“अहो दुधाची पिशवी आत आणता का? मगाशीच बेल वाजली.. “
“अरे बेल कधी वाजली? मला नाही ऐकू आली. थांब तू नको उठू.. तुला बरं नाही. आज तू दिवसभर आराम करायचा हे ठरल आहे ना… म्हणून तर सकाळ संध्याकाळ डबा सांगितला आहे. दोन वेळेसचा चहा तो काय….. मी करीन. ” तो एका दमात हे बोलला. ती आत गेली.
त्याच्या लक्षात आल आज आपण प्रथमच दूध आत घेत आहोत….
नाहीतरी प्रत्येक वेळेस बेल वाजली की तीच दार उघडते….
दुधाची पिशवी कापून दूध पातेल्यात घालताना दूध सांडलंच.. पटकन त्यांनी तिथल्या नॅपकिननी ते पुसून घेतलं. ती समोर नव्हती… ते एक बरं..
“अहो दूध तापलं असेल बघा… नाहीतर गॅस मोठा करून तिथे थांबून तापवून घ्या… “
” बरं बरं…. “
च्यायला… दूध तापायला किती वेळ लागतो…. इथे नुसतं बघत उभ राहायचं…..
तो वैतागून पुटपुटला..
शेवटी तापलं एकदाच दुध. तो पेपर वाचत बसला.
सकाळी अकराची वेळ
“अहो तुमचा दुसरा चहा… “
” आता परत दूध तापवायचं? “
“साय चांगली येण्यासाठी मी चारदा दूध तापवते…. “
दुध गॅसवर…. गॅसची फ्लेम कमी झाली का काय… काय कटकट आहे… कुकरला शिट्टी असते तस काहीतरी हव होतं…
मग त्याच्या लक्षात आलं आपल्याच चहासाठी दूध तापवणं चाललं आहे….
तसा बरा झालाय चहा… जमतय आपल्याला पण… अजून प्रॅक्टीस हवी… तो मनातल्या मनात बोलला..
दुपारी पावणेचारची वेळ
“माझ्या लक्षात आहे हं.. चारला आपल्या दोघांचा चहा करणार तेव्हा दूध तापवतो… “
तीनी काही बोलायच्या आताच त्यांनी सांगितलं.
ती खुद्कन हसली…
आज त्याला समजलं की साधा चहा करायचा म्हटलं तरी बराच व्याप असतो.. गाळणं, कप, बशी, चमचा, ते आलं खिसायच…. एका चहाचा ईतका पसारा?
झालं एकदाच आजच्या दिवसातल चहा प्रकरण….
वेळ रात्रीची..
“अहो उद्या दुपारी जेवताना दही लागणार त्यासाठी दूध विरजण लावायच आहे….. ” तो आत आला.
“दही नुसतं नाही घालायच. ती दह्याची कवडी चांगली हलवा.. मग दुध घाला म्हणजे दही घट्ट लागतं.. बास.. ईतके पुरे… सकाळच्या चहाला दुध लागेल… “
तिच्या सुचना सुरू होत्या..
आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी दुध विरझण लावलं.
“आता फ्रिज मधला तो साईचा सट घ्या. त्यात साय घाला. पाच दिवसांची साठली आहे. आता उद्या त्याचे ताक करते आणि लोणी काढते… तुमचे आवडते बेरी घालून कणकेचे लाडू करीन… आणि ताकाची कढी… गोळे घालून… गरम भाताबरोबर… “
तो बघत राहिला ती बोलतच होती…. आपल्याच तंद्रीत….. थोडं स्वतःशी थोडं त्याच्याशी…
तो नुसता ऊभा..
दूसरा दिवस… वेळ सकाळी साडे सहाची…
“अग आपला चहा झाला तरी दूध शिल्लकच आहे…. आता याचे काय करायचे… “
“आता हे रात्रीसाठी विरजण लावायचे…. पण इतक्यात नाही…
ताज दूध आलं की मग…
काल कसं… तुमचा मित्र आला की तुम्ही बाहेरून सांगितलं दोन कप कॉफी कर…… म्हणून हे ठेवायचे घरात दूध नाही असे नको व्हायला….. ” ती सांगत होती..
कालपासून आपण सकाळ… दुपार… संध्याकाळ…. दुधाच्या पातेल्याशीच खेळतं आहोत असे त्याला वाटले….
अरे देवा… एका दुधाच इतकं रामायण असतं ?
तो विचारात पडला….
स्वयंपाकघरात त्याने नजर फिरवली. भांडी, डबे, फ्रिज, बरण्या, बाटल्या, ताट, वाट्या….. मग या सगळ्यांचे किती असेल…
ती हे सगळं मॅनेज करते हे आपल्या कधी लक्षातच आलं नाही…
सारखं काय स्वयंपाक घरात काम असतं ग….
सारखी आत आत असतेस…
आपण तिला सहज म्हणत होतो…
तीनी केलेले अनेक पदार्थ त्यांना आठवायला लागले..
ती आत आली…
“अहो स्वयंपाक घरात काय करताय… “
“तू किती आणि काय काय करत असतेस माझ्या कधी लक्षातच आले नाही…. बायको सॅल्युट आहे तुला तो मनापासून म्हणाला….. “
“इश्य इतकं काही नाही हं…
आम्हा बायकांना सवय असते..
तुम्ही बाहेरचं सांभाळता आणि मी घरातलं… “
ती सहज म्हणाली
अचानक त्यांनी तिचे हात हातात घेतले…
“आज पर्यंत कधी बोललो नाही पण तू खरच संसार खूप छान केलास. नाती पण सांभाळलीस. कधी गंभीरपणे याकडे मी बघीतलच नाही. परंपरेनी चालत आलेल आनंदानी करत आलीस”
तो आज काहीतरी वेगळचं बोलत होता भाऊक झाला होता….
आवाजही नरम आणि कातर झाला होता…..
त्याचे आज एक निराळे रूप ती बघत होती……..
तो आज आतून.. अंतःकरणातून जे वाटले ते बोलत होता…. अगदी मनापासून..
खूप पूर्वीच आपण हे सांगायला हवं होतं असं त्याला वाटलं…..
ती तर गडबडूनच गेली होती…
तो अस कधीही आज पर्यंत बोलला नव्हता…
अनामिक अशा सुखानी ती भारावली होती… आनंदीत झाली होती…
जीवनाचं सार्थक झालं भरून पावलो असं मनोमन तिला वाटलं….
ते दोन जीव हातात हात घेऊन तृप्त मनाने एकमेकांकडे बघत होते…
(नाहीतरी मराठी माणसाला आपल्या परंपरांचा, आपल्या भाषेचा, आपल्या खाद्य संस्कृतीचा अभिमानच नाही हे त्यांनी बऱ्याचदा अनुभवलं होतं. म्हणून तर हाॅटेल्सच्या मेनूकार्डमधून मराठी पदार्थ गायब झाले होते.) – इथून पुढे —-
जेवण झालं. त्यांच्या अंदाजानुसार भरपूर भाज्या उरलेल्या पाहून संपतरावांचा जीव कळवळला. या उरलेल्या पदार्थांमध्ये कमीतकमी ५-६ माणसं आरामात जेवली असती. हाॅट वाॅटर बाऊल्स आली. पण त्यात हात न धुता संपतराव उठून बेसीनजवळ गेले. तिथे त्यांनी चुळ भरुन तोंड धुतलं. सध्या दंतवैद्यांचे दवाखाने या हाॅट वाॅटर बाऊल्सच्या थेरांमुळेच तुफान चालताहेत असं त्याचं मत होतं. घरी गेल्यावर आपल्या नातवांना ते खळखळून तोंड धुवायला सांगणार होते. डायनिंग टेबलवर ते परत आले तेव्हा सगळी मंडळी तोंडात शोप कोंबून निघण्याच्या बेतात होती. टेबलवर बऱ्याच भाज्यांच्या डिशेस हातही न लावलेल्या स्थितीत पडलेल्या पाहून संपतरावांना रहावलं नाही. ते प्रथमेशला म्हणाले
“अरे प्रथमेश हे एवढं उरलेलं पॅक तरी करुन घे. कुणा गरीबाचं तरी पोट भरेल”
“कुणाला देणार काका हे?आमच्या सोसायटीत तर कुणी हे घेणार नाही”
“ठिक आहे. मला दे पॅक करुन. मी बघतो कुणाला द्यायचं ते”
“नाना कशाला घेताय ते “सुजीत नाराज होऊन म्हणाला “आपल्याकडे तरी कुणाला देणार?”
“सुजीत अरे नाना बरोबरच म्हणताहेत. वाया जाण्यापेक्षा कुणाच्या पोटात गेलं तर चांगलंच. नाही का?”प्रथमेशचे वडील म्हणाले तसा सुजीत चुप बसला पण त्याची नाराजी मात्र गेली नव्हती. उरलेल्या चार भाज्या दोन बिर्याणी, तीन दाल तडका, आठ बटर पराठे हे सर्व वेटरने पार्सलमध्ये पॅक करुन आणलं आणि संपतरावांच्या हातात दिलं. एवढ्या पदार्थात ४-५ माणसांचं जेवण नक्की झालं असतं.
निरोप घेऊन सगळे आपापल्या गाड्यांमध्ये बसले. ड्रायव्हिंग करणाऱ्या सुजीतला संपतरावांनी सहज विचारलं.
“किती बिल झालं रे जेवणांचं?”
“काही जास्त नाही. फक्त बारा हजार रुपये”
संपतरावांना धक्का बसला. एवढ्या पैशात एखादं कुटूंब महिनाभर गुजराण करतं. त्यांना एकदम आठवण आली की आपल्या सोसायटीच्या केअरटेकरला फक्त दहा हजार पगार आहे. घरात त्याची तीन मुलं आणि बायको मिळून पाच सदस्य आहेत. कसा भागवत असेल तो?मनातल्या मनात त्यांनी त्याला आणि त्याच्या बायकोला सॅल्युट ठोकला.
“आता हे पार्सल कुणाला देणार आहात नाना?” किर्तीने विचारलं
“आपला केअरटेकर-शांताराम आहे ना! त्याला देऊन टाकू”
“आता रात्रीचे दहा वाजलेत. त्यांची जेवणंसुध्दा झाली असतील. आणि तो असं उरलेलं घेईल का?तसा तो स्वाभिमानी आहे”
“बघू या विचारुन. नाही घेतलं तर समोर बांधकाम चालू आहे. तिथल्या मजुरांना देऊन येईन”
किर्तीने तोंड वाकडं केलं. तिच्या मते नाना हा उगीचचा फालतूपणा करत होते.
गाडी थांबली. गाडीतून उतरता उतरता संपतराव म्हणाले.
” तुम्ही जा सगळे वरती. मी आलोच शांतारामकडे जाऊन”
शांतारामने बेसमेंटमधल्या दोन छोट्या रुममध्ये संसार थाटला होता. रुमचं दार उघडं पाहून संपतरावांना हायसं वाटलं.
” नमस्कार नाना “त्यांना दारात पाहून शांताराम आश्चर्यचकीत झाला”काही प्राॅब्लेम आहे का नाना?”
“नाही नाही. तुमची जेवणं झालीत का?”
“पोरांची झाली. माझं आणि घरवालीचं राहिलंय. मी जरा गावाला गेलतो. आताच आलो. का हो नाना?”
“अरे आज हाॅटेलमध्ये पार्टीला गेलो होतो. तिथे ऑर्डर केलेलं बरंच जेवण उरलं होतं. भरमसाठ मागवून ठेवतात आणि वाया घालवतात. म्हंटलं वाया जाण्यापेक्षा कुणाला दिलं तर त्याचं पोट तरी भरेल. उष्टं नाहिये बरं का!अगदी हातही लावलेला नाहीये”
” तो काही प्राॅब्लेम नाहीये नाना. तुम्ही तसं काही देणार नाही याची खात्री आहे मला. पण घरवालीने मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी करुन ठेवलीये. ती वाया जाईल ना!”
मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचं नाव ऐकूनच संपतरावांचे डोळे चमकले. अचानक त्यांना सपाटून भुक लागल्याची जाणीव झाली. आपण हाॅटेलमध्ये थोडंसंच खाल्ल्याचं त्यांना आठवलं. ते एकदम उत्साहाने म्हणाले
“ती भाजी भाकरी मला दे. मी ती खातो. तुम्ही हे खा ” बोलताबोलता त्यांनी ते पार्सल त्याच्या हातात दिलं.
“पण नाना, तुमचं जेवण तर झालंय ना?”
” मला नाही आवडत ते हाॅटेलचं जेवण. मी काहीच जेवलो नाही तिथे. आणि महाग किती!एकेक भाजी तीनशे रुपयांची. साधा पराठा शंभर रुपयाचा”
शांतारामने डोळे विस्फारले. त्याच्या बायकोने ताटात तीन भाकरी आणि मेथीची भाजी आणली.
“नाना वर घेऊन जाताय ना?”
“नाही नाही. मी इथंच बसतो. या तुम्हीही. आपण बरोबरच जेवू “
संपतराव तिथंच फतकल मारुन बसले.
“अहो नाना, पाट तरी घ्या बसायला”
“राहू दे रे. सवय आहे मला असं खाली बसून जेवायची”
शांतारामच्या बायकोने सगळं वाढून घेतलं. भाजीभाकरीचा पहिला घास घेताच संपतरावांना जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला.
” नाना हिरव्या मिरचीचा ठेचा देऊ?”
“अरे दे ना!व्वा मजा येणार जेवायची “संपतराव खुश होऊन म्हणाले.
” नाना हे जेवण पण खुप छान आहे. तुम्हांला कसं आवडलं नाही?”शांतारामने बिर्याणीचा घास घेत विचारलं.
” अरे कधीतरी खाणाऱ्याला ते चांगलंच वाटणार. आम्ही दर आठवड्याला हाॅटेलमध्ये जातो. कसं आवडणार ते आम्हांला?”
जेवण झालं. संपतरावांनी तीन भाकरी सहज संपवल्या होत्या. पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर त्यांनी दिला. त्यांनी पाहिलं. शांताराम आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरही तृप्ती आणि समाधान विलसत होतं. संपतरावांच्या डोक्यात अचानक एक कल्पना चमकून गेली.
” शांताराम मला कधी खायची इच्छा झाली तर मला भाजीभाकरी करुन पाठवशील. मी पैसे देईन त्याचे “
“अहो नाना. तुम्ही केव्हाही सांगा. मी स्वतः आणून देईन. आणि तुम्ही आमच्या वडिलांसारखे. वडिलांकडून कुणी जेवणाचे पैसे घेतं का?”
संपतराव समाधानाने हसले. ते वर घरात आले तेव्हा सुजीत त्यांचीच वाट पहात होता.
“बराच उशीर केलात नाना. आणि काय झालं?आनंदात दिसताय “
“काही नाही. शांतारामशी गप्पा मारत बसलो होतो. आणि त्याला आणि त्याच्या बायकोला हाॅटेलचं जेवण खुप आवडलं बरं. थ्री स्टार हाॅटेलचं एवढं महागडं जेवण करायला मिळालं म्हणून दोघंही खुप खुश झाले. उरलेलं जेवण उद्या सकाळी मुलांना देणार आहेत “
” चला बरं झालं. मलाही आवडत नाही हो नाना असं अन्न वाया घालवायला. पण काय करता! आपलं स्टेटस् आडवं येतं. पण मी आता यापुढे लक्षात ठेवून. पार्ट्यांमध्ये अन्न उरणारच नाही इतकंच मागवायचा आग्रह धरीन. आणि उरलंच तर पॅक करुन गरिबांना वाटून देण्याची सगळ्यांना विनंती करेन “
त्याच्या या म्हणण्याने संपतरावांच्या चेहऱ्यावरची तृप्ती अधिकच गडद झाली.
संपतराव बाहेर फिरुन घरात शिरत नाही तोच त्यांचा नातू त्यांना म्हणाला
“आबा पप्पांचा फोन आला होता. तुम्हाला तयार व्हायला सांगितलंय. आपल्याला पप्पांच्या मित्राच्या वाढदिवसाला हाॅटेलमध्ये जायचंय”
वाढदिवसाच्या पार्टीला आणि तेही हाॅटेलमध्ये हे ऐकून संपतरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“मी नाही येत पार्टीला. तुम्ही जा “ते उद्वेगाने म्हणाले आणि आपल्या रुममध्ये निघून आले. नातू त्यांच्याकडे बघतच राहीला. आजकाल संपतरावांना हाॅटेलमध्ये जेवायला जाणं अजिबात आवडत नव्हतं. अनेक वेगवेगळे पदार्थ पण अनावश्यक मसाले वापरुन त्यांची मुळची चव घालवून टाकलेली असते असं त्यांचं म्हणणं. एका कंपनीत ते सेल्स एक्झिक्युटिव्ह होते. सगळं आयुष्य प्रवासात गेलेलं. अर्थातच बऱ्याचदा जेवणं बाहेर हाॅटेलातच व्हायचं. त्यामुळे त्यांना आता या हाॅटेलच्या जेवणाचा वैताग आला होता. घरचं साधंसुधं जेवण तेही बायकोच्या हातचं त्यांना अतिशय आवडायचं. पण दोन वर्षांपूर्वी बायकोचं निधन झालं. सुन नोकरी करणारी. संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला की हाॅटेलमध्ये जाणं नाहीतर झोमॅटो, स्विगीवरुन बाहेरुन जेवण मागवणं नेहमीचं होऊन गेलं होतं. आणि तेच संपतरावांना आवडत नव्हतं.
ते आपल्या रुममध्ये पुस्तक वाचत बसलेले असतांनाच सुजीत आत आला.
“नाना तयार व्हा ना. आपल्याला पार्टीला जायचंय”
” तुम्ही जाऊन या ना. मला आजकाल पार्ट्यांना जायचा कंटाळा येतो. असंही तिथे माझ्या ओळखीचं कुणी नसतं “
” असं कसं म्हणता?प्रथमेशचे वडील तुम्हांला चांगलंच ओळखतात. त्यांनीच मला “तुझ्या वडिलांना नक्की घेऊन ये “असं सांगितलंय. वाटल्यास त्यांना तुम्हाला फोन करायला सांगतो”
“नको नको. खरं सांगतो तुम्ही जा. मी खाऊन घेईन सकाळचं काही उरलं असेल तर”
” सकाळचं काहिही उरलेलं नाहिये. आणि नाना आता फक्त तुमच्यासाठी किर्तीला स्वयंपाक करायला लावू नका. तीही थकून भागून येते. अशा पार्टीच्या निमित्तानेच तिला आराम मिळतो”
संपतराव चुपच झाले. खरंतर सुजीतला एवढा गलेलठ्ठ पगार असतांना सुनेने नोकरी करणंच त्यांना आवडत नव्हतं. पण एकदा ते असं म्हंटले होते तेव्हा किर्ती उसळून म्हणाली होती ” मग नाना माझ्या वडिलांनी मला इतकं शिकवलं ते काय फक्त रांधा, वाढा, उष्टी काढायलाच का?ते काही नाही. मी नोकरी सोडणार नाही ” तिचंही म्हणणं योग्यच होतं. पण नवराबायको दोघंही नोकरीला असले की घराला घरपण रहात नाही असं संपतरावांना वाटायचं. म्हणून तर त्यांनी त्यांची बायको सावित्रीबाई उच्चशिक्षित असतांनाही तिला नोकरी करु दिली नव्हती. अर्थात त्यावेळच्या मुली घर संसाराला पहिलं प्राधान्य द्यायच्या. त्यामुळे सावित्रीबाईंनी संपतरावांचा निर्णय सहजगत्या स्विकारला होता. आणि तो स्विकारण्यातही त्यांना कोणताच कमीपणा वाटला नव्हता. त्यांच्या सुनेला मात्र करिअर महत्वाचं वाटत होतं. करिअर आणि घर सांभाळतांना बाईची जी प्रचंड ओढाताण होते तिचा सर्वप्रथम परिणाम स्वयंपाक करण्यावर होतो. त्यातूनच मग बाहेरुन जेवण मागवण्याचे किंवा वारंवार हाॅटेलमध्ये जाऊन जेवण्याचे प्रकार वाढले होते. संपतरावांना हे कळत होतं म्हणून तर त्या दिवसापासून संपतरावांनी तोंडाला कुलुप लावून घेतलं होतं.
सुजीतच्या आग्रहाखातर ते हाॅटेलमध्ये जायला निघाले खरे पण तिथे जेवणाच्या कल्पनेने त्यांची भुकच मरुन गेली होती. कुठलंस थ्री स्टार हाॅटेल होतं. जेवणाचे रेटही तगडेच असणार होते. प्रथमेशच्या वाढदिवसाची जय्यत तयारी हाॅटेलने केलेली दिसत होती. खरंतर तीन परीवारांची मिळून इनमीन१५-१६ माणसं होती. घरीसुद्धा हा कार्यक्रम करता आला असता. पण म्हणतात ना हौसेला मोल नसतं. त्यातून पैसा भरपूर असला की तो उधळायला निमित्तच लागतं. जो कार्यक्रम १-२ हजारात होऊ शकला असता त्यासाठी अनावश्यक १५-२० हजार खर्च केले जाणार होते. प्रथमेशचे आईवडीलही आले होते पण त्यांच्याही चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत नव्हता. बरोबरच होतं. वाढदिवसाचे सोज्वळ, पवित्र सोहळे पाहिलेली ही माणसं. असे भडक दिखाऊ कार्यक्रम त्यांना कसे रुचावेत?
टेबलवर भला मोठा केक आणला गेला. मागे कुठलंतरी वेस्टर्न म्युझिक सुरु झालं. कडक थ्री पीस सुट घातलेल्या प्रथमेशने केकवरच्या मेणबत्त्या विझवून केक कापला तसा सगळ्यांनी एकच जल्लोष केला. एकदोन जणांनी केकवरच आयसिंग उचलून प्रथमेशच्या तोंडाला फासलं. या किळसवाण्या प्रकाराची तर संपतरावांना अतिशय चीड होती. जो पदार्थ खाण्यासाठी आहे तो चेहऱ्यावर फासण्यात कसली आली मजा? केक एकमेकांना भरवून फोटो सेशन झालं. दुर उभं राहून संपतराव हे सगळे प्रकार पहात होते. त्यांना स्वतःच्या वाढदिवसाची आठवण आली. सावित्रीबाई त्यांना पाटावर बसवून ओवाळायच्या. त्यांना प्रेमाने पेढा भरवायच्या. मग ते सगळ्या मुलांना जवळ घ्यायचे. घरात गोडाधोडाचा स्वयंपाक असायचा. एका पेढ्याव्यतिरिक बाहेरचा कोणताही पदार्थ घरात न आणण्याकडे सावित्रीबाईंचा कटाक्ष असायचा. त्या आठवणीने संपतरावांना गहिवरल्यासारखं झालं.
केक कापण्याचा सोहळा आटोपल्यानंतर साताठ वेटर आले. त्यांनी आता जेवणाची तयारी सुरु केली. समोर पडलेलं भलंमोठं मेनू कार्ड संपतरावांनी चाळायला सुरुवात केली. “बापरे !काय भयंकर महाग पदार्थ आहेत. एकही भाजी तीनशेच्या खाली नाही. साधी चपाती सुध्दा तीस रुपयाची?खरंच इतक्या महागड्या जेवणाची शरीराला गरज असते?”ते मनातल्या मनात बडबडले.
वेटरने चायनीज चवीचं सुप आणून टेबलवर ठेवलं. सोबतीला मसाला पापड. मग वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर आले. तंदूरी मंचुरियन, पनीर चिली, हराभरा कबाब आणि बरंच काहीबाही. हे स्टार्टर खाण्यातच पोट भरणार होतं. मग जेवणार कसं हा प्रश्न विचारायचं संपतरावांच्या ओठावर आलं होतं. पण पार्टी दुसऱ्याची होती. अर्थात ही पार्टी सुजीतची जरी असती तरी हा प्रश्न विचारण्याचं धाडस संपतरावांना झालं नसतं. त्यांनी प्रत्येक स्टार्टरचा एक एक तुकडा घेऊन फक्त त्याची चव घेतली. त्यांनी आयुष्यात इतके पदार्थ खाल्ले होते की या पदार्थांची नवलाई त्यांच्यासाठी संपली होती. स्टार्टर संपले आता जेवणासाठी वेगवेगळ्या भाज्यांच्या ऑर्डर्स दिल्या जात होत्या. इतक्या भाज्यांची खरंच गरज होती का?दाबून स्टार्टर खाऊन झाल्यावर खरंच इतकी भुक शिल्लक आहे?काही वाया तर जाणार नाही?पैसा आहे म्हणून वाटेल ते ऑर्डर करत बसायचं का? हे प्रश्न त्यांच्या मनात आले. पण मघाप्रमाणेच ते आताही चुप बसले. असंही आजकालच्या तरुण पोरांना म्हाताऱ्यांचं बोलणं पटतं कुठे?त्यांनी बसलेल्या सगळ्यांकडे नजर फिरवली. मसालेदार आणि भरपूर तेल, बटर घातलेले पंजाबी पदार्थ खाऊन जवळजवळ सर्वच लठ्ठ झाले होते. अपवाद होता तो प्रथमेशच्या आईवडिलांचा आणि त्यांचा स्वतःचा. साधं, सकस, भरपूर पोषक मुल्य असलेलं महाराष्ट्रीयन जेवण आजकाल मराठी माणसांना का आवडत नाही याचं संपतरावांना नेहमीच कोडं पडायचं. नाहीतरी मराठी माणसाला आपल्या परंपरांचा, आपल्या भाषेचा, आपल्या खाद्य संस्कृतीचा अभिमानच नाही हे त्यांनी बऱ्याचदा अनुभवलं होतं. म्हणून तर हाॅटेल्सच्या मेनूकार्डमधून मराठी पदार्थ गायब झाले होते.
☆ बाप्पा नेटवर्क : फ्रिक्वेंसी सॉलिड आहे… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
“अरे, एवढी भली मोठी सजावट विकत घेऊन आलास तू? धन्य आहे बाबा. किती रुपये लागले?” अमितचे बाबा त्याला म्हणाले.
“सात हजार. ”
“अरे, पण सात हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता होती का? आपल्याला चांगली सजावट घरी सुद्धा करता आली असती. ”
“बाबा, आता ते सगळं विकत मिळतं आणि दिसायला पण ऑस्सम दिसतं. किती वर्षं आपण तीच ती फुलं पानं अन् दिव्यांच्या माळा लावणार? आणि दुसरं म्हणजे मला आता तेवढा वेळही मिळत नाही. ” अमित जरा दुखावलाच होता. जयंतरावांचा एकुलता एक मुलगा. मागच्याच वर्षी इंजिनियर झाला आणि लगेच नोकरी सुद्धा मिळाली. पॅकेज चांगलं होतं.
“तू कमावता झाला आहेस. तुझे पैसे खर्च कुठं आणि कसे करायचे हे तूच ठरवलं पाहिजेस. पण हजारो रुपये खर्च केले म्हणजेच आपण उत्सव चांगला केला असं नसतं. ” जयंतराव सांगत होते.
“पण आता ते कागद आणा, कापत बसा, चिकटवा, रात्रभर वाळत ठेवा, हे सगळं करायला माझ्याकडं वेळच नाही. ” अमित म्हणाला.
“वेळ नाही असं कसं म्हणतोस तू? रोज जवळपास तीन चार तास तरी फोन मध्येच डोकं घालून बसलेला असतोस ना. ” बाबांनी त्यांचं निरीक्षण सांगितलं.
“ते वेगळं आहे हो. तुम्हाला नाही समजणार. ” अमित आता चांगलाच चिडला. एवढं हौसेनं डेकोरेशन आणलं, पण बाबांना त्याचं काही कौतुकच नाही, असं त्याला वाटत होतं.
“तुला दर शनिवारी-रविवारी सुट्टी असते, तेव्हाही करता आलं असतं. पण, ‘वेळ नव्हता’ म्हणण्यापेक्षा सुद्धा ‘इच्छाच नव्हती’ हेच कारण आहे. ” बाबांनी नस बरोबर पकडली.
“तुम्ही काहीही म्हणा. पण आपण स्वस्तात होईल म्हणून घरीच काहीतरी करायला जायचं आणि ते इतरांच्या तुलनेत इतकं गावठी दिसतं की, फेसबुक इंस्टा वर त्याचे फोटो सुद्धा टाकायला लाज वाटते. लोकं लाईक सुद्धा करत नाहीत. म्हणून मग आणलं सरळ विकत. ” अमित तणतणत म्हणाला.
“अरे, पण गणपतीचा आणि सोशल मीडियाचा संबंधच काय? आपण जगाला दाखवण्यासाठी गणपती बसवतो का? लोकांनी लाइक्स दिले नाहीत म्हणजे आपला गणपती चांगला नाही, असा त्याचा अर्थ होतो का?” जयंतराव त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.
“बाबा, आता हट्ट सोडा तुम्ही. आम्हाला जरा आमच्या पद्धतीनं करु द्या ना. ” अमित म्हणाला.
जयंतराव शांतपणे उठले आणि त्यांच्या खोलीत निघून गेले. खोलीतल्या त्यांच्या गादीवर तक्क्याला टेकून बसले. तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ त्यांच्या डोळ्यांसमोरून झरझर झरझर सरकायला लागला.
कचकड्यांचे चेंडू तयार करुन केलेली सजावट, पुठ्ठ्याला घोटीव कागद चिकटवून त्याच्या नक्षीदार महिरपी तयार करुन केलेली सजावट, वर्षभर लक्षात ठेवून सोडावॉटरच्या बाटल्यांची झाकणं दुकानांमधून गोळा करून त्यांची केलेली सजावट हे सगळं त्यांना आठवायला लागलं..
गणपती म्हणजे सगळ्यांचा आवडता सण. विशेषतः मुलांसाठी तर पर्वणीच. सजावटीच्या नानाविध कल्पना डोक्यात घोळत असायच्या. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी विकत आणण्याची पद्धत तेव्हां नव्हती. इकडून तिकडून गोष्टी मिळवाव्या लागत. मिळतील तशा गोळा करुन साठवून ठेवाव्या लागत. त्यामुळे, स्ट्रॉ, झाकणं, टोपणं, छोट्या डब्या, पिसं, बटणं, नट बोल्टस्, लोह चुंबकं, रंगीत कागद, लग्नपत्रिका, त्यांची पाकीटं, पुठ्ठे, दोरे, चित्रं, तारांचे तुकडे, राख्या, झाडांच्या बिया, वाळलेल्या शेंगा असल्या अनेक गोष्टी मुलं साठवून ठेवत असत. त्याचा उपयोग गणपतीच्या सजावटीसाठी बरोब्बर होई.
क्रेप कागदाची फुलं, पानं, मोत्यांच्या माळा, लोकरीची तोरणं, कापसाच्या बाहुल्या असं शिकण्याचे वर्गही चालत असत. कितीतरी मुलं मुली ते शिकण्यासाठी जात. उन्हाळ्याच्या सुट्टीत छंद वर्गात शिकायचं आणि त्याचा प्रयोग गणपतीच्या सजावटीत करायचा, हा तर कित्येकांच्या घरचा शिरस्ता होता. श्रावण महिन्यात दर सोमवारी शाळा लवकर सुटे. नागपंचमी, राखी पौर्णिमा, स्वातंत्र्यदिन यांच्या सुट्ट्या मिळत आणि शिवाय हक्काचा रविवार असे.
हरतालिकेच्या दिवशी सुद्धा शाळेला सुट्टी असे. मुली शाळेत पूजेसाठी जात असत. त्या दिवशी गणपतीच्या सजावटीचा शेवटचा दिवस. त्याची धांदल उडालेली असे. घरातला गणपती सोवळ्यात असायचा आणि घर लहान. त्यामुळे, फार मोठी सजावट करण्याचा प्रश्नच नसायचा. मूर्तीही ठरलेली असायची आणि छोटीच असायची. तेवढ्याशा जागेत त्यातल्या त्यात छान दिसावं यासाठी मुलांचा जो काही आटापिटा सुरु असायचा, त्यात एक विलक्षण गंमत होती. एखाद्या शिंप्याच्या दुकानातून कापडाचे तुकडे मागून आणणे किंवा घरोघरीं जाऊन लग्नपत्रिका मागून आणणे ह्यात कुणालाच काही गैर वाटत नसे.
एकदा कमळात बसलेला गणपती अशी सजावटीची कल्पना डोक्यात आली. पण कमळ खरोखर दिसतं कसं, हे प्रत्यक्ष पाहायला संधीच नव्हती. त्यामुळं, प्रत्यक्षात कमळ करताच आलं नाही. गूगल किंवा युट्यूब तेव्हां नव्हतं. त्यामुळं, करण्याची इच्छा असूनही मार्गच मिळाला नाही. पण कुणीतरी डोक्यात पिल्लू सोडलं की, कागदावर चित्र काढून त्याला खळ लावायची अन् वरुन रंगीत रांगोळी पसरवली की, रांगोळी त्या चित्रात चिकटून बसते आणि छान चित्र तयार होतं. मग घरीच चित्रं काढून त्यांना खळ लावली आणि रांगोळीचे रंग चिकटवून सजावट केली. पण एक मात्र नक्की होतं की, अशा अनुभवांमधून पुष्कळ शिकायला मिळायचं, व्यवहारज्ञान वाढायचं, नियोजन कौशल्य तयार व्हायचं. शाळा कॉलेजेसची वेळापत्रकं सांभाळून हा उद्योग करताना अभ्यासाकडे जराही दुर्लक्ष झालेलं घरी खपायचं नाही. त्यामुळं, वाहवत जाऊन चालायचं नाही. पण त्यामुळं, आवड आणि करिअर यांच्यातला तोल कसा सांभाळायचा, हे वेगळं शिकण्याची गरजच भासली नाही.
जयंतराव विचार करत होते.. इतकं छान, रम्य, क्रिएटिव्ह वातावरण काही वर्षांपूर्वी आपल्या समाजात होतं. मुलं प्रयोग करत होती, चुकत होती, पण त्यातून बोध घेत घेत शिकत होती. त्यांच्यातली शोधकवृत्ती, सृजनशक्ती चांगली विकसित होत होती. हे सगळं बदललं कसं? चांगल्या सकारात्मक गोष्टी गेल्या कुठं? आपल्या पिढीनं त्या संपू कशा दिल्या? जयंतरावांचं विचारचक्र काही केल्या संपेना.
अगदीं दहा पंधरा वर्षांपूर्वी मुलं आरत्या म्हणायची, श्लोक म्हणायची, वेचे म्हणायची. आता कित्येक ठिकाणीं म्युझिक सिस्टिमवरच आरत्या होतात अन् लोक नुसतेच टाळ्या वाजवतात. घरोघरी संध्याकाळी परवचा अन् शुभंकरोती नियमितपणे व्हायचं. वयस्कर मंडळींसोबत नातवंडं कीर्तन प्रवचनांना जायची. कानांवर वेगवेगळ्या कथा, अभंग, संतवचनं पडायची. मराठीतल्या म्हणी, वाक्प्रचार नव्यानं शिकण्याची गरज पडायची नाही. कानांवर उत्तम प्रासादिक भाषा पडायची. आठवड्यातून दोन तीन वेळा तरी भजनाला जाणं व्हायचं. हे सगळं अगदी लहानपणापासूनच अंगवळणी पडत गेल्यामुळे मुलांचं सांस्कृतिक आयुष्य आपसूकच घडायचं. आयुष्याची पहिली सोळा सतरा वर्षं आजूबाजूच्या थोरामोठ्यांच्या नजरेसमोरच जायची. जरासुद्धा इकडं तिकडं करण्याची बिशाद नव्हती अन् तसं वागण्याची गरजही पडली नाही. हे सगळं गेलं कुठं?
आता घरोघरी मखरं विकत आणली जायला लागली, मोदक विकत आणले जायला लागले, पूजा सांगायला ‘संपूर्ण चातुर्मास’ ची जागा युट्यूब वरच्या व्हिडिओज् नी घेतली. आरती संग्रह गेले आणि म्युझिक सिस्टीम आल्या. टाळ, चिपळ्यासुध्दा जाण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांची जागा घुंगरांच्या कड्या घेतायत. रांगोळ्यांच्या रेडिमेड टाईल्स आल्यात. केळीची शुद्ध नैसर्गिक पानं मिळत असताना सुद्धा कापडी पानं लोक विकत घ्यायला लागले. गोविंद विड्याच्या जागी मगई पान सुरु झालं. कण्हेर, जास्वंद, गोकर्ण जवळपास दुर्मिळ झाले अन् त्याच्या जागी जरबेरा सारखी फुलं देवाला वाहण्याचा प्रघात सुरु झाला. म्हणजे सगळंच तर बदलत चाललंय. मग पारंपारिक गणेशोत्सव म्हणून आपण नेमकं काय करतो आहोत? घरच्या गणपतीचासुध्दा इव्हेंट करतोय का आपण?
जयंतरावांच्या डोक्यातले भुंगे आता इतका गुंजारव करायला लागले होते की, शेवटी त्यांना असह्य झालं. आपल्या पिढीनं म्हणावं तितकं लक्ष न घातल्यामुळेच हातातून गोष्टी निसटत चालल्यात याची टोचणी त्यांना लागली. सगळा परिवार एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र स्वयंपाक करणं, सकाळ संध्याकाळ खणखणीत आवाजात आरत्या होणं, एकत्र पंगती बसणं, गप्पांचे धबधबे यातलं काहीच आपण गेल्या कित्येक वर्षांत अनुभवलं नाही, हे आठवताना त्यांचे डोळे भरुन आले. गालांवर अश्रू ओघळायला लागले, ते टिपण्याचंही भान त्यांना राहिलं नाही.
एक तास असाच उलटून गेला. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी खोलीतला दिवा लावला. समोरच्या भिंतीवर गणपतीचा सुंदर फोटो होता. त्यांनी फोटोला हात जोडले. आणि “आपण सगळं आपल्याला जसं जमेल तसं यथाशक्ती, यथाबुद्धी करण्यातच खरी गंमत असते. ती रेडिमेड आऊटसोर्सिंग च्या इव्हेंट मध्ये मिळणार नाही, हे आमच्या अमितला समजेल तो सुदिन.. त्याला तूच जाणीव करुन दे रे बाबा” अशी मनोमन प्रार्थना करत ते उठले आणि बाहेर बैठकीच्या खोलीत आले. पाहतात तर खोली रिकामीच. त्यांनी बाकीच्या खोल्या, बाल्कनी सगळीकडे पाहिलं, आणलेली रेडिमेड सजावट कुठंच दिसेना.. !
तोवर दारावरची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. दारात कागदांची भेंडोळी घेऊन अमित उभा.. “बाबा, अहो सेफ्टी डोअर उघडा ना.. माझे दोन्हीं हात गुंतलेत. ” अमित म्हणाला.
जयंतरावांनी दार उघडलं. अमित आत आला अन् तसाच फतकल मारुन बसला. त्यानं पिशवीतून एकेक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. ” ह्या ग्लू स्टीक्स, क्राफ्टच्या कात्र्या, ह्या सोनेरी घंट्या.. चायनीज नाहीत, स्वदेशी आहेत. हे हॅण्डमेड कागद. इकोफ्रेंडली आहेत. आणि ह्या मोत्यांच्या लडी. मस्तपैकी घरीच ओवून त्याच्या झालरी करता येतील. ” अमित उत्साहानं एकेक वस्तू दाखवत होता, जयंतराव बघतच राहिले. त्यांना काही सुचेना.
“अरे, हे सगळं आणलंस खरं. पण मगाशी आणलेला तो सेट कुठंय?”
“मी तो परत करुन आलो. ”
“आणि त्यानं घेतलं ते सगळं परत?” त्यांनी आश्चर्यानं विचारलं.
“हो, पण पैसे परत मिळालेले नाहीत. जेव्हा तो सेट दुसरं कुणी विकत घेईल तेव्हा पैसे मिळतील. मी तसं बोललोय त्याच्याशी. ” अमितनं सांगितलं.
“पण, आता ही सजावट कोण करेल? तुला तर वेळ नाही ना?”
“अजून आठ दिवस आहेत. मी रोज ऑफिस मधून घरी येऊन थोडं थोडं करत पूर्ण करेन. अगदीच घाई झाली तर दोन दिवस रजा टाकता येईल. पण डेकोरेशन घरचंच करु. सगळंच विकतचं आणून घरच्या गणपतीचा इव्हेंट नको व्हायला.. ” अमित बोलता बोलता मोबाईल वरुन कुठल्या कुठल्या घरगुती सजावटींचे फोटो दाखवत होता. “आपण असं करुया, असा रंग देऊया, असा पडदा लावूया” वगैरे वगैरे..
जयंतराव मात्र विचार करत होते, “जगात खरोखरच आपल्या बुद्धीच्या पलीकडचं सुद्धा एक कम्युनिकेशन नेटवर्क आहे. बाप्पा नेटवर्क.. फ्रिक्वेंसी सॉलिड आहे!”
☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-२ ☆ श्री मंगेश मधुकर ☆
काकूंबरोबर बोलल्यावर माझी अस्वस्थता वाढली. बायकोचा दुसरी बाजू समजून घेण्याचा मुद्दा योग्य वाटला. अवीला फोन केला. चार-पाच रिंग वाजल्यावर त्यानं फोन घेतला.
“अलभ्य लाभ, आज आमची आठवण, ”अवी नेहमीप्रमाणं सुरू झाला.
“मित्रा कसायेस”
‘मी मस्त, तू सांग. ”अवी.
“रुटीन”
“तेच बरं. बाकी ठिक ना. ”अवी
“तू कसा आहेस. काकू कशायेत”
“मी ठिक, एकदम आईविषयी विचारलसं. ”
“सहजच, विचारू नको का”
“अरे, तसं नाही रे. आता वय झालं. काहीतरी कुरबुरी असणारच. ”अवी
“तुझी तब्येत काय म्हणतीये”
“मी ठणठणीत, आता मुद्दयाचं बोल. महत्वाचं काम असल्याशिवाय तू फोन करणार नाहीस. ”अवी.
“मानलं तर महत्वाचं आहे. ”
“भाऊ, सरळ सरळ सांग ना. उगीच कशाला!!!”
“काकूंच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय”
“तुला कसं कळलं. ”
“ते महत्वाचं नाही. ”
“आईनं तुला फोन केला वाटतं. हाईट झाली. ”अवी वैतागला.
“एक मिनिट. ”
“सॉरी, तुला विनाकारण त्रास झाला. ”अवी
“काय म्हणतोय ते ऐक. मला फोन केला म्हणून काकूंवर चिडू नकोस. ”
“आईनं तुला बरंच काही सांगितलेलं दिसतंय. ”
“काही विशेष नाही”
“आता विषय निघालाय तर स्पष्टच बोल ना”
“काकूंना तुझी भीती वाटते. खासकरून तुझ्या चिडण्याची.. ”
“काय!!!”अवी किंचाळला.
“त्यांना खूप धाकात ठेवतोस. ”
“काहीही काय!!आई म्हणजे अति करते. ”अवी
“हे बघ. संतापू नकोस”
“एवढी वर्ष ओळखतोस. तुला वाटतं मी आईशी असं वागेल?जाऊ दे ना!!, मला यावर काहीच बोलायचं नाही”अवीनं फोन कट केला. पुन्हा पुन्हा डायल केलं पण त्यानं घेतला नाही. तासाभरानं परत फोन केल्यावर घेतला. “आपण नंतर बोलू”
“अवी, तू ठिक आहेस ना”
“खरं सांगू. याक्षणी अजिबात नाही. आईचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. ”
“माझं ऐक. ”
“आता अजून काय राहिलयं. माझा नालायकपणा आई जगजाहीर करतेय. ”
“शांत हो. उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. ”
“अजून कोणा कोणाला फोन केलेत काय माहिती?”
“कोणालाही नाही. फक्त माझ्याशीच बोलल्या ते सुद्धा सहज विषय निघाला म्हणून.. ”
“माझा स्वभाव कसा आहे हे तुला माहितीये. तरीही.. ”अवी
“तुझ्याविषयी खात्री आहे म्हणूनच तर इतकं स्पष्ट बोलण्याचं डेरिंग केलं”
“यार, सगळंच अवघड झालंय. काय करावं ते सुचत नाही. जमेल तितकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो ना बायको ना आई कुणी समजूनच घेत नाही. ऑफिसमध्ये वेगळीच तऱ्हा. घरी-दारी प्रत्येकाच्या अपेक्षा पुऱ्या करण्यातच आयुष्य चाललंय. शक्यतो कंट्रोल करतो तरीही कधी कधी तोल सुटतो. शेवटी मीही माणूसच आहे ना. सगळ्यांना चिडणं दिसतं पण माझ्या त्रासाची कुणाला जाणीवच नाही. ”
“प्रत्येक घरातल्या कर्त्याची हीच अवस्था आहे. मनाला लावून घेऊ नकोस. एखादे वेळेस ऑफिसचा राग काकूंवर निघाला असेल. इट्स नॉर्मल!!काकूंच्या वागण्यातही बदल झालायं परंतु हा सुद्धा विचार कर की तू तुझ्या आयुष्यात, संसारात आणि बाबा गेल्यापासून अनेक वर्षे काकू एकट्याच आणि सोबत प्रचंड रिकामा वेळ, म्हातारपणात शारीरिक दुखण्याबरोबर पण मनसुद्धा हळवं होतं. ”
“मान्य पण मी मुद्दाम वागत नाही पण काही वेळेला आईचं वागणं सुद्धा डोक्यात जातं मग संयम सुटतो. आवाज चढतो. फक्त आईवरच चिडतो असं नाही तर बायको, मुलीवर ओरडतो. आईनं पण थोड समजून घ्यायला पाहिजे ना”
“हे सगळ्याच घरात होतं. मला वाटतं तरी आई आणि तुझ्यात खूप अंतर पडलंय. ”
“ए बाबा, काहीही काय बोलतोयेस”
“जे खरंय तेच’
“असं काही नाहीये”
“आईबरोबर कामाशिवाय बोलणं सोडलं तर निवांत गप्पा कधी मारल्या होत्या हे आठवतंय का?”
“त्याचा इथं काय संबंध”
“तोच तर प्रॉब्लेम आहे. रागावू नको पण स्पष्ट बोलतो तुझा आईबरोबर संवाद संपलाय. ”
“कदाचित असेल. कामामुळे वेळ मिळत नाही म्हणून मला तिच्याविषयी काहीच वाटत नाही असं नाही. ”अवी.
“मित्रा, एकच विनंती करतो की कितीही बिझी असलास तरीसुद्धा आईसाठी वेळ काढ. प्रेमाचे दोन शब्द बोलावेत एवढीच तिची अपेक्षा आहे. तेच तिच्यासाठी टॉनिक आहे. आईची काळजी घे. पिकलं पान आहे. कधी गळेल त्याचा नेम नाही. नंतर कितीही वाटलं तरी उपयोग नाही. ”
“कुठला विषय कुठं नेतोयेस”अवी.
“अव्या, अजूनही आईचा आधार आहे ही फार मोठी भाग्याची गोष्टयं. तिच्यामुळेच तुझं बालपण अजूनही शाबूत आहे. बेटया, नशीबवान आहेस. आईविना आयुष्य काय असतं ते मला विचार. ”भरून आल्यानं मला पुढचं बोलता येईना. अवीची अवस्था देखील वेगळी नव्हती. तो सुद्धा भावुक झाला. फोन चालू होता पण कोणीच बोलत नव्हतं. नंतर कापऱ्या आवाजात कसंबस “थॅंक्स” म्हणत अवीनं फोन कट केला.
—-
चार-पाच दिवसांनी पुन्हा काकूंचा फोन. आवाजात एकदम उत्साह. “मंगेश, बोलू शकते ना. ”
“हो बोला काकू!!”
“अरे जादू झाली. अवीनं मला मोठ्ठं सरप्राईज दिलं. ”
“अरे वा!! काय ते !”
“माझ्यासाठी नवीन फोन आणला. त्याच्यावरूनच बोलतेय. आता रोज संध्याकाळी रूममध्ये येऊन माझ्याशी गप्पा मारतो. माझं लेकरू चांगलंय रे!!” बराच वेळ अवीविषयी कौतुकानं बोलताना काकूंच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारा आनंद स्पष्ट जाणवत होता.
“बरयं, ठेवते आता फोन. तुझा बराच वेळ घेतला. अवीच्या चिडण्याविषयी बोलले ते सगळं विसरून जा. कुणाला सांगू नको. ऑफिसच्या टेंशनमुळं होत असेल पण आता तो चिडत नाही. ”काकूंशी बोलल्यावर छान वाटलं आणि नकळत आईच्या आठवणीनं डोळे पाणावले.
☆ चार बालकांची कथा – हिन्दी लेखक : श्री घनश्याम अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(असं म्हणतात की ज्या दिवशी मूल जन्माला येते, त्याच दिवशी त्याची आई पण जन्म घेते. त्यामुळेच जेव्हा ‘मदर्स डे’ असतो, त्याच दिवशी अघोषित असा ‘शिशु दिवस’ही असतो. त्याला अनुलक्षून ही व्यंग कथा. चार मुलांच्या वेगवेगळ्या कथा, पण एकाच सूत्रात गुंफलेल्या.)
श्री घनश्याम अग्रवाल
भल्ला मॅडमच्या किटी पार्टीची सगळ्यांनाच उत्सुकता होती. दोघी-चौघी जणी जरा चिंतीत होत्या. कारण त्यांची मुले 3-4 महिन्यांची होती पण भल्ला मॅडमनी ती पण व्यवस्था केली होती. पार्टीच्या शेजारच्या खोलीत मुलांना दूध पाजून झोपवायचं. म्हणजे मग एखादं मूल रडलं, तर त्याची आई लगेच येऊन त्याला घेऊ शकेल.
शेजारच्या खोलीत चार शिशू झोपले होते. पार्टीत अडथळा येऊ नये, म्हणून त्यांच्या आयांनी मुलांच्या तोंडात रबरी निपल्स घातली होती. म्हणजे मुलं स्तन समजून ते चोखत राहतील आणि चूपचाप पडून राहतील.
इकडे पार्टी सुरू झाली आणि तिकडे चारी मुले आपापसात बोलू लागली. ‘बघितलत, आपल्या मम्मींकडे… मोठ्या हुशार समजतात स्वत:ला. रबराचं निपल घातलय तोंडात. निपलचा चिपचिपितपणा आणि स्तनाचा उबदारपणा आम्हाला काय समाजत नाही?’ एकदा तर त्यांच्या मनात आलं, आशा आयांना चांगली शिक्षा दिली पाहिजे. जेव्हा पार्टी अगदी ऐन भरात येईल, तेव्हा मोठमोठ्याने रडायला सुरुवात सुरुवात करायची आणि जोपर्यंत ओरिजनल स्तन मिळत नाही, तोपर्यंत रडत रहायचं. पण मग पुन्हा त्यांनी विचार केला, मोठं झाल्यावर परंपरेनुसार आपण तिला सतावणारच. आता आपण अगदी लहान आहोत. जाऊ दे झालं.
पहिला म्हणाला, ‘ मी गप्प आहे कारण भविष्यात मला पॉलिटिक्समध्ये जायचय. मी जेव्हा मोदीजींना भेटेन… ‘
‘हे मोदीजी कोण आहेत?’ बाकीच्या दोघांनी विचारले. ’
‘मोदी माहीत नाहीत? अरे तेच मोदी… मागे काही दिवसांपूर्वी आईने मांडीवर घ्यावे म्हणून रडत, किंचाळत गोदी… गोदी… म्हणत होतो आणि आपली आई त्याला मोदी.. मोदी समजून आपल्याला मांडीवर घेत होती आणि तिच्या डोळ्यात तिला तिचा नरेंद्र मोदी दिसत होता. तेच मोदी… हं! तर जेव्हा मी मोदींना भेटेन, तेव्हा त्यांना सांगेन, ‘या दिवसात तुमचा ‘मन की बात’चा टी. आर. पी. खालावत चाललाय आणि का खालावला जाणार नाही. ? तुम्ही ‘मन की बात’ विचारपूर्वक आणि लिहून करता, तेही मोठ्या लोकांकडून. ‘मन की बात’ करायचीच असेल, तर ती आमच्याशी करा, आमच्याकडे मनाशिवाय दुसरं काहीच असत नाही. मोदीजी मी आपल्याला सांगतो, भ्रष्टाचाराची मुळं कुठे आहेत! पण माझी एक अट आहे. जेव्हा केव्हा आपल्याला अमीत शहांसाठी विकल्प शोधाची वेळ येईल, तेव्हा या मुलाकडे लक्ष असू दे किंवा मग मला मिनिस्टर बनवा. मी घोटाळा करेन. सी. बी. आय. शोध घेईल आणि शोध ईमानदारीने झाला, तर बोट माझ्याकडे नाही, माझ्या आईकडे दाखवलं जाईल कारण तिने स्तनाच्या जागी रबराचं निपल देऊन मला भ्रष्टाचाराची घुटी पाजली होती. एक राजकारणी दुसर्याच्या कमजोरीचा तोपर्यंत फायदा उठवत नाही, जोपर्यंत तो स्वत: कमजोर होत नाही.
‘यावर तिन्ही मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाली, ‘जेव्हा आम्ही मोठे होऊ, तेव्हा तुलाच मत देऊ. ’
‘माझ्या गप्प राहण्याचं कारण थोडं वेगळं आणि रोमॅँटिक आहे. ’ दुसरा म्हणाला. ‘माझी आई माझ्यावर नाराज असते. तिला असा संशय आहे की माझ्या जन्मानंतर तिची फिगर बिघडली. लोक म्हणे तिला रखा म्हणायचे. आता मम्मीला कोण समजावणार की दोन भुवयांच्या मध्ये कुंकवाचा टिळा लावल्याने काही कुणी रेखा होत नाही. मम्मी आपल्याला कुणी सांगितलं की मुलाच्या जन्मामुळे आईची फिगर बिघडते. आम्ही तर मागच्या जन्मापासून ऐकत आलोय, की ज्या क्षणी स्त्री आई होते, त्या क्षणी तिचं सगळं सौंदर्य प्रकट होतं. आई बनल्याशिवाय सौंदर्याच्या परिपूर्णतेला कुणीच स्पर्श करू शकत नाही. हां! रेखाची गोष्ट वेगळी. तिचं सौंदर्य पूर्णपणे तिच्यातच प्रगत होतं म्हणून तर ती इतकी मोठी कलाकार आहे. मी रेखावर जबरदस्त फिदा आहे. मी तर देवाला सांगणार आहे, पुढल्या जन्मी मला रेखा मिळणार असेल, तरच मला जन्माला घाल. मग ती प्रेमिकेच्या रूपात मिळो की आईच्या रूपात, तुझी मर्जी असेल तसं. माझ्या मम्मीला कुणी रेखा म्हणत नाही. तीच तेवढी स्वत:ला रेखा समजते. तिच्या या आशा चुकीच्या समजण्यामुळेच मी या घरात जन्माला आलो. तसाही या संपन्न घरात मी सुखी आहे. एकुलता एक वारस आहे ना!’
‘आत्ता तर तू तीन महिन्यांचा आहेस. आत्तापासूनच कसं म्हणू शकतोस की तू एकुलता एक वारस आहेस?’ बाकीची मुलं म्हणाली.
‘म्हणू शकतो. माझ्या मम्मी आणि डॅडींचा विवाह दोन वर्षे लांबला कारण डॅडींना दोन मुले हवी होती आणि मम्मीला एकदेखील नको होते. शेवटी खूप चर्चा झाल्यावर, तिला समजवल्यावर दोघांनीही एका मुलावर शिक्कामोर्तब केले. त्याचा परिणाम म्हणजे मी रडलो, तर मम्मी डॅडींवर राग काढेल. डॅडी इतर डॅडींप्रमाणेच दबकू आहेत. चूक मम्मीची असली, तरी पुन्हा पुन्हा तेच तिची समजूत काढणार. तिची मनधरणी करणार. मम्मीला समजावण्याच्या चक्करमध्ये पुन्हा माझा कुणी भाऊ येऊ नये, मी कुठलीच रिस्क घेऊ इच्छित नाही म्हणून मी गप्प आहे. माझ्यासाठी शानदार घर आणि जनदार रेखा एवढं पुरेसं आहे. ’
‘यार, पुढल्या जनमाता तुला रेखा मिळेल, तेव्हा आम्हाला तिचा ऑटोग्राफ घेऊन दे. सांग की हे माझे मागच्या जन्मीचे दोस्त आहेत. ’ मुले म्हणाली.
आता तिसरा म्हणाला, ’ मी तर शायराना वृत्तीचा आहे. मी जेव्हा पोटात होतो, तेव्हा माझी मम्मी आणि पापा कायम मुशायरे ऐकायला जायचे. त्यामुळे मुशायरेचे शेर मी अभिमन्यूप्रमाणे गर्भातच म्हणू लागलो होतो. जन्माला येताच मुनव्वर राणाचा फॅन झालो.
‘हे मुनव्वर राणा कोण?‘ मुलांनी विचारले.
‘अरे, मुनव्वर राणाला कोण ओळखत नाही. कसं माहीत असणार? कधी मुशायर्यांना गेला नाही आहात ना! तोच मुनव्वर राणा, ज्याने आईवर इतके शेर म्हंटलेत, इतके शेर म्हंटलेत की जर त्याने आपल्या प्रेयसीवर शेर म्हंटला, तर समोर बसलेला त्यातही आपली आई शोधू लागतो. मला कधी भेटलाच, तर सांगेन त्याला, ‘हे मादरेआजम, तू आईच्या ममतेवर किती तरी शेर लिहिलेस. दोन चार शेर आशा मम्मींवर पण लिही, जे आपल्या मुलाच्या तोंडात स्तनाच्याऐवजी निप्पल कोंबतात. काहीही म्हणा पण, मुनव्वर राणा मोठा शायर आहे. आईच्यावर त्याने हजारो शेर म्हंटले, जे लाखो लोकांनी ऐकले. मला तर वाटतं, त्यांचे शेर ऐकूनच, ते आठवत एखादा आपल्या म्हातार्या आईला पाणी देतो, तेव्हा मला वाटतं, मुनव्वर राणा आपली सगळी शायरी जगले. लहान तोंडी मोठा घास होईल कदाचित, की प्रत्येक शायर फक्त एक शेर म्हणण्यासाठी जन्माला येतो. बाकी शायरी ही त्या शेरापर्यंत पोचण्याचा मार्ग असतो. हे शेर त्यांच्या शायरीचा असा पुरस्कार आहे, की ते इच्छा असूनही मिळवू शकत नाहीत आणि इच्छा असूनही परत पाठवू शकत नाहीत. मी मुनव्वर राणाच्या त्या शेराला सलाम करत गप्प बसतोय. कुणी आई आपल्या मुलाला धोका देऊ शकते? ‘बेंनीफिट्स ऑफ डाउट’ तर अपराध्यालाही मिळतो. मग या तर आपल्या आयाच आहेत. जर आईनं दिलाय, तर निप्पल नाही, स्तनच असणार.
‘वा: वा: वा: वा:.. ’ बाकीची तीन मुले म्हणाली.
शेवटी चौथा मुलगा, जो मळक्या, फाटक्या कपड्यात होता, म्हणाला, ‘माझी आई आपल्या आयांप्रमाणे पार्टीत मजा करायला आलेली नाही. ती पार्टीत काम करायला आली आहे. भल्ला मॅमने आधी नको म्हणून सांगितलं होतं, पण आईने खात्रीपूर्वक सांगितलं की माझा मुलगा समजूतदार आहे. तो मुळीच रडणार नाही. गुपचुप पडून राहील. माझ्या आईने केवढा विश्वास ठेवला माझ्यावर. मी रडून तिचा विश्वासघात करू शकत नाही. मला माहीत आहे, माझी आई तुमच्या आयांची खरकटी भांडी घासेल, सगळं स्वच्छ करेल, तेव्हा भल्ला मॅम तिला काही पैसे देईल. त्या पैशाने माझी आई काही तरी खाईल. त्या खाण्याने जे दूध बनेल, ते दूध माझी आई मला पाजेल. निप्पलने नाही. तिच्या स्तनाने पाजेल. ’
‘यू आर ए लकी बॉय!’ बाकीची तीन मुले म्हणाली. ‘हं! आमची आईसुद्धा भांडी -कुंडी, साफ-सफाईची कामं करत असती तर…. ’
पार्टीमधला आवाज वाढत चालला होता॰ मुले कंटाळली. गालिब जसं म्हणाला होता, ‘दिल को बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है… ’ मुले निप्पलची वस्तुस्थिती जाणूनसुद्धा स्वत:ला रमवत…
एक मोदीला, एक रेखाला, एक मुनव्वर राणाला आणि एक आपल्या आईला आठवत झोपी गेले.
मूळ कथा – चार शिशुओं की कथा
मूळ लेखक : श्री घनश्याम अग्रवाल, मो. – 9422860199
☆☆☆☆☆
अनुवादिका –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
(रेखा परवा येऊन गेलेल्या हेमांगी जोशीचा टेस्ट रिपोर्ट आलाय तो जरा मला दाखवशील. निवांतपणा आहे तर थोडं बारकाईने त्याविषयी मला विचार करता येईल. “होय मॅडम, मी घेऊन येते ती रिपोर्ट फाईल”. ) – – इथून पुढे —-
लग्नाला चांगली पाच वर्षे होऊनही मातृत्व सुखाने वंचित हेमांगी माझ्याकडे आली होती मोठी आशा घेऊन. “डॉक्टर ताई मदत करा हो माझी. तुम्ही सांगाल ते सगळे औषधोपचार, तपासण्या करून घेण्यास मी तयार आहे. त्यासाठी कोण कोणती दिव्ये मी केली मलाच माहित. उपवास, व्रतवैकल्य, घरगुती उपचार, पवित्र नद्यांचं स्नान. सगळं सगळं केलं. घरात सासूबाईचा तगादा वाढलाय. नातेवाईक, शेजारी, मित्र मैत्रीणी, शुभचिंतक, हितचिंतक, प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देताना माझी दमछाक होते हो. आणि डॉक्टर बाळाच्या मऊ कोमल स्पर्शासाठी मी सुद्धा आसुसले हो. ” “हेमांगी, अगं इतकी सेंटीमेंटल होऊ नकोस. आपण करू उपचार. सगळे प्रयत्न करू. ईश्वर नक्कीच आपली मदत करेल. “
मी हेमांगीची फाईल चाळली हेमांगीचं गर्भाशयचं अविकसित होतं जन्मतःच त्यात दोष होता. ईश्वराने तिला स्त्रीत्व तर दिलं होतं, पण मातृ सुखाचा तिचा तो मार्ग मात्र अविकसित राहिला होता. अशा स्थितीत तिला मातृत्व लाभणं कठीण होतं. हेमांगीला माता होण्यासाठी दोनच मार्ग आता शिल्लक होते. एक तर तिने मूल दत्तक घेणे. दुसरा भाडोत्री आईच्या (सरोगेट मदर) गर्भाशयात मूल वाढविणे. हेमाचे यजमान अविनाश जोशी तसे समजदार गृहस्थ होते. पण कुटुंबातून किती सहकार्य मिळेल याविषयी मी साशंक होते.
माझ्या हातातील फाईल काढून घेत आई म्हणाली, “एक दिवस तर आराम कर माझी बाई. ” मी मंद स्मित करीत फाईल ठेवली. आईला बरं वाटावं म्हणून बेडवर आडवी झाले. आणि हळूहळू भूतकाळाची आवर्तने माझ्या मन: पटावरून सरकू लागली. आई-वडिलांच्या संसार वेलीवरचं मी पहिलं वहिलं फूल. माझा जन्मच सगळ्यांना आनंद देणार होता. सगळ्यांच्या मुखावर हास्य होते. कारण बऱ्याच दिवसातनं रांगती पावलं घरभर दुडूदुडू धावत होती. माझ्यानंतर घरात दोन भावांचा जन्म झाला. सुखाच्या राशीवर आम्ही सगळे खेळत होतो, बागडत होतो.
माझा शाळा प्रवेश, शिक्षणातील गती, इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड, माझा वाचनाचा छंद- घरात नेहमीच कौतुकाचा, प्रोत्साहनाचा विषय ठरला. मुलगी म्हणून कुठलीही आडकाठी दुय्यम दर्जा मला कधी मिळाला नाही. वयाची बारा वर्ष मी पार केली आणि आईची काळजी वाढू लागली. मुलगी तारुण्यात पदार्पण करेल, तिला सांभाळायला पाहिजे, या चिंतेने ती पोखरली जाऊ लागली. पण वयाची पंधरा वर्षे पार होऊनही माझ्यात स्त्रित्वाची कोणतीच लक्षणे न दिसल्याने आई-बाबांनी मला डॉक्टरांकडे नेले. माझी सगळी शारीरिक तपासणी, सोनोग्राफी करण्यात आली. आणि विधात्याने माझ्यावर केलेला अन्याय लक्षात आला. मुलगी म्हणून मला जन्म तर मिळाला पण स्त्रित्व बहाल करणारा तो अवयवच (गर्भाशय) माझ्या शरीरात नव्हता. माझ्या कुटुंबावर तर हा आघात होताच. पण माझ्या तनामनावर आघात करणारा हा क्रूर नियतीचा खेळ होता. पण माझे वडील मोठे खंबीर आणि धीरोदत्त विचारसरणीचे, ताठ कण्याचे एक सद्गृहस्थ होते. त्यांनी आईला व मुख्यतः मला सावरले.
” काही काळजी करू नकोस बेटा. तुझा अभ्यास उत्तम चालू ठेव. त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कर. खूप शिक. मोठी हो आणि स्वतःच्या पायावर उभी रहा. ताठ मानेने ताठ कण्याने जगायला समर्थ करण्याइतका तुझा बाप नक्कीच तुला मदत करणारा आहे. “अहो पण मुलीची जात, परक्याचं धन आणि हा समाज- कसं सगळ्यांना तोंड देणार ?. मुलीचं लग्न कसं होणार?कोण करील तिच्याशी लग्न? आणि मुलींचे लग्न नाही केलं तर समाज काय म्हणेल?” माझी आई बोलत होती. थोडीशी पॅनिक झाली होती
“कोणता समाज, कोणते लोक, कोणाला घाबरताय तुम्ही. तुमचं दुःख, तुमचे कष्ट, कमी करायला काही हा समाज येत नाही. मग तुम्हाला बोलणारा, तुम्हाला बोट दाखवणारा कोणता समाज म्हणता तुम्ही. त्यांना अधिकार तरी आहे का तुम्हाला बोलण्याचा. “
बाबांचा खंबीरपणा, आईची मदत, भावांचं सहकार्य मी यशाच्या पायऱ्या भरभर चढत होते. बारावीचा माझा परीक्षेचा निकाल लागला. आणि मी बाबाजवळ मनमोकळेपणाने बोलले. “बाबा मला उत्तम डॉक्टर व्हायचंय. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून अनेक माता-भगिनींची सेवा करायचीय. विधात्याने माझ्यावर अन्याय केला स्त्रि जन्मा येऊनही स्त्रीचं पूर्णत्व मातृत्व सुखापासून मी वंचित राहिले. माझं दुःख सहन करण्याची विधात्यानचं मला शक्ती दिलीय. आता माझ्यासारख्या अनेक भगिनींची सेवा करून माझा हा जन्मच ही सफल करीन. मी अभागी नाही हो बाबा. “
“कोण म्हणते बेटा तू अभागी आहेस म्हणून. आणि तुझा विचार केवढा उदात्त. समाजानं आपल्याला काय दिलं, यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” मांडणारी माझी मुलगी खरंच महान आहे. बेटा तुझ्यापुढे आज तुझा हा बाप, जन्मदाता नतमस्तक होतोय. जा बेटा, पुढे पुढे जा. माझा मदतीचा हात सदैव तुझ्या पाठीशी राहील. “
आईबाबांच्या आशीर्वादाने व खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिल्याने आज मी डाॅ. शर्वरी गोखले एक. नामांकित स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ होते
माझ्या नेत्र पाकळ्या केव्हाच जडावल्या व मी झोपेच्या आधीन झाले. सकाळी उठल्यावर थोडे फ्रेश वाटले. रेखा आज हेमांगीला आणि तिच्या पतीराजांना बोलावून घे. मी सविस्तरपणे हेमांगी व अविनाशला समजावून सांगितले. आणि मूल दत्तक घेणे किंवा सरोगेट मदर द्वारा प्राप्त करण्याचे मार्गही सुचवले. अविनाश उच्चशिक्षित व समंजस होता मूल दत्तक घेण्याचाच त्याने विचार केला आणि कुटुंबाला समजावून सांगण्याची जबाबदारी ही स्वीकारली.
“ताई ताई तुम्ही खरोखरच धन्य आहात. मदतीचा हात देणाऱ्या दाता आहात आणि रोज नवीन कुटुंबाला जन्म देणाऱ्या अनेक माता भगिनींच्या ओटीत मातृत्वाचा दान देणाऱ्या तुम्ही धन्वंतरी आहात. “
“मी कसली धन्वंतरी. करता करविता तो ईश्वर आहे. तो सगळ्यांची मदत करणारा सगळ्यांचा भाग्यविधाता आहे. तुम्ही सगळेच मला धन्वंतरी, मातृरुपिणी मानतात. पण स्त्री जन्मा येऊनही स्त्रीचं पूर्णत्व मातृत्व मला कधीच मिळालं नाही. अपूर्णत्व असलेली मी एक स्त्री. “
“नाही डॉक्टरताई, तुमचं दुःख तसं मोठं आहे पण स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या दुःखावर मायेनं फुंकर घालणाऱ्या तुम्ही एक असामान्यचं आहात. या मानवीय दुःखावर मदतीचा हात देऊन तुम्ही त्यावर मात करतात, हे मानव जातीवर तुमचे उपकारच आहेत ताई. येते मी आणि बाळ दत्तक घेतल्यावर मिठाईचा बॉक्स घेऊन लवकरच येईल मी. “
माझी ओ. पी. डी. संपली होती. मी घरात आले. फ्रेश झाले. आईची सायंकाळची दिवाबत्ती नुकतीच झालेली होती. तिचे हरिपाठ स्तोत्र गुणगुणणे सुरू होते.
“मुंगी उडाली आकाशी,
तिने गिळले सुर्याशी. “
देवघरातील त्या दिव्याच्या मंद प्रकाशात आज मलाही अनोखे सौख्य लाभले होते. मनःशांती मिळाली होती. सौख्य आनंदाने भरलेला माझा तो तेज:पुंज चेहरा पाहिल्यावर आईलाही समाधान वाटले होते. तिचा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर होता.
☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
(“मावशी तुम्ही स्वतःही या दिव्यातून गेल्या आहात. आणि आज तुम्हीच घाबरताय. रीमा च्या नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. हे सगळं आपण तिच्या आणि बाळाच्या भल्यासाठीच करीत आहोत. थोडा धीर धरा. होईल सगळं व्यवस्थित.”) — इथून पुढे —
“मॅडम, बालरोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील आलेत. “
“माझ्या केबिनमध्ये बसव त्यांना चहा कॉफीचं विचारशील. मी येतेच थोड्या वेळात. “
“या डॉक्टर साहेब, काल माझ्याकडे एक अपूर्ण दिवसाची सातव्या महिन्यातच प्रसूती झालीये. बाळ अतिशय कमी वजनाचं. फक्त सोळाशे ग्रॅम वजनाचं आहे. इनक्यूबेटर मध्ये ठेवलंय. तुमचा सल्ला हवाय. बाळाला तुम्हीच ट्रीट करा. ” “ओके मॅडम, बघूया पेशंट” म्हणत मी आणि डॉक्टर त्या रूम कडे वळलो. “मॅडम बाळ कमी वजनचं अवश्य आहे. पण हेल्दी आहे. निरोगी आहे. जवळपास एक महिनाभर तरी याला इनक्यूबेटर लागेल. होईल सगळं व्यवस्थित. “
डॉक्टर पाटील माझ्या दवाखान्यातील प्रत्येक बाळाची देखभाल करीत. प्रत्येक जन्माला येणाऱ्या बाळाला बालरोग तज्ञाला दाखवून देणे हा अलिखित नियमच केला होता मी माझ्यासाठी.
“रेखा आज जन्माला आलेल्या बाळांची यादी दिलीस कां महानगरपालिकेत. ” “होय मॅडम, काल जन्मालेल्या तिघी बाळांची, दोन मुली एक मुलगा याची यादी दिली मी महानगरपालिकेत, जन्म मत्यू नोंदणी विभागात. ” “व्हेरी गुड-चल रीमा काय म्हणतेय बघूया. “
रीमाने आता संपूर्ण हॉस्पिटल दणाणून सोडलं होतं. आणि तो सुवर्णक्षण मी एका झटक्यासरशी टिपला. बाळाचं डोकं बाहेर येतात त्याला हळुवारपणे संपूर्ण बाहेर ओढलं. आणि रेखाच्या हाती दिलं. तिनं बाळाच्या नाका तोंडावरची घाण साफ केली आणि लगेच बाळाने टाहो फोडला. रीमाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संपूर्ण कुटुंब आनंद सागरात न्हाऊन निघालं. बाळाच्या जन्माच्या वेळी बाळ ओढल्याने प्रत्येक पहिलटकरीणीला टाके येतातच. मी ते काम करण्यात गर्क झाले. माझ्या धाकटा भाऊला व्हिडिओ चित्रीकरण यांचं मोठं वेड. अर्थात हा त्याचा छंद होता. शिक्षण त्याचं सुरू होतं. त्याने बाळाच्या जन्माची सीडीच तयार केली. बाळाला प्रत्येक नातेवाईकांकडे देणं, त्यांचे ते आनंदाचे चेहरे कॅमेर्यात बंद करणं, नवजात आईचं नवजात बालकाशी संवाद साधणं – सगळं सगळं त्याने चित्रीत केलं.
पेढ्यांचा बॉक्स माझ्या हाती देत रीमाची आई उद्गारली, “ताई तोंड गोड करा तुमचं” “अहो मावशी, तुमचं तोंड गोड होऊ देत आधी. आजीबाई झालात तुम्ही. ” म्हणून मी तिने दिलेल्या बॉक्स मधील पेढा तिला भरवला. “ताई बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. चांगले आहेत. निरोगी आहेत. भरून पावले मी. “
“ही सगळी परमेश्वराची कृपा. आपण फक्त मदतीचे हात सगळं नियंत्रण तर त्याच्याच हाती आहे. “
आज सकाळी सकाळी माझ्याकडून अंथरुणातून उठवलेही जात नव्हते. अंगात तापाची कणकण जाणवत होती. डोकं दुखत होतं. सर्दीनं नाक बंद झालं होतं. थोडासा खोकलाही येत होता. रेखा ड्युटीवर हजर झालीच होती. “मॅडम काय त्रास होतोय आपल्याला, चेहराही बराच उतरलाय. ” “अगं रेखा, बघ अंगात ताप आहे माझ्या. थर्मामीटर आण बघू”. “बापरे मॅडम 102 डिग्री ताप आहे तुम्हाला. ” “थांबा मी डॉक्टर देवकरांना बोलवते”. म्हणत तिने डॉक्टरांना फोन लावला.
“काय होतंय गं माझ्या बछडीला” म्हणत आई माझे जवळ आली. वार्धक्याने तिचा थरथरणारा हात, डोळ्यातून माझ्या विषयी ओसंडून वाहणारी अपार माया, करुणा पाहून मला भडभडून आलं. “उगी उगी बाळ, अंगं केवढं तापलंय. रात्रंदिवस काम, काम आणि काम. आजार पण नाही येणार तर काय होणार अशानं. कधी विश्रांती म्हणून नाही की चार आठ दिवस कुठे गावी जाणं नाही. सातत्याने कामाच्या दावणीला जुंपलेली. आता काही ऐकणार नाही मी तुझं. पंधरा दिवस डॉक्टर वृशालीला सोपव तुझ्या हॉस्पिटलचं काम. करील ती तुझी मदत. ” “अग आई किती काळजी करशील माझी. ऋतू बदलामुळे होतो त्रास. काही काळजी करू नकोस. “
“हा काय म्हणतोय आमचा पेशंट” म्हणून डॉक्टर देवकरांनी माझ्या रूममध्ये प्रवेश केला. मनगटावर बोटे ठेवून नाडीचे ठोके घेतले. टॉर्च चा झोत टाकून डोळ्यांची बुब्बुळे तपासली. स्टेथास्कोपने हृदयाचे ठोके घेतले. ” “केव्हापासून आलाय ताप. ” ” काल रात्रीपासूनच मला बरं नव्हतं डॉक्टर साहेब. आज तर अंथरुणातूनही उठवले जात नाही आहे. ” ताप, सर्दी, खोकला सगळी व्हायरल फिवरची लक्षणे आहेत. मी औषधे लिहून देतो, ती वेळेवर घ्या आणि रेखा ही दोन इंजेक्शनने सलाईनच्या ड्रिप मधून जाऊ देत शरीरात. होईल ताप लवकर कंट्रोल. आणि आई काही काळजी करू नका. लवकरच बऱ्या होतील मॅडम.
“माझं मेलीचं म्हातारपण. त्यात या पोरांना काही त्रास झाला तर माझं अवसानचं संपतं. हातपाय गळतात माझे. कधी आराम करीत नाही पोरगी, विश्रांतीसाठी कुठे जात ही नाही. 24 तास नुसती कामाला वाहिलेली. अहो यंत्राला सुद्धा काही तासांची विश्रांती लागते. तेव्हा ते पुन्हा पुर्ववत काम करतात. आम्ही तर हाडामासांची माणसे. त्यांना विश्रांती नको. मग व्हायचा तो परिणाम होतोच. बघा ना कसं अंथरुणातूनही उठवत नाही आहे आज हिच्याकडून. “
“हो बरोबर आहे आई. विश्रांती तर पाहिजेच. सक्तीच्या विश्रांतीसाठी तर सलाईनची बाटली लावली आहे. काळजी करू नका तुम्ही. येतोय मॅडम” डॉक्टर देवकर निघून गेले.
अंगात असलेला ताप, त्यामुळे आलेली ग्लानी, प्रचंड थकवा आणि पाच-सहा तास पुरणारे सलाईनमुळे माझ्या
पापण्या केव्हा जडावल्या आणि मी निद्रेच्या आधीन झाले मला कळलेही नाही. आज दिवसभराच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स रेखाने रद्द केल्या होत्या. अगदीच इमर्जन्सी केस असली तर डॉक्टर वृशालीला बोलवण्यात येणार होते.
सायंकाळपर्यंत माझा ताप बराच कंट्रोल झाला होता. पण अंग मात्र ठणकत होतं. विकनेस खूप जाणवत होता. ” उठलीस बाळ, चल थोडीशी चूळ भर आणि खाऊन घे. मूग डाळीची मऊ खिचडी केली आहे तुझ्यासाठी, त्यावर थोडीशी शुद्ध तुपाची धार. चवीला पापड आणि खुर्चणीची चटणी केलीय. जेवून घे बेटा. त्याशिवाय तुला तकवा कसा राहील. आईने मला जेवायला भाग पाडले. पण अन्नाची चव लागत नव्हती. सगळंच कडू वाटत होतं. अन्न गिळले न जाता तोंडातच गोळी होत होती. “होतंय बेटा तापात असं आणि हा अशक्तपणा चांगला आठ-दहा दिवस घेईल पूर्णपणे बरं व्हायला. आईने हलकेच माझ्या कपाळावर थोपटले. “
सायंकाळची मंद वाऱ्याची झुळूक हिरवळीवरचा प्रशांत गारवा, रात राणीचा मंद सुगंध माझ्या खिडकीतून माझ्यापर्यंत पोचत होता. या आल्हाददायी वातावरणानं थोडं मोकळं वाटलं. माझी कळी खुलली. आणि काहीतरी काम करावं, माझं मन मला खुणावू लागलं.
रेखा परवा येऊन गेलेल्या हेमांगी जोशीचा टेस्ट रिपोर्ट आलाय तो जरा मला दाखवशील. निवांतपणा आहे तर थोडं बारकाईने त्याविषयी मला विचार करता येईल. “होय मॅडम, मी घेऊन येते ती रिपोर्ट फाईल”.
☆ कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर☆
“बाबा, तुम्हाला माहित आहे का ? ते शेजारचे काका एकटेच (चारचाकी) गाडी घेऊन ऑफिसला जातात. त्यांच्या घरात कोणी असो नसो, त्यांचा AC ढणढणा चालूच असतो. त्यांची मुलं स्विगी झोमॅटोवरून भरमसाट अन्न मागवतात आणि त्यातलं बरंचसं अन्न न खाता तसंच फेकून देतात, अन्नाची नासाडी करतात. या सगळ्यांनी कार्बन फुटप्रिंट किती वाढतो माहितीये ?”
मी आपला रविवार सकाळी चहासोबत वर्तमानपत्राचा आस्वाद घेत होतो, आणि आमचे चिरंजीव – कधी नव्हे ते (रविवार असूनसुद्धा) लवकर उठून त्यांच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसले होते – ते अचानक वदते झाले.
“बाबा रे, तू अशी संदर्भाशिवाय आकाशवाणी करत जाऊ नकोस रे. हे कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय ? त्याचा काकांच्या गाडीशी, AC शी आणि अन्न वाया घालवण्याशी काय संबंध ? आणि कार्बन फुटप्रिंट वाढला म्हणजे चांगलं झालं का वाईट ?”
हा असा अजाण बाप माझ्याच नशीबी का यावा असा मला नेहमीसारखा हताश लूक देत, निरगाठ उकल तंत्राने, संदर्भासहित स्पष्टीकरण देत तो म्हणाला, “बाबा, एखादी वस्तू तयार करण्यासाठी अथवा एखाद्या सेवेचा वापर करण्यासाठी किती इंधन खर्च होतं आणि त्याच्या ज्वलनाने किती कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो, याला त्या वस्तूचा / सेवेचा कार्बन फुटप्रिंट म्हणतात. ”
“गाडी चालवण्यात इंधन जळलं हे समजू शकते. पण AC चालवल्याने आणि अन्नाची नासाडी केल्याने कसं काय इंधन जळतं बुवा ?” मी नि:संकोचपणे माझे अज्ञान प्रकट केले.
“अहो, दर वेळी प्रत्यक्ष इंधनच जळले पाहिजे असे नाही. बघा, AC साठी इलेक्ट्रिसिटी लागते की नाही, मग thermal power असेल तर त्याला कोळसा वापरला जातोच की नाही ? म्हणजेच AC साठी अप्रत्यक्षरीत्या का होईना इंधन जाळले जातेच.
अहो, हा खूप मोठा आणि क्लिष्ट विषय आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी थोडक्यात सांगितला.
अन्नधान्य निर्मितीसाठी ट्रॅक्टर वापरला जातो, शेतीसाठी पाणी उपसा करायला पंप मोटार वापरले जातात, या सगळ्यात इंधन लागतंच. शेतमालामधून आपल्याला खाण्यायोग्य अन्न बनवण्यासाठी – जसे गहू दळण्यासाठी, आइस्क्रीम करण्यासाठी, श्रीखंड करण्यासाठी ऊर्जा लागतेच.
शिवाय अगदी शेतकामासाठी बैल वापरले तरी त्यांना खायला प्यायला अन्न लागतं, त्यांचे ते अन्न निर्माण करायला परत ऊर्जा लागतेच की. ” चिरंजीव.
हे कार्बन प्रकरण लेकानं बरंच मनावर घेतलेलं दिसत होतं, बराच सांगोपांग अभ्यास केलेला दिसत होता त्यानं. “ते सगळं ठीक आहे, पण शेजारच्या काकांच्या एका घरामुळे जगाला असं काय मोठंसं नुकसान होणार आहे ? आणि ते त्यांच्या पैश्याने या गोष्टी करत आहेत ना ? त्याबद्दल तू आक्षेप घ्यायचं कारण काय ?” मी.
“बाबा, एका अर्थी तुमचे म्हणणे थोडेसे बरोबर आहे. उद्योगधंद्यांच्यामुळे प्रदूषण आणि कार्बन फुटप्रिंट प्रचंड वाढतो. त्या मानाने, घरगुती पातळीवर तेवढं नुकसान होत नाही. पण माणसांची लोकसंख्या लक्षात घेतली, तर हा गुणाकार अक्राळ विक्राळ होऊन उभा ठाकतो.
तासभर AC चालवल्याने जवळजवळ १ किलो कार्बन डायऑक्साइड फुटप्रिंट तयार होतो. आपल्या सोसायटीतील अशी १०० घरे धरली, शहरातील अशा हजारो सोसायट्यांचे गणित केलं, तर बघता बघता हा आकडा केवढा तरी अवाढव्य होत जातो.
तेच गणित गाडीचं. एक किलोमीटर अंतर कापायला पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाडीचा कार्बन फुटप्रिंट ०. २ किलो इतका आहे, तेच बस किंवा ट्रेनचा हा फुटप्रिंट प्रति किलोमीटर जेमतेम ०. १ किलो इतका – गाडीच्या निम्मा आहे. शिवाय ट्रेन – बस मधून एका गाडीच्या कितीतरी पट अधिक माणसे प्रवास करू शकतात. ” तो अतिशय गांभीर्याने सांगत होता.
मला या प्रकरणात उत्सुकता वाटू लागली. “बरं, जळलं इंधन, झाला निर्माण कार्बन डाय ऑक्साईड. पण त्यानं असं काय कोणाचं घोडं मारलं जाणार आहे ? आणि अशा एखाद्या गाडीने आणि एखाद्या AC ने असा काय तो मोठासा फरक पडणार आहे ?” मी विचारता झालो.
“बाबा, हा जो कार्बन डाय ऑक्साईड किंवा तत्सम वायू तयार होतो त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस – हरित गृह वायू म्हणतात. सूर्यकिरणांनी आपल्या वातावरणात जी उष्णता आली असते, ती या वायूंमुळे आपल्या वातावरणातच अडकून राहते, त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. Global warming, climate change होतं यामुळे बाबा ! ही खूप गंभीर बाब आहे. “
“पण याने तुला मला काय फरक पडतो ?”
“अहो बाबा, या तापमान वाढीने उत्तर ध्रुवावरचे बर्फ वितळू लागले आहे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. सेशेल्स, मॉरिशस असे अनेक देश नजीकच्या भविष्यकाळात पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत आणि अगदी मुंबईसह भारतातीलही किनाऱ्यावरील अनेक शहरांनाही धोका निर्माण झालेला आहे.
पाऊस पडण्याचे वेळापत्रक बिघडले आहे. गेली पाच दहा वर्षे आपल्याकडे, अगदी दिवाळीत, जानेवारी महिन्यातही बेदम पाऊस पडतो. Climate change मुळे उन्हाळे अधिक तीव्र होत चालले आहेत. यंदा तर पुण्यातसुद्धा तापमान ४०° च्यावर गेलं होतं.
हवामानाच्या या बदलांमुळे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अनेक जाती नामशेष होऊ लागल्या आहेत, हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू नद्यांच्या, समुद्रांच्या पाण्यात विरघळल्याने पाणी आम्लधर्मी (acidic) झाले आहे, त्याने पाण्यातील अनेक वनस्पती व मासे यांना हानी पोचत आहे. जैवविविधता (biodiversity) धोक्यात आली आहे.
प्रदूषणाने हवेची गुणवत्ता बिघडली आहे, लोकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघातासारखे प्रकार वाढू लागले आहेत. रोग पसरविणारे जीवाणू (pathogens) व विषाणू (virus) वाढू लागल्याने रोगराई वाढत आहे.
जमिनीची कृषी संबंधित उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आहे, पाण्याच्या उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.
☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
“अगं थोडसं सैल सोड तू. आक्रसून घेऊ नकोस. तुला भीती वाटणं साहजिकच आहे. पण आई व्हायचंय ना तुला. मग हे उपचार तर करावेच लागतील. काही त्रास होणार नाही तुला. या उपचारानंतर पुढच्या वेळेस येशील तू गोड आनंदाची बातमी घेऊनच. आणि मग पुढे बाळंतपणासाठी. मग मला सहकार्य कर. ” पेशंटची कळी खुलली. उपचार करून घेण्यास मला सहकार्य देण्यास तयार झाली.
“बाई, तुम्ही धन्वंतरी आहात. आजपर्यंत अनेक घरात तुमच्या मदतीने, ज्ञानाने वंशाचा दिवा उजळलाय. घरात पाळणा हलला आहे. सगळी आशा सोडून दिलेल्यांना तुम्ही पुन्हा त्यांच्या काळोख्या जीवनात दीपज्योती प्रज्वलित केलेल्या आहेत. अनेक मातांची ओटी भरून तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेतलेत. त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण केलात. खरंच बाई, परमेश्वराला तर मी पाहिलं नाही पण परमेश्वरा समान माणूस मी तुमच्या रूपात पाहिलाय. ” पेशंटची सासू शेवंता सोनटक्के बोलत होती.
“अहो, मी काही करत नाही. जे काही घडतं त्यामागे परमपित्या परमेश्वराचीच प्रेरणा असते. मी तर एक निमित्त मात्र. पेशंट्सची सेवा करणे हे तर माझं व्रत. त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, औषध उपचार करणं, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार उपचार करणं हे तर माझं कर्तव्यचं. माझ्या हाताला यश आहे असं तुम्ही मानता, पण मावशी माझ्या पेशंटचे सहकार्य, जिद्द, इच्छाशक्ती आणि मनोबल ही त्यांना मदत करतं. माझ्या प्रयत्नांना अशी सहकार्याची जोड मिळाली तर यश मिळणारच ना मावशी. होय एक गोष्ट मात्र मी कटाक्षानं पाळलीय, मी आणि पेशंटच्या दरम्यान पैसा हा महत्त्वपूर्ण घटक मी कधीही ठरू दिला नाही. एखादा गरजवंत अडचणीतील पेशंट असेल तर पैशा अभावी त्याचे उपचार न करणं हे माझ्या तत्त्वात कधीच बसलं नाही. अनेकांची मी मदत केली आहे, करीत आहे आणि करीत राहीन. “
“तेच तर म्हणते ताई मी, माणसापेक्षा त्याच्यातील माणुसकी ही श्रेष्ठ असते. तुमच्यातील माणुसकी, तुमच्यातील जिद्द, कामातील सचोटी यामुळेच तर माणूस ओढला जातोय तुमच्याकडे. तुमचं लाघवी बोलणं, पेशंटसच्या समस्या अगदी मातेच्या ममतेनं जाणून घेणं, सगळंच विलक्षण. तुमच्या बोलण्यानेच बाई पेशंटचा निम्मा आजार बरा होतो. अनेक माता भगिनी रित्या ओटीन, रित्या मनानं तुमच्याकडे येतात, आणि निराश न होता भरभरून सुख घेऊन जातात. म्हणून तर म्हणते तुम्ही धन्वंतरी नाही तर कोण आहात बाई?” शेवंताबाई दिलखुलास हसली.
“ठीक आहे मावशी, तुमच्या सुनेसाठी मी, ही काही औषधे लिहून देते. ती वेळेच्या वेळी घ्या. तिच्या खाण्यापिण्याकडे ही लक्ष असू द्या. थोडीशी ॲनिमिक झालीय ती. रक्ताची कमतरता भरण्यासाठी सकाळच्या वेळी खजूर, राजगिऱ्याचा लाडू, पालकाची भाजी, सफरचंदे, दूध, डाळी यांचा आहारात समावेश असू द्या. या महिन्याचं मासिक चक्र संपलं की लगेचच घेऊन या तिला. ”
“होय, डॉक्टर ताई तुम्ही सांगितलेला प्रत्येक सल्ला पाळीन मी. माझ्या ही सुनेची ओटी भरू द्या. माझ्याही घरात चिमणी पावलं उमटू द्या. आणि आजी म्हणून आता माझंही प्रमोशन होऊ द्यात. ऋणी राहीन तुमची. “
मी माझा आश्वासक हात त्यांच्या हातावर ठेवला. मायेने थोडासा दाबला. शेवंताबाईच्या नेत्रात आसवांनी दाटी केली. “या मावशी आता. ” मी टेबलावरची बेल दाबली तशी नर्स आत आली “नेक्स्ट”, “येस मॅडम” म्हणत तिने पुढील पेशंटला माझ्या केबिनमध्ये सोडलं.
सुनिता निनावे व तिचे यजमान माझ्यासमोर बसले. “काय त्रास होतो. ” “मॅडम आमच्या लग्नाला एक वर्ष होत आलंय. पण अजून बाळाची चाहूल लागली नाही. घरात आई-बाबांनाही नातवंडाचं मुख पाहण्याची तीव्र इच्छा वाढलीय.
“हे बघा, निनावे साहेब, एक वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही. अजून एक वर्ष आपण वाट पाहूया. दोन वर्षांच्या कालावधीतही अपयश आलं तर मग पुढील सगळ्या टेस्ट, उपायोजना आपण करूयात. “
“सुनिता तुझे चेकअप करूयात. ” नर्स ने सुनीताला टेबलावर झोपले. सुनिता मासिक चक्र व्यवस्थित सुरू आहे ना. त्यात काही अनियमितता तर नाही ना. ” “नाही मॅडम, मला कसलाही त्रास होत नाही. पोटात दुखत नाही की ब्लीडिंग चा त्रासही होत नाही. ” “गुड गुड, बाकी सर्व ठीक आहे. ” मी काही शक्तिवर्धक औषधे लिहून देते. आहार-विहार-योग्य व्यायामाचीही जोड असू दे. आणि मुख्य म्हणजे चिंता करू नकोस. काळजी करणं सोडून दे. “ऑल द बेस्ट” “येस मॅडम, ” सुनिता व तिच्या यजमानांचा चेहऱ्यावर हास्य पसरले.
काम आटोपून मी थोडी रिलॅक्स झाले. अर्थात असे निवांत क्षण माझ्या जीवनात फार कमी प्रमाणात येत. सातत्याने पेशंट, प्रसुती, दिवसाचे 24 तास मी जणू कामाला वाहिलेली होते. माझ्या दोन सखी भारती आणि रेखा या दोघींची मला खूप मदत व्हायची. बरीचशी जबाबदारी त्या सांभाळत. जणू माझा उजवा हातच होत्या ह्या दोघीजणी. “
“मॅडम कॉफी” भारती ने गरमागरम कॉफीचा मग माझ्या हाती दिला. माझ्या थकल्या भागल्या जीवाला ती कॉफी अमृता समान वाटली. “भारती, सगळ्या पेशंट ठीक आहेत. ” “होय मॅडम, रूम नंबर सात मधील पेशंटचं बाळ दूध पीत नाही हे तिचं म्हणणं ” “अगं मग बाळाच्या पायाला गुदगुल्या करा. त्याच्या कानाच्या चाफ्यावर हळूवार मसाज करा. कपाळावर मायेने हात फिरवा. बाळ लगेच दूध प्यायला सुरुवात करेल” “होय मॅडम, करते मी हे सगळं आणि मॅडम लेबर रूममध्ये एक पहिलटकरीण तळमळतेय. मी प्राथमिक स्तरावर तिची सर्वस्वी मदत करीत आहे. पण तिला काही वेदना सहन होत नाही आहेत. खूप आरडाओरडा करतेय. संपूर्ण हाॅस्पिटल दणाणलंय. आपण बघा मॅडम आता तिला ” ” ओ के, मी आलेच, वेळ पडली तर आँपरेशन थिएटर सुसज्ज ठेवा सिझेरियनसाठी. आपण नैसर्गिक सुटकेवरच भर देऊयात. सिझेरियन शेवटचा उपाय. “
मी पेशंटला स्टेथास्कोपनं तपासलं, तिचे व बाळाचे ठोकेही ठीक होते. ” हे बघ बाळ जन्माला येणार, ते आसुसलंय जगात पहिलं पाऊल टाकायला आणि तू त्याची मदत नाही करत. पोटात वेदनेची कळ उठली की तू ही प्राणपणानं शक्ती लाव. बाळाचा मार्ग सुकर होईल. ”
“आता नाही सहन होत डॉक्टर ताई. मी पाया पडते तुमच्या पण माझी सुटका लवकर करा. सिझर करा माझं. “
“अगं जगात बाळाचं पहिलं पाऊल पाहणं, त्याच्या संघर्ष पाहणं आणि त्याने फोडलेला पहिला टाहो ऐकणं हे तर प्रत्येक मातेचं आद्य कर्तव्य, नव्हे तो तिच्या जीवनातला सोनेरी क्षण. अशा सोनेरी क्षणाची साक्षीदार होण्याऐवजी झोपी जाऊन बाळाला जन्म देणार होय. तुला तपासलंय मी. नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. मग कशासाठी सिझेरियन करायचं. आणि ऑपरेशन नंतर दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती. जखमेचं दुरुस्त होणं, त्यामुळे येणारा अशक्तपणा, का ओढवून घेतेस”.
“नाही नाही डॉक्टर ताई. खूप त्रास होतोय मला तुम्ही करा माझं ऑपरेशन. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही”. मी तिला हलकेच थोपटून आश्वस्त केले.
“डॉक्टर ताई कशी आहे माझी मुलगी खूप त्रास होतोय हो. तिच्या वेदना ऐकल्याही जात नाहीत माझ्याकडून. “
“मावशी तुम्ही स्वतःही या दिव्यातून गेल्या आहात. आणि आज तुम्हीच घाबरताय. रीमा च्या नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. हे सगळं आपण तिच्या आणि बाळाच्या भल्यासाठीच करीत आहोत. थोडा धीर धरा. होईल सगळं व्यवस्थित. “