मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुरुदक्षिणा भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ गुरुदक्षिणा भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

अनुप कालपासून खूप बेचैन होता. काहीही करून त्याला आपल्या गावाला जावेसे वाटत होते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने गाव सोडले होते, खरे म्हणजे त्याला सोडावे लागले होते, आणि त्यावर त्याने आज ३८ वर्षे झाली तरी परत त्याच्या गावाला पाय लावले नव्हते. पण कालपासून त्याला आपल्या गावाची खूप आठवण येत होती.

हुशार असलेल्या अनुपने त्याची दहावीची परीक्षा मुंबईतच दिली. चांगल्या मार्क्सने पास झालेल्या अनुपला सायन्समध्ये प्रवेश मिळून इंजिनिअर बनता आले असते. पण त्याला गावच्या पाटीलसरांसारखे मास्तर व्हायचे होते म्हणून त्याने आर्ट्सला प्रवेश घेऊन, पुढील शिक्षण पुरे करून पदवी मिळाल्यावर कायद्याचे ज्ञान घेतले आणि वकील झाला. वकिली न करता त्याने पुढे एका शाळेत लहान मुलांना शिकवायला सुरवात केली. तीस वर्षांच्या पुढच्या प्रवासात त्याने कधी मागे वळून बघितले नाही. आपले घर आणि आपला संसार सांभाळून तो आता एका प्रतिष्ठित अशा कॉलेजचा प्रिन्सिपल झाला होता.

काल झालेल्या गुरुपौर्णिमेला त्याला भेटायला आलेल्या विद्यार्थाना बघून त्याला आपल्या गावच्या पाटीलसरांची आठवण झाली आणि तो बेचैन झाला होता. जेव्हा तो मुंबईला आला होता तेव्हा त्याला मुंबईचे काहीच माहित नव्हते. ‘ पाटीलसरांनीच त्यांच्या एका ओळखीच्या तनपुरेकाकांना एक चिट्ठी लिहून, त्यांना भेटायला सांगितले होते आणि तनपुरेकाकांनीच आपली पुढची सगळी सोय केली होती. आपली रहायची, शाळेतल्या ऍडमिशनची, खानावळीची सगळी सोय तेच बघत होते.’ आज एवढ्या वर्षांनी अनुपला आपला सगळा भूतकाळ डोळ्यासमोर येत होता. आपल्या आईवडिलांनी अचानकपणे एकाच वेळेला विहिरीत उडी मारून केलेली आत्महत्या. त्यानंतर १३ दिवसांनी पाटीलसरांनी आपल्याला मुंबईला पाठविणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या. त्यावेळेला आपल्या रहाण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च कोणी केला असेल, ह्या विचाराने तो ग्रासला होता आणि त्याने ठरविले आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही पाटीलसरांकडेच मिळतील आणि त्याने पाटीलसरांना भेटायला गावाकडे प्रस्थान केलं.

अचानक आलेल्या अनुपला सत्तरीच्या आसपास असलेल्या पाटीलसरांनी दारात बघितले आणि ते बघतच राहिले. अनुपने त्यांना विचारले, “पाटीलसर ?” अनुपने त्यांना ओळखले नसले तरी पाटीलसरांनी त्याला ओळखले होते. 

“अरे अनुप तू, हो हो , मीच पाटील. आज अचानक कसा गावाकडे फिरकलास. खूप वर्षांनी दिसतोयस. ये ये आत ये. ” पाटील सरांनी त्याला आपल्या छोटेखानी घरात आत यायला सांगितले. अनुपला पूर्वीचे त्यांचे घर काही आठवत नव्हते. त्या घरात मोजकेच सामान होते आणि पाटीलसर एकटेच दिसत  होते. आपल्याला एवढ्या वर्षानंतर भेटूनसुद्धा पाटीलसरांनी ओळखले कसे ह्याचे अनुपला आश्चर्य वाटले होते. पाटीलसर सत्तरीला पोचलेले असले तरी शरीराने एकदम फिट दिसत होते. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर घरातल्या पडवीत बसून पाटीलसरांनी बनविलेला चहा घेऊन अनुपने विषयाला सुरवात केली. ” पाटीलसर मला माझ्या बालपणीचे काहीच आठवत नाही. फक्त मी सातवीला असतांना  एके दिवशी तुम्ही मला एसटीमध्ये बसवून मुंबईला तनपुरेकाकांकडे एक चिट्ठी घेऊन पाठविले एवढेच आठवते. माझा त्यावेळच्या शिक्षणाचा, जेवणाचा, रहाण्याचा सगळा खर्च कोण करत होते? माझे आईवडील वारले आणि त्यांचे तेरावे झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही मला मुंबईला पाठविले होते. त्या दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या का केली ? मला काहीच माहित नाही. तेव्हा तनपुरेकाकांना मी खूप प्रश्न केले होते, पण त्यांनीही मला काहीच सांगितले नाही. ते फक्त तुमचा एकच निरोप नेहमी देत की,’ अभ्यास व्यवस्थित कर आणि मोठा हो.’  आज मी एका कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. खूप मुलांना मी गुरुस्थानी असलो तरी माझ्या कायम मनात हेच येत असते की, माझ्या ह्या आयुष्याला मार्ग दिलात तो तुम्ही. लहानपणापासून तुम्ही मला चांगली शिकवण दिलीत आणि दहावीला मला मुंबईला पाठविले. त्यामुळेच आज मला हे यश आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. सर तुम्ही माझे गुरु आहात. सर आज ह्या तुमच्या शिष्याला मोकळेपणाने सगळे सांगा. त्यावेळी कायकाय  झाले होते ते “. अनुपने पाटीलसरांना कळकळीने मनातले सांगितले. पाटीलसर जरा गंभीर झाले.

“अनुप तू मला खरंच जर गुरु मानत असशील तर मी तुझ्याकडे मागेन  ती गुरुदक्षिणा मला देशील का ?”

अनुपने लगेच उत्तर दिले, ” सर हे काय बोलणे झाले का ? सर तुम्ही काहीही मागा, मी खरंच देईन.”

पाटीलसरांनी पुढे बोलायला सुरुवात केली, ” ठीक आहे. मला वस्तूरूपात काहीही नको. मला तू फक्त एक वचन द्यायचे आहे की, मी जे काही सांगेन त्यानंतर तू ते फक्त ऐकून घ्यायचे आहे. त्याच्या मुळाशी जाऊन पस्तीस वर्षांपूर्वी गाढलेले मढे परत उकरून काढायचे नाहीस. बदल्याची भावना मनात न आणता तुझ्या भावी आयुष्याची वाटचाल तू चालू ठेवावीस. असे जर मला तू वचन देत असशील तरच मी तुला जे काही घडले ते सगळे सांगेन.”

— क्रमशः भाग पहिला

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उपरती— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ उपरती— ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

नणंद आजारी होती म्हणून तिला भेटायला निरुपमा हॉस्पिटल मध्ये गेली.

“ निरु,रोज येशील ना ग भेटायला? फार कंटाळा येतो ग इथे पडून पडून.” नणंद  तिला म्हणाली.

“ येईन की, त्यात काय….  मस्त आराम कर. लेक यायचाय का सिंगापूरहून?”

“ छे ग !त्याला कुठला वेळ बाई.” 

“ बरं.आता छान विश्रांती घे. मी येईन हं उद्या परत. “

निरुपमा लिफ्ट जवळ उभी होती. सहजच शेजारी बघितले, तर ओळखीचा चेहरा दिसला.

“ अग, तू संध्या तर नव्हेस? चारुशीलाची बहीण ? “

“ हो,ग, आणि तू निरुपमा ना? इकडे कशी ? “

“ अग माझ्या नणंदेची मायनर  सर्जरी झालीय, तिच्यासाठी येते मी.”

संध्या म्हणाली, “ निरुताई, प्लीज  चारूला भेटशील का? तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालाय. लवकरच आला लक्षात,

त्यामुळे काळजीचे कारण नाही. पुढच्या आठवड्यात तिची surgery आहे. भेटशील का तिला?” 

निरुपमा विचारात पडली. “ पण तिला चालेल का मी भेटलेले?”

“ भेट. बघ तरी काय म्हणते.” 

निरुपमा घरी गेली.जाताना तिच्या डोळ्यासमोर मागचा चित्रपट सरकू लागला—–

कॉलेजचे ते फुलपंखी दिवस. निरुपमा,चारू,पद्मिनी, असा सगळ्यांचा तो सुंदर ग्रुप होता. छान सकाळचे कॉलेज करावे आणि घरी यावे. कोणालाच शिक्षणाची फारशी ओढ नव्हती. लग्न होईपर्यंत डिग्री असावी,म्हणून घ्यायची, हाच विचार. निरुपमा भाबडी, अतिशय सरळ आणि दिसायला सुरेख होती. त्यातल्या त्यात धूर्त चारुच होती. स्वार्थ असेल तिथे चारू नेहमी पुढे. निरुपमाच्या हे लक्षात येत असे, पण ती दुर्लक्ष करायची.‘ जाऊ दे ना,कुठे बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचे,’ असे म्हणून सोडून द्यायची. निरुपमा आणि चारुच्या आर्थिक परिस्थितीतही खूप फरक होता.

निरुपमाचे आईवडील मध्यम वर्गीय तर चारुशीलाचे वडील चांगल्या पोस्टवर होतें आणि या दोघी बहिणीच.

दोघींनाही आपल्या  जरा उच्च परिस्थितीचा गर्व होताच.

एकदा पद्मिनीचा लांबचा भाऊ तिच्या घरी आला होता. त्याने निरुपमाला बघितले. पद्मिनीला म्हणाला, “ छान आहे ग तुझी मैत्रीण. दे ना ओळख करून.” –तो दुसऱ्या दिवशी कॉलेजवरच आला. कॅन्टीन मध्ये निरुपमा,पद्मिनी, चारू बसल्या होत्या. पद्मिनीचा हा भाऊ आर्मीमध्ये होता. त्याचा तो रुबाबदार युनिफॉर्म,  तलवार कट मिशी बघून मुली तर खुळ्याच व्हायच्या. रवीला– म्हणजे पद्मिनीच्या भावाला  हा अनुभव नवा नव्हता. चारुशीला तर सरळसरळ प्रेमातच पडलेली दिसली रवीच्या. पण रवीने तिच्याकडे सरळ दुर्लक्ष केले आणि निरुपमाशी बोलू लागला. चारुशीलाचा जळफळाट झाला. निरुपमाला रवी ‘ सहजच भेटलो ‘ असे भासवत भेटू लागला.

वेडं वय आणि हा रुबाबदार  पुरुष आपला अनुनय करतोय म्हटल्यावर  निरुपमा खुळावली. त्यांच्या भेटी वाढू लागल्या. पद्मिनीच्या हे लक्षात आले.

“ निरु, काय चाललंय तुझं? रवी बरोबर फार भेटी वाढल्यात वाटतं? माझा लांबचा भाऊ आहे, हे खरं,

पण सावध करतेय तुला. अजिबात धड शिकला नाही, मावशीने आणि काकांनी दिले आर्मीत पाठवून. चांगला बॉडीबिल्डर आहे,म्हणून झालाय सिलेक्ट तिकडे. अगदी सामान्य पोस्ट आहे त्याची. तू मुळीच मागे लागू नकोस ग त्याच्या– बघ बाई. मग नको म्हणू–पद्मिनीने सांगितले नाही.” 

त्या दिवशी,ती सहज  डेक्कन जिमखान्यावर गेली होती, तर तिला भास झाला की रवी आणि चारुशीला  मोटरसायकल वरून चालले आहेत.  दुसऱ्या दिवशी तिने चारुला विचारले, तर तिने साफ नाही म्हणून सांगितले.

रवीची सुट्टी संपली आणि तो निघून गेला. जाताना निरुपमाला भेटलाही नाही की  सांगितलेही नाही. निरुपमाला अतिशय वाईट वाटले.

सहा महिन्यांनी निरुपमाला पद्मिनीने सांगितले,” निरु, चारुशीलाचे लग्न ठरलंय रवीशी. तुला मी सांगितले होते ना,नुसता खेळवत होता तो तुला. बरोबर चारूने डाव टाकला. त्याला घरी बोलावून, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन केले त्याच्यासमोर. दोघे तसलेच उथळ. मूर्ख कुठले ! उलट तू सुटलीस त्याच्या जाळ्यातून. रडतेस कसली वेडे? बाबा बघतील त्या छान मुलाशी लग्न कर. तुझी या रवीपेक्षा खूप चांगला मुलगा मिळण्याची नक्कीच पात्रता आहे वेडे.

बघ. मी खरी मैत्रीण आहे ना तुझी? माझे शब्द खरे होतील बघ.” 

सहाच महिन्यात निरुपमाचे लग्न ठरले–महेंद्रशी. महेंद्र चांगल्या कंपनीत होता, आणि खूप शिकलेला होता।

भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल होता त्याचा. निरूपमाने महेंद्रला भेटून रवीबद्दल सगळे सांगितले.

महेंद्र हसला आणि म्हणाला “ होतं ग असं ! आता नाही ना काही तसलं तुझ्या मनात? जा विसरून ते काफ लव्ह !” 

निरुपमाला त्याचा उमदा स्वभाव अतिशय आवडला. नंतर ती तिच्या संसारात रमून गेली. सोन्यासारखी दोन मुले,  आणि सोन्यासारखाच महेंद्र, यात ती रमून गेली.

आणि आज किती तरी वर्षांनी  तिला चारुशीलाबद्दल समजले. दुसऱ्या दिवशी निरुपमा चारुला भेटायला गेली.

निरुपमाला बघून चारुला धक्काच बसला— “ निरु, तू? तू आलीस मला भेटायला?”

“अग हो चारू. माझी नणंद पालिकडच्याच रूममध्ये आहे. मी सहजच तुझे नाव वाचले रूमवर, म्हणून आले भेटायला तुला. कशी आहेस ग चारू तू ?”  चारुच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले—-

“ बघतेच आहेस मी कशी आहे ते. परवा माझे ऑपरेशन आहे. मला खूप भीती वाटतेय ग. निरु, मी तुझी अपराधी आहे.” 

” अग वेडे, कसली अपराधी आणि काय– तरुणपणातला वेडेपणा ग तो ! काय मनाला लावून घेतेस? ऑपरेशन झाले की आता मस्त बरी होशील बघ.” 

“ नाही निरु,मला बोलू दे. मी मुद्दाम तुझ्यापासून रवीला हिरावून घेतला. मला चांगलेच माहीत होते की त्याला तूच आवडत होतीस. तो तुझ्यावरच प्रेम करत होता .पण मी नाना प्रकारे त्याला भुलवले. पुरुषच तो ! अडकला माझ्या पाशात. मला आसुरी आनंद व्हायचा, तो तुला टाळून माझ्याबरोबर हिंडायचा तेव्हा. पद्मिनीने मलाही सावध केले होते.  पण तिच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केले. आणि लग्न केले रवीशी. पहिले काही दिवस बरे गेले,पण मग मात्र त्याचे खरे रंग दिसले मला. अतिशय उथळ, खर्चिक, दिखाऊ आणि कोणतीही जिद्द नसलेला रंगेल  माणूस आहे रवी. मी खूप  सहन केले पण माझीही सहनशक्ती हळूहळू संपलीच ग. एका घरात राहतो आम्ही, पण अजिबात  प्रेम नाही आमच्यात. आई बाबांनी माझ्या नावावर पैसे ठेवलेत म्हणून निदान त्याच्यावर अवलंबून तरी नाहीये मी. नाही तर कठीण होते माझे. मला आता पक्के समजले आहे की ,कोणाच्याही दुःखावर, तळतळाटावर उभा केलेला संसार सुखाचा होत नाही कधी. देवाने  शिक्षा म्हणून माझी कूसही रिकामी ठेवली. सगळ्या बाजूने मी हरले निरु.मला क्षमा करशील ना ग– प्लीज ?” –चारुशीला  ओक्साबोक्शी रडू लागली. 

निरुपमा तिच्या जवळ बसली. तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, “ काय ग हे वेडे. कुठल्या गोष्टी कुठे नेतेस.

असं काही नाही ग. माझ्या मनात असले काहीही नाही. त्यावेळी मलाही खूप वाईट वाटले होते हे कबूल करते मी.

पण मला महेंद्रसारखा उमदा जोडीदार मिळाला. माझी सोन्यासारखी मुले आणि संसार  कोणीही हेवा करावा असाच आहे. आणि आता मी आणि तूही पूर्वीचे सगळे विसरून जाऊ या. लवकर छान बरी होशील तू यातून. हे बघ – आता आपण असले हेवेदावे करायचे वय किती मागे टाकून आलोय ना. पूस बघू डोळे. माझ्या मनात आता काहीसुद्धा नाही ग मागचे कटुत्व. चारू, मी नेहमी तुला शुभेच्छाच देईन. चुकूनही मनात काहीसुद्धा ठेवू नकोस.” 

निरुपमा तिच्या खोलीतून बाहेर पडली. तिच्या मनात आले ‘ दैवगती तरी पहा, हे सगळे होण्यासाठी चारुशीलाला कॅन्सरच व्हायला हवा होता का ?’ निरुपमाला अगदी मनापासून खूप वाईट वाटले.

पण तितक्याच मनापासून चारुशीलासाठी प्रार्थना करण्याव्यतिरिक्त निरुपमाच्या हातात दुसरे काय होते?

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “पारूबाई…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “पारूबाई…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

सकाळी सव्वासहा.

घड्याळाचे काटे, काटा लगाऽऽ म्हणत सुसाट पळत सुटलेत.

मी मात्र ,सकाळ इतक्या लवकर कशी झाली ? म्हणत डोळे चोळतोय.

मागे स्वयंपाकघरातून ,कढईत पोहे ढवळल्याचा ‘वास’ येतोय.

डोळे ऊघडताच मला पारूबाई दिसते.

मला हात धरून ऊठवणं..

ब्रश करून आणणं..

आंघोळ घालणं.

ब्रेकफास्ट भरवणं.

दप्तर भरून , युनिफाॅर्म चढवणं..

हाताला धरून शाळेत पोचवणं.

दुपारी शाळेतून घरी आणणं.

भरवणं..

झोपवणं…

ऊठल्यावर चहा करून पाजणं.

ठिय्या मारून शेजारी बसणं.

मी अभ्यास करतोय की नाही ?..

शिकली नसल्यामुळे असेल कदाचित , शिक्षणाचं महत्व तिला खूप कळायचं.

त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत नो काॅम्प्रमाईज.

अभ्यास आवरला की मला ग्राऊंडवर घेवून जाणं.

ग्राऊंडवरनं घरी परत आणणं.

होता होता संध्याकाळचे सहा वाजायचे.

तोवर आई बाबा यायचे.

मग पारूबाईची सुटका व्हायची.

सकाळी सहा ते संध्याकाळी सहा.

पारूबाईशिवाय आमचं घर, घर वाटायचंच  नाही.

आई बाबा दोघंही नोकरी करणारे.

आई सकाळचा ब्रेकफास्ट करून आॅफिसला पळायची.

बाबा पण लगेचच.

मग स्वयंपाकघर पारूबाईच्या ताब्यात.

मला शाळेत सोडल्यावर, पारूबाई स्वयंपाक करायची.

डबेवाला यायचा.

आईबाबांच्या आॅफिसला डबा जायचा.

माझी शाळा कोपर्यावर.

मधल्या सुट्टीत पारूबाई, शाळेत डबा घेवून यायची.

संध्याकाळी आई आली की, चहाचा कप तयार .

आई सेटल झाल्याशिवाय पारूबाई कधीच गेली नाही.

पारूबाईच्या हाताला चव होती.

आईचीच…

नर्सरी ते बारावी .

पारूबाईनी माझे जगात सगळ्यात जास्त लाड केले.

मग काॅलेज.

नोकरी आणि लग्न.

माझी बायको पहिल्यांदा घरी आली, तेव्हा आईच्या बरोबरीने पारूबाईनेही ओवाळली तिला.

हळूहळू पारूबाई थकली.

मी किती सेल्फीश असेन बघा , इतक्या वर्षात पारूबाईच्या घरी कोण कोण आहे? याची कधी चौकशीही केली नाही.

पारूबाईला एकुलती एक मुलगी.

माझ्याहून लहान .

माझ्यापाठोपाठ तिचंही लग्न झालं.

आम्ही सगळे गेलो होतो

मी खरंच तिचा अपराधी आहे.

आईची सगळी माया पारूबाईने ,आमच्या घरावरच उधळलेली.

ती पोर बिचारी आजीच्याच खांद्यावर वाढली.

नवरात्रीला पारूबाईच आमच्या घरची सवाष्ण.

नाकात भलीमोठी नथ.

प्रसन्न चेहरा.

भलंमोठं कुंकू..

मला तर साक्षात  देवीच वाटायची.

 माझ्या लेकीचा जन्म झाला अन् पारूबाई रिटायर्ड.

दर एक तारखेला मी पारूबाईच्या घरी जायचो.

दोन हजार रूपये द्यायचो.

पारूबाईचं पेन्शन…

खरं, तिनं जे माझ्यासाठी केलं ,त्याचं मोल करताच येणार नाही…

तरीही..

या वेळी माझ्या लेकीला घेवून गेलो.

पारूबाई खूष.

लेक शहाण्यासारखी पाया पडली.

पारूबाईने तिच्या हातात दहा रूपयांची नोट ठेवली.

तीही खूष.

वाटेत , लेकीनं सहज प्रश्न विचारला .

बाबा , पारूबाईची जात कोणती ?

असे प्रश्न आठ वर्षाच्या मुलांच्या डोक्यात येतातच कसे ?

मला विलक्षण अपराधी वाटलं.

 मी जाम हादरलो.

 उत्तर मला माहित नव्हतं.

अन् त्याची गरजही नव्हती कधी.

मला कळेना , काय उत्तर द्यावं.

विचार करून म्हणलं..

“पारूबाईची जात ‘आई’ची..”

तिला पटलं.

नवीन आजी तिला आवडली.

 ती मनापासून हसली.

अन् मीही…

* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही *

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पितृपक्ष — अ.ल.क. ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? जीवनरंग ?

⭐ पितृपक्ष — अ.ल.क. ⭐सौ.शशी.नाडकर्णी-नाईक ⭐

अलक १-

नातू : आई,आज किती छान जेवण केलं आहेस! आणि किती प्रकार!

नात : आई,आज आजोबांचं श्राद्ध म्हणून हे केलंस ना? ह्यातलं काय  आवडायचं आजोबांना?

सून : नाही गं, राणी. मला माहीत नाही. बाबा लहान असतानाच आजोबा गेले. तर मी त्यांना कुठून बघणार? आणि त्यांची आवडनिवड मला कशी कळणार? मी आपली माझ्या मनाने करते आणि कावळ्याला ठेवते. एक ब्राह्मण वाढते. त्यालाच दान  करते. पितर तृप्त तर आपण सुखी .

नातू : अग आई, आजी तुला केव्हाची हाक मारतेय. तिला काय हवं ते बघ.

सून : त्यांचं काय? त्यांना किती केलं तरी त्यांचं समाधान नाही. ही म्हातारी स्वतः सुखाने जगायची नाही आणि मला जगू द्यायची नाही .

 

अलक 2-

सून : माझा चिनू अगदी गुणी आहे.  दोन वर्षाचा असला तरी किती समज आहे! माझ्या सुशिक्षित आईच्या तालमीत तयार झाला आहे. नाहीतर इकडे सगळाच उजेड!

मुलगा : उजेड काय आणि सुशिक्षितपणा काय?

आज  मी ज्या पदाला आहे आणि तू जी काही कामधंदा न करता ऐशारामात आहेस, ती त्याच अशिक्षित बाईने बाबांच्या मागे केलेल्या कष्टाची फळं आहेत..

14 वर्षानंतर

सून :चिनू इतका गुणी आहे. 10वीचा रिझल्ट लागला. त्याने देवाला पेढे ठेवले. लगेच बाहेर कावळ्याला तीन पेढे ठेवले.

चिनूची आत्या : अग तीन कोणाला?

सून : माझे बाबा, आणि तुमचे आई, बाबा. अगदी न चुकता तिघांची आठवण ठेवतो. माझी शिकवणच  आहे त्याला तशी!

चिनूची आत्या : पण आई असताना तर अडाणी बाई म्हणून तिच्या वासवाऱ्याला पण फिरकायचा  नाही.

सून : जाऊ दे,अहो ताई, तो इतिहास. गेलेल्या  माणसांची न चुकता आठवण ठेवावी अशी माझ्या आईची शिकवणच आहे.

 

अलक 3-

सून : राजा, जरा थांब ना आता कावळेदादा येतील  त्यांनी माम केले की आपण करायचे. तोपर्यंत थांब हा. सकाळी उठून इतका मन लावून स्वयंपाक केला पण कावळ्याचा पत्ता नाही.. सगळीकडे खाऊन सध्या भूक नाही वाटतं, नाहीतर रोज दहीभात  ठेवला तरी पटकन येतो.

नणंद : वहिनी, बघ पटतं का? राजाला भरव. सगळ्यांना वाढ. सगळे जेवले कि मग झटकन कावळा येईल. आज नानांचं श्राद्ध आहे. सगळे तृप्त झाले तरच नानांना समाधान. हा तर त्यांचा गुण. जिंदगीके साथ भी आणि जिंदगीके बाद भी जीवन आनंद नव्हे सदानंद (नाना )

आत्या आजी : होय ग सुनबाई, नानाचा पहिल्यापासून स्वभावच तसा. आम्हाला आईवडिलांच्या मागे एखाद्या बहिणीसारखं, आईच्या मायेने वागवले. तो आमचा भाऊ नाही ताई, आई सगळाच.

आणि काय गंम्मत सगळे जेवले आणि कावळा लगेच आला.

जित्याची खोड (गुणदोष )

मेल्याशिवाय  काय मेल्यावर पण जात नाही हेच खरं.

 

अलक ४-

भाऊ : ताई, अजून कसा ग कावळा येत नाही? मला जेवून ऑफिस गाठायचं आहे.

ताई : बाबांना मांसाहारी जेवणाची आवड ना म्हणून कावळा येते नसेल कदाचित. थांब हा मी बघते.

(ताई बाबांच्या फोटोसमोर उभी राहिली. हात जोडून डोळे मिटून म्हणाली “आजची वेळ हे जेवण घ्या. उद्या मटणाचे ताट ठेवीन.”)

आणि काय चमत्कार कावळा पटकन आला.

 

अलक ५-

फोटोतली आजी, फोटोतच बाजूला आजोबांना सांगते

आजी : आपण खरच  भाग्यवान तेव्हा पण जिवंतपणी मुलांनी, सुनांनी, नातवंडानी आपले हसतमुखांनी न कंटाळता केले.

मी इतके दिवस अंथरुणात होते पण कोणी कुरकुरले नाही. आळीपाळीने रजा एडजस्ट करुन आपल्याला सांभाळले. आता पण नातवंडे एकत्र येऊन आपल्या बद्दलच्या आठवणी कश्या काढतात. सुना आपल्या आवडीचे पदार्थ नं चुकता करतात. नाहीतर शेजारी बघा 

रानडेकाकूंच्या आजारपणात कोणाला वेळ नव्हता अगदी नातवंडाना सुद्धा. म्हणून २४तासाला दोन बायका ठेवल्या. ते पण रानडे काका, काकूंच पेंशन  होते म्हणून.

आणि काकू गेल्यावर काकांची सरळ वृद्धाश्रमात  रवानगी चक्क दोन वर्षे. तिकडेच त्यांचे बर्थडे साजरे करणे वगैरे तिकडेच.

आता कालपासून बघा सगळे एकत्र जमले आहेत. काय तर म्हणे त्या निमित्ताने  गेट टुगेदर. एरवी कुठे भेटायला मिळते.

पण एखाद्या कोजागिरीसारखे साजरे करतात रात्री  डी जे काय? लॉन्ग ड्राईव्हला जाऊन आली सगळी मंडळी. उद्या बाहेर ऑर्डर दिली. म्हणे कुठूनही पितरांची आठवण ठेवली कि झाले.

आपण भाग्यवान तेव्हाही आणि आताही

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ श्रद्धा आणि अनुभूती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ श्रद्धा आणि अनुभूती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

(डॉक्टर शैलेश मेहतां विषयी अब्दुल कलामांची एक व्हिडीओ क्लिप आहे….ती ऐकून ही गोष्ट लिहिली आहे.)

१३ वर्षापूर्वीची, २००९ ची गोष्ट आहे.

सोनुलीका….. सहा वर्षाची गोंडस गोल चेहऱ्याची मुलगी. दिसायला तिच्या बंगाली आईवर गेली होती. तिचे नाव जरी सोनुलीका ठेवले होते तरीही तिला सगळे सोनुली म्हणत. सहा महिन्यापूर्वी सोनुली शाळेत तिच्या दुसऱ्या मजल्यावरील वर्गात जाण्यासाठी जिना चढत असतांना अचानक चक्कर येऊन पडली.

 सोनुलीच्या आई वडिलांनी पुढचे सहा महिने चिंतेत काढले. खूप डॉक्टर झाले. अनेक चाचण्या झाल्या तेव्हा समजले की, सोनुलीच्या हृदयात रक्तपुरवठा नीट होत नव्हता. हृदयात रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे होते. शस्त्रक्रिया करूनही सोनुली वाचेल ह्याची शाश्वती कोणताही डॉक्टर देत नव्हता आणि अशातच सोनुलीच्या वडिलांना डॉक्टर शैलेश मेहता हे नाव सुचविले गेले.

 डॉक्टर शैलेश मेहता बडोद्यातील एक महान कार्डियाक सर्जन.  ओपन हार्ट सर्जरीसाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी किमान एक महिना आधी भेटीची वेळ घ्यावी लागते. सोनुलीच्या वडिलांनी काही ओळखी काढून डॉक्टर शैलेश मेहतांशी तडक संपर्क साधला आणि त्यांची एक आठवड्यानंतरची भेटीची वेळ नक्की केली.

 त्या आठवड्यात सोनुलीच्या आईने सोनुलीसाठी  मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि शिर्डीचे साईबाबा ह्या ठिकाणी जाऊन त्यांना सोनुली बरी होण्यासाठी साकडे घातले. घरी आल्यावर ती सोनुलीला नेहमी प्रसाद देऊन देवावरच्या श्रद्धेच्या काही गोष्टी सांगत असे. देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असतो आणि तोच आपला तारणहार आहे हे ती सोनुलीला निक्षून सांगत असे. सोनुलीच्या आईचा देवावरचा विश्वास, श्रद्धा ह्या स्वभावाच्या छटा छोटुल्या सोनुलीमध्येही आल्या होत्या. आतापर्यंत सोनुलीच्या एक लक्षात आले होते की आपल्याला काहीतरी मोठा आजार झाला आहे. पण आपले आई बाबा आणि देवबाप्पा आपल्याबरोबर असतांना आपण त्या आजारातून बाहेर पडणार ह्याची तिला खात्री होती.

 एक आठवड्याने सोनुली आणि तिचे आई बाबा डॉक्टर शैलेश मेहतांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर शैलेश मेहतांच्या मदतनीस डॉक्टरांनी सोनुलीची सुरवातीची प्राथमिक तपासणी केली. सोनुलीचे आधीचे रिपोर्ट्स आणि तिला दिलेली औषध ह्याची सगळी माहिती घेऊन तिची फाईल डॉक्टर मेहतांच्या रूममध्ये त्यांच्या टेबलवर ठेवली गेली. काही वेळाने सोनुलीचा नंबर आला तसे सोनुली आणि तिचे आईबाबा डॉक्टर शैलेश मेहतांच्या केबिनमध्ये गेले.

डॉक्टर मेहतांनी सोनुलीला झोपवून तिला तपासले. सोनुलीला तपासतांना डॉक्टरांनी सोनुलीलाही काही प्रश्न विचारून तिला बोलके केले. सोनुलीही मोकळेपणाने डॉक्टरांशी बोलत होती. सोनुलीला तपासून झाल्यावर डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट्स आणि पेपर्स बघायला सुरवात केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सोनुली आणि तिच्या आईला त्यांच्या केबिनमधून त्यांनी बाहेर पाठवले आणि सोनुलीच्या वडिलांना त्यांनी सोनुलीवर तातडीने ओपन हार्ट सर्जरी करायला लागेल आणि विशेष म्हणजे ते ऑपरेशन करूनही सोनुली वाचेल असे काही सांगता येणार नाही, तसेच ऑपरेशन करूनही फक्त १० टक्केच वाचायची शक्यता आहे, म्हणून ऑपरेशन करायचे आहे का नाही ह्याचा निर्णयही आत्ताच घ्यावा लागेल असे सांगितले.  सोनुलीच्या वडिलांनी डॉक्टरांना तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. आम्ही सोनुलीला तुमच्या हातात देत आहोत जे काय ठरवायचे आहे ते तुम्ही ठरवा, मी सगळ्या केसपेपर्सवर सही करून देतो असे सांगितले. डॉक्टरांनी एक आठवड्यानी ऑपरेशनचा दिवस ठरविला.

ऑपरेशनच्या दिवशी डॉक्टर ऑपरेशन रूममध्ये आले. ऑपरेशनरुममध्ये आल्यावर भुलीचे इंजेक्शन देण्याआधी आपल्या पेशंटशी बोलून त्याला धीर देण्याचा त्यांचा नेहमीचा  शिरस्ता असे. त्यामुळे आजही ते सोनुलीच्याजवळ गेले. सोनुली बेडवर झोपली होती आणी तिच्या चेहऱ्यावर चिंतेची किंवा काळजीची कसलीही छटा नव्हती. तरीही नेहमीच्या सवयीप्रमाणे डॉक्टरांनी सोनुलीला विचारले, ” सोनुली बेटा, कशी आहेस.”  सोनुलीने उत्तर दिले, ”  मी एकदम ठीक आहे. पण मला तुम्हाला काही विचारायचे आहे. डॉक्टरकाका आईने मला सांगितले आहे की, तुम्ही माझे हृदय ओपन म्हणजेच उघडे करणार आहात खरे आहे का ? ” डॉक्टरांनी सांगितले, ” हो, बेटा, पण तू काळजी करू नकोस, अशातऱ्हेने मी ते उघडून बघणार आहे की तुला काही दुखणार नाही “. “नाही, नाही काका मला अजिबात काळजी नाही, मला फक्त तुम्हांला  काही सांगायचे आहे ” सोनुलीने लगेच उत्तर दिले. ” मला आई नेहमी सांगते की, आपल्या हृदयात देवबाप्पा असतो. जेव्हा तुम्ही माझे हृदय उघडाल तेव्हा त्या हृदयातला देवबाप्पा तुम्हाला दिसेल. जेव्हा मी झोपून उठेन तेव्हा मला तुम्ही बघितलेला माझ्या हृदयातला देवबाप्पा कसा दिसतो तेवढे नक्की सांगा.” प्रथम डॉक्टर मेहतांना सोनुलीला काय उत्तर द्यायचे ते कळत नव्हते. जिचे ऑपरेशन सफल होण्याची शक्यता कमी आहे, जी आता भूल दिल्यानंतर परत उठेल का नाही हे सांगू शकत नाही तिला तिच्या हृदयात वसलेला देव कसा दिसतो ते सांगायचे ?….  ” नक्की नक्की बेटा” असे बोलून डॉक्टर त्यांच्या पुढच्या कामाला लागले.

ऑपरेशन टेबलवर सोनुली भुलीचे इंजेक्शन दिल्याने निश्चल झोपली होती. डॉक्टरांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या सगळ्या साथीदार डॉक्टरांना दक्ष राहण्यास सांगून ऑपरेशनला सुरवात केली. पुढील प्रत्येक क्षण महत्वाचा होता. काही वेळाने डॉक्टर सोनुलीच्या हृदयापर्यंत पोहोचले. हृदयात धमन्यांकडून रक्तप्रवाह होत नव्हता. डॉक्टरनी हृदयापर्यंत रक्त पोचण्यासाठी आधीच काही आराखडे तयार केले होते, पण ते आराखडे सगळे निष्क्रिय ठरत होते. खूप वेळ झाला असेल हृदयापर्यंत रक्तपुरवठा होत नव्हता. सगळे प्रयत्न करूनही रक्तपुरवठा होत नाही हे जेव्हा डॉक्टरांना कळले तेव्हा त्यांनी हार मानून सगळ्या टीमला सॉरी म्हणून ‘ सगळे संपले ‘ असे सांगितले. एक मिनिट झाला असेल डॉक्टर सोनुलीकडे नुसते बघत उभे होते. ऑपरेशनच्या आधीचे तिचे शेवटचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. देव हृदयात असतो असे तिच्या आईने तिला सांगितल्याने तिची खात्री होती, तिची श्रद्धा होती की तो आपल्याला वाचवणार. कुठे होता तो देव, आणि असता तर का नाही आला सोनुलीला वाचवायला. डॉक्टरांच्या मनात काहूर माजले होते. कधी नव्हे ते आज डॉक्टरांच्या डोळ्यातही पाणी आले होते. त्यांना सोनुली दिसत होती पण डोळ्यांतल्या पाण्यामुळे भुरकट दिसत होती आणि तेवढ्यात त्यांच्या सहकाऱ्याने सांगितले डॉक्टर हृदयात रक्त पुरवठा चालू झाला आहे. हो खरंच हृदयात रक्तपुरवठा चालू झाला होता. अनपेक्षितपणे काहीतरी वेगळे घडले होते. डॉक्टरांनी परत जोमाने ऑपरेशनला सुरवात केली. जवळ जवळ पुढचे तीन तास डॉक्टर ऑपरेशन करत होते आणि डॉक्टर शैलेश मेहतांनी सोनुलीची जी केस अशक्यप्राय वाटत होती तिच्यावर विजय मिळविला होता. सोनुलीची  ओपन हार्ट सर्जरी यशस्वी झाली होती. सोनुली वाचली होती.

सोनुली शुद्धीवर आली आणि काही वेळाने डॉक्टर शैलेश मेहता तिला भेटायला आले तसे सोनुलीने नजरेनेच त्यांना विचारले ‘ देवबाप्पा कसा होता ‘— तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले, ” सोनुली बेटा, तुझ्या हृदयातल्या देवबाप्पाला मी बघितला असे मी तुला सांगू शकत नाही. पण तुझ्या हृदयातल्या देवबाप्पाला मी अनुभवला नक्की. बेटा तू तुझ्या देवबाप्पावर असाच विश्वास आणि श्रद्धा कायम ठेव पण बाप्पाला शोधत बसू नकोस, तो कसा दिसतो ह्याचा विचार करत बसू नकोस. फक्त त्याला अनुभवत जा. मला खात्री आहे देव तुझ्याबरोबर कायम तुझ्या हृदयात असणार आहे.

——ह्या प्रसंगानंतर डॉक्टर शैलेश मेहता– महान कार्डियाक सर्जन हे ओपन हार्ट सर्जरी करायच्या आधी देवाचे स्मरण करतात.

——श्रद्धा असली की,  सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसत नसला तरी त्याची अनुभूती ही मिळतेच.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुनर्जन्म – भाग ३ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पुनर्जन्म –  भाग ३  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(‘‘हो गं. किती वाईट अवस्था झाली होती तुझी… जगतेस का मरतेस अशी… पण वाचलीस बाई.”) इथून पुढे —

‘‘ कशाला वाचले असं झालंय मला ताई. त्या बाळाबरोबर माझाही जीव गेला असता तर फार बरं झालं असतं.”

‘‘ असं बोलू नको बेबी. अगं नव्याने जन्म झालाय तुझा असं समज. तुला तुझं बाळ गेल्याचं किती दु:ख होत असेल, ते मी समजू शकते…”

‘‘ छे,छे… त्याचं दु:ख आजिबात होत नाहीये मला…” डॉ.स्नेहलला मध्येच थांबवत ती अगदी तिरीमिरीने म्हणाली. यावर स्नेहल काही बोलणार इतक्यात बेबीच पुन्हा बोलायला लागली…जरा जास्तच ठामपणाने —-

‘‘ अहो अशा बिनबापाच्या… शेंडा ना बुडखा म्हणावं अशा मुलांचं जगणं, म्हणजे जिवंत राहून रोज मरणंच असतं हो… मी स्वत: तशीच तर जगत आलेय् इतकी वर्षं… प्रचंड अगतिक होऊन… माझी आईही तशीच… बहीणही तशीच… आणि मीही… मेलेल्या माणसाचं जिवंत उदाहरण आहे मी… माझ्यानंतर त्या बाळीचा याच लाईनीत नंबर लागला असता की हो, त्यापेक्षा जन्मत:च सुटली … भाग्यवानच म्हणायची …” असं म्हणता म्हणता बेबी रडायला लागली… अगदी घळाघळ अश्रूंचे पाट वहायला लागले. इतके दिवस… नव्हे इतकी वर्ष मनात कोंडलेलं दु:ख, यातना, निराधारपणाची नकोशी आणि अतिशय वेदनादायक जाणीव, असहाय्यतेचा मनावर बाळगलेला प्रचंड दबाव…काय काय सांगत होते ते अश्रू… डॉ.स्नेहलने तिला थांबवलं नाही. नुसतीच तिच्या खांद्यावर…पाठीवर थोपटत राहिली. खरं तर तिला सुचतंच नव्हतं बेबीला काय आणि कसं समजवायचं… कसं शांत करायचं… पण ब-याच वेळाने बेबी आपणहूनच शांत झाली. स्नेहलने तिला पाणी प्यायला लावलं, आणि तिच्यासाठी कॉफी मागवली. आता तिचा चेहरा वेगळाच दिसायला लागला होता… ती हात जोडत स्नेहलला म्हणाली… ‘‘ ताई तुम्हाला एक विनंती करू का?…”

‘‘ अगं बोल ना… काही सांगायचंय् का? ”

‘‘ हो, तुम्ही ना, मला उद्याच इथून जायची परवानगी द्या… म्हणजे मनातल्या मनात द्या… मी इथून गुपचुप पळून जायचं ठरवलंय्…” 

‘‘ पण कुठे जाणार आहेस? ” — बेबीच्या या विचारापासून तिला ताबडतोब परावृत्त करावं असं स्नेहलला त्याक्षणी का वाटलं नाही, हे तिलाही कळत नव्हतं.   

‘‘ कुठेही जाईन… पण पुन्हा त्या ताईजीच्या नजरेलाही पडणार नाही, अशा कुठल्या तरी जागी. मला कल्पना आहे की तिची माणसं कधी ना कधी मला शोधून काढतील… सहजासहजी पैसे मिळवण्याचा मी एक मार्ग आहे ना तिच्यासाठी…”

‘‘ तुला कळतंय का बेबी, त्यांच्या हाती सापडलीस तर तुझे किती हाल करेल ती बाई, आणि तिची माणसं… असला काही वेडेपणा करू नको.”

‘‘ म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय का की मी पुन्हा त्या खाईत जाऊन रोज मरत रहावं… त्यापेक्षा मीच एका क्षणात माझा जीव देईन… माझ्या बहिणीसारखा…” बेबीचा आवाज नकळत चढला आणि डॉ.स्नेहल एकदम चपापली. बेबीला तिचाच संशय यायला लागल्याचं तिला जाणवलं. आता तिला कसं समजवावं हे स्नेहलला कळत नव्हतं. बेबी एकदम तिथून उठून तिरीमिरीने खोलीबाहेर पडली, आणि स्नेहल कमालीची घाबरून गेली. तिने पटकन् बाहेर जाऊन बेबीचा हात घट्ट पकडून तिला पुन्हा कॉटवर आणून बसवलं. ती खूपच अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट जाणवत होतं… स्नेहलची पाठ वळताच ती झटक्यात हॉस्पिटलमधून पळ काढणार, याची स्नेहलला खात्री वाटायला लागली होती…

… आणि क्षणार्धात वीज चमकावी तसा स्नेहलच्या मनात एक विचार चमकून गेला, आणि तितक्याच लगेच त्याचं रूपांतर निर्णयात झालं… बेबीच्या अगदी समोर बसून तिने तिचा हात हातात घेतला, आणि शांतपणे तिला विचारलं… ‘‘ बेबी तुला खरंच त्या नरकातून सुटका हवी आहे ना?” बेबीने मनापासून मान डोलावली. ‘‘ अगं मग त्यासाठी जीव देण्याची काय गरज आहे ? ” 

‘‘ मग दुसरं काय करू शकणार आहे मी, ज्यामुळे माझी तिथून सुटका होईल? ” 

‘‘ माझ्याकडे एक मार्ग आहे. शांतपणे ऐकणार असशील … विचार करणार असशील तर सांगते…” बेबीने आशेने तिच्याकडे पाहिलं… 

‘‘ हे बघ, मी आजच तुला इथून डिस्जार्च देते. पण माझी ड्यूटी संपेपर्यंत तू इथेच थांब. संध्याकाळी माझ्याबरोबर माझ्या घरी चल. मी आणि माझी आई, आम्ही दोघीच असतो घरी. आईला काय सांगायचं ते मी पाहीन. आणि तीही सगळं नक्कीच समजून घेईल, याची मला खात्री आहे. १५-२० दिवस तू माझ्या घरी पूर्ण विश्रांती घे. तोपर्यंत पुढच्या गोष्टींचा नीट विचार करता येईल आपल्याला. आणि एक सांगते… तू आमच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायला हरकत नाही. तू आयुष्यभर सुरक्षित रहाशील, आणि जुनं आयुष्य पूर्णपणे विसरून, एक नवं… वेगळं… ताणमुक्त आणि शांत, समाधानी आयुष्य जगू शकशील, अशी तुझी सोय करण्याची पूर्ण जबाबदारी माझी. तशी सोय नाहीच झाली, तर तू तुला वाटेल तितके दिवस… अगदी कायमचीही आमच्या घरी राहू शकतेस. पण पुन्हा जीव देण्याचा विचार मात्र कधीही मनातसुद्धा आणायचा  नाहीस.”

‘‘ ताई अहो कशाला माझं लोढणं आपणहून गळ्यात बांधून घेताय? माझा काय उपयोग होणार आहे कुणाला?”

‘‘ का नाही होणार उपयोग? माझ्या आईला, मला जमेल तशी मदत कर… जमेल तेवढ्या गोष्टी शिकून घे… अगदी लिहायला, वाचायलाही शीक…आई शिकवेल तुला. आहेस ना यासाठी तयार? पुढच्या आयुष्याचा नीट विचार कर ” बेबीने लहान मुलासारखी मान हलवली…

‘‘ मग झालं तर… चल, आता स्वच्छ आवरून तयार हो. माझी निघायची वेळ झाली की गुपचुप चलायचंस माझ्याबरोबर… आणि हो, इथल्या कुणालाही याबद्दल काहीही सांगायचं नाही… कळलं ? ”… डॉ.स्नेहल शांतपणे खोलीबाहेर पडली .. .. एका अनामिक समाधानाने.  

आणि बेबी … …

बेबीने पाठमो-या स्नेहलकडे बघत हात जोडले… ‘‘ देवा, मला कळत नाहीये की या ताईच्या रूपाने तू अचानक कसा काय प्रसन्न झालास माझ्यावर?.. तेही माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच… तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, आणि फेडू तर मुळीच शकणार नाही.”… आताही तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या, पण त्या होत्या कृतज्ञतेच्या–मन शांत, आश्वस्त आणि  नितळ झाल्याचं द्योतक असल्यासारख्या … आणि नमस्कार करून वर झालेला चेहराही आधीच्या बेबीपेक्षा वेगळाच वाटत होता… एका वेगळ्याच, आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेल्या आनंदाने, अनोळखी आशेने चमकणारा… जणू पुनर्जन्म झालेल्या बेबीचा. 

— समाप्त —

© मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुनर्जन्म –  भाग १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पुनर्जन्म –  भाग १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

कात्रज घाटातल्या गर्दीतून जमेल तशी वाट काढत स्नेहल तिची टू-व्हिलर दामटत चालली होती.

“अहो ताई जरा हळू जा— फुकट धडपडाल “ असं एकदोघांनी तिला ओरडून सांगितलं सुद्धा. पण तिचं कुठेच लक्ष नव्हतं. आज तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचायचंच होतं. आणि घाट संपल्यानंतर पुढे आणखी १२ कि.मी. वर ते हॉस्पिटल होतं, जिथे ती नुकतीच प्रत्यक्ष प्रॅक्टिस करायला लागली होती.—- हो– ती डॉ. स्नेहल– स्त्री रोग तज्ज्ञ.

कामाचा दांडगा उत्साह आणि सर्वांशीच असणारे आपुलकीचे वागणे, यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये तिचे नाव आदराने घेतले जाऊ लागले होते. त्यात तिच्या हाताला चांगला गुण  आहे असा लौकिकही मिळायला लागला होता. अगदी खूष होती ती. बाळाला जन्म देईपर्यंत वेदनेने व्याकूळ होऊन अक्षरशः आरडाओरडा करणारी स्त्री, स्वतःचे बाळ पाहताच, सगळे दुःख क्षणात कसे विसरते, आणि  कमालीच्या थकलेल्या तिच्या चेहेऱ्यावर आनंद आणि एक वेगळेच अनामिक समाधान जरा जास्तच ठळकपणाने कसे उठून दिसते, हे खरं तर ती प्रत्येक प्रसूतीच्या वेळी पहात असे. आणि अशा प्रत्येक वेळी तिलाही खूप आनंद आणि समाधान वाटायचं . 

पण आज मात्र तिच्या मनावर एक अनाहूत दडपण आलं होतं. नुकताच सातवा महिना लागलेली एक बाई काल रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असल्याचा फोन अगदी पहाटेच आला होता, आणि म्हणून तिला लवकरात लवकर पोहोचायचं होतं. 

स्कुटर पार्क करून जवळजवळ पळतच ती आत गेली. पटकन हात धुवून, ग्लोव्हज आणि एप्रन घालून ती लेबर रूममध्ये गेली— अतिशय कृश आणि अशक्त दिसणारी ती बाई बेडवर अक्षरशः तडफडत होती— बाई कसली– जेमतेम सोळा-सतरा वर्षांची मुलगीच होती ती.  डॉ. स्नेहल तिला तपासायला लागताच त्या मुलीने तिचा हात घट्ट धरून ठेवला— “ आता तुम्ही इथून जाऊ नका डॉक्टर— मला खूप भीती वाटतेय. “– आणि ती एकदम रडायलाच लागली. स्नेहल तिला धीर देत होती.

“ तुझ्याबरोबर कोण आलंय ? ” या प्रश्नाचं ‘ कोणी नाही ‘ असं मानेनेच उत्तर दिलं तिने. आता तिच्या कळाही मंदावल्या होत्या. बाळाचे ठोकेही नीट लागत नव्हते. नॉर्मल प्रसूती होईल अशी कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. आणि सिझेरिअनसाठी घरच्या कुणाचीतरी लेखी परवानगी घेणे भाग होते. इतक्या वेळात कुणीही तिची चौकशी करायला आले नव्हते. ‘ माझं नाव बेबी ‘ एवढंच ती सांगत होती. आडनाव सांगता येत नव्हतं. दहाबारा मिनिटांनी एक बाई कुठूनतरी आली आणि “ सुटली का नाही बया अजून ?” असं त्रासिकपणे विचारायला लागली. सिझेरियनसाठी सही द्या असं म्हटल्यावर एकदम भडकलीच. “ काही नको. त्याचा खर्च कोण करणार ? मरू दे मेली तर–कायमची पीडा टळेल एकदाची “— असं म्हणत ती बाई झटकन तिथून पसार झाली.

आता त्या मुलीची अवस्था फारच वाईट झाली होती. स्नेहलने क्षणभरच विचार केला– फॉर्मवर स्वतःच सही केली– आणि त्या मुलीला ताबडतोब ऑपरेशन-टेबलवर घेतलं. एक जेमतेम तीन पौंड वजनाची मृतावस्थेतली मुलगी जन्माला आली—’ पण ती जन्माला आली असं तरी कसं म्हणायचं ‘ हा तत्क्षणी मनात आलेला विचार स्नेहलने कसातरी दूर ढकलला. असे जन्मजात मृत मूल तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं — तिने महत्प्रयासाने स्वतःला सावरलं, आणि ती त्या मुलीकडे वळली. एव्हाना तिची अवस्थाही ‘ मरते की काय ‘ अशी झाली होती. पण स्नेहलने आता त्या मुलीला जगवण्यासाठी आवश्यक ते सर्व उपचार देण्यास सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत  तिच्या जिवाचा धोका टळला असल्याची खात्री झाली, आणि स्नेहल कितीतरी वेळाने आपल्या खोलीत जाऊन शांतपणे खुर्चीत रेलली.

पण तिचं मन मात्र आता जास्तच अस्वस्थ झालं होतं—‘ कोण असेल ही मुलगी? आणि तिला अशा अवस्थेत सोडून बिनदिक्कत निघून गेलेली ती बाई ? ती हिची आई नक्कीच नसणार — मग कोण असेल ? आणि आपल्याला तिच्या ऑपरेशनची जोखीम स्वीकारावी असं  अचानक का वाटलं ?– याबद्दल  मोठे डॉक्टर नक्कीच रागावणार होते, ते वेगळंच ‘—नियमात बसत नसलं तरीही त्या मुलीशी सविस्तर बोलायचंच असं तिने ठरवूनच टाकलं.

चार-पाच दिवसात त्या मुलीला खूपच बरं वाटायला लागलं. सगळ्याच पेशंटना जेवण-खाण हॉस्पिटलमध्येच दिलं जायचं, ते त्या मुलीसाठी फारच बरं झालं होतं, कारण तिला नुसतं भेटायलाही इतक्या दिवसात कुणीच आलं नव्हतं— आणि कदाचित त्या मुलीला त्यामुळेच लवकर बरं वाटायला लागलं असेल असं स्नेहलला उगीचच वाटून गेलं होतं. संध्याकाळी ड्युटी संपल्यावर स्नेहल  ठरवूनच तिच्या खोलीत गेली, आणि सहज चौकशी करावी तसं तिच्याशी बोलू लागली——

— आणि तिने तिची कहाणीच सांगायला सुरुवात केली—

‘‘ डॉक्टर त्यादिवशी तुम्ही मला माझं नाव विचारत होतात. काय नाव सांगितलं होतं मी?”

‘‘ बेबी… पण फक्त एवढंच सांगितलं होतंस.”

‘‘ हो. कारण तेव्हढंच नाव आहे माझं.”

‘‘ म्हणजे? आडनाव काय ते तरी सांग. ” 

‘‘ म्हणजे मला माझं आडनाव माहितीच नाहीये. कारण माझे वडील कोण आहेत हेच मुळात मला माहिती नाहीये. म्हणजे माझे वडील कोण? हे माझी आईसुध्दा बहुतेक सांगू शकली नसती.”

‘‘अगं…काहीतरीच काय ? ” डॉ. स्नेहल बुचकळ्यात पडली. 

‘‘ हो अहो, खरंच सांगते. कारण माझ्या मोठ्या बहिणीला असं बोलताना ऐकल्याचं मला आठवतंय् ना…”

‘‘ मोठी बहीण? मग कुठे असते ती…?”

‘‘ ढगात…”

‘‘अगं बाई, जरा नीट, मला कळेल असं सांगू शकतेस का काही?”

‘‘ हो सांगू शकते… खूप मोठी स्ष्टोरी आहे ती. पण तुम्हाला जमेल तेवढी थोडक्यात सांगते…”

आता डॉ.स्नेहलही जरा सरसावून बसली…

‘‘डॉ. मी तुम्हाला ताई म्हणू का?”… तिने अगदी अनपेक्षितपणे विचारलं, आणि का कोण जाणे, पण डॉ.स्नेहललाही लगेच ‘हो’ म्हणावंसं वाटलं. 

– क्रमशः भाग पहिला…

© मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

अनुभूति म्हणजे अनुभवच पण अलौकिक वाटावा  असा अनुभव. सुखद आश्चर्याचा स्पर्श जाणवणारा आणि असह्य दु:खावर अनपेक्षितपणे फुंकर घालावी तशी वेदना शमवणारा ! अनुभूतीचे असे स्पर्श त्या अनुभवात लपलेल्या अनुभूतीच्या चैतन्यदायी प्रकाशाचेच स्पर्श असतात. असा अनपेक्षित स्पर्श जाणवताच मनोमन होणारे विश्लेषण अनुभूतीची साक्ष पटवणारे असते.

क्वचितच कधीतरी अकल्पितपणे एखादा क्षण जणू आपली परीक्षा पहायला आल्यासारखा समोर येऊन जेव्हा उभा रहातो तेव्हा त्या नेमक्या क्षणी आपल्या नैसर्गिक प्रतिक्रियेला आणि कृतीला  अनन्यसाधारण महत्त्व असते. हे असे प्रसंग मोजकेच असले तरी ते आपला कस पहाणारे असतात. त्या कसोटीला उतरणारे अर्थातच अनुभूतीत लपलेल्या अलौकिक आनंदाचे धनी होतात!

मी स्वतःला असा भाग्यवान समजतो कारण अशा अलौकिक आनंदाचे दान अनेक प्रसंगात माझ्या वाट्यास आलेले आहे. त्या अनुभूतीच्या आनंदाचे ठसे मी मनोमन जपून ठेवलेले आहेत!

मी युनियन बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रॅंचचा मॅनेजर म्हणून नुकताच चार्ज घेतला होता तो १९८८ मधला हा प्रसंग. मला अतिशय गूढ, अकल्पित,अतर्क्य अशी अनुभूती देणारा !

त्याचीच ही अनुभव कथा!

‘आनंदाचे ठसे…’ – भाग – ३ 

( पूर्वसूत्र- प्रत्येकाच्याच विचारांचा आणि मनोभूमिकांचा कस पहाणाऱ्या या प्रसंगांचे धागेदोरे भविष्यात घडू पहाणाऱ्या एका अतर्क्याशी जोडले गेलेले आहेत हे त्या क्षणी मला तरी कुठे ज्ञात होते?)

सुजाताची समजूत घालून मी तिला परत पाठवलं आणि टेबलवरचा कामाचा ढीग उपसायला सुरुवात केली. घडलेलं सगळं पूर्णतः विस्मरणात जाणं शक्य नव्हतंच तरीही कामांच्या वाढत्या व्यापात हे सगळे प्रसंग, त्यांची जाणीव, आणि आठवण सगळंच थोडं मागं पडलं. पण त्यांची पुन्हा आठवण व्हायला माझ्या आईचं अचानक माझ्याकडे रहायला येणं निमित्त झालं.

माझ्या क्वाॅर्टर्स सर्व सोयींनी युक्त होत्या. तरीही फॅमिली शिफ्ट करणं शक्यच नव्हतं. मग वेकेशन्समधे बायको-मुलगा येऊन सलग रहायचे. तशीच अधून मधून कधीतरी बदल म्हणून आई यायची. आताही आई आली तेव्हा या सर्व घटना प्रसंगांना तीन आठवडे होऊन गेले होते. आई आली तेव्हा माझ्या खिशात फक्त शंभर-दीडशे रुपये होते आणि सेविंग्ज खात्यावर फक्त पाच रुपये! हे लक्षात आलं आणि तेच ‘लिटिल फ्लॉवर’चा प्रसंग आठवायला निमित्त झालं. आई दोन्ही वेळचा स्वैपाक घरीच करणार म्हणजे आवश्यक ते सगळं सामान तातडीने आणणं आलंच. माझी अडचण तिला मोकळेपणाने सांगायची म्हटलं तर घडलेलं सगळं रामायण सविस्तर सांगायला हवं. त्यामुळे पाच-सहा दिवसांनी पगार होणार असल्याने तोवर अत्यावश्यक तेवढ्याच वस्तू मी आणून दिल्यानंतर खिशात शिल्लक राहिली फक्त शंभर रुपयांची एक नोट!

“हे काय? एवढंच सामान?” रात्री जेवणाची तयारी करून ठेवल्यानंतर मी आणलेलं सामान आवरताना आई म्हणालीच.

“अगं,निकडीचं तेवढंच आणलंय. नंतर चांगल्या दुकानातून सवडीने महिन्याचं सगळं सामान आणून देईन”

“हो पण  चहाची पावडर नाही आणलीस ती?”

“अगदीच संपली नाहीये ना?”

“आज अरे घर मालकीणबाई येऊन भेटून गेल्या. संध्याकाळी पलीकडच्या कुलकर्णी आजी आणि वहिनी आल्या होत्या. त्या सगळ्यांना चहा केला ना त्यामुळे आता जेमतेम सकाळच्या दोघांच्या चहापूरतीच असेल.”

ही कुलकर्णी मंडळी पलीकडच्या पोस्टल-कॉलनीतच रहायची.त्यांचा मुलगा प्रमोद कुलकर्णी आमच्या बँकेच्या चाटी गल्ली ब्रँचमधे हेड-कॅशिअर होता. त्यामुळे ओळख झाली, विचार जुळले.आमचं रोज दिवसभर भेटणं व्हायचंच नाही म्हणून मग रात्री जेवणं झाल्यावर आम्ही दोघे कोपऱ्यापर्यंत पाय मोकळे करायला मात्र नियमित जायचो.

“आज प्रमोद आणि मी रात्री फिरायला जाऊ तेव्हा दुकान उघडं असलं तर मी घेऊन येईन. नाहीतर मग उद्या सकाळी नक्की आणेन” मी सांगून टाकलं.खरंतर प्रमोद बरोबर असताना फक्त शंभर ग्रॅम चहापूड कशी मागायची म्हणून मी ते टाळणारच होतो.

पण झालं भलतच.रात्री जेवण  आवरून मी हात धुतले तेवढ्यात प्रमोदची हांक आलीच. मी आईला सांगून निघालो.

“येताना चहा पावडर विसरू नको रेs आण आठवणीनं.” प्रमोदसमोरच आईने सांगितलं. मी ‘हो’ म्हणून वेळ मारून नेली.

कोपऱ्यापर्यंत निवांत फिरुन नेहमीप्रमाणे परत यायला वळणार तोच प्रमोदने मला थांबवलं.

“सर, चहाची पावडर घ्यायची होती ना? ते बघा दुकान उघड आहे. चला..” म्हणत तो जाऊ लागला. त्याच्या मागे मी.

“किती? पाव किलो?” त्यानेच विचारलं. नाईलाजाने मी चालेल म्हणालो आणि खिशातली एकमेव शंभर रुपयांची नोट दुकानदारापुढे केली.

“मोड नाहीये दादा.२५ रुपये सुट्टे द्या ना” दुकानदार म्हणाला. माझ्या ते पथ्यावरच पडलं.

“हो का?सुटे नाहीयेत. राहू दे” मी विषय संपवणार तेवढ्यात प्रमोदने माझ्या हातातली शंभर रुपयांची नोट वरच्यावर काढून घेतली.

” त्या समोरच्या टपरीवर मोड मिळेल सर. तो माझा मित्रच आहे. आलोच मी ” मला कांही बोलताच येईना.आता तिथे त्याला मोड मिळूच नये असा विचार मनात डोकावून गेला तेवढ्यात प्रमोद आलाच.२५ रुपये परस्पर दुकानदाराला देऊन त्यांनी चहाचा पुडा घेतला आणि त्याबरोबर राहिलेल्या नोटाही घडी करून माझ्याकडे सुपूर्द केल्या.

हा वरवर दिसायला किती साधा प्रसंग. पण तोच पुढे स्पर्शून जाणाऱ्या अनुभूतीचे पूर्व नियोजन होते हा विचार आता हे सगळं लिहिताना मनात डोकावतोय आणि त्या विचाराच्या स्पर्शानेच मी भारावून गेलोय.. तसं पाहिलं तर काही दिवसांपूर्वी घडून गेलेल्या ‘लिटिल फ्लाॅवर’ एपिसोडशी या प्रसंगाचा अर्थाअर्थी कांही संबंध असणं शक्य तरी वाटतं का? पण तसा तो होताच एवढं खरं.

यानंतर चारच दिवसांनी पुढची पौर्णिमा होती.शनिवारी कामावरून मी निघणार होतो. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वीच बॅग भरून ठेवली होती.

“पहाटे किती वाजता उठवायचं रे?” आईने विचारलं

“पाच वाजता”

सकाळी लवकर जाऊन पेंडिंग कामं पूर्ण करायची तर पाचला उठणं आवश्यकच होतं. अंथरुणाला पाठ टेकताच गाढ झोप लागली.

अचानक कोणाची तरी चाहूल लागल्यासारखं वाटलं आणि मी जागा झालो.

“कोण आहे?”

“पेपर आलाय रे. इथे टीपाॅयवर ठेवतेय. पाच वाजलेत. ऊठ.”आई म्हणाली.

“पेपर?इतक्या पहाटे?” स्वतःशीच आश्चर्य करीत मी पेपर घेतला. सहज चाळू लागलो. माझी नजर एका पानावर अचानक स्थिरावली.पटकन् उठून मी पॅंटच्या खिशातून लॉटरीचं तिकीट बाहेर काढलं. त्या पेपरमधल्या मिनी-लॉटरीच्या रिझल्टनेच माझं लक्ष वेधून घेतलं होतं. हातातल्या तिकिटावरचा नंबर मी पडताळून पाहू लागलो.माझ्या तिकिटावरील शेवटचे तीन आकडे ४७५ असे होते आणि त्याला १००० रुपयांचं बक्षिस लागलं होतं ! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अनपेक्षित आनंदाच्या लहरींनी मी उत्तेजित झालो. कधी एकदा हे आईला सांगतो असे झालं आणि मी तिला हाका मारू लागलो. पण…? माझा तो हाका मारणारा आवाज आईपर्यंत पोचतच नाहीय असं मला वाटत राहिलं. दूरवर जाऊन प्रतिध्वनींमधे परावर्तित झाल्यासारख्या माझ्याच आवाजातल्या हांका मलाच ऐकू येत राहिल्या आणि मी अस्वस्थ झालो. मला कुणीतरी हलवून उठवतंय असा भास झाला न् मी दचकून जागा झालो.

“पाच वाजले.उठतोयस ना?” असं म्हणत आईच मला उठवत होती. मघाशी मी पाहिलं ते एक स्वप्नच होतं तर.खरंतर पहाटे पडलेले स्वप्न म्हणजे  शुभशकूनच.पण त्याचा आनंद क्षणभरच टिकला.’ मी कधी लाॅटरीचं तिकीट घेतलेलंच नाहीय तर बक्षीस लागेलच कसं?’ या मनात उमटलेल्या प्रश्नाचं माझं मलाच हसू आलं. ‘मनी वसे ते स्वप्न दिसे’ म्हणावं तर झोपताना मी लवकर उठून आवरायच्याच विचारात तर होतो. हे असलं सगळं मनात कुठं काय होतं?आणि तरीही? या अशा स्वप्नांना काही अर्थ नसतो असं वाटलं पण अर्थ होता.ते एक ‘सूचक’ स्वप्न होतं आणि त्याचा नेमका अर्थ अधिकच गूढ होत लवकरच माझ्यापुढे उलगडणारही होता !

त्यादिवशी कामं आवरून घरी जेवायला यायला दोन वाजून गेले.नशीब काल रात्रीच बॅग भरून ठेवली होती. समोरच्या हाताला येईल तो हॅंगर ओढला. घाईघाईने कपडे बदलले आणि बॅग घेऊन बाहेर पडलो. बस सुटता सुटताच कसाबसा आत चढलो. बसायला जागा नव्हतीच. हातातली बॅग वरच्या रॅकवर ठेवणार त्याआधीच कंडक्टर तिकिटासाठी गडबड करू लागला. मी खिशातून पैसे बाहेर काढले. पन्नास रुपयांची नोट कण्डक्टरच्या हातात ठेवली. तिकीट घ्यायच्या गडबडीत हातातल्या बाकी नोटा खाली पडल्या. त्या उचलायला खाली वाकलो तेव्हा लक्षात आलं, त्या नोटांच्या घडीत कसला तरी कागदही दिसतोय. नोटांबरोबर तो कागदही खिशात सरकवला आणि तोल सावरत उभा राहिलो.

नृसिंहवाडीला गेल्यावर प्रसादाच्या नारळाचे पैसे देताना लक्षात आलं तो साधासुधा कागद नव्हता. ते मिनी लाॅटरीचं ५० पैशांचं तिकीट होतं आणि आश्चर्य म्हणजे त्यावरच्या नंबरातले शेवटचे तीन आकडे ४७५च होते ! हे सगळं कसं घडलं याचा थांगच लागेना. मनात आश्चर्य होतं..हुरहूर होती.. उत्सुकता होती आणि अनामिक असा आनंदही! मनाच्या त्याच तरंगत्या  अवस्थेत नतमस्तक होऊन मी दत्तदर्शन घेतलं आणि पायऱ्या चढून वर आलो. बाहेर पडताना वाटेतल्या लॉटरी स्टॉलवर ते तिकीट दाखवलं.

“एक हजार रुपयांचं बक्षीस लागलंय बघा” स्टॉलवाला म्हणाला. ते ऐकताच मनातल्या मनात झिरपू लागलेला आनंद मला लपवताच येईना.

“तिकिटे देऊना?”

“नको.पैसेच द्या “मी म्हंटलं.

” दीडशे रुपये कमिशन कापावं लागेल”

” चालेल”

कमिशन वजा जाता राहिलेले ८५० रुपये त्याने माझ्या हातावर ठेवले आणि मी शहारलो. नेमके ८५० रुपयेच. माझा विश्वासच बसेना. तसाच तरंगत स्टॅंडवर आलो. कितीतरी वेळ हे सगळं स्वप्नच असेल असंच वाटत राहिलं.

पुढे खूप वेळानंतर मन थोडं स्थिर झालं तेव्हा ‘मी कधीच न काढलेलं ते लॉटरीचे तिकीट माझ्या खिशात आलंच कसं?’ हा प्रश्न मनात प्रथमच उभा राहिला. हे सगळं इतकं सविस्तर सांगायचं कुणाला?माझ्या मनातल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर देऊ शकेल असं होतंच कुठं कोण? शेवटी प्रमोद कुलकर्णी आमच्याच बँकेचा स्टाफ म्हणून मनातली अस्वस्थता कमी करण्यासाठी मी हे सगळं त्यालाच सांगितलं आणि तो थक्क होऊन माझ्याकडेच पहात राहिला क्षणभर.त्याने जे सांगितलं ते ऐकलं तेव्हा मनाला स्पर्शून गेलेला थरार मला आजही लख्ख आठवतोय!

त्यादिवशी माझ्या हातातली शंभर रुपयांची नोट घेऊन प्रमोद मोड आणायला समोरच्या टपरीवाल्या मित्राकडे धावला होता तेव्हा त्याला मोड मिळालीही होती. पण ते पैसे देताना त्याचा टपरीवाला मित्र त्याला सहज चेष्टेने “काहीतरी घेतल्याशिवाय मोड मिळणार नाही” असं म्हणाला होता आणि त्यावेळी प्रमोदने त्याची चेष्टा करायची म्हणून त्याच्या स्टॉलवरचं फक्त पन्नास पैशांचं एक मिनी लाॅटरीचं तिकीट घेतलं होतं. चहा पावडरचे पंचवीस रुपये देऊन राहिलेल्या नोटांच्या घडीत त्याने तेच तिकीट ठेवलेलं होतं!

हे सगळं असं आणि याच क्रमाने कसं घडलं? याचं तर्काला पटणारं उत्तर माझ्याजवळ नाहीय. पण या सगळ्याच प्रसंगांमध्ये एकमेकात गुंतलेले धागेदोरे आणि त्यांची वीण एवढी घट्ट होती की त्यात लपलेलं एक कालातीत सत्य मला लख्ख जाणवलं. दैनंदिन आयुष्यात सहज घडणाऱ्या साध्या घटना, प्रसंग आणि त्यांच्या क्रमांमधेही  कुणीतरी पेरून ठेवलेला कार्यकारणभाग असतोच. तो समजून घेणं आणि त्या ‘कुणीतरी’ पुढं मनोमन नतमस्तक होणं एवढंच आपण करायचं! चहा पावडर आणायची आठवण आईने नेमकी प्रमोद समोरच करणं, माझ्या मनात नसतानाही पुढाकार घेऊन त्यानेच मला त्या दुकानात घेऊन जाणं, तिथे मोड नाहीये हे समजताच त्याने समोरच्या टपरीवरून सुटे पैसे आणायला प्रवृत्त होणं, तिथे सहजपणे ते लॉटरीचं तिकिट विकत घेणं, नोटांच्या घड्यांत ठेवलेलं ते तिकिट अलगद माझ्या खिशात सुरक्षित रहाणं आणि हे काहीच ध्यानीमनी नसणाऱ्या मला ते सूचक स्वप्न पडणं आणि ते खरं होणं या सगळ्यामागे विशिष्ट असा कार्यकारण भाव नक्कीच होता!

” माय गॉड वील ऑल्सो  रिइम्बर्स माय लाॅस इन वन वे आॅर अदर’ हे अंत:स्फूर्तीने बोलले गेलेले माझे शब्द शब्दशः खरे करण्याची जबाबदारी ‘त्या’चीच होती आणि ती ‘त्या’ने  योग्य रितीने अशी पारही पाडली होती! एरवी हा निव्वळ योगायोग आहे असं म्हणेलही कुणी पण हे असंच घडणार असल्याची सूचक कल्पना अकल्पितपणे माझ्या मनात त्या पहाटेच्या स्वप्नाद्वारे ध्वनित होणं मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि तेवढंच अतर्क्यही. माझ्या अंतर्मनाचा कण न् कण शूचिर्भूत झाला असल्याची भावना त्या क्षणी त्या अलौकिक अशा अनुभूतीने माझ्या मनात अलगद पेरली होती जी मला अतीव आनंद देऊन गेली होती! त्या आनंदाचा ठसा आजही माझ्या मनावर आपल्या हळुवार स्पर्शाचं मोरपीस अलगद फिरवतो आहे  !!

– पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

अनुभूति म्हणजे अनुभवच पण अलौकिक वाटावा  असा अनुभव. सुखद आश्चर्याचा स्पर्श जाणवणारा आणि असह्य दु:खावर अनपेक्षितपणे फुंकर घालावी तशी वेदना शमवणारा ! अनुभूतीचे असे स्पर्श त्या अनुभवात लपलेल्या अनुभूतीच्या चैतन्यदायी प्रकाशाचेच स्पर्श असतात. असा अनपेक्षित स्पर्श जाणवताच मनोमन होणारे विश्लेषण अनुभूतीची साक्ष पटवणारे असते.

क्वचितच कधीतरी अकल्पितपणे एखादा क्षण जणू आपली परीक्षा पहायला आल्यासारखा समोर येऊन जेव्हा उभा रहातो तेव्हा त्या नेमक्या क्षणी आपल्या नैसर्गिक प्रतिक्रियेला आणि कृतीला  अनन्यसाधारण महत्त्व असते. हे असे प्रसंग मोजकेच असले तरी ते आपला कस पहाणारे असतात. त्या कसोटीला उतरणारे अर्थातच अनुभूतीत लपलेल्या अलौकिक आनंदाचे धनी होतात!

मी स्वतःला असा भाग्यवान समजतो कारण अशा अलौकिक आनंदाचे दान अनेक प्रसंगात माझ्या वाट्यास आलेले आहे. त्या अनुभूतीच्या आनंदाचे ठसे मी मनोमन जपून ठेवलेले आहेत!

मी युनियन बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रॅंचचा मॅनेजर म्हणून नुकताच चार्ज घेतला होता तो १९८८ मधला हा प्रसंग. मला अतिशय गूढ, अकल्पित,अतर्क्य अशी अनुभूती देणारा !

त्याचीच ही अनुभव कथा!

‘आनंदाचे ठसे…’ – भाग – २ 

(पूर्वसूत्र – एका गंभीर बनू शकणाऱ्या प्रश्नाचं हे सहज सोपं उत्तर होतं. म्हणून मग आठवड्यातले दोन दिवस बँकेत येताना मी स्वतःच  लिटिल फ्लॉवर काॅन्व्हेंट स्कूलमधे जाऊन स्वतः कॅश मोजून घेऊन कॅश व स्लीप बँकेत घेऊन येऊ लागलो)

काही दिवस हे सुरळीत सुरू राहिलं आणि तो अनपेक्षित प्रसंग घडला. एका शुक्रवारची गोष्ट. रिजनल ऑफिसच्या अचानक आलेल्या फोननुसार शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता मला ब्रॅंच-मॅनेजर्स मीटिंगसाठी कोल्हापूरला जावं लागणार होतं.रविवारी पौर्णिमा असल्याने सोलापूरला परतण्यापूर्वी माझ्या नित्यनेमानुसार नृसिंहवाडीला दत्तदर्शन घेऊन येणंही शक्य होणार होतं. मीटिंगची आवश्यक ती तयारी रात्री उशीरपर्यंत बसून पूर्ण केली.शनिवारी पहाटे उठून मी बॅग घेऊनच बाहेर पडलो आणि ‘लिटिल फ्लॉवर’मधे जाऊन पैसे मोजून ताब्यात घेतले.पैसे आणि स्लिप ब्रॅंचमधे जाऊन सुजाता कडे सोपवली.

“सुजाता नीट मोजून घे मगच मी निघतो”मी तिला सांगितलं.

ती ‘हो’ म्हणाली. मी केबिनमधे आलो. थोडा वेळ वाट पाहिली. मग न रहावून बॅग घेऊन बाहेर आलो.

“सर, खरंच निघा तुम्ही”

सुजाता म्हणाली तेव्हा माझी सुटका झाली.

कोल्हापूरची मीटिंग चांगली झाली. नृसिंहवाडीचं दत्त दर्शन निर्विघ्नपणे पार पडलं. घरी सर्वांना भेटणं,गप्पा मारणं, फिरणं झालं आणि नेहमीच्या चक्रात अडकण्यासाठी मी रविवारी रात्री उशिराची सोलापूरची बस पकडली. पहाटे साडेपाचच्या सुमाराला घरी पोचलो. साडेआठला ब्रॅंचमधे. रात्रभराच्या जागरणाचा शीण सोबत असल्याने उत्साह फारसा नव्हताच. पण जो होता तो उसना उत्साहही नाहीसा करणारं एक अशुभ आक्रित ब्रॅंचमधे माझी वाट पहात होतं.मी केबिनमधे जाताच माझीच वाट पहात असलेले सुहास गर्दे माझ्यापाठोपाठ केबिनमधे आले.

“गुड मॉर्निंग सर”

“गुड मॉर्निंग.कांही विशेष?”

“विशेष काही नाही सर. पण शनिवारी थोडा घोळच झाला होता”

माझ्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली.

“कसला घोळ?”

“लिटिल फ्लॉवरच्या कॅशमधे ८५० रुपये शॉर्ट होते.”

“अहो भलतंच काय?कसं शक्य आहे हे?”

“सर,खरंच.५० रुपयांच्या सतरा नोटा कमी होत्या”

एव्हाना सुजाता समोर येऊन खाली मान घालून उभी होती.

“सुजाता, हे काय म्हणतायत?”

“हो सर. ८५० रुपये शॉर्ट होते” तिचे डोळे नेहमीप्रमाणे पाझरू लागले. ती उभीच्या उभी थरथरू लागली. मला संताप अनावर होऊ लागला. मी काही न बोलता डोकं गच्च धरून क्षणभर तसाच बसून राहिलो. संतापाने भरलेल्या जळजळीत नजरेने तिच्याकडे पहात तिला जायला सांगितलं. डोळे पुसत ती केबिन बाहेर गेली. मी व्यवस्थित पैसे मोजून तिच्याकडे दिलेले असताना ८५० रुपये कमी येतीलच कसे? एखाद दुसरी नोट कमी असणंही शक्य नव्हतं आणि चक्क १७ नोटा कमी? मनातला संशयी विचार सुजाताच्या पाठमोऱ्या आकृतीचा पाठलाग करीत राहिला. तिची आर्थिक चणचण,कौटुंबिक प्रश्न,थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देत होतं. पण संशयाचा काटा मनात रुतण्यापूर्वीच मी तो उपटून दूर भिरकावून दिला. ‘नाहीs सुजाता असं कांही करणं शक्यच नाही..’ मनाला ठामपणे बजावून सांगितलं. पण मग ‘साडेआठशे रुपये गेले कुठे ‘हा प्रश्न होताच.

“सुहास, मला पूर्ण खात्री आहे. मी ती कॅश दोनदोनदा मोजून घेतली होती. त्या कॅशमधे फरक असणं शक्यच नाही. दुसऱ्या कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल. कांहीतरी गफलत  नक्कीच झाली असेल.हा प्रश्न धसाला लावलाच पाहिजे”

“त्याची खरंच काही गरज नाहीये सर. प्रॉब्लेम आता मिटलाय.पैसे वसूल झालेत.”.   

“वसूल झाले म्हणजे?कसे? कुणी भरले?”

“सर, मी ‘लिटिल फ्लॉवर’ला फोन करून त्याच दिवशी सांगितलं.तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेला आहात हेही बोललो. त्यांनी आढेवेढे न घेता लगेच पैसे पाठवले सर”

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना.मिस् डिसूझाना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा, पण माझाच हात थरथरू लागला. डायल न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं पण जाताना मात्र त्याच्याही नकळत तो मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून गेलाय असंच मला वाटू लागलं. कारण पैसे मोजून घेणारा मी होतो! मी शांतपणे डोळे मिटून मान मागे टेकून बसलो. स्वस्थता नव्हतीच. माझ्यासमोर उभं राहून मिस्  डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडेच पहातायत असा भास मला झाला आणि मी दचकून भानावर आलो. खूर्ची मागे सरकवून ताडकन् उभा राहिलो. काहीतरी करायला हवं होतं पण काय करावं ते सुचत नव्हतं. अस्वस्थ मनाला प्रकाश दाखवू पहाणारा एक विचार सळसळत वर झेपावला आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो.

“सुजाता, मी त्या दिवशी ‘आधी कॅश मोजून घे मगच मी जातो” असं तुला सांगितलं होतं ना?” तिने भेदरून माझ्याकडे पाहिलं. माझा चढलेला आवाज ऐकून सर्व स्टाफ मेंबर्स चमकून माझ्याकडे पहात राहिले. सुहास गर्देची बसल्या जागी चुळबूळ सुरू झाली.

“सुहास, कॅश शॉर्ट आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं?”

“सर, सुजाताच्या काउंटरला शनिवारी खूप गर्दी होती.त्यामुळे तुम्ही दिलेली कॅश बरोबरच असणार म्हणून तिने ती न मोजता तशीच बाजूला सरकवून ठेवली होती आणि सगळ्यांत शेवटी ती मोजली तेव्हा त्यात पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी असल्याचं लक्षात आलं”

“म्हणून मागचा पुढचा विचार न करता तुम्ही थेट मिस् डिसोझांना फोन केलात?”

“साॅरी सर “

त्यांच्यासमोर डोके आपटून घेण्यात काही अर्थच नव्हता. मिस् डिसोझांना तातडीने फोन करणं गरजेचं होतं पण माझं धाडस होईना. स्वतःच एखादा भयंकर गुन्हा केल्यासारखं मलाच अपराधी वाटू लागलं. त्यांना समक्ष जाऊन भेटणंच गरजेचं होतं. तेही आत्ताच. या क्षणी. पण जाऊन सांगणार काय? रिक्त हस्तानं जाणंही योग्य वाटेना. पगार व्हायला अजून बरेच दिवस अवकाश होता. त्या काळी ८५० रुपये ही कांही फार किरकोळ रक्कम नव्हती. आपल्या सेव्हिंग खात्यात पुरेसा बॅलन्स असेल? हा विचार मनात आला आणि मी खसखन् आमचं स्टाफ लेजर ओढलं. माझ्या सेव्हिंग खात्याचा फोलिओ ओपन केला. पाहिलं तर नेमका ८५५ रुपये बॅलन्स होता. त्या काळी पाच रुपये मिनिमम बॅलन्स ठेवायला लागायचा. मी लगोलग विथड्राॅल स्लिप भरून ८५० रुपये घेतले आणि बाहेरचा रस्ता धरला.

मिस् डिसोझांच्या कपाळावर सूक्ष्म आठी होती. चेहऱ्यावरचं स्मितहास्य विरून गेलं होतं. नेहमीची शांत नजर गढूळ झाली होती. त्यांनी समोर बसण्याची खूण केली.

“येस्..?”त्यांनी त्रासिकपणे विचारलं.”

“मी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो मॅडम. आज पहाटेच आलो. सकाळी  ब्रॅंचमधे गेलो तेव्हा सगळं समजलं. माय स्टाफ शुड नॉट हॅव रिकव्हर्ड दॅट अमाऊंट फ्रॉम यू. आय अॅम रियली सॉरी फॉर दॅट”

त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या.

“सोs.., नाऊ व्हॉट मोअर यू एक्सपेक्ट फ्राॅम अस?” त्यांनी चिडून विचारलं.

मी काही न बोलता शांतपणे माझ्या खिशातले ८५० रुपये काढले. ते अलगद त्यांच्यापुढे ठेवले.

“व्हॉट इज धिस?”

“त्यांनी तुम्हाला फोन करून ते पैसे रिकव्हर करायला नको होते. बट दे वेअर इनोसंट. त्यांची चूक मला रेक्टिफाय करू दे. प्लीज. तुमच्याकडून मी पैसे मोजून माझ्या ताब्यात घेतले त्या क्षणीच तुमच्यापुरता तो व्यवहार पूर्ण झाला होता. पुढची जबाबदारी मीच स्वीकारायला हवी.सो प्लीज अॅक्सेप्ट इट”

“बट व्हॉट अबाउट दॅट शाॅर्टेज? समवन ऑफ युवर स्टाफ मस्ट हॅव प्लेड अ मिसचिफ”

“नाॅट नेसेसरीली. ती एखादी साधी चूकही असू शकेल कदाचित. त्याचा शोध घ्यायला हवा आणि मी तो घेईन”

“इट मीन्स यू आर पेईंग धीस अमाउंट आऊटऑफ युवर ओन पॉकेट”

“आय हॅव टू”

त्यांच्या कपाळावरच्या आठ्या एकदम विरून गेल्या. गढूळ नजर स्वच्छ झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मी समाधानाने उठलो.निघणार   तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं.

“वेट अ मिनिट. लिसन मि.लिमये, फॉर मी हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो फ्रॉम अॅब्राॅड रेग्युलरली. तेव्हा ८५० रुपये ही रक्कम माझ्यासाठी खूप लहान होती. पण प्रश्न तत्त्वाचा होता. विश्वासाचा होता. तरीही विथ एक्स्ट्रीम डिससॅटिस्फॅक्शन त्यादिवशी मी त्यांच्या मागणीनुसार आठशे पन्नास रुपये पाठवले होते कारण त्या क्षणी आय डी नॉट वॉन्ट टू मेक इट अॅन इश्यू. इट्स नाईस यू हॅव कम पर्सनली.सोs नाऊ धीस मॅटर इज ओव्हर फाॅर मी. प्लीज डोन्ट वरी फॉर माय लॉस.आय ॲम शुअर माय गॉड वील गिव्ह इट बॅक टू मी इन वन वे आॅर अदर”

त्या मनापासून बोलत होत्या. पण मला ते स्वीकारता येईना.

“मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास वाटतो आहे. माय गॉड ऑल्सो वीर स्क्वेअर अप माय लाॅस  इन धीस आॅर दॅट वे. मी आत्ता हे पैसे स्वतः देतो आहे ते केवळ कर्तव्य भावनेने आणि फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. मला त्याचीच गरज आहे मॅम. प्लीज अॅक्सेप्ट इट…प्लीज”

त्या हसल्या.अव्हेर न करता त्यांनी ते पैसे स्वीकारले. तरीही ८५० रुपये गेले कुठे ही रुखरुख माझ्या मनात होतीच. पण तीही फार काळ टिकली नाही. कारण मी परत बँकेत येताच सुहास गर्दे सुजाताला घेऊन माझ्यापाठोपाठ माझ्या केबिनमधे आले. सगळी चूक सुजाताची होती आणि तिला ती कन्फेस करायची होती.

समोरची गर्दी कमी झाल्यावर त्या दिवशी सुजाताने लिटिल फ्लॉवरची कॅश मोजायला घेतली.पन्नास रुपयांची पॅकेटस् मोजायला सुरुवात करणार तेवढ्यात पेट्रोल पंपाचा माणूस नेहमीप्रमाणे ड्राफ्ट काढण्यासाठी कॅश भरायला आला. शनिवारचा हाफ डे.कॅशअवर्स संपत आलेले. त्याला तातडीने ड्राफ्ट हवा होता. सुजाता भांबावली. तिच्या रुटीन मेडिकल चेकअपची अपॉइंटमेंट असल्याने काम आवरून तिलाही निघण्याची घाई होती. त्यामुळे लिटिल फ्लॉवरची कॅश पूर्ण न मोजता तशीच बाजूला सारून तिने पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली. त्यात एक रुपयापासून शंभर रुपयांपर्यंतच्या नोटांचा खच. ती कॅश मोजून झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं त्यात ८५० रुपये जास्त आहेत. तिने पुन्हा सगळी कॅश मोजून खात्री करून घेतली आणि मग शिक्का मारलेली रिसीट आणि जास्तीचे आलेले ८५० रुपये पेट्रोल पंपाच्या माणसाला परत केले. त्यानंतर लिटिल फ्लाॅवरची कॅश मोजायला घेतल्यावर तिच्या लक्षात आलं की ती ८५० रुपयांनी कमी आहे. अर्धवट मोजून आधी बाजूला सरकवून ठेवताना त्यातल्या पन्नास रुपयांच्या सतरा नोटा अनवधानाने पेट्रोल पंपाच्या    कॅशमधे मिक्स झाल्या होत्या. म्हणूनच ती कॅश ८५० रुपयांनी जास्त येत होती. हे जाणवलं तेव्हा सुजाता घाबरुन गेली होती.

“पेट्रोल पंपावरचा माणूस रोज बँकेत येणाराच आहे ना?”

“नाही सर. रोज दिवाणजी येतात.शनिवारी ते नसल्याने दुसरा नोकर आला होता”

“हो पण मग प्रॉब्लेम काय? पेट्रोल पंपाचे मालक आपल्या ओळखीचे आहेत ना?”

सुहास गर्दे मान खाली घालून बोलू लागले,

“हो सर.मी इतर दोघा तिघांना घेऊन शनिवारी आधी त्यांच्याकडेच गेलो होतो सर पण.. पण त्या नोकराने सरळ हात वर केले.८५० रुपये सुजाताने दिलेच नव्हते म्हणाला. मालकांनी दमात घेतल्यावर पॅन्टचे खिसे उलटे करून दाखवू लागला. रडून भेकून कांगावा सुरू केलान्”

“म्हणून तुम्ही मिस डिसोझांना फोन केलात? ती चूक कॅश काउंटिंगमधल्या चुकीपेक्षाही जास्त गंभीर होती सुहास..” कशी ते मी त्यांना समजावून सांगितलं. तिथं मी गेल्यावर जे घडलं त्या सगळ्याची त्यांना कल्पना दिली. ऐकताना सुजाताची मान शरमेने खाली गेली होती‌. तिचे डोळे भरून आले होते. ती असहाय्यपणे उठली. थोडी रेंगाळली. मग केबिनचं दार ढकलून जड पावलांनी बाहेर गेली. पुन्हा आत आली आणि मुठीत घट्ट आवळून धरलेली शंभर रुपयांची नोट माझ्यापुढे करून उभी राहिली.

“सर”.. तिचा आवाज भरून आला. “तुम्ही होतात म्हणून त्यावेळी मला सांभाळून घेतलंत. माझ्याऐवजी तुम्ही स्वतः पैसे भरलेत. त्यावेळेस खरंतर ते मी  भरायला हवे होते पण तेव्हा तेवढे पैसे नव्हते माझ्याजवळ. पण आता दर महिन्याला असे थोडे थोडे करून मी ते परत करणाराय सर”.

मी मनातून थोडासा हललो. याच सुजाताबद्दल क्षणभर कां होईना पण माझ्या मनात संशय निर्माण झालेला होता या कल्पनेनेच मला अस्वस्थ वाटू लागलं.

नकळत घडत गेलेल्या प्रसंगांच्या या दीर्घ मालिकेचा हा समाधानकारक समारोप आहे असं मला वाटलं पण ते तसं नव्हतं. मी सुजाताची समजूत काढली. तिने पैसे परत करायची आवश्यकता नाहीय हे तिच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते पटेना. माझे म्हणणं नाईलाजाने स्वीकारल्यासारखी ती उठली. मला वाटलं या सगळ्याच प्रकरणाला मी अतिशय योग्य पद्धतीने पूर्णविराम दिलाय. पण तो पूर्णविराम नव्हता तर अर्धविराम होता हे मला खूप नंतर समजलं. कारण प्रत्येकाच्याच विचारांचा आणि मनोभूमिकांचा कस पहाणाऱ्या या प्रसंगाचे धागेदोरे भविष्यात घडू पहाणाऱ्या एका अतर्क्याशी जोडले गेलेले आहेत हे त्या क्षणी मला तरी कुठे ज्ञात होतं?

क्रमश:.. 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

अनुभूति म्हणजे अनुभवच पण अलौकिक वाटावा  असा अनुभव. सुखद आश्चर्याचा स्पर्श जाणवणारा आणि असह्य दु:खावर अनपेक्षितपणे फुंकर घालावी तशी वेदना शमवणारा ! अनुभूतीचे असे स्पर्श त्या अनुभवात लपलेल्या अनुभूतीच्या चैतन्यदायी प्रकाशाचेच स्पर्श असतात. असा अनपेक्षित स्पर्श जाणवताच मनोमन होणारे विश्लेषण अनुभूतीची साक्ष पटवणारे असते.

क्वचितच कधीतरी अकल्पितपणे एखादा क्षण जणू आपली परीक्षा पहायला आल्यासारखा समोर येऊन जेव्हा उभा रहातो तेव्हा त्या नेमक्या क्षणी आपल्या नैसर्गिक प्रतिक्रियेला आणि कृतीला  अनन्यसाधारण महत्त्व असते. हे असे प्रसंग मोजकेच असले तरी ते आपला कस पहाणारे असतात. त्या कसोटीला उतरणारे अर्थातच अनुभूतीत लपलेल्या अलौकिक आनंदाचे धनी होतात!

मी स्वतःला असा भाग्यवान समजतो कारण अशा अलौकिक आनंदाचे दान अनेक प्रसंगात माझ्या वाट्यास आलेले आहे. त्या अनुभूतीच्या आनंदाचे ठसे मी मनोमन जपून ठेवलेले आहेत!

मी युनियन बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रॅंचचा मॅनेजर म्हणून नुकताच चार्ज घेतला होता तो १९८८ मधला हा प्रसंग. मला अतिशय गूढ, अकल्पित,अतर्क्य अशी अनुभूती देणारा !

त्याचीच ही अनुभव कथा!

‘आनंदाचे ठसे…’ – भाग – १

रहिवासी क्षेत्रातली ती ब्रॅंच. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी कामांची सकाळी ८.३० ते १२ आणि दुपारी २ ते ६ अशी डबलशिफ्ट होती. ब्रॅंचमधे चालत पाच मिनिटात पोचता येईल इतक्या जवळच्या कृषीनगर कॉलनीत माझ्या क्वाॅर्टर्स. त्यामुळे जाण्यायेण्याचा त्रास काहीच नव्हता.या एका अनुकूल गोष्टीच्या तुलनेत तिथली आव्हाने मात्र दडपण वाढवणारीच होती. ते रहिवासी क्षेत्र असल्यामुळे कर्ज वितरण आणि ठेवी संकलन या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवणे ब्रॅंच मॅनेजर म्हणून माझ्यासाठी खूप अवघड आणि आव्हानात्मक होते.मी चार्ज घेऊन चार-सहा दिवसच झाले असतील आणि एक वेगळंच नाट्य आकार घेऊ लागलं !

त्या नाट्यातला मीही एक महत्त्वाचा भाग असणार होतो आणि माझी कसोटी पहायला निमित्त होणार होते ते माझेच स्टाफ-मेंबर्स आणि ग्राहक याची  मला त्यावेळी कल्पनाही नव्हती.     

नेमकं सांगायचं तर एका अलिखित नाटकाचं आमच्याकरवी ते जणूकांही नकळत घडणारं उत्स्फुर्त सादरीकरण असणार होतं जसंकाही!

ब्रँचमधे स्टाफ तसा पुरेसा होता. जवळजवळ सगळेच अनुभवी. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅश काऊंटरवरची  सुजाता बोबडे. नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे कामाची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे आत्मविश्वासाचाही अभाव. अर्थात हेडकॅशिअर श्री सुहास गर्दे नियमांवर बोट ठेवून काम न करता तिला स्वतःचे काम सांभाळून मदत करायचे म्हणून रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं एवढंच. एरवी सुजाताच्या वर्क-कॉलिटी बद्दल मी फारसा समाधानी नव्हतो. खरं तर कुठल्याच व्यक्तीबद्दलचे पूर्वग्रह मी जाणीवपूर्वक नेहमीच तपासून पहात असे.गप्पांच्या ओघात मला मिळालेली माहिती सुदैवाने माझे तिच्याबद्दलचे पूर्वग्रह बदलणारी ठरली होती. रिझर्व्हड् कॅटेगरीतून निवड होऊन एक वर्षापूर्वी ती ब्रॅंचला जॉईन झाली होती.लगेचच नात्यातल्या एका मुलाशी तिचं लग्नही ठरलं होतं. तो एमबीबीएस करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न करायला त्याच्या घरचे तयार नव्हते आणि तोवर थांबायला हिच्या घरचे. यातून मध्यममार्ग निघतच नाहीय असं पाहून त्या दोघांनीही एक धाडस केलं. घरच्या विरोधाला न जुमानता लग्न करायचं ठरवलं. त्याच्या घरच्यांना हे अर्थातच मान्य नव्हतं. खूप विचार करून त्यांनी मग परस्पर रजिस्टर लग्न केलं. त्याच्या शिक्षणाची आणि घर खर्चाची सगळी जबाबदारी सुजाताने स्वीकारली आणि वेगळं बि-हाड केलं. नवऱ्याचं शिक्षण आणि तिची तारेवरची कसरत सुरू झाली.नवऱ्याचं एमबीबीएसचं शेवटचं वर्ष होतं. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी-लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर आला होता! मी ज्या नाट्यपूर्ण प्रसंगाची आठवण सांगणार आहे त्यामध्ये हीच सुजाता बोबडे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार होती हे मात्र तेव्हा मला माहिती नव्हतं!

ब्रॅंचचा चार्ज घेऊन झाल्यावर मी महत्त्वपूर्ण ग्राहकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. माझ्या घरापासून ब्रॅंचपर्यंतच्या रस्त्यावरच असणाऱ्या ‘लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ चा नंबर मी मनोमन तयार केलेल्या महत्त्वपूर्ण ग्राहकांच्या यादीत सर्वात वरचा होता. या संस्थेच्या बचत खात्यात बरीच मोठी रक्कम शिल्लक असे. शिवाय आठवड्यातून दोनतीनदा तरी थोड्याफार रकमांचा भरणा त्यात नियमितपणे होत असायचा.

आमच्या लहान ब्रॅंचसाठी तर अशा ग्राहकांना सांभाळणे गरजेचेच होते. त्या दिवशी सकाळी थोडं लवकर निघून मी  मिस् डिसोझांना भेटण्यासाठी प्रथमच त्या संस्थेत गेलो. मिस् डिसोझा या तेथील प्रिन्सिपल कम् व्यवस्थापक. अतिशय शांत आणि हसतमुख. प्रसन्न चेहरा आणि आदबशीर वागणं. कॉन्व्हेट मधील स्टाफ नन्सची कार्यतत्पर लगबग आणि लक्षात यावी, रहावी अशी काटेकोर शिस्त मी प्रथमच अनुभवत होतो. प्रकर्षाने जाणवणारी प्रसन्न शांतता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच तेजोमय भासणारी येशूची मूर्ती माझ्या मनावर गारुड करतेय  असं मला वाटू लागलं!

मी स्वतःची ओळख करून दिली. मिस् डिसोझांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं. गप्पांच्या ओघात मी चांगल्या सहकार्य आणि सेवेबद्दल त्यांना आश्वस्त करून त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली तेव्हा मात्र त्या थोड्या गंभीर झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा लोपला. नजरेतलं हास्यही अलगद विरून गेलं. पण हे सगळं क्षणभरच. लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं आणि….

“सी.. मिस्टर लिमये…” त्या बोलू लागल्या.

आमच्या ब्रॅंचमधील सेवेबद्दल त्या फारशा समाधानी नव्हत्या.कोणताही आक्रस्ताळेपणा किंवा आदळआपट न करता त्यांच्या मनातली नाराजी त्यांनी अतिशय सौम्य पण स्पष्ट शब्दात आणि तेवढ्याच डिसेंटली व्यक्त केली.

हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आमच्या ब्रॅंचमधे आठवड्यातून दोन दिवस, हातातली कामं बाजूला ठेवून त्यांची स्टाफ-नन् पैसे भरायला बँकेत येई.साधारण २५-३० हजार रुपयांचा भरणा करून परत जायला तिला पंधरा-वीस मिनिटांऐवजी किमान दोन तास तरी लागत. घाईगडबडीच्या कामांमधला एवढा अनावश्यक दीर्घकाळ एका स्टाफला स्पेअर करणं मिस् डिसोझाना शक्यच नव्हतं. तत्पर सेवेची, सरळ-साधी अपेक्षा होती त्यांची आणि त्यात मी लक्ष घालावं अशी त्यांनी विनंती केली. बँकेतला एखादा कॅशियर पाठवून आठवड्यातले दोन दिवस इथून कॅश कलेक्ट करणं शक्य होईल कां असंही त्यांनी विचारलं. यातून मार्ग काढायचं आश्वासन देऊन मी त्यांच्या निरोप घेतला.

हा प्रसंग मॅनेजर म्हणून माझ्या दृष्टीने तसा साधा,नेहमीच घडणारा..पण यावेळी मात्र अचानक मिळालेल्या वेगळ्याच कलाटणीमुळे माझी कसोटी पहाणारं नाट्य निर्माण होणार होतं आणि त्यात सुजाता बोबडे इतकाच या मिस् डिसोझांचाही सहभाग असणार होता याची मला कल्पनाच नव्हती.

दोन कॅश काउंटर्सपैकी एक थोडा वेळ बंद ठेवून तो कॅशिअर स्पेअर करणं मला प्रॅक्टिकल वाटत नव्हतं.कारण तसं करायचं म्हटलं तरी इथे पाठवणार कुणाला तर त्या सुजाता बोबडेला.तेही तिच्या अशा अवस्थेत.मला ते रास्त वाटेना.त्यांची कॅश घ्यायला दोन दोन तास कां लागतात हे जाणून घ्यावे या उद्देशाने मी सुजाताला केबिनमधे बोलावलं.’लिटिल् फ्लॉवर’ चा विषय काढताच ती बावरली.

“त्यांची कॅश मी नाही सर सुहास गर्दे घेतात”

“कां?”

ती गप्प बसली. तिचे डोळे भरून आले.

“ठीक आहे.तू जा.सुहासला पाठव.मी त्याच्याशी बोलेन”

ती उठली. खाल मानेनं केबिनबाहेर गेली. त्या क्षणी मला तिचा भयंकर राग आला आणि तिची कींवही वाटली.

सुहास गर्देंकडून जे समजलं ते ऐकून मला आश्चर्यच वाटलं. प्रश्न मी समजत होतो तेवढा गंभीर नव्हताच. एरवी स्ट्रिक्ट डिसिप्लिन असणाऱ्या मिशनरी सिस्टीममधल्या ‘लिटिल फ्लॉवर’ मधील स्टाफ नन्स आणि मिस् डिसोझांनाही बँकिंग व्यवहारातल्या मूलभूत नियमांची प्राथमिक जाणही फारशी नव्हती. रोख भरणा करण्यासाठी आणलेल्या नोटा उलट सुलट कशाही लावलेल्या असायच्या. शिवाय पैसे भरायच्या स्लिपमधे नोटांचे विवरणही बिनचूकपणे भरलेले नसायचे. त्यामुळे या सगळ्या दुरुस्त्या स्वतः करून त्या स्टाफ ननसमोर पैसे मोजून घेताना तिला थांबायला तर लागायचंच शिवाय त्या कामात गुंतून पडल्यामुळे सुजाताच्या काऊंटरसमोर ग्राहकांची हीs गर्दी व्हायची आणि सुजाता भांबावून जायची. म्हणून मग ते काम सुहास गर्देने स्वतःकडे घेऊन सुजाताचा प्रश्न सोडवला आणि त्या स्टाफ ननला हे प्रोसेस वेळोवेळी समजावून सांगूनही काही उपयोग न झाल्यामुळे ‘लिटिल फ्लावर’ चा प्रश्न मात्र लटकूनच राहिला होता. तो आता मलाच पुढाकार घेऊन सोडवणं भाग होतं.

पूर्व नियोजित वेळ ठरवून मी पुन्हा मिस् डिसोझांची भेट घेतली. त्यांना या सर्व नियम व त्रुटी समजावून सांगितल्या. त्याचं महत्त्व विशद केलं. त्या दिवशीची भरणा करायची रोख रक्कम व स्लिप मागवून घेतली. त्यांनी स्टाफ ननलाही समोर बसवून सगळं समजून घ्यायला सांगितलं. नोटा कशा अरेंज करायच्या,कशा मोजायच्या व त्यांचं विवरण स्लिपमधे कसं भरायचं हे मी स्वतः करून दाखवलं.

“ही  कॅश आणि स्लिप मी आता घेऊन जातो. वेळ मिळेल तेव्हा स्टाफ ननला पावती घेण्यासाठी पाठवून द्या” असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला. कॅश व स्लिप बॅंकेत जाताच सुजाताच्या ताब्यात दिली. थोड्या वेळाने स्टाफ नन येऊन काऊंटर स्लिप घेऊन दोन मिनिटात परतही गेली. एका गंभीर बनू पहाणाऱ्या प्रश्नाचं सहजसोपं उत्तर सर्वांसाठीच सोईचं होतं हे लक्षात आलं आणि मग आठवड्यातून दोन दिवस बँकेत येताना त्यांच्याकडे जाऊन कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मीच ती बँकेत आणू लागलो.

क्रमश:.. 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print