मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकीचं दान ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ माणुसकीचं दान ☆ श्री दीपक तांबोळी

“तुषार तू म्हणत होतास ना की तुला काहीतरी समाजसेवा करायचीये म्हणून.ती संधी चालून आलीये बघ.येत्या वीस तारखेला आपण एका आदिवासी पाड्यावरच्या आदिवासींना दिवाळीनिमित्त कपडे देणार आहोत.तुझ्याकडचे जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे काढून ठेव.आणि हो!यावेळी जी माणसं वस्त्रदान करतील त्यांचे फोटो आपण वर्तमानपत्रात देणार आहोत “

तुषारचा सामाजिक कार्यकर्ता असलेला मित्र,प्रताप फोनवर बोलत होता.

“ओके प्रताप.मी तयार आहे.माझ्याकडे बरेच जुने कपडे आहेत.ते काढून ठेवतो” तुषार आनंदाने म्हणाला.

काहीतरी समाजसेवा करावी असं बऱ्याच दिवसांपासून तुषारच्या मनात होत़ं.या कार्यक्रमाने त्या समाजसेवेला सुरुवात होणार होती.शिवाय प्रताप म्हणाला तसे वर्तमानपत्रात फोटो छापून आले तर दुधात साखरच पडणार होती.

” अहो ऐकताय का?”

शितलच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.

” बोल काय म्हणतेय?”

“आपली कामवाली म्हणत होती साहेबांचे आणि आकाशचे काही जुने कपडे असतील तर दिवाळीसाठी द्या म्हणून “

” अगं आताच मी प्रतापला कबूल केलंय आदिवासींना कपडे द्यायचं.यावर्षी राहू देत कामवालीला.पुढच्या वर्षी बघू ” तुषार जरा चिडूनच बोलला.

” अहो.तुम्हांला माहितेय ना,तिचा नवरा टी.बी.च्या आजारामुळे घरीच असतो.मुलं लहान आहेत.कमावणारी ही एकटीच.तेही महिन्याला फक्त दिडदोन हजार कमावणार.काय होत असेल त्यात?आपल्या आकाशचा एक ड्रेस येतो ३-४ हजारात.ती अख्खं कुटुंब चालवते त्या दिडदोन हजारात ” शितल त्याला समजावू लागली.

“असू दे.असंही तू तिला नेहमीच काही ना काही देत असते.यावेळी नाही दिलं तर काय बिघडलं?आणि आता मी प्रतापला कबूल करुन बसलोय.समाजसेवा करायची चांगली संधी आलीये तर त्यात तू विघ्न आणू नकोस “

तुषार चढ्या आवाजात म्हणाला तशी शितल चुप बसली.

शेवटी तो दिवस उजाडला.तुषार त्याचे स्वतःचे आणि आकाशचे जुने इस्त्री केलेले कपडे घेऊन आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी निघाला.मुख्य रस्त्यापासून ७ किलोमीटर आत जंगलात असलेल्या त्या पाड्यावर पोहचायला त्याला तब्बल एक तास लागला इतका तो रस्ता खराब होता.पाड्यावर पोहचल्यावर मात्र तिथलं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होत असेल याची त्याला कल्पना नव्हती.तिथं एक मोठा शामियाना उभारलेला होता.त्यात पन्नास एक खुर्च्या ठेवलेल्या होत्या.त्याने चौकशी केली तेव्हा मंत्री,खासदार,आमदार आणि कलेक्टरपासून सरपंचापर्यंत सारेच झाडून हजर रहाणार असल्याचं त्याला कळलं.गरीब आदिवासींना जुने कपडे देण्याच्या कार्यक्रमात या राजकारणी लोकांची उपस्थिती कशासाठी?असा त्याला प्रश्न पडला पण  व्हि.आय.पी.व्यक्तींसोबत आपले फोटो निघणार या विचाराने तुषार खुश झाला.

पाहुण्यांना यायला उशीर होता म्हणून तिथे उपस्थित असलेल्या आदिवासी तरुणाशी तुषार बोलू लागला.त्या तरुणाच्या बोलण्यावरुन तुषारला कळलं की पाचशे लोकवस्तीच्या त्या पाड्यावर कसल्याही सुविधा नव्हत्या.दोन किलोमीटरवरुन पाणी आणावं लागत होतं.म्हणायला वीजेचे खांब होते पण दिवसातून दोनतीन तासच वीज उपलब्ध असायची.काही बिघाड झाला तर आठवडा आठवडा कुणी तो दुरुस्त करायला येत नव्हतं.पाड्यावर दवाखाना नव्हता.तिथून अठरा किमी.वरच्या गावात सरकारी दवाखाना होता पण तिथे डाँक्टर क्वचितच उपलब्ध असायचे.खराब रस्त्यामुळे शहरात जाणयेणंही खुप त्रासदायक होतं.पावसाळ्यात तर त्या रस्त्यात इतका चिखल व्हायचा की मुख्य रस्त्यावर जाणंही अशक्य होऊन बसायचं.बऱ्याचदा गंभीर रुग्ण रस्त्यातच दगावायचे.अडल्यानडलेल्या गर्भारणी दवाखान्यात पोहचण्या अगोदरच प्रसुत व्हायच्या. कुणीही या पाड्याकडे लक्ष देत नव्हतं.आदिवासींच्या जीवनमरणाशी जणू कुणालाच काही देणंघेणं नव्हतं.मात्र निवडणुका आल्या की महिनाभर राजकीय पुढाऱ्यांची तिथं वर्दळ असायची.अनेक आश्वासनांची खिरापत वाटली जायची.सुधारणांची प्रलोभनं दाखवली जायची.मात्र निवडणुका संपल्या की कुणीही इकडे ढुंकूनही पहात नव्हतं.ते ऐकून तुषार अस्वस्थ झाला.आपण शहरात किती सुखासीन आयुष्य जगतोय याची त्याला जाणीव झाली.

कार्यकर्त्यांची वर्दळ सुरु होती.हळूहळू एकेक पाहुणा यायला सुरुवात झाली.मंत्री महोदय तब्बल दोन तास उशीराने उगवले.त्यांच्यासोबत आलेल्या  आलिशान गाड्यांचा ताफा पाहून तुषारच्या मनात विचार आला की २५-३० लाखाच्या गाडीत फिरणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांना अख्ख्या आदिवासी पाड्याला नवीन कपडे घेऊन देणं सहज शक्य होतं .पण ते खिशातली दमडीही खर्च करण्याची दानत दाखवत नाहीत. सामान्य माणसाला मात्र दानाचं आवाहन करत असतात.निवडणुका आल्या की मग मात्र दानशुरपणाचा आव आणतात.

भाषणांची सुरुवात झाली.प्रत्येक वक्ता आपल्या भाषणात त्याला गरीबांचा किती कळवळा आहे हे मोठ्या हिरीरीने मांडत होता.त्याचबरोबर  प्रतापची स्तुती करत होता.त्या स्तुतीने प्रतापचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.ते पाहून तुषारला मात्र प्रतापसारख्या समाजसेवकाकडे कसलाही उद्योगधंदा न करता सोळा लाखाची गाडी आलीच कशी हा प्रश्न पडला होता.

भाषणं संपता संपत नव्हती. दुपारचे दोन वाजून गेले.तोपर्यंत समोर उन्हात बसलेले आदिवासी कंटाळून गेल्याचं तुषारला स्पष्ट जाणवत होतं.तो स्वतःही कंटाळून गेला होता.कार्यक्रम वस्त्रदानाचा आहे की राजकीय पक्षांच्या प्रसिध्दीचा हेच त्याला कळेनासं झालं.

शेवटी एकदाची भाषणं संपली.मग मंत्री,खासदार ,आमदार आणि प्रतिष्ठितांच्या हस्ते वस्त्रदान झालं.आदिवासींना कपडे देतांना प्रत्येक पुढारी हौसेने फोटो काढून घेत होता. कपडे वाटून झाले आणि ज्याची तुषार आतुरतेने वाट पहात होता तो क्षण आला.सगळ्या वस्त्रदात्यांना बोलावून प्रतिष्ठितांसोबत फोटोसेशन झालं.मंत्री,आमदार, खासदारांसोबत फोटो काढून घ्यायची प्रत्येकाला घाई झाली होती.त्यासाठी प्रचंड रेटारेटी सुरु होती.ही समाजसेवा आहे की पब्लिसिटी स्टंट हेच तुषारला समजेनासं झालं.कपडे मिळालेले आदिवासी केविलवाण्या नजरेने हा तमाशा पहात होते.

वैतागलेल्या अवस्थेत तुषार घरी आला.कार्यक्रम कसा झाला हे शितलला सांगण्याचीही त्याला इच्छा उरली नाही.

दुसऱ्या दिवशी तो उत्सुकतेने सात आठ वर्तमानपत्रं विकत घेऊन आला.बातमी होती पण सर्व वर्तमानपत्रात मंत्री,आमदार,खासदार आणि त्यांच्यासोबत प्रतापचे फोटो होते.एकाही वर्तमानपत्रात तुषारचा फोटो नव्हता.चमकोगिरी करणाऱ्या या लोकांचा त्याला संताप आला.त्या संतापातच त्याने प्रतापला फोन लावला.त्याने तो उचलला नाही. तीन चार वेळा प्रयत्न केल्यावरच त्याने तो उचलला.

” यार प्रताप ज्यांनी कपडे दान केले त्यांचा कुणाचाच फोटो पेपरमध्ये नाहीये.सगळे मंत्री आणि आमदार,खासदारांचेच फोटो आहेत.” तुषार जरा रागानेच बोलला.

” हो मी पाहिले फोटो.आपण तर सगळे फोटो दिले होते.पण जागेअभावी त्यांनी ते दिले नसावेत.आणि हे तर तुलाही माहितेय तुषार की न्युज व्हँल्यू असल्याशिवाय पेपरवाले कोणतेही फोटो आणि बातमी टाकत नाहीत आणि राजकारणी व्यक्तींशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला न्युज व्हँल्यू येत नाही म्हणून त्यांचेच फोटो पेपरमध्ये टाकावे लागतात.हाच कार्यक्रम आपण राजकारणी पुढाऱ्यांना न बोलावता केला असता तर वर्तमानपत्रांनी त्या कार्यक्रमाची दखलसुध्दा घेतली नसती किंवा घेतलीही असती तर ती बातमी अगदी छोटीशी एखाद्या कोपऱ्यात टाकली असती.अशा बातमीला काहीच किंमत नसते “

तुषार काय समजायचं ते समजला.जे खरे दानी होते त्यांना कुणीही किंमत देत नव्हतं.भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या,जनतेच्या पैशावर ऐश करणाऱ्या, गरीबांचा वाली असण्याचं सोंग घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे आणि स्वतःच्या प्रसिध्दीसाठी समाजसेवेचं नाटक करणाऱ्या प्रतापसारख्या समाजसेवकांचे फोटो मात्र वर्तमानपत्रात दिमाखात झळकत होते.तुषारने न बोलता फोन कट केला.या अशा दिखावू समाजसेवेत फक्त वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळते म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्याने स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहीली.

दुसऱ्या दिवशी तो शितलला म्हणाला “अगं,आपल्या कामवालीला तिच्या नवऱ्याचे आणि मुलांचे जुने कपडे मापासाठी आणायला सांग.मी माझ्या काही मित्रांशी बोललोय.ते त्यांचे जुने कपडे देणार आहेत “

शितलला एकदम हायसं वाटलं.

“चला बिचारीची दिवाळी आनंदात तरी जाईल ” ती समाधानाने म्हणाली.

धनतेरसच्या दिवशी तुषारने शितलला सांगून कामवाली आणि तिच्या कुटुंबाला घरी बोलावून घेतलं.त्यांना बसायला सांगून तुषार घरातून कपड्यांच्या पिशव्या घेऊन आला.त्याच्या हातातल्या रेडिमेड कपड्यांच्या  पिशव्या पाहून शितलला आश्चर्याचा धक्काच बसला.

“अहो हे तर नवे कोरे कपडे दिसताहेत.तुम्ही तर जुने कपडे देणार होतात ना?”

” हो शितल.पण माझ्या लक्षात आलं की यांना जुने कपडे द्यायचे आणि आपण मात्र नवीन कपड्यांनी दिवाळी साजरी करायची?माझ्या मनाला ते पटेना म्हणून त्यांच्या मापाचे नवीन कपडेच विकत घेऊन आलो “

कामवालीचे आणि तिच्या नवऱ्याचे डोळे अश्रूंनी भरुन आले.तिच्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.तुषार त्यांना कपडे देत असतांनाच शितल आतून नवीकोरी साडी घेऊन आली आणि कामवालीला देऊन म्हणाली, ‘”सगळ्यांना नवीन कपडे झाले मग तूच कशाला मागे रहातेस?तुही नवीनच साडी घे.”

तेवढ्यात आकाश मोबाईल घेऊन पुढे आला.

” थांबा आई बाबा .कपडे देतांना फोटो काढू या”

तुषार त्याला थांबवत म्हणाला, “नको बेटा फोटो नको काढू.ही काही राजकारण्यांची दिखावू आणि स्वार्थी समाजसेवा नाहीये.हे माणुसकीचं वस्त्रदान आहे “

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

शाळेतून निवृत्त झाल्यावर आयुष्य कसं आनंदात चालले होते. सकाळी पांच वाजता उठायचे, सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक तास फिरून यायचे, आल्यावर बागेतून चक्कर मारायची. तोपर्यंत घरातील सर्वजण उठायचे. मग चहा करून बाल्कनी मध्ये बसून गरम चहाचे घोट घ्यायचे. कधी कधी फुले काढता काढता शेजारच्या काकूंशी गप्पा व्हायच्या. मग घरातील पुढचे व्यवसाय सुरू करायचे. पण आज माझी लगबग पाहून माझी मुलगी सोनू म्हणाली, “का ग आई !आज फार खुशीत दिसते आहेस आज काहीतरी विशेष दिसते “. मिस्टरांनी पेपर बाजूला करून माझ्या चेहऱ्याकडे पाहिले”अगं माझी बाल मैत्रीण’ विद्या तिच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. त्यासाठी कलेक्टर मेधाताई साने प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत आणि त्या सोहळ्याला मला आग्रहाचे निमंत्रण आहे. “त्यावर माझा मुलगा म्हणाला, “कोणाच्या? विद्यामावशीचया पुस्तकाचे का?”त्यावर मी होकार दिला आणि माझे मन भूतकाळात गेले.

आम्ही सांगलीला रहात असताना आमच्या शेजारी जोशींचे बिऱ्हाड राहायला आले. ते जोशी काका जिल्हा परिषद मध्ये नोकरीला होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी व दोन मुली आणि त्यांची आई असा परिवार होता. त्यांची थोरली मुलगी संध्या माझ्याच वर्गात होती व धाकटी विद्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. जोशी आजींना पहिली नात झाली तेव्हा त्या थोड्या नाराज झाल्या, त्यांना नातू हवा होता पण काही दिवसांनी दुसरी नात जन्मली आणि तिच्या दुर्दैवाने काही दिवसांनी त्यांचे यजमान अकस्मितपणे हृदयविकाराने स्वर्गवासी झाले. त्यांच्या जाण्याचे खापर विद्याच्या डोक्यावर फोडले गेले तिचे बारसेही केले नाही. ती दिसायला सुंदर होती. काळेभोर केस, टपोरे डोळे, गौरवर्ण आणि भरपूर बाळसे. इतकी सुंदर की पाहिली की उचलून घ्यावी अशी छान मुलगी होती ती, पण सगळेजण तिलाही हिडीस फिडीस करत. आजीनंतर तिचं नाव “नकोशी “ठेवलं होतं. आईचा मात्र तिच्यावर फार जीव होता. शेवटी मातृ हृदयच ते! आई तिला विद्या नावाने हाक मारत असे. ती अतिशय हुशार होती जणू तिच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. अर्थात या सर्व गोष्टी मी मोठी झाल्यावर माझ्या आईकडून मला कळल्या.

हळूहळू विद्या मोठी झाली. तिला आमच्या शाळेत प्रवेश घेतला गेला. कोणतीही स्पर्धा असो ती कशातच मागे नव्हती. तिचं अक्षर मोत्यासारखं सुंदर होते.

प्रवेशद्वाराजवळील फलकावर सुविचार लिहिण्याचा मान तिलाच मिळायचा. शाळेमध्ये पहिला नंबर तिने कधीच सोडला नाही. दहावी परीक्षेत तर गुणवत्ता यादीत येण्याचे भाग्य तिला लाभले. तिला मोगऱ्याची फुले फार आवडत। कायम मोगऱ्याच्या दिवसात तिच्या शेपट्यावर मोगऱ्याचा गजरा असायचाच.

दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यावर तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गौरवर्ण, बोलके डोळे लांब सडक केसांचा शेपटा व त्यावर मोगऱ्याचा गजरा यामुळे एकदम सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळू लागल्या. हुशारी आणि मनमोकळा स्वभाव या गुणांनी लवकरच “कॉलेज क्वीन “होण्याचा मान तिला मिळाला. कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचे नियोजन तिने केले होते

स्नेह संमेलनाच्या वेळी तिचे सौंदर्य ‘हुशारी व सभधीटपणा पाहून एका गर्भ श्रीमंत गृहस्थांनी माधवरावांनी, आपल्या एकुलत्या एक मुलासाठी तिला मागणी घातली. तिच्या वडिलांनी आनंदाने तिचे कन्यादान केले. लग्न होऊन सोन पावलांनी घरची लक्ष्मी घरी आणली. घरचा व्याप सांभाळून ती घरच्या व्यवसायातही मदत करू लागली. माधवरावांना तिचे खूपच कौतुक होते, आपल्या गुणांनी तिने सर्वांची मने जिंकून घेतली माधवरावांच्या निधनानंतर व्यवसायाची जबाबदारी तिने अंगावर घेतली व सुनीलच्या खांद्याला खांदा लावून ती मेहनत करत होती. अशा रीतीने दोन वर्षे भुरकन उडून गेली. आता मात्र सर्वांना लहान बाळाची चाहूल हवी होती. त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले होते. . खूप डॉक्टरी उपचार करून झाले पण दैव साथ देत नव्हते. तिच्या मातृत्वाचा हक्क दैवाने नाकारला होता तिला मूल होणारच नाही हे समजता क्षणी घरची माणसे बदलली, सगळीच नाती विस्कटली. समारंभाला जाताना सारे जण तिला टाळू लागले पण नणंदेला तिचे कौतुक होते. विद्या मात्र शांत होती समईतील वातीसारखी. माणूस ठरवतो एक आणि नियती घडवते दुसरच आपण तिच्या हातातलं बाहुलं असतो हेच खरे!

पुढे दोन वर्षांनी नणंद बाळंतपणासाठी माहेरी आली. तिच्या डोहाळे जेवणाचा घाट विद्याने पुढाकार घेऊन घातला. तिला प्युअर सिल्कची साडी व गळ्यातील नेकलेस आणला. त्यावेळी सुद्धा ओटी भरताना विद्याच्या मावस सासूला ओटी भरायला सांगितले गेले, जाणून बुजून सुनेला डावलले गेले.

दिवस भरल्यावर नणंदेला मुलगा झाला. तिच्या सोबत सासूबाई दवाखान्यात दोन दिवस राहिल्या. मुलगी व बाळ घरी आल्यावर तिच्या खोलीत जाण्यास विद्याला बंदी केली गेली, बारशाचया दिवशी तर कहरच झाला नणंदेची ओटी भरायला पुढे आलेल्या विद्याला हात धरून मागे ओढले गेले आणि” अगं ‘बाळंतिणीची ओटी लेकुरवाळी स्त्रीने भरायची असते हे तुला माहित नाही का? असे म्हणत सासूबाई डाफरल्या आणि शेजारच्या काकूंना ओटी भरण्याचा मान दिला. प्रत्येक ठिकाणी अपशकुनी ठरवून तिच्या सासूने, एका स्त्रीने एका स्त्रीची अवहेलना केली.

विद्याने कधीही चकार शब्द काढला नाही. येईल ती परिस्थिती निमूट पणे सहन करत होती. माहेरच्या माणसांना वाटे, ” विद्या नशीबवान आहे’ चांगला बंगला आहे, दारात  चार चाकी गाडी आहे, घरात नोकरांचा राबता आहे” आणि विद्या सुद्धा सर्वांच्या पुढे हसतमुख राहून आनंदी असल्यासारखी दाखवायची.

सुनील ‘तिचा नवरा सुद्धा रंग बदलू लागला सरड्यासारखा. ज्याच्या जीवावर आपलं घरदार सोडून, पुढील शिक्षण सोडून ती आली होती याचा विचार न करता तो तिला हिडीस-फिडीस करू लागला, मोलकरणी सारखा वागू लागला. मातृत्वाच्या कमतरतेवर वारंवार टोचून बोलू लागला. असेच दिवस चालले होते. नणंदेच मुलगा पाच वर्षाचा झाला. आजीने त्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. कार्यक्रमासाठी बरेच मित्र नातेवाईक, विद्याची बहिण व मेहुणे मुलासह आले होते.

कार्यक्रमाच्या दुसरे दिवशी घरातली मंडळी, नातेवाईक यांची सरबराई करण्यात विद्या दंग होती, त्यावेळी नणंदेचा मुलगा आणि तिच्या बहिणीचा मुलगा शेजारच्या आमराईत खेळायला गेले. तिथे कैऱ्या पडण्यासाठी आलेल्या मुलांपैकी एका मुलाचा दगड  चुकून उत्सव मूर्तीला लागला आणि कपाळाला खोक पडली. कोणीतरी  घरी येऊन सांगता क्षणीच नवऱ्याने तिच्यावर तोंड सुख घेतले” तू अवलक्षणी आहेस आता इतरांनाही तुझ्या पायगुणाचा प्रसाद मिळू लागला आहे तेव्हा तुझा घरात राहण्याचा अधिकार संपला आहे. तू घरातून चालती हो”

सर्व नातेवाईकांसमोर अपमानित झालेल्या विद्याने दोन कपड्यानिशी घर सोडले. रात्री ती स्टेशन वरील वेटिंग रूम मध्ये बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने तिने पुणे गाठले आणि “हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत” दाखल झाली. तिने आपली कर्म कहाणी तिथल्या संस्थापकांच्या कानी घातली. तिथल्या संस्थापक ताईंनी संस्थेमध्ये राहण्याची तिला परवानगी दिली. संस्थेत राहून तिने बी. एड. केले. तिच्यातील जिद्द पाहून तिला त्यांच्या शाळेत नोकरीत रुजू करून घेतले. नोकरी करता करता तिने पी. एच. डी. पदवी संपादन केली आणि वसतिगृहाच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेतली.

नोकरीतून जमलेल्या पुंजीतून आणि काही कनवाळू लोकांच्या देणगीतून पुण्याजवळ मायेची पाखर घालणारी” स्नेहालय” ही संस्था तिने सुरू केली. त्या संस्थेत अनाथ मुलं, दुर्लक्ष केलेल्या स्त्रियांना आसरा दिला. त्यांच्यासाठी व्यवसायाभिमूख कार्यशाळा सुरू  केल्या, त्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आपलं स्वतःच नाही म्हणून काय झाले संस्थेत येणारी मुले आपलीच आहेत असे मानून यावर मातेप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला आणि आपले जीवन सार्थक केले.

आज तिने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होते. नाव होते “मोगरा फुलला “. समाजामध्ये अनेक सामान्य स्त्रिया आहेत की ज्यांच्या पदरी दुःख आले असताना सुद्धा त्यांनी दुःखावर मात करून यशस्वी वाटचाल केली होती. रूढी अंधश्रद्धा यांना झुगारून प्रयत्नांची कास धरली होती आणि  त्या यशस्वी झाल्या होत्या, अशा स्त्रियांचे उदाहरणे देऊन तिने कथा लिहिल्या होत्या.

मोगऱ्याचे छोटेसे सुंदर ताजे फूल सुगंध देते, गजरा करून डोक्यात माळला तर केसांनाही सुगंधित करते. ते हातात घेतलं तर हातांना सुगंध येतो, आपले सुगंध पसरविण्याचे काम ते सोडत नाही.

प्रकाशनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. प्रखर बुद्धिमत्ता, श्रमाची आवड, मन ओतून काम करण्याची पद्धती या विद्याच्या गुणांमुळे अनेक प्रतिष्ठित लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. कलेक्टर मेधाताईंनीही विद्याच्या कार्याचे कौतुक केले आणि तिच्या कामात सहकार्य करण्याची इच्छा दर्शवली. आता तिचं मित्र मंडळ ही मोठं होतं॰ कुठेच कमतरता,. . न्यूनता नव्हती. चहापानानंतर मेधाताईंना प्रवेशद्वाराशी निरोप देऊन आम्ही परत हॉलमध्ये आलो. त्यावेळी एक मोगऱ्याचा गजरा आणि चिठ्ठी असलेले एक तबक कार्यकर्त्याने विद्याच्या हाती दिले. चिठ्ठी कोणाकडून आली असावी ?असे प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर उमटले. शांत चित्ताने  विद्याने चिठ्ठी उघडली. चिठ्ठीतील मजकूर पुढीलप्रमाणे होता.

विद्या

प्रिय विद्या म्हणण्याचा अधिकार मी केव्हाच गमावून बसलो आहे वर्तमानपत्रात पुस्तक प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचली आणि  आर्जवून समारंभास येण्याचे धाडस केले. पण तुला  भेटण्याचे मनात असूनही पुढें आलो नाही. तसे पाहता माझ्याकडून तुझी अवहेलनाच झाली, मी तुझा शतशः अपराधी आहे. जमली तर मला क्षमा कर. मी माझं राहतं घर” स्नेहालय “संस्थेच्या नावे केले आहे त्याचा   अव्हेर करू नकोस. केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याचा हाच एक मार्ग माझ्यासमोर होता माझ्या या विनंतीचा स्वीकार कर आणि यशस्विनी हो!.

सुनील !

अंधश्रद्धा आणि रुढीला चिकटून राहून सर्वांनी विद्याची अवहेलना केली होती पण त्या दुःखाला कवटाळित न बसता विद्याने पिडीत स्त्रियांना आणि निराधार बालकांना आधार दिला होता. त्यांची ती माय झाली होती. अशा प्रकारे महान कार्य करणारी माझी मैत्रीण खरोखर सर्वांची विद्याई झाली होती.

समारंभ संपता क्षणीच तिनं मला मिठी मारली. त्या मिठीत कौतुकाचा आनंद आणि पती न भेटता गेल्याचे दुःख सामावले होते. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आज खऱ्या अर्थाने विद्याच्या जीवनाचे सार्थक झाले होते.

*साहित्य प्रेमी भगिनी मंडळला पाठवलेली व प्रथम क्रमांक मिळालेली कथा

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मातीची ओढ… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मातीची ओढ… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

(पण एखाद्याला सोन्याचे अंडे खाण्यापेक्षा कोंबडीच कापून खायची असेल तर त्याला कोण काय करणार?)  इथून पुढे —–    

“सदाकाका, आम्हाला शेती करण्यात इंटरेस्ट नाहीय. इथे एकरी चार लाख रूपये भाव चालला आहे असं ऐकलंय. बारा लाख रूपये येतील. विकणेच रास्त ठरेल.” सुधीरने सांगून टाकले.

“ही शेतजमीन बाहेरच्या कुणालाही विकू नये अशी आमच्या आबांची इच्छा होती.”

“ठीक आहे, मग बारा लाख रूपये देऊन तुम्ही विकत घ्या.”

आक्का आणि काशिनाथकडे पाहत सदाभाऊ म्हणाले, “ठरलं तर. पुढच्या आठवड्यात सौदा पूर्ण करू. आमच्या एका भावानं आपला हिस्सा विकून खाल्ला आहे असं गावात बभ्रा व्हायला नको म्हणून विक्रीपत्राच्याऐवजी दानपत्र करून घेऊ. दुसरी अट, यापुढे किसन आमच्याबरोबर इथेच राहील. मंजूर असेल तर बोला.” किसनरावांना एका शब्दानंही न विचारता सुधीर आणि अविनाश यांनी दोन्ही अटी मान्य करून टाकल्या. विशाखाच्या डोळ्यांत पाणी तरारलं. किसनरावांनी मायेनं विशाखाच्या पाठीवर हात ठेवला.

किसनरावांच्या शेतजमीनीची विक्री वा दानपत्र करण्यासाठी सुधीर आणि विशाखाकडून रीतसर संमतीपत्र तसेच किसनरावांच्या नावाने योग्य ते कुलमुख्त्यारपत्र लिहून रजिस्टर करून घेतलं. सदाभाऊ, आक्का आणि काशिनाथ या तिघांनी मिळून बारा लाख दिले. दानपत्र केलंच नाही, किसनरावांचं नांव सातबाऱ्यावर तसंच राहिलं. ते नियमितपणे शेतात जाऊन शेतीची कामं बघायला लागले. अकाउंटिंगच्या आणि बॅंकेच्या कामात काकांच्या रूपाने प्रशांतला मोठा आधार मिळाला.

अविनाशचं क्लिनिक सुरू झालं. सुधीरनं फ्लॅट बुक केला. बघता बघता दोन वर्षे सरून गेली. विशाखा आठवड्यातून एकदा तरी फोन करत होती. सुरूवातीला सुधीरचे येणारे फोन कमी कमी होत गेले. वाड्यावर किसनरावांची सर्वचजण काळजी घ्यायचे. त्यांना त्यांच्या नातवंडांची आठवण यायची.

अलीकडेच त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. एकदा फोनवर बोलताना ही गोष्ट विशाखाच्या लक्षात आली. “बाबा, आधीच फोन करायचं होतं ना. तुमचे जावईच डॉक्टर आहेत. मी तुम्हाला घेऊन जायला आले असते.”

किसनरावांनी सांगितलं, “बेटा, मला काहीही झालं नाही. प्रशांतने शहरात नेऊन सगळ्या टेस्ट्स करवून घेतल्या आहेत. औषधोपचारदेखील चालू आहे.”

विशाखाने सदाकाकांशी बोलून घेतलं. ‘दोनच दिवसात परत पाठवणार असशील तरच किसनला येऊन घेऊन जा.’ असं सदाभाऊंनी स्पष्टच सांगून टाकलं.

विशाखाने लगोलग सुधीरला फोनवर सांगितलं, ‘सुधीर, बाबांची तब्येत बरी दिसत नाहीये. उद्या सुटीच आहे. सकाळी लवकर ये. आपण जाऊन बाबांना काही दिवसासाठी इकडे घेऊन येऊ.’

सकाळी दोघे कारने गावाकडे निघाले. बाबांना परत आणण्याच्या कल्पनेनेच सुधीर अस्वस्थ झाला होता. अखेर त्यानं तोंड उघडलं, “ताई, बाबांच्या तब्येतीच्या दृष्टिने त्यांनी गावातच राहणं चांगलं आहे. इकडे कशाला बोलावते आहेस? तुला माहीत आहे की मी भाड्याच्या घरात राहतो ते. माझ्याकडे जागा कुठे आहे? बाबांना तुझ्याकडेच का घेऊन जात नाहीस? औषधोपचारासाठी तुमच्याकडे क्लिनिकही आहे.”

विशाखाला सुधीरचं बोलणं आवडलं नाही. पण तिने विचार केला, अविनाशने तर रूग्णांच्या सेवेचंच व्रत घेतलं आहे. पितृतुल्य सासऱ्यांना तो थोडंच नाही म्हणणार आहे?  “बरं, मी घेऊन जाईन. झालं.” विशाखा ठसक्यात म्हणाली.

खूप दिवसांनी बाबांना पाहिल्यावर विशाखाच्या डोळ्यांत पाणी आलं. किसनराव म्हणाले, “वेडाबाई मला काहीही झालं नाही. हे रिपोर्ट्स बघ आणि ही औषधे.”

“बाबा तुम्हाला इथे काही कमी आहे म्हणून आम्ही न्यायला आलो नाही. तुमची तब्येत बरी नाही हे ऐकून सुधीरही अस्वस्थ झाला होता आणि तुमचे जावई तुम्हाला घेऊन या म्हणून आग्रह करीत होते म्हणून आम्ही आलो.” विशाखाने रेटून सांगितलं. दुपारच्या जेवणानंतर किसनरावला घेऊन विशाखा आणि सुधीर निघाले.

सुधीरची मुलं आतेभावांना भेटायला म्हणून विशाखाच्या घरीच आली होती. सगळ्यांच नातवंडांना एकत्र पाहून किसनराव खूप सुखावले. थकवा वाटत असल्यामुळे जेवण करून ते झोपायला गेले.

अविनाश क्लिनिकहून उशीरा आले. जेवणं झाल्यानंतर विशाखाने अविनाशला सहज सांगितलं, “अहो, सुधीरचा फ्लॅट लहान पडतो म्हणून मी बाबांना आपल्याकडेच घेऊन आले आहे.”

त्यावर अविनाश एकदम भडकला, “इथे का आणलंस? तुझ्या बाबांना सांभाळण्याची जबाबदारी तुझ्या भावाची आहे. फ्लॅटसाठी पैसे घेताना त्याला लाज वाटली नाही. उद्या सकाळीच त्यांना सुधीरच्या घरी पाठव. त्याला जमत नसेल तर वृद्धाश्रमात दाखल कर म्हणावं. माझे बॅंकेचे लोन फिटताच मी घेतलेले पैसे परत करीन, हे तुझ्या बाबांना सांग. कळलं?”

विशाखा पहिल्यांदाच अविनाशचं हे वेगळं रूप पाहत होती. “अविनाश, तुम्ही रात्रंदिवस रूग्णांची इतकी सेवा करीत राहता म्हणून त्यांना चार दिवस इकडे आणलं होतं. तुमच्या मनांत, घरात माझ्या बाबांच्यासाठी काहीच का स्थान नाही? बरोबर आहे म्हणा, इतर रूग्णांची सेवा केल्याने तुम्हाला पैसे मिळतात. हे मी विसरलेच. आणि हो, माझ्या बाबांचे पैसे परत करायचं म्हणत होता, जेंव्हा त्यांचे पैसे परत कराल त्यावेळी पैसे घ्यायला ते असतील की नाही हे त्या देवालाच माहीत. नोकरी सोडायला लावून तुम्ही माझे पंख कापून टाकलेत. आता एक अगतिक कन्या आपल्या बापासाठी तरी काय करणार म्हणा.” असं म्हणून विशाखा पटकन तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश क्लिनिकला गेल्यानंतर नाष्टा घेऊन विशाखा बाबांच्या खोलीत गेली. किसनराव सामान बांधूनच बसले होते. “बेटा, काल रात्रीचं तुमचं बोलणं ऐकलंय मी. माझ्यामुळे तू आपल्या संसारात विष कालवू नकोस. मायेची ऊब आणि आपुलकीचा ओलावा गवसत नसल्याने शहरातील बरीचशी वृद्धमंडळी मुळातच खुरटल्यासारखी दिसतात. गजबजल्या गोकुळात असून देखील एखाद्या वृद्धाश्रमात असल्यासारखे ते एकाकीच असतात. मला जाऊ दे.

घाबरू नकोस मी काही वृद्धाश्रमात जाणार नाहीय. कुणी शेतकरी बापडा वृद्धाश्रमात असल्याचं मी तरी आजवर ऐकलेलं नाही. गावाकडे माझी भावंडं माझी आतुरतेने वाट पाहताहेत. मला माझ्या मातीच्या मायेची ओढ लागून राहिलीय. टॅक्सी बोलावून घे. मी जाईन.” विशाखा स्वाभिमानी बाबांची संवेदनशीलता जाणून होती.

घरासमोर एक टॅक्सी येऊन थांबली. अगदी अकल्पितपणे टॅक्सीतून प्रशांत उतरला. “ताई, काका आहेत का ग?” असं म्हणत आत आला.

किसनराव बॅग घेऊन हसतच बाहेर आले. “प्रशांत गावाकडे चाललास ना?  बेटा, मला इथे करमत नाही. चल मी येतो.”

विशाखाच्या डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवून किसनराव टॅक्सीत बसले. सुधीरने बाबांच्या तब्येतीची चौकशीही केली नाही. आपलं काळीज ज्या जावयाच्या हातात सोपवलं होतं, तो जावई किमान सासऱ्यांना भेटला  देखील नाही. ‘बाबा इथे आरामात रहा, जायची घाई करू नका’ किमान असं तोंडदेखलं तरी बोलून तरी अविनाशने बाबांचा मान राखायला हवा होता. दोनच दिवसांचा प्रश्न होता. बाबा कुठे इथे आयुष्यभर राहायला आले होते?’ असं विशाखाला वाटून गेलं.

बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता पण या विचारांच्या वावटळीत, अगतिक विशाखाच्या डोळ्यांतला पाऊस मात्र थांबतच नव्हता.

— समाप्त — 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मातीची ओढ… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मातीची ओढ… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

किसनरावांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. वीस वर्षे तरी झाली असतील, त्या गोष्टीला. एका दसरा सणाला गावाकडचा वाडा मुलं, सुना, जावई आणि नातवंडं यांनी गजबजून गेला होता. गप्पागोष्टींना रंग चढला होता. हरिभाऊंच्या नातवंडांनी कल्ला करीत आजोबांना विचारलं होतं, “आजोबा, वडिलार्जित मिळालेलं चार एकराचं रान तुम्ही आपल्या हिंमतीवर बारा एकरापर्यंत वाढवलं आहे म्हणून ऐकलंय. आम्हाला सांगा ना त्याबद्दल.” 

हरिभाऊ मिशीतच हसत म्हणाले. “होय, मी हिंमत केली होती कारण मला फकस्त शेतीचाच नाद होता. काय झालं, त्या काळात शहरात कारखाने उभे राहायला लागले तेंव्हा गावाकडच्या शेतकऱ्यांचं लक्ष शहरातल्या रोजगाराकडे गेलं. कधी कधी वर्षभर राबूनदेखील हातात काहीच पडायचं नाही. दरमहा हमखास मिळणाऱ्या पैश्याच्या मोहापायी त्यांचं शेतीकडे दुर्लक्ष होत गेलं. शहरातच राहायचं असल्यानं त्यांना शेती विकावी लागली. मी मात्र मिळेल तेंव्हा पैसा गाठीला बांधत होतो. आजच्या तरूणांच्यासारखं आम्हाला बुलेट गाड्या मिळायच्या नाहीत. खिल्लारी बैलांची घुंगराची गाडी म्हणजेच आमच्यासाठी चैन होती.” 

इतक्यात आजीनं नातवांना जेवायला बोलावलं. सदरेवर फक्त सदाशिव, काशिनाथ आणि किसन बसले होते. हरिभाऊ म्हणाले, “तुम्ही भावंडं असंच गुण्यागोविंदाने राहा. बहिणीला कधी अंतर देऊ नका. ही बारा एकराची शेती चौघात वाटून घ्या. पंचांना कधी बोलवू नका. एवढंच माझं सांगणं आहे.” 

सदाशिव लगेच म्हणाले, “आबा, अशा निर्वाणीच्या गोष्टी आता कशाला करताय?” 

हरिभाऊ म्हणाले, “पिकलं पान कधी गळून पडंल सांगता यायचं नाही. आज तुम्ही एकत्र जमलात म्हणून मनातलं बोलून टाकलं.”

किसन म्हणाला, “आबा, शेतात भाऊच राबतात. मी कुठे शेती करतोय? तुम्ही मला शिकवलंत हेच खूप झालं. माझाही वाटा त्यांनाच द्या.”

“अरे, मी सगळ्यांनाच शाळेत पाठवलं होतं. ते शिकले नाहीत. किसन तू शिकलास. तुझ्या कर्तबगारीने आता हेडमास्तर झालास. त्यात तुझी मेहनत आहे. एक बाप म्हणून सगळ्या मुलांना समान वाटा देणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या माघारी तुझा हिस्सा कुठल्याही भावाला देऊन टाक. पण मिळालेली ही शेतजमीन मात्र बाहेरच्या कुणाला कधी विकू नकोस, एवढंच माझं कळकळीचं सांगणं आहे.”

किसनरावांना हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कालच जावई अविनाश आणि कन्या विशाखा त्यांना भेटायला आले होते. अविनाशने क्लिनिक उघडायचा विचार बोलून दाखवला. बॅंकेचे लोन मिळणार होते पण मार्जिनसाठी पांच लाख रूपये पाहिजे होते. सुपुत्र सुधीरनेही फ्लॅटच्या मार्जिनसाठी सात लाख रूपयांची मागणी केली होती. ‘आमच्या हातून कधी शेती होणारच नाही तर गावाकडे असलेली शेतजमीन विकून टाकावी’ असं सुधीर आणि विशाखा या दोघांचं मत पडलं होतं. 

गेल्या वीस वर्षात पुलाखालून किती पाणी वाहून गेलं आहे. आबा गेले, आई गेली. आपली मुलं सुधीर आणि विशाखा शिकून सवरून मोठी झाली. किसनरावांचे प्राव्हिडंट फंडाचे पैसे दोन्ही मुलांच्या लग्नांत संपले होते. मुलीचं अन मुलाचं लग्न पार पाडताच आपलं कर्तव्य संपलं असं समजून सुमन एकट्याला अर्ध्यावर सोडून अचानक निघून गेली. मुलगा सुधीर एका प्रायव्हेट फर्ममध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे. कन्या विशाखादेखील चांगल्या नोकरीत होती. पण तिच्या पहिल्या डिलीव्हरी नंतर जावयाने तिला नोकरी सोडायला लावली होती. प्रेमळ जावई लाभल्याने कन्येची चिंता नव्हती. मुलांच्या पुढे हात पसरायला लागू नयेत इतपत तुटपुंजी का होईना, पेन्शन मिळत होती. 

आता शेतजमीन विकायचं म्हटल्यावर किसनराव पेचात पडले. सकाळची बस पकडून ते गांवाकडे निघून गेले. 

गावात पाऊल टाकताच किसनराव भावाकुल झाले. इतकी वर्षे आपल्याला या मातीची कशी भूल पडली होती याची खंत वाटली. झपझप पावलं टाकीत वाड्याजवळ आले. अंगणात तुळशी वृंदावन पाहून त्यांना आईची आठवण आली. 

किसनरावांना असं अनपेक्षितपणे आलेलं पाहून दोन्ही भाऊ आनंदून गेले. दुपारची जेवणे झाल्यानंतर किसनरावांनी येण्याचे कारण सांगत सदाभाऊंच्या कानांवर सगळी हकिगत घातली. 

सदाभाऊंचा मुलगा प्रशांत एका महाविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. सदाभाऊ म्हणाले, “आज शनिवार आहे, सांजच्याला प्रशांत येईल तेव्हा त्याच्याशी बोलू. सध्या शेताचं काम प्रशांतच बघतो. अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे द्राक्ष पीक परवडेनासे झालं होतं म्हणून प्रशांतने गेल्या वर्षी द्राक्षबाग काढून टाकली होती.   

बाजारपेठेची मागणी आणि हंगामानुसार वेगवेगळ्या भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन करतो. आमच्या तिघांच्या हिश्श्यातल्या शेतीपैकी सहा एकर शेतजमीनीत चार एकर टोमॅटो, एक एकर वांगी, एका एकरात कांदा, घेवडा आणि चारापिकांची लागवड केलीय. 

गेल्या वर्षी टोमॅटोपासून एकरी पंचेचाळीस हजार तर वांग्यातून सत्तर हजाराचा नफा निघाला. याशिवाय हंगामानुसार कोबी, फ्लॉवर, ज्वारी पिकांची लागवड करतो. प्रशांत दर रविवारी येतो आणि पुढील आठवड्याचे नियोजन करून जातो. वेळोवेळी फोनवरूनदेखील आमच्याशी संपर्कात असतो, त्यामुळे वेळेवर निर्णय घेणे शक्य होते.” 

संध्याकाळी प्रशांत आला. किसनरावांना पुतण्याचा अभिमान वाटला. प्राध्यापक असूनदेखील त्याचं शेतीवरचं प्रेम कौतुकास्पद होतं. प्रशांतची पाठ थोपटत किसनराव म्हणाले, “प्रशांत तू ग्रेट आहेस. लोकांनी शेतीपुढे हात टेकले आहेत. तू मात्र चांगलीच प्रगती करतो आहेस.” 

“काका, शेतीपुढे हवामानातल्या बदलांचे मोठे आव्हान नेहमीच असते. बाजारभावात सातत्याने चढउतार होतच असतात. पिकांना अपेक्षित भाव मिळत नाही. हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे. या स्थितीत आम्ही बहुपीक पद्धतीकडे वळलो. कारण काही पिकांना जरी चांगला भाव मिळाला तरी इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊन जाते. बाजाराचा अभ्यास करून लागवडीची वेळ ठरविण्यावर आणि आंतरपीक पद्धतीच्या अवलंबावर भर देतो. 

काका, शेतीत ताळेबंद महत्वाचा असतो. बाजारभावावर आपले नियंत्रण नसते हे जरी खरं असलं तरी मी प्रत्येक पिकाचं अंदाजपत्रक तयार करतो. 

पिकानुसार जमा खर्चाचा हिशेब नीट ठेऊन अनावश्‍यक खर्च टाळतो. शेतीत आर्थिक व्यवस्थापन महत्वाचे असते. शेतातून आलेल्या उत्पन्नाचा उपयोग उत्पादक कामांसाठीच खर्च करतो. 

काका, तुम्ही म्हणत असाल तर या वर्षी तुमचंही रान करायला घेतो. मी जमाखर्चाचा हिशेब ठेवीन. सगळा नफा तुम्हालाच देईन. सांगा, मी तयार आहे.” 

प्रशांतच्या म्हणण्यावर किसनराव अंतर्मुख झाले. ‘आपण शेतजमीन पडीक ठेवून, फक्त शाळा एके शाळा करत बसलो,’ याबद्दल त्यांना स्वत:चीच कीव वाटली. ते काही बोलले नाहीत. 

सदाभाऊंनी किसनरावांची खरी अडचण प्रशांतच्या कानांवर टाकली. सदाभाऊंनी रात्रीच फोन करून आक्काला, सुधीरला आणि विशाखाला गांवाकडे बोलवून घेतलं. वाड्यावर बैठक बसली. पीक नियोजन आणि योग्य तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधला तर शेती व्यवसाय कशी किफायतशीर ठरू शकते हे प्रशांतने सांगण्याचा प्रयत्न केला. पण एखाद्याला सोन्याचे अंडे खाण्यापेक्षा कोंबडीच कापून खायची असेल तर त्याला कोण काय करणार?  

— क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-3 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-3 ☆ श्री मंगेश मधुकर 

(पुन्हा पुन्हा फोन वाजत होता. इतक्यात दारावरची बेल वाजली.आईनं दार उघडलं तर समोर…) इथून पुढे — 

आईनं दार उघडलं तर समोर विनीतचे ममी आणि पपा.त्यांना पाहून आईचा पुतळा झाला.ती फक्त एकटक बघतच राहिली.बाबांनी पुढे येऊन परिस्थिती सावरली.त्या दोघांच्या अवेळी,अनपेक्षित येण्यानं नमा,आई-बाबांच्या मनातली धडधड वाढली.

मध्यरात्र उलटून गेली तरी विनीत मोबाईलवर टाइमपास करत होता. तितक्यात मित्रानं  पाठवलेली त्याची अन नमाची क्लिप पाहून विनीतची झोप उडाली. घशाला कोरड पडली. हात-पाय लटपटायला लागले. मित्रांनी कॉल केले परंतु भीतीपोटी रिसिव्ह केले नाही. मेसेजेस वाचून घाम फुटला. अजून टेंशन नको म्हणून फोन स्वीच ऑफ केला. खूप घाबरला. डोक्यात नको त्या विचारांचं थैमान सुरू झालं. बेचैनी वाढली. नक्की काय करावं हेच कळेनासं झालं. येरझरा मारताना स्वतःशीच बोलायला लागला “झक मारली, बागेत गेलो अन नको ते करून बसलो. गावभर बोभाटा झाला. तोंड दाखवायला जागा राहिली नाही. नमा एक्साईट झाली पण मी कंट्रोल करायला हवा होता. इज्जतची माती झाली. ममी-पपांना काय वाटेल. हा कलंक आयुष्यभर सोबत राहणार. ज्यानं क्लिप केली त्याच्या xxx xx, xxxxx, एकदा भेटू दे, क्सक्सक्सक्स ची मजा झाली मी मात्र बरबाद झालो”रा ग अनावर झाल्यानं विनीतला खूप जोरजोरात ओरडावसं, रडावसं वाटत होतं पण तेही जमत नव्हतं. ममी-पपांना सामोरे जायची हिंमत नव्हती म्हणून रूमच्या बाहेर आला नाही. तिकडे क्लिप पाहून ममी-पपांना सुद्धा जबरदस्त धक्का बसला पण त्याहीपेक्षा विनीतच्या विचित्र वागण्यानं दोघं हादरले. दोघांनी खूप समजावलं पण काहीही उपयोग झाला नाही. सैरभैर विनीतला पाहून त्यांचाही धीर सुटत चालला होता त्याचवेळी नमाचा नवीन व्हिडिओ पाहून ममी ताबडतोब विनीतच्या रूममध्ये गेली. (संडे डिश™) 

“विनू,काय रे ही अवस्था.सांभाळ!!”

“ममा,काय करू सुचत नाहीये.डोकं पार आऊट झालंय”

“होऊन गेलेल्या गोष्टीवर जास्त विचार केल्यावर फक्त त्रासच होणार.”

“तोच तर होतोय”

“असं चडफडत स्वतःवर राग काढण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जा”

“हिंमत होत नाहीये.लोक काय म्हणतील”

“काहीही केलं तरी लोक बोलणारच.तुलाच यातून बाहेर याव लागेल.किती दिवस लपून बसणार.”

“लपून??ममा,काहीही काय बोलतीयेस.काय सहन करतोय ते माझं मला माहित.”

“आणि आमचं काय?तुझ्या इतकाच त्रास सहन करतोय”

“काहीच्या काही होऊन बसलयं.पार वाट लागली” 

“असं हातपाय गाळून चालणार नाही.तू फक्त स्वतःचा विचार करतोयेस.पुरुष असून तुझे हे हाल तर नमाची काय अवस्था असेल याचा विचार कर.अशा घटनेत जास्त बदनाम बाईच होते.”

“मग पुरुषांचं काय???त्यांना होणाऱ्या त्रासाचा कोणी विचारच करत नाही.माझा त्रास हा सुद्धा जगाच्या दृष्टिनं चेष्टेचाच विषय…”

“नमाशी बोल.याक्षणी तुम्ही एकमेकांच्या सोबत असलं पाहिजे.तू एवढा डिस्टर्ब तर तिचं काय झालं असेल.”

“माझ्यापेक्षा तुला तिचीच काळजी वाटतीय.”

“असं नाहीये.आधी स्वतःची कीव करणं बंद कर.त्याच त्या विचारांच्या रिंगणात गोल गोल फिरतोयेस.दोघांना झटका बसला पण तिनं यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला”.(संडे डिश™)

“म्हणजे,आता तिनं काय केलं”ममीनं नमाचा व्हिडिओ विनीतला दाखवला.त्यानं पुन्हा पुन्हा पाहिला अन अचानक ममीच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागला.

“साचलेलं वाहून गेलं.आम्हां बायकांना सहज जमतं पण वाटलं तरी रडता न येणं हाच पुरुषांचा प्रॉब्लेमयं.चल,नमाकडे जाऊ” ममी पाठीवर थोपटत म्हणाली.

विनीत आला पण नमासमोर जायची हिंमत होत नव्हती म्हणून कारमध्येच थांबला.ममी-पपा घरात गेले.सगळे हॉलमध्ये असले पण एकमेकांच्या नजेरेला नजर देणं टाळत होते.काय बोलावं,सुरवात कशी करावी हे कोणालाच सुचत नव्हतं.सगळेच अवघडलेले.विचित्र अशा शांततेत काही क्षण गेल्यावर ममी नमाच्याजवळ बसत म्हणाल्या “तुझं खूप कौतुक.धीराची आहेस.तुझ्या हिमतीमुळे मोठा आधार मिळाला.माझ्या इमोशनल लेकासाठी अशीच बायको पाहिजे.जिंकलंस शाबास सूनबाई!!”नमाच्या डोळ्यात पाणी तरारळं.(संडे डिश™) 

“विचित्र परिस्थितीला आपण सामोरे जातोय.काय करावं सुचत नव्हतं.तुमच्यासारखीच आमची अवस्था.कधी कल्पना केली नाही असे अनुभव आले.व्हिडिओ पाहिला.खूप धैर्य लागतं.तिघांचं कौतुक करायला आलोय.”ममी 

“विनीत कसा आहे”नमा. 

“ठीक!!खाली गाडीत बसलाय.जास्त काही सांगत नाही पण आत्ता त्याला तुझी गरज आहे.”

नमा पार्किंगमध्ये गेली.तिला पाहून विनीत गडबडला.चूळबुळ वाढली. 

“शांत हो.मी भांडायला आली नाहीये.”

“कशीयेस”विनीत

“आय एम ओके,हळूहळू सावरतेय.तुझं काय”

“नॉट ओके,खूप डिस्टर्ब आहे”

“ते लक्षात आलं.फोन अजूनही बंद”

“हो,लोक फार छळतात”

“बिनधास्त फोन चालू कर.डिलिटचं बटण आहे ना.मग कसली काळजी”

“काहीही घाणेरडं लिहितात”

“वाचायचं नाही.काही दिवस चिडवतील नंतर विसरून जातील”

“नाही ती क्लिप म्हणजे परमनंट टॅटु”

“होऊ दे.जे झालं ते झालं.सगळे करतात तेच केलंयं”नमा 

“तुला काहीच वाटत नाही”

“खूप सहन केलं.टोकाचा निर्णय घेतला.सुदैवाने वाचले नंतर ठरवून यातून बाहेर पडले.”

“मी अजूनही तिथेच अडकलोय”

“स्वतः प्रयत्न केल्याशिवाय सुटका होणार नाही.मी केलेला व्हिडिओ पाहिलास”

“येस,त्यामुळेच तर भेटायला आलो.त्यामुळेच उभारी मिळाली.तू खरंच भारीयेस.” (संडे डिश™)

“आता,पुढे काय?”

“म्हणजे समजलं नाही,ए बाई मला सोडून बिडून द्यायचा तर विचार नाहीये ना.” नमा मनापासून हसली.  

“पोलिसांकडे तक्रार करू.सोबत येणार.”

“येस,त्या हलकटाला सोडायचं नाही” 

“असले लोक भेकड,पळपुटे असतात सहजासहजी सापडणार नाहीत तरीही प्रयत्न सोडायचे नाहीत परंतु सगळी शक्ती त्यांना शोधण्यात लावायला नको.आपल्या आयुष्यात अजून खूप चांगल्या गोष्टी आहेत.”

“तुला संकटाच्या वेळी एकटं सोडलं याचा फार मोठा गिल्ट आहे.आय एम रियली सॉरी!!” 

“इट्स ओके,खरं सांगू.मलाही खूप राग आलेला पण वस्तुस्थितीच अशी होती की दोघांची अवस्था सारखीच.असल्या घटनेत बदनामी आणि सहानुभूती ही बाईच्या वाट्याला जास्त येते.पुरुष मात्र दुर्लक्षीला जातो.जो बीत गई,सो बीत गई”

“या क्लिपमुळं आपलं नातं हॅंग झालंय”विनीत भावुक झाला.त्याचा हात हातात घेत नमा म्हणाली “मग रिस्टार्ट करु” (संडे डिश™)

– समाप्त – 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-2 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-2 ☆ श्री मंगेश मधुकर 

(आणि दुसरं टोक गळ्याभोवती अडकवून टिपॉयवर उभी राहिली आणि मोठ्यानं ‘धाडकन’ आवाज आला??????)  इथून पुढे — 

“नमेssssss” बाबा जोरात ओरडले.आई-बाबांनी तिला खाली उतरवून पाणी दिलं आणि अचानक आईनं नमाच्या खाडकन थोबाडीत मारली.

“एवढयासाठी जन्म दिला होता का?जीव देत होतीस.आधी आम्हांला मारून टाक मग काय करायचं ते कर”आई संतापानं फणफणत होती.

“नमा,असलं काही करण्याआधी आमचा विचार केला नाहीस”

“तुम्हांला अजून त्रास होऊ नये म्हणून तर…..”

“तुला काही झालं असतं तर आम्ही राहिलो असतो का?”डोळ्याला पदर लावत आई म्हणाली तेव्हा बाबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं.नमा दोघांना घट्ट बिलगली.

“जे झालं ते झालं.वचन दे पुन्हा असा वेड्यासारखा विचार करणार नाही”

“प्रॉमिस!!पण सहन होत नाहीये.आयुष्याच्या रंगीबिरंगी चित्रावर अचानक काळा रंग ओतलाय असं वाटतंय.”

“सगळं व्यवस्थित होईल.हिंमत सोडू नकोस.जे घडलं त्याचा धक्का इतका मोठा होता की आम्ही कोलमोडलो.काहीच सुचत नव्हतं.म्हणून तुझ्याशी बोललो नाही.डोकं शांत झाल्यावर पहिला विचार डोक्यात आला की तुझी काय अवस्था असेल म्हणून धावत आलो.देवाची कृपा म्हणूनच वेळेत पोचलो

“तू एकटी नाहीस.आम्ही सोबत आहोत”आई.

“क्लिप व्हायरल झाली हे बदलू शकत नाही पण आपण गप्प बसायचं नाही.ज्यानं हे केलय त्याला शोधून काढू. पोलिसांकडे तक्रार करू”

“बाबा,पोलिसांकडं गेलं तर अजून बदनामी,अजून त्रास”

“काहीच केलं नाही तर होणारा त्रास त्यापेक्षा जास्त आहे.”

“पण बाबा”

“तुझी अवस्था समजतेय तरीही शांत डोक्यानं विचार कर मगच निर्णय घे.बळजबरी नाही.”

“आता आराम कर नंतर बोलू आणि दार बंद करू नकोस”.

छान झोप काढून काही वेळानं नमा हॉलमध्ये आली तेव्हा फ्रेश वाटत होती.

“थोडं बोलू”

“बाबा,परवानगी कशाला?”

“कारण क्लिप विषयीच बोलायचंय”

“मी ठीक आहे.तुम्ही बोला.”

“क्लिपमुळ झालेला त्रास,जे सहन केलंस,घेतलेला टोकाचा निर्णय.हे जगासमोर यायला हवं”

“का?कशासाठी?”आईनं वैतागून विचारलं.

“बाबा,तुमच्या डोक्यात काय चाललंय”

“बाजू मांडण्यासाठी तू सुद्धा क्लिप तयार कर.”

“अहो काहीही काय,अजून एक क्लिप म्हणजे लोकांना आयतं कोलीत दिल्यासारखं होईल”आई.

“नुसतं घरात रडत बसून तोंड लपवण्यापेक्षा जगाच्या समोर जाऊन चूक मान्य करून माफी मागणं केव्हाही चांगलं.”

“त्यानं काय होईल”नमा.

“नक्की सांगता येणार नाही पण तुझी हिंमत जगाला समजेल हे नक्की.”बाबांच्या बोलण्यानं नमाच्या विचारांना नवी दिशा मिळाली.

“अजून क्लिप-बीप काही नको.चार दिवस शांत राहू.सगळं ठीक होईल.”आई.

“बाबांचं बरोबरयं.तुमचा मुद्दा लक्षात आला.रडारड खूप झाली.पोलिसांकडे जाऊच पण त्याआधी व्हिडिओ करू.”

“ग्रेट,काय बोलायचं त्याचा विचार कर.पॉइंट काढ आणि बिनधास्त बोल.उद्या सकाळी शूट करू.”

दुसऱ्या दिवशी बोलायला सुरवात करण्याआधी नमानं हात जोडून प्रार्थना केली नंतर अंगठा उंचावून तयार असल्याची खूण केल्यावर बाबांनी मोबाईलवर शूटिंग सुरू केलं.

“नमस्कार!! मी नमा,माझ्या खाजगी क्षणांची चोरून केलेल्या क्लिपमुळे सगळ्यांना हा चेहरा माहितेय.कालपासून बदनाम हुये पर नाम हुवा.अशी अवस्था झालीय.भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली.सार्वजनिक ठिकाणी असं वागायला नको होतं.त्याबद्दल सर्वांची माफी मागते.नकळतपणे घडलेल्या चुकीची फार मोठी किंमत मोजावी लागतेय.माझी अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली.राक्षसी आनंदासाठी कोणीतरी लपून व्हिडिओ केला आणि तो व्हायरल झाल्यावर विकृतीचा खेळ सुरू झाला.लहान-थोर,गरीब-श्रीमंत,अडाणी-सुशिक्षित सगळेच यात आवडीनं सहभागी झाले.माणसांतल्या जनावरांनी लचके तोडायला सुरवात केली.क्लिप बघून नंतर फोन केले.घाणेरडे मेसेज केले.खूप निराश झाले त्याच भरात आत्महत्येचा प्रयत्न केला.आई-बाबांमुळे वाचले”.भरून आल्यानं नमाला बोलता येईना.बाबांनी शूटिंग पॉज केलं.नमा पुन्हा बोलायला लागली

“तसं पाहीलं तर मी काही जगावेगळ केलं नाही पण एका मध्यमवर्गीय मुलीची क्लिप म्हटल्यावर सगळ्यांना त्यात इंटरेस्ट निर्माण झाला.कालपासून खूप सहन केलंयं आणि अजूनही करतोय.सिनेमा,वेबसिरिजमध्ये तर यापेक्षा पुढच्या गोष्टी दाखवतात.ते आवडीनं पाहिलं जातं.बोल्ड सीन्स करणाऱ्यांना काहीही फरक पडत नाही उलट पैसे आणि प्रसिद्धी मिळते मात्र माझ्यासारख्या सामान्य मुलींसाठी हे फार भयंकर आहे.क्लिप व्हायरल झाल्यापासून भयानक अनुभव आलेत.इतरवेळी साधी चौकशी न करणारे नेमकं आत्ताच फोन करून क्लिपविषयी बोलतायेत.फुकटचे सल्ले तर चालूच आहेत.म्हणून आम्ही फोन बंद केले तर काहीजण घरी येऊन बळजबरीचं सांत्वन करून गेले.माणसांचं हे वागणं धक्कादायक होतं.जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.असो!! हा नवीन व्हिडिओ करण्या मागचा उद्देश वागण्याचं समर्थन नाहीये तर माझीही एक बाजू आहे.आई-बाबांमुळे मी जिवंत आहे.त्यांनी सपोर्ट केला परंतु अशा कितीतरी दुर्दैवी नमा आहेत ज्यांना कोणाचाच आधार नसतो म्हणून मग त्या टोकाचा निर्णय घेतात.सर्वांना हात जोडून विनंती आहे की या विकृतीच्या खेळात सहभागी होऊ नका.असे व्हिडिओ फॉरवर्ड न करता ताबडतोब डिलिट करा. उलट पाठवणाऱ्याला जाब विचारा.अजून जास्त काही बोलत नाही.थॅंकयू”नमा बोलायचं थांबली.डोळे घळाघळा वाहत होते.काही वेळ शांततेत गेला.

“आता मी बोलतो”बाबांनी मोबाईल नमाकडे दिला आणि आईला शेजारी बसवून बोलायला सुरवात केली.

“आम्ही तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं.साध सरळ चाललेलं आयुष्य अचानक कालपासून बदललं.क्लिपच्या रूपानं आलेल्या वादळानं मूळापासून हादरवलं.माणसातल्या एका गिधाडानं सावज टिपलं आणि बाकीच्यांनी मिटक्या मारत मजा घेतली.एकुलती एक,उच्चशिक्षित,लग्न ठरलेल्या मुलीचं अशापद्धतीनं प्रसिद्ध होणं हे फार भयंकर.पोटच्या मुलीच्या बाबतीतला हा प्रकार सहन करणं पालक म्हणून अतिशय वेदनादायक आहे.अचानक बसलेल्या झटक्यातून सावरतोय.आता गप्प बसणार नाही.पोलिसांकडे तक्रार करणार.याकामी तुमची मदत पाहिजे.

ज्यानं तुम्हांला पाठवली त्याला ही क्लिप कोठून मिळाली एवढंच विचारा.एकमेकांच्या मदतीनं गुन्हेगारापर्यंत पोहचू शकतो आणि आमचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.”

“माझी लेक वाचली.एवढंच सांगते की वेळीच आवर घातला नाही तर आजचे हे दु:शासन कधी घरात घुसतील ते कळणार नाही कारण त्यांच्या हातात अत्याधुनिक साधनं आणि आपल्या घरात आई,बहीण,बायको,मुली आहेत.हात जोडून विनंती आहे की यापुढे असल्या क्लिप फॉरवर्ड करू नका.एखाद्याची थोडक्यातली मजा दुसऱ्याच्या जिवावर बेतू शकते.”आईनंसुद्धा मन मोकळं केलं.

नमानं व्हिडीओ पोस्ट केल्यावर काही वेळानं मोबाईल वाजला,नाव बघून तिनं कॉल घेतला नाही. पुन्हा पुन्हा फोन वाजत होता.इतक्यात दारावरची बेल वाजली.आईनं दार उघडलं तर समोर …

— क्रमशः भाग दुसरा

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-1 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-1 ☆ श्री मंगेश मधुकर 

सकाळी जाग आल्यावर सवयीनं सगळ्यात आधी नमानं मोबाईल चेक केला तर एकशेवीस अनरीड मेसेज आणि सतरा मिस कॉल.नमाला प्रचंड आश्चर्य वाटलं.सर्वात जास्त कॉल शुभाचे.लगेच तिला कॉल केला.

“नमे,कुठंयेस.किती फोन केले मेसेज केले पण एकांचही उत्तर नाही”

“अगं.रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते.फोन सायलेंटवर होता.आत्ता बघितलं”

“म्हणजे तुला अजून काहीच माहिती नाही”

“काय ते”

“बोंबला!!क्लिप फिरतीये.”

“कसली क्लिप?”

“तू आणि विनीत,तुमच्या बागेतल्या लिपलॉकची……..”

“काय!!”नमा किंचाळली.

“अगं नमा,तू सोडून सगळ्या जगानं पाहिलंय.तुला क्लिप पाठवलीय,बघ.”

भीतभीत नमानं क्लिप सुरू केली.तिचे विनीतसोबतचे खाजगी क्षण लपून शूट केले होते.अवघ्या काही सेकंदाचा व्हिडिओ पाहून नमाचं धाबं दणाणलं.भीतीनं हात-पाय थरथरायला लागले.घशाला कोरड पडली.डोकं बधीर झालं.श्वासाचा वेग वाढला. जोरजोरात रडताना हातातून मोबाईल पडला आणि दारावर टकटक दोन्हीचा आवाज एकदमच झाल्यानं नमा दचकली.आईचा आवाज ऐकून जीवात जीव आला. रूममध्ये शिरताच आईनं विचारलं “नमा,हे काय गं”

“मला आत्ताच कळलं”

“काल रात्रीपासून तो व्हिडिओ फिरतोय.सोसायटी,नातेवाईक सगळे तुझ्याविषयीच विचारतायेत.सारखा फोन  वाजतोय.काही निर्लज्ज लोकांनी नाही नाही त्या चौकशा केल्या.”

“बाबा कुठं आहेत”

“हॉलमध्ये फोन बंद करून बसलेत.लँडलाईनचा रिसिव्हरसुद्धा बाजूला काढलायं.”

“विनीत”

“फोन बंद करून बसलाय.त्याला कोणाशीच बोलायचं नाहीये असं त्याच्या आईनं सांगितलं”

“आई,आता काय करू”

“जवळ जायच्या आधी विचारलं नाहीस”. 

“आई!!जे घडलं ते भावनेच्या भरात घडलं अन कितीवेळ तर अवघे काही सेकंद.” 

“तेच सेकंद गावभर फिरतायेत आणि बघणारे मजा घेतायेत.”

“आता!!”

“आधी तो फोन बंद कर आणि मी सांगत नाही तोपर्यंत रूमच्या बाहेर येऊ नकोस.”

“काहीच्या काही होऊन बसलं.खूप टेंशन आलंय”

“माझी तर अक्कल बंद झालीय.विनतचं ठीकये पण तुला कंट्रोल करता आलं नाही”

“आई!!”नमा ओरडली. 

“उगीच माझ्यावर डाफरून काय उपयोग.लोकांना फुकट तमाशा दाखवलास.”

“बोल!!अजून जे जे मनात आहे ते सगळं बोल.साखरपुड्याच्या सेलिब्रेशनसाठी बागेत गेलो.छान गप्पा मारताना एकांत होता म्हणून जरा …….”

“म्हणजे आपली चूक झालीय असं तुला वाटत नाही का?”

“पब्लिक स्पेस मध्ये असं वागायला नको होतं.माझी नुसती चूक नाही तर घोडचूक झालीये”माय-लेकी बोलत असताना बाबा रूममध्ये येऊन नमाचा मोबाईल घेऊन गेले.नमाकडं बघितलं सुद्धा नाही.त्याचं परक्यासारखं वागणं नमाला खूप खोलवर लागलं. 

“घराची अब्रू तू चव्हाट्यावर आणलीस”आई पुन्हा सुरू झाली.

“उगाच काहीही बोलू नकोस.”

“तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस.वागताना थोडी काळजी घ्यायची ना”

“परत तेच.मोहाच्या बेसावध क्षणी ते घडलं.जे झालं त्याचा फार पश्चाताप होतोय.सॉरी!!” 

“आता बाण सुटल्यावर माफी मागून काही उपयोग नाही.ही जखम आयुष्यभर सोबत करणार.सगळं संपलं.”आईचा आवाज कातर झाला.डोळे भरले.नमाची अवस्था वेगळी नव्हती.

“आता काय करायचं”नमानं विचारलं. 

“जे समोर येईल त्याला सामोरं जायचं’

“म्हणजे”

“पुढं काय वाढून ठेवलंय ते माहिती नाही.विनीतचं ठीक आहे तो पुरुष आहे पण त्याला कोण बोलणार नाही.सगळे तुलाच नावं ठेवणार.”

“असं का??”

“कितीही मॉडर्न वागत-बोलत असलो तरी प्रत्येक घरात मुली-बायकांसाठी वेगळे अलिखित नियम असतात.अदृश्य नियम,अटी बाईला पाळावेच लागतात.तुझे बाबा रागावले,चिडले असते तर ठीक परंतु ते काहीच बोलले नाहीत.याचीच भीती वाटतीये.”

“कसली भीती”

“ते काय करतील याची.”

“दोघं द्याल ती शिक्षा मान्य आहे”

“तुझं हे प्रकरण अजून काय काय पहायला लावणार आहे देवालाच माहीत”

“प्रकरण???,खाल्ली माती आता काय करू ते सांग”

तोंड फिरवून जाताना आईनं आपटलेल्या दाराच्या आवाजनं नमाचे कान बधीर झाले.उशीत तोंड खुपसून रडायला लागली. सारखी क्लिप डोळ्यासमोरून फिरत होती.मित्र,मैत्रिणी,

कॉलेज,सोसायटी,नातेवाईक, रूममधल्या निर्जीव वस्तु सगळे आपल्याकडं पाहत हसत आहेत असं वाटत होतं.डोळे गच्च  मिटले तरी जोरजोरात हसण्याचा,घाणेरड्या कमेंटचा आवाज कानावर आदळण्याचा भास व्हायला लागला.त्यातच थरथरणाऱ्या हातातून ग्लास पडून सगळ्या बेडवर पाणी सांडलं.डोक्यात फक्त निगेटिव्ह विचारांच ट्राफिक सुरू होतं.एकामागोमाग येणारे भयानक विचार भीती वाढवत होते.सगळ्या अंगाला दरदरून घाम फुटला.हृदयाचे ठोके वाढले.स्वतःला दोष देत सारखं तोंडात मारून दोन्ही गाल लाल झालेले,डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.काही क्षणाच्या उत्कट भावेनेची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं वाटलं नव्हतं.आपण खूप एकटे आहोत.आई-बाबांचा आधार घ्यावा तर तेच खचलेले आणि भावी जोडीदार तोंड लपवून बसलेला.प्रचंड हताश,निराश नमा रुममध्ये भिरभिरत्या नजेरेनं अस्वस्थपणे येरझारा मारताना बडबडायला लागली.“द एन्ड.होत्याचं नव्हतं झालं.ज्यानं क्लिप बनवली तो मजेत मी मात्र बरबाद. हलकटपणा त्यानं केला आणि गुन्हेगार मी.हा कलंक कधीच पुसला जाणार नाही.मीच नालायक,महामूर्ख नको ते करून बसले.आता करियर, लग्न,संसार काही काही नाही.लोकांच्या नजरेत फक्त आणि फक्त ती क्लिपचं असणार.ईथून पुढं विशिष्ट नजरा आणि नालायकपणे हसणारे चेहरे बघत आयुष्य काढावं लागणार.माझ्यामुळेच फक्त त्रास आणि त्रासच होणार.आयुष्य कधीच पूर्वीसारखं होणार नाही.मग .. हे विनाकारण तोंड लपवून जगणं कशासाठी?कुठंपर्यंत आणि कोणासाठी.. आपला एक निर्णय सगळं काही क्षणात थांबेल.”नमा एकदम बोलायची थांबली.

“आई,बाबा सॉरी!!मी चुकले पण त्याची शिक्षा तुम्हांला नको” एवढीच चिठ्ठी लिहून डोळे पुसून नमानं आरशासमोर “गुड बाय” म्हणत आवडत्या जांभळ्या ड्रेसच्या ओढणीचं टोक सिलिंग फॅनला अडकवलं आणि दुसरं टोक गळ्याभोवती अडकवून टिपॉयवर उभी राहिली आणि मोठ्यानं ‘धाडकन’ आवाज आला??????

— क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सामान — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ सामान — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकतीच दिवाळी होऊन गेली  आणि दिवाळी निमित्ताने भारतात आलेली कीर्ती परत अमेरिकेत जायला निघाली.

आई- वडिल, सासू -सासरे इतर काही नातेवाईक यांच्या गोतावळ्यात बसलेली कीर्ती एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू घेऊन रमलेली होती. 

सगळे तुला जाताना हे हवे का? ते हवे का? विचारत होते. आई- सासूबाई वेगवेगळी पिठे लोणची ई. खायचे पदार्थ द्यायची तयारी करत होते. 

सहज कीर्ती म्हणाली किती सामानाची अदलाबदल करत असतो ना आपण••• लहानपणची भातुकली बाहुला बाहुली लग्नाचे वय झाले की सोडतो, लग्न झाले की माहेर , माहेरच्या काही गोष्टी सोडतो, लग्नानंतरही नवर्‍याची बदली, दुसरे घर बांधणे , ई काही कारणाने नेहमीच सामान बदलत रहातो. आणि मग बदल हा निसर्ग नियम आहे असे वाक्य कीर्तीला आठवले आणि आपण सतत सामान बदलतो आहे म्हणजे नैसर्गिक जीवन जगतो आहे असे वाटले.

आता सुद्धा भारतात यायचे म्हणून अमेरिकेहून काही सामान मुद्दाम ती घेऊन आली होती आणि जाताना ते सामान तिकडे मिळते म्हणून येथेच सोडून नव्याच सामानासह ती अमेरिकेला निघाली होती.

आपल्या माणसांचे प्रेम जिव्हाळा पाहून ती सुखावली असली तरी यांना सोडून जायचे म्हणून मन भरून येत होते.

कितीही निवांत सगळी तयारी केली, आठवून आठवून आवश्यक सामानाने तिची बॅग भरली तरी ऐनवेळी जाताना लगीन घाई होऊन कोणी ना कोणी अगं हे असू दे ते असू दे म्हणून तिच्या सामानात भर घालतच होते.

जाण्याचा दिवस आला आणि सगळे सामान  घेऊन ती बाहेर पडली आणि गोतावळा भरल्या अंत:करणाने तिला निरोप देत होते. बायबाय टाटा करत होते आणि अरे आपले खरे सामान म्हणजे हा गोतावळा आहे आणि तेच आपण येथे ठेऊन अमेरिकेत जात आहोत या विचाराने तिच्या काळजात चर्रर्रss झाले आणि ते भाव तिच्या डोळ्यातून गालावर नकळत वाहिले.

काही जण विमानतळापर्यंत तिला सोडायला आले होते. तेथेही पुन्हा यथोचित निरोप घेऊन कीर्ती एकटीच आत गेली. फ्लाईटला अजून उशीर असल्याने वेटिंगरूम मधे बसली आणि आपली मुले नवरा तिकडे अमेरिकेत वाट पहात आहेत. तिकडे आपले घर आहे आपल्याला त्यासाठी तिकडे जावेच लागणार••• नाईलाज आहे याची जाणिव होऊन कीर्ती सावरली. 

तरी तिच्या मनातून ईथले क्षण, इथला परिवार त्यांचे बोलणे हसणे वागणे हे जातच नव्हते. तिकडच्या आठवणींनी जबाबदारी तर इकडच्या आठवणीतून जपलेली आपुलकी माया प्रेम दोघांची सरमिसळ होऊन मन हेलकावू लागले असतानाच तिला तिचे कॉलेजचे दिवस पण आठवू लागले•••

ती आणि विजय एकाच कॉलेजमधे वेगवेगळ्या शाखांमधे शिकत असले तरी स्पर्धांच्या निमित्ताने एकत्र येत होते. दोघांचे विचार जुळले आणि नकळत ते प्रेमात गुंतले. पण लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्याघरून कडकडून विरोध झाला आणि विजयनेही तिला सॉरी म्हणून विसरून जा म्हटले. 

किती भावूक झाली होती ती••• त्यातून नकळत तिच्या तोंडून पूर्ण गाणेच बाहेर पडले होते•••

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

ओ ओ ओ ! सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं

और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है

वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

पतझड़ है कुछ … है ना ?

ओ ! पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट

कानों में एक बार पहन के लौट आई थी

पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है

वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे – २

आधे सूखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी

गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो ! 

वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

एक सौ सोला चांद कि रातें एक तुम्हारे कांधे का तिल – २

गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ

झूठ-मूठ के वादे सब याद करा दूँ

सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

खरच असे कितीतरी सामान आपण आपल्या मनातही ठेवत असतो नाही का? पण परिस्थिती आली तर अवघड असूनही ते सामानही फेकून देता आले पाहिजे. आणि तेच कीर्तीने केले असल्याने ती नव्या माणसाचे नव्या घरातले सामान त्यामधे ठेऊ शकली होती.

मग अध्यात्माने तिचे मन नकळतच भरले आणि आपल्या मनाची सफाई जो नेमाने करतो त्याचे जीवन सौख्य शांती समाधानाने भरून पावते हे वाक्य आठवले. काही लोकांबद्दलचा राग, मत्सर, हेवा ई. अनेक विकारांचे सामान मनात साठले तर शांती समाधान सौख्य ठेवायला जागा उरत नाही म्हणून वेळीच हे नको असलेले सामान बाहेर फेकून दिले पाहिजे तरच सगळे व्यवस्थित होऊ शकते. याचा अनुभव तिने घेतलाच होता.

फ्लाईटची वेळ आली आणि ती सगळे सोपस्कार करून विमानात बसली मात्र, तिला जाणवले साधा प्रवास म्हटला तरी आपण किती सामान जमवतो? आधारकार्ड,पासपोर्ट,व्हिसा,एअर टिकेट••• प्रवास संपला तर टिकेट फेकून देतो पण इतर सामान जपूनच ठेवतो.

अमेरिकेत पोहोचायला २२ तासांचा अवधी होता. कीर्तीचे विचारचक्र चालूच होते.

तिच्या बाजूच्या सीटवरील व्यक्ती सांगत होती, त्या व्यक्तीचे वडील काही दिवसांपूर्वी वारले आणि त्यासाठी सगळी महत्वाची कामे सोडून त्या व्यक्तीला भारतात यावे लागले होते. 

आपल्याच विचारात गर्क असलेली कीर्ती अजून विचारात गढली गेली. जाणारी व्यक्ती निघून गेली पण तिने जमा केलेली माया मालमत्ता स्थावर जंगम हे सगळे इथेच सोडून गेली की••• हौसेने,जास्त हवे म्हणून, आवडले म्हणून, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून, आपल्या माणसांना आवडते म्हणून आयुष्यभर माणूस कोणत्याना कोणत्या कारणाने सामान जमवतच जातो पण तो••• क्षण आला की सगळे सामान येथेच ठेऊन निघूनही जातो•••

तेवढ्यात तिला आठवले कोणीतरी सांगितले होते की परदेशात जायचे तर तिथली करंन्सी न्यायला लागते. मग इथले पुण्यकर्म हीच परलोकातील करन्सी असल्याने हे पुण्यकर्माचे सामानच जमवले पाहिजे. 

ती अमेरिकेत पोहोचली होती पण आता ती पुण्यकर्माचे आधारकार्ड, स्वर्गाचा व्हिसा आणि सुगुणांचा पासपोर्ट हे सामान जमवण्याच्या विचारातच …

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। योगायोग ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ।। योगायोग ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(नीताची नोकरी संपली आणि  नीता रिटायर झाली.होणाऱ्या निरोप  समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या.) इथून पुढे —

मेघनाने नीताला फोन केला आणि म्हणाली, “आई आता जर कारणं सांगितलीस तर बघच. झाली ना नोकरी पूर्ण? मग कधी येतेस माझ्याकडे ते सांग.” तिने न विचारता नीताला तिकीटच पाठवलं आणि नीताला मग मात्र अमेरिकेला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. एअरपोर्टवर आलेल्या गोड नातीनं आजीच्या कमरेला मिठी मारली आणि ‘ आज्जू ‘ अशी हाक मारल्यावर नीताचे डोळे भरूनच आले. मेघनाने तिला जवळ घेतले आणि कारमध्ये बसवलं. वाटेत नात अस्मि नुसती चिवचिवत होती आणि तिला खूप आनंद झाला आपली आज्जू आली म्हणून. किती तरी साठलेलं बोलून घेतलं मायलेकींनी आणि दिवस कसे जात हेच समजेना नीताला. मेघनाला नीताने सांगितलं नव्हतं की ती ब्रेल शिकली आणि ब्लाइंड स्कूलमध्ये जाते. तिला मुद्दाम सांगायची वेळच आली नाही.

त्या दिवशी नीताला घेऊन मेघना आणि अस्मि तिथल्या लायब्ररीत  गेल्या होत्या. सहज बघितलं तर नीताला तिकडे एक सम्पूर्ण सेक्शन ब्रेल पुस्तकांचा दिसला. नीता अतिशय   एक्साइट होऊन त्या सेक्शनमध्ये गेली. तिकडे वाचनाचीही सोय होती. काही मोठी अंध मुलं, काही लहान मुलं ब्रेल पुस्तकं घेऊन वाचत होती. नीताचे हृदय भरून आलं. त्या अंध छोट्या मुलाजवळ ती  आपण होऊन गेली आणि म्हणाली “ खूप सुंदर पुस्तक आहे ना हे? फेअरी टेल्स? तू हॅन्स अँडर्सनच्या परीकथा वाचल्या आहेस का? जरूर वाच हं. आहेत बरं का त्या ब्रेल मध्ये.”  तिने त्याला एक गोष्ट वाचून दाखवली. तो मुलगा इतका खूष झाला. “ आंटी, प्लीज आणखी एक स्टोरी वाचाल का? तुम्ही इंडियन आहात का? तुमचा एक्सेन्ट अमेरिकन नाही, पण तुम्ही छान वाचता. थँक्स.” त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.  म्हणाली, “ माझा ख्रिस जन्मांध नाही पण हळूहळू त्याची दृष्टी कमी होत गेली. खूप उपाय केले आम्ही पण नाही उपयोग झाला. तुम्ही किती सहज ब्रेल पुस्तक वाचले.मला येईल का हो शिकता? “ नीता म्हणाली “ नक्की येईल. इथे अशा संस्था नक्की असतील ज्या तुम्हाला ब्रेल शिकवतील. करा चौकशी. नाही तर मी शिकवींन तुम्हाला. मी इथे आहे अजून चार महिने “ नीताचा फोन नंबर घेऊन त्या आभार मानून निघून गेल्या. मेघना हे थक्क होऊन बघत होतो. “आई,अग काय हे ! कधी शिकलीस तू हे? कित्ती ग्रेट आहेस ग! “ नीता मेघना अस्मि घरी आल्या. अतुलला हे सगळं मेघनाने सांगितलं..,तो म्हणाला, “ आई खरच ग्रेट आहात हो तुम्ही.”

नीताच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आपल्या मैत्रिणी आपल्याशी कशा  वागल्या ,माणसं कशी लगेच बदलतात हे सांगितलं आणि म्हणाली, “ माझा आता त्यांच्यावर राग नाही ग. मला उलट ही नवी वाट सापडली म्हणून मी आभारच मानेन त्यांचे. नाहीतर बसले असते पिकनिक करत आणि वेळ वाया घालवत.” मेघना आणि अतुलला अतिशय कौतुक वाटले नीताचे. मिसेस वॉल्सने ही बातमी सगळ्या मैत्रिणींना सांगितली आणि नीताचे कौतुक केले. ख्रिसची शाळा बघायला याल का असा फोन आला मेघनाला. पुढच्या आठवड्यात  नीताला घेऊन अस्मि मेघना अतुल ब्लाइंड स्कूलमध्ये गेले. ती छोटी छोटी अंध मुलं बघून अस्मि रडायला लागली आणि सगळ्यांचे डोळे पाणावले. ख्रिस नीता जवळ आला आणि म्हणाला, “ ही आंटी माझी फ्रेंड आहे. हो ना आंटी?” नीता म्हणाली “ हो तर !माझा छोटा मित्र ख्रिस आणि तुम्हीही सगळे माझे नवीन छोटे दोस्त. मी आता तुम्हाला माझ्या भाषेतली ,पण तुमच्यासाठी मी इंग्लिश ट्रान्सलेट केलेली गोष्ट वाचून दाखवू का?” मुलं आनंदाने हो म्हणाली. नीताने त्यांना बिरबलाची सुंदर गोष्ट वाचून दाखवली. तिथल्या प्रिंसिपलला फार आश्चर्यआणि कौतुक वाटले नीताचे. तुम्ही आमच्या या मुलांसाठी दर वीकला एकदा येत जाल का?” त्यांनी विचारले. नीता म्हणाली “अगदी आनंदाने येईन मी ! ब्रेल लिपी फार अवघड नाही. तुम्ही या मुलांच्या पालकांना शिकवा ना,, ही लिपी..घ्या त्यांचेही   क्लासेस.”

नीता आनंदाने  घरी परतली.मेघनाला अतिशय आश्चर्य आणि कौतुक आणि अभिमान वाटला आपल्या आईचा. दर आठवड्याला नीताला शाळेची बस न्यायला यायला लागली आणि या मुलांना शिकवताना, त्यांचे नवीन नवीन साहित्य बघताना नीताही खूप काही शिकली या शाळेतून.  बघता बघता नीताचा इथला मुक्काम संपत आला. एक दिवस लाजरा ख्रिस म्हणाला “आंटी माझ्या घरी याल? मला आमचं घर आणि माझी रूम दाखवायची आहे तुम्हाला.” नीताला गहिवरून आलं.” नक्की येईन ख्रिस!” ती म्हणाली. ती जाण्याच्या आधी शाळेतल्या मुलांनी तिला तिने शिकवलेली गाणी म्हणून दाखवली, नाच करून दाखवले. शाळेने नीताचा छोटासा सत्कार केला आणि पुन्हा पुन्हा या ,आमच्या मुलांना तुमच्या भाषेतली गाणी शिकवा, गोष्टी सांगा, असं म्हणत निरोप दिला.

नीताचा हा यावेळचा मुक्काम अतिशय अविस्मरणीय झाला. सहज ती त्या लायब्ररीत जाते काय आणि ब्रेल पुस्तकं तिला दिसतात काय आणि चिमुकला ख्रिस तिथे भेटतो काय ! नीताला अतिशय आनंद झाला. भारतातून आणलेली छोटी ब्रेल पुस्तकं तिने शाळेला दिली आणि ख्रिसला तर आणखी स्पेशल पुस्तक आणि वाजणारे टॉय. मेघना आणि अतुल घरी आले आणि मेघनाने आईला मिठीच मारली. “ आई किती ग कौतुक करु तुझं मी. स्वप्नातसुद्धा वाटलं नाही की तू हे शिकली असशील. खूप मोठं काम करते आहेस ग तू ! मेघनाचे डोळे भरून आले. बाबा गेल्याचे दुःख तर अजूनही आहेच ग.. पण तू धीराने सावरलंस स्वतःला.आणि ही वेगळी वाट निवडलीस याचा अभिमान आहे आम्हाला. आम्ही या  इथल्या शाळेला देणगी देऊच पण हा चेक तुझ्या पुण्यातल्या शाळेला अस्मिकडून.”

“ आज्जू,आता तू दरवर्षी ये आणि  त्या ब्लाइंड स्कूलमध्ये अशीच जात जा आणि ख्रिससारख्या मुलांना

भेट. आज्जू,किती आपण लकी ग.. आपल्याला डोळे आहेत. आणि मी हट्ट करते की मला हेच हवं आणि हाच ड्रेस हवा. आज्जू,थँक्स.मी आता कधीही हट्ट करणार नाही आणि नेहमी मॉमबरोबर ख्रिसला भेटायला जाईन.” चिमुकली अस्मि म्हणाली. नीताने तिला जवळ घेतले. गहिवरून ती मेघनाला म्हणाली, ” मेघना, हे सगळं घडायला संजयला जायलाच हवं होतं का ग? त्याला किती अभिमान वाटला असता ना.”

मेघना म्हणाली, “आई नको रडू तू. बाबा जिथे कुठे असतील तिथून हे नक्की बघत असतील. पण अस्मि म्हणते तशी दर वर्षी येत जा ग.”

नीता त्यांचा निरोप घेऊन परत आली. तिची इथली गरीब मुलं, तिची शाळा, तिची वाट पहात होती. कुठेही गेलं, कोणतीही भाषा-देश-वर्ण कोणताही असला तरी दुःखाची भाषा मात्र एकच असते हे त्या चिमुकल्या  अंध मुलांना बघून पुन्हा एकदा नीताला प्रकर्षाने जाणवलं.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

संध्याकाळ झाली होती.नीता अंगणात पायरीवर बसली होती. हा दगडी भक्कम बंगला तिच्या आहे सासऱ्यांचा!कित्ती भक्कम  आणि सुंदर बांधलेला होता तो. नीता अंगणात आली आणि शेजारी फुललेल्या जाईची फुलं तिनं ओंजळ भरून घेतली आणि आत वळणार तोच  पलीकडे रहाणाऱ्या आजींनी हाक मारली.” नीता, ये की चहा प्यायला ! ये !छान केलाय गवती चहा घालून !” नीता कम्पाउंड ओलांडून पलीकडे गेली आणि आजींच्याजवळ झोपाळ्यावर बसली.आजींनी गरम चहा तिच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या, “ घे ग ही आल्याची वडी !आत्ताच केल्यात– बघ बरी झालीय का? “

“ आजी,एकदम मस्त झालीय. किती हौस हो तुम्हाला या वयात सुद्धा !” नीता म्हणाली.” 

“ अग, आवडतं हो मला करायला. सुनेला ,नातसुनेला कुठला आलाय वेळ? पण मला आवडेल ते करते 

मी ! आहेत भरपूर नोकरचाकर हाताशी. काही काम नसतं  मला ! बरं, कधी आलीस अमेरिकेतून? बरे आहेत ना सगळे?  संजय फार लवकर गेला ग ! एकटी पडलीस बाळा, पन्नाशी जेमतेम उलटली नाही तोवरच ! “ आजींनी मायेने हात फिरवला नीताच्या पाठीवरून ! डोळे भरून आले  नीताचे. 

“आजी राहिले की मी सहा महिने ! आणखी किती रहाणार लेकीकडे. ते सगळे तिकडे सुखात आहेत,

नात मोठी होईल आता आणि शेवटी आपलं घर ते आपलं घर. मला कायम राहायला नाही हो आवडणार तिकडे. आपलं घर आणि आपला परिवार खरा शेवटी. आणि आहेत की तुमच्यासारखे सख्खे शेजारी. आणि मी काम करते ते ब्लाइंड स्कूल, तिथली गोड छोटी मुलं माझी वाट बघत असतील ना ! “ नीता हसत म्हणाली. जाईची ओंजळ तिने झोपाळ्यावर रिकामी केली आणि म्हणाली, “ येते हं.. आजी.थँक्स चहाबद्दल.”  

सहा महिने राहिल्यावर नीता मागच्याच महिन्यात भारतात परतली. दोन वर्षांपूर्वी अचानकच काहीही हासभास नसताना संजय हार्टअटॅकने गेला. नीताची एकुलती एक मुलगी  मेघना लग्न होऊन अमेरिकेला गेली होती आणि तिला तिकडे छान नोकरीही होती. बाबांचे अचानक निधन झाल्यावर मेघना लगेचच भारतात आली आणि एक महिना राहिली. “आई,तू माझ्या बरोबर येतेस का? चल.बरं वाटेल ग तुला.” 

पण नीता नको म्हणाली. “ नको ग मेघना,खूप कामं उरकावी लागतील मला. संजयच्या पेन्शनचं बघावं लागेल, बँकेचे व्यवहार बघावे लागतील. मग नंतर येईन मी नक्की. अग माझी काळजी नको करू तू !

माझी अजून चार वर्षे नोकरी आहे कॉलेज मध्ये. मग मलाही मिळेल पेन्शन. मी घरी बसून तरी काय करू? कॉलेजमध्येही जायला सुरुवात करीन.” नीताने मेघनाची समजूत घातली आणि मेघना एकटीच गेली अमेरिकेला. नीताने आपले रुटीन सुरू केले.  

नीताचे आईवडील नीताच्या लग्नानंतर लवकरच गेले आणि  नीताचे भाऊ  भावजय कोल्हापूरला रहात होते. नीता पुण्यात एकटीच होती. कॉलेजमध्ये तिचा वेळ सुरेख जायचा. तिच्या सहकारी मैत्रिणी मित्र आणि स्टुडंट्सनी नीताला कधी एकटं पडू दिलं नाही. संजय असतानाही अनेक वेळा ती या ग्रुपबरोबर चार दिवसाच्या ट्रीपला सुद्धा जायची.  सहज लक्षात आलं नीताच्या … आपला नेहमीचा ग्रुप चार दिवस दिसला नाही. मग तिने हाताखालच्या  रश्मीला विचारलं “ अग मानसी सुहास कुठे दिसल्या नाहीत ग?”   रश्मी म्हणाली “ मॅम, त्यांचा ग्रुप चार दिवस कोणाच्यातरी फार्म हाऊसवर नाही का गेला? तुम्हाला माहीत नाही का? “ नीता गप्प बसली. पुढच्या आठवड्यात सुहास तिच्याजवळ आली आणि म्हणाली “ रागावलीस का? पण तुला कसं विचारावं असं वाटलं आम्हाला ! आम्ही सगळे कपल्स ग आणि तू एकटी ! तुला  ऑकवर्ड झालं असतं ग, म्हणून नाही बोलावलं. “ नीता काहीच बोलली नाही पण तिनं खूणगाठ बांधली मनाशी की संजय गेल्याने आपल्या आयुष्याचे संदर्भ बदलले. तिला म्हणावेसे वाटले, ‘ संजय असतानाही मी एकटीच तर येत होते कितीतरी वेळा, तेव्हा हा प्रश्न कसा आला नाही तुमच्या मनात ‘. नीताने हळूहळू या ग्रुपशी संबंधच कमी करून टाकले. आपल्यामुळे त्यांना अडचण नको. मनातून अतिशय वाईट वाटलं तिला, पण हे करायचंच असा निर्णय घेतला तिनं. एका माणसाच्या जाण्यानं आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स उभे रहातील याची कल्पनाच नव्हती नीताला. तिने आपलं मन काढून घेतलं या लोकांतून !अतिशय मानसिक त्रास झाला तिला पण मुळात अतिशय खम्बीर असलेली नीता हाही आघात झेलू शकलीच. 

त्या दिवशी दबक्या पावलांनी सुहास नीता जवळ आली आणि म्हणाली, “ नीता अशी नको आमच्याशी तुटक वागू !आपली किती वर्षाची  मैत्री एकदम तोडून नको टाकू. आम्हाला खूप वाईट वाटतं ग. परवा माझ्या मुलीचं, तुझ्या लाडक्या अश्विनीचं मी डोहाळजेवण करतेय. तू नक्की नक्की ये बरं का..मला फार वाईट वाटेल तू नाही आलीस तर. “ .यावर शांतपणे नीता म्हणाली, “ खूप खूप अभिनंदन सुहास.आणि थँक्स मला तू बोलावलंस म्हणूनही. पण तुझ्या घरी आजेसासूबाई, सासूबाई आहेत. त्यांना माझ्यासारखी विधवा आलेली चालणार नाही. मी ओटी भरलेली तर मुळीच नाही चालणार..  नकोच ते. मी येणार नाही. अग मी हे तुझ्यावर रागवून नाही म्हणत पण आता अनुभव घेऊन शहाणी नको का व्हायला? अश्विनीला माझे आशीर्वाद सांग.” गोऱ्यामोऱ्या झालेल्या सुहासकडे न बघता नीता तिथून उठून गेली. हा बदल नीताने स्वीकारला पण तिला ते सोपे नाही गेले. आता नोकरीची तीन वर्षे राहिली होती. नीताने विचार केला ही नोकरी संपली की आपण काहीतरी सोशल वर्क करूया. नीताने आता कॉलेज सुटल्यावर ब्रेल लिपी शिकण्याचा क्लास लावला. फार आवडला तिला तो. हळूहळू नीता ब्रेलमधली पुस्तकं सहज वाचायला शिकली. तिचा जुना मैत्रिणीचा ग्रुप कधी सुटला तिला समजलं पण नाही आणि वाईट तर मुळीच वाटलं नाही. 

नीताला  ब्रेल शिकवणारी मुलगी अगदी तरुण होती. तिने एम एस डब्ल्यू  केल्यावर ब्लाइंड स्कूलमधेच नोकरी करायची ठरवली होती आणि आपण होऊन ब्रेल शिकणाऱ्या नीताचे तिला फार कौतुक वाटले. आता रोज नीता ब्लाइंड स्कूलमध्ये जाऊन छोट्या मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवू लागली. किती आनंदाच्या वाटा खुल्या झाल्या नीताला ! नीता रमून गेली तिकडे. ही  ब्रेल शिकवणारी तरुण मुलगी नीना तर तिची मैत्रिणच झाली .नीताची नोकरी संपली आणि  नीता रिटायर झाली. होणाऱ्या निरोप  समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या. 

क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares