सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ ‘प्रश्नचिन्ह…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
शैलाताईंच्या डोळ्यांना धार लागली होती. विचार करकरून डोकं भणभणून गेलं होतं. त्यांची नजर वारंवार ईशाकडे जात होती. ईशा त्यांची नात आपल्या कॉटवर शांत झोपली होती. तिच्या निष्पाप चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. मान एका बाजूला कलली होती आणि तोंडातून लाळ गळत होती. एरवी वारंवार तिचं तोंड स्वच्छ करणाऱ्या शैलाताई आज मात्र स्तब्ध बसून होत्या. आपल्या नशिबात अजून काय काय वाढून ठेवलंय कोण जाणे!
रामराव आणि शैलाताईंना तीन मुलगे. संजीव, संकेत आणि सलील. तिन्ही मुलांची लग्न होऊन त्यांनी स्वतंत्र संसार थाटले होते. संजीव मुंबईत, संकेत सांगलीत आणि सलील दुबईत. रामरावांच्या निधनानंतर संजीव आईला आपल्या घरी घेऊन आला होता. संजीवची बायको सानिकाशी त्यांचं छान जमायचं. इतर दोघी सुनांशीही भांडण नव्हतं, पण जवळीकही नव्हती तेवढी! नाशिकचं घर त्यांनी बंदच ठेवलं होतं.
ईशाच्या जन्मानंतर खरं तर घर किती आनंदात होतं. पण लवकरच ती गतीमंद असल्याचं निदान झालं आणि तिचं संगोपन हेच एक आव्हान म्हणून उभं ठाकलं. त्याच सुमारास संजीवला एका मल्टिनॅशनल कंपनीत ऑफर आली आणि चांगलं भारी पॅकेज मिळालं. त्यामुळे मग ईशाकडे लक्ष देण्यासाठी, सानिकानं आपला जॉब सोडला. शैलाताईंची मदत होतीच.
आणि गेल्याच वर्षी कंपनीच्या कामानिमित्त उत्तराखंडला जायला निघालेल्या संजीवचं विमान कोसळलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. शैलाताई आणि सानिका या आघाताने कोलमडून गेल्या. कंपनीकडून आर्थिक मदत मिळाली पण सानिकाला काहीतरी धडपड करणं भागच होतं, घर चालवण्यासाठी! शैलाताई एकट्या ईशाला कश्या सांभाळणार? हेही एक प्रश्नचिन्ह होतंच!
या संकटांचा मुकाबला करायच्या प्रयत्नात असतानाच कोविडमुळे लॉ कडाऊन सुरू झाला. सानिकाच्या नोकरीच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसली. औषधं, दूध, भाजीपाला आणण्यासाठी, अधून-मधून तरी सानिकाला घराबाहेर पडावं लागतंच होतं. सहा महिने कसेबसे गेले आणि तिलाही कोविडनी गाठलं आणि आठवड्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सानिकाचा मृतदेहही घरी आणता आला नाही. संकटाच्या या मालिकेमुळे शैलाताई दुःखानं पिचून गेल्या होत्या.
कोविडमुळे एकमेकांकडे जाणंही बंद होतं. शेजारी – पाजारीदेखील दुरावले होते. माणुसकीच्या नात्याने कोणी-ना-कोणी जमेल तशी मदत करत होते. पण त्यांनाही मर्यादा होतीच. मुलं-सुना, नातेवाईक फोनवरून संपर्क साधत होते, पण रोजचा गाडा तर शैलाताईंनाच हाकायचा होता.ईशाला आता एखाद्या गतीमंद मुलांसाठीच्या संस्थेत दाखल करावं, असं त्यांच्या दोन्ही मुलांनी आडून आडून सुचवलं होतं. पण आपल्या या दुर्दैवी नातीला असं एकटं कुठेतरी ठेवायला, शैलाताईंचं मन तयार होत नव्हतं. शिवाय कोविडमुळे तेही सोपं नव्हतंच! एक-एक दिवस त्या कसाबसा ढकलत होत्या.
आता आणखी सहा महिन्यांनंतर बाहेरची परिस्थिती हळूहळू निवळायला लागली होती. दुकानं, दळणवळण काही प्रमाणात सुरू झालं होतं. लोक मास्क लावून घराबाहेर पडायला लागले होते. सर्व निर्बंध काही प्रमाणात शिथिल होऊ लागले.
अश्याच एका दुपारी त्यांच्या फ्लॅटची बेल वाजली. दाराची साखळी अडकवून त्या बाहेर डोकावल्या तर बाहेरच्या माणसानं आपलं ओळखपत्र दाखवलं. तो संजीवच्या कंपनीतून आला होता. त्याच्यामागे एक गोरटेला, मध्यम उंचीचा माणूसही होता. तो परदेशी वाटत होता.
एवढ्यात शेजारचे शिंदेकाका पण घरातून बाहेर आले. त्यांनी मग त्या दोघांची चौकशी केली आणि शैलाताईंना दार उघडायला हरकत नाही असं सांगितलं. घरात येताच तो परदेशी वाटणारा माणूस, शैलाताईंच्या पायावर लोळण घेऊन ओक्साबोक्शी रडायला लागला. त्या तर या प्रकाराने भांबावून गेल्या. तो काहीतरी बोलत होता पण त्यांना त्याची भाषा समजेना.मग संजीवच्या कंपनीतल्या माणसाने सगळा उलगडा केला.
हा परदेशी माणूस अकिरो.. जपानी होता. संजीवबरोबर तो कंपनीत कामाला होता. दोघांची पोस्टही सारखीच होती. उत्तराखंडला मिटिंगला खरंतर अकिरोच जाणार होता. पण त्याची आई अत्यवस्थ असल्याचा फोन आल्यामुळे, तो अचानक सुट्टी घेऊन तातडीने जपानला गेला. त्याच्याऐवजी संजीव मिटिंगला गेला पण वाटेतच तो अपघात झाला. लॉकडाऊनमुळे अकिरो जपानमध्येच अडकून पडला. पण संजीवच्या मृत्यूला आपणच कारणीभूत झालो, अशी अपराधी भावना त्याला छळू लागली. पहिली संधी मिळताच तो भारतात आला आणि आज संजीवच्या घरी आला होता.
शैलाताईंना तर काय बोलावं तेच कळत नव्हतं. शिंदेकाकांनी त्या दोघांना शैलाताईंच्या सद्यस्थितीची कल्पना दिली. अकिरो खूपच भावुक झाला होता. आपल्या हावभावांद्वारे तो जणू शैलाताईंची माफी मागत होता. ईशाकडे बघून त्याचे डोळे सतत पाझरत होते. परत भेटायला येण्याचं आश्वासन देऊन ते दोघे निघून गेले.
आणि आज सकाळी ते दोघे परत आले. त्याने आणलेल्या प्रस्तावावर काय निर्णय घ्यावा या दुविधेत शैलाताई सापडल्या होत्या. अकिरोने ईशाला दत्तक घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याने व्हिडिओ कॉल करून आपलं घर आणि बायको व मुलगा यांची ओळख शैलाताईंना करून दिली. तो ईशाला जपानला आपल्या घरी घेऊन जाणार होता. त्यांच्या देशात अशा दिव्यांग, गतीमंद मुलांसाठी खूपच सुविधा उपलब्ध होत्या. आपल्याकडून नकळत का होईना पण जो अपराध घडला, त्याचं प्रायश्चित्त घेण्याची संधी मिळावी, अशी त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची विनंती आहे, हेच तो शैलाताईंचे पाय धरून सांगत होता.
एकीकडे ईशाचं सुरक्षित भवितव्य तर दुसरीकडे तिची आपल्यापासून कायमची ताटातूट, यात कशाची निवड करावी याचं उत्तर शोधण्याचा त्या प्रयत्न करत होत्या.
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈