मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी  

का कुणास ठाऊक पण  तिचे ते बोलणं ‘ रात गई, बात गई ‘ अशात मोडणारं नाही असा विचार त्याच्या मनात सारखा येत होता. सारखा तोच विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याने तो मनोमन अस्वस्थ ही झाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे गजर न लावताही त्याला जाग आली. बाबा उठलेले होतेच. ती जागीच आहे असे त्याला वाटलं पण तिच्याशी काहीही न बोलता तो किचनमध्ये गेला आणि चहाचं पातेलं घेऊ लागला.

“ काय चिरंजीव, आज लवकर उठलाय ? … आणि हे काय चिरंजीव ?  तुम्ही चक्क चहा ठेवताय ? अरे कशाला? मी करतो माझा चहा. तू जा झोप जा हवंतर. की चहा घेणार आहेस ? माझ्या हातचा फक्कड चहा घेऊन तर बघ.”

बाबांच्या या वाक्यावर तो हसून काहीतरी बोलून चहाचे आदण गॅसवर ठेवायला वळणार इतक्यात ती आत येत म्हणाली,,

“ हे हो काय? मला नाही का उठवायचं ? जाग आली पण पुन्हा जरा डोळा लागला माझा. सरका बाजूला.. मी असताना तुम्ही कुणी नाही हं काही काम करायचं ..“

“ नको. आज मी करतो…आणि माझ्या हातचा चहा तू पिऊन तर बघ…   तुझ्याइतका चांगला नाही पण तसा बरा करतो हं मी चहा..”

“ खरंच, आज करू दे त्याला चहा. त्याच्या हातचा चहा पिऊन तर बघू ? “

तिने  ‘ नाही हं बाबा..’ म्हणत त्याला बाजूला करून स्वतः चहा केला. बाबा ‘आपल्याला किती चांगली सून मिळालीय.. ‘ अशा विचारानं समाधानानं आणि अभिमानानं तिच्याकडे पहातच राहिले होते.

तो मात्र मनातून अस्वस्थ झाला होता. त्याला तिच्या वागण्याचं कोडे काही सुटेनासे झालं होतं .

बाबा चहा घेऊन फिरायला बाहेर पडले. ती बेडरूममध्ये गेली तरी तो बराच वेळ तिच्या वागण्या-बोलण्याचा विचार करीत तिथंच हॉल मध्ये बसून राहिला होता. तिने बेडरूममधूनच त्याला हाक मारली तसा तो दचकला आणि झटकन आत गेला.

“ कसला विचार करतोयस ?”

“ कसला नाही ..असाच बसलो होतो.”

“ असाच म्हणजे..?  तुला सांगितलं होतं ना मी ..  की मी नाही म्हणले तरी चहा तूच करायचास म्हणून.. मग..? “

“ पण तू कुठे करून दिलास ?… आणि अशी का वागतेस ? माझे काही चुकलंय काय? “

“ लक्षात ठेव..मला गृहीत धरण्याचा, माझ्यावर नवरेपणा गाजवण्याचा विचारही मनात आणू नकोस..”

“ अगं पण मी कधी नवरेपणा गाजवलाय ? मी तसा कधी वागलोय  का तुझ्याशी..?”

“  कधी वागलोय का म्हणजे ? तसे वागायचा विचार आहे की काय ? तसा विचार मनात असेल तर तो काढून टाक मनातून. माझ्याजवळ चालणार नाही ते कधीच. आधीच सांगून ठेवतेय.. “

ती म्हणाली तसे तो काहीच न सुचून तिच्याकडे पहातच राहिला.

” काय रे तुला चारशे अठठ्यांणव कलम माहीत आहे ना ? नसेल तर माहीत करून घे लगेच. “

तो काहीसा दचकला. काहीच प्रत्युत्तर न देता, काहीही न बोलता तिच्याकडे फक्त पहातच राहिला होता. मनात विचारांचे वादळ उठले होते.. त्याला  चारशे आठठयांण्णव कलमच काय इत्तर अनेक गोष्टी या फक्त वाचून, ऐकूनच ठाऊक होत्या. तिच्या वाक्क्याने भयाची एक थंडगार  लाट त्याच्या पूर्ण मनाला गिळून गेली. क्षणभर वाटले,सारं काही बाबांना सांगावं ..पण त्यांचा विश्वास बसेल आपल्या बोलण्यावर..? तिचे बेडरूम बाहेरचं वागणे, बोलणे असे होते की बाबाच काय जगातलं कुणीच त्याच्यावर विश्वास ठेवण्याची सुतराम शक्यताच नव्हती.

बऱ्याचदा ती त्यांच्याशीही चांगली वागायची पण मधूनच कधीतरी  कायदा स्त्रीच्या बाजूने असल्याची जाणीव ती त्याला करून द्यायची. ती कधी कसे वागेल याचा काहीच अंदाज त्याला यायचा नाही. ती अधूनमधून अशी का वागते ? का धमकावते ? याचं कोडं खूप विचार करूनही त्याला सुटत नव्हतं. आपण तिचा विश्वास संपादन करायला कमी पडलो काय?  हा प्रश्न  त्याच्या मनात रुंजी घालत होता. त्याला तिचे ते वागणं सहन होत नव्हते आणि त्याला त्याबद्दल कुणाला सांगताही येत नव्हतं.. त्याचा आत्मविश्वासही दिवसेंदिवस कमी होत चालला होता.. तो मनोमन खचत चालला होता.

               क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी  

त्याला जाग आली तर ती शेजारी नव्हती. तो झटकन उठला. त्याने घड्याळात पाहिले. साडेचार वाजून गेले होते. ‘बाबा उठले असतील ..’ मनात विचार येऊन त्याने.बाबांची चाहूल घेण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या आणि तिच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता.  तो बाहेर आला.

“ आता मी आलेय ना बाबा ? मग आता पहाटेचा चहा मी करून देणार हं तुम्हाला.. तुम्ही नाही स्वतः करून घ्यायचा. ”

“ अगं, पण मला सवय आहे त्याची.. उगाच तुझी झोपमोड कशाला ? जा. झोप जा तू.. घेईन मी करून चहा. “

“ ते काही नाही हं …बाबा, मी असताना तुम्ही चहा करून घेतलात तर मला ते नाही हं आवडणार. आजवर तुम्ही खूप केलेत…पण आता नाही. आता तुम्ही फक्त आराम करायचा, तुमच्या आवडी-निवडी जपायच्या, छंद जोपासत राहायचे. आता कुठल्याच कामाला मी नाही हं हात लावू देणार तुम्हांला. चला, तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा बघू,  मी आणते लगेच चहा करून.. अगदी तुमच्या आवडीचा.. आलं घालून .”

‘ बरं. तू आण चहा करून..’ असं म्हणून बाबा किचन मधून बाहेर येऊन हॉलमध्ये बसले..’ किती चांगली सून मिळालीय आपल्याला.. आपण खूप नशीबवान आहोत..’ बाबांच्या मनात आले. तो हे सारे  ऐकत होता.. तो हॉल मध्ये आला.

“ अरे, तू ही उठलास? ये. “

तो हॉल मध्ये आला. बाबांच्याशेजारी बसला. ती चहा घेऊन आली तेव्हा तिने त्याच्यासाठीही चहा आणला होता.

“ तुमचा आवाज आला म्हणून तुमच्यासाठीही आणलाय चहा.. घ्या. “

ती ओठातल्या ओठात हसत त्याच्या हातात त्याचा चहाचा कप देत म्हणाली.

चहा पिऊन झाल्यावर बाबा फिरायला बाहेर पडले. 

बाबा रोज पहाटे साडेचारला उठून, सारे आवरून स्वतःचा चहा स्वतः करून घेऊन पाचला फिरायला जात असत. गेल्या कित्येक वर्षाचा त्यांचा तो नेमच होता.  आधी आईही लवकर उठायची, बाबांना तीच चहा करून द्यायची पण तिची झोप पूर्ण होत नाही हे लक्षात येताच बाबांनीच तिला लवकर उठायला मनाई केली होती..

बाबा फिरायला निघून गेले आणि ती आणि तो,  दोघेही  त्यांच्या बेडरूम मध्ये आले. त्यांच्या लग्नाला काही दिवसच झाले होते पण तिने आपल्या वागण्याने घरच्यांचीच नव्हे तर शेजार-पाजाऱ्यांचीही मनं जिंकली होती.. तोही खुश होता.

“ उद्यापासून तूही उठायचंस लवकर.. मी उठवेन तूला ..”

बेडरूममध्ये शिरताच बेडरूमचे दार लोटून आतून कडी लावत ती त्याला म्हणाली. आईबाबांसमोर, इत्तरांसमोर ती त्याला अहो s जाहो म्हणत असली तरी दोघंच असताना मात्र ती त्याला अरेतूरे करत होती आणि त्यालाही ते खूप आवडत होते.

“ अरे वा ss! पहाटे पहाटे? नेकीं और पुछ पुछ ? “

तो मिश्कीलपणे डोळा बारीक करत म्हणाला. त्यावेळी तिच्या आवाजातला कोरडा आणि हुकमी स्वर त्याच्या ध्यानातच आला नाही.

“ उगाच लाडात येऊ नकोस.. उठून तू बाबांसाठी चहा करायचा आहेस.. मी कितीही तुला ‘नको,नाही म्हणले तरीही.. ‘ तू कशाला चहा करतोयस?  आता मी आहे ना..मी करते चहा ‘ असं  म्हणलं तरीही… चहा तूच करायचा आहेस हे लक्षात ठेव. “

“ए, मी नाही हं करणार चहा..”

ती आपली मस्करी करत आहे असे वाटून तो काहीसा लाडात येऊन, काहीसा चेष्टेने म्हणाला.

“ म्हणजे ? एकच लक्षात ठेव.. तू  करणार आहेस म्हणजे करणार आहेस.. “

ती काहीशा कठोरपणे म्हणाली .तिच्यातल्या या बदलाने तो आवाक होऊन तिच्याकडे पहात असतानाच ती हसत हसत म्हणाली,

“ कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे ठाऊक आहे ना..?  आत जायचं नाही ना तुला ?”

त्याने दचकून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले.  ती नेहमी जशी दिसते त्याहून वेगळीच भासली त्याला. तो अंतर्बाह्य थरारला. ‘ ही अशी काय वागतेय ? हिच्याशी एवढे प्रेमाने, समजुतीने वागूनही अगदी शांतपणे धमकी काय देतेय ?.. काही वाद, भांडण झाले असते आणि रागाच्या भरात बोलली असती तरी एकवेळ ते समजून घेण्यासारखं होते पण तसे काहीच नसताना, हे काय म्हणायचं ?…’ त्याच्या मनात विचार आला. त्याला तिच्या अशा वागण्याचं काहीच कारण कळेना पण तिच्या त्या वाक्याने त्याच्या मनात भीतीने घर केलं. तो मनोमन काहीसा घाबरलाय हे तिला जाणवले.. ती स्वतःशीच हसल्यासारखं हसून त्याला म्हणाली,

“ अरे, गंमत केली तुझी..”

ती ‘गंमत’ म्हणाली असली तरी ती गंमत नाही हे त्याच्या ध्यानात आलं होतं.

” आणि आपली ही गंमत कुणाला सांगायची नाही हं ! कुणाला म्हणजे कुणालाच. तुझ्या आई-बाबांनाही नाही. राहील ना हे तुझ्या लक्षात ? “

तो तिच्या बोलण्याने, तिच्यातील बदलाने अवाक होऊन तिच्याकडे पहातच राहिला होता.

               क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाठवणी… – लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ पाठवणी… – लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

फाल्गुनीचे लग्न ठरल्याची बातमी नातेवाईकात पसरली. तसे लपवण्यासारखे काही नव्हतेच. चारचौघासारखे पत्रिका बघून , दोघांच्या पसंतीने ठरलेल लग्न होते. शीतलच्या डोक्यावरचे ओझे उतरले अशी एक सर्वसाधारण प्रतिक्रिया नातेवाईक, शेजारीपाजारी होती.

फाल्गुनीला मोठं करताना, तिचे शिक्षण,  संस्कार याची जबाबदारी एकट्या शीतलनेच पार पाडली होती. प्रसाद बाबा म्हणून घरात होता. तसे तर चारचौघात दाखवण्यापुरता एक बिझनेस होता. जेमतेम उत्पन्न ही होते. पण तरी संसारात शीतल एकटीच होती.

फाल्गुनीचा नवरा ओजस एका साॅफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. सहा आकडी गलेलठ्ठ पगार, घर गाडी कशालाच कमी नाही. मोठ्या बहीणीचे लग्न होऊन ती तिच्या संसारात रमली आहे. त्याचे आईवडील रत्नागिरीत नोकरी करत असल्याने घरात कायम दोघेच राजाराणी.. हे समजल्यावर शीतलचा प्रवास बघणारे म्हणाले, “पोरीने नशीब काढले.. आईच्या कष्टाचे चीज झाले.”

शीतलला फाल्गुनीचे लग्न वेळेत ठरल्याचा फार आनंद झाला होता. फाल्गुनीचे सासर माहेर यात फारसे अंतर नव्हते ही अजून एक जमेची बाजू होती. शीतलला वाटले आपले माहेर पण जवळ असते तर परिस्थितीत खूप बदल झाला असता.

प्रसादशी लग्न होऊन शीतल पुण्यात आली. तिचे माहेर कोकणातले कुडाळचे. शीतलला लहानपणापासून शहराचे आकर्षण. तिचे शिक्षण झाले. तिच्या आईबाबांनी तिच्याकरता स्थळे बघायला सुरुवात केली.

मध्यम उंचीची, चारचौघींसारखी, सावळा रंग नि तरतरीत नाकाची शीतल स्वभावाने नावासारखीच शीतल होती. तिला वाटायचे, शहरातला नोकरदार मिळाला तर टुकीने संसार करता येईल. छोट्या गावात मोठ्या गावाची काय मजा असणार?

एका मध्यस्थाने पुण्यात रहाणाऱ्या प्रसादचे स्थळ आणले. स्वतःचा रहाता वाडा, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले वडील, दोन विवाहीत भाऊ, लग्न झालेली एक बहिण ही माहिती घरच्यांना पुरेशी वाटली. पुढे चारेक महिन्यात चांगल्या मुहूर्तावर लग्न करून ती पुण्यात आली.

लग्नाआधी प्रसादचा स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे एवढच तिला माहिती होते. ती एका शाळेत ज्युनियर शिक्षक म्हणून कामास होती. लग्नाआधी दोघे फारसे भेटलेच नाहीत त्यामुळे मनात रंगवलेले चित्र गृहीत धरून शीतलने प्रसादच्या घराचे माप ओलांडले.

हातावरच्या मेंदीचा रंग उतरण्यापूर्वीच तिला जाणीव झाली प्रसादच्या बेफिकीर स्वभावाची. त्याचा व्यवसाय होता पण तो मनापासून काम करत नसे. पोटापुरते मिळेल एवढ्यावर तो मात्र तो नक्कीच कमवत होता.

घरातली कोणतीच जबाबदारी घ्यायला प्रसाद तयार नसे. चार मित्र गोळा करावेत, गप्पा माराव्यात, बाहेर खावे प्यावे हेच त्याचे शौक होते. त्याच्या या बेफिकीर, लहरी वागण्यामुळे त्याला घरीदारी फारशी किंमत नव्हती.

शीतलच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरले. तिने प्रसादला समजवायचा हरप्रकारे प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.

तिने आधीच्या नोकरीच्या अनुभवाच्या जोरावर एका शाळेत नोकरी करायला सुरुवात केली. तिचे नियमीत पैसे येऊ लागल्यावर प्रसाद अधिक बेजबाबदार झाला. दोन वर्षांनी फाल्गुनीचे आगमन त्यांच्या संसारात झाले. जबाबदारी वाढली ती शीतलची! प्रसादच्या वागणूकीत फारसा फरक पडला नाही.

फाल्गुनीच्या तिसऱ्या वाढदिवसाला शीतलच्या मनात फाल्गुनीला सोन्याचे डूल करावे असे होते. तिने हौसेने पगारातून पैसे साठवले होते. बँकेत पैसे काढायला गेली तेव्हा प्रसादने खात्यातून काही पैसे काढले होते. उरलेल्या पैशात फाल्गुनीचे कानातले झाले नसते. शीतलचा पारा चढला. तिने घरी येऊन खूप आदळआपट केली. फाल्गुनीचे कानातले होणार नाही याचे प्रसादला वाईट वाटले पण हे वाईट वाटणे फोल असणार हे तिला समजून चुकले होते.

तिच्या सासूबाई तर हरल्या होत्या मुलासमोर. सासऱ्यांच्या सांगण्यावरून तिने प्रसादच्या नकळत दुसरे खाते काढले. त्याचे चेकबुक,  पासबुक सासूबाईंकडे ठेवले. दर महिन्यात त्या खात्यात ती पैसे साठवू लागली.

प्रसादने चौकशी केली. “एवढे पैसे कशाला लागतात काढायला?” त्याने पासबुक बघत विचारले.

“सलग दोन महिने घर चालवून बघा. किती नि कुठे पैसे लागतात हे समजेल.” तिने पोळी लाटता लाटता त्याला ठणकावून सांगितले.

“जास्त ऐट करू नको पैशाची..”

“पैशाची ऐट म्हणता? माझ्या पैशावर चाललय घर. ना गाठीशी पैसा ना अंगावर दागिना. नवऱ्याच्या जीवावर बायकोला आवडते ऐट करायला, ज्यादिवशी तुम्ही माझी हौस पुरवाल तेव्हा करेन ऐट! समजले? ” तिने हल्ला परतवला.

प्रसाद समजून चुकला होता. बायको बदलू लागली आहे. प्रसंगी उलट उत्तर देऊ लागली आहे. याकरता तोच जबाबदार होता.

मे महिन्याच्या सुट्टीत प्रसादच्या फॅब्रिकेशन युनिटचा एक माणूस प्रसादला शोधत घरी आला. तो घरी नव्हताच. शीतलने फाल्गुनीला घेतले नि गाडीवर काढून ती तिकडे पोचली. यापूर्वी ती तिकडे आली होती. तिला आलेले बघून कामगार चपापले. तिने तिथेच शेडमध्ये बसून काय प्राॅब्लेम झाला आहे हे समजून घेतले. अर्ध्या तासात तिने प्रश्न सोडवला. युनिटचे लाईट बिल भरायचे होते. एकदोघांचे पगार राहिले होते. तिने येणी किती आहेत ते तपासले नि कपाळावर हात मारून घेतला. पुढल्था दोन दिवसात तिने तिथली व्यवस्था लावून दिली. प्रसादला समजले तेव्हा तो खजील झाला. पुढचे दोनचार महिने चांगले गेले. शीतलला वाटले सुधारली परिस्थिती पण अशी इतक्यात तिची सुटका नव्हती.

फाल्गुनी आईची तारांबळ बघत मोठी झाली. ती हुशार होती, मेहनती होती. भरभर शिकत गेली. आईला त्रास होऊ नये याचा फाल्गुनीचा प्रयत्न बघितला की शीतलला रडू यायचे. ‘इतके समंजस बाळ दिलंय देवाने पोटी.. मी कमी पडले आई म्हणून!’ ती सर्वांना डोळ्यात पाणी आणून सांगायची.

फाल्गुनी शिकत असताना शीतलने तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मायलेकींच्या जगात प्रसाद आता कुठेच नसायचा. त्याचेही वय होऊ लागले होते पण सवयी, बेफिकीरीत फारसा फरक नव्हता. घरात दोन तट पडल्यासारखे झाले होते. प्रसाद एकाकी झाला होता.

फाल्गुनीचे घरचे केळवण म्हणून घरचे सगळे जमले होते. पंचपक्वान्नाचा बेत होता. लाल रंगाचा सोनेरी जरतारी काम असलेला अनारकली घातलेली फाल्गुनी खरच सुंदर दिसत होती. तिच्या थट्टेला उत आला होता. तिचे हसणे, लाजणे बघून शीतलला भरून येत होते. ही सासरी गेली की मी एकटी पडणार या विचाराने तिचे डोळे पाण्याने भरून येत. तिच्या जावेने तिच्या पाठीवर थोपटताच शीतल तिच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडू लागली. हसरे वातावरण एकदम तंग झाले.

“बाई गं, लेकीची पाठवणी सोपी नसते आईला. जगरहाटी आहे ती. पोटात किती तुटते ते लग्न झालेल्या मुलीची आईच फक्त जाणे.” सासूबाईनी तिची समजूत घालायचा प्रयत्न केला. शीतलने समजून पदराने डोळे पुसले. कोणीतरी पाण्याचा ग्लास आणून दिला त्यातले पाणी प्यायली.

एवढ्यात फाल्गुनी पुढे आली म्हणाली, “आई, आजी, काहीतरी बोलायचंय मला. पाठवणी माझी एकटीची नाही आईची पण होणार आहे..पण ती तयार झाली तर..” सगळे फाल्गुनीकडे आश्चर्याने बघू लागले.

“म्हणजे ग काय? ” शीतलने विचारले.

“आई, पंधरा दिवसांपूर्वी आपण कुडाळला गेलो होतो. तेव्हा तु शिकवायचीस ती शाळा दाखवलीस. मी संध्याकाळी देवीचे दर्शन घेऊन येताना सहजच शाळेत गेले. तिथे योगायोगाने माझी भेट तिथल्या मुख्याध्यापिकांशी झाली. त्यांना वाटले मी शाळेची माजी विद्यार्थीनी आहे. त्यांना तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना तुझी प्रगती ऐकून खूप छान वाटले.

त्यांनी रस दाखवला तेव्हा तुझा बायोडेटा माझ्या मोबाईलमधे होता तो दाखवला. तुझ्या इतका अनुभव असणारे शिक्षक शाळेला हवे आहेत असे त्या म्हणाल्या. तु तयार झालीस तर शाळेची दुसरी शाखा या जूनपासून सुरू होते आहे तिकडे तुला पर्यवेक्षिका म्हणून रूजू होता येणार आहे. पगार, महागाई भत्त्यात वाढ आहेच, पण मानही वाढेल.” फाल्गुनी सांगत होती आणि ऐकणारे चकित होत होते.

“आई, खूप केलस घराकरता नि माझ्याकरता. आता स्वतःकरता जगून घे, नवे अनुभव घे. नाही आवडले तिकडे तर मोकळ्या मनाने इकडे परत ये.. पण आलेली संधी घालवू नकोस. तुझ्या माहेरच्या माणसात, तुझ्या लाल मातीत मनमुराद आनंद लुट. तुझा हक्क आहे त्यावर.” फाल्गुनी मनातले बोलत होती.

“कुडाळला? मी अजिबात जाणार नाही. किती छोटे गाव आहे ते.” प्रसाद म्हणाला.

“बाबा, या सीनमध्ये तुम्ही तुमच्या कारखान्यासकट पुण्यातच रहा. आईला एकटीलाच जाऊ दे.” हे ऐकताच प्रसादला खूप राग आला.

फाल्गुनी आणि शीतल वगळून त्याला फारसे कोणी कधी मोजलेच नव्हते. त्याला अजून एकटेपणाच्या झळांची जाणीव नव्हती. शीतल थक्क झाली. जे घडत होते ते अविश्वसनीय  होते. शीतलचे सासूबाई नि सासरे यावेळीही तिच्या पाठीशी होते. ते दोघे फार थकले होते. सूनेने आनंदी रहावे असे मात्र त्यांना वाटत होते.

फाल्गुनीच्या लग्नाबरोबरीने शीतलच्या पाठवणीची पण तयारी सुरू झाली. नव्या जोमाने शीतलने जमवाजमव केली.

फाल्गुनी आणि ओजस पुण्यात परत आल्यावर मे महिन्याच्या  शेवटच्या आठवड्यात शीतलने पुणे सोडले नि डोळ्यात स्वप्न घेऊन कुडाळच्या गाडीत पाऊल ठेवले.

लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार

 पुणे, २४/०२/२०२३

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आयुष्य हे… – लेखिका- सुश्री सायली साठे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ आयुष्य हे… – लेखिका- सुश्री सायली साठे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

“आता फार काही करु नका डॉक्टर, आता 87 वर्षांची झाले मी, किती त्रास द्यायचा सगळ्यांना.” राजे आजी म्हणाल्या..

“अहो आजी, पण तुमच्याकडची माणसं सगळी चांगली आहेत, किती काळजी घेतात तुमची.. नाहीतर बरेच लोक एवढ्या म्हाताऱ्या लोकांची काळजीचं घेणं बंद करतात.. त्यांच्यासाठी तरी असं म्हणू नका ” डॉक्टरांनी आजींना समजावलं.

“ते बाकी खरंय, पण करायचं काय एवढ्या आयुष्याचं.” आजी निश्वास टाकत म्हणाल्या.

संध्याकाळी शेजारच्या बेड वर एक नविन पेशंट आला.. पोरगेलासा.. अगदी 22 23 वर्षाचा असेल.. आजींचे लक्ष जाताच त्यांच्याकडे बघुन हसला.. आजी नुसत्या बघत राहिल्या..

सकाळी काहीतरी गुणगुणत होता तो.. आजींचे लक्ष गेले तशी तो थांबला.. “किती दिवस झाले? नविन दिसत्ये आजे ” त्याने विचारले.

“हो, कालच ऐडमिट झाल्ये..” आजी उत्तरल्या..”

“मी परमनंट मेंबर बरं का, काही लागलं तर आपल्याला सांगायचं, इकडे सगळे ओळखतात आपल्याला.” तो हसत म्हणाला.. त्याची धीटाई बघुन आजींना पण हसू आले..

दुपारी आजींना एकदम आठवले तसे त्यानी विचारले, “सकाळी काय गुणगुणत होतास रे?” त्यांनी त्या मुलाला विचारलं.

मुलगा हसला, म्हणाला “त्याला रॅप म्हणतात आजे.. एक नंबर बनवतो आपण.. कोणत्या पण सब्जेक्ट वर.. तू तुझा आवडता सब्जेक्ट सांग.. मी तुला रॅप बनवून दाखवतो.”

आजी हसल्या. म्हणल्या, “माझा आवडता सब्जेक्ट म्हणजे माझा कृष्ण, त्याच्यावर करशील तुझा रॅप?”

“थोडा difficult सब्जेक्ट आहे पण जमेल.. थांब जरा” असं म्हणत त्याने थोड्या वेळात खरचं कृष्णावर रॅप म्हणून दाखवला.. थोड्या वेगळ्या ठेक्याचा गाण्याचा प्रकार ऐकुन आजींना मजा वाटली..

रोज त्याच्याशी बोलण्यात वेळ जाऊ लागला.. सतत काही ना काही बोलत असायचा.. बुधवार आला तसं आजींचा मुलगा आणी सुन हॉस्पिटल मधेच केक घेउन आले छोटासा.. त्यालाही दिला, तसं तो म्हणाला “एवढी म्हातारी वाटत नाही गं तू आजे..”

“झाले खरी एवढी म्हातारी, काय करु सांग.. आता काय येईल तो दिवस आपला.” आजी थोड्या नाराजीनेच  म्हणाल्या.

त्यांना निरखत तो म्हणाला “आजे, तुला देऊ का एक काम मग?”

हसू आवरत आजींनी विचारलं “कसलं काम रे, झेपणारं दे बाबा ह्या वयात.”

तसं तो म्हणाला, “काळजी करु नको आजे, तुला जमेल मस्त..  फक्त तू मनावर घ्यायला पाहिजे” तो म्हणाला..

“बघ आजे, मी काही दिवस आहे फक्त.. तुझ्यासारखं म्हातारं व्हायचं होतं मला पण तो तुझा कृष्ण तिकडेच बोलावतोय.. माझ्यासारखे किती असतील.. एवढं मोठं आणि छान आयुष्य मिळालंय तुला..

असं जेव्हा तुला वाटेल ना ,की फार आयुष्य आहे, तेव्हा आम्हाला आठव आणी आमच्यासारख्यांच आयुष्य पण तुच जग.. एकदम रापचिक स्टाइल ने.. आपल्या रॅप सारखं…” आजी त्याच्याकडे बघतच राहिल्या.

दूसऱ्या दिवशी आजीना डिस्चार्ज मिळाला.. तेव्हा शेजारचा बेड मोकळा होता.. आजी काय समजायचं ते समजल्या..

घरी आल्यावर आजींमधे खुप बदल झाला.. घरी एका खोलीत असणाऱ्या आजी आता सगळ्यांमधे मिसळत होत्या.. काहीबाही पदार्थ करत होत्या.. त्यांची आवडती पेटी माळ्यावरुन खाली आली होती.. घरातल्या सर्वांना फार फार बरे वाटत होते..

आजी आता भरभरुन जगण्याचा आनंद घेत होत्या.. ज्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी.. आणी.. त्याच्यासाठीही…

लेखिका- सुश्री सायली साठे

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संस्कार – लेखिका : सुश्री श्वेता कुलकर्णी ☆ श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆  संस्कार – लेखिका : सुश्री श्वेता कुलकर्णी (अलका) ☆ प्रस्तुती श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

गेल्या वर्षीची गोष्ट…

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अगदी तसंच महत्त्वाचं काम निघालं म्हणून अगदी टळटळीत उन्हातून दुपारी रविवार पेठ भागात गेले होते ….एरवी या गजबजलेल्या व्यापारी पेठेत जाणं नको वाटतं…

कोविडची भीती बरीच कमी झालेली. त्यामुळे नेहमीसारखंच वातावरण होतं. अरुंद रस्ता.. दुतर्फा लहानमोठी दुकानं.. टेम्पोमधून माल उतरवून घेण्याची घाई.. वाट काढत नागमोडी जाणाऱ्या दुचाकी आणि रिक्षा.. वाहनांना चुकवत चालणारे पादचारी.. कर्कश हॉर्न…

एरवी अशा गदारोळात चालताना इकडे तिकडे न बघता मी वाहनाचा धक्का लागणार नाही ना या काळजीने स्वतःला सांभाळत चालते…. पण त्या दिवशी त्या गर्दीत सुद्धा डावीकडे असलेल्या एका साड्यांच्या दुकानाकडे लक्ष गेलं…

लहानसं दुकान. शोकेसमध्ये पाच सहा साड्यांचा सुरेख display. दाराजवळ हिरवीकंच साडी परिधान केलेली मॉडेल. तो रंग दुरून सुद्धा मनात भरला. साडी खरेदीचा विचार त्या क्षणापर्यंत मनात आला सुद्धा नव्हता, पण आपसूकच पावलं दुकानाकडे वळली.

पुतळ्याचा सुबक चेहरा, ओठांवर छानसं स्मितहास्य कोरलेलं. डौलदार हातावर जरीचा पदर लहरत होता. त्या हिरव्यागार रंगाच्या, बारीक जरी बॉर्डर आणि नाजूक बुट्टे असलेल्या आकर्षक साडीमुळे पुतळ्याला सोज्वळ सौंदर्य प्राप्त झालेलं…!

साडी हातात धरून पोत पाहिला. सिल्क बरं वाटलं. लहान बॉर्डर तर माझी आवडती. किंमत सुद्धा परवडण्यासारखी. आणि झाडाची पालवी तरुण होताना जो हिरवा रंग धारण करते त्या रंगाची सुरेख हिरवीगार छटा. म्हटलं मंगळागौर येईल तेव्हा सुनेच्या हातात हीच साडी ठेवावी. परत अशी सुरेख साडी मिळेलच असं नाही. आणि दूर रहायला गेल्यामुळे लक्ष्मी रोडवर सारखं येणं सुद्धा आताशा होत नाही… अशाच विचारांमध्ये दुकानात शिरले.

दुकानदार तरुण मुलगा होता. 27/28 वर्षांचा असेल. “अगदी सेम अशीच साडी दाखवा…” पुतळ्याकडे निर्देश करून त्याला म्हटलं…

“Sorry मॅडम… हरएक पीस अलग है.. लेकिन और साडी तो देखो….”

मी थोडी नाराजीने दुकानात गेले. त्याच्या व्यापारी कौशल्यानुसार त्याने  ‘सकाळपासून एकही साडी विकली गेली नाही.. तुमच्या हातून भोवनी होऊ दे.. नवीनच स्टॉक आहे… discount पण मिळेल…’ अशी सर्व बडबड करत माझ्यापुढे साड्यांचा एक लहान ढीग टाकला. मला एकही साडी आवडली नाही. “नको” म्हणत मी दुकानातून बाहेर पडण्याची तयारी केली…

मघापर्यंत टळटळीत वाटणारी उन्हं अचानक खूप मंदावली होती. थोडा वाराही होता. अवेळी पावसाची शक्यता वाटत होती…

“आपको वही साडी पसंद आई है ना मॅडम? कल मै आपको वह साडी दे सकता हुं… कल आके लेके जाना प्लीज… क्षमा करे लेकिन आज नहीं दे सकते…”

दुसर्‍या दिवशी केवळ साडी साठी दूरवरून परत त्या भागात मी येणं शक्य नव्हतं. मुलगा नम्र होता म्हणून म्हटलं, “ठीक है, कोई बात नही, फिर कभी दुसरी एखाद साडी लेके जाऊन्गी।” म्हणत मी बाहेर पडले आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला लागलेच. तो मुलगा धावतच बाहेर आला आणि सांभाळून त्याने पुतळा दुकानात नेला.

पावसात भिजत जाणं शक्य नव्हतं म्हणून मीही परत दुकानात दाराजवळ थांबले. आता परत थोडा वेळ त्याची बडबड ऐकावी लागणार म्हणून माझा चेहरा थोडा त्रासिक झाला…

“कल चाहिये तो कुरिअर कर सकते है.. वह चार्जेस आप देना.. आज भागीदार कामकी वजहसे बाहर गया है.. कल उसको कुरिअर के लिये बोलता हूॅं।”

“मॉडेलची साडी नको. तुम्ही किती दिवस ती बाहेर ठेवत असाल. धूळ बसत असणारच. तसाच दुसरा पीस असला तरच मला हवा होता…”

“क्या है ना मॅडम, बिझिनेस छोटा है.. नया भी है.. तो बहुत ज्यादा stock नही रखते। Model की साडी दुकान बंद होनेके बादही रोज चेंज करते है… ताकी साडी खराब ना हो….” आणि मग पुतळ्याकडे निर्देश करून म्हणाला, “इनका भी सन्मान रखते है.. इनमे जान नही है तो क्या… नारी है… किसीकी नजर बुरी होती है इसलिये दुकान बंद होनेके बादही चेंज करते है।”

त्या शब्दांनी एकदम मनात काहीतरी चमकलं….असेच किंवा या अर्थाचे शब्द मी फार पूर्वी याच संदर्भात ऐकले आहेत…. स्मृतींचे दरवाजे उघडले… सर्व लख्ख आठवलं….

मी तेव्हा कॉलेजमध्ये अगदी पहिल्या दुसर्‍या वर्षात होते. माझी मामेबहीण माणिक मुंबईहून आमच्याकडे आली होती. लग्नाच्या वयाची, सुरेख, पदवीधर मुलगी…. योगायोगाने त्याच वेळी माझ्या आई वडिलांच्या घनिष्ठ ओळखीच्या एका डॉक्टरांचा मुलगा सुद्धा रत्नागिरीत आला होता. आईला माणिकसाठी ते स्थळ फार योग्य वाटलं होतं. त्यामुळे तेव्हाच्या प्रथेप्रमाणे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरला…

माणिक तयार झाली आणि आमचे डोळे विस्फारले! मुळात माणिकला अनुपम सौंदर्याची देणगी होतीच…आणि त्यात तिने नेसलेल्या सुरेख साडीमुळे ते सौंदर्य आणखी खुललं होतं… त्या वेळी मैसूर जॉर्जेट साड्यांची फार फॅशन होती. केशरी रंग, लहान बॉर्डर आणि अंगभर नाजूक सोनेरी बुट्टे… माणिकचा केतकी वर्ण त्या केशरी साडीमध्ये तेजस्वी वाटत होता…

नंतर माणिकने सांगितलं की पदवीधर झाल्याचं बक्षीस म्हणून वडिलांनी… म्हणजे माझ्या मामाने तिला साडी घेण्यासाठी पैसे दिले…. माणिक दुकानात गेली तर आतमध्ये मॉडेल च्या अंगावर ही सुरेख केशरी साडी होती. माणिकला तीच साडी पसंत पडली. दुकान मोठं होतं. त्यांनी ढीगभर साड्या दाखवल्या. पण तिला दुसरी कुठलीच साडी आवडेना.

दुकानातल्या लोकांनी तिला सांगितलं की ती साडी आज मिळू शकत नाही. त्यासाठी परत दुसर्‍या दिवशी यावं लागेल. मुंबईतल्या अंतराचा आणि लोकल ट्रेन, बस यांच्या गर्दीचा विचार करता ते शक्य नव्हतं… तरुण वय…. डोळ्यांना पडलेली साडीची भूल यामुळे तिथून तिचा पायही निघत नव्हता…

दुकानाचे मालक प्रौढ गृहस्थ होते… ते तिला म्हणाले, “बेटा, ही साडी बदलण्याचा एक रिवाज आम्ही सांभाळतो. रोज दुकान बंद केल्यावर या मूर्तीच्या चारही बाजूनी पडदे लावून मग आम्ही मूर्तीची साडी बदलतो. दुकानातला बाकी स्टाफ तेव्हा काम आवरत असतो. साडी बदलणारे लोकही ठराविक दोघे आहेत. इतर कोणाच्या नजरेसमोर हे काम केलं जात नाही. ही दगडी मूर्ती आहे. पण देह तर स्त्री चा आहे ना… तिला योग्य मान देणं… तिचं लज्जारक्षण करणं आमचं कर्तव्य आहे !”

माणिक प्रभावित झाली… लगेच म्हणाली की “मी उद्या परत येऊन ही साडी घेऊन जाईन…”

आम्हाला तेव्हा त्यांचे विचार ऐकून फार भारी वाटलं होतं….

ते दुकान मुंबईत होतं… हे पुण्यात… ते गृहस्थ या मुलाचे आजोबा.. पणजोबा असण्याची शक्यता पण कमीच… पण तरीही जवळपास तशाच प्रसंगात आज इतक्या वर्षांनी मी त्याच अर्थाचे शब्द या तरुण मुलाच्या तोंडून ऐकत होते…. कदाचित साड्या विकण्याचा बिझिनेस करताना समस्त स्त्री वर्गाबद्दल आदर वाटावा यासाठी सुद्धा असे संस्कार करत असतील… ते प्रत्येक पिढीत झिरपत येत असतील… असं मला वाटून गेलं!

इतक्यात त्याचा बाहेर गेलेला भागीदार परत आला. पाऊस कमी झाला होता म्हणून मी निघण्याची तयारी केली. त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं.

भागीदार म्हणाला, “ऐसा एक अलग कलर का पीस है… वह दिखाया क्या?” त्याने कोणत्या कपाटात ती साडी आहे ते सांगितलं. दोघांनी मला आणखी दोन मिनिटं थांबून ती एक साडी बघण्याची कळकळीची विनंती केली. खरंच दुसर्‍या मिनिटाला तो मुलगा साडी घेऊन आला. तशीच सेम लहान बॉर्डर, तसेच नाजूक बुट्टे, तसाच पदर…. रंग मात्र जांभळा होता….

ही पण साडी चांगली होतीच…पण त्याहून चांगले होते ते त्या तरुण दुकानदाराचे विचार… त्याचे संस्कार.. त्याची स्त्री कडे पाहण्याची दृष्टी…

मी लगेच ती जांभळी साडी खरेदी केली… पैसे दिले.. आनंदाने दुकानातून बाहेर पडले… न ठरवता केलेली ही साडी खरेदी मला अविस्मरणीय वाटते!

एकीकडे रोज खून, बलात्कार, चारित्र्यहनन, कौटुंबिक हिंसा, याबद्दल च्या बातम्या वाचून निराशेने मनाचं शुष्क वाळवंट होत असताना हे असे तुरळक ओअसिस मनाला उभारी देतात!

लेखिका – सुश्री श्वेता कुळकर्णी (अलका)

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऐसे हळूवारपण – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ 🔸 ऐसे हळूवारपण 🔸 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी एक लग्न झालेली मैत्रीण सुमती, तिच्या घरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. नागपूरचे उन्हाळ्याचे दिवस. कडक उन्हाळा पण कुलरमध्ये आम्हाला दोघीनाही घुस्मटल्यासारखं व्हायचं, म्हणून चक्क खिडक्या उघड्या ठेऊन आम्ही पंखे लावून बसायचो.

ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायात  सांगतात,’ अध्यात्म शिकायला पाहिजे ते ‘चकोर तलग्यासारखं’ – चकोराच्या पिल्लासारखं!  त्याप्रमाणे हळूवार मन करून ही कथा ऐका.

चांदणं पिऊन जगणारा हळूवार चाकोर, त्याची पिल्लं– म्हणजे किती नाजूक कल्पना.  हळूवारपणाच्या या व्याखेनेच वाचतावाचत्ता आम्ही मुग्ध झालो. क्षणभर स्तब्ध होऊन बाहेर पहात होतो.

रस्यावर शुकशुकाट होता. काम्पौडच्या बाहेर एक बाई होती. नऊवारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. डोक्यावर पाटयाचा दगड, हातात अवजारांची पिशवी, पायात टायरच्या रबराच्या केलेल्या चपला. उन्हाने दमली होती. घामाघूम झाली होती. बाहेरच्या झाडाशी ती थांबली.

डोक्यावरचा पाटा खाली ठेवला. पदराने घाम पुसत व त्यानेच वारा घेत ती उभी होती. रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती. ती तशीच उभी राहिली.

सुमती पटकन उठली, बाहेर जाऊन त्या बाईला घरात बोलावून आणलं. बाई व्हरांड्यात आली. उन्हातून आल्यावर नुसतं पाणी पिऊ नये, म्हणून सुमतीने तिला गुळ आणि पाणी दिलं. बाई खुश झाली. ‘बाई, केव्हढं उन्ह आहे बाहेर…’

बाईच्या रापलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हातांकडे पहात सुमती म्हणाली. बाईचं जळून गेलेले नाजूकपण ती न्याहळत होती. छिन्नी हतोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई वयाने फार नसावी, पण उन्हाने का परीस्थीतीने वाळली होती. पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते  ‘पाटे टाकवण्याच’ काम ती करीत होती.

‘किती घेता पाटयाचे?’

‘दोन रुपये.’

‘अशी किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला?‘

‘दहा मिळाले तर डोक्याहून पानी’ ती

‘नवरा आहे?’

‘नाही, सोडचिट्ठी दिली त्याने, दुसरा पाट बी मांडला.’

किती सहज ती ‘डिव्होर्स’ बद्दल बोलत होती? उन्हात रापता रापता हिच्या संवेदनाही रापल्या असतील का?

‘मुलं आहेत?’ सुमती.

‘दोन हायेत.’ ती

‘शाळेत जातात?’

कधी मधी! पाऊस झाला, अन् शेण गोळा कराया न्हाई गेले, तर सालेत जातात कारप-रेशनच्या’

२० रुपये रोजात दोन मुलं आणि ही बाई रहातात. त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हिंडते. मुलं जमलं तर जातात शाळेत. नवरा नाही. किती अवघड आयुष्य!

सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं. ‘ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल…’ चा मला साक्षात्कार होत होता.

सुमतीची सहृदयता मला माहीत होती. घरची मोलकरीण, पोळयावाली, धोबी हे सगळे जणूकाय तिचे ‘कुटुंबिय’च होते. पण ही कोण कुठली बाई, तिच्या कष्टांचाही सुमतीला ताप होत होता. ‘केळीचे सुकले बाग असुनिया पाणी’ तशी इतरांच्या दु:खात ही कोमेजते.

‘पन्ह घ्याल?’ सुमतीने तिला विचारलं.

‘नाही बाई, काम शोधाया पाहिजे. ‘येर’(वेळ) घालवून कसं व्हईल?’

‘एक मिनिट थांबा, माझा पाटा टाकवून द्या’ सुमतीने आतून पाटा आणला. तिच्यासाठी काम काढलं. त्याचे २ रुपये झाले. सुमतीने तिला पाच रुपये दिले.

‘नको बाई, कामाचे पैशे द्या फक्त.’ ती म्हणाली. बाईच्या स्वाभिमानाचं कौतुक वाटलं.

‘बर, थांबा एक मिनिट’ आणखी काम द्यायचं, म्हणून सुमतीने आतून वरवंटा आणला.

‘याला टाकवा.’ तिने वरवंटा पुढे केला.

बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला. छातिशी घट्ट धरला. आणि म्हणाली,

‘लेकरू आहे ते! त्याला टाकवत नाही’

जणू काय एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती.

बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात, तो संदर्भ! अशा ‘लेकराला’ छिन्नी हातोड्याचे घाव घालायचे, या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते.

अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती. नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला व नंतर परत दिला.

‘ऐसे हळूवारपण जरी येईल’ … चकोरतलग्याचं हळूवारपण त्या दोघींच्या रुपाने माझ्यापुढे जिवंत उभं होतं.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शंभरावा दगड… अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ शंभरावा दगड… अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

कथा

एक युवक साधूकडे गेला आणि म्हणाला, मी खूप प्रयत्न करतोय पण मला यश हुलकावणी देते, काय चूक होत आहे, मला कळू शकेल का?

साधू म्हणाले एक काम कर, बाजूला नदी आहे त्या नदीतून समान आकाराचे शंभर गोटे घेऊन ये, मग मी पुढे काय करायचं ते सांगतो. आज्ञेप्रमाणे युवक नदीकाठी जाऊन साधारण समान आकाराचे शंभर गोटे घेवून साधूकडे घेऊन आला. साधूनी पूढ़े सांगितले, हे पहा,  आपल्या आश्रमासमोर जे पटांगण आहे तिथे एक खांब रोवलेला आहे, त्या खांबापासून शंभर फुटावर एक चबुतरा आहे, तुला तिथे उभे राहायचे आहे आणि एक एक गोटा त्या खांबाला फेकून मारायचा आहे. तुझा जो गोटा खांबाला लागला, तिथे थांब आणि माझ्याकडे परत ये. तूझा फेकलेला गोटा खांबाला लागला तर जीवनात यशस्वी होशील आणि जर तुझा कोणताच गोटा लागला नाही तर तू आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाहीस.

ठरल्याप्रमाणे युवक सर्व गोटे घेऊन खांबापासून शंभर फुटावर असलेल्या चबुतऱ्याजवळ उभा राहिला आणि एक एक गोटा त्या खांबाला मारत राहिला. पहिले पंचवीस तीस दगड त्या खांबापर्यंत पोहोचलेच नाहीत. या टप्यावर त्याने थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा बळ एकवटून एक एक गोटा फेकण्यास सुरुवात केली. आता त्याने मारलेले गोटे खांबाच्या आसपास पोहोचू लागले पण खांबाला मात्र एकही गोटा लागला नाही.

अर्थात तो थोडासा निराश झाला, पाहता पाहता त्याच्याकडे केवळ पाचच गोटे उरले जे त्याला अगदी मन लावून ते फेकणे आवश्यक होते. संपूर्ण एकाग्र चित्त  करून शेवटचे पाच गोटे पुन्हा जोर लावून फेकण्यास त्याने सुरुवात केली आणि काय आश्चर्य शंभरावा गोटा खांबाला अचूक लागला.

अत्यंत आनंदाने ओरडत, युवक पळत आश्रमात येऊन  साधू ना घडलेला वृत्तांत सांगू लागला. साधू म्हणाले, तुला यातून काय बोध घ्यायचा आहे ते मी आता समजावून सांगतो.

प्रथम माझ्याकडे भरपूर गोटे आहेत, आणि काम खूपच सोपे आहे, म्हणून मी ते सहज करू शकतो या विचाराने  पहिले काही गोटे तू बेफिकिरीने फेकलेस, म्हणून लागले नाहीत.

इथे तुझा दृष्टिकोन उथळ होता.

मात्र जेव्हा पहिल्या तीस पैकी एकही गोटा खांबाला लागला नाही, तेव्हा तुझ्या मनात कुठेतरी भिती निर्माण होऊ लागली, आणि तू किंचित चिंताग्रस्त झालास.

त्यानंतर तू एक छोटीशी विश्रांती घेतलीस, नियोजन केले, योजना आखलीस आणि पुन्हा नव्या दमाने उरलेले दगड फेकू लागलास. या काळात बेफिकिरी जावून हळू हळू तू एकाग्र होऊ लागलास, म्हणून तुझे दगड खांबाच्या आसपास पोहोचू लागले, यातून तुला दगड फेकण्याची विशिष्ठ लय सापडली.

लय सापडली खरी, पण अजुन तुझे चित्त म्हणावे तितके एकाग्र झाले नाही.

आता जेव्हा शेवटचे पाच गोटे उरले, तेव्हा तू गंभीर झालास. जर आता माझा कोणताच गोटा लागला नाही तर, मी आयुष्यात पूर्णतः अपयशी होणार ही भिती तुला सतावू लागली. इथे तू तुझ्या इष्ट दैवताचे नाव घेवून, चित्त एकाग्र करून, लय साधून गोटे फेकू लागलास, आणि तुझा शंभरावा दगड खांबाला अचूक लागला.

मला अंतर्ज्ञानाने माहित झाले होते की तुझा शेवटचा गोटा खांबाला लागणार आहे. पण मी जर तुला ते आधीच सांगितले असते तर, तू पूर्णपणे बेफिकीर राहिला असतास, त्याचा शेवट असा झाला असता की तुझा कोणताच गोटा खांबाला लागला नसता. याचा परिणाम म्हणजे, माझ्यावरचा तुझा विश्वास उडाला असता, आणि मी भोंदू आहे असा तू निष्कर्ष काढला असतास.

बोध

लक्षात ठेव, उथळ वृत्तीने केलेल्या कामात कधीच यश मिळत नाही. नोकरी, व्यवसायात सुद्धा आपले सातत्य, एकाग्रता, व चित्त केंद्रित असेल तरच यश मिळते. आता तूला लक्ष कसे साध्य करायचे याचे आकलन झाले आहे असे मी मानतो.

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कडुलिंबाची फांदी… ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆

? जीवनरंग ?

☆ कडुलिंबाची फांदी… ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆

“हे घे अमृता” म्हणत त्यांनी लोणच्याची वाटी त्या भगदाड पडलेल्या भिंतीवरून दिली. हसत त्या अमृताला म्हणाल्या, “काय ग, वर्ष झालं असेल नाही का आपल्या मैत्रीला?”

अमृता म्हणाली, “नाही, वर्ष नाही झालं. पण होत आलं असेल. मागच्या लॉकडाऊन नंतर त्या तुफान पावसात पडलेली ही भिंत आणि मग दिसणारे आपले चेहरे.”

काकु म्हणाल्या,” कधी मन एकरूप होत गेले कळलंच नाही. पण बरं त्या कोरोनाच्या दुष्ट काळात जरा सोबत असल्यासारखं वाटलं. गप्पांमुळे मन मोकळं होत राहीलं ना. एकतर सगळेच घाबरत होते एकमेकांकडे जायला आणि फोनवर पण तोच विषय. कोरोनाचा. त्यापेक्षा आपलं मस्तच जमलं. दुपारी दासबोध काय, संध्याकाळी रामरक्षा, आणि तू ही तुळस इथे ठेवलीस हे बरं केलंस. तुझं माझं अंगण जोडलं ना तिने. पण परत तुझं ऑफिस, मग भेटी कमी झाल्या पण ओढ कायम हं.”

त्यांचं वाक्य तोडत अमृता म्हणाली, “आणि ह्या खाऊने तर अजूनच लज्जत वाढवली जगण्याची. किती चव आहे काकु तुमच्या हाताला. मला एकदा घरी येऊन गरमगरम पोटभर जेवायचं आहे तुमच्या हातचं. पण अजून घरी येण्याचे काही योग दिसत नाहीत. तुमच्या त्या रस्त्याचं काम किती रखडलं आहे. तुम्ही कसं करता काही लागलं तर?”

काकु म्हणाल्या, “अग लागतंच किती दोघांना, आणि फोनवर मागवतो किराणा, भाजीपाला, दूध. आम्ही कुठे जात नाही आणि इथून तुझं घर मला बऱ्यापैकी दिसतं. माझंच ह्या भिंतीआड असल्याने लक्षात येत नसेल तुझ्या. थोडं खोलवर पण आहे ना आमचं घर. जाऊ दे आपले चेहरे दिसतात हेच खूप आहे…”

“हो ना काकु, आणि माझे डोहाळे तुम्ही ह्या चार महिन्यात हा खाऊ देऊन पुरवत आहात, मला तर आईच्या रुपात भेटल्या तुम्ही.”

हे असं सगळं चालु होतं आणि पाडव्याची चाहूल लागली. पलीकडची काकूंच्या घराची  योजना नेमकी लक्षात येत नव्हती, पण एक कडुलिंबाची फांदी काकूंच्या डोक्यावर होती. अमृताने आदल्या दिवशीच सांगुन ठेवलं, “काकू, उद्या ती फुलं असलेली फांदी मला द्या हं तोडून.” काकूंनी फक्त फांदीकडे बघितलं आणि काहीच बोलल्या नाहीत.

सकाळी सकाळी अमृताने सुंदर रांगोळी काढली, सुंदर जरीची साडी नेसली. नवरोबा सुद्धा तयार झाले. मंद मोगऱ्याचा गजरा केला. गुढी उभारताना सुंदर जरीच्या साडीवर गाठी, गजरा सगळं घातलं आणि कडुलिंब राहिला की!

अमृताच्या लक्षात आलं तशी तिने भिंतीकडे हाक मारली, “अहो काकू, मला तेवढी कडुलिंबाची डगळी द्या ना. माझी गुढी उभारणं थांबली आहे.”   

काकूने, “नाही जमणार गं ..” असं उत्तर दिलं आणि अमृताला संताप आला, “अरे काय कमाल आहे ह्या काकूंची. ह्यांना आवडतात म्हणून मोगऱ्याची फुलं रोज देते मी ह्यांना. तुळस त्यांना प्रसन्न करते म्हणून मी ती दोघींच्या मधल्या भिंतीवर ठेवली आणि ह्या एवढी छोटी गोष्ट का देत नाहीत.”

तिची ही बडबड ऐकून नवरा तिला म्हणाला, “अगं, तू जरा शांत हो. नसेल जमत तोडायला त्यांना. म्हणून लगेच, तू केलेल्या उपकारांची लिस्ट काय वाचतेस तू. त्या मोठ्या आहेत वयाने. तुझे तर किती लाड करतात, आणि तू एवढ्या छोट्या गोष्टीवरून लगेच त्यांना वाईट ठरवतेस?? बघू,मी शोधून आणतो.”

अमृता म्हणाली, “नाही. तू थांब. अरे आपल्या कॉलनीत झाडच नाही आहे कडुलिंबाचे. माझं सर्व सर्च करून झालं आहे दोन दिवसांपासून, मॉर्निंगवॉकला गेले होते तेंव्हा. म्हणून तर ह्यांना सांगून मोकळी झाले. चांगल्या ठसठशीत तर दिसतात. एक लांब कडी घेऊन जरा टाचा वर केल्या कि तोडू शकतील त्या फांदी.”

नवरा म्हणाला, “वाद नको, आणि ह्या छोट्या गोष्टीवरून संबंध सुद्धा खराब करू नकोस. जोडायला वेळ लागतो, तोडायला नाही. चल काही बिघडत नाही कडुलिंब नसेल तर. गाठी आणि आंब्याची पानं आहेत ना. तीच बांधू.”

अमृता दिवसभर डोक्यात राग घेऊन होती. आज खरंतर काकु तिला बासुंदी पुरी देणार होत्या. त्यांनी हाक मारली पण अमृताने दारच उघडलं नाही. तिच्या नवऱ्याला मात्र हे वागणं पटलं नाही, आणि काकुंचंही कारण कळेना. खरंच थोड्या उंचीवर ती फांदी होती.

दुपारी जेवण आटोपल्यावर त्याने अमृताला बळेच बाहेर काढलं आणि तो काकूंच्या कॉलनीकडे वळला. रस्त्याच्या कामामुळे तसं चालणं अवघड होतं, पण त्याला भीती होती सोक्षमोक्ष जर झाला नाही तर गैरसमजाच्या जाळ्यात हे नातं अडकून संपून जाईल.

अंदाज घेत ते त्या जुन्या इमारतीत शिरले. अमृता म्हणाली “कशाला जायचं पण आपण. त्यांनी कधी बोलवलं नाही आपल्याला..”

त्यावर तो म्हणाला, “अमृता, अगं खाल्ल्या मिठाला तरी जाग. ज्या काकू तुला घासातला घास देतात त्या काकु एका छोट्या गोष्टीला तुला नाही म्हटल्या तर तू इतकी विरोधात गेली त्यांच्या. असा स्वभाव जर राहिला तर आयुष्यात आपण माणसं जोडू शकणार नाही गं. माझ्या आईने मला सांगितलंय कि, कोण्या माणसाचा कधी राग आला तर त्याने आपल्यासाठी जे चांगलं केलं ते आठवायचं.”

बोलत बोलत ते वरच्या मजल्यावर गेले. जरा पडका जुना जिना होता. जुनं कुजलेलं लाकूड असलेली बाल्कनी, त्यात प्लास्टिकच्या डब्यात हिरवागार मरवा सजला होता. दाराशी रांगोळी नव्हती. ‘एवढा सण पण साधी रांगोळी काढली नाही. नुसतं आपल्याला शहाणपण शिकवतात ह्या’ असं अमृताच्या मनात पण आलं.

“काकू” म्हणत दोघांनी हाक मारली. दरवाजा बंद होता. कडी वाजवली तरी बराच वेळ लागला दरवाजा उघडायला. दरवाजा उघडला पण समोर कोणी दिसलं नाही.

एकदम खालून आवाज आला, “या या. अहो, लेक आणि जावई आलेत.” म्हणत त्यांनी बाजेवर पडलेल्या काकांना हाक मारली आणि त्या खरकत खरकत बाजेकडे गेल्या.

अमृता आणि तिचा नवरा सुन्न होऊन बघत होते. काकूंना गुढग्यापासुन पायच नव्हते.

काका खूप आजारी दिसत होते पण खोलीत प्रसन्नता होती. छोटयाशा देवघरात छोटी गुढी उभी होती. लहानसा दिवा तेवत होता.

अमृताला रडूच आलं आणि ती काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागली. काकूंनी तिला रडू दिलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, “दोन वर्षांपूर्वी पोरगी गरोदर राहिली. तिला डोहाळजेवणाला आणण्यासाठी मी गेले आणि येताना अपघातात माझे पाय गेले आणि माझी पोटूशी पोरगी जागेवरच गेली गं.

ह्यांच दुखणं खूप जुनं. त्यात मी अशी झाले. निराशेचे ढग दाटले, पण पालवी फुटावी तशी तू जीवणात आली. कदाचित देवाची मर्जी.

तुला हे सगळं सांगावसं वाटत होतं. पण ओळखीनंतर तू काही दिवसात गोड बातमी दिलीस. मग वाटलं आता काही सांगितलं तर तू दयाळू नजरेने बघशील. काही दिला खाऊ तर तो तुला मला होणारा त्रासच वाटेल. कदाचित तू जसं हक्काने सांगत होतीस ‘मला हे खावं वाटतंय’ तसं तू बोलली नसतीस. मला माझी लेक दिसते ग तुझ्यात. हे काय तुझ्या डोहळजेवणाची हळूहळू तयारी करतेय.” म्हणत काकूंनी पुठ्ठ्याचे हरिण बनवलेले दाखवले. “बघ हरणाच्या गाडीत बसवते तुला.”

आता तर अमृताच्या नवऱ्यालाही रडू आलं. काका निपचित पडून होते पण ते तोडके मोडके शब्द जोडत बोललेच, “आयुष्यात कितीही संकटं आली तरी हिच्या आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची गुढी कायम उंच असते. म्हणून तर कठीण काळातही ती छान जगते.”

काकूंनी पटकन दोन वाट्यात बासुंदी दिली. काकूंचं ते पाय नसतानाही सहजतेने जगणं अमृता आणि तिच्या नवऱ्याला पुढच्या जगण्यासाठी खूप काही शिकवून गेलं होतं. “काकू, आज खरा गुढी उभारण्याचा अर्थ कळला हो. खरंच आभार तुमचे.”

काकू म्हणाल्या, “आपल्यातील आत्मविश्वास असा उंच ठेवायचा. स्वतःच्या मनाला असं आनंदाचं रेशीम वस्त्र गुंडाळत रहायचं. आपल्या ऊर्जेची गुढी मग लहरत राहाते.”

दोघे निघाले. काकू निरोपासाठी  दरवाज्याकडे येणार तेंव्हा अमृता म्हणाली, “मागूनच या आपल्याच जागी. दासबोधाची वेळ झाली ना.

“हो ना!” म्हणत काकू खरंच मागच्या दरवाज्यात गेल्या. दगड रचून केलेल्या खुर्चीवर अश्या जाऊन बसल्या. अमृताला वाटलं आपण फक्त तो हसरा चेहरा बघत होतो. आता कळलं, हि गुढी किती अवघड मार्गातून तिथे सज्ज असते.

तिने काकूंच्या देवघरातील गुढीकडे बघितलं. कुठलाही थाटमाट नसताना गुढी छोटीशी पण प्रसन्न आणि आंनदी दिसत होती.

अमृताने दिलेलं छोटंसं मोगऱ्याचं फुल सगळा आसमंत दरवळून टाकत होतं. अमृताला जणू सांगत होतं, तू ही आता ह्यांचं आयुष्य दरवळून टाक.      

© स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)

औरंगाबाद 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवोsहम्… भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ शिवोsहम्… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागच्या भागात प्रेम कथा लिहिणारी लेखिका, प्रेम कथा तिच्या पठडीतली कशी असावी हे सांगते…. आता पुढे)

३०—४० वर्षांपूर्वीची, सरू आणि विजयची प्रेम कहाणी माझ्या मनात अजून आहे. सरुने  हलकेच माळलेलं सोनचाफ्याचं पानासकट असलेलं फुल, चेहऱ्यावरचे लाजरे, बुजरे, काहीसे धुंद भाव आणि आतुरतेने त्या गावकुसाकडच्या पुलाखाली, खिशात हात घालून वाद घालणारा विजय. .या प्रेमात, लपून-छपून भेटी होत्या, चोरुन पाठवलेली पत्रं होती,चुंबने होती, धाकधूक होती, दु:खं होती,  घरच्यांनचा  विरोध होता,  वियोग ही होता!  पण तरीही ती  एक सफल प्रेम कथा होती. चारी अंगाने फुललेली  आणि विवाह बंधनात सुखरूप परिणती झालेली, सुरेख, गोजिरवाणी, स्वच्छ!

कल्पनांना एकसारखे धक्के बसत होते!  कधी कधी तर माझंच मला आतून ठकठकायचं.  हे सारे प्रवाह जुनाट, आऊटडेटेड वाटायला लागायचे.  माझे मलाच वाटायचे,  ज्या पिढीचं मी प्रतिनिधित्व करते, त्या पिढीच्या विचारांना, कल्पनांना, अनुभवांना आजच्या या नव्या बदलत चाललेल्या समाजाला खरोखरच काही महत्त्व आहे का? त्याहीपेक्षा काही उपयोग आहे का? आपण त्यांच्या पाठी की  पुढे आहोत? हा  एक गोंधळ वाढवणारा प्रश्न. पण मनाच्या एका अदृश्य पडद्यावर मला स्पष्ट दिसायची ती फक्त या नव्या समाजाची पाठच.  मीच आपली धावते त्यांच्या मागे.  माझ्याकडे जे काही थोडेफार आहे, त्याचं गाठोड घेऊन.  कधी कधी माझं मलाच ते जीर्ण, सुकलेलं, रसहीन, बेचव वाटते.  माझी प्रेम कथा तर अगदीच मुळमुळीत आहे असे वाटते. काही गरम मसाला नसलेलीच जाणवते.

प्रेमाचे रंग बदलत आहेत.  ते, अधिक उग्र, गडद डोळ्यांना सुखद वाटण्यापेक्षा, भयभीत,करणारे  रौद्र, भीषण, अचकट —विचकट झालेत. सूत्र प्रेमाचं आहे, गाभाही  प्रीतीचा आहे, पण ती मृदूता, तो मुलायमपणा कुठेतरी हरवलाय.

हे सगळं वाटायचं एक  कारण होतं.  अंतर्बाह्य ढवळून काढणारं,  हादरवणारं, धक्का देणारं, अगदी जवळच घडलेलं असं काही.  याच काळातली ती घटना.

त्याचं म्हणे तिच्यावर प्रेम होतं! वय वर्ष १९ . ती ही त्याच्याच वयाची. एकाच कॉलेजमधले, एकाच वर्गातले.  तिला तो आवडायचा म्हणे.  पण मित्र म्हणून.  तसे तिला मित्र खूपच होते.  ती होतीच छान!  आकर्षक,  गोरी, उंच,  सडपातळ, शिवाय हुशारही, पैसे वाली.  थोडक्यात अगदी सिनेमातल्या हिरोईन सारखी.  तशीच लांबलचक  गाडीतून यायची, शोफरने दार उघडल्याशिवाय गाडीतून उतरायची नाही. दिमाख, डौल होताच तिच्यात. 

त्याची नजर तिच्यावर गेली.  आणि त्याने ठरवलं,

” लग्न करायचं ते हिच्याशीच. नव्हे! ती आपली झालीच पाहिजे.”  तिच्या मनाचा विचार त्याच्या खिजगणतीतही  नव्हता.  ती दुसऱ्या कुणात गुंतली होती असेही काही म्हणता येणार नाही, पण त्याला मात्र ती सांगायची, अगदी विनवून विनवून,

” अरे मला तू आवडतोस! पण मित्र म्हणून.  मी काही तुझ्याशी लग्न वगैरे करणार नाही.”

त्याचे मित्रही त्याला चिडवायचे.  त्याची टिंगल करायचे.  त्याला आव्हान द्यायचे.  त्याच्या स्वप्नांना डिवचायचे.  तो तो त्याचा राग सळसळायचा.  अधिक चीड, अधिक संताप,  अधिक उद्रेक. टोकाची इर्षा. मनात अक्षरश: तांडव.

आणि एके दिवशी कॉलेजच्या आवारात ते घडलं. त्या कॉलेजच्या आवारातली जुनी वठलेली झाडंही थरथरली. किती युवा पिढ्या त्यांच्या छायेत वावरल्या  असतील! प्रेमाची कुंजनं, वियोगाचं कारुण्य, मनोभंगाची दुःखं, अश्रू सारं पाहिलं असेलच त्यांनी.  पिढ्या पिढ्यांच्या नात्यांचे, भावबंधांचे, अनुबंधांचे ते साक्षीदार होते. पण त्या दिवशी त्यांनी जे पाहिलं, अनुभवलं, त्यामुळे ते स्तब्ध झाले असतील.  मुळापासून कळवळले असतील.  त्यांची पानंफुलं मिटून गेली असतील. विदीर्ण झाली असतील.

तिचा आणि त्याचा बराच वेळ वाद झाला म्हणे! हिसका हिसकी झाली. तिने पाठ फिरवली  तरी त्याने तिचे हात खेचले.  तिने त्याला झटकलं. कडवट, कठोर तिरस्काराचे शब्द वापरले.  जळजळीत प्रतिकार केला तिने. त्याने डोळे विस्फारले.  छाती फुगवली. त्याच्यात बळ होतं.  शक्ती होती. त्याच्या नसानसात बेदरकारपणा  होता. संहार स्फुरत होता.  मग काही उरलं नाही. ना प्रेम ना ओलावा! ना दया ना करुणा. फक्त अहंकार, दुराभिमान, एक प्रचंड विकृत आत्मकेंद्रीतपणा.  सारं उपटून फेकून देण्याची वृत्ती.  एक विनाश.  एखाद्या प्रेमाचा फक्त एकच रंग.  लाल. लबलबीत, चिकट मनाची दुर्गंधी.

आता ती त्याचीही नव्हती आणि कुणाचीच नव्हती. सारं काही संपलं होतं.  उरल्या होत्या त्या फक्त चर्चा. सुरुवातीला दबक्या,  कळवळून केलेल्या आणि मग हळूहळू विरत जाणाऱ्या.  नव्हे! पुन्हा अशाच प्रकारच्या घटनांना बोथटपणे सामोऱ्या जायला लावणाऱ्या.

अशा साऱ्या पार्श्वभूमीवर, सामाजिक विकृतीच्या संदर्भात, माझी जन्माला येणारी प्रेमळ, लडिवाळ, हसरी रुसवी, राग —अनुरागाची प्रेम कथा एक सारखी हिंदकळत होती.  डळमळत होती. वास्तवतेच्या आणि अवास्तवतेच्या सूक्ष्म रेषेवर चक्क मरगळून गेलेली दिसत होती. 

एक दिवस सहज मनातलं कुणाजवळ तरी बोलावं म्हणून माझ्याच उमलत्या वयातल्या लेकीला मी म्हणाले,

” किती भयंकर घडलं नाही ग त्या कॉलेजमध्ये!”

तिच्या हातात भलं मोठं बर्गर होतं!  ते अख्खच्या अख्ख तोंडात घालतच तिने विचारलं,

” कशाबद्दल म्हणतेस मम्मी तू.?”

” अगं तुला माहित नाही? इतकं पेपरात रोज येत होतं ते! टीव्हीवरही तुम्हा कॉलेज तरुण— तरुणींच्या प्रतिक्रियांचाही कार्यक्रम झाला.  सूर हाच  होता, त्यानं तिची अशी हत्या करायला नको होतं. “नाही”म्हणायचा तिचा नैतिक अधिकारच होता.

” त्या दोन-तीन महिन्यापूर्वीच्या घटनेबद्दल बोलतेस का तू? काय मम्मी” अजुन तुझ्या डोक्यात तेच विचार आहेत? तू इतकी सेंटी होऊ नकोस. हे असं नेहमीच घडतं. एखादी घटना जरा जास्तच डिस्कस होते.  आजकाल हे काही नवीन नाही.  आधी प्रेमात पडायचं, फसवणूक झाली तर आत्महत्या करायची, नाहीतर तिचा किंवा त्याचा खून करायचा. सट्टॅक. फिनिश!  धिस इज लाईफ. आणि तू मला हेच का विचारतेस, त्याचाही मी अंदाज करू शकतेच. पण मी तुला सांगते, तू एवढा विचार नको करूस.  तुझी मुलं तशी नाहीयेत.  चांगली, विचारी, अभ्यासू, सरळ मार्गी सुसंस्कृत, आणि काय काय… तुला जशी हवी तशी आहेत. एवढं पुरे नाही का तुला?”

तिने ते भलं मोठं बर्गर संपवलं.  पाणी प्यायली आणि टीव्ही ऑन केला.  कुठला तरी इंग्लिश चॅनेल सेट करून त्यावरचं कार्टून पाहण्यात, ती पुढल्या काही सेकंदातच रमून गेली.

मी मात्र पहात राहिले तिचा कोरडेपणा. अलिप्तपणा. आपल्याच विश्वात मस्तपैकी रमायला लावणारा बिनधास्तपणा. 

सारं काही शांत झाल्यावर मी देव्ह्यारात  सांजवात केली. मंदपणे तेवणारी ज्योत, अन्  उदबत्तीचा संथ  सुगंध माझ्या डचमळणाऱ्या मनाला कुठेतरी आधार देत असल्यासारखं वाटलं. 

 मी पुन्हा घेऊन बसले, माझं अर्धवट राहिलेलं लिखाण. माझ्या कहाणीतल्या त्याला आणि तिला क्षणभर सुन्नपणे पाहिलं. मला त्यांच्याबाबतीत असं काही घडू द्यायचं नव्हतं पण  डोकं बधिर झालं होतं. शब्दसुद्धा सोडून गेलेत आपल्याला, असं वाटत होतं.  मी म्युझीअम मधल्या वस्तु जशा आपण कुतुहलाने पाहतो ना तशा सार्‍या घटनांना पाहत बसले.  माझ्या या कथेतल्या प्रेमिकांचा सारा अभिनिवेश जुनाट, मळका, गढूळ, धुळकट वाटला. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेले प्रेमाचे भावही अगदी शामळु वाटायला लागले.  एखाद्या कृष्णधवल चित्रपटातल्या नायक नायिके सारखे. केवळ गिमीक्स. वास्तवापासून दूर.अगदीच कृत्रीम. अनैसर्गिक.

पण का कोण जाणे! लिहूच नये  असेही वाटेना. या काळाचीच  प्रेमकथा मी  लिहावी का? वाचकांना तीच अधिक रुचेल. पण म्हणून, वास्तवाचा आग्रह धरुन समाजाला हे विकृत द्यायचं का? नाही.  हा  धुरळा जरा झटकता आला तर आतमध्ये अजूनही खूप काहीतरी शिल्लक आहे. जे मला जाणवत होतं. एक शांत, सुखावणारं, शीतल असं प्रेमरंगाचं मधुर मिश्रण!  तेच उलगडून दाखवायची गरज आहे. फक्त भडक, गर्द डोळ्यांना, केवळ रुद्रताच भासवणाऱ्या रंगात ते मिसळायला हवं, म्हणजे भीषणतेची, रौद्रतेची दाहकता कमी होईल. प्रेम म्हणजे नक्की काय असतं, याचा अविष्कार झाला पाहिजे. प्रेम म्हणजे हत्या नव्हे. प्रेम म्हणजे त्याग..

मी पुन्हा लेखणी हातात घेतली.  माझी प्रेम कथा सुंदर, स्वच्छ ,निर्मळ शब्दांची गुंफत गेले. मोगर्‍याच्या गजर्‍यासारखी. रुसणं, फुगण,! राग अनुरागात बांधलेली.  संहारापासून तर कितीतरी दूर. फक्त भावबंध जपणारी, गोड, मिठ्ठास. हातात हात गुंफणारी. जन्मोजन्मीची. साथसोबतीची.

मनाच्या गाभार्‍यात सहज एक ध्वनी घुमला.

कोहं? शिवोsहं!

शिव म्हणजे सुंदरही आणि संहारकही.

मला सुंदर लिहायचं होतं आणि संहारही करायचा होता.

विकृतीचा. अनैतिकतेचा, ओंगळतेच्या वास्तवाचा.

  – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवोsहम्… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ शिवोsहम्… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

एखादी प्रेम कथा लिहावी असं मनाशी ठरवलं, आणि त्या दिशेने मनात स्वाभाविकपणे काही प्रवाह वाहू लागले. 

तिची आणि त्याची एक प्रेम कहाणी. म्हणजे कहाणीत ती आणि तो असणारच.  कथेतली  “ती” सुंदर असायलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नव्हती..  पण पाहता क्षणीच म्हणा, अथवा काहीशा ओळखीने म्हणा,  त्याला ती आवडायला लागली. तोही अगदी काही सिनेमातला हिरो टाईपच हवा, असं नव्हे. पण त्याचं बोलणं, चालणं काहीसा हसरा, मिस्कील, विनोदी स्वभाव आणि बराचसा बिनधास्त पणा तिला आवडला आणि गुटर गु व्हायला लागलं.

जमतय.  ओढ वाटतेय् . पुन्हा पुन्हा भेटावसं वाटतंय. एकमेकांना दिलेल्या छोट्या-मोठ्या वस्तू सांभाळून ठेवाव्याशा  वाटतात.  तेच तेच गोड शब्द कानात रुंजी घालताहेत.  त्यामुळे ओठावर, नकळत वेळी अवेळी हंसू उमटते.  निसटते स्पर्श, त्याने अंग मोहरते.  गोड गोड लहरी जाणवत आहेत.  प्रीतीचा अविष्कार हाच नाही तर कोणता?कथेतले  ती आणि तो एकमेकांत गुंतत आहेत.

कथा तशी कोंबातच आहे. पण उलगडेल  हळूहळू. तिची आणि त्याची आकृती नक्कीच तयार झालीय्.  कथेत मीही हळूहळू गुंतत चाललले आहे, त्यापेक्षा कथा मनावर पांघरतेय. 

त्या दिवशी दामोदर आला.  दामोदर आला म्हणजे काही तरी बातमी असणारच.  तीही सनसनाटी.  आणि माझी अपेक्षा खरी ठरली.

चहापाणी, शिवाय गरमागरम कांद्याची भजी खाल्ल्यावर, दामोदर जरा मुळावर आला.  म्हणजे सुरुवातीला अवांतर बोलणं झालं.

” काय वहिनी? इतक्या ठिकाणी मी भजी खाल्ली आहेत पण ही चव नाहीच.”

मग गरमागरम भजीचा आस्वाद घेत त्याने एखादी अनधिकृत गोटातली बातमी सांगावी तसा अविर्भाव करून, म्हटलं,

” वहिनी कळलं का तुम्हाला?”

” कशाबद्दल? काय ते?”

” अहो सदानंद बद्दल?”

” सदानंद? काय झालं त्याचं?”

” सांगतो मी. पण सांभाळून! नाहीतर एखादी कथाच लिहाल त्याच्यावर.  म्हणजे तसा प्लॉट कथेसाठी चांगलाच आहे.”

” अहो पण झालं काय?”

” सदानंदची बायको सदानंदला सोडून गेली.”

” सोडून गेली? मग ही काय अशा रीतीने सांगण्याची बातमी आहे का?”

” अहो सोडून गेली म्हणजे वरती नाही हो! रश्मीकुमार सोनी बरोबर ती पळून गेली.”

” काय सांगताय काय?”

” सदानंदच्या बायकोबद्दल ऐकलं आहे मी. लोक काहीही बोलतात रे! चांगली आहे ती. शिवाय टॅलेंटेड आहे. त्यांची मुलं किती हुशार आहेत!  शिवाय कसली कमतरता नाही संसारात. ती कशाला अशी वागेल?”

” वहिनी! तुम्ही पण साध्या आणि सरळ आहात.  पण दुनिया फार निराळी आहे.  दिसतं तसं नसतं. आणि रश्मीकुमारचे अन मिसेस सदानंदांचे संबंध काही आजचे नाहीत.  फार पूर्वीपासूनचे आहेत.  ते काहीसं म्हणतात ना प्लॅटॉनिक लव, समान वैचारिक कल, जीवनाकडे पाहण्याचे कलात्मक दृष्टिकोन वगैरे…  बरीच मोठी स्टोरी आहे.  सांगेन सवडीने.  पण सध्या सदानंद पार हादरला आहे. प्रतिष्ठा, पोझिशन. ठीक आहे. पण त्याचं काय आहे शो मस्ट गो ऑन. वरवर तो भासवतोय्, “मला काही फरक पडत नाही.”

मग जाता जाता दामोदर एवढेच म्हणाला, “काय वहिनी? दिलं की नाही कथानक तुम्हाला? आता कल्पनेने रंग भरत बसा त्याच्यामध्ये.”

खरंय्.  प्रेम कथा लिहायचं ठरवले आहे  मी. तो आणि ती आहेतच माझ्या कथेत.  अजून त्यांचं वय, आकार, काळ ठरायचंय पण त्याच्यात  “रश्मी कुमार” आणि तिच्यात सदानंदची  बायको ,हे काय माझ्या कथेच्या साच्यात बसत नव्हतं.  म्हणजे घटना असेल प्रेमाची, पण माझ्या कथेतील प्रेम, त्याचं स्वरूप, रंग हे नाहीत एवढे नक्की.

अगदी नदीकिनारी, मावळता सूर्य, डोंगर, क्षितिज, गुलमोहराचे  झाड, वगैरे काव्यमय संकेत घालायचं  टाळत होते मी. कारण प्रेमाच्या बदलत्या परिभाषेचं भान ठेवायचं ठरवलं होतं मी.  म्हणजे डॉट कॉम, ई लँग्वेज वापरायला हरकत नव्हती.  प्रेमाचा  गाभा तोच असला तरी,  नवं स्क्रीन आणि इतर आधुनिक साधनं उपयोगात आणायला हरकत नव्हती. पण “रश्मी कुमार “आणि “सदानंदची बायको”  ही प्रेम कथा या पठडीतली नव्हती. ती जरा वयस्कर, वाकड्या वाटेने जाणारी, आणि असंस्कृत वाटत होती.  म्हणजे संस्कृतीच्या ज्या चौकटी आपण आखल्या आहेत आपल्या भोवती, त्यात बसणारी नव्हतीच मुळी. 

मला असं काही लिहायचं नव्हतं.  म्हणजे उच्च अभिरुची, ढासळलेल्या समाजाची घडी, बदलत्या माध्यमाचा वेडावाकडा प्रभाव ,वगैरे इतकं काही उंचीचं, टोकाचं नाही म्हणायचं मला.  पण एक नक्की,  ज्या समाजात मी वावरले, जगण्याची दिशा नक्की ठरली आहे त्या समाजात हे असं काही नव्हतं, म्हणून मला असं काही लिहिता येणार नाही.

क्रमश: भाग १

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares