवाज ऐकू येऊ लागले होते.

पोट्रेट – क्रमश: भाग १

मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह

हिन्दी अनुवादखाल हिंदी अनुवादक  – सुशांत सुप्रिय मो. -8512070086

मराठी स्वैर अनुवादपोट्रेट  अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ न आवडणार्‍या गोष्टी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

न आवडणार्‍या गोष्टी ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आई गं किती वेळा सांगितलं मी तुला मला कोथिंबीर आवडत नाही म्हणून? तरीही सगळ्या भाज्यात इतर पदार्थात बचकभर कोथिंबीर घातल्या शिवाय चैन पडत नाही तुला. प्रतिमा किंचाळलीच.

आई म्हणाली बाहेरची भेळ, मिसळ, पावभाजी खाताना बरं चालतं सगळं. आईलाच फक्त रागवायचं का? आणि उद्या लग्न झाल्यावर काय करणार? तिथं खाशीलच ना गुमान ? तिथे स्वत: स्वयंपाक करताना तूच स्वत: घालशील.

प्रतिमा आणि आईचे हे रोजचे म्हटले तरी वाद चालत. ती म्हणायची तेव्हा खावे लागणार म्हणून आता तरी मला मना सारखे खाऊ दे••• तर आई म्हणायची नंतर खावे लागेल म्हणून आता पासूनच नको का सवय करायला?

अशाच कुरबुरीत प्रतिमाचे लग्न झाले. तिला छान सासर मिळाले होते. सासू सासरे, दीर, नणंद असलेले सुशिक्षित , धनाढ्य सासर. प्रतिमाची सासू तशी मायाळू होती. 

प्रतिमाला कोथिंबीर आवडत नाही म्हणून ती तिच्यासाठी सगळे वेगळे काढून मग बाकीच्यांच्यासाठी पदार्थात कोथिंबीर घालायची.

काही दिवसांनी प्रतिमालाच स्वत:ची लाज वाटू लागली आणि हळूहळू ती कोथिंबीर खाऊ लागली; नव्हे तिला ती आवडू लागली. 

अजूनही बर्‍याच अशा गोष्टी होत्या ज्या तिला आवडत नव्हत्या त्या तिच्या आवडीच्या बनल्या. याला कारणही तिची सासूच होती. सासूने सांगितले लग्न ठरवायच्या वेळी जेव्हा तिच्या घरी पहिल्यांदा प्रमोद जेवायला आला होता तेव्हा त्यांच्याघरी भरल्या वांग्याचा बेत होता. प्रमोदला वांगेच आवडत नव्हते म्हणून त्याने सगळ्यात आधी ती भाजी संपवली की जेणेकरून आवडीचे पदार्थ नंतर नीट खाल्ले जातील. पण झाले उलटेच प्रमोदच्या ताटातील भाजी संपलेली पाहून त्याला पुन्हा ती वाढली. याने परत ती खाऊन टाकल्यावर जावईबापूंना वांगे फार आवडते दिसते असे वाटून पुन्हा पुन्हा आग्रह करून वांग्याची भाजी खाऊ घातली. एवढेच नाही तर त्या नंतर जेव्हा जेब्हा प्रमोद तिकडे जेवायला आला तेव्हा तेव्हा लक्षात ठेऊन वांग्याची भाजी फार आवडते वाटून तीच भाजी खावी लागली. आता मात्र प्रतिमाला हसू आले आणि आपल्यासारखीच गत प्रमोदची झाली हे ऐकून गंमत वाटली. पण प्रमोदने हे कुणाला कळू न देता चेहर्‍यावर तसे दाखवू न देता खाल्ले याबद्दल कौतूक अभिमान पण वाटला. 

त्याने आपल्यासाठी स्वत:ला बदलले मग आपणही बदलायला पाहिजे याची जाणिव झाली. आणि बर्‍याच गोष्टिंशी तडजोडही केली.

पण म्हणतात ना काहीही झाले तरी शेवटी सासू ती सासूच असा ग्रह प्रतिमाचा झालाच. कारण सणवार असले, कोणाकडे जायचे असले की प्रतिमाची सासू म्हणायची ड्रेस जिन्स काय घालतेस? साडी नेसायची. नुसते बारीक मंगळसूत्र काय? चांगले ठसठशीत आहे ना•• ते घाल•• कपाळाला टिकली नाही? ती आधी लाव••• हातात बांगड्या नकोत का? घाल गंऽऽ .

अशा एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून सासूला काय आवडत नाही हे प्रतिमाला कळायला लागले. पण सासूचे मन  आणि मान दोन्ही राखण्यासाठी ती तसे तसे नाईलाजाने का होईना पण वागत होती.

बघता बघता प्रतिमाच्या लग्नालाही २५ वर्ष झाली. तिची २२ वर्षाची मुलगी प्रिती आजीची फार लाडकी होती. लग्नाच्या २५व्या वाढदिवसा निमित्ताने छोटेखानी फंक्शन ठेवले होते. प्रितीने जिन्स शॉर्ट टॉप घातले होते. मग त्याला सूट होत नाही म्हणून कपाळाला टिकली नाही, गळ्यात कानात काही नाही हातात बांगड्या देखील नाहीत. हे पाहून प्रतिमाच प्रितीला रागवली आणि निदान आज तरी हे घाल की म्हणू लागली. 

तशी आजी म्हणाली, अगं तिला नाही ना आवडत तर नको करू बळजबरी. राहू दे अशीच. काही वाईट नाही दिसत. आमची प्रिती आहेच छान.

अहो पण आई तुम्हाला हे चालणार आहे का?••• प्रतिमाने विचारले आणि सासूबाई म्हटल्या अगं आताच त्यांना मनमुराद जसे हवे तसे जगू द्यायला हवं नाही का? नाहीतरी हे सगळं घालायचा कंटाळाच येतो. कधीतरी रहावं असचं . मेघाविन मोकळे सौंदर्य पहायला सुद्धा कोणीतरी टपलेले असतवच की•••

शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी काळ हेच औषध असते. कालौघात अशाच न अ‍ावडणार्‍या गोष्टी आवडू लागतात हेच खरे!!

प्रतिमाला नव्या सासूचा शोध लागला आणि अचानक सासूबाईपण जास्त म्हणजे

आईपेक्षाही जास्त आवडू लागल्या होत्या.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्रायसिस मॅनेजमेंट – भाग-2 ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ क्रायसिस मॅनेजमेंट – भाग-2 ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

(सुशांत आतल्या खोलीत बसून शांतपणे लिहीत होता. ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.) – इथून पुढे 

सुरेशला यायला उशीर झाला.

‘‘अहो, मी तुम्हाला फोन केला होता. निरोप ठेवला होता. ”

‘‘मी बाहेरच्या बाहेरच आलो; पण कशाला केला होतास फोन?”

‘‘अहो, सुशांतची प्रयोगाची वही हरवली. उद्या… ”

पुढचं ऐकूनही न घेता त्याने ओरडायला सुरवात केली.

याला आधी आपल्या वस्तू सांभाळायला नको. दप्तर एकीकडे, कंपास एकीकडे, घरभर पसारा पडलेला असतो. व्यवस्थितपणा म्हणून नाहीच अंगात. तू आणखी लाड कर त्याचे… ”

‘‘अहो, ऐका तरी. त्याने नाही हरवली वही. त्याने बाईंना दिली होती गेल्या आठवड्यात. त्यांच्याकडून हरवली. ”

‘‘काय? बाईंकडून हरवली? कोण बाई आहेत त्या? प्रिन्सिपलकडे कम्प्लेन्ट केली पाहिजे. मुलांच्या वह्या हरवतात म्हणजे काय? हेच संस्कार करणार मुलांवर? एक्सप्लेनेशन मागा म्हणावं त्यांच्याकडून. आज वही हरवली, उद्या पेपर हरवतील. आणि सांगतील गठ्ठ्यात पेपर नव्हता त्याअर्थी बसलाच नसणार परीक्षेला. ”

बाबांचा आवाज ऐकून धावत आलेला सुशांत रडवेला झाला होता. सुधानं त्याला खुणेनंच आत जाऊन लिहायला सांगितलं.

‘‘अरे बापरे, प्रयोगाची वही नसेल तर प्रयोगाची परीक्षाही जाणार? म्हणजे वही आणि प्रयोग – दोन्हींचे मार्क गेले. शास्त्रात कमी मार्क म्हणजे पुढच्या वर्षीही त्याची ‘अ’ तुकडी गेली. म्हणजे पुढच्या वर्षीही तो मार खाणार. त्याचा परिणाम पुढे एसएससीलाही कमी मार्क मिळणार म्हणजे चांगल्या कॉलेजात ऍडमिशन नाही. चांगलं कॉलेज नाही म्हणजे बारावीलाही बोंबला. मग काय? व्हा कसंबसं बीएससी! पुढे नोकरी मिळतानाही मारामार… ”

जेवणं झाली तरी सुरेशची बडबड चालूच होती.

‘‘अहो, उद्या लवकर निघणार ना तुम्ही?”

‘‘कोणी सांगितलं?”

‘‘सुशांतच्या शाळेत जाणार आहात ना?”

‘‘कशाला?”

‘‘प्रिन्सिपलना भेटायला. ”

‘‘असल्या हजामती करायला मला अजिबात वेळ नाही. तूच जा आणि चांगली सालटी काढ त्यांची. ”

मागचं आवरून बिछाने घालून सुधा सुशांतच्या शेजारी येऊन बसली.

‘‘आई, तू मॅडमना तुंगारेबाईंचं नाव नको सांगूस. तुंगारेबाई खूप चांगल्या आहेत. मॅडम त्यांना रागावतील. शिवाय तू तक्रार केल्याचं बाकीच्या बाईंना कळलं तर त्या माझ्यावरच वैतागतील आणि मला मुद्दामहून कमी मार्क देतील.

‘‘मी मॅडमना भेटायला नाही येणार, ” सुधा सुशांतच्या केसातून हात फिरवत म्हणाली, ‘‘फक्त सगळं व्यवस्थित होतं की नाही ते बघायला येणार. शाळेच्या बाहेरच थांबीन मी. तुंगारेबाईंनी वहीवर सह्या केल्या, की माझं समाधान होईल. नाहीतर दुपारी तू घरी येईपर्यंत माझा जीव टांगणीला लागणार. ”

सुशांतचं समाधान झालं.

‘‘किती राह्यलंय रे बाळा?”

‘‘दोनच पानं आहेत आता. ”

‘‘मग झालं?”

‘‘हो. ”

‘‘आणि आकृत्या?”

‘‘मघाशी लिहून लिहून कंटाळा येत होता ना. तेव्हा आकृत्या काढून घेतल्या. त्यामुळे आकृत्याही संपल्या आणि झोपही गेली. ”

‘‘माझं सोनुलं ग ते. ” सुधाने त्याचा पापा घेतला.

सुशांतने लिहायला सुरवात केली.

‘‘आई, झालं पुरं. ”

‘‘अरे वा रे माझ्या छाव्या! बघ, अर्ध्या दिवसात अख्खी वही लिहून काढलीस रे सोन्या. ”

‘‘कव्हर घालशील तू? आणि उद्या लवकर उठव हं नक्की. ’’

सुधानं सुशांतच्या हाताला तेल लावून मालिश केले. गाढ झोपलेल्या बाळाचा पापा घेतला.

वहीला कव्हर घालून त्यावर नाव घालून ती त्याच्या दप्तरात ठेवली.

‘तसा त्रास पडला माझ्या बाळाला, पण उद्या परीक्षेला जाताना टेन्शन नसणार. ’

सकाळी शाळेच्या दारातच तुंगारेबाई भेटल्या. धावत जाऊन सुशांतनं त्याची प्रयोगाची वही आणि झेरॉक्स त्यांच्या हातात दिली.

‘‘अरे वा! अख्खी वही लिहून काढलीस तू?”

‘‘होय बाई. ”

पाठीवर मिळालेल्या बाईंच्या शाबासकीने आदल्या दिवशीचा सगळा शीण पळून गेला.

बाई स्टाफरूममध्ये गेल्या. पाच मिनिटात मार्क आणि सह्या आटपून त्यांनी वही सुशांतच्या हातात दिली. त्यापूर्वी बाहेर उभ्या असलेल्या सुधाला वही उंचावून खूण करायला विसरल्या नाहीत त्या.

सुधा शांत मनानं घरी आली.

‘‘भेटलीस प्रिन्सिपलला? चांगला दणका दाखवला पाहिजे त्या बाईला. ”

सुरेशकडे लक्ष द्यायला वेळ तरी कुठे होता तिला? ती घाईघाईत त्याच्या नाश्त्याच्या, डब्याच्या तयारीला लागली. सुरेश ऑफिसात गेल्यावर तिनं मस्तपैकी चहा केला. एक एक गरमगरम घोट घेत कालच्या दिवसाचा समाचार घ्यायला सुरवात केली. काल हे संकट येऊन कोसळल्यावर ती कशी भेदरून गेली, ‘त्यां’ना फोन करण्याचा किती प्रयत्न केला, ‘ते’ येऊन संकटातून सोडवणार म्हणून…

पण ‘ते’ आल्यावर तर त्यांनी ओरडायला सुरवात केली. परीक्षेला बसायला मिळणार नाही म्हटल्यावर तर दादाच्या भाषेत सांगायचं तर ‘पॅनिकी’च झाले. बडबडत बडबडत पार त्याच्या नोकरीपर्यंत पोचले.

एवढं करून काय? तर उपाय सांगितलाच नाही. उलट प्रिन्सिपलशी भांडून परिस्थिती आणखीच बिकट झाली असती. बिचा-या सुशांतची तर वाटच लागली असती. त्याउलट आपण किती शांतपणे, न चिडता; पण तातडीनं योग्य निर्णय घेतले आणि त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी केली.

मग तिनं मागच्या गोष्टीही तपासल्या.

लहानपणी सुशांतला ताप आल्यावर तिनं मिठाच्या पाण्याच्या घड्या घातल्या होत्या. सुरेश मात्र ताप कसा आला, याचीच कारणमीमांसा करत बसला होता.

मागे सुधा मावसबहिणीच्या लग्नाला निघाली होती. नेहमीप्रमाणे सुरेश बाहेरगावी गेला होता. चार – पाच वर्षांच्या सुशांतला घेऊन सुधा जाणार होती. तसा तीन तासांचाच प्रवास होता. बसचं रिझर्व्हेशनही केलं होतं.

पहाटे लवकर उठून सगळं आटोपून सुधा निघाली. दाराला कुलूप लावलं आणि सुशांतला ‘शी’ झाली. मग पुन्हा घर उघडून सुशांतचं सगळं झाल्यावर बस स्टेशनवर पोचेपर्यंत बस निघून गेली होती.

सुधा रडवेली झाली. याच्या नंतरची बस अडीच तासांनी म्हणजे लग्न चुकणार.

ती कंट्रोलरकडे गेली – ‘‘सर, आता सुटलेली बस मला पुढच्या स्टॉपवर मिळू शकेल का?”

‘‘का? काय झालं?”

मग तिने थोडक्यात सगळं सांगितलं.

‘‘ही समोरची बस आत्ता सुटतेय. ही मधल्या रस्त्याने जाते. त्यामुळे त्या बसच्या आधी पोचेल. तुम्ही तुमचे सीट नंबर सांगा. मी त्या डेपोमध्ये फोन करून तुम्ही येइपर्यंत ती बस थांबवून ठेवायला सांगतो. ”

आणि खरंच, ती बस पुढच्या स्टॉपला गाठून सुधा लग्नाआधी व्यवस्थित पोचली.

उगीच चेष्टेचा विषय व्हायला नको म्हणून हॉलमध्ये ती कोणालाही – अगदी आईलाही काही बोलली नाही.

दोन दिवसांनी राहवलं नाही म्हणून सुरेशला सांगितलं.

‘‘एवढं काय अडलं होतं नसते उपद्-व्याप करायचं? तू गेली नसतीस तर काय लग्न लागायचं राहणार होतं?”

तेव्हा सुधा हिरमुसली होती; पण आज तिला स्वत:च्या समयसूचकतेचं कौतुक वाटलं. खरंच किती पटापट निर्णय घेतले आपण!

सुधानं आपल्या जागी आई, सासूबाई, दादा… एकेकाला उभं केलं, पण कोणीच एवढं शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेऊ शकलं नसतं. सुरेशचं पितळ तर उघडं पडलंच होतं. समोरच्या आरशात सुधाला दिसली तेजस्वी, ‘स्व’ ची ओळख पटलेली सुधा.

ती उठली. आरशाच्या जवळ गेली. ‘त्या’ सुधाच्या डोळ्याला डोळा भिडवून चक्क इंग्रजीत म्हणाली – ‘I am a confident lady. I can take my own decisions. ’

– समाप्त – 

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print