मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शुभमंगल सावधान – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ शुभमंगल सावधान – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पहिले – रात्री सगळेजण डोक्याला हात लावून बसले होते. जवळजवळ १५ तोळे सोने, सहा लाख रुपये, अडीच लाख रुपये लग्नाचा खर्च. एवढ्याच राजूच्या आईला आपल्या दागिन्यांची आठवण झाली, काल रात्र घाई घाई तिने दागिने काढून डायनिंग टेबलावर ठेवले होते, ती टेबलावर जाऊन पाहू लागली पण ते दागिने पण नाहीसे झाले होते. आता इथून पुढे) 

चार वर्षानंतर……

राजूच्या लग्नाच्या धक्क्यातून कुटुंब हळूहळू सावरत होते. राजूची आई भांबावली होती. आपल्या काळी सहज लग्न जमत होती. त्यावेळी मुलींना हुंडा द्यावा लागत होता. पंधरा-वीस वर्षात परिस्थिती किती बदलली? राजू लग्नाचे नाव घेत नव्हता ‘शुभमंगलं सावधान’ कुठे ऐकू आले तरी तो दचकत होता.

राजू ने बांबू लागवड केली, आंब्याची कलमे होतीच, नारळीची पण शंभर झाडे होती, तो आंबा कलमे करारावर घेत होता, टेम्पो भरून बेळगावच्या मार्केटात पाठवत होता. पैसे येत होते पण हे सर्व सांभाळायचे कोणी? असा प्रश्न राजूच्या आई-वडिलांना पडला होता.

मार्गशीर्ष महिना आला. राजूची आई गुरुवारचा उपास धरायची. लक्ष्मीचे व्रत करायची. एका गुरुवारी त्यांच्या दारात मोटरसायकल थांबली, तिने पाहिले, शेतकी मदतनीस माने गाडीवरून उतरत होते, त्यांच्या पाठीमागे एक २७- २८ वर्षाची युवती उतरत होती. माने या घरात नेहमी येणारे. या भागात येणे झाले की नेहमी राजूच्या घरी येणारे. माने घरात येता येतात ओरडून म्हणाले  ” काय म्हातारे बरी आहेस ना?’

“होय बाबानू, खूप दिवसांनी इलात, ही कोण बरोबर?’.

म्हातारे माझी आता बदली झाली, नोकरीची दोन वर्ष शिल्लक राहिली, कोकणात इतकी वर्षे काढली आता जातो गावाकडे, ही तुमच्या भागातील नवीन शेती मदतनीस. पूजा साळवी हिचे नाव. खेडच्या बाजूची आहे. ती माझ्या जागेवर पंधरा दिवसांपूर्वी रुजू झाली. तिची ओळख करून द्यायला आलो. ‘

“बसा हो, पेज वाढतंय, ही बाई पेज घेतली मा?”

‘ हो ना घेते मी पेज, पण तुम्हाला उगाच त्रास….’

“त्रास कसलो गो, आमच्या बागेत दहा जण काम करतात, सगळ्यांका पेज करूचच आसता. येवा, आत येवा.’.

राजूची आई आत गेली, तिने दोन पातेल्यात पेज आणि कुळथाची पिठी आणून ठेवली. मानेने आणि पूजाने हात धुतले आणि पेज घ्यायला बसले. पेज घेतल्यानंतर माने म्हणाले ” चला बाई तुम्हाला राजूची आंब्याची बाग दाखवतो ‘. मानेंच्या गाडीवर बसून पूजा राजूच्या आंबा बागेकडे गेली. राजूच्या बागेत कलमांना लहान लहान फळ आली होती. त्यावर फवारणी सुरू होती. पूजाने एवढी व्यवस्थित बाग क्वचितच पाहिली होती. ४०० आंब्याच्या कलमानंतर पुढे ओढा होता. ओढ्याचे पाणी वाहत होते.  पुढे ओढ्यावर बंधारा घातला होता. पाच चे दोन पंप लावले होते. त्या पंपाने नारळीच्या बागेत पाणी घेतले होते. त्याच्या पुढील दहा एकर वारकस जमिनीवर बांबू लावला होता. राजू पूजाला आणि मानेना सर्व बाग दाखवत होता. पूजा ने राजू ला विचारले  ” ही कुठली बांबूची जात आहे?”

या दहा जातीचे बांबू लावले आहेत. मिक्स प्रकार केले आहेत.’

कोकणात ‘माणगा’ ही बांबूची जात जास्त फोफावते. इथले हवामान त्याला अनुकूल आहे. कुडाळ जवळ मिलिंद पाटील नावाचा आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी आता बांबू लागवडी संबंधी माहिती देतो, माणगा ची रोपे पण मिळतात. मी तुम्हाला त्याचा नंबर देते, असं म्हणून तिने पर्स मधून मिलिंद चा फोन नंबर दिला.

“तुम्ही बांबू कोणाला देता? तुम्ही कुडाळ मध्ये “कॉर्नबॅक’ नामाची बांबूच्या वस्तू बनवणारी कंपनी आहे. त्यांचेकडे बांबूची रिक्वायरमेंट कायम असते.’ एवढ्यात राजूच्या आईचा फोन आला .”माने आणि पूजा दोघांना घरी जेवूक पाठव ‘म्हणून. माने आणि पूजा पुन्हा राजूच्या घरी आली. आईने त्यांना गरमागरम वरण भात, कैरीचे लोणचे, मुळ्याची भाजी  वाढली. माने आणि पूजा व्यवस्थित जेवली. जेवता जेवता आईने पूजाला विचारले ” घरी कोण कोण असतं ग तुझ्या पूजा?’

पूजा गप्प झाली. मानेंनी आईला विचारू नका असा इशारा केला. आई गप्प झाली. जेवण झाल्यावर पूजाने आपले ताट उचलले तसेच मानेंचे पण ताट उचलले आणि मोरीत धुवायला गेली. “अगो, ठेव ती ताटं,’ म्हणेपर्यंत पूजाने दोन्ही ताटे विसळून ठेवली. राजूची आई बघतच राहिली.” हल्ली मुलींना संस्कार नाही असे म्हणतात, बघा ही संस्कारी मुलगी ‘  असं मनातल्या मनात म्हणत होत्या. जेवण झाल्यावर माने आणि पूजा गाडीवर बसून गेली. संध्याकाळ झाली. रात्र झाली तरी आईच्या डोळ्यासमोरची पूजा जाईना.

दुसऱ्या दिवशी मानेंचा आईला फोन आला ” म्हातारे, काल तू पूजाला घरी कोण कोण असतं म्हणून विचारत होतीस, तेव्हा मी तुला गप्प बसवलं तिला ते सांगणं अवघड होतं. आता मी तुला तिच्याबद्दल सांगतो  ” पूजा ही खेड जवळची. घरी आई-वडील आणि एक लहान भाऊ. हिने दापोली कृषी विद्यापीठातून बीएससी एग्रीकल्चर केलं. पण तिला लगेच नोकरी मिळाली नाही. तिच्या वडिलांनी तिचे एका ग्रामसेवकांशी लग्न लावून दिले. तिचे सासू-सासरे आणि नवरा हिला माहेरून पैसे आणण्यासाठी छळू लागले. मारझोड करू लागले. एका वर्षातच हिला एक मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून परत जास्त छळ सुरू केला. सतत छळाला कंटाळून हिने स्त्रियांसाठी धडपडणाऱ्या संस्थेकडे  तक्रार दिली. त्यांनी तिच्या घरच्यांना तंबी दिली. म्हणून सासरच्या मंडळींनी हिला जाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या तावडीतून ही सुटली आणि मुलीसह माहेरी आली. त्या संघटनेने नंतर तिच्या नवऱ्याला आणि सासूला धडा शिकवलाच, तिच्या नवऱ्याची नोकरी पण गेली. दरम्यान पूजाला कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. एक वर्ष दापोलीत नोकरी केली आणि आता या भागात तिची बदली झाली. हिची चार वर्षाची मुलगी तिच्या आई-वडिलांकडे असते. म्हातारे, ही खरोखरच गुणी मुलगी आहे. आमच्या कृषी विभागात सर्वांची लाडकी आहे.’ असं म्हणून मानेने फोन खाली ठेवला.

राजूच्या आईला चुटपुट लागून राहिली. किती गुणी मुलगी आणि तिच्या घरच्यांनी हिची काय दशा करून ठेवली. रात्री राजूचे बाबा आणि राजू जेवायला बसले तेव्हा तिने त्यांना पूजाची कहाणी सांगितली. बाबांना पण ह्या चांगल्या मुलीची ही दशा बघून वाईट वाटले. असे नराधम अजून अस्तित्वात आहेत त्यांना खरे वाटेना.

पुढे दोन महिने झाले तरी पूजा त्या गावात आली नाही. आता राजूच्या बागेत आंब्याचा सिझन सुरू झाला होता. रोज पंधरा माणसे कामाला होती. त्यांचे चहापाणी, पेज, जेवण करून राजूची आई थकत होती. आपली सून असती तर तिने ही जबाबदारी घेतली असती, असे तिच्या मनात येई. अचानक एक दिवस स्कूटर वर बसून पूजा हजर झाली. पूजाला पाहताच आईना खूप आनंद झाला  “अगो, होतंस खय इतके दिवस?’ आईने विचारले.

” दीड महिन्याचे ट्रेनिंग होतं दापोली कृषी विद्यापीठात, तिकडे अडकले होते. तुमची सर्वांची आठवण येत होती. पण त्यादिवशी घाईत कुणाचा फोन नंबर घेतला नाही ‘.

” बस बस, पेज घेतस मा?’.

” हो घेते, तुम्ही उठू नका, मी तुमचे स्वयंपाक घर त्या दिवशी पाहिले आहे.’ असं म्हणून पूजा चटकन आत गेली आणि तपेल्यातील पेज लहान भांड्यात ओतून घेतली. टेबलावर बरणीत लोणचं दिसत होतं, त्यातील दोन फोडी घेतल्या. पेज जेऊ लागली, आई तिच्या पाठोपाठ आत मध्ये आल्या होत्या. तिचं सराईतपणे घरात वावरणं त्यांना आनंद देत होतं. पेज जेवल्यानंतर पूजा म्हणाली  ” आई मी बागेत जाते यंदा आंबे कसे आहेत बागेतले ते पाहून येते.’. स्कूटरवर बसून पूजा बागेत गेली. राजू घामाने डबडबला होता. आंबे उतरवणे सुरू होते. चार झाडावर चार जण आंबे काढण्यासाठी चढले होते. टोपलीतून खाली आंबे सोडत होते आणि मोठ्या टॅंक मध्ये आंबे ठेवत होते. एक पिकप गाडी आंब्याचे टॅंक घेऊन घरी जात होती. कितीतरी वेळ पूजा काम बघत होती. राजूचे तिच्याकडे लक्ष नव्हते. तो चार ठिकाणी धावत होता. काम करून घेत होता. एवढ्यात एका कामगाराचे पूजाकडे लक्ष गेले. त्याने राजूला पूजा आल्याचे दाखवले. राजू हसत हसत तिच्याजवळ आला  ” केव्हा आलात?”

” आत्ता तुमच्या घरी पेज जेऊन आले, दीड महिना ट्रेनिंग होते दापोलीला, म्हणून इकडे येता आले नाही ‘.

“होय काय, मला वाटले आम्हाला विसरलात.’

” छे हो. कशी विसरेन. तुमच्यासारखे मेहनती बागायतदार कमी. आमच्या कृषी विभागाचे तुमच्यासारख्यांकडे लक्ष असतेच. यावर्षी कुठली खते वापरणार हे बोलायचे होते,  पण तुम्ही कामात’.

” सध्या वेळच नाही, मी आणखी सहा बागा करारावर घेतल्या आहेत, त्याचे आंबे अजून काढायचे आहेत ‘

” मग हे आंबे पाठवता कोठे?’

” सध्या तरी बेळगाव मार्केट आणि कोल्हापूर मार्केट धरलय, रोज चार पिकप धावतात. रोजच्या रोज हिशेब मिळतो.’

” सातारा मार्केटचा पण प्रयत्न करा. कोल्हापूर पेक्षा साताऱ्यात जास्त दर मिळतो असे मी ऐकले आहे ‘.

एवढ्यात आईचा फोन, तू जेवायला ये आणि पूजाला पण जेवायला घेऊन ये. राजूने मोटरसायकल काढली पूजाने आपली स्कूटर काढली आणि दोघं घरी जेवायला आली. राजूचे बाबा घरी आलेलेच होते.

“तू मासे खातास काय गो पूजा, आईने विचारले.

“हो खाते ‘. पूजा आत गेली. तिने भराभर स्वयंपाकावर नजर टाकली. ताटे वाढायला घेतली. आई बघत राहिली. वाटीत बांगड्याचे तिखले, तळलेली कोलंबी, भात आणि सोलकढी. राजू चे बाबा आणि राजू जेवायला बसले.  आई म्हणाली ” तू पण जेवायला बस ग पूजा ‘.

” नको आई आपण मग जेवू ‘. दोघं पुरुष जेवण जेवून बाहेर गेले तशी पूजाने चटकन ताटे उचलले. आणि दोन ताटे वाढायला घेतली. जेवता जेवता आई पूजाला म्हणाली ” मानेंनी फोनवर सांगितल्याने तुझ्याबद्दल, तुझ्या लग्नाबद्दल, घटस्फोटाबद्दल, तुझ्या मुलीबद्दल’. पूजाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. आई तिच्या डोळ्याकडे बघत म्हणाली” पुस ते डोळे, स्त्रियांनी खंबीरच होहूक व्हया, असल्या माणसांका धडो शिकवकच व्हयो ‘.

पूजा गप्प झाली. “परत लग्नाचो काय विचार केलंस गो पूजा?’. पूजाने मान हलवली.

क्रमश: भाग-३ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शुभमंगल सावधान – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ शुभमंगल सावधान – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

 (मागील भागात आपण पाहिले –    त्यांच्या एका नातलगाने बातमी दिली, सावंतवाडीत एक एजंट आहे. तो सिंधुदुर्गात लग्नाच्या मुली पुरवतो. त्याने जिल्ह्यात काही मुली आणून त्यांची लग्न लावून दिली आहेत. त्यांचे संसार उत्तम चालले आहेत. राजूच्या बाबांनी त्या एजंटचा फोन नंबर घेतला. आणि वेळ घेऊन सावंतवाडीला त्याच्या घरी पोहोचले. ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या आधी सात-आठ जण मुलाचे आई-वडील तेथे बसलेले होते. आता इथून पुढे )

एजंटाच्या ऑफिसात एकेक पालक आत जात होता. एका तासानंतर राजूच्या बाबांचा नंबर लागला.

एजंट – तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे आणि तो काय करतो?

राजूचे बाबा -आठ्ठावीस वर्षाचा आहे, आमची आंबा बाग आहे चारशे कलमांची.

घरी कोण कोण आहेत -मी, माझी बायको आणि हा एकच मुलगा

एजन्ट – काय असते शेतकऱ्याच्या मुलाशी मुली लग्न करायला तयार होत नाहीत. तरीपण मी प्रयत्न करतो. बुधवारी आजर्‍याला मुली आणणार आहोत. माझे कमिशन पहिल्यांदा 80 हजार रुपये द्यायचे. मगच मुली दाखवणार. तुम्ही मुलगी पसंत केल्यानंतर लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीच्या बापाला पाच लाख रुपये रोख द्यायचे. लग्न सगळं तुमच्या खर्चाने. लग्नात जास्त माणसे जमवू नका. लग्नात मुलीच्या अंगावर दहा तोळे सोने घालायचे. मुलीच्या भावाला अर्ध्या तोळ्याची अंगठी. मुलीच्या माहेरच्या माणसांसाठी १५ चांगल्या प्रतीच्या साड्या. १५ पॅन्ट शर्ट पीस. लग्नाला जी माणसे कारवार होऊ देणार त्यांच्या गाडीचा खर्च. हे सर्व कबूल असेल तर मला उद्या संध्याकाळपर्यंत कळवा. आजऱ्याला जायचं असेल तर आठ आसनी चांगली गाडी घेऊन यायची. माझ्या फोनवर काय ते उद्या संध्याकाळपर्यंत कळवा. मुलींना मागणी खूप आहे. अजून कितीतरी लोक भेटायला यायचे आहेत. काय ते कळवा.

राजूचे बाबा बाहेर पडले. एसटी पकडून गावी आले. बायकोला आणि राजूला सर्वच बातमी सांगितली. मुलींच्या अटी ऐकून राजूची आई गप्पच झाली. पण नाईलाज होता. आपल्या भागातून लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. शेवटी त्या एजंटला पैसे देण्याचे ठरले. बाबांनी दुसऱ्या दिवशी एजंटला फोन केला. त्यांनी बुधवारी सकाळी आठ वाजता आपल्या घरी सावंतवाडीत यायला सांगितले. येताना एजंटचे कमिशन 80 हजार रुपये आणि आजऱ्यला जाण्यासाठी चांगली इनोवा गाडी आणण्यास सांगितले. राजूला हे सर्व पसंत नव्हते. तो असल्या भानगडी नकोच म्हणत होता. परंतु राजूच्या आईने जोर धरला.’ एकदा लग्न होऊ दे ‘असा तिचा आग्रह होता.

रविवारी गावातील एक आठ आसनी गाडी भाड्याने घेऊन तिघेजण सावंतवाडीत आले. एजंट ला ८0 हजार रुपये दिले आणि सोबत दोन लग्नाचे मुलगे आणि त्यांचे आई-वडिलांसह आजऱ्याला रवाना झाले. आजऱ्याला एका दुसऱ्या एजंटच्या घरात कारवार होऊन दोन मुली आणि त्यांचे वडील आले होते. तेथेच मुली दाखवल्या गेल्या. मुली मात्र दिसायला छान होत्या. पण भाषा कन्नड. राजूच्या घरच्यांना कन्नड येत नव्हते आणि त्या मंडळींना मराठी येत नव्हते. दोन मुलींपैकी एक मुलगी राजूच्या आईने पसंत केली. तिचे वडील आणि ते आणि हे दोन एजंट राजूच्या आई-बाबांच्या समोर बसले. लग्नाच्या आदल्या दिवशी पाच लाख मुलीच्या वडिलांना द्यायला पाहिजेत तरच मुलगी लग्नाला उभी राहील हे निक्षून सांगितले. लग्नाच्या वेळी मुलीच्या अंगावर दहा तोळ्याचे दागिने घातलेले पाहिजेत तरच मुलगी लग्नाला येईल. हे असे सांगितले त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. नाहीतर मुलीला घेऊन आम्ही माघारी येऊ अशी धमकी दिली. या सर्व अटी मान्य करून राजूचे आई-बाबा गाडीत बसले आणि एजंटला सावंतवाडीत उतरवून आपल्या घरी आले.

एकंदरीत सर्व विचार करून दोन मार्च ही लग्नाची तारीख ठरवली. लग्न राजूच्या शेजारील घराच्या दारात करायचे ठरले. एजंटला तारीख कळवली. त्यांनी एक मार्च रात्री पर्यत गावात पोहोचवण्याचे मान्य केले. राजूच्या बाबांनी दहा तोळ्याचे दागिने करायला दिले. मुलीच्या भावासाठी अर्ध्या तोळ्याची अंगठी करायला दिली. कणकवली जाऊन  “मालू क्लोथं ‘ मधून साड्या तसेच पॅन्ट पीस शर्ट पीस खरेदी केले. घराची रंगरंगोटी केली. जास्त लोकांना आमंत्रण दिले नाही. फक्त जवळच्या माणसांना आणि जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिले.

कारवारहुन मुलीकडची माणसे, दोन्ही एजंट, सायंकाळी सात वाजता हजर झाले. एजंटनी आल्या आल्या राजूच्या वडिलांकडून पाच लाख रुपये रोख मोजून घेतले. मुलीचे दागिने ताब्यात घेतले. कपडेलत्ते ताब्यात घेतले.

रात्री हळदी कार्यक्रम झाला. सर्वांनी कौतुकाने राजुला हळद लावली. हळदीची गाणी म्हटली डान्स केले. लाऊड स्पीकर मोठ्यामोठ्याने हळदीची गाणी म्हणत होता.

दोन मार्चला लग्न लागले. मुलीच्या अंगावर दहा तोळ्याचे दागिने दिसत होते. गावातील भटजींनी लग्न लावले. मग इतर लग्नाचे विधी  आणि सर्वांसाठी जेवण. खास देवगडहून आचारी बोलावले होते. मग देवळापर्यंत वरात, वरातीत नाचणे, बेंजो, फटाके वाजले.

राजू ची बायको घरात आली ती एक सारखी कन्नड मधून मोबाईल वर बोलत होती. सर्वांना वाटत होते आपल्या गावातील जवळच्या माणसांशी बोलत असेल. राजूच्या घरी पुन्हा रात्री माटाव जेवण. यावेळी खारे जेवण. बकरा मटन, चिकन, रस्सा, भात आणि भाकरी आणि तरुण मंडळी साठी बाटल्यांची खास सोय. रात्री अकरा पर्यंत जेवणाची धामधूम सुरू होती.  

हळूहळू सकाळ पासून दमलेले शेजारी, नातेवाईक आपापल्या घरी गेले, लाऊड स्पीकर बंद झाला. दोन दिवस धामधूम झाल्याने लोकांना झोप येत होती. लाईटी बंद केल्या गेल्या.

राजू रात्री बारा वाजता खोलीत गेला तेव्हा त्याची बायको कॉटवर गाढ झोपी गेली होती. सकाळी लग्नात घातलेले दागिने तसेच अंगावर होते. राजू ने चटई आणि चादर घेतली  आणि तो खाली जमिनीवर झोपला.

दोन रात्री झोप न मिळाल्याने सर्वजण गाढ झोपी गेले. सगळीकडे शांतता. सकाळी सहा वाजता राजूची आई जागी झाली. बाहेर ओट्यावर आली  तर घराच्या पुढच्या दाराची कडी काढलेली दिसत होती. तिला आठवले रात्री तिनेच दाराची कडी लावली होती. मग दार कोणी उघडले? हे तिच्या लक्षात येईना. काल रात्री मुक्कामास राहिलेले पाहुणे अजून झोपेत होते,, राजू आपल्या खोलीत होता, मग दार उघडे कसे? दाराची कडी कोणी काढली?

एवढ्यात खोलीतून राजू बाहेर आला. आईने त्याला पुढचे दार उघडे असल्याचे सांगितले. राजू ने परत खात्री केली, सर्वजण झोपेत होते. मग तो आपल्या खोलीत गेला तर काल लग्न केलेली त्याची बायको कॉटवर नव्हती. तिची कपड्यांची बॅग पण दिसत नव्हती. राजूला वाटले परसात कुठेतरी गेली असेल. त्यानी परसात शोधले. विहिरीजवळ पाहिले. ती कुठेच दिसेना. त्याने आईला तसे सांगितले. आईने पुन्हा त्याच्या खोलीत येऊन पहिले, तिची बॅग जागेवर नव्हती. एवढ्या शेजारची माई त्यांच्याकडे आली  “राजूच्या आई, काल रात्री चार वाजता मी बाहेर इल्लाय तर तुमच्या घरासमोर तीच कारवारची गाडी उभी होती आणि तुमच्या घरातून कोण त्या गाडीत बसलेला काय गे?’.

राजूच्या आईच्या काळजात धस झाले. म्हणजे काल लग्न केलेली नवरी रात्री पळाली की काय? तिने नवऱ्याला उठवले. राजूचे बाबा  हडबडून उठले, झोपलेले सर्व नातेवाईक उठले. पुन्हा एकदा परस, विहीर, शेजारी पाजारी शोधले. सावंतवाडीच्या एजंटना फोन लावले. तेव्हा ते फोन उचलत नव्हते. मग एका नातेवाईकाच्या फोनवरून त्यांना फोन लावला, तेव्हा त्यांनी फोन उचलला, त्यांनी हात झटकले ” लग्न लावून मुलगी तुमच्या घरात येईपर्यंत माझी जबाबदारी आता मुलगी नाहीशी झाली ती तुमच्या घरातून. माझी जबाबदारी नाही ‘. राजूच्या बाबांनी डोक्याला हात लावला. राजूची आई मावशी रडायला बसल्या. राजू चा चेहरा पडला. आई रडते हे पाहून तो पुन्हा रडायला लागला.  कुणीतरी म्हणाले पोलीस कम्प्लेंट करा. राजूच्या बाबांनी पोलिसात तक्रार दिली. काल लग्नात कोणीतरी मोबाईलवर काढलेले तिचे फोटो दाखवले. पोलीस इन्स्पेक्टर ला काहीतरी शंका आली. त्याने एक फाईल बाहेर काढली. फोटो पडताळून पाहिले. “अहो, या मुलीने आपल्याच तालुक्यात दोन वेळा दोन मुलांबरोबर लग्न केले आहे. हे पहा त्या लग्नातील फोटो. ती मंडळी लग्नात घातलेले दागिने आणि पैसे घेऊन पोबारा करतात. आम्ही त्या एजंटची पण चौकशी केली होती. ते म्हणतात, आम्हाला कर्नाटकचे एजंट येऊन फोटो देतात ते आम्ही आमच्या भागात दाखवतो. आम्ही त्या मुलींना किंवा त्यांच्या आई-वडिलांना ओळखत नाही. त्यामुळे तो तपास इथेच थांबला ‘. तुमची तक्रार येथे नोंदवा तसेच किती दागिने घेऊन ती मंडळी पळाली ते पण लिहा. चौकशी करतो’.

राजूच्या बाबांनी डोक्याला हात लावला. पोलिसांनी मग त्या गाडीचा तपास केला, ती गाडी हलकर्णी भागातील भाड्याने घेतलेली गाडी होती. ती गाडी त्या मंडळींनी आंबोली जवळ पैसे देऊन सोडली,’.

रात्री सगळेजण डोक्याला हात लावून बसले होते. जवळजवळ १५ तोळे सोने, सहा लाख रुपये, अडीच लाख रुपये लग्नाचा खर्च. एवढ्याच राजूच्या आईला आपल्या दागिन्यांची आठवण झाली, काल रात्र घाई घाई तिने दागिने काढून डायनिंग टेबलावर ठेवले होते, ती टेबलावर जाऊन पाहू लागली पण ते दागिने पण नाहीसे झाले होते.

क्रमश: भाग-२ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शुभमंगल सावधान – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ शुभमंगल सावधान – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

राजूच्या आईला संध्याकाळी पेपर वाचायची सवय. त्यांच्या जिल्ह्यातील पेपर यायचा सकाळी पण घरच्या व्यापात तिला पेपरात डोकं घालायला वेळ मिळायचा नाही. तशी ती सातवी शिकलेली, त्यामुळे तिला मराठी वाचन चांगले यायचे. सकाळी पेपर आला की राजाचे बाबा  पहिल्यांदा पेपर वाचायचे. त्यांना तसा राजकारणात इंटरेस्ट, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सर्व राजकारण ते वाचायचे. राजू दुपारी आला की पेपर वाचायचा. राजूच्या आईचे पेपर वाचता वाचता एका बातमीकडे लक्ष गेले, कुडाळ आज त्यांच्या जातीचा वधू-वरांचा मेळावा होता. जिल्ह्यातील पुढारी मंडळींनी हा मेळावा ठेवला होता. इतर काही काही कार्यक्रम होते पण मुख्य कार्यक्रम हाच होता.

राजूच्या आईच्या मनात कितीतरी दिवस मनात होतो आता राजू २७ वर्षाचा झाला, त्याचे दोनाचे चार हात करायला हवेत. आपणच या विषयावर घरात बोलायला हवे, नाहीतर बापलेक काही बोलायचे नाहीत. आपला राजू कमी बोलणारा, मुलींच्या मागे मागे फिरणारा नव्हे.

“तिने राजूच्या बाबांना हाक मारली  ” अहो ही बातमी बघितलीत, समाजाचो मिळावो आसा कुडाळाक, वधू आणि वर दोघांचा  बोलावल्यानी, राजू साठी बघू होय आता ‘ ” पण राजू काय म्हणावतो लग्नाबद्दल ‘.

” तो कसो म्हणतंलो? आपण मोठ्यानी आता बोलाक व्हया ‘

” पण तेका विचार रात्री, तेच्या मनात कोण आसात तर, नायतर खय ठरवल्यानं तर’     ” तो काय ठरवतलो? खयच्या मुलीकडे मान वर करून बोलाचो नाय कधी ‘.

“तरीपण इचार तेका.’

रात्री राजाच्या आईने राजाला विचारले.”राजू, आपल्या समाजाचो मिळावो आसा कुडाळाक, त्याच्याबरोबर वधू आणि वरांचा पण  मिळावो आसा. तुझा नाव देऊया मेळाव्यात, आता तुझा २७ वर्षा वय झाला. खयतरी बघुक व्हयचं आता ‘.

राजा गप्प बसला.

” तुझ्या मनात कोण असेल तर सांग.’ 

” नाय तस कोणी नाय ‘.

“मग नाव नोंदवूक सांगू बाबांका ‘?    

“हा, म्हणत राजू जेवू लागला. राजूच्या आईने राजूच्या बाबांना हाक मारून सांगितले,     ” ऐकलात हो, राजू म्हणता रविवारी कुडाळाक जाऊ या ‘.

“बरा, मी फोन करून नाव नोंदवातंय ‘ बाबा म्हणाले. राजूच्या बाबांनी मेळाव्याच्या आयोजकांना फोन करून राजूचे नाव दिले.

रविवार 12 जानेवारी

रविवारी १२ जानेवारी रोजी कुडाळच्या मंगलमूर्ती हॉलमध्ये समाजाचा मेळावा भरला होता. राजू आणि राजूचे आई वडील सकाळी नऊ वाजताच हॉलमध्ये हजर होते. आज समाजातील आजूबाजूची लोकसुद्धा बरीच हजर होती. साडेनऊला कार्यक्रम सुरू झाला. पहिल्यांदा प्रास्ताविक, समाजाची माहिती वगैरे. मग आमदारांच्या मागे  समाजाने उभे राहिले पाहिजे, अशा तऱ्हेची नेहमीसारखी भाषणे. मग चहापाणी झाली आणि मग मुख्य कार्यक्रम सुरू झाला.

पहिल्यांदा वरांची ओळख सुरू झाली. आयोजक एक एक वराचे नाव पुकारत होते. प्रत्येक वर आपली ओळख करून देत होता. मुलीबद्दलच्या अपेक्षा सांगत होता. असे करत करत ३३ मुलांनी आपली ओळख करून दिली. मग दुपारचे जेवण झाले आणि मग मुलींची ओळख सुरू झाली. आयोजकांचे म्हणणे फक्त दोन मुलींनीच नाव दिलेले आहे. त्यांची ओळख सुरू झाली.

पहिली मुलगी –‘माझे नाव विशाखा. शिक्षण बीए. थोडे थोडे टायपिंग येते. घरी एक भाऊ, वडिलांची थोडी शेती. दहा आंब्याची कलमे….’

मग आयोजकांनी नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा विचारल्या.

विशाखा अपेक्षा सांगू लागली “सरकारी नोकरी, घरात कमीत कमी माणसे, नवऱ्याचे शहरात वास्तव्य, नवऱ्याची स्वतःची गाडी.’

आयोजकांनी दुसऱ्या मुलीचे नाव पुकारले.

नाव सोनाली- वडील बस कंडक्टर, आई अंगणवाडी शिक्षिका. शिक्षण बारावी पास.

मग आयोजकांनी तिच्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा विचारल्या. सोनाली अपेक्षा सांगू लागली ” मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर. शहरात स्वतःची जागा. चार चाकी गाडी.’

दोनच मुलींनी नाव नोंदवले होते, आयोजकांनी कोणी आयत्यावेळी नाव द्यायचे असेल तर द्या असे कळवूनही कोणीही मुली पुढे आली नाही.

राजूची आई आ वासून बसली होती. वधू वर मेळाव्यासाठी 32 मुलगे आणि फक्त २ मुली. खेड्यात राहणाऱ्या या मुलींची अपेक्षा काय ” सरकारी नोकरी, घरात जास्त माणसे नकोत. त्या दुसऱ्या कंडक्टरच्या मुलीची अपेक्षा  ” नवरा इंजिनियर किंवा डॉक्टर, शहरात स्वतःच घर.’

राजूची आई मनातल्या मनात असल्या मुलींना शिव्या देत होती “आपला  तोंड तरी बगा गो एकदा आरश्यात, धड नाक नाय डोळो, बारावी पास आणि बी.ए.  शिक्शन, अंगात कसली कला नाय, दोन पैसे मिळविण्याची अक्कल नाय आणि नवरो इंजिनीर आणि डॉक्टर होयो? अगो, इतक्या शिक्षण घेतलेले नवरे तुमच्याबरोबर कीत्या लगीन करतीत? तेंका नोकरीं करणारी मुलगी गावातली नाय काय? आमच्या काळात आमचे आईवडील दाखवितीत तेचाशी आमी लगीन करू फक्त धड धाकट नवरो आणि एकत्र कुटुंब बगला कीं काळजी वाटा नाय, अडी अडचणीक कुटुंब होया आसता, तुमका सासू सासरे नको, दीर नणंद नको. असली भूतां माझ्या झिलाक नकोच. ‘

राजू आणि त्याचे आई-बाबा घरी आले. मुलींच्या एवढ्या अपेक्षा असतील हे राजूला माहीतच नव्हते, असे असेल तर आपल्यासारख्या शेती बागायती करणाऱ्या मुलाला मुलगी मिळणे किती अशक्य आहे हे त्याला कळले. सध्या समाजात लग्नाच्या मुली नाही की काय असाही त्याला प्रश्न पडला. आपली ४०० आंब्याची कलमे, शंभराच्या वर नारळीची झाडे, गाई म्हशी, त्यांचे दूध काढणे, घरातले रोजचे जेवण तसेच गडी माणसांची रोजची जेवणे. एवढे सर्व आपली आई  विना तक्रार किती वर्षे करते. आणि या सध्याच्या मुली? यांना शहरातला डॉक्टर इंजिनियर नाहीतर सरकारी अधिकारी हवा. कसे व्हावे आपले लग्न?

राजूचे बाबा राजू च्या आईला म्हणाले ” बघितलस काय परिस्थिती आसा? समाजात आधी मुली कमी. लोका मुलींका जन्मच देणत नाय, कसला तरी यात मशीन इल्ला मागे, त्यात कळा मुलगी काय मुलगो? मुलगी दिसली काय पाडुन टाकायचा, तेचो हो परिणाम, ह्याच्यात डॉक्टर लोकांनी पैसे मिळविल्यानी.’

राजूची आई म्हणाली ” तेंका जाऊदे, मी माझ्या भावाशीक विचारतंय, माझ्या भावाशीच चेडू आसा हेमा लग्नाचा, माझो भाऊस तसो नाय म्हणाचो नाय. हेमा तसा कामाचा पण आसा. ‘

“मग तूझ्या दादाक विचार राजू साठी हेमा देतास काय.’

दुसऱ्या दिवशी राजूची आई बांदा एसटीत बसली आणि ओटावण्याला भावाकडे आली. तिला अचानक आलेली पाहून भावाला खूप आनंद झाला “अगो, अचानक कसा इलंस, कळविलंस पण नाय ‘ भाऊ म्हणाला. एवढ्यात वहिनी पण बाहेर आली  ” अचानक इलास वन्सनू,जेवण करतय, आत मधीचं यावा.’

वहिनीने पाणी दिलं चहा दिला, ” सगळी घरची बरी आसात मा, राजू काय म्हणता?’

‘बरो आसा, तेच्या लग्नाचा बघतय ‘

“होय काय, बघलंस खय काय?’

“मुलींचे नखरे काय कमी? हेमाचा बघलंस नाय अजून, तेचि पण पंचवीस झाली मा?’.

‘बघुक’

” बघुक व्हया,’

“गे वैनी, हेमाक विचारूक इललैय मी राजू साठी ‘.

“कोण राजू साठी? काय आसता वन्स, आमी गावात लगीन करून इलाव, आयुष्यभर हाल काढलव, ह्या घर सांभाळून आता म्हातारी झालाव, शहरांतली माणसा घराक कुलूप लावून जग फिरतात, आमी आयुष्यभर हायसार, इतक्या करून गाठीक नाय दोन पैसे, त्यामुळे मी ठरवलंय हेमांक नोकरीवालोच आणि शहरातलोच नवरो बघायचो, ह्या गावात आसा काय? आंबे लागले तर पैसे आणि तेका मेहनत किती? नोकरीवल्या सारखो एक तारखेला पगार नायतर पेन्शन थोडीच गावातली. तेव्हा राजूक दुसरी मुलगी बघूया, मी बघतय. माझे ओळखी असात, तुमी काळजी करू नकात.’

“बरा तर, मी निघताय,’

“असा काय जेऊन जावा ना, किती दिवसांनी इलात ‘

“नाय गे, घराकडे कोण आसा? कामाक माणसा एलीत,’ असं म्हणून राजूची आई बाहेर पडलीच. भाऊ बाहेर गेला होता. तो तेवढ्यात घरी आला “

‘अग तू खय चाल्लं, जेऊन जा ‘असा आग्रह करत होता, पण त्याला न जुमानता ती बाहेर पडलीच, परत देवगड गाडी पकडून गावी आली. घरी पोहोचताच तिने सर्व बातमी राजूच्या बाबांना सांगितली. “मुलीपेक्षा मुलींच्या आई चो जास्त प्रॉब्लेम आसा, सगळ्यांका शहरा हवी, गावातली कामा नको ‘. माझ्या भावाक आणि भावजयक सुद्धा मुलगी शहरात देवची आसा ‘.

मग राजूच्या बाबांनी मुलगी बघण्याची मोहीमच काढली. अनेक ओळखीच्यांना आणि नातेवाईकांना जाऊन लग्नासाठी भेटले. सर्वजण हो हो म्हणत होते, पण कोणी स्थळ आणत नव्हते. असेच एक वर्ष गेले.

त्यांच्या एका नातलगाने बातमी दिली, सावंतवाडीत एक एजंट आहे. तो सिंधुदुर्गात लग्नाच्या मुली पुरवतो. त्याने जिल्ह्यात काही मुली आणून त्यांची लग्न लावून दिली आहेत. त्यांचे संसार उत्तम चालले आहेत. राजूच्या बाबांनी त्या एजंटचा फोन नंबर घेतला. आणि वेळ घेऊन सावंतवाडीला त्याच्या घरी पोहोचले. ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या आधी सात-आठ जण मुलाचे आई-वडील तेथे बसलेले होते.

क्रमश: भाग-१

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग ३ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग ३ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

डॉ सुधा ओम ढींगरा

(मागील भागात आपण पहिले – ज्या दिवशी त्याला मुंबईला आय. आय. टी. ला प्रवेश मिळाला, त्या दिवशी तो, आमोद, पप्पा खूप खूश होते. तो पतियाळातील लोकांशी बोलू इच्छित होता. आजी-आजोबांना सांगू इच्छित होता की त्याला आय. आय. टी. ला प्रवेश मिळालाय. पण त्याला पप्पांचं बोलणं आठवलं. ‘आपल्या पायावर उभं राहून तू आपले निर्णय घेशील आणि निवड करशील, तेव्हा तुला कुणीच काही म्हणणार नाही. सगळं विश्व तेव्हा तुझं असेल!’ हा विचार करून तो गप्प बसला. आता इथून पुढे)

त्या दिवशी आकाशात खूप विजा चमकत होत्या. वीज आजोळच्याच घरावर पडली. आजोबा आणि मामाने दिवाळं काढलं होतं. त्यांचं सारं काही संपलं होतं. पप्पा धम्मकन कोचावर बसले. तो आणि आमोद पप्पांकडे धावले. त्यांना भीती वाटत होती, पप्पांना काही होणार तर नाही ना?

सगळं काही लुटलं गेलं होतं. तरीही पप्पा, मम्मीला काहीच बोलले नाहीत. बस्स! मम्मीबरोबर जे काही थोडं-फार बोलणं होत असे, तेही बंद झालं. तसे दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमधूनच झोपत असत.

तो आय. आय. टी. ला मुंबईला गेला, तर आमोद आय. आय. टी.साठी हैद्राबादला. त्यांची फी, इतर खर्च यांची व्यवस्था पप्पांनी कुठून कशी केली, हे मम्मीनं विचारलं नाही,  पप्पांनी सांगितलं नाही.

     तो गाडीत चढत होता, तेव्हा पप्पा म्हणाले, ‘तू नेहमी विचारायचास, पप्पा तुम्ही आईला काहीच का बोलत नाही? तू माझ्यावर नाराजसुद्धा व्हायचास. बेटा, सुगंधा माझ्या तीन मुलांची आई आहे. तुमची आई आहे. आपल्या मुलांच्या आईला मी कसं काही बोलणार? तुमच्या  आईने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर इतके खोटे-नाटे आरोप केले की इच्छा असती, तर मी घटस्फोट घेऊ शकलो असतो, पण तुम्ही तिघे आमच्या भांडणात भटकला असतात. तुला तुझ्या आजोळचे लोक माहीतच आहेत. मला कळलं होतं, त्यांची नजर आपल्या हिश्श्यावर आहे आणि सुगंधा त्यांच्या कारस्थानाला बळी पडली. मला खूप वर्षांनंतर कळलं की वाटणी झाल्यानंतर तुझ्या मम्मीच्या वडलांनी माझी बदली इथे दिल्लीला करवली. तुला माहीतच आहे, राजकीय क्षेत्रात ते मोठे पॉवरफुल होते. मला माझ्या कुटुंबापासून तोडूनच ते हे सगळं करू शकत होते. बाबांनी एक गोष्ट चांगली केली की त्यांनी जमिनीची वाटणी नाही केली. ती तेवढी वाचली.’

     ‘पण आपण स्वत: आजी- आजोबांना भेटू शकला असतात. फोनवरून बोलू शकला असतात. .’

     बेटा, मी तसं केलं असतं, तर रोज त्यांना शिवीगाळ झाली असती. नवनवीन दोष लावले गेले असते. मग आईच म्हणाली, ‘आमच्यापासून तुटून बाजूला हो आणि आपल्या परिवाराशी जोडून घे. आपल्या मुलांना मोठं कर. त्यांना चांगला माणूस बनव. आम्ही जीवंत राहिलो, तर ती आम्हाला जरूर भेटतील. ज्या वृक्षाची मुळं मजबूत असतात, त्या वृक्षाचा तणा   कधीही सुकत नाही. मजबूत असतो तो. बेशक, अनेक वर्षांनी त्याच्याकडे या. अनेक वर्षांपूर्वी सुटलेली तीच सावली, तीच स्निग्धता मिळेल. विचार केला, तर कधी उशीर होत नाही. … बस! धैर्य धर!‘ मी तेच केलं.’

     ‘पण सगळ्यांपासून तुटूनही घरातलं वातावरण चांगलं कुठे राहीलं होतं?’ मी उदास नजरेने पप्पांकडे पाहीलं.

     ‘ मी माझ्याकडून खूप प्रयत्न केला.’ त्यांच्या शब्दात विवशता होती.

     ‘ पहिली दहा वर्षे आपली चांगली गेली. आपली साथ होती. नाही तर ज्या वातावरणात आम्ही वाढत होतो, तिथे काहीही होऊ शकलं असतं!’, असं म्हणत तो आणखी उदास झाला. त्याच मूडमध्ये त्याने विचारले, ’ पप्पा, मम्मी इतकी कशी बदलली?’

     ‘बेटा, आज दिसणारी सुगंधाच खरी सुगंधा आहे. पतियाळाच्या वातावरणात  तिने स्वत:ला ढाळून घेतलं होतं. वातावरणाचा किती परिणाम होतो, हे तू आपल्याच घरापासून शिकू शकतोस.’ 

     पप्पांच्या बरोबार स्टेशनवर झालेलं बोलणं, एखाद्या टॉर्चप्रमाणे त्याने आपल्याजवळ बाळगलं होतं.

     आय. आय. टी. मधे असताना, अनेक वेळा पतियाळाला फोन करण्याची त्याला इच्छा झाली, पण लाज, शरम त्याचे हात थांबवत होती. मम्मीच्या वागण्याचं त्याला गिल्टी फील  येत होतं. कुणी तरी बनेन, मगच फोन करेन. तेव्हा मम्मी काहीच बोलू शकणार नाही. तेव्हा विकल्प आणि निवड त्याची असेल. दुसर्‍या कुणाची नाही, त्याने ठरवलं.

     फोनच्या रिंगने स्मृतींची शृंखला तुटली. पप्पांचा फोन आहे. ‘ हॅलो पप्पा…’

     ‘बेटा, तू रोज फोन करतोस. सुगंधा शेजारीच असते. तू काही बोलू शकत नाहीस. काही खास आहे?’

     ‘ हं! जे काम आपण करू शकला नाहीत, ते करायला मी निघालो आहे. आत्या इथेच, मी रहातो, त्या शहरात आपल्या मुलाकडे रहायला आली आहे. तिचा मुलगा या शहरात आहे, हे मला माहीतच नव्हतं. त्याने मला शोधून काढलं. आजोबा- आजी पण आले आहेत. त्यांच्या घरासमोरच मी कारमध्ये बसलोय. भेटायला चाललोय.’ 

     ‘काजलच्या मुलाला माहीत होतं का, की तो तुझ्या शहरात आहे किंवा तू त्याच्या श्हरात आहेस आणि त्याने तुला शोधून काढलं. उगीच काही तरी बोलतोस झालं! चेष्टा करू नकोस!’ नवनीत भुल्लर नाराज होत म्हणाले.

     ‘पप्पा, नाराज होऊ नका. या देशात येऊन मी पहिला फोन पतियाळाला केला होता. रिंग वाजत राहिली. कुणी फोन उचलला नाही. जेव्हा जेव्हा लहानपणच्या आठवणी यायच्या, तेव्हा तेव्हा मी पतियाळाला फोन लावायचो, पण पदरी निराशाच यायची. मग मला वाटलं, की त्या घरात आता कोणीच रहात नाही किंवा मग नंबर बदललाय. मग कुणी तरी माझा मिस्ड कॉल बघून म्हणालं, ‘कुणी मार्केटिंगवाले फोन करताहेत.’ काजल आत्याचा मुलगा अंकीत त्यावेळी तिथे होता. तो नंबर पाहून म्हणाला, हा माझ्या शहराचा नंबर आहे. कदाचित नंदी शिकागोत असेल.’

     अंकित इथे येणारच होता. सगळेच मग मला भेटण्यासाठी इथे आले आहेत. आपल्याला माहीतच आहे, आजोबा- आजीला फोन करणं मुळीच आवडत नाही. सरळ गळामिठी घालायची, हीच त्यांची पहिली आणि शेवटची पसंती आहे. बस! आले भेटायला!’

     हे ऐकताच दुसरीकडे एकदम शांतता पासरली. त्याला जाणवतय , दुसर्‍या बाजूने डोळे काही बोलताहेत. दीर्घ श्वास सोडल्याच्या आवाजाबरोबरच हुंदक्याचाही आवाज आला.

     पप्पांचा धीर-गंभीर आवाज त्याला ऐकू आला, ‘ आई खरं बोलली होती. ती म्हणाली होती, विचार केला, तर कधी उशीर होत नाही.‘ आणि फोन बंद झाला.

     आनंद कारमधून बाहेर पडला आणि कार लॉक करून, त्या घराच्या दिशेने पुढे

निघाला. त्या घरच्या दरवाजाआड अनेक डोळ्यांच्या जोड्या प्रतिक्षारत आहेत आणि घराकडे पावले टाकत जाताना आनंद हळू हळू नंदी होऊ लागलाय. 

 

 – समाप्त –

मूळ हिंदी  कथा 👉 ‘कभी देर नहीं होती…’- मूळ लेखिका – सुधा ओम ढींगरा

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

डॉ सुधा ओम ढींगरा

3     जीवनरंग —

“ नंदू आणि आनंद….. “  ( अनुवादित कथा )–       भाग दुसरा

हिंदी कथालेखिका : सुधा धिंगरा.

मराठी अनुवाद : उज्ज्वला केळकर

 

नंदू आणि आनंद ( अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग २

(मागील भागात आपण पहिले – वयाची दहा वर्षे होईपर्यंत त्याने आपल्या मम्मीचं अतिशय सुंदर रूप पाहिलं होतं. नंतर त्याने जे पाहिलं, त्यामुळे तो घाबरूनच गेला. आता इथून पुढे)

दहा वर्षापर्यंत तो एकत्र कुटुंबात वाढला. मोठा झाला. आजोबा- आजी, काका-काकी, आत्या सगळी घरात होती. तो तेव्हा सगळ्यांचा नंदी होता. सगळ्यांच्या कडे-ख्ंद्यावर चढून उड्या मारत, त्याचं बालपण सरलं. आजी-आजोबांच्या प्रेमाने भरलेल्या, खेळकर जीवनातील पहिली दहा वर्षे, विसरायची म्हंटली, तरी तो विसरू शकणार नाही.

त्याने घरात फक्त प्रेम आणि आपलेपणा, जिव्हाळाच पाहिला. नोकरांबरोबर देखील इथे मित्रांसारखीच वागणूक असायची. सागळा परिवारच गोड आणि प्रेमाने बोलणारा होता. तिरस्कार काय असतो, ते त्याला मुळीच माहीत नव्हतं, पण या परिवाराला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक?

आत्याचं लग्न झालं आणि लग्नानंतर सगळंच बदललं. आत्याचं लग्न झाल्यावर आजोबांनी आपली सारी संपत्ती तीन हिश्श्यात वाटली. दुर्दैवाने त्याच्या पप्पांची बदली त्याच वेळी दिल्लीला झाली. दुर्दैव अशासाठी की दिल्लीला आल्यावर घरातलं सुख, चैन संपलं.

दिल्लीतल्या आपल्या नवीन घरात प्रवेश करताच, जीवनातला एक दु:खद अध्याय सुरू झाला. दिल्लीत त्याचं आजोळ होतं. त्याच्या आजोळच्या लोकांचा विचार त्याच्या गावाकडच्या लोकांपेक्षा वेगळा होता. ही गोष्ट त्याला लहानपणापासूनच कळलेली होती. एका दिलाने रहाणारे, पशू-पक्षी, निसर्ग, कुणालाच न दुखवणारे असे गावाकडचे लोक होते. आजोळचे लोक सामंती विचाराचे, समोरच्यांना भिववून, दाबून वरचष्मा दाखवणारे होते.

दिल्लीत नव्या घराची वास्तुशांत होते न होते, तोवरच मम्मीच्या मम्मीने, पप्पांकडे बघत कर्कश्य आवाजात म्हंटलं, ‘ सुगंधा तुझ्या सासर्‍याने तुमच्यावर खूप अन्याय केलाय. दहा वर्षे नवनीतची कमाई त्यांनी घेतली. तू जीव तोडून त्या सगळ्यांची सेवा केलीस आणि आता इस्टेटीची वाटणी करायची वेळ आली, तर सगळ्यांना एका तराजूत तोललय. मुलीचं लग्न इतकं थाटा-माटात, वाजत- गाजत केलं, तर तिला इस्टेटीतला वाटा द्यायची काय गरज होती?’

पप्पांनी त्या कर्कश्य आवाजाला मधुर आवाजात उत्तर दिलं, ‘ मम्मी, केवळ माझीच नाही, तर माझी आत्या, भाऊ, वाहिनी, बहीण सगळ्यांचाच पगार घरात खर्च होत होता आणि लग्नाचं म्हणत असाल, तर आम्हा सगळ्यांचंच लग्न थाटा-माटात, वाजत- गाजत झालं होतं. केवळ काजलच्या लग्नाचाच विचार कशाला करायचा? जितका आमचा हक्क इस्टेटीवर आहे, तेवढाच तिचाही आहे. ’

‘मोठ्या मुलाचा हक्क नेहमीच इतरांपेक्षा जास्त असतो.. ’ आजीने पुन्हा तिखटपणे मम्मीला सांगितलं.

‘आपण आपल्या मोठया मुलाला बाकीच्या दोघांपेक्षा जास्त हक्क द्याल?’ पप्पा पहिल्यांदाच तिखटपणे बोलले होते. भविष्यात कदाचित बोलणं वाढतच जाईल, असं त्यांना वाटू लागलं होतं आणि ते, ते सारं आधीपासूनच थांबवू इच्छित होते.

मम्मीचा मोठ्या आवाजात आक्रोश सुरू झाला. ते पाहून तो आणि त्याचा दोन वर्षाचा धाकटा भाऊ आमोद दोघेही घाबरले. त्यांच्या छातीत धडधड होऊ लागली. कसं दृश्य होतं ते. चारी बाजूंनी मोठमोठे आवाज. त्यांनी इतक्या मोठ्या आवाजातलं बोलणं यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. सगळे हळू आवाजात बोलायचे. त्याच्या चेहर्‍यावर घामाचे थेंब डवरले. मम्मी रडून रडून आजीला संगत होती, ‘आई, ऐकलस नं यांचं तिरकस बोलणं! कळलं ना तुला इतके दिवस मी काय काय सहन केलं असेल ते! दहा वर्षे मी तिथे कसे दिवस काढले, मलाच माहीत! आपल्या संस्कारामुळेच मी गप्प बसले आणि सारं सहन केलं. नशीब, मी आता दिल्लीला आपल्या लोकांमध्ये आलीय. ’

पप्पा आणि दोघे भाऊ हैराण होऊन उभे होते. काहीच काळात नव्हतं. हसत्या-खेळत्या परिवारात मिसळून गेलेली मम्मी हे काय बोलते आहे? आणि इतकी का रडते आहे?

या सगळ्या आवाजात फोनची रिंग वाजली. पप्पांनी फोन उचलला. गृहप्रवेशाच्या निमित्ताने पतियाळाहून आजोबांचा फोन होता.

‘बाबा, दंडवत!’ पप्पा एवढे बोलतात, न बोलतात तोवर आजीने त्यांच्या हातून फोन हिसकावून घेतला आणि आजोबांना काहीही बोलू लागली. बरळूच लागली. आजीच्या चढलेल्या आवाजाने धाकटी बहीण घाबरली आणि मम्मीच्या मांडीत डोकं खुपसून रडू लागली. आनंद आणि आमोदने बघितलं, त्यांचे पप्पा आवाक होऊन बेचैनसे उभे होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. आजीने फोन खाली ठेवला, तेव्हा पप्पा इतकंच बोलू शकले, ‘सुगंधा इतकं खोटं कशासाठी?’ त्यापेक्षा जास्त काही बोलूच शकले नाहीत ते. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता.

हे ऐकून आजोबा उभे राहिले आणि कडवट, दर्पयुक्त आवाजात म्हणाले, ‘नवनीत भुल्लर, आपण आमच्या समोर आमच्या मुलीला खोटं ठरवताय, मग पतियाळात आपल्या  सगळ्या परिवारासोबत ती एकटी होती, तेव्हा तिला कशी वागणूक मिळत असेल, आलं आमच्या लक्षात!’

आजी आखडून म्हणाली, ‘नवनीतजी, यापुढे आपण आमच्या मुलीला काही बोललात, तर आपण पतियाळात रहाल आणि सुगंधा इथे मुलांना घेऊन आमच्याजवळ राहील.’ 

पप्पा नि:स्तब्धसे उभे राहून बघत होते. दोन्ही भाऊ त्यांना जाऊन चिकटले. पप्पांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्यांना घेऊन ते बेडरूममध्ये आले. पप्पांनी त्यांना मिठीत घेतलं. त्यांच्या डोळ्यातून टपकणारे गरम अश्रू मुलांच्या डोक्यावर पडले. मुलांना काही तरी जाणवलं.

‘पप्पा, मम्मी खोटं बोलत होती. आपण काहीच का बोलला नाहीत?’ त्याने विचारले.

‘बेटा, घराचा मालक, घर बांधणाराच जर घर जाळायला निघाला, तर आग विझवण्यासाठी पाणी कसं घालणार?’

‘पप्पा, मम्मी, आजी, आजोबा आपल्याला का रागावत होते?’ आमोदने विचारलं.

‘हं… मला कळलं असतं तर… मला कळतच नव्हतं, हे काय चाललय?’ त्या रात्री ते दोघे आपल्या पप्पांजवळच झोपले. मम्मी खोलीत आलीच नाही. गृहप्रवेशानंतर घरात एकच आवाज सतत गुंजत राहिला. तो आवाज मम्मीचा होता. पप्पा जवळ जवळ गप्पच असायचे.

‘नंदी बेटा, ऊठ. शाळेला उशीर होईल. ’ पप्पांचा आवाज ऐकून मम्मी संतापाने म्हणाली, ‘तुम्ही लोक किती आडाणी आहात. कुणाचं नावसुद्धा नीट उच्चारत नाही. नावात बिघाड करण्यात मोठी मजा वाटतेय तुम्हा लोकांना! खबरदार आजपासून याला कुणी नंदी म्हंटलं तर. मी त्याचं इतकं चांगलं नाव ठेवलय, आनंद. आनंद तू पण ऐकून ठेव, जर कुणी नंदी म्हंटल्यावर तू उत्तर दिलस, तर तुलाच शिक्षा करीन!’

त्या दिवसापासून तो आनंद झाला. नंदीला त्याने आपल्या आत लपवून ठेवलं. तो दिवस आणि तो क्षण असा होता, की पहिल्यांदाच ते दोघे भाऊ भाऊ आपल्या आईला घाबरले. दहा वर्षे तिने त्यांच्यावर खूप प्रेम केलं होतं. आता त्यांच्या मम्मीचं व्यक्तिमत्वच बदलून गेलं होतं. प्रत्येक गोष्टीत राग. प्रत्येक गोष्टीत अहंकार.

‘मम्मी खूप बदललीय. ’

‘होय. बदललीय. का? कारण काही कळत नाही. ’ पप्पांनी दीर्घ श्वास घेतला. ते सतत ते क्षण आठवत त्यांची चिरफाड करायचे.

सकाळी मुलांना तयार करून पप्पा शाळेत पाठवायचे. शाळेनंतर दोघेही भाऊ बाहेर खेळत रहायचे. पप्पा घरी आले की ते घरी यायचे. आमोद या काळात याच्या खूप जवळ आला होता आणि ते दोघे पप्पाच्या. मम्मीने त्यांच्याकडे लक्ष देणं बंद केलं होतं. तशीही पहिल्यापासूनच मम्मी त्यांच्याबाबतीत निश्चिंत होती. आजोबा-आजी आणि आत्याने त्याचं पालन केलं होतं. दिल्लीत आल्यावर मम्मी जास्त करून आपली आई, बहिणी, भाऊ, वाहिनी यांच्यासोबत असायची. किटी पार्टी, मैत्रिणी, क्लब यातच आपला वेळ घालवायची. त्यांचे पप्पाच त्या तिघांना सांभाळायचे.

एक दिवस तो हट्टालाच पेटला. ‘पप्पा, मम्मी घरी नाहीये. आजोबांशी बोलायला द्या ना!’

‘नाही बोलायला देता येणार बेटा! तुमची मम्मी बाहेर जाण्यापूर्वी फोनला कुलूप लावून जाते. ‘ असं म्हणता म्हणता पप्पांना रडू आलं. तो काळ लँडलाइन फोनचा होता.

मुले मोठी होऊ लागली होती. घरातील लहान-मोठ्या गोष्टी कळू लागल्या होत्या. एक दिवस घरात पुन्हा भांडण झालं. आजोळची सारी माणसे घरात एकत्र झाली होती. त्याच्या आजोबांनी आपल्या इस्टेटीचे जे तीन हिस्से केले होते, त्यापाकी त्यांच्या हिश्श्याचे पैसे मम्मी, आजोबा आणि मामाच्या बिझनेसमध्ये घालू इच्छित होती. पप्पांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती. मम्मीने सगळी कागदपत्रे आजोबांच्या आणि मामाच्या स्वाधीन केली. मग काही दिवसांनंतर मम्मी आणि पप्पांच्या सह्याही घेतल्या गेल्या.

त्याला वडलांचा राग यायचा. ते इतके गप्प का बसतात. काहीच का बोलत नाहीत?

ती दोघे आपला राग गिळून टाकत. ती इतकीही मोठी झाली नव्हती की पप्पांना काही विचारावं किंवा मम्मीला काही सांगावं.

ज्या दिवशी त्याला मुंबईला आय. आय. टी. ला प्रवेश मिळाला, त्या दिवशी तो, आमोद, पप्पा खूप खूश होते. तो पतियाळातील लोकांशी बोलू इच्छित होता. आजी-आजोबांना सांगू इच्छित होता की त्याला आय. आय. टी. ला प्रवेश मिळालाय. पण त्याला पप्पांचं बोलणं आठवलं. ‘आपल्या पायावर उभं राहून तू आपले निर्णय घेशील आणि निवड करशील, तेव्हा तुला कुणीच काही म्हणणार नाही. सगळं विश्व तेव्हा तुझं असेल!’ हा विचार करून तो गप्प बसला.

क्रमश: भाग २ 

मूळ हिंदी  कथा 👉 ‘कभी देर नहीं होती…’- मूळ लेखिका – सुधा ओम ढींगरा

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग १ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग १ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

डॉ सुधा ओम ढींगरा

टेक लेफ्ट..’ तो कार डावीकडे वळवून दूरवर घेऊन गेला. ‘नव टेक राईट ऑन स्टॉप साईन. …’ त्याने स्टॉप खुणेशी गाडी उजवीकडे वळवली आणि ड्राईव्ह करत तो त्याच जागी पुन्हा आला, जिथून त्याने सुरुवात केली होती. दिशा निर्धारित यंत्राच्या निर्देशांचा, तो गेले अर्धा तास पालन करत होता आणि शहरात वसलेल्या घरांच्या समूहाला तो प्रदक्षणा घालत होता. पण अजूनही त्याला हव्या त्या घरापाशी तो पोचला नव्हता.

‘अरे यार, तू मला किती फिरवणार? मला हव्या या घराशी पोचवणार की नाही? ‘ नेव्हिगेटरकडे बघत तो चिडून म्हणाला.

दिशा निर्धारित यंत्राच्या निर्देशांनुसार तो त्या सब-डिव्हिजनमध्ये पोचला होता॰ त्याला हवं ते घर तिथेच, त्याच सब-डिव्हिजनमध्ये होतं. त्याचा पत्ता त्याला दिला गेला होता आणि आता तिथे तो निघाला होता, पण गेले दहा-बारा मिनिटे नेव्हिगेटर त्याला कधी डावीकडे, तर कधी उजवीकडे फिरवत होता. पण कुठल्याही घराशी थांबायला मात्र संगत नव्हता. एरिया नवीन होता. काही घरं नुकतीच तयार झाली होती. काही तयार होत होती. त्यामुळेच कदाचित ती गुगल मॅपमध्ये नव्हती आणि त्यामुळे नेव्हिगेटर दिशा निर्देश देऊ शकत नव्हता. ज्या रस्त्यावर त्याला हवं ते घर होतं, तो रस्ताही कळत नव्हता.

एवढ्यात त्या ला रस्त्यावरून, म्हणजे साईडवॉकवरून चालत जाणारा एक भारतीय दिसला. त्याने आपली कार त्याच्याजवळ नेऊन थांबवली आणि खिडकीची काच खाली केली. आपल्या हातातला पत्ता त्याच्यापुढे करत विचारलं, ‘सर, हे घर कुठे आहे, आपण सांगू शकाल?’ दक्षिण भारतातली ती एक प्रौढ व्यक्ती होती. पत्ता बघून ते म्हणाले, ‘ मी इथे मुलाकडे आलोय. नवीन आहे इथे मी. मला काहीच माहीत नाही…. त्यांना विचारा.’ त्यांनी समोरच्या घरातील, एका गोर्‍या माणसाकडे बोट दाखवलं. तो आपल्या बागेला पाणी देत होता.

त्याने कार तिथेच थांबवली आणि पत्ता घेऊन तो त्या माणसाकडे गेला.

‘हॅलो ….’

‘हाय…’

‘कॅन यू टेल मी वेयर इज दीज हाऊस?’ 

त्या गोर्‍या माणसाने त्याच्या हातातून पत्ता घेतला आणि हसत म्हणाला, ‘ तू घराच्या अगदी जवळ आला आहेस. तू घरासाठी चकरा मारताना मी पाहिलं तुला.’ त्याने आपल्या एका हाताच्या तळव्यावर दुसर्‍या बोटाने रेघा काढत त्याला रस्ता समजावला. ‘ थॅंक्स’ म्हणत तो कारपाशी आला. रस्ता दाखवण्याची ही पद्धत त्याला खूप आवडली. आत्ता त्या माणसाने दाखवलेल्या रस्त्यानुसार तो पुढल्या गल्लीत उजवीकडे वळला. गल्लीच्या शेवटी ते घर त्याला दिसलं. घर नव्याने तयार झालेलं होतं आणि त्याच्याशेजारी एक नवीन घर बनत होतं. त्याने थोड्या आंतरावर कार पार्क केली.

तो योग्य जागी आला होता खरा, पण कारमधून उतरण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्याच्या मस्तकाच्या आखाड्यात वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात कुस्तीच चालली होती जशी. त्यामुळे त्याच्या डोक्यात गोंधळ चालला होता. त्याला आश्चर्य वाटलं, अचानक मागे सरलेल्या वर्षांनी त्याला असं कसं बांधून ठेवलं.

भूतकाळाचा त्याच्यावर इतका दबाव पडला होता की तो त्याला कारसीटपासून हलूच देत नव्हता. कसा जाणार तो त्या घरात? तो जसा काही कारच्या सीटला जखडला गेला होता. 

भूतकाळाचा हाच तर वैताग असतो. त्याचे पापुद्रे सुटू लागले की सुटतच जातात. आठवणी पिंगा घालू लागल्या की पाठ सोडतच नाहीत. त्याच्याबाबतीत हेच तर होतय. गेले दोन दिवस घालवलेला वेळ वर्तमानावर दबाव आणतोय. स्वत:ला सामान्य करण्यासाठी त्याने कार सीटवरच मागच्या बाजूला डोके टेकले आणि डोळे मिटून घेतले.  

एका फोन कॉलवरील स्नेहाळ आवाजाने त्याला भावूक बनवलं होतं…. ‘हॅलो…’

‘इज दिज मिस्टर आनंद.’

‘यस.’

‘मिस्टर आनंद आपल्याशी कोणी तरी बोलू इछितय. घ्या. बोला.’

तो हैराण झाला होता. कुणाला त्याच्याशी बोलायची इच्छा होती? एवढ्यात मधात घोळलेला एक मधुर आवाज त्याच्या कानावर पडला. – ‘नंदी…’ फोनच्या या बाजूला आणि त्या बाजूला आवेगाच्या पावसाचे थेंब झरझरू लागले. दोन्ही बाजूला तन-मन भिजून चिंब झालं. कामाची घाई होती, तरीही आनंद तासभर त्या आवाजाशी बोलत राहिला. तो त्याला भेटायला उत्सुक झाला. कधी एकदा त्याला भेटतो, असं आनंदला होऊन गेलं. एका प्रोजेक्टचा शेवटचा दिवस उद्या होता, त्यामुळे दोन दिवसांनंतर भेटायचं नक्की ठरलं. दोन दिवस तो अशा बागेत फिरत होता, जिथे सप्तरंगी फुले फुलली होती. त्यांचा सुगंध तो ऑफीस, घर, बिछाना, इतकच काय, आपल्या श्वासातही अनुभवत होता. एक अजबशी खुमारी चढत होती.  मधुर मधुर आवाज,  ‘नंदी… नंदी…’ म्हणत त्याला बोलावत होता. हा आवाज लहानपणी तो देवघरातून ऐकत होता.

लहानपणाचा त्या घराचा सुगंध त्याच्या आत आत अजूनही वसलाय. बनारसी, बालदेव आणि हरी त्यांच्याकडे कामाला होते, पण ते त्याचे मोठे काका- छोटे काका होते. त्याने घरात प्रेम आणि मधाळ आवाजच ऐकला होता. कामगारांच्या बरोबरही कोणी मोठ्या आवाजात बोलत नसत.  त्याला नेहमीच वाटतं, लहानपणी त्याच्या आत सामावलेला स्नेहाचा सुगंध त्याला इतका सुगंधित करत राहिला, की तो कुणाचा तिरस्कार करूच शकत नाही. तिरस्काराची बीजे अनेकदा रोवली गेली, पण प्रेमाच्या छायेत ती वाढू शकली नाहीत.

प्रथम तर त्याचा विश्वासच बसला नाही. इथे विदेशात येऊन कुणी, जे बर्‍याच दिवसांपूर्वी हरवलं होतं, ते विश्वासाने त्याला शोधून काढेल, त्याला फोन करेल, या खात्रीने फोन करेल की त्यांच्याविषयीची त्याच्या मनातली प्रेमाची ठिणगी विझलेली नसणार आणि खरोखरच नंदीच्या मनातली, जी प्रेमाची ज्योत त्यांनी लावली होती, ती अजूनही जळतेच आहे. विदेशात आल्याबरोबरच तो आनंदाचा नंदी झालाय आणि खरोखरच आपल्या आतली ती प्रेमाची ज्योत त्याने कधीच विझू दिली नव्हती. तो त्यांना कधीच विसरला नव्हता. त्याच्या बालपणीची दहा वर्षे त्यांच्याशी जोडलेली होती. इथे आल्यावर तर तो स्वत:ला त्यांच्या अधीकच जवळ आल्याचं अनुभवत होता. इथे आठवणींच्या आधारेच तर माणूस आपली सुख- दु:खे भोगत असतो. हां! आनंद बनून तो काही वर्षे त्यांच्यापासून दूर राहिला. आता नंदी बनून तो त्यांच्याजवळ आलाय.

नंदी आणि आनंदचं अंतर्द्वंद् कधीपासून सुरू झालं? मम्मीने नंदीला आनंदपासून हिसकावून घेतलं आणि आनंद एकटा झाला. आनंदसाठी तो मोठा कठीण काळ होता. अवघा दहा वर्षाचा होता तो तेव्हा, पण तो जसजसा मोठा होईल, तसतसा त्याने आपल्या आतल्या नंदीला संभाळून जीवंत ठेवला होता.

आठवणींचे पक्षी फडफडू लागले. डोक्यात गोंधळ माजला. आठ्ठावीस वर्षापर्यंत तो ज्या परिवेशात वाढला, तिथे प्रचंड विरिधाभास होता. तो जसा जसा मोठा होत गेला, तसतशी त्याला समज येऊ लागली. आता तर त्याला खूप गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. परदेशातील वातावरण आणि कार्यप्रणाली याने त्याचा विवेक जागृत झालाय. बुद्धिमत्ता अनेकांमध्ये असते, पण बुद्धिमान कमी असतात. या देशाने त्याची अंतर्दृष्टी व्यापक बनवलीय. गोष्टींकडे बघण्याच्या दृष्टीत परिवर्तन आलय. भिन्न भिन्न देशातील भिन्न भिन्न लोकांसोबत काम करण्याने एक वेगळ्याच प्रकारची सजगता त्याच्या ठायी आलीय.

तो आपल्या वडलांना सांगू इच्छित होता की वयाच्या त्या थांब्यापर्यंत ते जे काम करू शकले नाहीत, ते काम करायला तो निघालाय. परंतु त्याने जेव्हा जेव्हा आपल्या पप्पांना फोन लावला, तेव्हा तेव्हा, त्याच्या मम्मीनीच तो उचलला, त्यामुळे तो काहीच बोलू शकला नाही. मम्मीला कळणं, म्हणजे घरात वाद-विवाद, क्लेश. इथे आल्यानंतर त्याने मम्मीच्या अनेक गोष्टींना विरोध केला होता. मम्मी त्याला काही म्हणायची नाही, पण घरात पप्पांची धडगत नसे. त्यांना मम्मीचं तिरकस बोलणं ऐकून घ्यावं लागे-

‘तुमचा मुलगा तुमच्यावर गेलाय. मोठा चलाख आहे. मनमानी करणारा. माझी पर्वा तुम्ही कधी केलीत, म्हणून तो करेल. एक मुलगीच तेवढी आहे, जी मला समजून घेते. ‘

कधी काळी तो आपल्या आईवर खूप प्रेम करायचा. पण दिल्लीला आल्यानंतर, तो आणि त्याचा भाऊ दोघेही आपल्या पाप्पांच्या निकट आणि मम्मीपासून दूर होत गेले. छोट्या  छोट्या बाबीत, त्याची मम्मी, पप्पांना खाली बघायला लावायची, त्यांचा अपमान करायची,  ते भावाभावांना मुळीच आवडत नसे. प्रत्येक वेळी त्याचे पप्पा मान खाली घालून मम्मीची प्रताडना सहन करायचे. त्यांच्या डोळ्यात समुद्र उसळताना त्याने पाहिलय. जेव्हा तो कोपर्‍यातून वाहू लागेल, असं वाटे, तेव्हा ते आपल्या खोलीत निघून जात. त्याला अनेक वेळा आपल्या पप्पांचा राग येई. वाटे, ते बोलत का नाहीत? 

वयाची दहा वर्षे होईपर्यंत त्याने आपल्या मम्मीचं अतिशय सुंदर रूप पाहिलं होतं. नंतर त्याने जे पाहिलं, त्यामुळे तो घाबरूनच गेला.

क्रमश: भाग १

मूळ हिंदी  कथा 👉 ‘कभी देर नहीं होती…’- मूळ लेखिका – सुधा ओम ढींगरा

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आभारी आहे भाऊ…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘आभारी आहे भाऊ…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

किदवई नगर चौकात टेम्पोमधून उतरून पुढे जाऊ लागताच तीन चार सायकल रिक्शावाले माझ्याकडे येत म्हणाले, ” चला साहेब, के-ब्लॉक….”

सकाळ संध्याकाळचे तेच प्रवासी व तेच रिक्शेवाले. सर्व एक दुसऱ्याचे चेहरे ओळखू लागले आहेत. ज्या रिक्शांवर बसून मी सायंकाळी घरी पोहोचायचो ते मोजके तीन चारच होते. माझ्या स्वभावामुळे मी नेहमीची खरेदीसाठीची दुकानं, वाहने किंवा मित्र निवडकच ठेवतो, त्यांच्यावरच विश्वास ठेवतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा बदलतही नाही.

एका रिक्शावर मी बसलो. आज ऑफिसमध्ये डायरेक्टरसाहेब विनाकारणच माझ्यावर नाराज झाले होते, म्हणून डोके जड व मन दुःखी होते. रिक्शा मुख्य रस्त्यावरून केव्हा वळली आणि केव्हा घरासमोर येऊन उभी राहिली मला समजलेच नाही. 

“चला, साहेब, आपले घर आले.” रिक्षावाल्याचा आवाज ऐकून मी विचारातून बाहेर आलो. रिक्शा घरासमोर पोहोचल्याचे बघून मी खाली उतरलो व खिशातून पैसे काढून रिक्शावाल्याला दिले आणि घराकडे जाऊ लागलो. 

“ साहेब ” …  

रिक्शावाल्याचा आवाज़ ऐकून मी मागे वळलो आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पहात म्हणालो, 

” काय, चुकून पैसे कमी दिले का मी? “

” नाही साहेब.”

” मग काय आहे? तहान लागली आहे का? “

” नाही साहेब.”

” मग भाऊ, काय झाले?”

” साहेब, ऑफीसमध्ये काही बिघडले आहे का?”

“ हो… पण तुला कसे समजले ! ” मी आश्चर्यचकित होत विचारले.

” साहेब, आज तुम्ही घर येइपर्यंत रिक्शात बसून माझ्याशी काहीच बोलले नाही. माझ्या घर परिवाराविषयी काही विचारलेही नाही. प्रवासात गप्प गप्प व अगदी शांत बसून होतात‌. “

” हो भाऊ, आज मन जरा अशांत आहे म्हणून गप्प बसलो होतो मी. पण पैसे तुला तर पूर्ण दिले ना !”

“साहेब, पैसे तर दिले पण …”

” पण काय …?”

” साहेब, थैंक्यू नाही म्हटले आज तुम्ही.. साहेब, आम्हा रिक्षेवाल्यांच्या  जीवनात आम्हाला सन्मानाने कोण वागवतो. काही लोक तर भाडे पण नाही देत. काही तर मारपीट पण करतात. एक तुम्ही आहात जे रिक्शात बसताच आमची चौकशी करता, घर परिवाराविषयी, मुलांचे शिक्षण, अभ्यासाविषयी विचारपूस करता, खूप चांगलं वाटतं जेव्हा कुणी आपलेपणा दाखवतो. हे सर्व करून तुम्ही भाडे तर पूर्ण देताच, घरी येऊन थंड पाणी ही प्यायला देता आणि वरून आम्हाला थैंक्यू पण म्हणता. आम्ही चौकातले लोक तुमच्याविषयी बोलताना  ” थैंक्यूवाले साहेब ” म्हणून बोलतो… पण आज तर…” त्याचा आवाज भरून आला होता.

मी आपली पाठीवरची बॅग काढून गेटजवळ ठेवली, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच म्हणालो, ” भाऊ मला माफ कर. मन अशांत होते म्हणून ही सर्व गड़बड़ झाली. माझ्या घरापर्यंत आणून सोडल्याबद्दल तुझे मनापासून आभार व धन्यवाद. थैंक्यू भाऊ।”

तो हसला आणि पॅडलवर पाय मारत तेथून निघून गेला.

हिंदी लेखक – अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ती…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘ती…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

तिनं स्कूटर लावली, हँडल लॉक केलं. डिकीतली पर्स अन् पुस्तकं काढून घेतली. पर्स खांद्याला अडकवली अन् पुस्तकं हातात धरून चालू लागली. नेहेमीसारखीच कुठंही न बघता थेट फ्लॅटच्या दाराशी आली. दाराचं कुलूप काढून घरात गेली. लगेच मागं वळून दरवाजा बंद केला.

…बस एवढंच तिचं दर्शन रोज आजूबाजूच्यांना होत होतं. तिचा हा रोजचाच दिनक्रम होता. सकाळी ठराविक वेळेला ती घरातून बाहेर पडायची अन् संध्याकाळी ठराविक वेळेला परतायची. आली की फ्लॅटच्या बंद दरवाजाआड लुप्त व्हायची. तिच्या जाण्याच्या अन् येण्याच्या वेळा आजूबाजूच्या लोकांना माहीत झाल्या होत्या. दोन्ही वेळेला रिकामटेकडे न् अतिचौकस लोक तिला डोळे भरून न्याहाळून घेत. दार बंद झालं की, तिचं दर्शन दुर्लभ व्हायचं. तिच्या घरातून कधी बोलण्याचे, रेडिओ, टी.व्ही.चे कसलेच आवाज यायचे नाहीत. खिडकीतूनसुद्धा ती कधी डोकावताना दिसायची नाही. आत सदैव एकटी काय करत असावी, याची अनेकांना उत्सुकता होती.

दिसायला फार देखणी नसली, तरी आकर्षक होती. राहण्यात मेकअप किंवा नटवेपणा कधी दिसला नाही. पण, साधासुधा नेटकेपणा होता. केसांचा बॉयकट, साधी सुती साडी, कुंकवाची एवढीशी टिकली. बस. बाकी कानात, हातात, गळ्यात कुठं दागिने नसायचे. गळ्यात मंगळसूत्र पण नव्हतं. यामुळंच तिच्याबद्दल अनेक तर्क-कुतर्क प्रत्येकजण लढवत होता.

ती एकटी होती म्हणून आजूबाजूच्या टगे मंडळींना तिच्याबद्दल फार कुतूहल होते. त्यांच्या दृष्टीनं विवाहित असो, कुमारिका असो की विधवा. काहीही असलं तरी तिचं आकर्षक रूप अन् एकटं असणं फार महत्त्वाचं होतं. तिची स्कूटर वगैरे बंद पडेल, कधी कधी गॅसची टाकी वर न्यावी लागेल किंवा काही मदत लागेल, त्यानिमित्ताने तिच्या घरात जाण्याची संधी मिळेल, याची सगळे वाट पाहत होते. पण, 6 महिन्यांत अजून तरी तशी वेळ आली नव्हती.

तिला राहायला येऊन 6 महिने झाले होते. पण, ती सकाळी जाते, संध्याकाळी येते अन् एकटी राहते, यापलीकडे फारसं कुणालाच तिच्याबद्दल काही माहीत नव्हते.

बिल्डिंगमधल्या बायकांना मात्र, तिचं एकटं राहणं आवडायचं नाही. तसा तिचा काही त्रास कुणाला नव्हता. पण, तिच्याबद्दल कुणालाच, काहीच माहीत नव्हतं, याचाच सगळ्यांना संताप यायचा. त्यांच्या दुपारच्या वेळातल्या लोणची-पापडांच्या गप्पांत तोंडी लावायला त्यांना तिचा विषय घेता येत नव्हता. मग तिच्या एकटं राहण्याबद्दलच त्या नाना तर्क लढवत.   ती विधवा की अविवाहित की घटस्फोटित ते कळत नव्हतं. ती कुणाची कोण हे माहीत नव्हतं. तिचे लागेबांधे कुणाशी, हे कळण्याशिवाय तिचे स्थान पक्कं करता येत नव्हतं. ‘आमचे हे’ या पलीकडं विश्व नसलेल्या त्या बायकांना तिच्या विश्वाची कल्पनाच करता येत नव्हती. मग कुणी म्हणत, ‘चार बायकांच्यात मिसळायला काय झालं?’

’शिष्ट आहे.’

‘गर्वीष्ठ दिसतेय.’

‘कशाचा एवढा गर्व आहे, कुणास ठाऊक?’

‘ समजते कोण स्वत:ला?

त्या सारखी माझ्याकडं तिच्याबद्दल चौकशी करत. कारण आमची अन् तिची एक भिंत कॉमन होती. पण, मलाही तिच्याबद्दल जास्त काही माहीत नव्हते.

त्या दिवशी रात्री मात्र काही वेगळाच प्रकार घडला. रात्री 11 चा सुमार होता. तिच्या दारापाशी काही माणसं बोलत होती. तिच्या दारावर टक्टक् करीत होती. ते काय बोलतायत ते ऐकू येत नव्हतं. पण, रागरंग काही चांगला वाटत नव्हता. मी खूप वेळ चाहूल घेत होते. पण, काय करावं, ते मलाही काही कळेना. नाही नाही ते विचार मनात येत होते. भीती, शंका-कुशंका… यामुळे मी बेचैन झाले. घरातल्यांना उठविण्याच्या विचारातच मी होते.

तेवढ्यात आमच्या मागच्या खिडकीच्या काचेवर, दारावर खूप आवाज झाला. पाहते तर ती! भेदरलेली…, घाबरलेली…, जोरजोरात दार आपटत होती. मी पळतच दार उघडलं… तर तिनं मला घट्ट धरून ठेवलं. तिच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. एवढी ती घाबरली होती. खाणा-खुणा करून सांगत होती. पुढच्या दाराशी कुणी आहे म्हणून. एवढ्यात आवाजाने बरेच लोक जागे झाले. ते बाहेरचे लोक निघून गेले. ती मला घट्ट पकडूनच तिच्या घरात घेऊन गेली. अजूनही थरथर कापत होती ती. घरात जाताच ती माझ्या गळ्यात जवळ-जवळ कोसळलीच. गदगदून… रडत होती. शहारत होती. मीही फक्त तिचा थोपटत राहिले. हळूहळू हुंदके देतच तिला झोप लागली. मीही तिथंच लवंडले. पहाटे उठून हलक्या पावलाने घरी आले. सगळं आवरून तिच्यासाठी चहा घेऊन पुन्हा आले, तर ती सुस्नात… प्रसन्न एखाद्या पारिजातकाच्या फुलासारखी! ध्यानस्थ बसलेली. डोळे बंद. तिला माझी चाहूलही लागली नाही.

घरात फारसं सामानसुमान नव्हतं. समोरच्या भिंतीवर एक सुंदर पेंटिंग होतं. त्याखाली तिचंच नाव असावं… अश्विनी. मी त्या पेटिंगकडं पाहात मनात प्रश्न जुळवू लागले. कालची माणसं कोण असावीत? कशाला आले असतील?

तिच्याकडे नजर गेली अन् तिनं डोळे उघडले.  पण, त्या अथांग डोळ्यात प्रगाढ दुःख दिसत होते. अन् मिटलेल्या ओठात ते सहन करण्याची ताकद!

मी काही विचारायच्या आत ती माझ्याजवळ आली. तिने मला चक्क मिठी मारली. माझे हात हातात घेऊन माझ्याकडे पाहत राहिली. काय बोलावं तेच मला सुचेना. कारण ती खुणा करून सांगत होती ‘‘मला बोलता येत नाही’’ –

तिच्या सगळ्यांच्यात न मिसळण्याचं, इतरांशी न बोलण्याचं हे कारण होतं तर… आणि आम्ही बायका काय काय समजत होतो तिच्याबाद्दल. मलाच लाज वाटली.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचे माहेरपण आणि… भाग – १ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ तिचे माहेरपण आणि… भाग – १ ☆ श्री मयुरेश देशपांडे

ऐनवेळी गोंधळ नको म्हणून त्याने एसटीची तिकिटे आधीच आरक्षित करून ठेवली होती. अगदी तिला आवडते तसे खिडकीतले तिकीट आणि अगदी पुढची जागा. त्याने सामान वरती लावले, तिला खिडकी उघडून दिली आणि खाली उतरला. बस निघेपर्यंत तिच्या सूचना चालूच होत्या आणि एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे आठवणीच्या वहीवर तिच्या सूचना नोंदवून घेत होता. बस स्थानकातून बाहेर पडली तशी त्याची पावले मागे वळाली.

ती तिच्या परीक्षेला गेली होती. पण खरी परीक्षा त्याचीच होती. माहेरच्या गावी परीक्षा केंद्र खालच्या सरकारने नव्हे तर वरच्या सरकारने ठरवून दिले होते. ” कधी नव्हे ते सणांव्यतिरिक्त माहेरी येणे होतेय, राहू देत की लेकीला चार दिवस “, सासूबाईंचा थेट त्याला फोन. पडत्या फळाची आज्ञा मानत, मी देखील,

“हो ना, तेवढाच मोकळा वेळ मिळेल तिला.”, असे म्हणत त्याने त्यांच्या होकारामध्ये होकार भरला.

“तुम्हाला काय जातंय होय म्हणायला, दोन लेकरं आहेत पोटाशी. त्यांचे कोण पाहणार? तुम्ही सकाळी जाणार कामावर, ते संध्याकाळी उजाडणार. आणि उजाडले तरी कोपऱ्यावर मित्र मंडळीत जाणार. माझी लेकरं राहायची उपाशी. त्यांना शाळेत सोडणार कोण – आणणार कोण, शंभर धंदे असतात माझ्यापाठी. आईला काय जातंय म्हणायला ‘ ये चार दिवस म्हणून ‘ .” तिने दांडपट्टा चालवला.

तिचे माहेरी राहणे बहुधा रद्द होते आहे पाहून तो आतून सुखावला. पण मग पट्ट्याची पट्टी झाली आणि तिही खाली उतरली. त्याचा आनंद काही फार काळ टिकला नाही.

“आईचेही बरोबर आहे म्हणा. सणवार सोडले तर एरवी कुठे तिच्याकडे जाणे होतेय. आणि सणवार म्हणजे पाहुण्यांची उठबस. बरं घरात दुसरं बाई माणूस नाही. भावाचं  लग्न लावून दे म्हटले तर तो बसलाय तिकडे राजधानीत. आम्हाला बोलायला उसंत काही मिळत नाही. मी काही सांगेन म्हणते, ती काही सांगेन म्हणते, जरा बाबांच्या मांडीवर डोके ठेवेन म्हणते, पण कसले काय. तिकडे जाऊनही रांधा वाढा उष्टी काढा. आता जाईन तर छान गप्पा होतील. आवडी निवडीचे हक्काने मागून खाता येईल. बरे मागे मुलांचा व्यापही नाही. ते काही नाही. आई म्हणते ते बरोबरच आहे. परीक्षा झाली की, तशीच आईच्या घरी जाते आणि चांगली चार दिवस राहून येते. कळू देत मुलांनाही माझी किंमत.” … तिचा खालचा सूर कधी वरती गेला तिलाही कळाले नाही. तो मात्र चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवता आत गेला.

आपल्याला इथेच ठेवून आई एकटीच माहेरी जात आहे म्हटल्यावर मुले जाम खूश. बाबा काय दिवसभर बाहेर असतो. म्हटल्यावर दिवसभर घरावर आपले साम्राज्य म्हणून मुले आनंदली. लेकीची शाळा दुपारची तर लेकाची सकाळची. दोघांनी टीव्ही, संगणक, मोबाईल व इतर खेळांच्या वेळा आपापसात वाटून घेतल्या. चार दिवस अभ्यासाला सुट्टी. पण चार दिवस बाबा सुट्टी काढून घरी थांबणार आहे कळल्यावर त्यांच्या आनंदावर विरझण पडले, अगदी मगाशी बाबांच्या आनंदावर पडले तसे. बाबांना त्यांच्या साहेबांशी बोलताना तिघांनी चोरून ऐकले होते. हो तिघांनी म्हणजे आईनेसुद्धा. तिने तर लगेच पिशवी भरायला घेतली.

“अग हो, वेळ आहे ना अजून. आधी परीक्षा मग माहेरपण. तेव्हा आधी अभ्यास मग पिशवी भरणे.” त्याने उसने अवसान आणून रागे भरले. तिचा पुढचा आठवडा माहेरपणाचे नियोजन करण्यात, तिच्या पश्चात घरात करायच्या कामांची त्याला व मुलांना सूचना देण्यात आणि मधेआधे वेळ मिळेल तसा अभ्यास करण्यात गेला. आणि शेवटी त्याच्यासाठी महाप्रलयाचा तर तिच्यासाठी महाआनंदाचा दिवस उजाडला.

गाडी सकाळचीच होती आणि तिची कालपासून तयारी सुरू होती. तिच्या डोळ्यांतले पाणी आता हे तिघे चोरून पाहात होते. हो, पुन्हा तिघेच. यावेळी बाबा त्या दोघांना सामील झाले होते. तिचा पाय निघत नव्हता. तरी बरं ती निघाली तेव्हा मुले साखरझोपेत होती. धाकट्याचं मी पण येणार हे पालूपद आठवडाभर चालूच होतं, पण तिने काही त्याला दाद दिली नाही.

तिने देवापुढे निरांजन लावले. देवाला धूप अगरबत्ती दाखवली. नमस्कार करून पिशव्या उचलायला गेली. ” सगळे  घेतलंय ना बघ एकदा.”, त्याने बाहेरूनच गाडी काढता काढता आवाज दिला. ” हं काही राहिले तरी मी माघारी थोडीच फिरतीये.” उंबरा ओलांडतानाच तिचे प्रत्युत्तर आले. ” अगं तसं नव्हे, परीक्षेचे सगळे घेतले का?”, असे मला म्हणायचे होते. त्याने सारवासारव करतच गाडी सुरू केली.

पुढे तिच्या पिशव्या आणि मागे ती अशी ओझ्याची कसरत करीत ते स्थानकावर पोहोचले. बस अजून फलाटावर लागायची होती. दोघांनी गरमागरम चहा घेतला. तसे तिचे माहेरी जाणे आता काही कौतुकाचे राहिले नव्हते. लग्नाला जेवढी वर्षे झाली नसतील त्याहीपेक्षा अधिक वेळा ती माहेरी गेलेली होती. दोन जीवांची आई झाली तशी सोबतच्या पिशव्या वाढल्या, पण जाणे कमी झाले नाही. पण यावेळी तिची कच्चीबच्ची बरोबर नव्हती आणि म्हणून जीव तुटत होता.

“अगं राहतील व्यवस्थित. आता मी चार दिवस रजा घेतली आहे ना, मग काय काळजी करतेस. आणि सोबतीला राधाक्का आहेच की. तूच तर नेहमी म्हणतेस ‘ मुले तुझी कमी आणि राधाक्काची जास्त वाटतात.’ मग कशाला काळजी करतेस. तू फक्त परीक्षेवर लक्ष केंद्रित कर आणि मग माहेरपणावर. इकडली काळजी इथेच फलाटावर सोडून दे.”, तिला बसवता बसवता त्याने धीर दिला. पण खऱ्या धीराची गरज तर त्याला होती. हे तो कोणाला सांगणार.

तिची गाडी दिसेनाशी झाली तशी त्याने गाडी काढली आणि घराची वाट धरली. गाडी लावून घराकडे वळला तशी जिन्यातच राधाक्का भेटली. ” पोरं अजून झोपली आहेत. लेकीला झोपू दे हवे तर, पण मुलाला उठवावे लागेल, नाहीतर उशीर होईल शाळेला.”, राधाक्काच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेम एकाच वेळी दिसून येत होते. “आणि हो, डबा मी बनवते खाली. तू त्याला तयार करून खाली घेऊन ये.”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आसावरी… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आसावरी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(बरं, मी तसा काही रूपवान नाही. धन म्हणाल तर स्वत:चं घरही नाही आणि प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. विद्या म्हणाल तर बी. कॉमच झालोय.” त्या काही बोलल्या नाहीत.) – इथून पुढे. 

“बरं, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा.” असं सुधाकरनं म्हटल्यावर वहिनी म्हणाल्या, “मी असं ऐकलंय की मागे तुम्ही घरोघरी पेपर टाकत होता, हे खरं आहे का?”    

सुधाकर मनातल्या मनात चरकला. तो एकेकाळी पेपर टाकत होता म्हणून या आधी एका स्थळाकडून नकार आलेला होता. सुधाकरने सांगून टाकलं, “होय, खरंय मी पेपर वाटप करीत होतो.”

आसावरी वहिनी म्हणाल्या, “खरं सांगू, तुम्हाला होकार देण्यासाठी मला एवढं एकच कारण पुरेसं वाटलं. जो माणूस श्रमाला एवढी प्रतिष्ठा देतो तो माणूस आयुष्यात कधीही मागे राहणार नाही. प्रतिकूल परिस्थितीत देखील घट्ट पाय रोवून उभी असणारी माणसं मला आवडतात. आजचा दिवस उद्या राहणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही नक्कीच प्रगती कराल याची खात्री वाटली म्हणूनच मी होकार दिला.” 

लगेच मी म्हटलं, “सुधाकर तुला आसावरी रागातील गाणी आवडतात. आता ‘आसावरी’ याच नांवाची कन्या तुझ्या आयुष्यात पत्नी म्हणून येते आहे. चला हा सुंदर योगायोग आहे.” यावर ते दोघेही हसले. 

मार्चमध्ये लग्न ठरलं आणि झालं ते डिसेंबरमध्ये. सुधाकरने तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. एकमेकांना संपूर्णपणे अनोळखी असणाऱ्या दोन व्यक्तींनी एकदम एकत्र राहायला येणं, सहजीवन सुरू करायला लागणं हे त्याच्या हिशेबात बसत नव्हतं. एकमेकांना समजून घ्यायला, पुरेसं जाणून घ्यायला, महत्वाचं म्हणजे दोघांमध्ये भावनिक ओढ, एक भावबंध निर्माण व्हायला एवढा अवधी असणं त्याला गरजेचं वाटलं होतं. 

सुधाकरच्या आयुष्यात आसावरी वहिनी आल्या आणि त्याला पावलोपावली यश मिळू लागलं. पुण्यातल्या एका प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट फर्मकडून त्याला चांगली ऑफर आली. त्यांनी राहण्यासाठी छोटासा फ्लॅटही दिला. 

इकडे गावाकडे असलेल्या त्याच्या बहिणींच्या लग्नांच्या जबाबदाऱ्या ते जोडपे यथासांग पार पाडत होते. वहिनींकडून सुधाकरच्या कर्तृत्वगुणांना सतत प्रोत्साहन मिळत गेले. संसारवेल फुलताना दोन मुलं झाली. त्याचबरोबर आर्टिकलशीप करता करता तो एकदाचा चार्टर्ड अकौंटंट झाला आणि सुधाकर त्याच्या क्षेत्रात नावाजला जाऊ लागला. 

आजच्या कार्यक्रमाला डॉ. भीमाशंकर देखील सपत्निक आला होता. आम्ही तिघे मित्र सहकुटुंब दरवर्षी न चुकता सहलीला जात असतो. 

सौ. वहिनींच्या वाढदिवसानिमित्त घरी धार्मिक अनुष्ठान केलेले होते. मोजकेच नातेवाईक आणि मित्रांच्या समवेत तो सोहळा साजरा होत होता. सौ. वहिनींचं औक्षण झाल्यावर कुलदेवतांचे स्मरण करून उपस्थित वरिष्ठांनी त्यांच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकल्या. 

‘जन्मदिनं इदं अयि प्रिय-सखे I शन्तनोतु ते सर्वदा मुदम II प्रार्थयामहे भव शतायुषी I ईश्वर: सदा त्वां च रक्षतु II पुण्य-कर्मणा कीर्तिमर्जय I जीवनं तव भवतु सार्थकम II आधीच रेकॉर्ड करून ठेवलेली मंगलकामना करणारी प्रार्थना वाजवली गेली. त्यावेळी वातावरणात एक वेगळीच सात्विकता भरून राहिली होती. 

ते जोडपे कुणाकडूनही कुठलीच भेटवस्तू घेत नसत. सर्वांनी मन:पूर्वक अभिष्टचिंतन केले. उपस्थितांचे तोंड गोड करण्यासाठी पेढे देण्यात आले.  

सुधाकर बोलायला उभा राहिला. “आज आसावरीचा साठावा वाढदिवस आहे. आजवर तिच्याविषयी बोलायचा कधी प्रसंग आला नाही. एवढंच सांगतो, आम्हाला परस्परांच्या विषयी खूप आदर आहे. आम्ही एकमेकांच्या मनातलं वाचू शकतो. माझ्या क्षमतेवर सदैव विश्वास दाखवत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे म्हणून मी यशस्वी चार्टर्ड अकौंटंट होऊ शकलो. आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात तिची मोलाची साथ लाभली.

एवढ्या वर्षाच्या सहजीवनात ती मला कधीच सोडून राहिलेली नाही. माहेरी कधी जाऊन राहिल्याचं मला आठवत नाही कारण माझ्याबरोबर अखंड चालण्याचा तिने वसा घेतलेला होता आणि तो वसा ती अतिशय प्रेमाने निभावते आहे. 

आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी आसावरीला सांगत असतो, त्याशिवाय मला राहवत नाही. एकमेकांवरचा अटळ विश्वास हेच आमच्या सहवासाच्या यशस्वीतेचं गमक आहे. मुलांच्यावर उत्तम संस्कार करीत तिने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

घर सांभाळत ती माझ्या ऑफिसचं व्यवस्थापनही सांभाळते. आमच्याकडे आर्टिकलशीपसाठी ती गरीब घरांतल्या होतकरू मुलांना निवडते. त्यांच्यासाठी घेतलेल्या फ्लॅटमध्ये त्या मुलांची जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून ती काळजी घेते. आसावरीबरोबरचं माझं आयुष्य सुखात चाललं आहे.” सुधाकर आसावरी वहिनींविषयी अत्यंत समरसून बोलत होता.

समोर बसलेल्या एका युवकाने विचारलं, “साहेब, तुमची कधी भांडणं होत नाहीत का?”

सुधाकर हसत हसत म्हणाला, “भांडणं नाही पण अधूनमधून वादविवाद होतात. एखादे जोडपे, ‘आमचे कधीच वादविवाद होत नाहीत’ असं म्हणत असेल तर खुशाल समजावं की ते चक्क खोटं बोलताहेत.

दोन स्वतंत्र व्यक्तिमत्वे एकत्र आली की कमी जास्त वादविवाद होणारच. कित्येक वेळा वादविवादातून चांगलंच फलित निष्पन्न होतं याबद्दल आम्हाला कधीच शंका नसते. त्यामुळं अशा वादविवादामधून आमचं नातं अधिक घट्ट होत गेलं आहे. ती अजूनही पूर्वीसारखीच साधी राहते. आसावरी ‘थाट’ राग असतो हे तिला ठाऊकच नाही. 

माझे दोनच जीवलग मित्र आहेत, एक रत्नाकर आणि दुसरा भीमाशंकर, पण लग्नानंतर मला मात्र आसावरी नांवाची एक जीवलग मैत्रिण देखील लाभलेली आहे. आणखी काय हवंय?” 

कुणीतरी म्हणाले, “सर, आसावरी रागातलं एखादे हिंदी गाणे असेल तर सांगा ना.” 

सुधाकर उत्साहाने म्हणाला, “सांगायचं कशाला? आज गाऊनच दाखवतो” आणि वहिनींच्याकडे पाहत अगदी रोमॅंटिक मूडमध्ये सुधाकरने गायला सुरूवात केली, “जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन. तू हाँ कर या ना कर……..” आसावरी वहिनींचा चेहरा लाजेने चूर झाला होता. 

गाणं संपताच बिस्मिलाखाँ साहेबांचे सनईचे सूर आसमंतात घुमत होते आणि उपस्थित मंडळी स्वच्छ चांदण्यांत प्रीतीभोजनाचा आस्वाद घेत होती. 

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares