जीवनरंग
☆ घरातलीच — एक गृहितक! – सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆
सकाळच्या जेवणाच्या तयारीतच तिने डिनरसाठी लागणारी कोशिंबीर नि भाजीचीही चिराचिरी करून ठेवली. ‘आता फुलकेही दोन्ही वेळचे उरकून घेऊ ’ ह्या विचाराने तिनं तवा तापत टाकला नि पोळपाट लाटणं हाती घेतलं.सरावाने लाटण्याखालची पोळी झरझर गिरकी घेत मोठी होत होती नि जोडीला विचारांची आवर्तनंही !
सासूबाईंचा काल त्यांच्या मोठ्या लेकाशी झालेला संवाद तिच्या कानावर पडला होता तो आठवला.
(‘एकत्र कुटुंबात तग धरण्यासाठी म्हणून की काय आपले कान हळुहळु अधिकच तिखट होऊ लागलेयत ’ असा एक खोडकर विचार मनात डोकावला तिच्या ! )
“ हॅलो समीर, अरे दीप्ती नि क्षमा जायच्या आहेत नं मुलुंडला उद्या दुपारी ? तू नि मोहन या इथेच ! ठीकै ?”
पलिकडून रूकार मिळाल्याचा अंदाज आला तिला एकंदर संवादावरून !
दीप्ती नि क्षमा तिच्या सख्ख्या जावा. मुलुंडला ज्या काकांकडचं बोलावणं आलं होतं त्यांच्याशी तिचंही नातं, क्षमा नि दिप्तीसमानच असल्यामुळे आमंत्रण तर तिलाही होतं त्या फंक्शनचं !
पण…
हार्ट प्रॅाब्लेमचं निदान झाल्यामुळे गेली दोनेक वर्ष तिच्या सासूबाईंची तब्येत तशी नरमगरमच !
तसं तर दिप्ती-क्षमाच्याही त्या ‘अहो’ आईच !
परंतु … दोघीही स्वतंत्र आपापल्या घरी…ही आजार-झळ न पोचे दूरवरी … अशी सोईस्कर व्यवस्था !
‘आता २ दिवस बेड -रेस्टच घेते ’ असा सासूबाईंचा फतवा कोणत्याही क्षणी निघे. त्याप्रमाणे तो काल सकाळीही निघाला. ती घरातलीच नं, मग घरचं सगळं तिलाच बघायला हवं हा न्याय ( ?) लावून दोन्ही लेकांना ‘ इथेच या ’ चे फोन गेले देखिल.
तिचं लग्न ठरल्यानंतरचे आईचे शब्द आठवले आत्ता तिला, “ अगं , माणसं हवीत बाई ! इथे तू एकुलती एक ! तिथे तीनतीन भावंडं ! तुम्ही दोघं सासू-सासऱ्यांजवळ रहाणार म्हणजे घर सतत जागतं असेल. ह्या ना त्या निमित्ताने सगळी जमत रहातील. भरल्या घराची चव काही न्यारीच असते बाई ! मला आतून असं वाटतंय की तुझ्या समजूतदार नि माणूसप्रिय स्वभावाने घराचं गोकुळ करशील बघ ! ”
तिला वाटलं, ‘ खरंच तेव्हा आपल्याही मनात खुशीचे लाडू फुटत होतेच की ! कामाचा उरक , बोलका स्वभाव नि हवीहवीशी नाती, ह्या आपल्या गुणांनी-मनोधारणेनी अख्ख्या कुटुंबाला आपलंसं करता येणं काही कठीण नाही ’ असं स्वप्न आपणही पाहिलं होतंच की !
पण……
अहो आईंची चूल शेअर करतांना, विस्तवाखालचं वास्तव निराळंच असतं हे लक्षात येऊ लागलं नि ह्याच वास्तवाच्या चटक्यांनी मग तिला जागृत आणि जागरूकही केलं.
सणावारी एकत्र जमण्याचे कार्यक्रम, धार्मिक कार्य करण्याचे ठराव नि अशा अनेक गोष्टी, वेगळ्या चुली मांडलेल्या मुलांच्या-सूनांच्या सोईनुसार ठरत नि जाहीर होत… Execution करायला काय… ती आहेच घरात ! घर म्हटलं म्हणजे ‘ तिला ‘ करायला हवंच !
नि …’ घर ‘ कोणाचं ? तर ते मात्र नक्कीच ‘ आमचंय ‘ .. म्हणजे अहो आई नि सासरेबुवांचं !
ही अशी ट्रीटमेंट मिळूनही सुरुवातीला वाटलं तिला की कुटुंबात घट्ट स्थान मिळवायला काही काळ तर जाऊ द्यायला हवा. कामाचं योगदान देऊन जबाबदाऱ्या पार पाडल्या की ‘ आमच्या ‘ घराचं परिवर्तन सहज आपल्या ‘ घरात होईल ‘ नि तिलाही कुटुंबपरिघावर विराजमान होता येईल.
माहेरी एकुलती एक असल्यामुळे म्हणा किंवा माहेरची न्यूक्लिअर फॅमिली असल्याने म्हणा, दुहेरी वागणूकीचा गंधही नव्हता तिला सुरुवाती सुरुवातीला. आई-वडील स्वत:च्याच मुलांमध्ये असा पक्षपात कसा करू शकतात ? जवळ राहिलेल्या मुलापेक्षा बाहेर गेलेल्या मुलांशी अधिक गोडीचे संबंध का दर्शवतात ? जवळ राहिलेल्या मुलाच्या बायकोबरोबर सगळ्या गोष्टी शेअर कराव्या लागण्याचा वचपा काढायला अशी रणनीती आखत असतील का ?… असे अनेक प्रश्न * तिच्या* मनात घोळत असत तेव्हा.
वर्षागणिक अनुभवाअंती तिच्या प्रश्नांमध्ये भरच पडत गेली.
दीर-जावांनी त्यांच्या घरी केलेला एखाद-दोन दिवसांचा पाहुणचार ,आणलेल्या लहानसहान गिफ्टस् , केवळ फोनवरून केलेली विचारपूस नि ह्या सगळ्याचं ‘ अहो आईंनी ‘ भरभरून केलेलं कौतुक , (तेही घरच्या सुनेने २४/७ दिलेल्या * योगदानाला कर्तव्याच्या* कॅटेगरीत सोईस्करपणे ठेवून)
… म्हणजे * दिव्याखाली अंधार ?* की *कौटुंबिक राजकारण * ??
‘ वैयक्तिक घरगुती संबंध आपल्या जागी नि राजकारणी संबंध आपल्या जागी ’ ही अशी पक्षीय राजनीतीतली वाक्यं आपल्याला परिचयाची होती. पण * घरगुती राजनीती एव्हाना चांगलीच परिचयाची झालेय आपल्याला. आज काही झालं तरी ह्या राजनीतीला बळी न पडता घराबाहेर पडायचंच नि तेही हसतमुखाने चोख प्रत्युत्तर देऊन !
‘ स्स ! हाssय !!’ शेवटचा फुलका तव्यावरून उतरवतांना जशी वाफ हातावर आली, तशी विचारांच्या तंद्रीतून * ती* बाहेर आली.
“ हे काय तू कुठे निघालीस ? संध्याकाळी समीर नि मोहन यायचेत लक्षात आहे नं ?”
दुपारची झोप झालेली पाहून चहा घेऊन आलेल्या तिला अहो आईंचा प्रश्न आला.
“ अय्या, अहो आई , तुम्ही विसरलात का ? मुलुंडच्या काकांचं आपल्यालाही आमंत्रण आहे ! आणि ….
अहो, समीरदादा नि मोहनदादा यायचेत म्हणजे सगळी रक्ताची नातीच जमायचीत ! मग म्हटलं आपणच काकांच्या आमंत्रणाचा मान ठेवावा. तुम्हा सगळ्यांना मोकळेपणाने बोलता येईल नि आपल्या घरची प्रतिनिधी म्हणून मीही समारंभात उपस्थिती लावीन. ठीक आहे ?”
तिच्या ह्या अनपेक्षित मूव्हमुळे हैराण झालेल्या ‘ अहो ‘ आईंकडे हसतमुखाने कटाक्ष टाकून ती पर्स उचलून घराबाहेर पडली.
लेखिका : सुश्री अनुजा बर्वे
(कथा सत्य कथाबीजावर आधारित आहे. आजच्या घडीलाही जिथे जिथे असा “सापत्न भाव“ आढळत असेल त्यांना ह्या कथेशी रिलेट करता येईल असं वाटतं.)
संग्राहिका – सुश्री पार्वती नागमोती
मो. ९३७१८९८७५९
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈