सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ मला नाही मोठं व्हायचं… भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
( मागील भागात आपण पाहिले – परीला माहीत होतं, आजोबा घरात सगळ्यात मोठे आहेत. त्यांना मोठी मोठीच कामं आवडतात. पण त्यांच्या हे कसं लक्षात येत नाही, की प्रत्यक्षात अनेक लोक हे काम करतात. त्यांचे मम्मी-पप्पा, किंवा आजी-आजोबा कधी त्यांना नको म्हणत नाहीत. मी कुठलंही काम करायचं ठरवलं, तरी ते कुणालाच आवडत नाही. हा माझ्यावर अन्याय आहे. शी:! सगळंच कसं वैतागवाणं. सगळंच कसं निराशाजनक!…. आता इथून पुढे )
या सगळ्या उहापोहात एक आठवडा सरला. अजूनपर्यंत एखादं नवीन काम परीला सुचलेलं नाही. आज शनिवार आहे. सगळे जण बाहेर फिरायला जाणार आहेत. ‘रॉयल ओंटेरियो म्यूज़ियम’ बघायला जायचा त्यांचा विचार आहे आणि ते गेलेही.
ते आत पोचले, तेव्हा सारं काही भव्य-दिव्य होतं. मोठमोठ्या मूर्ती काचेच्या उभ्या पेटीत सुंदर तर्हेमने सजवून मांडलेल्या होत्या. परी मात्र त्या सुंदर, संग्रहित वस्तूंकडे बघत नव्हती. तिचं लक्ष होतं त्या गाईडकडे. ती मोठ्या मधुर आवाजात, अगदी चांगल्या रीतीने तिथल्या वस्तूंचा इतिहास सांगत होती आणि सगळे जण अगदी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होते. त्या गाईडचे कपडेही खूप चांगले होते. काळा स्कर्ट. काळा ब्लेझर आणि गळ्यात लाल स्कार्फ. नेम टॅग गळ्यात घातलेला होता. एक नवा विचार परीच्या मनात वळवळू लागला. असेच हाय हीलचे बूट घालून आणि ‘परी’च्या नावाचा टॅग गळ्यात घालून ती गाईड बनेल.
संध्याकाळी सगळे घरी परतले. दिवसभर परीने जे काही ऐकलं, पाहीलं, ते तिला नानीला, म्हणजे मम्माच्या ममाला फोनवर सांगायचं होतं. ही तिच्यासाठी एक चांगली संधी होती. तिने समोर टांगलेला मम्मीचा ब्लेझर काढून घातला. हाय हीलचे बूट घातले॰ लोकरीची दोरी बनवून त्यात एक कागद घातला. त्यावर मोठ्या मोठ्या अक्षरात ‘परी’ लिहीलं होतं. आपला नेम टॅग गळ्यात घालून तिने सगळा जामानिमा पूर्ण केला आणि फोनवर व्हिडिओ चालू करून ती नानीशी बोलू लागली. अगदी गाईडप्रमाणे. जे जे तिने तिथे बघितलं होतं, ते ते तिने नानीला सांगितलं आणि तिने हेही नानीला सांगितलं की ती मोठी झाल्यावर गाईड बनू इच्छिते. हे ऐकल्यावर नानी खूप हसली. म्हणाली, ‘परी … खूप छान…. पण तुला गाईड का बनायचय? तुझी नानी प्रोफेसर आहे. बनायचं तर प्रोफेसर बन ना! खूप पैसे मिळतील.’ .
तिला अशी आशा होती, की तिची नानी तिला समजून घेईल. ती तिच्यावर खूप प्रेम करते. पण नाही… तिला वाटलं आपण चुकीचा विचार केला. नानीला कसं समजावून सांगावं की तिला माहीतच नाही, की प्रोफेसर कसे शिकवतात? मुलांना ते आवडतात की नाही? जर काहीच माहीत नसेल, तर त्याबद्दल ती कसा विचार करणार? परीचा काम करण्याचा उत्साह तिच्यासाठी एक कोडं बनून राहिला आहे. कसं सोडवावं हे कोडं?
परी विचार करते आहे. विचार करता करताच तिचं लक्ष समोर टेबलावर पसरलेल्या वॉटर कलर आणि क्रेयॉन्सच्या रंगांकडे जातं. तिला चित्र काढायला, पेंटिंग करायला सगळ्यात जास्त आवडतं. अगदीच बुद्दू आहोत आपण. आधीच का नाही बरं आपल्याला हे सुचलं, तिला वाटतं. चला, अजूनही काही फारसा उशीर झालेला नाही आहे. आता तिला असं काम सापडलय, जे काम तिने करणं सगळ्यांनाच आवडेल. मम्मी-पप्पा, तिला आणि छोटूला ‘आर्ट गॅलरी ऑफ ऑन्टेरियो’ ला एकदा घेऊन गेले होते. तिथे मोठमोठ्या चित्रांचं प्रदर्शन लागलं होतं. तेव्हा तिचे पप्पा तिला म्हणाले होते, ‘बघ बेटा रंगांची कमाल! कलाकाराचं कौशल्य बघ रंगांना किती सुंदरपणे सजवतं! कल्पना आणि रंगांच्या उत्कृष्ट मिलाफातून जन्म घेते चित्रकला.
अखेर तिने एक चांगलं काम शोधून काढलच तर. या कामाबद्दल कुणाचीच कसली तक्रार असणार नव्हती.
तिने आपल्या रिकाम्या वेळात एकामागून एक अनेक चित्रे बनवली आणि मम्मी-पप्पांना सांगितलं, ‘मी चित्रकार बनेन. हा माझा शेवटचा निर्णय आहे.’ मम्मी-पप्पांनी एकमेकांकडे पाहीलं आणि मग परीकडे पाहीलं. ती एकटक मम्मी-पप्पांकडे बघत होती. मग दोघे एकदम बोलू लागले की त्यांच्यापैकी एकजण कुणी तरी, परीला काही कळलं नाही. तिच्या कानातं आवाज येत होता, ‘ तू कलाकार तर आहेसच, बेटा! खूप छान चित्र काढलीयस तू! आम्हाला आवडली पण आपलं खास काम, फुल टाईम काम काही तरी वेगळं असायला हवं. कलाकाराला पार्ट टाईम ठेव. हा एक छंद असू शकतो. आपलं मुख्य काम नव्हे. जे फुल टाईम कलाकार असतात ते भुकेने मरतात.
फुल टाइम, पार्ट टाइम तिला काही कळलं नाही. भुकेने मरण्याची गोष्टही तिच्या गळ्याखाली उतरली नाही. कालपर्यंत तर ते त्या आर्ट गॅलरीत पाहिलेल्या मोठमोठ्या चित्रांची तारीफ करत होते. आज कशी भाषा बदलली?
परी उदास आहे. काम शोधण्याचा तिने खूप प्रयत्न केला. या मोठ्या लोकांचं बोलणं मोठं आहे. त्यांना कळतच नाही, की जे तिने बघितलय, जे तिला आवडलय, तेच काम ती करू शकेल नं? त्याचीच स्वप्नं ती बघू शकेल. जे तिने पाहीलंच नाही, किंवा पाहीलं, पण तिला आवडलं नाही, तर ते काम परी कशी करू शकेल? तिला पसंत असलेलं प्रत्येक काम हे लोक रिजेक्ट करतात.
आता परीने मोठं होण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला. ती छोटी आहे, तेच ठीक आहे. आपला दुधाचा दात ती शोधते आहे, म्हणजे तो पुन्हा लावता येईल.
– समाप्त –
मूळ हिंदी कथा 👉 ‘बडों की दुनिया में’ भाग – २ – मूळ लेखक – डॉ हंसा दीप
अङ्ग्रेज़ी भावानुवाद 👉 In the world of Elders Part – 2 – Translated by – Mrs. Rajni Mishra
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈