सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ वादळ – भाग- २☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – त्याने एक-दोन वर्षे एका गॅरेजमध्ये काम करून, दुचाकी गाड्या दुरूस्तीचं काम शिकून घेतलं. त्याला या विषयात गती होती. मग काकाच्या मदतीने, बँकेकडून कर्ज काढून स्वतःचं गॅरेज काढलं. पोटापाण्यापुरतं उत्पन्न मिळत होतं त्याला. तो काकाकडेच पोखरणला राहात होता. जमेची बाजू म्हणजे राजा मेहनती आणि निर्व्यसनी होता. मागच्या वर्षी बहिणीचं लग्न करून दिलं होतं. आता इथून पुढे)
वसंतराव उद्विग्न झाले होते. फार श्रीमंत नसले तरी आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी लाडाकोडात वाढवलं होतं. एकीकडे लेकीची चिंता तर दुसरीकडे तिनं असं लग्न केल्यामुळे संताप, यामुळे त्यांचं डोकं काम करेनासं झालं होतं. वसुमतीनं काही बोलायचा प्रयत्न केला तर, ‘मुक्ताचं नावही काढायचं नाही या घरात आता! तिनं लग्न केलंय ना आई-बापांना न सांगता, बघेल तिचं ती!’ असं त्यांनी तिला बजावलं होतं. वसुमती आता जरा सावरून, शांत डोक्याने विचार करत होती. तिनं लेकीला भेटून यायचं ठरवलं. पण वसंतराव काही या गोष्टीला तयार होणार नव्हते आणि रागाच्या भरात काही उलट-सुलट बोलून बसतील, अशी धास्ती होती तिला. साधनाबरोबर जाऊन आपण गुपचूप भेटून यावं, असं तिनं ठरवलं. सुरेशला काकांचा पत्ता शोधायला सांगितला.
पण राजाच्या मित्राकडून, लेक आणि जावई सावंतवाडीला गेल्याचं समजलं. आंब्याचा सीझन असल्याने तिथे कामही होतं. त्यामुळे दोन महिने ते तिकडेच राहणार होते. शिवाय इथे राहायच्या जागेची पंचाईत होतीच. काही न सांगता कळवता, पुतण्याने लग्न केल्यामुळे काकाही नाराज होता. तसंही काकांचं घर वन बीएचके, त्यामुळे आता तिथे राहाणं शक्य नव्हतंच.
एक आठवडा असाच गेला . वसंतराव घरीच बसून होते. मिहिरही गुमसुम झाला होता. ही कोंडी फोडायची तरी कशी! वसुमतीनं मनाशी काही एक ठरवलं आणि मिहिर शाळेत गेल्यावर ती वसंतरावांशी बोलायला आली. वसंतराव डोळे मिटून सुन्नपणे बसले होते. वसुमतीची चाहुल लागताच त्यांनी डोळे उघडले आणि प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं. वसुमती म्हणाली, ‘ हे बघा मी काय म्हणते ते जरा शांतपणे ऐकणार आहात का?’
त्यांची नजर वसुमतीवर स्थिरावली. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. चेहरा भकास दिसत होता. या आठ दिवसांत तिची रयाच गेली होती. तिची अवस्थादेखील आपल्यासारखीच झाली आहे. पण ती कोणाला सांगणार? वसंतरावांच्या मनात आलं.
‘ बोल ‘ असं म्हणत ते ती काय सांगते या अपेक्षेने बघू लागले.
मुक्ता चुकीचं वागली हे तर खरंच आहे. पण आपलं लेकरू चुकलं तर आपणच नको का सांभाळून घ्यायला तिला? त्यांची बाजूपण समजून तर घेतली पाहिजे. थांबा, चिडू नका. तुम्ही तरी किती दिवस तोंड लपवून घरात बसणार आहात? आणि तिनं लग्न केलंय. नसते रंग उधळून लाज आणण्यासारखं तरी काही वागली नाहीयेत ती दोघं! तरूण आहेत पण बेजबाबदार नक्कीच नाही. नाहीतर आजकाल आपण काय काय ऐकतो आणि बघतो, एकेका मुलांचं! सुरेशरावांनी माहिती काढली, त्यावरून मुलगा सज्जन वाटतो. आपण एकदा भेटलं तर पाहिजे ना त्याला? आणि आपण आपल्या मुलीच्या पाठिशी उभं आहोत हा विश्वास तिला द्यायला नको का? चूक झाली तर ती सुधारण्याची संधी, तिच्या दुष्परिणामांपासून आपणच मुलांना वाचवायला हवं ना? का खड्ड्यात उडी मारलीत, आता तिथंच अडकून राहा, म्हणून हातावर हात धरून बघत बसायचं आहे? ‘
‘ काय म्हणणं आहे तुझं? त्यांची काय आरती ओवाळायची आहे का? ‘
‘ शांतपणे विचार करा जरा! आणि एक सांगते. माझ्या लेकीच्या पाठिशी मी उभी राहणार हे नक्की. ती लहान आहे, अजून विचारांची परिपक्वता नाही तिच्याकडे. आयुष्यातल्या टक्क्याटोणप्यांचा अनुभवही अजून यायचा आहे. त्यांना सावध करणं, आधार देणं हे आपलं कर्तव्य नाही का? तिचं नाव काढू नका म्हणता॰ असं रक्ताचं नातं तोडून टाकता येतं का हो? आणि मग रात्र-रात्र अस्वस्थपणे फेऱ्या कशाला मारत बसता तुम्ही? लेकीच्या काळजीनंच ना! आपण तिच्या पाठीशी उभे राहिलो की बोलणाऱ्यांची तोडंपण आपोआप गप्प होतील. आणि सासरच्या लोकांनाही थोडा चाप राहिल. ते कसे आहेत हे अजून आपल्याला माहीत नाही, पण माझी मुलगी असहाय्य नाही, हे त्यांना माहीत असलं पाहिजे. ‘
‘ काय करायचं आहे तुला ते स्पष्ट सांग ना. ‘
‘ आपण सावंतवाडीला जायचं का त्यांना भेटायला? ‘
‘ काय? तुझं म्हणजे ना.. ‘
‘ अहो ते आले नाहीत तर आपण जायचं. त्यानिमित्ताने त्यांचं घर आणि एकूण परिस्थिती पण पाहता येईल ना! आपल्या लेकीला आयुष्य काढायचं आहे, ती माणसं, त्यांचं वागणं, ठाऊक नको? लग्न ठरवलं असतं लेकीचं, तर हे सगळं केलं असतंच ना? मग आता करायचं. हवं तर साधना आणि सुरेशना पण सोबत घेऊया. ‘
मग त्या दोघांशी बोलून वसंतरावांनी कोकणरेल्वेची तिकिटं बुक केली. सावंतवाडीचा राजाच्या घरचा पत्ता मिळवला. दुसर्या दिवशी संध्याकाळी मंडळी तिथे पोचली. आधी तर राजा आणि त्याच्या घरचे चपापले. हे लोकं आता काय गोंधळ घालणार म्हणून! पण सुरेश आणि साधनानं त्यांना आश्वस्त केलं. सावंत कुटुंबाने मग प्रेमानं स्वागत केलं.
तीन खोल्यांचं पण प्रशस्त घर होतं. शिवाय मागेपुढे ओसरी. आंबे आणि नारळ-सुपारीची बरीच झाडं होती. पण ते उत्पन्न सामाईक होतं. राजाची आई साधी पण प्रेमळ वाटली. तिनं लेक आणि सुनेला स्वीकारलं होतं. ” त्या म्हणाल्या, ‘वय वेडं असतं. चुका होतात मुलांकडून, पण आपलीच आहेत ना, घ्यायचं सांभाळून! ‘ बहीण आणि मेव्हणे पण आले होते. आनंदात जेवणखाण पार पडलं.
रात्री जावयाशी आणि लेकीशी सविस्तर बोलणं झालं. मुक्तानं आईला मिठी मारून, दोघांची माफी मागितली.
ठाण्याला घराच्या येण्या-जाण्याचा वाटेवर राजाचं गॅरेज होतं. मुक्ता आणि राजा एकमेकांकडे आकर्षित झाले. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ठरवून गाठीभेटी होऊ लागल्या. कॉलेजला, क्लासला येता-जाता. लोणी विस्तवाजवळ आलं तर वितळणारच. दोघांना मोह टाळता आला नाही. पण दोन-तीनदा असं झाल्यावर मुक्ताला भयंकर अपराधी वाटायला लागलं. आई-बाबांना हे कळलं तर याची भितीही वाटायला लागली. आणि स्वतः कोणत्या तोंडाने सांगणार ती? तिनं राजाकडे लग्नाचा हट्ट धरला. त्यालाही तिच्याशी लग्न करायचं होतंच. पण हातात थोडे पैसे जमायची वाट बघत होता तो. राहायला जागा तर हवी. शिवाय संसार थाटायचा म्हणजे सगळं आलंच की! आता गॅरेजच्या मागच्या भागातच थोडी सोय करून त्यांना सध्या राहावं लागणार होतं.
बाबांनी गहिवरून दोघांना जवळ घेतलं. ते आणि सुरेशकाका त्यांना ठाण्यात भाड्याचं घर घ्यायला मदत करणार होते. मुक्तानं आपलं शिक्षण पूर्ण करावं असं त्यांना वाटत होतं. पण मुक्ताला तिचं ब्युटी पार्लर काढायचं होतं. ठाण्यात आल्यावर ती ब्युटिशियनच्या कोर्सला अॅडमिशन घेणार होती. बाबांनी तिची फी भरायची तयारी दर्शवली. जमेल तेवढी आर्थिक मदत ते करणार होते. लग्नाचा खर्च आपण केला असताच ना! मग तोच पैसा मुलांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी खर्च झाला तर छानच की!
वसुमतीनं मुक्ताचे कपडे असलेली बॅग आणि तिचा मोबाईल तिच्याकडे सोपवला. मुक्ता आणि राजा भारावून गेले होते. असं काही घडेल याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं.
वसुमती त्यांना म्हणाली, ‘असेच तर असतात आई-बाप!’
आठवड्यापूर्वी उठलेलं वादळ आता शांत झालं होतं.
– समाप्त –
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
वाॅटसप संपर्क.. 98334 79845 ईमेल [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈