मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मातीची ओढ… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मातीची ओढ… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

किसनरावांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. वीस वर्षे तरी झाली असतील, त्या गोष्टीला. एका दसरा सणाला गावाकडचा वाडा मुलं, सुना, जावई आणि नातवंडं यांनी गजबजून गेला होता. गप्पागोष्टींना रंग चढला होता. हरिभाऊंच्या नातवंडांनी कल्ला करीत आजोबांना विचारलं होतं, “आजोबा, वडिलार्जित मिळालेलं चार एकराचं रान तुम्ही आपल्या हिंमतीवर बारा एकरापर्यंत वाढवलं आहे म्हणून ऐकलंय. आम्हाला सांगा ना त्याबद्दल.” 

हरिभाऊ मिशीतच हसत म्हणाले. “होय, मी हिंमत केली होती कारण मला फकस्त शेतीचाच नाद होता. काय झालं, त्या काळात शहरात कारखाने उभे राहायला लागले तेंव्हा गावाकडच्या शेतकऱ्यांचं लक्ष शहरातल्या रोजगाराकडे गेलं. कधी कधी वर्षभर राबूनदेखील हातात काहीच पडायचं नाही. दरमहा हमखास मिळणाऱ्या पैश्याच्या मोहापायी त्यांचं शेतीकडे दुर्लक्ष होत गेलं. शहरातच राहायचं असल्यानं त्यांना शेती विकावी लागली. मी मात्र मिळेल तेंव्हा पैसा गाठीला बांधत होतो. आजच्या तरूणांच्यासारखं आम्हाला बुलेट गाड्या मिळायच्या नाहीत. खिल्लारी बैलांची घुंगराची गाडी म्हणजेच आमच्यासाठी चैन होती.” 

इतक्यात आजीनं नातवांना जेवायला बोलावलं. सदरेवर फक्त सदाशिव, काशिनाथ आणि किसन बसले होते. हरिभाऊ म्हणाले, “तुम्ही भावंडं असंच गुण्यागोविंदाने राहा. बहिणीला कधी अंतर देऊ नका. ही बारा एकराची शेती चौघात वाटून घ्या. पंचांना कधी बोलवू नका. एवढंच माझं सांगणं आहे.” 

सदाशिव लगेच म्हणाले, “आबा, अशा निर्वाणीच्या गोष्टी आता कशाला करताय?” 

हरिभाऊ म्हणाले, “पिकलं पान कधी गळून पडंल सांगता यायचं नाही. आज तुम्ही एकत्र जमलात म्हणून मनातलं बोलून टाकलं.”

किसन म्हणाला, “आबा, शेतात भाऊच राबतात. मी कुठे शेती करतोय? तुम्ही मला शिकवलंत हेच खूप झालं. माझाही वाटा त्यांनाच द्या.”

“अरे, मी सगळ्यांनाच शाळेत पाठवलं होतं. ते शिकले नाहीत. किसन तू शिकलास. तुझ्या कर्तबगारीने आता हेडमास्तर झालास. त्यात तुझी मेहनत आहे. एक बाप म्हणून सगळ्या मुलांना समान वाटा देणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या माघारी तुझा हिस्सा कुठल्याही भावाला देऊन टाक. पण मिळालेली ही शेतजमीन मात्र बाहेरच्या कुणाला कधी विकू नकोस, एवढंच माझं कळकळीचं सांगणं आहे.”

किसनरावांना हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कालच जावई अविनाश आणि कन्या विशाखा त्यांना भेटायला आले होते. अविनाशने क्लिनिक उघडायचा विचार बोलून दाखवला. बॅंकेचे लोन मिळणार होते पण मार्जिनसाठी पांच लाख रूपये पाहिजे होते. सुपुत्र सुधीरनेही फ्लॅटच्या मार्जिनसाठी सात लाख रूपयांची मागणी केली होती. ‘आमच्या हातून कधी शेती होणारच नाही तर गावाकडे असलेली शेतजमीन विकून टाकावी’ असं सुधीर आणि विशाखा या दोघांचं मत पडलं होतं. 

गेल्या वीस वर्षात पुलाखालून किती पाणी वाहून गेलं आहे. आबा गेले, आई गेली. आपली मुलं सुधीर आणि विशाखा शिकून सवरून मोठी झाली. किसनरावांचे प्राव्हिडंट फंडाचे पैसे दोन्ही मुलांच्या लग्नांत संपले होते. मुलीचं अन मुलाचं लग्न पार पाडताच आपलं कर्तव्य संपलं असं समजून सुमन एकट्याला अर्ध्यावर सोडून अचानक निघून गेली. मुलगा सुधीर एका प्रायव्हेट फर्ममध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे. कन्या विशाखादेखील चांगल्या नोकरीत होती. पण तिच्या पहिल्या डिलीव्हरी नंतर जावयाने तिला नोकरी सोडायला लावली होती. प्रेमळ जावई लाभल्याने कन्येची चिंता नव्हती. मुलांच्या पुढे हात पसरायला लागू नयेत इतपत तुटपुंजी का होईना, पेन्शन मिळत होती. 

आता शेतजमीन विकायचं म्हटल्यावर किसनराव पेचात पडले. सकाळची बस पकडून ते गांवाकडे निघून गेले. 

गावात पाऊल टाकताच किसनराव भावाकुल झाले. इतकी वर्षे आपल्याला या मातीची कशी भूल पडली होती याची खंत वाटली. झपझप पावलं टाकीत वाड्याजवळ आले. अंगणात तुळशी वृंदावन पाहून त्यांना आईची आठवण आली. 

किसनरावांना असं अनपेक्षितपणे आलेलं पाहून दोन्ही भाऊ आनंदून गेले. दुपारची जेवणे झाल्यानंतर किसनरावांनी येण्याचे कारण सांगत सदाभाऊंच्या कानांवर सगळी हकिगत घातली. 

सदाभाऊंचा मुलगा प्रशांत एका महाविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. सदाभाऊ म्हणाले, “आज शनिवार आहे, सांजच्याला प्रशांत येईल तेव्हा त्याच्याशी बोलू. सध्या शेताचं काम प्रशांतच बघतो. अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे द्राक्ष पीक परवडेनासे झालं होतं म्हणून प्रशांतने गेल्या वर्षी द्राक्षबाग काढून टाकली होती.   

बाजारपेठेची मागणी आणि हंगामानुसार वेगवेगळ्या भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन करतो. आमच्या तिघांच्या हिश्श्यातल्या शेतीपैकी सहा एकर शेतजमीनीत चार एकर टोमॅटो, एक एकर वांगी, एका एकरात कांदा, घेवडा आणि चारापिकांची लागवड केलीय. 

गेल्या वर्षी टोमॅटोपासून एकरी पंचेचाळीस हजार तर वांग्यातून सत्तर हजाराचा नफा निघाला. याशिवाय हंगामानुसार कोबी, फ्लॉवर, ज्वारी पिकांची लागवड करतो. प्रशांत दर रविवारी येतो आणि पुढील आठवड्याचे नियोजन करून जातो. वेळोवेळी फोनवरूनदेखील आमच्याशी संपर्कात असतो, त्यामुळे वेळेवर निर्णय घेणे शक्य होते.” 

संध्याकाळी प्रशांत आला. किसनरावांना पुतण्याचा अभिमान वाटला. प्राध्यापक असूनदेखील त्याचं शेतीवरचं प्रेम कौतुकास्पद होतं. प्रशांतची पाठ थोपटत किसनराव म्हणाले, “प्रशांत तू ग्रेट आहेस. लोकांनी शेतीपुढे हात टेकले आहेत. तू मात्र चांगलीच प्रगती करतो आहेस.” 

“काका, शेतीपुढे हवामानातल्या बदलांचे मोठे आव्हान नेहमीच असते. बाजारभावात सातत्याने चढउतार होतच असतात. पिकांना अपेक्षित भाव मिळत नाही. हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे. या स्थितीत आम्ही बहुपीक पद्धतीकडे वळलो. कारण काही पिकांना जरी चांगला भाव मिळाला तरी इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊन जाते. बाजाराचा अभ्यास करून लागवडीची वेळ ठरविण्यावर आणि आंतरपीक पद्धतीच्या अवलंबावर भर देतो. 

काका, शेतीत ताळेबंद महत्वाचा असतो. बाजारभावावर आपले नियंत्रण नसते हे जरी खरं असलं तरी मी प्रत्येक पिकाचं अंदाजपत्रक तयार करतो. 

पिकानुसार जमा खर्चाचा हिशेब नीट ठेऊन अनावश्‍यक खर्च टाळतो. शेतीत आर्थिक व्यवस्थापन महत्वाचे असते. शेतातून आलेल्या उत्पन्नाचा उपयोग उत्पादक कामांसाठीच खर्च करतो. 

काका, तुम्ही म्हणत असाल तर या वर्षी तुमचंही रान करायला घेतो. मी जमाखर्चाचा हिशेब ठेवीन. सगळा नफा तुम्हालाच देईन. सांगा, मी तयार आहे.” 

प्रशांतच्या म्हणण्यावर किसनराव अंतर्मुख झाले. ‘आपण शेतजमीन पडीक ठेवून, फक्त शाळा एके शाळा करत बसलो,’ याबद्दल त्यांना स्वत:चीच कीव वाटली. ते काही बोलले नाहीत. 

सदाभाऊंनी किसनरावांची खरी अडचण प्रशांतच्या कानांवर टाकली. सदाभाऊंनी रात्रीच फोन करून आक्काला, सुधीरला आणि विशाखाला गांवाकडे बोलवून घेतलं. वाड्यावर बैठक बसली. पीक नियोजन आणि योग्य तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधला तर शेती व्यवसाय कशी किफायतशीर ठरू शकते हे प्रशांतने सांगण्याचा प्रयत्न केला. पण एखाद्याला सोन्याचे अंडे खाण्यापेक्षा कोंबडीच कापून खायची असेल तर त्याला कोण काय करणार?  

— क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-3 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-3 ☆ श्री मंगेश मधुकर 

(पुन्हा पुन्हा फोन वाजत होता. इतक्यात दारावरची बेल वाजली.आईनं दार उघडलं तर समोर…) इथून पुढे — 

आईनं दार उघडलं तर समोर विनीतचे ममी आणि पपा.त्यांना पाहून आईचा पुतळा झाला.ती फक्त एकटक बघतच राहिली.बाबांनी पुढे येऊन परिस्थिती सावरली.त्या दोघांच्या अवेळी,अनपेक्षित येण्यानं नमा,आई-बाबांच्या मनातली धडधड वाढली.

मध्यरात्र उलटून गेली तरी विनीत मोबाईलवर टाइमपास करत होता. तितक्यात मित्रानं  पाठवलेली त्याची अन नमाची क्लिप पाहून विनीतची झोप उडाली. घशाला कोरड पडली. हात-पाय लटपटायला लागले. मित्रांनी कॉल केले परंतु भीतीपोटी रिसिव्ह केले नाही. मेसेजेस वाचून घाम फुटला. अजून टेंशन नको म्हणून फोन स्वीच ऑफ केला. खूप घाबरला. डोक्यात नको त्या विचारांचं थैमान सुरू झालं. बेचैनी वाढली. नक्की काय करावं हेच कळेनासं झालं. येरझरा मारताना स्वतःशीच बोलायला लागला “झक मारली, बागेत गेलो अन नको ते करून बसलो. गावभर बोभाटा झाला. तोंड दाखवायला जागा राहिली नाही. नमा एक्साईट झाली पण मी कंट्रोल करायला हवा होता. इज्जतची माती झाली. ममी-पपांना काय वाटेल. हा कलंक आयुष्यभर सोबत राहणार. ज्यानं क्लिप केली त्याच्या xxx xx, xxxxx, एकदा भेटू दे, क्सक्सक्सक्स ची मजा झाली मी मात्र बरबाद झालो”रा ग अनावर झाल्यानं विनीतला खूप जोरजोरात ओरडावसं, रडावसं वाटत होतं पण तेही जमत नव्हतं. ममी-पपांना सामोरे जायची हिंमत नव्हती म्हणून रूमच्या बाहेर आला नाही. तिकडे क्लिप पाहून ममी-पपांना सुद्धा जबरदस्त धक्का बसला पण त्याहीपेक्षा विनीतच्या विचित्र वागण्यानं दोघं हादरले. दोघांनी खूप समजावलं पण काहीही उपयोग झाला नाही. सैरभैर विनीतला पाहून त्यांचाही धीर सुटत चालला होता त्याचवेळी नमाचा नवीन व्हिडिओ पाहून ममी ताबडतोब विनीतच्या रूममध्ये गेली. (संडे डिश™) 

“विनू,काय रे ही अवस्था.सांभाळ!!”

“ममा,काय करू सुचत नाहीये.डोकं पार आऊट झालंय”

“होऊन गेलेल्या गोष्टीवर जास्त विचार केल्यावर फक्त त्रासच होणार.”

“तोच तर होतोय”

“असं चडफडत स्वतःवर राग काढण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जा”

“हिंमत होत नाहीये.लोक काय म्हणतील”

“काहीही केलं तरी लोक बोलणारच.तुलाच यातून बाहेर याव लागेल.किती दिवस लपून बसणार.”

“लपून??ममा,काहीही काय बोलतीयेस.काय सहन करतोय ते माझं मला माहित.”

“आणि आमचं काय?तुझ्या इतकाच त्रास सहन करतोय”

“काहीच्या काही होऊन बसलयं.पार वाट लागली” 

“असं हातपाय गाळून चालणार नाही.तू फक्त स्वतःचा विचार करतोयेस.पुरुष असून तुझे हे हाल तर नमाची काय अवस्था असेल याचा विचार कर.अशा घटनेत जास्त बदनाम बाईच होते.”

“मग पुरुषांचं काय???त्यांना होणाऱ्या त्रासाचा कोणी विचारच करत नाही.माझा त्रास हा सुद्धा जगाच्या दृष्टिनं चेष्टेचाच विषय…”

“नमाशी बोल.याक्षणी तुम्ही एकमेकांच्या सोबत असलं पाहिजे.तू एवढा डिस्टर्ब तर तिचं काय झालं असेल.”

“माझ्यापेक्षा तुला तिचीच काळजी वाटतीय.”

“असं नाहीये.आधी स्वतःची कीव करणं बंद कर.त्याच त्या विचारांच्या रिंगणात गोल गोल फिरतोयेस.दोघांना झटका बसला पण तिनं यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला”.(संडे डिश™)

“म्हणजे,आता तिनं काय केलं”ममीनं नमाचा व्हिडिओ विनीतला दाखवला.त्यानं पुन्हा पुन्हा पाहिला अन अचानक ममीच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागला.

“साचलेलं वाहून गेलं.आम्हां बायकांना सहज जमतं पण वाटलं तरी रडता न येणं हाच पुरुषांचा प्रॉब्लेमयं.चल,नमाकडे जाऊ” ममी पाठीवर थोपटत म्हणाली.

विनीत आला पण नमासमोर जायची हिंमत होत नव्हती म्हणून कारमध्येच थांबला.ममी-पपा घरात गेले.सगळे हॉलमध्ये असले पण एकमेकांच्या नजेरेला नजर देणं टाळत होते.काय बोलावं,सुरवात कशी करावी हे कोणालाच सुचत नव्हतं.सगळेच अवघडलेले.विचित्र अशा शांततेत काही क्षण गेल्यावर ममी नमाच्याजवळ बसत म्हणाल्या “तुझं खूप कौतुक.धीराची आहेस.तुझ्या हिमतीमुळे मोठा आधार मिळाला.माझ्या इमोशनल लेकासाठी अशीच बायको पाहिजे.जिंकलंस शाबास सूनबाई!!”नमाच्या डोळ्यात पाणी तरारळं.(संडे डिश™) 

“विचित्र परिस्थितीला आपण सामोरे जातोय.काय करावं सुचत नव्हतं.तुमच्यासारखीच आमची अवस्था.कधी कल्पना केली नाही असे अनुभव आले.व्हिडिओ पाहिला.खूप धैर्य लागतं.तिघांचं कौतुक करायला आलोय.”ममी 

“विनीत कसा आहे”नमा. 

“ठीक!!खाली गाडीत बसलाय.जास्त काही सांगत नाही पण आत्ता त्याला तुझी गरज आहे.”

नमा पार्किंगमध्ये गेली.तिला पाहून विनीत गडबडला.चूळबुळ वाढली. 

“शांत हो.मी भांडायला आली नाहीये.”

“कशीयेस”विनीत

“आय एम ओके,हळूहळू सावरतेय.तुझं काय”

“नॉट ओके,खूप डिस्टर्ब आहे”

“ते लक्षात आलं.फोन अजूनही बंद”

“हो,लोक फार छळतात”

“बिनधास्त फोन चालू कर.डिलिटचं बटण आहे ना.मग कसली काळजी”

“काहीही घाणेरडं लिहितात”

“वाचायचं नाही.काही दिवस चिडवतील नंतर विसरून जातील”

“नाही ती क्लिप म्हणजे परमनंट टॅटु”

“होऊ दे.जे झालं ते झालं.सगळे करतात तेच केलंयं”नमा 

“तुला काहीच वाटत नाही”

“खूप सहन केलं.टोकाचा निर्णय घेतला.सुदैवाने वाचले नंतर ठरवून यातून बाहेर पडले.”

“मी अजूनही तिथेच अडकलोय”

“स्वतः प्रयत्न केल्याशिवाय सुटका होणार नाही.मी केलेला व्हिडिओ पाहिलास”

“येस,त्यामुळेच तर भेटायला आलो.त्यामुळेच उभारी मिळाली.तू खरंच भारीयेस.” (संडे डिश™)

“आता,पुढे काय?”

“म्हणजे समजलं नाही,ए बाई मला सोडून बिडून द्यायचा तर विचार नाहीये ना.” नमा मनापासून हसली.  

“पोलिसांकडे तक्रार करू.सोबत येणार.”

“येस,त्या हलकटाला सोडायचं नाही” 

“असले लोक भेकड,पळपुटे असतात सहजासहजी सापडणार नाहीत तरीही प्रयत्न सोडायचे नाहीत परंतु सगळी शक्ती त्यांना शोधण्यात लावायला नको.आपल्या आयुष्यात अजून खूप चांगल्या गोष्टी आहेत.”

“तुला संकटाच्या वेळी एकटं सोडलं याचा फार मोठा गिल्ट आहे.आय एम रियली सॉरी!!” 

“इट्स ओके,खरं सांगू.मलाही खूप राग आलेला पण वस्तुस्थितीच अशी होती की दोघांची अवस्था सारखीच.असल्या घटनेत बदनामी आणि सहानुभूती ही बाईच्या वाट्याला जास्त येते.पुरुष मात्र दुर्लक्षीला जातो.जो बीत गई,सो बीत गई”

“या क्लिपमुळं आपलं नातं हॅंग झालंय”विनीत भावुक झाला.त्याचा हात हातात घेत नमा म्हणाली “मग रिस्टार्ट करु” (संडे डिश™)

– समाप्त – 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-2 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-2 ☆ श्री मंगेश मधुकर 

(आणि दुसरं टोक गळ्याभोवती अडकवून टिपॉयवर उभी राहिली आणि मोठ्यानं ‘धाडकन’ आवाज आला??????)  इथून पुढे — 

“नमेssssss” बाबा जोरात ओरडले.आई-बाबांनी तिला खाली उतरवून पाणी दिलं आणि अचानक आईनं नमाच्या खाडकन थोबाडीत मारली.

“एवढयासाठी जन्म दिला होता का?जीव देत होतीस.आधी आम्हांला मारून टाक मग काय करायचं ते कर”आई संतापानं फणफणत होती.

“नमा,असलं काही करण्याआधी आमचा विचार केला नाहीस”

“तुम्हांला अजून त्रास होऊ नये म्हणून तर…..”

“तुला काही झालं असतं तर आम्ही राहिलो असतो का?”डोळ्याला पदर लावत आई म्हणाली तेव्हा बाबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं.नमा दोघांना घट्ट बिलगली.

“जे झालं ते झालं.वचन दे पुन्हा असा वेड्यासारखा विचार करणार नाही”

“प्रॉमिस!!पण सहन होत नाहीये.आयुष्याच्या रंगीबिरंगी चित्रावर अचानक काळा रंग ओतलाय असं वाटतंय.”

“सगळं व्यवस्थित होईल.हिंमत सोडू नकोस.जे घडलं त्याचा धक्का इतका मोठा होता की आम्ही कोलमोडलो.काहीच सुचत नव्हतं.म्हणून तुझ्याशी बोललो नाही.डोकं शांत झाल्यावर पहिला विचार डोक्यात आला की तुझी काय अवस्था असेल म्हणून धावत आलो.देवाची कृपा म्हणूनच वेळेत पोचलो

“तू एकटी नाहीस.आम्ही सोबत आहोत”आई.

“क्लिप व्हायरल झाली हे बदलू शकत नाही पण आपण गप्प बसायचं नाही.ज्यानं हे केलय त्याला शोधून काढू. पोलिसांकडे तक्रार करू”

“बाबा,पोलिसांकडं गेलं तर अजून बदनामी,अजून त्रास”

“काहीच केलं नाही तर होणारा त्रास त्यापेक्षा जास्त आहे.”

“पण बाबा”

“तुझी अवस्था समजतेय तरीही शांत डोक्यानं विचार कर मगच निर्णय घे.बळजबरी नाही.”

“आता आराम कर नंतर बोलू आणि दार बंद करू नकोस”.

छान झोप काढून काही वेळानं नमा हॉलमध्ये आली तेव्हा फ्रेश वाटत होती.

“थोडं बोलू”

“बाबा,परवानगी कशाला?”

“कारण क्लिप विषयीच बोलायचंय”

“मी ठीक आहे.तुम्ही बोला.”

“क्लिपमुळ झालेला त्रास,जे सहन केलंस,घेतलेला टोकाचा निर्णय.हे जगासमोर यायला हवं”

“का?कशासाठी?”आईनं वैतागून विचारलं.

“बाबा,तुमच्या डोक्यात काय चाललंय”

“बाजू मांडण्यासाठी तू सुद्धा क्लिप तयार कर.”

“अहो काहीही काय,अजून एक क्लिप म्हणजे लोकांना आयतं कोलीत दिल्यासारखं होईल”आई.

“नुसतं घरात रडत बसून तोंड लपवण्यापेक्षा जगाच्या समोर जाऊन चूक मान्य करून माफी मागणं केव्हाही चांगलं.”

“त्यानं काय होईल”नमा.

“नक्की सांगता येणार नाही पण तुझी हिंमत जगाला समजेल हे नक्की.”बाबांच्या बोलण्यानं नमाच्या विचारांना नवी दिशा मिळाली.

“अजून क्लिप-बीप काही नको.चार दिवस शांत राहू.सगळं ठीक होईल.”आई.

“बाबांचं बरोबरयं.तुमचा मुद्दा लक्षात आला.रडारड खूप झाली.पोलिसांकडे जाऊच पण त्याआधी व्हिडिओ करू.”

“ग्रेट,काय बोलायचं त्याचा विचार कर.पॉइंट काढ आणि बिनधास्त बोल.उद्या सकाळी शूट करू.”

दुसऱ्या दिवशी बोलायला सुरवात करण्याआधी नमानं हात जोडून प्रार्थना केली नंतर अंगठा उंचावून तयार असल्याची खूण केल्यावर बाबांनी मोबाईलवर शूटिंग सुरू केलं.

“नमस्कार!! मी नमा,माझ्या खाजगी क्षणांची चोरून केलेल्या क्लिपमुळे सगळ्यांना हा चेहरा माहितेय.कालपासून बदनाम हुये पर नाम हुवा.अशी अवस्था झालीय.भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली.सार्वजनिक ठिकाणी असं वागायला नको होतं.त्याबद्दल सर्वांची माफी मागते.नकळतपणे घडलेल्या चुकीची फार मोठी किंमत मोजावी लागतेय.माझी अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली.राक्षसी आनंदासाठी कोणीतरी लपून व्हिडिओ केला आणि तो व्हायरल झाल्यावर विकृतीचा खेळ सुरू झाला.लहान-थोर,गरीब-श्रीमंत,अडाणी-सुशिक्षित सगळेच यात आवडीनं सहभागी झाले.माणसांतल्या जनावरांनी लचके तोडायला सुरवात केली.क्लिप बघून नंतर फोन केले.घाणेरडे मेसेज केले.खूप निराश झाले त्याच भरात आत्महत्येचा प्रयत्न केला.आई-बाबांमुळे वाचले”.भरून आल्यानं नमाला बोलता येईना.बाबांनी शूटिंग पॉज केलं.नमा पुन्हा बोलायला लागली

“तसं पाहीलं तर मी काही जगावेगळ केलं नाही पण एका मध्यमवर्गीय मुलीची क्लिप म्हटल्यावर सगळ्यांना त्यात इंटरेस्ट निर्माण झाला.कालपासून खूप सहन केलंयं आणि अजूनही करतोय.सिनेमा,वेबसिरिजमध्ये तर यापेक्षा पुढच्या गोष्टी दाखवतात.ते आवडीनं पाहिलं जातं.बोल्ड सीन्स करणाऱ्यांना काहीही फरक पडत नाही उलट पैसे आणि प्रसिद्धी मिळते मात्र माझ्यासारख्या सामान्य मुलींसाठी हे फार भयंकर आहे.क्लिप व्हायरल झाल्यापासून भयानक अनुभव आलेत.इतरवेळी साधी चौकशी न करणारे नेमकं आत्ताच फोन करून क्लिपविषयी बोलतायेत.फुकटचे सल्ले तर चालूच आहेत.म्हणून आम्ही फोन बंद केले तर काहीजण घरी येऊन बळजबरीचं सांत्वन करून गेले.माणसांचं हे वागणं धक्कादायक होतं.जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.असो!! हा नवीन व्हिडिओ करण्या मागचा उद्देश वागण्याचं समर्थन नाहीये तर माझीही एक बाजू आहे.आई-बाबांमुळे मी जिवंत आहे.त्यांनी सपोर्ट केला परंतु अशा कितीतरी दुर्दैवी नमा आहेत ज्यांना कोणाचाच आधार नसतो म्हणून मग त्या टोकाचा निर्णय घेतात.सर्वांना हात जोडून विनंती आहे की या विकृतीच्या खेळात सहभागी होऊ नका.असे व्हिडिओ फॉरवर्ड न करता ताबडतोब डिलिट करा. उलट पाठवणाऱ्याला जाब विचारा.अजून जास्त काही बोलत नाही.थॅंकयू”नमा बोलायचं थांबली.डोळे घळाघळा वाहत होते.काही वेळ शांततेत गेला.

“आता मी बोलतो”बाबांनी मोबाईल नमाकडे दिला आणि आईला शेजारी बसवून बोलायला सुरवात केली.

“आम्ही तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं.साध सरळ चाललेलं आयुष्य अचानक कालपासून बदललं.क्लिपच्या रूपानं आलेल्या वादळानं मूळापासून हादरवलं.माणसातल्या एका गिधाडानं सावज टिपलं आणि बाकीच्यांनी मिटक्या मारत मजा घेतली.एकुलती एक,उच्चशिक्षित,लग्न ठरलेल्या मुलीचं अशापद्धतीनं प्रसिद्ध होणं हे फार भयंकर.पोटच्या मुलीच्या बाबतीतला हा प्रकार सहन करणं पालक म्हणून अतिशय वेदनादायक आहे.अचानक बसलेल्या झटक्यातून सावरतोय.आता गप्प बसणार नाही.पोलिसांकडे तक्रार करणार.याकामी तुमची मदत पाहिजे.

ज्यानं तुम्हांला पाठवली त्याला ही क्लिप कोठून मिळाली एवढंच विचारा.एकमेकांच्या मदतीनं गुन्हेगारापर्यंत पोहचू शकतो आणि आमचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.”

“माझी लेक वाचली.एवढंच सांगते की वेळीच आवर घातला नाही तर आजचे हे दु:शासन कधी घरात घुसतील ते कळणार नाही कारण त्यांच्या हातात अत्याधुनिक साधनं आणि आपल्या घरात आई,बहीण,बायको,मुली आहेत.हात जोडून विनंती आहे की यापुढे असल्या क्लिप फॉरवर्ड करू नका.एखाद्याची थोडक्यातली मजा दुसऱ्याच्या जिवावर बेतू शकते.”आईनंसुद्धा मन मोकळं केलं.

नमानं व्हिडीओ पोस्ट केल्यावर काही वेळानं मोबाईल वाजला,नाव बघून तिनं कॉल घेतला नाही. पुन्हा पुन्हा फोन वाजत होता.इतक्यात दारावरची बेल वाजली.आईनं दार उघडलं तर समोर …

— क्रमशः भाग दुसरा

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-1 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-1 ☆ श्री मंगेश मधुकर 

सकाळी जाग आल्यावर सवयीनं सगळ्यात आधी नमानं मोबाईल चेक केला तर एकशेवीस अनरीड मेसेज आणि सतरा मिस कॉल.नमाला प्रचंड आश्चर्य वाटलं.सर्वात जास्त कॉल शुभाचे.लगेच तिला कॉल केला.

“नमे,कुठंयेस.किती फोन केले मेसेज केले पण एकांचही उत्तर नाही”

“अगं.रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते.फोन सायलेंटवर होता.आत्ता बघितलं”

“म्हणजे तुला अजून काहीच माहिती नाही”

“काय ते”

“बोंबला!!क्लिप फिरतीये.”

“कसली क्लिप?”

“तू आणि विनीत,तुमच्या बागेतल्या लिपलॉकची……..”

“काय!!”नमा किंचाळली.

“अगं नमा,तू सोडून सगळ्या जगानं पाहिलंय.तुला क्लिप पाठवलीय,बघ.”

भीतभीत नमानं क्लिप सुरू केली.तिचे विनीतसोबतचे खाजगी क्षण लपून शूट केले होते.अवघ्या काही सेकंदाचा व्हिडिओ पाहून नमाचं धाबं दणाणलं.भीतीनं हात-पाय थरथरायला लागले.घशाला कोरड पडली.डोकं बधीर झालं.श्वासाचा वेग वाढला. जोरजोरात रडताना हातातून मोबाईल पडला आणि दारावर टकटक दोन्हीचा आवाज एकदमच झाल्यानं नमा दचकली.आईचा आवाज ऐकून जीवात जीव आला. रूममध्ये शिरताच आईनं विचारलं “नमा,हे काय गं”

“मला आत्ताच कळलं”

“काल रात्रीपासून तो व्हिडिओ फिरतोय.सोसायटी,नातेवाईक सगळे तुझ्याविषयीच विचारतायेत.सारखा फोन  वाजतोय.काही निर्लज्ज लोकांनी नाही नाही त्या चौकशा केल्या.”

“बाबा कुठं आहेत”

“हॉलमध्ये फोन बंद करून बसलेत.लँडलाईनचा रिसिव्हरसुद्धा बाजूला काढलायं.”

“विनीत”

“फोन बंद करून बसलाय.त्याला कोणाशीच बोलायचं नाहीये असं त्याच्या आईनं सांगितलं”

“आई,आता काय करू”

“जवळ जायच्या आधी विचारलं नाहीस”. 

“आई!!जे घडलं ते भावनेच्या भरात घडलं अन कितीवेळ तर अवघे काही सेकंद.” 

“तेच सेकंद गावभर फिरतायेत आणि बघणारे मजा घेतायेत.”

“आता!!”

“आधी तो फोन बंद कर आणि मी सांगत नाही तोपर्यंत रूमच्या बाहेर येऊ नकोस.”

“काहीच्या काही होऊन बसलं.खूप टेंशन आलंय”

“माझी तर अक्कल बंद झालीय.विनतचं ठीकये पण तुला कंट्रोल करता आलं नाही”

“आई!!”नमा ओरडली. 

“उगीच माझ्यावर डाफरून काय उपयोग.लोकांना फुकट तमाशा दाखवलास.”

“बोल!!अजून जे जे मनात आहे ते सगळं बोल.साखरपुड्याच्या सेलिब्रेशनसाठी बागेत गेलो.छान गप्पा मारताना एकांत होता म्हणून जरा …….”

“म्हणजे आपली चूक झालीय असं तुला वाटत नाही का?”

“पब्लिक स्पेस मध्ये असं वागायला नको होतं.माझी नुसती चूक नाही तर घोडचूक झालीये”माय-लेकी बोलत असताना बाबा रूममध्ये येऊन नमाचा मोबाईल घेऊन गेले.नमाकडं बघितलं सुद्धा नाही.त्याचं परक्यासारखं वागणं नमाला खूप खोलवर लागलं. 

“घराची अब्रू तू चव्हाट्यावर आणलीस”आई पुन्हा सुरू झाली.

“उगाच काहीही बोलू नकोस.”

“तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस.वागताना थोडी काळजी घ्यायची ना”

“परत तेच.मोहाच्या बेसावध क्षणी ते घडलं.जे झालं त्याचा फार पश्चाताप होतोय.सॉरी!!” 

“आता बाण सुटल्यावर माफी मागून काही उपयोग नाही.ही जखम आयुष्यभर सोबत करणार.सगळं संपलं.”आईचा आवाज कातर झाला.डोळे भरले.नमाची अवस्था वेगळी नव्हती.

“आता काय करायचं”नमानं विचारलं. 

“जे समोर येईल त्याला सामोरं जायचं’

“म्हणजे”

“पुढं काय वाढून ठेवलंय ते माहिती नाही.विनीतचं ठीक आहे तो पुरुष आहे पण त्याला कोण बोलणार नाही.सगळे तुलाच नावं ठेवणार.”

“असं का??”

“कितीही मॉडर्न वागत-बोलत असलो तरी प्रत्येक घरात मुली-बायकांसाठी वेगळे अलिखित नियम असतात.अदृश्य नियम,अटी बाईला पाळावेच लागतात.तुझे बाबा रागावले,चिडले असते तर ठीक परंतु ते काहीच बोलले नाहीत.याचीच भीती वाटतीये.”

“कसली भीती”

“ते काय करतील याची.”

“दोघं द्याल ती शिक्षा मान्य आहे”

“तुझं हे प्रकरण अजून काय काय पहायला लावणार आहे देवालाच माहीत”

“प्रकरण???,खाल्ली माती आता काय करू ते सांग”

तोंड फिरवून जाताना आईनं आपटलेल्या दाराच्या आवाजनं नमाचे कान बधीर झाले.उशीत तोंड खुपसून रडायला लागली. सारखी क्लिप डोळ्यासमोरून फिरत होती.मित्र,मैत्रिणी,

कॉलेज,सोसायटी,नातेवाईक, रूममधल्या निर्जीव वस्तु सगळे आपल्याकडं पाहत हसत आहेत असं वाटत होतं.डोळे गच्च  मिटले तरी जोरजोरात हसण्याचा,घाणेरड्या कमेंटचा आवाज कानावर आदळण्याचा भास व्हायला लागला.त्यातच थरथरणाऱ्या हातातून ग्लास पडून सगळ्या बेडवर पाणी सांडलं.डोक्यात फक्त निगेटिव्ह विचारांच ट्राफिक सुरू होतं.एकामागोमाग येणारे भयानक विचार भीती वाढवत होते.सगळ्या अंगाला दरदरून घाम फुटला.हृदयाचे ठोके वाढले.स्वतःला दोष देत सारखं तोंडात मारून दोन्ही गाल लाल झालेले,डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.काही क्षणाच्या उत्कट भावेनेची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं वाटलं नव्हतं.आपण खूप एकटे आहोत.आई-बाबांचा आधार घ्यावा तर तेच खचलेले आणि भावी जोडीदार तोंड लपवून बसलेला.प्रचंड हताश,निराश नमा रुममध्ये भिरभिरत्या नजेरेनं अस्वस्थपणे येरझारा मारताना बडबडायला लागली.“द एन्ड.होत्याचं नव्हतं झालं.ज्यानं क्लिप बनवली तो मजेत मी मात्र बरबाद. हलकटपणा त्यानं केला आणि गुन्हेगार मी.हा कलंक कधीच पुसला जाणार नाही.मीच नालायक,महामूर्ख नको ते करून बसले.आता करियर, लग्न,संसार काही काही नाही.लोकांच्या नजरेत फक्त आणि फक्त ती क्लिपचं असणार.ईथून पुढं विशिष्ट नजरा आणि नालायकपणे हसणारे चेहरे बघत आयुष्य काढावं लागणार.माझ्यामुळेच फक्त त्रास आणि त्रासच होणार.आयुष्य कधीच पूर्वीसारखं होणार नाही.मग .. हे विनाकारण तोंड लपवून जगणं कशासाठी?कुठंपर्यंत आणि कोणासाठी.. आपला एक निर्णय सगळं काही क्षणात थांबेल.”नमा एकदम बोलायची थांबली.

“आई,बाबा सॉरी!!मी चुकले पण त्याची शिक्षा तुम्हांला नको” एवढीच चिठ्ठी लिहून डोळे पुसून नमानं आरशासमोर “गुड बाय” म्हणत आवडत्या जांभळ्या ड्रेसच्या ओढणीचं टोक सिलिंग फॅनला अडकवलं आणि दुसरं टोक गळ्याभोवती अडकवून टिपॉयवर उभी राहिली आणि मोठ्यानं ‘धाडकन’ आवाज आला??????

— क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सामान — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ सामान — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकतीच दिवाळी होऊन गेली  आणि दिवाळी निमित्ताने भारतात आलेली कीर्ती परत अमेरिकेत जायला निघाली.

आई- वडिल, सासू -सासरे इतर काही नातेवाईक यांच्या गोतावळ्यात बसलेली कीर्ती एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू घेऊन रमलेली होती. 

सगळे तुला जाताना हे हवे का? ते हवे का? विचारत होते. आई- सासूबाई वेगवेगळी पिठे लोणची ई. खायचे पदार्थ द्यायची तयारी करत होते. 

सहज कीर्ती म्हणाली किती सामानाची अदलाबदल करत असतो ना आपण••• लहानपणची भातुकली बाहुला बाहुली लग्नाचे वय झाले की सोडतो, लग्न झाले की माहेर , माहेरच्या काही गोष्टी सोडतो, लग्नानंतरही नवर्‍याची बदली, दुसरे घर बांधणे , ई काही कारणाने नेहमीच सामान बदलत रहातो. आणि मग बदल हा निसर्ग नियम आहे असे वाक्य कीर्तीला आठवले आणि आपण सतत सामान बदलतो आहे म्हणजे नैसर्गिक जीवन जगतो आहे असे वाटले.

आता सुद्धा भारतात यायचे म्हणून अमेरिकेहून काही सामान मुद्दाम ती घेऊन आली होती आणि जाताना ते सामान तिकडे मिळते म्हणून येथेच सोडून नव्याच सामानासह ती अमेरिकेला निघाली होती.

आपल्या माणसांचे प्रेम जिव्हाळा पाहून ती सुखावली असली तरी यांना सोडून जायचे म्हणून मन भरून येत होते.

कितीही निवांत सगळी तयारी केली, आठवून आठवून आवश्यक सामानाने तिची बॅग भरली तरी ऐनवेळी जाताना लगीन घाई होऊन कोणी ना कोणी अगं हे असू दे ते असू दे म्हणून तिच्या सामानात भर घालतच होते.

जाण्याचा दिवस आला आणि सगळे सामान  घेऊन ती बाहेर पडली आणि गोतावळा भरल्या अंत:करणाने तिला निरोप देत होते. बायबाय टाटा करत होते आणि अरे आपले खरे सामान म्हणजे हा गोतावळा आहे आणि तेच आपण येथे ठेऊन अमेरिकेत जात आहोत या विचाराने तिच्या काळजात चर्रर्रss झाले आणि ते भाव तिच्या डोळ्यातून गालावर नकळत वाहिले.

काही जण विमानतळापर्यंत तिला सोडायला आले होते. तेथेही पुन्हा यथोचित निरोप घेऊन कीर्ती एकटीच आत गेली. फ्लाईटला अजून उशीर असल्याने वेटिंगरूम मधे बसली आणि आपली मुले नवरा तिकडे अमेरिकेत वाट पहात आहेत. तिकडे आपले घर आहे आपल्याला त्यासाठी तिकडे जावेच लागणार••• नाईलाज आहे याची जाणिव होऊन कीर्ती सावरली. 

तरी तिच्या मनातून ईथले क्षण, इथला परिवार त्यांचे बोलणे हसणे वागणे हे जातच नव्हते. तिकडच्या आठवणींनी जबाबदारी तर इकडच्या आठवणीतून जपलेली आपुलकी माया प्रेम दोघांची सरमिसळ होऊन मन हेलकावू लागले असतानाच तिला तिचे कॉलेजचे दिवस पण आठवू लागले•••

ती आणि विजय एकाच कॉलेजमधे वेगवेगळ्या शाखांमधे शिकत असले तरी स्पर्धांच्या निमित्ताने एकत्र येत होते. दोघांचे विचार जुळले आणि नकळत ते प्रेमात गुंतले. पण लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्याघरून कडकडून विरोध झाला आणि विजयनेही तिला सॉरी म्हणून विसरून जा म्हटले. 

किती भावूक झाली होती ती••• त्यातून नकळत तिच्या तोंडून पूर्ण गाणेच बाहेर पडले होते•••

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

ओ ओ ओ ! सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं

और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है

वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

पतझड़ है कुछ … है ना ?

ओ ! पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट

कानों में एक बार पहन के लौट आई थी

पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है

वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे – २

आधे सूखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी

गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो ! 

वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

एक सौ सोला चांद कि रातें एक तुम्हारे कांधे का तिल – २

गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ

झूठ-मूठ के वादे सब याद करा दूँ

सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

खरच असे कितीतरी सामान आपण आपल्या मनातही ठेवत असतो नाही का? पण परिस्थिती आली तर अवघड असूनही ते सामानही फेकून देता आले पाहिजे. आणि तेच कीर्तीने केले असल्याने ती नव्या माणसाचे नव्या घरातले सामान त्यामधे ठेऊ शकली होती.

मग अध्यात्माने तिचे मन नकळतच भरले आणि आपल्या मनाची सफाई जो नेमाने करतो त्याचे जीवन सौख्य शांती समाधानाने भरून पावते हे वाक्य आठवले. काही लोकांबद्दलचा राग, मत्सर, हेवा ई. अनेक विकारांचे सामान मनात साठले तर शांती समाधान सौख्य ठेवायला जागा उरत नाही म्हणून वेळीच हे नको असलेले सामान बाहेर फेकून दिले पाहिजे तरच सगळे व्यवस्थित होऊ शकते. याचा अनुभव तिने घेतलाच होता.

फ्लाईटची वेळ आली आणि ती सगळे सोपस्कार करून विमानात बसली मात्र, तिला जाणवले साधा प्रवास म्हटला तरी आपण किती सामान जमवतो? आधारकार्ड,पासपोर्ट,व्हिसा,एअर टिकेट••• प्रवास संपला तर टिकेट फेकून देतो पण इतर सामान जपूनच ठेवतो.

अमेरिकेत पोहोचायला २२ तासांचा अवधी होता. कीर्तीचे विचारचक्र चालूच होते.

तिच्या बाजूच्या सीटवरील व्यक्ती सांगत होती, त्या व्यक्तीचे वडील काही दिवसांपूर्वी वारले आणि त्यासाठी सगळी महत्वाची कामे सोडून त्या व्यक्तीला भारतात यावे लागले होते. 

आपल्याच विचारात गर्क असलेली कीर्ती अजून विचारात गढली गेली. जाणारी व्यक्ती निघून गेली पण तिने जमा केलेली माया मालमत्ता स्थावर जंगम हे सगळे इथेच सोडून गेली की••• हौसेने,जास्त हवे म्हणून, आवडले म्हणून, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून, आपल्या माणसांना आवडते म्हणून आयुष्यभर माणूस कोणत्याना कोणत्या कारणाने सामान जमवतच जातो पण तो••• क्षण आला की सगळे सामान येथेच ठेऊन निघूनही जातो•••

तेवढ्यात तिला आठवले कोणीतरी सांगितले होते की परदेशात जायचे तर तिथली करंन्सी न्यायला लागते. मग इथले पुण्यकर्म हीच परलोकातील करन्सी असल्याने हे पुण्यकर्माचे सामानच जमवले पाहिजे. 

ती अमेरिकेत पोहोचली होती पण आता ती पुण्यकर्माचे आधारकार्ड, स्वर्गाचा व्हिसा आणि सुगुणांचा पासपोर्ट हे सामान जमवण्याच्या विचारातच …

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। योगायोग ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ।। योगायोग ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(नीताची नोकरी संपली आणि  नीता रिटायर झाली.होणाऱ्या निरोप  समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या.) इथून पुढे —

मेघनाने नीताला फोन केला आणि म्हणाली, “आई आता जर कारणं सांगितलीस तर बघच. झाली ना नोकरी पूर्ण? मग कधी येतेस माझ्याकडे ते सांग.” तिने न विचारता नीताला तिकीटच पाठवलं आणि नीताला मग मात्र अमेरिकेला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. एअरपोर्टवर आलेल्या गोड नातीनं आजीच्या कमरेला मिठी मारली आणि ‘ आज्जू ‘ अशी हाक मारल्यावर नीताचे डोळे भरूनच आले. मेघनाने तिला जवळ घेतले आणि कारमध्ये बसवलं. वाटेत नात अस्मि नुसती चिवचिवत होती आणि तिला खूप आनंद झाला आपली आज्जू आली म्हणून. किती तरी साठलेलं बोलून घेतलं मायलेकींनी आणि दिवस कसे जात हेच समजेना नीताला. मेघनाला नीताने सांगितलं नव्हतं की ती ब्रेल शिकली आणि ब्लाइंड स्कूलमध्ये जाते. तिला मुद्दाम सांगायची वेळच आली नाही.

त्या दिवशी नीताला घेऊन मेघना आणि अस्मि तिथल्या लायब्ररीत  गेल्या होत्या. सहज बघितलं तर नीताला तिकडे एक सम्पूर्ण सेक्शन ब्रेल पुस्तकांचा दिसला. नीता अतिशय   एक्साइट होऊन त्या सेक्शनमध्ये गेली. तिकडे वाचनाचीही सोय होती. काही मोठी अंध मुलं, काही लहान मुलं ब्रेल पुस्तकं घेऊन वाचत होती. नीताचे हृदय भरून आलं. त्या अंध छोट्या मुलाजवळ ती  आपण होऊन गेली आणि म्हणाली “ खूप सुंदर पुस्तक आहे ना हे? फेअरी टेल्स? तू हॅन्स अँडर्सनच्या परीकथा वाचल्या आहेस का? जरूर वाच हं. आहेत बरं का त्या ब्रेल मध्ये.”  तिने त्याला एक गोष्ट वाचून दाखवली. तो मुलगा इतका खूष झाला. “ आंटी, प्लीज आणखी एक स्टोरी वाचाल का? तुम्ही इंडियन आहात का? तुमचा एक्सेन्ट अमेरिकन नाही, पण तुम्ही छान वाचता. थँक्स.” त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.  म्हणाली, “ माझा ख्रिस जन्मांध नाही पण हळूहळू त्याची दृष्टी कमी होत गेली. खूप उपाय केले आम्ही पण नाही उपयोग झाला. तुम्ही किती सहज ब्रेल पुस्तक वाचले.मला येईल का हो शिकता? “ नीता म्हणाली “ नक्की येईल. इथे अशा संस्था नक्की असतील ज्या तुम्हाला ब्रेल शिकवतील. करा चौकशी. नाही तर मी शिकवींन तुम्हाला. मी इथे आहे अजून चार महिने “ नीताचा फोन नंबर घेऊन त्या आभार मानून निघून गेल्या. मेघना हे थक्क होऊन बघत होतो. “आई,अग काय हे ! कधी शिकलीस तू हे? कित्ती ग्रेट आहेस ग! “ नीता मेघना अस्मि घरी आल्या. अतुलला हे सगळं मेघनाने सांगितलं..,तो म्हणाला, “ आई खरच ग्रेट आहात हो तुम्ही.”

नीताच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आपल्या मैत्रिणी आपल्याशी कशा  वागल्या ,माणसं कशी लगेच बदलतात हे सांगितलं आणि म्हणाली, “ माझा आता त्यांच्यावर राग नाही ग. मला उलट ही नवी वाट सापडली म्हणून मी आभारच मानेन त्यांचे. नाहीतर बसले असते पिकनिक करत आणि वेळ वाया घालवत.” मेघना आणि अतुलला अतिशय कौतुक वाटले नीताचे. मिसेस वॉल्सने ही बातमी सगळ्या मैत्रिणींना सांगितली आणि नीताचे कौतुक केले. ख्रिसची शाळा बघायला याल का असा फोन आला मेघनाला. पुढच्या आठवड्यात  नीताला घेऊन अस्मि मेघना अतुल ब्लाइंड स्कूलमध्ये गेले. ती छोटी छोटी अंध मुलं बघून अस्मि रडायला लागली आणि सगळ्यांचे डोळे पाणावले. ख्रिस नीता जवळ आला आणि म्हणाला, “ ही आंटी माझी फ्रेंड आहे. हो ना आंटी?” नीता म्हणाली “ हो तर !माझा छोटा मित्र ख्रिस आणि तुम्हीही सगळे माझे नवीन छोटे दोस्त. मी आता तुम्हाला माझ्या भाषेतली ,पण तुमच्यासाठी मी इंग्लिश ट्रान्सलेट केलेली गोष्ट वाचून दाखवू का?” मुलं आनंदाने हो म्हणाली. नीताने त्यांना बिरबलाची सुंदर गोष्ट वाचून दाखवली. तिथल्या प्रिंसिपलला फार आश्चर्यआणि कौतुक वाटले नीताचे. तुम्ही आमच्या या मुलांसाठी दर वीकला एकदा येत जाल का?” त्यांनी विचारले. नीता म्हणाली “अगदी आनंदाने येईन मी ! ब्रेल लिपी फार अवघड नाही. तुम्ही या मुलांच्या पालकांना शिकवा ना,, ही लिपी..घ्या त्यांचेही   क्लासेस.”

नीता आनंदाने  घरी परतली.मेघनाला अतिशय आश्चर्य आणि कौतुक आणि अभिमान वाटला आपल्या आईचा. दर आठवड्याला नीताला शाळेची बस न्यायला यायला लागली आणि या मुलांना शिकवताना, त्यांचे नवीन नवीन साहित्य बघताना नीताही खूप काही शिकली या शाळेतून.  बघता बघता नीताचा इथला मुक्काम संपत आला. एक दिवस लाजरा ख्रिस म्हणाला “आंटी माझ्या घरी याल? मला आमचं घर आणि माझी रूम दाखवायची आहे तुम्हाला.” नीताला गहिवरून आलं.” नक्की येईन ख्रिस!” ती म्हणाली. ती जाण्याच्या आधी शाळेतल्या मुलांनी तिला तिने शिकवलेली गाणी म्हणून दाखवली, नाच करून दाखवले. शाळेने नीताचा छोटासा सत्कार केला आणि पुन्हा पुन्हा या ,आमच्या मुलांना तुमच्या भाषेतली गाणी शिकवा, गोष्टी सांगा, असं म्हणत निरोप दिला.

नीताचा हा यावेळचा मुक्काम अतिशय अविस्मरणीय झाला. सहज ती त्या लायब्ररीत जाते काय आणि ब्रेल पुस्तकं तिला दिसतात काय आणि चिमुकला ख्रिस तिथे भेटतो काय ! नीताला अतिशय आनंद झाला. भारतातून आणलेली छोटी ब्रेल पुस्तकं तिने शाळेला दिली आणि ख्रिसला तर आणखी स्पेशल पुस्तक आणि वाजणारे टॉय. मेघना आणि अतुल घरी आले आणि मेघनाने आईला मिठीच मारली. “ आई किती ग कौतुक करु तुझं मी. स्वप्नातसुद्धा वाटलं नाही की तू हे शिकली असशील. खूप मोठं काम करते आहेस ग तू ! मेघनाचे डोळे भरून आले. बाबा गेल्याचे दुःख तर अजूनही आहेच ग.. पण तू धीराने सावरलंस स्वतःला.आणि ही वेगळी वाट निवडलीस याचा अभिमान आहे आम्हाला. आम्ही या  इथल्या शाळेला देणगी देऊच पण हा चेक तुझ्या पुण्यातल्या शाळेला अस्मिकडून.”

“ आज्जू,आता तू दरवर्षी ये आणि  त्या ब्लाइंड स्कूलमध्ये अशीच जात जा आणि ख्रिससारख्या मुलांना

भेट. आज्जू,किती आपण लकी ग.. आपल्याला डोळे आहेत. आणि मी हट्ट करते की मला हेच हवं आणि हाच ड्रेस हवा. आज्जू,थँक्स.मी आता कधीही हट्ट करणार नाही आणि नेहमी मॉमबरोबर ख्रिसला भेटायला जाईन.” चिमुकली अस्मि म्हणाली. नीताने तिला जवळ घेतले. गहिवरून ती मेघनाला म्हणाली, ” मेघना, हे सगळं घडायला संजयला जायलाच हवं होतं का ग? त्याला किती अभिमान वाटला असता ना.”

मेघना म्हणाली, “आई नको रडू तू. बाबा जिथे कुठे असतील तिथून हे नक्की बघत असतील. पण अस्मि म्हणते तशी दर वर्षी येत जा ग.”

नीता त्यांचा निरोप घेऊन परत आली. तिची इथली गरीब मुलं, तिची शाळा, तिची वाट पहात होती. कुठेही गेलं, कोणतीही भाषा-देश-वर्ण कोणताही असला तरी दुःखाची भाषा मात्र एकच असते हे त्या चिमुकल्या  अंध मुलांना बघून पुन्हा एकदा नीताला प्रकर्षाने जाणवलं.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

संध्याकाळ झाली होती.नीता अंगणात पायरीवर बसली होती. हा दगडी भक्कम बंगला तिच्या आहे सासऱ्यांचा!कित्ती भक्कम  आणि सुंदर बांधलेला होता तो. नीता अंगणात आली आणि शेजारी फुललेल्या जाईची फुलं तिनं ओंजळ भरून घेतली आणि आत वळणार तोच  पलीकडे रहाणाऱ्या आजींनी हाक मारली.” नीता, ये की चहा प्यायला ! ये !छान केलाय गवती चहा घालून !” नीता कम्पाउंड ओलांडून पलीकडे गेली आणि आजींच्याजवळ झोपाळ्यावर बसली.आजींनी गरम चहा तिच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या, “ घे ग ही आल्याची वडी !आत्ताच केल्यात– बघ बरी झालीय का? “

“ आजी,एकदम मस्त झालीय. किती हौस हो तुम्हाला या वयात सुद्धा !” नीता म्हणाली.” 

“ अग, आवडतं हो मला करायला. सुनेला ,नातसुनेला कुठला आलाय वेळ? पण मला आवडेल ते करते 

मी ! आहेत भरपूर नोकरचाकर हाताशी. काही काम नसतं  मला ! बरं, कधी आलीस अमेरिकेतून? बरे आहेत ना सगळे?  संजय फार लवकर गेला ग ! एकटी पडलीस बाळा, पन्नाशी जेमतेम उलटली नाही तोवरच ! “ आजींनी मायेने हात फिरवला नीताच्या पाठीवरून ! डोळे भरून आले  नीताचे. 

“आजी राहिले की मी सहा महिने ! आणखी किती रहाणार लेकीकडे. ते सगळे तिकडे सुखात आहेत,

नात मोठी होईल आता आणि शेवटी आपलं घर ते आपलं घर. मला कायम राहायला नाही हो आवडणार तिकडे. आपलं घर आणि आपला परिवार खरा शेवटी. आणि आहेत की तुमच्यासारखे सख्खे शेजारी. आणि मी काम करते ते ब्लाइंड स्कूल, तिथली गोड छोटी मुलं माझी वाट बघत असतील ना ! “ नीता हसत म्हणाली. जाईची ओंजळ तिने झोपाळ्यावर रिकामी केली आणि म्हणाली, “ येते हं.. आजी.थँक्स चहाबद्दल.”  

सहा महिने राहिल्यावर नीता मागच्याच महिन्यात भारतात परतली. दोन वर्षांपूर्वी अचानकच काहीही हासभास नसताना संजय हार्टअटॅकने गेला. नीताची एकुलती एक मुलगी  मेघना लग्न होऊन अमेरिकेला गेली होती आणि तिला तिकडे छान नोकरीही होती. बाबांचे अचानक निधन झाल्यावर मेघना लगेचच भारतात आली आणि एक महिना राहिली. “आई,तू माझ्या बरोबर येतेस का? चल.बरं वाटेल ग तुला.” 

पण नीता नको म्हणाली. “ नको ग मेघना,खूप कामं उरकावी लागतील मला. संजयच्या पेन्शनचं बघावं लागेल, बँकेचे व्यवहार बघावे लागतील. मग नंतर येईन मी नक्की. अग माझी काळजी नको करू तू !

माझी अजून चार वर्षे नोकरी आहे कॉलेज मध्ये. मग मलाही मिळेल पेन्शन. मी घरी बसून तरी काय करू? कॉलेजमध्येही जायला सुरुवात करीन.” नीताने मेघनाची समजूत घातली आणि मेघना एकटीच गेली अमेरिकेला. नीताने आपले रुटीन सुरू केले.  

नीताचे आईवडील नीताच्या लग्नानंतर लवकरच गेले आणि  नीताचे भाऊ  भावजय कोल्हापूरला रहात होते. नीता पुण्यात एकटीच होती. कॉलेजमध्ये तिचा वेळ सुरेख जायचा. तिच्या सहकारी मैत्रिणी मित्र आणि स्टुडंट्सनी नीताला कधी एकटं पडू दिलं नाही. संजय असतानाही अनेक वेळा ती या ग्रुपबरोबर चार दिवसाच्या ट्रीपला सुद्धा जायची.  सहज लक्षात आलं नीताच्या … आपला नेहमीचा ग्रुप चार दिवस दिसला नाही. मग तिने हाताखालच्या  रश्मीला विचारलं “ अग मानसी सुहास कुठे दिसल्या नाहीत ग?”   रश्मी म्हणाली “ मॅम, त्यांचा ग्रुप चार दिवस कोणाच्यातरी फार्म हाऊसवर नाही का गेला? तुम्हाला माहीत नाही का? “ नीता गप्प बसली. पुढच्या आठवड्यात सुहास तिच्याजवळ आली आणि म्हणाली “ रागावलीस का? पण तुला कसं विचारावं असं वाटलं आम्हाला ! आम्ही सगळे कपल्स ग आणि तू एकटी ! तुला  ऑकवर्ड झालं असतं ग, म्हणून नाही बोलावलं. “ नीता काहीच बोलली नाही पण तिनं खूणगाठ बांधली मनाशी की संजय गेल्याने आपल्या आयुष्याचे संदर्भ बदलले. तिला म्हणावेसे वाटले, ‘ संजय असतानाही मी एकटीच तर येत होते कितीतरी वेळा, तेव्हा हा प्रश्न कसा आला नाही तुमच्या मनात ‘. नीताने हळूहळू या ग्रुपशी संबंधच कमी करून टाकले. आपल्यामुळे त्यांना अडचण नको. मनातून अतिशय वाईट वाटलं तिला, पण हे करायचंच असा निर्णय घेतला तिनं. एका माणसाच्या जाण्यानं आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स उभे रहातील याची कल्पनाच नव्हती नीताला. तिने आपलं मन काढून घेतलं या लोकांतून !अतिशय मानसिक त्रास झाला तिला पण मुळात अतिशय खम्बीर असलेली नीता हाही आघात झेलू शकलीच. 

त्या दिवशी दबक्या पावलांनी सुहास नीता जवळ आली आणि म्हणाली, “ नीता अशी नको आमच्याशी तुटक वागू !आपली किती वर्षाची  मैत्री एकदम तोडून नको टाकू. आम्हाला खूप वाईट वाटतं ग. परवा माझ्या मुलीचं, तुझ्या लाडक्या अश्विनीचं मी डोहाळजेवण करतेय. तू नक्की नक्की ये बरं का..मला फार वाईट वाटेल तू नाही आलीस तर. “ .यावर शांतपणे नीता म्हणाली, “ खूप खूप अभिनंदन सुहास.आणि थँक्स मला तू बोलावलंस म्हणूनही. पण तुझ्या घरी आजेसासूबाई, सासूबाई आहेत. त्यांना माझ्यासारखी विधवा आलेली चालणार नाही. मी ओटी भरलेली तर मुळीच नाही चालणार..  नकोच ते. मी येणार नाही. अग मी हे तुझ्यावर रागवून नाही म्हणत पण आता अनुभव घेऊन शहाणी नको का व्हायला? अश्विनीला माझे आशीर्वाद सांग.” गोऱ्यामोऱ्या झालेल्या सुहासकडे न बघता नीता तिथून उठून गेली. हा बदल नीताने स्वीकारला पण तिला ते सोपे नाही गेले. आता नोकरीची तीन वर्षे राहिली होती. नीताने विचार केला ही नोकरी संपली की आपण काहीतरी सोशल वर्क करूया. नीताने आता कॉलेज सुटल्यावर ब्रेल लिपी शिकण्याचा क्लास लावला. फार आवडला तिला तो. हळूहळू नीता ब्रेलमधली पुस्तकं सहज वाचायला शिकली. तिचा जुना मैत्रिणीचा ग्रुप कधी सुटला तिला समजलं पण नाही आणि वाईट तर मुळीच वाटलं नाही. 

नीताला  ब्रेल शिकवणारी मुलगी अगदी तरुण होती. तिने एम एस डब्ल्यू  केल्यावर ब्लाइंड स्कूलमधेच नोकरी करायची ठरवली होती आणि आपण होऊन ब्रेल शिकणाऱ्या नीताचे तिला फार कौतुक वाटले. आता रोज नीता ब्लाइंड स्कूलमध्ये जाऊन छोट्या मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवू लागली. किती आनंदाच्या वाटा खुल्या झाल्या नीताला ! नीता रमून गेली तिकडे. ही  ब्रेल शिकवणारी तरुण मुलगी नीना तर तिची मैत्रिणच झाली .नीताची नोकरी संपली आणि  नीता रिटायर झाली. होणाऱ्या निरोप  समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या. 

क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकाकीपणा विकत घेणे आहे – लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

🌸 जीवनरंग 🌸

☆ एकाकीपणा विकत घेणे आहे – लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

निमिषच्या फोनवर मेसेज आला ‘ फिरायला जायचं आहे, येशील का ? वेळ संध्याकाळी पाच ते सात.’  त्याने चटकन yes रिप्लाय केला. त्याने पत्ता पाठवला. त्याने वॉकिंगच्या स्मायली टाकल्या. आईची चाहूल लागली की फोन बंद केला. आई बघत राहिली. काही विचारावेसे वाटले; पण त्याचा मुड जाईल म्हणून गप्प बसली. चहा घेणार ? विचारले तर मानेनेच नकार दिला. आई निघून गेली.

हल्ली सतत हेच चालले होते. संध्याकाळी 4 नंतर तो जायचा ते 11 पर्यंत यायचा नाही. आईला काळजी वाटायची. सरळ साधा, हळवा, प्रेमळ असणारा निमिष पदवी मानसशास्त्रात घेतली होती. पण नोकरी मिळत नव्हती. कोणताही व्यवसाय करावा तर त्याला भांडवल देण्याची ऐपत नव्हती. नोकरी नाही तर छोकरी नाही हे व्यवहारी गणित त्यांच्याबाबतीत जुळून आलेले. वडीलही कापडाच्या दुकानात काम करत होते. आई डबे करत असे.

त्याच्या बाहेर जाण्याचे गूढ वाढत चालले होते. आईला आता काळजी वाटू लागली की हा रोज कुठे जातो. ह्याला काही वाईट संगत लागली की काय ? असे वाटू लागले होते. आज काल वाट्टेल ते ऐकायला येत होते. अगदी मुले पैसे मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतात त्या सर्व वाईट गोष्टी वाटून गेल्या. स्मगलिंगपासून जिगेलोपर्यंत सगळ्या शंका डोकावून गेल्या. त्याचे काय चालले आहे ते कळत नव्हतं. आजही तो बाहेर पडला की निमिषची आई, सुहृदाने बाबांना, सुमितला फोन केला. आजही निमिष न सांगता गेला. आजही कुणाचा तरी मेसेज आला आणि तो गेला. मला त्याची फारच काळजी वाटू लागली म्हणाली. बाबा म्हणाले “ तो जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत आपण ही बोलायचे नाही. तो वाईट मार्गाला जाणार नाही याची खात्री आहे. तू शांत रहा मी आल्यावर बोलूया “आणि फोन ठेवला.

फोन ठेवला खरा पण काळजी तर त्यांनाही वाटत होतीच दुकान मालकाला सांगून आज लवकरच बाहेर पडले. नेहमीची बस मिळाली नाही म्हणून थोडे वाट पहात झाडाखाली थांबले. एवढ्यात त्यांना निमिष दिसला. त्याला हाक मारावी म्हणून तोंड उघडणार एवढ्यात त्यांना त्याच्याबरोबर एक वयस्कर बाई दिसली. तिच्या सोबत हा चालला होता. ती बाई त्याच्यासोबत बरीच ओळख असल्यासारखी बोलत होती. ते गप्प बसले. त्याचे ह्यांच्याकडे लक्ष नव्हते, ती दोघे निघून गेली. बाबांना काहीच कळेना. ह्या बाई कोण ? तसेच घरी आले. निमिष आलाच नव्हता. पत्नीला काही बोलले नाहीत.

दोन दिवस गेल्यावर त्यांचा एक मित्र म्हणाला, “ परवा निमिषला मॉलमध्ये बघितले एका महिलेसोबत. तुझा विश्वास बसणार नाही म्हणून फोटो काढून आणला. बघ जरा ह्या कोण आहेत. तुमच्या बऱ्याच नातेवाईक स्त्रिया मला माहिती आहेत. ह्या वेगळ्याच वाटल्या. त्यांनी फोटो पाहिला. त्या दिवशीच्या बाईपेक्षा ही वेगळीच होती.”  आता मात्र ते चक्रावले पण तसे दाखवले नाही. त्याला म्हणाले ? हो, ह्या तुला माहिती नाहीत. पत्नीकडच्या आहेत.” घरी गेल्यावर पत्नीशी बोलायचे ठरवले.

घरी आल्यावर सुहृदाला म्हणाले, “ मला तुझ्याशी बोलायचे आहे;”  तर ती म्हणाली “ आधी मला बोलू द्या. आज माझी मावशी नाटकाला गेली होती. तिथे तिला निमिष vip रांगेत बसलेला दिसला. ह्याने तिला ओळख दिली नाही. जाताना मोठ्या गाडीने निघून गेला. तिने बघितले. एवढी मोठी गाडी घेतली आम्हाला बोलली नाहीस असे म्हणून ती रागावली व फोन बंद केला. आता मात्र हद्द झाली. हा काय करतो ते आज कळलेच पाहिजे.”  एवढ्यात बाबांचा फोन वाजला मालकांचा होता. घरी अर्जंट पत्नीसह बोलावले होते. बाबा म्हणाले आधी जाऊन येवू मग बोलू.

मालकाच्या घरी मोठी पार्टी सुरू होती. सर्वांना आमंत्रण दिले होते. घरात देखरेखीसाठी विश्वासू असल्याने ह्यांना बोलवले होते. मालकांच्या वडिलांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होता. सगळी तयारी झाली होती. आता त्यांची एन्ट्री होणार म्हणून सगळे त्यांच्यावर फुले टाकायला उभे राहिले होते. शानदार गाडी, दाराशी आली त्यातून उतरला तो निमिष. त्याने आजोबांना धरून उतरवले. सुमित व सुहृदा त्याला तिथे बघून चमकले. काहीच बोलले नाहीत. सोहळा पार पडला. सगळे घरी जाण्यासाठी निघाले. निमिषला आजोबा म्हणाले, “ तू आपल्या गाडीने जा, रात्र झाली आहे.” त्याने बाबांना जाताना पाहिले. त्यांना थांबवले.  ‘ गाडीतून जाऊ ‘ म्हणाला. सुमितला वाटले ह्याने मालकांच्या वडिलांच्या केअरटेकरची नोकरी पत्करली आहे. त्यांचा स्वाभिमान दुखावला होता.

पण आजोबांनी निमिषचे कौतुक करायला सुरुवात केली. ते म्हणाले, “ तू फार भाग्यवान आहेस की हा तुझा मुलगा आमच्यासारख्या वृध्द एकाकी लोकांचा आधार बनला आहे.”  सुमितला कळेना हे काय बोलत आहेत. आजोबा म्हणाले, “ हा तुझा मुलगा जे काम करत आहे, त्याचे खूप मोठे पुण्य त्याला मिळणार आहे.”  त्यांनी विचारले, “  तुम्ही ह्याला कसे ओळखता, तुमची ह्याची भेट कशी झाली ?”  

त्यावेळी निमिष म्हणाला मी सांगतो बाबा ऐका….. “ मी कामाच्या शोधात खूप फिरत होतो. त्यावेळी मला तऱ्हेतऱ्हेच्या माणसांशी गाठ पडली. मी असेच काम मिळेना म्हणून हताश होऊन बागेत बसलो होतो.  तेथे एक आजी येवून बसल्या. सुरुवातीला मला राग आला. त्यांनी माझी चौकशी केली. मी फक्त हो/ नाही करत राहिलो. त्याच त्यांचे काहीबाही सांगत होत्या. बराच वेळ झाला. मग त्या म्हणाल्या ‘ माझा नातू तुझ्याएवढाच आहे. तुला बघून तोच आठवला म्हणून बोलले एवढे. तो परदेशी असतो. पती वारले आहेत. घरी मी एकटीच. दिवसभर कोणाशी बोलणार? कामाच्या बायकांव्यतिरिक्त कोणी येत नाही. कोणाशी बोलू ? मग इथे बागेत येते. कोणाशी तरी बोलत राहते. ऐकून घेणारे कोणीतरी भेटते. बोलले की जीव हलका होतो. नाहीतर खाण्याखेरीज तोंड उघडत नाही दिवसभर. बरं निघते मी. ये उद्या बोलायला असाच.” 

त्या आजीशी मी फार बोललो नाही. त्याच खूप काही बोलल्या तरी त्यांना बरे वाटले आणि मला माझे काम सापडले तिथेच. मी विचार केला या जगात अशी एकाकी असणारी अनेक माणसे आहेत. त्यांना फक्त ऐकणारे कुणीतरी हवे आहे. साथ देणारे हवे आहे… सिनेमाला, नाटकाला, खरेदीला, फिरायला, खेळायला, बोलायला आणि त्यापेक्षाही ऐकायला माणूस हवा आहे. मोबाईल, टीव्ही या यांत्रिकी मनोरंजनाचा माणसाला कंटाळा आला आहे. घरात माणसे कमी, असलेली कामावर जाणारी, घरी आली की मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसणारी, कुणाला कुणाशी बोलायला, बोलणे ऐकायला वेळ नाही. एखादी कलाकृती बघताना सोबत जर समान इंटरेस्ट असणारा असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. मी मानसशास्त्रात पदवी घेतली असल्याने हे काम करायचं ठरवलं. मग एक जाहिरात तयार केली…..  

“ एकटेपणा विकत घेणे आहे….  तुमचे ऐकणे, तुम्हाला खरेदीला, नाटकाला, सिनेमाला, बँकेत जाण्यासाठी सोबत करणारा एक साथीदार मिळेल. कोणतेही अनाहुत सल्ले न देणारा, तुम्हाला जज न करता तुम्हाला सोबत करणारा, गॉसिप न करणारा, विश्वासार्ह साथीदार मिळेल.” –  संपर्क क्रमांक दिला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला खूप फोन येवू लागले. ह्यात मी स्वतःला काही बंधने घालून घेतली. वेळ, स्थळ माझ्या मर्जीने ठरवतो. आधी त्यांचा बायोडाटा बघतो आणि मग ठरवतो. ह्यातून अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी होत गेल्या. पैसे मिळू लागले. त्याचाच एक भाग म्हणून या आजोबांशी ओळख झाली. म्हणून आज कार्यक्रमाला आलो होतो. हे मला तुम्हा दोघांना सांगायचे होते पण तुम्हाला हे आवडणार नाही असे वाटले. ह्यात काही लपविण्याचा हेतू नव्हता. त्यादिवशी मावशीला मी नाटकाला दिसलो ते असेच एका काकूंना नाटकाची खूप आवड. पतीला अजिबात नाही म्हणून सोबत केली. बाबा तुम्हालाही बघितले होते. त्या मावशींना रस्त्यावर खरेदी करायला आवडते पण घरच्यांच्या स्टेटसला शोभत नाही म्हणून करता येत नाही. मग मला बोलावले त्यांनी. आम्ही मनसोक्त खरेदी केली. एका आजीना वाचायचा नाद आहे त्यांना पुस्तके वाचून दाखवतो, तर एका मावशींना खूप बोलायला आवडते. दिवसभर घरी कोणीच नसते ऐकायला सगळे कामाला जातात, मी त्यांचा श्रोता होतो.”

“आई बाबा मी कोणतेही वाईट काम करत नाही. उलट मदतच करत आहे. तुमचे चांगले संस्कारच मला इथे उपयोगी पडतात. कुणाचा सुहृद, कुणाचा सखा, कुणाचा श्रोता, कुणाचा खरेदीचा पार्टनर तर कुणाचा खाबुगिरीतला दोस्त. माझ्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे करतो आहे. ह्याला इतका रिस्पॉन्स मिळेल असे वाटले नव्हते. पण मनुष्याच्या एकाकीपणामुळे माझ्या या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.” 

आई-बाबा निमिषकडे बघतच राहिले. नव्या युगातील या नव्या व्यवसायाचे कौतुक करावे की, माणूस सगळ्यात असून एकटा पडला ह्याची खंत वाटावी, ह्या द्विधा मनस्थितीत घरी परतले.

लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद

पंढरपूर.

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्पेस — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

स्पेस — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आय.टी. क्षेत्रात काम करणारे सुशांत प्रज्ञा आपापल्या कंपनीत अतिशय चांगले काम करत होते. लग्न करून शहरात नोकरी निमित्ताने स्थिर होऊ पहात होते.

दोघांचाही पगार लाखांच्या पलिकडचा त्यामुळे सगळ्या ऍम्यूनिटिज असलेल्या महागड्या टाऊनशिपमधे त्यांचे सर्व सोयींनी युक्त असे टू बीएचके चे घर. 

सकाळी उठून दोघेही आपापल्या कारनी ऑफिसला जायचे. संध्याकाळी यायची वेळ निश्चित नाही पण यायचे आणि तरी समोर लॅपटॉप उघडून बसायचे आणि मोबाइलवर सतत कॉल्स. 

एकमेकांशी बोलायला वेळ नाही आणि धडपणे जेवायला जमत नाही. अशी गत•••. स्वयंपाक करायचा कोणी? बाईने केला तरी तो थंड स्वयंपाक खायचा कोणी? नकोच असले काही म्हणून दोघांनीही रोज आपल्या आवडीचे जेवण बाहेरून मागवायचे, जमलेच तर एकत्र जेवायचे नाहीतर ज्याला जसे जमेल तसे त्याने खाऊन घ्यायचे. 

एकमेकांबरोबर कुठे जाणे सोडाच, पण एकमेकांशी धडपणे बोलताही येत नव्हते त्यांना. पाच दिवस काम दोन दिवस सुट्टी, असे असले तरी सुट्टीच्या दिवशीही एकतर बरेच उशीरा उठायचे आणि मग ५ दिवसांचे कामाचे प्लॅनिंग, काही क्लायंटसच्या शंका कुशंका सोडवणे आणि इतर काही गोष्टींमुळे दोघे आपल्यातच व्यग्र.

कामापुरते जुजबी गोष्टीच ते एकमेकांशी बोलायचे. घर आणि रहाणीमान पाहून सगळ्यांना वाटायचे ‘ वा काय मस्त संसार चालला आहे राजा राणीचा ••’ त्यांच्या आपसातील प्रेमाचा(?) हेवाच वाटायचा प्रत्येकाला.

१-२ महिन्यांनी गावाकडून बोलावणे यायचे. मग दोघांनी आनंदाने प्रेमाने जावे की नाही? पण नाहीच, त्यावरूनही कधी सुशांत तर कधी प्रज्ञा चिडायची. अरे आपल्याला आपली काही स्पेस हवी की नाही? एरवी नोकरी, क्लायंटस आणि सुट्टीच्या दिवशी काय तर म्हणे आई-बाबा आजी यांना भेटायला जाऊन दमायचे. कधी मिळणार आपल्याला आपल्यासाठी स्पेस?

झाऽऽऽले या दोघांमधे कोणी नको म्हणून गावाकडच्यांनी यांना शहरात रहायला परवानगी दिली, अभिमानाने कौतुकाने यांच्याबद्दल गावातल्या सगळ्यांना सांगत होते. मग हे दोघेच एकत्र रहात होते तरी त्या दोघांनाही मनाप्रमाणे एकमेकांना वेळ देता येत नव्हता, तसेच स्वत:साठीही वेळ देता येत नव्हता, तेवढी स्पेस त्या दोघांना मिळत नव्हती ही फॅक्ट होती•••

एका विकेंडला असेच गावाकडे जाण्यावरून दोघांचेही बिनसले. प्रज्ञा म्हणाली, “ यावेळी मी नाही येत, तूच एकटा जा.”  तर सुशांत म्हणाला, “ तुझ्या आई बाबांकडे मी येतो ना? मग माझ्या आई बाबांकडे जाताना तुला का प्रॉब्लेम येतो?”  ती म्हणाली, “ मी पण येतेच की, पण आज मला शांतता हवी आहे. मला माझी स्पेस हवी आहे. थोडी विश्रांती हवी आहे. तर तू मला माझी स्पेस देणारच नाहियेस का? ”

असे बोलून ती एका बेडरूममधे जाऊन दार लावून बसली. तिने घट्ट डोळे मिटून घेतले. डोके ओढणीने बांधून घेतले. पडदे ओढून अंधार करून ती पलंगावर पडली. हळूहळू तिला थोडे शांत वाटायला लागले, आणि तिला तिची आई आजी दिसू लागले•••

आई बाबा काका काकू आजी, आम्ही दोघे भावंडे आणि चुलत दोन भावंडे, असे ९ जण एका कुटुंबात रहात होतो. आई घरातील मोठी सून म्हणून सगळी जबाबदारी तिच्याकडे होती. पण सगळ्यांच्या आवडी निवडी, आजीचे मत, सगळे सांभाळून ती आनंदाने रहात होती. वडिलांच्या कामात हातभार लावून मधेअधे सिनेमा नाटके फिरायला जाणे हे सगळे ती करू शकत होती. 

मग प्रज्ञाला आठवले … एकदा तिने आईला याविषयी विचारलेही होते, “ तू कसे हे सांभाळू शकतेस? कसं जमतं गं तुला? “ तेव्हा आई म्हणाली होती, “अगं हे सगळं मी आपल्या माणसांसाठीच करते ना? मग आपल्या माणसांसाठी काही केले तर ते कष्ट जाणवत नाहीत. ते कष्टच वाटत नाहीत. फक्त त्यासाठी थोडी तडजोड आवश्यक आहे.”

“अजून एक सांगते बघ••• मला जेव्हा त्रास व्हायला लागतो ना? तेव्हा मी सासूबाईंचा विचार करते. अगं आपलं तर तेव्हा २०-२५ जणांचं कुटुंब होतं. तरी त्यांनी नाही सगळं सांभाळलं? त्यांना पती पत्नींना एकमेकांसाठी वेळ देणं तर सोडाच पण एकमेकांशी बोलताही येत नव्हतं. मग एकमेकांशी बोलणे नाही जमले तरी कोणाच्याही नकळत एकमेकांना स्पर्श करणं. काही खोड्या करणं यातूनच तर प्रेम बहरलं. एकमेकांच्या हृदयात घर केलं. ( हृदयात स्पेस निर्माण केली) सगळं घर हसतं खेळतं ठेवलं.”

“मग त्यांच्याही सासर्‍यांचे निधन झाले म्हणून घराच्या वाटण्या झाल्या आणि त्यांच्या ४ मुलांसवे वेगळ्या राहू लागल्या. तरी सणवार,लग्न, मुंज आदि सोहळ्यांना उपस्थित राहून त्यांनी इतरांच्या मनातही असलेली स्पेस जपलीच ना? तेव्हा घरात जागा नसेल कदाचित पण प्रत्येकाच्या मनात निश्चित जागा होती. हे सगळे पाहिले आणि मग थोडा त्याग, थोडी आपल्या भावनांना मुरड घालता आली तर आपणच आपली स्पेस निर्माण करू शकतो हे पटलं. म्हणून मी पण सासूबाईंच्या नकळत त्यांचा हा गुण चोरला म्हटलीस तरी हरकत नाही.” 

प्रज्ञाला हे आठवले मात्र. तिने डोळे खाडकन उघडले . तिच्या मनात असंख्य विचार भिरभिरून गेले. आपण दोघेच रहात असलो, घर मोठं असलं तरी आपल्याला स्पेस नाही हा किती कोता विचार आहे हे लक्षात आले. आपल्याला स्पेस मिळण्यासाठी कुणाच्यातरी मनात स्पेस निर्माण करता यायला हवी हे तिला पटले. 

तेव्हा स्पेस नसेलही कदाचित, पण एकमेकांच्या मनातील स्पेसमुळेच सगळी सुख दु:खे संकटे यांना सामोरे जायचे धैर्य मिळत होते, खंबीरता लाभत होती. आता एवढी स्पेस असूनही एकमेकांच्या मनातच स्पेस नाही त्यामुळे संकटकाळी अडीअडचणींना एकट्यानेच सामोरे जावे लागते आहे.  तेवढे धैर्य आपल्यात नसले तरी वरवर ते आपण दाखवतो आणि आतल्या आत खचतो. 

ही खच कोणाच्याही हृदयात स्पेस नसल्याने कोणालाच कळत नाही. आता आपणही अशीच स्पेस निर्माण करायला हवी हे तिने आता भांडून घेतलेल्या स्पेसने तिला शिकवले होते.

प्रज्ञा बाहेर आली आणि सुशांतला म्हणाली,” चल आपण गावाकडे जाऊ.” गावाकडील लोकांच्या मनात स्पेस करण्याच्या या विचाराने सुशांतच्या हृदयातील तिची स्पेस जरा बळकट झाली होती.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पश्चात्ताप… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पश्चात्ताप… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण  पहिले – पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा?” नरेशने विचारलं – आता इथून पुढे)

“आम्हांला वेळ मिळत नाही असं म्हणणारे तासंतास टिव्ही बघत बसलेले असतात नाहीतर मोबाईलवर व्हाँट्सअप,फेसबुकमध्ये बुडून गेलेले असतात.मी त्याऐवजी वेळेचं मँनेजमेंट केलं.अर्थात खुप स्ट्रिक्टली नाही कारण मग आपण जे करतो त्यातला आनंद हरवून जातो.आणि मी जे करत होतो ते आनंदासाठी.मला काही त्यात करीयर करायचं नव्हतं”

नरेशला आपलं आयुष्य आठवलं.नोकरी एके नोकरी आणि नोकरी दुणे घर याशिवाय त्याला दुसरं काही माहित नव्हतं.अफाट पैसा कमवायचा मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि तीन पिढ्या बसून खातील अशी प्राँपर्टी जमवायची हे त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं.हे ध्येय साधतांना आपण कधीही न मिळणारे आनंदाचे क्षण गमावतोय हे कधी त्याच्या लक्षात आलं नाही.निवृत्त झाल्यावर आपल्याला भरपूर वेळ असेल.तेव्हा जे करायचं राहून गेलंय ते करता येईल असं त्याचं मत होतं.

” मीही आता ठरवलंय.उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं” नरेश म्हणाला ” आताशी तर आपण साठी गाठलीये.अजून दहा वर्ष तरी काही होत नाही आपल्याला”

” तसं झालं तर सोन्याहून पिवळं.पण आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं ग्रुहीत धरुनच मी माझं जीवन जगलो”

सुनीलच्या या म्हणण्यावर नरेश जोरात हसून म्हणाला

” डोंट वरी यार.तुही काही लवकर मरत नाहीस.आता हे जग मला दाखवण्याची जबाबदारी तुझी.बरं ते जाऊ दे.तुझी मुलं काय करताहेत?लग्नं झाली असतील ना त्यांची?”

“हो तर! मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. मुलगा माझ्याच सोबत रहातो आणि मुलगीही याच शहरात असल्याने नातवंडासोबत माझे दिवस झकास चालले आहेत”

नरेशचा चेहरा पडला.वर्षभरापासून बंगलोरला रहाणारी मुलं घरी न आल्याने नातवंडाशी त्याची भेट आजकाल व्हिडीओ काँलवरच व्हायची.

“घरबीर बांधलंस की नाही?”त्याने उत्सुकतेने सुनीलला विचारलं

” हो तर!तुझ्यासारखा बंगला नाहीये माझा पण एक टूबीएचकेचं घर आहे.मुलगा चांगला कमावतोय.तो बांधेल मोठा बंगला पुढे. शेवटी त्यालाही काहीतरी स्वकष्टाची प्राँपर्टी केल्याचं समाधान मिळायला हवं ना!तुझी कार मात्र झकास आहे हं”

“तू केव्हा पाहिलीस?”नरेश आनंदाने फुलून म्हणाला

“मगाशी तू आलास तेव्हा मी बाहेरच होतो”

“अच्छा!लग्न लागल्यावर चल.तुम्हांला गाडीतून घरी सोडतो”

“अरे मी आणलीये ना माझी गाडी.तुझ्या गाडीइतकी आलिशान नाहिये पण ठिक आहे.माझं काम भागतंय तिने”

नरेशचा चेहरा पडला.”अरेच्चा!आपण  कमावलेल्या सगळ्या गोष्टी सुनीलकडेसुध्दा आहेत.मग आपण एवढा गर्व का करतोय?”त्याच्या मनात विचार आला.सुनीलला कमी लेखून आपण मोठी चुक करतोय हेही त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात नवरदेवाची मिरवणूक आली.अर्ध्या तासात लग्न लागलं.सुनीलला पाहून बरेच लोक त्याला आनंदाने भेटत होते.तरुण मुलंमुली त्याच्या पाया पडत होते.सुनीलला पाहून नवरीला खुप आनंद झाला.त्याच्या पाया पडून ती नवऱ्याला म्हणाली ” हे आमचे भागवत सर.यांनी आम्हांला भरभरून जगायला शिकवलं.शिकणं आणि जगणंसुध्दा किती आनंददायी असतं हे त्यांच्यामुळेच आम्हांला कळलं” तिच्या नवऱ्याने सुनीलला वाकून नमस्कार केला.

सुनीलला मिळणारा आदर पाहून नरेश मनातून खट्टू झाला.त्याला आठवलं.निवृत्तीनंतर तो आँफिसला दोनतीन वेळा गेला तेव्हा तिथल्या स्टाफने त्याची दखलसुध्दा घेतली नव्हती.ही ब्याद कशाला इथे आली असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.

जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्र एकमेकांना घरी यायचं निमंत्रण देऊन निघाले.

नरेशने ठरवलं आता सुनीलसारखं जगायचं.आहे ते उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं.आता त्याला त्याचा एकटेपणा खटकू लागला.म्हणून मग त्याने दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नागरीक संघाची सदस्यता घेतली.आतापर्यंत कट्ट्यावर बसणारे हे म्हातारे त्याला आवडत नव्हते.हळुहळू त्याची त्यांच्याशी मैत्री झाली. माँर्निंग वाँक त्यांच्यासोबत होऊ लागला.एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाला गेला.या वयातही संगीत आपल्याला आवडतं,आपल्या मनाला भारुन टाकतं हा नवीन शोध त्याला लागला.अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांना कधी त्याने हात लावला नव्हता.वपु.काळे,चेतन भगत,पाऊलो कोएल्होची पुस्तकं आता टेबलवर उपस्थिती देऊ लागली.स्वयंपाक हे बायकांचं क्षेत्र आहे असं तो आजपर्यंत मानत होता.पण आता नवीन रेसिपीज तो बायकोला सुचवू लागला आणि ती बनवण्यासाठी तिला मदतही करु लागला.एक दिवस ज्येष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांना त्याने एका चांगल्या हाँटेलात पार्टी दिली.सुनीललाही त्याने स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं.आपल्या या मित्रामुळेच आपण आनंददायी जीवन जगायला सुरुवात केली आहे याचा त्याने सर्वांसमक्ष उल्लेख केला.सुनीलनेही मग आपण कसं जीवन जगलो आणि उरलेलं आयुष्य कसं भरभरुन जगलं पाहिजे याबद्दल एक खुमासदार भाषण ठोकलं.

सिंगापूर, मलेशियाच्या टूरला आता चारपाचच दिवस उरले होते.ही टूर झाली की हिस्टोरिकल युरोपची टूर करायची हे नरेशने ठरवून टाकलं.आपलं हे सुंदर आयुष्य फार कमी उरलंय याचा खेद त्याला आजकाल वाटू लागला होता.

टुरला दोन दिवस बाकी होते.तो सकाळी आपल्या मित्रांसोबत माँर्निग वाँक करत होता.जाँगिंग ट्रँकचे तीन राऊंड त्याने पुर्ण केले.चवथ्या राऊंडला त्याने सुरुवात केली आणि त्याच्या छातीत कळ आली.कळ इतकी जोरदार होती की तो खालीच कोसळला.पडता पडता त्याचा उजवा गुडघा जोरात आपटला.त्याच्याबरोबरचे सगळे धावून आले.सगळ्यांनी मिळून त्याला बेंचवर झोपवलं.घामाच्या धारांनी तो न्हाऊन निघाला होता.अँब्युलन्स बोलवण्यात आली.त्याला हाँस्पिटलमध्ये अँडमिट करण्यात आलं.ट्रिटमेंट सुरु झाली. दोन तासांनी तो शुध्दीवर आला. समोरच त्याची बायको आणि डाँक्टर उभे होते.

“कसं वाटतंय?”त्याच्या बायकोने मीराने विचारलं.त्याच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं.उजवा गुडघा भयंकर दुखत होता.

“मला काय झालं होतं?”खोल गेलेल्या आवाजात त्याने डाँक्टरला विचारलं.    “तुम्हांला मासीव्ह हार्ट अटँक आला होता.त्यात तुम्ही नेमके गुडघ्यावर आपटल्यामुळे तुमचा गुडघा तुटलाय.त्याचं आँपरेशन करावं लागणार आहे.”

” मग करुन टाका.आम्हांला दोन दिवसांनी सिंगापूरला जायचंय”

डाँक्टर हसले. म्हणाले,

“साँरी मिस्टर नरेश.यु हँव टू फरगेट अबाउट युवर टूर.तुमची शुगर आणि बी.पी.जोपर्यंत नाँर्मल होत नाहीत तोपर्यंत आँपरेशन शक्य नाही.आँपरेशन नंतरही तुम्हांला लवकर चालता येईल असं वाटत नाही.दुसरी गोष्ट उद्या तुमची एंजिओग्राफी करणार आहोत.हार्टमधल्या ब्लाँकेजेसवर तुमची बायपास करायची की एंजिओप्लास्टी ते ठरेल.माझ्या अनुभवानुसार तुमची बायपासच करावी लागेल असं वाटतं.आणि बायपास झाल्यावर कमीतकमी तीन महिने तरी तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही”

नरेशने हताशपणे बायकोकडे पाहिलं.

जाऊ द्या .तुम्ही अगोदर बरे व्हा.मग बघू कुठे जायचं ते” ती त्याला समजावत म्हणाली ” जीव वाचला ते काय कमी आहे? सिंगापूर काय नंतर केव्हाही करता येईल!”

नरेश काही बोलला नाही.पण त्याला समजून चुकलं होतं.त्याच्या जीवाचं काही खरं उरलं नव्हतं.नशीबात असलं तर टूर होतीलही पण ते कायम तब्ब्येतीच्या काळजीने भरलेले असतील.त्यात आनंद,उत्साह यांचा अभाव असेल.जीवनात आता कुठेशी रंगत येऊ लागली होती आणि त्यात हे असं घडलं.आयुष्य हे क्षणभंगुर आहे असं सुनील म्हणाला होता.खरंच होतं ते!आता टूरच काय आयुष्यात राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी करता येणार नव्हत्या.’अनेक गोष्टी योग्य वयातच केलेल्या चांगल्या असतात ‘ असं सुनील जे म्हणत होता ते चुकीचं नव्हतं हे त्याला आता ठाम पटलं होतं.क्षणभर त्याला सुनीलचा हेवा वाटला.आणि त्याच्यासारखं आयुष्य आपण का जगलो नाही या पश्चातापाने त्याचं मन भरुन गेलं.

 – समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print