डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
दारावरची बेल वाजली. आत्ता दुपारी कोण आलं असेल म्हणून देवकी जरा वैतागूनच दार उघडायला गेली. . . दार उघडलं तर दारात बकुळ उभी.
जवळजवळ सात आठ वर्षांनी देवकी बकुळला बघत होती. पहिल्यांदा तर तिने बकुळला ओळखलंच नाही. केवढा बदल झाला होता बकुळ मध्ये ! छानसं पोनीटेल, एका हातात घड्याळ आणि गळ्यात सोन्याची चेन. अंगावर सुंदर साडी आणि प्रसन्न हसतमुख चेहरा !
कुठे पूर्वीची कामवाली बकुळ ! शेपटा वळलेला, मोठं कुंकू आणि हातभर बांगड्या. बकुळ देवकीकडे दिवसभर कामाला होती. देवकी होती भूल देणारी डॉक्टर. चोवीस तास तिला केव्हाही कॉल यायचे. देवकीची मुलं लहान होती आणि देवकीला चोवीस तास रहाणाऱ्या बाईची अत्यंत गरज होती. तिचे सासू-सासरे होते म्हणा, पण देवकीच्या सासरचा गोतावळा खूप होता. सतत पाहुणे, माणसांचे येणे जाणे असायचं आणि मग सासूबाईंना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ व्हायचा नाही. देवकीचा नवरा होता डोळ्यांचा डॉक्टर ! तोही दिवसभर घरी नसायचा.
देवकीने हजार लोकांना बाईबद्दल सांगून ठेवले होते. अशात कोणीतरी ही बकुळ पाठवली. आली तेव्हा बकुळ असेल सोळा सतरा वर्षाचीच. पहाता क्षणीच देवकीला आवडली ही मुलगी. मोठे डोळे, पण विलक्षण चमकदार !
देवकी म्हणाली, “ काय ग नाव तुझं? किती शिकली आहेस? कोणी पाठवलं तुला? “
“ बाई, मी बकुळ ! तुमच्या मैत्रीण नाहीत का उषाताई, त्यांनी पाठवलं मला. मी काम करत होते त्या मावशी मुलाकडे गेल्या कायमच्या. मला राहून असलेलं काम हवंय म्हणून मला उषाताईंनी पाठवलं. मी दहावी शिकले बाई, पण पुढं नाही शिकता आलं. मला. आईवडील नाहीत, मामाने वाढवलं आणि आता मामी नको म्हणती मला रहायला. रोज रोज भांडण करण्यापेक्षा मीच मग चोवीस तासांचं काम बघतेय “. . एका दमात बकुळने आपली माहिती सांगितली.
देवकीला अत्यंत गरज होती अशा बाईची ! ती म्हणाली “ मी बघते तुला ठेवून घेऊन महिनाभर ! आवडलं, आपलं पटलं तर मग बघूया. मी कधीही केव्हाही बाहेर जाते. आजी आहेत कुरकुऱ्या, तुला पटवून घ्यावे लागेल हं ! “ बकुळ हसली आणि म्हणाली, “ बाई, उद्यापासून येऊ ना? “ देवकीला फार आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच बकुळ हजर झाली. नीट नेटकी साधी साडी, जाड केसांचा शेपटा, त्यावर गजरा !देवकीचा बंगला मोठा होता, त्यामुळे बकुळला ठेवून घेण्यात देवकीला अडचण नव्हती. आल्याआल्या पदर बांधून देवकी म्हणाली, “ बाई, घर दाखवा ना आपलं ! स्वयंपाकघरात गेल्यावर आजींना तिनं खाली वाकून नमस्कार केला. आजींनी प्रश्नार्थक मुद्रेने देवकीकडे बघितलं.
“ आजी, ही बकुळ. आपल्याकडे राहून काम करणार आहे. तुमच्या हाताखाली ही मदत करील तुम्हाला स्वयंपाक घरात ! “
आजी म्हणाल्या, “ हो का? आत्तापर्यंत सतरा जणी आल्या, आता हिचा काय उजेड पडतो बघूया. ” देवकीने बकुळकडे पाहिलं. बोलू नकोस अशी खूण केली आणि तिला तिची खोली दाखवली. देवकीने तिला काम समजावून सांगितलं. मुलांची ओळख करून दिली. तेवढ्यात फोन वाजलाच ! डॉ मराठ्यांकडे तिला लगेचच कॉल होता.
देवकी म्हणाली, “ बकुळ मी जातेय ! जमेल तसं कर. आले की बाकीचे सांगेन मी !” त्या दिवशी देवकीला घरी यायला रात्रीचे नऊ वाजले. एक मिनिट फुरसत मिळाली नाही तिला. घरी आता काय काय झालं असेल म्हणतच देवकी घरी आली. हॉलमध्ये देवकीची मुलं राही आणि रोहन बकुळ जवळ बसले होते आणि ती त्यांना गोष्ट सांगत होती आणि आजी सुद्धा ऐकत होत्या, मन लावून ! देवकीने सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवात तरी चांगली झाली म्हणायची… देवकी हसून मनाशी म्हणाली. हळूहळू बकुळ घरी रुळायला लागली. देवकीच्या फोनजवळ डायरी असायची आणि त्यात सगळे तिचे कॉल्स वेळ, तारीख नोट केलेले असायचे. बकुळ हळूहळू हे करायला शिकली. आता देवकीला कोणताही फोन आला की बकुळ म्हणायची, “ एक मिनिट हं सर ! बाईंची डायरी बघून सांगते. मी ! उद्या आठ वाजता नाहीये कुठे कॉल. मी लिहून ठेवते तुमचा कॉल आणि बाई आल्या की मग करतीलच तुम्हाला कॉल. ! “ बाकीच्या डॉक्टरांना बकुळचे कौतुकच वाटायचे. ‘ देवकी, तुझ्या बकुळने फिक्स केलाय बरं कॉल ! मस्त तयार झाली ग तुझी ही असिस्टंट ! “ इतर डॉक्टरणी देवकीला हेव्याने म्हणायच्या. बकुळ हळूहळू उजवा हात झाली देवकीचा. घरात तर ती सगळ्यांची आवडती झालीच ! रोहन राहीला तर एक क्षण करमत नसे बकुळताई शिवाय, आणि आजीही खूष होत्या तिच्यावर ! देवकीला खूप लळा लागला बकुळचा. ती आता घरातलीच सदस्य नव्हती का झाली? मुलं मोठी व्हायला लागली. आता तर त्यांना सांभाळायची आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायची तशी गरजही उरली नाही. देवकी एक दिवस लवकर घरी आली होती. बकुळचे सगळे काम संपले होते. देवकीने तिला विचारलं, “ बकुळ, खूप दिवस तुला विचारीन म्हणते, पण मी तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल कधीही चौकशी केली नाही ग ! तू अशी लोकांकडे कामं करत किती वर्षे रहाणार बाळा? किती गुणी आहेस तू. काय ठरवलं आहेस तुझ्या पुढच्या आयुष्याचं बेटा? “
बकुळच्या डोळ्यात पाणी आलं. “ बाई, काय सांगू तुम्हाला ! फार हाल काढलेत हो मी ! माझे आई वडील खूप लवकर गेले आणि मी एकटीच मुलगी त्यांना. मग मामा मामीनं थोडे दिवस संभाळलं. त्यांनाही त्यांची मुलंबाळं होतीच आणि गरीबीही होतीच की पाचवीला पुजलेली. नाईलाजानं त्यांनी मला अनाथाश्रमात ठेवलं. पण मामी नेहमी यायची मला भेटायला, थोडे पैसे द्यायची, कपडे घ्यायची. ती तरी आणखी काय करणार होती? मी होते त्या आश्रमात मुलं मुली दोन्ही होती. मी आश्रमाच्या शाळेतच जात होते. हे सुंदर रूप सगळीकडे आड यायला लागलं हो बाई. एका रात्री एका मुलानं बळजबरी केली माझ्यावर ! मी आरडाओरडा केला. पण काही दिवसांनी हे वारंवार घडत गेलं. कोणाकडे दाद मागणार मी? एक दिवस तर आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून….
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈