सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ नशिबाने थट्टा मांडली…भाग – 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(पूर्वार्ध : मागील भागात आपण पाहिले – दलालाने म्हटल्याप्रमाणे पहिलवानाच्या पुतळ्याचे भरघोस पैसे मिळाले. आता इथून पुढे )
झाले एवढे खून बस्स झाले…. खून? हो. खूनच नाहीतर काय? तर एवढे पैसे भरपूर झाले. हे घेऊन इथून निघायचं. दलालाच्या नकळत. दलाल सोन्याचं अंडं देणारी कोंबडी हातची जाऊ देणार नाही. आपल्या गावी परतायचं. पैसेवाला म्हटल्यावर काय? काहीच कमी नाही पडायचं. मोठं घर बांधायचं. एखादी विधवा बघून लग्न करायचं. तिला आधीच थोडीफार कल्पना द्यायची. शारीरिक सुख सोडलं, तर घर,पैसे, प्रतिष्ठा ,सुरक्षितता …तक्रार करायची गरजच पडणार नाही तिला. पण तिला तसं वाटेल का? की ती दुस-या कोणाशी संबंध….
तरीही गावी परतायचंच,हे त्याने नक्की केलं आणि दलाल एका बाईला घेऊन आला. बाई कसली, तरुणीच होती ती.
दलाल गेल्यावर तो म्हणाला,”अंगावर एकही कपडा नको.”
“काsय?”
“घाबरू नका. मी कलावंत आहे. माझ्यासाठी तुम्ही निव्वळ एक नमुनाकृती आहात. एक पुरुष म्हणून माझ्यापासून तुम्हाला कोणताही धोका होणार नाही, याचं मी आश्वासन देतो.”
तिने कपडे उतरवले.
” तुम्हाला नृत्यमुद्रेत निश्चल उभं राहावं लागेल. पाय मुरली वाजवणा-या कृष्णासारखे. एक पाय सरळ. दुसरा त्याच्यावर वळवून त्याची फक्त बोटं जमिनीला टेकलेली. वरचं शरीर नृत्यमुद्रेत . मान उजवीकडे वळलेली.”
मग ती त्या मुद्रेत उभी राहिली. खूप आकर्षक मुद्रा होती ती.
“ठीक आहे. याच स्थितीत तुम्हाला रोज आठ-दहा तास उभं राहावं लागेल. अजिबात हलता येणार नाही.”
“बाप रे! आठ-दहा तास?”
“कठीण आहे. मला माहीत आहे, खूप कठीण आहे ते. पण ते सोयीचं व्हावं, म्हणून मी एक द्रव तयार केला आहे. तो अंगावर शिंपडला, की त्या अवस्थेत राहणं ,फारसं अवघड जात नाही.”
त्याने तिच्या पायावर अरिष्ट शिंपडायला सुरुवात केली.
“काय आहे यात? वनस्पतींपासून सिद्ध केलंय, असं वाटतं.”
“मी सांगू शकत नाही. गुरूंची अनुमती नाही,”त्याने उगीचच सांगितलं.
“हेच. माझे वडील वनौषधितज्ज्ञ होते. वेगवेगळ्या वनस्पतींपासून वेगवेगळी रसायनं, लेप, काढे, आसवं, अरिष्टं बनवायचे आणि लोकांना खडखडीत बरं करायचे. पण त्या औषधी कशा सिद्ध करायच्या, ते कोणाला सांगणं तर सोडाच, त्याची कुठे नोंदही केली नाही त्यांनी. कारण हेच. गुरूंची अनुमती नाही. शेवटी रानात वनस्पती गोळा करायला गेले असताना त्यांना विषारी नाग चावला. त्यांनी स्वतः कितीतरी लोकांचं विष उतरवलं होतं. पण नक्की काय करायचं, ते दुस-या कोणालाच माहीत नव्हतं. ते स्वतः बोलूही शकत नव्हते. त्यातच ते गेले.”
“अरेरे!” तिच्या पोटावर अरिष्ट शिंपडत असताना तो क्षणभर थांबला आणि पुन्हा त्याने आपलं काम सुरू केलं.
“मी त्यांना मदत करायला तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती. शिष्या म्हणून मला…” थोडं थांबून तिने घाबरत घाबरत विचारलं,” तुमची हरकत नसेल तर एक विचारू?”
तो काहीच बोलला नाही. फक्त अरिष्ट शिंपडत राहिला.
मग तिनेच धीर करून विचारलं,” तुमच्यात काही कमी आहे का?”
निर्विकारपणे तिच्या छातीवर अरिष्ट शिंपडता शिंपडता तो थांबला. क्षणभरासाठी त्याने रोखून तिच्याकडे पाहिले, पण बोलला काहीच नाही. त्याने पुन्हा अरिष्ट शिंपडायला सुरुवात केली.
“मी वडिलांबरोबर जायचे ना, त्यामुळे काही वनस्पतींची नीट माहिती झाली. काही औषधे कशी सिद्ध करायची, तेही शिकले. त्या औषधांच्या मात्रा वगैरे सगळं माहीत झालं. नपुंसक पुरुषाचं पुरुषत्व कसं जागृत करायचं, ते कळलं. तेवढ्या एकाच व्याधीवर उपचार करू शकते मी. वडील गेल्यानंतर मी दोघांना पुरुषत्व मिळवून दिलं. दोघेही सुखाने संसार करताहेत. एकाची बायको गरोदर आहे. वडिलांनी केलेली चूक मी करणार नाही. मी सगळं तपशीलवार लिहून ठेवणार आहे.”
तो काहीही न बोलता अरिष्ट शिंपडत होता.
“मघाशी मी विव…. म्हणजे कपडे नसतानाही तुम्ही ज्या निर्विकारपणे माझ्याकडे बघत होता, त्यावरून मला वाटलं. हे ..जर.. खरं.. असेल.. तर ..मी .. ब..रं.. क..री..न….तु….म्हा…….” बोलताबोलता मूर्च्छा आल्यासारखी ती निःशब्द झाली. म्हणजे डोळे उघडे होते; पण तिचा पुतळा झाला होता.
नियती आपल्याशी भयंकर खेळ खेळलीय, हे मेंदूपर्यंत पोचल्यावर तो सुन्न झाला. कितीतरी वेळ तो तसाच बसून होता.
अचानक साक्षात्कार झाल्यासारखा तो उठला. कदाचित संशोधकाने त्या अरिष्टाचा प्रभाव उतरवणारा उतारा शोधूनही काढला असेल.
मनात धुगधुगती आशा घेऊन तो संशोधकाकडे निघाला. कितीतरी काळ गेला होता, त्याला संशोधकाला भेटून. तो जंगलात राहत असेल अजून, की पूर्वायुष्यात परतला असेल?
संशोधक त्याच्या पूर्वीच्या जगात सुखी होईल कदाचित. पण आपलं काय?
आपण पूर्वायुष्यात परतायचं म्हणतोय, पण दलाल आपल्याला सोडेल काय? त्याचे हात लांबवर पोचले आहेत. त्याची हाव आपल्याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही.
झोपडी तशीच होती. बाहेरचा कुत्राही तसाच होता. पण अंगणात पालापाचोळा पसरला होता. वातावरणात दुर्गंध भरून राहिला होता. संशोधक सगळं स्वच्छ ठेवायचा. कदाचित निघून गेला असेल तो.
तो झोपडीत शिरला. आतलं भयंकर दृश्य बघून त्याच्या अंगावर काटा आला. संशोधकाच्या पोटापासून खालचा भाग आणि मनगटापासूनचे हात निश्चल झाले होते. बहुधा अपघाताने त्यावर अरिष्ट सांडलं असावं. पंचा चिंब भिजल्यामुळे ते आतपर्यंत पोचलं असावं. बरेच दिवस झाले असावेत या घटनेला. कारण संशोधकाचा वरचा भाग कुजून गेला होता. झोपडी त्याच दर्पाने भरून गेली होती.
त्याचं डोकं गरगरू लागलं. संशोधक, लोभी दलाल, त्याने पुतळे करून मारून टाकलेली सगळी माणसं, विशेषतः ती परोपकारी, निरागस तरुणी….. सगळे आपल्याभोवती गरगर फिरताहेत, असं त्याला वाटू लागलं. एकंदर प्रकाराने तो एवढा खचून गेला की……
त्याने स्वतःचे कपडे काढून टाकले. अरिष्टाचा रांजण भरलेला होता. ओट्यावर एक भांडं होतं. ते रांजणात बुडवून आतलं अरिष्ट तो स्वतःच्या अंगावर ओतत राहिला. आयुष्यात स्वकर्तृत्वावर उभं राहण्यासाठी त्याला ठाम टेकू दिल्याचा आभास निर्माण करणा-या पायांवर, मग त्या नाकर्त्या अवयवावर, दाही दिशा फिरायला लावणा-या पोटावर, निधडी-भरदार या सर्व विशेषणांच्या विरुद्ध असलेल्या छातीवर, मध्यंतरीच्या काळात ताठ होऊ पाहणा-या मानेवर, जगापासून लपवाव्याशा वाटणा-या चेह-यावर आणि शेवटी निरपराध माणसांच्या आयुष्याशी खेळ करण्याचं दुष्कृत्य करणा-या त्या हातांवर.
– संपूर्ण –
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈